Thursday, July 2, 2020

शोध - पहिला भाग...


संध्याकाळचे पाच वाजत आले होते. स्कायलाईन हॉस्पिटलमधल्या डॉक्टर संजयच्या केबिनमध्ये सीनियर इंस्पेक्टर प्रधान, इंस्पेक्टर आनंद, सब इंस्पेक्टर सचिन आणि डॉ. गोखले बसले होते. डॉ. संजय रिपोर्ट्स न्याहाळत होते. प्रधान म्हणाले, "सो डॉ. संजय, काय म्हणत आहेत रिपोर्ट्स..." डॉ. हसत म्हणाले, "येस प्रधानसाहेब. एव्हरीथिंग इज नॉर्मल. आज तुम्ही उमा मॅडमना घेऊन जाऊ शकता. इतक्या जखमा होऊनही त्या लवकर रिकव्हर झाल्या. तुमच्या बाकी साथिदारांना झालेल्या जखमा तितक्या गहिऱ्या नव्हत्या पण उमा..." डॉ. गोखले मध्येच म्हणाले, "येस. शी इज अ फायटर. काही दिवसांपूर्वी तुम्ही पेपरमध्ये डॉ. विद्यानंद आणि त्यांच्या फसलेल्या प्रयोगाबद्दल वाचलंच असेल. त्याच ऑपरेशनदर्म्यान हे सर्व जख्मी झाले होते. बट ऑल्स वेल दॅट एंड्स वेल..." एकमेकांना टाळ्या देत आनंद आणि सचिन एकदम म्हणाले, "येस इनडीड..."

बोलणी सुरूच होती की उमा आत आली. तिला पाहून सर्वांच्या चेहेऱ्यावर आनंद दिसू लागला. उमाच्या डोक्यावर हात ठेवत प्रधान म्हणाले, "कशी आहेस उमा..." उमा हसून म्हणाली, "फिट एँड फाईन सर. नव्या केसची वाट बघते आहे..." हे ऐकून सर्वजण हसू लागले. इतक्यात बाहेरून गोंधळ ऐकू आला. डॉ. संजयसह सर्वजण बाहेर आले तर एक माणूस एका वृद्धाला स्ट्रेचरवरून आणत, "डॉक्टर लवकर बघा यांना काय झालं..." असं ओरडत होता. उमा त्याला ओळखत म्हणाली, "जतीन... अरे काय झालं आजोबांना..." उमाजवळ जात सचिन म्हणाला, "उमा, तू ओळखतेस यांना..." उमाने मानेनेच होकार दिला. डॉ. संजयने ताबडतोब उपचार सुरू केले. प्रधानांकडे पाहत उमा म्हणाली, "सर, हा जतीन. आणि ते त्याचे आजोबा. तीन वर्षांपूर्वी मी याच परिसरात राहत होते. तेव्हा हे आमचे शेजारी होते..." मग जतीनकडे वळत उमा म्हणाली, "जतीन अरे झालं तरी काय आजोबांना..."

दारावर लागलेल्या काचेतून आत पाहत मग नजर उमाकडे वळवत जतीन म्हणाला, "काय सांगू उमा... आम्ही पिक्चर बघत होतो. नेहमी आजोबा त्यांच्या खोलीत असतात. आज कधी नव्हे ते बाहेर येऊन बसले. पिक्चर सुरू होऊन दहाच मिनिटं झाली होती आणि आजोबा किंचाळायला लागले, "रामदास... माझी डायरी... माझी डायरी त्या रामदाससोबत... खजीना... रामदास..." असं काहीसं असंबद्ध ओरडत असतानाच ते एकदम स्तब्ध झाले. आम्ही त्यांना हलवलं तर ते कोलमडले. काय करावं मला काहीच सुचेना. म्हणून मी लगेच त्यांना इथे आणलं..." जतीन इतकं बोलतच होता की दार उघडून डॉ. संजय बाहेर आले. त्यांच्या उदासवाण्या चेहेऱ्याने अर्धी खबर तर दिलीच होती. तरीही जतीन त्यांच्याकडे आशेने पाहत होता. जतीनच्या खांद्यावर हात ठेवत डॉ. संजय म्हणाले, "आय म सॉरी. ही इज नो मोर..."

जतीन झटक्यात खुर्चीवर बसला. त्याला कसं व्यक्त व्हावं समजत नव्हतं. उमा त्याच्या बाजूला जाऊन बसली. उमाकडे पाहून जतीनच्या अश्रूंचा बांध फुटला. उमा त्याला दिलासा देत असताना डॉ. गोखले यांनी डॉ. संजयकडे विचारणा केली, "डॉ. संजय, असं अचानक काय झालं त्यांना..." पेशंटच्या बॉडीकडे पाहत डॉ. संजय म्हणाले, "एकाच वेळी त्यांचं हृदय आणि मेंदू बंद पडले. ही वॉज डेड बिफोर ही वॉज ब्रॉट हियर. त्यांना बसलेला धक्का इतका जबरदस्त होता की ते सहन करू शकले नाहीत आणि..." पेशंटकडून जतीनकडे पाहत प्रधान म्हणाले, "डॉक, पी.एम. करून बॉडी लवकरात लवकर जतीनच्या ताब्यात द्या..." आनंद प्रधानांजवळ येत म्हणाला, "सर, जतीनची चौकशी करू का..." आनंदकडे वळत प्रधान म्हणाले, "नको आनंद. ही वेळ नाही. यावेळी चौकशीपेक्षा त्यांना सांत्वनाची गरज आहे. उमा, सचिन, तुम्ही जतीनला त्याच्या घरी घेऊन जा. बॉडी ताब्यात आली की आम्हीही येतोच..."

पंध्रवडा उलटून गेला. चौकीवर उमा काही वाचण्यात गर्क होती. सचिन तिच्याजवळ येत म्हणाला, "काय गं उमा, इतकी तल्लीन होऊन काय वाचते आहेस..." सचिनकडे पाहत उमा म्हणाली, "अरे सचिन, रंगा आजोबांची फाईल वाचते आहे. आपले पांडुरंग काळे, जे हॉस्पिटलमध्ये मरण पावले... डॉक्टरांकडून त्यांची फाईल मिळवली. त्यांचे मेडिकल रेकॉर्ड्स एकदम नॉर्मल आहेत. वयाच्या सत्त्याऐंशीव्या वर्षीही नो बी.पी., नो शुगर, नो हार्ट प्रॉब्लेम... आणि असा माणूस अकस्मात जातो... मला हे ठीक वाटत नाही..." "यू आर राईट उमा..." उमा-सचिनचं संभाषण मध्येच तोडत प्रधान म्हणाले, "हॉस्पिटलमध्येही मला जरा शंका आलीच होती..." आनंद बाजूलाच उभा होता. शंका व्यक्त करत म्हणाला, "सर, म्हणजे यात काही काळं-बेरं असण्याची शक्यता वाटते आहे का... शुड वी व्हिजिट जतीन फॉर धिस..." मानेनेच होकार देत प्रधान म्हणाले, "लेट्स गो..."

सर्वजण जतीनच्या घरी पोहोचले. एका महिलेने दार उघडलं. समोर उमाला पाहून ती म्हणाली, "उमा... कशी आहेस... ये आत ये..." आत जात असताना उमा प्रधानांना म्हणाली, "सर, ही प्रिया. जतीनची बायको... आणि प्रिया, हे सिनीयर इंस्पेक्टर प्रधान, हे इंस्पेक्टर आनंद आणि हे सब इंस्पेक्टर सचिन..." ओळखी होत असतानाच जतीन हॉलमध्ये आला. जतीनला पाहून प्रधानांनी त्याच्याशी हस्तांदोलन केलं. स्थरस्थावर झाल्यावर प्रधान म्हणाले, "मि. जतीन, स्पष्टच बोलतो. तुमच्या आजोबांचे मेडिकल रिपोर्ट्स आणि त्यांच्या झालेल्या अकस्मात मृत्यूमध्ये तफावत जाणवते आहे. आमचा आत्तातरी कोणवरही संशय नाही पण तपास करावा लागेल. आजोबांची खोली पाहू शकतो का आम्ही..." जतीनने होकार देताच आनंद व सचिन आत गेले...

प्रधानांनी जतीनला विचारलं, "मि. जतीन, जेव्हा ती घटना घडली, तेव्हा नेमकं काय झालं होतं..." जतीनने एकवार प्रियाकडे पाहिलं आणि बोलू लागला, "सर, त्या दिवशी रविवार होता हे तुम्हाला माहितच आहे. आम्ही सगळे घरी होतो. आबा आत होते. आम्ही विचार केला नवीन आणलेल्या होम थियेटरवर एखादा पिक्चर पहावा. पिक्चर सुरू होऊन १०-१५ मिनिटं झाली असतील, आबा बाहेर येऊन आमच्यासोबत बसले. काही क्षणातच स्क्रीनकडे बोट दाखवत ते किंचाळले, "रामदास... माझी वही... रामदास सोबत माझी वही... खजीना... रामदास..." इतकं बोलून आबा पुतळ्यासारखे स्तब्ध झाले. त्यानंतर......" बोलतानाच जतीनने डोळे पुसले. प्रधान बाजूला झाले आणि त्यांनी उमाला इशारा केला...

प्रधान म्हणाले, "उमा, तुला कितपत खरं वाटतं हे... वयाच्या या टप्प्यात असतानाही त्यांना कोणताच आजार नव्हता आणि असे अचानक... जतीनने तर काही..." प्रधानांना मध्येच तोडत उमा म्हणाली, "सर, तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण जतीन असं काही करेल असं नाही वाटत मला. इस्टेटीचं म्हणाल तर सगळं काही जतीनच्याच नावावर आहे आणि असं असताना तो..." उमा बोलतच होती की दारात आनंद दोघांना इशारा करताना दिसला. प्रधान आणि उमा खोलीत आले. आनंद म्हणाला, "सर, खोलीत जास्त काही नाही पण कपाटात ही ट्रंक सापडली. तिला कुलूप नव्हतं पण ती अशी ठेवली होती की सहजासहजी दिसणार नाही. यात जुनी पुस्तकं, काही खेळ आणि हे कागद होते. तुम्हीच बघा सर हे कागद..."

प्रधानांनी ते कागद हातात घेतले. ते दत्तकपत्र होतं. त्यावर शिक्का अलिबागचा होता. प्रधानांनी ते दत्तकपत्र वाचलं आणि अवाक होत म्हणाले, "पांडुरंग शेलार... पण जतीनच्या आजोबांचं नाव तर पांडुरंग काळे आहे... दत्तकपित्याचं नाव आहे रामचंद्र काळे आणि या दत्तकपत्राची तारीख, २५ जुलाय १९४७... जुलाय १९४७, अलिबाग... मी जो विचार करत आहे तसंच आहे का हे..." प्रधान सर्वांसोबत ताबडतोब बाहेर आले. त्यांनी विचारलं, "मि. जतीन, तुम्ही कोणता सिनेमा पाहत होता..." प्रिया म्हणाली, "टायटॅनिक होता सिनेमा... दहाच मिनिटं झाली होती आणि..." प्रधानांनी एक क्षण थाबून उत्तर दिलं, "मि. जतीन, तुम्ही टायटॅनिक पाहत होतात, दहाच मिनिटं झाली आणि ती घटना घडली. यामागे खूप पूर्वीची पार्श्वभूमी आहे..."

प्रधानांनी मोबाईलवर काहीतरी सर्च केलं आणि सर्वांना दाखवत म्हणाले, "तुम्हा सर्वांना १९४७ झालेल्या रामदास बोटीची दुर्घटना माहीत आहे का... दिनांक १७ जुलाय १९४७ रोजी मुंबईहून निघालेली रामदास ही प्रवासी बोट अलिबागजवळ बुडाली. खूप जणांना जलसमाधी मिळाली. टायटॅनिक सिनेमात, दहा मिनिटानंतर बोट बुडतानाचा ग्राफिक सीन दाखवला जातो. त्याच सीनदर्म्यान मि. पांडुरंग यांना तो शॉक बसला. याचा वेगळा अर्थ लावायचा झाला तर बहुतेक मि. पांडुरंग यांनी रामदास बोटीची ती घटना स्वत: पाहिली असावी असा माझा अंदाज आहे आणि टायटॅनिक सिनेमातला तो सीन पाहून त्यांना रामदास बोटीची घटना पुन्हा आठवली असावी. सॉरी मि. जतीन. मृत्यूसारखी घटना अचानक घडल्यामुळे आम्हाला तपास करणं भाग होतं. आमचं काम झालं आहे. निघतो आम्ही..."

जीपमध्ये बसताना उमा म्हणाली, "सर, रंगा आजोबांच्या त्या दत्तकपत्राबद्दल तुम्ही त्यांना नाही सांगितलंत..." प्रधान हसत म्हणाले, "उमा, जतीनचा संसार चांगला चालू आहे. मि. पांडुरंगांच्या आधीच्या आडनावामुळे जर जतीन आणि प्रिया यांच्यात काही वाद झाले, किंवा प्रियाच्या कुटुंबियांनी ही गोष्ट मान्य केली नाही तर... उगाच सर्वांना त्रास होईल. अज्ञानात सुख असतं असं म्हणतात. मि. पांडुरंग तर गेले, आता जतीन आणि त्याच्या कुटुंबाला कशाला वादाच्या भोवऱ्यात ढकलायचं उगाच..." सर्वांना प्रधानांचं म्हणणं पटलं. सचिन तेवढ्यात म्हणाला, "सर, पण मि. पांडुरंग यांनी उच्चारलेल्या शंब्दांचं काय... वही, खजीना..." सचिनला दुजोरा देत आनंद म्हणाला, "हो ना... खरंच त्या रामदास बोटीवर एखादा खजीना असेल तर... सर मला वाटतं..." आनंदला मध्येच तोडत प्रधान म्हणाले, "तुम्ही दोघं जे बोलत आहात ते बरोबर आहे. आणि त्यासाठी आपल्याला लगेच आलिबागला जायचं आहे..."



सर्वजण आलिबागला पोहोचले. एक ऊंचपुरा धिप्पाड माणूस त्यांची वाट पाहत होता. सर्व जमल्यावर प्रधानांनी त्या माणसाची सर्वांशी ओळख करून दिली, "टीम, हे बबन आंगरे. इथल्या मच्छीमार समितीचे अध्यक्ष. हे आपल्याला रामदासपर्यंत पोहोचायला मदत करतील. आणि आंगरे साहेब, ही माझी टीम. इंस्पेक्टर आनंद, सब इंस्पेक्टर उमा आणि सब इंस्पेक्टर सचिन..." सर्वांशी हस्तांदोलन केल्यावर बबन आंगरे म्हणाले, "साहेब, तुम्हाला हवी ती सर्व माहिती मी काढून ठेवली आहे. १७ जुलाई १९४७ या दिवशी मुंबईहून रेवासला येणारी रामदास बोट काशाच्या कडकाजवळ बुडाली. त्यानंतर ती बोट शोधली गेली पण बोटीच्या सांगाड्याखेरीज आणि अडकलेल्या प्रवाशांच्या मृतदेहांखेरीज काहीच सापडलं नाही. आता इतक्या वर्षानंतर पुन्हा ती बोट हुडकायची म्हणजे..."

आंगरेला मध्येच तोडत प्रधान म्हणाले, "मि. आंगरे, आम्हाला माहित आहे की बोट शोधण्याचा या आधीही झाला आहे. पण आम्हाला खात्री करून घ्यायची आहे. एक वस्तू त्या बोटीवर होती जेव्हा ती बुडाली. त्या वस्तूचा शोध घ्यायचा आहे..." प्रधानांच्या बोलण्यावर मान डोलवत आंगरे म्हणाले, "हे ऑक्सिजन सिलेंडर्स आणि हे मास्क. ही दोघं माणसं तुमची मदत करतील..." इतकं बोलून प्रधांनांशी हस्तांदोलन करून आंगरे निघून गेले. सर्वांकडे पाहत प्रधान म्हणाले, "पांडुरंग शेलारची सगळी माहिती काढली आहे मी. त्यांचे वडिल जनार्दन शेलार मुंबईच्या सरकारी खात्यात होते. जनार्दन आणि त्यांचं कुटुंब आलिबागला रहायचं. ज्या दिवशी ती दुर्दैवी घटना घडली त्याच्या आदल्या दिवशी ते पांडुरंगला आपलं ऑफीस दाखवायला घेऊन आले होते. तिथे आलिबागला जनार्दनच्या भावाची बायको कधीही बातमी देणार होती. तशी तार येताच दुसऱ्याच दिवशी ते परत निघाले...

तोच तो दुर्दैवी दिवस होता. रामदास बोट बुडाली. वाचलेल्यांपैकी एक पांडुरंग होता जो किनाऱ्याला पोहोचला. तो धक्का इतका मोठा होता की मि. पांडुरंगांना स्मृतीभ्रंश झाला. शिवराम शेलार, म्हणजेच मि. पांडुरंगांच्या काकाची परिस्थिती त्यांना सांभाळण्याइतपत नव्हती. तेव्हा त्यांचे फॅमिली फ्रेंड रामचंद्र काळे यांनी मि. पांडुरंगांना दत्तक घेतले. त्या दिवशी टायटॅनिक पाहताना धक्का बसून त्यांची स्मृती परत आली आणि मेंदूवर ताण पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. दॅट मीन्स देयर मे बी समथिंग ऑन द शिप..." सचिन व आनंदकडे वळत प्रधान म्हणाले, "आनंद, सचिन, तुम्ही तयारी करा. हे कॅमेरा तुमच्या सूटना लावा आणि या मायक्रोफोनद्वारे तुम्ही आमच्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये रहाल. मी आणि उमा किनाऱ्यावर असू. ऑल द बेस्ट..." तयारी करून आनंद, सचिन आणि ते दोन खलाशी बोटीने काशाच्या कडकाजवळ पोहोचले. मास्क लाऊन चोघांनीही पाण्यात उड्या घेतल्या. पाण्याचे बदलते रंग, कमी होत जाणारा सूर्यप्रकाश, विविध वनस्पती पाहत सर्व खाली जात राहिले. बरंच खाली पोहत असताना त्यांना दूरवर काहीतरी दिसू लागलं...

चौघंही आपापल्या वेगाने पाणी कापत पुढे जाऊ लागले. बरंच अंतर पाण्याखाली जिथे सूर्यप्रकाशाचा लवलेश नव्हता तिथे त्या चौघांच्या सूट्सवर लावलेले दिवे त्यांना रस्ता दाखवण्याचं काम करत होते. दिव्यांच्या अंधूक प्रकाशात एक पसरलेली वस्तू त्यांना दिसू लागली. खलाशांनी तिथे बोट दाखवताच चौघांनी त्यांच्या पोहण्याचा वेग वाढवला. जसजसे सर्व अजून जवळ गेले तसतसा रामदास बोटीचा सांगाडा दिसू लागला. सचिन व आनंदने त्यांचे व्हिडियो सिग्नल्स चालू केले. तिथे किनाऱ्यावर प्रधान व उमा कंट्रोलरूममधून हे सर्व पाहत होते. आत शिरण्यासाठी चौघांनीही बोटीची सर्व बाजूंनी पाहणी केली. सचिनला एक भगदाड दिसलं. त्यातून आत डोकावत सचिनने पाहिलं तर एक जिना त्याला दिसला. सचिनने ताबडतोब बीप सिग्नल पाठवत बाकी तिघांना भगदाडाशी बोलावलं...

बाकी तिघं सचिनजवळ पोहोचले. चौघंही आत शिरले. जिन्याच्या शेजारी एका खांबावर अडकवलेली '2' असं लिहिलेली एक तुटकी पाटी त्यांनी दिसली. तिथे कंट्रोलरूममध्ये प्रधान मायक्रोफोनद्वारे बोलले, "हॅलो, कम इन आनंद, कम इन सचिन... जनार्दन शेलारची '1C' नंबरची स्वतंत्र खोली होती. त्या पाटीवर '2' लिहिलं आहे. म्हणजेच तुम्ही दुसऱ्या मजल्यावर आहात. खाली जाऊन '1C' शोधा..." प्रधानांचं बोलणं सचिन व आनंदला समजलं. त्यांनी अंगठे दाखवले आणि दोघा खलाशांसह ते खाली जाऊ लागले. पहिल्या मजल्यावर पोहोचताच चौघंही पांगले. एका खलाशाला अस्पष्ट असं 1C लिहिलेलं एक अर्धवट उघडं दार दिसलं. त्याने लगेच बाकी तिघांना संदेश पाठवला. चौघंही आत गेले. एक मोडकी खाट आणि एक छोटं लोखंडी कपाट याखेरीज तिथे दुसरं काहीच नव्हतं. आनंद कपाट उघडायला गेला पण ते जाम झालं होतं. सचिनने कपाटावर गोळी चालवायला पिस्तूल काढलं तर खलाशांनी त्याला थांबवलं व इशाऱ्यानेच सभोवतालचं पाणी दाखवलं...

सोबत आणलेल्या साखळ्यांनी सर्वांनी त्या कपाटाला व्यवस्थित बांधलं आणि त्याला मोटर बसवली. मोटर सुरू होताच कपाट वरवर जाऊ लागलं. पाण्याच्या दाबाविरुद्ध जात थोड्याच वेळात मोटर लावलेलं कपाट आणि त्यामागून पोहत येणारे आनंद, सचिन व इतर दोन खलाशी पाण्यावर आले. बोटीमध्ये प्रधान व उमा सर्वांची वाटच पाहत होते. सर्वांना बोटीत घेऊन बोट तडक किनाऱ्याकडे निघाली. किनाऱ्यावर पोहोचताच सचिन, आनंद आणि त्या दोन खलाशांनी मोठ्या कष्टाने पण हळुवारपणे कपाटाचा दरवाजा उघडला. आतून बराचसा ओला कचरा भसकन बाहेर आला. आनंदने हात घालून राहिलेलं सगळं बाहेर काढायला सुरुवात केली आणि काही क्षणातच जराजरजरा अवस्थेतली एक डायरी बाहेर पडली...

डायरी खूप खराब झाली होती. सततच्या पाण्यामुळे कागद फारच वाईट अवस्थेत होते. कुठल्याही क्षणी फाटू शकत होते. प्रधान म्हणाले, "हीच ती मि. पांडुरंगांची वही असावी. सांभाळ आनंद... इट इज डॅमेज्ड अ लॉट... लेट्स टेक धिस टू डॉक..." चौघंही डॉ. गोखलेंच्या लॅबमध्ये पोहोचले. बराच वेळ डॉ. गोखलेंनी वहीतल्या पानांवर वेगवेगळे केमिकल्स वापरले. वही ठेवलेल्या काचेच्या पेटीच्या वरच्या बाजूला कॅमेरा बसवला होता. बाजूलाच असलेल्या मोठ्या प्रॉजेक्टर स्क्रीनवर सर्वजण ती वही पाहू शकत होते. हळू हळू कागदांमधलं लिखाण दिसू लागलं. प्रधानांनी ते वाचायला सुरुवात केली, "दिनांक: १५/०७/१९४७... नजिकच्या काळात मला काही महत्वाची कागदपत्र मिळाली आहेत. त्या कागदांची भाषा आजची नसून शिवाजी महाराज किंवा पेशव्यांच्या काळातली वाटते. मी आपल्या भाषेत ते सर्व मांडण्याचा प्रयत्न केला आहे...

इथे बऱ्याच पुरातन वस्तू, कागदपत्र जतन करून ठेवली आहेत. शिवकालीन, पेशवेकालीन करारनामे, बिक्षिसी दिलेली कागदपत्रे, काही नकाशे, असे बरेच कागद आहेत. काही कागद माझ्या हाती लागलेत. त्या कागदांचा अभ्यास आणि त्यात लिहिलेल्या गोष्टींचा मी जितका अभ्यास केला त्यावरून असं समजतं, की ते कागद बहुतेक कोणाच्याही नजरेत आले नाहीत आजवर. हे कागद आहेत वसईच्या किल्ल्याबद्दलचे, आणि तेही पोर्तुगीझांच्या काळातले. बाजीरावांचे भाऊ चिमाजी अप्पा यांनी हा किल्ला पोर्तुगीझांकडून पेशवाईत आणला. तिथे अडकलेल्या नागरिकांना तिथून जिवंत जाण्याची मुभा दिली. पोर्तुगीझ छावणीत त्यावेळी एक सरदार होता. त्याच्याकडे खूप धन होतं. पेशव्यांच्या एका सरदाराने ते धन त्या पोर्तुगीझ सरदाराकडून काबीज केलं आणि तो कोणाला काही सांगेल म्हणून त्या पोर्तुगीझ सरदारालाही मारून टाकलं...

आपलं हे कृत्य उघडकीस येऊ नये म्हणून ते धन आणि त्या पोर्तुगीझ सरदाराला या पेशव्यांच्या सरदाराने किल्ल्यातच पुरून ठेवलं. नंतर कधीतरी लक्षात रहावं म्हणून खुणेसाठी एक नकाशा बनवला. कालांतराने तो सरदार इंग्रजांच्या चकमकीत मारला गेला. इंग्रजांचा अंमल संपला आणि किल्ला व अनेक कागदपत्र भारत सरकारला सुपूर्द केली गेली. त्यात हा नकाशाही होता. मी नकाशाच्या मार्गावर गेलो पण तसा तो कठिण असल्याने मला जास्त पुढे जाता आलं नाही. हे धन चुकीच्या हातात जायला नको म्हणून मी अजून कोणाशीच काही बोललो नाही. दोन दिवसांनी सुट्टीसाठी मी गावाला जाणार आहे. मी मुंबईला परतल्यावर हे कागद व तो नकाशा सरकारच्या हवाली करेन म्हणजे त्यांच्या परीने ते धन शोधून काढतील..." वाचून झाल्यावर प्रधानांनी वर पाहिलं. सगळेजण मन लाऊन त्यांना ऐकत होते. प्रधानांनी मागची पानं पाहिलं आणि एका कागदावर काही लिखण व खुणा त्यांना सापडल्या...

ते सर्वांना उद्देशून म्हणाले, "ही ती डायरी आणि हा नकाशाचा कागद. सो, व्हॉट डू यू थिंक..." सचिन म्हणाला, "सर, हे कागद जुने आहेत. पेशवे गेले आणि ब्रिटीश राजवट आली. ते जितके हुशार होते, मला नाही वाटत ते धन अजून तिथे असेल..." सचिनला दुजोरा देत उमा म्हणाली, "ही इज राईट सर, इतका काळ गेल्यावर हे धन तिथे असण्याची शक्यता कमीच वाटते..." उमाला मध्येच तोडत आनंद म्हणाला, "सर, मि. जनार्दन यांचा हेतू चांगला होता. त्या दुर्घटनेमुळे हा चांगला हेतू सफल होऊ शकला नाही. हे जे आपण आत्ता वाचलं, त्याची तारीख दुर्घटनेच्या फक्त दोन दिवस आधीची आहे. कदाचित आत्तासुद्धा काही असेल तिथे..." आनंदला दुजोरा देत डॉ. गोखले म्हणाले, "आनंदच्या बोलण्यात तथ्य आहे प्रधान साहेब. यू हॅव टू गो फॉर इट..." सर्वांचं बोलणं ऐकल्यावर प्रधान म्हणाले, "ओके. वी विल गो... वसईचा किल्ला टूरिस्ट स्पॉट आहे. लवाजमा घेऊन गेलो तर एकच हलकल्लेळ माजेल. वी विल कीप धिस टू अस ओनली... लेट्स मूव्ह..."

संध्याकाळ टळून चालली होती. चौघंही किल्ल्याजवळ पोहोचले. प्रधानांनी नकाशा उघडला आणि सर्वजण त्याकडे पाहू लागले. एका ठिकाणी निळ्या रेषा दिसत होत्या. थोडं पुढे करड्या व काळ्या रेषा होत्या. त्या रेषांच्या पुढे एक मोठा चौकोन आणि चौकोनात वर जाण्याचा बाण होता. आनंद म्हणाला, "या निळ्या रेषा म्हणजे समुद्र. करड्या व काळ्या रेषा म्हणजे जमीन असावी आणि हा मोठा चौकोन म्हणजे किल्ल्याचा मुख्य दरवाजा असावा..." चौकोनाकडे पाहत उमा म्हणाली, "पण हा वर जाण्याचा बाण काय असावा..." नकाशाकडे पाहत प्रधान म्हणाले, "हा वर जायचा नाही, तर आत जाण्याचा मार्ग आहे. मला वाटतं हे बाण आपल्याला सांगतील कुठल्या मार्गाने जायचं..." चौघंही बाणाच्या दिशेने मुख्य दरवाजातून आत गेले. समोर होता भग्नावस्थेतला किल्ला. सर्वांनी नकाशा पुन्हा पाहिला. मोठ्या चौकोनावर एक छोटा चौकोन होता ज्यावर क्रॉस होता आणि त्यात, खाली जाणारा बाण दिसत होता आणि एका कोपऱ्यात तलवारीचं चिन्हं दिसत होतं. उमा म्हणाली, "हा छोटा चौकोन म्हणजे बालेकिल्ला, आणि हा क्रॉस म्हणजे चर्च..." नकाशाकडे पाहत सचिन म्हणाला, "राईट. आणि हा बाण म्हणजे चर्चच्या खाली जाण्याचा मार्ग असणार..."

क्रमशः...

No comments:

Post a Comment