Tuesday, November 9, 2021

हुंदके - तिसरा आणि शेवटचा भाग...

आत्तापर्यंत...

नेत्राला रोज रात्री भयानक स्वप्न पडतात आणि ती आपरात्री दचकून उठते. य त्रासाबद्दल जाणण्यासाठी आणि तो कमी करण्यासाठी रत्नाकर आणि सरिता, डॉ. कौशिक साने या मानसोपचारतज्ञाची मदत घेतात. नेत्रा आणि डॉ. कौशिक बोलत असताना नेत्राला सांगून आलेल्या अबीर गोखले या मुलाचा विषय निघतो आणि डॉ. कौशिक ते सेशन तिथेच थांबवतात. दुसऱ्या दिवशी घरात सगळी आवराआवर सुरू असताना आणि स्वप्नांच्या विचारात नेत्रा हरवली असताना गाडीचा हॉर्न ऐकू येतो...

अबीर, त्यांची आई म्हणजे कल्पना गोखले आणि वडील म्हणजे सुधीर गोखले यांच्यासोबत आलेला असतो. गप्पा रंगतात आणि नेत्रा व अबीर फ्लॉव्हर गार्डन पाहायला मागल्या दारी जातात. तिथे बोलत असताना नेत्राला एक दरवाजा दिसतो जो कुलूपाने बंद आहे पान कोणीतरी आतून ठोठावत आहे. हे सगळं पाहून नेत्रा बेशुद्ध पडते. रत्नाकर आणि सरिता याबद्दल गोखले दाम्पत्य आणि अबीरला सर्व सांगतात. सर्व समजल्यावर अबीर पुढच्या सेशनला नेत्रासोबत जाण्याची परवानगी मागतो. गोखले दाम्पत्य निघून जातं पण अबीर तिथेच थांबतो...

अबीर आणि नेत्रा डॉ. कौशिकच्या क्लिनिकमध्ये पोहोचतात. तिथे नेत्राला समजतं की अबीर आणि कौशिक लहानपणापासूनचे मोटर आहेत. हे कळल्यावर नेत्रालाही जरा हायसं वाटतं पण त्याच वेळी नेत्राला पुन्हा त्या सर्व भयानक गोष्टी दिसू लागतात. कधीतरी मागे घडलेली घटना या त्रासाचं मूळ असावं अशी समजूत घालत डॉ. कौशिक नेत्राला हिप्नोटाईझ करून मागे घेऊन जातात. एक एक घटना आठवत नेत्रा त्या दिवसात पोहोचते जेव्हा अबीरने नेत्राला एक मेल पाठवलेला असतो आणि संध्याकाळी मोकळी झाल्यावर नेत्रा तो मेल उघडते...

मेलमधला अबीरचा फोटो पाहून नेत्रा सुखावते. त्या रात्री तिला पहिल्यांदा ते भयानक स्वप्न पडतं. नेत्राला डॉ. कौशिक अजून मागे नेतात. त्या दिवशी ती घरात एकटी असताना एक पिक्चर पाहत झोपते पण तिला ती भयानक स्वप्न पडत नाहीत. डॉ. कौशिक नेत्राला संमोहित अवस्थेतून बाहेर काढतात आणि त्या पिक्चरचा परिणाम झाला असावा असं सांगतात. नेत्रा आणि अबीर जांभुळपाड्याला जाणार हे समजल्यावर तिथे असलेल्या घरी डॉ. कौशिक त्यांची व्यवस्था करण्याची हमी देतात. त्याच दिवशी अबीर आणि नेत्राचा साखरपुडा पार पडतो. संध्याकाळी ठरलेल्या छोटेखानी पार्टीत अबीर आणि डॉ. कौशिक बोलत असताना नेत्रा पाहते आणि तिला शंका येते...

रात्री नेत्राला पुन्हा तीच दृष्य दिसतात. या वेळी अजून काही संदर्भ समोर येतात. नेत्रा घाबरते पण काहीही न बोलता झोपी जाते व थेट सकाळी उठते. अबीरला लवकर परत जावं लागणार म्हणून जांभुळपाड्याचा निर्णय लगेच घेतला जातो आणि लगचंच सगळे निघतात. गप्पांमध्ये प्रवास सुरू असताना गाडी जांभुळपाड्याच्या वेशीपर्यंत पोहोचते. तिथे असलेल्या एका इमारतीला नेत्राने ओळखलं हे पाहून सगळे गोंधळतात. गाडी डॉ. कौशिकच्या बंगल्यात शिरते. बंगल्याच्या समोर असलेल्या वाड्याकडे पाहण्यात नेत्रा हरवून जाते. बंगल्याचा नोकर हिरू त्या वाड्याचा भूतकाळ सांगायला सुरुवात करतो. त्यात मंगळदास व गोपाळदास या दोन भावांचा आणि गोपाळदासने नव्याने घरी आणलेल्या त्याच्या पत्नीचा, राधाबाईचा उल्लेख असतो जिला मंगळदास सून म्हणून स्वीकारतो...


हिरू पुढे सांगतो की कशी या वाईट विचारांच्या राधाबाईमुळे दोन्ही भावांची वाताहात होते. राधाबाई तर मारतेच पण गोपाळही वेडा होऊन आत्महत्या करतो. राधाबाई वाईट आहे हे ऐकताच नेत्रा चवताळते पण लगेच भानावर आल्यावर तिला काहीच आठवत नाही. नेत्राला बरं वाटावं म्हणून ती आणि अबीर गावात फेरफटका मारायला जातात तेव्हा गोखले दाम्पत्य, हिरू आणि ओक दाम्पत्य तिथेच बंगल्यावर असतात. शाळेजवळ पोहोचताच नेत्राला राधाबाईच्या आयुष्यात काय घडलं ते प्रत्यक्षात दिसू लागतं. अबीरला काहीच दिसत नसतं, पण तरीही तो नेत्रासोबत राहतो. नेत्राला दिसत असलेल्या घटनांमधल्या राधाबाईचा चेहेरा तिच्यासारखा असतो, गोपाळदासचा चेहेरा डॉ. कौशिकसारखा असतो तर मंगळदासचा चेहेरा हुबेहूब अबीरसारखा असतो...

तिसरा आणि शेवटचा भाग...

तो माणूस पुढे येत म्हणाला, "गोपाळ, अरे आपलं घराणं काय, गावातली आपली प्रतिष्ठा, कशाचाही विचार केला नाहीस तू..." गोपाळदास त्याला मध्येच तोडत म्हणाला, "मंगळदादा अरे तेवढा वेळच नव्हता विचार करायला. सकाळी शेताकडे जात असताना गावाबाहेरच्या जंगलाच्या तोंडावर गर्दी दिसली. आत डोकावलं तर या राधाला आणि आनंदीला लोकांनी धरून ठेवलं होतं. कोणीतरी तिथे उठवलं होतं की राधा आणि आनंदी या माय-लेकी, माणसं खाणाऱ्या हडळी आहेत. राधाच्या पहिल्या नवऱ्यालाही म्हणे या दोघींनीच मारलं. आजकालच्या जमान्यातही हे असले विचार करतात लोक... तिचा नवरा तापाच्या साथीत गेला, पण हे अडाणी गावकरी... मला रहावलं नाही. जमिनीवर पडलेलं तिचं मंगळसूत्र मी उचललं आणि तिच्या गळ्यात घातलं..." मंगळदास अजून चिडला. त्याच स्वरात बोलता झाला, "अरे तुला इतकाच पुळका आला होता, तर घरातली मोलकरीण बनवून आणायचंस तिला. किंवा गावातच उजवायची तिला. पण तू... जातीबाहेरच्या या बाईशी लग्न करून तू घराण्याला काळिमा फासला आहेस गोपाळ..."

मंगळदासचा आवेश जरा कमी होण्यासाठी गोपाळने काही क्षण जाऊ दिले. मग खिडकीबाहेर दिसत असलेल्या राधाबाई व आनंदीला पाहत तो म्हणाला, "दादा, त्यावेळी मला जे योग्य वाटलं तेच मी केलं. आता राधा माझी लग्नाची बायको आहे आणि या घरची मालकीण. तुला जर हे पटत नसेल तर..." गोपाळदासच्या या वाक्याने मंगळदास हबकला. तो रागाने लाल होत गोपाळदास जवळ गेला. मग आपला चेहेरा सौम्य करत गोपाळदासच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, "गोपाळ, तू केलंस ते योग्यच होतं. आता नव्या नवरीला असं दारातच उभं ठेवणार आहेस का... चल..." दोघंही बाहेर आले. मंगळदास पुढे होत म्हणाला, "या घरात बाईमाणूस नाही. त्यामुळे तुमचं स्वागत कसं करायचं ते समजत नाहीये..." राधाबाईचे डोळे पाणावले. तिने मंगळदासला वाकून नमस्कार केला. तिला पाहून आनंदीनेही मंगळदासला नमस्कार केला. सर्वजण आत गेले. हे सर्व पाहणारी नेत्रा मनातून सुखावत होती. तिघांनाही आराम करायला सांगून मंगळदास झोपाळ्यावर येऊन बसला...

निजानीज झाली. वातावरण शांत झालं आणि झोका घेणाऱ्या मंगळदासच्या चेहेऱ्यावरचे भाव बदलले. मंगळदासचे डोळे रागाने लाल होऊ लागले. तो काहीच बोलत नव्हता, पण नेत्राला त्याच्या मनातले विचार स्पष्ट ऐकू येऊ लागले, "कोण कुठली ही राधाबाई आणि तिची पोर आनंदी... हा गोप्या तर महामूर्ख आहे. म्हणे लग्न केलं. हा गोप्या सावत्र असून माझ्या बापाचा त्याच्यावर जीव. सगळी इस्टेट त्याच्या नावे केली आणि मी सख्खा असून मला काहीच नाही... आत्तापर्यंत या गोप्याला हातातलं खेळणं बनवून ठेवलं होतं मी, या बयेच्या येण्याने ही शेळी वाघासारखी बोलायला लागली आहे. या राधाबाईचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा. पण त्या आधी या गोप्याला तालुक्याला धाडून देतो. नाहीतरी वकिलांकडून कागदपत्र आणून त्यांच्यावर या गाढवाची सही घ्यायची होती. आता तो स्वत: जाईल त्यांच्याकडे. गोप्या नसताना राधाबाईला हाकलणं सोप्पं जाईल...” काही क्षणातच मंगळदास झोपाळ्यावरून उठला आणि आत जात गायब झाला. मंगळदासचे हे विचार ऐकून नेत्रा अवाक झाली. आत्ताचा मंगळदास खरा की मगाचचा खरा हाच प्रश्न तिला पडला होता. नेत्रा विचार करतच होती की तिची नजर तिच्या हातावर असलेल्या घड्याळावर गेली...

घड्याळातले काटे अचानक गरा गरा फिरू लागले आणि सातवर येऊन थांबले. नेत्राने पाहिलं तर मंगळदास पुन्हा झोपाळ्यावर बसला होता आणि गोपाळदास दारात उभा होता. मंगळदास म्हणाला, "गोपाळ, कालच्या गडबडीत सांगायचं राहून गेलं. आज वकिलसाहेबांनी बोलावलं आहे कागदपत्र आणायला. मी जाण्यापेक्षा तूच का नाही जात... मी जाणार, कागद घेऊन येणार मग तू सही करणार मग कागद परत जाणार, यापेक्षा तूच गेलास तर एक दिवस वाचेल की... आत्ताच निघालास तर उद्या संध्याकाळपर्यंत परतही येशील तू. आता लग्न झालंय तुझं. थोड्या जबाबदाऱ्या तुलाही स्वीकारायला हव्याच की..." गोपाळदासला मंगळदासचं म्हणणं पटलं. तो आत जात गायब झाला. घड्याळाचे काटे पुन्हा फिरू लागले आणि नऊवर येऊन थांबले. फाटकाबाहेर बैलगाडी उभी होती आणि त्यात गोपाळदास बसून फाटकाच्या दिशेने हात हलवत होता. आनंदी आणि राधाबाई फाटकात उभ्या राहून त्याला प्रतिसाद देत होत्या. बैलगाडी गेली आणि आनंदी व राधाबाई घराकडे परतल्या...


"
गोपाळदास, अरे थांब... नको जाऊस... राधाबाईला घराबाहेर काढण्याचा इरादा आहे मंगळदासचा. गोपाळदास..." गेटमध्ये उभी राहून नेत्रा बैलगाडीकडे हात करत ओरडत होती. थोडी दूर जात गाडी गायब झाली. नेत्राला हलवत अबीर म्हणाला, "नेत्रा अगं काय चाललंय तुझं... कोण आहे इथे... नेत्रा..." अबीरचा हात झटकत नेत्रा घराकडे गेली. तिथे मंगळदास झोपाळ्यावर बसला होता. पायऱ्या चढून वर जात राधाबाई म्हणाली, "आनंदे, जा बगू, तुजी खोली साफ कर. तोवर म्या तुज्यासाटी खायला आनते..." आनंदी खोलीत पळाली आणि मंगळदासकडे पाहत राधाबाई म्हणाली, "दादा, चा टाकते बरं तुमच्यासाटी..." राधाबाई आत गेली. मंगळदासने चौफेर नजर फिरवली. कोणी नाही याची खात्री करून तो उठला आणि आत गेला. राधाबाई स्वयंपाक घरात शिरतच होती की मंगळदास बोलता झाला, "थांब तिथेच... चहा तर लांबची गोष्ट आहे. तुझ्या हातचं पाणीही मी प्यावं इतकी ही लायकी नाही तुझी..."

मंगळदासच्या बोलण्याने राधाबाई अवाक झाली. मंगळदास पुढे बोलता झाला, "कोण कुठली तू... त्या बावळट गोपाळदासला भूल पाडलीस आणि इथे आलीस. गावकरी बरोबर बोलत असणार, तूच तुझ्या नवऱ्याला मारलंस आणि पैशासाठी या गोपाळदासशी लग्न केलंस. तो मूर्ख आहे. पण मी तुला बरोबर ओळखलं आहे. ताबडतोब काळं कर या घरातून. आणि तुझ्या त्या पोरीलाही घेऊन जा..." असं म्हणून मंगळदासने राधाबाईला हाताला धरून ढकललं. राधाबाई दारावर आदळली आणि तिचा पदर थोडा खाली सरकला. हे पाहून मंगळदासच्या चेहेऱ्यावरचे भाव बदलले. मंगळदास तिला वरपासून खालपर्यंत पाहू लागला आणि राधाबाई पदर सावरून आनंदीकडे जाऊ लागली. मंगळदास म्हणाला, "थांबजाणार तर तू आहेसच. पण जाण्याआधी माझी तहान भागव..." डोळे पुसत राधाबाई स्वयंपाकघराकडे वळली तशी तिचा पदर धरत मंगळदास म्हणाला, "मला पाण्याची नाही, तर तुझ्या या शरीराची तहान लागली आहे..."

हे ऐकून राधाबाई हादरली. स्वत:चा पदर खेचून घेत ती दूर झाली आणि म्हणाली, "दादा, हे काय बोलतायसा... थोरली वैनी आयपरमाने असती तर धाकली बैनीसारखी असती. म्या तुमची धाकली वैनी, तुमच्या पाटच्या भावाची बायको, तुम्माला बैनीसारखी, अन् तुम्मी..." राधाबाईकडे रोखून पाहत मंगळदास म्हणाला, "वहिनी, आई, बहिण, हे शब्द तुझ्यासाठी नाहीत. आत्ता मला तुझ्यात फक्त माझी तहान भागवण्याचं साधन दिसतंय. तू मला हवं ते दिलंस, तर तू गेल्यावर या आनंदीचा सांभाळ मी करेन. तिला शाळेत घालेन, चांगल्या घरात लग्न करेन तिचं. तुझ्या वाट्याला जे आलं ते तिच्या वाट्याला नाही येऊ देणार मी. पण जर तू माझं ऐकलं नाहीस, तर..." असं म्हणून आनंदी खेळत होती त्या खोलीत मंगळदास गेला आणि आनंदीचे केस पकडून त्याने तिला उचललं व तिचा गळा दाबू लागला. त्यासरशी राधाबाई खोलीजवळ येत म्हणाली, "नगं नगं, आसं नका करू. तुम्माला जे हवं... ते... देते म्या..."

मंगळदासच्या चेहेऱ्यावर स्मित आलं. त्याने आनंदीला सोडलं. तिने लगेच, "आय... आय..." असं म्हणत राधाबाईकडे धाव घेतली. मंगळदासने तिला पुन्हा मागे खेचत जमिनीवर ढकललं आणि डोळे मोठे करून आनंदीकडे पाहत म्हणाला, "ए चिमुर्डे, तुझी आई माझ्या ताब्यात आहे. तू आणि तुझा आवाज, अजिबात या खोलीच्या बाहेर येता कामा नये. नाहीतर..." असं म्हणून मंगळदासने दार व खिडकी लाऊन घेतली. खिडकीची कडी लावली आणि दाराला कुलूप लाऊन चावी तिथेच बाजूच्या टेबलवर ठेवली. मग राधाबाईच्या जवळ येत मंगळदास म्हणाला, "राधाबाई, चला... आपल्याला त्या खोलीत जायचं आहे. चावी तर इथेच ठेवली आहे. माझी तहान भागली, की तू उघड हे दार... हा...हा...हा..." राधाबाईचा दंड धरून मंगळदास तिला खेचत नेऊ लागला. राधाबाईच्या डोळ्यांना पाण्याची धार लागली होती. आनंदीच्या खोलीच्या दाराकडे पाहत जड पावलांनी ती मंगळदाससोबत दुसऱ्या खोलीत जाऊ लागली. खोलीत असलेल्या खाटेवर मंगळदासने राधाबाईला ढकललं आणि विकृत हसत त्याने खोलीचं दार लाऊन घेतलं...

नेत्रा दोन्ही बंद खोल्यांच्या मध्ये उभी होती. एका खोलीतून, "आय, मला भिती वाटती हितं. ये ना गं... मला भूक लागली..." असं रडवेल्या हलक्या स्वरात आनंदी बोलत होती, तर दुसऱ्या खोलीतून राधाबाईच्या हुंदक्यांचा आवाज येत होता. नेत्राने दोन्हीही खोल्यांकडे हात केला आणि तिची नजर तिच्या हातावरच्या घड्याळाकडे गेली. घड्याळातले काटे गरा गरा फिरत पुढे धाऊ लागले. बघता बघता तो दिवस सरून दुसऱ्या दिवसाची संध्याकाळ आली. आनंदी ज्या खोलीत होती, त्या खोलीतून आवाज येणं बंद झालं. बाजूच्या खोलीतले राधाबाईचे हुंदकेही बंद झाले होते. खोलीचं दार उघडलं. मिशांवरून हात फिरवत मंगळदास दारात दिसला. मागे वळत तो म्हणाला, "तू तुझं काम केलंस. माझी तहान भागली. तो गोप्या यायची वेळ झाली आहे. तू निघून जा इथून. त्या आनंदीची काळजी नको करूस. तिला मी सांभाळेन..." नेत्राने खोलीत डोकावलं, तर फाटकं लुगडं अंगाभोवती गुंडाळलेली राधाबाई जमिनीवर बसली होती...


मंगळदासने आनंदीच्या खोलीचं दार उघडलं. आनंदी भिंतीकडे तोंड करून जमिनीवर झोपली होती. तिच्याकडे पाहत मंगळदास म्हणाला
, "ए चिमुर्डे, तुझी आई निघाली बघ. तिला भेटून घे एकदाचं..." तिथे भिंतीचा आधार घेत राधाबाई कशीबशी उभी राहिली आणि हळूहळू चालत आनंदीच्या खोलीपर्यंत आली. झोपलेल्या आनंदीजवळ जात राधाबाईने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. डोळ्यांच्या कडा पुसत राधाबाई म्हणाली, "आनंदे... म्या भाईर जाऊ येती. तू हितंच ऱ्हा अन् काकांना तरास देऊ नगं... गुनाची पोरी ती. चल, ऊठ पाहू. म्या जेवनाचं बगते..." हे बोलत असतानाच तिने आनंदीला हलवलं तरी ती उठली नाही. राधाबाईने आनंदीला कुशीवरून पाठवर झोपवलं. त्यावेळी तिचे उघडे डोळे, कोरडे पडलेले ओठ आणि निपचित शरीर पाहून राधाबाईला धक्का बसला. "आनंदे... अगं आ...नंदे... अगं ऊठ... आनंदे..." राधाबाई आनंदीला उठवत होती पण आनंदी कायमची झोपली होती...

हे दृश्य पाहून दारात उभा असलेला मंगळदास म्हणाला, "मेली की काय... चला, ब्याद टळली एकदाची..." असं म्हणत कुत्सित हसत मंगळदास झोपाळ्यावर येऊन बसला. राधाबाई त्याच्या मागे मागे दाराबाहेर आली. मंगळदासकडे बोट दाखवत ती म्हणाली, "तू मारलंस माज्या पोरीला. तुज्या तहानेसाटी माजी पोर उपाशीपोटी, बिनपान्याची ऱ्हायली आनि त्यातंच ती गेली. तू नीच हायेस..." मंगळदास ताडकन झोपाळ्यावरून उठला आणि राधाबाईला म्हणाला, "मी... हा...हा... मी नाही, तूच मारलंस तुझ्या मुलीला. तिच्या अन्न-पाण्याची सोय तुलाच पहायची होती. पण तू तिकडे माझ्यासोबत... पोटच्या पोरीच्या तहान-भुकेपेक्षा तुला तुझी शारिरीक भूक जास्त प्रिय होती. तुझ्याचमुळे आनंदी मेली..." हे ऐकून राधाबाईच्या आसवांनी भरलेल्या डोळ्यात राग दाटून आला आणि बाजूलाच ठेवलेली फुलदाणी, पूर्ण तकदीनिशी उचलून राधाबाईने मंगळदासवर वार केला. मंगळदास डोकं धरून खाली कोसळला आणि त्याचवेळी त्याला समोरून गोपाळदास येताना दिसला...

गोपाळदासला पाहून मंगळदास एकदम ओरडला, "गोपा...ळ... अरे वाचव मला... या कुल्टेने आनंदीला मारून टाकलं आणि आता मलाही मारू पाहते आहे..." मंगळदासच्या ओरडण्याने राधाबाईने समोर पाहिलं, तर गोपाळदास फाटकात उभा होता. हे पाहून तिच्या हातून फुलदाणी गळून पडली. "न्हाई न्हाई म्या कुल्टा न्हाई..." असं ओरडत राधाबाई जंगलाच्या दिशेने पळाली. नेत्रासुद्धा राधाबाईच्या मागे गेली. राधाबाई जंगलात धावत होती. एका ठिकाणी ती ठेच लागून पडली. राधाबाईने सभोवताली पाहिलं, तर किर्र झाडी होती. तिच्या पायातून रक्त येत होतं. झाडाचा आधार घेऊन ती उठणारच होती, की तिला गुरगुरण्याचा आवाज आला. राधाबाई घाबरली. तिने नजर वळवली आणि दोन चमकदार डोळे तिला दिसले. भेदरलेल्या नजरेने राधाबाई त्या डोळ्यांकडे पाहत असतानाच पुढे येत असलेल्या लांडग्याने तिच्यावर झडप घातली. राधाबाई जिवाच्या आकांताने किंचाळली. त्याचवेळी लांडग्याने राधाबाईच्या नरडीचा घोट घेतला...

"मंगल.... तुला... सो...ड...णा...र न्हा..." शेवटचा श्वास घेणाऱ्या राधाबाईने कसेबसे हे शब्द उच्चारले आणि प्राण सोडले. विजेची एक लकेर राधाबाईच्या शरीरातून निघाली आणि वाड्याकडे गेली. आनंदी असलेल्या खोलीच्या बंद दाराआड ती वीज गेली आणि "खा...ड" असा आवाज करत दाराचं कुलूप हललं. दारासमोर नेत्रा उभी होती. तिच्या हातातलं घड्याळ चमकू लागलं. काटे गरागरा फिरू लागले. काळ आजच्या दिवसावर परत आला. सगळीकडे जळमटं, अंधार असलेल्या त्या जागेत अबीर व नेत्रा उभे होते. सगळं वातावरण शांत होतं. अबीरकडे पाहत नेत्रा म्हणाली, "अबीर... तू... तू केलंस हे..." बंद दाराकडे जात अबीर म्हणाला, "म्हणजे तुला सगळं आठवलं तर… हेच तर मला हवं होतं. लहानपणापासून मलाही त्या आनंदीचा आवाज ऐकू यायचा, हा दरवाजा मलाही दिसायचा. जसजसा मोठा होत गेलो तसतशा मला मंगळदासच्या इतर काही गोष्टी दिसू लागल्या...

माझी खात्री पटली, माझ्या रूपात मंगळदासचा आणि कौशिकच्या रूपात गोपाळदासचा पुनर्जन्म झाला आहे. आम्ही दोघं लहानपणापासून एकत्र, पण कौशिकने मला कधी काही जाणवू दिलं नाही. अर्थात, काय झालं होतं हे त्याला माहितच नव्हतं म्हणा... त्यालाच काय, तुलाही सगळं कुठे माहित आहे... राधाबाईने फुलदाणी मारली आणि गोपाळला पाहून जंगलाकडे पळाली. गोपाळदास मंगळदासजवळ आला. मंगळदासने त्याला सांगितलं, की राधाबाई एक कुलटा आहे आणि पैशासाठी तिने गोपाळशी लग्न केलं आहे. शिवाय राधाबाईची शारिरीक भूक भागवण्यासाठी तिने मंगळदासला फरशी पाडायचा प्रयत्न केला आणि आनंदीला हे समजल्यामुळे तिलाही मारलं... त्या मूर्ख गोपाळचा यावर विश्वास बसला आणि राधाबाईला मारायला तो कोयता घेऊन तिच्या मागे जंगलात गेला...

या संधीचा फायदा घेऊन मंगळदासने आनंदीला तिथे खोलीतच पुरून टाकलं आणि दाराला कुलूप लावलं. इतक्यात त्याला जोरदार ओरडण्याचा आवाज आला. तो आवाज गोपाळचा होता. मंगळदास घराबाहेर आला तर गावकरी जंगलाच्या दिशेने पळत होते. मंगळदासही त्यांच्यासोबत जंगलाच्या दिशेने गेला. एका झाडाजवळ गोपाळ उभा होता. त्या झाडापासून काही अंतरावर काहीतरी हालचाल दिसली. मंगळदास आणि ते गावकरी गोपाळदास जवळ पोहोचले. गोपाळदासचा चेहेरा पांढराफटक पडला होता. डोळे भितीने गोठले होते आणि जबडा पूर्ण उघडा होता. गोपाळदास पाहत असलेल्या दिशेला सर्वांनी पाहिलं तर एक प्राणी काहीतरी ओढत होता. तितक्यात ढगाआड लपलेला चंद्र बाहेर आला आणि त्याचा प्रकाश त्या जनावरावर पडला. तो एक लांडगा होता आणि ते निपचित पडलेलं शरीर राधाबाईचं होतं...

त्या लांडग्याचे लालबुंद डोळे पाहून आधी सगळे घाबरले. पण सर्वांनी जोरजोरात ओरडायला सुरुवात केल्यावर ते जनावर जंगलात पळालं. मंगळदास आणि इतर गावकरी गोपाळदासला घेऊन गावात परतले. गोपाळदासच्या डोक्यावर जबरदस्त परिणाम झाला होता म्हणून मंगळदासने त्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. ही संपत्ती हे वैभव आपण एकटेच उपभोगणार म्हणून मंगळदास खुश होता. पण डॉक्टर म्हणाले गोपाळदास ठिक होऊ शकतो. मग मंगळदासने हॉस्पिटलमधल्या एका माणसाला पैसे चारून त्याच्याकरवी गोपाळदासचा खून करवला आणि मग त्या माणसालाही मारून टाकलं. मंगळदासला वाटलं सगळं संपलं, पण नाही. आनंदीचं प्रेत जिथे पुरलं होतं त्या खोलीने मंगळदासला कधी शांतता लाभू दिली नाही. गावातलं एकमेव श्रीमंत घर असल्याने लोकांची रेलचेल, शिवाय जंगलातले लांडगे, यामुळे मंगळदास आनंदीच्या प्रेताला कधी बाहेर काढू शकला नाही...

मंगळदासने ठरवलं, की गावाकडची सगळी संपत्ती, जमीन-जुमला विकून इथून कायमचं निघून जायचं. पण हा वाडा दुसऱ्याच्या हाती गेला असता तर त्या प्रेताने कधीतरी डोकं वर काढलंच असतं. म्हणून, त्या कुलटा राधाबाईचं पिशाच्च या वाड्यात वावरतंय अशी अफवा मंगळदासने गावात पसरवली. वाड्याच्या समोरच्या घरात राहणाऱ्या मधूकाकाने मंगळदासला शहरात त्याच्या मुलाकडे जायला सांगितलं. मंगळदास शहरात गेला. तिथे त्याचं लग्नही झालं. लग्नानंतरच मंगळदासला धंद्यात खोट बसली. त्याची सगळी संपत्ती निघून गेली आणि त्याच धक्क्याने लग्नाच्या सहा महिन्यातच मंगळदास गेला. त्यावेळी त्याची बायको प्रेग्नंट होती. काही महिन्यांनी तिला एक मुलगा झाला. तो मुलगा म्हणजे मी. माझं नाव अबीर गोखले नाही, तर अबीर जहागीरदार आहे. माझी आई मला जन्म देऊन मरण पावली. शहरात आमच्या शेजारी राहणाऱ्या गोखले नावाच्या दामपत्याने मला दत्तक घेतलं...

गोखले दामपत्याला नंतर अजून एक मुलगा झाला. मी मोठा झालो तसं माझ्या दत्तक बापाने विल केलं. सगळी संपत्ती आम्हा दोघांमध्ये वाटली. पण मला सगळा पैसा हवा होता. ऍक्सिडेंट करवून मी त्या हिस्सेदारासह गोखले दामपत्यालाही संपवलं आणि इथली सगळी संपत्ती विकून सिंगापूरला निघून गेलो. शहरात मंगळदास ज्याच्याकडे आला होता, त्याचा मुलगा म्हणजे कौशिक साने. आमची चांगली मैत्री होती. सिंगापूरला गेल्यावरही आम्ही सोशल मीडियावर कनेक्टेड होतो. मला जे सगळं दिसत होतं ते कदाचित त्यालाही दिसत असावं, पण कौशिकने कधी मला काही जाणवू दिलं नाही. मी त्याला त्याच्या आयुष्यासोबत सोडून द्यायचं ठरवलं. पुढे मलाही सगळ्याचा विसर पडला. लग्नाचं वय झालं होतं. भारतीयच बायको करावी म्हणून वेबसाईटवर नाव रजिस्टर केलं आणि पहिलीच प्रोफाईल तुझी दिसली. तुझा चेहेरा पाहून भूतकाळाने पुन्हा डोकं वर काढलं. तुला आणि कौशिकला संपवून, पुनर्जन्माची ही सिस्टीमच बंद करायची असा विचार करून मी एक प्लॅन बनवला...

तुझ्याशी जवळीक वाढवली. माझ्यावर प्रेम करायला तुला भाग पाडलं. गोष्टी लग्नापर्यंत आल्या. तुमच्यासारखी माणसं फक्त मुलावर समाधानी नसतात. तुम्हाला मुलाचे नातलगही हवे असतात. भारतात आल्यावर एका भाडोत्री जोडप्याला तयार केलं आणि माझे आई-बाबा बनवून त्यांना तुमच्या समोर आणलं. इथे आल्यावर तुझी आणि कौशिकची भेट झाल्याचं मला समजलं. तुझ्यासोबत कौशिकच्या क्लिनिकमध्ये आलो आणि तिथेच ठरवलं, तुम्हा दोघांना अज्ञानात मारण्यापेक्षा सर्व आठवल्यावरच तुम्हाला संपवायचं, आणि तेही तिथेच जिथून या सर्वाला सुरुवात झाली. पार्टीत मी त्या भाडोत्री जोडप्याला कौशिकपासून दूर ठेवलं. ते समोर आले असते तर तिथेच माझं बिंग फुटलं असतं. तू मला आणि कौशिकला बोलताना पाहिलंस. तेव्हा तो मला सांगत होता की त्याला सर्व आठवतंय. आता थांबणं शक्य नव्हतं. त्याच रात्री मी कौशिकच्या घरी गेलो आणि त्याला जांभुळपाड्याला यायला सांगितलं. तूही जांभुळपाड्याला गेली आहेस आणि मला तिथेच तुम्हा दोघांची माफी मागायची आहे असं सांगितल्यावर कौशिक तयार झाला...

मी त्याला मुद्दाम जुन्या रस्त्यावरून नेलं. एका निर्जन ठिकाणी थांबून कौशिकच्या डोक्यात फटका मारून त्याला बेशुद्ध केलं. खोपोली क्रॉस करून गाडी घाटात नेली आणि संधी साधून बेशुद्ध असलेल्या कौशिकला ड्रायव्हर सीटवर बसवून गाडी खाली ढकलून दिली. गाडीला आग लागल्याचं दिसलं आणि मी परत फिरलो. माझ्या त्या भाडोत्री जोडप्याने आधीच जांभुळपाड्याला येऊन त्या हिरूचा काटा काढला होता आणि त्याची जागा घेतली राणाने. कौशिकही संपला होता. आता उरली होतीस तू. सकाळी तुमच्या घरी येऊन लगोलग तुम्हाला इथे जांभुळपाड्याला आणलं. मला खात्री होती, इथे आल्यावर तुला सगळं आठवणार. पुढचं सगळं तुला माहितच आहे. तिथे माझ्या माणसांनी तुझ्या आई-बापाला मारलं असेल. आता तूही नाही वाचणार. तुला एकदाची संपवली की सगळी कटकटच संपेल..." असं म्हणत अबीरने नेत्रासमोर पिस्तुल धरलं...

हे सर्व ऐकून सुन्न झालेली नेत्रा पिस्तुल समोर पाहून भानावर येत म्हणाली, "नीच माणसा... किती खालच्या पातळीला जाशील... इतकी वाईट कृत्य करूनही तुझं पोट भरलं नाही अजून... देव बघतोय. तुला याची फळं इथेच भोगावी लागतील..." हे ऐकून अबीर हसत म्हणाला, "हा...हा...हा... देव त्याही वेळी काही करू शकला नाही आणि आत्ताही काही करणार नाही. या गनसमोर तोही फोल आहे... सो नेत्रा, गेट रेडी टू डाय..." हे बोलत असतानाच अबीरने पिस्तुल अजून पुढे केलं आणि तो चाप ओढणार इतक्यात एक दगड येऊन त्याच्या हाताला लागला. चाप ओढला गेला, पण गोळी नेत्राच्या खांद्याच्या बाजूने निघून गेली आणि पिस्तुल खाली पडलं. दगड आला त्या दिशेला अबीरने पाहिलं तर डोक्यावर पट्टी बांधलेला कौशिक समोर उभा होता. कौशिकला पाहून अबीर अजून चवताळला. त्याच्याकडे पाहत म्हणाला, "तू जिवंत आहेस तर... आता तुला सोडणार नाही..."

अबीर कौशिकवर धाऊन गेला. दोघांमध्ये हाणामारी सुरू झाली. एकमेकांची कॉलर पकडत दोघं घराबाहेर फेकली गेली. हे सर्व पाहत असलेल्या नेत्राला काहीतरी सुचलं. तिने बाजूलाच पडलेला एक दगड उचलला आणि आनंदीचं प्रेत पुरलं होतं त्या दाराच्या कुलुपावर मारू लागली. काही क्षणातच कुलूप तुटलं. नेत्राने कडी काढून दार ढकललं. आतून खूप प्रखर असा प्रकाश नेत्राच्या डोळ्यांवर पडला. तिचे डोळे दिपले. "आय, तू आलीस..." या वाक्याने नेत्राचे डोळे उघडले आणि ती प्रकाशाच्या दिशेने पाहू लागली. प्रकाश अजून वाढत गेला आणि नेत्रा त्यात दिसेनाशी झाली. तिथे अबीर आणि कौशिकचं द्वंद्व सुरूच होतं. कौशिकने अबीरला ढकललं तसा तो मागे जात जमिनीवर पडला. बाजूलाच मघाशी हातून निसटलेलं पिस्तुल पडलं होतं. अबीरने ते उचललं आणि कौशिकवर गोळी झाडली. गोळी कौशिकच्या दंडाला चाटून गेली. दंड पकडून कौशिक विव्हळू लागला. अबीर दुसरी गोळी चालवणार इतक्यात त्याच्या हाताला गोळी लागली...

अबीरच्या हातून पिस्तुल पुन्हा दूर फेकलं गेलं. कौशिक व अबीरने गोळी आलेल्या दिशेला पाहिलं तर हातात पिस्तुल घेऊन इंस्पेक्टर व काही हवालदार उभे होते. नेत्राचे आई-वडील व बेड्या घातलेली अबीरची माणसंही बाजूलाच होती. कौशिक म्हणाला, "अबीर, तू मला मारायचा प्रयत्न केलास, पण माझं दैव बलवत्तर म्हणून मी वाचलो. मोक्याच्या क्षणी मला शुद्ध आली आणि मी गाडीतून उडी घेतली. कसाबसा रस्त्यावर येऊन पुन्हा बेशुद्ध झालो. प्रवाशांपैकी कोणीतरी मला हॉस्पिटलला नेलं. तिथे आलेल्या पोलीसांना मी सर्व सांगितलं आणि आम्ही सगळे लगोलग निघालो. इंस्पेक्टर साहेब नेत्राच्या आई-बाबांना वाचवायला गेले आणि मी इथे आलो. मला वाटलं मंगळदासच्या कृत्यांचा तुला पश्चात्ताप झाला म्हणून तू मला इथे आणणार होतास, पण तू..." कौशिकचं बोलणं पूर्ण होत होतं तोच इंस्पेक्टर पुढे होत म्हणाला, "मि. अबीर, डॉ. कौशिकसोबत हे सर्व तुमच्या विरुद्ध साक्ष द्यायला तयार आहेत. तुमचा खेळ संपला आहे. चला..."

अबीर खाली मान घालून पोलीसांसोबत जाऊ लागला. काही पावलं चालल्यावर त्याने इंस्पेक्टरला धक्का दिला आणि त्याच्या हातातलं रिव्हॉल्व्हर खेचून घेतलं. सर्वांकडे ते रिव्हॉल्व्हर रोखत अबीर म्हणाला, "हा...हा...हा... अबीरचा खेळ संपला असेल, पण मंगळदासचा डाव अजून बाकी आहे. या गनमध्ये अजून आठ गोळ्या शिल्लक आहेत, आणि तुम्ही सगळे पण आठच आहात. मला कोणीच हरवू शकत नाही. मंगळदास आहे मी मंगळदास. हा...हा...हा..." अबीर मोठ-मोठ्याने हसत होता. त्याच्या डोळ्यात वेडाची झाक दिसत होती. हवालदार आणि इंस्पेक्टर त्याच्याजवळ सरकत होते तोच, "व्हय. मंगलदास हायस तू मंगलदास... नीच आन् पापी राक्षस..." या आवाजाने सर्व चपापले. सर्वांनी आवाजाच्या दिशेने पाहिलं तर समोर नेत्रा होती. ती हवेत तरंगत होती. तिचे मोकळे सुटलेले केस, राखाडी छटा असलेलं शरीर पाहून सर्वजण स्तब्ध झाले. अबीरही चांगलाच घाबरला. त्याच्या हातून पिस्तुल गळून पडलं. नेत्राने अबीरच्या दिशेने पाहत आपला हात वर उचलला, तसा अबीरही वर उचलला गेला...

जवळ जवळ दोन-तीन पुरुषभर हवेत गेल्यामुळे अबीर अजूनच घाबरला. तो सगळीकडे पाहत असतानाच नेत्रा पुन्हा भसाड्या आवाजात म्हणाली, "मंगलदास... तू माज्या आयला तरास दिलास, माला बंद करून ठिवलंस, तुला मरायाच हवं..." असं म्हणत नेत्राने तिच्या हाताची बोटं जवळ आणायला सुरुवात केली. त्याबरोबर अबीरचा गळा आवळू लागला. काही क्षणातच अबीरचे प्राण जाणार हे लक्षात येताच कौशिक ओरडला, "थांब आनंदी. असं करू नकोस. तू या मंगळदासला मारशील, पण शिक्षा तुझ्या आईला मिळेल. नेत्राच्या रूपाने परत आलेल्या तुझ्या आईला पुन्हा त्रास व्हावा असं वाटतंय का तुला..." हे ऐकून कौशिककडे पाहत नेत्राने आपली बोटं मोकळी केली आणि आपला हात खाली आणला. त्यासरशी अबीर जमिनीवर कोसळला. उभा राहत स्वत:ला चाचपडत अबीर हसू लागला आणि म्हणाला, "हा...हा...हा... मंगळदासला कोणीच हरवू शकत नाही... हा...हा...हा..." विकृत हसत अबीर जंगलाच्या दिशेने पळाला...

नेत्रा हळू हळू जमिनीवर उतरली. तिच्या शरीराला एक झटका लागला आणि ती कोसळली. बाजूला एक पांढरी आकृती उभी होती. तो आनंदीचा आत्मा होता. त्या आकृतीने जंगलाच्या दिशेने पाहिलं आणि तिने क्षणार्धात एका हिंस्त्र लांडग्याचं रूप घेतलं. जराही न थांबता तो लांडगा जंगलाच्या दिशेने धावत सुटला. लांडगा लांब गेल्यावर कौशिक आणि नेत्राचे आई-वडील नेत्राजवळ आले. नेत्राचं डोकं मांडीवर घेत सरिता  म्हणाली, "नेत्रा, ऊठ बाळा... अहो, ही उठत नाही हो..." काही क्षणात नेत्रा शुद्धीवर आली. स्वत:ला चाचपडलं, उठून उभी राहत ती म्हणाली, "मी इथे कशी... मी तर आत त्या खोलीसमोर होते. कुलूप तोडलं आणि... आनंदी कुठे आहे... आणि अबीर..." नेत्राच्या डोक्यावरून हात फिरवत रत्नाकर म्हणाले, "नेत्रा, शांत हो बेटा..." आणि आत्ता घडलेली सर्व हकीगत रत्नाकरने नेत्राला सांगितली. "आनंदे... अगं आनंदे..." अशी हाक मारत नेत्रा जंगलाच्या दिशेने पळत सुटली. कौशिक, रत्नाकर, सरिता आणि पोलीसदेखील नेत्राच्या मागून गेले...


तिथे जंगलात धडपडत
, ठेचकाळत अबीर वाट फुटेल तिथे धावत होता. दगडाला अडखळून तो पडला. त्याने सभोवताली पाहिलं. किर्र झाडी, प्रकाशाचे हलके हलके कवडसे, याशिवाय काहीच नव्हतं. अबीर उभा राहणारच होता, इतक्यात त्याला गुरगुरण्याचा आवाज आला. भेदरलेल्या डोळ्यांनी त्याने वळून पाहिलं. त्याच्यासमोर एक लांडगा उभा होता. त्याच्या अंगाभोवतीचं प्रकाशाचं वलय, लाळ गाळणारे त्याचे दात आणि निखाऱ्यासारखे डोळे पाहून अबीरने कांठळ्या फोडल्या. अबीरचा आवाज जंगलात घुमला. नेत्रा आणि इतर सर्वजण आवाजाच्या दिशेने येत अबीरपर्यंत पोहोचले. समोरचं दृश्य भयंकर होतं. डोळे सताड उघडे ठेऊन अबीर निपचित होऊन जमिनीवर पडला होता आणि एक लांडगा त्याच्या नरडीचा घोट घेत होता. समोर पाहत तो लांडगा उठला आणि पुन्हा रूप बदलून पांढऱ्या आकृतीत परिवर्तीत झाला. "आ...ऽऽऽय..." अशी हाक मारत ती आकृती नेत्राच्या दिशेने येत तिच्या शरीराच्या पार जात वाड्याच्या दिशेने नाहीशी झाली. वाड्याच्या दिशेला पाहत इंस्पेक्टर म्हणाला, "कायद्याच्या वरही विधाता नावाची एक शक्ती असते. त्या विधात्यानेच मंगळदास व अबीरचा न्याय केला. मि. कौशिक आणि मिस नेत्रा, तुम्ही प्लीज स्टेटमेंट द्यायला उद्या चौकीवर या. घेऊन चला रे या सर्वांना..."

अबीरच्या माणसांना घेऊन पोलीस निघून गेले. कौशिककडे वळत नेत्रा म्हणाली, "मंगळदासचा न्याय तर झाला, पण आनंदी... ती अजूनही त्याच फेऱ्यात अडकलेली आहे. तिलाही मुक्ती मिळायला हवी..." कौशिकला नेत्राचं म्हणणं पटलं. सर्वजण वाड्यात गेले. ज्या खोलीचं दार नेत्राने उघडलं होतं, त्या खोलीत सर्वजण पोहोचले. कौशिक व रत्नाकरने तिथली माती बाजूला करायला सुरुवात केली. कौशिक त्याच्या घरातून कुदळ घेऊन आला आणि जमीन खणू लागला. बरंच खणल्यावर त्यांना सांगाड्याचे तुकडे दिसू लागले. रत्नाकर व कौशिकने ते तुकडे अलगद बाहेर आणले. चिता रचून कौशिकने अग्नी दिला. जळणाऱ्या चितेतून एक मंद अशी ज्योत आकाशात जात नाहीशी झाली...

निळ्याशार आकाशात तेजस्वी आवरणात आनंदीचा चेहेरा दिसत होता. ती गोड हसत म्हणाली, "आय... माजं पॉट भरलं. आता तुला सपनांचा कंदी बी तरास होनार न्हाय..." इतकं बोलून तो चेहेरा लुप्त झाला. त्या रात्री बिछान्यावर झोपलेल्या नेत्राला आज हे सुखद स्वप्न पडलं. झोपलेल्या नेत्राच्या चेहेऱ्यावर स्मितहास्य दिसत होतं... 

समाप्त.


@ अनिकेत परशुराम आपटे.

Saturday, November 6, 2021

हुंदके - दुसरा भाग...

पहिल्या भागात...

नेत्राला रोज रात्री भयानक स्वप्न पडतात आणि ती आपरात्री दचकून उठते. य त्रासाबद्दल जाणण्यासाठी आणि तो कमी करण्यासाठी रत्नाकर आणि सरिता, डॉ. कौशिक साने या मानसोपचारतज्ञाची मदत घेतात. नेत्रा आणि डॉ. कौशिक बोलत असताना नेत्राला सांगून आलेल्या अबीर गोखले या मुलाचा विषय निघतो आणि डॉ. कौशिक ते सेशन तिथेच थांबवतात. दुसऱ्या दिवशी घरात सगळी आवराआवर सुरू असताना आणि स्वप्नांच्या विचारात नेत्रा हरवली असताना गाडीचा हॉर्न ऐकू येतो...

अबीर, त्यांची आई म्हणजे कल्पना गोखले आणि वडील म्हणजे सुधीर गोखले यांच्यासोबत आलेला असतो. गप्पा रंगतात आणि नेत्रा व अबीर फ्लॉव्हर गार्डन पाहायला मागल्या दारी जातात. तिथे बोलत असताना नेत्राला एक दरवाजा दिसतो जो कुलूपाने बंद आहे पान कोणीतरी आतून ठोठावत आहे. हे सगळं पाहून नेत्रा बेशुद्ध पडते. रत्नाकर आणि सरिता याबद्दल गोखले दाम्पत्य आणि अबीरला सर्व सांगतात. सर्व समजल्यावर अबीर पुढच्या सेशनला नेत्रासोबत जाण्याची परवानगी मागतो. गोखले दाम्पत्य निघून जातं पण अबीर तिथेच थांबतो...

अबीर आणि नेत्रा डॉ. कौशिकच्या क्लिनिकमध्ये पोहोचतात. तिथे नेत्राला समजतं की अबीर आणि कौशिक लहानपणापासूनचे मोटर आहेत. हे कळल्यावर नेत्रालाही जरा हायसं वाटतं पण त्याच वेळी नेत्राला पुन्हा त्या सर्व भयानक गोष्टी दिसू लागतात. कधीतरी मागे घडलेली घटना या त्रासाचं मूळ असावं अशी समजूत घालत डॉ. कौशिक नेत्राला हिप्नोटाईझ करून मागे घेऊन जातात. एक एक घटना आठवत नेत्रा त्या दिवसात पोहोचते जेव्हा अबीरने नेत्राला एक मेल पाठवलेला असतो आणि संध्याकाळी मोकळी झाल्यावर नेत्रा तो मेल उघडते...

आता पुढे...

अबीरने त्याचा फोटो पाठवला होता. तो हसतमुख चेहेरा आवडला मला. सकाळी आलेल्या नंबरवर मी मेसेज टाकला. अबीरचा फोन आला. आम्ही छान बोललो. अबीर बोलण्यात खूप डिसंट वाटत होता. रात्री मला एक भयानक स्वप्न पडलं. एक जंगल ज्यात कोणीतरी धावतंय. ती व्यक्ती खाली पडली आणि एक किंकाळी. मी दचकून जागी झाले. मला दरदरून घाम आला होता. मानही प्रचंड दुखत होती..." नेत्राच्या कानाजवळ जात डॉ. कौशिक म्हणाले, "काम डाऊन नेत्रा. आता आपण अजून पंधरा दिवस मागे जाऊ... काय झालं आज..." नेत्राने पुन्हा मान हलवून आठवण्याचा प्रयत्न केला आणि बोलू लागली, "मी घरात एकटीच आहे. आई-बाबा नाशिकला गेलेत. माझ्या मैत्रिणी यायच्या होत्या पण तो प्रोग्रॅम कँसल झाला. आवरून-सवरून मी टि.व्ही. लावला. एक पिक्चर लागला होता. जंगलात एक माणूस धावत होता. तो पडला. एका लांडग्याने त्या व्यक्तीवर वार केला...


तो सीन पाहत असतानाच मला झोप लागली. मध्यरात्रीनंतर कधीतरी मला जाग आली. टि.व्ही. चालू होता पण मगाचचा पिक्चर नव्हता. आता दुसराच पिक्चर सुरू होता. मी टि.व्ही. बंद केला आणि झोपायला गेले. जी झोपले ती सकाळी पेपरवाल्याच्या बेलने जागी झाले..." डॉ. कौशिक आणि अबीरने एकमेकांकडे पाहिलं. मग डॉ. कौशिक नेत्राजवळ येत तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले
, "नेत्रा, आता हळूहळू आजच्या दिवसात परत ये... येस... आता हळूहळू डोळे उघड..." नेत्राने डोळे उघडले. काही क्षण शून्यात हरवल्यासारखी नेत्रा सभोवताली पाहत होती. मग डॉ. कौशिक व अबीरला पाहून सुखावली. डॉ. कौशिक यांनी विचारलं, "कसं वाटतंय आता..." नेत्राने डोळ्यांची उघडझाप करत होकारार्थी मान हलवली. डॉ. कौशिक यांनी स्मित केलं आणि म्हणाले, "डोकं थोडं जड झाल्यासारखंही वाटेल. पण काळजी नाही. तू पाहिलेल्या चित्रपटाचा कदाचित हा परिणाम असू शकेल. एखाद्या लांडग्याचा फोटो किंवा व्हिडियो तुझ्या डोळ्यांसमोरून गेले असतील आणि तुझ्या अंतर्मनात दडलेला तो सीन पुन्हा वर आला असेल. बट डोन्ट वरी. होशील तू नॉर्मल. आज आपण इथेच थांबू. मी काही गोळ्या लिहून देतो त्या घे. नेक्स्ट वीक आपण पुन्हा भेटू..."

डॉ. कौशिकने हे बोलायचा अवकाश, की अबीर म्हणाला, “अरे पुढच्या आठवड्यात नाही रे येऊ शकणार आम्ही... अरे आम्ही जांभुळपाड्याला जायचा विचार करतोय. तिथल्या उजव्या सोंडेच्या गणपतीचं दर्शन घ्यावं असं आई-बाबांचं म्हणणं आहे. आणि तिथे जाणारच आहोत तर जरा ३-४ दिवस पिकनिकसाठीच जावं असा विचार करतोय. म्हणजे अलिबागसुद्धा करता येईल...” जांभुळपाड्याचं नाव ऐकताच डॉ. कौशिक म्हणाले, “अरे जांभुळपाड्याला माझं घर आहे. राहण्याची काही काळजीच नाही. आमचा एक विश्वासू नोकर आहे तिथे. हिरू नाव आहे त्याचं. मी त्याला सांगून ठेवतो. तो सगळी व्यवस्था करेल तुमची. फक्त कधी जाताय आणि किती जण जाताय ते कळवा. मला जमलं तर मी पण येईन...” अबीरने स्मित केलं. डॉ. कौशिकला मिठी मारून नेत्राला घेऊन तो बाहेर पडला. दार बंद होताना डॉ. कौशिक कोणाशीतरी बोलताना दिसले आणि नेत्रा व अबीर बाहेर आले. नेत्राचा चेहेरा पाहून अबीर म्हणाला, “अगं तुला सांगणारच होतो, पण तेवढ्यात कौश्यानेच विषय काढला ना. म्हणून असं सांगावं लागलं...” नेत्रा काहीच बोलत नव्हती. थोडा वेळ गेल्यावर ती म्हणाली, “अबीर, आधी मला काका-काकूंना भेटायचं आहे...”

अबीरने मान हलवली आणि बाईक सुरू झाली. थोड्याच वेळात बाईक दाराशी येऊन थांबली. नेत्रा उतरली आणि काही काळ बंद दाराकडे टक लावून पाहत राहिली. अबीरने तिला आत यायला सांगितलं तेव्हा तिची तंद्री भंग झाली. थोडं बिचकतच नेत्राने आत प्रवेश केला. गोखले दाम्पत्य समोरच उभं होतं. नेत्रा सरळ त्यांच्याजवळ जात म्हणाली, "काका, काकू, मला थोडं बोलायचं आहे. काल तुम्ही घरी आला होता तेव्हा जे काही घडलं ते घडायला नको होतं. हे काय होतंय ते मला माहित नाही. पण यामुळे तुम्हाला जो त्रास झाला त्याबद्दल मला तुमची माफी मागायची आहे..." नेत्रा बोलत असतानाच मि. गोखलेंनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, "बेटा, काल रात्री आमचं आणि अबीरचं बोलणं झालं आहे. अबीरप्रमाणेच आम्हालाही असंच वाटतं, की यात तुझा काहीही दोष नाही..." मि. गोखलेंना दुजोरा देत नेत्राच्या जवळ येत मिसेस गोखले म्हणाल्या, "यांचं बरोबर आहे नेत्रा. आमची तुझ्याविषयी कसलीच तक्रार नाही..."

हे ऐकून नेत्राच्या डोळ्यांत अश्रू येताच गुडघ्यावर बसून अबीरने नेत्रासमोर अंगठी धरली आणि तिला विचारलं, "नेत्रा, माझ्याशी लग्न करशील...??" नेत्रासाठी हा सुखद धक्का होता. तिने सर्वांकडे पाहिलं आणि अबीरला उठवत म्हणाली, "अरे पण आई-बाबा... त्यांना विचारायला हवं. आणि माझ्याकडे अंगठी नाहीये अजून..." नेत्रा हे बोलतच होती, की "सर्प्राईझ..." या हाकेने ती दचकली. तिने आवाजाच्या दिशेने पाहिलं तर तिचे आई-बाबा समोर होते. सरिता म्हणाली, "नेत्रा, अगं तू बाहेर पडलीस आणि मि. गोखलेंनी फोन केला. त्यांच्याकडून अबीरच्या अंगठीचं माप घेऊन येतानाच ही अंगठी घेतली. खरंतर अबीर तुला न सांगता इथे आणणार होता, पण तूच त्याला इथे येण्यासाठी विचारलंस. सगळं कसं झकास जमून आलं..." सरिता बोलत असतानाच रत्नाकर पुढे होत म्हणाले, "नेत्रा, तुझं काय म्हणणं आहे बेटा..." नेत्रा लाजली आणि मानेनेच तिने होकार दिला आणि सरिताच्या कुशीत शिरली...

एकीकडे टाळ्या वाजत होत्या तर दुसरीकडे अबीर व नेत्राने आपापल्या अंगठ्या बदलल्या. तेवढ्यात रत्नाकरना फोन आला. फोन घेत रत्नाकर म्हणाले, "हां रंजू, आनंदाची बातमी... ठरलं नेत्राचं. हो आम्ही आत्ता त्यांच्याच घरी आहोत... हो तर नक्कीच... मी लगेच कळवतो..." फोन ठेवत सुधीरकडे वळत रत्नाकर म्हणाले, "मि. गोखले, माझ्या बहिणीचा फोन होता. नेत्रा कुटुंबातली एकुलती एक मुलगी आहे. नेत्रा सोडून तिच्या पिढीत सगळे मुलगेच आहेत, त्यामुळे आमच्या नातेवाइकांना होणाऱ्या जावयाला पहायचं आहे. आज अनायसे शनिवार आहे, तर संध्याकाळी एक छोटा समारंभ ठेवायचा का... फक्त घरातली माणसंच असतील..." मि. गोखलेंनी कविताकडे पाहून अबीरकडे नजर वळवली आणि मानेनेच होकार दिला. त्यावर आनंदी स्वरात रत्नाकर म्हणाले, "तर मग येतो आम्ही. संध्याकाळची तयारी करायची आहे. नेत्रा, सरू चला. आपण तयारीला लागू..." ते तिघंही निघाले आणि सुधीर, कविता व अबीरने दारातूनच त्यांना निरोप दिला...

संध्याकाळचे सात वाजले होते. सर्वजण हळूहळू जमत होते. सगळी व्यवस्था घरच्या मागच्या अंगणात केली गेली होती. नेत्रा आणि अबीर सर्वांशी हसतमुखाने बोलत होते. नेत्रा आपल्या कुटुंबाशी अबीरची ओळख करून देत होती. तेवढ्यात, "काँग्रॅट्स नेत्रा..." हा आवाज आला. दोघांनी पाहिलं तर हातात पुष्पगुच्छ घेऊन डॉ. कौशिक उभे होते. कौशिकला पाहून अबीर व नेत्रा दोघांनाही नवल वाटलं. तेव्हा रत्नाकर म्हणाले, "मीच बोलावलं डॉ. कौशिकना. दुपारी डॉक्टरांचा फोन आला होता तेव्हा दिलं आमंत्रण..." नेत्राच्या हातात पुष्पगुच्छ देत डॉ. कौशिक म्हणाले, "काय रे अब्या, गुपचूप पार्टी... यही तेरी दोस्ती..." डॉ. कौशिकच्या खांद्यावर हात ठेवत अबीर म्हणाला, "नाही रे कौश्या... अरे फॅमिली फंशन आहे ना, म्हणून नाही सांगितलं हो तुला. आणि हे ठरलंही सकाळीच..." त्यांचं बोलणं सुरू होतं तेव्हा नेत्रा पाणी पिण्यासाठी बाजूला गेली. तिथून तिने या दोघांकडे पाहिलं तर दोघंही काहीतरी बोलत होती. काही क्षणातच डॉ. कौशिक तिथून निघून गेले. नेत्राने अबीरला विचारलं तर तो म्हणाला, "अगं त्याला एका पेशंटचा फोन आला..." पण नेत्राला मात्र शंका येत होती...


पार्टी संपली. अबीर त्याच्या घरी गेला. आवरा-आवर करून नेत्रा जेव्हा झोपायला गेली तेव्ही ती खूप खुश होती. दिवसभराची दगदग झाली खरी
, पण साखरपुडा झाल्याचा आनंद काही वेगळाच होता. मोबाईलमध्ये संध्याकाळच्या पार्टीचे फोटो पाहत असतानाच, "आय..." या आवाजाने नेत्रा दचकली. तिने खोलीभर पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. विषय बाजूला सारून ती पुन्हा फोटो पाहू लागली. तेवढ्यात पुन्हा, "आय... ये ना... म्या वाट बगते हाय... मला भूक लागली..." हा आवाज आला. नेत्रा पुन्हा दचकली. मोबाईल तिच्या हातून खाली पडला. तिने समोर पाहिलं तर तिच्या समोर एक दरवाजा होता. कुलूपाने बंद तो दरवाजा कोणीतरी हलवत होतं. दारापलिकडून, "आय, भायेर काढ ना माला... ए आय..." नेत्रा दाराकडे जाणारच होती की, "राधा..." हा आवाज खोलीभर घुमला. नेत्राने दोन्ही हातांनी चादर घट्ट धरली. घुमणारा तो आवाज परत आला, "राधा... घर सोडून... गोपाळ..." काहीसा अस्पष्ट आणि तुटक आवाज आल्याने नेत्राला काहीच समजत नव्हतं. तिला आईला बोलवायचं होतं पण शब्दच फुटत नव्हते. शेवटी तिने डोळे गच्च बंद केले आणि हात दोन्ही कानांवर ठेऊन दिले...

बराच वेळ ते आवाज घुमत राहिले, मोठे होत गेले आणि अचानक बंद झाले. सगळं शांत झालं हे लक्षात येताच नेत्राने कानावरचे हात काढले. डोळे किलकिले करून तिने सगळीकडे नजर फिरवली. पिवळ्या डिम लाईटमुळे खोलीभर अंधूक प्रकाश पसरला होता. तो दरवाजा, ते आवाज, सगळं गायब झालं होतं आणि सगळीकडे शांतता पसरली होती. नेत्रा बेडवरून खाली उतरली. जिथे तिला ते दार दिसलं होतं तिथे गेली. तिने हाताने चाचपडून पाहिलं पण तिच्या हाताला काहीच लागलं नाही. ए.सी.मुळे खोली बऱ्यापैकी थंड झाली होती नेत्रा मात्र घामेजलेली होती. तिने गटागटा पाणी प्यायलं आणि दार उघडायला धावली. दार उघडणार इतक्यात नेत्रा थांबली आणि विचार करू लागली, "आई-बाबा किती खुशीत असतील... एरवी मी रात्री दचकून जागी होते याचं टेंशन असतं दोघांना. आता पुन्हा त्यांना त्रास द्यायचा का..." हा विचार करत नेत्रा दारापासून लांब होत बेडवर येऊन झोपली. सगळं शांत होतं तरी तिला झोप येईना. शेवटी डोक्यावरून पांघरूण घेऊन नेत्राने डोळे बंद करून घेतले...

नेत्राला थेट सकाळी जाग आली तेव्हा सरिता तिच्या खोलीत आवरा-आवर करत होती. नेत्राला जाग आलेली पाहून सरिता म्हणाली, "उठलीस बाळा, चला आवर लवकर. अगं अबीरचा फोन आला होता. तो म्हणतोय ट्रिपला जाऊ. काय बाई ही घाई तरी... पण नाही कसं म्हणणार... जावईबापू नाराज झाले म्हणजे... चल राणी आवर पटकन. मंडळी येतीलच थोड्या वेळात..." बेडवर बसल्या बसल्या नेत्रा हे सर्व ऐकत होती आणि एकीकडे तिचं विचारसत्र सुरू होतं, "रात्री काय झालं सांगू का आईला... नको. उगाच टेंशन घेत बसेल..." हा विचार करत असतानाच, "राणी अगं ऊठ की आता. तयार हो पटकन..." या तिच्या आईच्या आवाजाने नेत्रा भानावर आली आणि वॉशरूममध्ये पळाली. आवरून-सवरून नेत्रा हॉलमध्ये आली तर अबीर आणि गोखले दामपत्य चहा पीत बसले होते. सर्वजण ट्रिपच्या तयारीनिशीच आले होते. त्यांना पाहून गोंधळलेली नेत्रा अबीरच्या बाजूला जाऊन बसली...

नेत्राचा गोंधळ लक्षात येताच अबीर म्हणाला, "अगं माझ्या ऑफिसमधून कॉल आला रात्री. मी ज्या प्रॉजेक्टवर काम करतोय त्यात काही अडचणी आल्या आहेत. मला २-३ दिवसात निघावं लागेल. पण त्या आधी आपली ही ठरलेली ट्रिप करावी असं वाटतं. म्हणून असा तडकाफडकी निर्णय घेतला. सकाळी काकांना कॉल करून सांगितलं तर त्यांनीही होकार दिला..." नेत्रा अजूनही चक्रावल्यासारखीच पाहत होती. शेवटी म्हणाली, "अरे डॉ. कौशिकना सांगितलंस का... ते ही येणार होते ना..." नेत्राचं हे बोलणं सपतं न संपतं तोच अबीरने मोबाईल काढत नंबर लावला, "हॅलो कौश्या... अरे ते आपलं ट्रिपचं ठरत होतं ना, ते आजच जातोय आम्ही. तू ही तयार रहा. आम्ही येतो तुला न्यायला. काय... अच्छा. ठिक आहे. पण नक्की बरं का... ओके..." फोन ठेवत अबीर म्हणाला, "कौशिकच्या काही अपॉईंटमेंट्स आहेत आज. त्या संपवून तो उद्या येईल. त्याचा तो कोण हिरू आहे त्याला सांगून सगळी व्यवस्था करून ठेवतो म्हणाला...”

सगळं इतकं पटापट होतंय ही गोष्ट नेत्रा जरा विचित्र वाटत होती. पण आई-बाबांच्या आनंदाकडे पाहत ती गप्प बसली.  तयारी झाली आणि गाडी निघाली. ड्रायव्हिंग सीटवर अर्थात अबीर होता आणि बाजूला नेत्रा बसली होती. गोखले व ओक दामपत्य मागच्या सीट्सवर स्थानापन्न झाले होते. गप्पा-गाणी यांच्या सहाय्याने प्रवास मस्त चालू होता. साधारण दोन-अडीच तासात गाडी जांभुळपाड्याच्या वेशीवर आली. गाडीने वेस ओलांडताच नेत्राला काहीतरी जाणवल्यासारखं झालं आणि ती खिडकीतून बाहेर पाहू लागली. एका इमारतीजवळून गाडी पास झाली आणि नेत्रा म्हणाली, "ही गावची शाळा ना..." हे ऐकून सर्वजण नेत्राकडे पाहू लागले. काही क्षणातच एक बोर्ड दिसला ज्यावर बोर्ड होता, "प्राथमिक शाळा, जांभुळपाडा..."

अबीरने गाडी थांबवली. नेत्रा एकटक त्या बोर्डकडे पाहत होती. नेत्राला "काय गं नेत्रा... काय पाहतेस..." अबीर असं म्हणाला आणि ती भानावर आली. नकारार्थी मान हलवत तिने सर्वांकडे पाहिलं. अबीरने गाडी पुन्हा सुरू केली. वातावरण हलकं करण्यासाठी अबीर म्हणाला, "पुन्हा शाळेत शिकण्याचा विचार दिसतोय नेत्राचा. हरकत नाही, आम्हाला मूल झालं की ते या शाळेत येईल हां शिकायला..." अबीरच्या बोलण्यावर नेत्रा लाजली आणि सर्वजण हसू लागले. नेत्राने खिडकीबाहेर पाहिलं तर रस्त्यापासून थोडा आत तिला एक वाडा दिसला. कौलं, लाल मातीचा रस्ता आणि काळा पडलेला वाडा पाहण्यात नेत्रा गर्क झाली. इतक्यात गाडीही थांबली. सर्वजण उतरले आणि अबीर नेत्राला हलवत म्हणाला, "नेत्रा... अगं ऊठ... कुठे तंद्री लागली आहे..."

सर्वजण उतरलेले पाहून नेत्राही उतरली. त्या वाड्याकडे पुन्हा एकटक पाहत ती वाड्याच्या दिशेने जाणार इतक्यात गाडीतून बॅगा काढणारा माणूस म्हणाला, "ताईसाहेब, थितं न्हवं. हे घर हाय कौशिक सायबांचं. त्यो वाडा लय वंगाळ हाय..." त्याचं बोलणं झालं आणि नेत्रीने पुन्हा आपली नजर वाड्याकडे वळवली. अबीर जवळ येत म्हणाला, "काय गं नेत्रा... पुन्हा हरवलीस... अगं चल की आत... हिरू, यांना आत घेऊन जा. आणि जेवणाचं बघ जरा..." नेत्रा अबीरसोबत चालू लागली. तिने मध्येच वाड्याकडे एक कटाक्ष टाकला. नेत्रा आत जाणार इतक्यात तिला हळू असा मुसमुसण्याचा आवाज आला. तिने इकडे तिकडे पाहिलं पण आस-पास कोणीच नव्हतं. नेत्राची नजर पुन्हा वाड्याकडे वळली. वाड्याकडे पाहत ती विचार करू लागली, "हा तोच वाडा तर नाही ना जो मला स्वप्नात दिसतो..."

हात-पाय-तोंड धुऊन सर्व जरा बसले होते तोच नेत्राने प्रश्न केला, "हिरूदादा, तुम्ही म्हणालात तो वाडा वंगाळ आहे. तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे..." हिरूने एकवार सर्वांकडे पाहिलं आणि बोलू लागला, "लय वरीस अदुगर त्या वाड्यामंदी मंगलदास आनी गोपालदास असे दोन भाव ऱ्हायचे. मंगलदास थोरला व्हता अन् गोपालदास धाकला. त्येंच्याकडं लय पैका व्हता. गोपालदास शहराकडं शिकाया व्हता तर मंगलदास इतं सावकारीचं, शेत-जिमिनीचं समदं बगायचा. मंगलदास लय चांगला व्हता. पन गोपालदास आकशी वाया ग्येलेला. त्येला बरीच व्यसनं व्हती. येक दिस गोपालदास राधाबाई नावाच्या येका बाईला घेऊन घरी आला. राधाबाई त्येंच्या घरान्याला शोभनारी न्हवती, पर गोपालदासने म्हने तिच्यासंगं लगीन केलं व्हतं. मंगलदासना ह्ये आवडलं न्हाई, पर आपल्या भावाकडं पाहून त्यांनी त्या राधाबाईला सून म्हनून स्वीकारलं...

गोपालदासला कामं व्हतं म्हनून त्यो तालुक्याला ग्येला व्हता. गोपालदासची पाठ वळली आनी या राधाबाई तिचं खरं रूप दाखवाया लागली. ती मंगलदासला जाल्यामंदी वडू लागली. तिला म्हाईत व्हतं, की मंगलदासकडंच समदा पैका हाय. त्या राधाबाईने तिच्या शरीराचा वापर करायचं ठरिवलं, पर मंगलदासला ह्ये पटलं न्हाई आनी त्यांनी राधाबाईला दूर लोटली. राधाबाई चवताळली आनी तिने फुलदानी उचलून मंगलदासच्या डोसक्यात मारली. त्याचवेली गोपालदास थितं आला. त्येला पाहून राधाबाई घाबरली अन् रानाकडं पलत सुटली. गोपालदासने मंगलदासला पायलं अन् राधाबाईच्या मागे ग्येला. मंगलदासपन कसेतरी त्येंच्या मागे गेले. धावताना मंगलदासना येक वरडन्याचा आवाज आला. त्येंनी पायलं तर राधाबाई वाईस लांब मरून पडली व्हती अन् लांडगं तिचं लचकं तोडत व्हतं. बाजूलाच गोपालदास उभा व्हता. मोटे डोले करून त्यो त्ये समदं बगत व्हता...

मंगलदासनी गोपालदासला माघारी आनलं. रानात त्ये समदं बगून गोपालदासच्या डोसक्यावर परिनाम हून त्यो येडा जाला. मंगलदासनी गोपालदासला येड्यांच्या दवाखान्यात घातलं. थितं म्हनं त्येनं सवताला फास लाऊन घेतला. मंगलदासला खूप दुख जालं. त्यो येकलाच वाड्यात ऱ्हाऊ लागला. पर त्येंना समदीकडं राधाबाई दिसू लागली. वचपा काढाया वाड्यात राधाबाईचं भूत आलं व्हतं. मंगलदासना तरास व्हाया लागला अन् त्ये गाव सोडून निगून गेले. मंगलदास आनी गोपालदास चांगले गुन्यागोविंदानं ऱ्हायचे हो. पर त्या राधाबाईने येऊन समदा इस्कोट केला. बाई कसली हो ती, बारा गावचं पानी प्यालेली कुल्टा व्हती ती कुल्टा..." "खोटं हाय समदं... राधा कुल्टा न्हाई..." हिरू बोलत असतानाच हा आवाज आला आणि सगळे दचकले. सर्वांनी पाहिलं तर नेत्रा हे बोलत होती. तिच्या चेहेऱ्यावरचे भाव बदलले होते...

सर्वांनी एकमेकांकडे पाहिलं. अबीर नेत्राच्या जवळ गेला आणि तिला हलवत म्हणाला, "नेत्रा, अगं काय बोलतेस..." अबीरच्या हलवण्याने नेत्रा भानावर आली. तिने सर्वांकडे पाहिलं आणि गोंधळून विचारलं, "काय झालं... तुम्ही सर्व माझ्याकडे असे काय बघताय..." नेत्राचं हे बोलणं ऐकलं आणि कोणाला काय बोलावं तेच समजत नव्हतं. रत्नाकर नेत्राजवळ येत म्हणाले, "नेत्रा, मला वाटतं तुला प्रवासाचा थकवा आलाय. तू जरा आराम कर..." नेत्रा काही बोलणार इतक्यात अबीरच म्हणाला, "त्यापेक्षा असं केलं तर... काका-काकू, तुम्ही आराम करा. मी आणि नेत्रा जरा फेरफटका मारून येतो. नेत्रालाही बरं वाटेल... काय बाबा..." सुधीरने मान हलवत सांगितलं, "हो, चालेल की... तुम्ही दोघं या चक्कर मारून. आम्ही दोघं आणि हा हीरू आहोत यांची काळजी घ्यायला..." हे ऐकून नेत्राला बरं वाटलं. अबीर आणि नेत्रा बाहेर पडली. समोरच्या वाड्याकडे नेत्रा एकटक पाहत होती. अबीर तिथे आला तशी नेत्रा म्हणाली, "तिथे कोणी राहत असेल का रे..." अबीरने खांदे उडवत नकारार्थी मान हलवली. नेत्राने एक कटाक्ष वाड्याकडे टाकला आणि दोघं पुढे चालू लागली...

थोडं अंतर चालून गेल्यावर अबीर म्हणाला, "नेत्रा, मघाशी तू काय म्हणत होतीस त्या राधाबाईबद्दल... तुला काही माहिती आहे का तिच्यासंदर्भात..." अबीरच्या प्रश्नाने नेत्राचा चालण्याचा वेग मंदावला. एका ठिकाणी येऊन ती थांबली आणि अबीरकडे वळत म्हणाली, "काही कळत नाही रे. हिरूदादा जेव्हा राधाबाईबद्दल सांगत होते तेव्हा असं वाटलं की ते खोटं बोलत आहेत. अचानक डोकं बधीर झाल्यासारखं झालं. तू मला हलवत होतास तेव्हा कुठे शांत झालं ते. हे असं पहिल्यांदाच झालं आहे..." नेत्रा पुढे काही बोलणार इतक्यात तिने बाजूला पाहिलं. ते दोघं शाळेच्या इमारतीसमोर उभे होते. अचानक वारा वहायला सुरुवात झाली. रस्त्यावरचा पालापाचोळा नेत्रापासून लांब जात गावच्या वेशीकडे गेला. नेत्राला घुंघरांचा आवाज आला. डोळे किलकिले करत नेत्राने त्या दिशेला पाहिलं, तर समोर एक बैलगाडी येताना दिसली. बैलगाडी शाळेच्या दारापर्यंत येऊन थांबली. आत गाडीवानासह एक लहान मुलगी आणि एक जोडपं बसलं होतं...


जोडप्यातला पुरूष बाजूला बसलेल्या स्त्रीला म्हणाला
, "राधे, ही गावची शाळा. माझ्या वडिलांनी बांधली. आपल्या आनंदीला आपण याच शाळेत घालू. काय आनंदी, या शाळेत जाणार ना..." त्या लहान मुलीने होकारार्थी मान हलवली. तो पुरूष पुन्हा राधाकडे पाहत म्हणाला, "आणि आपल्याला जे बाळ होईल त्या बाळाला ही... चालेल ना..." हे ऐकून राधा लाजली आणि तिने खाली पाहिलं. नेत्रा ते सगळं पाहत होती. अबीर नेत्राला भानावर आणण्याचा प्रयत्न करत होता पण नेत्रा एकटक बैलगाडीकडे पाहत होती. बैलगाडी पुन्हा सुरू झाली आणि नेत्राला पार करून पुढे गेली. बैलगाडीत बसलेल्या राधाने मागे वळून नेत्राकडे पाहिलं आणि हसली. तिचा चेहेरा पाहून नेत्रा गोंधळली. राधाचा चेहेरा हुबेहूब नेत्रासारखा दिसत होता. तो चेहेरा पाहून नेत्राने डोळे मोठे केले...

अबीरकडे पाहत नेत्रा म्हणाली, "ते पाहिलंस तू..." अबीरला काहीच कळत नव्हतं. तो म्हणाला, "काय पाहिलं... अगं आत्ता तू बोलता बोलता थांबलीस आणि एकटक शाळेकडे पाहू लागलीस. आता तू गावाकडे बोट दाखवत आहेस. काय आहे तिथे..." गोंधळलेली नेत्रा अबीरकडे पाहत म्हणाली, "अरे असं काय करतोस... ही समोर चाललेली बैलगाडी नाही दिसत का तुला... त्या बैलगाडीत राधा बसली आहे. आणि तिचा चेहेरा बघ... अगदी माझ्यासारखा आहे... राधा थांब. मला बोलायचं आहे तुझ्याशी..." असं म्हणत नेत्रा बैलगाडीच्या मागे गेली. बैलगाडी त्या जुनाट वाड्याच्या दिशेने जात गायब झाली. अबीर व नेत्रा धावतच तिथे पोहोचली. तिथे स्मशान शांतता होती. साधं चिटपाखरूही तिथे नव्हतं. वाड्याचं गेट कुलूपाने बंद केलं होतं. नेत्रा सगळीकडे शोध घेत होती तेवढ्यात वारा वाहू लागला. वाऱ्यासरशी रस्त्यावरचा पाचोळा वाड्याच्या दिशेने जाऊ लागला. गेटला लावलेलं कुलूप आणि साखळी गळून पडले. गेट उघडलं. ओसरीवर एक झोपाळा हलत होता. त्यावर कोणीतरी बसलं होतं. पायऱ्यांपाशी एक जोडपं उभं होतं. नेत्राला सगळं काही धुसर दिसत होतं... 

झोपाळ्यावरचा माणूस उठला आणि पायऱ्यांजवळ येत म्हणाला, "गोपाळ, आत ये. मला बोलायचं आहे तुझ्याशी. आणि, एकटाच ये..." असं म्हणत तो माणूस वळला आणि पाय आपटत बंद दाराच्या आत गायब झाला. नेत्राही पायऱ्या चढून वर येऊ लागली. अबीर तिच्या मागे होताच. नेत्राने पायऱ्यांजवळ उभ्या असलेल्या गोपाळ आणि राधाकडे पाहिलं आणि गोपाळचा चेहेरा पाहून ती अवाक झाली. गोपाळ हुबेहूब डॉ. कौशिकसारखा दिसत होता. ती काही बोलणार इतक्यात राधाकडे वळत गोपाळ म्हणाला, "राधा, तू काळजी करू नकोस. मंगळदादा चांगला आहे. मी त्याला समजावतो. तू थांब, मी आलोच..." असं म्हणत गोपाळही बंद दाराकडे जात नाहीसा झाला. पदराच्या काठाला बोटांवर फिरवत राधाबाई दाराकडे पाहू लागली. बाजूलाच खेळत असलेली लहान मुलगी राधाबाईला येऊन बिलगत म्हणाली, "काय जालं गं आय... आपन हितं कशापायी थांबलो..."


तिला पोटाशी धरत राधाबाई म्हणाली, "काय न्हाय आनंदे. आपन जाऊ बरं आत..." तिच्या केसांमधून हात फिरवत राधाबाई घराच्या बंद दाराकडे पाहू लागली. पायऱ्यांवर उभी असलेली नेत्रा हे सर्व पाहत होती. राधाबाईने नेत्राकडे पाहिलं आणि डोळ्यांनीच दाराकडे इशारा केला. नेत्राने दाराकडे पाहिलं. दार आपोआप उघडलं गेलं. नेत्रा हळूहळू दाराच्या आत गेली. अबीरही गोंधळलेल्या नजरेने तिची सोबत करत होता. वाड्यात सर्वत्र अंधार होता. तिथे चिटपाखरूही नव्हतं. नेत्राजवळ येत अबीर म्हणाला, "नेत्रा, अगं इथे कुठे आलो आपण... या वाड्यात तर कोणीच नाही. तुला कोणी दिसलं का..." नेत्रा काही बोलणार इतक्यात समोरच्या खोलीतून आवाज येऊ लागले. नेत्राने खोलीत प्रवेश केला तेव्हा तिथे एक माणूस पाठमोरा उभा होता आणि गोपाळ त्याच्याशी बोलू पाहत होता. गोपाळने, "दादा..." म्हणण्याचा अवकाश, की तो पाठमोरा माणूस झटकन फिरला. त्याच्या डोळ्यात अंगार होते. त्याचा चेहेरा पाहून नेत्राला अजूनच धक्का बसला. तो माणूस हुबेहूब अबीरसारखा दिसत होता...

शेवटचा भाग: ०९.११.२०२१

Wednesday, November 3, 2021

हुंदके - पहिला भाग...

रात्र वाढत चालली होती. जंगलात वाऱ्याचा लवलेश नव्हता. सर्वत्र भयाण शांतता पसरली होती. रातकिड्यांचा आवाज शांततेचा भंग करू पाहत होता. काट्या-कुट्यातून, दगड-धोंड्यातून वाट काढत दोन पाय पळत होते. अचानक ते पाय अडखळले आणि पळणारी व्यक्ती खाली पडली. वळून पाहणाऱ्या डोळ्यात आसवं आणि भिती एकाच वेळी दिसत होते. काही क्षणातच आसमंत भेदणारी एक किंकाळी जंगलात दूरवर जात नाहीशी झाली...


"
आई... आ...ई..." असं ओरडत नेत्रा जागी झाली. तिला दरदरून घाम फुटला होता. आवाज ऐकून नेत्राचे आई-बाबा धावत तिच्याजवळ आले. पाण्याचा ग्लास नेत्राला देत तिची आई म्हणाली, "शांत हो नेत्रा. पाणी घे बघू आधी..." थरथरत्या हातांनी नेत्राने ग्लास घेतला आणि ढसाढसा पाणी प्यायलं. नेत्राचं पाणी पिऊन झालं तेव्हा तिच्या वडिलांनी विचारलं, "नेत्रा, पुन्हा तेच स्वप्न पाहिलंस का..." नेत्राने होकारार्थी मान हलवली आणि तिच्या आईच्या कुशीत शिरून रडू लागली. तिला जवळ घेत तिची आई म्हणाली, "हे कसलं दुष्टचक्र मागे लागलं हो पोरीच्या... आता लग्न व्हायचं पोरीचं. आणि हे..."

नेत्राचे बाबा लगेच म्हणाले, "सरिता, आता हिला झोपू देत. स्वप्न पाहून झालंय तिचं. आता झोपेल शांतपणे..." नेत्रा झोपली आणि सरिता व रत्नाकर खोलीच्या बाहेर आले. सरिता म्हणाली, "काय करायचं हो पोरीसाठी. परवा ती मंडळी येतील तिला पहायला. या एका गोष्टीमुळे..." रत्नाकर म्हणाले, "शांत हो सरिता. हे बघ, ती मंडळी परवा येणार आहेत. आपण उद्याच एखाद्या सायकियाट्रिस्टला कन्सल्ट करायचं का..." "सायकियाट्रिस्टला... अहो आपली नेत्रा काही..." रत्नाकरला मध्येच तोडत सरिता म्हणाली. तिला समजावत रत्नाकर म्हणाले, "सरिता अगं नेत्राच्या डोक्यावर परिणाम झालाय म्हणून नाही जात आपण डॉक्टरकडे. तिला हे एकच स्वप्न का पडतंय हे समजायला नको का..." सरिताला रत्नाकरचं म्हणणं पटलं. झोपलेल्या नेत्राकडे पाहत दोघांनी दार बंद केलं...

दुसऱ्या दिवशी तिघंही डॉक्टरकडे जायला निघाले. नेत्रा थोडी अपसेटच दिसत होती. "आई, बाबा, जाणं गरजेचं आहे का... साधं स्वप्नच तर आहे... त्यासाठी सायकियाट्रिस्ट कशाला...", सारखी हा प्रश्न विचारत होती. थोड्याच वेळात टॅक्सी एका बिल्डिंगजवळ थांबली. क्लिनिकमध्ये डॉक्टर कौशिक एका खुर्चीत बसले होते. सरिता व रत्नाकर एका बाजूला जाऊन बसले. नेत्रा डॉक्टरांच्या समोरच्या खुर्चीत बसली होती. डॉ. कौशिक काही काळ नेत्राकडे टक लाऊन पाहत होते. नेत्राही त्यामुळे जरा अवघडल्यासारखी झाली. डॉक्टर म्हणाले, "सुरुवात करण्याआधी मी हे सांगू इच्छितो, की मानसोपचारतज्ञाकडे जाणं म्हणजे आपल्या डोक्यावर परिणाम झाला आहे असं नाही. त्यामागे अनेक कारणं असू शकतात. तेव्हा तुम्ही अगदी निर्धोकपणे व्यक्त व्हा..." डॉक्टरांच्या बोलण्यामुळे नेत्राला जरा हायसं वाटलं आणि तिने बोलायला सुरुवात केली...

"डॉक्टर, आत्तापर्यंत सगळं ठिक होतं. पण मागच्या महिन्यापासून रोज रात्री साधारणपणे बारा नंतर मला एक विचित्र स्वप्न पडतं. एक खिडकी दिसते. आतून रडण्याचा आवाज येतो. रडवेल्या आवाजातच, “आई... ये ना... भूक लागली मला...” असं ऐकू येतं, पण भाषा गावरान असते. काही क्षणात एक जंगल दिसतं. कोणीतरी धावत असतं. अचानक ती व्यक्ती खाली पडते. मग वळून पाहणारे भेदरलेले डोळे आणि एक आर्त किंकाळी... हेच एक स्वप्न मी गेला महिनाभर पाहते आहे. किंकाळीनंतर मला जाग येते. संपूर्ण शरीरात कापरा भरतो आणि मानही दुखू लागते. थोड्या वेळाने झोप लागते ती थेट सकाळी जाग येते..." सर्व ऐकून घेत डॉक्टर म्हणाले, "मिस नेत्रा, महिनाभर हे एकच स्वप्न तुम्ही पाहत आहात असं म्हणताय. म्हणजे महिन्यापूर्वी अशा काही घटना घडल्या असणार, ज्यांनी तुमच्या अंतर्मनावर खोल परिणाम केलाय. त्याबद्दल काही सांगू शकाल का..." हे ऐकताच सरिता म्हणाली, "अबीर... अबीर गोखले..."

डॉक्टरांनी नेत्राकडे पाहत तिला विचारलं, "अबीर गोखले..??" नेत्रा थोडी लाजल्यासारखी झाली. तेव्हा रत्नाकर म्हणाले, "डॉक्टर, नेत्राच्या लग्नासाठी आम्ही विवाह मंडळात नाव नोंदवलं होतं. महिन्यापूर्वीच सिंगापूरला राहणाऱ्या, अबीर गोखले या मुलाकडून नेत्राची चौकशी झाली. अबीर कालच भारतात आला आहे आणि उद्या ती मंडळी घरी येणार आहेत..." हे ऐकून डॉ. कौशिक जरा हरवल्यासारखे झाले आणि लगेच सावरत म्हणाले, "ही तर खूपच चांगली गोष्ट आहे. मिस नेत्रा, आज आपण इथेच थांबू. इतक्या चांगल्या गोष्टीचा तुमच्या स्वप्नाशी काही संबंध असेल का, ते नाही सांगता येत. कदाचित अजूनही काही घटना घडल्या असू शकतात. त्यासाठी एक-दोन निवांत सेशन्स लागतील. आपण परवा याच दिवशी भेटू..." हे ऐकून नेत्राला थोडं हायसं वाटलं आणि डॉक्टरांचा निरोप घेऊन तिघंही निघून गेले. तिथे क्लिनिकमध्ये डॉ. कौशिक मात्र विचारात गढून गेले...

रात्री बिछान्यावर पडल्या पडल्या नेत्रा सकाळचा विचार करत होती. त्या विचारातच तिला झोप लागली. मध्यरात्रीनंतर झोपेतच अस्वस्थ होऊन ओरडली आणि दचकून उठली. सरिता व रत्नाकर खोलीत आले तेव्हा नेत्रा बिछान्यावर थरथरत बसली होती. सरिताने जाऊन तिला जवळ घेतलं. रत्नाकरने तिला पाणी देत विचारलं, "बेटा, पुन्हा तेच पाहिलंस का..." नेत्राने पाणी प्यायलं आणि म्हणाली, "हो बाबा. पण आज मला अजून काहीतरी दिसलं. एक जुनाट वाडा, झोपाळ्यावर कोणीतरी बसलंय. त्याचा चेहेरा नाही दिसला पण पाय दिसले. जिन्यावर दोघंजण पाठमोरे उभे होते. एक बाई आणि एक पुरुष होता. सगळं धुसर दिसत होतं. तेवढ्यात ते सगळं गायब झालं आणि माझं नेहमीचं स्वप्न दिसू लागलं. आई, माझ्याबरोबर हे का होतंय गं..." सरिताच्या कुशीत शिरून नेत्रा रडू लागली...

नेत्राला धीर देत सरिता म्हणाली, "अहो, सकाळचा कार्यक्रम पुढे ढकलायचा का आपण. पोरीची ही अवस्था पाहवत नाही हो..." खुर्ची पुढे खेचून रत्नाकर बसले आणि काही बोलणार इतक्यात त्यांनी पाहिलं की नेत्रा गाढ झोपी गेली होती. तिला नीट झोपवून दोघं बाहेर आली. रत्नाकर म्हणाले, "सरू, मला माहित आहे की नेत्राचा हा त्रास जरा गंभीर आहे. पण जर सकाळचा कार्यक्रम कँसल केला तर काय वाटेल त्या मंडळींना. शिवाय सगळं व्यवस्थित झालं तर आपल्या नेत्राला होकार पण मिळण्याची शक्यता आहे. काही काळजी करू नकोस. तो बसलाय ना वर, सगळं ठिक होईल. नेत्रा काही आता सकाळपर्यंत उठायची नाही. तू ही झोप पाहू..." दोघं पलंगावर आडवी झाली खरी, पण नेत्राच्या काळजीने डोळ्याला डोळा लागत नव्हता. अखेर पाहण्याच्या कार्यक्रमाचे सुखद विचार करत दोघं झोपी गेली...

उजाडलं तशी घरात धांदल सुरू झाली. येणाऱ्या पाहुण्यांसाठी खास स्वयंपाक, घरातली आवरा-आवर यातच सकाळचे दहा वाजले. आवरून-सवरून सरिता खोलीत आली तेव्हा नेत्रा आरशासमोर केस विंचरत बसली होती. "नेत्रा, अगं किती उशीर हा... ती मंडळी येतीलच इतक्यात. तयार हो पाहू पटकन..." असं म्हणून सरिता जायला लागली तर नेत्राने तिचा हात पकडला व म्हणाली, "आई, सगळं होईल ना नीट..." नेत्राला जवळ घेत सरिता म्हणाली, "काळजी करू नकोस राणी. सगळं व्यवस्थित होईल. आता आवर लवकर..." सरिता निघून गेली आणि नेत्रा तिच्या तयारीत गुंतून गेली. तिच्या मनात वेगवेगळे विचार सुरू होते. गेला महिनाभर सोशल मिडियावर ज्याच्याशी नेत्रा गप्पा मारत होती त्या अबीरला आज ती प्रत्यक्षात भेटणार होती याचा आनंद तर होताच. पण रात्री दिसणाऱ्या त्या स्वप्नांबद्दल काळजीही वाटत होती. नेत्रा विचारात हरवली असतानाच गेटवर हॉर्न ऐकू आला...


सरिता व रत्नाकरनेही तो हॉर्न ऐकला होता. ते बाहेर आले तेव्हा एक गाडी आत आली होती. गाडीतून एक जोडपं उतरलं. त्यातला पुरूष म्हणाला
, "नमस्कार, मी सुधीर गोखले. आणि ही माझी पत्नी कल्पना..." हस्तांदोलन, नमस्कार होतंच होते की एक देखणा तरूण समोर आला. त्याला पाहूनच रत्नाकर व सरिताची कळी खुलली. हा अबीरच असला पाहिजे हे त्यांनी ओळखलंच होतं. सर्वजण स्थिरावले, चहा-कॉफीसोबत इकडच्या-तिकडच्या गप्पा सुरू असताना अबीर मात्र सगळीकडे नजर फिरवत होता. त्याला पाहून सुधीर म्हणालेच, "हॅव पेशन्स यंग मॅन... सब्र का फल मीठा होता है..." हे ऐकून हास्याची एक लकेरच हॉलमध्ये पसरली. तेवढ्यात जिन्यावरून उतरणाऱ्या नेत्राला पाहून अबीर उठून उभा राहिला...

हॉलमध्ये येऊन नेत्रा तिच्या आईजवळ उभी राहिली. अबीरच्या आई-वडिलांची ओळख झाल्यावर तिने दोघांनाही वाकून नमस्कार केला. गाडी अबीरवर आली तशी नेत्रा गालातल्या गालात हसली आणि नजर जमिनीकडे वळवत मागे जाऊन उभी राहिली. सर्व मंडळी बसली. चहा-कॉफीच्या सेकंड राऊंडसोबत आलेला उपमा खाताना गप्पाही रंगू लागल्या. अबीर व नेत्रा मात्र एकमेकांकडे चोरटा कटाक्ष टाकत होते, पण काहीच बोलत नव्हते. सुधीरना हे समजताच ते म्हणाले, "मि. ओक, या दोघांना आपल्यात बसणं थोडं अवघडल्यासारखं होत असेल नाही का..." रत्नाकरांना सुधीरच्या म्हणण्याचा अर्थ समजला आणि ते नेत्राला म्हणाले, "बेटा, अगं तू सजवलेली फ्लॉव्हर गार्डन दाखव की अबीरला..." नेत्राने स्मित केलं. अबीरही जागेवरून उठला. दोघंही मागच्या दाराकडे वळली...

नेत्राने कडी काढून दार ढकललं आणि समोर एक सुंदर बाग दिसू लागली. वेगवेगळी फुलझाडं, लॉन, मधोमध बसवलेला झोपळा आणि झोपाळ्याकडे जाणाऱ्या छोट्या छोट्या पायऱ्या, सगळंच खूप छान दिसत होतं. नेत्रा पुढे होत अबीरला म्हणाली, "या ना..." अबीरने पुढे पाऊल टाकलं आणि डोळे मोठे करत म्हणाला, "आहो-जाहो... सोशल मिडियावर अरे-तुरे आणि आता... या ना... आप तो ऐसे न थे... हे बघ नेत्रा, आपण एकमेकांना आधीच पसंती दिली आहे. ही भेट आपल्या आई-वडिलांना आपली पसंती कळवावी म्हणून आहे. तेव्हा नो फॉरमॅलिटीज. तू सोशल मिडियावर जशी बिन्धास्त आहेस तशीच रहा. मला जास्त आवडशील. पण तिथे मला अब्या म्हणतेस तसं इथे नको बरं का..." अबीरच्या बोलण्याने नेत्रा सुखावली व थोडी हसली. हसत असताना तिने बागेकडे एक कटाक्ष टाकला आणि तिचं हसू विरून गेलं...

आत्तापर्यंत जिथे उजेड होता, तिथे गडद अंधार दाटून आला. बाग नाहीशी झाली होती आणि एक जुनाट वाडा तिथे दिसू लागला. ते पाहत असताना नेत्रा नि:शब्द झाली होती. अचानक, "आय... लवकर ये ना..." हा रडवेला आवाज आला आणि मोठ्या कुलुपाने बंद असलेलं एक दार नेत्राच्या समोर आलं. नेत्राच्या समोर येऊन ते दार जोरजोरात वाजू लागलं. असं वाटत होतं जणू दारापलिकडून कोणीतरी ते उघडण्याचा प्रयत्न करतंय. नेत्रा किंचाळली आणि तिने आपले डोळे घट्ट बंद करून घेतले. "नेत्रा... ए नेत्रा... अगं काय झालं..." नेत्राला भानावर आणत अबीर म्हणाला. नेत्राला बोलायचं होतं पण शब्दच फुटत नव्हते. अबीरच्या मिठीत शिरत तिने बागेकडे बोट दाखवलं व स्वत: तिथे पाहिलं. तो अंधार, ते दार, तो वाडा, सगळंच गायब झालं होतं आणि समोर बाग दिसत होती. हे पाहून नेत्राला काहीच सुचेना. ती अबीरच्या हातात कोसळली आणि तिची शुद्ध हरपली...

नेत्राच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून गोखले व ओक दांपत्य एव्हाना बागेत पोहोचली होती. सर्वांनी मिळून नेत्राला आत नेलं आणि तिच्या रूममध्ये बिछान्यावर झोपवलं. नेत्रा अजून बेशुद्धच होती. तिला तिथेच ठेऊन सर्वजण बाहेर आले. मि. सुधीर म्हणाले, "मि. ओक, हे सगळं काय होतं. नेत्राला काही आजार तर नाही ना..." ओक दामपत्य बोलायला कचरत आहेत हे लक्षात येताच अबीर म्हणाला, "काका, जे असेल ते सांगा. काळजी करू नका..." रत्नाकरांना जरा हायसं वाटलं आणि नेत्राला पडणाऱ्या स्वप्नांबद्दल सगळं सविस्तर सांगत ते म्हणाले, "कालच आम्ही डॉ. कौशिक साने यांच्याकडे ट्रीटमेंट सुरू केली आहे..." हे ऐकून काय बोलावं तेच सुधीर आणि कल्पनाला समजत नव्हतं. खाली मान घालून उभ्या रत्नाकरांच्या खांद्यावर हात ठेवत अबीर म्हणाला, "काका, माझा निर्णय बदललेला नाही..." अबीरच्या बोलण्याने रत्नाकर व सरिताला थोडा धीर आला. अबीर पुढे म्हणाला, "पण नेत्राला होणाऱ्या त्रासाचा निकाल लावायलाच हवा. तुमची हरकत नसेल तर पुढच्या सेशनला मी जाऊ नेत्रासोबत..." सरिता व रत्नाकर दोघांनी स्मित करून माना डोलावल्या...

नेत्रा पूर्ण दिवसभर बेशुद्धच होती. गोखले पती-पत्नी तर निघून गेले होते, पण अबीर तिथेच थांबला होता. रात्रीचे बारा वाजून गेले तरी नेत्रा अजून शुद्धीवर येत नाही याची काळजी रत्नाकर व सरितासोबत अबीरलाही होती. तिथे नेत्रा बिछान्यावर तळमळू लागली. रडत रडत कोणीतरी मारलेली हाक, तो बंद दरवाजा, तो वाडा आणि कोणाचंतरी धावणं, हे सगळं तिला दिसू लागलं. "आई..." असं ओरडत नेत्रा जागी झाली. तिने पाहिलं तर ती तिच्या खोलीत नव्हती. आजू-बाजूला जंगल होतं. सगळीकडे किर्र झाडी आणि अंधार. तिने पाहिलं तर तिच्या अंगावरचे कपडेही बदललेले होतो. तिच्या नेहमीच्या ड्रेसऐवजी गावाकडचं लुगडं होतं तिच्या अंगात. ते ही जागोजागी फाटलेलं. नेत्राने सभोवार पाहिलं पण अंधाराशिवाय तिला काहीच दिसत नव्हतं. अचानक तिला पावलांचा आवाज आला. नेत्राने समोर पाहिलं तर एक काळी आकृती तिच्या दिशेने येत होती. त्या आकृतीचे डोळे चमकत होते आणि जबडा उघडा होता. तो एक लांडगा होता. त्या लांडग्याने नेत्रावर झेप घेतली आणि, "आऽऽऽऽऽ..." नेत्रा त्याचवेळी किंचाळली आणि तिने डोळे बंद करून घेतले...

नेत्राच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून रत्नाकर, सरिता व अबीर धावत तिच्या खोलीत गेले. सरिताने लाईट लावले. नेत्रा चेहेऱ्यावर हात ठेऊन बेडवर बसली होती. अबीर नेत्राजवळ गेला आणि तिला हलवत त्याने विचारलं, "नेत्रा... काय झालं... नेत्रा..." नेत्राने डोळे उघडले तेव्हा तिचे आई-वडील बाजूला उभे होते आणि अबीर तिच्याजवळ बेडवर बसला होता. नेत्राने सगळीकडे नजर फिरवली. तो अंधार, तो लांडगा, ते जंगल, सगळं गायब झालं होतं. तिने स्वत:ला चाचपडलं तर ते लुगडं गायब होऊन तिचे सकाळचे कपडे तिला दिसले. अबीर नेत्राला शांत करण्याचा प्रयत्न करत होता आणि ती आपला हात सगळीकडे फिरवत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती. पण तिच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. थोड्या वेळात नेत्रा शांत झाली. दोन्ही हातांनी डोकं धरत, "माझं डोकं खूप ठणकतंय. मी पडते जरा..." असं म्हणत नेत्राने उशीवर डोकं ठेवलं. काही क्षणातच तिला गाढ झोप लागली...

तिला झोपवून रत्नाकर, सरिता आणि अबीर खोली बाहेर आले. अबीरने शांत झोपलेल्या नेत्राकडे पाहिलं आणि दार लावून तो हॉलमध्ये आला. रत्नाकर म्हणाले, "पाहिलंस अबीर... हे असं होतं. गेला महिनाभर नेत्राला हा त्रास आहे. यातून कसं सावरायचं तिला हेच समजत नाहीये..." त्यांना धीर देत अबीर म्हणाला, "काळजी करू नका काका. डॉ. कौशिक चांगले मानसोपचारतज्ञ आहेत. ते नेत्राला नक्कीच बाहेर काढतील..." सरिता आणि रत्नाकर यांच्या चेहेऱ्यावरचे आश्चर्याचे भाव पाहून अबीर पुढे म्हणाला, "मी आणि कौशिक शाळेपासूनचे मित्र आहोत. एकाच शाळेत होतो आम्ही. कौशिक पुण्याला निघून गेला आणि हळू हळू आमचा संपर्क कमी होत गेला. आता तर फक्त सोशल मिडियावर आम्ही टचमध्ये आहोत... बरं काका आता पुढचं सेशन कधी आहे..." रत्नाकरांनी सेशन उद्याच आहे असं सांगितलं. दोघांचा निरोप घेऊन अबीर निघणारच होता, की सरिता म्हणाली, "अरे इतक्या रात्रीचा कुठे जातोस आता. आज रात्री इथेच झोप. सकाळी जाऊन फ्रेश होऊन ये परत हवं तर. सेशन सकाळी अकराचं आहे..." अबीरला सरिताचं म्हणणं पटलं आणि तो तिथेच गेस्ट रूममध्ये झोपला...


सकाळ झाली. नेत्राला जाग आली. सगळं आवरून ती बाहेर आली. नेत्रा सोफ्यावर बसलीच होती की सरिता तिच्याजवळ येत म्हणाली, “नेत्रा, बरं वाटतंय का...” आईला पाहताच नेत्राने तिला मिठी मारली. नेत्राच्या डोक्यावरून हात फिरवत सरिता म्हणाली, “सगळं ठीक होईल बाळा... बरं चल, आवर लवकर. डॉ. कौशिककडे जायचं आहे ना... अबीर येईलच इतक्यात...” अबीरचं नाव ऐकताच नेत्राला आश्चर्य वाटलं. रत्नाकर बाजूलाच उभे होते. ते म्हणाले, “हो नेत्रा. तू बेशुद्ध झाल्यावर अबीर तुझ्याच सोबत होता. रात्रीही तो इथेच झोपला. आत्ता पहाटे उठून तयार व्हायला घरी गेला. तो येतोय आज तुझ्या बरोबर डॉक्टरकडे...” रत्नाकरना दुजोरा देत सरिता म्हणाली, “नेत्रा, अबीर खूप चांगला मुलगा आहे. आम्हा दोघांनाही तो आवडला. मला खात्री आहे, तुलाही तो आवडत असणार. हो ना...” नेत्रा जमिनीकडे पाहत होती. पुन्हा आपल्या आईकडे पाहत म्हणाली, “हो आई. मलाही तो आवडतो, पण...” “पण... पण काय...”

नेत्रा बोलतच होती की दारातून हा आवाज आला. सर्वांनी दारात पाहिलं तर अबीर उभा होता. आत येत अबीर म्हणाला, "पण काय नेत्रा..." नेत्रा काहीच बोलत नव्हती. तेव्हा अबीरच बोलता झाला, "नेत्रा, तुझा तो ‘पण’ काय असू शकेल याचा अंदाज आलाय मला. मी घरी गेलो तेव्हा आई-बाबांनीही मला तुझ्याबद्दल फेरविचार करायला सांगितलं होतं. मी त्यांना समजावलं आहे. त्यामुळे आपल्या लग्नाविषयी माझ्याकडून... नव्हे आमच्याकडून तरी होकारच आहे. हां, आता तुलाच नकार द्यायचा असेल तर..." हे ऐकून, "तसं काही नाही रे..." असं म्हणत नेत्रा लाजली. वातावरण जरा हलकं झालं तेव्हा रत्नाकर म्हणाले, "चला निघा आता. डॉ. कौशिक वाट पाहत असेल..." रत्नाकर व सरिताचा निरोप घेऊन नेत्रा आणि अबीर त्याच्या बाईकने निघाले डॉ. कौशिककडे जायला...

थोड्याच वेळात ते क्लिनिकला येऊन पोहोचले. नेत्रा उतरली आणि, "तू पुढे हो. मी बाईक पार्क करून येतो..." असं सांगून अबीर बाईक घेऊन पुढे गेला. नेत्रा आत गेली तेव्हा डॉ. कौशिक तिची वाटच पाहत होते. नेत्रा खुर्चीवर जाऊन बसली. "आज एकट्याच आलात का..." असं डॉ. कौशिकने विचारल्यावर नेत्रा काही बोलणार इतक्यात, "आत येऊ का डॉक्टर..." असा आवाज आला. डॉ. कौशिक आणि नेत्रा दोघांनीही दाराकडे पाहिलं तर अबीर समोर उभा होता. काही क्षण डॉ. कौशिक तसेच अबीरकडे पाहत होते. मग उठून त्याच्याकडे जात म्हणाले, "अब्या..." अबीरनेही, "कौश्या..." असं ओरडत डॉ. कौशिकला मिठी मारली. हे पाहून नेत्राला आश्चर्य वाटलं. "तुम्ही ओळखता एकमेकांना..." या प्रश्नावर दोघंही हसले. अबीर म्हणाला, "आम्ही एकाच शाळेत होतो. पण शाळा संपल्यावर कौशिक पुण्याला गेला. अगदी परवापर्यंत आम्ही चॅटवर बोलत होतो आणि आज भेट झाली. अशी भेट अपेक्षित नव्हती, पण असो..."

अबीरला दुजोरा देत डॉ. कौशिक म्हणाले, "परवा जेव्हा तू अबीरबद्दल सांगितलंस, तेव्हाच हे लक्षात आलं होतं माझ्या. पण म्हटलं आधी सगळं ठरू देत मग बोलू. आता अबीरला इथे पाहून सगळं ठरल्यातच जमा आहे, सो मी तुला नेत्रा वहिनी म्हणणार. चालेल ना..." नेत्रा लाजली आणि पायाकडे पाहू लागली. काही क्षणात तिने वर पाहिलं, तर चित्रंच पालटलं होतं. तिला समोर तोच वाडा दिसत होता. तोच हलणारा झोपाळा. ओसरीवर उभे असलेले एक माणूस आणि बाई, झोपाळ्यावर बसलेला एक माणूस, सगळं धुसर दिसत होतं. तेवढ्यात रडण्याचा आवाज आला. नेत्राने बाजूला पाहिलं, तर एक दार तिला दिसलं. कोणीतरी ते दार उघडण्यासाठी दारामागून धडका देतंय असं वाटत होतं. क्षणार्धात सगळं नाहीसं झालं आणि जंगल दिसू लागलं. पुन्हा तेच भेदरलेले डोळे आणि आर्त किंकाळी...

नेत्रा एकदम दचकली. "नेत्रा... अगं कुठे तंद्री लागली आहे... ए नेत्रा..." अबीर नेत्राला भानावर आणण्याचा प्रयत्न करत होता. शून्यात हरवलेली नेत्रा बाहेर आली आणि अबीरकडे पाहू लागली. तिने आजूबाजूला पाहिलं पण काहीच नव्हतं. सगळं गायब झालं होतं. अबीरचा हात धरत नेत्रा म्हणाली, "अबीर, पुन्हा तेच सगळं दिसलं रे... ते सगळं... अबीर..." नेत्राला शांत करत, तिला खुर्चीत बसवत अबीरने कौशिककडे पाहिलं आणि म्हणाला, "कौशिक, हा कसला त्रास असू शकतो रे... काल पण असंच काहीसं झालं होतं. नेत्रा काहीतरी शोधत होती, असंबद्ध बोलत होती पण आम्हाला कोणालाच काही समजत नव्हतं. शिवाय, काल नेत्रा बेशुद्ध पडली होती, पण आज तसं झालं नाही..."

दोघांजवळ येत डॉ. कौशिक म्हणाले, "अबीर, काल जेव्हा हे घडलं, तेव्हा तुला याबद्दल काहीच माहित नव्हतं. त्रास वाढल्याने नेत्राच्या मेंदूवर जास्त ताण पडला आणि तिची शुद्ध हरपली. पण आज तू तयार होतास. वेळेत तिला भानावर आणलंस म्हणून ती शुद्धीत आहे. याचा संबंध आपण आपल्या अंतर्मनाशी जोडू शकतो. आपल्या अवतीभोवती अनेक घटना, किस्से घडत असतात. बहुतांश किस्से आपण विसरून जातो किंवा त्यांच्याकडे विशेष लक्ष देत नाही. पण एखादा प्रसंग किंवा घटना अशी असते, जी आपल्या नकळत आपल्या अंतर्मनावर सखोल परिणाम करते. नेत्रा, तुझ्या बाबतीतही हेच झालं आहे. महिन्याभरापूर्वी तुझ्यासोबत असं काही घडलं आहे, ज्याने तुझ्या अंतर्मनाचा ताबा मिळवला आणि तुला हा त्रास सुरू झाला. या गोष्टीचा संदर्भ कदाचित विस्मरणात गेलेल्या एखाद्या प्रसंगाशी किंवा घटनेशीही असू शकतो. तुझ्या या त्रासाचं मूळ शोधण्यासाठी आपल्याला संमोहनशास्त्र म्हणजे हिप्नॉटिझमचा आधार घ्यावा लागेल..." 

नेत्रा आणि अबीरने मान हलवली आणि डॉ. कौशिकने नेत्राला आतल्या खोलीत जायला सांगितलं. त्या खोलीत आरामखुर्चीसारखी एक खुर्ची होती आणि समोर एक स्टँड होता. त्या स्टँडला एक गोलाकार चकती लावली होती. नेत्रा त्या खुर्चीवर जाऊन बसली. डॉ. कौशिकने अबीरला बाहेर बसायला सांगितलं, पण तो काही तयार होईना. मग दोघंही आत आले. अबीरला एका बाजूला उभं रहायला सांगून नेत्रा जवळ येत डॉ. कौशिक म्हणाले, "नेत्रा, आता आपण सेशन सुरू करत आहोत..." हे म्हणत असतानाच त्यांनी सगळे दिवे बंद केले आणि त्या स्टँडचा लाईट सुरू केला. एका लयीत ती चकती फिरू लागली. "नेत्रा, रिलॅक्स. आरामात मागे डोकं टेकून बस आणि या फॉर्मेशनकडे लक्ष दे. कॉन्सनट्रेट...", डॉ. कौशिकचा हा आवाज ऐकताच नेत्रा जरा टेकून बसली आणि चकतीकडे पाहू लागली. काही क्षणातच तिचे डोळे जड झाले आणि ती झोपली...

डॉ. कौशिक नेत्राच्या कानाजवळ येत म्हणाले, "नेत्रा, जर माझा आवाज तुला ऐकू येत असेल तर तुझा उजवा हात वर नेऊन खाली कर..." नेत्राने तसं केलं आणि डॉ. कौशिकने स्मित केलं. मग पुन्हा ते म्हणाले, "आता आपण पंधरा दिवस मागे जातोय... आज काय झालं सांग..." नेत्राला काहीतरी आठवत होतं आणि ती बोलू लागली, "आज दिवसभर मी वाट पाहत होते, पण अबीरने कॉलच नाही केला. अब्या, कुठे आहेस रे... कर ना कॉल... एखादा मेसेज तरी... पण काहीच नाही. मीही फोन स्विच ऑफ करून ठेऊन दिला. संध्याकाळी फोन चालू केला तेव्हा अबीरच्या मेसेजेसचा आणि इमेजेसचा पाऊस पडला. प्रत्येक मेसेजमध्ये सॉरी म्हटलं होतं त्याने. पण मी ठरवलं होतं. दिवसभर अब्याने मला सतवलं आता मी सतावणार. मी रिप्लाय दिलाच नाही. पण मलाच कसंसं झालं. पंधरा दिवसांची ओळख आणि अबीर इतका महत्वाचा झाला होता माझ्यासाठी...


शेवटी रात्री गुड नाईटचा मेसेज केला. अब्याचा लगेच रिप्लाय आला. आम्ही बराच वेळ बोलत राहिलो. मग मी झोपी गेले..." हे ऐकून कोपऱ्यात उभ्या अबीरच्या चेहेऱ्यावर स्मितहास्य उमटलं. तिथे नेत्रा बोलतच होती, "मला ते जंगल दिसतंय, तो लांडगा, ते भेदरलेले डोळे..." खुर्चीत बसल्या बसल्या नेत्रा थरथरू लागली. डॉ. कौशिक तिच्या जवळ जात म्हणाले, "शांत हो नेत्रा. शांत हो..." नेत्राचं थरथरणं कमी झालं आणि ती शांत झाली. डॉ. कौशिक पुन्हा म्हणाले, "आता आपण अजून पंधरा दिवस मागे जातोय... काय झालं आज..." नेत्राने मान हलवली आणि बोलू लागली, "मी ऑफिसला जायच्या गडबडीत होते. तेवढ्यात फोन वाजला. मी फोन घेतला तर तो अबीर होता. मेल चेक केला का हे विचारत होता. मी घाईत असल्याने संध्याकाळी पाहते असं सांगितलं. दिवसभर तो फोन डोक्यात घोळत राहिला. संध्याकाळी मी मेल उघडला...

पुढील भाग: ०६.११.२०२१