निलिमा खडबडून जागी झाली. तिला दरदरून घाम फुटला होता. तिने स्वत:चा हात आणि खांदा चाचपडले. तिथे काहीच नव्हतं. निलिमाने घड्याळाकडे पाहिलं, तर सकाळचे साडे सहा वाजले होते. आपण स्वप्न पाहत होतो हे लक्षात येताच निलिमाला हायसं वाटलं. तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला. पलिकडून आवाज आला, "निलू, साडे सहा वाजलेत. तू तयार नसशीलच. कॉलेजला भेटायचं आहे सर्वांना. लेटलतीफला पेनल्टी आहे माहित आहे ना..." हे ऐकून निलिमा डोळे मोठे करत, "ओ शीट, विसरलेच मी. थँक्स सँडी..." हे म्हणाली आणि फोन तसाच बेडवर टाकून वॉशरूमकडे पळाली. सगळं आवरून-सवरून, "आई येते गं... उद्या संध्याकाळपर्यंत येईन..." असं म्हणून, "अगं जरा हळू... आणि सांभाळून गं..." हे तिच्या आईचं वाक्य पूर्ण होण्याआधी निलिमाने घराबाहेर धूम ठोकली...
निलिमा गेटजवळ पोहोचली तेव्हा संदेश, विक्रांत, कविता, अजित आणि मधुरा तिची वाटच पाहत होते. तिला पाहून सर्वजण लेटलतीफ, पेनल्टी असं ओरडू लागले. संदेशला चापट मारत निलिमा म्हणाली, "काय रे सँड्या... लवकर का नाही केलास कॉल... उशीर झाला ना मला... गाईज, हा सँडीच जबाबदार आहे माझ्या लेट येण्याला... खरंतर मी येणारच नव्हते आज... अरे पहाटे पहाटे..." निलिमाला मध्येच तोडत विक्रांत म्हणालाच, "ते सगळं जाऊ दे, पण निलू, तू लेट आलीस. आता पेनल्टी..." "अरे पण विक्या, पेनल्टी तर सांग..." कविता आणि मधुराने एकत्रच उच्चारलेल्या वाक्यावर अजित म्हणाला, "ए, ते सगळं लोणावळ्याला पोहोचल्यावर. आधी निघुया आपण. ट्रॅफिक लागायचा नाहीतर..." सर्वांना अजितचं म्हणणं पटलं आणि विकीच्या गाडीत सर्व बसले...
गाडी सुरू झाली. कविताने निलिमाला विचारलं, "काय गं, मगाशी म्हणालीस तू येणारच नव्हतीस... तब्येत बरी नाही का..." कविताचा हात पकडत निलिमा म्हणाली, "तसं नाही अगं, पहाटे पहाटे मला एक भयानक स्वप्न पडलं. तेव्हापासून माझं चित्त थाऱ्यावर नाही. पहाटेची स्वप्न खरी होतात म्हणे..." "चल, तुझं आपलं काहीतरीच..." निलिमाचं वाक्य तोडत मधुरा म्हणाली, "निले, हा घाबरटपणा सोड गं आता. त्यामुळेच तर तुला सगळे भित्री भागुबाई म्हणतात..." हे ऐकून निलिमा थोडी खिन्न झाली. विक्रांत तेवढ्यात म्हणाला, "सोडा यार, टॉपिक चेंज. निलू, अगं तू इतकी छान गातेस, ऐकव की तुझं फेव्हरेट गाणं. तुझ्यानंतर बाकी सगळे पण त्यांचं त्यांचं आवडतं गाणं गातील. आज्या रेकॉर्ड कर पाहू..." निलिमाने घसा साफ केला आणि गायला सुरुवात केली, "गुमनाम कोई... बदनाम है..." "ए निले, चांगल्या दिवशी हे काय गातेस..." निलिमाला थांबवत संदेश म्हणाला...
संदेशला टपलीत मारत अजित म्हणाला, "ए सँड्या, कोणीही कोणतंही गाणं गाऊ शकतं बरं का. तू लक्ष नको देऊ गं... कर सुरुवात. मी परत रेकॉर्डिंग स्टार्ट करतो..." निलिमाने पुन्हा गायला सुरुवात केली. निलिमापाठोपाठ बाकीच्यांनी पण त्यांची त्यांची आवडती गाणी गायली आणि प्रवास अजून सुकर होत गेला. काही वेळातच गाडी विकीच्या लोणावळ्यातल्या घरी पोहोचली. चहा-नाश्ता सुरू असताना कविता आणि मधुराने पुन्हा पेनल्टीचा विषय काढला. विकीने एकदम फिल्मी स्टाईलमध्ये, "सब्र करो सब्र करो... सब्र का फल मीठा होता है..." असं म्हणत अजितला टाळी दिली. कविता आणि मधुराने एकमेकींकडे पाहिलं तेव्हा निलिमा आणि संदेशनेसुद्धा एकमेकांकडे पाहिलं. चहा-नाश्ता झाला आणि सगळी फिरायला बाहेर पडली. संध्याकाळी दमून-भागून सगळे बंगल्यावर परतले. निलिमाला वाटलं विकी बहुतेक विसरला पेनल्टीबद्दल. या विचाराने निलिमा तर सुखावत होती, पण अजित आणि विकीच्या मनात काहीतरी वेगळंच सुरू होतं...
जेवणं झाल्यावर विकी म्हणाला, "चला रे आपण वॉक घेऊन येऊ..." असं म्हणत त्याने अजितकडे पाहिलं आणि अजितच्या चेहेऱ्यावर हास्यरेषा उमटली. बंगल्याच्या बाजूला असलेल्या झाडीतून वाट काढत सर्वजण जात होते. मुली थोड्या बावरल्या होत्या, पण मुलं सोबत आहेत म्हणून चालत होत्या. "आलो आपण स्पॉटला. विक्या शुरू हो जाओ..." अजितचं बोलणं ऐकून सर्वजण थांबले. विक्रांतने टॉर्च मारला. समोर दोन मजली बंगला दिसत होता. बंगल्याकडे बोट दाखवत विकी म्हणाला, "गाईज, खूप वर्षांपूर्वी या बंगल्यात एक माणूस रहायचा. त्याच्याकडे खूप पैसा होता. त्याला चारच शौक होते, जुनी गाणी ऐकणं, जेवण बनवणं, बाटली आणि बाई. म्हणे, तो रोज एक बाई घेऊन बंगल्यावर यायचा. गावातल्या कोणाशीच त्याने कधी संबंध ठेवला नाही. एक दिवस त्याने गावातल्याच एका मुलीला पळवून बंगल्यावर आणलं. तिला वाचवायला गावकरी लाठ्या-मशाली घेऊन बंगल्यावर गेले. त्या मुलीची वाईट अवस्था पाहून ते भडकले. त्यांनी त्या माणसाला बंगल्यातच बांधून बंगला पेटवला. तो माणूस जळून मेला, पण त्याचा आत्मा तिथेच राहिला. आजही या बंगल्यात इथल्या लोकांना कधी-कधी अन्न शिजण्याचा वास येतो किंवा जुनी गाणी ऐकू येतात..."
सर्वजण स्तब्ध होऊन ऐकत होते. विक्रांत पुढे म्हणाला, "निलू, तुझी पेनल्टी ही, की तू या बंगल्यात जाऊन सगळ्या खोल्यांमधून फिरून परत यायचंस..." हे ऐकून निलिमा थोडी घाबरली. मागे सरकत म्हणाली, "ओके. उद्या सकाळी आपण परत जाण्यापूर्वी मी जाऊन येईन बंगल्यात..." तेवढ्यात अजित म्हणालाच, "सुबह का वेट कौन करेगा... पेनल्टी तर आत्ताच भरली पाहिजे. नाहीतर या पुढे आम्ही सर्व तुला भित्री निलिमा या नावाने हाक मारणार..." कविता आणि मधुरासुद्धा अजित आणि विक्रांतच्या बाजूने बोलू लागल्या. सर्वांची समजूत काढताना संदेश मात्र एकटा पडला. निलिमा थोडा विचार करू लागली. मग विक्रांत व अजितकडे वळत म्हणाली, "ठिक आहे. मी आत्ताच जाते. पण या पुढे तुम्ही मला चिडवायचं नाही..." सर्वांनी होकारार्थी माना डोलवल्या. अजित म्हणाला, "गो अहेड निलू. आम्ही सगळे इथेच आहोत. डोंट वरी..." निलिमाला थोडं हायसं वाटलं. मधुराने दिलेला टॉर्च घेऊन निलिमा बंगल्याच्या गेटजवळ पोहोचली. तिने मागे वळून पाहिलं तर सगळे तिला हात दाखवत होते. एक मोठा श्वास घेऊन निलिमाने गेट ढकललं...
"कड् कड्..." असा आवाज करत गेट उघडलं गेलं. अंगावर शहारे आणणाऱ्या त्या आवाजाने निलिमा थोडी घाबरली आणि एक पाऊल मागे सरकली. टॉर्च चालू करून निलिमा पुढे सरसावली आणि बंगल्याच्या दारापर्यंत पोहोचली. तिने कडी काढली आणि दार ढकललं. ते दारसुद्धा कर्कश आवाज करत उघडलं. निलिमाने बाहेरूनच टॉर्च मारला. आत मिट्ट काळोख होता. निलिमा दोन पावली पुढे जात आत शिरली. तिथे बंगल्यापासून काही अंतरावर उभ्या विक्रांतने, "अब शुरू होगा एक जबरदस्त सीन..." असं म्हणून खिशातून रिमोट काढत बटण दाबलं. बंगल्याचा दरवाजा आपोआप बंद झाला. कविता, मधुरा आणि संदेशने आश्चर्याने विक्रांतकडे पाहिलं तेव्हा अजितला टाळी देत विक्रांत म्हणाला, "हा माझ्या पप्पांच्या मित्राचा बंगला आहे. मित्र गेली पाच वर्ष यू.एस.ला आहे म्हणून हा बंगला बंदच असतो. आपण सगळे इथे येणार हे मी पप्पांना सांगितलं तेव्हा त्यांनी मला या बंगल्याची चावी दिली आणि इथे काही कमी-जास्त नाही ना ते बघायला सांगितलं. चावी दिसताच मला एक आयडिया सुचली आणि मी आज्याला कॉल केला..."
आता अजित बोलू लागला, "आत्तापर्यंत आपल्या ग्रूपमधल्या सगळ्यांवर प्रँक्स झालेत पण ही निलिमा नेहमी वाचत राहिली. आज तिचा नंबर लागला आहे. सँड्या, तुला मुद्दामच आम्ही अर्धा तास लेट सांगितलं. तू कॉलेजजवळ राहतोस म्हणून लवकर आलास. पण निलिमाला उशीर झाला. या बंगल्यात कोणी आत्मा वगैरे नाही. मी आणि विक्या दोन दिवसांपूर्वी आलो होतो इथे. बऱ्याच गोष्टी आम्ही इथे पेरून ठेवल्या आहेत. विक्या टॅब सुरू कर. आपण निलूची मजा पाहू..." संदेश थोडासा चिडला आणि म्हणाला, "धिस इज नॉट फेयर यार... मी आत्ताच जाऊन तिला सगळं सांगतो..." संदेशला थांबवत कविता म्हणाली, "ए सँडी नको ना यार पचका करू... फक्त थोडा वेळ..." कविताची री ओढत मधुरा म्हणाली, "हो ना... पिकनिकला आलोय तर जरा एंजॉय करू. आणि आपण इथेच तर आहोत..." सर्वांचं बोलणं ऐकून संदेश तयार झाला. आणि विक्रांतने टॅब सुरू केला...
तिथे बंगल्यात, एक पाऊल पुढे टाकताच दरवाजा धाडकन् बंद झालेला पाहून निलिमा दचकली. तिच्या हातून टॉर्च निसटला आणि जमिनीवर पडून बंद झाला. पुन्हा एकदा मिट्ट काळोख झाला होता. निलिमाने जवळची जमीन चाचपडली पण तिला टॉर्च सापडला नाही. तिने मोबाईल टॉर्च सुरू करून खाली पाहिलं, तर टॉर्चची काच फुटली होती आणि आतला बल्बही तुटला होता. टॉर्च आता काम करणार नाही हे लक्षात आल्यावर मोबाईल टॉर्च वर धरत तिने सगळीकडे नजर फिरवली. निलिमा एक मोठ्या दिवाणखान्यात उभी होती. तिच्या डाव्या हाताला दोन दरवाजे तर उजव्या हाताला एक दरवाजा होता. निलिमाच्या समोर एक दरवाजा होता आणि बाजूलाच वरच्या मजल्याकडे जाणारा एक जिना होता. निलिमा विचार करू लागली, "इथे चार दारं आहेत. म्हणजे चार खोल्या, आणि हा जिना... आपण पटकन या सगळ्या खोल्यांमधून जाऊन बाहेर येऊ आणि लगेच बाहेर पडू..." हा विचार करून निलिमा डाव्या हाताच्या पहिल्या दाराकडे वळली...
हळूहळू ती दाराजवळ आली. तिने दार चाचपडलं आणि नॉब फिरवून दार ढकललं. कसलाही आवाज न करता ते दार उघडलं. निलिमाने मोबाईल समोर धरून आत डोकावलं. ती एक साधीशी खोली होती. एक छोटा सोफा, एक टेबल, एक कपाट, असं सगळं तिथे होतं. बंगल्याबाहेर सर्वजण निलिमाला पाहत होते. मधुरा म्हणाली, "काय यार, निलूला आत जाऊन दहा मिनिटं झाली. अजून काहीच कसं होत नाही..." विकी हसला आणि रिमोटवरचं एक बटण दाबत म्हणाला, "अब देखो क्या होता है..." तिथे बंगल्यात निलिमा त्या खोलीच्या दाराशी उभी होती. ती पुढे जाणार इतक्यात समोरच्या खिडकीला लावलेला पडदा थोडा हलला आणि कोणाचातरी हळुवार हसण्याचा आवाज आला. निलिमा दचकली आणि तिने गोल फिरून सगळीकडे पाहिलं. तिथे कोणीच नव्हतं. निलिमा हललेल्या पडद्याकडे जाऊ लागली तोच पडदा पुन्हा हलला आणि पुन्हा हसण्याचा आवाज आला. निलिमा लगेच मागे सरकत खोलीबाहेर आली आणि तिने दार लाऊन घेतलं. दाराबाहेर ती दम खात उभी असताना पुन्हा तिला आवाज आला. यावेळी कोणाच्यातरी रडण्याचा आवाज होता...
रडण्याचा आवाज येतो न येतो तोच हळुवार गाण्याचा आवाज आला, "गुमनाम है कोई..." निलिमाने कान देऊन ऐकलं. हे तिच्याच आवाजातलं गाणं होतं. निलिमा विचार करू लागली, "हे गाणं तर मी सकाळी गायलं होतं. इथे कसं काय... हा नक्कीच आज्या आणि विकीचा चावटपणा आहे...” मग सगळीकडे नजर फिरवत म्हणाली, “तुम्ही दोघं इथेच आहात ना... मला घाबरवण्यासाठी हे गाणं लावलंत ना... थांबा, आता तुम्हाला शोधूनच काढते..." असं म्हणून निलिमा बाजूच्या खोलीत गेली. बंगल्याच्या बाहेर बाकी सर्वजण लाईव्ह व्हिडियो पाहत असताना मधुरा म्हणाली, "ओ नो... निलूला कळलं... आता..." तोच मानेला झटका देत विक्रांत म्हणाला, "अरे मैं हूँ ना... कहानी में कुछ तो ट्विस्ट आना चाहिए... या रूममध्ये काहीच नाही पेरलेलं. तिला जरा किचनमध्ये तर जाऊ देत... फिर देखो..." मधुरा हसली आणि सर्वजण पुन्हा व्हिडियो पाहू लागले. निलिमा खोलीत पोहोचली. निलिमाने मोबाईल पुढे केला. खोलीत पुस्तकांनी भरलेली दोन कपाटं, एक टेबल आणि तीन-चार खुर्चा होत्या. बाकी कसलीच हालचाल तिथे नव्हती. निलिमाने उसासा सोडला तोच 'धप्' असा हलकासा आवाज आला...
निलिमाने लगेच आवाजाच्या दिशेने मोबाईल केला. तिथे काहीच नव्हतं. तिने मोबाईल डावीकडे केला, तर एक उंदीर पळत जाताना तिला दिसला. निलिमाने मोकळा श्वास सोडला आणि बाहेर येऊन दार लाऊन घेतलं. मोबाईल एकीकडे फिरवत निलिमा विचार करू लागली, "आता किचन आणि वरच्या खोल्याच राहिल्या आहेत. इथेच कुठेतरी हे दोघं लपून बसले असणार..." निलिमा किचनकडे वळली. तेवढ्यात मोबाईलने लो बॅटरीचा सिग्नल दिला. त्याकडे फारसं लक्ष न देता निलिमा किचनपर्यंत पोहोचली. तिथे बंगल्याबाहेर व्हिडियो पाहताना संदेश म्हणाला, "ए आता बस ना यार. इतका वेळ मजा बघितली ना..." संदेशला टपलीत मारत अजित म्हणाला, "ए सँड्या, बोर नको करू हां... आत्ता कुठे मजा यायला लागली आहे..." अजितला दुजोरा देत कविता म्हणाली, "हो ना... ए विकी तू सांग पुढे काय आहे. या सँड्याचं ऐकू नकोस..." विक्रांतने एकवार सर्वांकडे पाहिलं आणि संदेशच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, "ओके सँडी, तेरी दोस्ती के लिए... आता हा फायनल टच... या किचनमध्ये ते काचेचं कपाट आहे ना, त्यात एक मोबाईल मी व्हायब्रेटर मोडवर ठेऊन दिला आहे. आता फक्त पाच मिनिटं..."
बंगल्यात निलिमाने किचनच्या आत डोकावलं. किचनमधल्या सगळ्या वस्तू जागच्या जागी होत्या. एकदा आत जाऊन पूर्ण किचन पाहून निलिमा बाहेर येत असताना काचा हलण्याचा आवाज आला. निलिमाने आवाजाच्या दिशेला पाहिलं, तर काचेच्या कपाटातल्या वस्तू हलत होत्या आणि एक लाईट सारखा चालू-बंद होत होता. काही क्षणांसाठी निलिमा घाबरली खरी पण लगेच सावरत, "आज्या आणि विक्या, आता तुमचं बिंगच फोडते..." असं म्हणत तिने कपाटाचं दार उघडलं आणि आतला मोबाईल काढून बंद केला व ओट्यावर ठेवला. किचनच्या बाहेर येत असताना निलिमाने विक्रांतला कॉल लावला व म्हणाली, "ए विक्या, आता बस कर हां ही तुझी नाटकं. तुझं आणि आज्याचं पितळ उघडं पडलंय. चला, बाहेर या पाहू दोघांनी..." विक्रांत म्हणाला, "बाहेर या, अगं निलू आम्ही सगळे बाहेरच आहोत, गेटच्या बाजूला असलेल्या झाडाजवळ. तुला इतका वेळ का लागतोय..." विक्रांत बोलत असतानाच त्याने अजितला डोळा मारला आणि अजितने अजून एक बटण दाबलं...
तिथे निलिमाला हे समजताच ती म्हणाली, "काय, तुम्ही बाहेर आहात..." ती बोलतच होती, की तिच्या मागून 'टक्' असा आवाज आला आणि हलकासा उजेड दिसू लागला. निलिमाने हळूहळू मान वळवून पाहिलं, तर गॅस सुरू झाला होता. ती पेटणारी ज्योत पाहून निलिमा थरथरू लागली. तिच्या हातून मोबाईल गळून जमिनीवर पडला आणि बंद झाला. "विकी आणि अजित इथे नाहीत तर त्या खोलीत तो पडदा, हा गॅस, ते गाणं... म्ह...णजे इथे नक्कीच कोणीतरी आहे. मला इथून लगेच बाहेर पडायला हवं..." हा विचार करून निलिमा लगबगीनं किचनच्या बाहेर पडली. ती बाहेर आली आणि तिला मंद असा हसण्याचा आवाज आला. पाठोपाठ, "गुमनाम है कोई..." हे गाणंही सुरू झालं. आता मात्र निलिमा पुरती घाबरली आणि, "मला वाचवा... इथून बाहेर काढा... कोणीतरी मदत करा... असं ओरडत सैरा-वैरा पळू लागली. हे सर्व पाहताना संदेश म्हणाला, "आता बस झालं यार... अरे विकी कुठेतरी लिमिट ठेव... मी जातोय आत. तुम्हाला यायचं तर या नाहीतर गेट लॉस्ट..." एव्हाना हा प्रँक जरा जास्त झाल्याचं इतरांनाही वाटू लागलं आणि ते सर्व संदेशसोबत निघाले. अजितने बटण दाबून उघडलेलं दार संदेशने उघडलं आणि, "आऽऽऽऽऽऽऽऽऽऽ..."
ती किंकाळी निलिमाची होती. आवाज वरच्या मजल्याकडून आला होता. सगळे जिन्याने वर जात निलिमाला हाका मारू लागले. एका खोलीतून आवाज आला, "मी इथे आहे... मला खूप भिती वाटते आहे... लवकर या..." आवाज येत असलेल्या खोलीत सर्वजण पोहोचले. निलिमा खिडकीजवळ उभी होती. सर्वांना पाहून ती म्हणाली, "आलात तुम्ही... मी इथे अडकले आहे रे... मला बाहेर काढा ना..." सर्वजण पुढे जात असताना संदेश कशालातरी अडखळून पडला. सर्वांनी खाली पाहिलं आणि त्यांचा थरकाप उडाला. जमिनीवर पडलेली ती गोष्ट म्हणजे निलिमाचं निष्तेज प्रेत होतं. प्रेताचे डोळे सताड उघडे आणि भितीने भरलेले होते. विकीने थरथरत्या हाताने टॉर्च खिडकीवर मारला. निलिमा तिथे नव्हती. तेवढ्यात, "कोणाला शोधतो आहेस विकी... मी तर इथे उभी आहे..." या आवाजाने सर्वजण दचकले. आवाज त्यांच्या पाठून येत होता. सर्वांनी वळून पाहिलं, तर निलिमा दारात उभी होती. तिचे बुबुळं नसलेले डोळे, मोकळे केस आणि राखाडी रंगाचं भेगा पडलेलं शरीर पाहून सर्वांच्या काळजात धस्स झालं. सर्वजण मागे जात खोलीच्या मधोमध पोहेचले. कविता म्हणाली, "निलू... हे क...सं..."
कविताकडे पाहत निलिमा म्हणाली, "मी बाहेर जायचा मार्ग शोधताना अंधारात इथे वर आले. त्या आरशात पाहिलं आणि माझं काळीज माझी साथ सोडून गेलं..." हे ऐकून हात जोडत मधुरा म्हणाली, "निलू, माफ कर गं आम्हाला. मी आणि कविता तर यात नव्हतोच. आम्ही फक्त गम्मत बघत होतो..." "हो निलू, गोष्टी इतक्या हाताबाहेर जातील असं नव्हतं वाटलं गं आम्हाला. तुझ्यावर प्रँक करावा म्हणून..." अजितच्या वाक्याला तोडत भसाड्या आवाजात निलिमा म्हणाली, "प्रँक... प्रँकच्या नावाखाली जीवघेणी थट्टा केलीत तुम्ही... आधी या घरात कोणताही आत्मा किंवा भूत नव्हतं, पण आता... आता मी आहे... आणि... कधी कधी, सकाळी पडलेली स्वप्न खरी होतात... हा...हा...हा..." अघोरी हसत निलिमाने वर पाहिलं. हे पाहून इतरांनीही आपली नजर वर केली आणि ते भितीने गोठून गेले. रक्ताळलेले, लांब नखं असलेले अनेक हात खाली येत होते. ते हात पाहून सर्वांनी एकत्र किंकाळ्या फोडल्या... कानठळ्या बसणाऱ्या त्या किंकाळ्यांचा आवाज पूर्ण बंगल्यात घुमला. आणि सोबतच, "गुमनाम है कोई..." हे निलिमाच्या आवाजातलं गाणं ऐकू येऊ लागलं...
@ अनिकेत परशुराम आपटे.
No comments:
Post a Comment