Saturday, June 22, 2019

टिल्लू - भाग २...



मीनूच्या उत्तराने वरमलेला टिल्लू हलक्या आवाजात म्हणाला, "का गं मीनू, काय झालं. माझं काही चुकलं का... का मी दिसायला..." टिल्लूला मध्येच तोडत मीनू म्हणाली, "नाही टिल्लू, तसं नाही. तुझ्या दिसण्यामुळे नाही रे... खरंतर मीच लायक नाही तुझ्यासाठी. मी तुला फ........" मीनू बोलायची थांबली आणि मागे सरकत, "नाही टिल्लू, मी तुला सांगू शकत नाही. आता मला इथे राहता येणार नाही..." इतकं बोलून मीनूने पळायला सुरुवात केली. टिल्लूला मीनूचं हे वागणं खटकलं. तो तसाच तिला जाताना पाहू लागला. मीनूने नदी पार केली आणि पुढे जाऊ लागली. इतक्यात काही वटवागुळांनी तिच्यावर हल्ला केला आणि आपल्या तीक्ष्ण पंजात तिला पकून वरवर नेऊ लागले. मीनूच्या उत्तराने सुन्न झालेला टिल्लू, तिचा म्यावा ऐकून भानावर आला. त्याने वर पाहिलं तर चार वटवागुळं मीनूला पकडून हवेत उडत जात होती...

"मीनूऽऽऽऽऽ..." असं ओरडत टिल्लू त्या दिशेला धावू लागला. वटवागूळं झाडांच्या वर जाऊ लागली तसा टिल्लूही झाडावर चढला. एका फांदीवरून दुसरीवर उद्या मारत टिल्लू मिनूला वाचवण्यासाठी पळत होता. एक फांदी तुटली आणि टिल्लू झाडावरून खाली पडला तो थेट जमिनीवर. पुन्हा एकदा "मीनूऽऽऽऽऽ..." असा म्यावा टिल्लूने केला आणि ती वटवागूळं मीनुला घेऊन डोंगरापलिकडे दिसेनाशी झाली. टिल्लू कसाबसा गब्बू आजोबा राहत होते त्या झाडाखाली पोहोचला. दिवसभराचं काम उरकून सगळे तिथे गप्पा मारायला जमले होते. टिल्लूला उदास पाहून चिमणी आईने त्याला विचारलंच, “काय झालं रे टिल्लू, असा उदास का आहेस... आणि आपली मीनू कुठे आहे...” चिमणी आईच्या पंखाआड जाऊन टिल्लू रडू लागला. चिमणा बाबा त्याला थांबवणार तोच गब्बू आजोबा म्हणाले, “रडू दे त्याला. मन हलकं झालं की आपसूक थांबेल...” आणि तेच झालं. काही क्षण रडून झाल्यावर टिल्लूने त्याच्या पंजांनी डोळे पुसले आणि नदीकाठी घडलेली सर्व घटना सर्वांना सांगितली...

हे ऐकून सर्व सुन्न झाले. टिल्लू पुढे म्हणाला, “गब्बू आजोबा, मला मीनूला शोधायला जायचं आहे. आई, बाबा, मला मीनू खूप आवडते. माझ्यासमोर ती वटवागूळं मीनूला घेऊन गेली आणि मी काहीच करू शकलो नाही. आता ती संकटात असताना मी तिला वाचवायला जायला हवं. चिमणी आई चटकन म्हणाली, “नाही नाही. मी टिल्लूला कुठेच जाऊ द्यायची नाही. मीनूसुद्धा आपलीच आहे. तिच्याबद्दल मला वाईटच वाटतंय. पण तिला मदत करताना माझ्या टिल्लूला काही झालं तर... नाही नाही... मी नाही जाऊ देणार त्याला...” चिमणा तिला समजावत म्हणाला, “चिमणे, अगं आपला टिल्लू आता मोठा झाला आहे. स्वत:ला आणि मीनूला वाचवताना त्याने कशी हुशारी दाखवली ठाऊक आहे ना...” काही केल्या चिमणी आई ऐकत नव्हती. शेवटी टिल्लू म्हणाला, “आई, तुझी काळजी मला समजते. मी स्वत:ची काळजी घेईन. मला जाऊ दे...” शेवटी चिमणी आई तयार झाली. माकडी मावशी म्हणाली, “अरे पण टिल्लू, तू मीनूला शोधणार तरी कुठे...” “काऽऽऽऽऽव... काऽऽऽऽऽव...” या कर्कश आवाजाने सर्वांचं लक्ष त्या दिशेला गेलं...

झाडावर एक डोमकावळा बसला होता. सर्वांचं लक्ष आपल्याकडे आहे हे पाहून तो खाली आला. म्हणाला, “मी सांगतो तुम्हाला मीनू कुठे आहे ते... ती कालीपूरमध्ये आहे. महाराज कालीने तिला कैद करून ठेवलं आहे आणि उद्या तो तिला मारून टाकेल. कारण त्याला तिच्या कातड्याचा अंगरखा शिवायचा आहे...” हे ऐकून सर्वजण घाबरले. गब्बू आजोबा पुढे होत म्हणाले, “पण हे सगळं तुला कसं काय माहित...” तो डोमकावळा त्याची चोच खाली करत म्हणाला, “मीही कालीच्या सेनेत होतो...” हे ऐकताच टिल्लूचे सवंगडी लगेच म्हणाले, “याच्यावर विश्वास नका ठेऊ कोणी... कोणास ठाऊक हा खोटं बोलत असेल...” टिल्लू त्या डोमकावळ्याजवळ जात म्हणाला, “तू जर त्या कालीच्या सेनेत होतास तर आम्हाला मीनूबद्दल का कळवलंस... आणि मीनू इथे राहत होती हे तुला कसं माहित...” तो डोमकावळा म्हणाला, “बरोबर आहे तुम्हा सर्वांचं. मी कालीच्या सेनेत होतो. पण तो काली पक्का स्वार्थी निघाला. आपलं पोट भरण्यासाठी त्याने माझ्याच पिल्लांचा फडशा पाडला. माझी पिल्लं तर नाहीत, निदान मीनू तरी वाचावी असं मला वाटतं. आणि मीनूवर नजर ठेवण्याचं काम माझ्याकडेच होतं. या जंगलात तुमच्यासोबत राहताना मी तिला पाहिलं होतं. नदीकाठी मीनू एकटीच बसल्याची वार्ताही मीच कालीच्या वटवागुळांना दिली होती...”

तो डोमकावळा गप्प झाला. सर्वांना त्याच्याबद्दल संताप होता. पण त्याच्या पिल्लांबद्दल वाईटही वाटत होतं. टिल्लू, चिमणी आई आणि चिमणा बाबांकडे वळत म्हणाला, “आई, बाबा ऐकलंत ना... आपली मीनू संकटात आहे. मी लगेच निघतो तिला सोडवायला...” त्याच्या मागून येणाऱ्या त्याच्या सवंगड्यांना थांबवत टिल्लू म्हणाला, “आणि माझ्यासोबत कोणीही येणार नाही. नदीकाठी मीनूला मी वाचवू शकलो नाही. माझ्याचमुळे मीनू त्या वटवागुळांच्या तावडीत सापडली. आता मीच तिला सोडवून आणणार. कावळेदादा, मला तुझ्या पाठीवरून नेशील का कालीपुरात...” तो डोमकावळा लगेच तयार झाला. गब्बू आजोबा, माकडी मावशी, चिमणी आई आणि चिमणा बाबांचे आशीर्वाद घेऊन सर्वांना टाटा करत टिल्लू डोमकावळ्याच्या पाठीवर बसला. डोमकावळा आकाशात उडाला आणि काही क्षणातच नदीच्या दिशेने नाहीसा झाला. चिमणी आईने डोळे पुसले. माकडी मावशी तिला जवळ घेत म्हणाली, “काळजी करू नकोस चिमणे, आपला टिल्लू सुखरूप असेल हो...”

इकडे तो डोमकावळा जसा कालीपुराजवळ आला तसा त्याने उडण्याचा वेग कमी केला. हळू हळू खाली येत म्हणाला, “टिल्लू हे बघ कालीपूर. मीनूला नक्की कुठे कैद केलं आहे ते नाही माहित. मी तुला वेशीवर सोडतो. उगाच तुला कोणी माझ्यासोबत पाहिलं तय माझ्या कावळीचेही प्राण संकटात येतील...” टिल्लूने मानेनेच होकार दिला. कालीपूरच्या वेशीबाहेर त्या डोमकावळ्याने टिल्लूला उतरवलं. महालापर्यंत जाण्याचा मार्गही त्याला सांगितला आणि लगेच तिथून उडून गेला. सर्वांच्या नजरा चुकवत टिल्लू पुढे पुढे जाऊ लागला. ती घरं, ते रस्ते, यांबद्दल टिल्लूच्या मनात वेगळीच भावना निर्माण झाली. तो विचार करू लागला, “हे सर्व ओळखीचं का वाटतंय... मी कधी इथे आलो होतो का... असं का वाटतंय की मी इथलाच आहे...” विचार करत करत टिल्लू चालत असताना अचानक कुठूनतरी काही वटवागुळं त्याच्यावर धाऊन आली. अकस्मात झालेल्या हल्ल्याने टिल्लू गडबडला आणि वटवागुळांनी त्याला पकडलं. टिल्लू काही करण्याच्या आत वटवागुळं हवेत उडती झाली आणि महालाच्या दिशेने जाऊ लागली. काळे मनोरे, काळ्या खडकातून तयार झालेल्या भिंती, हे सर्व पाहून टिल्लू विचार करू लागला, “हे सगळं असंच होतं का... बहुतेक हे सगळंच वेगळं होतं. का मला सारखं वाटतंय, की मी इथलाच आहे...” वटवागुळांनी टिल्लूला जमिनीवर फेकलं आणि त्याची विचारमालिका खंडित झाली. टिल्लू महालात सर्वत्र नजर फिरवतच होता की, “हा...हा...हा... ये टिल्लू... आलास...” या आवाजाने तो चपापला...

टिल्लूने आवाजाच्या दिशेने पाहिलं तर तांबड्या डोळ्यांचा, काळा अंगरखा घातलेला, काळा मुकुट परिधान केलेला एक काळा-करडा बोका समोरून चालत येत होता. त्याला पाहताच टिल्लूने आपली नखं बाहेर काढली. वटवागुळं आणि इतर काळ्या बोक्यांनी लगेच टिल्लूला धरलं आणि पिंजऱ्यात डांबलं. पिंजऱ्याजवळ येत काली म्हणाला, “टिल्लू, तुला माहित आहे मी कोण ते... मी आहे काली. या कालीपूरचा राजा. आणि तू, माझ्या अनोख्या संग्रहालयातील एक वस्तू. अरे आकाराने इतका लहान तरीही इतका चपळ आणि हुशार बोका पाहिला नव्हता कोणी आजवर. माझ्या कावळ्यांनी नदीच्या पलिकडे तुला पाहिलं आणि लगेच मला वर्दी दिली. मी पाठवलेल्या बोक्यांना आणि वटवागुळांना तू पळवून लावलंस...” “पुढचं मी सांगू का महाराज...” कालीला मध्येच तोडत यवक्री म्हणाला. कालीची आज्ञा मिळताच तो पुढे बोलू लागला, “टिल्लू, मी यवक्री. महाराज कालीचा उजवा हात. महाराज तर सैन्य पाठवणार होते तुला आणायला. पण मीच म्हणालो त्यांना, की इतक्या लहान कामासाठी सैन्य कशाला... मोहिनीअस्त्राचा वापार करावा... आमचं मोहिनी अस्त्र पहायचं आहे तुला... ते बघ...”

यवक्रीने दाखवलेल्या दिशेला टिल्लूने पाहिलं तर बेड्यात जखडलेली मीनू त्याला दिसली. “मीनू...” असं ओरडत टिल्लू बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागला पण पिंजरा चांगलाच मजबूत होता. काली पुढे म्हणाला, “या मीनूवर किती काळ डोळा होता माझा. हिला माझी राणी करून घेण्याचा विचार होता माझा. पण ही मस्तवाल मांजरी... मग तिच्या वडिलांना मी कैद केलं आणि त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. तेव्हा मीनू लग्नाला तयार झाली. पण त्याआधीच तू पळवून लावलेले माझे बोके आणि वटवागुळं परत आली...” कालीला दुजोरा देत यवक्री म्हणाला, “आणि त्यानंतर याच मोहिनीअस्त्राचा वापर करायचं आम्ही ठरवलं. तुझ्यासमोर माझ्या काही वटवागुळांनी मीनूवर हल्ला केला. तू तिला वाचवलंस आणि तिच्या मायाजाळात अडकलास. काल नदीकाठी माझ्या वटवागुळांनी मीनूला पळवलं नाही, तर तुला इथे येण्यासाठी प्रवृत्त केलं. आणि, तू इथे कसा आलास माहित आहे... ए कावळ्या... ये की आता बाहेर...” हे ऐकताच मगाचचा डोमकावळा बाहेर आला...

“काली महाराजांचा विजय असो...” हे शब्द ऐकताच टिल्लूने त्या दिशेला पाहिलं तर त्याला पाठीवरून इथवर घेऊन येणारा डोमकावळाच त्याच्यासमोर उभा होता. तो पुढे म्हणाला, “महाराज, तुम्ही आणि यवक्रीने सांगितलं तितका हा टिल्लू काही हुशार नाही... अहो मी मारलेल्या थापेवर चटकन विश्वास ठेवला की त्याने. अगदीच मूर्ख निघाला हो हा टिल्लू... हा...हा...हा...” सर्वजण हसू लागले. टिल्लूने मीनूकडे पाहिलं तशी मीनू म्हणाली, “टिल्लू, माफ कर रे मला. तुला दुखवायचा हेतू नव्हता पण या दुष्टाने माझ्या वडिलांना पकडून ठेवलं आणि मी... नदीकाठी तुला हे सांगावं की नाही याचाच विचार करत होते रे मी...” मीनूचा गळा आपल्या पंजांनी आवळत कालीने तिला गप्प केलं. टिल्लूकडे पाहून म्हणाला, “ मीनू, तुझा बाप वरच्या बुरुजावरून खाली पडून कधीच मेला. या टिल्लूला वाचवायला तुला माझ्याशी लग्न करावंच लागेल. टिल्लू, आता आजची रात्र आराम कर या पिंजऱ्यात. उद्या सकाळी लांडगेभाऊ, तरसबुआ, कोल्होबा, गिधाडराज या इतर राज्यांच्या राजांसमोर आणि माझ्या मित्रांसमोर तुझ्यासह माझं अनोखं संग्रहालय पेश करेन आणि मग दिमाखात या मीनूशी विवाह करेन. आणि हो, उद्याच आम्ही सर्व मित्र मिळून सर्व जंगलं काबीज करण्यासाठी सैन्य पाठवू. मग ना तुझे ते सवंगडी राहतील आणि ना इतर कोणी प्राणी. सर्व जंगलांवर आमचंच राज्य असेल... हा...हा...हा... घेऊन जा रे याला आणि पिंजऱ्यासह कालकोठडीत डांबा...”

हे सर्व ऐकून टिल्लूचा राग मस्तकात जाऊ लागला. त्याच्या पंजांमधून धूर यायला लागला. तो पिंजऱ्यातून बाहेर पडण्याची धडपड करू लागला. पण त्याला ते शक्य होत नव्हतं. पिंजरा कालकोठडीत ठेवला गेला. बाहेर पडण्यासाठी टिल्लूची धडपड सुरूच होती. “कोण... कोण आहे इथे... कालीचा नवा कैदी का...” या आवाजाने टिल्लूचं लक्ष विचलित झालं. त्याच्या पंजांमधून निघणारा धूर बंद झाला. टिल्लूने कान वळवले. आवाज आला त्या दिशेला टिल्लू जाऊ लागला. त्या कालकोठडीत अंधाराशिवाय दुसरं काहीच नव्हतं पण झारोख्यांमधून चंद्राच्या शीतल प्रकाशाचे छोटे छोटे कवडसे मात्र पडत होते. त्या प्रकाशात टिल्लूने पाहिलं, की एक म्हातारा बोका समोर साखळदंडांमध्ये जखडून उभा आहे आणि बाजूलाच तशाच साखळदंडांमध्ये जखडलेली एक म्हातारी मांजर बसली आहे. टिल्लूने स्वत:ची ओळख करून दिली आणि विचारलं, ”तुम्ही कोण आहात... आणि इथे या अवस्थेत कसे काय...” टिल्लू हा प्रश्न विचारात असतानाच त्या म्हाताऱ्या बोक्याचं लक्ष टिल्लूच्या कपाळाकडे गेलं. आपले मिचमिचे डोळे अजून उघडत त्याने टिल्लूच्या कपाळावरचं निशाण पाहिलं आनंदाने किंचाळलाच, “युवराज... आमचा युवराज... हे निशाण, हा आकार... मनीदेवी... मनीदेवी, उठा... पहा. आपला युवराज आला...”

हे ऐकून ती म्हातारी मांजरही उठून उभी राहिली. सळ्यांजवळ येत म्हणाली, “हो महाराज, आपला युवराजच... तेच निशाण, आणि विषामुळे लहान राहिलेला आकार...” टिल्लूला काहीच कळत नव्हतं. प्रश्नार्थक नजरेने समोर पाहत टिल्लूने विचारलं, “कोण युवराज... कोण मनीदेवी... काय बोलता आहात तुम्ही...” आपले साखळदंडातले पंजे कसेबसे टिल्लूच्या कपाळावर नेत तो म्हातारा बोका म्हणाला, “टिल्लू, मी बोकेश्वर आणि या मनीदेवी आणि तू आमचा युवराज. तुझ्या कपाळावर असलेलं हे चिन्ह त्याचा पुरावा आहे. तू खूपच लहान होतास जेव्हा मी तुला नदीत सोडून दिलं होतं...” मग बोकेश्वरांनी व मनीदेवीने सगळी हकीगत टिल्लूला सांगितली. टिल्लूच्या डोळ्यात पाणी तरारलं. सळ्यांजवळ येत तो म्हणाला, “म्हणजे... तुम्ही माझे आई-बाबा आहात...” दोघांनी मानेनेच होकार दिला. हळू हळू आनंदाची जागा क्रोधाने घेतली. टिल्लू म्हणाला, “आणि हा दुष्ट काली माझा मामा आहे तर... त्याच्याचमुळे आपल्यासर्वांची ही दशा झाली... सकाळी तो आणि त्याची मित्रराष्ट्र सर्व जंगलांवर हल्ला करण्याचा मनसूबा आखत आहेत... मी हे होऊ देणार नाही...”

टिल्लूच्या हातून पुन्हा धूर येऊ लागला. त्याचे डोळे लालेलाल झाले. कालीवरच्या रागाने त्याने पिंजऱ्याची लोखंडी सळई घट्ट पकडली. काही क्षणातच टिल्लूच्या पंजांनी आग पकडली आणि ती सळई वितळू लागली. टिल्लूने क्षणार्धात आपला पंजा मागे घेतला. त्याचं लक्ष विचलित झालं आणि पंजांवर असलेली आग व धूर नाहीसे झाले. टिल्लूला जळजळू लागलं आणि तो पंजे चाटू लागला. कालकोठडीच्या एका रक्षक बोक्याने सर्व ऐकलं. त्याला टिल्लू, बोकेश्वर आणि मनीदेवीच्या नात्याची कल्पना आली आणि तो लगेच कालीला ही खबर देण्यासाठी निघाला. काली त्याच्या कक्षात उभा राहून बाहेरचं जग पाहत असताना अचानक ढगांचा गडगडाट होऊन एक आवाज कालीच्या कानावर पडला, कालीने आकाशात पाहिलं तर ढगांमध्ये त्याला अस्वलेश्वर गुरुजींचा चेहरा दिसला. ते हसत म्हणाले, “तो दिवस आला आहे काली... तुझा कर्दनकाळ उद्या तुझा अंत करेल...” गडगडाट थांबला. अस्वलेश्वर गुरुजींचा चेहराही नाहीसा झाला आणि कालकोठडीचा रक्षक बोका समोर येत म्हणाला, “महाराजांचा विजय असो... महाराज, आपण संध्याकाळी पकडलेला तो छोटा बोका साधा नाही. त्या बोकेश्वर आणि मनीदेवीचा पुत्र आणि राज्याचा युवराज आहे...”

काली हे ऐकतच होता की यवक्री दालनात येत म्हणाला, “महाराज, वाईट बातमी... त्या मीनूचा बाप मंगू, निसटला आपल्या तावडीतून...” काही क्षण शांततेत गेले आणि काली म्हणाला, “निसटला... जाऊ देत उद्याच्या आनंददायी सोहळ्यासाठी ही चूक आम्ही माफ करतो. तो मंगू अर्धमेलाच झालाय. जाऊन जाऊन जाईल कुठे... मरेलच थोड्या वेळात. त्याला मारण्याचे माझे कष्ट तरी वाचले. आणि यवक्री, तो टिल्लू म्हणजे युवराज आहे बरं का कधीकाळच्या मार्जारपूरचा... उद्या माझ्या सर्व शत्रूंना एकत्रच संपवतो. पुत्रासमोर त्याच्या माता-पित्याची हत्या आणि प्रजेसमोर त्यांच्या युवराजांची हत्या... काय दृश्य असेल ना... हा...हा...हा...” काली हसत असताना यवक्री म्हणाला, “महाराज, ते सर्व ठीक, पण बोकेश्वर, मनीदेवी आणि युवराजला पाहून प्रजेने विद्रोह केला तर... आपला डाव आपल्यावरच उलटायचा...” यवक्रीकडे शांत नजरेने पाहत काली म्हणाला, “तसं काही होणार नाही यवक्री. आणि झालंच तर... चाल माझ्यासोबत...” बोलता बोलता काली थांबला आणि यवक्रीला घेऊन तळघरात गेला. त्याने एक छोटं दार उघडलं आणि आत प्रवेश केला. यवक्री त्याच्या मागोमाग होताच. काली म्हणाला, “यवक्री, जर तू म्हणतोस तसं उद्या काही आपल्या विरोधात गेलंच तर हा आपली मदत करेल...” कालीने पंजा दाखवलेल्या दिशेला यवक्रीने पाहिलं आणि भीतीने त्याचे डोळे उघडेच राहिले...

समोर संपूर्ण दगडाचा आणि पर्वताएवढा मोठा किडा बसला होता. त्याचे डोळे बंद होते आणि त्याच्या डोळ्यांच्या मधोमध एक खाच होती. त्या किड्याच्या बाजूलाच एक चमकणारा लाल मणी ठेवला होता. यवक्रीच्या खांद्यावर हात ठेवत काली म्हणाला, “यवक्री, उद्याच्या सोहळ्यात जर काही विघ्न आलंच, तर हा मणी त्या खाचेत घालून या राक्षसी किड्याला जागृत करू. मग हा किडा त्याच्या वाटेत येणाऱ्या सर्वांचा चेंदामेंदा करेल. जोपर्यंत हा मणी त्याच्या कपाळावर असेल तोपर्यंत याला कोणी थांबवू शकणार नाही. तो मणी तुटताच हा किडा नष्ट होईल... तो एवढासा टिल्लू काय वाकडं करू शकणार आपलं... या राक्षसाच्या आणि माझ्या मित्रराष्ट्रांच्या मदतीने मी या जगावरच्या सगळ्या जंगलांवर राज्य करेन. हा...हा...हा...”

तिकडे कालीपूरपासून लांब, नदीपलिकडच्या जंगलात चिमणा-चिमणी, माकडी मावशी, गब्बू आजोबा आणि टिल्लूचे सवंगडी, असे सर्व टिल्लूच्या चिंतेत असतानाच, “म्या.... म्या....व.... म्या...” असा कहणण्याचा आवाज आला. सर्वजण आवाजाच्या दिशेला गेले तर एक जखमी बोका झाडाच्या खाली आला होता. सर्वांगाने रक्तबंबाळ झालेल्या त्या बोक्याला माकडी मावशीने झाडाला टेकवून बसवलं. गब्बू आजोबांनी जवळ जात त्याची विचारणा केली तेव्हा तो म्हणाला, “मी मंगू. त्या दुष्ट कालीला माझ्या मुलीशी, मीनूशी लग्न करायचं होतं. तिने नकार दिला. म्हणून त्याने मला कैद केलं आणि मीनूवर लग्नासाठी दबाव आणला. मीनूने त्याच्याशी लग्न करू नये म्हणून मी तिथून पळालो. त्या कालीचे काळे बोके आणि वटवागुळं माझ्या मागे लागली. मला चावलं, ओरबाडलं. पण मी तसाच पळत राहिलो आणि कसाबसा इथवर पोहोचलो. माझ्या... मी...नूला... वा...चवा हो...” बोलत असतानाच मंगूने डोळे मिटले. गब्बू आजोबांनी मंगूचा पंजा धरला आणि सर्वांकडे पाहत म्हणाले, “हा तर मेला. बहुतेक जखमा आणि थकव्यामुळे याने प्राण गमावले...” सर्वांनी मान खाली घातली. चिमणी म्हणाली, “म्हणजे, ती मीनू इथे आली ती... माझा टिल्लू... तरी मी सांगत होते सर्वांना... नका पाठवू टिल्लूला तिथे. पण कोणीच ऐकलं नाही माझं. आता मी नाही ऐकणार कोणाचं. मला जायचं आहे टिल्लूकडे आत्ताच्या आत्ता...” चिमणीला दुजोरा देत सर्वजण म्हणाले, “आम्हालाही टिल्लूची काळजी आहे. आम्हीही येणार तुझ्यासोबत. चला... सर्वजण लगेच निघू...”

सकाळ झाली. कालीच्या सांगण्यावरून संपूर्ण कालीपूर सजवलं गेलं होतं. महालाच्या टेकडीच्या खालीच असलेल्या पटांगणात सर्व प्रजेला बोलावलं गेलं होतं. महालातल्या सर्वांत ऊंच मनोऱ्यात काली त्याच्या जागेवर बसला होता. त्याच्याच बाजूला बेड्यांमध्ये अडकलेली मीनू खिन्न होऊन बसली होती. त्याचे सगळे मित्र, म्हणजे लांडगेभाऊ, तरसबुआ, कोल्होबा, गिधाडराज त्यांच्या त्यांच्या स्थानांवर बसले होते. बोकेश्वर आणि मनीदेवीला बाजूच्याच मनोऱ्यात साखळदंडांमध्ये जखडून बसवलं होतं. सोहळा दिमाखात सुरू झाला. भाल्यांच्या टोकावर जमवलेल्या त्या प्रजेसमोर कालीने जमवलेले अदभूत प्राणी असलेले पिंजरे येत गेले आणि पुढे सरकत राहिले. शेवटचा पिंजरा टिल्लूचा होता. पिंजरा पटांगणात येताच आकाराने लहान असलेल्या त्या पांढऱ्या-नारंगी बोक्याला पाहून सर्वजण अवाक झाले. आवाजाच्या दिशेने कान हलवत टिल्लू पिंजऱ्यात तडफडत होता. टिल्लूचा पिंजरा पाहताच काली जागेवरून उठला आणि म्हणाला, “प्रजाजनहो, ही आहे माझ्या संग्रहालयातली सर्वात नवखी वस्तू. आणि बरं का, हा फक्त बोका नाही, तर तुमचा युवराज आहे. हो, तुमच्या बोकेश्वर आणि मनीदेवीचा सुपुत्र...

हे ऐकताच सर्वजण उभे राहिले. एकमेकांकडे पाहत असतानाच मीनूला उठवत काली पुन्हा कडाडला, “ही तुमची भावी राणी आणि, हे बघा तुमचे बोकेश्वर आणि मनीदेवी...” कालीने पंजा डावीकडे नेला. पडदा बाजूला झाला आणि कालीच्या काळ्या बोक्यांच्या गराड्यात उभे असलेले बोकेश्वर आणि मनीदेवी सर्वांसमोर आले. त्यांना पाहून जनता खवळली. आपल्यामागे भाले घेऊन उभे असलेल्या कालीच्या बोक्यांना काहीजण मारू लागले तर काहीजण उड्या मारून मैदानात उतरले. हे सर्व पाहताच कालीने यवक्रीला इशारा केला. यवक्री लगेच तळघराकडे निघाला. प्रजेने विद्रोह केला होता. कालीचे काळे बोके आणि वटवागूळ सेना त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू लागली. तिथे यवक्री तळघरात पोहोचला. त्याने मण्याला त्या किड्याच्या मस्तकावरच्या खाचेत बसवलं. प्रचंड गडगडाट झाला. त्या महाकाय किड्याने डोळे उघडले. किड्याने त्याचे दगडी पाय पसरले आणि तो उभा राहिला. पर्वतही लहान वाटेल इतका मोठा किडा आणि त्याचे जळत्या निखाऱ्यासारखे ते लालभडक डोळे पाहून यवक्री थोडा घाबरला. लगेच सावरत बाहेरच्या दिशेने पळाला. किड्याने यवक्रीला पाहिलं आणि वाटेतले दगड-धोंडे पायाखाली तुडवत तो यवक्रीच्या दिशेने जाऊ लागला...

यवक्री बाहेर आला. कालीच्या दिशेने पाहताच काली जोरात हसायला लागला. सगळे त्याच्याकडे पाहू लागले. “आणि आता या महासभेचं खास आकर्षण... माझा महाकाय अंगरक्षक...” असं म्हणत कालीने एका दिशेला पंजा केला. जमीन हादरू लागली आणि काही क्षणातच जमीन दुभंगली आणि सहा पाय असलेला, लालभडक डोळ्यांचा तो भीमकाय किडा सर्वांच्यासमोर आला. किड्याला पाहून सर्व घाबरले. किडा कालीच्या दिशेने येऊ लागला. आता तो कालीला पकडणार इतक्यात कालीने त्याच्या पंजावर असलेली एक कळ दाबली. त्यासरशी किडा थांबला. आपला पाय मागे घेत किडा वळला आणि बोकेश्वर व मनीदेवी ज्या मनोऱ्यात होते तिथे गेला. किड्याने मनोऱ्याला एक फटका मारला. मनोरा तुटू लागला. बोकेश्वर आणि मनीदेवी खाली पडत होते. कालीने पुन्हा पंजावरची कळ दाबली आणि किड्याने खाली पडणाऱ्या बोकेश्वर आणि मनीदेवीला त्याच्या एका पायात पडकलं. काली पिंजऱ्याकडे पाहत म्हणाला, “टिल्लू, हे बघ तुझे आई-बाबा... आता याच्याचकडून त्यांची माती-माती करवतो. कोण वाचवणार आता त्यांना. हा...हा...हा...”

काली बोलतच होता की अचानक अंधार झाला. गरुडावर बसलेले टिल्लूचे सवंगडी, माकडी मावशी, त्याच्यासोबत उडणारे अनेक पोपट, कबुतरं, चिमणे आणि चिमण्या यांच्या प्रचंड थव्यामुळे सूर्य झाकोळला गेला होता. गरुडांच्या पायात मोठे तर कबुतर आणि पोपटांच्या पायात लहान दगड होते. पटांगणावर येताच सर्वांनी दगड खाली सोडले. काळ्या बोक्यांवर आणि वटवागुळांवर ते दगड पडले. काही त्याचक्षणी गतप्राण झाले आणि काही मागे हटले. काही गरूड पुढे गेले आणि त्या राक्षसी किड्यावर त्यांनी दगड सोडले. अकस्मात हल्ला झाल्याने किडा गोंधळला. त्याने बोकेश्वर आणि मनीदेवीला जमिनीवर भिरकावलं. दोन गरूड लगेच खाली झेपावले आणि त्यांनी बोकेश्वर व मनीदेवीला झेलून सुखरूप जमिनीवर आणलं. हे पाहून काली आणि त्याचे मित्र म्हणजेच लांडगेभाऊ, तरसबुआ, कोल्होबा, गिधाडराज मैदानात उतरले. सर्वजण गरूडसेनेवर तुटून पडले. भीषण युद्ध सुरू झालं...

गरुडाने काली बसला होता त्या मनोऱ्याकडे झेप घेतली. माकडी मावशी आणि टिल्लूच्या सवंगड्यांच्या एकत्रित ताकदीसमोर काळ्या बोक्याचं काहीच चाललं नाही. ते पळून गेले आणि मीनूला सोडवून सगळे लगेच खाली उतरले. मीनूला पटांगणाच्या एका बाजूला यवक्री दिसला. तिने आपल्या पंजांनी त्याला धरलं आणि त्याच्या मानेचा जोरदार चावा घेतला. मीनूच्या जबड्यात तडफडत यवक्रीने प्राण सोडले. यवक्रीची दशा पाहून काली खवळला. आपल्या मित्रांना घेऊन तो मीनूकडे झेपावला. दुसऱ्या बाजूला नागरिकांची पळापळ होत असताना चिमणा-चिमणी, पोपटराव आणि गरुडांनी पाहिलं तर मीनू आणि त्याच्या सवंगड्यांना काली आणि त्याच्या मित्रांनी घेराव घातला आहे. गरूड, पोपट, आणि कबुतरांनी लगेच तिथे धाव घेतली. लांडगेभाऊ, तरसबुआ, कोल्होबा, गिधाडराज यांना गरूडसेनेने सळो की पळो करून सोडलं. काळ्या बोक्यांच्या सेनेला आणि वटवागुळांना कालीपूरच्या  प्रजेने, पोपटांनी आणि कबुतरांनी नामोहरम केलं. तो राक्षसमात्र काही केल्या थांबत नव्हता...

टिल्लू पिंजऱ्यातून बाहेर पडण्याचा आतोनात प्रयत्न करत असताना बोकेश्वर आणि मनीदेवी त्याच्याजवळ आले. बोकेश्वर म्हणाले, “युवराज, आपल्या क्रोधाला आपली शक्ती बनवा. बघा तो राक्षस सर्वांना किती त्रास देत आहे. आणि तो काली, ज्याच्यामुळे आपण दुरावलो. कालकोठडीतलं तुमचं ते रूप बाहेर येऊ द्या. मनोनिग्रह करा युवराज...” त्यांना दुजोरा देत मनीदेवी म्हणाल्या, “ऊठ टिल्लू, तुझ्यात अमोघ शक्ती आहे. त्याच्या जोरावर नष्ट कर त्या दुष्टांना...” टिल्लूने दोघांचे शब्द ऐकलेमात्र आणि त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. क्रोधाचा लावा भडकला. टिल्लूच्या अंगातून धूर निघू लागला आणि क्षणार्धात त्याचं संपूर्ण शरीर आगीच्या ज्वाळांमध्ये घेरलं गेलं. टिल्लूने म्यावा केला पण बाकीच्यांना जणू सिंहगर्जनाच ऐकू आली. टिल्लूच्या शरीरातून निघणारी आग इतकी तीव्र होती की तो लोखंडी पिंजरा वितळून गेला. टिल्लू किड्याच्या दिशेने पळू लागला. त्याला जाणवलं की त्याचा आकार वाढतो आहे. किड्यापर्यंत पोहोचेपर्यंत टिल्लू त्या किड्याच्या आकाराइतकाच मोठा झाला होता. आपल्यासमोर आगीत घेरलेला हा प्रचंड प्राणी पाहून किड्याने इतर सर्वांना सोडून त्याच्याकडे आपले पाय वळवले. एका महा-द्वंद्वाला सुरुवात झाली...

किड्याचे सहा पाय तर टिल्लूचे दोन पंजे एकमेकांवर आदळत होते. किड्याच्या प्रत्येक वाराला टिल्लू परतवत होता. आपल्या एका पंजाने टिल्लू त्या किड्याचे पाय अडवत होता तर दुसऱ्याने त्याच्यावर वार करत होता. टिल्लूच्या अग्नीची झळ किड्याला लागत होती. किडा पूर्ण जोर लाऊन पुढे सरकला तशी टिल्लूने जमिनीवर घसरत त्याचे एकेक करत चार पाय तोडून टाकले. किडा कोलमडला आणि जमिनीवर आदळला. त्याने आपलं अजस्र तोंड उघडलं आणि त्यातूनसुद्धा आगीच्या ज्वाळा निघू लागल्या. टिल्लूने त्याचे दोन्ही पंजे त्या किड्याच्या पोटात खुपसले खरे पण तरीही तो किडा अजून जिवंतच होता. मीनूला त्या किड्याच्या डोळ्यांच्या मधोमध एक चकाकणारा खडा दिसला. मीनू लगेच ओरडली, “टिल्लू... तो खडा... त्या किड्याच्या मस्तकावर असलेला तो लाल खडा...” टिल्लूने ते ऐकलं. तो मणी टिल्लूला दिसला. टिल्लूने हवेत उडी घेतली आणि आपल्या पंजाच्या एकाच वाराने त्या किड्याच्या मस्तकावरचा मणी बाजूला केला. त्यासरशी त्या किड्याचे डोळे बंद झाले आणि किडा निपचित पडला. तो मणी जमिनीवर आदळून फुटला आणि त्याच क्षणी प्रचंड स्फोटानिशी तो किडा नष्ट झाला...

पटांगणात आता लांडगेभाऊ, तरसबुआ, कोल्होबा, गिधाडराज, काळे बोके आणि वटवागूळ सेना, कोणी कोणी मागे नव्हते. गरूडराज, पोपटराव, कबुतर, बोकेश्वर, मनीदेवी, टिल्लूचे सवंगडी आणि मीनू यांच्या गराड्यात आता काली एकटाच राहिला होता. सभोवार नजर फिरवत असताना काली थोडा घाबरला होता पण लगेच उसने अवसान आणून म्हणाला, “मी एकटा राहिलो तरी माझे हे विषारी पंजे सर्वांना पुरून उरतील. या... करा वार... बघतोच एकेकाला...” हे ऐकून प्रचंड गर्जना करत टिल्लू म्हणाला, “नाही... या कालीला कोणीही हात लावणार नाही. हा माझा अपराधी आहे. याला मीच शिक्षा देणार...” हे बोलत असताना टिल्लूचा आकार परत लहान होत गेला. त्याच्या अंगातल्या ज्वाळा नाहीशा होत लुप्त झाल्या आणि टिल्लू पुन्हा पूर्ववत झाला. त्याला पाहून काली म्हणाला, “टिल्ल्या, तू आकाराने मोठा होतास तेव्हाच मला मारायला हवं होतंस. आता तुला क्षणार्धात मारून टाकतो बघ...”

काली टिल्लूवर धाऊन गेला. कालीच्या उजव्या विषारी पंजाला चुकवत टिल्लू त्याच्याशी लढत होता. कालीच्या पिळदार डाव्या पंजाचे वारही टिल्लूला चांगलेच लागत होते. त्याच्या अंगातून रक्त वाहू लागलं. कालीच्या प्रचंड ताकदीपुढे टिल्लूची ताकद कमी पडत होती. टिल्लूला थकवा जाणवू लागला. टिल्लूचं लक्ष विचलित झालेलं पाहून कालीने त्याच्यावर आपल्या उजव्या विषारी पंजाचा वार केला. टिल्लू घायाळ झाला आणि कोसळला. टिल्लू पडलेला पाहून चिमणी आणि मनीदेवी एकदम पुढे सरसावल्या. चिमणा म्हणाला, “थांबा, ही टिल्लूची लढाई आहे. त्याची त्यालाच लढायला हवी...” बोकेश्वर पुढे येत म्हणाले, “चिमणेराव म्हणत आहेत ते बरोबर आहे. युवराजांना लढू द्या स्वत:ची लढाई...” हळू हळू जमिनीवर पडलेल्या टिल्लूने डोळे किलकिले केले. त्याचं शरीर निळं पडत चाललं होतं. हे पाहून गरूडराज चटकन हवेत उडाले. तिथे टिल्लू उभा राहिला. विष पसरत चाललं होतं पण टिल्लू त्वेषाने पुढे झाला. कालीने पुन्हा वार केला. यावेळी टिल्लूने त्याच्या संपूर्ण ताकदीनिशी त्याचा उजवा पंजा रोखला आणि झाडाच्या दिशेने वळवला. पंजाची नखं झाडात रुतून तुटली. टिल्लूने त्याच्या अंगात असलेली शेवटची शक्ती पणाला लावली आणि आपल्या पंजांनी कालीवर वार केला. टिल्लूचा वार कालीच्या मानेवर बसला. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. कालीचा गळा कापला गेला आणि तो कोसळला. पटांगणातून सरपटत सिंहासनाकडे तो जाऊ लागला पण तिथे तो पोहोचू शकला नाही आणि वाटेतच गतप्राण झाला...

टिल्लूही जखमा सहन करू शकला नाही आणि तिथेच कोसळला. सर्वजण टिल्लूच्या भोवती जमा झाले. टिल्लूला उठवण्याचा प्रयत्न करू लागले. इतक्यात गरूडराज एका सापाला घेऊन आला. मानेवर दहाचा आकडा असलेला फणा काढून तो नाग सर्वांकडे पाहत असताना गरूडराज म्हणाले, “नागराज... आमच्या टिल्लूला बरं करा हो...” नागराजांनी एकवार टिल्लूकडे पाहिलं आणि त्याच्या पावलावर चावा घेतला. थोड्याच वेळात नागराज बाजूला झाले. टिल्लूच्या शरीराचा निळा रंग उतरू लागला. हळू हळू टिल्लू शुद्धीवर आला. आपलं अंग झाडत तो उभा राहिला. मनीदेवी त्याला येऊन बिलगली. हमसून हमसून रडू लागली. बोकेश्वरांनीही टिल्लूच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. टिल्लूसुद्धा दोघांच्या प्रेमाने भारावला होता. इतक्यात त्याची नजर चिमणा आणि चिमणीकडे गेली. त्याच्यासह गरूडराज, पोपटराव, कबुतर, सर्वांनी आपले पंख पसरवून टिल्लूला आशीर्वाद दिला आणि मागे वळले...

टिल्लू लगेच त्यांच्याजवळ जात म्हणाला, “हे काय आई-बाबा, तुम्ही कुठे निघालात... मला भेटलाही नाहीत तुम्ही...” माकडी मावशी त्याच्याजवळ येत म्हणाली, “आता तुम्ही युवराज आहात... खूप मोठे आहात... आता आम्ही तुमच्यासोबत नसलेलंच बरं नाही का...” टिल्लू माकडी मावशीच्या जवळ जात म्हणाला, “नाही मावशी, मी कितीही मोठा झालो तरी तुझा आणि तुम्हा सर्वांचा टिल्लूच आहे... नका ना जाऊ...” मनीदेवी सर्वांच्या जवळ येत म्हणाल्या, “बरोबर आहे टिल्लूचं. तो जितका आमचा आहे तितकाच तुमचाही आहे...” बोकेश्वर महाराजांनी त्याचक्षणी घोषणा केली, “आजपासून या कालीपूरचं नाव पुन्हा मार्जारपूर असेल आणि या प्रांतात असलेल्या सर्व जंगलांना आणि त्यातल्या प्राण्यांना आमच्याकडून अभय असेल...” हे ऐकून सर्वांना आनंद झाला. सर्व टाळ्या वाजवत असताना एका भिंतीआड लपलेली उदासवाणी मीनू चिमणीला दिसली...

तिला जवळ बोलवत चिमणीने तिचा पंजा टिल्लूच्या पंजावर ठेवला. त्यासरशी मीनू गोड लाजली. टिल्लूही हसला. मोठा सोहळा रंगला. मार्जारपूरचा युवराज म्हणून गब्बू आजोबांनी टिल्लूचा राज्याभिषेक तर केलाच शिवाय टिल्लू आणि मीनूचं थाटामाटात लग्नही लाऊन दिलं. सर्वत्र आनंदी आनंद पसरला आणि मार्जारपूर पुन्हा खुशाल झालं...

समाप्त.

No comments:

Post a Comment