Friday, March 25, 2022

पाचवा कोन... (दुसरा व शेवटचा भाग)

पहिल्या भागात...

सकाळच्या वेळी सुहासिनी सबनीस त्यांच्याच बिल्डिंगच्या गच्चीतून खाली पडून आपला प्राण गमावतात. सोसायटीचे सेक्रेटरी शिर्के पोलिसांना फोन करतात. पोलिस तपास सुरू होतो. आनंदला गच्चीत एक मुलगी बेशुद्धवस्थेत सापडते. उमा वर गेल्यावर ती मुलगी सुहासिनी सबनीस यांची सून असल्याचं समजतं. सचिन बॉडी घेऊन डॉ. गोखलेंकडे रवाना होतो आणि त्याच वेळेला तिथे आलेल्या रंजनला घेऊन प्रधान व शिर्के सातव्या मजल्यावर जातात. त्यावेळी आनंद प्रधानांना गच्चीत बोलावतो. गच्चीत आनंद त्यांना इनहेलर दाखवतो तर तिथे लागलेले कॅमेरेही प्रधानांना दिसतात. त्यांचं फुटेज आणायला प्रधान आनंदला आणि मि. शिर्के यांना पाठवतात आणि स्वत: पुन्हा रंजनच्या घरी पोहोचतात. रंजन आणि पूजाची चौकशी सुरू असतानाच आनंद तिथे फुटेज घेऊन येतो आणि सांगतो की खूनी सापडला...

प्रधान व्हिडियो सुरू करतात आणि त्यात पूजाने सुहासिनी सबनीसला गच्चीवरून ढकलून दिल्याचं दिसतं. हे पाहून प्रधान पूजाला अटक करतात. आनंदला घराची झडती घ्यायला सांगून प्रधान आणि उमा लॅबकडे निघतात. खुन्याला अटक झालेली असूनही प्रधान गोंधळलेले आहेत हे पाहून उमा त्यांना कारण विचारते. या मृत्यूमागे काहीतरी काळंबेरं असल्याची शंका व्यक्त करताना प्रधान काही मुद्दे मांडतात. डॉ. गोखले बॉडी आणि बाकी वस्तु तपासात असताना उमा, सचिन आणि प्रधान पुन्हा व्हिडियो बघतात. व्हिडियो पुन्हा पुन्हा बघून, सुहासिनी सबनीस आणि पूजा सबनीस या दोघांनाही हिप्नोटाईझ त्यांच्याकडून हे कृत्य घडवून आणल्याचं समजतं. यामागचं कारण काय हा विचार करत असताना, यामागचं कारण प्रॉपर्टी असू शकेल अशी शंका आनंद व्यक्त करतो आणि या सर्वाला सुरुवात रंजन आणि पूजाच्या लग्नापासून झाली असू शकेल असंही सांगतो...

घरांमधले वाद आणि रंजनचं वेगळं या गोष्टीवरून गाडी फ्लॅटच्या कागदपत्रांवर येते. रंजनच्या नावे असलेलं नॉमिनेशन बदलून आता ते सुहासिनी सबनीस यांचे चुलत भाऊ सुधाकर देसाई यांच्या नावाने झाल्याचं समजतं. रंजन आणि सुधाकर देसाई दोघांनाही चौकीवर बोलावलं जातं. त्याचवेळी डॉ. गोखले पूजाला ओळखतात आणि पुण्यात घडलेली एक केस समोर येते…

दुसरा व शेवटचा भाग...

प्रधानांचा इशारा मिळताच उमाने कॉम्प्यूटरवर केस फाईल उघडली. फाईल उघडताच उमा माहिती वाचू लागली, "पुणे, २२ जून २०२०. आरती ढवळकर (नाव बदललं आहे...) या २३ वर्षीय तरुणीवर तिच्या राहत्या घरात मकरंद नावाच्या एका मुलाने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी पोलिसांच्या इमर्जन्सी नंबरवर कॉल आला. पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि मकरंदला ताब्यात घेतलं गेलं. मकरंदला क्राईम स्पॉटवर रेड हँड पकडल्यामुळे त्याला शिक्षा झाली. बदनामीच्या भितीने मकरंदने जेलमध्ये आत्महत्या केली..." बाजूला पूजा मुजुमदारचा फोटो होता. फोटो पाहून उमा म्हणाली, "अरे, ही तर पूजा सबनीस आहे... पण या केसचा आत्ताच्या केसशी काही संबंध असू शकेल का...!!!" उमाच्या शंकेवर प्रधान म्हणाले, "May or may not be... आत्ताच काही सांगणं मुश्कील आहे. या मकरंदची माहिती जरा..." प्रधान बोलतच होते की सचिनचा फोन आला, "हां बोल सचिन, ओके. जे काही मिळालं ते घेऊन लॅबवर या..." फोन बंद करून प्रधान म्हणाले, "सचिन व आनंदला क्रॉसच्या खाली विडीची थोटकं आणि तुटलेल्या वायरींचे तुकडे सापडलेत. ते घेऊन ते दोघं इकडेच यायला निघालेत..."

थोड्याच वेळात सचिन आणि आनंद लॅबला पोहोचले. त्यांनी दिलेली विडीची थोटकं आणि वायर्सचे तुकडे डॉ. गोखले तपासू लागले. काही वेळात प्रधानांचा फोन वाजला, "हॅलो... ओके. दोघांनाही वेगवेगळ्या खोलीत बसवा. आम्ही येतोच..." फोन खिशात ठेवत प्रधान म्हणाले, "चौकीवरून फोन होता. सुधाकर देसाई आणि रंजन सबनीस तिथे आलेत. सगळ्या टेस्टनंतर उद्या आपण त्यांची चौकशी करणार होतो. पण दोघंही आत्ताच आले. नॉट बॅड. आनंद आणि सचिन, तुम्ही इथेच थांबा. काय रिपोर्ट येतो ते मला कळवा. मी आणि उमा चौकीवर जातो..." तेवढ्यात पुन्हा प्रधानांचा फोन वाजला. त्यांनी नंबर पाहत भुवई उंचावली आणि फोन घेतला, "येस. ओके. कीप इन टच..." इतकं बोलून प्रधानांनी फोन खिशात ठेवला आणि उमाकडे पाहत म्हणाले, "लेट्स गो..."

उमा आणि प्रधान चौकीवर पोहोचले. सुधाकर देसाई आणि रंजन सबनीस या दोघांना बाजूबाजूच्या खोल्यांमध्ये बसवलं गेलं होतं. प्रधान सुधाकर देसाईंकडे वळले तर रंजन ज्या खोलीत बसला होता, उमा तिथे गेली. उमाला पाहून रंजन उभा राहिला. आत येत उमा म्हणाली, "मि. रंजन, तुम्ही आत्ता इथे... आम्ही तुम्हाला सकाळी बोलावलं होतं ना... बसा..." खुर्चीत बसत रंजन म्हणाला, "माझी आई गेली. तिच्या खुन्याला अजून शिक्षा नाही झाली. अशा वेळी मला स्वस्थ बसवेल का मॅडम... सकाळचं माझं हसतं खेळतं घर आता भकास वाटू लागलं मला. म्हणून मी इथे आलो. माझ्या आईची बॉडी तरी द्या मला... तिला वाचवू नाही शकलो, निदान तिचा पुढचा प्रवास तरी सुखकर करू द्या मला..." विषय बदलत उमा म्हणाली, "तुमचे मामा पण आलेत. त्यांनाही सकाळीच बोलावलं होतं. पण ते सुद्धा आत्ताच आले. एकत्र आलात वाटतं दोघं..."

मामाचं नाव ऐकून रंजन चिडचिड्या स्वरात म्हणाला, "आम्ही काही एकत्र आलो नाही. त्या माणसाशी माझा काडीचा संबंध नाही. तो माझा सख्खा मामा नाही. आईचा चुलत भाऊ आहे तो. एक नंबरचा दारुडा आणि कावेबाज. मी आईजवळ नसताना त्यानेच आईला फूस लाऊन नॉमिनेशन स्वत:च्या नावे करवून घेतलं. आणि आईनेही कसलाही विचार न करता त्याच्या होला हो केलं. आता काय... आयताच मिळाला तो फ्लॅट त्याला..." रंजनचे बदलत असलेले भाव उमा न्याहाळत होती. रंजनकडे पाहत उमा म्हणाली, "अच्छा, म्हणजे तुम्ही राहत असलेला फ्लॅट तुमच्या मामाला बळकवायचा आहे असं तुमचं म्हणणं आहे तर... कदाचित याचाच राग मनात ठेऊन तुम्ही... जाऊ द्या... मला सांगा तुमच्या घरचं वातावरण कसं होतं... म्हणजे तुमचे आणि पूजाचे संबंध, पूजा आणि तुमच्या आईचे संबंध..." उमाकडे थोडं रागानेच पाहत रंजन म्हणाला, "माझी आणि पूजाची ओळख दीड वर्षापूर्वी झाली. माझ्या ऑफिसच्या एका क्लायंटच्या ऑफिसमध्ये ती रिसेप्शनला होती. कामानिमित्त वरचेवर आमच्या भेटी व्हायच्या. त्यातंच ती मला आवडली. आम्ही दोघांनी एकमेकांना पसंती दर्शवली आणि वर्षापूर्वी आमचं लग्न झालं...

आमच्यात नॉर्मलच होतं सगळं. नवरा-बायकोमधली नेहमीची भांडणं असतात तशीच. काही वेगळं नव्हतं. आई आणि पूजामध्ये पण तसं नॉर्मलच होतं सगळं. माझी आजी माझ्या वडिलांच्या लहानपणीच वारली. त्यामुळे घरात बाईमाणूस कोणीच नव्हतं. आईने तिच्या पद्धतीने घर उभारलं. पूजा आल्यावर काही गोष्टी आईच्या मनाविरुद्ध होत गेल्या. त्यामुळे कदाचित दोघींमध्ये खटके उडू लागले. घरातलं वातावरण बदलावं, दोघींचा व माझाही मनस्ताप कमी व्हावा म्हणून मी वेगळं रहायचं ठरवलं. त्या माणसाने याचाच फायदा घेऊन हे कारस्थान रचलं असावं..." रंजनकडे पाहत उमा म्हणाली, "अच्छा, म्हणून तुम्ही तातडीने परत आलात तर..." टेबलवर जोरात हात आपटत रंजन म्हणाला, "नाही... घरी परतण्याचं माझं कारण वेगळं होतं. मी निघून गेल्यावर आईला दम्याचा अटॅक आला होता. दोन दिवस ती हॉस्पिटलमध्ये होती. तिला डिस्चार्ज देऊन घरी आणतानाच मी परतण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी मला नॉमिनेशनबद्दल माहितच नव्हतं. मी पूजाला माझा निर्णय सांगितला तेव्हा तिनेही माझं समर्थन केलं. मला वाटलं पूजा बदलली असेल आणि त्यामुळे आईसुद्धा थोडं समजून घेईल. पण पूजाच्या मनात इतका वाईट विचार होता हे मला कुठे माहित होतं..."

एकीकडे रंजनची जबानी सुरू असताना दुसऱ्या खोलीत बसलेल्या सुधाकर देसाईंकडे प्रधान पोहोचले. सुधाकर देसाई बसले होते त्याच्या समोरच्या खुर्चीत बसत प्रधान म्हणाले, "तुम्ही सुधाकर देसाई. बरोबर ना... पण आम्ही तुम्हाला सकाळी बोलावलं होतं..." प्रधानांकडे पाहत मि. देसाई बोलते झाले, "हो सकाळीच बोलावलं होतं मला. पण राहवलं नाही म्हणून आलो. सुहासिनी माझी चुलत बहिण. पण आमच्यात सख्ख्या भावंडांसारखं प्रेम होतं. तिच्या मृत्यूची बातमी पोलिसांकरवी समजावी हेच माझं दुर्दैव. रंजनच्या मनात लहानपणापासूनच माझ्याबद्दल अढी आहे. ती निर्माण केली रंजनच्या वडिलांनी. माझा बिझिनेस आहे आणि चांगली मिळकत आहे. माझं राहतं घर चांगलंच मोठं आहे. असं असताना या फ्लॅटवर मी का हक्क सांगेन... रंजन घर सोडून गेल्यावर त्याला परत आणण्यासाठी कायद्याच्या मार्गाने काही उपाय करता येतील का हे पाहण्याचा सल्ला मीच सुहासिनीला दिला. पण तिने नॉमिनेशन बदलून मलाच नॉमिनी केलं यात माझा काय दोष. उलट, तिला दम्याचा अटॅक आला तेव्हा मीच तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं..."

सुधाकर देसाईंच्या बोलण्यावर प्रधान थोडे हसले आणि म्हणाले, "ऍडमिट केलंत की करावं लागलं... मि. देसाई, आम्हाला सुहासिनी मॅडमच्या कपाटात त्यांची मेडिकल फाईल मिळाली. त्या ज्या दिवशी ऍडमिट झाल्या, त्या दिवशी आणि त्यावेळी तुम्ही तिथे हजर होतात. काय करत होता तुम्ही तिथे..." प्रधानांकडे रागाने पाहत देसाई म्हणाले, "भाऊ बहिणीकडे गेला तर त्या कोणाचं काय नुकसान..." उभं राहत देसाईंजवळ येत प्रधान म्हणाले, "नुकसान नाही, फायदा. तुम्हाला... मि. देसाई, या केसशी संबंधित सर्व व्यक्तींबद्दल आम्ही माहिती मिळवली आहे. आम्हाला असं समजलं, की मुलीच्या लग्नासाठी तुम्ही राहत्या घरावर बँकेतून कर्ज घेतलं होतंत. तुमचा बिझीनेस बरा चालू होता, पण बँकेचे हफ्ते व्यवस्थित चुकते होतील इतपत उत्पन्न येत नव्हतं. तुमचे बँक रेकॉर्ड हेच सांगतात. अशावेळी इतर कोणाकडे हात-पाय पसरण्यापेक्षा तुम्हाला तुमची बहिण आठवली. बरोबर ना..." हे ऐकताच देसाईंनी टेबलवर गुद्दा मारला आणि म्हणाले, "हो. पैशासाठी केलं मी ते सगळं...

दोनेक वर्षांपूर्वी माझा धंदा व्यवस्थित सुरू होतो. प्रॉफिट पण चांगला येत होता. त्याच दर्म्यान माझ्या मुलीचं लग्न ठरलं. धंद्यातला थोडा पैसा आणि घरावर घेतलेलं कर्ज, हे हाताशी धरून मी मुलीचं लग्न लावलं. पण अलिकडच्या काही महिन्यातच माझ्या बिझीनेसमध्ये घसरण झाली. बँकेचे हफ्तेही कमी-जास्त व्हायला लागले. मित्र-मंडळींकडे पैसे मागितले तर त्यांनी हात झटकले. तेव्हा शेवटचा उपाय म्हणून मी सुहासिनीकडे गेलो. तिच्याकडून काही मदत झाली असती तर माझा थोडा भार कमी झाला असता. पण तिने साफ नकार दिला. आमच्यात वाद झाले आणि नेमका त्याचवेळी तिला दम्याचा अटॅक आला. तिला काही झालं असतं तर पहिला संशय माझ्यावरच आला असता. मी सुहासिनीला हॉस्पिटलला घेऊन गेलो. तिथे तिला एक-दोन दिवसांनी बरं वाटल्यावर तिने रंजन दुरावल्याचा विषय काढला. तेव्हा त्याला परत आणण्यासाठी कायद्याची मदत घेण्याचा सल्ला मी तिला दिला...

मला माहित नव्हतं, की सुहासिनी रंजनचं नाव काढून मला नॉमिनी करेल. घरी परतल्यावर एक दिवस रंजन माझ्याकडे आला. सुहासिनीला फूस लावून मी नॉमिनेशन बदलून घेतलं असं त्याचं म्हणणं होतं. त्या दिवशी खरंतर मला नॉमिनेशनबद्दल समजलं..." देसाईंना मध्येच तोडत प्रधान म्हणाले, "आणि म्हणून तुम्ही सुहासिनी सबनीसचा खून करवलात. जेणेकरून पूर्ण फ्लॅट तुम्हाला मिळेल. पण मि. देसाई, नॉमिनीला फ्लॅटचं पझेशन मिळणं इतकं सोपं नसतं. त्यासाठी..." प्रधान बोलत होते तेव्हाच दारावर टक् टक् झाली. प्रधानांनी तिथे पाहिलं तर एक हवालदार तिथे उभा होता. प्रधान दाराकडे गेले आणि काही क्षणात परत येऊन देसाईंना म्हणाले, "मि. देसाई, छोटासा ब्रेक घ्या. आलोच थोड्या वेळात..." असं म्हणून प्रधान बाहेर पडले. बाहेर एक वकील बसला होता. उमा त्याच्या समोर थोड्या अंतरावर उभी होती. त्यांच्या बाजूच्या खुर्चीत बसत प्रधान म्हणाले, "बोला वकील साहेब. हवालदार म्हणाला या केससंदर्भात तुमच्याकडे काही कागदपत्र आहेत..." वकीलाने मान हलवली आणि बोलायला सुरुवात केली...

"मी प्रेमानंद खरे. पेशाने वकील आहे. सुहासिनी मावशी व आमचे घरोब्याचे संबंध. ती माझी सख्खी मावशी नाही. ती नासिकला राहत असताना आम्ही त्यांच्या शेजारी रहायचो. अलिकडेच मावशीने मला घरी बोलवून घेतलं होतं. तिला विल करायचं होतं. तिने मला सांगितलं होतं, की हे विल कोणाच्याही हाती लागू द्यायचं नाही. आता ती गेली तर..." खरेंकडे पाहत प्रधानांनी विचारलं, "खरे साहेब, पण सुहासिनी सबनीस गेल्या ही बातमी तुम्हाला कोणी दिली..." खरे म्हणाले, "सर, मी अजूनही नासिकलाच राहतो. सकाळी सुहासिनी सबनीस यांची चौकशी करत पोलिस तिथे आले होते. त्यांच्याकडून समजलं मला. म्हणून मी तातडीने निघालो. हे विलचे पेपर्स. बघा, केससाठी काही उपयोग होतो का. याची एक कॉपी माझ्या बँकेच्या लॉकरमध्ये ठेवली आहे..." फाईल हातात घेत प्रधान म्हणाले, "या विलबद्दल सुहासिनी मॅडमशिवाय अजून कोणाला काही माहित आहे का..." त्यावर खरे म्हणाले, "कदाचित. मी जेव्हा मावशीला भेटायला गेलो तेव्हा मि. देसाई तिथेच होते. मी गेलो आणि ते निघाले. मावशीने, "विलचे पेपर्स आणलेस का..." असं त्यांच्याचसमोर विचारलं होतं मला. शिवाय मावशीची शेवटची सही झाली आणि त्याचवेळी रंजनदेखील तिथे आला. तेव्हा त्याची नजर गेली होती या पेपर्सवर. पण तो काही बोलला नाही..."

ऍडवोकेट खरे गेल्यावर प्रधान आणि उमाने पेपर्स वाचले. मग उमाकडे वळत प्रधान म्हणाले, "म्हणजे रंजन आणि मि. देसाई, दोघांनाही या पेपर्सबद्दल माहित होतं तर. रंजनकडून कदाचित पूजालाही समजलं असेल..." होकारार्थी मान हलवत उमा म्हणाली, "सर, पण यात काय लिहिलं आहे, ते कळलं असेल त्यांना... कारण मुख्य मुद्दे तर तिसऱ्या पानावर आहेत..." हनवटी चोळत प्रधान म्हणाले, "हम्म्म... आय डाऊट. लेट्स आस्क पूजा फर्स्ट..." दोघंही पूजाला ज्या सेलमध्ये बंद करून ठेवलं होतं तिथे गेले. पूजा एका कोपऱ्यात रडत बसली होती. दाराचा आवाज ऐकून ती उभी राहिली. हात जोडून दोघांजवळ जात ती म्हणाली, "सर, मला खरंच काहीच माहित नाही हो. माझ्याकडून हे पाप घडलं याची कल्पनाही करवत नाही मला. आमच्यात वाद होते, पण ते कुठल्या घरात नसतात... तेवढ्यासाठी मी आईंना..." पूजाकडे रोखून पाहत उमा म्हणाली, "या मागचं कारण वेगळं असू शकतं... नाही का पूजा मॅडम..."

पूजाचा गोंधळलेला चेहेरा पाहून उमा म्हणाली, "वेगळं कारण म्हणजे तुमच्यासोबत घडलेली एक घटना, ज्यात मकरंद इनव्हॉल्व्ह होता..." मकरंदचं नाव ऐकताच पूजाचे डोळे मोठे झाले. तेव्हा उमा म्हणाली, "मॅडम, आम्ही पोलिस ऑफिसर्स आहोत. हाती आलेल्या केसची पाळंमुळं खणून काढणं हे आमचं पहिलं काम. मकरंदबद्दल आम्हाला समजलं आहे. शिवाय तुम्ही लिहिलेली डायरीही हाती लागली आहे आमच्या..." हे ऐकून पूजा पुरती गोंधळली. काही क्षण शांतंतेत गेल्यावर पूजा बोलू लागली, "ही गोष्ट लपवण्याचा खूप प्रयत्न केला मी, पण आता सांगावंच लागेल. मी लहान असतानाच आई-बाबा गेले. माझ्या काकांनी मला लहानाचं मोठं केलं. त्या घरात काकूकडून मला सतत हिणवलं जायचं. मग एक दिवस ते घर सोडून मी पुण्याला आले. पेईंग गेस्ट म्हणून एका आजीकडे राहू लागले. एक पार्ट टाईम नोकरी पत्करली. त्याच पैशात घर आणि कॉलेज असे दोन्ही खर्च भागवत होते. कॉलेजमध्ये मला मकरंद भेटला. त्याची डॅशिंग पर्सनॅलिटी पाहून मी भारावले...

कधी मूव्ही, कधी गार्डन असे आम्ही भेटू लागलो. आजींना मकरंदबद्दल सांगावं असं माझ्या मनात आलं. त्या दिवशी आजी काही कामासाठी बाहेर गेल्या होत्या. त्या रोजंच त्यावेळी बाहेर जायच्या आणि दीड-दोन तासांनी परतायच्या. आजी बाहेर पडल्या आणि दहाच मिनिटात मकरंद येऊन पोहोचला. त्याला पाहून मला आश्चर्य वाटलं. मी त्याला परिस्थितीची कल्पना दिली आणि कुठेतरी बाहेर जाऊ असा आग्रह धरला. मकरंद कुत्सित हसला आणि मला ढकलून दार लाऊन घेतलं. मग त्याने खिशातून एक इंजेक्शन काढून स्वत:ला टोचलं. त्यानंतरचा त्याचा अवतार पाहून मी अजूनच घाबरले. मकरंदचे ते लाल झालेले डोळे, ती क्रूर नजर पाहून माझी खात्री पटली, की त्याने ड्रग्सचं इंजेक्शन घेतलं होतं. पुढे येत मकरंद म्हणाला, "तुला काय वाटलं, तुझ्यावर प्रेम आहे माझं... तुझ्यासारख्या कित्येकींना फिरवतो मी. कोणीही मला नाही म्हटलं नाही कधी. पण तू... जरा हात लावायचा प्रयत्न केला तर लांब ढकलतेस मला. तुझ्यासारखी पहिल्यांदाच भेटली मला. मग मी पण ठरवलं. जे हवं ते मिळवायचंच...

मी घरावर लक्ष ठेवलं. मला समजलं, म्हातारी रोज या वेळी बाहेर जाते. बस. मी ठरवलं, हीच वेळ साधायची. आणि आज... तू प्रेम करतेस ना माझ्यावर... मग दे मला हवं ते..." इतकं बोलून त्याने माझ्यावर हात टाकला. मी स्वत:ला सोडवण्याचा प्रयत्न करू लागले, पण मकरंदच्या ताकदीपुढे माझं काहीच चालत नव्हतं. माझं डोकं कपाटावर आदळलं आणि माझी शुद्ध हरपली. पुढचं काहीच आठवत नाही मला. शुद्धीवर आले तेव्हा पाहिलं, की माझे कपडे जागोजागी फाटलेले होते. एक लेडी पोलिस माझ्या शेजारी बसली होती. मकरंदला पोलिसांनी पकडून ठेवलं होतं. मकरंद माझ्याशी असा वागेल असं स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं मला. त्याच्यासोबत माझं नाव जोडलं गेलं असतं तर माझं काय झालं असतं या विचाराने मी हबकले आणि पोलिसांना माझं नाव गुप्त ठेवण्याची विनंती केली...

मकरंदला शिक्षा झाली खरी, पण तो प्रसंग मला स्वस्थ बसून देत नव्हता. मी कसंबसं कॉलेज पूर्ण करून मुंबईला आले आणि नोकरी पत्करली. त्याच सुमारास मला रंजन भेटला. आमची मैत्री झाली, भेटी वाढत गेल्या आणि एक दिवस रंजनने मला मागणी घातली. त्याचा मनमिळाऊ स्वभाव, गोड बोलणं मलाही आवडलं होतं. पण आधीचा अनुभव गाठीशी असल्याने मी माझ्या परीने त्याची चौकशी केली, मगच लग्नाला होकार दिला. लग्नानंतर मी पूर्ण गृहिणी झाले. वर्ष झालं आमच्या लग्नाला पण अजूनही रंजनला मकरंदबद्दल काहीच माहित नाही. कधी कधी पुन्हा आठवणी जाग्या व्हायच्या. तेव्हा मन हलकं करण्यासाठी मी डायरी लिहू लागले. कदाचित त्यातलीच काही पानं आईंनी वाचली असावीत. त्या गेल्या त्याच्या आदल्या संध्याकाळी त्यांनी मला याबद्दल विचारलं होतं. त्यावेळी मी काहीतरी उत्तरं दिली, पण त्यांनी रंजनला काही सांगितलं तर... या विचाराने मी मनातून घाबरले होते..."

"आणि म्हणून तुम्ही सुहासिनी मॅडमना गच्चीवरून..." उमाचे हे उद्गार ऐकून पूजाचा चेहेरा अजून पडला. डोळ्यात अश्रू आणत पूजा काही बोलणार इतक्यात उमाच म्हणाली, "काही बोलू नका पूजा मॅडम. काहीही माहित नसल्याचा उगाच आव आणताय तुम्ही..." असं म्हणत टेबलवर हात मारून उमा बाहेर आली. मागून येणाऱ्या प्रधानांकडे वळत ती म्हणाली, "सर, मला तर वाटतं पूजा आपल्याला भरकटवते आहे. कदाचित हे सगळं तिनेच प्लॅन केलं असावं..." सेलच्या बाजूला असलेल्या दोन खोल्यांकडे पाहत प्रधान म्हणाले, "सुधाकर देसाई आणि रंजनबद्दल काय सांगशील उमा... त्यांच्याकडेही त्यांची त्यांची कारणं आहेतच की हे कृत्य करण्यासाठी. सुहासिनी सबनीस यांना हिप्नोटाईझ केलं गेलं हे तर कनफर्म आहे. पण या तिघांपैकी हे कोणी केलं, याचा तपास करायला हवा..." प्रधान आणि उमा बोलतच होते की प्रधानांचा फोन वाजला...

"बोल आनंद... हां... ओह... ओके, तुम्ही दोघं तिथे पोहोचा. आम्ही पण येतो..." फोन ठेवत उमाकडे वळून प्रधान म्हणाले, "आनंदचा फोन होता. त्या दोघांना खूप महत्वाची माहिती आणि काही पुरावेपण मिळाले आहेत. या तिघांना घेऊन आपल्याला मधुबन सोसायटीमध्ये जायचं आहे. बहुतेक आजच या केसवर पडदा पडेल..." उमाच्या चेहेऱ्यावर स्मितहास्य उमटलं. दोन हवालदारांसह पूजा सबनीस, रंजन सबनीस, सुधाकर देसाई, उमा आणि प्रधान, मधुबन सोसायटीकडे रवाना झाले. हवालदारांसह मागे बसलेले पूजा, रंजन आणि सुधाकर देसाई एकमेकांकडे एकेक कटाक्ष टाकत होते. आसवं भरलेल्या नजरेने रंजनकडे पाहत पूजाने रंजनच्या हातावर हात ठेवला. हे पाहून रंजनच्या डोळ्यात राग उतरला. पूजाकडे रोखून पाहत रंजनने तिचा हात झटकला आणि जीपच्या बाहेर पाहू लागला. थोड्याच वेळात जीपने मधुबन सोसायटीच्या आवारात प्रवेश केला...

सायरनचा आवाज ऐकून काही जणं आवारात जमले. जीपमधून सगळे उतरल्यावर प्रधानांनी बोलायला सुरुवात केली, "आपण इथे जमलोत ते सुहासिनी सबनीस यांच्या मृत्यूमागचं रहस्य उलगडण्यासाठी. सुहासिनी सबनीस यांचा मृत्यू अपघाती नसून तो एक खून होता. प्रत्येक खुनामागे एक मोटिव्ह किंवा कारण असतं. या केसला चार बाजू आहेत. पहिली बाजू म्हणजे स्वत: सुहासिनी सबनीस. त्या त्यांच्याही नकळत एका अशा सापळ्यात अडकल्या, ज्यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मृत्यू. केसची दुसरी बाजू म्हणजे पूजा सबनीस. पूजासुद्धा त्याच सापळ्यात अडकली होती ज्यात सुहासिनी मॅडम होत्या. पण पूजासाठी त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग होता तुरूंगवास. हो. सुहासिनी सबनीस आणि पूजा सबनीस या दोघींनाही हिप्नोटाईझ केलं गेलं होतं आणि असा आभास निर्माण केला, की पूजानेच सुहासिनी सबनीसला गच्चीतून खाली ढकलून दिलं आहे. कोण करू शकतं असं... पूजा मॅडम, बी.एस.सी. आहात ना. माईंड कंट्रोल हा विषय तुमच्या परिचयाचाच आहे. लग्न झाल्यानंतर सासूसोबत होणारी सततची भांडणं आणि वाद यामुळे वैतागून जाऊन, ऍक्रोफोबिया आणि हिप्नॉटिझम यांच्या कवचाआड लपून तुम्हीच हे कृत्य केलं असेल तर..."

पूजा काही बोलणार इतक्यात रंजनकडे वळत प्रधान म्हणाले, "या केसची तिसरी बाजू म्हणजे तुम्ही मि. रंजन. तुमच्या घरी मी तुम्हाला विचारलं होतं, सुहासिनी मॅडमचा इनहेलर तुमच्या कपाटात कसा होता...??? तुम्ही उत्तर नाही दिलंत..." प्रधानांकडे पाहत रंजन म्हणाला, "रोज सकाळी मी पम्पमध्ये औषध भरून तो आईच्या खोलीत ठेवतो. आज जरा घाईत होतो. पम्प भरला होता पण तो तिथेच कपाटात राहिला..." रंजनला मध्येच तोडत उमा म्हणाली, "इतक्या घाईत होतात तुम्ही मि. रंजन, की तुमची फाईलसुद्धा विसरलात आणि त्याच वेळी पूजा मॅडमला फोन केलात जेव्हा सुहासिनी मॅडम गच्चीकडे जात होत्या. हाऊ कनव्हिनियंट..." उमाकडे पाहत रंजनने विचारलं, "म्हणजे... मी आईचा खून केला असं तर नाही ना म्हणायचं तुम्हाला..." उमाच्या पुढे येत प्रधान म्हणाले, "में बी... स्वत:चे पैसे फ्लॅटमध्ये घालूनही फ्लॅटचा मालकी हक्क तर नाहीच मिळाला, शिवाय नॉमिनेशन पण गेलं. याचा राग मनात ठेऊन तुम्ही..."

बाजूलाच उभे असलेले सुधाकर देसाई स्मित करून रंजनकडे पाहत होते. त्यांना तसं पाहून प्रधान म्हणाले, "मि. देसाई, तुम्हीसुद्धा एक संशयित आहात बरं का..." हे ऐकून सुधाकर देसाईंचे भाव बदलले आणि आवाज चढवत ते म्हणाले, "मी... संशयित... का... माझा काय संबंध...!!!" यावर उमा म्हणाली, "तुम्हाला बिझीनेससाठी हवे असलेले पैसे सुहासिनी मॅडमने दिले नाहीत. वर त्यांना हॉस्पिटलमध्येही तुम्हालाच न्यावं लागलं. त्याचा खर्च वेगळा... नॉमिनेशन तुमच्या नावावर झालं हे कळल्यावर तुम्ही या संधीचा फायदा घ्यायचा असं ठरवलं नसेल कशावरून..." मग सर्वांकडे पाहत प्रधान म्हणाले, "एक मृत्यू आणि तीन संशयित... आता खरा गुन्हेगार शोधायला आपल्याला त्याच जागी जायला लागेल जिथे गुन्हा घडला. चला. सगळे गच्चीत जाऊ. मि. शिर्के, एक विटनेस म्हणून तुम्ही पण चला आमच्यासोबत..." सर्वजण गच्चीच्या दाराशी पोहोचले. प्रधानांनी मि. शिर्केंकडे वळत चावीची मागणी केली. मि. शिर्केंनी चावी देताच उमाने ती घेऊन दार उघडलं...

प्रधान, उमा, मि. शिर्के, मि. देसाई, रंजन, पूजा आणि अजून चार-पाच जण दारातून आत गेले. सर्वांकडे पाहत प्रधान म्हणाले, "जे घडलं ते इथे घडलं. सुहासिनी मॅडम दाराकून आत आल्या. शिडी चढून टाकीवर जाऊ लागल्या. तेवढ्यात पूजा मॅडम इथे आल्या. सुहासिनी मॅडमना टाकीवर जाताना पाहून पूजा मॅडम पण त्यांच्या मागे गेल्या आणि त्यांनी सुहासिनी मॅडमना टाकीवरून ढकलून दिलं व स्वत: तिथेच बेशुद्ध पडल्या. पण म्हणतात ना, डोळ्यांनी पाहिलेली गोष्टसुद्धा कधी-कधी फसवी असते... तसंच इथेही घडलं. आता ते कसं घडलं हे आपण पाहू..." बोलता बोलता प्रधान पूजासमोर उभे राहिले. पूजाला इतर सर्व दिसत होतं, पण प्रधांनांच्या मागे उभी असलेली उमा दिसत नव्हती. प्रधान उमाकडे वळले आणि म्हणाले, "आपण कल्पना करू, की सब इंस्पेक्टर उमा म्हणजे सुहासिनी मॅडम आहेत. उमा दारात ये..." उमा दारात उभी राहिली तशी वॉकी-टॉकी तोंडाजवळ धरत प्रधान म्हणाले, "सचिन, नाव..."

त्याच बरोबर त्या बिल्डिंगपासून काही अंतरावर असलेल्या एका बिल्डिंगवर एक लाल क्रॉस प्रकाशमान झाला. प्रधानांनी उमाला इशारा करताच उमा एक टक बघत टाकीच्या दिशेने चालू लागली. उमा शिडी चढत असताना प्रधान पूजाच्या समोरून बाजूला झाले. तेव्हा तो क्रॉस पूजालाही दिसू लागला. क्रॉस पाहताच हळुवार हुंदके देणारी पूजा एकदम शांत झाली आणि उमासारखीच एक टक पाहत टाकीच्या दिशेने जाऊ लागली. उमा तोवर टाकीवर चढून सर्वांकडे तोंड करून उभी राहिली. पूजा टाकीवर पोहोचली. तिला चमकणारा क्रॉस स्पष्ट दिसत होता. समोर उभ्या उमाला ढकलण्याच्या पावित्र्याने पूजा तिच्या दिशेने वळली. खाली उभ्या असलेल्या प्रधानांनी सचिनला वॉकी-टॉकीवर सांगितलं, "सचिन, पुट इट ओफ..." क्रॉस चमकायचा बंद झाला. पूजा त्याच क्षणी भानावर आली आणि इथे-तिथे पाहू लागली. उमाने तिला सांभाळलं आणि अलगद शिडीवरून खाली घेऊन आली...

दोघीही खाली उतरल्यावर प्रधानांनी बोलायला सुरूवात केली, "सुहासिनी मॅडमचा खून असा झाला. हा असा खून होता ज्यात मृत व्यक्ती आणि खूनी दोघंही विटनेस नव्हते. मि. रंजन, गुन्हा पूजाच्या हातून घडला. पण तो त्यांनी स्वत: नाही केला, तर हिप्नॉटिझमचा आधार घेऊन त्यांच्याकडून तो घडवला गेला. सुहासिनी मॅडमनाही तसंच हिप्नोटाईझ केलं गेलं होतं. नाहीतर त्या स्वत:हून टाकीवर का जातील... व्हिडियो पाहून आम्हाला वाटलं या केसला दोनच बाजू आहेत. एक म्हणजे सुहासिनी मॅडम आणि दुसरी पूजा. मी बिल्डिंगच्या पाळतवर माणसं ठेवली. सुहासिनी मॅडमशी संबंधीत व्यक्तींची माहिती गोळा केली. तेव्हा रंजन आणि सुधाकर देसाईसुद्धा संशयाच्या जाळ्यात अडकले. पण जसजसं आम्ही अजून खोलात शिरलो. व्हिडियो परत परत पाहिले. तसी आमची खात्री पटली. या केसला चार नाही, तर पाच बाजू आहेत. केसचा पाचवा कोन आणि या कटाचा मुख्य सूत्रधार आहे मकरंद..."

हे नवीन नाव ऐकून सर्वजण गोंधळात पडले. पूजा थोडी भांबावल्यासारखी दिसली. पण तिने तसं जाणवू दिलं नाही. प्रधानांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली, "दोन वर्षांपूर्वी पुण्यात पूजा ज्या कॉलेजमध्ये शिकत होती, तिथे मकरंदसुद्धा होता. एक दिवस ड्रग्सच्या नशेत मकरंदने पूजाच्या घरात घुसून तिच्यावर हात टाकला. कोणी सुजाण नागरिकाने वेळेवर पोलिसात कळवल्यामुळे पूजावरचं संभाव्य संकट टळलं आणि मकरंदला अटक झाली. जेलमध्ये मकरंदला बाबू भेटला. पाच वर्षांपूर्वी बाबू एक भुरटा चोर होता, जो लोकांना हिप्नोटाईझ करून त्यांना लुबाडायचा. या बाबूने मकरंदला हिप्नॉटिझमच्या काही क्लृप्त्या शिकवल्या. मकरंदला पूजाचा बदला घ्यायचाच होता. बाबूने शिकवलेल्या हिप्नॉटिझम ट्रिक्सचा वापर करून मकरंदने पूजाकरवी सुहासिनी मॅडमचा खून करवला आणि स्वत:चा बदला पूर्ण करून घेतला..." "खोटं आहे हे. मकरंदने खून नाही करवला. तो तसं करूच शकत नाही..." प्रधानांचं बोलणं मध्येच तोडणाऱ्या या वाक्याने सर्व चपापले आणि हे शब्द आलेल्या दिशेने पाहू लागले...

समोर मि. शिर्के रागाने लाल झालेले दिसत होते. त्याकडे पाहत उमा म्हणाली, "का मि. शिर्के... असं का म्हणताय तुम्ही... आमच्याकडे पुरावे आहेत..." मि. शिर्के पुन्हा उफाळून म्हणाले, "नाही. मकरंद खून करूच शकणार नाही..." त्यावर प्रधानांनी लगेच विचारलं, "का..." मि. शिर्के म्हणाले, "कारण त्याने जेलमध्येच आत्महत्या..." मि. शिर्केंना मध्येच तोडत प्रधान म्हणाले, "राईट मि. शिर्के. मकरंदने जेलमध्येच आत्महत्या केली. हे तुम्हाला माहित असण्याचं कारण म्हणजे, मकरंदचं संपूर्ण नाव आहे मकरंद अशोक शिर्के. तुमचा एकुलता एक मुलगा. आता हे ही सांगून टाका मि. शिर्के, खुनाचा हा कट मकरंदने नाही, तर कोणी रचला..." मि. शिर्के आवाज चढवत म्हणाले, "हो. मी करवला हा खून. माझ्या मुलाच्या खुनाचा बदला घेतला मी. त्याने आत्महत्या नाही केली. या पूजाने भाग पाडलं मकरंदला आत्महत्या करायला..." मग पूजाकडे वळत ते म्हणाले, "काय गं... पोलिसांनी त्याला वेळेतच पकडलं होतं ना... तुला काहीच झालं नव्हतं ना... मग तक्रार करून मकरंदचं आयुष्य का बर्बाद केलंस... तू तक्रार मागे घेतली असतीस तर कोणाला कळलंही नसतं की तो ड्रग्स घेतो आणि त्याने तुझ्यावर... पण तू... म्हणून मी तुला अडकवलं..."

मग प्रधानांकडे वळत मि. शिर्के म्हणाले, "वेळ खराब होती इंस्पेक्टर, मकरंदलाही वाचवू शकलो नाही आणि त्याचा बदलाही घेऊ शकलो नाही. पण आज वेळ चांगली आहे. तुमच्याकडे माझ्याविरुद्ध काहीच पुरावे नाहीत. नुसत्या बोलबच्चनने काहीच होत नाही... हा...हा...हा..." "पुरावा नाही कसा... सबळ पुरावा आहे मि. शिर्के..." वेडवाकडं हसत असताना दारातून हा आवाज आला. सर्वांनी दारात पाहिलं तर दोन हवालदारांनी एका माणसाला पकडून ठेवलं होतं. दोन हवालदार, आनंद आणि सचिन बाजूला उभे होते. मि. शिर्केंकडे पाहत आनंद म्हणाला, "याला ओळखता ना मि. शिर्के... नाही म्हणू नका. हा बाबू आहे बाबू. तुमच्या फोन रेकॉर्डमध्ये असलेला बाबूचा नंबर आणि "Activ Securities"च्या आवारातल्या कॅमेऱ्याने टिपलेली तुम्हा दोघांची भेट, हे पुरावे आहेत आमच्याकडे..." आनंदच्या म्हणण्याला पुढे नेत सचिन म्हणाला, "बाबूचा वापर करून मकरंदचा बदला घेण्यासाठी तुम्ही पूजा सबनीसला अडकवायचा प्रयत्न केलातच, पण सुहासिनी मॅडमना मारण्यातही तुमचा स्वर्थच होता नाही का..."

सचिनच्या बोलण्याला पुढे नेत प्रधान म्हणाले, "मि. शिर्के, सुहासिनी सबनीस यांच्या मृत्यूमागे काहीतरी पाणी मुरतंय हे इथे आल्या क्षणापासून आम्हाला जाणवत होतं. म्हणून आम्ही इथे छुपा पहारा बसवला. त्यात सोसायटीच्या खात्यांमध्ये तुम्ही केलेल्या आर्थिक गैरव्यवहारांबद्दल आम्हाला बरीच माहिती मिळाली. शिवाय आनंद जेव्हा सी.सी.टि.व्ही चेक करायला गेला, तेव्हा रेकॉर्डिंगमध्ये छेडछाड केल्याचंही समोर आलं. पूजा सबनीसबद्दलच्या तपासात पूजा मुजूमदार आणि मकरंद शिर्के यांची केस समोर आली. तुम्हीच मकरंदचे वडील आहात ही गोष्ट समजली. गच्चीतलं फुटेज बघताना क्रॉसमधला बंद झालेला दिवा आणि क्रॉसखाली होत असलेली हालचाल आम्हाला जाणवली. तिथे मिळालेल्या वस्तूंवरून आम्ही "Activ Securities"मध्ये गार्ड असणाऱ्या बाबूपर्यंत पोहोचलो. त्याने सर्व सांगितल्यावर आमची खात्री पटली, की तुम्हीच आहात या कटामागचे खरे सूत्रधार. आणि म्हणूनच हा सगळा बनाव रचला आम्ही... आता तोंड उघडा मि. शिर्के..."

मि. शिर्केंनी मान खाली वळवली. एक मोठा सुस्कारा सोडला आणि बोलते झाले, "हो. मीच घडवून आणलं सगळं. मी मकरंदला पोलिस स्टेशनला भेटायला गेलो तेव्हा ही पूजासुद्धा होती तिथे. मकरंदने विनवण्या करूनही पूजाने केस मागे घेतली नाही आणि मकरंदला शिक्षा झाली. लोक त्याच्याबद्दल काहीबाही बोलत असल्याचं जसं माझ्या कानावर येत होतं तसंच ते मकरंदच्याही कानी पडत होतं. मकरंद खचत चालला होता. अखेर एक दिवस मकरंदने ब्लेडने हाताची नस कापून... याला जबाबदार होती पूजा. मला पूजाला संपवायचं नव्हतं, तर तिला आयुष्यातून उठवायचं होतं. माझा मकरंद जसा एकटा पडला, तसं तिला एकटं पाडायचं होतं. एकीकडे पूजा होती, तर दुसऱ्या बाजूला होती ही सुहासिनी सबनीस... जुन्या मधुबन सोसायटीमध्ये मी ट्रेजरर होतो. पैशांमध्ये केलेले बारीक-सारीक हेरफेर जेव्हा पचले, तेव्हा माझी भूक वाढली आणि मोठे हात मारायला लागलो. सगळं सुरळीत चालू होतं. कोणालाही यात कसलाही पत्ता लागत नव्हता. पण तेवढ्यात सोसायटी रीडेव्हलप झाली...

सोसायटीत आलेल्या नवीन मेंबर्सने नव्या कमिटीची मागणी केली. माझं खजिनदारपद जाऊन मी सेक्रेटरी झालो आणि सुहासिनी सबनीस नव्या ट्रेजरर झाल्या. मला वाटलं, बाई आहे तर गुंडाळून ठेवता येईल. पण ही तर माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त हुशार निघाली. रीडेव्हलपमेंटच्या वेळी केलेली अफरातफर तर पकडलीच, पण माझ्या मागच्याही गैरव्यवहारांबद्दल तिला समजलं. एक दिवस मला घरी बोलवून सर्व पैसे भरण्यासाठी तिने सात दिवसांची मुदत दिली. पूजा सबनीसचा बदला कसा घ्यायचा आणि सुहासिनी सबनीसला कसं रोखायचं या विचारात असतानाच एक दिवस मला हा बाबू भेटला. कोणाच्यातरी ओळखीने "Activ Securities"मध्ये हा गार्ड म्हणून काम करत होता. मकरंद ज्या जेलमध्ये होता तिथे बाबूसुद्धा होता. या बाबूने मला सांगितलं, की अडीच वर्षांपूर्वी सुहासिनी सबनीसमुळेच तो पकडला गेला होता. आमच्या दोघांचे शत्रू एकाच परिवारात होते. आम्ही दोघांनी हातमिळवणी केली. त्याच दर्म्यान रंजन आणि पूजा सोसायटीत परत आले. मी आणि बाबूने एक प्लॅन बननला...

माफी मागण्याच्या बहाण्याने मी सुहासिनी सबनीसच्या घरी पोहोचलो. तेव्हा बाबूही होता माझ्यासोबत. त्या बयेने बाबूला ओळखलं पण बाबूनेही तिची माफी मागितली आणि बोलता बोलता तिला लाल क्रॉसवरून हिप्नोटाईझ केलं. मग बाबूने पूजाला गाठलं आणि तिलाही तसंच क्रॉसवरून हिप्नोटाईझ केलं. दोन दिवसांनी आम्ही सगळे सोसायटी पिकनिकला जाणार होतो, पण सबनीस परिवार आणि अजून एक-दोन कुटुंब येणार नव्हती. आम्ही पिकनिकचाच दिवस नक्की केला. मी रामदिनकडून चावी मिळवून त्याची डूप्लिकेट बनवून घेतली. कॅमेरा रेकॉर्डिंगमध्ये फेरफार करून बाबूला गच्चीत नेऊन क्रॉस बसवायची जागा निश्चित करून घेतली. मला काय माहित होतं सगळं वेळेच्या आधीच घडेल. सकाळी त्या बिल्डिंगवर क्रॉस बसवून बाबू त्याची टेस्ट घेणार होता पण..." मि. शिर्केंचं बोलणं पुढे नेत बाबू म्हणाला, "मी क्रॉसमधला लाईट तपासत होतो. कनेक्शन लूज असल्याने लाईट बंद झाला. त्याचवेळी समोरच्या बिल्डिंगमधून कोणीतरी खाली पडल्याचं मी पाहिलं आणि काय घडलं असावं ते लक्षात येऊन मी ताबडतोड सटकलो..."

बोलणं संपल्यावर मि. शिर्केंजवळ येत प्रधान म्हणाले, "तुम्हा दोघांचा प्लॅन तर चांगला होता मि. शिर्के... सबनीस परिवारात घडलेल्या योगायोगांमुळे पिकनिकच्या दोन दिवस आधीच सुहासिनी सबनीसना संपवण्यात तुम्ही यशस्वीही झालात, पण पूजाला तुम्ही अडकवू शकला नाहीत. पूजाला असलेला ऍक्रोफोबिया, तिच्यावरचा हिप्नोसिसचा प्रभाव काढण्याची न मिळालेली संधी, मकरंद आणि बाबूच्या केसेस आणि क्रॉस लावताना "Activ Securities"च्या यूनिफॉर्ममध्ये असलेला बाबू, या गोष्टी तुम्हा दोघांच्या विरोधात गेल्या. गुन्हा कधीच लपत नाही मि. शिर्के... आणि बाबू, जेलमधून सुटल्यावर नव्याने आयुष्य सुरू करण्याची संधी तुला मिळाली होती. पण ती तू गमावलीस. हवालदार, घेऊन जा या दोघांना..." मि. शिर्के आणि बाबूला घेऊन हवालदार निघून गेले. रंजनकडे वळत प्रधान म्हणाले, "मि. रंजन, चला. तुमच्या घरी जाऊ. मि. देसाई, तुम्हीपण या..."

सर्वजण सबनीसांच्या घरात पोहोचल्यावर विलचे पेपर्स काढत प्रधान म्हणाले, "हे सुहासिनी मॅडमचं विल आहे. बहुतेक, येणाऱ्या मृत्यूची चाहूल त्यांना आधीच लागली होती. मि. देसाई, तुमच्या प्रॉब्लेमचा त्यांनी पुरेपूर विचार केला आहे. सुहासिनी मॅडमच्या नावे वेगवेळ्या बँकेत असलेले सत्तावीस लाख रुपये त्यांनी तुमच्या नावाने केले आहेत. आणि मि. रंजन, हा फ्लॅट त्यांनी तुमच्या व पूजाच्या नावावर केला आहे. सोबत, तुम्हाला लिहिलेलं हे पत्रही आहे. यात त्यांनी तुमच्या आणि मि. देसाईंच्या बिघडलेल्या संबंधांबद्दल लिहिलं आहे. मि. रंजन, मि. देसाई, दोघांनीही हे पत्र वाचा. आत्तापर्यंत जे झालं ते झालं. सुहासिनी मॅडमची शेवटची इच्छा समजून तुमच्यातले मतभेद मिटवून टाका. पूजा मॅडम, तुम्ही निर्दोष आहात, पण तुमची रीतसर सुटका झालेली नाही. तुम्ही आमच्यासोबत चौकीवर चला. काही फॉरमॅलिटीज बाकी आहेत..." सर्वजण निघत असताना पूजाकडे पाहत रंजन म्हणाला, "पूजा, आम्ही दोघंही तुझी वाट पाहतोय आपल्या या घरात. लवकर ये..."

चौकीवर कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर घरी जायला निघालेल्या पूजाला थांबवत उमा म्हणाली, "पूजा मॅडम, मकरंदबद्दल या केसशी संदर्भात जेवढी गरजेची माहिती होती, तेवढीच आम्ही समोर आणली. आम्ही कायद्याचे रक्षक आहोत. गुन्हेगाराला शिक्षा देणं हेच आमचं काम आहे. कदाचित मि. शिर्केंनाही तुमच्या आणि मकरंदबद्दल संपूर्ण मीहिती नसेल, पण मकरंदबद्दल तुमच्या परिवाराला सर्वकाही माहित असणं, तुमच्या संसाराच्या आणि पुढील आयुष्याच्या दृष्टीने गरजेचं आहे. मकरंदबद्दलची तुमची निवड चुकली, पण रंजन चांगला माणूस आहे. शांतपणे त्यांना सगळं सांगा. ते नक्कीच समजून घेतील..." पूजाने होकारार्थी मान डोलावली आणि डोळे पुसून समाधानाने घराकडे निघाली...

समाप्त.

@ अनिकेत परशुराम आपटे.

Saturday, March 19, 2022

पाचवा कोन... (पहिला भाग)

सकाळचे आठ वाजले होते. सिक्यूरिटी केबिनमध्ये रामदिन बसला होता. बाजूने जात असलेल्या एका माणसाला पाहून तो उठला. बाहेर येत, "गुड मार्निंग साब..." असं म्हणत त्याने सलाम ठोकला. रामदिनकडे पाहत तो माणूस म्हणाला, "हां रामदिन... इस साल दिवाली में गाँव जा रहे हो या नहीं..." रामदिन हसत म्हणाला, "जाना तो है साब | छुट्टी की अर्जी भी दी है आफिस में | देखते हैं क्या जवाब..." दोघं बोलतच होते की, "आऽऽऽऽऽऽऽऽ..." असा जोरदार किंकाळीचा आवाज आला...

दोघांनी आवाजाच्या दिशेने पाहिलं तर कोणीतरी वरून खाली पडत होतं. दोघं धावतच तिथे गेले. ती पडणारी व्यक्ती "धप्..." असा आवाज करत जमिनीवर पडली. रामदिन आणि तो माणूस पडलेल्या व्यक्तीजवळ पोहोचले. रक्ताच्या थारोळ्यात ती व्यक्ती पाठीवर पडली होती. सताड उघड्या डोळ्यांनी ती वर पाहत होती. त्या व्यक्तीने आपला थरथरता हात बिल्डिंगकडे नेला आणि काही क्षणातच ती व्यक्ती गतप्राण झाली. तिथे इतर बघ्यांचीही गर्दी जमली होती. रामदिन म्हणाला, "अरे, यह तो सात मालेवाली सबनीस आँटी है..." रामदिनसोबतच्या त्या माणसाने मोबाईल काढत फोन लावला, "हॅलो, पोलीस..."

तपास सुरू झाला. सब इंस्पेक्टर उमा आणि सब इंस्पेक्टर सचिन बॉडी चेक करत होते. सीनियर इंस्पेक्टर प्रधानांनी गर्दीकडे पाहत विचारलं, "फोन कोणी केला होता..." एक माणूस पुढे होत बोलता झाला, "सर, मी फोन केला होता. माझं नाव अशोक शिर्के. या सोसायटीचा सेक्रेटरी. एक नंबर बिल्डिंगमध्ये राहतो. या मिसेस सुहासिनी सबनीस. याच दोन नंबर बिल्डिंगमध्ये सातव्या मजल्यावर राहतात. मी आणि रामदिन बोलत होतो तेव्हा ओरडण्याचा आवाज आला. आम्ही बिल्डिंगकडे पाहिलं तेव्हा या वरून खाली पडत होत्या. आमच्या समोरच या कोसळल्या आणि बिल्डिंगकडे बोट दाखवू लागल्या. आम्ही डोक्टरांना फोन केला असता, पण त्या आधीच..."

प्रधान आणि आनंद बिल्डिंगकडे पाहू लागले. आनंद म्हणाला, "सर, या बाजूच्या सर्व खिडक्यांना ग्रिल आहेत. एखाद्या खिडकीचं ग्रिल उघडलं असेल तर सांगता येत नाही. पण मला वाटतं या बाई गच्चीवरून पडल्या असाव्यात..." होकारार्थी मान हलवत प्रधान म्हणाले, "आनंद, तू गच्चीवर जाऊन तपास कर. बघ काही हाती लागतंय का. आणि सचिन, एँब्यूलंस बोलाव. बॉडी डॉककडे घेऊन जा..." आनंद लिफ्टकडे गेला तर सचिन फोन बाहेर काढत बॉडीकडे वळला. प्रधानांकडे येत उमा म्हणाली, "सर, हिट खूप जोरात असणार. डोक्यातून खूप रक्त गेलंय..."

उमा बोलतच होती, की आनंदचा फोन आला, "हां बोल आनंद... काय... ओके. मी पाठवतो..." लगेच उमाकडे वळत प्रधान म्हणाले, "आनंद सांगतोय, वर एक मुलगी बेशुद्धावस्थेत पडलेली आहे. तू जरा वर जाऊन बघ..." मग गर्दीकडे पाहत त्यातल्या बायकांना उद्देशून ते म्हणाले, "प्लीज, तुमच्यापैकी एखाद-दोन जणी गच्चीत जाता का... त्या मुलीची ओळख पटेल. घाबरू नका आमची ऑफिसर उमा आहे तुमच्यासोबत..." तीन महिला आणि उमा लिफ्टकडे गेले आणि प्रधान शिर्केंकडे वळले, "मि. शिर्के, या सबनीस मॅडमच्या घरी कोण कोण असतं..." बॉडीकडे पाहत शिर्के म्हणाले, "एक मुलगा रंजन आणि सून पूजा. रंजन सकाळीच ऑफिसला जातो. त्याला आम्ही कळवलं आहे. पूजा घरीच असेल..."

प्रधानांचा फोन पुन्हा वाजला. यावेळी पलिकडे उमा होती. ती म्हणाली, "सर, ही बेशुद्ध पडलेली मुलगी पूजा आहे. सुहासिनी सबनीसची सून. आम्ही तिला त्यांच्या घरी नेत आहोत..." प्रधानांनी फोन ठेवला आणि बाईकचा आवाज आला. बाईक बाजूला लावत एक माणूस डेड बॉडीकडे धावत आला. "आई..." असं म्हणत तो बॉडीला हात लावणार इतक्यात सचिनने त्याला धरलं. शिर्केंनी त्या माणसाकडे डोळे दाखवत प्रधानांना तो माणूस रंजन असल्याचं सांगितलं. तेवढ्यात सायरन वाजवत अँब्यूलंस आत शिरली. रंजनला सांभाळत प्रधान म्हणाले, "सचिन, तू बॉडी घेऊन डॉककडे जा, आम्ही येतो. मि. रंजन, तुम्हाला अद्याप बॉडीला हात लावता येणार नाही. पोस्ट मॉर्टम झालं की बॉडी तुमच्या ताब्यात देऊ. तुर्तास तुम्ही घरी चला. तुमची पत्नी पूजा बेशुद्ध पडली आहे..."

बॉडी घेऊन सचिन अँब्यूलंसमधून निघून गेला. रंजन कसा-बसा सावरला आणि प्रधानांसोबत चालू लागला. त्यांच्या सोबत मि. शिर्के आणि अजून एक-दोन जण होते. सगळे सातव्या मजल्यावर पोहोचले. एका फ्लॅटचा दरवाजा उघडा होता. समोरच सोफ्यावर एक मुलगी झोपली होती. तिला पाहून, "पूजा... अगं काय झालं तुला..." असं म्हणत रंजन तिच्याजवळ जाऊ लागला. आनंदने त्याला अडवून थोडं शांत केलं. उमाच्या हातून पाण्याचा ग्लास घेऊन रंजन पूजाच्या चेहेऱ्यावर पाणी मारू लागला आणि तिला थोडं हलवून, "पूजा, ऊठ... शुद्धीवर ये... पूजा..." असं ओरडू लागला. प्रधानांनी आनंद व उमाला बाजूला घेत गच्चीचा रिपोर्ट विचारला. आनंद म्हणाला, "सर, मी गच्चीत गेलो तेव्हा भिंतीजवळ... सर तुम्ही गच्चीत चला. तिथेच मी तुम्हाला सांगतो..."

प्रधान आणि आनंद दोघं गच्चीत आले. मि. शिर्केही त्यांच्यासोबत होते. आत आल्यावर आनंदने खिशातून एक पिशवी बाहेर काढली. त्यात एक इनहेलर होतं. दाराजवळच एका ठिकाणी बोट दाखवत आनंद म्हणाला, "सर, हे इनहेलर इथे पडलं होतं. आता हे गच्चीचे कठडे बघा. ते इतके लहान नाहीत की एखादी व्यक्ती तोल जाऊन आपोआप पडेल. या कठड्यांकडे पाहून, खाली पडण्याचे दोनच मार्ग दिसतात. एकतर सुहासिनी मॅडमने स्वत: उडी मारली असावी किंवा कोणीतरी... शिवाय, दारासमोरच ही शिडी आहे जी पाण्याच्या टाकीकडे जाते. पूजा सबनीस पण इथेच या टाकीवर बेशुद्धावस्थेत सापडल्या. मी वर जाऊन पाहिलं. तिथे मला ही चप्पल सापडली..." आनंदने दुसरी पिशवी दाखवली ज्यात चप्पल होती. आनंद पुढे म्हणाला, "याचीच दुसरी चप्पल आपल्याला खाली सुहासिनी मॅडमच्या मृतदेहाजवळ सापडली. त्या टाकीवरून म्हणाल तर तोल जाऊ शकतो... सर इथे नक्कीच पाणी मुरतंय..." कठडे आणि टाकीकडून इनहेलरकडे वळत प्रधानांनी शिर्केंना विचारलं, "या इनहेलरबाबत तुम्ही काही सांगू शकाल का...??"

इनहेलरकडे पाहत मि. शिर्के म्हणाले, "मी सुहासिनी वहिनींकडे एक इनहेलर पाहिला होता. पण हा त्यांचाच आहे का, ते नाही सांगता येत..." मि. शिर्के बोलतच होते, की प्रधानांचं लक्ष भिंतीकडे गेलं. तिथे दोन कॅमेरे बसवलेले दिसले. एकाचं तोंड गच्चीकडे होतं तर दुसऱ्याची दिशा टाकीकडे होती. कॅमेऱ्यांकडे बोट दाखवत प्रधानांनी मि. शिर्केंना विचारलं, "यांचा कंट्रोल कुठे आहे..." मि. शिर्केंनी ग्राऊंड फ्लोअरला ऑफिसमध्ये कंट्रोल असल्याचं सांगितलं. आनंदकडे वळत प्रधान म्हणाले, "आनंद, तू मि. शिर्केंबरोबर कंट्रोल रूममध्ये जाऊन या दोन्ही कॅमेऱ्यांचं गेल्या तासाभराचं फुटेज घेऊन ये. मी सबनीसांच्या घरी पूजा शुद्धीवर आली का ते बघतो..." तिघंही लिफ्टमध्ये शिरले. प्रधान सातव्या मजल्यावर उतरले आणि आनंद व मि. शिर्केंना घेऊन लिफ्ट खाली गेली. प्रधानांनी घरात प्रवेश केला तेव्हा पूजा सोफ्यावर बसली होती व अचके देत पाणी पीत होती. रंजन तिच्या बाजूला बसला होता तर उमा सोफ्याशेजारी उभी होती...

प्रधानांना पाहून पूजाने पाण्याचा ग्लास टेबलवर ठेवला. पूजाच्या समोरच्या खुर्चीत बसत प्रधान म्हणाले, "मॅडम, मी सीनियर इंस्पेक्टर प्रधान. तुम्हाला आता बरं वाटत असेल तर काही प्रश्न विचारायचे आहेत..." पूजाने मानेनेच होकार दिल्यावर प्रधान म्हणाले, "मॅडम, तुम्ही आमच्या ऑफिसर्सना बेशुद्धावस्थेत गच्चीच्या टाकीवर सापडलात. तिथेच जिथून पडून सुहासिनी सबनीस... आता मला सांगा, तुम्ही तेव्हा गच्चीवर काय करत होता... आणि काय पाहिलंत तुम्ही..." पूजाने रंजनकडे पाहिलं आणि बोलायला सुरुवात केली, "रंजन रोज सकाळी सातला घर सोडतो. आजही तसाच निघणार होता. मी त्याच्या चहा-नाश्त्याची तयारी करत होते. आई तेव्हा वॉशरूममध्ये होत्या. रंजन निघाल्यावर मी आमच्या नाश्त्याच्या तयारीत गुंतले. काही वेळाने मला दार उघड-बंद केल्याचा आवाज आला. मी की-होलमधून पाहिलं तर आई जिना चढत होत्या...

त्या रोज सकाळी गच्चीत जातात. तशा आजही गेल्या होत्या. मी पुन्हा किचनकडे वळले. त्याचवेळी रंजनचा फोन आला. त्याची एक फाईल कपाटात राहिली होती. ती घेण्यासाठी तो परत येणार होता. तोवर फाईल काढून टेबलवर ठेवायला त्याने सांगितलं. मी कपाट उघडलं. फाईल रॅकवर ठेवली होती. ती मी उचलली, पण त्याच वेळी तिथे आईंचा इनहेलर दिसला. आईंना दम्याचा त्रास आहे. हा इनहेलर नेहमी त्यांच्याजवळ असतो. इनहेलर घेऊन मी लगेच गच्चीकडे धाव घेतली. दार उघडं होतं. मी आत शिरले. समोर पाण्याची टाकी होती. टाकीला लागलेल्या लोखंडी शिडीवर आई चढत होत्या. मी त्यांना थांबवायला हात केला आणि काही बोलणार इतक्यात... पुढचं मला काहीच आठवत..."

"आठवत नाही... म्हणजे..." उमाने केलेल्या या प्रश्नावर उमाकडे पाहत पूजा म्हणाली, "मला शेवटचं इतकंच आठवतंय, की मी टाकीवर होते. खाली पाहून मला चक्कर आली आणि... मला जाग आली तेव्हा मी इथे होते आणि रंजन माझ्या शेजारी होता..." हे ऐकून थोड्या चिडलेल्या स्वरात उमा म्हणाली, "थोडंसं व्हेग बोलताय पूजा मॅडम तुम्ही. असं अधून मधून तुम्हाला आठवतंय आणि बाकी तुमच्या लक्षात नाही हे कसं काय...!!!" उमाकडे पाहत रंजन तिला म्हणाला, "मी सांगतो ऑफिसर. पूजाला ऍक्रोफोबिया आहे. ऊंचावर जायची तिला भिती वाटते, तिला चक्कर येते..." रंजनला मध्येच थांबवत प्रधानांनी विचारलं, "मि. रंजन, सुहासिनी मॅडमना जर दमा आहे, तर तो पम्प त्यांच्याजवळ असायला हवा होता. तो तुमच्या कपाटात का होता...!!!" रंजन काही बोलणार इतक्यात आनंद आणि मि. शिर्के दारात आले. प्रधानांच्या हातात टॅब देत आनंद म्हणाला, "सर, सी.सी.टि.व्ही. फुटेज मिळालं. आणि खूनीसुद्धा..."

प्रधानांच्या चेहेऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले. त्यांनी टॅब सर्वांना दिसेल असा ठेवत चालू केला. एका फाईलवर कॅमेरा १ असं लिहिलं होतं तर दुसरीवर कॅमेरा २ हे नाव लिहिलं होतं. प्रधानांनी पहिली फाईल सुरू केली. गच्चीचं फुटेज होतं. दार उघडं होतं. सुहासिनी सबनीस दारातून आत येत डावीकडे वळल्या. मग उजवीकडे वळत टाकीकडे पाहू लागल्या. काही क्षण तसंच पाहत त्या टाकीकडे जाऊ लागल्या. टाकीला लागलेली शिडी त्या चढत असतानाच गच्चीच्या दारात पूजा सबनीस आली. तिने टाकीकडे पाहिलं आणि हात पुढे केला. दुसऱ्याच क्षणी तिच्या हातून काहीतरी खाली पडलं आणि पूजा टाकीच्या दिशेने जाऊ लागली. एव्हाना सुहासिनी सबनीस शिडी चढून टाकीवर पोहोचल्या होत्या. पूजा हळूहळू शिडी चढून वर गेली. बाकी काहीच दिसलं नाही. कोणीतरी टाकीवर आणि कोणीतरी बिल्डिंगबाहेर पडलेलं दिसत होतं. त्याशिवाय त्या व्हिडियोत दुसरं काहीच नव्हतं...

व्हिडियो बंद झाला. प्रधानांनी कॅमेरा २ लिहिलेली फाईल सुरू केली. हा कॅमेरा टाकीवर आणि बिल्डिंगबाहेर असा फोकस असलेला होता. त्यातही तेच दृष्य होतं. सुहासिनी सबनीस शिडी चढून वर येतात आणि मागून पूजा येते. टाकीवर फोकस असल्याने तिथे काय घडलं ते समजत होतं. सुहासिनी सबनीस शिडी चढून वर आल्या आणि टाकीच्या एकदम टोकाला उभ्या राहिल्या. तेवढ्यात पूजा वर आली आणि ती तिथे उभ्या असलेल्या सुहासिनी सबनीसला धक्का देणार इतक्यात सुहासिनी सबनीस वळल्या. तेवढ्यात पूजाने त्यांना धक्का दिला आणि सुहासिनी सबनीस टाकीवरून खाली पडल्या. त्याचवेळी पूजा सबनीससुद्धा टाकीवरच कोसळली. व्हिडियो बंद झाला. काही क्षण शांतता राहिली. तोंडावर हात ठेवत मोठे डोळे करून स्क्रीनकडे पाहणाऱ्या पूजाकडे बघत रंजन म्हणाला, "पूजा... तू केलंस हे... तुमच्यातल्या वादांचा शेवट तू असा केलास... अगं भांडणं कोणाकडे होत नाहीत... म्हणून खून करायचा... मला लाज वाटते की आजवर मी तुझ्यावर प्रेम केलं..."

स्क्रीनकडे पाहतच पूजा म्हणाली, "हे.... मी... रंजन अरे हे मी नाही केलं... मला काहीच माहित नाही यातलं. तुझी शप्पथ..." हे म्हणताना पूजाने रंजनच्या हातावर हात ठेवला जो रंजनने झिडकारला आणि सोफ्यावरून उठत खिडकीकडे गेला. पूजा रंजनकडे हात करू लागली पण रंजन तिच्याकडे पाहतच नव्हता. काही क्षणात प्रधान म्हणाले, "पूजा, तुमचं हे कृत्य कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालं आहे. हा तुमच्या विरुद्धचा सबळ पुरावा आहे. मिसेस पूजा सबनीस, मिळालेल्या पुराव्याच्या आधारे मी तुमच्यावर सुहासिनी सबनीसच्या खुनाचा आरोप ठेवत आहे. सब इंस्पेक्टर उमा, अरेस्ट हर एँड कम्प्लीट द प्रोसिझर. मि. रंजन, तुम्हालाही आमच्यासोबत चौकीवर यावं लागेल. आनंद, संपूर्ण घराची झडती घे. खास करून पूजा व सुहासिनी सबनीसच्या सामानाची आणि या केसशी संबंधीत काही मिळालं तर मला कळव. ही लेडी कॉन्स्टेबल आणि हे दोन हवालदार तुझी मदत करतील. मि. शिर्के, झडती होईपर्यंत तुम्ही प्लीज व्हिटनेस म्हणून इथे थांबा... लेट्स गो..."

थोड्याच वेळात सर्वजण चौकीवर पोहोचले. उमाने पूजाला एका सेलमध्ये बंद केलं. सगळे सोपस्कार झाल्यावर रंजनने जड आवाजात विचारलं, "सर, आईची बॉडी..." रंजनच्या खांद्यावर हात ठेवत प्रधान म्हणाले, "मला तुमच्या भावना समजतात मि. रंजन, पण सुहासिनी सबनीसचा मृत्यू अनैसर्गिक आहे. त्यामुळे पोस्ट मॉर्टेम झाल्याशिवाय बॉडी तुम्हाला मिळू शकणार नाही. संध्याकाळपर्यंत रिपोर्ट येईल. त्यानंतरच बॉडी तुम्हाला मिळेल. राहिला प्रश्न पूजाचा. तर..." प्रधानांना मध्येच तोडत रंजन म्हणाला, "तिच्याबद्दल मला काहीच बोलायचं किंवा ऐकायचं नाही. ती आणि तिचं नशीब. तुम्ही फक्त माझी आई मला मिळवून द्या..." हे ऐकून प्रधानांनी उमाकडे पाहिलं. मग रंजनचा खांदा थोपटत प्रधानांनी त्याला रवाना केलं. रंजन बाहेर पडला आणि प्रधानांना आनंदचा फोन आला, "बोल आनंद... ओके. तू ते सगळं घेऊन लॅबवर ये. आम्ही तिथेच जात आहोत..." फोन बंद झाल्यावर उमा व प्रधान डॉ. गोखलेंच्या लॅबकडे निघाले...

जाताना प्रधान गप्प गप्प होते. उमाने त्यांना कारण विचारलं तर ते म्हणाले, "या केसने मला विचारात पाडलं आहे..." प्रधानांच्या वाक्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असलेल्या उमाकडे पाहत प्रधान म्हणाले, "दिसायला तर ही ओपन एँड शट केस दिसते, पण काही प्रश्नांनी मला भंडावून सोडलं आहे. पहिलं म्हणजे सबनीस कुटुंब तिथे बऱ्याच काळापासून राहत आहे. जागोजागी कॅमेरे लावले आहेत हेही त्यांना माहित आहे. असं असताना खून करायचा झाल्यास पूजा असा उघड उघड खून का करेल... दुसरी गोष्ट म्हणजे, चल मानलं की पूजा इनहेलर द्यायला गच्चीत गेली. पण दाराजवळच तो इनहेलर तिच्या हातून पडला तरी पूजाने तो उचलला नाही. ती तशीच सुहासिनी सबनीसच्या दिशेने गेली. असं का... तिसरा प्रश्न म्हणजे पूजाला ऍक्रोफोबिया आहे. इट इज फियर ऑफ हाईट. अशी व्यक्ती ऊंचावर गेली तर घाबरते. एकदम पॅनिक होते. असं असताना पूजाने खुनासाठी ऊंचावरची गच्चीच का निवडली. ती तिथे स्वत: पॅनिक कशी नाही झाली..."

प्रधानांच्या बोलण्याने उमासुद्धा विचारात पडली. तिलाही काय बोलावं ते सुचत नव्हतं. गाडी थोड्याच वेळात लॅबच्या इमारतीच्या आवारात शिरली. उमा आणि प्रधान लिफ्टने वर जाऊ लागले. उमा म्हणाली, "सर, तुम्ही जे बोलताय, ती विचार करण्यासारखी गोष्ट आहे... कुठेतरी पाणी मुरतंय सर..." स्मित करत प्रधान म्हणाले, "एनीवेज, आनंदने मि. शिर्के आणि तिथल्या इतर राहिवाशांची चौकशी केली आहे. शिवाय त्याला सबनीसांच्या घरी काही कागदपत्र मिळाली आहेत. ती घेऊन तो इथेच येत आहे. तोवर डॉक काय म्हणतात ते पाहू..." बोलता बोलता लिफ्ट थांबली आणि लॅबचं दार ढकलून दोघं आत शिरली. सचिन एका बाजूला उभा होता आणि डॉ. गोखले बॉडीच्या जवळ उभे राहून फाईल वाचत होते. प्रधानांना आणि उमाला पाहून फाईल बाजूला ठेवत ते म्हणाले, "या प्रधानसाहेब. बॉडी पूर्ण चेक केली मी. शरीरावर कुठेही जखमांच्या किंवा इतर कसल्याही खुणा नाहीत. घोट्याजवळ खर्चटल्यासारखं दिसतंय. ते बहुतेक पडण्याआधी घोटा घासला गेला असावा...

कपड्यांवर सुहासिनी सबनीसच्या बोटांशिवाय अजून काही ठिकाणी वेगळे ठसे सापडले आहेत. तुम्ही स्पॉटवर काही फिंगर प्रिंट्स घेतले असतील तर द्या. मी ते पण मॅच करतो. उमाने डॉ. गोखलेंना पेन ड्राईव्ह दिला. पेन ड्राईव्ह घेऊन त्यांच्या कॉम्प्यूटरजवळ गेले आणि प्रधान उमा व सचिनकडे वळत म्हणाले, "मला वाटतं आपण काहीतरी मिस करतोय. उमा, तो टॅब प्रोजेक्टरला कनेक्ट कर. लेट्स वॉच द क्लिप्स अगेन..." प्रोजेक्टर सुरू झाला. पुन्हा तोच व्हिडियो दिसू लागला. काही क्षणातच प्रधान म्हणाले, "स्टॉप. थोडं रिवाइंड करून स्लो मोशनमध्ये सुरू कर..." एका फ्रेमवर प्रधानांनी व्हिडियो थांबवला आणि विचारलं, "डिड यू सी दॅट..."

स्क्रीनकडे पाहत सचिन म्हणाला, "सर, सुहासिनी सबनीस दारातून आत आल्या तेव्हा नॉर्मल पाहत होत्या, पण एका पॉईंटनंतर त्या एकाच दिशेला टक लावून पाहू लागल्या..." प्रधानांनी स्मित केलं आणि म्हणाले, "अजून काही दिसलं व्हिडियोत..." त्यावर उमा लगेच म्हणाली, "सर तो लाल क्रॉस... समोरच्या बिल्डिंगवर असलेला तो लाल क्रॉस... सुहासिनी सबनीस दारात आल्या तेव्हा क्रॉसमधला दिवा बंद होता. पण लगेच तो लागला आणि सुहासिनी सबनीस त्याच दिव्याकडे टक लावून पाहत होत्या..." उमाचं म्हणणं ऐकून प्रधान म्हणाले, "Absolutely spot on... सचिन आणि उमा, तुम्हा दोघांचं बरोबर आहे. आता व्हिडियो पुढे चालवू..." व्हिडियो पुन्हा सुरू झाला. एका फ्रेमवर आल्यावर प्रधानांनी स्क्रीनकडे बोट दाखवत दोघांनाही काय दिसलं असं विचारलं. उमा म्हणाली, "इनहेलर पूजाच्या हातून पडला, पण तो न उचलताच ती शिडीकडे चालत गेली. गच्चीत जाण्याचा तिचा हेतूच सफल होती नाही..." सचिन लगेच म्हणाला, "आणि सर, पूजासुद्धा त्याच लाल क्रॉसकडे पाहत होती..."

स्क्रीनच्या दिशेने टिचकी वाजवत प्रधान म्हणाले, "देयर यू आर... गच्चीच्या दारात आल्या तेव्हा दोघीही नॉर्मल होत्या. हा लाल क्रॉस पाहिला आणि दोघीही भारावल्यासारख्या वागू लागल्या. Its definitely hypnotism. या दोघींना हिप्नोटाईझ करून त्यांच्याकडून ही कृत्य करवून घेतली गेली आहेत. हा नक्कीच खून आहे, पण साधा-सरळ नाही. या खुनाचा मोटिव्ह लक्षात यायला हवा. काय असू शकेल खुनाचं कारण..." "सर खुनाचं कारण प्रॉपर्टी असू शकेल..." प्रधान बोलतच होते, की आनंदच्या आवाजाने सर्वांचं लक्ष वेधलं गेलं. हातात डायरी आणि दोन फाइली घेऊन आनंद दारात उभा होता. आत येत तो बोलता झाला, "सर, सबनीसांच्या घरात मला ही डायरी आणि या दोन फाईल्स सापडल्या. ही पूजाची पर्सनल डायरी आहे. या फाईलमध्ये सबनीस कुटुंबियाने बँकेत ठेवलेल्या डिपॉझिट्स, शेयर्स आणि म्यूचूअल फंड्स यांची कागदपत्र आहेत आणि या फाईलमध्ये प्रॉपर्टीसंदर्भातले पेपर्स आहेत...

विनायक सबनीस म्हणजे सुहासिनी सबनीस यांचे मिस्टर व रंजनचे वडील. त्यांच्या नावे दोन फ्लॅट होते. नासिकमधला फ्लॅट त्यांच्या आणि रंजनच्या नावे होता तर मुंबईतला मधुबन सोसायटीमधला फ्लॅट त्यांच्या आणि सुहासिनी सबनीस या नावाने होता. चार वर्षांपूर्वी विनायक सबनीस गेले आणि दोन्ही फ्लॅट राहिलेल्या व्यक्तींच्या नावे झाले. रंजनने नासिकमधला फ्लॅट भाड्यावर चढवला आणि सुहासिनी मॅडमसोबत मुंबईत राहू लागला. अडीच वर्षांपूर्वी मधुबन सोसायटीची रीडेव्हलपमेंट सुरू झाली तेव्हा सुहासिनी सबनीस तेवढा काळ नासिकमध्ये राहत होत्या आणि नोकरीसाठी म्हणून रंजन मुंबईतच भाड्याने राहू लागला. नवीन बिल्डिंगमध्ये मोठा फ्लॅट घेण्यासाठी रंजनने नासिकमधली जागा विकली. या संदर्भातले सगळे पेपर्स या फाईलमध्ये आहेत. गेल्या वर्षीपर्यंत सर्व ठिक होतं. मला वाटतं सबनीसांच्या घरात प्रॉब्लेम आले ते गेल्या वर्षी..." सचिनने लगेच विचारलंच, "मागच्या वर्षी... काय झालं होतं तेव्हा..." सचिनकडे पाहत आनंद म्हणाला, "मागच्या वर्षी रंजन आणि पूजाचं लग्न झालं...

लग्नाचे पहिले दोन-तीन महिने सर्व ठिक होतं. पण नंतर पूजा आणि सुहासिनी मॅडम यांच्यात वाद सुरू झाले. सोसायटीतल्या बऱ्याच लोकांनी सांगितलं की मोठ-मोठ्याने भांडणं आणि आदळ-आपटीचे आवाज यायचे. आणि हे रोजचंच झालं होतं. शेवटी रंजन आणि पूजा भाड्याचं घर घेऊन वेगळे राहू लागले. या गोष्टीला सहा महिनेही झाले नसतील, की दोघं पुन्हा मधुबन सोसायटीत परतले. भर गेटवर दोघांनी सुहासिनी मॅडमची माफी मागितली. तिथे बरीच माणसं होती. सोसायटीतल्या रहिवाशांच्या जबानी दर्म्यान त्यांनी सांगितलं..." "पण जर भांडणांना कंटाळून रंजन वेगळा राहत होता तर तो परत का आला...!!!" आनंदच्या बोलण्यावरून सचिनने त्याची शंका विचारून घेतली. त्याला उत्तर देत आनंद पुन्हा बोलू लागला, "या प्रश्नाचं उत्तरही कदाचित या दुसऱ्या फाईलमध्ये आहे सचिन. सर, मधुबन सोसायटी रीडेव्हलपमेंटला गेली तेव्हा रंजनने नासिकमधला त्याचा फ्लॅट विकून ते पैसे इथे गुंतवले आणि मोठा फ्लॅट घेतला. रजिस्ट्रेशनच्या वेळी ऑफिसच्या वतीने रंजन जर्मनीत असल्याने जुन्या फ्लॅटप्रमाणे हा नवा फ्लॅट, सुहासिनी मॅडम यांच्या नावाने रजिस्टर झाला आणि रंजनला नॉमिनी केलं गेलं...

रंजन वेगळा रहायला गेल्याच्या एक-दोन महिन्यातच सुहासिनी मॅडमने नॉमिनेशन बदललं. यावेळी नॉमिनी होता सुहासिनी मॅडमचा भाऊ सुधाकर देसाई. सुधाकर देसाई मुंबईतच राहतात. कदाचित याचा राग मनात धरून पूजाने हे कृत्य केलं असावं..." आनंदचं बोलणं संपलं आणि प्रधान बोलते झाले, "या खुनाला एक नाही तर चार बाजू आहेत. पहिल्या आहेत सुहासिनी मॅडम, ज्यांचा मृत्यू झाला. दुसरी पूजा, जी सध्या कोठडीत आहे. आनंदच्या म्हणण्याप्रमाणे नॉमिनेशन बदलल्याचा राग तिच्या मनात असू शकतो. तिसरा कोन म्हणजे रंजन. त्याच्या मनातसुद्धा नॉमिनेशनबद्दलचा राग असू शकतो. आणि चौथा कोन आहे सुधाकर देसाई, ज्यांच्या नावाने नॉमिनेशन बदलण्यात आलं. उद्या सुधाकर देसाई आणि रंजन सबनीसला चौकीवर बोलवून घ्या. या तिघांचीही कसून चौकशी करू... सचिन, जरा तो व्हिडियो परत चालू कर आणि लाल क्रॉस आला की फ्रीज कर..." सचिनने तसं केलं...

क्रॉसकडे बोट दाखवत प्रधान म्हणाले, "ज्या बिल्डिंगवर हा क्रॉस आहे, ती कमीत कमी १०० ते १५० फूट लांब वाटते..." प्रधानांचं बोलणं पुढे नेत उमा म्हणाली, "सर, ही तर अंडर कंस्ट्रक्शन बिल्डिंग दिसते. क्रॉसच्या आजू-बाजूला सळ्या बाहेर असलेले कॉलम्स आहेत..." प्रधानांनी सचिनला क्रॉसवर झूम करून व्हिडियो पुन्हा सुरू करायला सांगितलं. व्हिडियोच्या एका फ्रेमवर सचिनने फ्रीज केलं आणि म्हणाला, "सर, इथे क्रॉसमधला दिवा बंद झाला पण क्रॉसच्या खालच्या बाजूला काहीतरी हालचाल जाणवली. आपण परत पाहू तेवढा भाग..." सचिनने थोडं रिवाईंड केलं आणि व्हिडियो स्लो मोशनमध्ये सुरू केला. क्रॉसमधला लाल दिवा बंद झाला तेव्हा त्याच्या खालून कोणीतरी गेल्यासारखं वाटलं. प्रधानांनी दिवा बंद होण्याच्या आधी आणि दिवा बंद झाल्यावर, अशा दोन फ्रेम झूम करून त्यांचे फोटो काढायला सांगितलं. दोन्हीही फोटो दुसऱ्या स्क्रीनवर दिसू लागले. प्रधान म्हणाले, "माणसाचा चेहेरा धुसर दिसतोय, पण त्याने घातलेल्या कपड्यावर 'A.S.' अशी अक्षरं दिसत आहेत. सचिन, आनंद लगेच तिथे जा आणि बघा या माणसाबद्दल अजून काही सापडतंय का... कदाचित या माणसाचा वापर सुहासिनी मॅडमला मारायला केला गेला असावा..."

सचिन आणि आनंदने क्रॉस लावलेल्या बिल्डिंगचा फोटो काढून घेतला आणि तडक निघाले. डॉ. गोखले पुढे येत म्हणाले, "प्रधान साहेब, या इनहेलरवरचे ठसे मी बाकी ठशांशी जोडून पाहिले. स्वत: सुहासिनी सबनीस, पूजा सबनीस आणि रंजन सबनीसच्या ठशांशी ते जुळतात. बाकी त्यावर कोणतेच ठसे सापडले नाहीत. या पम्पमध्येही औषधच आहे, कोणतंही घातक केमिकल नाही..." डॉ. गोखले बोलतच होते की त्यांची नजर फाईलकडे गेली. फाईलच्या एका बाजूला सुहासिनी सबनीसचा फोटो आणि नाव होतं तर दुसऱ्या बाजूला पूजा सबनीसचं नाव आणि तिचा फोटो होता. त्या फोटोकडे बोट दाखवत डॉ. गोखले म्हणाले, "अरे, पूजा मुजुमदार..." या शब्दांवर प्रधान आणि उमाने भुवया उंचावल्या तेव्हा डॉ. गोखले पुढे बोलते झाले, "दोन वर्षांपूर्वी मी पुण्यात होतो. तेव्हाची ही केस आहे. पूजा मुजूमदार नावाच्या एका मुलीवर एकाने तिच्याच घरात जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. पोलीस वेळेवर पोहोचले आणि त्या माणसाला पकडलं. पूजा मुजूमदारने तिचं नाव गुप्त ठेवावं अशी विनंती केल्यावर केस पेपर्समध्ये तिचं नाव बदललं गेलं. मी तेव्हा तिथेच फॉरेंसिक डॉक्टर म्हणून कार्यरत असल्याने मला खरं नाव समजलं. बाकी डीटेल्स केस नं. १३२ मधून समजतील..."


दुसरा व शेवटचा भाग: २५.०३.२०२२