पहिल्या भागात...
नुकताच साखरपुडा झालेले आयुषी आणि रजत त्यांच्या मित्राच्या लग्नासाठी रतनगढला जात असतात. पहाटेच आयुषीला एक भयानक स्वप्न पडतं ज्याबद्दल ती गाडीत राजतला सांगते. रजत तिचं बोलणं हसण्यावारी नेत विषय बदलतो. पुढे दोघं एका ढाब्यावर थांबले असताना ढाब्याचा मालक रजतला वत्सलेची कहाणी सांगण्यास सुरुवात करतो ज्यात रतनगढ, तिथलं जंगल, तिथलं गांव, गावात राहणारी कावेरी आणि गावाबाहेर राहणारी वत्सला यांचा उल्लेख असतो...
वत्सला हडळ असल्याचं ढाब्याचा मालक सांगतो. पण राजतला ते पटत नाही. उलट रजत त्यांची मस्करी करतो. ढाब्याचा मालक आयुषीलाही शॉर्टकट नका घेऊ असं सांगायचा प्रयत्न करतो पण तोवर गाडी निघून गेली असते. जंगलाच्या बाजूने न जाता रजत डाव्या बाजूने गाडी वळवतो पण काही अंतर गेल्यावर एक झाड अचानक रस्त्यावर उनमळून पडतं आणि रजतला गाडी उजवीकडे वळवावी लागते. जंगलात शिरताच गाडी गरम होऊन बंद पडते आणि रजत पाणी आणण्यासाठी जंगलात जातो. बराच वेळ रजत परत येत नाही म्हणून काळजीत असलेली आयुषी, रजतला कॉल्स करते पण रजत उत्तर देत नाही. शेवटी न राहवून आयुषी गाडीबाहेर पडते...
जंगलात थोडं चालल्यावर आयुषीला एक जुनाट वाडा दिसतो. पूर्ण जळून काळा झालेला तो वाडा पाहून आयुषीला नवल वाटतं. अनोळखी जागा असल्याने आयुषी वाड्याला बाहेरून फेरी मारते. तेव्हा तिला एक चिठोरा सापडतो. त्यात वत्सलेचा उल्लेख असतो. समोरच एक दार असतं. रजतला शोधत आयुषी आत प्रवेश करते. तिला समोर रजत दिसतो पण तो एका बाहुल्यासारखा झालेला असतो. तेवढ्यात “बोल री काठपुतली डोरी...” हे गाणं ऐकू येतं आणि रजत हातातल्या झांजा वाजवायला लागतो. आयुषीला भीती वाटते आणि त्याचवेळी तिला वत्सला दिसते. वत्सला तिची कहाणी आयुषीला सांगू लागते...
वत्सला तिच्या काळ्या विद्येबद्दल सांगताना असंही सांगते की याच विद्येने तिने कावेरी नावाच्या मुलीच्या आई-वडिलांनाही बाहुल्या बनवलं होतं. वत्सला आयुषीला कावेरी सोबत घडलेली हकिगत दाखवते. वत्सला जंगलात कावेरीला पाहते आणि तिच्या शरीराला काबिज करण्याच्या अभिलाषेने वत्सला कावेरीला फसवून वाड्यावर आणते. तिच्या विद्येबद्दल कावेरीला सांगताना ती मध्येच थांबते. कारण कावेरीचं स्वत:हून खोलीत जाणं गरजेचं असतं. या वाड्यातून बाहेर पडण्याचा मार्ग या वाड्यातच आहे असं कावेरीला सांगून वत्सला अनुष्ठानाला बसते...
शेवटचा भाग...
डोळे बंद असतानाही वत्सलेला कळत होतं कावेरी कुठे कुठे जात आहे. अनुष्ठानात बराच वेळ गेला. मध्यरात्र होऊ लागली होती. डोळे मिटलेल्या अवस्थेत वत्सलेने दाराकडे मान केली. तिच्या चेहेऱ्यावर स्मित होतं. "ही पोरगी त्या खोलीत पोहोचली तर... रिंगणाच्या आजू-बाजूला घुटमळतेस काय... पण तुला आत प्रवेश करावाच लागेल... हा...हा...हा..." असं स्वत:शीच पुटपुटत वत्सलाने डोळे उघडले. बसल्या जागेवरूनच काळ्या धुरासह ती नाहीशी झाली आणि त्याच काळ्या धुरासह ती प्रकटली, ती वरच्या मजल्यावरच्या एका खोलीसमोर. वत्सलेला अचानक आलेली पाहून कावेरी दचकली आणि मागे सरकली. वत्सलेने कावेरीच्या पावलांकडे पाहिलं आणि पुन्हा तिच्या डोळ्यात चमक दिसू लागली. खोलीत येत वत्सला म्हणाली, "तू मुक्तीचा मार्ग शोधलास तर... हे रिंगणच मुक्तीचा मार्ग आहे. आता बस पाहू त्या रिंगणात. मी मंत्र म्हणते आणि मुक्तीचा मार्ग सुकर करते..." कावेरी खूप घाबरली होती. पण मुक्ती हा शब्द ऐकला आणि तिला हायसं वाटलं. ती पटकन त्या रिंगणात बसली. वत्सलाही रिंगणाच्या एका बाजूला आरशाच्यासमोर असलेल्या दुसऱ्या रिंगणात बसली. दोन्ही रिंगणांच्या सभोवताली असलेल्या मेणबत्त्या आपोआप पेटल्या...
वत्सला म्हणाली, "कावेरी, तुझ्या उजव्या हाताला असलेल्या आरशाकडे बघ..." कावेरीने तिथे पाहिलं, तर एक विक्राळ बिभत्स व्यक्ती त्यात दिसत होती. त्या व्यक्तीला पाहून कावेरी अजूनच घाबरली आणि तिने डोळे मिटून घेतले. आरशाकडे बोट करत वत्सला म्हणाली, "ही व्यक्ती आता मुक्तीचा मार्ग दाखवेल. तू डोळे मिटूनच बस. मंत्रोच्चार सुरू होईल. मंत्र संपेपर्यंत डोळे उघडू नकोस..." वत्सलेच्या ताकिदीकडे लक्ष देऊन कावेरी स्वस्थ बसली. यावेळी तिने डोळे नीट मिटले होते. वत्सला उठली आणि कावेरी बसली होती त्या रिंगणाभोवती तिने काळ्या मातीचं अजून एक रिंगण तयार केलं. रिंगण पूर्ण होताच जळत्या निखाऱ्याप्रमाणे ते लाल झालं आणि त्या मातीच्या रिंगणाने पेट घेतला. वत्सला जागेवर येऊन बसली. तिच्या रिंगणाभोवतीही तिने काळ्या मातीचं वर्तुळ काढलं. तेही वर्तुळ जळू लागलं. वत्सला मंत्र म्हणू लागली. मंत्रोच्चार जसा वाढत गेला तशा ज्वाळा भडकत गेल्या आणि काळा धूर खोलीभर पसरला. काही क्षणांसाठी खोलीत फक्त धुराचंच साम्राज्य होतं. अचानक तो धूर नाहीसा झाला. दोन्ही रिंगणांभोवती असलेल्या ज्वाळा शांत झाल्या आणि रिंगणात बसलेल्या कावेरी आणि वत्सलेने एकदमच डोळे उघडले. कावेरीने समोर पाहिलं आणि तिला धक्का बसला. तिने स्वत:ला चाचपडलं आणि ती अजून घाबरली...
कावेरीच्या कोमल कांतीच्या जागी सुरकुतलेलं वृद्ध शरीर दिसत होतं. ती ज्या रिंगणात बसली होती, आता ती तिथे नसून दुसऱ्या रिंगणात होती. कावेरीने समोर पाहिलं तर तिचं शरीर तिला दिसलं. त्या शरीराच्या मुखातून शब्द फुटले, "कावेरी, हा तुझ्या नाही, तर त्या खंगत चाललेल्या शरीरातून बाहेर पाडण्यासाठी माझ्या मुक्तीचा मार्ग होता. मी अनुष्ठानाला बसले ते वेताळाला प्रसन्न करून परकाया प्रवेशाची ही क्रिया सक्रीय करण्यासाठी. तुझं स्वत:हून या वाड्यात येणं आणि रिंगणात प्रवेश करणं आवश्यक होतं. म्हणून जंगलात तो डाव रचून तुला इथवर येण्यास भाग पाडलं मी. आता तुझं हे तरूण शरीर मला मिळालंय आणि त्या नष्ट होत चाललेल्या शरिरात तू बंदिस्त झाली आहेस. या क्रियेचा दुसरा फायदा म्हणजे आता तुला बोलताही येणार नाही. तुझी वाचाही नष्ट केली आहे मी. या नव्या शरिरानिशी मी मुक्त संचार करणार आणि तू इथेच खितपत मरणार... हा...हा...हा..." इतकं बोलून कावेरीच्या तरूण शरीरातली वत्सला काळ्या धुरानिशी नाहीशी झाली...
वाड्याबाहेर काळा धूर प्रकट झाला आणि धूर नाहीसा होताच कावेरीच्या शरीरात असलेली वत्सला तिथे दिसू लागली. ती विचार करू लागली, "नवं शरीर मिळालं. पण ती पोर तशी हुशार वाटते. तो आरसाही अजून तिथेच आहे. त्या आरशाने कावेरीला वाड्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगितला तर... मी तिचं शरीर मिळवलं खरं, पण आता मी स्वत: ते नष्ट नाही करू शकणार... हां... हीच युक्ती करावी..." मनाशी विचार पक्का करत वत्सलेने वाड्याकडे नजर टाकली आणि कुत्सित हसत वाड्याच्या उलट्या दिशेने चालू लागली. जंगलात जाऊन वत्सलेने तिचे घातलेले कपडे जागो-जागी फाडले, अंगावर कुठे कुठे जखमा केल्या आणि गावच्या वेशीजवळ येऊन निपचित पडली. येणाऱ्या वाटसरूंनी तिला पाहिलं आणि ती कावेरी आहे असं समजून ते तिला गावात घेऊन गेले...
शुद्धीवर येताच वत्सला रडू लागली आणि रडत रडतच म्हणाली, "मी... मी जंगलात गेले होते ना... तेव्हा ती... ती तिथे आली आणि मला बळजबरीने जंगलातल्या वाड्यावर घेऊन गेली. ती मला बाहुली बनवणार होती. आणि माझ्यानंतर ती गावात येऊन सर्वांना बाहुली बनवणार होती. ती मंत्र म्हणू लागली तशी मी पटकन तिथून निसटले. मी जंगलाबाहेर आले आणि मला चक्कर आली. माझ्या आई-बाबांनाही तिने मारून टाकलं आणि बाहुली बनवलं. मला खूप भिती वाटते. ती इथे आली तर मला परत घेऊन जाईल... नको नको... मला परत नाही जायचं..." कावेरीचं हे बोलणं ऐकून सगळे थोडे घाबरले. पण त्यातला एकजण म्हणाला, "आपण किती काळ त्या वत्सलेपासून असं घाबरून राहणार..." दुसरा म्हणाला, "बरोबर आहे. हिम्मत करून आपण सर्वांनी एकाच वेळी हल्ला चढवला तर ती वत्सला तरी काय करेल..." सर्वांना हे पटलं आणि त्याचक्षणी सर्व गावकरी मशाली घेऊन कावेरीच्या मागे निघाले...
कावेरीच्या शरीरात असलेली वत्सला मनोमन सुखावत होती. थोड्याच वेळात सर्वजण वाड्यावर पोहोचले. मुख्य दरवाजा उघडाच होता पण आत जायला कोणी धजावत नव्हतं. काही क्षणातच थरथरत्या हातात जळके निखारे घेऊन वत्सलेच्या शरीरात अडकलेली कावेरी बाहेर आली. कावेरीने आपल्या जुन्या शरीरावर ते निखारे भिरकावले, पण अंगात त्राण नसल्याने ते निखारे जवळच पडले. कावेरीच्या शरीरातली वत्सला लगेच म्हणाली, "बघा ही पुन्हा मला मारायला सरसावली आहे..." त्यासरशी गावकऱ्यांनी दाराच्या दिशेने दगडफेक करायला सुरुवात केली. त्यांचा समज होता की ते वत्सलेला दगड मारत आहेत. पण ते दगड लागत होते वत्सलेच्या शरीरात कैद असलेल्या कावेरीला. कावेरी वेदनेने विव्हळली. तिला सगळं सांगायचं होतं, पण शब्दच फुटत नव्हते. काही क्षणातच कावेरी कोसळली. तसं गावकऱ्यांनी दगडफेक बंद केली. त्या जखमी, वृद्ध शरीराला फरफटत कावेरी कशीबशी आत गेली...
वत्सला लगेच म्हणाली, "ही हडळ आहे. परत येऊ शकते. जाळून टाका हा वाडा..." गावकऱ्यांना वत्सलेचं म्हणणं पटलं आणि त्यांनी मशाली वाड्यावर भिरकावल्या. ज्वाळा भडकल्या. वाड्यातून आर्त किंकाळ्यांचा आवाज ऐकू येऊ लागला. काही गावकरी म्हणाले, “अखेर गावाला लागलेली ही पीडा संपली. या हडळीचा नायनाट झाला. चला घरी..." या हडळीचा नायनाट झाला..." हे ऐकून कावेरीच्या शरीरातली वत्सला सुखावत होती. तोच आनंद तिच्या चेहेऱ्यावरही दिसून येत होता. तेव्हा तिने तो लपवला. जळणाऱ्या वाड्याकडे तिने एक कटाक्ष टाकला. त्याच क्षणी सर्व गोठून गेलं. पुन्हा तो प्रखर उजेड समोर आला. वेळ आत्ताच्या काळात परत आली होती. आयुषीचे डोळे दिपले तशी तिने पापण्या मिटून डोळ्यांवर हात ठेवला. हळूहळू तो प्रखर उजेड कमी होत वातीच्या कंदिलांचा मंद प्रकाश सर्वत्र पसरला. आयुषीने डोळे उघडले. समोर वत्सला उभी होती...
तिला पाहून आयुषी दोन पावलं मागे सरकत, त्या प्रकाशाच्या दिशेकडे बोट दाखवत म्हणाली, "म्हणजे दगडफेकीत आणि आगीत जी मेली ती तुझ्या शरीरातली कावेरी होती तर... अगं तू माणूस आहेस की सैतान... त्या कावेरीचे असे हाल पाहवले तरी कसे तुला..." हे ऐकून वत्सला कर्कश हसत म्हणाली, "मी माणूस कुठे आहे... मी तर हडळ आहे... या मानवी देहात विसावणारी एक हडळ... या मानवी देहाच्या मर्यादा मी बदलू शकत नाही, पण हा देह तर बदलू शकते... तेच तर केलं मी... आणि आताही करणार आहे. मी असलेल्या देहाला ज्या दिवशी शंभर वर्ष पूर्ण होतात, त्या दिवसाच्या कातरवेळेनंतर जी पहिली स्त्री माझ्या समोर येईल तिचाच देह मी धारण करू शकते... त्या वेळी जंगलात कावेरी भेटली, आणि आज... तू... हा...हा...हा..." इतकं बोलू वत्सला पुन्हा हसू लागली. त्याच्या हसण्याचा आवाज वाड्यात घुमू लागला. त्याच वेळी त्याच सुरातला रडण्याचा हळुवार आवाजही आयुषीला ऐकून आला. सगळीकडे नजर फिरवत आयुषी म्हणाली, "हा रडण्याचा आवाज... म्हणजे इथे अजूनही कोणी आहे..." तो आवाज वत्सलेनेसुद्धा ऐकला...
आपलं हसणं थांबवत वत्सवा म्हणाली, "हुशार आहेस... इथे तुझ्या-माझ्याखेरीज, या बाहुल्यांखेरीज आणि वेताळाच्या साम्राज्याशिवाय अजूनही कोणीतरी आहे... तो आहे एक आरसा, ज्यात माझं प्रतिबिंब मी कैद केलं आहे. ते माझं प्रतिबिंब असल्याने माझ्या पूर्ण विरुद्ध आहे. मी वाईट आहे तर ते चांगलं आहे. पण ते माझंच प्रतिबिंब असूनही इथून जाऊ शकत नाही. कारण माझ्या मंत्रशक्तीच्या जोरावर मी त्याला त्या आरशात बंदिस्त केलंय. मी स्वत:हून त्याला नष्टही करू शकत नाही. कारण ते माझंच प्रतिबिंब आहे. ते नष्ट झालं तर मीसुद्धा नष्ट होईन. आणि हाच या वाड्यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग आहे... त्या कावेरीला मारण्याचा कट मी याचकरिता रचला. माझ्या प्रतिबिंबाने तिला मुक्तीचा मार्ग सांगितला असता आणि तिने तसं केलं असतं, तर माझं अस्तित्वच संपलं असतं... पण आता मला भय नाही. हा...हा...हा..." वत्सला हसू लागली. आयुषी अजून घाबरली आणि एक पाऊल मागे झाली. लाकडाचं एक फळकूट तिच्या पायाला लागलं. वत्सला दुसरीकडे पाहते आहे हे लक्षात येताच आयुषीने ते फळकूट उचललं आणि पूर्ण ताकदीनिशी तिने वत्सलेवर वार केला...
त्याच क्षणी काळ्या धुरासह वत्सला नाहीशी झाली आणि आयुषीच्या मागे पुन्हा काळ्या धुरासह प्रकटत म्हणाली, "तुला अजून समजलेलं दिसत नाही... मला कोणतीही सजीव व्यक्ती किंवा मानव निर्मित गोष्ट मारू शकत नाही. मला फक्त माझी विद्याच मारू शकते. आता तुझ्याकडे फारच थोडा अवधी आहे. परकाया प्रवेशाची क्रिया सक्रीय करण्यासाठी मी आता अनुष्ठानाला बसणार आहे. माझं अनुष्ठान जोवर सुरू आहे तोपर्यंतच हे शरीर तुझ्याकडे आहे. त्या नंतर... हा...हा...हा..." विचित्र हसत वत्सला काळ्या धुरासह नाहीशी झाली. सर्वत्र सामसूम झालं. आयुषी पुन्हा रजतकडे वळत म्हणाली, "रजत... काय करू रे मी... सांग ना..." आयुषीने रजतचा तो लाकडी पुतळा हलवला आणि त्याच्या खिशातून मोबाईल खाली पडला. मोबाईल उचलून छातीशी धरत आयुषी रडू लागली. तेवढ्यात तिला आठवलं, की वाड्याबाहेर तिला मिळालेला एक चिठोरा तिने खिशात कोंबला होता. आयुषीने लगेच खिसा चाचपडला आणि तो चिठोरा बाहेर काढला.. भरल्या डोळ्यांनी आयुषीने तो चिठोरा पुन्हा वाचला आणि विचार करू लागली, "यात या वत्सलेबद्दल लिहिलेलं दिसतंय. म्हणजे हे कावेरीने तर लिहिलं नसेल... तसं असेल तर तिने अजूनही काही लिहिलं असणार... मला ते शोधायला हवं..."
आयुषीने डोळे पुसले आणि रजतच्या छातीवर दोन वेळा हलकीशी थाप मारून शोध मोहिम सुरू केली. आयुषी एकेक खोलीत जात होती आणि निराशेने परतत होती. तिथे अनुष्ठानात बसलेल्या वत्सलेला हे समजत होतं आणि तिच्या चेहेऱ्यावर स्मित उमटत होतं. बाहेर आयुषी एका भिंतीजवळ पोहोचली. पण तिला कुठेच काहीच सापडलं नव्हतं. रागाने तिने भिंतीला लाथ मारली. जमिनीपासून काही इंच अंतरावर भिंतीला तडा गेला आणि माती खाली पडली. आयुषीने खाली पाहिलं तर आयताकृती आकाराचा एक तडा तिथे दिसत होता. आयुषी विचार करू लागली, "भिंतीला तडाच जाईल तर वेडावाकडा जाईल... असा आकार घेऊन कसा..." आयुषीला काहीतरी आठवल्यासारखं झालं आणि ती स्वत:शीच पुटपुटली, "गावकऱ्यांनी कावेरीवर दगडफेक केली. कावेरी घायाळ झाली आणि फरफटत वाड्याच्या आत आली... या इथे तिने काही लपवलं तर नसेल..." आयुषी तड्याच्या आजूबाजूची जागा साफ करू लागली. थोड्याच वेळात एक हलणारी वीट समोर आली...
आयुषी दोन्हीही हातांनी ती वीट खेचू लागली. तिथे वत्सलेलाही ती वीट दिसली होती. अनुष्ठानातच ती विचार करू लागली, "ही वीट... त्या कावेरीने खरंच काही लिहून इथे लपवलं की काय... वेताळा... मदत कर... त्या पोरीला थांबव..." इकडे आयुषीने ती वीट खेचून काढली. आत एक गुंडाळी केलेला मळका कागद होता. आयुषीने तो कागद बाहेर काढला तसा वारा वाहू लागला. बंद वाड्यात वारा कसा हा प्रश्नच आयुषीला पडला नाही, कारण ती वत्सला जवळपास असताना कधीही काहीही होऊ शकतं हे ती समजून गेली होती. तो वारा इतका सुसाट आणि वेडावाकडा होता की आयुषीला नीट उभंही राहणं शक्य होत नव्हतं. कागद घट्ट हातात धरून आयुषी कशीबशी रजतजवळ पोहोचली. आयुषी पुतळ्याच्या मागच्या बाजूला गेली. तिथे वारा नव्हता. आयुषीने कागदाकडे पाहिलं. कागदाला काही धागे गुंडाळले होते. आयुषीने त्या धाग्यांना हात लावला आणि म्हणाली, "हे तर केस आहेत... म्हणजे कावेरी..." आयुषीने लगबगीने केसांची गुंडाळी सोडवली. काळ्या अक्षरात लिहिलेला मजकूर समोर आला. दुसराच शब्द 'कावेरी' असल्याने तो मजकूर कावेरीनेच लिहिला आहे याची आयुषीला खात्री पटली आणि ती तो कागद वाचू लागली...
"मी कावेरी. ही वत्सला साधी नाही. ती एक हडळ आहे. जंगलात तिने मला तिच्या बोलण्याने फसवून या वाड्यात आणलं. इथे मला माझे आई-बाबा भेटले. पण ते आता माझे आई-बाबा नव्हते. या वत्सलेने त्यांना पुतळा केलं होतं. मला खूप भिती वाटत होती पण इथून बाहेर कसं पडायचं ते समजत नव्हतं. मग वत्सलेने मला एक आरसा शोधायला सांगितलं. हेही सांगितलं की तो आरसाच मला बाहेर जाण्याचा मार्ग दाखवेल. वरच्या मजल्यावरच्या तिसऱ्या खोलीत तो आरसा मला सापडला. तिथे एक विचित्र रिंगण होतं. त्या आरशात मला एक प्रतिबिंब दिसलं. त्याचा चेहेरा खूप भयानक होता. मी काही बोलणार इतक्यात ती वत्सला दारात आली. मी घाबरून मागे सरकले आणि नकळत रिंगणात शिरले. तिथून बाहेरच पडता येत नव्हतं मला. मग वत्सला म्हणाली मला बाहेर पडायचं असेल तर मला त्या रिंगणात बसावं लागेल. मी रिंगणात डोळे मिटून बसले. ती वत्सला काही-बाही मंत्र म्हणू लागली...
वत्सलेने म्हटलेले मंत्र मला ऐकू येत होतेच पण अजून एक आवाज कानी येत होता. तो आवाज वत्सलेच्या आवाजासारखाच होता पण शब्द वेगळे होते. जणू तो मंत्रच उलटा म्हटला जात होता. बराच वेळ हा मंत्रोच्चार सुरू होता. हळूहळू मला जाणवलं की येणाऱ्या आवाजांच्या दिशा बदलत आहेत. थोड्याच वेळात मंत्र बंद झाले. मी डोळे उघडले आणि समोर पाहिलं तर मला धक्काच बसला. माझंच शरीर मला दिसत होतं. मी स्वत:ला चाचपडलं तर माझ्या हातांवरच्या सुरकुत्या, काळे फाटलेले कपडे मला दिसले. मी गोंधळले. तेव्हा वत्सला म्हणाली की तिने मंत्राच्या मदतीने माझं शरीर घेऊन मला या शरीरात अडकवलं आहे आणि मी आता अशीच मरेन. इतकं बोलून वत्सला काळ्या धुरानिशी नाहीशी झाली. मी कशीबशी स्वत:ला सावरत उभी राहिले. तेव्हा मी माझं नाव ऐकलं. मी आवाजाच्या दिशेने पाहिलं. आरशातलं प्रतिबिंब माझ्याशी बोलत होतं...
"कावेरी... वत्सलेने परकाया प्रवेशाची क्रिया संपन्न केली आहे. तुझी आता या शरीरातून सुटकाही नाही होणार आणि तू बोलूही शकणार नाहीस. कारण तुझ्या शरीरासोबत तुझी वाचाही गेली आहे. आता मी काय सांगते ते नीट ऐक... मी त्या वत्सलेचं प्रतिबिंब आहे. ती जे करते, त्याच्या उलट घडतं माझ्याकडून. ती म्हणत असलेले मंत्र उलटे म्हणून परकाया प्रवेशाची क्रिया अपूर्ण ठेवण्याचा मी प्रयत्न केला. पण त्या वत्सले इतकं सामर्थ्य माझ्यात नाही. तिला संपवण्याचे दोनच उपाय आहेत. एक आहे तिचीच विद्या आणि दुसरा उपाय म्हणजे हा आरसा. वत्सला तिची विद्या तिच्याविरुद्ध नाही वापरणार. आता राहिला हा आरसा. हा आरसा एकाच घावात तुटला तर मीही नष्ट होईन आणि माझ्यासोबत ती वत्सलाही कायमची संपेल. काहीतरी असं शोध ज्याने एकाच घावात हा आरसा निखळून पडेल. पण लक्षात ठेव, हा आरसा तुला दुसरा वार करू देणार नाही. जे करणार असशील ते लवकर कर. तुझ्याजवळ फार थोडा अवधी आहे..." मी प्रतिबिंबाचं बोलणं ऐकलं आणि आजूबाजूला शोध घेऊ लागले...
एका कोनाड्यात मला एक तुटलेली फुलदाणी सापडली. आपल्या थरथरत्या हातांनी मी ती फुलदाणी उचलण्याचा प्रयत्न केला. पण त्या वृद्ध कांतीत ताकद नव्हती. मी खाली कोसळले. वत्सलेचं प्रतिबिंब पुन्हा बोलू लागलं, "कावेरी. हे शरीर ज्यात तू अडकली आहेस, तेच तुला साथ देत नाहीये. मी याहून जास्त तुझी मदत करू शकत नाही. पण तुझी कोणालातरी मदत होऊ शकेल. तुझ्यानंतर अजून कोणी स्त्री या वत्सलेच्या काळ्या विद्येला बळी पडू नये असं तुला वाटत असेल तर तुझ्यासोबत जे घडलं ते लिहून ठेव... कावेरी, मी पुन्हा सांगते, तुझ्याकडे अवधी फार कमी आहे. तुझं शरीर धारण केलेली ती वत्सला गावाला जाऊन मिळाली आहे. तिने गावकऱ्यांना तुझ्याविरुद्ध भडकवलं आहे. सारा गाव इथेच येत आहे. लिही कावेरी लिही..." मला त्या प्रतिबिंबाचं म्हणणं पटलं. मी सगळीकडे शोध घेऊ लागले. मी शोध घेत घेत कशी-बशी खाली आले. मला तिथल्या एका पुतळ्याच्या जवळ काही कागद आणि कोळशाचे काही तुकडे सापडले. मी त्याच कागदांवर हे सगळं लिहीत आहे. ती वत्सला हडळ आहे. तिला संपवायचं असेल तर वरच्या मजल्यावरच्या तिसऱ्या खोलीत ठेवलेला तो आरसा एकाच घावानिशी तोडावा..."
आयुषी जेव्हा कावेरीचे ते कागद वाचत होती तेव्हा दुसरीकडे अनुष्ठानाला बसलेल्या वत्सलेच्या चेहेऱ्यावरचे भाव बदलत होते. वत्सला मनोमन म्हणू लागली, "वेताळा... काय झालं हे... त्या कावेरीने माझं गुपित लिहून ठेवलं आणि ते या पोरीने वाचलं... परकाया प्रवेशाची क्रिया सक्रीय व्हायला आता थोडाच अवधी आहे, तोवर तिला त्या खोलीपर्यंत पोहोचू देऊ नकोस वेताळा... मदत कर वेताळा, मदत कर..." तिथे आयुषीने कागद उलट-सुलट करून पाहिले आणि विचार करू लागली, "यापुढे तर काहीच लिहिलेलं नाही... मग हे कागद भिंतीतल्या त्या खोबणीत कसे गेले... वत्सलेला इतकी वर्ष ते कसे नाही मिळाले..." विचार करताना आयुषीने खाली पाहिलं तर तिला काळे-पांढरे केस पडलेले दिसले. "हे कावेरीचे केस, तिने या कागदांना गुडाळले होते. हे कागद त्या भिंतीत लपवलेले होते. म्हणजे कावेरी त्या वेळी त्या क्षणी इथेच कुठेतरी असणार..." आयुषीने मनोमन काहीतरी विचार केला आणि कावेरीचे केस हातात पकडले. त्या सरशी पुन्हा सोसाट्याचा वारा वाहू लागला. तिथले पुतळे हलू लागले. त्या सगळ्याला न जुमानता केस हातात घट्ट पकडत, डोळे बंद करून आयुषी म्हणाली, "कावेरी... काय झालं होतं सांग मला... कावेरी... सांग मला..."
अचानक तो वाहणारा वारा थांबला आणि गोंगाट ऐकू आला. असं वाटत होतं अनेक माणसं काहीबाही बोलत आहेत. आयुषीने डोळे उघडले, तर समोरचं चित्रच पालटलं होतं. पुतळे वेगळे होते. खिडक्यांची तावदानं थोडी किलकिली होती आणि त्यातून बाहेरचं सगळं दिसत होतं. काळ जवळ जवळ नव्वद वर्षांनी मागे गेला होता...
आयुषीने खिडकीच्या आणि तावदानाच्या फटीतून समोर पाहिलं तर अनेक गावकरी हातात मशाली, लाठ्या, दगडं घेऊन उभे होते. तेवढ्यात आयुषीला बाजूला कसलीतरी चाहूल लागली. तिने बाजूला पाहिलं, तर शंभरीला टेकलेली एक जख्ख म्हातारी तिथे उभी होती. ही तीच म्हातारी होती जिचं प्रतिबिंब आरशात होतं. तिच्या हातात कागदाची गुंडाळी होती. म्हणजे ही म्हातारी, परकाया प्रवेशाच्या क्रियेला बळी पडलेली वत्सलेच्या जुन्या शरीरात अडकलेली कावेरी होती. लोकांना पाहताच तिच्या हातातले कागद गळून पडले. कावेरी हळू हळू चालत खिडकीजवळ पोहोचली. तिने खिडकीतून पाहिलं तर माणसांची झुंबड तिला दिसली. आयुषी तिच्या बाजूलाच उभी राहून सर्व पाहत होती. गावकऱ्यांना पाहून कावेरीच्या वृद्ध चेहेऱ्यावर स्मितरेषा उमटली. तिला बोलायचं होतं, पण शब्दच फुटत नव्हते. कावेरीने हताशपणे आयुषीकडे पाहिलं आणि पुन्हा खिडकीबाहेर पाहू लागली...
गर्दीच्या एका कोपऱ्यात उभी वत्सला तिला दिसली. कावेरीच्या मूळच्या शरीरात असलेली वत्सला वाड्याकडे पाहून स्मित करत होती. वत्सलेला पाहताच कावेरीच्या तळपायाची आग मस्तकात गेली. बाजूलाच वातीचा एक पेटता कंदिल होता. कावेरीने तो हातात घेतला पण शरीरात ताकद उरली नसल्याने कंदिल जमिनीवर पडून फुटला आणि आतून निखाऱ्याप्रमाणे जळणारे लालबुंद कोळशाचे तुकडे बाहेर पडले. दोन्हीही हातात मावतील इतके तुकडे घेऊन कावेरी दारात आली. आयुषी तिच्या सोबतच सर्व पाहत होती. दारात पोहोचल्यावर कावेरीने सर्व जळके कोळसे वत्सलेच्या दिशेने भिरकावले. पण ते सर्व ओसरीवरच पडले. त्याच वेळी समोरून काठ्या आणि दगडांचा मारा सुरू झाला. कावेरीला जखमा होत होत्या पण "अ....", "ब...", "आ...ह..." अशा अक्षरांशिवाय तिच्या मुखातून दुसरं काहीच येत नव्हतं. वेदनेने कावेरी कोसळली आणि तशीच फरफटत वाड्याच्या आत परत गेली...
बाहेरून गावकऱ्यांनी वाड्याला आग लावली होती. जमीनीवर पडलेली कावेरी कशीबशी आत आली होती. तिथे पडलेले कागद तिने उचलले पण तिला उभं राहता येत नव्हतं. तिथेच भिंतीत एक छोटी खोबणी होती. कावेरीने तिच्या थरथरत्या हाताने तिच्या डोक्यावरचे काही केस उपटले आणि त्या कागदांना गुंडाळू लागली. कागदाचा काही भाग फाटून जरा लांब गेला. कावेरी तो कागद घ्यायला गेली पण तो दारातून सरकत वाड्याबाहेर गेला. कावेरीने पुन्हा आयुषीकडे पाहिलं आणि उरलेले कागद आणि त्यांना गुंडाळलेले केस त्या खोबणीत ठेवले. कावेरीने आपले दोन्ही थरथरते हात त्या खोबणीसमोर जोडले आणि जखमांमधून वाहणारं रक्त त्या खोबणीवर लावलं. जेव्हा कावेरीने पुन्हा हात जोडले तेव्हा अचानक ती खोबणी भरली गेली आणि ते कागद भिंतीत दडून गेले. तोवर वाड्यातली आग सर्वत्र पसरली होती आणि कावेरीच्या पावलांपर्यंत ती आग आली. कावेरीने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला पण शारीरिक क्षमतेमुळे तिला हार पत्करावी लागली. आगीने कावेरीच्या पूर्ण शरीरावर ताबा मिळवला आणि आयुषीकडे पाहून उरली-सुरली ताकद एकवटून कावेरी जिवाच्या आकांताने किंचाळली...
कानठळ्या बसून आयुषीने कानावर हात ठेवले आणि डोळे घट्ट बंद केले. काही क्षणातच सर्व आवाज बंद झाले. आयुषीने डोळे उघडले आणि कानावरचे हात काढून सर्वत्र पाहू लागली. तिथे आगीचा लवलेश नव्हता. सगळीकडे सामसूम होतं. वेळ आत्ताच्या काळात परत आली होती. हातातल्या केसांकडे पाहून आयुषी म्हणाली, "कावेरी... किती यातना झाल्या असतील गं तुला... कशाचीही तमा न बाळगता तू हे कागद जतन करून ठेवलेस. ही तुझीच पुण्याई आहे, की त्या पापी वत्सलेला आजपर्यंत हे कागद मिळाले नाहीत. तुला त्यावेळी वाचवायला कोणीच नव्हतं. पण आज मी आहे. हे कागद वाचवण्याचा तुझा आटा-पिटा, तुझ्या वेदना, हे काहीच वाया जाऊ देणार नाही मी. शेवटच्या श्वासापर्यंत त्या वत्सलेला संपवण्याचा प्रयत्न करेन मी..." कागद आणि केस रजतच्या पुतळ्याच्या पायाशी ठेऊन आयुषीने रजतच्या छातीवर हात ठेवला आणि डोकंही टेकलं. मग वरच्या मजल्यावरच्या तिसऱ्या खोलीकडे पाहत आयुषी मोठ्याने म्हणाली, "वत्सला, तुझ्या अंताच्या दिशेने जातेय मी. हिम्मत असेल तर अडव मला..."
आयुषी जिन्याच्या दिशेने चालू लागली. त्यासरशी पुन्हा वारा वहायला सुरुवात झाली. आत्ताचा वारा अधिक जोरकस आणि वेडावाकडा होता. मध्ये मध्ये विजाही चमकत होत्या. एक विजेरी आयुषीच्या दिशेने येऊ लागली. आयुषीने ती विजेरी पाहिली आणि तिने मागच्या बाजूला उडी घेतली. विजेरीने जिन्यावर आघात केला आणि तीन पायऱ्या एकदम निखळल्या. तिथे एक भगदाड दिसू लागलं. आयुषी दोन पावलं मागे झाली आणि वेगाने जिन्याकडे धावली. भगदाडीच्या आधीच्या पायरीवरून आयुषीने उडी घेतली पण तिची झेप अपूरी पडली आणि तिचे फक्त हातच भगदाडाच्या पुढच्या पायरीपर्यंत पोहोचू शकले. तिचं बाकीचं शरीर त्या भगदाडीत फेकलं गेलं. आयुषीने खाली पाहिलं तर तळ नसलेली, विजा चमकणारी एक अथांग पोकळी तिला दिसली. एक अज्ञात शक्ती आयुषीचे पाय ओढत होती. आयुषीने सगळी ताकद एकवटून हातांवर जोर देत तिचं शरीर वर उचललं आणि भगदाडीच्या वरच्या बाजूला जाऊन उभी राहिली...
क्षणाचाही विलंब न करता आयुषी पलटली आणि झपझप पावलं टाकत तिसऱ्या खोलीपर्यंत पोहोचली. खोलीचं दार बंद होतं आणि आयुषी ते दार ढकलण्याचा प्रयत्न करू लागली. तिथे अनुष्ठानात बसलेल्या वत्सलेला हे समजलं आणि ती अस्वस्थ झाली. तिने झटक्यासरशी डोळे उघडले आणि वर पाहत म्हणाली, "वेताळा... आता काही क्षणच उरले होते ही क्रिया पूर्ण व्हायला. मी जर उठले तर ही क्रिया अपूर्ण राहील आणि मला दुसरा स्त्री देह शोधावा लागेल... तुझ्या असामान्य शक्तीसोबत देखील तू त्या सामान्य मुलीला थांबवू शकला नाहीस. आता मलाच तिचा बंदोबस्त करायला हवा..." इतकं म्हणून वत्सलेने हातात काळी माती घेतली आणि मंत्र म्हणून ती स्वत:वर शिंपडली. काळ्या धुराचं एक रिंगण वत्सलेभोवती तयार झालं आणि वत्सला त्या धुरासोबत अदृष्य झाली. तिथे आयुषीने अथक प्रयत्नानिशी तो दरवाजा उघडला. जसं ते दार उघडलं तसा तो वारा, ते वावटळ, त्या विजा, सगळं लुप्त झालं...
आयुषी खोलीत पोहोचली. एका कोपऱ्यात तो आरसा भिंतीला लावलेला होता. आरशात वत्सलेची छबी दिसत होती. मोठे मोठे लालभडक डोळे असलेली, काळी फाटकी वस्र परिधान केलेली ती छबी एखाद्या बिभत्स चेटकीणीप्रमाणे वाटत होती. आरशाकडे पाहत आयुषी मनात म्हणाली, "हाच कावेरीने म्हटलेला आरसा असावा. मला हा आरसा तोडायला हवा..." आयुषी आजूबाजूला शोधू लागली. जवळच एक तुटलेली झांज पडली होती. आयुषीने ती झांज उचलली आणि आरशाकडे भिरकावली. ती झांज आरशाला लागणार तोच तिची दिशा बदलली आणि ती आरशाच्या बाजूला भिंतीवर आदळली. खोलीचं दार अचानक बंद झालं. आयुषी ती झांज उचलायला जाणार तोच आरसा आणि तिच्या मध्ये वत्सला येऊन उभी राहिली...
झांजेकडून आयुषीकडे पाहत वत्सला म्हणाली, "माझा आरसा तोडून मला संपण्याचा प्रयत्न करतेस... हा...हा...हा... ते शक्य नाही... मूर्ख मुली, ही विद्या माझ्याशिवाय काहीच करत नाही. माझ्याकडे विद्या नाही… मीच आहे ही काळी विद्या... माझी साधना अपूर्ण ठेवलीस तू... परकाया प्रवेशाची क्रिया अर्धवट राहिली... हरकत नाही. माझा वेताळ पाठीशी आहे माझ्या. तो मला एक दिवस नक्कीच देईल. उद्या पुन्हा नवीन शरीर शोधेन मी. पण तुला सोडणार नाही. या घरात जेवढ्या बाहुल्या आणि कठपुतळ्या आहेत ना, त्या सर्वांवर माझाच प्रभाव आहे. जोवर मी मंत्र म्हणत नाही तोवर या सर्व बाहुल्या अशाच झांजा वाजवत राहतील... तुझ्या त्या जोडीदाराची अवस्था पाहिलीस ना... आता तुझीही हीच दशा करणार आहे मी... हा...हा...हा..." वत्सला विचित्र हसत आरशाच्यासमोर नाचू लागली. तिचा आवाज फारच भयानक होता. नाचता नाचताच वत्सलेने मंत्र म्हटला...
दुसऱ्याच क्षणाला वाड्यात जागोजागी असलेल्या बाहुल्यांच्या हातातल्या झांजा गायब झाल्या. त्यांच्या हातांना बांधलेले दोरखंड नाहीसे झाले. त्या बाहुल्यांमध्ये चेतना आली. सर्वजण आपापलं अंग चाचपडत असतानाच वाड्याचे दरवाजे उघडले गेले. सर्वजण दरवाजांकडे पळत सुटले. रजतनेही त्याचं अंग चाचपडलं. आपण माणसात आलो याचा त्याला आनंद झाला. रजतचं लक्ष त्याच्या पायांकडे गेलं. तिथे काही कागद आणि काही केस पडले होते. बघता बघता त्या दोन्ही गोष्टी हवेत विरून गेल्या. रजत विचार करू लागला, "सगळ्या बाहुल्या आणि कठपुतळ्यांमध्ये चेतना आली. सर्वांची सुटका झाली. मला आयुषीकडे जायला हवं. ती काळजीत असणार...” रजत दाराकडे वळलाच होता की त्याला जमिनीवर पडलेलं आयुषीच्या कानातलं सापडलं. “म्हणजे, मला शोधत आयुषी इथे आली की काय... आणि ते कागद आणि केस... त्या वत्सलेने आयुषीला तर काही..." हा विचार मनात येताच रजत घाबरला, आणि आयुषीला आवाज देत वाड्यात तिला शोधू लागला...
तिकडे वत्सलेच्या खोलीत तिने मंत्र म्हणताच आयुषीने आपले डोळे बंद करून घेतले. पण काहीच झालं नाही हे जाणवून तिने डोळे उघडले. समोर वत्सला पाठमोरी उभी होती. आरशावर नजर फिरवत ती जोरात किंचाळली. खाली रजतने किंकाळी ऐकली आणि भगदाडीवरून उडी घेत धावत वर आला. खोलीत आयुषी स्वत:ला चाचपडत असतानाच खोलीचं दार आपोआप उघडलं आणि रजत तिथे पोहोचला. रजतला पाहून आयुषी लगेच त्याच्या जवळ पोहोचली. त्याला चाचपडत म्हणाली, "रजत, तू ठीक आहेस ना..." तेवढ्यात, "ना....ही... हे शक्य ना...ही... मा...झी विद्या..." असा कर्कश आवाज ऐकू आला. दोघांनी समोर पाहिलं, तर वत्सलेच्या संपूर्ण शरीराभोवती काळं वलय तयार झालं होतं. दोघं लगेच दाराबाहेर पळत सुटली. बाकीचे सगळे आधीच बाहेर पडले होते. रजत आणि आयुषी गेटपर्यंत पोहोचले आणि त्यांनी मागे पाहिलं, तर वाड्याच्या सर्व दारं-खिडक्या आपोआप बंद झाल्या...
वाड्यात आता अंधार झाला होता. सर्वत्र स्मशान शांतता पसरली होती. खिडकीपाशी ठेवलेला ग्रामोफोन हवेत विरून गेला. तिथे खोलीत आरशासमोर उभी वत्सला निस्तेज आणि एखाद्या दगडासारखी दिसत होती. तिच्या दोन्हीही हातात झांजा आल्या आणि एका दोरखंडाने झांजा आणि तिचे हात बांधले गेले. मंत्र म्हणताना वत्सला आरशासमोर उभी होती. झालेल्या अतीव आनंदाच्या भरात वत्सलेने आरशातल्या स्वत:च्या प्रतिबिंबावरच मंत्राचा प्रयोग केला होता. तिची काळी विद्या तिच्यावरच उलटली होती. हातातल्या झांजा वाजवत वत्सला वाडाभर फिरू लागली. आरशातलं वत्सलेचं प्रतिबिंब, आता वत्सलेसाठी गाणं म्हणू लागलं, "बावरी कठपुतली डोरी..."
समाप्त.
@ अनिकेत परशुराम आपटे.




No comments:
Post a Comment