संध्याकाळ सरत चालली होती. वादळ-वाऱ्यासह
कोसळणारा पाऊस वातावरणात एक भयावह गूढ निर्माण करू पाहत होता. बंगल्याच्या मागच्या
अंगणातल्या झोपाळ्यावर दामले काका बसले होते. हळू हळू झोका घेत ते सारखे घराकडे
पाहत होते. अचानक वीज चमकली आणि त्यांनी दचकून आभाळाकडे पाहिलं. म्हणाले, “काय
विचित्र, भयाण वातावरण आहे... संध्याकाळ आहे की रात्र तेच समजत नाही...” “समजेल
कसं हो... पावसामुळे अंधार किती पडलाय बघताय ना...” या आवाजाने आकाशाकडे लागलेली
त्यांची नजर खाली आली. बाजूला दामले काकू उभ्या होत्या. चेहरा शांत आणि हसतमुख
होता त्यांचा. त्या झोपाळ्यावर बसल्या. दामले काका म्हणाले, “अगं वसू होतीस कुठे
तू... मी कधींचा आलोय...” पायाने झोपाळा ढकलत दामले आजी म्हणाल्या, “इथेच तर
होते... जाणार कुठे... आता तुमच्याशिवाय मला आणि माझ्याशिवाय तुम्हाला दुसरं कोणी
आहे का... हे वातावरण काहीही म्हणो... पण आपली ही साथ अशीच राहील. याच झोपाळ्यावर.
नाही का...” दहा दिवसांपूर्वी...
"या साहेब या... बघा किती प्रशस्त हवेशीर
बंगला आहे. दुसऱ्या मजल्यावर बेडरूम्स आहेत..." बंगला दाखवणारा एजंट एका
माणसाला सांगत होता. तो पुढे काही बोलणार इतक्यात त्याचा फोन वाजला. फोनवर बोलत तो
एजंट बाहेर गेला. बंगला पहायला त्या माणसासोबत एक मुलगीही आली होती. ती म्हणाली,
"कित्ती छान आहे रे बंगला... आपलं लग्न झाल्यावर आपण इथे
राहणार या विचारानेच मी जाम खुश आहे..." ती बोलत असताना तिने त्याच्याकडे
पाहिलं. तो एकटक खिडकीबाहेर पाहत होता. तिने जवळ जाऊन पाहिलं, तर लॉनमध्ये असलेला झोपाळा हलत होता. “काय रे...
कुठे तंद्री लागली आहे...” त्याला हलवत ती म्हणाली. त्याने झोपाळ्याकडे बोट
दाखवलं. हलणारा झोपाळा पाहून तिलाही थोडं विचित्र वाटलं. ती लगेच म्हणाली, “अरे
वाऱ्याने हलत असेल. तू नको लक्ष देऊ...” ती जायला निघाली तर तो तिला थांबवत
म्हणाला, “वाऱ्याने... पण मग लॉनमधल्या झाडांची पानं का हलत नाहीत... जाऊन बघावं
का...”
नुकताच पाऊस पडून गेल्याने हवेत गारवा पसरला
होता. ओलसर लॉनमधून दोघं हळू हळू चालत झोपाळ्यापर्यंत गेले. झोपाळ्याच्या हलण्याचा
वेग मंदावला. एकाएकी झोपाळा एकदम स्थिर झाला. जसा झोपाळा थांबला तसे ते दोघंही
थांबले. काही क्षण तिथेच थांबून आपल्याला भास झाला असेल असं समजून दोघं वळली. थोडं
पुढे गेली आणि झोपाळा पुन्हा सुरु झाला. दोघांनी हळू हळू मान वळवली. झोपाळा हलका
हलका झोका घेत होता. पुन्हा तो अचानक थांबला. गवतावरून कोणीतरी चालत येतंय असं
वाटलं. अचानक दोघांनाही धक्का बसला. दोघं खाली पडली आणि लॉनवरून कोणीतरी पावलं
टाकत बंगल्याकडे गेलं. दार उघडलं गेलं आणि पुन्हा बंद झालं. दोघांनी एकमेकांकडे
पाहिलं. त्या थंड वातावरणातही दोघांनाही घाम फुटला होता. ती म्हणाली, “त...ते
क...काय होतं... क...कोण गेलं आ...त...” तोही चांगलाच घाबरला होता पण तिला धीर देत
सावरत म्हणाला, “काही समजत नाहीये... तू घाबरू नकोस. चल, आपण आत जाऊन पाहू...”
दोघंही हळू हळू बंगल्याच्या दिशेने जाऊ लागली...
बंगल्यात सगळीकडे सामसूम होतं. दाराबाहेर तो
एजंट फोनवर बोलत होता. ते दोघं इकडेतिकडे पाहत होते इतक्यात दार आपोआप बंद झालं.
वाऱ्याची झुळूक त्यांना चाटून गेली. त्या दिशेने दोघांनी पाहिलं तर आरशावर काहीतरी
लिहिलं जात होतं. दोघांनी जवळ जात पाहिलं तर, “निघून जा... परत येऊ नका...” ही
अक्षरं लाल रंगात दिसत होती. दोघंही खूप घाबरली. हात जोडत ती म्हणाली, “निघून
जातो. निघून जातो आम्ही. परत नाही येणार...” तिला दुजोरा देत तोही म्हणाला, “हो
हो... परत नाही येणार आम्ही. पण तो दरवाजा...” वाऱ्याची झुळूक पुन्हा त्यांना स्पर्श
करून गेली आणि लाथ मारल्यासारखा बाहेरचा दरवाजा उघडला. ती दोघंही मागे न बघता
बाहेर पळाली. तो एजंट परत येत असताना दोघंही त्याच्यावर आदळली. तो म्हणाला, “ठेवा
हे घर तुमच्याकडेच. आम्ही जातो...” दोघंही तिथून निघून गेल्यावर एजंट बंगल्याकडे
पाहत, “काय पनवतीवाला बंगला आहे... कधी पिच्छा सोडणार काय माहित...” असं म्हणत
निघून गेला. बंगल्याचं दार बंद झालं. लॉनकडचा दरवाजा उघडला गेला. झोपाळा पुन्हा
हलके हलके झोका घेऊ लागला...
मध्ये काही काळ निघून गेला. एजंटने पुन्हा धीर
करून बंगल्यासाठी ग्राहक शोधला. नवरा-बायकोचं ते जोडपं बंगला पहायला आलं. एजंट
त्यांच्यासह आत गेला. सर्व बंगला नजरेखालून घातल्यावर ती म्हणाली, “विशाल, कित्ती
छान आहे रे बंगला... बघ, मी तुझ्यासाठी किती लकी आहे... आपलं लग्न झालं आणि तुला
प्रमोशन मिळालं. या आनंदावर कळस म्हणून आता आपण हा बंगला घेत आहोत... ए, घेउया ना
हा बंगला... आई-बाबांनापण आवडेल अशा मोकळ्या जागेत रहायला...” लाडिकपणे विशालच्या
खांद्यावर डोकं ठेवणाऱ्या तिला थोपटत विशाल म्हणाला, “हो गं नेहा... घेऊ आपण हा
बंगला... मि. पवार, बंगला तर आवडला आहे आम्हाला. पण, या बंगल्याबद्दल बाहेर जे
बोललं जातं ते जरा विचित्र आहे. तुम्हाला काही माहित आहे का याबद्दल...” मि. पवार
म्हणाले, “तसं काही विशेष नाही साहेब. लोक काय आपलं उगाच काहीबाही सांगतात...” विशाल
बधत नाही हे पाहून उसासा टाकत मि. पवार म्हणाले, “या बंगल्याचे मालक प्रभाकर दामले
आणि त्यांच्या पत्नी वसुधा दामले यांचा मृत्यू या बंगल्यात झाला होता...
म्हणतात की प्रभाकर दामले यांच्या मुलाने
विक्रांतने हा बंगला बांधला. तो खूप खुश होता स्वत:चं घर झाल्यावर. पुढे कृतिका
नावाच्या मुलीशी त्याचं लग्नही झालं. घरात येणारी सून खूप चांगली होती. मनमिळाऊ
होती. पण वसुधा दामलेंना कृतिका अजिबात आवडत नसे. त्या तिला नेहमी पाण्यात
पहायच्या. रोजरोज होणाऱ्या कटकटी विक्रांतला सतावू लागल्या. त्यातच कृतिकाही या
सगळ्याला कंटाळून निघून गेली. विक्रांतला मानसिक धक्का बसला. त्याच वेळी त्याला
सिंगापूरला नोकरी लागली आणि या सगळ्यापासून दूर जायचं म्हणून विक्रांत तिथे निघून
गेला. या घरात प्रभाकर दामले आणि वसुधा दामले दोघंच उरली. कालांतराने विक्रांतला
खबर मिळाली की शॉक लागून वसुधा दामले आणि त्या धक्क्याने प्रभाकर दामले असे दोघंही
मरण पावलेत. नाही म्हणायला त्यांनी एक गोष्टमात्र केली, की विल करून बंगला विक्रांतच्या
नावे केला. आई-बाबा गेल्याचं दु:ख विक्रांतला होतंच शिवाय या घरात घडलेल्या वाईट
गोष्टींचा अनुभवसुद्धा गाठीशी होता त्याच्या. शेवटी न राहून विक्रांतने बंगला
विकायचं ठरवलं. विक्रांत निघून गेला आणि त्या दिवसापासून इथे विचित्र अघटित घटना
घडू लागल्या...”
सर्व ऐकून विशाल म्हणाला, “फार वाईट झालं हे.
सासू-सुनेमध्ये वाद होतात पण त्याची झळ मुलाला क्वचितच बसावी. आता आमच्याही घरात
कधी कधी आई व नेहामध्ये वाद होतात. पण इतर वेळीमात्र दोघीही अगदी मायलेकीप्रमाणे
असतात. दोघी एकमेकींचं कौतुक करता थकत नाहीत...” नेहा थोडीशी लाजत म्हणाली, “चल रे
विशाल, काहीतरीच तुझं. आपण आत्ता या दामले नवरा-बायकोबद्दल बोलत आहोत बरं का...
मला वाटतं कदाचित या दामले दाम्पत्याने त्या कृतिकाचा खूप छळ केला असणार म्हणून तर
ती अशी विक्रांतला सोडून गेली. बिचारा विक्रांत...” “खोटं आहे हे सगळं... असं
काहीच घडलं नाही...” विशाल, नेहा आणि मि. पवार बोलत असतानाच या दोन वाक्यांमागचे
दोन आवाज पूर्ण घरात पसरले. अचानक आलेल्या आवाजाने गोंधळलेले तिघंही इकडे तिकडे
पाहू लागले. इतक्यात वाऱ्याची झुळूक तिघांनाही स्पर्श करून लॉनच्या दिशेने गेली. लॉनचा
दरवाजा उघडला गेला. त्या वाऱ्याच्या झुळुकीमुळे आणि दारामुळे भयभीत झालेल्या मि.
पवारने, “बापरे... परत नाही परत नाही... वाचवा...” असं म्हणत थेट बाहेरचा रस्ता
धरला...
विशाल व नेहा एकमेकांचे हात धरून तिथेच उभे
होते. मि. पवारांना याचा अनुभव असला तरी या दोघांना हे नवीन होतं. त्यामुळे काय
करावं हे त्यांना सुचत नव्हतं. धीर करून विशाल व नेहा लॉनकडे चालू लागले. जसजसे ते
दाराजवळ आले तसतसा झोपाळा हलू लागला. दोघंही झोपाळ्याच्या जवळ पोहोचले आणि झोपाळा
एकदम स्थिरावला. नेहा प्रचंड घाबरली होती. तिला धीर देत विशाल म्हणाला, “कोण आहे
इथे... हे बघा असे छुपे खेळ करून आम्हाला घाबरवू नका...” काही क्षण गेल्यावर लॉनच्या
गवतावर पावलांचा आवाज आला. वाऱ्याची एक झुळूक दोघांनाही स्पर्श करून झोपाळ्याकडे
गेली आणि एक प्रखर पांढऱ्याशुभ्र प्रकाशाने विशाल व नेहा, दोघांचेही डोळे दिपले.
डोळे किलकिले करत दोघांनी पाहिलं तर झोपाळ्यावर बसलेल्या दोन आकृत्या त्यांना
जाणवल्या. हळू हळू प्रकाश कमी होत नाहीसा झाला. विशाल व नेहाने पाहिलं तर झोपाळ्यावर
एक वृद्ध जोडपं बसलं होतं. नेहाचे डोळे विस्फारले. थरथरत्या हाताने त्यांच्याकडे
बोट दाखवत ती कशीबशी म्हणाली, “त...तुम्ही कोण... आ...णि इ...थे कसे काय...” ते
वृद्ध जोडपं हसलं. त्यातला पुरुष म्हणाला, “घाबरू नका. आम्ही तुम्हाला काहीही
करणार नाही. हा बंगला विकत घेण्यासाठी, भाड्याने घेण्यासाठी आजवर इथे अनेक जण आले
पण तुम्ही पहिले आहात ज्यांच्या मनात आपल्या आई-वडिलांविषयी खरं प्रेम पाहिलं
आम्ही. आम्हाला तुमची मदत हवी आहे...”
विशाल व नेहाने एकमेकांकडे पाहिलं. त्यांचे
गोंधळलेले चेहरे पाहून तो माणूस म्हणाला, “मी प्रभाकर दामले. आणि ही माझी पत्नी
वसुधा दामले. आमचा प्रेमविवाह. आम्ही दोघंही अनाथ असल्याने कदाचित तोच आमच्यातला
दुवा ठरला असावा. आमची परिस्थिती बेताचीच होती. चाळीतल्या दीड खोल्यांमध्ये आमचा
संसार सुरू झाला. नोकरीत माझी प्रगती होत गेली, पगारवाढ झाली आणि त्याचं फळ म्हणजे
हा बंगला. या जागेवर आम्ही दोघांनी हा बंगला बांधला, सजवला. रोज संध्याकाळी मी
कामावरून येत असे आणि त्यानंतर याच झोपाळ्यावर तासंतास बसून आम्ही गप्पा मारत असू.
सगळं काही छान सुरू होतं. फक्त एकच उणीव होती आणि ती म्हणजे आम्हाला मूलबाळ
नव्हतं. उपचार केले, नवस केले पण उपयोग झाला नाही. शेवटी अनाथ आश्रमातून आम्ही एक
मुलगा दत्तक घेतला. मनात विचार होता, जे अनाथाचं आयुष्य आम्ही काढतो आहोत निदान
एका मुलालातरी तसं काढायला लागू नये. ते मूल आमच्यासोबत नांदू लागलं. मोठ्या
प्रेमाने हिने त्याचं नाव विक्रांत ठेवलं. त्याच्या खोड्यांनी, चाळ्यांनी घराला
चैतन्य आलं. पण त्या नुसत्याच खोड्या नव्हत्या हे त्यावेळी कुठे ठाऊक होतं
आम्हाला...” प्रभाकर दामले बोलता बोलता थबकले. त्यांना पुढे बोलवेना म्हणून वसुधा
दामले पुढे बोलू लागल्या...
“विक्रांत जसा मोठा होत गेला तशा त्याच्या
खोड्याही वाढत गेल्या. आसपासच्या मुलांशी मारामाऱ्या करणं, उद्धटपणे बोलणं, बेलगाम
वागणं, सगळं वाढत गेलं. विक्रांतवरच्या अतिप्रेमापाई आम्ही या सर्व गोष्टींकडे
दुर्लक्ष केलं. शेजारी सतत सांगत असत आणि आम्ही त्याचं बोलणं उडवून लावत असू.
विक्रांत मोठा झाला. वाईट संगतीमुळे घरात चोरी करण्यापर्यंत मजल गेली त्याची. घरात
येणाऱ्या त्याच्या मित्रमंडळींचा धांगडधिंगा, दारू पिऊन केलेले हिडीस नाच, सगळं
आमच्या कल्पनेपलिकडचं होतं. यावर कहर म्हणून की काय... कृतिका नावाच्या त्या
मुलीचा घरात शिरकाव झाला. न जाणो कुठल्या कुठल्या पुरुषासोबत तिने... हे तिने
स्वत:च कबूल केलं. तिच्या अवास्तव मागण्या आणि जोडीला अपमान, शारीरिक छळ, सगळं
जेव्हा सहन करण्यापलिकडे गेलं तेव्हा ह्यांनी विक्रांतला दुसरं घर पहायला सांगितलं
आणि तसं नाही झालं तर पोलीस बोलावेन अशीही धमकी दिली. हे ऐकून कृतिका निघून गेली
आणि विक्रांत हवालदिल झाला व घरातून निघून गेला. आम्हाला वाटलं सगळं संपलं, पण
इथेच आम्ही चुकलो...”
वसुधा दामलेंची पाठ थोपटत प्रभाकर दामले बोलते
झाले, “रस्त्याच्या कडेला एक फूलवाला बसतो. त्याच्याकडे चाफ्याची फुलं खूप छान मिळतात.
या बंगल्यात आल्यापासून एक दिनक्रम मी ठरवला. रोज संध्याकाळी मी बाहेर फिरायला जात
असे आणि येताना माझ्या वसूसाठी फुलं आणत असे. त्यादिवशीही मी तसाच बाहेर पडलो.
वसू सारखी सांगत होती नाक जाऊ पण मी ऐकलं
नाही. फुलं घेऊन परत आलो तेव्हा बाहेरचा दरवाजा सताड उघडा होता. असं कधीच झालं
नव्हतं आजवर. थोडा अचंभित होऊन मी आत गेलो तर, “ऊ...ऊ...” असा आवाज येत होता. मी
पाहिलं तर लॉनकडचा दरवाजाही उघडा होता आणि आवाज तिथूनच येत होता. मी तिथे गेलो तर
वसू झोपाळ्यावर बसली होती. तिला दोराने बांधून ठेवलं होतं. समोर कृतिका उभी होती
आणि हातातल्या वायर्सने वसूला शॉक देत होती. मला ते दृश्य पाहवलं नाही. मी
तिच्याकडे जाणार तोच विक्रांतने मला अडवलं. वसूच्या जिवाच्या बदल्यात विलच्या
पेपर्सवर त्याला माझ्या सह्या हव्या होत्या. मी नकार दिला तर ती कृतिका माझ्या
वसूला शॉक देऊ लागली. न राहून मी सह्या केल्या आणि वसूकडे धावलो. पण तोवर सगळं
संपलं होतं...
शॉकच्या झटक्यांमुळे माझ्या वसूची प्राणज्योत
मालवली होती. वसू मला सोडून गेली हा धक्का मला सहन झाला नाही आणि तिच्या शेजारी
याच झोपाळ्यावर मीही प्राण सोडले. जगाला दाखवण्यासाठी की विक्रांत एक चांगला मुलगा
आहे, त्याने आमचे अंत्यसंस्कार केले. पण तरीही आम्हाला मुक्ती नाही मिळाली. कारण
आमचा जीव अडकलाय तो विक्रांतने पसरवलेल्या खोट्यात आणि आम्ही सह्या केलेल्या
कागदपत्रात. विशाल, नेहा... मुक्ती मिळवण्यासाठी आम्हाला मदत करा...” काही काळ
शांतता पसरली. नेहा म्हणाली, “काका, काकू... तुमची ही कहाणी ऐकून मला रडू आवरत
नाही हो... कसं काय सहन केलंत तुम्ही इतकं सगळं...” विशाल काहीच बोलत नाही हे
पाहून प्रभाकर दामले त्याच्या जवळ गेले. तेव्हा विशाल म्हणाला, “काका. तुमची ही
कहाणी हृदय पिळवटून टाकणारी आहे पण बाहेरच्या जगात जी कहाणी पसरली आहे ती याहून
पूर्ण निराळी आहे. अशा वेळी कोणावर विश्वास ठेवावा कोणावर नाही हाच मोठ्ठा पेच आहे
माझ्या पुढे. दामले काका हसत म्हणाले, “बरोबर आहे तुमचं. एकाच घटनेच्या दोन
कहाण्या तुम्ही ऐकल्यात. कोण खरं बोलतंय कोण खोटं हे समजणं कठीण आहे. विक्रांतला
इथे आणा. सगळं आपोआप सिद्ध होईल...” विशालला दामले काकांचं म्हणणं पटलं. दुसऱ्याच
दिवशी विशालने मि. पवारांना फोन केला...
“मि. पवार, आम्हाला बंगला आवडला आहे. तुम्ही
सांगाल त्या किमतीला आम्ही तो विकत घ्यायला तयार आहोत पण अट एकच. हा सौदा आम्ही
तुमच्याशी नाही तर खऱ्या मालकाशी करू इच्छितो आणि तेही याच बंगल्यात...” मि.
पवारांनी काही दिवसांची मुदत मागून घेतली व फोन कट केला. आठवडा निघून गेला. एक
दिवस मि. पवारांचा फोन आला. व्यवहाराचा दिवस ठरला. विशाल आणि नेहा ठरल्या दिवशी
बंगल्यावर पोहोचले. बंगल्याच्या आवारात एक ऊंचपुरा धिप्पाड माणूस उभा होता. हाच
होता विक्रांत. हस्तांदोलन झालं ओळखपाळख झाली आणि चौघं आत गेले. बंगल्याचे कागद
वाचताना विशालने एकाएकी कृतिका आणि वसुधा दामलेंच्या वादाचा मुद्दा काढला.
गडबडलेल्या विक्रांतचं ततपप झालं खरं पण त्याही वेळी त्याने प्रभाकर दामले व वसुधा
दामले कसे वाईट होते तेच सांगायला सुरुवात केली. तो बोलत असताना अचानक घरातले दिवे
चालू-बंद होऊ लागले. वाऱ्याची झुळूक विक्रांतच्या कानाला चाटून गेली. “नालायक
माणसा...” हा आवाज बंगल्यात घुमू लागला. विक्रांत व मि. पवार सर्वत्र पाहू लागले.
इतक्यात लॉनकडचा दरवाजा उघडला गेला आणि वाऱ्याच्या जोरदार झोतासरशी विक्रांत हवेत
उडाला. नेहाच्या हातातले कागद एकाएकी जळू लागले...
हवेतल्या हवेत गटांगळ्या खात असताना, “वाचवा... वा...च... असे अस्पष्ट उद्गार त्याच्या तोंडून निघत होते. त्याच वेळी, “कबूल कर तुझं कृत्य नीच माणसा... कबूल कर...” हे आवाजही घुमत होते. घाबरलेला, हवेत गटांगळ्या खात असलेला विक्रांत कसाबसा बोलला, “म...मी कबूल करतो... मी...मी... खून केला माझ्या आई-वडिलांचा... आ...ता मला वाचवा...” अचानक वाऱ्याचा झोत विक्रांतला लॉनकडे घेऊन गेला. झोपाळ्यासमोर तो आपटला गेला. सर्वजण लॉनवर आले. “सगळं सत्य कबूल कर...” हा आवाज घुमताच विक्रांत बोलता झाला, “मी कबूल करतो की माझ्या आई-वडिलांचा खून मीच केला. वाईट संगतीमुळे मला ड्रग्सचं व्यसन लागलं. ते पूर्ण करायला हवा असलेला पैसा मी जबरदस्तीने आई-बाबांकडून मिळवू लागलो. एकदा माझे मित्र मला तिथे घेऊन गेले. तिथे कृतिकाची भेट झाली. मला ती त्याच वेळी आवडली होती. मी कृतीकाला या घरात घेऊन आलो. ती म्हातारीवर जाच करू लागली. माझा विचार होता की या जाचाला कंटाळून ते दोघं इथून निघून जातील पण झालं भलतंच...
हवेतल्या हवेत गटांगळ्या खात असताना, “वाचवा... वा...च... असे अस्पष्ट उद्गार त्याच्या तोंडून निघत होते. त्याच वेळी, “कबूल कर तुझं कृत्य नीच माणसा... कबूल कर...” हे आवाजही घुमत होते. घाबरलेला, हवेत गटांगळ्या खात असलेला विक्रांत कसाबसा बोलला, “म...मी कबूल करतो... मी...मी... खून केला माझ्या आई-वडिलांचा... आ...ता मला वाचवा...” अचानक वाऱ्याचा झोत विक्रांतला लॉनकडे घेऊन गेला. झोपाळ्यासमोर तो आपटला गेला. सर्वजण लॉनवर आले. “सगळं सत्य कबूल कर...” हा आवाज घुमताच विक्रांत बोलता झाला, “मी कबूल करतो की माझ्या आई-वडिलांचा खून मीच केला. वाईट संगतीमुळे मला ड्रग्सचं व्यसन लागलं. ते पूर्ण करायला हवा असलेला पैसा मी जबरदस्तीने आई-बाबांकडून मिळवू लागलो. एकदा माझे मित्र मला तिथे घेऊन गेले. तिथे कृतिकाची भेट झाली. मला ती त्याच वेळी आवडली होती. मी कृतीकाला या घरात घेऊन आलो. ती म्हातारीवर जाच करू लागली. माझा विचार होता की या जाचाला कंटाळून ते दोघं इथून निघून जातील पण झालं भलतंच...
म्हाताऱ्याने मला व कृतिकाला पोलीसांची धमकी
दिली. हे ऐकून कृतिका त्याच क्षणी निघून गेली आणि मी एकटा पडलो. कृतिका इतकी मोहक
आणि सुंदर होती की तिला गमावणं मला शक्य नव्हतं. कृतिकाला पैसा हवा होता आणि माझं
लक्ष होतं या घरावर. मी एक प्लॅन बनवला. म्हातारा संध्याकाळचा बाहेर गेल्यावर कृतिकाला
लॉनकडून मी आत शिरकाव करायला मदत केली. म्हातारी तिथेच झोपाळ्यावर बसली होती. मी
म्हाताऱ्याच्या मागे गेलो. प्लॅन असा होता की कृतिकाने इलेक्ट्रिक शॉक देत
म्हातारीची सही विलच्या पेपर्सवर घायची व मी म्हाताऱ्याला वाटेतच संपवायचं. मी त्याला
संपवणार इतक्यात कृतिकाचा फोन आला. तिने सांगितलं की घर दोघांच्या नावावर आहे.
तेव्हा प्लॅन बदलून मी म्हाताऱ्याला घरी जाऊ दिलं. म्हातारीची अवस्था त्याला बघवली
नाही आणि त्याने सही करून टाकली. मी विचार केला दोघांनाही लांब कुठेतरी नेऊन तिथेच
संपवून टाकावं पण ही म्हातारी... जरासे झटके सहन झाले नाहीत तिला आणि मरून गेली
ती. हा म्हातारा पण तिथेच खपला. मी दोघांवर अंत्यसंस्कार केले आणि त्यांच्याबद्दल
खोटंनाटं पसरवलं. वाटलं आता निवांतपणे हा बंगला विकेन आणि कृतिकासोबत जाईन निघून
कुठेतरी पण...”
विक्रांत बोलत असतानाच पोलीस झाडामागून बाहेर
आले. इंस्पेक्टर म्हणाले, “मी सर्व रेकॉर्ड केलं आहे. चला मि. विक्रांत, मोठ्या
घरी जायला तयार व्हा. आणि हो त्या कृतिकालाही बोलवा. तुमच्या वाट्याला येणारी
शिक्षा तिलाही भोगू दे की... धन्यवाद मि. विशाल. तुमच्यामुळे खरं बाहेर आलं.
कधीकधी सत्यासाठी अशा अमानवी गोष्टींचा आधार घ्यावा लागतो माणसाला. पुन्हा एकदा
धन्यवाद...” पोलीस विक्रांतला घेऊन गेले. पाठोपाठ मि. पवारपण निघून गेले. दामले
पती-पत्नी विशाल व नेहासमोर आले. हात जोडून त्यांनी दोघांना धन्यवाद म्हटलं. विशाल
म्हणाला, “काका, तुम्ही आता मुक्त झालात. हा वाडा मुक्त झाला. आता आम्ही निघतो...”
काका लॉनच्या दिशेने जात नाहीसे झाले. नेहा, काकूजवळ जात, “काकू... नमस्कार
करते...” असं म्हणत खाली वाकली. काकूने तिला आशीर्वाद दिला आणि लुप्त झाली. विशाल
व नेहाने एकमेकांकडे पाहिलं. एकमेकांचे डोळे पुसत दोघं घराबाहेर पडली. नेहाने एकदा
वळून पाहत घराला नमस्कार केला. सगळीकडे सामसूम झालं. फक्त येणाऱ्या पावसाचाच आवाज
होता...
संध्याकाळ सरत चालली होती. वादळ-वाऱ्यासह
कोसळणारा पाऊस वातावरणात एक भयावह गूढ निर्माण करू पाहत होता. बंगल्याच्या मागच्या
अंगणातल्या झोपाळ्यावर दामले काका बसले होते. हळू हळू झोका घेत ते सारखे घराकडे
पाहत होते. अचानक वीज चमकली आणि त्यांनी दचकून आभाळाकडे पाहिलं. म्हणाले, “काय
विचित्र, भयाण वातावरण आहे... संध्याकाळ आहे की रात्र तेच समजत नाही...” “समजेल
कसं हो... पावसामुळे अंधार किती पडलाय बघताय ना...” या आवाजाने आकाशाकडे लागलेली
त्यांची नजर खाली आली. बाजूला दामले काकू उभ्या होत्या. चेहरा शांत आणि हसतमुख
होता त्यांचा. त्या झोपाळ्यावर बसल्या. दामले काका म्हणाले, “अगं वसू होतीस कुठे
तू... मी कधींचा आलोय...” पायाने झोपाळा ढकलत दामले आजी म्हणाल्या, “इथेच तर
होते... जाणार कुठे... आता तुमच्याशिवाय मला आणि माझ्याशिवाय तुम्हाला दुसरं कोणी
आहे का... हे वातावरण काहीही म्हणो... पण आपली ही साथ अशीच राहील. याच झोपाळ्यावर.
नाही का...” आणि झोपाळा हळू हळू झोके घेऊ लागला...
समाप्त.
No comments:
Post a Comment