रात्रीचा सुमार होता. पाऊस वातावरणाला झोडपून
काढत होता. निर्मनुष्य रस्त्यावरून आर्यन झपाझप पावलं टाकत होता. अधून-मधून तो
मागे वळून पाहत होता. मागे कोणीच नव्हतं पण आपला कोणीतरी पाठलाग करत आहे असा भास
आर्यनला होत होता. कसाबसा तो स्टेशनवर पोहोचला. आर्यनने घड्याळात पाहिलं.
पावसामुळे साडेनऊलाच त्याचं घड्याळ बंद पडलं होतं. त्याने स्टेशनवर सगळीकडे पाहिलं
कुठेही घड्याळ दिसत नव्हतं. आडगावातलं स्टेशन ते, क्वचित एखादी ट्रेन तिथे थांबते.
तिथे घड्याळ कुठलं असायला. किती वाजलेत हे कळण्याचा काहीच मार्ग नव्हता.
जिन्यालगतच्या एका बाकड्यावर आर्यन बसला. त्याचं सामान त्याने बाजूलाच ठेवलं आणि
एकदा सभोवार नजर फिरवली. पाऊस, अंधार आणि एकलकोंडं स्टेशन याखेरीज त्याच्या नजरेस
काहीच पडत नव्हतं. काही अंतरावर दिव्याखाली बाकावर कोणीतरी घोंघडी पांघरून बसलेलं
आर्यनला दिसलं. “ओ दादा... ओय... ओ भाऊसाहेब...” असं बसल्या जागेवरून आर्यन ओरडला.
घोंघडी फक्त सारखी झालेली आर्यनला दिसली...
आर्यन उठला आणि त्या घोंघडी पांघरलेल्या
व्यक्तीकडे जाऊ लागला. त्याच्याकडे येणारा वारा जणू त्याला सांगत होता, “थांब...
जाऊ नकोस तिथे... धोका आहे...” पण ती बाकावरील व्यक्ती एखाद्या चुंबकासारखी
आर्यनला आपल्याकडे खेचत होती. बाकाजवळ पोहोचताच पुढे वाकून आर्यन म्हणाला, “माफ
करा दादा... गाडी येऊन गेली का... का, येणार आहे अजून...” आवाज ऐकून बाकावर
बसलेल्या माणसाने घोंघडी सारखी केली आणि अंगाची मुटकुळी करून घेतली. ती व्यक्ती काहीच उत्तर देत नाही पाहिल्यावर आर्यन आपल्या सामानाकडे वळणार इतक्यात
वाऱ्यासरशी घोंघडी बाजूला झाली. आर्यनने पाहिलं तर ती एक मुलगी होती. साधारण
वीस-पंचवीस वयातली ती मुलगी असावी. दिव्याच्या अंधुक प्रकाशातही तिचं सौंदर्य खुलत
होतं. आर्यनला मोहित करत होतं. जरा वेळ तसाच त्या मुलीकडे पाहत आर्यन भानावर आला. म्हणाला
“माफ करा. मी चुकून तुम्हाला दादा, भाऊसाहेब म्हणालो. मला माहित नव्हतं तुम्ही
आहात. मी काही करू शकतो का तुमच्यासाठी...” त्या मुलीने पुन्हा घोंघडी सारखी केली
आणि अवघडल्यासारखी दिसली. आर्यन जाण्यासाठी वळला तेव्हा त्याला आवाज ऐकू आला, “एक
कप चहा...”
आर्यन पुन्हा मागे वळला. त्याने त्या मुलीच्या
जवळ जात तिला विचारलं, “क...काय म्हणालात... पुन्हा सांगा...” ती मुलगी घोंघडी
बाजूला करत म्हणाली, “एक कप चहा हवा आहे... थंडी वाजते आहे...” आर्यनने आजू-बाजूला
पाहिलं आणि आपलं सामान ती मुलगी बसली होती त्या बाकाजवळ आणत म्हणाला, “ठीक आहे. मी
करतो काहीतरी. पण माझं हे सामान जरा बघा हा...” आर्यनने सगळं स्टेशन पालथं घातलं
पण तिथे चिटपाखरूही नव्हतं. शोधत शोधत तो बाहेर आला. रस्त्याच्या कडेला एक चहाची
टपरी होती. एक कळकट माणूस त्यात पेंगत बसला होता. आर्यन टपरीजवळ गेला. त्या
माणसाला उठवत चहा बनवायला सांगितलं. आधी त्या माणसाने थोडे आढेवेढे घेतले पण
आर्यनने जास्त पैसे कबूल केल्यावर तो तयार झाला. चहा घेऊन आर्यन पुन्हा स्टेशनात
परतला. त्या मुलीजवळ जात आर्यनने चहाचा ग्लास तिच्यासमोर धरला. तिने स्मित केलं
आणि चहाचा ग्लास घेतला. “मी इथे बसलो तर चालेल का...” आर्यनने माफक सूर काढला.
त्या मुलीने पुन्हा सिमत केलं आणि सावरून बसली. दोघंही चहाचे घोट घेऊ लागले. काही
क्षण शांततेत गेल्यावर आर्यन बोलता झाला...
“काय वातावरण आहे ना... हा पाऊस तर थांबण्याचं
नाव घेत नाहीये. आणि अशावेळी असा गरमागरम चहा मिळाला तर किती छान वाटतं. बाय द वे,
मी आर्यन. आणि तुम्ही...” चहाचा एक घोट घेत ती मुलगी म्हणाली, “मी दिशा. या
स्टेशनवर न जाणो किती काळापासून एक कप चहाची वाट पाहत होते... आज योग आला...”
आर्यनला दिशाच्या म्हणण्याचा अर्थ नाही समजला. बुचकळ्यात पडल्यासारखा तो चहाचा घोट
घेऊ लागला. दिशाने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, “तुम्हाला समजलं नाही वाटतं
माझं म्हणणं. समजेल समजेल. ट्रेन तर येऊ देत...” पाऊस वाढत होता आणि दोघांच्याही
कपातला चहा संपत आला. आर्यन प्रश्न विचारत होता आणि दिशा तेवढ्याच तेवढं उत्तर देत
होती. आर्यनला दिशाचं ते बोलणं, तिचं तिथे असणं जरा खटकत होतं. इतक्यात कडाक्याची वीज
चमकली. आवाजासरशी दिशाने आर्यनला मिठी मारली. त्याचवेळी एक ट्रेन वेगाने
स्टेशनवरून गेली. दिशा आणि आर्यन दोघांनीही डोळे गच्च बंद करून घेतले. ट्रेन निघून
गेली तसं आर्यनने डोळे उघडले. त्याने पाहिलं तर दिशा तिथे नव्हती. त्याने
आजू-बाजूला पाहिलं पण कोणीच नव्हतं. आर्यन जागेवरून उठला आणि स्टेशनभर दिशाला शोधू
लागला...
त्याला दूरवर दोन माणसं बोलताना दिसली. आर्यन
त्यांच्या जवळ गेला तर एक टी.सी. होता तर दुसऱ्याच्या हातात हिरवा बावटा होता. आर्यन
म्हणाला, “अहो, तुम्ही इथे एका मुलीला पाहिलंत का... घाऱ्या डोळ्यांची अशी
पंचविशीतली ती मुलगी मागे बाकावर बसली होती. पाहिलंत का तिला...” तो टी.सी.
बाकाच्या दिशेने पाहत म्हणाला, “काय... बाकावर... आज पुन्हा... अरे देवा... हे
दुसऱ्यांदा झालं आहे. चल रे लवकर चल... दाखव मला...” तो टी.सी. आणि तो बावटाधारी
दोघंही बाकाकडे धावले. मागोमाग आर्यनही निघाला. धावता धावता, “कुठे चाललास
आर्यन... अरे मी इथे आहे...” हा आवाज आर्यनला ऐकू आला. त्याने मागे वळून पाहिलं तर
दिशा उभी होती. तिचे विस्कटलेले केस, पूर्ण पांढरे कपडे, मोठमोठे डोळे पाहून आर्यन
क्षणभर घाबरला. लगेच सावरत म्हणाला, “दिशा, अगं कुठे गायब झालीस क्षणात... मी तुला शोधायला गेलो तेव्हा तो टी.सी. दिसला.
मी त्याला...” दिशाने आर्यनच्या तोंडावर हात ठेवला. म्हणाली, “मी इथेच आहे आणि
इथेच राहणार... आणि आर्यन, तूही आता माझ्यासोबतच राहशील... कायमचा... नाही
समजलं...” दिशाने तिचा हात आर्यनकडे नेला. वरून पडणारं पावसाचं पाणी तिच्या
हाताच्या आर-पार जात होतं. नुसतं हाताच्याच नाही तर तिचं पूर्ण शरीराच पारदर्शक
दिसत होतं...
आर्यन चरकला. मागे मागे जाऊ लागला. दिशाने
त्याला थांबवलं आणि बाजूलाच असलेल्या काचेजवळ नेलं. काचेत आर्यनला त्याचं
प्रतिबिंबच दिसत नव्हतं. त्याचे डोळे विस्फारले. इतक्यात तो टी.सी. आणि तो बावटाधारी त्याच्या बाजूने गेले. टी.सी. म्हणाला, “काय अभद्र स्टेशन आहे हे... दोन
महिन्यांपूर्वी पंचविशीतली एक मुलगी त्या बाकावर मृतावस्थेत सापडली आणि आता हा
मुलगा... काय घडतंय इथे काय माहित. पण जे काही आहे ते फार अघोरी आहे... भयानक
आहे... अमानवी आहे...” आर्यन त्या दोघांच्या समोर उभा राहिला पण त्याचं अस्तित्व
त्या दोघांना जाणवतच नव्हतं. आर्यनच्या शरीराच्या आर-पार जात ते दोघं स्टेशनबाहेर
नाहीसे झाले. आर्यनने धावत बाकाजवळ जाऊन पाहिलं तर त्याचं सामान बाकाच्या बाजूला
होतं. बाकावर आर्यनचं मृतशरीर होतं. त्याची मान पूर्ण मागे वळली होती व डोळे बाहेर
आलेले दिसत होते आणि बाकाच्या बाजूला जमिनीवर होता एक कप चहा...
समाप्त.
No comments:
Post a Comment