Monday, January 17, 2022

The Grand Experience...

मंडळी, गेल्या शनिवारी आणि रविवारी मी, माझी बायको तेजू आणि मुलगी अनुरा यांच्यासोबत ‘ताज’ हॉटेलची एक राहती सफर करून आलो. त्या माझ्या राजेशाही अनुभवाचा आनंद तुमच्यासोबत शेयर करावा म्हणून हा माझा छोटासा प्रयत्न...


१.     
तयारी...

२०१९मध्ये मोठी दिवाळी ट्रिप केल्यावर २०२० आणि २०२१ ही वर्ष कोरडी-कोरडीच गेली. नुकतीच नोव्हेंबरमध्ये माझ्या लग्नाला दहा वर्ष पूर्ण झाली आणि आता जानेवारीत अनुराचा वाढदिवस येणार होता. मनात विचार डोकावला, की या दोनही दिवसांचं औचित्य साधून काहीतरी करू. पण निर्बंधांच्या राज्यात आणि कोव्हिडच्या विळख्यात काय करावं हाच प्रश्न होता. कुठूनतरी 'ताज' हॉटेलचा विषय निघाला आणि माझ्या विचारांची गाडी तिथेच येऊन थांबली...

बुकिंग करायचं कसं... हा प्रश्न होता. आधी 'ताज' हॉटेलच्या साईटवर नजर मारली पण तिथे पेमेंट क्रेडिट कार्ड किंवा लिंकवरूनच करायचं होतं. तिथे जाऊन पैसे भरण्याचीही मुभा होती, पण ते सुद्धा फक्त क्रेडिट कार्डनेच. रोख पैसे किंवा डेबिट कार्ड चालणारच नव्हते. मग दुसरा पर्याय होता 'मेक माय ट्रिप' या साईटचा. तिथे डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग पेमेन्टचा पर्याय उपलब्ध होता. या दोन्ही साईट बघण्यात आणि विचार-विनिमय करण्यात आमचे दोन दिवस निघून गेले, आणि मला हवी असलेली 'सी व्ह्यू' रूम माझ्या हातून गेली...


आता एकमेव पर्याय उरला होता
, तो म्हणजे 'सिटी व्ह्यू' रूमचा. रूमसोबत असलेलं पॅकेज आधीच नजरेखालून गेलं होतं, त्यामुळे बुकिंग झटपट होणार होतं. मला खरंतर ३१ डिसेंबरचं बुकिंग हवं होतं. त्या दिवशी तिथे सुंदर रोषणाई असते, रात्री आकाशात दिसणाऱ्या फटाक्यांची आतिषबाजी असते असं ऐकलं होतं. त्या तारखेला रूम उपलब्ध होती खरी, पण ३१ डिसेंबरला असलेलं quarterly closing, ३१च्या रात्रीचा, आधीच ठरलेला प्लॅन आणि सहा जानेवारीला येणारा अनुराचा वाढदिवस, या सगळ्याचा विचार करून ८ जानेवारी या तारखेवर शिक्कामोर्तब झालं...

बुकिंग केल्याच्या दुसऱ्या दिवशी 'मेक माय ट्रिप' मधून फोन आला. पलिकडच्या अधिकाऱ्याने माझ्या बुकिंगची माहिती तर सांगितलीच, शिवाय बुकिंगच्या रकमेनुसार मला मिळणाऱ्या गिफ्ट वाऊचरबद्दलही सांगितलं. मी चेक-इन केल्यानंतर ते वाऊचर मला मेलवर आणि एस.एम.एस.ने मिळणार होतं, जे मला तिथेच 'ताज'मध्येच वापरायचं होतं. 'मेक माय ट्रिप' मधून आलेला फोन बंद झाला. मध्ये काही दिवस गेले आणि बरोब्बर आठवड्याने, 'ताज'च्या reservation desk मधून मला फोन आला...

माझ्या बुकिंगची सर्व माहिती मला दिल्यावर त्या अधिकाऱ्याने पॅकेजमध्ये वाढ करायची झाल्यास, चार तारीख रात्री बारापर्यंत ती करता येईल असं सांगितलं. शिवाय हॉटेलमध्ये प्रवेश करताना आणि तिथे राहताना असलेल्या विस्तृत नियमावलीचा वेगळा मेल पाठवला आहे असंही सांगितलं. फोन बंद झाल्यावर मी 'ताज'कडून आलेला मेल उघडला. त्यात मोठ्या ठळक अक्षरात लिहिलं होतं, "चालू नियमांनुसार spa, swimming pool आणि gymबंद असतील..." पुढे लंबी-चौड़ी यादी होती. कोव्हिडच्या संदर्भातले आपले नेहमीचे नियम, जे आपण पाळतोच...

लिस्टमध्ये पहिलाच नियम होता वेळेचा. चेक-इनची वेळ होती दुपारी तीन वाजता, तर चेक-आऊट सकाळी अकराचं. संपूर्ण एक दिवसही पूरा दिलेला नव्हता. अशी वेळ का असावी, ही शंका आल्याशिवाय राहिली नाही. दुसरा नियम होता ओळखपत्राचा, ज्यात लिहिलं होतं, "PAN is not treated as an identity proof. Carrying physical and original photo identity proof is mandatory (Anyone from valid Aadhaar Card or valid Passport)..." इथे मला प्रश्न पडला, की लायसन्स किंवा वोटर कार्ड का नाही, कारण त्यावरही पत्ता व फोटो असतोच की... विचार केला हे प्रश्न तिथे 'ताज'मध्ये विचारावं. कागदपत्रांची सिद्धता झाली होती. आता आठ तारखेला निघायचं हेच बाकी होतं. त्यातच ओमायक्रॉनचा प्रसार आणि संध्याकाळी पाच नंतर सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या निर्बंधांची बातमी आली...

'ताज'चे, मरीन ड्राईव्हचे, गेट वेचे वेगवेगळे फोटो पाहण्यात आम्ही दंग असताना संध्याकाळी पाच ते सकाळी पाच सार्वजनिक ठिकाणं बंद करण्याच्या, प्रवासावर निर्बंध आणण्याच्या बातम्या कानी पडल्या. आता काय करावं हा प्रश्न उगवलाच. या शंकेच्या पालीचं समाधान करण्यासाठी मी 'ताज'ला फोन लावला. त्यांचं म्हणणं, निर्बंध आहेत. पण इथे आतही पाहण्यासारखं पुष्कळ काही आहे. शिवाय त्यांनी असंही सांगितलं, की घरापासून घरापर्यंत गाडी हवी असल्यास अधिक पैसे भरून ती गाडी बुक करता येईल. लगे हाथ, चेक-इन व चेक-आऊटची वेळ आणि ओळखपत्राची शंकाही मी विचारून घेतली. त्यावर त्यांचं एकच उत्तर होतं, "२००८ नंतर बदललेल्या त्यांच्या पॉलिसी..." यावर नो पुढे चर्चा असं आम्ही ठरवलं आणि आठ तारखेची वाट पाहू लागलो...

२. प्रवास आणि चेक-ईन...

आठ तारीख उजाडली. आधी आम्ही ठरवलं होतं उबेर करून जायचं. गाडी बुक पण केली होती. निघायला फक्त अर्धाच तास बाकी असताना अनुरा म्हणाली, "बाबू, ट्रेनने जाउया ना..." बालहट्टापुढे नो अपील. बुक केलेली कँसल करून आमची स्वारी निघाली स्टेशनकडे. तिकिटाला नो फारशी लाईन, ट्रेनसुद्धा जशी आमच्याचसाठी स्टेशनवर आली आहे असं वाटत होतं. २०१९ नंतर आज ट्रेनमध्ये बसल्याने थोडं वेगळं वाटत होतं खरं. फास्ट लोकल असल्याने स्टेशनवर नाही, पण स्टेशन पार करून थांबत थांबत साडे बारा वाजता ट्रेन चर्चगेट स्टेशनला येऊन धडकली...

'ताज'चं चेक-इन तीन वाजता होतं. म्हणून मग दुपारचा पोटोबा करण्यासाठी नरिमन पॉईंटच्या 'स्टेटस' हॉटेलमध्ये गेलो. मनसोक्त हादडल्यावर जरा शतपावलीच्या इराद्याने मरीन ड्राईव्हकडे पावलं वळवली. भर दुपार असल्याने तिथे फारसं कोणीच नव्हतं. नाही म्हणायला काही प्रेमी युगूलं होती, पण तरीही मोकाट वाटत होतं. एव्हाना सवा-दोन झाले होते. आम्ही सुयोग्य टॅक्सी हेरली आणि थेट 'ताज टॉव्हर' गाठला. सुयोग्य अशासाठी, की 'मरीन ड्राईव्ह'ला ज्या टॅक्स्या उभ्या असतात, त्यातल्या बहुतांश टॅक्स्या मीटरप्रमाणे चालत नाहीत. त्यांचे भाव ठरलेले आहेत. 'गेट वे' आणि परिसर सांगितला तर रु. १२०/- पासून सुरुवात होते. मी कफ परेडला काम केल्यामुळे आणि जवळ जवळ दोन-अडीच वर्ष तो माझ्या येण्या-जाण्याचा रस्ता असल्याने मला हे माहित होतं...


'
ताज'च्या रस्त्यावर टॅक्सी आली. तिथे 'गेट वे'ला जाणाऱ्या व येणाऱ्या माणसांची, टॅक्सी व बसेसची प्रचंड गर्दी होती. ते अर्ध्या मिनिटाचं वळण पार करायला जवळ जवळ सात ते आठ मिनिटं लागली. 'गेट वे'लाच टॅक्सी सोडून चालत जावं असा विचार आला मनात, पण गर्दीपुढे संधीच मिळाली नाही. आमची टॅक्सी 'ताज टॉव्हर'च्या गेटसमोर थांबली. 'ताज महाल' हॉटेल असो किंवा 'ताज टॉव्हर', त्यांच्या स्वत:च्या आणि ग्राहकांच्या वैयक्तिक वाहनांशिवाय इतर कुठल्याही वाहनाला प्रवेश नव्हता. पादचाऱ्यांचा एक आणि वाहनांचा एक, असे दोन मार्ग तिथे तयार केलेले होते. गेटवर गडद राखाडी रंगाचा गणवेष परिधान केलेला एक माणूस हात जोडून उभा होता. तो येणाऱ्या ग्राहकांना योग्य दिशा दाखवण्याचं काम करत होता. त्यामुळे कसलीही गडबड न होता अगदी व्यवस्थित ती माणसं विभागली जात होती...

आमचा नंबर आला तसं आमचं आधार चेक झालं, तापमान चेक झालं. सामान चेक करून आमच्या ताब्यात दिलं गेलं आणि आम्ही पुढे सरकलो. फिरत्या गोलाकार गेट मधून आत गेल्यावर सर्व बाजूंनी बंद असलेल्या मोठ्या रिसेप्शन हॉलमध्ये आम्ही पोहोचलो. गोलाकार गेटच्या डाव्या बाजूला तीन काऊंटर्स होते आणि त्या काऊंटर्सच्या डाव्या बाजूला चार मोठे काऊंटर्स होते. ते तीन काऊंटर्स गेस्ट काऊंटर्स होते. म्हणजे तिथे राहत असलेल्या लोकांना भेटायला आलेल्या लोकांची खातरजमा तिथे केली जात होती. त्याच्या बाजूला असलेले चार मोठे काऊंटर्स, तिथे रहायला येणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या लोकांची निगा राखत होते...

आमच्या कागदपत्रांच्या पडताळणीनंतर काऊंटरपलिकडल्या अधिकाऱ्याने रूमची, आमच्या पॅकेजची जुजबी माहिती आम्हाला दिली आणि दुसऱ्याच क्षणी रोख पाच हजार रुपये भरायला सांगितले. पैशांबद्दल ऐकताच मी चपापलो. कारण पूर्ण पैसे आधीच भरलेले होते. मग आता हे कसले पैसे... मला पडलेला प्रश्न लक्षात घेऊन तो अधिकारी म्हणाला, की ते डिपॉझिट आहे आणि रूम सर्व्हिसमधून काही मागवल्यास त्याचे पैसे डिपॉझिटमधून वळते केले जातील. याला दुसरा काही पर्याय आहे का असं विचारल्यावर, ज्या ज्या वेळी रूम सर्व्हिसचा वापर केला जाईल त्या त्या वेळी आलेलं बिल चुकतं करण्याचा मार्ग त्या अधिकाऱ्याने सांगितला. हा मार्ग मला योग्य वाटला. मी आमच्या रूमचं कार्ड घेतलं आणि आम्ही निघालो...

३. रूम आणि विरंगुळा...

त्या चार मोठ्या काऊंटर्सच्या डाव्या बाजूला आणि गोलाकार गेटच्या समोर लिफ्टकडे जाण्याचा मार्ग होता. आमची रूम पंधराव्या मजल्यावर होती. लिफ्ट आली आणि आम्ही आत शिरलो. ती लिफ्ट म्हणजे दाराच्या उजवीकडे, डावीकडे आणि वरच्या बाजूला काचा व दारासमोर सुंदर नक्षी असलेली एक छोटीशी खोलीच होती. मंद असं संगीत वाजत होतं. मी बटण दाबलं पण काहीच झालं नाही. आमच्यासोबत अजून एक माणूस आत शिरला होता. त्याने रूमचं कार्ड नंबर पॅनलवर लावायला सांगितलं. मी तसं केलं आणि सगळे नंबर्स उजळले. आम्ही १५ नंबर दाबला आणि जराही हालचाल न करता काही क्षणातच लिफ्ट पंधराव्या मजल्यावर पोहोचली. लॉबीमध्ये एक जागोजागी रूम नंबर आणि तिथे जाण्याच्या दिशांच्या पाट्या होत्या. त्यांना पाहत आम्ही आमच्या रूमपर्यंत आलो. कार्ड वापरून दार उघडलं आणि पाहिलं तर एक सुंदर रूम आमचं स्वागत करत होती...

आत पाऊल ठेवलं आणि माझा मोबाईल वाजला. 'मेक माय ट्रिप' कडून मिळालेल्या पाचशे रुपयांच्या गिफ्ट वाऊचरचा तो मेसेज होता. त्या मेसेजला जरा बाजूला ठेवत आम्ही रूमचा आस्वाद घेण्याचं ठरवलं. अनुराने आधीच सांगितलं होतं की हॉटेलच्या मऊ आणि बाऊंसिंग बेडवर ती मनसोक्त गुधडणार आहे. तिची ही करामत सुरू होण्याआधी मी ठरवलं नीट-नेटक्या रूमचे फोटो काढून घ्यायचे. तो मोठा बेड, सीलिंगला, बेडच्या वरच्या बाजूला आणि टि.व्ही.च्या मागच्या बाजूला असलेले पांढरे-पिवळे लाईट्स, रिक्लायनर, बाल्कनी शेजारी असलेलं लाईटचं झुंबर, काचेचं छोटं टेबल व खुर्ची, भिंतीच्या आत असलेला छोटा फ्रिज, इस्त्री करायची झाल्यास दाराजवळ असलेली स्वतंत्र जागा आणि हे सर्व कमी म्हणून की काय, तर खुर्चा टाकून आरामात बसता येईल इतपत मोठी बाल्कनी, हे सगळं पाहण्यातच आणि फोटो काढण्यात आम्ही दंग झालो...


बाल्कनीचं दार ढकललं आणि प्रचंड कोलाहल कानी पडला. गाड्यांचे व हॉर्नचे आवाज
, 'गेट वे'ला होणाऱ्या घोषणा, यामुळे वेगळ्याच जगात गेल्यासारखं वाटत होतं. बाल्कनीचा दरवाजा जणू दोन भिन्न जगांना विभागणारा डिव्हायडरच होता असं वाटत होतं. दरवाजा ढकलला की प्रचंड कलकलाट असलेलं 'ताज'च्या बाहेरचं जग अनुभवायला मिळत होतं, तर दरवाजा बंद केल्यावर शांत निवांत असं 'ताज'मधलं लॅव्हिश जग समोर येत होतं. बाल्कनीचा दरवाजा म्हणजे एक superb contrastमधला दुआ होता असंच म्हणावं लागेल. सर्वजण सी व्ह्यूसाठी का झटत असतात हे त्या वेळी मला समजलं. हे वैभव अनुभवतच होतो की बेल वाजली...

दार उघडलं तर राखाडी सूट परिधान केलेला एक रुबाबदार माणूस समोर उभा होता. त्याच्या हातात अनुरासाठी आणलेले फुगे होते. अनुराला फुगे देत त्या माणसाने स्वत:ची ओळख करून दिली. तो आमच्या मजल्याचा मॅनेजर होता. त्याने सांगितलं, की प्रत्येक मजल्याला एक मॅनेजर असतो जो त्याच्या मजल्यावरच्या सर्व बिऱ्हाडकरूंची जातीने काळजी घेतो. त्याने आम्हाला रूमची आणि तिथल्या उपकरणांची थोडक्यात माहिती दिली. त्याला रूम सर्व्हिसबद्दल विचारलं असता तो म्हणाला की खाली डिपॉझिट न भरल्याने रूम सर्व्हिसमधून जे काही मागवलं जाईल, त्याचं बिल त्याचवेळी रोख किंवा क्रेडिट कार्डाने चुकवावं लागेल. पण इथे ठेवलेल्या पाण्याच्या बाटल्या, चहा-कॉफी-साखर-दुधाचे पाऊचेस जर परत मागितले तर त्यांचे कोणतेही वेगळे पैसे आकारले जाणार नाहीत. ही सर्व माहिती देऊन झाल्यावर त्याने आम्हाला हाय-टीचं आमंत्रण दिलं. रूम न्याहाळण्यातच दीड-पावणे दोन तास गेलेत हे हाय-टीचं नाव ऐकल्यावर लक्षात आलं...

आम्ही तिघं खाली आलो. लिफ्टच्या डाव्या बाजूला आणि मुख्य रिसेप्शन काऊंटरच्या समोर 'शामियाना' नावाचं डाईन-इन रेस्टॉरंट आहे. हॉटेलमधल्या सर्व रहिवासी ग्राहकांच्या ब्रेक फास्ट, लंच, हाय-टी आणि डिनरचा बुफे तिथे लावला जातो. आम्ही तिथे गेलो. दारावर उभ्या असलेल्या ललनेने आमचा रूम नंबर विचारला. रूम नंबर समजताच आमच्या पॅकेजमध्ये फक्त ब्रेकफास्ट असल्याचं तर तिने सांगितलंच, शिवाय जर आत जायचं असेल तर हाय-टीचे पैसे आधी भरावे लागतील. माझ्याकडे 'मेक माय ट्रिप' मधून मिळालेलं गिफ्ट वाऊचर होतं, पण ते इथे वापरावं असं नाही वाटलं मला. मी मेन्यूवर नजर मारली, तर चहा-कॉफीसोबत बिस्किटं, कुकीज, पेस्ट्रीज, रोल्स अशी जवळ जवळ १५-१६ नावं दिसली. मी अनुराला विचारलं इथे जायचं का तर तिला सकाळी जेवलेल्या 'स्टेटस' हॉटेलमध्ये जायचं होतं...

'शामियाना'तल्या हाय-टीला बगल देऊन त्याच्याच बाजूला असलेल्या केक काऊंटरवर आम्ही पोहोचलो. मिळालेल्या गिफ्ट वाऊचरचा वापर करून दोन मोठाल्या पेस्ट्रीज आम्ही पदरात पाडून घेतल्या. पेस्ट्री खाऊन बाहेर येईपर्यंत सवा पाच झाले होते. 'मरीन ड्राईव्ह', 'गेट वे' या गोष्टी निर्बंधांमुळे बंद झाल्या होत्या. 'गेट वे'ला येणाऱ्या जेट्टी आणि प्रवाशांची गर्दी इतकाच काय तो जमाव दिसत होता. आम्ही 'ताज'च्या आजू-बाजूच्या परिसरातच चालण्याचा, छोट्या छोट्या गल्ल्या पाहण्याचा निर्णय घेतला. आस-पासची वर्दळ, गल्ल्या, दुकानं पाहत विंडो शॉपिंग करण्यात साडे सहा वाजले. 'रीगल' थियेटरच्या थोडंसं पुढे जाऊन आम्ही टॅक्सी घेतली आणि 'स्टेटस' हॉटेल गाठलं. 'ताज'ची नाईट लाईफ काही औरच असते असं ऐकलं होतं. तो ही अनुभव घेण्यासाठी लवकर जेऊन पावणे आठच्या सुमारास 'ताज'ला परतलो...

४. ‘ताज’ची नाईट लाईफ, ग्रँड ब्रेकफास्ट आणि समारोप...

'गेट वे'ला पोहोचलो तर सगळा शुकशुकाट होता. सकाळी पाहिलेला हाच का तो गजबजलेला रस्ता अशी शंका यावी इतपत शांतता होती. 'ताज टॉव्हर'च्या गल्लीत डावीकडे वळलो आणि एकदम झगमगात डोळ्यांवर आला. 'ताज महाल' हॉटेलला बाहेरून सुंदर रोषणाई केलेली होती. 'ताज टॉव्हर'च्या प्रत्येक मजल्याच्या बाल्कनीखाली एकेक दिवा दिसत होता. दिव्यांच्या रांगाच होत्या जणू. यात रस्त्यावरच्या हिरव्या-पिवळ्या प्रकाश योजनेची छान भर पडत होती. त्यामुळे एकीकडे सूर्यासारखा झगमगाट तर दुसऱ्या बाजूला ताऱ्यांची लुकलूक असा मनोरम contrast दिसत होता. आम्ही हॉटेलच्या आत शिरलो. तिथे तर रोषणाई काही औरच होती...

सकाळच्या पांढऱ्या-पिवळ्या लाईट्स सोबत झुंबरातून येणाऱ्या प्रकाशामुळे प्रकाशाचे निरनिराळे रंग दिसत होते. ख्रिस्टमस आणि नवीन वर्षाची सांगड घालून त्या रिसेप्शन एरियात अनेक छोट्या-मोठ्या शोभेच्या वस्तू ठेवल्या होत्या. छोटी छोटी घरं रचून त्यांवर कापूस ठेवले होते, जणू बर्फात ती घरं लपली आहेत असा भास होत होता. कुठे छोटासा सँटा क्लॉज तर कुठे छोटी-छोटी माणसं ठेवली होती, कुठे राजा-राणी तर कुठे सुंदर देखावे रचलेले होते. या सर्वांना कापसाने सजवल्यामुळे आणि त्यांच्या आतून प्रकाश योजना दिल्यामुळे त्या सर्व वस्तू अधिकच आकर्षित दिसत होत्या. त्या सर्व वस्तूंचा निवांतपणे आनंद घेतल्यावर रूमकडे जाण्याआधी इथे अजून काय आहे ते पहावं असा विचार केला...


मुख्य रिसेप्शन काऊंटरच्या दोन्हीही बाजूला दोन रस्ते आत गेले होते. काऊंटरच्या डावीकडे जाणारा रस्ता
, spa, pool आणि gymकडे जात होता. ते सर्व बंद असल्याने तो रस्ता ब्लॉक केला गेला होता. मग आम्ही काऊंटरच्या उजवीकडील रस्त्याकडे वळलो. ती एक लांबच लांब लॉबी होती. लॉबीच्या दुतर्फा बरेच दरवाजे आम्हाला दिसत होते. आम्ही त्या लॉबीमध्ये शिरलो. आमच्या डाव्या हाताला वेगवेगळी रेस्टॉरंट्स आणि बार्स होते तर उजव्या हाताला शो पीस गॅलरीज आणि पुस्तकांची दुकानं होती. तिथल्या किमतींचा अंदाज बांधत आणि दुकानांना लावलेल्या दिव्यांची आरास पाहत आम्ही पुढे सरकलो. लॉबीचा रस्ता उजवीकडे वळला तसे आम्ही पण वळलो. तिथे दोन्हीही बाजूला कपड्यांची आणि वेगवेगळ्या उपकरणांची दुकानं होती. टाय-पिन, कफ्लिंग, घड्याळं, पेनं अशी उपकरणं तर होतीच, शिवाय बूट, सँडल्स, गॉगल्स, पर्सेस यातलेही प्रकार होते...

बराच वेळ विंडो शॉपिंग केल्यावर अखेर सवा नऊ वाजता आम्ही रूम मध्ये गेलो. रात्रीचं शहर पहावं या विचाराने बाल्कनीचं दार ढकललं. खाली पाहिलं तर जिथे दुपारी वाहनांची रेलचेल, माणसांच्या झुंडी दिसत होत्या, तिथे आता सामसूम होतं. शहराकडे नजर फिरवली तर टिमटिमणाऱ्या ताऱ्यांप्रमाणे बिल्डिंगमधले लाईट्स दिसत होते. कुठल्यातरी सिनेमात 'ताऱ्यांचं बेट' असा उल्लेख आला होता. बाल्कनीतून शहराचं हे दृष्य पाहताना अगदी तेच आठवलं. आम्ही तिघांनी बराच वेळ बाल्कनीत घालवला. शेवटी 'नेम-प्लेस-ऍनिमल-थिंग' या गेमने दिवस संपवला. झोपताना उत्सूकता लागली होती, ती सकाळी 'शामियाना' रेस्टॉरंटमध्ये होणाऱ्या ग्रँड ब्रेकफास्टची...

सकाळ झाली. अकराचं चेक-आऊट होतं. सगळी आवरा-आवर करून आम्ही सज्ज झालो. आमच्या फ्लोअर मॅनेजरने माहिती देताना आम्हाला ब्रेकफास्टच्या तीन वेळा सांगितल्या होत्या. साडे सात ते साडे आठ अजिबात गर्दी नसते, साडे आठ ते साडे नऊ तुरळक गर्दी असते आणि शेवटचा एक तास म्हणजे साडे नऊ ते साडे दहा तुफान गर्दी होते असं तो म्हणाला होता. हे डोक्यात ठेऊन पावणे नऊच्या सुमारास आम्ही खाली आलो. 'शामियाना' रेस्टॉरंटच्या दारात उभ्या सुंदरीने हात जोडून आमचं स्वागत केलं. आमचा रूम नंबर विचारून आम्हाला बसण्यासाठी टेबल मिळवून दिलं. इथे एक गोष्ट अशी समजली, की प्रत्येक रूमला टेबल आधीच नियुक्त केलं गेलं होतं. आपण आत जाऊन कुठल्याही टेबलवर बसू शकत नव्हतो. स्थिरस्थावर झाल्यावर अनुरा आणि तेजू सगळे काऊंटर्स पाहून घ्यावेत म्हणून निघाल्या. जवळ जवळ दहा मिनिटांनी दोघी परतल्या तेव्हा अनुराच्या हातात छोटी आणि तेजूच्या हातात मोठी प्लेट होती. अनुराच्या चेहेऱ्यावरचा आनंद तर ओसंडून वाहत होता...

ती म्हणाली, "बाबू, जाऊन बघ काय काय आहे खायला... सो यम्मी..." त्या दोघी बसल्यावर मी उठलो आणि काऊंटर्सकडे निघालो. नॉन-व्हेज काऊंटर वेगळा आणि व्हेज वेगळा असा प्रकार नव्हता तिथे. लाल आणि हिरवे चौकोन आणि ठिपके प्रत्येक दिशसोबत लावले होते. त्यांना पाहून, ते व्हेज की नॉन-व्हेज हे समजत होतं. संपूर्ण ब्रेकफास्ट काऊंटर इंग्रजी 'एल' आकारात होता. मोठ्या काऊंटरवर, ऑम्लेट-ब्रेड (ऑर्डर प्रमाणे बनवून दिले जात होते), ब्रेड-बटर-जॅम, उपमा, मेदू वडे, इडली, नूडल्स, डोसे-उत्तप्पे, छोटे समोसे, छोटे बटाटे वडे, कॉर्न फ्लेक्स, तीन प्रकारचे परोठे (ऑर्डर प्रमाणे बनवून दिले जात होते), कोथिंबीरवडी, डोसे-उत्तप्पे (ऑर्डर प्रमाणे बनवून दिले जात होते), कापलेली फळं, चार प्रकारचे ज्यूसेस, असा थाट होता. छोट्या काऊंटरवर crossiants, donuts, muffins, neutella, choco cookies, बदाम, पिस्ते, काजू, बेदाणे, चहा, कॉफी असं सगळं रचून ठेवलं होतं. हे फक्त व्हेजवाले पदार्थ होते. नॉन-व्हेजचे काऊंटर्स धरता तब्बल पंसवीसेक पदार्थ तरी होतेच...



आजवर जेवढे बुफे पाहिले, त्यांत आणि या बुफेमध्ये थोडा फरक दिसला. इतर कुठेही बुफे लागला असेल तर साधारणपणे संपूर्ण प्लेट भरेल इतपत अन्न भरून घेतलं जातं आणि बसायची जागा न मिळाल्यास कुठेतरी बाजूला उभं राहून ते अन्न खाल्लं जातं. आपल्याला हवा तो पदार्थ अजून हवा असल्यास रांगेमध्ये शिरून तो पदार्थ मिळवला जातो. जर लाईव्ह काऊंटर असेल, तर तिथे प्लेट धरून उभ्या व्यक्तींची चांगलीच गर्दी दिसते आणि आपली डिश भरली की एकेक जण कमी होत जातो. पण इथे ‘शामियाना’मधल्या बुफेची वेगळीच रीत, ज्याला आपण बुफे मॅनर्स म्हणू शकतो, ते पाहायला मिळालं. ऑम्लेट-ब्रेड, परोठे, डोसे-उत्तप्पे, चहा, कॉफी या लाईव्ह काऊंटर्सवर एक माणूस उभा होता. टेबल नंबर किंवा रूम नंबरसह तो ऑर्डर घेत होता. मोजून पाचव्या मिनिटाला ती ऑर्डर बरोब्बर विविक्षित टेबलावर पोहोचत होती...

छोटे समोसे, छोटे बटाटे वडे, कोथिंबीरवडी, कॉर्न फ्लेक्स, crossiants, donuts, muffins, choco cookies, बदाम, पिस्ते, काजू, बेदाणे या सूख्या पदार्थांसाठी वेगळी डिश घ्यायची होती तर नूडल्स, उपमा, इडली यांसाठी वेगळी डिश घ्यायची होती. कापलेल्या फळांसाठी त्याच काऊंटरवर वेगळ्या छोट्या डिशचा थर ठेवला होता, जो फक्त फळांसाठी वापरायचा होता. इतक्या सगळ्या डिशेस एकाच टेबलवर कशा मावतील, हाही प्रश्न होताच. पण याला ‘शामियाना’मधल्या अटेंडंट्स चोख उत्तर होतं. त्यांचं सर्व टेबलांकडे लक्ष होतं. एखाद्या टेबलवर एखादी प्लेट किंवा डिश तशीच दिसली, की त्या टेबलाजवळ येत ते अटेंडंट्स अजून काही हवं आहे का, असं विचारायचे. आणि जर त्या डिशचं काम झालं असेल तर लगेच ती डिश तिथून उचलली जायची. एखादा पदार्थ अधिक हवा असल्यास फिरणाऱ्या अटेंडंट्सपैकी कोणाला सांगितलं, तर एका ठराविक प्रमाणात तो पदार्थ टेबलवर हजर व्हायचा. यामुळे गर्दी वाढत असतानाही कुठेही गडबड-गोंधळ किंवा काऊंटर्सवर गलका दिसत नव्हता. उलट सर्वांचा ब्रेकफास्ट सुरळीत पार पडत होतं...  

ब्रेकफास्टला इतके पदार्थ होते, तर दुपारच्या आणि रात्री जेवणात किती आणि काय काय पदार्थ असू शकतील, हाच विचार मनात आला. जवळ जवळ सर्व पदार्थांवर यथेच्छ ताव मारून पोट तुडुंब भरलं होतं. अनुराला तर अजून तिथेच बसायचं होतं. अर्धा तास टाईमपास करून परत डिश भरू, असं तिचं म्हणणं होतं. पोट फुटेल इतकं खालल्याने आता अजून काही पोटात जावं असं आम्हाला वाटेना. मग जड पावलांनी आम्ही 'शामियाना' सोडलं आणि रूमची वाट धरली. आजवरच्या अनुभवांवरून, चेक-आऊटमध्ये किती वेळ लागू शकतो हे लक्षात घेऊन मी निघायची घाई करू लागलो. रिसेप्शनवर पोहोचलो तर काचेपलिकडच्या अधिकाऱ्याने हसून माझं स्वागत केलं. माझ्याकडून कार्ड घेऊन दुसऱ्या मिनिटाला माझी वाट मोकळी केली. कुठलेही कमी-जास्त सोपस्कार न करता, आठ तारखेचं चेक-इन आणि नऊ तारखेचं चेक-आऊट अगदी सुरळीत पार पडलं होतं...

फिरत्या गोलाकार दरवाजाबाहेर पडताना मागे पाहिलं, तर जवळच उभा असलेला सुटा-बुटातला एक अधिकारी हसतमुखाने आम्हाला हात करत होता. आम्ही मेन गेटवर पोहोचलोच होतो की माझा फोन वाजला. 'ताज'कडून एक courtesy message आला होता ज्यात आमच्या वास्तव्याबद्दल धन्यवाद म्हटलं गेलं होतं. आम्ही टॅक्सी घेतली आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली. 'ताज टॉव्हर' मागे जात इतर बिल्डिंगच्या पाठी नाहीसा झाला. दोन दिवस का होईना, पण 'ताज'चा grand आणि five star अनुभव गाठीशी आला, हे ही नसे थोडके...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Wednesday, January 12, 2022

प्रँक...


रात्रीची वेळ होती. थंडगार वाऱ्यासोबत पाऊस कोसळत होता. "गुमनाम है कोई... बदनाम है कोई..." हळू आवाजात हे गाणं वाड्यात वाजत होतं. वाडा पूर्ण अंधारलेला होता. निलिमा एकेक खोलीचा दरवाजा बाजूला सारत कानोसा घेत होती. अधून-मधून कानी पडणारं ते गाणं तिचा थरकाप उडवत होतं. निलिमा हॉलच्या मधोमध उभी होती. ती दुसऱ्या बाजूच्या खोल्यांकडे वळणार इतक्यात तिच्या हातावर काहीतरी पडलं. तिने हात चाचपडला तर पाण्यासारखं काहीतरी लागलं. निलिमाने मोबाईलचा टॉर्च हातावर मारला तर त्या द्रवाचा रंग लाल होता. ते रक्त होतं. निलिमा थरथरू लागली. तेवढ्यात अजून एक रक्ताचा थेंब तिच्या खांद्यावर पडला. निलिमाने वर पाहिलं मात्र
, ती भितीने गोठून गेली. रक्ताळलेले अनेक हात वरच्या बाजूने तिच्याकडे येताना तिला दिसले. निलिमाने आर्त किंकाळी फोडली...

निलिमा खडबडून जागी झाली. तिला दरदरून घाम फुटला होता. तिने स्वत:चा हात आणि खांदा चाचपडले. तिथे काहीच नव्हतं. निलिमाने घड्याळाकडे पाहिलं, तर सकाळचे साडे सहा वाजले होते. आपण स्वप्न पाहत होतो हे लक्षात येताच निलिमाला हायसं वाटलं. तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला. पलिकडून आवाज आला, "निलू, साडे सहा वाजलेत. तू तयार नसशीलच. कॉलेजला भेटायचं आहे सर्वांना. लेटलतीफला पेनल्टी आहे माहित आहे ना..." हे ऐकून निलिमा डोळे मोठे करत, "ओ शीट, विसरलेच मी. थँक्स सँडी..." हे म्हणाली आणि फोन तसाच बेडवर टाकून वॉशरूमकडे पळाली. सगळं आवरून-सवरून, "आई येते गं... उद्या संध्याकाळपर्यंत येईन..." असं म्हणून, "अगं जरा हळू... आणि सांभाळून गं..." हे तिच्या आईचं वाक्य पूर्ण होण्याआधी निलिमाने घराबाहेर धूम ठोकली...

निलिमा गेटजवळ पोहोचली तेव्हा संदेश, विक्रांत, कविता, अजित आणि मधुरा तिची वाटच पाहत होते. तिला पाहून सर्वजण लेटलतीफ, पेनल्टी असं ओरडू लागले. संदेशला चापट मारत निलिमा म्हणाली, "काय रे सँड्या... लवकर का नाही केलास कॉल... उशीर झाला ना मला... गाईज, हा सँडीच जबाबदार आहे माझ्या लेट येण्याला... खरंतर मी येणारच नव्हते आज... अरे पहाटे पहाटे..." निलिमाला मध्येच तोडत विक्रांत म्हणालाच, "ते सगळं जाऊ दे, पण निलू, तू लेट आलीस. आता पेनल्टी..." "अरे पण विक्या, पेनल्टी तर सांग..." कविता आणि मधुराने एकत्रच उच्चारलेल्या वाक्यावर अजित म्हणाला, ", ते सगळं लोणावळ्याला पोहोचल्यावर. आधी निघुया आपण. ट्रॅफिक लागायचा नाहीतर..." सर्वांना अजितचं म्हणणं पटलं आणि विकीच्या गाडीत सर्व बसले...

गाडी सुरू झाली. कविताने निलिमाला विचारलं, "काय गं, मगाशी म्हणालीस तू येणारच नव्हतीस... तब्येत बरी नाही का..." कविताचा हात पकडत निलिमा म्हणाली, "तसं नाही अगं, पहाटे पहाटे मला एक भयानक स्वप्न पडलं. तेव्हापासून माझं चित्त थाऱ्यावर नाही. पहाटेची स्वप्न खरी होतात म्हणे..." "चल, तुझं आपलं काहीतरीच..." निलिमाचं वाक्य तोडत मधुरा म्हणाली, "निले, हा घाबरटपणा सोड गं आता. त्यामुळेच तर तुला सगळे भित्री भागुबाई म्हणतात..." हे ऐकून निलिमा थोडी खिन्न झाली. विक्रांत तेवढ्यात म्हणाला, "सोडा यार, टॉपिक चेंज. निलू, अगं तू इतकी छान गातेस, ऐकव की तुझं फेव्हरेट गाणं. तुझ्यानंतर बाकी सगळे पण त्यांचं त्यांचं आवडतं गाणं गातील. आज्या रेकॉर्ड कर पाहू..." निलिमाने घसा साफ केला आणि गायला सुरुवात केली, "गुमनाम कोई... बदनाम है..." "ए निले, चांगल्या दिवशी हे काय गातेस..." निलिमाला थांबवत संदेश म्हणाला...

संदेशला टपलीत मारत अजित म्हणाला, "ए सँड्या, कोणीही कोणतंही गाणं गाऊ शकतं बरं का. तू लक्ष नको देऊ गं... कर सुरुवात. मी परत रेकॉर्डिंग स्टार्ट करतो..." निलिमाने पुन्हा गायला सुरुवात केली. निलिमापाठोपाठ बाकीच्यांनी पण त्यांची त्यांची आवडती गाणी गायली आणि प्रवास अजून सुकर होत गेला. काही वेळातच गाडी विकीच्या लोणावळ्यातल्या घरी पोहोचली. चहा-नाश्ता सुरू असताना कविता आणि मधुराने पुन्हा पेनल्टीचा विषय काढला. विकीने एकदम फिल्मी स्टाईलमध्ये, "सब्र करो सब्र करो... सब्र का फल मीठा होता है..." असं म्हणत अजितला टाळी दिली. कविता आणि मधुराने एकमेकींकडे पाहिलं तेव्हा निलिमा आणि संदेशनेसुद्धा एकमेकांकडे पाहिलं. चहा-नाश्ता झाला आणि सगळी फिरायला बाहेर पडली. संध्याकाळी दमून-भागून सगळे बंगल्यावर परतले. निलिमाला वाटलं विकी बहुतेक विसरला पेनल्टीबद्दल. या विचाराने निलिमा तर सुखावत होती, पण अजित आणि विकीच्या मनात काहीतरी वेगळंच सुरू होतं...

जेवणं झाल्यावर विकी म्हणाला, "चला रे आपण वॉक घेऊन येऊ..." असं म्हणत त्याने अजितकडे पाहिलं आणि अजितच्या चेहेऱ्यावर हास्यरेषा उमटली. बंगल्याच्या बाजूला असलेल्या झाडीतून वाट काढत सर्वजण जात होते. मुली थोड्या बावरल्या होत्या, पण मुलं सोबत आहेत म्हणून चालत होत्या. "आलो आपण स्पॉटला. विक्या शुरू हो जाओ..." अजितचं बोलणं ऐकून सर्वजण थांबले. विक्रांतने टॉर्च मारला. समोर दोन मजली बंगला दिसत होता. बंगल्याकडे बोट दाखवत विकी म्हणाला, "गाईज, खूप वर्षांपूर्वी या बंगल्यात एक माणूस रहायचा. त्याच्याकडे खूप पैसा होता. त्याला चारच शौक होते, जुनी गाणी ऐकणं, जेवण बनवणं, बाटली आणि बाई. म्हणे, तो रोज एक बाई घेऊन बंगल्यावर यायचा. गावातल्या कोणाशीच त्याने कधी संबंध ठेवला नाही. एक दिवस त्याने गावातल्याच एका मुलीला पळवून बंगल्यावर आणलं. तिला वाचवायला गावकरी लाठ्या-मशाली घेऊन बंगल्यावर गेले. त्या मुलीची वाईट अवस्था पाहून ते भडकले. त्यांनी त्या माणसाला बंगल्यातच बांधून बंगला पेटवला. तो माणूस जळून मेला, पण त्याचा आत्मा तिथेच राहिला. आजही या बंगल्यात इथल्या लोकांना कधी-कधी अन्न शिजण्याचा वास येतो किंवा जुनी गाणी ऐकू येतात..."

सर्वजण स्तब्ध होऊन ऐकत होते. विक्रांत पुढे म्हणाला, "निलू, तुझी पेनल्टी ही, की तू या बंगल्यात जाऊन सगळ्या खोल्यांमधून फिरून परत यायचंस..." हे ऐकून निलिमा थोडी घाबरली. मागे सरकत म्हणाली, "ओके. उद्या सकाळी आपण परत जाण्यापूर्वी मी जाऊन येईन बंगल्यात..." तेवढ्यात अजित म्हणालाच, "सुबह का वेट कौन करेगा... पेनल्टी तर आत्ताच भरली पाहिजे. नाहीतर या पुढे आम्ही सर्व तुला भित्री निलिमा या नावाने हाक मारणार..." कविता आणि मधुरासुद्धा अजित आणि विक्रांतच्या बाजूने बोलू लागल्या. सर्वांची समजूत काढताना संदेश मात्र एकटा पडला. निलिमा थोडा विचार करू लागली. मग विक्रांत व अजितकडे वळत म्हणाली, "ठिक आहे. मी आत्ताच जाते. पण या पुढे तुम्ही मला चिडवायचं नाही..." सर्वांनी होकारार्थी माना डोलवल्या. अजित म्हणाला, "गो अहेड निलू. आम्ही सगळे इथेच आहोत. डोंट वरी..." निलिमाला थोडं हायसं वाटलं. मधुराने दिलेला टॉर्च घेऊन निलिमा बंगल्याच्या गेटजवळ पोहोचली. तिने मागे वळून पाहिलं तर सगळे तिला हात दाखवत होते. एक मोठा श्वास घेऊन निलिमाने गेट ढकललं...

"कड् कड्..." असा आवाज करत गेट उघडलं गेलं. अंगावर शहारे आणणाऱ्या त्या आवाजाने निलिमा थोडी घाबरली आणि एक पाऊल मागे सरकली. टॉर्च चालू करून निलिमा पुढे सरसावली आणि बंगल्याच्या दारापर्यंत पोहोचली. तिने कडी काढली आणि दार ढकललं. ते दारसुद्धा कर्कश आवाज करत उघडलं. निलिमाने बाहेरूनच टॉर्च मारला. आत मिट्ट काळोख होता. निलिमा दोन पावली पुढे जात आत शिरली. तिथे बंगल्यापासून काही अंतरावर उभ्या विक्रांतने, "अब शुरू होगा एक जबरदस्त सीन..." असं म्हणून खिशातून रिमोट काढत बटण दाबलं. बंगल्याचा दरवाजा आपोआप बंद झाला. कविता, मधुरा आणि संदेशने आश्चर्याने विक्रांतकडे पाहिलं तेव्हा अजितला टाळी देत विक्रांत म्हणाला, "हा माझ्या पप्पांच्या मित्राचा बंगला आहे. मित्र गेली पाच वर्ष यू.एस.ला आहे म्हणून हा बंगला बंदच असतो. आपण सगळे इथे येणार हे मी पप्पांना सांगितलं तेव्हा त्यांनी मला या बंगल्याची चावी दिली आणि इथे काही कमी-जास्त नाही ना ते बघायला सांगितलं. चावी दिसताच मला एक आयडिया सुचली आणि मी आज्याला कॉल केला..."

आता अजित बोलू लागला, "आत्तापर्यंत आपल्या ग्रूपमधल्या सगळ्यांवर प्रँक्स झालेत पण ही निलिमा नेहमी वाचत राहिली. आज तिचा नंबर लागला आहे. सँड्या, तुला मुद्दामच आम्ही अर्धा तास लेट सांगितलं. तू कॉलेजजवळ राहतोस म्हणून लवकर आलास. पण निलिमाला उशीर झाला. या बंगल्यात कोणी आत्मा वगैरे नाही. मी आणि विक्या दोन दिवसांपूर्वी आलो होतो इथे. बऱ्याच गोष्टी आम्ही इथे पेरून ठेवल्या आहेत. विक्या टॅब सुरू कर. आपण निलूची मजा पाहू..." संदेश थोडासा चिडला आणि म्हणाला, "धिस इज नॉट फेयर यार... मी आत्ताच जाऊन तिला सगळं सांगतो..." संदेशला थांबवत कविता म्हणाली, "ए सँडी नको ना यार पचका करू... फक्त थोडा वेळ..." कविताची री ओढत मधुरा म्हणाली, "हो ना... पिकनिकला आलोय तर जरा एंजॉय करू. आणि आपण इथेच तर आहोत..." सर्वांचं बोलणं ऐकून संदेश तयार झाला. आणि विक्रांतने टॅब सुरू केला...

तिथे बंगल्यात, एक पाऊल पुढे टाकताच दरवाजा धाडकन् बंद झालेला पाहून निलिमा दचकली. तिच्या हातून टॉर्च निसटला आणि जमिनीवर पडून बंद झाला. पुन्हा एकदा मिट्ट काळोख झाला होता. निलिमाने जवळची जमीन चाचपडली पण तिला टॉर्च सापडला नाही. तिने मोबाईल टॉर्च सुरू करून खाली पाहिलं, तर टॉर्चची काच फुटली होती आणि आतला बल्बही तुटला होता. टॉर्च आता काम करणार नाही हे लक्षात आल्यावर मोबाईल टॉर्च वर धरत तिने सगळीकडे नजर फिरवली. निलिमा एक मोठ्या दिवाणखान्यात उभी होती. तिच्या डाव्या हाताला दोन दरवाजे तर उजव्या हाताला एक दरवाजा होता. निलिमाच्या समोर एक दरवाजा होता आणि बाजूलाच वरच्या मजल्याकडे जाणारा एक जिना होता. निलिमा विचार करू लागली, "इथे चार दारं आहेत. म्हणजे चार खोल्या, आणि हा जिना... आपण पटकन या सगळ्या खोल्यांमधून जाऊन बाहेर येऊ आणि लगेच बाहेर पडू..." हा विचार करून निलिमा डाव्या हाताच्या पहिल्या दाराकडे वळली...

हळूहळू ती दाराजवळ आली. तिने दार चाचपडलं आणि नॉब फिरवून दार ढकललं. कसलाही आवाज न करता ते दार उघडलं. निलिमाने मोबाईल समोर धरून आत डोकावलं. ती एक साधीशी खोली होती. एक छोटा सोफा, एक टेबल, एक कपाट, असं सगळं तिथे होतं. बंगल्याबाहेर सर्वजण निलिमाला पाहत होते. मधुरा म्हणाली, "काय यार, निलूला आत जाऊन दहा मिनिटं झाली. अजून काहीच कसं होत नाही..." विकी हसला आणि रिमोटवरचं एक बटण दाबत म्हणाला, "अब देखो क्या होता है..." तिथे बंगल्यात निलिमा त्या खोलीच्या दाराशी उभी होती. ती पुढे जाणार इतक्यात समोरच्या खिडकीला लावलेला पडदा थोडा हलला आणि कोणाचातरी हळुवार हसण्याचा आवाज आला. निलिमा दचकली आणि तिने गोल फिरून सगळीकडे पाहिलं. तिथे कोणीच नव्हतं. निलिमा हललेल्या पडद्याकडे जाऊ लागली तोच पडदा पुन्हा हलला आणि पुन्हा हसण्याचा आवाज आला. निलिमा लगेच मागे सरकत  खोलीबाहेर आली आणि तिने दार लाऊन घेतलं. दाराबाहेर ती दम खात उभी असताना पुन्हा तिला आवाज आला. यावेळी कोणाच्यातरी रडण्याचा आवाज होता...

रडण्याचा आवाज येतो न येतो तोच हळुवार गाण्याचा आवाज आला, "गुमनाम है कोई..." निलिमाने कान देऊन ऐकलं. हे तिच्याच आवाजातलं गाणं होतं. निलिमा विचार करू लागली, "हे गाणं तर मी सकाळी गायलं होतं. इथे कसं काय... हा नक्कीच आज्या आणि विकीचा चावटपणा आहे...” मग सगळीकडे नजर फिरवत म्हणाली, “तुम्ही दोघं इथेच आहात ना... मला घाबरवण्यासाठी हे गाणं लावलंत ना... थांबा, आता तुम्हाला शोधूनच काढते..." असं म्हणून निलिमा बाजूच्या खोलीत गेली. बंगल्याच्या बाहेर बाकी सर्वजण लाईव्ह व्हिडियो पाहत असताना मधुरा म्हणाली, "ओ नो... निलूला कळलं... आता..." तोच मानेला झटका देत विक्रांत म्हणाला, "अरे मैं हूँ ना... कहानी में कुछ तो ट्विस्ट आना चाहिए... या रूममध्ये काहीच नाही पेरलेलं. तिला जरा किचनमध्ये तर जाऊ देत... फिर देखो..." मधुरा हसली आणि सर्वजण पुन्हा व्हिडियो पाहू लागले. निलिमा खोलीत पोहोचली. निलिमाने मोबाईल पुढे केला. खोलीत पुस्तकांनी भरलेली दोन कपाटं, एक टेबल आणि तीन-चार खुर्चा होत्या. बाकी कसलीच हालचाल तिथे नव्हती. निलिमाने उसासा सोडला तोच 'धप्' असा हलकासा आवाज आला...

निलिमाने लगेच आवाजाच्या दिशेने मोबाईल केला. तिथे काहीच नव्हतं. तिने मोबाईल डावीकडे केला, तर एक उंदीर पळत जाताना तिला दिसला. निलिमाने मोकळा श्वास सोडला आणि बाहेर येऊन दार लाऊन घेतलं. मोबाईल एकीकडे फिरवत निलिमा विचार करू लागली, "आता किचन आणि वरच्या खोल्याच राहिल्या आहेत. इथेच कुठेतरी हे दोघं लपून बसले असणार..." निलिमा किचनकडे वळली. तेवढ्यात मोबाईलने लो बॅटरीचा सिग्नल दिला. त्याकडे फारसं लक्ष न देता निलिमा किचनपर्यंत पोहोचली. तिथे बंगल्याबाहेर व्हिडियो पाहताना संदेश म्हणाला, "ए आता बस ना यार. इतका वेळ मजा बघितली ना..." संदेशला टपलीत मारत अजित म्हणाला, "ए सँड्या, बोर नको करू हां... आत्ता कुठे मजा यायला लागली आहे..." अजितला दुजोरा देत कविता म्हणाली, "हो ना... ए विकी तू सांग पुढे काय आहे. या सँड्याचं ऐकू नकोस..." विक्रांतने एकवार सर्वांकडे पाहिलं आणि संदेशच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, "ओके सँडी, तेरी दोस्ती के लिए... आता हा फायनल टच... या किचनमध्ये ते काचेचं कपाट आहे ना, त्यात एक मोबाईल मी व्हायब्रेटर मोडवर ठेऊन दिला आहे. आता फक्त पाच मिनिटं..."

बंगल्यात निलिमाने किचनच्या आत डोकावलं. किचनमधल्या सगळ्या वस्तू जागच्या जागी होत्या. एकदा आत जाऊन पूर्ण किचन पाहून निलिमा बाहेर येत असताना काचा हलण्याचा आवाज आला. निलिमाने आवाजाच्या दिशेला पाहिलं, तर काचेच्या कपाटातल्या वस्तू हलत होत्या आणि एक लाईट सारखा चालू-बंद होत होता. काही क्षणांसाठी निलिमा घाबरली खरी पण लगेच सावरत, "आज्या आणि विक्या, आता तुमचं बिंगच फोडते..." असं म्हणत तिने कपाटाचं दार उघडलं आणि आतला मोबाईल काढून बंद केला व ओट्यावर ठेवला. किचनच्या बाहेर येत असताना निलिमाने विक्रांतला कॉल लावला व म्हणाली, "ए विक्या, आता बस कर हां ही तुझी नाटकं. तुझं आणि आज्याचं पितळ उघडं पडलंय. चला, बाहेर या पाहू दोघांनी..." विक्रांत म्हणाला, "बाहेर या, अगं निलू आम्ही सगळे बाहेरच आहोत, गेटच्या बाजूला असलेल्या झाडाजवळ. तुला इतका वेळ का लागतोय..." विक्रांत बोलत असतानाच त्याने अजितला डोळा मारला आणि अजितने अजून एक बटण दाबलं...

तिथे निलिमाला हे समजताच ती म्हणाली, "काय, तुम्ही बाहेर आहात..." ती बोलतच होती, की तिच्या मागून 'टक्' असा आवाज आला आणि हलकासा उजेड दिसू लागला. निलिमाने हळूहळू मान वळवून पाहिलं, तर गॅस सुरू झाला होता. ती पेटणारी ज्योत पाहून निलिमा थरथरू लागली. तिच्या हातून मोबाईल गळून जमिनीवर पडला आणि बंद झाला. "विकी आणि अजित इथे नाहीत तर त्या खोलीत तो पडदा, हा गॅस, ते गाणं... म्ह...णजे इथे नक्कीच कोणीतरी आहे. मला इथून लगेच बाहेर पडायला हवं..." हा विचार करून निलिमा लगबगीनं किचनच्या बाहेर पडली. ती बाहेर आली आणि तिला मंद असा हसण्याचा आवाज आला. पाठोपाठ, "गुमनाम है कोई..." हे गाणंही सुरू झालं. आता मात्र निलिमा पुरती घाबरली आणि, "मला वाचवा... इथून बाहेर काढा... कोणीतरी मदत करा... असं ओरडत सैरा-वैरा पळू लागली. हे सर्व पाहताना संदेश म्हणाला, "आता बस झालं यार... अरे विकी कुठेतरी लिमिट ठेव... मी जातोय आत. तुम्हाला यायचं तर या नाहीतर गेट लॉस्ट..." एव्हाना हा प्रँक जरा जास्त झाल्याचं इतरांनाही वाटू लागलं आणि ते सर्व संदेशसोबत निघाले. अजितने बटण दाबून उघडलेलं दार संदेशने उघडलं आणि, "आऽऽऽऽऽऽऽऽऽऽ..."

ती किंकाळी निलिमाची होती. आवाज वरच्या मजल्याकडून आला होता. सगळे जिन्याने वर जात निलिमाला हाका मारू लागले. एका खोलीतून आवाज आला, "मी इथे आहे... मला खूप भिती वाटते आहे... लवकर या..." आवाज येत असलेल्या खोलीत सर्वजण पोहोचले. निलिमा खिडकीजवळ उभी होती. सर्वांना पाहून ती म्हणाली, "आलात तुम्ही... मी इथे अडकले आहे रे... मला बाहेर काढा ना..." सर्वजण पुढे जात असताना संदेश कशालातरी अडखळून पडला. सर्वांनी खाली पाहिलं आणि त्यांचा थरकाप उडाला. जमिनीवर पडलेली ती गोष्ट म्हणजे निलिमाचं निष्तेज प्रेत होतं. प्रेताचे डोळे सताड उघडे आणि भितीने भरलेले होते. विकीने थरथरत्या हाताने टॉर्च खिडकीवर मारला. निलिमा तिथे नव्हती. तेवढ्यात, "कोणाला शोधतो आहेस विकी... मी तर इथे उभी आहे..." या आवाजाने सर्वजण दचकले. आवाज त्यांच्या पाठून येत होता. सर्वांनी वळून पाहिलं, तर निलिमा दारात उभी होती. तिचे बुबुळं नसलेले डोळे, मोकळे केस आणि राखाडी रंगाचं भेगा पडलेलं शरीर पाहून सर्वांच्या काळजात धस्स झालं. सर्वजण मागे जात खोलीच्या मधोमध पोहेचले. कविता म्हणाली, "निलू... हे क...सं..."

कविताकडे पाहत निलिमा म्हणाली, "मी बाहेर जायचा मार्ग शोधताना अंधारात इथे वर आले. त्या आरशात पाहिलं आणि माझं काळीज माझी साथ सोडून गेलं..." हे ऐकून हात जोडत मधुरा म्हणाली, "निलू, माफ कर गं आम्हाला. मी आणि कविता तर यात नव्हतोच. आम्ही फक्त गम्मत बघत होतो..." "हो निलू, गोष्टी इतक्या हाताबाहेर जातील असं नव्हतं वाटलं गं आम्हाला. तुझ्यावर प्रँक करावा म्हणून..." अजितच्या वाक्याला तोडत भसाड्या आवाजात निलिमा म्हणाली, "प्रँक... प्रँकच्या नावाखाली जीवघेणी थट्टा केलीत तुम्ही... आधी या घरात कोणताही आत्मा किंवा भूत नव्हतं, पण आता... आता मी आहे... आणि... कधी कधी, सकाळी पडलेली स्वप्न खरी होतात... हा...हा...हा..." अघोरी हसत निलिमाने वर पाहिलं. हे पाहून इतरांनीही आपली नजर वर केली आणि ते भितीने गोठून गेले. रक्ताळलेले, लांब नखं असलेले अनेक हात खाली येत होते. ते हात पाहून सर्वांनी एकत्र किंकाळ्या फोडल्या... कानठळ्या बसणाऱ्या त्या किंकाळ्यांचा आवाज पूर्ण बंगल्यात घुमला. आणि सोबतच, "गुमनाम है कोई..." हे निलिमाच्या आवाजातलं गाणं ऐकू येऊ लागलं...

@ अनिकेत परशुराम आपटे.