Sunday, July 18, 2021

माऊकाका...

आपल्या आयुष्यात अनेक अशा व्यक्ती येतात, ज्यांमुळे आपल्याला फायदा-तोटा काहीच नसतो. पण तरीही त्या व्यक्ती आपल्या लक्षात राहतात. विजयच्या आयुष्यात आलेले माऊकाकाही असेच होते...

"माऊकाका", हे नावही त्यांना एका लहान मुलीने दिलं होतं. विजयच्या घरापासून ऑफीसपर्यंतच्या रस्त्यात एक गल्ली होती. त्या गल्लीला सगळेजण माऊची गल्ली म्हणत. एक मजली कौलारू घरं असलेल्या त्या गल्लीत अनेक मांजरं होती. लहान, मोठ्या अशा वेगवेगळ्या मांजरांनी ती गल्ली नेहमी भरलेली असायची. विजयचं ऑफीस त्या गल्लीच्या जवळच असल्याने रोजचं येण-जाणं व्हायचं. ऑफीससाठी अमंळ लवकर निघायचं. माऊच्या गल्लीत जाऊन मांजरांसोबत थोडा वेळ घालवायचा, मग ऑफीसला निघून जायचं. असा विजयचा रोजचा ठरलेला कार्यक्रम होता...

गल्लीच्या शेवटी असलेल्या एका घरात तीन-चार वर्षांची एक मुलगी होती. विजय तिथे मांजरांसोबत असताना ती मुलगी हाताने त्याला बोलवत असे. मग विजयने एखादं मांजर तिच्याजवळ नेलं की ती त्या मांजराला कुरुवाळत असे. असं छानपैकी चाललं होतं. एक दिवस विजयला ऑफीसला जायला थोडा उशीर झाला. त्यामुळे त्याने माऊच्या गल्लीला फ्लाईंग व्हिझीट द्यायचं ठरवलं. विजय माऊच्या गल्लीत पोहोचला. जास्त वेळ न घालवता त्याने एका मांजराला उचलून त्या मुलीजवळ नेलं. ती मुलगी त्या मांजराला कुरुवाळत होती आणि ते मांजर विजयच्या हातातून निसटून पळालं. मांजराच्या जाण्याच्या दिशेकडे पाहत, "माऊकाका..." असं ओरडत त्या मुलीने टाळ्या वाजवल्या...

विजयने ती मुलगी पाहत होती त्या दिशेला पाहिलं, तर साधारण सत्तरीचे एक गृहस्थ येताना दिसले. सदरा-लेंगा असे साधे कपडे, डोळ्यांवर चष्मा आणि हातात कापडी पिशवी, असे ते गृहस्थ गल्लीच्या मधोमध येऊन उभे राहिले. सगळ्या मांजरांनी एव्हाना त्यांच्या भोवती घोळका केलाच होता. त्या गृहस्थांनी पिशवीतून काही डबे काढले आणि झाकणं उघडून ते जमिनीवर ठेवले. काहींत दूध होतं, काहींत दूध-पाव होता, काहींत तुकडे केलेली पोळी होती. ती मांजरं त्यांची पोटं भरत असताना ते गृहस्थ शांतपणे पायरीवर बसून राहिले. थोड्या वेळात सगळ्या मांजरांचं खाणं झालं आणि ती पांगली. त्या माणसाने डबे पुन्हा पिशवीत भरले आणि तो त्याच्या वाटेने निघून गेला...

विजय मोठ्या कौतुकाने त्या जाणाऱ्या माणसाकडे, तो दिसेनासा होईपर्यंत पाहत राहिला. बरेच दिवस हा प्रकार चालू राहिला. विजय मांजरांशी खेळत असताना तो माणूस यायचा. मांजरांना खायला द्यायचा आणि त्यांचं खाणं संपेपर्यंत पायऱ्यांवर बसून रहायचा. खाणं झाल्यावर डबे आवरून, आल्या पावली परत जायचा. मांजरांना रोज खायला घालणारा हा माणूस, एकाही मांजराला हात लावत नाही, ही गोष्ट विजयच्या लक्षात आली होती. या गोष्टीचं मात्र त्याला नवल वाटत होतं. याबद्दल त्या माणसाशी बोलायचंच असं विजयने ठरवलं. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो गृहस्थ पायऱ्यांवर बसला होता तेव्हा विजय त्याच्याजवळ जात म्हणाला, "काका, थोडं बोलायचं होतं..."

त्या माणसाने विजयकडे पाहून स्मित केलं तेव्हा विजय बोलू लागला, "मी रोज तुम्हाला मांजरांना खाणं देताना पाहतो. तुम्हाला मांजरं खूप आवडतात ना..." तो माणूस हसला आणि म्हणाला, "मला मांजर अजिबात आवडत नाही..." त्याचं उत्तर ऐकून विजयला नवल वाटलं. विजय काही बोलणार इतक्यात तो माणूसच बोलता झाला, "मी दिनानाथ. इथले सगळेजण मला दिनूकाका म्हणतात. ही मागे बिल्डिंग दिसते ना, तिथे मी राहतो. मलाच नाही, तर माझ्या संपूर्ण परिवाराला मांजरं आवडत नाहीत. पण माझी पत्नी सुनंदा अत्यंत मांजरवेडी. तिला मांजरं भयानक आवडायची. घरी आणणं शक्य नव्हतं म्हणून सुनंदा इथे येऊन या मांजरांसोबत वेळ घालवायची. मांजरांना खाणं देण्याची सवयही तिचीच...

एक दिवस सुनंदाने सहज विचारलं, "अहो, मी गेल्यावर जर तुम्ही असाल, तर गल्लीतल्या त्या माऊंना खायला घालाल ना..." मला तिचा हा प्रश्न फारसा रुचला नाही. पण तिचं मन राखण्यासाठी मी होकार दिला. मी तर तो प्रश्न आणि उत्तर, विसरूनही गेलो होतो. वर्षभरापूर्वी सुनंदाला अटॅक आला आणि त्यातच ती गेली. त्यावेळी तिचा तो प्रश्न आठवला आणि मग मीसुद्धा या मांजरांना खायला द्यायचं ठरवलं. यांच्यासोबत असताना मी सुनंदासोबत आहे असं वाटतं मला..." दिनूकाकांनी चष्मा वर करून डोळ्यांच्या कडा पुसल्या. जागेवर उभे राहत त्यांनी विजयच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्यांच्या वाटेने निघून गेले. दिनूकाका, मांजरं आणि त्या मुलीच्या सानिध्यात असेच अनेक महिने गेले. कोविड १९चा संचार झाला आणि सर्वत्र लॉकडाऊन लागला...

बँकेत असल्याने विजयला वर्क फ्रॉम होम हा पर्याय नव्हता. कमीत कमी संपर्क व्हावा म्हणून विजय त्याच्या बाईकने ऑफीसला जाऊ लागला आणि माऊची गल्ली दुरावली. चार-पाच महिने तसेच गेले. एक दिवस बाईक बिघडल्याने विजयला पायी जाणं भाग होतं. पण माऊच्या गल्लीतून जायला मिळणार, ती मांजरं, ती मुलगी, दिनूकाका पुन्हा भेटणार यातच त्याला आनंद होता. "ती मुलगी, दिनूकाका ओळखतील का मला..." हा विचार करत विजय माऊच्या गल्लीत पोहोचला. त्याला दिनूकाका काही दिसले नाहीत. त्या मुलीशी आणि मांजरांशी खेळताना त्या मुलीने, "माऊकाका...???" असा प्रश्न विचारला पण विजयकडे उत्तर नव्हतं. तो तसाच ऑफीसला निघून गेला...

बरेच दिवस निघून गेले पण दिनूकाका काही आले नाहीत. शेवटी विजयने कोणालातरी विचारायचं ठरवलं. त्या मुलीचे वडील आणि ती मुलगी ओसरीवर खेळत होते. विजयने त्यांना दिनूकाकांबद्दल विचारलं. तेव्हा ते म्हणाले, "दिनूकाकांना कोरोना संसर्ग झाला, आणि त्यातच ते गेले. आज चार महिने झाले. माझी मुलगी रोज दारात येऊन बसते. पण तिचे माऊकाका काही तिला सापडत नाहीत. बिचारी उदासवाणी होते हो..." या बातमीने विजय हळहळला. त्याला काय बोलावं तेच समजत नव्हतं. विजयने एकवार गल्लीतल्या मांजरांकडे पाहिलं मग त्या मुलीकडे पाहत, "काळजी करू नकोस हां बाळा... उद्यापासून तुझे माऊकाका परत येतील बघ..." असं म्हणून, मनाशी काहीतरी ठरवून विजय त्याच्या मार्गाने निघून गेला...

पुढच्याच दिवशी ती मुलगी नेहमीप्रमाणे दारात बसली. गल्लीच्या मध्यावर तिची नजर गेली आणि टाळ्या वाजवत, "माऊकाका आले..." असं ती ओरडू लागली. आवाज ऐकून तिचे वडील बाहेर आले आणि त्यांनी पाहिलं तर, विजय तिथल्या मांजरांना खायला देत होता. त्याच्या हातात तशीच पिशवी होती जशी दिनूकाकांच्या हातात असायची. त्या मुलीला पाहून विजय तिच्याजवळ गेला. तिच्या डोळ्यात आनंद दिसत होता. विजयकडे बोट दाखवत तिने विचारलं, "माऊकाका...???" आणि पाणावलेल्या डोळ्यांनी विजयने मान हलवून होकार दिला...

दिनूकाका काळाच्या पडद्याआड गेले खरे, पण त्या छकुलीच्या माऊकाकांचा नव्याने जन्म झाला होता...

@ अनिकेत परशुराम आपटे.

No comments:

Post a Comment