Thursday, August 23, 2018

शापित राजकन्या...



फार पूर्वीची गोष्ट आहे. भारताच्या मधोमध एका छोट्याशा गावात रामू आपल्या आईसोबत राहत होता. रामू मेहनती व धाडसी होता पण नशीबाची साथ त्याला लाभत नव्हती. गरिबीत दिवस काढत तो बिचारा आयुष्य वेचत होता. गावात पडेल ते काम करून रामू आपले व आपल्या आईचे पोट भरत असे. दीर्घ आजाराने ग्रासलेल्या आपल्या आईची त्याला जास्त काळजी होती कारण तिच्या औषध-पाण्यासाठी पुरेसे पैसे त्याच्याजवळ नव्हते. एक दिवस हताशपणे देवळात बसला असताना गावकऱ्यांचे शब्द त्याच्या कानी पडले, "शेजारच्या नगराच्या, कृपापुरीच्या महाराज कृपळदेवने म्हणे दवंडी पिटवली आहे... की त्यांच्या मुलीला म्हणजे राजकुमारी सोनलला जी कोणी व्यक्ती परत आणून देईल त्या व्यक्तीला रहायला मोठा वाडा आणि अमाप पैसा बहाल केले जाईल...", "सांगतोस काय... कोण असेल ती भाग्यवान व्यक्ती...", "अरे पण असं झालं तरी काय राजकन्येला...", "हो ना, परत आणून देईल म्हणजे कुठे गेली तरी कुठे ती...", "काय एकेक ऐकावं ते नवलंच..." रामू कान देऊन सगळं ऐकत होता. त्याने मनोमन विचार केला, "जावं का तिथे... बघू प्रयत्न करून... यावेळी नशीबाने साथ दिलीच तर आईची चिंताच मिटेल आणि नाहीच दिली तर त्याच नगरात एखादं काम मिळवू..." मनाशी विचार पक्का करून रामू घरी परतला...

रामूने तयारी केली आणि आईसोबत प्रवासाला निघाला. कृपापुरीत पोहोचेपर्यंत संध्याकाळ झाली होती. नगराच्या बाहेर असलेल्या देवळात रामूने वस्ती केली आणि सकाळ होताच राजमहालाकडे निघाला. द्वारपालाने हटकलंच, “काय रे... आत कुठे निघालास... काय हवं आहे तुला...” रामूने त्याच्या येण्याचं कारण सांगताच द्वारपालाने एका सैनिकाकरवी महाराजांना वर्दी दिली. रामूला ताबडतोब आत बोलावलं गेलं. दरबारात महाराज कृपाळदेव व महाराणी सुनंदादेवी दोघंच होते. रामूने आत येताच महाराजांना मुजरा केला, “महाराजांचा विजय असो. महाराज, मी रामू. शेजारच्या नगरातून आलो आहे. आपल्या दवंडीबद्दल मी ऐकून आहे आणि माझ्याकडून काही होण्यासारखे असल्यास मी तयार आहे...” महाराज आणि महाराणी दोघंही एकमेकांकडे पाहू लागले. महाराज सिंहासनावरून खाली येत म्हणाले, “मुला, बहुतेक तुला दवंडीची पूर्ण कल्पना नाही. आम्ही तुला सगळं सांगतो. चल आमच्यासोबत...” रामू महाराजांसह एका दालनात आला. ते राजकुमारी सोनलचे दालन होते. दालनाच्या मधोमध एक दगडी पुतळा होता. रामूने तो पुतळा पाहिला आणि त्याला धक्काच बसला, “महाराज हे...” तो पुढे काही बोलेल इतक्यात महाराज पुढे होत म्हणाले, “हो... हीच आमची कन्या... राजकुमारी सोनल...

काही दिवसांपूर्वी राजकुमारी शिकारीहून परतल्या त्याच मुळी रडत. आजवर राजकुमारीच्या डोळ्यात कधी अश्रू आले नव्हते आणि आज तर त्या चक्क रडत होत्या. आम्ही दोघं त्यांना सारखे विचारत होतो. शेवटी त्या बोलत्या झाल्या, “पिताश्री, आज माझ्याकडून एक अघटित गोष्ट घडली. जंगलात शिकार करत असताना एक मृग माझ्या नजरेस पडलं. त्यावर मी बाण मारला खरा पण मागाहून ओरडण्याचा आवाज मात्र मनुष्याचा होता. मी जवळ जाऊन पाहिलं तर तिथे एका योग्याचं शरीर पडलं होतं. इतक्यात मला हसण्याचा आवाज आला. मी वर पाहिलं तर एक शीर हवेत उडत चाललं होतं. त्याला माझा बाण अडकला होता. त्या शिराच्या मुखातून शब्द बाहेर पडले, “तू माझी साधना भंग केलीस... मी तुला शाप देतो... आज सूर्यास्तानंतर तुझी काया दगडाची होईल आणि जसे माझ्या शरीराचे दोन भाग झाले तसे तुझ्याही शरीराचे दोन भाग होऊन एक भाग माझ्या गुहेत बंदिस्त होईल... हा...हा...हा...” हे बोलत ते शीर क्षितिजावर नाहीसे झाले. मातोश्री मला खूप भीती वाटते आहे हो... पिताश्री मला वाचवा हो...” हे बोलत असतानाच सूर्य मावळला. त्याचसोबत, “पिताश्री...” असे ओरडत राजकुमारी दगडाच्या पुतळ्यामध्ये परिवर्तीत झाल्या. नुसते एवढ्यावरच भागले नाही, तर पुतळ्याचे दोन भाग झाले आणि एक भाग गायब झाला. आम्ही त्या योग्याच्या गुहेचा आणि सोनलच्या अर्ध्या देहाचाही शोध घेतला पण हाती काही लागलं नाही...

जंगलात आम्हाला एक शीर नसलेला देह सापडला. पण तो देह योग्याचा वाटत नव्हता तर एखाद्या राक्षसाचा वाटत होता. शेवटी न राहून आम्ही दवंडी पिटवली...” रामूने सर्व ऐकलं. म्हणाला, “महाराज, मला तुमची मनस्थिती समजू शकते. मी राजकन्येला पूर्ववत करण्याचा प्रयत्न करेन. त्यासाठी मला त्या गुहेच्या शोधार्थ जावं लागेल आणि अशावेळी माझ्या आईकडे...” रामू गप्प झाला. महाराणी सुनंदादेवी रामूच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाल्या, “रामू, तू काही चिंता करू नकोस. तुझ्या आईची आम्ही पुरेपूर काळजी घेऊ...” रामूला हायसं वाटलं. तो मोहिमेवर निघाला. राजकुमारी सोनलसोबत जो सैनिक जंगलात गेला होता त्याच्यासह रामू त्याच जागी पोहोचला जिथे त्या राक्षसाचं शरीर होतं. रामूने पाहिलं तर शिराविना असलेलं ते धड काळं आणि अगडबंब होतं. योग्याचं शीर कुठल्या दिशेने गेलं याची त्या सैनिकाकडे विचारणा करून रामू विचारात पडला, “याचं शीर वेगळं झालं तरी अजून शरीर तसंच आहे. रक्त येत नसलं तरी शरीर जिवंत असल्याचा भास होतोय. हा काय प्रकार असावा...” महाराजांकडे वळत रामू म्हणाला, “महाराज, हा नक्कीच कोणीतरी मायावी राक्षस असणार... या घटनेला दिवस उलटून गेलेत तरी अजून याचं शरीर तसंच आहे... महाराज मला आज्ञा द्यावी निघण्याची...”

नमस्कार करणाऱ्या रामूला महाराज कृपाळदेवांनी उठवलं. प्रवासासाठी घोडा आणि संरक्षणासाठी तलवार व कट्यार देत ते म्हणाले, “जा मुला, यशस्वी हो...” ज्या दिशेला राक्षसाचं शीर नाहीसं झालं होतं त्या दिशेने रामू निघाला. एका अरण्यातून दुसऱ्या अरण्यात असा त्याचा प्रवास चालला होता. एका नदी किनारी तो पोहोचला. घोड्याला थोडा आराम मिळावा म्हणून एका डेरेदार वृक्षाखाली रामूने त्याला बांधून ठेवलं आणि तिथेच बाजूला बसून महाराणीने दिलेली शिदोरी तो खाऊ लागला. त्याचं जेवण सुरू असताना, “ओम... ओम...” असा आवाज त्याला ऐकू आला. जवळच कोणीतरी मुनिवर असणार याची कल्पना त्याला आली. त्यांचं दर्शन व्हावं म्हणून रामू आवाजाच्या दिशेने निघाला. रामूने पाहिलं तर एक झाडाखाली एक मुनी पद्मासनात बसले होते. त्याचं शीर सोडून संपूर्ण शरीर दगडाचं होतं. रामू अवाक झाला. जवळ जाऊन मांडीवर डोकं ठेवत रामू म्हणाला, “प्रणाम मुनिवर... आपण तपस्वी असून आपली ही अवस्था...” त्या योग्याने डोळे उघडले. रामूकडे पाहून ते हसत म्हणाले, “वत्सा, अरे मी तपस्वी आहे म्हणूनच माझं पूर्ण शरीर दगडाचं नाही होऊ शकलं. हे कृत्य त्या मायावी क्रूरकर्मा संधू राक्षसाचं आहे. माझ्याकडून शिवशंकराला प्रसन्न करण्याचा मंत्र जाणून घेऊन त्याने माझी अशी गत केली. माझंच रूप धारण करून तो संधू शंकराच्या तपश्चर्येसाठी पुढे गेला...

मी अंतरज्ञानाने जाणलं, संधूने भगवान शंकरकडून वरदान प्राप्त केलं. त्यानुसार संधूचा वध फक्त त्याच्या स्वत:च्याच हातून होऊ शकेल. या वरदानावरही त्या संधूचं समाधान नाही झालं. त्याला आता त्रिलोकाधीश व्हायचं होतं. त्यासाठी संधूने पुन्हा तपश्चर्येला प्रारंभ केला पण कृपाळदेवाच्या कन्येमुळे संधूची तपश्चर्या भंग पावली. राजकुमारी सोनलच्या बाणामुळे संधूचं शीर धडावेगळं झालं आणि त्याची तपश्चर्या भंगली. संधूचं शीर हिमालयातल्या त्याच्या गुहेत गेलं आणि त्याच्या शापामुळे राजकुमारी सोनलचा अर्धा देहही त्यासोबत गेला. शिराविना असलेल्या संधूच्या धडाला पुढचे आदेश येणं बंद झालं आणि ते तसंच निपचित पडून राहिलं... रामू, तुझं येण्याचं कारणही मला ज्ञात आहे. राजकुमारी सोनलचा अर्धा देह याच संधूच्या भाळावर स्थित मण्यामध्ये कैद आहे. तो मणी तोडताच सोनलचा देह तिच्या उरवरित अर्ध्या देहाशी जोडला जाईल आणि सोनलची शापातून मुक्तता होईल. कारण तो मणीच त्या संधू राक्षसाचा प्राण आहे. मी तुला एक धनुष्य व सात बाण देत आहे. त्याचा प्रयोग करून त्या संधूचं शीर त्याच्या धडापर्यंत पोहोचवू शकशील...

संधूचं शीर त्याच्या धडाला शिवताच तो राक्षस पुन्हा जिवंत होईल आणि मग त्याला रोखणं अशक्य होईल. रामू, तुला असं काहीतरी करावं लागेल ज्यामुळे संधू स्वत:च स्वत:ला इजा करेल. आता बस माझ्यासमोर...” रामू मुनींसमोर डोळे मिटून बसला. मुनींनी मंत्र म्हटला आणि क्षणार्धात रामूसमोर एक धनुष्य आणि सात बाण प्रकट झाले. मुनी म्हणाले, “रामू, या सहा बाणांचे त्यांचे त्यांचे गुणधर्म आहेत आणि हा सातवा बाण एका विशिष्ठ गोष्टीसाठी वापरता येईल. नीट विचार करून यांचा वापर कर. संधू राक्षसाची गुहा हिमालयात स्थित गिरीधर पर्वतात आहे. तिथवर तू तुझ्या अश्वावर जाऊ शकशील पण गुहेतमात्र तुला चालत जावं लागेल. संधूनेच तयार केलेले पाच राक्षस त्या गुहेचं रक्षण करतात. त्यांना नमवूनच तू गुहेच्या मध्यावर असलेल्या संधूच्या शिरापर्यंत पोहोचशील. जा वत्सा तुझा विजय असो...” रामूने त्या सात बाणांकडे पाहिलं. हिरवा, पांढरा, निळा, लाल, सोनेरी आणि काळा असे ते सहा बाण आणि रिंगण असलेला सातवा बाण पाहून रामूला आश्चर्य वाटलं. आणि प्रत्येक बाणाचा त्याचा त्याचा गुणधर्म म्हणजे काय असणार याचाच विचार तो करू लागला. रामूला विचारात पाहून मुनी म्हणाले, “काळजी नसावी रामू... योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य बाण वापरण्याचं ज्ञान तुला तुझं अंतर्मन देईल. कल्याण हो...” मुनींना नमस्कार करून रामू पुढे निघाला. बरंच अंतर पार केल्यावर रामू गिरीधर पर्वताच्या पायथ्याशी पोहोचला. त्याने वर पाहिलं तर एखाद्या उघड्या जबड्यासारखी एक गुहा त्याला दिसली...

रामूने देवाचे नाव घेतले आणि आत प्रवेश केला. गुहेत सगळीकडे सामसूम होतं. अंधाऱ्या रस्त्यावरून हळूहळू मार्गक्रमण करत रामू पुढे जाऊ लागला. अचानक त्याच्या समोरचा रस्ता प्रकाशमान झाला. रामूने पाहिलं तर समोर झाडंच झाडं होती. रामूने जसे पाऊल पुढे टाकले तशी त्या झाडांनी आपली जागा सोडली. झाडांच्या खोडातले हिरवे डोळे चमकू लागले आणि झाडं रामूच्या दिशेने येऊ लागली. रामूने धनुष्य-बाण खाली ठेवत तलवार उपसली पण त्या झाडांच्या अक्राळ-विक्राळ ताकदीपुढे त्याचा निभाव लागत नव्हता. त्याने धनुष्य-बाणाचा वापर करायचं ठरवलं. पण कुठला बाण चालवायचा आणि कोणावर... कारण प्रत्येक बाण एकदाच चालवता येणार होता. रामूने जरा विचार केला आणि फांद्यांना चकवत धनुष्य-बाणापर्यंत पोहोचला. त्याने तलवार म्यान केली आणि हिरव्या रंगाचा बाण धनुष्याला लावला. बाण मारण्यासाठी जागा शोधत असताना रामूला जाणवलं की इतर झाडांचे दोन डोळे आहेत पण एका झाडालामात्र तीन डोळे आहेत. रामूने नेम धरून त्या झाडाच्या तिसऱ्या डोळ्यावर बाण मारला. “आ......” अशी आरोळी ऐकू आली. बाणाने त्याचे कार्य साध्य केले होते. सगळी झाडं गायब झाली. ज्या झाडाला बाण लागला होता ते कोसळलं आणि त्याजागी हिरवट रंगाचा राक्षस दिसू लागला. त्या राक्षसाला ओलांडून रामू पुढे गेला आणि अचानक सोसाट्याचा वारा वाहू लागला...

प्रकाश कमी होत गेला आणि अंधार वाढू लागला. एका बाजूला वाढत जाणारा अंधार आणि दुसरीकडे हे वावटळ... रामूला तर डोळे उघडणंच शक्य होत नव्हतं. त्याचा चालण्याचा वेग मंदावला. दोन्ही हात डोळ्यांवर ठेऊन तो पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता खरा पण हा वारा त्याला तसूभारही सरकू देत नव्हता. पुढे कसं जावं हा विचार करत असतानाच वावटळाने त्याला गिळंकृत केलं. वावटळात गटांगळ्या खात असताना रामूने डोळे किलकिले करत पाहिलं तर केंद्रस्थानी त्याला एक काळा चौकोन दिसला. या वावटळात सर्वकाही फिरत असताना हाच चौकोन स्थिर कसा काय याचाच विचार करत असताना रामूला त्याच्याकडे असलेल्या काळ्या बाणाची आठवण झाली. रामूने लगेच धनुष्याला तो काळा बाण लावला आणि त्या काळ्या चौकोनाकडे भिरकावला. चौकोनात बाण बसताच “आ.......” असा ओरडण्याचा आवाज आला. वावटळ थांबलं तसा रामू खाली आला. खाली राखाडी रंग अंगभर फासलेला एक राक्षस पडला होता. रामू म्हणाला, “आधी ती झाडं आणि आता हे वावटळ... झाडांसाठी हिरवा बाण आणि आता काळा बाण... म्हणजे... पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश... याचा अर्थ त्या संधूने पंचतत्वांच्या आधारे हे पाच राक्षस बनवले तर... आता मला सावध व्हायला हवं कारण जल, अग्नी आणि अवकाश यांचा प्रकोप अजून बाकी आहे...” रामू विचारच करत होता की एकाएकी आकाशात गडगडाट झाला आणि विजा चमकू लागल्या. एक वीज रामूच्या शेजारी असलेल्या झाडावर कोसळली आणि क्षणार्धात झाडाची राख झाली...

रामूने झाडाकडे पाहत स्मित केलं आणि स्वत:शीच म्हणाला, “याचा अर्थ हा राक्षस अवकाश या तत्वापासून तयार झाला आहे तर. याला थांबवण्यासाठी कोणता बाण वापरावा... अंधारात चमकणाऱ्या या विजा पांढऱ्या रंगाच्या भासत आहेत... पांढराच बाण वापरतो. पण बाण मारायचा कुठे...” बोलत असताना रामूच्या लक्षात आलं की सगळ्या विजा एकाच ठिकाणाहून येत आहेत. रामू धनुष्याला पांढरा बाण लावून वर पाहत पावित्र्यात उभा राहिला. जशी वीज कोसळली त्यासरशी रामूने बाण सोडला. “आ......” असा ओरडा पुन्हा ऐकू आला. विजा शांत झाल्या आणि पांढऱ्या रंगाचा राक्षस धपकन जमिनीवर पडला. “तीन गेले आता दोन...” असे उद्गार काढत रामू पुढे गेला. बराच काळ चालूनही कुठलंही आव्हान त्याच्या समोर आलं नाही. रामू थोडा आश्चर्यचकित झाला खरा पण इतक्यात गुहेच्या एका बाजूला असलेला दगडी दरवाजा सरकला आणि आतून “खळखळ...” असा आवाज येऊ लागला. रामू सावधपणे पुढे जात दारातून आत गेला. त्या दालनाच्या मधोमध हवेत तरंगत असलेलं एक शीर त्याच्या नजरेस पडलं. ते शीर मोठ्या आवाज म्हणालं, “आलास... ये की पुढे... इथवर आला आहेस तर थांबलास कशाला...” ते शीर संधू राक्षसाचं होतं. रामू पुढे जाणार इतक्यात त्याची नजर खाली गेली. पाण्याच्या एका प्रचंड मोठ्या भोवऱ्याच्या तोंडावर रामू उभा होता. एक पाऊल पुढे टाकलं असतं तर भोवऱ्यात अडकून रामूला जलसमाधीच मिळाली असती...

रामू एक पाऊल मागे गेला. थोडं मागे जाऊन धावत येत त्या भोवऱ्यावरून उडी मारावी अशा विचारात तो असतानाच तो दगडी दरवाजा बंद झाला आणि जमीनही भोवऱ्याच्या दिशेने सरकू लागली. आता वेळ घालवून चालणार नव्हतं. रामूकडे आता चार बाण उरले होते, निळा, लाल, सोनेरी आणि रिंगण असलेला बाण. त्याने ताबडतोब निळ्या रंगाचा बाण धनुष्याला लावला आणि भोवऱ्याच्या उगमाच्या दिशेने पाण्यात सोडला. त्यासरशी पाण्यातून, “आ......” असा ओरडण्याचा आवाज येऊन भोवरा कमी होत होत नाहीसा झाला व त्या जागी निळ्या रंगाचा राक्षस पडलेला दिसला. रामूने पाय पुढे ठेवला. त्याला टणक जमीन लागली. संधूचं शीर हाकेच्या अंतरावर आहे हे पाहून रामू धावतच त्याकडे निघाला. तो शिरापर्यंत पोहोचणार इतक्यात शिराच्या चारही बाजूंनी प्रचंड मोठे आगीचे लोळ वर आले. नुसत्या स्पर्शाने एखाद्याची जळून राख होईल इतकी दाहकता होती त्या आगीत. ती आग पार करून पुढे जाण्याचा मार्ग शोधत असताना ती आग रामूच्या दिशेने येऊ लागली. रामूला समजलं ही नुसतीच आग नसून पंचतत्वांनी तयार झालेला एक राक्षस आहे. उरलेल्या तीन बाणांपैकी लाल बाण त्याने धनुष्यावर चढवला आणि जमिनीवर असलेल्या लाल निखाऱ्यावर त्याने तो चालवला. लगेचच आग शांत झाली आणि एक लालबुंद राक्षस तिथे पडलेला दिसला...

रामू पुढे आला तसं संधूचं शीर म्हणालं, “तुला काय वाटलं, या आग, पाणी, अशा क्षुद्र गोष्टींना नाहीसं करून तू माझ्यापर्यंत पोहोचशील... हा...हा...हा... मी संधू आहे संधू... बघ तुझ्या अवती-भोवती...” रामूने चौफेर नजर फिरवली तर दगड फोडून हिरव्या रंगाचा राक्षस, वाऱ्याच्या वेगाने आलेला राखाडी रंगाचा राक्षस, पाण्यातून निर्माण झालेला निळा राक्षस, आकाशातून उडी घेत खाली आलेला पांढरा राक्षस व अग्नीतून निर्माण झालेला लाल रंगाचा राक्षस असे पाचही राक्षस वेडेवाकडे हसत हात पसरवून रामूकडे येऊ लागले. आता रामूकडे दोनच बाण शिल्लक होते. रामूने धनुष्य-बाण खाली ठेवले आणि तलवार उपसली. बराच वेळ रामू त्या पाचही राक्षसांचा प्रतिकार करत होता पण त्याला यश मिळत नव्हतं. कुठल्याही राक्षसावर रामूने तलवार चालवताच तो वार त्या राक्षसाच्या शरीराच्या आर-पार जाई आणि राक्षस हसत राही. रामूला समजलं, हे राक्षस मायावी आहेत. हे असे नष्ट होणार नाहीत. जर हे राक्षस संधूनेच निर्माण केलेत तर संधूचाच कुठलातरी गूण त्यांच्यात असणारच. हा विचार करेपर्यंत पाचही राक्षसांनी रामूला घेराव घातला होता. रामूने सर्वांचं निरीक्षण केलं आणि त्याला जाणवलं की पाचही राक्षसांच्या भाळावर एकेक मणी आहे. रामू हसला. त्याला मार्ग सापडला होता. एक राक्षस पुढे आला. रामूने त्याला चुकवून त्याच्या भाळावरच्या मण्यावर वार केला. त्याबरोब्बर त्या राक्षसाचं भस्म झालं. रामूने आता सर्व राक्षसांच्या मण्यावर वार करण्याचा सपाटाच लावला. एकेक राक्षस भस्मसात होत गेला आणि रामू संधूच्या शिराजवळ पोहोचला...

आपल्या सर्व राक्षसांचं भस्म झालेलं पाहून संधू थोडा चरकला पण सावरत म्हणाला, “माझ्या या राक्षसांना मारून हे मानवा तुला काय वाटलं... तू मला हरवशील... मला... या संधूला... हा...हा...हा... राजकुमारीला सोडवायचं आहे ना तुला... पण ती तर माझ्या भाळावर असलेल्या या मण्यात कैद आहे आणि हा मणी माझ्या हातून तुटला तरच राजकुमारी मुक्त होईल... पण माझे हात असलेलं माझं धड... ते तर लांब त्या वनात आहे... माझं हे शीर जर माझ्या धडाशी पुन्हा जोडलं गेलं तर... तर मी पूर्ववत होईन. मग कुठली राजकुमारी नी कसली ही पृथ्वी... हा...हा...हा... काय करशील रे...” तलवार उपसून संधूवर वार करण्यास रामू सज्ज झाला होता खरा पण संधूचे हे शब्द ऐकले आणि रामू विचारात पडला, “हा संधू म्हणतोय ते खरं आहे. मणी फक्त संधूच्याच हातून तुटला तरच राजकुमारी सोनल त्याच्या शापातून मुक्त होईल. आणि ते मुनिवर म्हणाले तसं जर संधूचं शीर पुन्हा धडाशी जोडलं गेलं तर हा राक्षस पूर्ववत होईल आणि मग याला संपवणं अशक्य होईल... काय करावं...” विचार करत असताना रामूला एक युक्ती सुचली. त्याने तलवार म्यान केली. त्याच्याजवळ दोन बाण शिल्लक होते. त्यातल्या रिंगण असलेला बाण रामूने काढला. आपल्याजवळची कट्यार बाणाच्या अग्रस्थानी असलेल्या रिंगणात नीट बसवली आणि बाण वनाच्या दिशेने भिरकावला. हे पाहून संधू हसत म्हणाला, “हा...हा...हा... कट्यार टाकून दिलीस... अरे मानवा आता कसा रे मला हरवणार तू...” रामू संधूकडे पाहत हसला. “तुला लवकरच कळेल पुढे काय होईल ते...” असं म्हणत असताना रामूने सोनेरी बाण धनुष्याला लावला. त्याला नमस्कार केला आणि संधूच्या दिशेने सोडला...

त्या सोनेरी बाणाने संधूच्या शिराचा बरोब्बर वेध घेतला. बाणाचा शिराला स्पर्श होताच एक सोनेरी वलय त्या शिराभोवती प्रकट झालं. तो बाण संधूच्या शिराला त्याच्या धडाच्या दिशेने नेऊ लागला. पाठोपाठ रामूही निघाला. जसा रामू बाणाच्या मागे जाऊ लागला तसं त्याच्या मागे गुहा कोसळू लागली. बाणाचा पाठलाग करत रामू गुहे बाहेर आला. संपूर्ण गुहा कोसळून भुईसपाट झाली. हवेत बाणाला लागलेलं संधूचं शीर हसत आपल्या धडाच्या दिशेने जात होतं. रामूही घोड्यावर स्वार होत बाणामागे घोडदौड करू लागला. तिथे रिंगण असलेल्या बाणाने सोबत असलेल्या रामूच्या कट्यारीला बरोब्बर संधूच्या धडापर्यंत पोहोचवलं होतं. त्या कट्यारीनेही एकाच वारानिशी देहापासून हात वेगळा करत आपलं कामही चोख बजावलं होतं. हे अदभूत दृष्य महाराज, महाराणीसह तिथे जमलेली रयत पाहत होती. त्याच वेळी हसत असलेलं संधूचं शीर येताना दिसलं. शीर धडाला शिवलं आणि वलयासह संधू राक्षस पूर्ववत होऊन उभा राहत मोठमोठ्याने हसू लागला. सर्वजण घाबरून मागे सरकू लागले तेवढ्यात रामू तिथे पोहोचला. ताडाच्या झाडाएवढा ऊंच असलेल्या संधूला पाहून रामू खाली उतरला. संधू म्हणाला, "हा...हा...हा... मी पूर्ववत झालो... आता तुम्हा सर्वांना खाणार... आणि या रामूच्या तर चिंध्या करून हवेत फेकून देणार... हा...हा...हा..."

संधू बोलत असतानाच पुढे येत रामू म्हणाला, "संधू, तू सगळं करशील पण एका हाताने तू किती जणांना मारशील..." रामू बोलतच होता तेव्हा संधूने त्याच्या हातांकडे पाहिलं तेव्हा आपला डावा हात नसल्याचं त्याला समजलं. रागाने लाल होत त्याने रामूकडे पाहिलं तर रामू धनुष्याला संधूचा हात लावून सज्ज होता. क्षणार्धात रामूने संधूचा हात बाणासारखा भिरकावला. बाणाने संधूच्या कपाळाचा वेध घेतला आणि हाताच्या लांबच लांब नखाचा वार संधूच्या भाळावर स्थित मण्यावर बसला. "आ......" असं किळसवाणं ओरडत संधू वितळत जाऊन नाहीसा झाला. मागे राहिलेल्या मण्यातून दिव्य प्रकाश बाहेर पडला आणि समोर दिसू लागला राजकुमारी सोनलचा अर्धा देह. तो अर्धा देह सोनलच्या उर्वरित अर्ध्या देहाशी जाऊन मिळाला आणी सोनलमध्ये चेतना परत आली. सोनल धावत जाऊन महाराज व महाराणीला बिलगली. इतक्यात, "राजन..." या आवाजाने सर्वांचं लक्ष वेधलं. सर्वांनी पाहिलं तर समोर एक मुनिवर उभे होते. रामूने लगेच ओळखलं की हे तेच मुनी होते ज्यांनी संधूला नमवण्यात त्याची मदत केली होती…

रामूने त्यांना नमस्कार केला. रामूला उठवत मुनी म्हणाले, "रामू, संधूचा वध झाला आणि सोनलसह माझीसुद्धा मुक्तता झाली. राजन, संधूचा वध करताना या रामूने अद्वितीय पराक्रम दाखवला आहे. सोनलशी याचा विवाह करून राज्यकारभार याला सोपवावा असे मला वाटते..." महाराजांनी सोनलकडे पाहिलं. लाजून गुलाबी झालेल्या सोनलने एकवार रामूकडे पाहिलं व म्हणाली, "माझी काहीच हरकत नाही..." रामूच्या रूपात सोनलला तिच्या मनाजोगता आणि सुयोग्य जोडीदार तर मिळालाच होता पण नगरालाही एक कर्तबगार आणि पराक्रमी राजा मिळाला होता. सोनल व रामूचा सुखी संसार सुरू झाला व सर्वत्र आनंदी आनंद पसरला...

समाप्त.

No comments:

Post a Comment