सगळीकडे अंधाराचं साम्राज्य होतं. वादळ-वाऱ्यासह पावसाचं थैमान सुरू होतं. वाड्यात मात्र भयाण शांतता होती. आयुषी कशीबशी अंधारात पुढे जात होती. तिला समोर कोणीतरी उभं असलेलं दिसलं. जवळ जाऊन आयुषीने त्या व्यक्तीला खांद्याला धरून वळवलं. ती व्यक्ती वळली आणि त्याच वेळी अनेक विजा चमकल्या. त्या प्रकाशात, उभ्या असलेल्या व्यक्तीचा चेहेरा पाहून आयुषी अवाक झाली. तो रजत होता. रजतचे डोळे सताड उघडे होते. त्याचं संपूर्ण अंग एखाद्या दगडासारखं झालं होतं. रजतच्या हातात झांजा होत्या. वाड्यात कुठूनतरी, "बोल री कठपुतली डोरी..." हे गाणं ऐकू येऊ लागलं. त्याच बरोबर गूढ स्मित करत हातातल्या झांजा वाजवत रजत आयुषीच्या दिशेने सरकू लागला. आयुषी घाबरली आणि दोन्ही हातांनी डोळे बंद करून जिवाच्या आकांताने किंचाळली...
"आयू... ए आयू... अगं काय झालं... आयू..." आयुषीची आई तिला उठवत होती. आयुषीला जाग आली. तिने पाहिलं तर ती तिच्या बेडरूममध्ये होती. तिची आई बाजूला बसली होती आणि तिचे बाबा दारात उभे होते. आयुषी उठून बसली. तिला कुरवाळत तिची आई म्हणाली, "स्वप्न पाहिलंस का आयू..." आईकडे पाहत आयुषीने होकारार्थी मान हलवली. तिच्या आईने तिला जवळ घेतलं. दारात उभे आयुषीचे बाबा म्हणाले, "स्वप्नच पाहिलंस ना... भूल जाओ | रात गई बात गई..." बाबांना पाहून आयुषी धावतच त्यांच्या जवळ पोहोचत म्हणाली, "बाबा, तुम्ही कधी आलात... आणि ट्रिप कशी झाली तुमची..." आयुषीला जवळ घेत तिचे बाबा म्हणाले, "पहाटेच आलो, आणि ट्रिप एकदम सक्सेसफूल. क्लायंट जाम खुश आहे कंपनीवर. बरं ते जाऊ देत. तू तयार हो पाहू लवकर... होणारे जावई बापू येतीलच इतक्यात...
हे ऐकून आयुषीने आश्चर्याने दोघांकडे पाहिलं. आयुषीचे बाबा म्हणाले, "अगं तुझ्या आईने मला कधीच सांगितलं आहे. तू आणि रजत तुमच्या मित्राच्या लग्नाला जात आहात ना... जा जा. मी नाही अडवणार तुला. साखरपुडा झाला आहे तुझा. अब तो घूमने का लायसंस मिल गया है... पण बेटा..." बाबांच्या हातावर हात ठेऊन आयुषी म्हणाली, "बाबा, तुमच्या या 'पण'चा अर्थ समजला मला. मी असं काहीही होऊ देणार नाही ज्याने तुमची काळजी वाढेल..." बाबा हसले आणि घड्याळ पाहून त्यांनी आयुषीला घाई करण्याचा इशारा केला. आवरा-आवर करून आयुषी हॉलमध्ये आली तर रजत तिथे चहा घेत बसला होता. आयुषीला पाहून आपल्या गुडघ्यावर बसत तो म्हणाला, "ओ माय फेयर लेडी... आय, युअर हम्बल वुड बी हजबंड, अवेटिंग दाय स्माईल..." बाबा पुढे येत म्हणाले, "वाह रजत, एकदम शेक्सपियर..." रजतच्या बोलण्याने छोटासा हशा पिकला...
आयुषी पुढे होत म्हणाली, "चला चला महाशय, ट्रॅफिक लागला तर शेक्सपियरचा हिट्लर होऊन बसेल..." आयुषीच्या उत्तराने तर वातावरण अजून विनोदी झालं. सामान गाडीत ठेवल्यावर आई-बाबांना नमस्कार करून आयुषी गाडीत बसली. रजतही गाडीत बसणार इतक्यात त्याला काहीतरी वाटलं. आयुषीला इशारा करून तो मागे फिरला. आई-बाबांजवळ पोहोचत त्याने दोघांना नमस्कार केला. मग बाबांकडे वळत तो म्हणाला, "बाबा, तुमच्या चेहेऱ्यावरून तुमच्या मनातल्या धास्तीचा मला अंदाज आला आहे. आमचा साखरपुडा जरी झाला असला, तरी मी माझ्या मर्यादा जाणतो. काळजी करू नका..." रजतच्या बोलण्याने आयुषीच्या आई-बाबांना थोडा धीर आला. बाबांनी रजतच्या खांद्यावर हात ठेवत गाडीकडे इशारा केला. दोन्ही जोडप्यांनी एकमेकांना टाटा केलं आणि गाडी रवाना झाली...
गाडी आपल्या गतीने चालत होती. आयुषी खिडकीबाहेर पाहत होती. तिच्यासमोर टिचकी वाजवत रजत म्हणाला, "कहां हो सनम..." रजतकडे पाहत आयुषीने स्मित केलं. रस्त्यावर नजर स्थिर ठेवत रजत पुन्हा म्हणाला, "काय झालं आयू... मी घरापासून पाहतोय, तू गप्प गप्प आहेस... सांग तरी काय झालं..." "रजतला स्वप्नाबद्दल सांगू की नको..." हाच विचार आयुषीच्या मनात होता. शेवटी रजतकडे पाहत ती म्हणाली, "रजत अरे उठण्यापूर्वी मला एक भयानक स्वप्न पडलं. मी कुठल्यातरी अंधाऱ्या बंगल्यात फिरत होते. तेवढ्यात तू समोर आलास. पण तू तू नव्हतास... तुझ्या जागी तुझ्याचसारखा दिसणारा एक बाहुला होता. तुझ्या हातात झांजा होत्या आणि त्या वाजवत तू माझ्या दिशेने येत होतास... मी इतकी घाबरले..." आयुषीचं बोलणं संपल्यावर काही क्षण शांततेत गेले. मग आयुषीकडे पाहत रजत हसू लागला...
रजतला हसताना पाहून आयुषी कपाळावर आठ्या आणत म्हणाली, "तू हसतोस काय असा..." रजत तिला उत्तर देत म्हणाला, "अगं हसू नाहीतर काय करू... तू ज्या भुताखेतांच्या सीरियल आणि पिक्चर बघतेस ना रात्रीची, त्याचाच हा परिणाम आहे. आता या सीरियस गप्पा सोड आणि आपल्या विषयीसुद्धा बोल की काहीतरी... साखरपुडा तर झाला... लग्नाला तीनच महिने उरलेत. पण एका महत्वाच्या गोष्टीवर आपल्यात काही चर्चाच नाही झाली..." रजतचं बोलणं एकून आयुषीला प्रश्न पडला. रजत लगेच म्हणाला, "अगं आपला हनिमून... कुठे जायचं फिरायला... तुझी चॉईस..." हनिमूनचा विषय निघताच आयुषी गोड लाजली. त्यांच्यातला हा विषय वाढत गेला आणि गाडीने शहर सोडलं...
रजत आणि आयुषीमध्ये लग्नाचा विषय रंगत जात होता. गाडीही बराच वेळ चालत होती. एका ढाबावजा हॉटेलकडे रजतने गाडी वळवली. त्या हॉटेलची एकंदर जागा पाहून गाडीतच आयुषी म्हणाली, "रजत, इथे जेवायचं आपण..." गाडी थांबवत रजत म्हणाला, "आयू तू लुकवर नको जाऊस. संज्या म्हणाला होता की जेवण चांगलं असतं इथे. शिवाय बसून खाण्यासारखं चांगलं हॉटेल पुढे नाही ना..." हो नाही करतच रजत आणि आयुषी आत शिरले. जेवताना विषय बदलत बदलत रतनगढवर आला. आयुषीने विचारलं, "कधी पोहोचणार आपण रतनगढला... गाडीत बसून बसून उबग आलाय..." रजतने गल्ल्यावरच्या माणसाकडे पाहत रतनगढचं अंतर विचारलं. त्याने, "अजून चार-पाच तास लागतील..." असं सांगितलं. पण बोलताना त्याच्या चेहेऱ्यावर चिंता दिसत होती...
आयुषी वॉशरूमला गेली तेव्हा रजत त्या गल्ल्यावरच्या माणसाजवळ येत म्हणाला, "काय झालं दादा... रतनगढचं नाव ऐकून तुमच्या चेहेऱ्यावरचे भाव एकदम बदलले ते..." त्या माणसाने वॉशरूमकडे पाहिलं. आयुषी अजून बाहेर नव्हती आली. मग रजतकडे वळत तो माणूस म्हणाला, "साहेब, तुमच्यासोबत मॅडम आहेत म्हणून काही बोलत नव्हतो. पण आता तुम्हाला सांगतो. पुढे गेलात की तुम्हाला दोन रस्ते लागतील. एक रस्ता डावीकडनं जातो ज्याने रतनगढला पोहोचायला चार-पाच तास लागतील. आणि एक रस्ता सरळ जातो. त्याने रतनगढला लवकर पोहोचता येतं. पण तो रस्ता रतनगढच्या जंगलातून जातो. असं म्हणतात की ते जंगल आत आलेल्या व्यक्तीला बाहेर जाऊ देत नाही. खूप वर्षांपूर्वी ते जंगल फक्त रतनगढच्या घाटाच्या पायथ्यापर्यंतच होतं आणि बाकी सगळी वस्ती होती. त्या वस्तीच्या शेवटी आणि जंगलाच्या तोंडावर वत्सला नावाची एक बाई रहायची. तिला कठपुतळ्या म्हणजे दोरीला बांधलेल्या बाहुल्या खूप आवडायच्या...
गावातल्या लहान-मोठ्यांना कठपुतळ्याचे खेळ
दाखवून पैसे कमावून ती गुजरण करायची. म्हातारपणामुळे तिचे खेळ कमी झाले, तिला मिळणारे पैसे कमी झाले. तिचे हाल
होऊ लागले. "आपण इतके गुणी कलाकार, पण लोकांना आपली किंमतच नाही..." हा विचार
करून तिने मनात राग धरला. वत्सलेचे पूर्वज तांत्रिक होते म्हणे. त्यांच्याकडून
वत्सलेला अनेक काळ्या विद्या मिळाल्या होत्या. त्यांचा वापर करून म्हणे वत्सला
लोकांना भुरळ पाडायची आणि त्यांना बाहुल्या बनवायची. गावातली
बरीच माणसं अशीच गायब झाली होती. त्याच गावात कावेरी नावाची एक मुलगी राहत होती. ती
आणि तिचे आई-वडील मागे-पुढे गायब झाले. कावेरीचे आई-वडील काही सापडले नाहीत. पण
ज्या दिवशी कावेरी गायब झाली, त्याच्या पुढच्याच दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी कावेरी गावच्या वेशीजवळ
सापडली. तिने सांगितलं, की वत्सला काळ्या जादूने माणसांचं बहुल्यात रुपांतर करते आणि त्याची
शारीरिक ताकद स्वत: मिळवते. कावेरीने सांगितलेल्या गोष्टीवरून वत्सला काळी जादू
करणारी एक हडळ आहे याची गावकऱ्यांना खात्री पटली...
सर्वांनी वत्सलेच्या घरावर धडक मारली. दोन्ही हातात जळका कोळसा घेऊन वत्सला दारात उभी होती. जख्ख म्हातारी असलेली वत्सला काहीच न बोलता गर्दीकडे पाहत होती. जमावाकडे पाहत असताना वत्सलेला कावेरी दिसली. रागाने वत्सलेचे डोळे लाल झाले. तिने दोन्ही हातातले जळके कोळसे कावेरीवर भिरकावले. वत्सलेच्या हातात ताकद नसल्याने ते कोळसे जवळच पडले. कावेरीपर्यंत ते पोहोचूच शकले नाहीत. कावेरी वाचली, पण जमावाने वत्सलेवर दगडफेक करायला सुरुवात केली. रक्तबंबाळ झालेली वत्सला जमिनीवर कोसळली तसं गावकऱ्यांनी दगडं मारायचं थांबवलं. वत्सला कशीबशी स्वत:च्या जख्मी शरीराला हाताच्या बळावर ओढत घराच्या आत गेली आणि दार लावून घेतलं. कावेरी म्हणाली, "ही बया हडळ आहे. गावात नकोच ही ब्याद. आपण जाळून टाकू हे घर..." गावकऱ्यांना कावेरीचं म्हणणं पटलं आणि सर्वांनी वत्सलेचं घर पेटवून दिलं. ज्वाळा भडकल्या आणि आतून आर्त किंकाळ्यांचा आवाज येऊ लागला. किंकाळ्यांची तीव्रता कमी होत गेली आणि थोड्या वेळात सर्व शांत झालं. गावकरी निघून गेले...
गावकऱ्यांना वाटलं संपलं सगळं. पण तसं नव्हतं. तिथूनच वत्सलेच्या काळ्या जादूला खरी सुरुवात झाली. सर्वात आधी गावातून कावेरी गायब झाली. त्याच सुमारास "कठपुतली" नावाचा सिनेमा आला होता. रतनगढच्या एका मंत्र्यांच्या मुलाला त्यातलं “बोल री कठपुतली..” हे गाणं खूप आवडायचं. त्याच्याकडे असलेल्या ग्रामोफोनमध्ये तो हे गाणं सारखं लावायचा. असं ऐकलं होतं, की कावेरी पुन्हा गायब झाल्यावर काही दिवसांनी तो मंत्र्यांचा पोरगासुद्धा गायब झाला. त्यानंतर त्या जळक्या वाड्यातून हे गाणं ऐकू येऊ लागलं. ज्या ज्या वेळी वत्सलेच्या वाड्यातून हा आवाज यायचा, त्या त्या वेळी गावातली एखादी व्यक्ती गायब असायची. यामागे ती काळी जादू करणारी हडळ वत्सलाच आहे हे लोकांना कळलं. तिच्यापुढे आपला काहीच टिकाव लागणार नाही हे लक्षात येताच वस्ती कमी होऊ लागली. गाव ओसाड पडू लागलं आणि जंगल वाढत गेलं. वत्सलेच्या काळ्या जादूने जंगलावर पकड बसवली. म्हणून म्हणतो साहेब, जंगलाच्या वाटेने जाऊ नका. तिथे गेलेलं कोणीच परत आलं नाही आजवर..."
त्या माणसाचं बोलणं संपलं तसा रजत म्हणाला, "काय राव उगा बाता मारताय... असं कधी असतं का... नाही पण छान गोष्ट आहे. तुम्ही पुस्तक लिहा या गोष्टीवर..." तेवढ्यात आयुषी तिथे आली. दोघांना काऊंटरवर बोलताना पाहून ती संभ्रमात पडली. तिला पाहून विषय बदलत रजत म्हणाला, "किती वेळ आयू... मला वाटलं आज इथेच रहावं लागतंय की काय... बरं चल, आवर आता. मी गाडी काढतो. मॅनेजरदादांनी छान शॉर्टकट सांगितला मला..." इतकं म्हणून रजत बाहेर पडला. बॅग सरसावून आयुषी बाहेर पडू लागली तसा तो मॅनेजर म्हणाला, "मॅडम, मी साहेबांना शॉर्टकट सांगितला खरा, पण तिथून नका जाऊ. काय आहे, तुमच्यासाठी अनोळखी जागा आहे, जंगलातला रस्ता आहे आणि आता दोनेक तासात अंधार पडेल म्हणून म्हणतोय..." हे बोलणं ऐकून आयुषी म्हणाली, "मी सांगत होते रजतला, फ्लाईटने जाउया... पण माझं ऐकेल तर ना... मला पडलेलं कठपुतळीचं स्वप्न त्याला सांगूनही..." तेवढ्यात रजतने हॉर्न वाजवला. बोलणं अर्धवट सोडून आयुषी बाहेर पळाली. तो मॅनेजर स्वत:शीच पुटपुटला, "स्वप्न, कठपुतळी... म्हणजे वत्सला..." पाठमोऱ्या आयुषीकडे पाहत तो मॅनेजर ओरडला, पण तोवर गाडी निघून गेली होती...
गाडी बराच वेळ धावत होती. रजत आणि आयुषी दोघं शांत बसले होते. मॅनेजरने सांगितलेल्या गोष्टीचा विचार करत रजत रस्त्यावर नजर ठेऊन होता तर जंगलाचा विचार करत आयुषी खिडकीबाहेर पाहत होती. गाडी एका तिठ्ठ्यावर आली. गाडीच्या समोर दोन रस्ते दिसत होते. एक रस्ता उजवीकडे वळला होता आणि कच्चा व थोडा खडकाळ होता, तर दुसरा चांगला डांबरी होता आणि डावीकडे गेला होता. रजत व आयुषीने एकमेकांकडे पाहिलं आणि रजतने गाडी डाव्या रस्त्यावर घातली. गाडी थोडंच पुढे गेली होती, की सोसाट्याचा वारा सुरू झाला. अचानक वारा कसा काय, हा प्रश्न दोघांना पडतच होता, की काही अंतरावरचं एक झाड उनमळून गाडीच्या बरोब्बर समोर आणि रस्त्याच्या मधोमध पडलं. झाड पडताना पाहून रजतने कचकन ब्रेक मारला. कर्कश आवाज करत गाडी झाडापासून इंचभर आधी थांबली. दोघंही उतरून ते दृष्य पाहू लागले. झाड चांगलंच मोठं होतं, त्यामुळे ते हलवणं शक्य नव्हतं. झाडाच्या पुढचा रस्ता पूर्ण मोकळा होता. रस्त्याच्या डाव्या बाजूला नाला होता तर उजवीकडे शेतं होती...
रजतकडे पाहत आयुषी म्हणाली, "तरी मी तुला सांगत होते, फ्लाईटने जाउया... पण तुला रोमँटिक ड्राईव्ह हवी होती ना... आता काय करायचं... ना पुढे जाऊ शकत ना मागे... आणि अंधारही पडत चाललाय..." रजत विचार करत असतानाच शेताच्या बाजूला आणि रस्त्यापासून थोड्या अंतरावर त्याला एक कच्चा रस्ता दिसला. रजत आयुषीला म्हणाला, "आयू, आता झालं ते झालं. हा कच्चा रस्ता बघ या मुख्य रस्त्याला पॅरलल जातोय. बहुतेक मुख्य रस्त्याला मिळेल पुढे. जायचं का त्याने..." रस्त्याकडे पाहत आयुषी, "डू वी हॅव एनी अदर ऑप्शन..." असं म्हणत परत गाडीत जाऊन बसली. रजतही मागोमाग गाडीत आला. गाडी थोडी मागे घेत त्याने उजवीकडे वळवली आणि मुख्य रस्त्याच्या थोडं खाली असलेल्या कच्चा रस्त्यावर घातली. रस्ता कच्चा आणि शेतातला असल्याने गाडीचा वेग मंदावला होता. आयुषीने आजूबाजूचं वातावरण पाहिलं आणि रजतला म्हणाली, "रजत, आपण मेन रोडवर होतो तेव्हा तर झाड पडेल इतका वारा होता, आणि आता तर वाऱ्याचा काही जोरच नाही..." रजतलाही ही गोष्ट खटकली. त्याने बाहेर पाहिलं तर मुख्य रस्ता दृष्टीआड झाला होता आणि झाडी वाढत चालली होती...
स्टियरिंग घट्ट धरत नजर समोर ठेऊन रजत म्हणाला, "आयू, आपण तर जंगलाच्या दिशेने चाललोय. पण मी तर गाडी डाव्या बाजूला..." रजत पुढे बोलणार इतक्यात गाडीच्या समोरून काहीतरी गेलं आणि रजतने पुन्हा ब्रेक मारला. समोर बोट दाखवत आयुषी म्हणाली, "रजत, काय होतं ते..." आयुषीकडे वळत रजत म्हणाला, "आयू अगं जंगल आहे हे. एखादं जनावर गेलं असेल. मी आहे ना... वैसे, समा है सुहाना सुहाना..." रजत गाणं म्हणायला लागला तर त्याच्या खांद्यावर चापट मारत आयुषी म्हणाली, "काय रे रजत... अशा वेळीही तुला रोमँस सुचतोय... आधी बाहेर पडू इथून. रोमँससाठी पूर्ण आयुष्य पडलंय..." रजत हसला आणि त्याने किल्ली फिरवली. घरघर झाली पण गाडी सुरू झाली नाही. रजतने एक-दोन वेळा गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला. पण काही उपयोग झाला नाही. शेवटी तो गाडीच्या बाहेर आला. बॉनेटला हात लावताच त्याला चटका बसल्यासारखं झालं. त्याने बॉनेट उघडून आत डोकावलं. मग गाडीत येऊन बसत तो म्हणाला, "गरम झाली आहे गाडी. पाण्याची व्यवस्था करायला हवी..."
रजतने सभोवताली पाहिलं. अंधार वाढत चालला होता. आयुषी काही बोलणार तोच डॅशबोर्डमधून टॉर्च घेऊन, गाडीचं दार उघडून रजत बाहेर पडला आणि डिकीकडे वळला. डिकी उघडून कॅन घेऊन त्याने डिकी बंद केली आणि पुन्हा आयुषीजवळ आला. एकवार सगळीकडे नजर फिरवत रजत म्हणाला, "आयू, अंधार पडतोय. तू गाडीतच बस. आतून गाडी लॉक करून घे. मी कुठे पाणी मिळतंय का बघतो..." आयुषीसुद्धा येण्याचा हट्ट करू लागली. तेव्हा तिला समजावत रजत म्हणाला, "आयू अगं जंगल आहे. वाट हरवताना वेळ नाही लागत जंगलात. तसंच काही झालं, तर तू इथे असशीलच की मला गाईड करायला... शिवाय अंधार आहे. कुठे दगड-धोंड्यात अडकून तुला काही झालं तर..." रजतने अनेक मिनतवाऱ्या केल्यावर आयुषी गाडीत बसायला तयार झाली. रजत कॅन घेऊन चालू लागला. एका झुडुपाजवळ येऊन त्याने मागे पाहिलं. दोघांची नजरानजर झाली. दोघांनी एकमेकांना हात दाखवला आणि रजत झुडुपाआड निघून गेला...
रजत गेल्यावर आयुषीने काचा वरपर्यंत चढवून सर्व दरवाजे आतून लॉक केले. तिने बाहेर नजर फिरवली. सर्वत्त अंधार पसरला होता. गाडीत काय तो दिवा होता. एका क्षणासाठी आयुषीचा थरकाप उडाला. तिने गाडीतले लाईट बंद केले आणि मोबाईलवर गाणी सुरू केली. किशोर कुमारची जुनी गाणी वाजत होती आणि आयुषीने सीटवर डोकं टेकलं. गाणी ऐकताना तिला कधी झोप लागली हे तिचं तिलाही कळलं नाही. काही वेळाने झोपेतच आयुषीला एक बिभत्स चेहेरा दिसला. वेडेवाकडे बाहेर आलेले दात, मोठमोठे लाल डोळे, कापूस पिंजल्यासारखे पांढरेशुभ्र केस, असा तो सुरकुतलेला भयानक चेहेरा आयुषीला दिसला आणि ती दचकून जागी झाली. तिने गाडीतला लाईट लावला आणि सर्वत्र पाहिलं. तो चेहेरा कुठेच नव्हता पण अंधार अजून गडद झाला होता. तिने घड्याळ पाहिलं आणि विचार करू लागली, "रजतला जाऊन बराच वेळ झालाय. अजून कसा परत आला नाही हा... कॉल करू का त्याला..." आयुषीने लगेच रजतला कॉल लावला. बेल वाजत राहिली पण रजतने कॉल नाही घेतला. आयुषीने बरेच कॉल्स केले पण काही उपयोग झाला नाही. आता आयुषीला काळजी वाटू लागली. तिने मनाशी निर्धार केला आणि गाडीतून बाहेर पडली...
अंधार मी म्हणत होता. आयुषीने मोबाईलचा टॉर्च सुरू केला आणि वाटेतल्या दगडांना, खडकांना चुकवत ती पुढे जात होती. तिने वळून पाहिलं, पण अंधाराशिवाय दुसरं काहीच दिसत नव्हतं. आयुषी वळली आणि पुन्हा चालू लागली. वाटेत एका ठिकाणी तिला लाल ठिपका दिसला. तिने जवळ जाऊन पाहिलं, तर ते सिग्रेटचं अर्धवट जळलेलं थोटूक होतं. "म्हणजे मला गाडीत बसवून हा शहाणा इथे सिग्रेट ओढत होता तर... भेटू तर देत, चांगला इंगा दाखवते..." आयुषी स्वत:शीच पुटपुटत होती. थोडं पुढे गेल्यावर वातावरणातला बदल तिला जाणवला. आत्तापर्यंत वाहणारा मंद वारा अचानक स्तब्ध झाला होता. पानांची होत असलेली सळसळ बंद झाली होती. खाली लक्ष देत पुढे जात असतानाच एक कावळा "काव काव" करत आयुषीच्या डोक्याच्या इंचभर वरून निघून गेला. डोक्यावरून हात फिरवत आयुषी खाली बसली आणि जाणाऱ्या कावळ्याकडे पाहू लागली. कावळा ज्या दिशेने गेला तिथे एका इमारतीसारखं काहीतरी दिसत होतं. आयुषी उठली आणि तिने मोबाईल समोर धरला. त्या प्रकाशात ती इमारत बऱ्यापैकी दिसू लागली. तो एक जुनाट, काळकभिन्न वाडा होता...
"या जंगलात हा बंगला... हा तर जळून काळा पडलाय... कोणी राहत असेल का इथे... रजत इथे तर आला नसेल... जाऊन बघावं का..." आयुषीचं विचारचक्र सुरू झालं. ती हळूहळू बंगल्याच्या दिशेने जाऊ लागली. काटेरी कुंपण, लोखंडी गेट, गेटला लावलेलं कुलूप, सगळं जुन्या पद्धतीचं होतं. गेट उघडंच होतं. आयुषी आत गेली. तिथल्या हवेत एक विचित्र वास होता. मुख्य दरवाजा काही पावलांवरच होता. आयुषी पुढे जाणार तोच तिला तिच्या वडिलांचे शब्द आठवले, "कुठल्याही अनोळखी ठिकाणी जायच्या आधी त्या ठिकाणाची जमेल तितकी माहिती करून घ्यावी..." हे शब्द आठवले आणि आयुषी पुढे जायची थांबली. "बंगल्याला सगळ्या बाजूने निरखून मगच आत जावं..." हा विचार मनाशी पक्का करत आयुषी डावीकडे वळली. बंगल्याच्या भिंतीचा आधार घेत, जमिनीवरच्या दगडांपासून वाचत, मोबाईलच्या मंद प्रकाशात आयुषी पुढे जात होती. सगळं काही शांत होतं. एका आवाजाने शांततेचा भंग केला. ते एक हळुवार वाजणारं गाणं होतं, "बोल री कठपुतली डोरी कौन संग बाँधे..."
अचानक आलेल्या या आवाजाने आयुषी दचकली. आधी तिला वाटलं रजतच मस्करी करत असेल. पण ऐकू येणारा आवाज जुनाट होता. जणू ग्रामोफोनमधून येत असावा. आयुषीला लक्षात आलं, की गाणं वाजवणारा रजत नाही. ती आवाजाच्या दिशेने वळलीच होती, की जमिनीवरच्या दगडांवरून घसरून तिचा तोल गेला आणि आयुषी खाली पडली. ती कशीबशी उठत असताना तिच्या हाताला कागदाचा एक तुकडा लागला. आयुषीने तो कागद उचलला आणि मोबाईलच्या प्रकाशात धरला. धूळ भरलेला तो कागदाचा तुकडा खूपच जुना होता. त्यावर अस्पष्ट अशी अक्षरं दिसत होती. आयुषीने धूळ हटवली तशी ती अक्षरं दिसू लागली, "मला भुरळ घालून वत्सला मला इथे घेऊन आली. मी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या मायाजालामधून सुटू शकले नाही. मी एक एक खोली पाहू लागले. एका खोलीत एक विचित्र रिंगण होतं. रिंगणाच्या बाहेर विजलेल्या मेणबत्त्या उभ्या करून ठेवल्या होत्या. कुतुहल म्हणून मी रिंगणात प्रवेश केला, तेवढ्यात......"
तिथे तो कागद फाटलेला होता. आयुषी विचार करू लागली, "कोण वत्सला... कोण अडकलं तिच्या जाळ्यात... कसलं रिंगण..." विचार करत असतानाच आयुषीला एक दार दिसलं. तिने तो कागद पँटच्या खिशात घातला आणि दार चाचपडलं. ते दार उघडंच होतं. आतल्या बाजूला ढकललं गेलं. आत अंधार होता. दारातच खोळंबलेली आयुषी विचार करू लागली, "पुढचं मोठं दार उघडायला गेले तर कदाचित आवाज होईल. हे दार कसलाही आवाज न करता उघडलं. कदाचित रजत असेल आत..." विचार पक्का करत आयुषीने दारातून आत पाऊल ठेवलं. त्यासरशी वाऱ्याची एक थंडगार झुळूक तिच्या दंडाला चाटून दाराबाहेर निघून गेली. आयुषीच्या अंगावर काटा आला. तिने मोबाईल समोर धरला. त्या अंधूक प्रकाशात तिला काहीच स्पष्ट दिसत नव्हतं. एक प्रकारचा दुर्गंध पसरला होता. हा तोच वास होता जो आयुषीला बंगल्याच्या बाहेरही आला होता. आयुषीने नाकावर हात ठेवला आणि पुढे गेली. तिने एक पाऊल पुढे टाकलंच होतं, की तिच्या पायाला काहीतरी लागलं. तिने खाली पाहिलं तर तो रजतचा टॉर्च होता. "म्हणजे रजत इथे आलाय तर... मग गेला कुठे... आणि हा टॉर्च..." विचार करतच आयुषीने मोबाईल खिशात ठेऊन टॉर्च उचलून चालू केला. टॉर्च समोर धरताच आयुषी अवाक झाली...
रजत समोर उभा आयुषीकडे एक टक पाहत होता. पापण्याही न लवता उभ्या असलेल्या रजतकडे पाहून आयुषी त्याच्याकडे धावली. "रजत... रजत अरे कुठे होतास तू... किती नाही नाही ते विचार आले मनात... रजत... अरे बोल ना..." आयुषीच्या या बोलण्याचा रजतवर काहीच परिणाम दिसत नव्हता. निर्विकार चेहेऱ्याने तो आयुषीकडे पाहत होता. तेवढ्यात पुन्हा गाणं ऐकू येऊ लागलं, "बोल री कठपुतली डोरी कौन संग बाँधे..." रजतच्या चेहेऱ्यावर एक गूढ हास्यरेषा उमटली. त्याने हात पुढे केले. आयुषीला वाटलं तो तिला जवळ बोलवत आहे. आयुषी रजतजवळ जाणार इतक्यात तिचं लक्षं त्याच्या हातांकडे गेलं. रजतच्या दोन्ही हातात दोन मोठाल्या झांजा होत्या आणि साखळदंडांनी त्या हातांना बांधल्या होत्या. हे पाहून आयुषी अजून घाबरली. ती पुढे काही बोलणार इतक्यात रजतने त्याचे दोन्ही हात जवळ आणले. झांजा वाजल्या आणि मोठा आवाज आला. आयुषीने पटकन कानांवर हात ठेवले. झांजा वाजत होत्या आणि ध्वनी वाढत होता. कानांवर हात ठेऊनच आयुषी खाली बसली. "तो आता तुझ्या जगातून बाहेर पडला आहे..."
या आवाजाने आयुषी भानावर आली. तिने डोळे उघडले. सभोवताली वातीच्या कंदिलांचा बऱ्यापैकी उजेड पसरला होता. गाणं बंद झालं होतं. रजतने झांजा वाजवणंही बंद केलं होतं. आयुषी उठून उभी राहिली. तिने सगळीकडे पाहिलं तर रजतप्रमाणे इतर अनेक माणसं हातात झांजा घेऊन तिथे विखुरलेली होती. "काय पाहतेस... या सगळ्या माझ्या कठपुतळ्या आहे..." सभोवतालच्या माणसांकडे पाहताना आलेल्या या आवाजाने आयुषी दचकली. तिने आवाजाच्या दिशेने पाहिलं, तर जिन्यावर एक आकृती होती. ती आकृती खाली येऊ लागली. प्रकाशात येताच त्या आकृतीला पाहून आयुषी अजून घाबरली. फाटके-मळके कपडे घातलेली ही तीच होती, जी आयुषीला झोपेत असताना गाडीत दिसली होती. थोडी मागे सरकत आयुषी कशी-बशी म्हणाली, "क...कोण आ...हेस तू... य....या बा...हुल्या..." बिभत्स हसत ती बाई कर्कश आवाजात बोलती झाली, "मी वत्सला... हा वाडा माझा आहे. आणि ही सगळी माझी खेळणी आहेत. मला लहानपणापासूनच बाहुल्यांचा छंद होता. लाकडाच्या नि कापडाच्या बाहुल्यांना दोऱ्या बांधून त्यांना माझ्या तालावर मी नाचवायचे. आई-वडिलांना माझा हा छंद आवडत नव्हता म्हणून त्यांचा त्याग करून मी इथे आले...
इथे हे वन नव्हतं, तर एक समृद्ध गाव होतं. गावाच्या एका
कोनाड्यात मी एक झोपडी बांधली. तिथेच हा कठपुतळ्याचा खेळ दाखवून मी गुजरण
चालवायचे. मला धन मिळत गेलं आणि त्या झोपडीच्या जागी हा वाडा उभा राहिला. लग्नाचा
विचारही मी कधी केला नाही. या बाहुल्याच माझं जग होतं. पण माझ्या या ऐश्वर्याला
दृष्ट लागली. जग बदलत होतं, मानवांच्या आवडी बदलत होत्या. माझ्या कठपुतळ्यांचे खेळ त्यांना आवडेनासे
झाले. माझं महत्व कमी झालं, माझे हाल होऊ लागले. पण या मानवांना काहीच वाटलं नाही त्याचं. मग मी
ठरवलं, मला
दूर लोटणाऱ्या या मानवजातीलाच कठपुतळ्या बनवायचं, आणि मी माझ्या विद्येचा प्रयोग सुरू केला. हो.
मला काळी विद्या अवगत आहे. मी कुठल्याही सजीव किंवा निर्जीव गोष्टीवर मंत्रप्रयोग
करून त्या गोष्टीला माझ्या आधीन करू शकते. वाड्याच्या आस-पासच्या लोकांना वश करून
वाड्यात आणून मी मंत्र म्हणायचे. त्या लोकांचा मानवी देह मग लाकडात परिवर्तीत
व्हायचा आणि त्यांच्या हातात झांजा यायच्या...
मला याच गोष्टीत आनंद मिळू लागला. हळू हळू गाव ओसाड पडू लागलं. मला मिळणारी माणसं कमी होऊ लागली. जंगल वाढू लागलं. नवं खेळणं मिळवण्यासाठी मी दुसऱ्या गावी जाणार होते, पण मला या जंगलाची सीमा ओलांडता आली नाही. मी माझ्या विद्येने याचं कारण जाणलं तेव्हा समजलं, की या विद्येचा पहिला प्रयोग मी ज्या ठिकाणी केला असेल, तेच ठिकाण माझ्या विद्येची सीमा असेल. गावाबाहेरच्या वनात मी या विद्येने पहिलं सावज हेरलं होतं. म्हणून मी या जंगलातच अडकले. त्या वेळी एक माणूस एक यंत्र घेऊन याच जंगलात गाणी ऐकत होता. मला नवं खेळणं मिळालं. मी त्या माणसाला माझ्या विद्येने भुरळ घालून वाड्यावर बोलवलं. या यंत्रात वाजणारं, "बोल री कठपुतली..." हे गाणं मला फार आवडलं. त्या माणसाची कठपुतळी केल्यावर मी या यंत्रावरही प्रयोग केला. आता हे यंत्रच माझ्यासाठी सावज शोधून आणतं. ते गाणं ऐकताच मनुष्य चुंबकासारखा वाड्याकडे खेचत येतो आणि माझं खेळणं बनतो. तुझा हा मित्र वाड्यावर आला तेव्हा मी मंत्र म्हणण्यात दंग होते. तो आत आल्याचं मला कळलंही नाही. त्याच्या जवळ असलेलं एक यंत्र आवाज करू लागलं तेव्हा मला समजलं...
आयुषीने विचार केला, "म्हणजे मी जेव्हा रजतला कॉल केलं तेव्हा तो इथे होता तर... आणि माझ्या कॉलमुळेच हिचं लक्ष... सॉरी रजत..." आयुषीचे विचार भंगले ते वत्सलेच्या बोलण्याने, "तो आवाज ऐकला आणि मी इथे आले. हा तुझा साथिदार आयताच माझ्या तावडीत सापडला. आता हा तुझा साथिदार नाही. आता हे माझं खेळणं आहे. या सगळ्या खेळण्यांप्रमाणे. ते गाणं वाजलं ना, की हा तुझा मित्र हसतो आणि झांजा वाजवू लागतो. पण तू घाबरू नकोस. तुला मी खेळणं बनवणार नाही. तू तर माझा तिसरा पुनर्जन्म आहेस..." आयुषीला हे वाक्य समजलं नाही. ती कशीबशी म्हणाली, "तिस...रा पुनर्जन्म... म्ह....णजे..." आयुषीचं हे वाक्य ऐकून वत्सला किळसवाणी हसत म्हणाली, "हा...हा...हा... मी आत्ता दिसते ते तर हे शरीर आहे. माझं वय त्याहून अधिक आहे. मी जेव्हा ही काळी विद्या ग्रहण केली तेव्हा परकाया प्रवेश करण्याचीही विद्या मला प्राप्त झाली. पण तो मंत्र मी आयुष्यात एकदाच वापरू शकणार होते. काळी विद्या, कठपुतळ्यांचे खेळ यांसोबत मी मोठी झाले. अनेक वर्षांपूर्वी मी शंभरी गाठली. माझ्या शरीराची मर्यादा तेवढीच असल्याने मला तो देह सोडावा लागणार होता. दुसऱ्या शरीराच्या शोधात असतानाच जंगलात बागडणारी कावेरी माझ्या दृष्टीस पडली..."
वत्सला बोलत असतानाच तिने एका ठिकाणी पाहिलं. आयुषीने वत्सला पाहत असलेल्या दिशेला पाहिलं. अचानक प्रखर प्रकाशाने तिचे डोळे दिपले. आयुषीने लगेच डोळ्यांवर हात ठेवला. हळूहळू प्रकाश कमी झाला तसे आयुषीने डोळे उघडले. वाड्याच्या भिंती गायब होऊन समोर घनदाट जंगल दिसू लागलं. भूतकाळातली ती घटना आयुषीसमोर प्रत्यक्ष उभी राहिली...
घनदाट जंगलात कावेरी बागडत होती. फुलांचा सुगंध घेत, फळांचा आस्वाद घेत, झाडांच्या फांद्यांना लोंकळत कावेरी स्वत:चा जीव रमवत होती. कावेरीचे हे खेळ सुरू असताना एका वृक्षामागून वत्सला तिला पाहत होती. वत्सलेच्या पाश्वी डोळ्यात एक क्रूर आनंद दिसत होता. वत्सला विचार करू लागली, "चुणचुणीत दिसते ही मुलगी. हा देह बदलायची वेळ जवळ येते काय आणि ही मुलगी मला दिसते काय... वाह वेताळा, तूच आहेस रे सोबतीला... या मुलीला कसंही वाड्यात न्यायला हवं..." विचार करता करता वत्सलेला एक युक्ती सुचली. कावेरीची पाठ दिसताच वत्सला झाडामागून बाहेर आली आणि कावेरीच्या दिशेने चालू लागली. कावेरीने वळून पाहताच वत्सला जमिनीवर कोसळली आणि त्याच अवस्थेत रडू लागली, "आई आई गं... माझं मेलीचं नशीबच फुटकं... या वयात आता हा पाय पण मुरगळला... आता कशी जाऊ मी परत..." पडलेल्या बाईचं विव्हळणं पाहून कावेरी धावत तिच्याजवळ गेली. जमिनीवर बसत ती म्हणाली, "आजी, तुला लागलं का... मी मदत करू का..." वत्सलेच्या डोळ्यात एक चमक आली. तिने विचारलं, "काय नाव तुझं मुली... आणि इथे या वनात काय करतेस..." वत्सलेला आधार देऊन उठवताना कावेरी म्हणाली, "मी कावेरी. माझे आई आणि बाबा जंगलात लाकडं तोडून त्याच्या मोळ्या विकत. रोज ते दोघंच यायचे पण महिन्याभरापूर्वी ते दोघं अचानक गायब झाले. म्हणून आज मी आले... पण तुम्ही कोण..."
कावेरीच्या खांद्याचा आधार घेत वत्सला म्हणाली, "माझं नाव वत्सला. इथून जवळच असलेल्या वाड्यात राहते. काढा करावा म्हणून वनस्पती गोळा करायला आले तर पाय घसरून पडले..." कावेरीने वत्सलेला आधार दिला आणि दोघी वाड्याच्या दिशेने चालू लागल्या. थोड्याच वेळात दोघी वाड्यावर पोहोचल्या. आत आल्या-आल्याच वत्सलेने कावेरीच्या खांद्यावरचा हात काढला आणि, "बाळ कावेरी, मी जरा आलेच बरं का..." असं म्हणून वत्सला आतल्या खोलीत निघून गेली. खोलीच्या दाराआडून वत्सलेने कावेरीला पाहिलं. कावेरी तिथेच घुटमळत होती. वत्सलेच्या चेहेऱ्यावर एक गूढ हसू आलं. दाराआडूनच कावेरीला पाहताना वत्सला विचार करू लागली, "हिला वरच्या खोलीत नेण्याचा काहीतरी उपाय करायला हवा. ही स्वइच्छेने त्या रिंगणात गेली तरच माझी विद्या फळाला येईल..." विचार करत असताना वत्सलेने पाहिलं, तर कावेरी दोन कठपुतळ्यांना आई-बाबा म्हणत होती. दाराआडून बाहेर येत वत्सला म्हणाली, "ते तुझे आई-बाबा नाहीत हो... आता ती माझी खेळणी आहेत... बघायचं आहे तुला..." बोलता बोलता वत्सलेने तिच्या कमरेला लटकवलेल्या बटव्यातून काळी माती काढली. मंत्र म्हणून तिने ती माती तिथल्या पुतळ्यांवर टाकली. पुतळ्यांचे डोळे अधिक विस्फारले. त्यांच्या चेहेऱ्यावरचं हसू अधिक मोठं झालं. त्या पुतळ्यांनी हात पुढे केले. त्यांच्या हातात मोठमोठ्या झांजा होत्या आणि हात साखळदंडांनी जखडलेले होते...
वत्सलेने पुन्हा मंत्र म्हटला आणि तिथल्या सर्व बाहुल्या त्यांच्या हातातल्या झांजा वाजवू लागल्या. कानठळ्या बसणारा तो आवाज ऐकून कावेरीने कानावर हात ठेवले आणि डोळे घट्ट बंद करून घेतले. वत्सलेच्या डोळ्यात एक विकृत चमक होती. तिने चेहेऱ्यावर हसू आणत पुन्हा मंत्र म्हटला. त्याबरोब्बर सर्व बाहुल्या स्तब्ध झाल्या. त्यांच्या चेहेऱ्यावरचं हसू कमी होऊन ते पुन्हा निर्विकार दिसू लागले. आवाज बंद होताच कावेरीने डोळे उघडून कानांवरचे हात काढले. तिने पाहिलं तर सर्व बाहुल्या त्यांच्या त्यांच्या जागी हात खाली करून उभ्या होत्या. कावेरी घाबरली आणि त्याच नजरेने वत्सलेकडे पाहू लागली. वत्सला म्हणाली, "ही सर्व माझी खेळणी. मला हवं त्यावेळी मी यांच्याशी खेळते. आणि बरं का, यांचा हा आवाज या वाड्याबाहेर नाही जात. म्हणून बाहेर कोणालाच काही कळत नाही. फक्त मी एकमेवच आहे जी या वाड्याच्या आत-बाहेर करू शकते. या बाहुल्यांमध्ये चेतना नसली तरी मानवी शरीराचे सर्व गुणधर्म आहेत. म्हणून या बाहुल्या आपोआप वृद्ध होऊन भस्मसात होतात. मग मी नवी खेळणी आणते. तुझे आई-वडिल पण असेच आले इथे. आणि आता तू..."
हे ऐकून कावेरी अजून घाबरली आणि दोन पावलं मागे सरकली. तिला पाहून वत्सला अजून खुश झाली. थोडी पुढे सरकत ती म्हणाली, "कावेरी, तू घाबरू नकोस... मी तुला काहीच करणार नाही. तू तर माझा दुसरा पुनर्जन्म......." बोलता बोलता वत्सला थबकली आणि म्हणाली, "तू तर मला सोबत केलीस. त्या वनातून इथे यायला मदत केलीस... त्याबद्दल मी तुला काही करणार नाही. या वाड्यातून बाहेर पडण्याचा मार्ग याच वाड्यात आहे. मी आता मंत्र म्हणायला बसणार आहे. त्या आधी तू तो मार्ग शोधलास तरच तू मुक्त होशील. नाही तर... हा...हा...हा..." बिभत्स हसणारी वत्सला काळ्या धुरासह गायब झाली. वत्सला तिच्या खोलीत त्याच धुरासह प्रकट झाली. तिने एकवार दाराआडून बाहेर पाहिलं, तर कावेरी वाडाभर नजर फिरवत हळू-हळू पुढे जात होती. तिला पाहून वत्सला कुत्सित हसली आणि अनुष्ठानाच्या जागी जाऊन बसली. "काय सांगत होते मी त्या पोरीला... तिला इथे आणण्याचं खरं कारण तिला समजलं असतं तर... माझ्या वेळीच लक्षात आलं म्हणून बरं... आता या पोरीचा त्या खोलीत जाण्याचा अवकाश... ती स्वत:हून त्या रिंगणात गेली की..." असं स्वत:शीच पुटपुटून वत्सला गूढ हसली आणि हातात काळी माती घेऊन डोळे मिटून तिने मंत्र म्हणायला सुरुवात केली...
दुसरा व अंतिम भाग लवकरच...
.jpeg)


No comments:
Post a Comment