अंदमानचा इतिहास म्हटला, की आपल्याला आठवतं सेल्यूलर जेल, तिथे मिळणाऱ्या काळ्या पाण्याच्या कठोर शिक्षा आणि स्वतंत्र्यवीर सावरकर. पण वीर सावरकरांच्याही आधी अंदमानत अजून एक निडर क्रांतीकारक होऊन गेला... शेर अली आफ्रीदी...
एकोणीसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकात, म्हणजे साधारण १८३० ते १८४० या काळात शेर अली यांचा जन्म, त्या काळातल्या ब्रिटिश इंडियामध्ये झाला. आफ्रीदी-पष्टून जमातीत जन्मलेल्या शेर अलीला फरज़ंद अली, असं सुद्धा म्हटलं जायचं. अंबाला येथे असलेल्या पेशावर सैन्याच्या घोडेस्वार दलात शेर अली होता. मेजर ह्यूग जेम्स यांच्या हाताखाली तो काम करायचा...
मेजर-जनल रायनेल टेलर यांनी शेर अलीच्या कर्तबगारीवर खुश होऊन त्याला एक पिस्तुल आणि घोडा भेट दिला होता. १८५७च्या स्वातंत्र्य समरादरम्यान ईस्ट इंडिया कंपनीच्या रोहिलखंड येथे असलेल्या सैन्यातही शेर अली होता. ब्रिटिशांसाठी काम करूनसुद्धा त्याच्या मनात ब्रिटिशांबद्दल राग होता. या रागाची दोन कारणं होती. पहिलं कारण म्हणजे ब्रिटिशांचा अमानुष छळ आणि भारतीयांना वागवण्याची त्यांची पद्धत आणि दुसरं कारण होतं एक घटना आणि त्यामुळे शेर अलीवर झालेला अन्याय...
१८६७ साली हैदर नावाच्या एका माणसाने शेर अलीच्या बहिणीची विटंबना केली. त्याचा बदला म्हणून शेर अलीने भर दिवसा हैदरला जिवे मारलं. त्या मानव हत्येपाठी काय कारण होतं हे सांगूनही शेर अलीला फाशीची शिक्षा सुनावली गेली. वारंवार याचिका दाखल केल्यावर शेर अलीची फाशी रद्द होऊन आजन्म कारावासासाठी त्याला अंदमान येथे पाठवलं गेलं. अंदमान येथे आजन्म कारावासाची शिक्षा मिळालेला तो पहिला भारतीय ठरला. शेर अलीला ही शिक्षा मान्य नव्हती. हैदरच्या वधासाठी ब्रिटिश सरकारने दिलेली ही शिक्षा त्याला जास्त वाटत होती. तेव्हापासून ईस्ट इंडिया कंपनीवर आणि ब्रिटिश सरकारवर शेर अलीचा राग होता...
अंदमान येथील रॉस आयलंडवर शेर अली रहायचा आणि पोर्ट ब्लेयर येथे न्हाव्याचं काम करायचा. साधारण पाच वर्ष काम करून शेर अली तिथला सर्वात श्रीमंत भारतीय बनला होता. आपल्या कामासोबत, तिथे असलेल्या इतर भारतीयांची मदत करण्याचं महत्वाचं कार्यही शेर अली करायचा. काळासोबत शेर अलीचा रागही वाढत होता. त्या रागाला वाचा फुटली ती १८७२च्या फेब्रुवारी महिन्यात...
रिचर्ड बूर्क. मेयो राजवटीचा सहावा सरदार आणि त्या काळातला भारतातला ब्रिटिश सुभेदार त्या वेळी अंदमानात होता. त्याला लॉर्ड मेयो म्हणूनही संबोधलं जायचं. ब्रिटिशांचा अंदमानातील सर्व कारभार लॉर्ड मेयो पहायचा. अंदमानातील शासन, कैद्यांना दिल्या जाणाऱ्या शिक्षा, यात लॉर्ड मेयोच्या कल्पनांचा मोठा वाटा होता. म्हणूनच याच लॉर्ड मेयोचा वध करण्याचा निर्णय शेर अलीने घेतला...
८ फेब्रुवारी १८७२ रोजी माऊंट हॅरियेट म्हणजेच आत्ताचं माऊंट मणिपूर येथील आपली पाहणी संपवून संध्याकाळी सातच्या सुमारास लॉर्ड मेयो बोटीकडे परतत होता. त्याच वेळेस अंधाराचा फायदा घेऊन शेर अली तिथे आला आणि त्याने लॉर्ड मेयोवर सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात असलेला लॉर्ड मेयो पाण्यात पडला आणि गतप्राण झाला. हे कृत्य करूनही शेर अली पळाला नाही. त्याला अटक झाली आणि वायपर आयलंडच्या कोर्टात त्याच्यावर खटला चालवला गेला...
ब्रिटिश राजवटीला लॉर्ड मेयोच्या मृत्यूचा जबरदस्त धक्का बसला होता. पण शेर अलीला त्याच्या कृत्याचा अभिमानच होता. "परवरदिगारच्या सांगण्यावरूनच मी हा वध करून एका नराधमाचा अंत केला", असंच तो म्हणत राहिला. शेर अलीला फाशीची शिक्षा सुनावली गेली. वायपर आयलंडच्या ओपन जेलमध्ये साखळी कैद्यांमध्ये शेर अलीला ठेवलं गेलं. अखेर आपण केलेल्या वधाचं जराही दु:ख किंवा सल मनाशी न बाळगता ११ मार्च १८७२ रोजी वायपर आयलंड येथील फाशीघरात शेर अली अमर झाला...
मंडळी मी काही संशोधक किंवा इतिहासकार नाही. मी स्वत: अंदमानला भेट दिली. तिथल्या स्थनिकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आणि इंटरनेटवर असलेल्या माहितीच्या आधारे हा लेख मी लिहू शकलो...
@ अनिकेत परशुराम आपटे.

काही नवीन माहिती समजली. खूप धन्यवाद.
ReplyDelete