#HBD_Bombay_Duck...
"Shot... what a square cut to complete his maiden test century... He now becomes the seventh Indian cricketer to score a century at Lord's..." या वाक्यातला 'He' म्हणजे भारताचा मध्यम-जलदगती गोलंदाज व फलंदाज, अजित भालचंद्र आघरकर...
अजित आघरकरला अजून एका नावाने ओळखलं जातं. ते नाव आहे "Bombay Duck." १९९९-२०००च्या हंगामात जेव्हा भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होता, तेव्हा सलग पाच वेळा शून्यावर बाद होण्याचा अनोखा विक्रम अजितच्या नावे आला. त्या पाचपैकी चार वेळा तर तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला. याच कारणासाठी अजितला 'Bombay Duck' हे टोपणनाव मिळालं...
"याला काही फलंदाजी जमणार नाही..." असं म्हणणाऱ्यांची तोंडं बंद झाली, जेव्हा क्रिकेटची मक्का म्हणवणाऱ्या Lord'sवर, २००२साली अजित आघरकरने इंग्लंडच्या वेगवान आणि फिरकी माऱ्याचा समाचार घेत, दिमाखदार शतक झळकवत, नाबाद १०९ धावा फटकावल्या. भारतीय संघ तो कसोटी सामना हरला, पण अजित आघरकरची ती जिगदबाज खेळी त्या पराभवाला झाकोळून गेली...
अजितने गोलंदाजीतही असाच पराक्रम, २००३साली ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटीत, 'Adelaide Oval'वर दाखवला. ज्या ऑस्ट्रेलियाने एकेकाळी अजितला सळो की पळो करून सोडलं होतं, अजितने त्याच ऑस्ट्रेलियाची त्याच्या धारदार माऱ्याच्या जोरावर दाणादाण उडवत, एक्केचाळीस धावात सहा बळी मिळवले आणि भारतीय संघाला ऐतिहासिक विजयाच्या समीप नेलं. आपल्या फलंदाजांनी विजयश्री मिळवली आणि वीस वर्षांची भारतीय संघाची पराभवाची मालिका खंडीत केली. त्या सामन्याचा सामनावीर जरी राहुल द्रविड असला, तरी त्यानेही त्या वेळी मान्य केलं होतं, की या ऐतिहासिक विजयाचा खरा पाया रचला तो अजित आघरकरने...
कसोटीपाठोपाठ एकदिवसीय सामन्यातही अजितने त्याचं अष्टपैलूत्व सिद्ध केलं. १९९८ साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिला सामना खेळणाऱ्या या वीस वर्षाच्या अजितने न्यूझीलंड विरुद्धच्या लगेचच्या सामन्यात चार बळी मिळवत सामनावीराचा मानही पटकावला. एकदिवसीय सामन्यात भारतातर्फे सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांमध्ये अजित तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. गोलंदाजीसोबतच फलंदाजीतही अजितने काही चांगल्या खेळी केल्या आहेत. २००० साली झिम्बाब्वेविरुद्ध अजितने २५ चेंडूत चोपलेल्या नाबाद ६७ धावांची खेळी कोण विसरेल...
अजितची ऊंची इतकी नसली तरी त्याच्या गोलंदाजीत स्विंग आणि वेग होता. त्या काळातल्या ब्रेट ली, मॅथ्यू हॉगार्ड, शोएब अख़तर, ऍलन डॉनल्ड अशा ऊंचपुऱ्या आणि धिप्पाड गोलंदाजांसोबत अजित आघरकरचीही वर्णी लागायची. जवगल श्रीनाथसोबत अजित एक चांगली जोडी जमवेल असं सर्वांनाच वाटायचं. पण सततच्या दुखापतींमुळे आणि झहीर ख़ान, आशीष नेहरा, इरफ़ान पठाण यांच्या उगमामुळे अजितच्या कारकीर्दीला धक्का बसला...
कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसोबतच T20 या छोटेखानी प्रकारातही अजितने हात आजमावला. दिल्ली डेयर डेव्हिल्स आणि कोलकाता नाईट या संघांतर्फे अजित IPLमध्ये तर खेळलाच, पण २००७च्या ICC T20 विश्वचषक जिंकलेल्या भरतीय संघातही तो होता. या वेगवान अष्टपैलू गोलंदाजाला त्या छोटेखानी वेगवान प्रकारात फारसं यश मिळालं नाही. वाढणारी स्पर्धा आणि सततची शारीरिक दुखणी यांच्याशी जुळवून घेत अजितने २०१३मध्ये क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती घेतली...
आज ४ डिसेंबर. आज अजित आघरकरचा वाढदिवस. या अष्टपैलू वेगवान गोलंदाजाला वाढदिवसाच्या स्विंगमय शुभेच्छा...
Happy Birthday 'Bombay Duck...'
@ अनिकेत परशुराम आपटे.
.jpeg)
.jpeg)


No comments:
Post a Comment