गुणी जन हो... एका अभिनव कार्यक्रमाच्या निवेदनात ऐकलेला हा शब्द अगदी मनात भरला. तर गुणी जनहो, अभंग या काव्यप्रकारावर अनेक कार्यक्रम झालेत. त्यातलाच एक, पण तरीही थोडासा वेगळा कार्यक्रम आहे, 'नृत्यसंस्कार' कृत आणि 'तालीम' प्रस्तुत "अभंग गाथा..."
नाव ऐकताच आपल्यासमोर येते रंगमंचावर मधोमध मांडलेली एक बैठक. बैठकीवर एका बाजूला टाळ, पखवाज, तबला, पेटी अशी वाद्य घेऊन बसलेली वादक मंडळी आणि शेजारी थोर संतांनी रचलेल्या रचना सादर करणारे गायक व गायिका. एकेक रचना सादर होत जाते आणि रसिकजनांचे कान तृप्त होतात. याही कार्यक्रमाचं असंच स्वरूप होतं. पण कार्यक्रमाचं वेगळेपण अधोरेखित झालं कार्यक्रमात सादर झालेल्या चौथ्या कलेमुळे...
'नृत्यसंस्कार' कृत आणि 'तालीम' प्रस्तुत "अभंग गाथा" या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण होतं, 'नृत्यसंस्कार' या कथक नृत्यसंस्थेच्या संचालिका, श्रीमती राजश्री ओक आणि त्यांच्या विद्यार्थी भगिनींनी अभंगांवर सादर केलेले कथकचे नृत्याविष्कार. खरंतर अभंग आणि नृत्य हा मेळ दुर्मिळच. पण ही कल्पना रंगमंचावर सादर करण्याचं शिवधनुष्य श्री. सिद्धेश कामत, श्रीमती राजश्री ओक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लीलया पेललं...
कुठल्याही कार्यक्रमाची नांदी किंवा सुरुवात आपण गणेशवंदनेने करतो. याही वेळी तसंच झालं. "ओम नमो जी आद्या..." या रचनेवर नृत्य सादर करताना नृत्य-भगिनींनी अप्रतीम अशी गणेशमूर्ती साकारली आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. मिताली प्रभू आणि स्वप्नील परांजपे यांच्या स्वरात गायलेल्या अनेक अभंग रचना आणि त्यांना साजेसे नृत्याविष्कार सादर होत गेले आणि कार्यक्रमाची ऊंची वाढत गेली...
"येई ओ विठ्ठलें..." या रचनेत दिसलेले बालकृष्णाचे रूप असो किंवा "अबीर गुलाल..." या रचनेदर्म्यान घडलेले विठ्ठल-रखुमाईचे दर्शन असो. "माझी रेणुका माऊली..." या अभंग रचनेद्वारे समोर आलेल्या कालीमाता आणि दुर्गामाता असो किंवा "श्रीरंगा कमलाकांता..." या रचनेत सादर झालेले श्रीकृष्ण आणि गोपिकेचे खेळ असो... प्रत्येक नृत्यविष्कारात एखादी कथा किंवा कथेनुरूप एखादा प्रसंग साकारत राहिले...
अभंग रचना आणि नृत्याविष्कार यांच्यासोबतच स्वानंद मुळ्ये, शशांक प्रभू, अथर्व कार्लेकर आणि स्वप्नील परांजपे या वादक मंडळींनीही कमाल केली. टाळ, पेटी, तबला आणि पखवाज यांची अफाट जुगलबंदी सादर करत, कार्यक्रमात त्यांनी एक वेगळीच रंगत आणली. एका मागून एक गायल्या गेलेल्या अभंग रचना, त्या रचनांना सालंकृत करणारी वाद्य, रचनांच्या ओळींमध्ये येणारे पढंत आणि या सर्वांसोबत सादर झालेले नृत्याविष्कार, या सर्वांचं समीकरण इतकं सुंदर होतं, की कान, डोळे आणि मन तीन्हीही तृप्त झाले...
'दर्जेदार कलाकृती' असा उल्लेख होऊ शकणारा 'नृत्यसंस्कार' कृत आणि 'तालीम' प्रस्तुत "अभंग गाथा" हा कार्यक्रम निश्चितच एक अभिनव कल्पना आहे. विविध अभंग रचना आणि त्यांवर सादर होणाऱ्या नृत्याविष्कारांच्या या कार्यक्रमाचे अनेक प्रयोग व्हावेत हीच माऊली चरणी प्रर्थना...
@ अनिकेत परशुराम आपटे.
No comments:
Post a Comment