पहिला भाग...
दुपारचे चार वाजले होते. जुना मुंबई-पुणे महा-मार्ग. घाट नुकताच सुरू झाला
होता. निळ्या रंगाची क्रेटा रस्त्यावरून चालली होती. अनूप गाडी चालवत होता आणि
त्याची बायको रश्मी बाजूला बसली होती. "अनूप, घाट सुरू झाला आहे. जरा हळू..." रश्मीच्या या बोलण्यावर अनूप हसला आणि
नजर समोर ठेवतच म्हणाला, "तू पण एक नंबरची भित्री
आहेस. लग्नाआधी बाईक फास्ट चालवतो म्हणून मला हैराण करायचीस. आता गाडी घेतली तरीही
तेच. बरं बाई, हळू चालवतो बस..."
दोघांचा संवाद सुरू असताना एक पांढरी इनोव्हा गाडी भरधाव वेगाने अनूप-रश्मीच्या
गाडीला जवळ-जवळ खेटून गेली...
अचानक गाडी क्रॉस झाल्याने अनुपचा कंट्रोल सुटला. पण लगेच स्थिर होत अनुपने
गेयर बदलला आणि त्या इनोव्हामागे जाऊ लागला. थोडी मोकळी जागा पाहून अनुपने इनोव्हाला
ओव्हर्टेक केलं आणि आपली गाडी जवळ नेत इनोव्हा बाजूला दाबली. एकदम जवळ आलेली गाडी
पाहून इनोव्हावाल्याने गाडी वळवली आणि ब्रेक मारला. रस्त्याच्या बाजूला असलेल्या
रेलिंगला गाडी धडकली आणि थांबली. इनोव्हाचा ड्रायव्हर खाली उतरला तसा, रश्मीकडे पाहत, "तू इथेच थांब..." असं म्हणून, अनुपही बाहेर आला. तो इनोव्हाचा ड्रायव्हर थोडा लुकडा-सुकडाच होता. अनुपने
लगेच त्याच्या कॉलरला हात घातला...
दोघांची बाचा-बाची, धक्का-बुक्की सुरू झाली
तशी रश्मी बाहेर आली. काही प्रवासी आपापल्या गाड्या थांबवून तिथे जमू लागले. गर्दी
वाढत गेली. एक पोलिस मोबाईल व्हॅन तिथून जात होती. गर्दी पाहून व्हॅन थांबली आणि
दोन गणवेषधारी बाहेर पडले. गर्दीला बाजूला सारत, अनुप, रश्मी आणि ड्रायव्हर जिथे
होते, तिथे ते दोघं आले. तो ड्रायव्हर निसटण्याचा प्रयत्न करत होता. रश्मी अनुपला
मागे खेचत होती पण अनुपने त्या ड्रायव्हरची कॉलर घट्ट धरून ठेवली होती. "काय
रे... काय गडबड आहे..." हा आवाज येताच अनुपची पकड सैल झाली. अनुपच्या हाताला
झटका देऊन तो ड्रायव्हर रश्मीला बाजूला सारत सटकू लागला पण त्या गणवेषधाऱ्यांपैकी
एकाने त्याला पकडलं...
"काय रे कुठे पळतोस... काय
चाललंय इथे..." ड्रायव्हरला पकडलेल्या हवालदाराने हा सवाल केला आणि
ड्रायव्हरने काही बोलायच्या आधी अनुपच सुरू झाला, "साहेब, हा रॅश ड्रायव्हिंग करत
होता. माझ्या गाडीला जवळ-जवळ धडक दिली याने. याला थांबवून मी जाब विचारला तर हा
हमरी-तुमरीवर आला. पळून जायचा प्रयत्न करू लागला. म्हणून मी याला धरलं..." हे
ऐकून मोठे डोळे करत तो हवालदार म्हणाला, "काय रे, नाव काय तुझं... हे
सांगतात ते खरं आहे का... तुझ्याकडे पाहून, ही गाडी तुझी असावी असं
वाटत नाही..." बोलता बोलता हवालदाराने त्या ड्रायव्हरच्या मानेला झटका दिला.
तसा हात जोडून तो ड्रायव्हर म्हणाला, "साहेब, मी बाबू. जरा घाईत होतो म्हणून चूक झाली. परत नाही करणार साहेब..." तो
हवालदार आपल्या साथिदाराकडे पाहत म्हणाला, "सोनटक्के, जरा गाडी चेक कर... मला तर काहीतरी गडबड वाटते..."
हवालदार सोनटक्के गाडी चेक करू लागला आणि काही क्षणातच त्याने आवाज दिला, "सावंत, इकडे या लवकर..." हे ऐकताच सावंतने बाबूची गचांडी धरली आणि इनोव्हाच्या
मागच्या बाजूला गेला. रश्मी, अनुप आणि इतर बघेही होतेच बरोबर. मागे पोहोचल्यावर सोनटक्के म्हणाला, "सावंत, गाडीची डिक्की उघडी आहे. आत काय आहे ते बघा जरा..." सावंतने बाबूला सोनटक्केच्या
हाती दिलं आणि गाडीकडे वळला. मागचा भाग अर्धवट उघडा होता. सावंतने दार वर करून लॉक
केलं. आत पाहताच सर्वांना धक्का बसला आणि रश्मी जोरात किंचाळली. आत एक बोरी होती.
बोरीच्या आस-पास लाल रंगाचा पदार्थ होता आणि बोरीच्या एका भागातून एक हात बाहेर
आलेला दिसत होता...
थोड्याच वेळात तिथे एक जीप येऊन थांबली. सीनियर इन्स्पेक्टर प्रधान,
सब-इन्स्पेक्टर उमा, सब-इन्स्पेक्टर सचिन आणि इन्स्पेक्टर आनंद जीपमधून उतरले.
सर्वजण इनोव्हापर्यंत पोहोचले. प्रधानांना पाहून सोनटक्केने सलाम ठोकला आणि
सावंतने त्यांना अभिवादन केलं. मान हलवत प्रधान म्हणाले, “काय झालं इथे...” बाबूला
सोनटक्केच्या ताब्यात देऊन पुढे येत सावंत म्हणाला, “सर, मी सावंत. आणि हा
सोनटक्के. आम्ही मोबाईल व्हॅनने या रस्त्यावर गस्त घालतो. खोपोली ते लोणावळा अशी
आमची ड्यूटी आहे. आत्ता खोपोलीकडे जाताना आम्हाला ही गर्दी दिसली...” सावंतचं
म्हणणं पुढे नेत सोनटक्के म्हणाला, “होय सर. आम्ही इथे आलो तर हे नवरा-बायको या
बाबूशी भांडत होते. आम्हाला बाबूचा संशय आला म्हणून आम्ही गाडी तपासली तर हे प्रेत
सापडलं. सर ही गाडी कोणी अनिता
चौधरीच्या नावावर आहे...”
तपास सुरू झाला. प्रधान गर्दीशी संवाद साधू लागले. उमा रश्मी आणि अनुपकडे
वळली, सचिन इनोव्हा चेक करू लागला तर आनंद बोरी तपासत होता. बोरी ज्या बाजूने उघडी
होती, त्याच बाजूने हात बाहेर आला होता. आनंदने बोरीचं तोंड उघडलं तसं आतून एक
प्रेत बाहेर पडलं. ते प्रेत रक्ताने पूर्ण माखलं होतं. प्रेत पाहून रश्मीला भोवळ
आली. उमाने तिला तिच्या गाडीपर्यंत नेलं. आत बसवून तिला पाणी देत विचारलं, “आर यू
ओके...” रश्मीने मानेनेच होकार दिला. गर्दीकडे पाहत प्रधान म्हणाले, “हे पहा, ही
पोलिस केस आहे. तुम्ही सर्व जरा लांब उभे रहा...” बॉडी पाहून मग गाडीकडे पाहत
आनंदने बाबूची गचांडी धरली. त्याला हलवत आनंद म्हणाला, “बाबू नाव तर तुझं. या
इनोव्हाचा आणि तुझा काही मेळ बसत नाही. खरं सांग काय भानगड आहे. कोणाचं आहे ते
प्रेत...” बाबू काही बोलत नाही म्हटल्यावर सचिन पुढे झाला आणि हात उगारून म्हणाला,
“बाबू, बऱ्याबोलाने सांग नाहीतर...”
बाबू थोडा घाबरला आणि बोलता झाला, “मारू नका साहेब. मी सगळं सांगतो. मी
बाबू. खोपोली ते लोणावळा या भागातल्या पेट्रोल पंपांवर येणाऱ्या गाड्या चोरण्याचं
माझं काम आहे. घाटाच्या सुरुवातीला असलेल्या पंपावर ही इनोव्हा मला दिसली. पेट्रोल
भरलं जात असताना गाडीतला ड्रायव्हर उतरून टॉयलेटच्या दिशेने गेला. संधी साधून मी
गाडी पळवली. कोणी मागे येईल या भीतीने मी फास्ट चालवत होतो. मला तर माहीतच नव्हतं,
की गाडीत हे......” बाबू गप्प झाला. सचिन म्हणाला, “गाडीचा ड्रायव्हर... पण गाडी
तर अनिता चौधरीच्या नावावर आहे...” प्रधान पुढे येत म्हणाले, “आनंद, सचिन, या
बाबूला घेऊन घाटाजवळच्या पंपावर जाऊन चौकशी करा. अँड कीप मी पोस्टेड...”
सोनटक्के आणि सावंतकडे पाहत प्रधान म्हणाले, “ही केस आता आम्ही ताब्यात
घेतो. तुम्ही खूप चांगलं काम केलंत. मी हे नक्कीच लक्षात ठेवेन... अजून एक करा.
तुमच्यापैकी एक जण इथे थांबा. ही इनोव्हा आणि ही बॉडी घेऊन जायला आम्हाला मदत
होईल...” बाबूला घेऊन आनंद आणि सचिन त्याच मोबाईल व्हॅन मधून सावंतसोबत पेट्रोलपंपाकडे
रवाना झाले. सोनटक्के मात्र लॅबचा पत्ता घेऊन इनोव्हा आणि बॉडी डॉ. गोखलेंकडे घेऊन
गेला. अनुपकडे येत उमा म्हणाली, “मि. अनुप, दुसऱ्याने चुकीची गाडी चालवली म्हणून
आपण संयम सोडायचा नसतो. आपल्यावर अवलंबून किंवा आपल्यावर प्रेम करणारी माणसं आहेत
हे ध्यानात असू दे...” अनुपने मानेने समर्थन दर्शवलं. अनुप आणि रश्मीचे फोन नंबर्स
आणि दोघांचा पत्ता उमाने डायरीमध्ये लिहून घेतला. अनुपजवळ येत प्रधान म्हणाले, “मि.
अनुप, आत्ता आम्ही तुम्हाला अडवणार नाही. पण गरज भासलीच, तर तुम्हाला बोलावून घेऊ.
आता तुम्ही जाऊ शकता...” क्रेटा तिच्या दिशेने निघून गेल्यावर उमाकडे वळत प्रधान
म्हणाले, “उमा, या पेपर्सवर अनिता चौधरीचा पत्ता आहे. लेट्स गो अँड मीट हर...”
जीप एका घराजवळ थांबली. गेटवर एक पाटी होती ज्यावर लिहिलं होतं, “चौधरी
भवन.” उमा आणि प्रधान दाराजवळ आले. दार आतून बंद होतं. बेल वाजताच एका माणसाने दार
उघडलं. पुढे होत उमा म्हणाली, "मी सब इंस्पेक्टर उमा आणि
हे सीनियर इन्स्पेक्टर प्रधान. आम्हाला तुमच्या..." उमा पुढे काही बोलणार
इतक्यात आतून आवाज आला, "जयेश... कोण आहे रे...???" हे वाक्य बोलत एक मुलगी बाहेर आली. तिच्याकडे पाहत उमाने
विचारलं, "या..." तो माणूस
म्हणाला, "ही अनिता चौधरी. माझी
बायको. आणि मी जयेश चौधरी... अनिता, दोघं पोलिस आहेत. पण तुम्ही इथे..." यावर
उमा म्हणाली, “आम्हाला तुमच्या गाडीबद्दल बोलायचं आहे. एम.एच. ०२ के ५३२४ ही
इनोव्हा तुमची आहे का...” या प्रश्नावर जयेशने होकारार्थी मान हलवली. अनिता
म्हणाली, “हो. माझ्याच नावावर आहे ती गाडी. पण ते तुम्हाला कसं माहीत... नाही
म्हणजे गाडी तर बाहेरच उभी आहे...” अनिताकडे पाहत प्रधान म्हणाले, “गाडी बाहेर उभी
आहे... मिसेस अनिता, तुमची गाडी आम्हाला मुंबई-पुणे हायवेवर मिळाली आहे आणि त्यात
एक डेड बॉडी सापडली आहे...”
हे ऐकताच अनिता आणि जयेश दोघांनाही आश्चर्य वाटलं. जयेश म्हणाला, “कसं शक्य
आहे... गाडी तर बाहेर आहे...” बोलता बोलता जयेश घराबाहेर पडला. अनिता, उमा आणि
प्रधान जयेशच्या मागून घराबाहेर पडले. जयेश गॅरेजकडे वळला. तिथे गाडी नाही हे
पाहून तो चपापला. अनिताकडे पाहत जयेश म्हणाला, “अनिता, अगं गाडी कुठे गेली... काल
संध्याकाळपर्यंत तर इथेच होती...” जयेशकडे संशयाने पाहत उमा म्हणाली, “म्हणजे,
गॅरेजमधून, तुमच्या घरासमोरून गाडी गायब झाली आणि तुम्हाला माहीतही नाही...”
उमाच्या या प्रश्नावर अनिता म्हणाली, “मॅडम, काल संध्याकाळी आम्ही पिक्चरला गेलो
होतो. ट्रॅफिक टाळायला आम्ही जयेशची बाईक घेऊन गेलो. तेव्हा तर गाडी इथेच होती...”
प्रधान आणि उमाने एकमेकांकडे पाहिलं. प्रधान म्हणाले, “ठीक आहे मि. जयेश, तुर्तास
तरी आम्ही निघतो. तुमची गाडी आमच्याकडे आहे. ती तुम्हाला लवकरच मिळेल...”
उमा आणि प्रधान लॅबकडे निघाले. उमा म्हणाली, “म्हणजे खुन्याने अनिताची गाडी
पळवली. मग खून केला. मग बॉडी त्याच गाडीच्या डिक्कीत एका बोरीमध्ये ठेऊन गाडी
घाटाच्या दिशेने घेऊन गेला... साऊंड्स वियर्ड... ” उमाला उत्तर देत प्रधान
म्हणाले, “चौधरी भवनवर कोणी वॉचमॅन नव्हता. जयेश आणि अनिता दोघंही घरात नव्हती.
अशा परिस्थितीत गाडी पळवणं सहज शक्य आहे. पण त्याने चावी कुठून मिळवली असेल...
उमा, जयेशला कॉल कर आणि चावीबद्दल विचार...” उमाने जयेशला फोन केला. थोडा वेळ
बोलणं झाल्यावर फोन ठेऊन उमा म्हणाली, “सर, जयेशचं म्हणणं आहे, तो गाडीची एक चावी
गाडीच्या डॅशबोर्डमध्ये ठेवतो. त्या खुन्याने याच गोष्टीचा फायदा उचलला असावा. पण
सर, डॅशबोर्ड म्हणजे गाडीच्या आत. मग दार कसं उघडलं असेल...” उमाला उत्तर देत
प्रधान म्हणाले, “खिडकीची काच जरा जारी खाली असेल तर दार उघडता येऊ शकतं. मग कुत्सित हसत प्रधान म्हणाले, “रिकामं घर, गाडीच्या
डॅशबोर्डमध्ये चावी, हे म्हणजे गुन्ह्याला खुलं आमंत्रण. मग हीच लोकं नुकसान झालं
म्हणून बोंबलतात. असो. लेट्स सी व्हॉट डॉक हॅज टू से...”
डॉक्टर गोखले बॉडी तपासत होते. प्रधान आणि उमा बाजूला उभे होते. थोड्याच
वेळात डॉ. म्हणाले, "बॉस, फार वाईट पद्धतीने मारलंय हिला..." "हिला...
म्हणजे..." डॉ. गोखलेंना मध्येच तोडत उमाने विचारलं. उमा आणि प्रधानांकडे पाहत
डॉ. गोखले म्हणाले, "प्रधानसाहेब हे प्रेत एका
मुलीचं आहे. डोक्यावर केस नाहीत आणि अंगात पुरुषी पेहराव, यामुळे हा पुरूष असावा ही शंका बरोबर आहे. पण मी पूर्ण
बॉडी चेक केली आहे. ही एक मुलगी आहे. हिचं वय साधारण २४-२५ असावं..." “डॉक्टर, हिचा मृत्यू कशाने झाला असावा..." प्रधानांच्या या
प्रश्नावर डॉ. गोखले म्हणाले, "हिचा मृत्यू गुदमरल्याने झाला
आहे. हिची श्वासनलिका दाबली गेली आहे. बहुतेक कोणीतरी हिचा गळा आवळला..."
"गुदमरल्यामुळे... मग
हिच्या बॉडीवर साचलेलं रक्त..." उमाच्या या शंकेवर डॉ. गोखले म्हणाले, "हे रक्त, तिचं शरीर बाजल्यामुळे
आणि वितळल्यामुळे बाहेर आलं आहे..." डॉ. गोखलेंच्या या बोलण्यावर प्रधानांना
नवल वाटलं. डॉ. गोखले पुढे म्हणाले, "या मुलीला मारल्यानंतरही त्या खुन्याला समाधान नाही मिळालं. आधी तिचा गळा
दाबला. तिचा मृत्यू झाल्यावर तिच्या शरीरावर ऍसिड टाकलं गेलं..." हे
ऐकल्याबरोबर उमाने डोळे गच्च बंद केले. मग डोळे उघडत ती म्हणाली, “इतकं क्रूर आणि
अमानुष कसं असू शकतं कोणी... पण मारल्यावरही असं करण्याचं काय कारण असावं... "मला
वाटतं, या मुलीची ओळख पटू नये
म्हणून ऍसिडचा वापर केला असावा..." प्रधानांचं हे बोलणं ऐकून डॉ. गोखलेंनी
अंगठा दाखवला. स्मित करत प्रधान म्हणाले, "पण डॉक, मला एक शंका आहे..." प्रश्नार्थक नजरेने प्रधानांकडे पाहणाऱ्या उमा आणि डॉ. गोखलेंकडे पाहत
प्रधान म्हणाले, "ही मुलगी तर मेली. ऍसिड
टाकताना ती हालचाल करणार नव्हती. तरीही संपूर्ण शरीरावर ऍसिड यूनिफॉर्म पडलेलं
नाही वाटत. कमरेच्या खालचा भाग, वरच्या भागाच्या तुलनेत
कमी बाजलेला दिसतो. पुन्हा तळवे जास्त भाजलेत पण हिच्या कोपरापासूनचे पुढचे हात
मात्र कमी भाजलेत. ही गोष्ट समजली नाही..."
टाळ्या वाजवत डॉ. गोखले म्हणाले, "वाह प्रधान साहेब. काय नजर आहे तुमची... परफेक्टली राईट यू आर... या
अन-ईव्हन ऍसिडमाऱ्याचं कारण म्हणजे, या मुलीला उभं केलं गेलं होतं. तिचे हात वरच्या बाजूला बांधून ठेवले होते
आणि चेहेरा खराब होईल अशा पद्धतीने डोक्यावरून पायापर्यंत ऍसिडचा मारा केला गेला.
हे पहा, या मुलीच्या मनगटावर
साखळदंडाच्या खुणा आहेत..." उमाचा चेहेरा त्रासिक झाला. ती म्हणाली, या मुलीला गळा दाबून मारलं
गेलं. तिचे हात साखळदंडांनी बांधले गेले. मग ओळख पटू नये म्हणून तिच्यावर ऍसिड
टाकलं गेलं. खूनी खूपच विकृत आहे..." "खुनी विकृत आहे की नाही ते नाही सांगता येणार, पण नक्कीच हुशारही
आहे..." उमाचं बोलणं पुढे नेत प्रधान म्हणाले, "या मुलीची ओळख पटणार नाही याची व्यवस्थित काळजी घेतली आहे खुन्याने.
डोक्यावरून ऍसिड टाकल्याने स्कलवरून चेहेरा बनवणंही शक्य नाही. राईट डॉक..."
प्रधानांच्या बोलण्यावर स्मित करत डॉ. गोखले म्हणाले, "राईट बॉस. पण फक्त स्कलवरूनच ओळख पटू शकते असं
नाही..." डॉ. गोखलेंच्या या बोलण्यावर प्रधान आणि उमा दोघांनाही नवल वाटलं.
डॉ. गोखले पुढे म्हणाले, "हिच्या उजव्या हातात
मनगटाजवळ एक स्टीलची पट्टी आहे. बहुतेक ही कधीतरी पडली असेल, फ्रॅक्चर झालं असेल आणि मग ही पट्टी तिथे फिट केली
असेल..." उमाकडे वळत प्रधान म्हणाले, "उमा, रेकॉर्ड्स चेक कर. अशी
कुठली हॉस्पिटल्स आहेत जिथे २४ ते २५ वयोगटातल्या मुलींच्या उजव्या हाताचं ऑपरेशन
झालं आहे..." उमाने कॉम्प्यूटर चेक केला आणि म्हणाली, "सर, संपूर्ण देशात अशी २६
हॉस्पिटल्स आहेत जिथे आपल्याला हव्या असलेल्या वयातल्या मुलींच्या हाताचं ऑपरेशन
झालं आहे. पण सर, दोन हॉस्पिटल्समध्ये
झालेली ऑपरेशन्स आपल्याला हव्या असलेल्या मुलीशी मॅच होतात. नागपूरचं कमळा
हॉस्पिटल आणि मुंबईचं धनवंतरी हॉस्पिटल..." प्रधान स्क्रीनकडे पाहू लागले.
स्क्रीनवर नावं आणि पत्ते झळकत होते. एक होती नागपूरची सुधा कानविंदे आणि दुसरी
मुंबईची अनिता चौधरी. स्क्रीनकडे पाहत प्रधान म्हणाले, "ही मेलेली मुलगी बहुतेक याच दोन मुलींपैकी एक असावी.
अनिताला तर आपण भेटलो. आता राहिली सुधा कानविंदे..." प्रधान बोलत असतानाच
त्यांचा फोन वाजला, "येस आनंद... ओके.
ओके..."
फोन झाल्यावर उमा आणि डॉ. गोखलेंकडे पाहत प्रधान म्हणाले, "त्या पेट्रोल पंपाचा ठिकाणा सापडला आहे. तिथल्या माणसाने
बाबूला तर नाही ओळखलं, पण इनोव्हा तिथे कोण घेऊन
आलं होतं, हे तो सांगू शकतो. तो म्हणाला, की पंपातून निघाल्यावर इनोव्हा लोणावळ्याच्या दिशेने गेली, तर इनोव्हा घेऊन आलेला माणूस विरुद्ध दिशेला म्हणजे
मुंबईकडे पळाला. ते ही बस पकडून..." उमा आणि डॉ. गोखलेंनी एकमेकांकडे पाहिलं.
प्रधान पुढे म्हणाले, "बाबूला आणि त्या
पंपवाल्याला घेऊन आनंद चौकीवर यायला निघाला आहे. आणि सचिन त्या बसच्या शोधात गेला
आहे..." बोलता बोलता प्रधानांनी फोन काढून नंबर लावला, "हॅलो. नागपूर पोलिस स्टेशन... मी सीनियर इंस्पेक्टर
प्रधान बोलतोय. मी तुम्हाला एका मुलीचं नाव आणि पत्ता पाठवत आहे. त्या मुलीची
चौकशी करा. आणि मला लगेच रिपोर्ट द्या..." प्रधानांनी फोन ठेवलाच होता, की
त्यांना अजून एक फोन आला. “हॅलो, सीनियर इन्स्पेक्टर प्रधान बोलतोय... बोला.
कुठे... ओ.के. आम्ही पोहोचतो...” फोन ठेवत डॉ. गोखलेंकडे पाहत प्रधान म्हणाले,
“डॉक, तुम्हाला अजून एक काम मिळेल थोड्याच वेळात. आरे कॉलनीमध्ये एक प्रेत मिळालं
आहे. उमा, लेट्स गो...”
प्रधान आणि उमा घटनास्थळी पोहोचले. तिथे बघ्यांची गर्दी जमली होती.
रस्त्याच्या कडेला एक बाईक उभी होती. गर्दी हटवत प्रधान आणि उमा बॉडीजवळ पोहोचले.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्या प्रेताचा चेहेरा खराब झाला होता. उमा म्हणाली,
“सर, चेहेऱ्याचा पार चेंदा-मेंदा झाला आहे. बहुतेक कुठल्यातरी मोठ्या वस्तूने
चेहेऱ्यावर वार केला आहे...” प्रधानांनी बॉडी चेक केली. खिशातून वॉलेट निघालं.
उमाने आजू-बाजूला पाहिलं तर एक चावी पडलेली दिसली. प्रेताच्या जवळच एक मोठा दगड
पडला होता. उमा म्हणाली, “सर, ही चावी बहुतेक या बाईकची असावी. आणि हाच तो दगड
असेल ज्याने या माणसाच्या चेहेऱ्यावर... मी या दगडावर लागलेल्या रक्ताचे सॅम्पल
घेते आणि काही ठसे मिळतात का तेही पाहते...” वॉलेटकडे पाहत प्रधान म्हणाले, “या
वॉलेटमध्ये काही पैसे, हे ड्रायव्हिंग लायसन्स आणि हे व्हिझिटिंग कार्ड आहे. याचं
नाव जयराम आहे. हा एक डिटेक्टिव्ह आहे. एका डिटेक्टिव्हचं इथे काय काम... हा
कोणाचा पाठलाग तर करत नव्हता...”
मग प्रधान गर्दीकडे वळले आणि म्हणाले, “याबद्दल तुमच्यापैकी कोणी काही सांगू
शकेल...” एक माणूस पुढे आला. त्याच्या हातात एक कुत्रा होता. तो माणूस म्हणाला,
“सर, मी रोज माझ्या कुत्र्याला फिरवायला इथे घेऊन येतो. आजही आलो. कुत्रा पुढे
पुढे चालत होता आणि मी त्याचा पट्टा धरून त्याच्या मागून फोनवर बोलत येत होतो. अचानक
हा भुंकायला लागला आणि पुढे पुढे जाऊ लागला. मी सुद्धा त्याच्या मागून जाऊ लागलो.
मला एका बाईकचा आवाज आला. बाईक रेज झाली आणि मग आवाज लांब लांब जाऊ लागला. मी रस्त्याचं
वळण घेतलं तर एक बाईक जाताना दिसली. ती खूप लांब असल्याने आणि स्पीडमध्ये असल्याने
मला नंबर किंवा चालवणारा दिसला नाही. मी इथे आलो तर ही बाईक उभी होती. कुत्र्याने
वास घेतला आणि बाईकच्या दुसऱ्या बाजूला पाहून भुंकू लागला. मी तिथे पाहिलं तर हे
प्रेत दिसलं. मी लगेच तुम्हाला फोन केला...” प्रधानांनी स्मित केलं आणि म्हणाले,
“तुम्ही दोघांनी खूप छान काम केलंत. थॅंक यू...” मग त्यांनी कुत्र्यासमोर हात धरला
तर कुत्र्यानेही त्याचा पंजा प्रधानांच्या हाती दिला. तेवढ्यात उमा पुढे येत म्हणाली,
“सर, हा तुटलेला मोबाईल मिळाला आहे. बहुतेक या जयरामचा असावा...” यावर प्रधान
म्हणाले, “उमा, पोलिसांची तुकडी बोलावून घे. ही बॉडी, ही बाईक, हे ब्लड सॅम्पल, हे
ठसे आणि हा फोन डॉककडे पाठवायचे आहेत...”
डॉ. गोखले बॉडी तपासत होते. प्रधानांकडे पाहत ते म्हणाले, “प्रधानसाहेब,
हल्ली एका डेड बॉडीवर समाधान होत नाही तुमचं, दोन-तीन तरी असतातच..” उमा आणि
प्रधान हसू लागले. प्रधान म्हणाले, “आता काय करायचं डॉक, गुन्हेगारांची मानसिकताच
तशी झाली आहे...” डॉ. गोखले पुढे म्हणाले, “असो. या जयरामचा खून डोक्यावर आघात
झाल्याने झाला आहे हे नक्की. खुन्याने याच्या डोक्यात दगड घालून याला मारलं. जो
दगड तुम्ही आणलात, त्यावर धूळ आणि रक्ताशिवाय काहीच नाही. नो फिंगर प्रिंट्स. पण
दगड इतका वजनदार आहे की तो उचलणारी एखादी दणकट व्यक्ती असावी. खून कदाचित घाई-घाईत
झाला असावा. तुम्हाला बॉडी मिळाली रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाच्या मागे. तो
एरिया जरी शांत असला, तरी एखादी गाडी, एखादा पादचारी तिथून जाणारच. शिवाय त्या
कुत्रेवाल्यानेही बाईक रेज झाल्याचा आवाज ऐकला आणि मग एक बाईक स्पीडने जाताना
दिसली...” डॉ. गोखले बोलतच होते की प्रधानांचा फोन वाजला, "हॅलो. सीनियर इंस्पेक्टर प्रधान हियर... हां... ठिक आहे.
ओ.के. थँक यू..." फोन ठेवत उमाकडे पाहत ते म्हणाले, "नागपूर पोलिसांचा फोन होता. सुधा कानविंदे सध्या युरोप
टुअरवर आहे. नागपूर पोलिसांनी तिथे संपर्क साधून सुधा कानविंदे जिवंत असल्याची
खात्री करून घेतली आहे..."
हे ऐकून उमा म्हणाली, "सर आपण तर समजत होतो ती
मेलेली मुलगी सुधा कानविंदे किंवा अनिता चौधरीपैकी एक असावी. पण दोघीही जिवंत
आहेत. मग ही मेलेली मुलगी कोण असावी..." हनवटी चोळत प्रधान म्हणाले, "आपल्या समोर दोन बॉडीज आहेत. पहिली बॉडी आहे एका मुलीची,
जी आपल्याला एका गाडीत बोरीमध्ये ठेवलेली सापडली. त्या मुलीला गळा दाबून मारलं
गेलं, मग चेहेरा खराब करण्यासाठी ऍसिड टाकलं गेलं. बॉडी घेऊन जाताना गाडी चोरीला
गेली आणि एका अपघातामुळे खून उघडकीस आला. तो पेट्रोल पंपवाला विटनेस आहे त्या
गाडीचा आणि ड्रायव्हरचा. त्या मुलीच्या हाताचं ऑपरेशन झालं आणि एक स्टीलची पट्टी
त्यात बसवली गेली. या खेरीज आपल्याला अजून काहीच माहीत नाही. दुसरी बॉडी या
जयरामची, जो एक डिटेक्टिव्ह आहे. ही बॉडी आपल्याला मिळाली आरे कॉलनीत. तो
कुत्रेवाला याचा विटनेस आहे. हे दोन्ही खून वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या
पद्धतीने झालेत. पण मला वाटतं या दोन्हीमध्ये काही ना काहीतरी कनेक्शन असावं.
साध्या आपण त्या मुलीच्या खुनावर लक्ष ठेऊ. आपल्याकडे आहे ती इनोव्हा आणि तो पंपवाला
माणूस. आनंद त्याला घेऊन चौकीवर पोहोचला आहे. पाहू त्यातून काही मिळतं का..."
प्रधानांनी जीप सुरू केली आणि भरधाव वेगाने एका दिशेने चालू लागली. थोड्याच
वेळात जीप चौकीवर पोहोचली. आत आनंदने एका माणसाला आणि बाबूला खुर्चीत बसवलं होतं.
आनंद स्वत: बाजूच्या खुर्चीत बसला होता. प्रधान आणि उमाला पाहताच तो उठून उभा
राहिला. एका माणसाकडे बोट दाखवत तो म्हणाला, "सर हा सोनू. त्या पेट्रोल पम्पावर कामाला आहे. याने त्या इनोव्हाच्या
ड्राव्हरला पाहिलं आहे. सोनू, तू सांग काय
पाहिलंस..." प्रधानांसमोर हात जोडत सोनूने बोलायला सुरुवात केली, "साहेब, मी घाटाच्या आधी असलेल्या
पेट्रोल पम्पावर काम करतो. सकाळी ती इनोव्हा पम्पावर आली. ड्रायव्हर खूप घाईत
होता. मला हजार रुपये दिले आणि पेट्रोल भरायला सांगून तो माणूस टॉयलेटला गेला...
पेट्रोल भरून मी माझ्या बाकी गिऱ्हाइकांकडे वळलो. लगेच ती इनोव्हा सुरू झाली
आणि पम्पाबाहेर जाऊ लागली. मला वाटलं तो माणूस परत आला. पण तो माणूस टॉयलेटच्या
दिशेने आला आणि धावत गाडीमागे जाऊ लागला. मला खरा प्रकार लक्षात आला आणि मी पण
त्या माणसामागे धावलो. ती गाडी डावीकडे वळत घाटाच्या दिशेने गेली. तो माणूसही
पम्पाबाहेर पडला. काही काळ गाडी गेली त्या दिशेने पाहून त्याने डोक्याला हात
मारला. मग लगेच रस्ता क्रॉस करून तो समोरच्या दिशेने गेला आणि मुंबईकडे जाणाऱ्या
बसमध्ये बसून तो निघून गेला..." हे सर्व ऐकून प्रधान विचारात पडले आणि म्हणाले, "आपली गाडी पळवली गेल्यावर गाडीच्या दिशेने न जाता तो
माणूस उलट्या दिशेला गेला... स्ट्रेंज..." त्यावर आनंद म्हणाला, "सर, मी सचिनला त्या बसचा माग
काढायला पाठवलं आहे. आपल्याला थोड्याच वेळात त्या बसबद्दल समजेल..." सोनूकडे
वळत प्रधान म्हणाले, "सोनू, तू त्या माणसाला जवळून पाहिलं आहेस. त्याचा चेहेरा वर्णन
करून सांग, आमचा आर्टिस्ट त्याचं
स्केच बनवेल..." प्रधान बोलतच होते की त्यांच्या मोबाईलवर डॉ. गोखलेंचा फोन
आला...
फोन उचलत प्रधान म्हणाले, "बोला डॉक..." समोरून
आवाज आला, "प्रधान साहेब, इनोव्हावर आणि टायर्सवर लागलेल्या धुळीची मी टेस्ट. त्यात
मला ग्रीस, ऑईल आणि काचेचे कण
सापडलेत..." हे ऐकून प्रधानांचे डोळे विस्फारले. डॉ. गोखलेंना धन्यवाद देत
प्रधानांनी फोन ठेवला आणि विचार करू लागले, "ग्रीस, काचेचे कण... म्हणजे ही
गाडी अशा ठिकाणी गेली होती जिथे हे सगळं असणार..." मग आनंदकडे वळत ते म्हणाले, "आनंद, त्या पेट्रोल पंपाच्या
आस-पास अशी कोणती जागा आहे का बघ जिथे ऑईल, ग्रीस हे प्रकार असतात. एखादी फॅक्टरी, एखादं गोडाऊन..." प्रधान बोलतच होते, की सचिन एका माणसाला घेऊन आत शिरत म्हणाला, "सर, हे विलास. त्या बसचे
कन्डक्टर, ज्या बसमधून तो माणूस
पळाला. जरा, सरांना सांगा तुम्ही मला
काय सांगितलंत..." प्रधानांसमोर हात जोडत तो माणूस म्हणाला, "साहेब, मी विलास. बस क्रमांक
३१३२चा कन्डक्टर. साहेब ही बस तळेगाव ते दादर आणि दादर ते तळेगाव या रूटवर जुन्या
रस्त्याने जाते. आज घाट उतरून बस खाली आली तर रस्त्याच्या कडेला एक माणूस दिसला.
त्याने हात दाखवला म्हणून बस थांबली. आत शिरताच त्याने लास्ट स्टॉपचं तिकीट
मागितलं. पण साहेब, तो पनवेल यायच्या आधीच
उतरला...
कामोठ्याजवळ सिग्नलला बस स्लो झाली तशी त्याने दरवाजा उघडला आणि बाहेर उडी
घेऊन समोरच्या रस्त्याकडे पळत गेला..." प्रधानांनी त्याचं वर्णन विचारल्यावर
विलास म्हणाला, "साहेब, तो दिसायला राकट होता. सावळासा, कुरळ्या केसांचा आणि मोठी दाढी असलेला. तो बेचैन वाटत
होता. सारखा वळून वळून मागे पाहत होता. मग कामोठ्याला बसचा स्पीड कमी झाला तसा तो
उतरला..." विलासला मध्येच तोडत सचिन म्हणाला, "पण बसमध्ये तर बरेच प्रवासी असतात. मग हाच कसा लक्षात राहिला..."
त्यावर विलास म्हणाला, "साहेब, एकतर हा स्टॉपवरून न येता मधूनच आला होता. दुसरं म्हणजे
याचे तिकिटाचे उरलेले पैसे माझ्याकडे बाकी होते. मी म्हटलं त्याला, पनवेल डेपो आला की देतो. पण त्या आधीच..." विलास
बोलत असतानाच आनंद हातात एक स्केच घेऊन आला. प्रधानांसमोर स्केच धरत तो म्हणाला, "सर, सोनूने वर्णन
केल्याप्रमाणे तो माणूस असा दिसतो..." स्केचकडे पाहून विलासचेही डोळे मोठे
झाले. स्केचकडे बोट दाखवत तो ओरडला, "साहेब हाच तो माणूस जो बसमध्ये चढला आणि अर्ध्या वाटेवरच उतरला..."
विलास बोलत असताना प्रधानांजवळ येत उमा म्हणाली, “सर, त्या जयरामच्या
बॉडीजवळ मिळालेली बाईक कोणा मधुकर सबनीसच्या नावावर आहे. त्यांचा पत्तासुद्धा
मिळाला आहे...” गोंधळून जात प्रधान म्हणाले, “उमा, आपण आत्ता त्या मुलीच्या
मृत्यूबद्दल बोलतोय, आणि तू... एक मिनीट एक मिनिट, म्हणजे ती बाईक जयरामची नव्हती
आणि या केसमध्ये इनोव्हामध्ये मिळालेली बॉडी कोणाची आहे हे अजून माहीत नाही. दोन
खून, दोन वेगळ्या ठिकाणी. पण दोन्ही खुनांच्या वेळी एक वाहन मिळतं. इंटरेस्टिंग.
म्हणजेच कदाचित या दोन्ही खुनांमध्ये काही ना काहीतरी कनेक्शन असू शकेल. गुड वर्क
उमा...” सचिनने नवी मुंबईचा नकाशा टेबलवर पसरला. एका ठिकाणावर बोट ठेवत तो म्हणाला, "सर, कामोठेचा सिग्नल इथे आहे.
सिग्नलच्या डाव्या बाजूला संपूर्ण इन्डस्ट्रीयल एरिया आहे. विलासने
सांगितल्याप्रमाणे जर तो माणूस सिग्नलला उतरून या बाजूने गेला, तर तो नक्कीच इथल्या एखाद्या फॅक्टरीत किंवा गोडाऊनकडे
गेला असणार..."
सचिन
बोलत असताना आनंद म्हणाला,
"सर, त्या पेट्रोल पम्पापासून सुमारे
चाळीस किलोमीटरवर बऱ्याच फॅक्टरीज आणि गोडाऊन्स आहेत. त्यातलं एक नाव आपल्या
कामाचं आहे. 'शाईन ग्लासेस...' या शाईन ग्लासेसचं एक वर्क
शॉप-कम-गोडाऊन आहे. दीड वर्षापूर्वी तिथे शॉर्टसर्किट होऊन आग लागली होती. कोणी
संतोष देसाई आहेत मालक त्या गोडाऊनचे. आणि सर,
हे
गोडाऊन त्याच भागात आहे जिथे तो माणूस बसमधून उतरून गेला..." प्रधानांनी थोडा
विचार केला आणि म्हणाले,
"उमा,
तू आणि मी, या मधुकर सबनीसला जाऊन भेटू. त्याची बाईक जयरामकडे कशी आली ते पाहू.
सचिन आणि आनंद, तुम्ही शाईन ग्लासेसचं गोडाऊन तपासा. तिथल्या लोकल पोलिसांची मदत
घ्या. मी डॉकला सुद्धा तिथे यायला सांगतो. लेट्स गो..."
दुसरा आणि शेवटचा भाग: दि: ०९.०३.२०२४...