Tuesday, January 10, 2023

The Dependable Wall...

"द वॉल..." असा उल्लेख जेव्हा क्रिकेट जगत किंवा क्रिकेटप्रेमींमध्ये होतो, तेव्हा एकाच खेळाडूचं नाव समोर येतं. तो खेळाडू म्हणजे 'जॅमी'. अर्थात, राहुल द्रविड...

राहुल द्रविडला 'जॅमी' हे टोपणनाव मिळालं, ते त्याच्या वडिलांमुळे. राहुलचे वडिल शरद द्रविड, 'किसान' या जॅम बनवणाऱ्या कंपनीत कामाला होते. राहुल जेव्हाही सामन्यासाठी जायचा, तेव्हा त्याला जॅमची एक बाटली मिळायची. तिथूनच राहुलला, 'जॅमी' हे टोपणनाव मिळालं. काही वर्षांनी याच 'किसान' जॅम्सच्या जाहिरातींमध्ये अनेक रूप घेऊन जॅम मिळवण्याचा प्रयत्न करतानाही राहुल दिसला होता...

स्थानिक क्रिकेटमध्ये भरघोस यश मिळवणाऱ्या राहुलने पहिला एकदिवसीय सामना खेळला तो एप्रिल १९९६मध्ये विश्वविजेत्या श्रीलंकेविरुद्ध. याच वर्षी इंग्ल्डविरुद्ध लॉर्ड्सवर राहुलने त्याचा पहिला कसोटी सामना खेळला. कसोटी सामन्यांमध्ये राहुलला जितकं यश मिळालं, तितकं यश त्याला एकदिवसीय सामन्यांमध्ये मिळवता आलं नाही. सुरुवातीच्या काळात एकदिवसीय संघातून सतत आत-बाहेर करणारा राहुल, कसोटी संघाचा एक अविभाज्य घटक बनला होता...

एक बाजू धरून ठेवण्यात राहुलचा हातखंडा होता. धारदार माऱ्यासमोरही बॅट आणि पॅडची भिंत तयार करत राहुलने टिच्चून फलंदाजी केली आहे. अनेक वेळा असं झालं आहे, की दुसऱ्या बाजूला एकेक फलंदाज बाद होत जायचे पण राहुल द्रविड मात्र एका बाजूला भिंतीसारखा उभा असायचा. त्याच्या याच कसबीच्या जोरावर राहुलने अनेक सामन्यांमध्ये भारताला विजयाच्या समीप तरी नेलं आहे, किंवा मोठी धावसंख्या तरी उभारायला हातभार लावला आहे...

मोठ्या भागिदाऱ्या रचण्यात राहुलचा मोलाचा सहभाग असायचा. बहुतकरून सेकन्ड फिडल बॅट्समन म्हणजेच सहायक फलंदाजाची भूमिका राहुल द्रविडच्या वाट्याला यायची. २००५-०६च्या हंगामात जेव्हा भारतीय संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर होता, तेव्हा राहुलने सेहवागसोबत सलामीला येऊन ४१० धावांची भागीदारी रचली होती. सेहवागच्या झंझावातापुढे राहुलची १२८ धावांची संयमी खेळी झाकोळली गेली होती. राहुलची सर्वात महत्वाची भागीदारी आली, ती २००१ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोलकातामध्ये. व्ही.व्ही.एस लक्ष्मणसोबत नेटाने पूर्ण दिवस फलंदाजी करत राहुलने विक्रम केला होता. ३७६ धावांच्या त्या भागीदारीत द्रविडची १८० धावांची खेळी पुन्हा लक्ष्मणच्या द्विशतकाखाली दबली गेली. पण त्या भागीदारीमुळेच भारताने ऑस्ट्रेलियाच्या घशात गेलेला सामना खेचून आणला होता...

कसोटीपाठोपाठ एकदिवसीय सामन्यातही द्रविडने अशाच काही मोठ्या भागीदाऱ्या रचल्या आहेत. १९९९च्या विश्वचषकात श्रीलंकेविरुद्ध खेळताना द्रविडने सौरव गांगुलीसोबत ३१८ धावांची भागीदारी करून एकदिवसीय सामन्यातली पहिली त्रिशतकी भागीदारी रचण्याचा विक्रम केला. त्याच वर्षी हा विक्रम मोडत, राहुल द्रविडने सचिन तेंडुलकरसोबत न्यूझीलंडविरुद्ध ३३१ धावांची भागीदारी रचली. या दोन्हीही भागीदाऱ्यांमध्ये दोन गोष्टी समान होत्या. पहिली ही, की दोन्हीही सामन्यात द्रविडच्या जोडीदाराने १८० धावांचा पल्ला पार केला. आणि दुसरी ही, की दोन्हीही सामन्यात राहुलचा जोडीदारच सामनावीर ठरला होता...

'द वॉल' हे नाव राहुलला याच कारणासाठी मिळालं, की टिच्चून फलंदाजी करणे आणि मोठ्या भागीदाऱ्या रचण्यात मोलाचा वाटा उचलणे यात त्याचा हात कोणी पकडू शकत नसे. अजून एका बाबतीत राहुलची संघाला मदत झाली. ती गोष्ट म्हणजे यष्टीरक्षण. यष्टीरक्षक फलंदाज म्हणून राहुलने धुरा सांभाळली आणि संघाला एक गोलंदाज अधिक खेळवून समतोल साधण्यात यश मिळालं. फलंदाज, यष्टीरक्षक, उपकर्णधार आणि कर्णधार असा प्रवास करणाऱ्या राहुल द्रविडने वयानुरूप क्रिकेटला अलविदा केलं खरं, पण क्रिकेटपासून त्याला दूर ठेवणं शक्य नव्हतं आणि भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक, या नव्या रूपात राहुलची सेकंड इनिंग सुरू झाली...

आज ११ जानेवारी. राहुल द्रविडचा आज पन्नासावा जन्मदिवस. वाढदिवसाची half century पूर्ण करणाऱ्या भारतीय क्रिकेटच्या या 'dependable wall'ला वाढदिवसाच्या अभेद्य शुभेच्छा...

Happy Birthday Jammy...

@ अनिकेत परशुराम आपटे.

No comments:

Post a Comment