Sunday, August 12, 2018

न्याय...



सकाळचे नऊ वाजले होते. चर्चगेटकडे जाणारी फास्ट ट्रेन प्लॅटफॉर्म सोडतच होती की एक माणूस धावत चालत्या ट्रेनमध्ये चढला. गर्दीतून रेटारेटी करत आत शिरत असताना स्वत:शीच बडबडत होता, "फर्स्ट क्लासमध्येपण गर्दी... काही सीमाच नाही राहिली गर्दीची. त्यात पावसानेही कहर केलाय..." कसाबसा तो माणूस आत पोहोचला. स्थिरस्थावर होईपर्यंत गाडीने अंधेरी सोडलं होतं. त्या माणसाला नीटसं उभं राहता येत नव्हतं त्यामुळे त्याची चलबिचल चालू होती. समोर बसलेल्या माणसाला त्याचा सारखा धक्का लागत होता. एकदोनदा त्याने वर पाहिलंसुद्धा. पण काय उपयोग झाला नाही. शेवटी न राहून त्या बसलेल्या माणसाने समोर उभ्या राहिलेल्या माणसाला ढकललं. तो माणूस अडखळणार इतक्यात इतर प्रवाशांनी त्याला सावरलं. तो माणूस पुढे येत म्हणाला, "काय हो, धक्का का मारताय... बसलात ना निवांत मग... आम्ही उभे आहोत तेसुद्धा बघवत नाही का..." बसलेला माणूसही काही कमी नव्हता. म्हणाला, "मग नीट उभे रहा ना... डांस कसला करताय... डांसच करायचाय तर जरा मोकळ्यावर करा. चार पैसे मिळतील..." गाडी एकेक स्थानक पुढे जात होती आणि या दोघांचं भांडणही वाढत होतं. शेवटी न राहून त्या उभ्या असलेल्या माणसाने बसलेल्या माणसाला जोरात ढकललं. मागच्या लोखंडी पाईपवर त्याचं डोकं जोरात आपटलं. "आह..." असा अस्पष्ट उच्चार करत त्या माणसाने मान टाकली...

उभ्या असलेल्या माणसाने त्याला हलवलं तर तो बाजूच्या माणसावर कलंडला. बाजूला बसलेल्या माणसाने त्याला सावरत डोक्याला धरून सरळ केलं तर त्याच्या हाताला रक्त लागलं. रक्त पाहून भांबावून तो आरडा-ओरडा करू लागला, “रक्त... अरे हा मेला-बिला की काय... पकडा रे या माणसाला... थांबवा गाडी... चेन खेचा कोणीतरी...” डब्यात गोंधळ सुरू झाला. त्यातच कोणीतरी साखळी खेचली. गाडी दादर सोडतच होती की साखळी खेचल्यामुळे थांबली. प्रवाशांपैकी कोणीतरी पोलीसांना फोन केला. तपास सुरू झाला. सब इंस्पेक्टर सचिन आणि इंस्पेक्टर आनंद बॉडी तपासू लागले. सचिन म्हणाला, “याला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय आठवत नाही कुठे...” सब इंस्पेक्टर उमा आणि सीनियर इंस्पेक्टर प्रधान प्रवाशांची जबानी घेऊ लागले, “बोला... काय घडलं इथे...” एक प्रवासी सर्व हकीगत सांगू लागला. प्रधान म्हणाले, “हम्म... म्हणजे त्या मृत व्यक्तीमध्ये आणि या माणसामध्ये वाद झाला आणि त्यातून झालेल्या ढकला-ढकलीत या बिचाऱ्याचा मृत्यू ओढवला... काय रे... काय नाव तुझं...” रक्त, प्रेत आणि गोंधळ पाहून आधीच घाबरलेला तो इसम कसाबसा बोलला, “स...सर... म...मी प्रमोद... रोज याच ट्रेनने जातो सर... आ...आज थोडा उशीर झाला म्हणून गर्दीत सापडलो... या माणसाशी काही वैर नाही हो माझं... मी का मारू याला...” तो बोलत असतानाच सचिन बोलता झाला, “सर, बॉडीवर कोणत्याच जखमा नाहीत... इथे डोक्याला हा रॉड लागल्याने रक्त आलं आहे... कदाचित याचमुळे या माणसाचा मृत्यू झाला असावा...”

प्रधान त्यांची नजर प्रमोदवर रोखत म्हणाले, "उमा, अजून काय मिळालं याच्याकडे... ओळख पटेल असं काही..." उमाने बॉडीच्या वस्तू चेक केल्या. म्हणाली, "सर याचं नाव आकाश आहे. बोरिवलीला राहतो आणि नरिमन पॉईंटला असलेल्या एबीसी टेक्नोमध्ये जॉब करतो. थोडे पैसे आहेत, पॅन कार्ड, पास, क्रेडिट कार्ड्स, याखेरीज अजून काही नाही सर..." ऐकून प्रधानांची नजर अजून धारदार झाली. ते म्हणाले, "बोल प्रमोद, आता काय बोलायचं आहे तुला..." प्रमोदला घाम फुटला होता. तो हात जोडत म्हणाला, "सर, प्लीज सर... प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर... मी काहीही केलं नाही..." प्रमोदला मध्येच तोडत प्रधान म्हणाले, "तुर्तास तरी समोर आलेल्या गोष्टींवरून तू दोषी आहेस. सचिन, याला चौकीवर घेऊन जा..." मग प्रवाशांकडे वळत म्हणाले, "घटनेच्या वेळी तुम्ही सगळे इथे होता. तर आपापले फोन नंबर्स द्या. कदाचित आम्हाला तुमची गरज लागेल. आणि, आत्ता हा डबा रिकामा करा. इथे जर काही पुरावे राहिले असतील तर गर्दीमुळे ते नष्ट होऊ शकतात. आनंद, तू या डब्यात थांब. मी रेल्वे अथॉरिटीजशी बोलून घेतो. गाडी चर्चगेटला जाऊ दे. मग हा डबा वेगळा करून पुढील तपासासाठी कारशेडला हलवू. उमा, तू चल माझ्यासोबत. आपण बॉडीला डॉ. गोखलेंकडे नेऊ..."

रेल्वेच्या परवानगीने ट्रेनचा डबा कारशेडला नेला गेला. आनंद तपास करू लागला. आकाशचं प्रेत ज्या ठिकाणी होतं. तिथून तो बारकाईने सर्व जागा न्याहाळू लागला. सर्वसाधारण प्रथम दर्जाचा तो डबा दोन भागात विभागला गेला होता. मागचा भाग शारीरिक विकलांगांसाठी होता तर पुढचा भाग बाकी सर्वांसाठी. या दोन्ही भागांना जोडणाऱ्या लोखंडाच्या पाईपला रक्त लागलं होतं. त्या जागेपासून दारापर्यंत आनंदने सर्व डबा तपासला दोन पिना व कचरा याखेरीज त्याला विशेष काही आढळलं नाही. विकलांगांच्या डब्यातही जरा नजर फिरवावी म्हणून आनंद तिथे शिरला. बारकाईने तपासत असताना त्याला जमिनीवर पडलेली एक नळी सापडली. आनंदने हातमोजे घालून ती नळी उचलली. म्हणाला, “हा तर स्ट्रॉ आहे... पण इथे काय करतोय...” आनंदने प्रधानांना फोन लावला. तिथे डॉ. गोखले आकाशची बॉडी तपासत म्हणाले, “प्रधान साहेब, मी बॉडी तपासली आहे. एक नक्की, याचा मृत्यू डोक्याला मार लागल्याने नाही तर विषामुळे झाला आहे...” गोंधळलेल्या प्रधान आणि उमाकडे पाहत डॉ. गोखले म्हणाले, “सांगतो... हे बघा... याचे ओठ आणि हाताची नखं हलकी निळी पडली आहेत आणि याच्या डोक्यात गळ्याच्या वर ही छोटी ठिपक्याएवढी जखम. याच्या आजूबाजूलाही हलका निळा रंग दिसतोय. इथूनच आकाशला विष दिलं गेलं असावं. विष कोणतं, तर साईनाईड आहे... अत्यंत जहाल विष... एका झटक्यात मृत्यू...” डॉ. बोलत असताना प्रधानांचा फोन वाजला...

फोन घेत प्रधान म्हणाले, “बोल आनंद... हम्म्म... एक काम कर, तू ते सगळं घेऊन इथे डॉ. गोखलेंकडे ये. पण सांभाळून... तो स्ट्रॉ तोंडाजवळ नेऊ नकोस... त्या डब्याच्या सुरक्षिततेसाठी मी परळ पोलीस चौकीला कळवलं आहे. त्यांचे हवालदार येताच तू निघ... डॉक्टर, आनंदला ट्रेनच्या डब्यात जिथे आकाशचं प्रेत होतं तिथे काही पिना सापडल्यात आणि त्याच्या मागच्या डब्यात एक स्ट्रॉ सापडला आहे. आनंद ते सर्व घेऊन इथेच यायला निघाला आहे...” काही वेळात आनंद आत आला. डोक्टरांनी आनंदने आणलेले जिन्नस तपासले. म्हणाले, “प्रधान साहेब, बरं झालं तुम्ही आनंदला हा स्ट्रॉ तोंडाजवळ न नेण्याची सुचना दिलीत. या कचऱ्यात विशेष काही नाही पण या पिनांमधल्या एकीवर आणि या स्ट्रॉमध्ये मला साईनाईडचे ट्रेसेस सापडले आहेत. शिवाय या पिनेच्या टोकाच्या भागाला थोडं रक्त आहे जे आकाशच्या रक्ताशी जुळतंय. प्रधान साहेब, याच स्ट्रॉचा वापर करून ही विषारी पीन आकाशवर चालवली गेली ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला...” प्रधान काही क्षण हनवटी चोळत उभे राहिले. मग म्हणाले, “ठीक आहे... आनंद, उमा, आपण चौकीवर जाऊ. त्या बिचाऱ्या प्रमोदला आपण धारेवर धरलंय...” गाडी बसता बसता उमा म्हणाली, “सर, म्हणजे खरा खूनी अजूनही मोकाट सुटलाय...”

सर्व चौकीवर पोहोचले तेव्हा तिथे गदारोळ सुरू होता. लोकांचे तीन गट दिसत होते. एक पोलीसांचा, एक आरडाओरड करणाऱ्या नागरिकांचा आणि एक शांतपणे उभ्या रेल्वेमधल्या प्रवाशांचा. गोंगाट करणारे सर्व आकाशचे नातेवाईक होते. पोटतिडकीने प्रमोदला शिक्षा देण्याची मागणी करत होते. प्रधान पुढे होत म्हणाले, “जरा शांत व्हा... हे बघा घडला प्रकार या सर्वांच्या समोर झाला असला तरी हा प्रमोद दोषी नाही. डब्यात झालेल्या वादात तो ढकलाढकलीचा प्रकार घडला हे जरी खरं असलं तरी त्यामुळे आकाशचा मृत्यू झाला नाही. त्याचा खून झाला आहे... विष दिलं गेलंय त्याला. मला सांगा, आकाशचं कोणाशी वैर होतं का...किंवा भांडण वगैरे...” सर्वांनी नकारार्थी माना हलवल्या. प्रधान म्हणाले, “ठीक आहे. तुम्ही आता घरी जा. आणि विश्वास ठेवा आमच्यावर... आम्ही या प्रकरणाचा छडा लवकरच लाऊ...” सर्वजण निघून गेल्यावर प्रधानांनी सचिनला प्रमोदला सोडायला सांगितलं. इतका वेळ शांत बसलेल्या त्या प्रवासी गटातील एकजण पुढे येत म्हणाला, “इंस्पेक्टर साहेब, आम्हाला किती वेळ अजून इथे थांबावं लागेल... अहो हा माणूस खूनी असेल किंवा नसेल, पण आम्हाला कशाला अडकवताय...” आनंद पुढे होत म्हणाला, “हे बघा, तुमच्याकडून थोडी माहिती हवी आहे म्हणून तुम्हाला इथे बोलावलं आहे. आम्हाला सहकार्य करा म्हणजे या केसची उकल लवकर होईल...” त्या सर्वांनी मानेने होकार देताच उमा पुढे झाली...

“मला सांगा, आकाश आणि प्रमोदचं भांडण सुरू असताना त्या ठिकाणाच्या आस-पास एखादी वेगळी गोष्ट तुम्हाला कोणाला जाणवली का... किंवा काही पाहिलंत का असं...” उमाच्या या प्रश्नावर सर्व विचार करू लागले पण कोणी काही बोललं नाही. इतक्यात एक माणूस पुढे होत म्हणाला, “सर, एक विचित्र गोष्ट घडली खरी...” सर्वांनी पाहिलं तर तो एका पायाने अधू असलेला इसम हातात कुबडी घेऊन उभा होता. तो पुढे बोलू लागला, "सर, हा प्रकार ज्या डब्यात घडला त्याच्या मागच्या अपंगांच्या डब्यात मी होतो. माझ्या समोर एक आंधळा बसला होता. फिकट दाढी-मिशा, डोक्यावर तुरळक केस, डोळ्यांवर काळा गॉगल, असा हा माणूस हातात कोल्ड ड्रिंकचा कागदी ग्लास घेऊन बसला होता. ग्लासात असलेला स्ट्रॉ त्याने नुसताच तोंडात धरला होता कारण स्ट्रॉमध्ये हालचाल दिसत नव्हती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्या हातात काठी नव्हती. मी त्याला विचारलंही पण त्याने उत्तर दिलं नाही. गोंधळामुळे जेव्हा गाडी थांबली तेव्हा तो उतरून गेला..." प्रधान म्हणाले, "ही फार मोलाची माहिती दिलीत तुम्ही. एकच करा. त्या आंधळ्या माणसाचा चेहरा बनवायला आम्हाला मदत करा. सचिन, गेट स्टार्टेड..."

पायाने अधू असलेल्या त्या व्यक्तीच्या मदतीने त्या अंध व्यक्तीचं स्केच बनवलं गेलं. सर्वाना जाऊ दिलं गेलं. मध्ये बराच वेळ निघून गेला. प्रधानांसह इतर तिघंही ते स्केच न्याहाळू लागले. प्रधान म्हणाले, “मला वाटतं हा माणूस आंधळा नसावा. त्या डब्यात शिरण्यासाठी केलेला बनाव असावा...” प्रधानांना दुजोरा देत उमा म्हणाली, “हो सर, आणि याचा या दाढी-मिशापण कृत्रीम वाटत आहेत. याने नक्कीच मेकप केला असणार...” सचिन पुन्हा त्या स्केचला न्याहाळत म्हणाला, “असं तर नाही, की हे टक्कलसुद्धा त्याच मेकपचा भाग आहे... याचा खरा चेहरा कसा काय ओळखायचा...” सर्व बोलत असताना आनंदचा फोन वाजला, “इंस्पेक्टर आनंद बोलतोय... काय... कुठे... ओके आम्ही पोहोचतोच... सर, वसई रोडवर अपघात झाला आहे. एका ट्रकने कारला धडक दिली आहे ज्यात कार-चालक जागीच मारला गेलाय. तिथे जमलेल्या सर्वांनी ट्रकचालकाला ताब्यात ठेवलं आहे...” सर्व ऐकत प्रधान म्हणाले, “सचिन, आनंद, तुम्ही तिथे जा... मला सविस्तर माहिती कळवा. उमा आपण या स्केचमधल्या माणसाला शोधण्याच्या कामाला लागू. न जाणो कुठे असेल हा... आणि हो... आकाशचा फोटोही बघ रेकॉर्ड्समध्ये. बघ काही सापडतंय का...”

सचिन व आनंद घटनास्थळी पोहोचले. बघ्यांच्या गर्दीतून वाट काढत दोघं गाडीजवळ आले. गाडी पूर्ण उलटी झाली होती. समोरचा भाग बऱ्यापैकी चिरडला गेला होता आणि आत रक्तबंबाळ झालेला एक माणूस दिसत होता. बाजूलाच उभ्या भल्यामोठ्या ट्रकजवळ काही माणसं एकाला धरून उभी होती. तो धरलेला माणूस, “मला सोडा... सोडा मला...” अशी गयावाया करत होता. सचिन व आनंद घोळक्याजवळ पोहोचले. “काय झालं इथे, आणि याला का धरून ठेवला आहे...” आनंदच्या या प्रश्नावर एकजण पुढे येत म्हणाला, “साहेब, हाच या ट्रकचा ड्रायव्हर आहे. आम्ही समोरून येताना हा प्रकार आमच्या समोर घडला. ती गाडी आपल्या मार्गाने जात होती आणि अचानक याने ट्रक वळवला तो थेट या गाडीवर. गाडीला जोरदार धडक बसली. गाडी हवेत उडून खाली पडली. ट्रकच्या बरोब्बर समोर गाडी पडली असल्याने ट्रक पुढे जाऊ शकला नाही आणि आम्हाला याला पकडता आलं. आनंदने प्रधानांना सगळी हकीगत सांगितली सचिनला जबान्या घेऊन चौकीवर यायला सांगून ट्रकसह प्रेत आणि गाडीला घेऊन पुढील तपासणीसाठी तो डॉ. गोखलेंकडे रवाना झाला. तिथे चौकीवर एव्हाना रेकॉर्ड्स तपासले गेले होते. उमा म्हणाली, “सर, या आकाशचं नाव आपल्या रेकॉर्ड्समध्ये आहे. माधुरी सबनीस केसमध्ये हा साक्षीदार होता...” प्रधान हनवटी चोळत म्हणाले, “इंटरेस्टिंग, त्या केसची फाईल घेऊन ये. बघू अजून काही सापडतंय का...”

डॉ. गोखलेंनी प्रेत, ट्रक आणि गाडी तपासण्यात बराच वेळ घालवला. प्रेतावरचं रक्त साफ झाल्यावर आनंदने चेहरा पाहिला आणि तो उडालाच. म्हणाला, "डॉक्टर याला ओळखतो मी. मागे आम्ही माधुरी सबनीस नावाच्या मुलीची केस हाताळली होती. त्यात हा एक साक्षीदार होता. याचं नाव रणजीत आहे आणि गोव्याच्या ए.व्हाय.एस. फिशरीजमध्ये हा कामाला होता. पण मग हा इथे काय करतोय...” आनंदच्या बोलण्याकडे लक्ष देत सचिन म्हणाला, “आठवलं आनंदसर त्या ट्रेनमध्ये खून झालेल्या आकाशला मी कुठे पाहिलं. याच माधुरी सबनीस केसमध्ये तोही एक साक्षीदार होता. मुंबईतल्या कॅपिटाज इंव्हेस्टमेन्टमध्ये हा कार्यरत होता... डॉक्टर अजून काही कळलं का...” डॉक्टर आनंद व सचिनला गाडीजवळ घेऊन येत म्हणाले, “या गाडीच्या इंजिनमध्ये एक चिप बसवली होती. तशीच चिप या ट्रकच्या स्टीयरिंग यंत्रणेतसुद्धा आहे. एकाच रिमोटने या दोन्ही चिप्स अॅक्टिव्हेट केल्या गेल्या ज्यामुळे गाडीचं इंजिन बंद झालं आणि ट्रकचं स्टियरिंग गाडीच्या दिशेने वळलं. पुढे काय झालं ते तुम्हाला माहीतच आहे. या रिमोट चिप्सची रेंज साधारण दहा ते वीस फुटांमध्ये असावी...” सचिन पुढे येत म्हणाला, “म्हणजे हा अपघात नसून खून आहे तर... आणि खूनी त्यावेळी आस-पासच होता. तो बिचारा ट्रक ड्रायव्हर योगायोगाने या प्रकरणात अडकला...” सर्व ऐकून आनंदने ताबडतोब प्रधान सरांना फोन केला...

चौकीवर चौघांची मिटिंग भरली. उमा म्हणाली, “सर, ट्रेनमध्ये भांडण होतं ज्यात या आकाशचा मृत्यू होतो. आपल्याला समजतं, की त्याला विष दिलं गेलं आहे. बिचारा प्रमोद त्यात अडकतो...” उमाच्या बोलण्याला पुढे नेत सचिन म्हणाला, “आणि हा आकाश आपण सोडवलेल्या एका केसमध्ये साक्षीदार निघतो. त्याच प्रकारे या रणजीतच्या गाडीला अपघात होतो आणि बिचारा ट्रक ड्रायव्हर त्यात अडकतो...” आनंद बाजूलाच उभा होता. म्हणाला, “आणि हा रणजीत त्याच माधुरी सबनीसच्या केस मधला दुसरा साक्षीदार निघतो... विलक्षण योगायोग...” प्रधान इतका वेळ शांत होते. सर्वांचं ऐकत म्हणाले, “हे सर्व योगायोग नाहीत... वरकरणी अपघात वाटणाऱ्या या दोन्ही घटना म्हणजे सूडाच्या उद्देशाने केलेले थंड डोक्याचे योजनाबद्ध खून आहेत. माधुरी सबनीस केसचा खूनी, तो रघुवीर, त्याला तर फाशी झाली... म्हणजे हा कोणीतरी त्याचा हितचिंतक असावा... माधुरी सबनीसच्या फाईलप्रमाणे त्या केसमध्ये तीन प्रमुख साक्षीदार होते. एक आकाश, दुसरा रणजीत आणि तिसरे होते माधव गानू. हे माधव गानू मालाड वेस्टच्या चिंचोली बंदर परिसरात राहत होते जेव्हा ती केस सुरु होती. त्यांचा पत्ता शोधा पण त्यांच्याशी संपर्क साधू नका. या योगायोगाच्या अपघातांवर पडदा पडण्याची वेळ आली आहे...” ते बोलत असतानाच त्यांची नजर कॉमप्युटरकडे गेली. त्यांचे डोळे विस्फारले. बाकीच्या तिघांना त्यांनी स्क्रीनकडे पहायला सांगितलं. सिनीयर इंस्पेक्टर प्रधान, इंस्पेक्टर आनंद, सब इंस्पेक्टर सचिन व सब इंस्पेक्टर उमा बराच वेळ आतल्या खोलीत आखणी करत होते. त्या ट्रक ड्रायव्हरला सोडून देण्यात आलं. अखेर त्यांनी सापळा रचला...

दोन दिवस मध्ये निघून गेले. संध्याकाळची वेळ होती. सोसायटीच्या आवारात मुलं खेळत होती. जवळच्या बागेत वृद्धांच्या गप्पा चालल्या होत्या. इतक्यात धप असा आवाज आला. सर्वांनी पाहिलं तर जमिनीवर कोणीतरी पडलं होतं. चेहऱ्याभोवती रक्तच रक्त होतं. बघ्यांची गर्दी जमली. एकाने प्रेत सरळ केलं आणि सर्वांना धक्का बसला. “याचा काय अर्थ... ही काय मस्करी करण्याची पद्धत झाली... हा पुतळा कोणी पाडला वरून...” गर्दीमधल्या एकाला कंठ फुटला आणि कुजबूज सुरू झाली. त्यातलाच एक माणूस मागे जात गर्दीपासून वेगळा झाला. इकडे-तिकडे पाहत आधी हळू आणि मग जोरात पळत सोसायटीमधून बाहेर जाऊ लागला. “कुठे निघालास विलास...” या आवाजाने विलास थबकला. त्याने हळू हळू मागे पाहिलं तर सिनीयर इंस्पेक्टर प्रधान व यांच्यासोबत प्रमोद त्याच्या समोर उभे होते. त्यांना पाहून विलासचे डोळे विस्फारले आणि तो पळू लागला. थोडाच पळाला असेल आणि हातात पिस्तूल घेतलेली उमा त्याच्या सामोर आली. आजूबाजूने विलास पळणार तोच सब इंस्पेक्टर सचिन व इंस्पेक्टर आनंदने त्याला पकडला. जमावाकडे पाहत प्रधान म्हणाले, “मंडळी, माफ करा. खुन्याला पकडण्यासाठी आम्हाला हा बनाव करावा लागला. प्रमोद, ट्रेनमध्ये जो खून झाला त्याचा खूनी हा आहे हा... विलास...

विलास तू लवकरच प्रमोदचा खून करायला येणार हे आम्ही ओळखलं होतं. त्याच्या घरात ट्रांसमीटर बसवले होते आम्ही. आज सकाळी तू प्लंबर बनून घरात प्रवेश केलास तेव्हाच समजलं की तू आजच याचा काटा काढणार. तू गेल्यावर आम्ही तपास केला तेव्हा समजलं की बाल्कनीच्या रेलिंगचे स्क्रू लूज आहेत. म्हणजे प्रमोद इथे आला असता रेलिंगला हात लावताच त्याच्यासकट तो खाली पडला असता आणि खेळ खलास... नाही का... पण सुडाच्या आगीत जळत असताना तू केलेली एक छोटीशी चूक तुला आज भोवली. आकाश आणि रणजीत आम्ही सोडवलेल्या दुसऱ्या एका केसमध्ये साक्षीदार होते. आम्ही त्याच केसच्या मागे लागलो असतो पण तुझ्या चेहऱ्याने तुझा घात केला. ट्रेनमध्ये झालेल्या खुनात त्या आंधळ्याचे चित्र बनवत असताना तू गडबडीत स्वत:चाच दाढी-मिशा लावलेला चेहरा बनवलास. तो चेहरा आम्ही चेक केला तेव्हा नीता सोनटक्केची केस समोर आली. आपल्या बहिणीच्या खुनासाठी तू तिघांना जबाबदार धरलं होतंस, आकाश, रणजीत आणि हा प्रमोद. तू बनवलेला आंधळ्याचा चेहरा, पायाने अधू असलेल्या माणसाचा आमच्या सी.सी.टिव्हीमधला चेहरा, ट्रक ड्रायव्हरचा चेहरा मॅच झाला. तो तूच होतास विलास. हे समजल्यावर आम्ही तापासाची दिशा बदलली आणि आज तू अडकलास. पुढचं मी सांगू की तू सांगतोस...”

चारही पोलीसांच्या गराड्यात फसलेल्या विलासने बोलायला सुरुवात केली, “मी विलास सोनटक्के. मी लहान असतानाच माझे आई-बाबा मला सोडून गेले. तेव्हा माझ्या तीन वर्षांच्या बहिणीची, नीताची जबाबदारी माझ्यावर आली. मी तिला लहानाची मोठी केली चांगल्या कॉलेजला घातली. ती कॉलेजमध्ये रमू लागली आणि तिला आनंदी पाहून मला समाधान वाटलं. कॉलेज संपल्यावर नीताचं लग्न लावावं हीच माझी इच्छा होती. नीतालामात्र पुढे शिकायचं होतं. पण सगळं संपलं. नीता तिच्या कॉलेज पिकनिकला जी गेली ती परतलीच नाही. मी शोध घेतला पण व्यर्थ. तीन दिवसांनी चालत्या गाडीतून कोणीतरी नीताची बॉडी घराबाहेर फेकली. त्यावेळी तिच्या हातात एक कागद होता. त्यावर लाल रंगाने तीन नावं लिहिली होती... आकाश, रणजीत आणि प्रमोद... खाली नाव होतं नीता... मी पोलिसांना बोलावलं. तपासात समजलं की तिच्यावर शारीरिक अत्याचार झाले होते. शिवाय शरीरावर जखमाही होत्या. माझी फुलांसारखी नाजूक नीता... किती हालहाल झाले असतील तिचे... मी त्या तिघांविरुद्ध तक्रार नोंदवली. तो कागदही मी पोलीसांना दाखवला पण त्यांनी नीट तपास केला नाही आणि तो कागदही गायब झाला. पुराव्या आभावी या तिघांचीही निर्दोष सुटका झाली. मी तिथेच त्या तिघांवर हल्ला केला पण पोलिसांनी मला पकडलं...

कोर्टाची बेअदबी आणि खोटी केस केल्याबद्दल मला शिक्षा झाली. मला खात्री होती, की याच तिघांमुळे माझ्या नीताचं... ती परत तर येऊ शकणार नव्हती पण तिला न्याय मिळवून द्यायचाच असं मी ठरवलं. त्याच आगीत जळत मी शिक्षा पूर्ण केली. बाहेर येताच आकाश, रणजीत आणि प्रमोदची माहिती मिळवली. तिघांनाही मारण्याचा प्लॅन बनवला. आकाशवर व रणजीतवर पाळत ठेवली. रणजीत मुंबईत आल्याचं मला समजलं पण नीताने लिहिलेल्या कागदात आकाशचं नाव पहिलं होतं. मी त्याच्या ट्रेनची वेळ शोधून काढली. योगायोगाने प्रमोदही तिथे आला. त्यांच्यात भांडण झालं. आकाशला मारून प्रमोदला त्यात अडकवण्याचा मी प्रयत्न केला पण त्याच वेळी तुम्हाला तुमच्या टीमसह येताना पाहिलं. मी घाबरलो आणि पायाने अधू बनून चौकीवर येऊन तुमची दिशाभूल करण्यासाठी आंधळ्याचा चेहरा बनवून दिला. तिथून मी निघालो तो थेट रणजीतकडे. मला वाटलं मला उशीर झाला, पण इथेही योगायोग माझ्या पथ्यावर पडला. रणजीतला निघायला उशीर झाला होता. मी त्याच्या गाडीच्या इंजीनमध्ये चिप बसवली. मी स्वत: ट्रकमध्ये होतो आणि माझ्यावर संशय येऊ नये म्हणून तशीच चिप मी ट्रकच्या स्टीयरिंगमध्ये बसवली. रणजीत टप्प्यात येताच मी रिमोटचं बटण दाबलं. इंजीन बंद पडून रणजीतची गाडी मंदावली आणि माझा ट्रक त्याच्या दिशेने वळला. मी व्यवस्थित यशस्वी झालो होतो पण...”  

विलासला मध्येच तोडत प्रधानांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, “पण ओव्हर काँफिडंस आणि सूडबुद्धी यामुळे तुझाच घात झाला. आमची दिशाभूल करण्याच्या नादात तू स्वत:चंच चित्र काढलंस हे तुझ्या लक्षात आलं नाही आणि तिथेच तू फसलास... प्रमोद... विलासच्या कबुलीजबाबामुळे नीता सोनटक्केची केस रीओपन होईल. बऱ्याबोलाने सर्व कबूल कर नाहीतर केस रीओपन झाल्यावर तुला रिमांडवर घेऊन...” प्रमोद हात जोडत म्हणाला, “साहेब, नीताच्या मृत्यूला मी, रणजीत आणि आकाश कारणीभूत होतो हे खरं असलं तरी आम्ही तिला मारलं नाही हो... ती कॉलेजला आल्यापासूनच आमचा तिच्यावर डोळा होता पण नीता आमच्याशी कधीच बोलली नाही. पिकनिकच्या वेळी आम्ही तिघांनी प्लॅन करून तिला पळवलं आणि रणजीतच्या फार्महाऊसवर नेलं. तिथे दोन दिवस आम्ही तिघांनी मिळून आळीपाळीने तिच्यावर... आम्ही केलेल्या मारहाणीमुळे आणि अशक्तपणामुळे तिसऱ्या दिवशी नीता मेली. तेव्हा आम्ही तिला गाडीत घालून तिच्या आयकार्डवर लिहिलेल्या तिच्या घरच्या पत्त्यावर टाकून दिली. कालांतराने माझ्यात आणि आकाशमध्ये गैरसमज होऊन शत्रुत्व निर्माण झालं आणि मी शहर बदललं. मला चांगली नोकरी लागली आणि काही वर्षांनी माझी पुन्हा मुंबईत बदली झाली. त्या दिवशी ट्रेनमध्ये योगायोगाने आम्ही भेटलो आणि राग अनावर होऊन त्याने भांडण उकरून काढलं...”

प्रमोदचं बोलणं संपतं न संपतं तोच विलासने प्रमोदचा गळा आवळला. सचिन आणि आनंदने विलासला धरलं. प्रमोदच्या डोक्याला पिस्तूल लावत उमा म्हणाली, “सर, एक खून माफ करा सर मला... या नराधमाला जगण्याचा काहीही अधिकार नाही...” उमाकडे पाहत प्रधान म्हणाले, “कंट्रोल युअरसेल्फ उमा... पुट द गन डाऊन... यू आर अ रिस्पॉन्सिबल ऑफिसर... प्रमोद, गुन्हेगार कितीही अट्टल असो, केलेला गुन्हा कधी लपून राहत नाही. नीता सोनटक्केवर केलेल्या अत्याचारांची कठोर शिक्षा तुला होईल. नक्कीच होईल. विलास... गुन्ह्याला शासन व्हायला हवं हे खरं आहे पण त्यासाठी तू निवडलेला मार्ग योग्य नव्हता. तुझ्याकडे सहानुभूतीच्या नजरेने पाहण्याची मी कोर्टाला विनंती करेन शिवाय नीतासारख्या मुलींना न्याय मिळावा यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू...”

समाप्त.

No comments:

Post a Comment