Sunday, February 24, 2019

पासबूक सुमीत


कुणाच्यातरी बोलण्यात, 'ब्रँडेड' हा शब्द ऐकला आणि एकदम बँकेतल्या पासबूक सुमीतची आठवण झाली. वास्तविक, त्याचं नाव सुमीत धबडे होतं. पण तो करत असलेल्या कामामुळे त्याला पासबूक सुमीत असं नाव मिळालं. मी मात्र त्याला साहेब हे विशेषण लावलं होतं बरं का...

सुमीतची आणि माझी पहिली भेट झाली ती आमच्या बँकेच्या हेड ऑफीसमध्ये. आम्ही दोघंही इंटरव्ह्यूसाठी तिथे गेलो होतो. साधारण साडे-पाच फुटांच्या आत-बाहेर ऊंची असलेल्या आणि साखरेचं पोतं असतं ना, तितपत किरकोळ शरीरयष्टी असलेल्या त्या इसमाचं नाव सुमीत धबडे हे समजलं. डोक्यावरचे बरेच केस, "कर चले हम फिदा..." अशा आविर्भावात टकलाची जमीन दाखवत इतर केसांना सोडून गेले होते. काळ्याभोर डोळ्यांच्या वरच्या मजल्यावर दाक्षिणात्य पौराणिक चित्रपटातल्या राक्षसाला असतात ना तशा भरीव भुवया होत्या तर डेळ्यांवर मोठ्या काळ्या फ्रेमचा जाड चष्मा बसला होता. क्रिकेटचा लाल रबरी चेंडू अर्धा कापल्यावर जसा आकार दिसेल त्या आकाराचं नाक आणि नाकाखाली, घनदाट जंगलही लाजेल अशा भरघोस मिशा...

इंटरव्ह्यूचं टेंशन घालवायला काहीतरी वाचत असताना बहुतेक एखादा विनोद सुमीतने वाचला असावा. दिलखुलास पण आवाज न करता हसत असताना सुमीतने दाखवलेली त्याच्या दातांची ठेवण तर भारीच होती. म्हणजे इंग्लीश भयपटात ड्रॅक्यूला असतो ना, दोन दात मागे आणि दोन सुळके पुढे, तशी होती हो. अर्थात लहान असताना कोणीतरी मारलेला बॉल तोंडावर बसून त्याचे मधले दोन दात अर्धे तुटले होते ही माहिती मला बरीच नंतर मिळाली म्हणा, पण त्यावेळी जरा विचित्र वाटलं खरं. आमचा इंटरव्ह्यू पार पडला. मला अंधेरीची शाखा दिली गेली आणि साहेबांची दादरकडच्या शाखेत वर्णी लागली. साधारण पंधरा दिवस झाले असतील, एके दिवशी मी शाखेत पोहोचलो तर समोर सुमीत उभा. दादरची त्याची टेंपररी ट्रांस्फर होती आणि या शाखेत तो रुजू होणार असल्याची बातमी समजली. मी कॅशियर म्हणून पुढे सरकलो आणि साहेबांना पासबूक काऊंटरची जागा मोकळी झाली...

साहेब सीटवर विराजमान झाले ते झालेच. म्हणजे सर डोनाल्ड ब्रॅडमन क्रीजला चिकटून रहायचे ना तस्से हे आमचे साहेब चिकटले हो पासबूक काऊंटरला. कदाचित म्हणून साहेबांना पासबूक सुमीत हे विशेषण मिळालं असेल. साहेबांना एक छान पण चिवित्र सवय होती बरं का... म्हणजे, ग्राहकांसाठी बँकेची वेळ संपल्यावर साहेब कानात बुच्चू घालून हिंदी गाणी ऐकायचे. बरं, नुसते ऐकायचे असंही नाही. आपले भटजी मंत्रपुष्पांजली गुणगुणतात ना, त्याच ढंगात ती गाणी साहेब स्वत: म्हणायचे. म्हणून मग, आमचे हेड कॅशियर, साहेबांना भुंगा म्हणायचे भुंगा. साहेबांचा कपडेपटही वेगळाच असायचा. म्हणजे एकाच रंगाच्या किंवा डिझाईनच्या गडद आणि हलक्या अशा दोन छटा असलेला शर्ट साहेब घालायचे. त्यावरून त्यांना टू ईन वन सुमीत हेही एक विशेषण मिळालं. बरं, ते शर्ट साधे-सुधे नसायचे बरं का... "कुठला शर्ट..." असं विचारताच, "चिरागदिन, पीटर इंग्लंड, जॉन पिलेयर्स, वॅन ह्यूसेन" अशी नवं साहेब आमच्या तोंडावर फेकत असत. साहेबांच्या या सवयीमुळे त्यांना ब्रँडेड सुमीत, असं बिरुदही चिकटलं...

जसजसे साहेबांचे दिवस जात होते... (दिवस जात होते म्हणजे, ब्रांचमध्ये साहेबांचा एकेक दिवस जसा पुढे जात होता, असं म्हणायचं होतं बरं का... लगेच भुवया ऊंचवू नका तुम्ही...) तशी विशेषणांमागून विशेषणं साहेबांना मिळत गेली. म्हणजे, पारकर सुमीत, कारण चालत नसलेलं पारकरचं पेन नेहमीच त्यांच्या खिशाला असायचं. सांगितिक सुमीत, कारण त्यांच्या फेंदारलेल्या नागपुड्यांमधून नेहमीच संगीत ऐकू यायचं. विराट सुमीत, बहुतेक त्यांच्या आकारावरून असेल. अशा विविध बिरुदांनी साहेब सजले होते. इतकं असूनही त्यांच्या पासबुकच्या कामात मात्र ते चोख होते बरं का (हो म्हणजे, थोडा गुणवर्णनात्मक भागही यायला हवा ना साहेबांचा...). इतर कामात कितीही किरकोळ चुका असतील, पण पासबूक भरताना साहेबांचा अर्जून व्हायचा. म्हणजे, एक प्रिंटर, एक पासबूक आणि एकच ध्येय. ते म्हणजे पासबुकात एंट्र्या प्रिंट करून देणे. साहेबांचं इतरांशी पटत असेल नसेल, पण मला मात्र ते परममित्र मानायचे हो. एकदा ते गणपतीला म्हणून माझ्याकडे आले आणि त्यानंतर ते येतच गेले. त्या काळात, शनिवार हा आम्हा बँकवाल्यांसाठी अर्धा दिवस असायचा. मग काय, दर शनिवारी चार ते सात साहेबांच्या गप्पांची मैफल माझ्या घरी...

गप्पा म्हणजे वन वे ट्रॅफिक हो. म्हणजे बरं का, सगळे शब्द साहेबांच्या वेने येऊन माझ्या एका कानाच्या वेने आत शिरून दुसऱ्या कानाच्या वेने बाहेर जात असत. बरं, साहेबांना काही सांगायचीही सोय नव्हती हो. आनंद असो किंवा दु:ख; १९९ धावांवर खेळत असलेला फलंदाज त्याच्या जोडीदाराच्या चुकीमुळे रनआऊट होतो, तेव्हा त्याचा चेहरा जसा होईल; अगदी तसा चेहरा असायचा साहेबांचा. त्यामुळे निमूटपणे ऐकत बसणे हेच असायचं माझ्या हातात. साहेब माझ्यासोबत आले की आम्हा दोघांना चहा करून, "अनिकेत, मी जरा देवळात जाऊन येते रे..." असं म्हणून आई सटकायची आणि मी आयताच सापडायचो साहेबांच्या शाब्दीक जाळ्यात. अखेर एक दिवस अंधेरीच्या शाखेतला माझा शेयर संपला. बदलीचा आदेश आला. सुमीतपासून आता सुटका होणार हा आनंद जेव्हा माझ्या चेहऱ्यावर (मनातही) होता तेव्हा साहेबांच्या मुखावर मात्र प्रेयसी सोडून गेलेल्या प्रियकराचे भाव होते. मी साहेबाला माझ्या घरी (हुश्श... शेवटचाच...) घेऊन आलो...

गप्पा सुरू असताना मी त्याला विचारलं, "काय रे साहेबा, सगळे तुझी इतकी चेष्टा करतात, मस्करी करतात... तुला दु:ख होतं नाही... राग नाही येत त्यांचा..." साहेब हसले (यावेळी पहिल्यांदाच स्मितहास्य बरं का...) म्हणाले, "दु:ख, नाही रे... मला काहीतरी बोलून, माझी मस्करी करून त्यांना हसू येतं. दिवसभराच्या कटकटीनंतर माझ्यामुळे थोडा वेळ का होईना त्यांचं मनोरंजन होतं, त्यांचा ताण थोडा कमी होतो. मला बरं वाटतं..." साहेब गप्प झाले. ती होती माझी आणि साहेबांची शेवटची भेट. पुढे माझंं प्रमोशन झालं, वेगळ्या ब्रांचमध्ये वेगळ्या कामांवर माझी नेमणूक होऊ लागली. साहेबाबद्दल चौकशी करायचो तेव्हा साहेबांची ब्रांच बदलली असायची पण पासबूकचा काऊंटर तसाच असायचा. आपल्यावर इतके विनोद होत असूनही विनोद करणाऱ्याच्या आनंदात सुख मानणाऱ्या या पासबूक सुमीतने नकळतच माझ्या मनात कायमची एंट्री केली होती...

समाप्त.

No comments:

Post a Comment