Wednesday, June 19, 2019

टिल्लू - भाग १...


मार्जारपूर, एक खुशाल राज्य. तिथले राजे बोकेश्वर महाराज आणि राणी मनीदेवी खूप प्रेमळ होते. प्रजेला आपल्या मुलाप्रमाणे ते वागवत. प्रजासुद्धा त्यांच्यावर मनापासून प्रेम करत होती. सर्वकाही छान असूनही बोकेश्वर आणि मनीदेवी यांना एक दुःख होतं, आणि ते म्हणजे त्यांना स्वत:ला मूल-बाळ नव्हतं. त्यांनी कित्येक नवस केले, देव-धर्म केले पण काहीच गूण आला नाही. एक दिवस त्यांना, अस्वलेश्वर नावाचे एक तपस्वी, जग परियटणाला निघालेत आणि सध्या नगराबाहेरच्या जंगलात वास्तव्य करून आहेत ही बातमी मिळाली. मग काय, बोकेश्वर महाराज आणि मनीदेवी ताबडतोब त्यांच्या दर्शनाला गेले...

दोघं त्यांच्या मठात पोहोचले तेव्हा अस्वलेश्वर गुरूजी साधनेत लीन होते. त्यात व्यत्त्यय येऊ नये म्हणून दोघं तसेच वाट पाहत उभे राहिले. काही वेळातच गुरुजींनी डोळे उघडले. बोकेश्वर आणि मनीदेवी यांना समोर पाहून स्मित करत ते म्हणाले, "ये राजन. तुझं इथे येण्याचं प्रयोजन आम्ही जाणतो. राणी, आपली समस्या आम्हास ज्ञात आहे. घे हे संत्र. निजण्यापूर्वी हे ग्रहण कर. लवकरच तुला पुत्रप्राप्ती होईल. राजन, तू परोपकारी आणि मनाने चांगला आहेस. तुझ्या याच गुणांमुळे तुझा पुत्र असामान्य असेल. तो धाडसी असेल, प्रेमळ असेल, पण त्याची देहबोली इतरांसारखी नसेल. मनोनिग्रह केल्यास हिमालयसुद्धा त्याच्यापुढे ठेंगणा होईल आणि अग्निदेवता त्याला नमन करेल. तुझ्या मस्तकावर आहे तसंच चिन्ह त्या बाळाच्याही मस्तकी असेल आणि तीच त्याची ओळख पटवून देईल..."

गुरुजींनी आशीर्वादाचा हात वर करत पुन्हा स्मित केलं आणि बोकेश्वर व मनीदेवी त्यांना नमस्कार करून समाधानाने महालात परतले. निजण्यापूर्वी मनीदेवींनी संत्र खाललं आणि येणाऱ्या सुखाची स्वप्न पाहत बोकेश्वर व मनीदेवी निद्राधीन झाले. महालापासून दूर, नागराच्या वेशीआधी, वटवागुळांच्या गुहेशेजारी असलेल्या महालात काली येरझारा घालत होता. नागराचा प्रधान असलेला काली, हा मनीदेवीचा सावत्र भाऊ होता. तो एक काळा-करडा बोका होता आणि नावाप्रमाणेच मनानेही काळा व क्रूर होता. त्याचा हस्तक होता यवक्री नावाचा एक कपटी आणि कारस्थानी वटवागूळ. कालीला असं फिरताना पाहून यवक्रीने विचारलंच, "महाराज, काय झालं... अशा फेऱ्या का मारताय..."

आपले लाल झालेले डोळे यवक्रीवर रोखत काली म्हणाला, "काय झालं... तुला दिसलं नाही काय झालं ते... इथे वारस नसलेल्या त्या बोकेश्वर आणि मनीदेवीचा अडथळा दूर करून मार्जारपुराचा राजा होण्याची स्वप्न बघतोय आम्ही आणि तिथे त्या योग्याने पुत्रप्राप्तीचं संत्र दिलं त्या मनीदेवीला. आत्तापर्यंत तिने ते ग्रहणही केलं असेल... आता त्यांना पुत्र झाला तर... तो थेट गादीवर बसेल. आणि मी... प्रधान तो प्रधानच..." बोलता बोलता कालीने पंजा उगारला आणि समोर असलेला पेला खिडकीबाहेर भिरकावला. त्याचा राग पाहून यवक्री थोडा घाबरला खरा, पण धीर करून म्हणाला, "महाराज, आपण आजपर्यंत खूप सहन केलंत. वास्तविक राणीचा भाऊ म्हणून तुम्हाला अधिक मान मिळायला हवा होता. निदान अर्ध राज्य तरी... काहीतरी करायलाच हवं..."

दिवस सरत गेले आणि बोला-फुलाला गाठ पडली. अस्वलेश्वर महाराजांनी दिलेल्या प्रसादाला फळ मिळालं आणि मनीदेवीची कूस धन्य झाली. बातमी सर्वत्र पसरली. मनीदेवी बाळाला जन्म देणार म्हणून प्रजा खूप खुश होती. सगळीकडे आनंदी आनंद असताना कालीचा मात्र जळफळाट होत होता. आपल्या महालात पुन्हा फेऱ्या मारत असताना वाटेत येणाऱ्या वस्तूंची तोडफोड करत काली त्याचा राग व्यक्त करत होता. थोड्याच वेळात यवक्रीकडे पाहून म्हणाला, “यवक्री, आपल्या वटवागूळ सेनेला बोलावून घे. आत्ताच महालावर आक्रमण करू आपण. यवक्री त्याच्या मालकाप्रमाणेच धूर्त होता. कालीच्या कानाजवळ येत म्हणाला, “महाराज, असा अतातायी विचार करू नये. प्रजा आज त्या बोकेश्वर आणि मनीदेवीच्या बाजूने आहे. असं नको व्हायला की आपण महालावर आक्रमण करायचो आणि आणि ही प्रजा आपल्यालाच...”

यवक्रीच्या बोलण्याने काली विचारात पडला. यवक्री पुढे म्हणाला, “महाराज, प्रजेला क्रोधाच्या आगीत जाळून काबीज करण्यापेक्षा दु:खाच्या सागरात तिला बुडवून त्यांच्यावर राज्य करा. महालातले चोर दरवाजे तुम्हाला ठाऊक आहेतच. रात्री निजानीज झाल्यावर महालात शिरायचं. त्या मनीदेवीला विष पाजून बोकेश्वरासह तिला खिडकीबाहेर फेकून द्यायचं आणि महालावर कब्जा करायचा. एकदा का राजा-राणी मेले की प्रजा हवालदिल होईल आणि आपल्या चरणांशी येईल...” कालीला ही युक्ती पटली. क्रूर हसत तो म्हणाला, “हा...हा...हा... आता अर्ध नाही, तर तुझं पूर्ण राज्य मी हस्तगत करणार आहे बोकेश्वर. मनीदेवी, तुझा भाऊ असलो म्हणून काय झालं. सिंहासनाची लालसा कोणाला नसते... बिचारी ती मनीदेवी... हा...हा...हा...”

रात्र वाढत चालली होती. आपल्या बाळाचे आणि भावी युवराजाचे इमले मनात बांधण्यात बोकेश्वर आणि मनीदेवी इतके गर्क होते की येणाऱ्या संकटाची साधी चाहूलसुद्धा त्यांना नव्हती. अंधाराचा फायदा घेत कालीची वटवागूळसेना महालात शिरली. बोकेश्वर महाराजांच्या एकेक सैनिकाला मारत ती सेना कालीसाठी रस्ता मोकळा करत होती. काली आणि यवक्री दालनात पोहोचले तेव्हा बोकेश्वर आणि मनीदेवी गाढ झोपेत होते. वटवागुळांनी लगेच दोघांच्या मुसक्या बांधल्या. अचानक झालेल्या हल्ल्याने दोघं घाबरली. काही करायच्या आतच दोघांचे पंजे आणि पाय बांधले गेले. काय होत आहे हे समजण्याचा प्रयत्न करत असतानाच काली त्यांच्या समोर आला. त्याला तसा पाहून बोकेश्वर म्हणाले, “काली... तू... तू केलंस हे...” त्यांना दुजोरा देत मनीदेवी म्हणाल्या, “अरे, भाऊ ना तू माझा. आपल्या बहिणीशी असं वागताना काहीच वाटत नाही का तुला...”

आपल्या पंजांनी दोघांची मान पकडत काली म्हणाला, “भाऊ नाही मनीदेवी, सावत्र भाऊ. तुझ्या नाही, तर माझ्या बापाने दुसरं लग्न केलं. मी मोठा पण तो नेहमीच मला पाण्यात पहायचा. त्याचं तुझ्यावरच प्रेम जास्त. इतकंच कशाला, आपल्या राज्याचं नावही त्याने तुझ्या जन्मानंतर बदललं. शेवटी सहन न होऊन माझ्या या विषारी पंजांनी मीच मारलं त्याला. पण त्याने, मरण्यापूर्वीच सर्वकाही तुझ्या स्वाधीन केलं. माझा हक्क हिरावून घेतला. तुझं लग्न झालं आणि मोठ्या मनाने तू मला इथे आणलंस. मला मात्र सतत इथे आश्रितासारखं वाटत होतं. पण आता नाही. बोकेश्वर, भावी युवराजाची स्वप्न पाहतो आहेस ना... त्याच्या जन्माआधीच त्याला संपवतो आणि मग तुम्हा दोघांना कैद करून ठेवतो म्हणजे उघड्या डोळ्यांनी तुम्ही आयुष्यभर मला राज्य करताना पाहत बसाल आणि गेलेल्या युवराजाच्या शोकाने व्याकूळ व्हाल. हा...हा...हा...”

“महाराज, बोलत काय बसलात... हा घ्या पेला आणि करा विषप्रयोग...” काली बोलत असताना यवक्री एक पेला घेऊन समोर आला. दोघांची मान सोडून कालीने त्याच्या पंजातील विष पेल्यात टाकलं आणि जबरदस्तीने मनीदेवीला ते प्यायला लावलं. बोकेश्वरांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तर यवक्रीने त्याच्या पंजांनी त्यांना जखमी केलं. इतक्यात त्यांच्या अंगरक्षकाला, मन्याला याचा सुगावा लागला. मन्या ताबडतोब महाराजांच्या कक्षात आला. आपल्या पंजांनी एकेका वटवागुळाला बाजूला सारत महाराज आणि महाराणीपर्यंत मन्या पोहोचला व तिथून निघण्यास सांगू लागला. महाराज म्हणाले, “नाही मन्या. मी या नगराचा राजा आहे. मी असा पळून गेलो तर माझी प्रजा...” मन्या त्यांना समजावत म्हणाला, “महाराज, तुमचं बरोबर असलं तरी आत्ता आपल्याला तुमचा, महाराणींचा आणि येणाऱ्या युवराजांचा जीव जास्त महत्वाचा आहे. हट्ट करू नये महाराज. आपण या रस्त्याने निघावं. मी त्यांना इथे थोपवून धरतो...”

महाराज बोकेश्वर मनीदेवीला घेऊन महालाच्या मागच्या बाजूने जंगलाच्या दिशेने पळाले. तिथे महालात काली आणि यवक्रीने त्यांच्या वटवागूळ सेनेसह मन्यावर हल्ला केला. शरीराने कणखर असलेल्या मन्याने आपल्या पंजाच्या सहाय्याने एकेका वटवागुळाचा समाचार घ्यायला सुरुवात केली. खिडकीबाहेर जंगलाच्या दिशेने जात असलेल्या बोकेश्वर आणि मनीदेवीला पाहून काली खवळला. त्याच्या विषारी पंजाने त्याने मन्यावर एकच वार केला. घायाळ झालेला मन्या निपचित पडला आणि काही क्षणातच त्याची प्राणज्योत मालवली. काली यवक्रीला सूचना देत म्हणाला, “वटवागुळांना आणि कावळ्यांना सांग वरून जंगलाकडे लक्ष द्यायला. आपल्या सैनिकांना जंगलाचा कोपरा अन कोपरा खणून काढायला सांग. ती दोघं सापडलीच पाहिजेत...”

तिथे जंगलात जखमी असलेले बोकेश्वर आणि विष प्राशन केल्यामुळे अर्धमेल्या झालेल्या मनीदेवी कसेतरी स्वत:ला खेचत एका झाडापर्यंत पोहोचले. पंजांनी घसा आणि पोट पकडत मनीदेवी म्हणाल्या, “खोक... खो...क... म...महा...राज... आ...पलं... बाळ...” स्वत:च्या वेदना विसरून मनीदेवीकडे पाहत बोकेश्वरांनी सभोवार नजर फिरवली आणि दुर्वांच्या पाती घेऊन आले. मनीदेवीसमोर ठेवत म्हणाले, “मनीदेवी, तुमचे पंजे निळे पडत आहेत पण काळजी करू नका. या दुर्वा खा. तुम्हाला बरं वाटेल...” मनीदेवी दुर्वा खाणार इतक्यात कुठूनतरी एक विंचू आला आणि मनीदेवीच्या पायाला चावला. त्याबरोबर कर्कश ओरडत मनीदेवींनी पाय झाडला. विंचू झाडीत फेकला गेला आणि मनीदेवी जमिनीवर पडल्या. बोकेश्वर त्यांच्या जवळ आले. त्यांनी मनीदेवींकडे पाहिलं तर त्यांच्या पंजाचा रंग बदलत होता. निळाई कमी होत होती. मनीदेवीला उठवत बोकेश्वर म्हणाले, “मनीदेवी, उठा. बघा, तुमचं विष उतरतंय. देव विंचवाच्या रूपाने आला आपल्या बाळाचं रक्षण करायला...”

मनीदेवीला आता त्राणच नव्हतं. कुठल्याही क्षणी बाळ बाहेर येणार होतं. त्यांनी एक आर्त किंकाळी दिली आणि मनीदेवींच्या शेपटीजवळ एक छोटंसं पिल्लू दोघांना दिसलं. मनीदेवींच्या किंकाळीने आकाशात घिरट्या घालत असलेल्या एका डोमकावळ्याचे लक्ष खाली गेलं. त्याने बोकेश्वर आणि मनीदेवीला पाहिलं पण तो पिल्लाला पाहू शकला नाही. ताबडतोब यवक्रीला वर्दी देण्यासाठी तो माघारी फिरला. खाली बोकेश्वर आणि मनीदेवीने समोरच्या पिल्लाला पाहिलं आणि त्यांना धक्का बसला. बेडकापेक्षाही लहान आकाराचं ते पिल्लू पाहून मनीदेवी म्हणाल्या, “महाराज, हे... काय... आपलं बाळ...” बोकेश्वर त्या पिल्लाकडे पाहत म्हणाले, “शेवटी त्या विषाने आपला परिणाम दाखवलाच. पण मनीदेवी देवाच्या कृपेने आपलं बाळ सुखरूप तर आहे...” मनीदेवी बाळाला दूध पाजू लागली आणि बोकेश्वर अन्नाच्या शोधात जंगलात गेले. त्यांनाही चालण्याचं जास्त त्राण नव्हतं पण मनीदेवीही उपाशी होत्या...

फिरता फिरता बोकेश्वरांना काही कावळे वटवागुळांसोबत हवेत फिरताना दिसले. त्यांनी कान टवकारले. जमिनीवरून कालीच्या काळ्या बोक्यांची सेना जवळ येताना त्यांना जाणवली. लगेचंच मागे जात ते मनीदेवीपर्यंत पोहोचले. त्यांना म्हणाले, “मनीदेवी, मला इथे धोका संभवतो आहे. तो काली किंवा त्याची सेना इथे कधीही पोहोचू शकते. आत्ताच आकाशात कावळे आणि वटवागूळ पाहिले मी. आपल्याला इथून निघायला हवं...” कशाबशा उठत मनीदेवी म्हणाल्या, “महाराज, आपण दोघंही जखमी आहोत. त्यांचा सामना आपण नाही करू शकणार. आपल्या बाळाच्या जिवाला जास्त धोका आहे. त्याची सुरक्षितता आधी पहायला हवी...” बोकेश्वरांना मनीदेवीचं म्हणणं पटलं. आजू-बाजूला पडलेली काही पानं उचलून बोकेश्वरांनी त्याचा द्रोण तयार केला. आपल्या झोपलेल्या पिल्लाला त्या द्रोणात अलगद ठेऊन एकदा डोळे भरून त्याला पाहून मनीदेवीने तो द्रोण बोकेश्वरांच्या स्वाधीन केला. बाजूलाच वाहत असलेल्या नदीत त्या द्रोणाला सोडत बोकेश्वर म्हणाले, “जा युवराज, सुखरूप रहा. आम्ही तुमची वाट पाहू...”

प्रवाहात वाहत तो द्रोण दिसेनासा झाला आणि साश्रू नयनांनी बोकेश्वर मागे फिरले. मनीदेवीजवळ ते पोहोचलेच होते की त्यांनी पाहिलं, काळ्या बोक्यांनी मनीदेवीला घेराव घातला होता आणि यवक्रीने त्यांना पकडून ठेवलं होतं. बोकेश्वर पुढे होणार इतक्यात डोमकावळ्यांनी आणि वटवागुळांनी मिळून त्यांना पकडलं. क्रूर हसत काली समोर आला. “हा...हा...हा... बोकेश्वर, पळून पळून जाशील कुठे... आणि हे काय, तुमचं बाळ... मार्जारपुराचा युवराज कुठे आहे...” यवक्री पुढे होत म्हणाला, “महाराज, तुमच्या जालीम विषापुढे त्याचा काय निभाव लागणार... संपला असेल की तो...” यवक्रीकडून बोकेश्वर आणि मनीदेवीकडे नजर वळवत काली म्हणाला, “युवराज संपला, हा राजा आणि ही राणी माझ्या कैदेत... आता मीच राजा. आता या मार्जारपुराचं कालीपूर करणार मी. महालात आरामात वास्तव्य करणार मी आणि तुम्ही दोघं, कोठडीत मरेपर्यंत खितपत जगत राहणार. हा...हा...हा...”

तिथे नदीतून वाहत तो द्रोण बराच लांब निघून गेला. पिल्लाला जाग आली. आजू-बाजूला आपली आई नाही आणि वर मागे-मागे सरकणारं आकाश पाहून ते पिल्लू घाबरलं. द्रोणातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागलं पण त्या गुळगुळीत हिरव्यागार पानावरून त्याचे पंजे सरकत होते. त्याला काय करावं सुचत नव्हतं. जिवाच्या आकांतानं, “म्या.....व म्या.....व...” करत त्याने साद घालायला सुरुवात केली. नदीच्या किनाऱ्यावर एक चिमणा व चिमणी कीटक वेचत होते. त्यांना अस्पष्ट आणि हळू असा म्यावा ऐकू आला. त्यांनी कान देऊन ऐकलं आणि नदीतून वाहत असलेल्या द्रोणाकडे त्यांचं लक्ष गेलं. लगेच उडत जाऊन दोघांनी आत डोकावून पाहिलं आणि ते इवलंसं पिल्लू त्यांच्या नजरेस पडलं. काही अंतरावर नदी डोंगरावरून खाली जात एका धबधब्यात परिवर्तीत होत होती. त्या धबधब्यात हा द्रोण अडकला तर हे पिल्लू जिवानिशी जाईल, हे चिमण्याला काळलं. त्या दोघांनी द्रोणाला चोचीच्या सहाय्याने द्रोणाला उचलत किनाऱ्यावर आणलं. चिमणी म्हणाली, “अहो, हे मांजराचं पिल्लू इथे कसं काय आलं असेल...” त्या पिल्लाकडे पाहत चिमणा म्हणाला, “बहुतेक या द्रोणात पडलं असेल आणि वाहत वाहत इथवर पोहोचलं असेल. पण हे इतकं छोटंसं कसं काय... आणि सारखं ओरडतंय का...” चिमणी म्हणाली, “अहो याला भूक लागली असेल. चला आपण याला गब्बू आजोबांकडे घेऊन जाऊ...”

गब्बू आजोबा म्हणजे त्या जंगलात राहणारं एक घुबड होतं. वयाने आणि अनुभवाने ते मोठं असल्याने सर्व प्राणी, पक्षी त्यांचा सल्ला घ्यायला यायचे. चिमणा-चिमणी त्या द्रोणाला गब्बू आजोबांकडे घेऊन आले. पोपट, कबुतर, खार, माकड असे बरेच पक्षी आणि प्राणी तिथे जमले. अखेर गब्बू आजोबा म्हणाले, “चिमण्या, हे पिल्लू जरी मांजराच्या जातीचं असलं तरी ते आपल्या आश्रयाला आलं आहे आणि चिमणे, तुझी पिल्लं त्या डोमकावळ्यांनी खाऊन टाकली ना. मग असं समज हेच तुझं पिल्लू आहे...” “हो, आणि त्याला दूध पाजायचं म्हणशील तर मी आहेच की...” बाजूच्याच फांदीवर बसलेल्या माकडीणीने गब्बू आजोबांना दुजोरा देत त्या पिल्लाला जवळ घेतलं आणि दूध पाजू लागली. गब्बू आजोबा म्हणाले, “काय रे, याचं नाव काय ठेवायचं...” चिमणी म्हणाली, “आजोबा, हा इवलासा आहे ना तर आपण याला टिल्लू म्हणू... चालेल...” टिल्लू हे नाव सर्वांना आवडलं. आणि सर्वांनी हसत होकार दिला. दूध पिऊन पुन्हा झोपलेल्या त्या पिल्लाला कुशीत घेत चिमणी म्हणाली, “माझा गोंडस टिल्लू गं तो...”

तिकडे मार्जारपुरात कालीने बोकेश्वर आणि मनीदेवी दोघांनाही कोठडीत डांबले. आपल्या दालनात येऊन त्याने सर्व सैनिकांना हुकुम सोडला आणि काही क्षणातच मार्जारपुराची प्रजा महालाबाहेर येऊन ठेपली. काली म्हणाला, “तुम्हा सर्वांना एक दु:खद बातमी द्यायची आहे. आपले महाराज बोकेश्वर आणि राणी मनीदेवी आपल्या युवराजांसहीत स्वर्गवासी झालेत. आणि आनंदाची बातमी अशी की आता मार्जारपुरावर मी राज्य करणार आहे. माझ्या या राज्याचं नाव कालीपूर असेल. कालीपूर आणि माझ्या राजा बनण्यावर जर कोणाचा आक्षेप असेल तर तो आधीच सांगावा जेणेकरून त्याला बोकेश्वराकडे पाठवता येईल... हा...हा...हा...” यवक्री बाजूलाच होता. लगेच ललकारी देत म्हणाला, “महाराज काली यांचा विजय असो...” त्या बरोबर सर्व वटवागुळांनी आणि काळ्या बोक्यांनी कालीच्या नावाचा जयजयकार केला. महाराज बोकेश्वर, मनीदेवी आणि युवराज गेल्याची बातमी ऐकून जनता शोकाकूल झाली. समोर जे वाढून ठेवलं आहे त्याचा स्वीकार करण्याशिवाय कोणालाच पर्याय नव्हता...

आपल्या नावाचा जयजयकार ऐकून आणि समोर असलेली भेदरलेली जनता पाहून काली मनोमन खूप खुश झाला. यवक्री म्हणाला, “महाराज, तुमचं स्वप्न खरं झालं. बोकेश्वर गेला, मनीदेवी गेली आणि तो युवराजही गेला. आता तुम्हाला आरामात राज्य करता येईल...” यवक्रीकडे पाहत काली म्हणाला, “बरोबर आहे यवक्री सगळं काही आपल्या मनासारखं झालं आहे, पण अजून एकाची भेट घ्यायची आहे आपल्याला...” इतकं बोलून कालीने टाळी वाजवली. काही क्षणात काही काळे बोके तिथे आले. काली म्हणाला, “आम्ही जंगलात त्या अस्वलेश्वरला भेटायला जात आहोत. ताबडतोब व्यवस्था करा...” थोड्याच वेळात तीन-चार काळे बोके, दोन-तीन वटवागुळं, यवक्री आणि काली असे सर्व अस्वलेश्वर ऋषींच्या मठात पोहोचले. गुरुजी ध्यानस्थ बसले होते. काली पुढे होत अस्वलेश्वर ऋषींना म्हणाला, “योग्या, तुझं भाकीत खोटं ठरवलं मी. सगळ्यांना दूर करून टाकलं... हा...हा...हा...”

इतकं बोलून कालीने आपल्या पंजांचा वार अस्वलेश्वर ऋषींवर केला. त्याबरोब्बर तीव्र पांढरा प्रकाश तिथे झाला. गुरुजी अचानक गायब झाले आणि त्याजागी अनेक गुलाबाची फुलं प्रकट झाली. सर्वजण किलकिल्या डोळ्यांनी इथे-तिथे पाहत असतानाच आकाशवाणी झाली, “काली... पापी, दुष्टबुद्धी, तुला वाटलं असेल की तुला आता कोणी हरवू शकणार नाही, कोणी मारू शकणार नाही. तू उन्मत्त झाला आहेस. पण तुझा कर्दनकाळ अजून जिवंत आहे. एक दिवस तूच त्याला इथे आणशील आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी तुझा मृत्यू होईल...” आकाशवाणी बंद झाली आणि गुलाबाची सगळी फुलं अचानक गायब झाली. सर्वत्र अंधार पसरला. अस्वलेश्वर ऋषींना मारू न शकलेल्या कालीचे डोळे रागाने लाल झाले होते. त्याच रागात त्याने झाडावर आपल्या पंजाने वार केला आणि तणतणत महालाकडे निघून गेला. कालीने ज्या झाडावर वार केला होता त्याची पानं हळू हळू सुकायला लागली. खोड काळं पडलं आणि काही क्षणातच ते झाड जमीनदोस्त झालं...

तिथून बरंच लांब असलेल्या जंगलात टिल्लू वाढू लागला. त्याचा दिवस एकदम छान जायचा. सकाळी चिमणीआईसोबत दाणे वेचणं, भूक लागली की माकडी मावशीकडे जाऊन दूध पिणं. गब्बू आजोबांकडून छान छान धडे घेणं. फुलपाखरू, ससुल्या, खारुताई, बेडूकदादा या सवंगड्यांसोबत मनसोक्त खेळणं. चिमणाबाबांच्या पाठीवर बसून आकाशाची सफर करणं, असे रोजचे उद्योग करत टिल्लू मोठा होऊ लागला. जसजसा टिल्लू मोठा होत होता तसतसं त्याचं शरीरही वाढत होतं. वयात आलेला हा टिल्लू आता चिमण्याहून थोडाच मोठा दिसत होता. आता त्याला पाठीवर बसवून आकाशात उडणं चिमण्याला जमेना. त्याने पोपटरावांना सांगितलं. मग काय विचारता, पोपटरावांच्या पाठीवर बसून टिल्लू आकाशात मुक्त विहार करी. सरसर सरसर झाडावर चढी. खारुताई आणि बेडूकदादासोबत शर्यत लावी. एकदा गरूडराज आकाशातून जात होते. इतका मोठा पक्षी टिल्लूने कधीच पाहिला नव्हता. त्याने चिमणीला विचारलं. तर ती म्हणाली, “टिल्लू, हा की नाही गरूड आहे. हा खूप उंचावर उडतो. कधी कधी तर ढगात गायब होऊन जातो...”

चिमणी बोलतच होती की गरूड समोरच्या झाडावर येऊन बसला. टिल्लू हळू हळू त्यांच्याजवळ जात म्हणाला, “गरूडकाका, मला तुमच्या पाठीवरून घेऊन चला ना. मला या ढगांच्या पलिकडे काय आहे ते बघायचं आहे...” गरूडाने एकवार टिल्लूकडे पाहिलं आणि म्हणाला, “कोण तू... दिसायला तर मांजर आहेस पण इतका लहान आकार...” टिल्लू खाली मान घालत म्हणाला, “माझं नाव टिल्लू. खरं आहे की मी एक बोका आहे. माझा आकार असा का ते माझ्या आई-बाबांनाही माहित नाही...” खाली मान घालून उभ्या असलेल्या टिल्लूकडे पाहून तो गरूड हलकेच हसला. त्याच्या जवळ येत गरूड म्हणाला, “टिल्लू, नाव तर खूप छान आहे. आणि तू सुद्धा गोड आहेस. चल, बस माझ्या पाठीवर...” गरूडकाकांना विनंती करून टिल्लूने खारूताई, बेडूकदादा व ससुल्यालाही त्यांच्या पाठीवर बसण्याची परवानगी मिळवली आणि गरुडाने आकाशात झेप घेतली. त्याच्या पाठीवर बसलेले टिल्लू आणि त्यांचे सवंगडी खूप खुश होते. टिल्लू इतक्या वर कधीच आला नव्हता. त्याचे सवंगडी तर कधी आकाशातही गेले नव्हते. दिसणाऱ्या सर्व गोष्टींचं सर्वांनाच अप्रूप होतं. गरूडकाकांच्या पाठीवर बसून आकाशात विहार करताना टिल्लूला दूरवर काळ्या रंगाचा एक मनोरा दिसला. तो मनोरा पाहून टिल्लूला खूप नवल वाटलं...

त्याने पंजाने गरूडाला हात लावत विचारलं, “गरूडकाका, ते लांब काळं-काळं काय दिसतंय...” गरूडाने टिल्लू दाखवत असलेल्या दिशेला पाहिलं आणि म्हणाला, “ते कालीपूर आहे. आणि तो ऊंच मनोरा दिसतोय ना, तो आहे कालीपूरमधील सर्वात ऊंच टेकडीवर असलेला महाराज कालीचा राजवाडा. आधी त्या राज्याचं नाव मार्जारपूर होतं. तिथल्या महाराज बोकेश्वर आणि मनीदेवीला त्या कालीने मारलं आणि राज्य बळकावलं...” बोलत असतानाच गरूडाने डोळे किलकिले केले आणि म्हणाला, “आपल्याला खाली जायला हवं. मला वाटतं त्या मनोऱ्यात उभा राहून काली बहुतेक याच दिशेला बघतोय...” इतकं बोलून गरूड परत फिरला. टिल्लूने एकदा मागे वळून पाहिलं. खारूताईने विचारलं, “काय झालं रे टिल्लू, असा का बघतो आहेस...??” टिल्लू म्हणाला, “काय माहित, पण ती जागा ओळखीची वाटते...” तिथे मनोऱ्यातून खरोखरंच काली त्याच्या दुर्बिणीतून सगळीकडे पाहत होता. परत फिरणारा गरूड त्याला दिसला. दुर्बीण खाली ठेवत कालीने टाळी वाजवली. दोन कावळे उडत खिडकीपर्यंत आले. गरूड उडाला त्या दिशेला पंजा दाखवत काली म्हणाला, “जा, तो गरूड जिथे गेला त्या दिशेला जा. त्या गरुडाच्या पाठीवर मी एक मांजर पाहिलं. काय प्रकार आहे ते मला येऊन काळवा...”

गरूड ज्या दिशेला गेला, कावळेही लगेच त्या दिशेने उडाले. एक कावळा नदीच्या या बाजूला शोधू लागला आणि दुसरा कावळा नदीच्या पलीकडे गेला. या बाजूला असलेल्या कावळ्याला दगड-धोंड्यांखेरीज काहीच सापडलं नाही पण नदीपलिकडे गेलेला कावळा जेव्हा एका झाडावर थोडा आराम करण्यासाठी बसला होता, तेव्हा त्याला खाली काही प्राणी खेळताना दिसले. त्यातल्या टिल्लूला पाहून तर तो कावळा चक्रावलाच. आकाराने पोपटापेक्षा थोडा लहान असलेल्या त्या मांजराला पाहून कावळ्याला नवल वाटलं. दिसायला लहान असूनही हुशारी आणि चपळाई यामध्ये त्याने सर्वांना मागे टाकल्याचं दिसत होतं. कावळा लगेच कालीपूरकडे उडाला. महालात जाऊन कालीला ही खबर देताच काली मनोमन म्हणाला, “अच्छा आकाराने लहान मांजर पण बुद्धी आणि चपलता मात्र.... ते मांजरतर माझ्या अदभूत संग्रहालयात यायला हवं...” दाराबाहेर पाहत काली ओरडला, “कोण आहे रे तिकडे...” लगोलग दोन काळे बोके धावत आले. काली म्हणाला, “दक्षिणेकडे नदीच्या पलिकडे जे वन आहे, तिथे जा. आकाराने लहान असणारं एक अदभूत मांजर आहे तिथे. त्याला घेऊन या. काही वटवागुळांना न्या सोबत...”

कालीच्या आज्ञेचं पालन करत दोन-तीन वटवागुळं आणि दोन-तीन बोके मोहिमेवर निघाले. येणाऱ्या या संकटाची खबर नसलेला टिल्लू त्याच्या सवंगड्यांसोबत खेळात गर्क होता. चिमणा-चिमणी, गब्बू आजोबा, माकडी मावशी आणि इतर वयस्कर प्राणी-पक्षी त्यांना खेळताना पाहून आनंदित होत होते. इतक्यात, “थांबा...” या आवाजाने सर्वजण थबकले. सर्वांनी आवाजाच्या दिशेने पाहिलं तर काही काळे बोके आणि वटवागुळं समोर उभी होती. त्यातला एक बोका म्हणाला, “तुमचे हे खेळ ताबडतोब बंद करा. या मांजराला आम्ही घेऊन जायला आलो आहोत. कालीपूरच्या काली महाराजांचा तसा हुकूम आहे...” हे ऐकून सर्वजण टिल्लूभोवती गोळा झाले. गब्बू आजोबा म्हणाले, “तुमच्या काली महाराजांना सांगा, आमचा टिल्लू काही खेळणं नाही कधीही घेऊन जायला...” एक बोका पुढे होत म्हणाला, “म्हाताऱ्या घुबडा, तुला काली महाराज काय चीज आहेत ते माहित नाही म्हणून असा बोलत आहेस... बऱ्याबोलाने मागे व्हा सगळे आणि ए टिल्लू, चल आमच्यासोबत. नाहीतर...”

त्या काळ्या बोक्याने जसा आवाज वाढवला तशी तिथे आलेली वटवागुळं आणि इतर बोके हल्ला करायला सज्ज झाले. या इतक्या मोठ्या बोक्यांपुढे आपले सवंगडी तग धरू शकणार नाहीत हे लक्षात येताच टिल्लू पुढे होत म्हणाला, “नाहीतर काय... उगाच आवाज चढवून बोलू नका. तुम्ही मला न्यायला आलात ना... मग या, आधी मला पकडून तर दाखवा की... जर पकडलंत तर मी स्वत: तुमच्यासोबत येईन...” टिल्लूच्या बोलण्यावर चवताळलेले बोके एकसाथ त्याच्यावर धाऊन गेले. तसा टिल्लू पटकन मागे सरकत झाडाच्या मागून पळाला. तो सरसर सरसर झाडावर चढला. बोके त्याच्या मागे होतेच. टिल्लू त्यांच्यापासून पळत एका अरुंद आणि सुकलेल्या फांदीवर गेला. ती फांदी इतकी लहान होती की बोक्यांना स्वत:ला सांभाळता येईना. बोके मागे जाणार इतक्यात फांदी तुटली आणि सगळे खाली पाण्यात पडले...

टिल्लूने मात्र लगेच उडी मारून दुसरी फांदी गाठली. आपले पंजे एकमेकांवर आपटत तो हसू लागला. हे पाहून वटवागुळं लगेच हवेत उडाली आणि टिल्लूच्या दिशेने येऊ लागली. त्यांना पाहून कबुतरं मदतीला येणार इतक्यात टिल्लूने पंजा दाखवत त्यांना थांबवलं. टिल्लू जिथे उभा होता त्या फांदीला लागून एक वेल वरच्या बाजूला गेला होता आणि वरच्या एका फांदीला वेटोळे घालून बसला होता. टिल्लूने दातांनी तो वेल ओढला. तशी ती फांदीही ओढली गेली. ती वटवागुळं जशी टप्प्यात आली तसा टिल्लूने वेल सोडला. ओढली गेलेली फांदी पुन्हा सरळ झाली पण सरळ होताना येणाऱ्या वटवागुळांना फटके मारत गेली. वटवागुळं झाडांवर आदळून खाली पडली. पाण्यातून बाहेर आलेल्या बोकांचा माकडी मावशी आणि माकडोबा मामाने समाचार घेतला तर त्या वटवागुळांवर कबुतरं तुटून पडली. त्यांना तिथे थांबणं अशक्य वाटू लागलं आणि सर्व बोके व वटवागुळं आल्या दिशेला निघून गेली. मिळालेल्या विजयाचा सर्वजण आनंद साजरा करत असताना गब्बू आजोबा म्हणाले, “ते बोके आणि ती वटवागुळं आज जरी निघून गेली असली तरी संकट अजून टळलेलं नाही. तो काली महादुष्ट आहे. तो असा गप्प नाही बसणार. आपल्याला सावध रहायला हवं...”

गब्बू आजोबांच्या बोलण्याने सर्व धास्तावले खरे पण टिल्लूची हुशारी व चपळाई पाहून सर्व आनंदीतही होते. दिवस जसे पुढे जात होते तसा टिल्लू मोठा होत होता. आता तर टिल्लू चांगलाच मोठा झाला होता, पण आकारानेमात्र एखाद्या पोपटाइतकाच होता. एक दिवस नदी किनारी पाणी पीत असताना टिल्लूला वटवागुळांचा चित्कार ऐकू आला. त्याच्या पाठून हलक्या आवाजातला म्यावाही त्याने ऐकला. टिल्लूने वर पाहिलं तर दोन-तीन वटवागुळं एका पांढऱ्याशुभ्र मांजरीचा पाठलाग करत होते. मधूनच तिला पंजांनी मारत होते. नदीच्या या बाजूला असलेल्या टिल्लूला तिची मदत कशी करावी तेच कळत नव्हतं. त्याने आजूबाजूला पाहिलं. एका मोठ्या खडकाला एक लाकडाचं फळकूट टेकून उभं होतं आणि त्याचा नदीच्या बाजूचा भाग हवेत होता. टिल्लूला एक युक्ती सुचली. त्याने काही दगड तोंडात पकडून फळकुटावर ठेवले. मग थोडा मागे जाऊन जोरात धावत येऊन स्वत: त्यावर चढला आणि नदीच्या दिशेने उडी मारली...

त्यासरशी नदीकडचा फळकुटाचा भाग खाली गेला आणि खाली असलेला दगड ठेवलेला भाग वर उचलला गेला. दगड हवेत भिरकावले गेले आणि समोर असलेल्या वटवागुळांवर आदळले. वटवागुळं सैरभैर झाली आणि पळून गेली. ती गेलेली पाहून सुटकेचा निश्वास सोडत ती मांजर आपल्या जखमा चाटत तिथेच बसली. टिल्लू तिच्या जवळ आला. त्या मांजरीने टिल्लूला पाहत डोळे मिचकावले. ते निळेशार डोळे पाहून टिल्लू मनोमन सुखावला. ती मांजरी म्हणाली, “तू दगड मारून मला वाचवलंस ना. मी तुझी खूप आभारी आहे. नाहीतर आज त्या वटवागुळांनी मला फाडूनच खाल्लं असतं. तो कोण आहेस... आणि... इतका लहान कसा काय...” टिल्लू थोडा खजील झाला. म्हणाला, “माझं नाव टिल्लू. मी असा का ते मलाही माहित नाही खरंतर. सगळे म्हणतात मी लहानपणापासून असा आहे. बरं ते जाऊ दे... तू कोण आहेस आणि इथे कशी...???” कशीबशी उठत ती मांजरी म्हणाली, “मी मीनू. आईसोबत या जंगलाच्या पलिकडच्या गावात राहत होते. एकदा गावात दुष्काळ पडला. तिथे खाण्यापिण्याचीही व्यवस्था होईना. त्यातच तहान-भुकेने व्याकूळ माझी आई गेली. ज्यांच्या घरी आम्ही राहत होतो तिथेही लहान मुलं होती. आता माझा मालक मला खायला देईल की त्याचं पोट भरेल... मग मीच ते घर सोडलं...

या जंगलात आले. इथे असणारे छोटे पक्षी, किडे खाऊन, पाणी पिऊन दिवस घालवत होते. आज मी एक पक्षी मारून खात बसले होते तेव्हा काही वटवागुळं तिथे आली. मला पाहून माझ्यावर हल्ला केला. एखाद-दुसरं असतं तरी ते काही माझ्या पंजांच्या तावडीतून सुटलं नसतं. पण ते संख्येने जास्त होते. माझा काय निभाव लागणार होता... मी पळाले आणि ती वटवागुळं माझ्या मागे लागली. पुढचं सगळं तर तुझ्यासमोरच घडलं...” मीनू गप्प झाली. टिल्लू त्याचा पंजा मीनूच्या खांद्यावर ठेवत म्हणाला, “काळजी करू नकोस मीनू. ती वटवागुळं गेलीत आता. आणि राहण्याचं म्हणशील, तर तू चल माझ्यासोबत. नदीच्या त्या बाजूला मी माझ्या आई-बाबांसोबत राहतो. तूही तिथेच रहा...” मीनू खुश झाली आणि टिल्लूसोबत चालू लागली. दोघंही चालत चालत गब्बू आजोबांकडे पोहोचले. टिल्लूने गब्बू आजोबांना व तिथे जमलेल्या माकडी मावशी, चिमणी आई, चिमणा बाबा आणि त्याच्या सवंगड्यांना घडलेलं सगळं सांगितलं. गब्बू आजोबा म्हणाले, “मीनू, तू काही काळजी करू नकोस. तू इथेच रहा आम्हा सगळ्यांसोबत...” चिमणी आई त्यांना दुजोरा देत म्हणाली, “मीनू, जसा माझा टिल्लू तशीच तू आहेस हो... आता तुला काही काळजी करायची गरज नाही हो...”

मीनू मनोमन सुखावली. एक नवीन जग, एक नवीन घर मिळालं होतं तिला. टिल्लू आणि त्याच्या सवंगड्यांसोबत, त्याच्या परिवारासोबत मीनू तिथे मजेत राहू लागली. टिल्लूही त्याचा जास्त वेळ आता मीनूसोबत घालवू लागला. दोघंच जणं लांब लांब फिरायला जायची, मासे व उंदीर पकडायची. बेडूकदादा, खारुताई व ससोबाला जाणवू लागलं की टिल्लू आता त्यांच्यासोबत जास्तवेळ खेळत नाही. त्यांनी चिमणा बाबांकडे विचारणा केली तेव्हा ते म्हणाले, "अरे, टिल्लू जरी आपल्यात मोठा झाला असला तरी तो एक बोका आहे. त्याच्या जोडीचा, त्याच्याचसारखा दिसणारा एखादा सवंगडी त्याला मिळाला तर तो लांब जाणारच... तुम्ही काळजी नका करू..." तिथे टिल्लूला मनोमन मीनू आवडू लागली होती. आपल्या सवंगड्यांना भेटून टिल्लूने त्याच्या मनातली गोष्ट सांगितली. "मीनूला सर्व मनातलं सांगून टाक..." असा सल्ला त्यांनी टिल्लूला दिला...

टिल्लू मीनूला शोधू लागला. मीनू नदी किनारी असल्याचं पोपटरावांनी टिल्लूला सांगितलं. टिल्लू धावतच तिथे पोहोचला. पाण्याकडे एकटक पाहत मीनू उदास चेहऱ्याने बसली होती. टिल्लू तिथे कधी आला ते तिला कळलंच नाही. "काय झालं मीनू, अशी का बसली आहेस..." मीनूजवळ बसत टिल्लू म्हणाला. त्याच्याकडे पाहत मीनू म्हणाली, "विचार करते आहे मी. टिल्लू, तुला काहीतरी सांगायचं आहे. पण धीरच होतं नाही..." मीनूच्या खांद्यावर पंजा ठेवत टिल्लू म्हणाला, "मीनू, आज मलाही तुला काही सांगायचं आहे. आपण इतके दिवस एकत्र खेळलो-बागडलो की आता मला तुझी सवय झाली आहे. तू मला मनापासून आवडायला लागली आहेस मीनू..." टिल्लूकडे पाहत मीनूने टिल्लूचा पंजा आपल्या खांद्यापासून दूर केला. आपली नजर खाली करत म्हणाली, "तुझ्या मनातल्या भावना मला समजत आहेत टिल्लू. पण ते शक्य नाही..."

पहिला भाग समाप्त.

No comments:

Post a Comment