Thursday, February 14, 2019

शापित...



संध्याकाळ सरून गेली होती. अंधार मी म्हणत होता. रस्ता एकदम सामसूम झाला होता. गावखेड्यातला तो रस्ता, त्यामुळे सातच वाजत असताना रस्त्यावर चिटपाखरूही नव्हतं. रातकिड्यांचा आवाज शांततेचा भंग करू पाहत होता. किस्ना खिडकीत रडत बसला होता. त्याचे आजोबा जेवणाचं ताट घेऊन त्याच्या बाजूला येत म्हणाले, "किस्न्या... ल्येका जेऊन घे रं... आरं नापासच जालास न्हवं. पुन्यांदा बैस की प्रीक्षेला..." किस्ना डोळे पुसत म्हणाला, "आजा... आरं आभ्यास करूनसुदिक नापास जालू की म्या... मास्तरानं बरुबर तपासलं न्हाई. मला चानस गावला न्हवं का तर म्या परत मगं जाऊन त्योच प्येपर पुन्यांदा दीन..." आजोबा परोपरीने किस्नाला समजावण्याचा प्रयत्न करत होते, "किस्ना, आरं आसं व्हत न्हाई राजा... जे कपालावर लिवलं असतंय न्हवं ते चुकत न्हाई कदी..." पण किस्ना ऐकायलाच तयार नव्हता. त्यांचा संवाद सुरू असताना दारावर टकटक झाली...

आजोबांनी दार उघडलं तर समोर एक माणूस हातात कॅन घेऊन उभा होता. डोळ्यांवर चष्मा, अंगात लांबसर काळा कोट घातलेल्या आणि साधारण चाळीशीतल्या त्या माणसाला पाहून आजोबा म्हणाले, "कोन हो तुम्मी पावनं..." आजोबांना नमस्कार करत तो माणूस म्हणाला, "नमस्कार काका. मला पुढच्या गावी जायचं आहे पण गाडी गरम होऊन बंद पडली हो... जरा पाणी मिळेल का..." आजोबांनी कॅनमध्ये पाणी भरलं. किस्नाला घरातच बसायला सांगून कंदील घेऊन ते त्या माणसासोबत गाडीपर्यंत गेले. तो माणूस गाडीत पाणी ओतत असताना आजोबा म्हणाले, "पावनं, आवं रात झालीया... या वक्ताला फुडल्या गावी कुटं जाताय... संबर मैल लांब हाय त्ये गाव..." 'शंभर मैल' हे शब्द ऐकताच गोंधळलेला तो माणूस म्हणाला, "शंभर मैल... आहो आत्ता मागेच पाटी पाहिली मी... मंगळपाडा ५ असं लिहिलं होतं त्यावर. आणि तुम्ही..."

त्या माणसाला मध्येच तोडत आजोबा म्हणाले, "मंगलपाडा... थितं जायाचं तुम्मासनी... सायेब ती जागा लय ब्येक्कार हाय. आवं थितं तर गाव बी न्हाय, निस्ती तुटलेली घरं आन पान नसलेली झाडं हायेत..." बोलत असताना आजोबांच्या डोळ्यात असलेली भिती त्या माणसाला दिसत होती. तो फक्त हसला. पाणी भरून झालंच होतं. तो माणूस गाडीत बसतच होता की आजोबा म्हणाले, "ल्येका, तू मला माज्या पोरासारखा... सांगतू ते ऐक बाबा... नगं जाऊ थितं... आरं आसं म्हंत्यात की थितं..." गाडी चालू करत तो माणूस म्हणाला, "काका, मला तुमची काळजी समजते. तुम्हाला काय म्हणायचं आहे तेही लक्षात येतंय. पण मला मंगळपाड्याला जायलाच हवं. ते गाव माझ्या आयुष्याशी जोडलं गेलं आहे..." इतकं बोलून तो माणूस गाडी घेऊन निघून गेला. आकाशाकडे पाहत हात जोडत आजोबा म्हणाले, "इठ्ठला... वाचीव रं बाबा त्याला..."

दहा-पंधरा मिनिटे गाडी चालत होती. एका वळणावर मंगळपाडा अशी पाटी पाहून त्या माणसाने गाडी थांबवली. डावीकडे एक अंधारा कच्चा रस्ता वळण घेऊन पुढे सरळ जात होता. “चला आलो एकदाचा मंगळपाड्याला. याच रस्त्यानं पुढे जायचं असणार...” हा विचार करत तो माणूस गाडी वळवणार इतक्यात त्याच्या उजव्या बाजूला छोटासा दिवा मिणमिणताना त्याला दिसला. गावाच्या बाहेर या जंगलाच्या तोंडावर झाडीतला हा दिवा पाहून त्या माणसाला नवल वाटलं. तो गाडीतून उतरला आणि हळू हळू दिव्याकडे जाऊ लागला. त्याचं एक मन सांगत होतं, “तिथे जाऊ नकोस... काहीतरी धोका संभवतो आहे...” तर दुसरं मन सांगत होतं, “कदाचित हाच तो दिवा असेल जो तुला तुझ्या जीवनातल्या अंधारात वाट दाखवेल...” अशा द्विधा मन:स्थितीत रस्त्याच्या कडेला उभा असतानाच, “माजंच घर हाय त्ये...” या आवाजाने तो दचकला. त्याने मागे पाहिलं तर एक बाई समोर उभी होती...

हिरवीगार साडी नेसलेली, कपाळावर चंद्रकोरीच्या आकाराचं कुंकू लावलेली, दिसायला नक्षत्रासारखी ती बाई त्या वातावरणात जरा वेगळीच वाटत होती. तिच्या कपाळावर एक छोटा डाग होता. ती बाई एक पाऊल पुढे झाली तसा तो माणूस भानावर येत म्हणाला, “माफ करा. मला त्रास नाही द्यायचा तुम्हाला. गावात नवीन आहे म्हणून जरा...” ती बाई हसली. वेणी मागे सारत म्हणाली, “आवं पावनं तरास कशा पाई...  ह्यो दिवा दिसतुया न्हवं थितं म्या लोकास्नी ज्यावन बनवून देते. रात किती जालिया बगा... तुमास्नी भूक लागली आसंल... चला, दोन घास खाऊन घ्या आन मंग जा की म्होरं...” त्या बाईचं बोलणं ऐकून तो माणूससुद्धा जरा खुश झाला. “थोडं खाऊन पुढे जाऊ. भूकही भागेल आणि मंगळपाड्याबद्दल या बाईला थोडी माहितीसुद्धा विचारता येईल...” हा विचार करत तो माणूस त्या बाईमागून चालू लागला. एका छोट्या खोपटाकडे ती बाई त्या माणसाला घेऊन आली. खोपटाच्या दाराला तो कंदील लावला होता जो त्या माणसाने गाडीतून पाहिला होता...

त्या माणसाने आत प्रवेश केला आणि, “नगं नगं... आसं करू नगासा... हिनं काय बी क्येलं न्हाय... म्या पदर पसरते...” या आवाजाने तो माणूस दचकला. बाजूच्याच खाटेवर एक म्हातारी बाई बसली होती. वयाने आणि शरीराने खंगलेल्या त्या म्हातारीचे डोळे मात्र भीतीने सताड उघडे होते. त्या म्हातारीला शांत करत ती बाई म्हणाली, “तुम्मी घाबरू नगासा. ही माजी आय... आदुगर हीच समद्यांना ज्यावन द्याची, पर आता वय जालं न्हवं हिचं. आय, ह्ये फकस्त ज्यावन करनार हायेत बाकी काय न्हाय... पावनं तुम्मी बसा. म्या ताट आनती...” थोड्याच वेळात ती बाई ताट घेऊन आली. ते रुचकर जेवण जेवत असताना त्या माणसाला समाधान वाटत होतं. जेवण झालं आणि तो उठला. बाहेर पडणार इतक्यात तो थांबला. मागे वळत म्हणाला, “अ... एक विचारू का... मंगळपाडा गावात जायचं आहे मला. तुम्ही रस्ता दाखवाल का...” मंगळपाड्याचं नाव ऐकताच त्या बाईचा चेहरा बदलला. ती म्हणाली, “थितं कशा पाई जायाचं तुम्मासनी... काय काम हाय थितं...”

तो माणूस बोलता झाला, “तुम्ही मला जेऊ घातलंत. तुमच्यापासून मी काही लपवणार नाही. त्या गावाशी माझ्याच नाही, तर माझ्या पूर्ण घराण्याचा जवळ जवळ दोनशे वर्ष जुना संबंध आहे. मी प्रभाकर. इथून जवळच असलेल्या किल्ल्यावर एकेकाळी सरदार असलेले प्रतापराव यांचा मी वंशज. प्रतापराव खूप दयाळू होते. जनतेची सेवा करणं हेच त्याचं ध्येय होतं. त्याच काळात या मंगळपाडा गावात चारू नावाची एक बाई राहत होती. असं म्हणतात की ती माणसं खाणारी हडळ होती. सगळेजण तिला खूप घाबरायचे. एकदा त्या गावच्या सरपंचाला जेव्हा त्या हडळीने मारलं तेव्हा गावकऱ्यांनी तिला कायमचं संपवायचं ठरवलं. प्रतापरावांनामात्र त्या चारूबद्दल सहानुभूती होती. तिचा यात काहीच दोष नाही असंच त्यांना वाटत होतं. म्हणून एक दिवस प्रतापरावांनी चारूला पळून जाण्यास मदत केली. पण गावकऱ्यांनी दोघांना पकडलं. प्रतापरावांच्या डोळ्यांदेखत चारूला जिवंत जाळलं. तिच्या घरालाही आग लावली ज्यात तिची आई जळून राख झाली...

हे सर्व ज्या दिवशी झालं त्याच दिवशी प्रतापरावांचा चाळीसावा वाढदिवस पण होता. मरता मरता त्या  कृतघ्न चारूने प्रतापरावांनाही शाप दिला आणि दुसऱ्याच दिवशी किल्ल्यावर परत जाताना घोडा उधळून त्यांच्या घोडागाडीचं चाक त्यांच्याच अंगावरून गेलं आणि प्रतापराव जागीच गेले. त्या नंतर आजपर्यंत माझ्या घराण्यातील कुठल्याही पुरुषाने एक्केचाळीसावं वर्ष पाहिलं नाही. प्रतापराव बिचारे त्या चारूच्या मदतीसाठी गावाविरुद्ध उभे राहिले आणि त्या दुष्ट चारू ने... ती नुसती बाई नाहीच... गावकरी म्हणतात तशी हडळच आहे ती. ज्याने आपल्याला मदत केली त्यालाच तिने मारलं. आणि नुसतं मारलं नाही तर पार त्याच्या घराण्याला धुळीला मिळवायला निघाली ही चारू...” “ह्ये खरं न्हाय...” प्रभाकर बोलतच होता, की या आवाजाने तो दचकला. त्याने आवाजाच्या दिशेने पाहिलं तर त्या बाईचं रूप बदललं होतं. केस मोकळे होते पदर जमिनीवर लोंबत होता. कपाळावरचं कुंकू पसरलं होतं आणि डोळे क्रोधाची आग ओकत होते...

तिला पाहून प्रभाकर खूप घाबरला. कसा-बसा बोलला, “ह...हे ख...रं नाही.. त...तुला क...सं म...माहित... तू... क...कोण....???” प्रभाकरकडे एक तीक्ष्ण कटाक्ष टाकत ती बाई बोलती झाली, “मला ह्ये समदं कसं म्हाईत... म्या कोन... म्याच चारू हाय. तू सांगतुयास तसा त्यो परतापराव चांगला न्हवता. त्येनं काय क्येलं ठावं न्हाय तुला...” खिडकीकडे पाहत चारू बोलू लागली, “म्या चारुलता. याच गावामंदी माजा जनम जाला. आय म्हनती म्या जनामले तवाच आंधली व्हते. येक म्हंजी पोरगी आन ती बी आंधली... म्हनून माज्या बाला लय राग आला. मला तसाच उचलून त्यो जंगलाकडं ग्येला. पाटून आय तेच्या मिनतवाऱ्या करत व्हती पन त्याने ऐकलं न्हाय. जंगलात खड्डा खनून मला त्यात टाकनार त्याच येली त्याला साप डसला. म्या तेच्या हातून खाली पडले आन ही जकम जाली. म्या निपचित पडले व्हते. साप डसल्याने बा खपला व्हता. आयला वाटलं म्या बी गेले. ती मला त्या खड्डयामंदी ठेवनार त्योच म्या रडू लागले. म्या डोले उघडले आणि आदी मला कोन दिसला आसंल, तर त्यो व्हता खपलेला माजा बा...

तवाधरनं आय म्हनती मला आसं समदं वंगाल दिसतं. एकाद्या मानसाचं मरान आलं का न्हाई की त्यो माज्या समोरून आदृस होतू. आदी आयला ह्ये काय बी खरं वाटलं न्हाय पर येक दिस मास्तर शिकवत असताना येकायेक आदृस जाले. मला त्ये दिसतच न्हवते. म्या आक्क्या वर्गामंदी मास्तरांना ह्ये बोलून दाकिवलं तर त्ये हसाया लागले. पर शाला सुटल्यावर घराकडं जाताना येका झाडाची फांदी त्यांच्या डोसक्यात पडली आन त्ये गेले. ही बातमी सगलीकडे पसरली. म्या मानसासनी मारते आसं पसरलं आन आम्माला गावाभाईर काढलं. आमी या घरामंदी ऱ्हाया लागलो. लोकांला ज्यावन घालून आय आमची गुजरान चालवू लागली. लय वर्ष सरली. म्या म्होटी जाले. येक दिस मंगलपाडाचे नवे सरपंच गावात परत येत व्हते. त्यासनी थान लागली तवा वाटेत आमच्याकडे आले. आयने माला पानी द्याया सांगितलं, पर माला सरपंच दिसलेच न्हाईत. म्या तशीच थांबलेले पाहून सरपंचांनी सवताच पेला घेतला. त्यो पेला हवेत तरंगत व्हता तवा म्या बोलून गेले, “सरपंच, तुम्मी मला दिसत न्हाय... तुम्मी लवकरच मरनार बगा...” सरपंच लय चिडले. पेला जमिनीवर आपटून तरातरा निघून गेले...

आय माला धरत म्हनाली, “अगो पोरी, काय केलंस ह्ये... त्ये गावचे सरपंच, आन तू त्यासनी आसं आसुब... आगं आपल्याला कोनी ऱ्हाऊ देत्याल का हितं...” म्या सारखी रडत व्हते. आता माला आसं वंगाल दिसतंय त्यात माजी काय चूक... दुसऱ्या दिवशी आम्माला खबर लागली की सवताच्या घरात जिन्यावरून पडून सरपंच गेले आनी ह्ये म्याच केलं आसं समदे म्हनत हायेत. म्या दाराभाईर येऊन सगलीकडे पायलं तर काही मानसं माला दिसली. ती आमच्याच घराकडं डोळे लावून व्हती. म्या आत जाऊन आयला ह्ये सांगितलं तर ती लय घाबरली. लगोलग कापडं भराया लागली आन येकीकडं म्हनत व्हती, “पोरी, आता ह्ये गाव काय आपल्याला जगू देनार न्हाय. आपन...” “खरं आहे तुमचं, हे गाव तुम्हाला जगू देणार नाही...” आय बोलतच व्हती की दाराकडून ह्यो आवाज आला. आम्मी दोगांनी थितं पायलं तर दारामंदी येक ऊंच मानूस उभा व्हता. त्येला पाऊन आम्मी लय भ्यालो. त्यो फुडं येत म्हनला, “घाबरू नका. मी तुम्हाला त्रास द्यायला आलो नाही तर वाचवायला आलोय...

मी प्रतापराव, रतनगिरी किल्ल्याचा सरदार. हे गावकरी तुमची तक्रार घेऊन आमच्याकडे आले होते पण त्यांच्याजवळ पुरावे नसल्याने आम्ही काहीच करू शकलो नाही. काल सरपंच गावात शिरले तेव्हा मीही तिथेच होतो. रात्री घडलेली हकीगत त्यांनी आम्हाला सांगितली आणि सकाळी सरपंच त्यांच्याच घरात जिन्यावरून घसरून पडले. गावकऱ्यांचं म्हणणं पडलं की ते तुझ्यामुळे गेले. मी जेव्हा तपास केला तेव्हा त्यांच्याशी कोणताही दगाफटका झाल्याचं दिसत नव्हतं. पण गावकरी हटूनच बसलेत, की ते तुलाही संपवतीलच. म्हणून मी माझी माणसं पाठवली जेणेकरून गावातून कोणी इथे आलंच तर तुम्हा दोघींना काही व्हायला नको. मीसुद्धा म्हणूनच इथे आलो. गावकरी जे सांगतात त्यावर माझा विश्वास नाही, पण चारू, तुला आता दारात पाहिली आणि क्षणभर सगळं विसरून गेलो मी. चारू, तुझ्याशी विवाह करण्याचा विचार आहे मनात. चारूच्या आई, तुम्ही आणि चारूने परवानगी दिलीत तर आज, आत्ता आपण देवळात जाऊन विवाह करू. मग बघतो, किल्ल्याच्या सरदाराच्या पत्नीचं कोण काय वाकडं करतो ते...”

आम्माला कळंच ना काय जालं त्ये. ह्यो सरदार येकदम येतू काय आन माला लगीन करती का आसं इचारतू काय... आम्मी येकमेकींकडे पायलं. आय म्हनाली, “पोरी, समदं गाव आपल्या इरोधात हाय. पर ह्ये म्हनत्यात तसं जर हेंच्याशी तू लगीन केलं तर तू या सगल्यातून सुटशील बघ. इचार कर पोरी इचार कर...” म्या उत्तर द्यायला येक दिस मागितला. रातभर खिडकीत बसून म्या इचार करत व्हते. फाटं फाटं परतापराव पुन्यांदा घरला आले. म्या त्यासनी होकार दिला आन त्याच दिवशी गावच्या भाईरच्या म्हाद्येवाच्या मंदिरात आमचं लगीन जालं. माला वाटलं आतातरी म्या या जाचातून भाईर येनार, आय आनी परतापरावासंगं किल्ल्यात ऱ्हानार. पर तसं काय बी जालं न्हाय. परतापराव म्हनाले, “किल्ल्यावर डागदुजीचं काम सुरू आहे तर पाच-सहा दिवस आपण तुमच्याच घरी राहू. काम पूर्ण झाल्याची खबर मिळताच आपण किल्ल्याकडे जाऊ...” माजं चुकलं आन म्या त्यांच्यावर इस्वास ठेवला. आम्मी तिघं माज्याच घरात ऱ्हाऊ लागलो. माजं सर्वस्व म्या परतापरावाला दिलं. माज्याकडंच समदं पिरेम म्या त्याच्या पायाला व्हायलं आन त्येनं माज्याशी दगा केला...” 'दगा' हा शब्द ऐकताच प्रभाकर आश्चर्यचकित होत म्हणाले, “दगा... दगा केला म्हणजे... असं काय केलं प्रतापरावांनी...”

पदराने डोळे पुसत चारू पुन्हा बोलू लागली, “आमचं लगीन हून धा दिस जालं व्हतं. म्या किल्ल्यावर जान्याचं सपान बगत व्हते. आय कुटतरी भाईर गेली व्हती. परतापराव धावत घरला येत म्हनाले, “चला, आता घाई करायला हवी. सांगावा आलाय. सगळी कामं पूर्ण झाली आहेत. तुम्हा दोघींना मी न्यायला आलो आहे. पण, आई कुठे आहेत...” आय भाईर गेल्याचं म्या सांगितलं तसा त्यो म्हनाला, “ठीक आहे. मी त्यांच्यासाठी वेगळी बग्गी पाठवेन. तू चल, लवकर चल माझ्यासोबत. हां, पण डोळे बंद करून बरं का... नवी जागा असेल तुझ्यासाठी सगळं लगेच पाहून कसं चालेल...” माजं पिरेम आन परतापरावावरचा आंधला इस्वास माज्या अंगाशी आला. म्या गपगुमान त्याच्यासंगं चालू लागले. येकाटिकानी माला मानसांचे आवाज ऐकू येऊ लागले. म्या काही बोलनार येवद्यात कोनीतरी माजे हात मागं बांधले. माला दोगा-तिगांनी पकडलंय आसं वाटलं. “काय चाललंय ह्ये... सोडा माला... परतापराव, आवं कुटं हायसा तुम्मी... ह्ये बगा...” म्या वरडतच व्हते की माला हसन्याचा आवाज आला...

“हा...हा...हा... नीट बांधा रे तिला. सुटता कामा नये. आरे ए, तिच्या डोळ्यांवरची पट्टी काढ की... पाहू दे तिला सगळं...” कोनीतरी पट्टी काढली. म्या डोले किलकिले करत पायलं तर माला म्हाद्येवाच्या मंदिराम्होरं येका खांबाला बांधलं व्हतं. माज्या अवतीभवती मानसं हातामंदी काट्या घेऊन हुबी व्हती. सगलीकडे नजर फिरवताना माला परतापराव दिसला. त्यो हासत व्हता. म्या म्हनाले, “परतापराव तुम्मी... तुम्मी आनलं माला हितं... का क्येलं आसं...” परतापराव हासतच व्हता. म्हनाला, “हा...हा...हा... का केलं मी असं, तू मला ओळखलं नाहीस चारू. मंगळपाड्याचा शाळा मास्तर आठवतो का... त्याच्या मरण्याचं भाकीत तू केलं होतंस आणि दुसऱ्या दिवशी तो मेला. मी त्याच मास्तरचा मुलगा आहे. बाबा गेले आणि बदल्याच्या भावनेने माझ्या मनात जन्म घेतला. वय वाढत गेलं तशी त्या भावनेवर धूळ साचली खरी पण गावकरी जेव्हा तुझी तक्रार घेऊन आले तेव्हा पुन्हा ती भावना उफाळून वर आली. त्या दिवशी गावकऱ्यांसोबत तुला कसं मारावं याचाच विचार करत असतानाच सरपंच गावात शिरले...

घाबरलेल्या सरपंचांनी तू सांगितलेलं भविष्य आम्हाला सांगितलं. त्या रात्री मी खरंतर त्या सरपंचाला मारायलाच आलो होतो. कारण त्याच्या बायकोसोबत त्याने मला नको त्या अवस्थेत पाहिलं होतं आणि राजाकडे माझी तक्रार करणार होता. मी त्याच्या घरात शिरलो. तू केलेल्या भविष्याने तो सरपंच आधीच अर्धमेला झाला होता. अंधारात जिन्यावरून घसरला आणि त्याच क्षणी मेला. माझ्यासाठी तर सुंठीवाचून खोकलाच गेला होता. आता तुझी पाळी होती. तुझी दहशत ज्यांच्या मनात बसली आहे, त्या गावकऱ्यांच्या स्वाधीन तुला केलं तर त्यांच्यासमोर माझीही पत वाढेल. सरपंचांना मागे-पुढे कोणीच नव्हतं म्हणून त्यांची सगळी कार्य गावकऱ्यांनाच करावी लागणार होती. चितेची आग शांत होईपर्यंत तुझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी मी आणि माझी काही माणसं तुझ्या घराबाहेर पहारा देऊ लागलो. तुला दारात पाहिलं आणि तुझं हे मोहक रूप माझ्या मनात भरलं. आजच तू मेली असतीस तर मला काय फायदा झाला असता... त्यावेळी मला एक युक्ती सुचली. गावात परत जाऊन मी सरपंचांचे राहिलेले दिवस पूर्ण करायला गावकऱ्यांना सांगितलं. तोवर तुला कुठेही निसटू न देण्याचं आश्वासनही मी त्यांना दिलं...

त्यानंतर मी तुझ्या घरात शिरकाव केला. तुमच्यासारख्या मुली मंगळसूत्र घातल्याखेरीज अंगाला हात पण लाऊ देत नाहीत हे माहित होतं मला. तुला मिळवण्यासाठी तुझ्याशी लग्नाचं नाटक करावं लागलं मला. तू आणि तुझी ती म्हातारी... दोघीही सारख्याच बावळट. अलगद माझ्या जाळ्यात अडकलात. आणि तू... तू तर मला सर्वस्वच देऊन बसलीस... मला हवं होतं ते मिळालं. आता, गावकऱ्यांना दिलेलं वचन पूर्ण करायला नको का... आज सरपंचाचा तेरावा दिवस आहे आणि माझा वाढदिवस पण आहे... तिकडे बघ...” परतापरावाने बोट दाखिवलं थितं म्या पायलं, तर समदं गाव मशाली घेऊन येत व्हतं. समदे जवळ आले तसा परतापराव म्हनाला, “मंडळी, मी तुम्हाला वचन दिलं होतं ना... ही बघा तुमच्या जिवावर उठलेली चारू... अरे बघताय काय... संपवून टाका हिला कायमचं. आणि गावाबाहेर असलेल्या खानावळीत हिची म्हातारी आईपण असेल. तिलाही संपवून टाका, म्हणजे कोणीही परत असं करायला नको. हा...हा...हा...” गावकरी वाईस म्होरं आले. माज्या डोल्यातलं पानी थांबत न्हवतं. माजा इस्वासघात क्येला व्हता या परतापरावानं. म्या तेच्याकडं पायलं आनी त्यो माज्या डोल्याम्होरं आदृस जाला...

समद्यांनी मशाली माज्यावर फेकल्या. आगीने माज्या अंगाची लाही लाही जाली. परतापरावच्या हासन्याचा आवाज येत व्हता थितं बगून म्या म्हनाले, “परतापराव, माज्या पिरमाची राक क्येलीस तू... पर तू बी वाचनार न्हाईस... आज तुजा जनम दिस हाय न्हवं... मंग तू उद्याची रात न्हाय बगू शकनार... तूच न्हाय, तर तुज्या खानदानातले समदे बापे तुज्या येवढेच जगतील... हा माजा शाप हाय तुला... शाप हाय...” आग वाढू लागली आनी थोड्याच येलेत....... त्या उलट्या कालजाच्या परतापरावाने माज्या आयला बी न्हाय सोडलं. माज्या घरासंगं तिलाबी जित्ती जालून मारली. सकाली त्यो परतापराव परत जाताना घोडा उधलून गाडी अंगावरून जाऊन थितंच खपला. म्या परतापरावाला शाप दिला अन तवाधरनं परत्येक रातीला म्या तीच रात जगती. त्योच परतापराव, त्येच पुन्यांदा आगीत जलनं...” चारू शांतपणे खिडकीबाहेर पाहत होती आणि प्रभाकरचे डोळे दरवाजाकडे लागले होते. प्रभाकर म्हणाले, “या शापातून माझ्या घराण्याला मुक्त करण्यासाठी मी झटत होतो, पण चारुलता, तुम्ही मात्र रोज हा शाप जगत होता. प्रतापरावाच्या कृत्याची लाज वाटते आहे मला. प्रतापरावाने जे केलं ते केलं. पण आता मी तुम्हाला वाचवणार...”

प्रभाकरकडे पाहत चारू म्हणाली, “परभाकर, तुम्मी मनाने लाई चांगले हायसा. पर, जे जालं त्ये समदं इदिलीकीत व्हतं. त्ये तुम्मी न्हाय रोकू शकत...” चारू हे बोलतच होती की प्रकाशाचा एक प्रचंड मोठा बोगदा सरकत प्रभाकरना पार करून गेला. बोगद्याला पाहून प्रभाकर वळले तेव्हा ती म्हातारी खाटेवर नव्हती आणि चारू स्तब्ध उभी होती. तिचं अंग पाण्यासारखं पारदर्शक होतं. तिच्या डोळ्यांवर पट्टी होती. प्रभाकर थोडे पुढे सरकले आणि चारूच्या बाजूला प्रतापराव दिसू लागले. तेही चारूप्रमाणेच पारदर्शक दिसत होते. “चल माझ्यासोबत...” असं म्हणत प्रतापरावांनी हात पुढे केला. चारूने त्यांच्या हातात हात दिला आणि दोघं दाराबाहेर जात अदृश्य झाले. विस्फारलेल्या डोळ्यांनी ते दृष्य पाहत प्रभाकर तिथेच उभे होते. त्यांनी विचार केला, “पुन्हा तेच होतंय. नाही चारू, यावेळी मी तुम्हाला नाही मरू देणार. मी आलो चारू...” असं म्हणत प्रभाकर दाराबाहेर पळाले. धावत धावत ते महादेवाच्या देवळात आले. तिथे सगळं सामसूम होतं. अचानक पुन्हा प्रकाशाचा बोगदा प्रभाकारांना चाटून गेला. हातात मशाली घेतलेली बरीच पारदर्शक माणसं प्रभाकारांना दिसू लागली. एका खांबाला चारूला बांधलं होतं...

“संपवून टाका हिला कायमचं...” हे उच्चार ऐकू येताच मशाली हातात घेतलेली माणसं पुढे सरकू लागली. हे पाहून त्यांना थांबवायला प्रभाकर पुढे झाले. “थांबा... काय करताय तुम्ही... नका मारू तिला... तिचा काही दोष नाही...” असं म्हणत प्रभाकर सर्वांना विनवण्या करत होते पण त्याचा काहीच उपयोग होत नव्हता. प्रभाकरने एखाद-दोन माणसांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण ते कोणालाही स्पर्श करू शकत नव्हते. प्रभाकर परोपरीने याचना करत असतानाच, “कोण आहे रे हा... आपल्यामध्ये येतोय... हाणा याला...” प्रतापरावने हुकूम सोडताच काठ्या हातात घेतलेली काही पारदर्शक माणसं प्रभाकरवर धाऊन आली. काठ्यांचा मार खाल्ल्याने प्रभाकर बेशुद्ध झाले. काही क्षणात ते शुद्धीवर आले तेव्हा तिथे काहीच नव्हतं. ना प्रतापराव, ना गावकरी... चारूसुद्धा दिसत नव्हती कुठे. प्रभाकर हळू हळू उभे राहिले. त्याचं डोकं ठणकत होतं. त्यांनी सर्वत्र पाहिलं. कोणीच नाही असं कळल्यावर प्रभाकर विचार करू लागले, “अरे, कुठे गेले सगळे... ती माणसं, प्रतापराव... आणि... चारू... म्हणजे... संपलं सगळं. मी चारुलतांना वाचवू शकलो नाही. आणि आता... त्या आजी... नाही... आजी... मी येतोय आजी...” असं ओरडत प्रभाकर गावाबाहेर असलेल्या खानावळीकडे धावले. खानावळीजवळ ते पोहोचले तर आग धडधडत होती. “आजी... नाही आजी... मी वाचवतो तुम्हाला...” असं ओरडत प्रभाकरने घरात धाव घेतली...

सकाळ झाली. खानावळीच्या आत दाराजवळ प्रभाकर निपचित पडले होते. त्यांनी डोळे उघडले. काळ्याठिक्कर पडलेल्या, अर्धवट तुटलेल्या भिंतींमधून प्रकाशाचे कवडसे येत होते. प्रभाकर उभे राहिले. त्याचं डोकं दुखायचं थांबलं होतं. त्यांनी सगळीकडे नजर फिरवली, पण भकास भिंतींशिवाय त्यांना काहीच दिसत नव्हतं. प्रभाकर मान खाली घालून दाराबाहेर पडले. हळू हळू चालत प्रभाकर त्यांच्या गाडीजवळ पोहोचले. दार उघडायला त्यांनी हँडलला हात लावला. त्यांचा हात हँडलच्या आरपार गेला. प्रभाकरना आश्चर्य वाटलं. हे काय झालं याचा विचार करत प्रभाकर तिथेच उभे होते की, “परभाकर...” ही हाक ऐकून ते वळले. समोर चारू उभी होती. तीसुद्धा तशीच पारदर्शक दिसत होती. “चारुलता... तुम्ही... मला माफ...” प्रभाकर पुढे काही बोलणार इतक्यात चारू म्हणाली, “परभाकर, त्या परतापरावनं माला फशिवलं म्हनून म्या त्येला शाप दिला. पर तुम्मी माला वाचिवन्यासाटी सवताचा जीव धोक्यात घातला. त्या परतापरावाच्या करनीमुलं म्या हितं आडकून पडले. पर तुम्मी आज माला मुक्त केलं. म्या दिलेला त्यो शाप आज म्या परत घेती. याम्होरं तुमच्या घराले बापे माज्या शापामुळं मरनार न्हाईत. माफी करा माला...”

चारूने हात जोडले. पांढऱ्या प्रकाशाचं वलय तिच्याभोवती तयार होऊ लागलं. प्रकाश वाढत गेला आणि चारू त्यात लुप्त झाली. प्रभाकर हे पाहतच होते की, “आरं किस्ना, ती बघ, राती भेटलेल्या काकाची गाडी. आरे, त्यो काकाबी हाय थितं...” हा आवाज त्यांच्या मागून आला. प्रभाकरने मागे पाहिलं तर रात्री भेटलेला किस्ना आणि त्याचे आजोबा समोर उभे होते. “आरं पोरा, लई घोर लागला व्हता जिवाला. तू ठीक हायेस ह्ये पाऊन जिवात जीव आला बग...” आजोबांचं बोलणं ऐकत थोडं हसत प्रभाकर म्हणाले, “हं... नाही काका... जे व्हायचं होतं ते घडून गेलं आहे...” असं म्हणत प्रभाकरने त्यांचा हात पुढे केला. आजोबांनी हात पकडायला स्वत:चा हात पुढे नेला तर तो आरपार गेला. आजोबा अवाक होऊन पाहू लागले. प्रभाकर म्हणाले, “काका, मीही आता पुढच्या प्रवासाला निघालोय. जमलं तर ही गाडी माझ्या घरी पोहोचवा आणि त्यांना माझा निरोप द्या. म्हणावं आपल्या कुटुंबाला लागलेला शाप आता दूर झालाय. शापमुक्त झालो आपण. बरं आहे काका. निघतो आता...” इतकं बोलून प्रभाकरने हात जोडले. त्यांच्याभोवतीसुद्धा पांढऱ्या प्रकाशाचं वलय तयार होऊ लागलं. प्रकाश वाढत गेला आणि प्रभाकर त्यात लुप्त झाले...

समाप्त.

No comments:

Post a Comment