Wednesday, January 23, 2019

षडयंत्र...



रात्रीचे अकरा वाजून गेले होते. शहराबाहेरच्या निर्मनुष्य रस्त्यावरून एक जोडपं बाईकवरून चाललं होतं. "किती अंधार आहे रे... काहीच दिसत नाही बघ... इतका लांबसडक रस्ता आहे, निदान एखाद-दोन स्ट्रीट लाईट्स तरी लावायला हवे होते की..." मागे बसलेली मुलगी सभोवार नजर फिरवत म्हणाली. बाईक चालवणारा मुलगा हातांची पकड घट्ट करत थोडा मागे वळत म्हणाला, "कशाला घाबरतेस रजू... अगं दहा मिनिटात हा रस्ता पार करू आपण. हा शहराबाहेरचा रस्ता आहे म्हणून इतका सुनसान वाटतोय पण शहर जागं असेल बघ..." बोलणं बंद झालं. रातकिड्यांचा आणि बाईकचा काय तो आवाज, बाकी सर्वत्र नीरव शांतता पसरली होती. बाईक आपल्या वेगाने जात असताना, "खरऽऽऽडऽऽऽरऽऽऽ..." असा आवाज करत काही अंतरावर जाऊन थांबली...

"काय रे... काय झाला आता..." रजू खाली उतरत म्हणाली. त्या मुलाने बाईक स्टँडला लावली आणि मोबाईलच्या प्रकाशात हँडलजवळ वाकून पाहत म्हणाला, "सत्यानाश... अगं पेट्रोल संपलं. काय पण दुष्काळात तेरावा महिना... चल आता... इथे कुठला पंप मिळतोय आपल्याला... शहरापर्यंत बाईक हाताने चालवत न्यावी लागणार..." चेहऱ्यावरचे त्रासिक भाव अजून वाढवत रजू त्या मुलासोबत चालू लागली. हवेत गारठा असूनही बाईक ढकलून तो मुलगा घामाघूम झाला होता. बरंच अंतर चालून गेल्यावर रस्त्याच्या कडेला उभी असलेली एक रिक्षा त्यांना दिसली. रजू लगेच म्हणाली, "सुरेश, अरे ती बघ रिक्षा उभी आहे. चल ना विचारू त्याला..." सुरेशने चालण्याचा वेग वाढवला. बाईक रिक्षाच्या मागे लावून दोघं रिक्षाजवळ गेले...

आत रिक्षाचालक लोखंडी बारला डोकं टेकवून झोपला होता. "गोकुळधामला येणार का..." सुरेशने जवळ जात विचारलं. रिक्षावाला काहीच बोलला नाही तेव्हा त्याला हलवत, "ओ भाऊ... उठा की... का..." हे बोलतच होता की रिक्षावाला त्याच्या अंगावर पडला. अकस्मात रिक्षावाला अंगावर पडल्याने सुरेश गडबडून मागे झाला तसा तो रिक्षावाला जमिनीवर आदळला. त्या रिक्षावाल्याच्या गळयाभोवती जखम पाहून सुरेश हबकला. त्याने रिक्षावाल्याच्या नाकाजवळ बोट नेलं. त्याची नाडी तपासली आणि ताडकन उभा राहत म्हणाला, "र...रजू... ह...हा तर म....मेलाय..." हे ऐकून रजूचा धीर सुटला आणि ती किंचाळली...

तपासाला सुरुवात झाली. सब इंस्पेक्टर सचिन बॉडी तपासत होता आणि सिनीयर इंस्पेक्टर प्रधान दोघांची जबानी घेत होते. सुरेश बोलू लागला, "सर, मी सुरेश आणि ही माझी बायको रजनी. आम्ही परतत होतो तर बाईक बंद पडली. या रिक्षावाल्याला विचारावं म्हणून जवळ गेलो तर हा मरून पडलेला..." प्रधानांनी सर्व ऐकून घेतलं. हनवटी चोळत सचिनला म्हणाले, "सचिन, हा रिक्षावाला काय सांगतो आहे..." स.इं. सचिन उभा राहत बोलता झाला, "सर, याच्या लायसन्सवरून याचं नाव समजलं आहे, राजाराम शिंत्रे नाव याचं. गोराईला राहतो. मी रिक्षा तपासली. अचानक ब्रेक लागून ती थांबवली गेली आहे. टायर मार्क्स तेच सांगतात. सर, रिक्षाला मीटर नाही, म्हणजे फोन करून रिक्षा बोलावली गेली आहे. बाकी पाकिट, मोबाईल, सगळं जागच्या जागी आहे..." मृतदेहाकडे पाहत प्रधान म्हणाले, "हा इतकंच बोलून गप्प बसणार नाही. बोलेल... अजून बोलेल डॉ. गोखले बोलतं करतील याला..."

सर्वजण डॉ. गोखलेंच्या लॅबमध्ये पोहोचले तेव्हा ते तेस्टटयूबमधलं काहीतरी तपासत होते. मान वर करून पुन्हा खाली नेत डॉक्टर म्हणाले, "या प्रधानसाहेब, नॉर्मली आपण रिक्षावाल्याच्या शोधात असतो. आज हा स्वत:हून आला की आपल्याकडे... याचा मृत्यू गळा आवळल्यामुळे झाला आहे. ही गळ्यावरची जखम बघा... कॉपरचे ट्रेसेस सापडलेत यात. म्हणजे कॉपरच्या तारेने गळा आवळून मारलं आहे याला..." प्रधान गळ्यावरची जखम न्याहाळत म्हणाले, "अजून काही खुणा शरीरावर..." त्यावर डॉक्टर म्हणाले, “हो याच्या नखांमध्ये मला चामड्याचे अंश सापडलेत. त्याचा डी.एन.ए. काढला मी, पण आपल्या रेकॉर्डशी तो जुळत नाही...” सी. इं. प्रधान सचिनकडे वळत म्हणाले, “सचिन, तू, आनंद आणि उमा या रिक्षाच्या कंपनीत जाऊन या राजाराम शिंत्रे आणि त्याच्या शेवटच्या भाड्याचा माग काढा...”

सकाळचे अकरा वाजत आले होते. गाडी वेगाने रस्ता कापत होती. सब इंस्पेक्टर सचिन गाडी चालवत होता. इंस्पेक्टर आनंद बाजूला बसला होता आणि सब इंस्पेक्टर उमा मागे बसली होती. "आपले सर थोडे स्ट्रिक्ट खरे, पण केसच्या वेळी काय काय शक्कल लढवतात ना..." उमाला कंठ फुटला. तिला दुजोरा देत सचिन म्हणाला, "हो ना... विलास सोनटक्के केस काय किंवा त्या बंसीची केस काय... सरांच्या विचार करण्याच्या पद्धतीचा तर मी फॅन झालोय..." बोलणी सुरूच होती की गाडीसमोर एक माणूस आला. "सचिन वॉच आऊट..." या आनंदच्या ओरडण्याने सचिनने कर्कचून ब्रेक दाबला. आनंदने लगेच उतरून त्या धावणाऱ्या माणसाला धरलं व म्हणाला, "काय रे... रस्ता क्रॉस करताना गाड्या बघून करता येत नाही का... आणि ही बॅग... चोरून आणलीस वाटतं... चल चौकीवर. पोलीसी खाक्या दाखवल्याशिवाय तू बोलणार नाहीस..."

इं. आनंद म्हणाला, “सचिन, तू त्या रिक्षाच्या कंपनीत जा. मी आणि उमा याला घेऊन चौकीवर जातो...” सचिन मार्गस्थ झाला. त्या माणसाला जीपमध्ये बसवलं गेलं आणि जीप चौकीकडे रवाना झाली. चौकीवर पोहोचताच आनंदने त्या माणसाची चौकशी करायला सुरुवात केली. गदारोळ ऐकून सी. इं. इंस्पेक्टर प्रधान आत येत म्हणाले, "काय गडबड चालू आहे इथे... कोण आहे हा माणूस..." उमाने रस्त्यात घडलेली हकीगत सांगताच प्रधान म्हणाले, "हम्... ही बॅग आणि या माणसाच्या वेषात साधर्म्य वाटत नाही... नक्कीच याने ही चोरली असावी... काय रे, बऱ्याबोलाने सांग नाहीतर..." प्रधानांनी जसा आवाज चढवला तसा तो माणूस घाबरला. म्हणाला, "स...साहेब, मारू नका हो. मी सांगतो सगळं. मी संतोष. मी आणि माझे मित्र, राम मंदीर स्टेशनच्या आस-पास चोऱ्या करतो. गोरेगाव आणि जोगेश्वरीहून निघालेली ट्रेन जशी स्लो होते तशी आम्ही बाहेरून..." संतोष बोलतच होता की त्याला तोडत प्रधान म्हणाले, "फटका गँग... बरोबर ना...

ट्रेनमधल्या प्रवाशांमधून आपलं सावज हेरून हातावर फटका मारून पडलेल्या वस्तू घेऊन पसार होणारे ते तुम्हीच ना... बरे सापडलात तावडीत. आम्ही मागावरच होतो तुमच्या... उमा, या बॅगेला पासवर्ड लॉक आहे. एकदा स्कॅनरमधून घालून बघ काही समजतंय का..." उमाने बॅग स्कॅनरमध्ये घातली. त्यात कागद दिसत होते, फोनसारखी वस्तू होती आणि एक पिस्तूल दिसत होतं. पिस्तूल पाहून सर्व अवाक झाले. प्रधानांच्या परवानगीने आनंदने ती बॅग उघडली. आत एक कोरा कागद, एक स्वीस मेड गन व एक रिमोट होतं. त्या रिमोटला एकच बटण होतं. बॅगेतल्या वस्तू पाहून सर्वांना नवल वाटलं. प्रधान म्हणाले, "या वस्तू... हा कोरा कागद, ही पिस्तूल आणि हा रिमोट... काहीतरी वेगळंच वाटतंय हे... कोरा कागद इतका नीट नेटका ठेवला आहे की शंका येत आहे..."

प्रधानांना दुजोरा देत आनंद म्हणाला, "हो ना... आणि ही विना लायसंस पिस्तूल व हा रिमोट... एकच बटण असलेला हा रिमोट कशासाठी असेल..." उमाने सहज कागदाला हात लावला तर तो थोडा दमट लागला. तिने नाकाजवळ नेला आणि म्हणाली, "सर, हा कागद लिंबाने भिजवला आहे. पण असा कागद कोण कशाला जवळ बाळगेल... काय असेल यात..." सर्व वस्तूंकडे पाहत प्रधान म्हणाले, “कुठल्यातरी मोठ्या कटाची नांदी दिसते ही...” ते पुढे बोलणार इतक्यात सचिनचा फोन आला, “बोल सचिन, लोकेशन समजलं. ओके. बघ काही मिळतंय का...” फोन ठेवत संतोषकडे वळत म्हणाले, “काय रे, ज्या माणसाकडून ही बॅग लंपास केलीस, त्याला पाहिलं असशीलच ना...” बॅगमधल्या वस्तू पाहून संतोष भीतीने आधीच अर्धमेला झाला होता. म्हणाला, “साहेब, मी त्या माणसाला नाही पाहिलं हो. खरं सांगतोय...

आम्ही तीन-चार जण एकत्र काम करतो. आमच्यापैकी दोघंजण चर्चगेटवरून सुटणाऱ्या ट्रेनमध्ये शिरतात. आणि दोघं राम मंदिरस्टेशनच्या थोडं पुढे उभे राहतात. आमचा शिकार हेरून त्याच्या आजूबाजूला आम्ही उभे राहतो. हे प्रवाशी आपापल्या बॅगा घेऊन दारात उभे असतात आणि यांच्यामुळेच आमचं फावतं. अंधेरीला ट्रेन पोहोचली की आमच्यातला एक उतरतो आणि स्टेशनबाहेर उभ्या असलेल्या आमच्या माणसांना फोन करून शिकाराची माहिती देतो. आमच्या शिकाराला बोलण्यात, भांडणात गुंतवून ठेवत त्याच्या मागे उभा असलेला आमचा माणूस राम मंदिर येण्याची वाट बघतो. स्टेशन आलं की तो सर्वांच्या नकळत आम्हाला फोन करतो. आम्ही फोन घेत नाही पण रिंग वाजत राहते. त्याचा फोन आला की आम्ही काठी घेऊन तयार राहतो. फोन कट होताच आमच्यातला एक फटका मारतो आणि सामान ट्रेन बाहेर पडतं. ट्रेन गेल्यावर झाडीत लपलेला आमचा साथीदार ते सामान उचलतो आणि पसार होतो...

या वेेेळी मला पडलेलं सामान उचलून पळून जायचं होतं आणि आमच्यातल्या सन्नीला ट्रेनमधून फोन करायची ड्यूटी होती...” संतोषला मध्येच तोडत प्रधान म्हणाले, “ड्यूटी का... वाह... मोठे संरक्षण अधिकारीच की तुम्ही... चला, त्या सन्नीला बोलवून घ्या इथे... आणि, हा सन्नी इथे नाही पोहोचला, तर संतोष, तुझी काही खैर नाही...” संतोष चळचळा कापत होता. थरथरत्या हाताने त्याने सन्नीला फोन लावला, “स...सन्नी, कुठे आहेस... ह...हे बघ...” फोन त्याच्या हातून खेचून घेत प्रधान म्हणाले, “सन्नी, मी सिनियर इंस्पेक्टर प्रधान बोलतोय... जिथे असशील तिथून स्पेशल ब्रांचला ये... नाही आलास तर याद राख...” इतकं बोलून प्रधानांनी फोन बंद केला. इतक्यात आनंदचा फोन वाजला. फोन बघत आनंद म्हणाला, “सर, सचिनचा मेसेज आलाय. त्या शिंत्रेच्या रिक्षात बसणाऱ्या माणसाचा चेहरा त्याने पाठवलाय...”

आनंद आणि प्रधानांनी फोटो पाहिला. आनंद म्हणाला, “सर, क्लोज-अप एकदम क्लीयर आलाय, पण या माणसाच्या दाढी-मिशा फेक वाटत आहेत...” प्रधान काही बोलणार इतक्यात उमा सांगत आली, “सर, या कागदाची उकल झाली आहे. लिंबाने भिजलेला हा कागद ज्योतीखाली धरला तेव्हा लाल रंगातल्या या रेषा समोर आल्या...” उमाने आणलेला कागद सर्वांनी पाहिला. त्यावर काही चिन्ह आणि एक मोठी रेष दिसत होती. आनंद म्हणाला, “इंग्लिश मधल्या डी या अक्षराशी मिळणारा हा आकार, एका बाजूला इंग्लिश यू आणि दुसऱ्या बाजूला एक चौकोन... काय अर्थ असावा याचा...” कागद उलटा-सुलटा करत असताना प्रधानांचे डोळे विस्फारले. मध्ये बराच वेळ निघून गेला. चौकीच्या दारात एक माणूस आला. तो माणूस थोडा घाबरतच चौकीत शिरला...

"सर, हाच आहे सन्नी..." संतोषच्या बोलण्याने सर्वांनी सन्नीकडे पाहिलं. आनंद म्हणाला, "वाह, लवकर आलास... या संतोषने सांगितलं, की ट्रेनमधल्या माणसावर लक्ष तुला ठेवायचं होतं, बरोबर ना... त्या माणसाचं स्केच बनव आमच्यासाठी... तू वर्णन कर, आमचा आर्टिस्ट स्केच बनवेल..." काही वेळात स्केच तयार झालं. डोक्यावर तुरळक पांढरे केस, सुरकुतलेला चेहरा, जाड भिंगाचा चष्मा, मिशी आणि गहिरा सावळा वर्ण, अशा आविर्भावातल्या माणसाचा चेहरा सर्वांनी पाहिला. उमाला काहीतरी जाणवलं आणि तिने रिक्षामधल्या भाडेकरूचा चेहरा व ट्रेनमधल्या प्रवाशाचा हा चेहरा स्कॅन करून जुळवून पाहिला. क्षणार्धात ती उडालीच. म्हणाली, "सर, हे दोन्ही चेहरे मॅच होत आहेत. थोडाफार मेकप केल्याने वेगेळे वाटत आहेत इतकंच..."

स्क्रीनकडून प्रधानांकडे वळत आनंद म्हणाला, "सर, याचा अर्थ, त्या रिक्षाचालकाचा खून करणारा आणि ज्याची ही बॅग आहे तो ट्रेनमधला माणूस, हे दोन्ही एकच आहेत..." काहीक्षण सर्वांकडे पाहत प्रधान म्हणाले, "आय थॉट सो... बरं, सचिनशी काही संपर्क... बराच वेळ झालाय, तो त्या रिक्षाचाच माग काढतोय...” आनंद व उमाने नकारार्थी मान हलवल्यावर उमाकडे वळत प्रधान म्हणाले, “उमा, मुंबईचा कोस्टल मॅप ओपन कर प्रॉजेक्टरवर... टीम, हॅव अ लूक. ही इंग्लीश अक्षरं नाहीत. हे बघा, हा इंग्लीश यू नसून गेटवे ऑफ इंडियाचं चिन्ह आहे... त्याच्या समोरची ही वळलेली रेषा म्हणजे क्वीन्स नेकलेस. अर्थात मरीन ड्राईव्ह. पण हा चौकोन काय असावा..." "हा चैकोन म्हणजे शिवाजीपार्कचं मैदान आहे सर..." सर्वांनी आवाजाच्या दिशेने पाहिलं, तर सचिन दारात उभा होता. त्याला पाहून सर्व आनंदित झाले. सचिनच्या जवळ जात त्याच्या खांद्यावर हात ठेवत आनंद म्हणाला, “काय हे सचिन, होतास कुठे...”

आनंदकडे पाहत खांद्यावरचा हात बाजूला सारत सचिन म्हणाला, “यायला उशीर झाला. त्या रिक्षाबद्दलची सगळी माहिती गोळा करून आलोय...” प्रधानांनी सर्व ऐकून घेतलं व म्हणाले, "गुड जॉब सचिन. आता एक काम कर... तू आणि उमा हा रिमोट घेऊन डॉक्टर गोखलेंकडे जा. याच्या सिग्नल्समधून काही अधिक समजतंय का बघा...” सचिन आणि उमा रिमोट घेऊन डॉ. गोखलेंकडे रवाना झाले. आनंद म्हणाला, "सर, सचिनचं वागणं-बोलणं थोडं वेगळं वाटलं मला. म्हणजे तो नेहमीसारखा जाणवत नव्हता. थोडा तेन्स्ड वाटला..." आनंदच्या बोलण्यावर होकारार्थी मान हलवत प्रधान काही बोलणार इतक्यात त्यांचा फोन वाजला, "हॅलो, सीनियर इंस्पेक्टर प्रधान बोलतोय... सचिन, काय झालं रे... हां... बरं... नको तू डॉ. गोखलेंकडे ये. कोणाला मदतीला पाठवू का... ओके..."

कॉल कट झाला. गोंधळलेल्या नजरेने आनंदकडे पाहत प्रधान म्हणाले, "आत्ता दहा मिनीटांपूर्वी उमासोबत सचिन डॉ. गोखलेंकडे गेला तेव्हा तो बरा वाटत होता. पण फोनवरचा त्याचा आवाज वेगळा वाटला. त्याच्या आवाजात वेदना जाणवल्या... आनंद, या आलेल्या कॉलचा ट्रेस कर आणि सचिन व उमा दोघांचे ट्रॅकर्स ऑन कर... बी क्विक..." प्रधानांनी सांगितल्याप्रमाणे आनंदने केलं आणि तोही गोंधळला. म्हणाला, "सर, सचिनचा संपर्क तुटला आहे पण त्याचं शेवटचं लोकेशन मालवणीच्या एरियात दाखवतंय. उमाचा ट्रॅकर अजून चालू आहे आणि अंधेरी एरियात एकाच ठिकाणी दाखवतोय... शिवाय तुम्हाला आत्ता आलेला कॉल बोरिवलीजवळच्या जंगलातलं लोकेशन दाखवतोय..." प्रधानांचे डोळे विस्फारले. ते म्हणाले, "स्ट्रेंज... सचिन आणि उमा दोघं एकत्र गेले असताना दोघांची लोकेशन्स वेगळी कशी... आणि ही दोन्ही लोकेशन्स डॉ. गोखलेंच्या लॅबपासून लांब आहेत... समथिंग इज फिशी आनंद... सचिनने तर कॉल केला आहे आता आधी आपण उमाचा शोध घेऊ... लेट्स गो..."

उमाच्या ट्रॅकरचा माग काढत आनंद आणि प्रधान अंधेरीत पोहोचले. एका निर्मनुष्य गल्लीच्या कडेला एक पडका बंगला दिसत होता. आनंद कुजबुजत म्हणाला, “सर, उमाच्या ट्रॅकरचा सिग्नल इथलंच लोकेशन दाखवतोय. ती आतच आहे सर...” पुढे जाणाऱ्या आनंदला थांबवत प्रधान म्हणाले, “थांब आनंद. डोंट गेट एक्साइटेड. उमा संकटात असली तर... तू या झाडीतून मागच्या बाजूने जा. मी समोरून जातो...” आनंदला प्रधानांचं म्हणणं पटलं. पिस्तुल सरसावत आनंद दबकत दबकत मागच्या बाजूला गेला. प्रधानांनी त्याचं पिस्तुल काढलं आणि दाराकडे जाऊ लागले. दाराजवळ पोहोचत त्यांनी कानोसा घेतला. आत पावलांचा आवाज येत होता. खिडकीचं दार बाजूला करत प्रधानांनी पाहिलं तर उमाला खुर्चीत बांधून ठेवलं होतं आणि तीन बंदुकधारी गुंड तिच्या आस-पास फिरत होते...

त्यातले दोघं आत निघून गेले आणि एक दाराकडे येऊ लागला. प्रधानांनी संधी साधत दाराला धडक दिली. दार खाडकन उघडलं आणि तो गुंड मागे सरकत उमाच्या पायाशी पडला. त्याच्या हातून त्याची बंदूक निसटली. प्रधानांनी लगेच त्याचं तोंड दाबलं आणि स्वत:जवळच्या पिस्तुलाच्या प्रहाराने त्याला बेशुद्ध केलं. प्रधान उमाला सोडवतच होते की आत गेलेले बाकी दोन गुंड बाहेर आले. ते प्रधानांवर गोळ्या चालवणार इतक्यात खिडकी तोडून आनंद आत शिरला आणि त्याने दोघांनाही गोळ्या घातल्या. उमाला सोडवत असताना प्रधानांनी विचारलं, “काय गं उमा... इथे कोणी आणलं तुला... आणि तो सचिन...” प्रधानांना मध्येच तोडत उमा म्हणाली, “सर, तो सचिन नाही. दुसराच कोणीतरी आहे. कदाचित त्याने मास्क लावला असावा. आम्ही निघालो आणि त्याला फोन आला. तो ज्या भाषेत बोलत होता त्यावरून समजलं की तो सचिन नाही. मी काही करणार इतक्यात त्याच्या साथीदारांनी मला पकडलं...

सर, ते मला मारू शकत होते. पण त्यांनी असं केलं नाही. जो माणूस सचिन बनून आला होता तो म्हणाला, “मरने की जल्दी क्या है... जरा सब्र कर लो... और डरो नहीं. तुम अकेली नहीं मारोगी. तुम्हारी यह मुंबई भी तुम्हारे साथ होगी...” सर, त्याच्या बोलण्याचा अर्थ नाही समजला. मला बांधून तो माणूस रिमोट घेऊन निघून गेला...” त्या बेशुद्ध असलेल्या गुंडाला बेड्या घालत आनंद म्हणाला, “सर, इथे जास्त वेळ थांबण्यात धोका आहे... आपण लगेच इथून निघू आणि यालाही घेऊन जाऊ सोबत...” सर्वांना आनंदचं म्हणणं पटलं. त्या गुंडाला घेऊन आनंद व उमा प्रधानांसोबत डॉ. गोखलेंकडे रवाना झाले. थोड्याच वेळात सर्व डॉ. गोखलेंकडे पोहोचले. डॉ. गोखले उमाच्या डोक्याला पट्टी बांधतच होते की धापा टाकत सचिन आत शिरला. त्याच्या खांद्याला जखम झाली होती आणि तिथलं रक्त साखळून डाग पडला होता...

त्याला एका खुर्चीवर बसवत प्रधान म्हणाले, “सचिन, थँक गॉड यू आर ओके... पण ही जखम... आणि होतास कुठे तू...” उमाने दिलेलं पाणी पीत सचिन म्हणाला, “सांगतो सर, त्या राजाराम शिंत्रेच्या रिक्षाचा माग काढत त्याची रिक्षा जिथे बुक केली गेली होती तिथे मी पोहोचलो. आजू-बाजूला असलेल्या दुकानांमध्ये असलेल्या सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यातले शिंत्रेच्या शेवटच्या ग्राहकाचे फोटो तुम्हाला पाठवले. तो फोटो पाहून चेहरा बनावट वाटला. म्हणून अधिक तपास करू लागलो. एका बंद कारखान्याजवळ पोहोचलो. तिथे कॉम्प्यूटरवर एका पेनड्राईव्हद्वारे एक व्हिडीयो सुरू होता. इतक्यात एक माणूस तिथे आला. त्या माणसाचा चेहरा आणि मी पाठवलेल्या रिक्षातल्या ग्राहकाचा चेहरा यात मला साम्य वाटलं. मी त्याचा फोटो काढला. सर त्यांच्याजवळ अत्याधुनिक हत्यारं होती. वाढीव कुमक बोलवावी म्हणून तुम्हाला फोन करणार इतक्यात त्यांनी मला पकडलं. मी प्रतिकार करताच माझ्या डोक्यावर फटका मारला. मला शुद्ध आली तेव्हा माझ्या समोर तो माणूस उभा होता. त्याने माझ्या चेहऱ्याचा मास्क घातला आणि अगम्य भाषेत त्याच्या साथीदारांना काहीतरी सांगून तो निघून गेला...

बहुतेक मला ठार मारायला सांगितलं असावं. तो जाताच ती माणसं माझ्याकडे वळली. मी त्यांना गुंगारा देऊन पेनड्राईव्ह घेऊन तिथून निसटलो पण त्यांनी माझ्यावर गोळी झाडली. जंगलात एका तलावाजवळ पाणी पिताना त्यांनी मला गाठलं. मी तिघांनाही संपवलं आणि त्यांच्याच फोनवरून तुम्हाला कॉल केला. सर ही पेनड्राईव्ह बघा... इट्स शॉकिंग...” पेनड्राईव्ह चालवला गेला. त्यात जंग-ए-जिहाद, मुंबईचा रोड मॅप आणि हाफ़ीज़ सैयद यांचा उल्लेख होता. आनंदने त्या पकडून आणलेल्या माणसाला हे दाखवलं आणि रिक्षातला भाडेकरू, ट्रेनमधला प्रवासी हे दोन्ही हाफ़ीज़ सैयद असल्याची पुष्टी करून घेतली. प्रधानांनी लगेच इंटरपोलच्या साईटवरून जंग-ए-जिहादबद्दल माहिती मिळवली. काही क्षणात त्यांना हवी असलेली माहिती मिळाली. ती वाचताना प्रधानांना धक्का बसला...

बॅगेतून मिळालेला कागद पुन्हा पाहत प्रधान म्हणाले, "टीम, इट्स बिग अँड डेंजरस टू... हाफ़ीज़ सैयद एक अंतरराष्ट्रीय अतिरेकी आहे. जंग-ए-जिहाद ही international terrorist organization आहे. हे पाकिस्तान, अफगाणिस्तान व इतर काही देशांना गुप्तपणे घातक हत्यारं पुरवतात. इतर हत्यारांखेरीज यांच्याकडे सहा न्यूक्लीयर बॉम्बपण होते. त्यांच्यातला एक आता विकला गेला आहे. तो रिमोट, उद्याच्या मुंबई परेडचा हा रोड मॅप, ही पेनड्राईव्ह आणि इंटरपोलची माहिती... यावरून हे स्पष्ट आहे की न्यूक्लीयर ब्लास्ट करून पूर्ण मुंबई संपवण्याचं भयंकर षडयंत्र रचलं गेलंय. कदाचित त्या रिक्षावाल्याला प्रवासात याची कुणकूण लागली आणि त्या बिचाऱ्याचा हाकनाक बळी गेला. टीम, वी आर डिलींग विथ अॅन एक्सट्रीमली डेमजरस सिच्यूवेशन...

या प्रकरणाबाबत पूर्ण गुप्तता पाळा. ही गोष्ट लीक झाली तर मुंबईत हलकल्लोळ माजेल... वी हॅव द डेट, वी हॅव द प्लेस बट, वी डोंट हॅव द टाईम अँड लोकेशन... या सैयदच्या पाच माणसांना आपण संपवलं आहे. उद्या परेडमध्ये अजूनही माणसं असतील..." प्रधानांना मध्येच तोडत डॉ. म्हणाले, "प्रधान साहेब, तुमच्याकडे इतकी माहिती असताना मला नाही वाटत हा सैयद उद्या काही करेल... ही मे जस्ट ड्रॉप हिज प्लॅन..." प्रधान म्हणाले, “नो डॉक, आय डोंट थिंक सो... सैयद हा प्लॅन ड्रॉप नाही करणार. त्याने आपल्याच माणसाचा चेहरा वापरून शिताफीने ते रिमोट पळवलं आहे. दॅट मीन्स ही हॅज गिव्हन अस ओपन चॅलेंज... आय टेक धिस चॅलेंज सैयद... टीम, या रोड मॅपमध्ये दाखवलेल्या या फुल्या म्हणजे नर्मल बॉम्ब असणार, आपलं लक्ष्य विचलित करण्यासाठी. खरा ब्लास्ट, शिवाजी पार्क... इन द हार्ट...

आनंद, तू या पहिल्या मार्कवरचा बॉम्ब निकामी कर, फाऊंटन एरिया... उमा, तू दुसरा मार्क, गणेश गल्ली एरिया, सचिन, तिसरा मार्क, चित्रा सिनेमा एरिया आणि मी असेन शिवाजी पार्कला... आपले आपले बॉम्ब निकामी झाले की लगेच शिवाजी पार्कला पोहोचा... लेट्स नेल दीज टेररिस्ट्स... ऑल द बेस्ट..." दुसऱ्या दिवशी चौघंही चौकीवर भेटले. पोलिसांची वाढीव कुमक तयारच होती. सर्वांनी आपापल्या बंदुका तपासल्या. “आजचा दिवस, मुंबईसाठी...” असं म्हणत प्रधानांनी सर्वांसोबत हस्तांदोलन केलं. मोहीम सुरू झाली. नऊ वाजून गेले होते. आनंद, उमा, सचिन आणि प्रधान आपापल्या तुकड्यांसह ठरलेल्या जागी पोहोचले. मार्कवर पोहोचताच सर्व पांगले. डोळ्यात तेल घालून सर्व चौफेर नजर फिरवत होते. एखादी संशयास्पद वस्तू किंवा माणूस आढळताच एकमेकांना कळवत होते. फाऊंटन जवळच एका बँकेच्या बाहेर बसलेल्या गार्डवर आनंदची नजर गेली. थंडीचे दिवस असूनही तो गार्ड घामांच्या धारांनी ओलाचिंब झाला होता. भीतीयुक्त नजरेने तो सगळीकडे पाहत होता...

आनंद त्याच्याकडे जाऊ लागला तशी हलकेच मान हलवून त्याने आनंदला थांबवलं आणि एका ठिकाणी नजर वळवली. आनंदने तिथे पाहिलं तर दोन माणसं त्या गार्डपासून जवळच खिशात हात घालून उभी होती. आनंद कानाला हात लावत म्हणाला, “टीम आल्फा कम इन... टू पार्सलस थर्टी डिग्रीज...” आनंदचं बोलणं ऐकताच चार हवालदार पुढे आले आणि त्या दोन माणसांना जेरबंद केलं. सगळं इतकं पटकन झालं की त्यांना काही समजलंच नाही. आनंद त्या गार्डजवळ आला. त्याच्या खुर्ची खाली आनंदला टिकटिक ऐकू आली. “कव्हर मी...” असं म्हणत आनंदने खुर्चीखाली पाहिलं. टायमर लावलेला बॉम्ब त्याच्या नजरेस पडला. तीन वायर असलेल्या त्या बॉम्बजवळ जात आनंदने मधली सर्वात लांब असलेली लाल रंगाची वायर कापली. टायमर बंद झाला. आनंदने सर्वांना कळवलं, “रेड वूल्फ नंबर थ्री... वन डाऊन टू टू गो...” आनंदचं बोलणं सर्वांना समजलं. रेड वूल्फ म्हणजेच लाल वायर हे सर्वांना आनंदने सांकेतिक भाषेत सांगितलं...

परेड आपल्या मार्गाने सुरू होती. पोलिसांची तुकडी, सैनिकांची तुकडी आपापल्या कवायती करत होत्या. गणेश गल्लीजवळ उभी असलेली उमा सगळीकडे बॉम्बला शोधत होती. एका गाडीजवळ उमा उभी असताना दोघा जणांनी तिला हटकलं आणि गाडीपासून लांब जायला सांगितलं. उमाला संशय आला खरा पण काही न बोलता ती गाडीपासून लांब झाली. थोडं लांब जात उमा उजवा हात तोंडाजवळ नेत म्हणाली, “टीम अल्ट्रा... क्लोज इन... टू स्टिक्स फॉर्टी फाईव्ह डिग्रीज...” उमाचा संदेश मिळताच तिच्यासोबतच्या हवालदारांनी त्या दोघाही माणसांच्या मुसक्या बांधल्या आणि त्यांना घेऊन गेले. उमाने गाडी तपासली. डिक्कीला हात लावताच तिच्या हाताला झिणझिण्या जाणवल्या. उमाने डिक्की उघडली. टायमर सुरू होता. स्फोट व्हायला मिनिटभर उरलं होतं तेव्हा उमाने लाल वायर कापली. बॉम्ब निकामी झाला. उमा हसली आणि हात तोंडाजवळ नेत म्हणाली, “टू डाऊन वन टू गो...”

एकेक बॉम्ब निकामी होत होता तशी प्रधानांची कळी खुलत होती. चित्रा सिनेमासमोर उभा असलेल्या सचिनला थियेटर परिसरातच काहीतरी गडबड आहे असं सारखं जाणवत होतं. परेड चित्रा सिनेमाजवळ पोहोचणारच होती. सचिन आत शिरला. गेटजवळच एका झाडाखाली असलेल्या कचऱ्याच्या पेटीत एक खोका पडला होता. “अलर्ट टीम सिग्मा... कव्हर मी...” असं सचिनने म्हणताच सचिनसोबतचे हवालदार त्याला घेरून उभे राहिले. सचिनने खोका बाहेर काढून हळूच उघडला. बॉम्बवरचा टायमर तीन मिनिटे दाखवत होता. सचिनने लाल वायर कापली. बॉम्ब बंद झाला. कानाजवळ हात नेत सचिन म्हणाला, “ऑल विकेट्स डाऊन... टाईम फॉर द बिग वन...” सगळे बॉम्ब निकामी झाले होते. प्रधानांनी सुटकेचा श्वास घेतलाच होता की त्यांच्या पाटीवर कोणीतरी थाप मारली. प्रधान वळले तर एक माणूस समोर उभा होता. तो हसला. बंदूक प्रधानांच्या पोटाला लावत म्हणाला, “प्रधान... तू क्या समझता है... यह छोटे-मोटे बम बंद करके तू मुझे हरा पायेगा... इस हाफ़ीज़ सैयद को...

मुझे मालूम था तू कुछ भी करके मेरे इरादे को नाकामयाब करने की कोशिश करेगा... वह बम इसीलिये लगाये थे ताकी तू यहाँ अकेले आ जाये... अब इस रिमोट का बटन दबाकर तेरे साथ तेरी यह मुंबईभी खत्म हो जायेगी... इंशाह अल्लाह... कामयाबी मेरे कदम चूमेगी... हा...हा...हा...” “सैयद... इस गलतफहमी में मत रहना... मेरी टीम आती ही होगी...” प्रधानांच्या या बोलण्यावर सैयद अजून जोरात हसत म्हणाला, “बेवकूफ... इतना बडा मैदान है... कहां तलाश करोगे बम को... और जब परेड यहाँ पोहोचेगी तब... बूम... सब खत्म... ले जाओ इसे और बांध दो बम के साथ...” चार माणसं प्रधानांना घेऊन गेली. आनंद, उमा आणि सचिन मैदानाजवळ पोहोचले. प्रत्येक जण प्रधानांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता पण ते उत्तर देत नव्हते. तिघंही बॉम्बला आणि प्रधानांना शोधू लागले. मैदानाच्या मधोमध एक मंच उभारला होता ज्यावर माननीय मुख्यमंत्री आणि इतर मोठी माणसं बसली होती. त्याच मंचाच्या खाली प्रधानांना एका खुर्चीवर बांधून ठेवलं होतं. त्यांच्यासमोर एक हिरव्या रंगाची मोठी काचेची पेटी होती. त्या पेटीतून टिक टिक टिक असा सारखा आवाज येत होता...

पेटीकडून प्रधानांकडे पाहत सैयद म्हणाला, “यह क्या है जानते हो... यह है जन्नत का रास्ता... जब इस रिमोट का बटन डबा दूंगा तब... लेकीन इतनी जल्दी भी क्या है... अब मै ऊपर जाकर यह बटन दबा दूंगा. नीचे दिखेगा एक आग का दरिया... और तेरी मुंबई खत्म. पहले मुंबई और फिर पूरा हिंदुस्तान... हा...हा...हा...” हे म्हणत असताना सैयद बाहेर पळाला. चार बंदुकधारी प्रधानांवर पिस्तुलं रोखून उभे होते. इथून बाहेर कसं पडावं याचाच विचार करत असतानाच त्याचं घड्याळ आवाज करू लागलं. हा आवाज कुठून येतोय हे पाहताना ते बंदुकधारी गोंधळले. प्रधानांनी त्यांच्या घड्याळातली एक पिन ओढली. एक छोटी सुरी बाहेर आली. त्या सुरीने प्रधानांनी दोर कापला आणि ते उभे राहिले. ते चारही बंदुकधारी आता गोळ्या चालवणार इतक्यात तीनही बाजूंनी गोळ्या सुटल्या आणि ते बंदुकधारी एकामागून एक कोसळले. प्रधान म्हणाले, “उमा, आनंद, सचिन... तो सैयद रिमोट घेऊन पळालाय. गाठा त्याला. मी इथे हा बॉम्ब निकामी करण्याचा प्रयत्न करतो... गो फास्ट...”

मंचाबाहेर पडण्याआधी तिघांनी एकदा मागे वळून पाहिलं आणि सैयदमागे जात तिघं दिसेनासे झाले. प्रधानांनी काचेची पेटी उघडली. काहीक्षण त्यांनी तो बॉम्ब नीट पाहिला. पिवळ्या त्रिकोणाला एक फिकट लाल सिलेंडर जोडला होता. वरून उघड्या असलेल्या त्या सिलेंडरमध्ये एक नारंगी रंगाचा गोळा स्वत:भोवतीच फिरत होता. “काही करून हा गोळा फिरायचा थांबला पाहिजे तरच याला बाहेर काढता येईल आणि तेव्हाच हा बॉम्ब निकामी होईल...” हा विचार करत असतानाच प्रधानांना पिवळ्या त्रिकोणावर चार स्क्रू दिसले. प्रधान अलगदपणे एकेक स्क्रू उघडून बाजूला ठेऊ लागले. तिथे सैयद त्याच्या हेलिकॉप्टरकडे वळला. हेलिकॉप्टर चालू झालं पण त्याचवेळी आनंद, उमा आणि सचिन तिथे पोहोचले. एव्हाना परेड मैदानापर्यंत पोहोचली होती. तिघांनी हेलिकॉप्टरमध्ये उडी घेऊन सैयदला बाहेर काढलं खरं पण त्याआधीच सैयदने बटण दाबून बॉम्ब सुरू केला होता. जेरबंद झालेला सैयद जोरजोरात हसत म्हणाला, “हा...हा...हा... अब क्या करोगे... बम शुरू हो चुका है... किसी को पताही नहीं चलेगा कब सब जन्नत पाहुच गये... हा...हा...हा...”

इतकं होईपर्यंत प्रधानांनी चारही स्क्रू काढून तो पिवळा त्रिकोण वेगळं केला. त्रिकोण वेगळा होताच लाल सिलेंडरमधल्या गोळ्याचा फिरण्याचा वेग मंदावला. प्रधानांनी सिलेंडरला जोडलेल्या वायर्स कापायला सुरुवात केल्या. तिथे सैयदने आकडे मोजायला सुरुवात केली, “तुम्हारी मुंबईका आखरी वक्त नजदीक आ गया है... पांच... चार... तीन... दो... जिहाद...” त्याचवेळी सर्व वायर्स कापून प्रधानांनी तो नारंगी गोळा बाहेर काढला. बॉम्ब निकामी झाला होता. तो गोळा घेऊन प्रधान मंचाच्या मागे आले. गोंधळलेला सैयद प्रधानांकडे रोखून पाहत असताना प्रधान म्हणाले, “हाफ़ीज़ सैयद... क्या हुआ... बम नहीं फटा... क्यों... यह सस्पेन्स लेकारही तू जा जहन्नूम में...” असं म्हणत प्रधानांनी पिस्तुल काढत सैयादवर गोळी झाडली. प्रधान म्हणाले, “टीम, वी हॅव डन इट... मुंबईवरचं संकट आज पुन्हा एकदा टळलं...” हे बोलत असतानाच मंचाच्या पुढच्या भागातून टाळ्यांचा कडकडाट झाला. सर्वांनी पाहिलं, तर मंचासमोरच्या स्तंभावर तिरंगा फडकला होता. चौघांनीही तिरंग्याला सलाम करत मानवंदना दिली...

समाप्त.

Wednesday, January 16, 2019

सावज...




मध्यरात्र उलटून गेली होती. केतन स्टेशनवर उतरला. चिटपाखरूही नसलेल्या त्या छोट्या स्टेशनवर उभा असताना केतन मनातून थोडा घाबरला होता. "हा सलील आला कसा नाही न्यायला. काल रात्री याच स्टेशवरून मला फोन करून हंड्रेड पर्सेंट न्यायला येतो असं मोठं आश्वासन दिलं आणि आता कुठेच दिसत नाही. जाऊ दे, आपण स्वत:च निघावं हेच बरं..." हा विचार करत केतन स्टेशनबाहेर पडला. सगळीकडे अंधाराचं साम्राज्य होतं. एक टांगा समोर उभा होता. केतन हळूहळू टांग्याजवळ गेला, तर आत एक माणूस पेंगत होता. त्याला हलवत केतन म्हणाला, "ओ दादा, अहो उठा... काळभोर वाड्यावर जायचं आहे. किती घेणार..." काळभोर वाड्याचं नाव ऐकताच तो गाडीवान ताडकन उठला. त्याच्या डोळ्यात भिती दाटली होती. तो म्हणाला, "थितं जायाचं तुम्मासनी... नगं नगं... थितं नगा जाऊ... लई वंगाळ जागा हाय... अन् आज तर आमोशा पन हाय... न्हाय सायेब, नगा जाऊ थितं..." जास्तीचे पैसे देऊनही तो टांगेवाला येत नाही असं समजल्यावर केतन स्वत:च मार्गस्थ झाला...

थंडीचे दिवस असूनही सामानाच्या ओझ्याने केतन घामाघूम झाला होता. किर्र झाडीमधून जाणारा तो अंधारा रस्ता, रातकिड्यांचा आवाज आणि सभोवतालचं वातावरण यामुळे केतन अधिकच घाबरला होता. भय थोडं कमी व्हावं म्हणून त्याने हेडफोन कानाला लावत मोबाईलमधली गाणी चालू केली. रस्ता तसा सरळसोट होता आणि जागोजागी लावलेल्या पाट्यांमुळे वाड्यावर पोहोचण्याचा मार्ग अधिक सुकर झाला होता. त्या पाट्यांबाबत एक गोष्ट केतनला खटकत होती. पाट्यांवर काळभोर वाडा आणि तिथे जाण्याचा मार्ग तर दिसत होताच, पण प्रत्येक पाटीवर लाल रंगाची फुलीही दिसत होती. केतन तसाच पुढे जात राहिला. गाण्यांमुळे वातावरणाची भिती हळूहळू कमी होत होती. बरंच अंतर चालल्यावर केतन एका तिठ्ठ्यावर पोहोचला. त्याच्या मागचा रस्ता स्टेशनकडे जात होता. त्याच्या समोरचा रस्ता अजून पुढे जात होता. एक रस्तामात्र डाव्या बाजूला वळला होता. त्या रस्त्याच्या बाजूला एक पाटी होती. "काळभोर वाडा... पुढे जाऊ नका..." असं लिहिलेली ती पाटी पाहून केतनला आश्चर्य वाटलं. त्या गाडीवानाचे शब्द केतनला आठवले, "वंगाळ, जाऊ नगा..." आणि पुन्हा भितीने त्याचा थरकाप उडाला. पाटीसमोर उभा राहून विचार करत असतानाच, "आलास... ये. सरळ ये..." हा आवाज केतनच्या कानी पडला...

"गाणी सुरू असताना इतका स्पष्ट आवाज कसा ऐकू आला..." हा विचार केतनच्या मनात आला आणि त्याने मोबाईल पाहिला. मोबाईल पूर्ण बंद होता. भितीपाई, मोबाईल बंद झाला आहे हे केतनच्या लक्षातच आलं नाही. मोबाईल पाहण्यात गर्क असलेला केतन, "अरे थांबलास का असा... ये की..." या आवाजाने चपापला. "हा तर सलीलचा आवाज... थांब आता तुला दाखवतोच..." असं स्वत:शीच पुटपुटत केतन डावीकडे वळला आणि वाड्याच्या दिशेने चालू लागला. काळभोर वाडा जसजसा दृष्टपथात येऊ लागला तसं केतनला जाणवलं, की रातकिड्यांचा आवाज, पानांची सळसळ, सगळं कमी होत होत बंद झालंय. एकेक पाऊल टाकत केतन गेटजवळ पोहोचला. गेट उघडंच होतं आणि आतल्या बाजूला सलील उभा होता. सलीलला पाहून केतनला जरा हायसं वाटलं. झपाझप पावलं टाकत तो सलीलजवळ पोहोचत म्हणाला, "अरे काय सलील, तू मला स्टेशनला भेटणार होतास ना..." सलीलच्या चेहऱ्यावर एक हास्यरेषा उमटली. तो शांतपणे म्हणाला, "मी तुलाच न्यायला आलोय केतन... चल. आत चल..."

सलीलचं ते बोलणं केतनला जरा विचित्र वाटलं, पण काही न बोलता तो सलीलसोबत चालू लागला. वाडा गेटपासून जरा लांब होता. सभोवताली पाहत केतन म्हणाला, "काय भयावह जागा आहे रे... इथवर येतानाच अर्धा गळून पडलो मी. बरं झालं बँकेने माझ्यासोबत तुझीही ट्रांस्फर या गावी केली. नाहीतर मी एकटा काही तग धरू शकलो नसतो..." बोलत असतानाच एक वाऱ्याची झुळूक केतनला चाटून गेली. केतनच्या अंगावर एकदम शहारा आला. त्याने मागे पाहिलं, तर गेट बंद झालं होतं. वाड्यात जागोजागी त्याला काही माणसं दिसू लागली. "ही इतकी माणसं एकदम कुठून आली..." असं म्हणत केतनने सलीलकडे पाहिलं. सलीलचे ते थंड डोळे, निर्विकार चेहरा पाहून केतनच्या हृदयात धस्स झालं. वाड्याचं दार ढकलून केतन आत गेला. अंधाराशिवाय तिथे दुसरं काहीच नव्हतं. कुबट वासाने केतन थोडा बावचळला. टॉर्च पेटवून त्याने सभोवार नजर फिरवली. बाहेर दिसलेली माणसंच आता केतनला आत दिसत होती. ती सर्व माणसं केतनकडे थंड नजरेने पाहत होती. हे पाहून केतन भितीने गोठून गेला. त्याच्या हातून टॉर्च गळून पडला. केतनने टॉर्च  उचलण्यासाठी खाली पाहिलं तर जमिनीवर पडलेला सलील त्याला दिसला. त्याचे बाहेर आलेले डोळे आणि उघडा जबडा पाहून केतनने कांठळ्या फोडल्या...

केतन धावत बाहेर पोहोचला तर दारात सलील उभा होता. त्याचे बुबुळं नसलेले पांढरे डोळे, लाल जखमांनी भरलेला पांढरा चेहरा आणि त्याचं विचित्र हसणं पाहून केतन पांढराफटक पडला. जिवाच्या आकांताने धावत केतन गेटजवळ पोहोचला तर गेटपासून आतल्या बाजूला कोणीतरी झोपलेलं दिसलं. केतनने हळूहळू पुढे जात पोटावर झोपलेल्या माणसाला सरळ केलं आणि तो स्तब्ध झाला. तो पडलेला माणूस स्वत: केतनच होता. "ह...हा... म...मी... म...म्हणजे... मी..." हा विचार करत स्वत:लाच चाचपडत असतानाच केतनच्या खांद्यावर हात पडला. केतनने पाहिलं तर सलील हसत म्हणाला, "केतन, आता आपण दोघंही इथून बाहेर पडू शकणार नाही. ही सर्व माणसं अशीच आली आहेत इथे. आपला आवाज बाहेर जाईल, पण आपण नाही... वाड्याला जेव्हा भूक लागते, तेव्हा कोणाचातरी मृत्यू आलेला असतो. इथे प्रत्येक जण कोणाचंतरी सावज आहे. मी कोणाचं तरी सावज आणि माझं सावज... तू... " सलील बोलत असतानाच मुख्य रस्त्यावरून कोणीतरी जाताना केतनला जाणवलं. केतनने सलीलकडे पाहिलं. त्याचा चेहराही लाल जखमांनी भरून विद्रूप झाला होता आणि बुबुळं नाहीशी होऊन डोळे पांढरे झाले होते. सलीलकडे पाहत विचित्र हसत केतन म्हणाला, "माझं सावज... हा...हा...हा..."

समाप्त.

Sunday, January 13, 2019

सूड...



रात्रीचे बारा वाजत आले होते. दुतर्फा झाडी असलेल्या निर्मनुष्य रस्त्यावरून बबन गाडी चालवत होता. त्याच एका गाडीच्या इंजिनाचा आवाज आणि गाडीतून येणाऱ्या लाईटच्या प्रकाशाखेरीज दुसरं काहीच नव्हतं. मधूनच एखादी गाडी किंवा बाईक बबनच्या गाडीला ओव्हरटेक करायची. बबनमात्र एका बाजूने त्याच्या वेगाने गाडी चालवत विचार करत होता, "काय विचार करून पनवेलची ट्रीर केली कोण जाणे... एखादी लोकल ट्रीप मारली असती तर आत्तापर्यंत घरी झोपलो असतो..." बबनची विचारमालिका भंग झाली ती रस्त्याच्या कडेला हातवारे करत उभ्या असलेल्या एका माणसाला पाहून. बबनने गाडी बाजूला घेतली. समोरच अजून एक गाडी उभी होती. बबनच्या गाडीला ओव्हरटेक करून गेलेली हीच गाडी आहे हे त्याच्या लक्षात आलं. गाडी थांबलेली पाहून तो हातवारे करणारा माणूस जवळ येत म्हणाला, "थँक्यू राव, गाडी थांबवली. एयरपोर्टसाठी म्हणून निघालो आणि इथे गाडी बंद पडली हो. आता या जंगलात टॅक्सीपण मिळत नाहीये. तुम्ही सोडता का... तीनची फ्लाईट आहे हो माझी..." बबनने एकदा त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, "सोडतो की, पण साहेब, पाचशे रुपये होतील. मला जायचं आहे गोराईला. परतीचं भाडं पण नाही हो मिळणार..." "चक् चक्..." असे उद्गार काढत तो माणूस तयार झाला. बॉनेट बंद करून बॅग घेऊन तो माणूस बबनसोबत निघाला...

प्रवास सुरू झाला. बबनने आपलं नाव सांगितलं. त्या माणसानेही त्याचं नाव सांगितलं. मग बॅगेतून बाटली काढत म्हणाला, "घेणार का थोडी... एयरपोर्टपर्यंत संपवावी लागेल ना..." रस्त्यावरून बाटलीकडे पाहून पुन्हा रस्त्याकडे पाहत बबन म्हणाला, "नाही साहेब. मी दारू पीत नाही. शिवाय गाडी पण चालवतो आहे ना..." तो माणूस जरासा हसत म्हणाला, "हा...हा... बबन दारू घेत नसेल, पण राजीव तर दारू पितो की..." त्या माणसाच्या तोंडून राजीव हे नाव ऐकून बबन चपापला. त्याने तात्काळ ब्रेक मारला. कर्कश आवाज करत गाडी थांबली. बबनने बाजूला पाहिलं, तर त्या माणसाने हातात पिस्तूल धरलं होतं. बबन काही बोलणार इतक्यात तो माणूस म्हणाला, "ओरडू नकोस... इथे कोणीच नाही तुझं ऐकायला... चल, पी ही दारू. नाहीतर, सायलेंसर लावलेल्या या पिस्तुलाने... नाही ना... मग पी... चल लवकर..." पिस्तूलाच्या भितीने बबनने संपूर्ण बाटली रिकामी केली. दारूची नशा चढली आणि बबन बेशुद्ध पडला. तो माणूस लगेच खाली उतरला. बबनचं डोकं स्टेयरिंग व्हिलला टेकवून, त्याचे हात व्हिलवर ठेऊन त्याने गाडी गेयरमध्ये घातली आणि तिला ढकलू लागला. थोडावेळ गाडी ढकलून त्याने सोडून दिली. उतारावरून येत गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली...

तो माणूस लगेच धावत गेला. गाडीजवळ जाऊन त्याने पाहिलं तर दारूच्या धुंदीत असलेला बबन स्टियरिंग व्हिलवर निपचित पडला होता. त्या माणसाने ताबडतोब बॅगेतून पेट्रोलचा कॅन काढला. गाडीच्या इंजिनवर आणि आजू-बाजूला पेट्रोल शिंपडून त्याला काडी लावली. गाडीने पेट घेतला आणि क्षणार्धात मोठा स्फोट झाला. काम झालंय हे पाहून तो माणूस तिथून निघून गेला. मध्ये बराच वेळ गेला. काही वाटसरूंनी पोलीसात वर्दी दिली आणि तपास सुरू झाला. पत्रकारही तिथे पोहोचले होते. इंस्पेक्टर मराठे त्यांना सांगत होते, "गाडी या झाडावर जोरात आदळली आणि तिचा स्फोट झाला. बहुतेक ड्रायव्हरचा कंट्रोल सुटला असावा. सध्यातरी इतकंच सांगू शकतो..." त्या घटनेपासून बरंच लांब, ठाण्याच्या एका घरात नयना सोफ्यावर वाचत बसली होती. दुपारचे तीन वाजले होते. मोलकरीणही तिचं काम करून निघून गेली. वाचता वाचता नयना पेंगू लागली. तिने पुस्तक टेबलवर ठेवलं आणि बेडरूममध्ये जाणार इतक्यात डोरबेल वाजली. "यावेळी कोण आलं आता... नेमकी हीच वेळ कशी मिळते या लोकांना कोणास ठाऊक..." असं स्वत:शीच पुटपुटत नयनाने दार उघडलं. दारात एक मुलगी उभी होती. पूर्ण बाह्यांचा ड्रेस, लांबसडक वेणी, डोळ्यांना जाड भिंगाचा चश्मा, अशा आविर्भावातली ती मुलगी हसत म्हणाली, "नमस्कार, गुड आफ्टरनून. मला माहीत आहे दुपारची ही योग्य वेळ नाही पण मी तुम्हाला जास्त त्रास देणार नाही बरं का... "

नयनाला काहीच बोलू न देता ती फाईल उघडत म्हणाली, "मी Mental Health & Rehabilitation या संस्थेकडून आले आहे. आमची संस्था मानसिकदृष्या कमकुवत असणाऱ्या लोकांसाठी काम करते. म्हणजे अशी माणसं मानसिक रुग्ण का झाली असावीत, हे शोधून त्यांचं पुनर्वसन करते. तर त्यासाठी देणगी..." त्या मुलीला पुढे बोलू न देता, "मला काही ऐकायचं नाही हो... I am least interested..." असं म्हणत नयना दार लाऊ लागली. ती मुलगी दार अडवत म्हणाली, "बरं मग, थोडं पाणी देता का... प्लीज हो, खूपच तहान लागली आहे..." चिडचीड करत नयना आत गेली. ती मुलगी एक-दोन पावलं पुढे येऊन घराच्या आत आली. नयना पाणी घेऊन आली तोवर नयना सोफ्याजवळ पोहोचली होती. "हे काय... एकदम आत आलात... मी सांगितलं होतं का आत यायला... हं, पाणी घ्या..." हे बोलत असतानाच नयनाने पाण्याचा ग्लास समोर धरला. तिच्या बोलण्याकडे लक्ष न देता त्या मुलीने ग्लास घेतला आणि टेबलवर ठेवत म्हणाली, "आत्ता काय म्हणालात तुम्ही... I am least interested... You may not be interested in rehabilitation, but you were certainly interested in making someone mentally retarded... Right..." त्या मुलीच्या या वक्तव्याने चकित झालेली नयना, त्या मुलीने काढलेल्या पिस्तुलाने भानावर आली. नयना ओरडणार इतक्यात ती मुलगी म्हणाली, "शूऽऽऽऽ... जर ओरडलीस, तर गोळ्या घालेन तुला. बस त्या खुर्चीत..."

नयना खुर्चीत बसली. त्या मुलीने टेबलवर ठेवलेल्या पाण्याच्या भरलेल्या ग्लासात स्वत:जवळच्या एक छोट्या बाटलीतले तीन-चार ड्रॉप टाकले आणि म्हणाली, "हे घे. पी हे पाणी... घाबरू नकोस, विष नाही त्यात... चल, पी लवकर..." त्या मुलीच्या दरडावण्याने आणि पिस्तुलाला पाहून घाबरलेल्या नयनाने ते पाणी प्यायलं. नयनासमोर बसत ती मुलगी म्हणाली, "गुड गर्ल. आता काही क्षणातच तुला झोप लागेल. तू झोपलीस की मी निघून जाईन. तू मात्र... सगळंच आत्ता कशाला... तू झोप निवांत..." काही समजायच्या आतच नयनाचं डोकं जड होऊ लागलं आणि तिला झोप लागली. त्या मुलीने लगेच ग्लास धुऊन जागेवर ठेवला. तिने स्पर्श केलेल्या सर्व गोष्टी पुसून ठसे नाहीसे केले. नयनाला ओढत किचनमध्ये नेलं. बर्नर चालू केला आणि ती निघून गेली. जवळपास चार तास उलटून गेले. नयनाला जाग आली. सर्वत्र अंधार होता. तिला घरात कसलातरी उग्र वास येत होता. किचनच्या दारं-खिडक्या बंद होत्या. नयनाची घुसमट होऊ लागली. खोकून खोकून ती बेजार होऊ लागली. धडपडत लाईटच्या स्वीचजवळ जात तिने बटण दाबलं. कानठळ्या बसणारा प्रचंड स्फोट झाला. नयनाला पळायचा काय, ओरडायलाही वाव मिळाला नाही. पोलीस घटनास्थळी पोहोचले. काळ्या पडलेल्या, भगदाड पडलेल्या भिंती, काळाठिक्कर पडलेला एक मृतदेह या सर्वांचा तपास सुरू झाला. पोलीस सर्व गोष्टींची पाहणी करत असतानाच काही पत्रकार तिथे पोहोचले. त्यांच्या उलट-सुलट प्रश्नांना वैतागून इन्स्पेक्टर मराठे म्हणाले, “हे बघा, आम्हालाही फारसं काही समजू शकलं नाहीये. प्रथमदर्शनीतरी असंच वाटतंय की बहुतेक सिलेंडरच्या स्फोटामुळे हे घडलं असावं. बाकी पोस्ट मॉर्टेम रिपोर्टनंतर काय ते समजेल...”

दुसऱ्या दिवशी चौकीवर कामकाज सुरू असताना एक-दोन पत्रकार आले आणि कालच्या घटनांबद्दल विचारू लागले. इं. मराठे त्यांच्याशी बोलत असतानाच एक हवालदार काही पाकिटं घेऊन आला. मराठेंनी पाकिटं उघडून आतले कागद वाचले. पत्रकारांना सामोरे जात ते म्हणाले, "मंडळी, कालच्या घटनांचे पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट आलेत... बबन दारू पिऊन गाडी चालवत होता आणि कंट्रोल सुटून गाडीचा अॅक्सिडेंट झाला. गाडीने पेट घेतला आणि स्फोट झाला... तर नयनाचा मृत्यू सिलेंडरच्या स्फोटामुळे झाला. Both are open and shut cases... हलगर्जीपणा आणि त्यामुळे अपघाती मृत्यू..." पत्रकारांनी सगळं लिहून घेतलं आणि ते निघून गेले. पत्रकार गेल्यावर इंस्पेक्टर मराठेंनी सर्वांना आत बोलावलं. म्हणाले, "पत्रकारांना घालवण्यासाठी मी ते सगळं बोललो. या दोन्ही केसेस साध्या नाहीत. या रिपोर्ट्समध्ये एक वेगळीच गोष्ट समोर आली आहे... बबनच्या रक्तात अॅल्कोहॉलव्यतिरिक्त एका केमिकलचे ट्रेसेस सापडले आहेत. ते केमिकल गुंगीचं औषध बनवण्याच्या कामी येतं. शिवाय बबनच्या गाडीजवळ पेट्रोलचे अंश सापडलेत. पण बबनची गाडी डिझेलची आहे. नयनाच्या केसमध्ये पण तसंच काहीसं आहे. तिच्या रक्तातही तेच केमिकल आढळलं आहे जे बबनच्या रक्तात सापडलं. यात दोन गोष्टी समोर येतात. एक, हे दोन्ही अपघात नसून खून आहेत आणि दुसरी गोष्ट अशी, की कदाचित या दोन्ही खुनांचा आपापसात काहीतरी संबंध असावा... मोहिते, तुम्ही या बबनची कुंडली बनवा. आणि शिंदे, तुम्ही आणि पाटकर मॅडम, या नयनाची माहिती काढा... पण सगळं गुप्ततेने आणि लवकरात लवकर झालं पाहिजे..."

दुसऱ्याच दिवशी इंस्पेक्टर मराठेंनी सर्वांना पुन्हा आत बोलावलं. "हां, बोला... काय माहिती मिळाली बबन व नयनाबद्दल..." मराठेंचा हा प्रश्न ऐकून सर्वांनी एकमेकांकडे पाहिलं. मोहिते बोलू लागले, "सर, या बबनचं खरं नाव राजीव आहे. पाच वर्षांपूर्वी हा डी.वाय. कॉलेजमधून पास आऊट झाला. त्यावेळी त्याला दाढी-मिशा नव्हत्या. बहुतेक नंतर वाढवल्या असाव्यात. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे..." मोहिते काही बोलणार इतक्यात पाटकर मॅडम म्हणाल्या, "नयनासुद्धा याच कॉलेजला होती आणि तीही या राजीवच्याच बॅचला..." पाटकर मॅडमला दुजोरा देत शिंदे म्हणाले, "हो सर, या राजीव व नयनाचा एक ग्रूप होता. त्यात वरुण व पंकज अशी अजून दोन मुलंही होती..." इंस्पेक्टर मराठे विचार करत म्हणाले, "हम्म... इंटरेस्टिंग... बरं, अजून काही माहिती..." तशी मोहित्यांनी सांगितलं, "सर, हा ग्रूप पाच वर्षांपूर्वीच फुटला. याचं कारण होतं वरुण आणि पंकजमध्ये नयनावरून झालेलं भांडण... ते प्रकरण त्यावेळी खूप गाजलं होतं. वरुण आणि पंकजमध्ये जवळपास मारामारी झाली होती, आणि त्यांना कॉलेजमधून काढून टाकण्याइतपत ते प्रकरण पुढे गेलं होतं. नंतर त्यांच्यात समेट होऊन भांडण मिटलं असं म्हणतात...” मराठेंनी सर्व ऐकून घेतलं आणि म्हणाले, “कदाचित ते प्रकरण त्या वेळेपुरतं मिटलं असावं आणि आता अशाप्रकारे त्याचा वचपा निघाला असावा... नयना आणि राजीव तर नाहीत, हे वरुण आणि पंकजच आता काय ते सांगू शकतील. या दोघांचा शोध घ्या आणि लवकरात लवकर यांना चौकीवर घेऊन या...”  हे बोलण्याचा अवकाश की शिंदे म्हणाले, “सर, आम्ही त्यांची माहिती मिळवली आहे...

त्या प्रकरणानंतर पंकज गायब झाला. त्याचा अजून पत्ता नाही सर...” मोहिते म्हणाले, “सर, त्या बबन ऊर्फ राजीवचा खून ज्या दिवशी झाला, त्याच्या आदल्या दिवशीच वरुणने शहर सोडलं. तो अत्यंत घाईघाईने निघाला असं त्याच्या घरातल्या नोकराने सांगितलं. या दोघांचे फोटो आम्ही सर्व पोलीस चौक्यांवर पाठवले आहेत. लवकरच काही ना काही माहिती मिळेल आपल्याला...” ही चर्चा सुरू असतानाच फोन खणखणला. “इन्स्पेक्टर मराठे बोलतोय, येस... काय... ओके धन्यवाद...” फोन ठेवत सर्वांकडे पाहत म्हणाले, “गुड न्यूज आहे... वरुणचा पत्ता सापडला आहे. आलिबागजवळ असलेल्या खानाव या गावी एका शेतात तो लपून बसला आहे असं समजलं आहे. लेट्स गो...” सर्वजण खानावला पोहोचले. इं. मराठेंनी फोन लावला, “इन्स्पेक्टर मराठे बोलतोय. आम्ही खानावला पोहोचलो आहोत. तुम्ही कुठे आहात... बरं...” एका निळ्या गेटपासून थोडी लांब गाडी थांबवत सर्वजण उतरले. गेटजवळच एक हवालदार उभा होता. इं. मराठे आणि त्यांचे साथीदार गेटजवळ आले. इं. मराठेंना पाहून त्या हवालदाराने सेल्यूट केला. त्याचा सेल्यूट स्वीकारत इं. मराठे म्हणाले, “हवालदार वाडेकर ना... मी इन्स्पेक्टर मराठे आणि हे माझे सहकारी. बोला, कुठे आहे वरुण...” गेटकडे बोट दाखवत हवालदार वाडेकर म्हणाले, “सर, त्याचं नाव माहित नाही मला. पण तुम्ही जो फोटो पाठवला होता तोच माणूस इथे या शेतात लपून बसला आहे. गावाबाहेरच्या वडाप नाक्यावर तो मला दिसला. मी त्याचा पाठलाग केला तर तो या शेतात घुसला. मी लगेच तुम्हाला सूचना दिली. अजूनतरी तो बाहेर पडला नाही...”

इं. मराठेंनी पुन्हा हवालदार वाडेकरांना धन्यवाद दिले आणि म्हणाले, “हा वरुण डेंजरस असू शकतो. कदाचित हे दोन्ही खून यानेच केले असावेत. सो एव्हरीवन बी अलर्ट. पाटकर मॅडम, तुम्ही आणि वाडेकर आऊटहाऊसच्या मागून जा, मोहिते, तुम्ही गोठयाच्या दिशेने जा, मी आणि शिंदे समोरून जातो... लेट्स मूव्ह...” सर्वजण जाणार इतक्यात पाटकर मॅडम म्हणाल्या, “सर, तुम्हीच म्हणताय की हा वरुण डेंजरस असू शकतो. आणि समोरून असं ओपनली तुम्ही त्याला सामोरे जाऊ नका. हवालदार वाडेकर, तुम्हीसुद्धा सरांसोबत जा. या आऊटहाऊसजवळ चांगला आडोसा आहे. शिवाय उजेडही आहे. मला गरज वाटली तर तुम्हाला बोलवेन मी. डोंट वरी...” इं. मराठेंनी मान हलवली आणि सर्वजण पांगले. इं. मराठे, हवालदार शिंदे आणि हवालदार वाडेकर हळू हळू पुढे जात होते. “वरुण जिवंत असेल हीच आशा करू...” हे वाक्य कुजबुजत असतानाच इं. मराठेंनी एका दिशेला पाहिलं आणि त्या दिशेला चालू लागले. शिंदे आणि वाडेकरपण त्यांच्या सोबत होतेच. या शोधमोहिमेपासून जरा आत एका विहिरीजवळ वरुण बसला होता. बेचैन होऊन तो सगळीकडे पाहत होता. सारखं घड्याळ पाहत विचार करत होता, “संध्याकाळ जवळ आली. हा रघू अजून जेवण घेऊन आला नाही. पोटात भुकेने कावळे ओरडायला लागलेत. किती काळ मला असं लपून रहायला लागणार कोण जाणे... या पंकज...” पानांच्या सळसळीने वरुणची विचार मालिका खंडित झाली. “आला वाटतं रघू...” असं म्हणत वरुण उठला आणि वळला. त्याचे डोळे विस्फारले आणि हात-पाय कापू लागले. वरुण मागे-मागे सरकत अडखळला आणि पडला. त्याच्या तोंडातून अस्पष्ट शब्द बाहेर पडले, “त...तू... इ...थे...”

वरुणसमोर एक व्यक्ती डोक्यावरून शॉल घेऊन उभी होती. त्या व्यक्तीने हातात एक साप धरला होता. ती व्यक्ती साप घेऊन पुढे पुढे येऊ लागली. त्या व्यक्तीने साप धरलेला हात उगारला. ती व्यक्ती वरुणवर साप फेकणार इतक्यात, “होल्ड इट... डोंट मूव्ह... सर्वजण विहिरीच्या बाजूला या. वरुण सापडला आहे. आणि खूनीसुद्धा...” इं. मराठेंच्या या बोलण्यावर सर्वजण विहिरीजवळ पोहोचले. इं. मराठे म्हणाले, “खरा खूनी बघायचा आहे तुम्हाला... हा बघा...” असं म्हणत त्यांनी शॉल बाजूला केली. सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला, “पाटकर मॅडम तुम्ही...” मोहिते आणि शिंदे एकत्रच ओरडले. त्यांना दुजोरा देत इं. मराठे बोलू लागले, “हो... पाटकर मॅडम... कायद्याच्या राक्षकानेच कायद्याचं असं भक्षण केलं. बबनच्या गाडीपासून थोड्या अंतरावर मला हे घड्याळ सापडलं. तुमच्याच हातात मी हे घड्याळ पाहिलं होतं पण घडयाळं एकसारखी असू शकतात म्हणून त्यावेळी मी गप्प बसलो. पण नयनाच्या घरासमोर रस्त्यापलीकडे असलेल्या बँकेच्या सी.सी.टी.व्ही.मध्ये हा चेहरा दिसला जो तुमच्याशी जुळत होता. यावरून माझी खात्री पटली की यामागे तुम्हीच आहात. बोला पाटकर मॅडम. का केलंत तुम्ही असं... काय मिळालं तुम्हाला खून करून...” पाटकर मॅडमचे डोळे रागाने लाल झाले होते. सापाला लांब फेकत त्या बोलत्या झाल्या, “काय मिळालं मला हे खून करून... समाधान. आणि माझ्या भावाच्या आत्म्याला शांती... तुम्ही पंकजला शोधत आहात ना. तो कधीच मिळणार नाही. कारण वर्षभरापूर्वीच तो हे जग सोडून गेलाय. पंकज माझा सख्खा धाकटा भाऊ. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर आम्ही दोघंच एकमेकांचे होतो. पंकज माझ्यापासून कधीच काही लपवायचा नाही. तो डी.वाय. कॉलेजात भारती झाला तेव्हा मी ट्रेनिंगला होते. दर आठवड्याला आम्ही फोनवर बोलत असू. वर्ष सरून गेलं. एक दिवस पंकज मला म्हणाला की त्याचं एका मुलीवर, नयनावर प्रेम आहे ही शेवटच्या वर्षाची परीक्षा संपली की ते दोघं लग्नही करणार आहेत. मला वाटलं आता पंकजचं आयुष्य मार्गी लागेल... पण सर्वच संपलं...

पंकजचा फोन येऊन ३-४ दिवस झाले असतील, मला खंडाळा पोलीस चौकीवरून फोन आला. मला तिथे तातडीने बोलवलं होतं. तिथे गेल्यावर मला समजलं, की नयनाचा अपघाती मृत्यू झालाय आणि त्याचा पंकजला जबरदस्त मानसिक धक्का बसला आहे. दरीत छिन्नविछिन्न, रक्ताळलेलं, जनावरांनी लचके तोडलेलं नयनाचं प्रेत सापडलं. त्यावेळी हे वरुण आणि राजीवदेखील तिथे होते. नयनावर अंत्यसंस्कार झाल्यावर पंकजला मी माझ्यासोबत घेऊन आले. त्याची अवस्था फार वाईट होती. तो एकटक एका दिशेला बघत बसे. मध्येच नयनाचं नाव घेत धावत फिरे. हळूहळू पंकज डिप्रेशनमध्ये जाऊन दारू पिऊ लागला. त्याच्यावर जमेल ते उपचार मी करत होते. पण काही उपयोग होत नव्हता. एक दिवस दारूच्या नशेत, “नयना माझ्यामुळे गेली, मी तिला वाचवू शकलो नाही. मी जगायला लायक नाही...” असं काहीतरी असंबद्ध तो बोलत होता. मी पंकजला खूप वेळा विचारलं, पण तो काहीच बोलायचा नाही. शेवटी गेल्या वर्षी पंकजने छतावरून उडी घेऊन आत्महत्या केली. माझं कुटुंब उध्वस्त झालं होतं. माझंही मानसिक संतुलन ढळेल का याची मला भीती असतानाच मुंबईत ट्रान्सफर झाल्याची ऑर्डर मला मिळाली. जागाबदल झाल्यावर माझ्या मनावरचा ताण कमी होईल असं मला वाटलं आणि मी तुम्हाला जॉईन झाले. सर्व सुरळीत चालू होतं. पण गेल्या आठवड्यात मी असं काही पाहिलं ज्याने मी पुरती हादरले... ड्युटी संपवून घरी परत जात असताना एका सिग्नलजवळच्या मॉलमधून मी नयनाला बाहेर पडताना पाहिलं... ती नयनाच होती. “ही जिवंत आहे...” हा विचार करत असतानाच तिच्या पाठीमागून येणारा वरुण मला दिसला. त्या दोघांना गळ्यात गळे घालून हसतमुखानं बाहेर पडताना पाहिलं आणि माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली...

नयनाला एका घराजवळ सोडून वरुण पुढे जाऊ लागला. मी त्याचा पाठलाग केला. वरुण घरात गेल्यावर मी त्याच्या मागोमाग जाऊन बेल वाजवली. वरुणने दार उघडताच त्याला ढकलून मी आत शिरले. टेबलवर ठेवलेल्या फळांच्या ताटलीत एक सुरीही ठेवली होती. ती सुरी वरुणच्या मानेला लावत मी त्याला माझी ओळख करून दिली. नयना जिवंत कशी आणि नेमकं काय घडलं हे दरडावून विचारताच हा बोलू लागला, “मी, नयना आणि राजीव, डी.वाय. कॉलेजला होतो. नयना आणि मी एकमेकांना आवडत होतो पण लग्न वगैरे करावं असं नाही वाटलं आम्हाला. एस.वायला पंकज या कॉलेजात आला. त्याआधी मीच इथे फेमस होतो, सर्व तरुणी माझ्याशी बोलत असत. पण हा पंकज माझ्याहून हुशार आणि देखणा. हळूहळू त्याचा प्रभाव वाढू लागला. एकदा तर एकांकिका स्पर्धेत त्याने मला हरवून पाहिलं बक्षीस मिळवलं. माझी ईर्ष्या वाढत गेली आणि पंकजशी माझी भांडणे, मारामाऱ्या होऊ लागल्या. त्यातच मला समजलं की हा पंकज नयनाच्या प्रेमात पडलाय. नयनासुद्धा माझ्या हातून निघून जाणार हे लक्षात येताच पंकजशी माझं भांडण झालं. भांडण इतकं विकोपाला गेलं की आमच्यात हाणामारी होऊ लागली. बातमी प्रिन्सिपॉलपर्यंत पोहोचली आणि त्यांनी आम्हाला रस्टीगेट केलं. पंकजने जाऊन माफी मागितली आणि तो सुटला. मीमात्र अजून जळफळत होतो. या पंकजला काहीही करून आयुष्यातून कसं उठवता येईल याचाच विचार करत होतो आणि एक प्लॅन बनवला. त्यानुसार आधी जाऊन प्रिन्सिपॉलची आणि पंकजची माफी मागून प्रकरण निकालात काढलं. माझा मनसूबा राजीव व नयनाला सांगितला. दोघांनाही पंकज आवडत नसे म्हणून तेही लगेच तयार झाले...

आम्ही पंकजशी मैत्री केली. नयनानेही पंकजवर प्रेम असल्याचं नाटक सुरू केलं. पंकजने नयनाला लग्नाची मागणी घातली आणि तिनेही माझ्या प्लॅननुसार लगेच होकार दिला. याचं सेलिब्रेशन करायला आम्ही चौघं खंडाळ्याला गेलो जिथे प्लॅनच्या शेवटच्या दोन स्टेप्स एग्झिक्यूट होणार होत्या. राजीवने आणलेलं गुंगीचं औषध आम्ही कॉल्ड ड्रिंकमधून पंकजला पाजलं. त्याला जाग आल्यावर पंकजने आपली अब्रू लुटली असं नाटक करून नयना रडू लागली. मी आणि राजीवने आगीत तेल ओतत पंकजवर ताशेरे ओढले. मनातून मात्र सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पडत आहेत याचा आम्हाला आनंद होत होता. नयना रडत रडतच तिथून पळाली आणि आम्ही तिघंही तिच्या मागे जाऊ लागलो. आम्ही पंकजला सांगितलं की आम्ही दुसऱ्या रस्त्याने तिला गाठतो. पंकज तसाच नयनाच्या मागे धावत राहिला. एका कड्यावर नयना उभी होती. पंकज झाडीतून तिच्या जवळ येत असताना अडखळून पडला आणि त्याच वेळी नयनाने उडी मारली. पंकजसमोर नयना दरीत कोसळलेली पाहून पंकजने किंकाळी फोडली. खरंतर ती नयना नव्हतीच. ती एक भिकारीण होती जी आमच्या कॉलेजजवळ बसायची. तिला पैशाचं अमिष दाखवून आम्ही इथे आणलं. पंकज खाली पडला हे पाहून नयना आणि राजीवने त्या भिकारणीला कड्यावरून ढकलून दिलं. समोर उभ्या असलेल्या पंकजला वाटलं हे त्याच्याचमुळे झालं आणि तो सुन्न झाला. मला हवं होतं ते मिळालं होतं. पंकज तुमच्याबद्दल नेहमी सांगायचा म्हणून आम्ही तुम्हाला फोन केला. मला पंकजला मारायचं नव्हतं तर आयुष्य बरबाद करायचं होतं त्याचं. याला कारणही तोच होता. पंकजची लोकप्रियता आणि बुद्धीच त्याच्या नाशाला कारण ठरली...

कॉलेज संपलं पण मुलखाचा भित्रा असलेला राजीव आम्हाला सोडून नाव बदलून मुंबईत टॅक्सी चालवू लागला. कालांतराने मी आणि नयनाही मुंबईत आलो आणि पुन्हा आम्हा तिघांचं एकत्र लाईफ सुरू झालं. त्यात नयना आणि माझे संबंधही छान चालू होते पण मध्येच तुम्ही आलात...” सर, वरुण गप्प झाला. मला वाटलं त्याचवेळी याला संपवून टाकावं. पण त्याला एक संधी द्यावी म्हणून दुसऱ्या दिवशी पोलीसात जाऊन सगळं कबूल कर असं त्याला दरडावून मी तिथून निघून गेले. सकाळ झाली. मला वाटलं आपण स्वत:च वरुणला चौकीला घेऊन येऊ म्हणून त्याच्या घरी गेले तर हा पहाटेच गायब झाला होता. आतामात्र माझा तीळपापड झाला. सुडाच्या आगीत मी पेटून उठले. कायद्याचं रक्षण, न्याय, या सर्व गोष्टी मला फोल वाटू लागल्या आणि मीच कायदा हाती घेण्याचं ठरवलं. आधी राजीवला आणि मग नयनाला मारून मला वाटलं लपून बसलेला वरुण बाहेर पडेल. पण इथेही मला नशिबाची साथ लाभली नाही. वरुणला संपवण्याआधीच तुम्ही मला पकडलंत सर...” पाटकर मॅडमचं सर्व बोलणं झाल्यावर इं. मराठे त्यांच्या जवळ जात म्हणाले, “पाटकर मॅडम, तुमचं दु:ख आम्ही समजू शकतो. वरुण पळून गेला म्हणून तुम्ही जे पाऊल उचललंत ते योग्य नव्हतं. आपण पंकजला न्याय मिळवून द्यायला पुराव्यांचा शोध घेऊ शकलो असतो. एकदातरी आम्हाला हे सांगितलं असतंत ना तर आपल्याला मार्ग काढता आला असता. आणि वरुण, ईर्श्येपोटी तू, नयना आणि राजीवने केलेलं कृत्य अत्यंत नीच आणि हीनपणाचं आहे. याची शिक्षा कायदा तुला देईलच. सुष्मा पाटकर, यू आर अंडर अरेस्ट. वाडेकर, घेऊन जा यांना. शिंदे, मोहिते, या वरुणला बेड्या ठोका...”

सर्वजण बाहेर पडत असतानाच, वाडेकरांना हिसडा देऊन पाटकर मॅडम मोकळ्या झाल्या आणि शिंदेंचं पिस्तुल बळकावून वरुणच्या कपाळाच्या बरोब्बर मधोमध गोळी घातली. वरुण कोसळला. पाटकर मॅडम पिस्तुल चौघांवर रोखत म्हणाल्या, “माफ करा सर, पण कायदा पुराव्यांच्या कुबड्या घेऊन चालतो. माझ्या भावाच्या त्या अवस्थेला जबाबदार असलेल्या या तिघांना मृत्यू हीच शिक्ष योग्य होती. आज माझा सूड पूर्ण झाला. पण मी कायदा हाती घेण्याचं पाप केलं आहे. त्यासाठी मी स्वत: तुमच्या स्वाधीन होते. सॉरी वन्स अगेन...” हे म्हणत असतानाच पाटकर मॅडमने पिस्तुल शिंदेंना दिलं आणि हाताच्या मुठी बंद करून बेड्या अडकवून घेण्यास सज्ज झाल्या...

समाप्त.