मध्यरात्र उलटून गेली होती. तुफान पाऊस पडत होता. वादळ-वारा तर, "बाहेर पडू नका... काहीतरी अघटित घडेल..." असं सांगू पाहत होता. अशा वातावरणात निर्जन रस्त्यावरच्या एका बस स्टॉपवर एक जोडपं बसलं होतं. ती म्हणाली, "संजय, अरे इतका वेळ आपण इथे आहोत. पाऊसही वाढत चालला आहे. गाडी येईल का रे अशा वेळी..." संजय सभोवार नजर फिरवत म्हणाला, "वाट पाहण्याखेरीज आपण अजून काय करू शकतो... गाडी आली तर ठीक. नाही, तर आपलं नशीब..." ती थोडी उदास झाली. इतक्यात काही अंतरावर असलेल्या वळणावर प्रकाश दिसला आणि मागोमाग गाडीचा हॉर्न ऐकू येऊ लागला...
संजयने तिला तिथेच स्टॉपवर बसायला सांगितलं आणि स्वत: रस्त्यावर आला. डोळे किलकिले करत संजयने पाहिलं तर एक मोठी जीपवजा गाडी येताना दिसली. गाडीचे वायपर हलत होते. फ्रंट लाईटच्या प्रकाशात ड्रायव्हरला कोणीतरी हातवारे करताना दिसलं. गाडीचा स्पीड मंदावला. काही क्षणात काळ्या रंगाची टाटा क्वॉलीस संजयजवळ येऊन थांबली. काच खाली होताच संजयने आत पाहिलं. ड्रायव्हर आणि त्याच्या साथिदारासह अजून दोघंजण मागे बसले होते. संजय सर्वांना म्हणाला, "माफ करा. आमची गाडी बंद पडली. मी आणि माझी पत्नी कसेबसे चालत या बसस्टॉपपर्यंत पोहोचलो. पण आता पुढे जाववत नाही. तुम्ही आम्हाला पुढच्या गावापर्यंत सोडाल का..."
ड्रायव्हरने सर्वांकडे पाहिलं आणि होकारार्थी मान हलवली. संजयचा हात दिसताच ती धावत गाडीजवळ आली. त्या दोघांना मधल्या सीटवर बसवून बाकी दोघं सर्वात मागे जाऊन बसले. गाडी सुरू झाली आणि संजय बोलता झाला, "मी, संजय. ही माझी पत्नी वसुधा. आम्ही देवीला जात होतो तर गाडी बिघडली. बरं झालं तुम्ही भेटलात. नाहीतर या पावसात टिकाव धरणं मुश्कील झालं होतं..." मागे बसलेल्या दोघांपैकी एक म्हणाला, "तुम्ही बाहेर होता ते बरं होतं की इथे बसलात ते बरं झालं हे समजेलच आता..." त्याचं बोलणं संपतं न संपतं तोच त्याच्यासह बाकी तिघंही हसायला लागले. त्यांचं ते हसणं पाहून वसुधा घाबरली. गाडी रस्त्याच्या कडेला थांबली. वसुधा संजयचा हात पकडत म्हणाली, "स...संजय... आ...पण यांच्या स...सोबत नको जायला... चल उतरू..."
दोघं उतरणार इतक्यात ड्रायव्हरचा साथिदार वसुधाचा हात धरत म्हणाला, "चाललीस कुठे... या अशा वातावरणात तू इथे असताना आम्ही तुला कसे जाऊ देऊ... पळव रे गाडी आणि जाऊ दे सरळ जंगलात..." इशारा मिळताच ड्रायव्हरने अॅक्सलरेटर दाबला. गाडीने कर्कश आवाज करत वेग घेतला आणि बाजूलाच असलेल्या झाडीत शिरली. गाडी एका झाडाजवळ थांबली आणि पावसालाही भेदणारा आर्त किंकाळ्याचा आवाज व मागून येणाऱ्या भिबत्स हसण्याचा आवाज साऱ्या जंगलात घुमला. विजा चमकत होत्या आणि पाऊस गाडीवर तसाच कोसळत राहिला...
सकाळ झाली होती. गाडीच्या आस-पास वर्दळ दिसत होती. पोलीस तपास सुरू होता. "बोला, काय पाहिलंत तुम्ही..." इंस्पेक्टरने एकाला विचारलं. तो इसम म्हणाला, "काय सांगू सायेब... फाटं आम्मी कामावर जायाला निगालू आन वाटत ह्यो परकार दिसला बगा... त्यांची तसली हालत बगुनशान आम्माला तर काय बी बोलताच येईना..." इंस्पेक्टरने पुन्हा गाडीकडे पाहिलं. आत चार प्रेतं होती. त्या चौघांच्याही माना पूर्ण वळवलेल्या होत्या आणि डोळ्यांतून बुबूळं गायब होती. इंस्पेक्टर म्हणाला, "फार भयानक मरण आलं यांना... पण अशा प्रकारे यांचे खून झाले तरी कसे असतील..." बाजूलाच उभा असलेला हवालदार म्हणाला, "सर, या परिसरातली खुनाची ही दुसरी घटना...
तुमची नुकतीच बदली झाल्यामुळे तुम्हाला काही माहीत नाही याबद्दल. सहा महिन्यांपूर्वी याच भागात दोन मृतदेह सापडले होते. ते जोडपं होतं सर. तपासात समजलं, की मुलीवर...... मुलाला खूप मारहाण झाली होती. आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा छिन्न-विछिन्न अवस्थेत मुलीचं प्रेत जमिनीवर होतं तर मुलाचं प्रेत झाडाला बांधलं होतं. दोघांचेही गळे कापले गेले होते. बाजूलाच टायर मार्क दिसत होते. त्या प्रकरणाचा अजून सुगावा लागला नाही आणि आता हे..." इंस्पेक्टर विचार करत म्हणाला, "या दोन्हीही घटना कदाचित एकमेकांशी जुळत असाव्यात... मागच्या घटनेची फाईल पहायला हवी..." गाडी आणि प्रेतं पुढील तपासासाठी पाठवले गेले आणि इंस्पेक्टर व हवालदार चौकीवर आले...
फाईल मिळवून इंस्पेक्टर ती चाळू लागला, "हम्म्म... मुलाचं नाव होतं संजय आणि मुलीचं वसुधा... बिचारे... फिरायला जात असतील आणि हाकनाक बळी पडले..." मध्यरात्रीचा सुमार. पाऊस तसाच मी म्हणत होता. रस्त्याच्या कडेला असलेल्या बस स्टॉपवर दोघं उभी होती. ती म्हणाली, "संजय, अरे इतका वेळ आपण इथे आहोत. पाऊसही वाढत चालला आहे. गाडी येईल का रे अशा वेळी..." संजय म्हणाला, "वाट पाहण्याखेरीज आपण अजून काय करू शकतो... गाडी आली तर ठीक..." इतक्यात काही अंतरावर असलेल्या वळणावर प्रकाश दिसला आणि मागोमाग गाडीचा हॉर्न ऐकू येऊ लागला...
समाप्त.
No comments:
Post a Comment