Friday, March 8, 2024

ऍसिड रेन (दुसरा व शेवटचा भाग)...

पहिल्या भागात...

मुंबई-पुणे जुन्या रस्त्यावरून अनुप-रश्मीची गाडी जात असताना एक दुसरी गाडी घाटाच्या तोंडाजवळ त्यांच्या गाडीला खेटून जाते. अनुप आणि दुसऱ्या गाडीचा ड्रायव्हर बाबू यांच्यात बाचा-बाची होते. तिथे पोलिस येतात आणि त्याच वेळी बाबू चालवत असलेल्या गाडीच्या डिक्कीत एका बोरीमध्ये ठेवलेली एक बॉडी सापडते. बाबूने ती गाडी पेट्रोल पांपावरून चोरली असं त्याचं म्हणणं असतं. बाबू चालवत असलेली गाडी अनिता चौधरी या मुलीच्या नावावर असते. आनंद आणि सचिन बाबूसोबत पेट्रोल पांपाकडे जातात तर प्रधान आणि उमा अनिता चौधरीला भेटायला जातात, जिथे त्यांना समजतं की अनिता आणि जयेश चौधरीला गाडी जागेवर नसल्याचं माहितच नसतं...

गाडी जागेवर नाही आणि गाडीत प्रेत आहे हे समजताच अनिता आणि जयेश घाबरतात. त्या वेळी प्रधान आणि उमा तिथून निघून डॉ. गोखलेंकडे येतात. डॉ. गोखले सांगतात ते प्रेत एका मुलीचं आहे जिला गळा दाबून मारलं आहे आण नंतर बॉडी नष्ट करायला त्यावर ऍसिड टाकलं गेलं. डॉ. गोखले पुढे सांगतात की त्या मुलीच्या हाताचं ऑपरेशन झालं होतं ज्यात मनगटाजवळ एक पट्टी लावली गेली. उमा अशा दोन मुलींची नावं शोधून काढते ज्यातली एक नागपूरला असते. प्रधान नागपूरच्या सुधा कानविंदेची चौकशी करायला सांगतात. त्याच वेळी आरे कॉलनीत अजून एक प्रेत मिळाल्याचं समजतं. मेलेल्या माणसाचं नाव जयराम असतं आणि तो एक गुप्तहेर असतो...

डॉ. गोखले सांगतात की जयरामला डोक्यात दगड घालून मारलं गेलं आहे. त्याच वेळी नागपूरहून सुधा कानविंदे जीवंत असल्याची खबर मिळते. तिथे चौकीवर आनंदने बाबूला आणि पंपवाल्या सोनूला आणलं असतं. इनोव्हा चालवणारा गाडी गेली त्याच्या उलट्या दिशेला गेला असं सोनू सांगतो आणि त्याचं स्केच बनवायला त्याचं वर्णन करू लागतो. सचिन बस कंडक्टर विलासला घेऊन येतो. विलासही त्या माणसाबद्दल माहिती देतो. सोनूने वर्णन केलेल्या स्केचमधल्या माणसाला विलास ओळखतो आणि सांगतो तो कामोठेलाच उतरला. तेव्हा कामोठेच्या शाईन ग्लासेस या फॅक्टरीचं नाव समोर येतं. त्याच वेळी जयरामच्या बॉडीजवळ सापडलेली बाईक मधुकर सबनीसची असल्याचं उमा सांगते. प्रधान आणि उमा मधुकर सबनीसला भेटायला जातात तर आनंद, सचिन आणि डॉ. गोखले कामोठेला निघतात...

दुसरा व शेवटचा भाग...

जीपने कामोठेचा सिग्नल ओलांडला आणि उजवीकडे वळून थोड्याच वेळात एका गेटजवळ जीप पोहोचली. गेट बंद होतं. आणि त्याला एक मळकटशी पाटी लावली होती. पाटीवर लिहिलं होतं, "This property belongs to Shine Glasses. Trespassers Not Allowed..." समोरच दुसरी जीप उभी होती आणि त्याच्या बाजूला चार गणवेशधारी पोलिस उभे होते. आनंद, सचिन आणि डॉ. गोखले त्यांच्या जीपमधून उतरताच त्या चारही गणवेशधाऱ्यांनी एकत्र सलाम ठोकला. आनंद पुढे होत म्हणाला, “आपल्याला ही जागा नीट तपासायची आहे. तुम्ही दोघं हा परिसर बाहेरून चेक करा आणि काही हाती लागलं तर आम्हाला कळवा. तुम्ही दोघं आमच्यासोबत आत चला. आपण तिथे चेक करू. सर्वजण सभोवताली नजर फिरवू लागली. सचिन म्हणाला, "सर, या गोडाऊनच्या आस-पासच्या फॅक्टरीज काही अंतरावर आहेत. शिवाय रस्त्यापासूनही हे गोडाऊन चांगलंच आत आहे..." आजू-बाजूला पाहत डॉ. गोखले म्हणाले, "इथे कोणी वॉचमॅन किंवा गार्डही दिसत नाही..." डॉ. गोखलेंना दुजोरा देत आनंद म्हणाला, "हो ना. फक्त ही काळी पडलेली पाटी आणि हे गंजलेलं कुलूप आहे गेटला..."

सचिनने सहज कुलुपाला हात लावला तर ते उघडलं. सर्वांनी एकमेकांकडे आश्चर्याने पाहिलं. आनंदचा होकार मिळताच सचिनने कुलूप काढलं आणि गेट उघडून सर्व आत गेली. आत पूर्ण शांतता पसरली होती. एखादं चिटपाखरूही नजरेस पडत नव्हतं. समोरच आत जाण्याचा मुख्य दरवाजा होता. तोही जळून काळा पडला होता. आनंद आणि सचिनने लाथा हाणून दरवाजा उघडला आणि त्या दोघांसह डॉ. गोखले आणि बाकी दोन हवालदार आत पोहोचले. आत सगळीकडे शांतता पसरली होती. भिंती काळ्या पडल्या होत्या. गोडाऊनमध्ये एका बाजूला माशीन्स दिसत होती ज्यांना जळमटं लागली होती, तर मशीन्सच्या मागे एक लोखंडी जिना वरच्या दिशेने जात होता. सचिन आणि ते दोन हवालदार खालचा एरिया तपासू लागले तर आनंद आणि डॉ. गोखले जिना चढून वर गेले. जिना चढताना आनंद म्हणाला, "डॉक्टर, ही जागा इतकी अलिप्त आहे, की इथे घडलेला गुन्हा कोणाच्या लक्षातही येणार नाही. त्या मुलीलाही इथेच मारलं असावं कदाचित. पण मग बॉडी इथून बाहेर का नेली... इथेच लपवली असती तर कोणाला पत्ताही लागला नसता. ऍसिडचा मारा झालाच होता बॉडीवर..."

यावर डॉ. गोखले म्हणाले, "यू आर राईट आनंद. ऍसिडचा मारा झाला होता. पण ऍसिड बहुतेक अपूरं पडलं. बॉडी पूर्ण नष्ट झाली नाही. राहिलेली बॉडी कालांतराने सडली असती, वास येऊ लागला असता. म्हणून बॉडी इथून हलवली..." दोघं वर पोहोचली. ती जागा तशी छोटीच होती. एका भिंतीला एक टेबल लावलं होतं आणि दोन जळलेल्या खुर्च्या तिथे पडलेल्या होत्या. ते टेबलही अर्धवट तुटलेलं आणि काळं पाडलेलं होतं. त्या जागेच्या आतल्या कोपऱ्याजवळ एक गुंडाळलेली गादी होती आणि बाजूलाच एका स्टुलावर ग्लासेस आणि एक माठ ठेवलेला होता. हे पाहून डॉ. गोखले म्हणाले, “बाकी सगळ्या वस्तू तर जळलेल्या दिसतात. पण हा माठ, हे ग्लासेस, ही गादी तशीच कशी. हे बहुदा इथलं ऑफिस असावं. मग इथे ही गादी काय करत असावी...” डॉ. गोखलेंना दुजोरा देत आनंद म्हणाला, "याचा अर्थ ही जागा कोणीतरी वापरत आहे. आणि ग्लासही दोन आहेत. म्हणजे इथे दोन व्यक्ती येतात. कोण असावं..." दोघं बोलत असताना सचिनने त्यांना हाक मारली. आवाज ऐकून आनंद आणि डॉ. गोखले खाली आले...

एका मशीनजवळ सचिन उभा होता. आनंद आणि डॉ. गोखले तिथे पोहोचले तेव्हा एका दांडयाकडे बॉट दाखवत सचिन म्हणाला, “सर, सर्व मशीन्स निकामी आहेत. पण जर ती सुरू केली तर चालूही होतील. यातल्या या मशीनला वरच्या बाजूला हा लोखंडी पाईप आहे. यातून एक थेंब आत्ता बाहेर पडला आणि जमिनीवर हा थेंब जिथे पडला तिथला भाग जाळतोय. या पाईपच्या वरच्या बाजूला साखळदंडाच्या खुणा आहे आणि खालचा बराच भाग काळा पडला आहे. सर, काय असावं हे, तेल की पाणी...” सचिन त्या पाईपच्या तोंडाला हात लावणारच होता, की डॉ. गोखले त्याला अडवत म्हणाले, “थांब सचिन. हात लावू नकोस. ते पाणी किंवा तेल नाही. ते ऍसिड आहे. या पाईपच्या खालची जमीन आगीत जळल्यासारखी वाटत नाही. ऍसिडमुळे भाजली आहे ती. मी इथले सॅम्पल घेऊन टेस्ट करतो. तुम्ही दोघं या पाईपचं नोझल उघडा. पण सांभाळून. ऍसिड असू शकतं त्यात...” आनंदने जवळ पडलेला एक पत्र्याचा तुकडा घेतला आणि पाईपच्या तोंडावर लाऊन दुमडला. सचिनने पान्याच्या मदतीने नोझल उघडलं. आत काहीतरी चमकत होतं. आनंदने एक होल्डर आत घालून ती चमकणारी वस्तू बाहेर काढली. ती एक लोखंडी गोल डबीसारखी होती...

डॉ. गोखले म्हणाले, “हीच ती कॅप्सूल ज्यात ऍसिड होतं. यातूनच त्या मुलीच्या बॉडीवर ऍसिडचा मारा केला गेला. मी आणलेल्या माईक्रोस्कोपमध्ये सॅम्पल चेक केलं. त्यात मानवी शरीराचे काही कणसुद्धा आहेत. मी म्हणालो नव्हतो, ऍसिड अपूरं पडलं असेल म्हणून. तेच झालं. यात इतकं ऍसिड नव्हतं ज्याने पूर्ण बॉडी जळून जाईल. म्हणून बॉडीची विल्हेवाट लावण्यासाठी बॉडी बाहेर नेली गेली...” डॉ. गोखले बोलतच होते की एक हवालदार म्हणाला, “सर, इथे काहीतरी घासण्याच्या खुणा आहेत. एखादी मोठी वस्तू इथून घासत दारापर्यंत नेली गेली...” हे ऐकून सचिन म्हणाला, “ती मोठी वस्तू म्हणजे ती बोरीच असावी...” इतक्यात बाहेर तपासत असलेले दोन्ही हवालदार आत आले. एक म्हणाला, “सर, आम्ही पूर्ण परिसर तपासला. बाकी सगळीकडे धूळ आणि माती आहे. पण मेन गेटच्या जवळ आम्हाला दोन वेगळ्या वाहनांचे टायर मार्क्स मिळाले. एक फोर व्हीलर आणि एक बाईक. त्याच फोर व्हीलरचे टायर मार्क्स इथे या दारापर्यंत पण आलेले दिसतात...” यावर आनंद म्हणाला, “ती फोर व्हीलर म्हणजे ती इनोव्हा असेल आणि ती बाईक खुन्याची असू शकेल...” तेवढ्यात आतला परिसर तपासणारा अजून एक हवालदार हातात काही चिठोरे घेऊन समोर येत म्हणाला, “सर, जिन्याखाली आणि जिन्याच्या आस-पास हे चिठोरे मला सापडले. त्यातल्या एकावर, "जे.डी.ए..." ही अक्षरं लिहिली आहेत...”

आनंद आणि सचिनने सर्व चिठोरे जोडले आणि एक कागद तयार झाला. तो कागद एका नोट पॅडमधून फाडला होता. त्यावर इथला पत्ता होता आणि खाली "जे.डी.ए." ही अक्षरं लिहून त्याखाली एक भिंगं काढलेलं होतं. ते भिंगं आणि ती अक्षरं पाहून डॉ. गोखले म्हणाले, “अरे, हा तर त्या जयराम डिटेक्टिव्हचा कागद आहे, ज्याची बॉडी आपल्याला आरे कॉलनीमध्ये सापडली. त्याच्या खिशात सापडलेल्या वॉलेटवर हीच अक्षरं आणि हाच लोगो सापडला...” हे ऐकून आनंद आणि सचिनचे डोळे विसफारले. आनंद म्हणाला, “रस्त्यावर झालेल्या अपघातात एक बॉडी आढळते. डॉ. गोखले सांगतात की ती एका मुलीची बॉडी आहे जिला गळा आवळून मारलं गेलं आणि नंतर ऍसिडने शरीर नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला..." डॉ. गोखले यावर म्हणाले, “ती गाडी कोण्या अनिता चौधरीची आहे आणि तिला गाडी चोरीला गेल्याचं माहितच नाही. शिवाय, ती बॉडी एकतर सुधा कानविंदे किंवा अनिता चौधरीची असावी अशी आपली शंका. पण दोघीही जिवंत आहेत...”

डॉ. गोखलेंचं म्हणणं पुढे नेत सचिन म्हणाला, “यातच आपल्याला आरे कॉलनीत अजून एक बॉडी सापडते आणि ती बॉडी जयराम डिटेक्टिव्हची असल्याचं आपल्याला समजतं. हे दोन्ही मृत्यू एकमेकांशी संबंधित आहेत का याचा संशय आपल्याला येतो...” सचिनचं बोलणं पुढे नेत आनंद म्हणाला, "त्या पंपावरच्या सोनूकडून आणि त्या कंडक्टरकडून आपल्याला एका दाढीवाल्याबद्दल समजतं आणि त्याचा माग काढत आपण इथे येतो. आणि त्या मुलीचा खून इथेच झाल्याचे पुरावे आपल्याला सापडतात. इतकंच नाही, तर जयरामचा या केसशी काहीतरी संबंध आहे हे सुद्धा समोर येतं. सरांचा तर्क परफेक्ट होता. जयरामचा खून आणि त्या मुलीचा खून, या दोन्ही एकाच केसच्या दोन बाजू आहेत. ही बाब आपल्याला सरांना कळवायला हवी...” इतकं बोलून आनंदने फोन काढला आणि प्रधानांचा नंबर मिळावला...

तिथे जीप एका इमारतीच्या आवारात शिरली. उमा आणि प्रधान एका घराच्या दारासमोर आले. बाजूला पाटी होती, मधुकर सबनीस. प्रधानांनी बेल वाजवताच एका साठीच्या आस-पास असलेल्या माणसाने दार उघडलं. प्रधान आणि उमाला समोर पाहून त्याने डोळ्यांवरचा चश्मा सारखा केला आणि दोघांकडे पाहू लागला. प्रधान म्हणाले, “तुम्ही मधुकर सबनीस का...” त्या माणसाने मान डोलावली तसे आपलं कार्ड दाखवत प्रधान म्हणाले, “मी सीनियर इन्स्पेक्टर प्रधान आणि या सब-इन्स्पेक्टर उमा. आम्ही तुमच्या बाईकबद्दल...” प्रधान बोलतच होते की माधुकर मध्येच बोलते झाले, “सापडली माझी बाईक. चला बरं झालं. लवकर सापडली म्हणायची. सकाळीच तर तक्रार करून आलो मी. द्या चावी द्या. आता त्या जयरामला गाडीकडे पाहूसुद्धा देणार नाही...” मधुकरचं बोलणं ऐकून प्रधान आणि उमा चक्रावले. उमा म्हणाली, “म्हणजे, तुम्ही जयरामला ओळखता...” हे ऐकून दोघांकडे पाहत मधुकर म्हणाले, “ओळखता... अहो तो माझा भाडेकरू आहे. या आत या...” दोघं घरात गेली. मधुकरने पुन्हा बोलायला सुरुवात केली, “साहेब, मी आणि माझी बायको शिल्पा, आम्ही दोघंच असतो इथे. माझी मुलगी वैशाली सिंगापूरला असते. हा आणि बाजूचा असे दोन्ही फ्लॅट आमचे आहेत. वैशाली लग्न करून सिंगापूरला गेल्यावर हे दोन्ही फ्लॅट सांभाळणं आम्हाला कठीण जाऊ लागलं. म्हणून एक फ्लॅट भाड्याने द्यायचं ठरलं...

सहा महिन्यांपूर्वी जेव्हा वैशाली आणि जावईबापू इथे आले होते, तेव्हा त्यांनीच हे सुचवलं. त्याप्रमाणे या जयरामला तो बाजूचा फ्लॅट भाड्याने दिला. हा जयराम म्हणे स्वत:ला गुप्तहेर म्हणवतो. त्यानेच माझी बाईक आवारात पाहिली आणि त्याबद्दल मला विचारलं. मी विचार केला, तेवढीच ती बाईक चलनात राहील. गाडीचं हवा-पाणी, पेट्रोल वगैरे जयराम पाहील या अटीवर मी त्याला बाईक वापरण्याची परवानगी दिली. दररोज सकाळी जयराम बाईक घेऊन जायचा आणि रात्री कितीही उशीर झाला तरी चावी मला आणून द्यायचा. परवापर्यंत सगळं ठीक होतं. काल जयराम जो गेला तो परतलाच नाही. हां, दुपारी आला होता. पण लगबगीने पुन्हा बाहेर पडला तो अजून त्याचा पत्ता नाही. मी रात्रीपासून त्याला इतके फोन केले, पण जवाबच नाही. म्हणून शेवटी थोड्या वेळापूर्वी मी तक्रार करून आलो...” सर्व ऐकून घेत प्रधान म्हणाले, “मि. सबनीस, जयरामचा खून झाला आहे. जिथे त्याची बॉडी मिळाली तिथेच तुमची बाईक पण मिळाली आहे...” हे ऐकून मधुकरना थोडा धक्का बसला. ते थोडे कोलमाडल्यासारखे झाले, तेव्हा उमाने त्यांना बसवलं आणि पाणी दिलं. पाणी पिऊन मधुकर थोडे स्थिरावले तेव्हा उमा म्हणाली, “मि. सबनीस, आम्हाला तो बाजूचा फ्लॅट पाहता येईल का, ज्यात जयराम राहत होता...”

मधुकरकडून बाजूच्या फ्लॅटची डुप्लीकेट चाव घेऊन प्रधानांनी लॉक उघडलं. दोघंही आत शिरली. एक हॉल, छोटं किचन आणि वॉशरूम इतकीच जागा होती. हॉलमध्ये एका बाजूला एक बेड होता ज्यावर चादरी अस्ताव्यस्त पडल्या होत्या. बेडच्या बाजूला असलेल्या टेबलवर कागदपत्र, काही कात्रणं, काही फोटोज यांचा पसारा पडला होता. एका बाजूला एक बंद कपाट होतं. टेबलवरची कागदपत्र पाहण्यात उमा गर्क झालेली पाहून प्रधान कपाटाकडे वळले. त्यांनी कपाट उघडण्याचा प्रयत्न केला. पण ते लॉक होतं. प्रधानांनी हँडलला बरेच हिसडे दिले आणि कपाट उघडलं. आत कपड्यांसह काही पैसे, मेकपचं सामान, काही फाईल्स असं बरंच काही होतं. हातात दाढी आणि फाईल्स घेत प्रधान म्हणतात, “बरेच केसेस हाताळत होता हा जयराम. बऱ्याच फाईल्स आहेत इथे. या दाढी-मिशा, या टोप्या,..” प्रधानांना दुजोरा देत उमा म्हणाली, “हो ना, या टेबलवर पडलेली कागदपत्र आणि फोटोही तेच सांगतात...” बोलता बोलता उमाची नजर एका कात्रणावर पडली. त्या कात्रणावर हेड लाईन होती, “कामोठे येथे लागलेल्या आगीत ग्लास फॅक्टरी जळून बेचिराख...”

प्रधानांना बोलवत उमाने ते कात्रण दाखवलं. प्रधानांनी त्या कात्रणातला मजकूर वाचला आणि म्हणाले, “यात तर त्या शाईन ग्लासेसच्या वर्कशॉपबद्दल लिहिलं आहे...” प्रधानांना दुजोरा देत उमा म्हणाली, “पण त्याचं कात्रण जयरामकडे काय करतंय...” बोलता बोलता प्रधानांनी त्यांच्या हातात असलेली एक फाईल उघडली. त्यातून एक फोटो खाली पडला. तो फोटो एका मुलीचा होता आणि फोटोच्या मागे काहीतरी लिहिलं होतं. उमा म्हणाली, “सर, फोटोच्या मागे काहीतरी लिहिलं आहे. रोझॅन, १२ मूनव्हिला, चेंबूर, शाईन ग्लासेस...” ते वाचून प्रधान विचारात पडले. उमाकडे पाहत ते म्हणाले, “कोण असावी ही रोझॅन... आणि शाईन ग्लासेसशी तिचा काय संबंध असावा...” प्रधान बोलत असताना उमाला टेबलवर अजून एक कागद सापडला, ज्यावर संतोष देसाई हे नाव लिहिलं होतं. प्रधानांना तो कागद दाखवत उमा म्हणाली, “सर, या कागदावर संतोष देसाई लिहिलं आहे. संतोष देसाई म्हणजे त्या शाईन ग्लासेसचे मालक ना... त्यांचं नाव जयरामकडे...”

प्रधान काही बोलणार इतक्यात त्यांचा फोन वाजला. पलिकडे आनंद होता, “यस आनंद. हां... आय न्यू इट. देयर इज अ कनेक्शन. आनंद, तू आणि सचिन, मी देतो त्या पत्त्यावर जाऊन रोझॅन नावाच्या मुलीची चौकशी करा. तिचा संबंध शाईन ग्लासेसशी असल्याचे काही पुरावे इथे जयरामच्या घरी सापडलेत. तिचा फोटोही मी पाठवतो तुला. आणि आम्ही त्या संतोष देसाईला जाऊन भेटतो...” फोन ठेवत प्रधान म्हणाले, “त्या शाईन ग्लासेसच्या वर्कशॉपमध्ये आनंद आणि सचिनला बरंच काही सापडलं आहे. त्या निनावी मुलीचा खूनही तिथेच झाल्याच्या खुणा तिथे आहेत. काही टायर मार्क्स सापडले आहेत. शिवाय या जयरामने लिहिलेला एक कागदही तिथे सापडला आहे. डॅट मीन्स देयर इज अ डेफिनेट कनेक्शन इन बोथ दीज मर्डर्स. आनंद आणि सचिन त्या रोझॅनची चौकशी करायला चेंबूरला निघालेत. आपण त्या संतोष देसाईला जाऊन भेटू. लेट्स गो...”

प्रधान आणि उमा जीपने निघाले. बराच प्रवास केल्यावर जीप एका बंगल्याच्या आवारात शिरली. वॉचमॅनने जीपला हटकलं तसं प्रधानांनी त्यांचं आय.डी. कार्ड दाखवलं. वॉचमॅनने सलाम ठोकला आणि मार्गातून बाजूला झाला. बंगला छोटेखानीच होता. एका बाजूला एक गाडी पार्क केलेली दिसली आणि गाडीच्या बाजूला एक बाईक उभी होती. जीप त्या गाडीच्या समोर लावत प्रधान आणि उमा उतरून आधी बाईककडे वळले. जंगलातून भरधाव वेगाने निघून गेलेली दुसरी बाईक हीच असावी ही शंका येऊन प्रधान आणि उमा बाईकचे टायर्स चेक करत होते. इतक्यात दारातून आवाज आला, "ती माझी गाडी आहे साहेब. काय हवं आहे तुम्हाला..." प्रधान आणि उमाने वळून पाहिलं तर एक जाडासा माणूस समोर उभा होता. त्याच्याकडे येत प्रधान म्हणाले, "मी सीनियर इंस्पेक्टर प्रधान आणि या सब-इंस्पेक्टर उमा. तुम्हीच संतोष देसाई... शाईन ग्लासेसचे मालक..." त्या माणसाने होकार देताच उमा म्हणाली, "आम्हाला तुमच्या कामोठेला असलेल्या वर्कशॉपबद्दल बोलायचं आहे..." संतोषने दोघांना आत बोलावलं आणि वॉचमॅनला हात करून स्वत: आत येत म्हणाला, "कामोठेचं वर्कशॉप. पण सर ते तर बंद आहे. जवळ जवळ दीड वर्ष झालं...

काय सांगू सर, ती जागा म्हणजे पनवतीच आहे. आधी ज्याच्याकडे होती त्याला धंद्यात खोट बसली. अर्ध्या किमतीत मला जागा विकली त्याने. मीही विचार केला, मुंबईबाहेर धंदा वाढवायला ही जागा कामी येईल. पण कसलं काय साहेब... वर्षभरापूर्वी तिथे आग लागली. माझं खूप नुकसान झालं त्या आगीमुळे. म्हणून मग तिकडचा सगळा कारभार गुंडाळला. आता मी मुंबईतूनच सांभाळतो. थोडा ताण प़डतो, पण इलाज नाही..." संतोषचं म्हणणं ऐकून प्रधान म्हणाले, "मग विकली का नाही ती जागा. दीडेक वर्ष तशीच का ठेवली..." प्रधानांकडे पाहत संतोष म्हणाला, "साहेब, त्या जागेबद्दल सर्वांना माहित आहे. म्हणून कोणी ती जागा घ्यायला तयार नाही. मी बरेच प्रयत्न केले. पण काही उपयोग नाही झाला..." संतोषला मध्येच तोडत उमा म्हणाली, "मग एखादा वॉचमॅन किंवा गार्ड तरी नेमायचा तिथे..." उमाकडे पाहून संतोष हसत म्हणाला, "मॅडम, माझं खूप नुकसान झालं त्या जागेमुळे. त्या आगीत माल तर गेलाच. पण तिथे ठेवलेली मशीन्सदेखील निकामी झाली. जागेचा टॅक्स तर देतोच आहे मी सरकारला. अजून सिक्यूरिटी ठेवून तो खर्च का सोसू मी... पण साहेब, इतक्या काळानंतर त्या वर्कशॉप बद्दल तुम्ही का चौकशी करताय..."  प्रधान आणि उमाने एकमेकांकडे पाहिलं. मग संतोषकडे पाहत प्रधान म्हणाले, "मि. देसाई तुमच्या त्या जागेचा वापर एका खुनासाठी झाला आहे..."

हे ऐकून संतोषला धक्का बसला. स्वत:ला सावरत तो म्हणाला, "साहेब. मला या याबद्दल काहीच माहित नाही..." हे ऐकून पुढे येत उमा म्हणाली, "माहित कसं नाही... मि. संतोष, जागा तुमची, चाव्या तुमच्याकडे, तिथे कोणी वॉचमॅन नाही, जागा शहरापासून आणि हायवेपासून लांब, तुमच्या वर्कशॉपच्या आजू-बाजूच्या फॅक्टऱ्या आणि गोडाऊन्स काही अंतरावर, या सगळ्याचा फायदा उचलून तुम्हीच खून केला नाही कशावरून..." उमाचा चढा आवाज ऐकून संतोष थोडा घाबरला. मग गळ्याला हात लावत म्हणाला, "धंद्याची शप्पथ मॅडम. मला या बद्दल काहीही माहीत नाही. सर, ग्लासना लावलेल्या फ्रेम्स बदलून नवीन फ्रेम्स बसवण्याचा धंदा आहे माझा. आधी मुंबईहून काम पहायचो. कामोठ्याची जागा मिळाल्यावर धंद्याचा काही भाग तिथून करू लागलो. पण तेवढंच साहेब. मी गेलं दीड वर्ष तिथे फिरकलोच नाही. जागा विकायची जबाबदारीसुद्धा मी माझ्या मॅनेजर गगनवर सोपवली. अधून-मधून जागेसाठी गिऱ्हाईक आलं म्हणून गगन माझ्याकडे चाव्या मागायला येतो. तेवढाच काय तो माझा संबंध. सेन्ड-ऑफच्या दिवशी जो मी शेवटचा तिथे गेलो, त्यानंतर त्या जागेकडे तोंडही फिरवलं नाही..." सेन्ड-ऑफ हा शब्द ऐकताच प्रधान आणि उमाने एकमेकांकडे पाहिलं. मग संतोषकडे पाहत दोघं एकदम म्हणाली, "सेन्ड-ऑफ... म्हणजे..."

तेव्हा संतोषने बोलायला सुरुवात केली, "साहेब त्या आगीत सगळा माल नष्ट झाला. मशीन्स निकामी झाली. मग मी तिथलं काम बंद करण्याचा निर्णय घेतला. तिथे सात वर्कर्स आणि दोन ऑफिस स्टाफ, असे नऊ जण काम करायचे. तिथलं काम बंद झाल्यावर त्या सर्वांना मुंबईतल्या फॅक्टरीत काम देतो असं सांगितलं मी. पण दोघं-तिघं सोडले तर बाकी सर्वांनी नकार दिली. मी सर्वांचे पगार दिले आणि जवळच असलेल्या हॉटेलमध्ये त्यांना सेन्ड-ऑफ दिला. तिथे काढलेले फोटोही आहेत माझ्याजवळ. ते दाखवू का तुम्हाला..." प्रधानांनी होकार देताच संतोष बेडरूमकडे गेला. उमाकडे पाहत प्रधान म्हणाले, "काय वाटतं तुला, हा खरं बोलतोय..." बेडरूमच्या दिशेने पाहत उमा म्हणाली, "सर, संशय अजूनही संतोषवरच आहे मला. पण तो गगनही असू शकतो. चाव्या तर त्याच्याकडेही असतात कधीतरी..."

दोघं बोलत असताना संतोष एक अल्बम घेऊन आला. एकेक फोटो पाहत असताना एक ग्रूप फोटो समोर आला. त्यातल्या दोघांचे चेहरे पाहून उमा आणि प्रधान आश्चर्यचकित झाले. उमा म्हणाली, "सर हे दोघं तर..." त्यावर संतोष म्हणाला, "हे माझ्या ऑफिस स्टाफ पैकी दोघं आहेत..." यावर प्रधान काही बोलणार इतक्यात त्यांचा फोन वाजला. समोरून आनंद म्हणाला, “सर, इथे चेंबूरला रोझॅन जिथे राहत होती तिथे आम्ही गेलो. आम्हाला तिची एक मैत्रीण शलाका भेटली. सर, शलाकाचं म्हणणं आहे, रोझॅन गेले दोन-तीन दिवस आलीच नाही घरी. परवा तिचा फोन आला की ती काही दिवस बाहेरगावी जात आहे. त्यानंतर काही खबर नाही तिची. सर, तुम्ही पाठवलेल्या फोटोमधली मुलगी रोझॅन नाही. शलाकानेही त्या मुलीला ओळखलं नाही. रोझॅनचा फोटो पाठवला आहे तुम्हाला. आम्ही दोघं चौकीकडे यायला निघालो आहोत...” फोन बंद झाला. प्रधानांनी आनंदने पाठवलेला फोटो पाहिला आणि त्यांचे डोळे विसफारले. तो फोटो संतोषला दाखवत प्रधानांनी विचारलं, “ही मुलगी तुमच्याकडे कामाला होती ना...” फोटो पाहत संतोष म्हणाला, “हो सर, हिचं नाव रोझॅन आहे. त्या कामोठेच्या वर्कशॉपमध्ये ही ऑफिस सांभाळायची. त्या ग्रूप फोटोमध्ये पण आहे ती...” प्रधानांनी लगेच आनंदला फोन लावला, “आनंद, मी तुला एक पत्ता पाठवत आहे. तू आणि सचिन ताबडतोब तिथे पोहोचा. वी हॅव्ह गॉट आवर बर्ड...” प्रधानांनी फोन ठेवला आणि उमासह तडक निघाले...

उमाने बेल वाजवली. दार उघडताच समोरची व्यक्ती चपापली. ती अनिता होती. मागे सरकत म्हणाली, "तुम्ही... परत... आता काय राहिलं..." उमा आणि प्रधान आत गेले. अनिताकडे पाहत उमा म्हणाली, "तुम्ही बाहेर निघालात वाटतं. पण तुम्हाला जाणं कँसल करावं लागेल..." यावर आश्चर्य व्यक्त करत असलेल्या अनिताकडे पाहत प्रधान म्हणाले, "मॅडम, या आधी आम्ही तुम्हाला इथे भेटलो तेव्हा तुमची गाडी गायब झाल्याचं समजलं ना आपल्याला... ती गाडी कशी गायब झाली हे तुम्हाला सांगावं म्हणून आलो इथे..." "मला काहीही ऐकून घ्यायचं नाही..." असं म्हणत अनिता किचनच्या दिशेने जाऊ लागली. उमाने तिचा हात धरून तिला फिरवलं आणि एक थोबाडीत लगावली. त्या धक्क्याने अनिताचा तोल गेला आणि ती सोफ्यात आदळली. त्याच वेळी जयेशला घेऊन सचिन आणि आनंद किचनच्या दिशेने आत आले. जयेशला अनिताच्या शेजारी बसवत आनंद म्हणाला, "सर हा मागच्या दाराने बाहेर पळाला. आम्ही याला हटकलं तर आरेरावी करू लागला..." आनंदचं म्हणणं पुढे नेत सचिन म्हणाला, "म्हणून सर याच्या मुसक्या बांधून आम्ही याला इथे आणलं..."

दोघांवर नजर रोखत प्रधान म्हणाले, "आता ताबडतोब पोपटपंची सुरू करा... नाहीतर..." प्रधानांची जरब पाहून दोघंही घाबरली आणि अनिताने बोलायला सुरुवात केली, "मी अनिता चौधरी नाही. माझं नाव रोझॅन आहे. मी आणि जयेश, शाईन ग्लासेसच्या कामोठेच्या वर्कशॉपचं ऑफिस सांभाळायचो. गगनसाहेब महिन्यातून एक चक्कर टाकायचे. बाकी आम्ही दोघंच तिथे असायचो. हळू हळू आमच्यात मैत्री झाली आणि त्याचं रुपांतर प्रेमात झालं. वर्कशॉप सहा वाजता बंद व्हायचं. त्यानंतर आम्ही दोघं इथे वेळ घालवायचो..." रोझॅनचं म्हणणं पुढे नेत जयेश म्हणाला, "आमचं सुरळीत चालू होतं. पण दीड वर्षापूर्वी एक दिवस गगन म्हणाला की इथे ऑडिट होणार आहे. तेव्हा आम्ही घाबरलो. कारण अकाऊंट्समध्ये फेरफार करून आम्ही बरेच पैसे मिळवले होते. ऑडिट झालं असतं तर आमची चोरी, आमचे संबंध उघडकीस आले असते. म्हणून आम्ही शॉर्टसर्किट घडवलं. ते वर्कशॉप राख झालं. त्यात अकाऊंट्स पण जळले. देसाईने वर्कशॉप बंद केलं आणि आम्हाला मुंबईला येण्यासाठी विचारलं. मुंबईत आम्हाला असं भेटता आलं नसतं. म्हणून आम्ही नकार दिला...

आमच्याकडे बऱ्यापैकी पैसा जमा झाला होता. मी नवा व्यवसाय सुरू केला. पण त्याबद्दल अनिताला माहित नव्हतं. तिला हेच वाटत होतं की मी अजून शाईन ग्लासेसमध्येच आहे. आता रोझॅनला भेटणं अजून सोपं झालं होतं. बाहेर कुठे भेटण्यापेक्षा ते बंद वर्कशॉप जास्त सेफ होतं. मी वर्कशॉपच्या चाव्यांची डूप्लिकेट बनवून घेतली होती आणि वर्कशॉपला एक वळकटी आणि पाण्याचा माठही ठेवला. जवळ जवळ रोजच आम्ही त्या वर्कशॉपला भेटत होतो. कधी कधी तर आम्ही तिथे रात्रही घालवायचो. सगळं कसं छान सुरू होतं. कालही आम्ही दोघं असेच भेटलो. पण न जाणो अनिता तिथे कशी कडमडली. तिने पुरुषी कपडे घातले होते. त्या डिटेक्टिव्हनेच हा पत्ता दिला होता अनिताला. पत्ता लिहिलेला कागद घेऊन ती तिथे पोहोचली आणि आम्हाला नको त्या अवस्थेत पाहून तमाशा करू लागली..." पुढे बोलत रोझॅन म्हणाली, "अनिताला समोर पाहून आम्ही गडबडलो. मी ताबडतोब तिचं तोंड दाबलं. जयेशने अनिताच्या हातून कागद खेचून फाडून टाकला आणि माझ्या मदतीला आला. आम्ही दोघांनी तिला गादीवर झोपवली. मी तिचे हात गच्च धरून ठेवले आणि जयेशने तिचा गळा आवळला. अनिताची थोडी तडफड झाली आणि तिने प्राण सोडला...

अनिता मेल्यावर घडला प्रकार आमच्या लक्षात आला. अनिताचं प्रेत आमच्यासमोर पडलं होतं. काय करावं हे मला सुचत नव्हतं. मग जयेशला युक्ती सुचली आणि आम्ही अनिताच्या बॉडीला खाली आणलं..." रोझॅनने जयेशकडे पाहिलं तसा जयेश पुन्हा बोलू लागला, "या वर्कशॉपमध्ये आरशाच्या मेटल फ्रेम्स री-सायकल केल्या जायच्या. मेटल वितळवण्यासाठी वर्कशॉपमध्ये एक स्प्रे होता. स्प्रेच्या नोझलमध्ये ऍसिड असलेली कॅप्सूल घालून फ्रेम्सवर स्प्रे केलं जायचं. मेटल वितळायचं आणि नवीन फ्रेम्ससाठी लिक्विड मेटल तयार व्हायचं. ज्या दिवशी आग लागली त्या दिवशी एक ऍसिड कॅप्सूल नोझलमध्ये घातली गेली होती पण तिचा वापरच झाला नाही. मी तोच स्प्रे वापरायचं ठरवलं. अनिताच्या प्रेताला त्या स्प्रेला साखळदंडांनी बांधलं आणि स्प्रे ऑन केला. डोक्यापासून सगळं शरीर वितळू लागलं. पण तेवढ्यात कॅप्सूलमधलं ऍसिड संपलं. बॉडी पूर्ण नष्ट नाही होऊ शकली. मी वर्कशॉपच्या बाहेर डोकावलं तर अनिता तिची गाडी घेऊन आली होती. मला एक कल्पना सुचली. मी वेषांतर केलं. रोझॅनला इथे भेटायला येताना करायचो तसं. मग आम्ही दोघांनी अनिताची बॉडी खाली उतरवली. ती जड बॉडी जमिनीवर सांडलेल्या ऍसिडमध्ये पडली. आम्ही बॉडी एका बोरीमध्ये घातली आणि बोरी फरफटत नेऊन अनिताच्या गाडीत ठेवली. मी रोझॅनला घरी पाठवलं आणि स्वत: अनिताची गाडी घेऊन निघालो. माझी आयडिया होती, गाडी एखाद्या निर्जन स्थळी नेऊन अनिताला ड्रायव्हर्स सीटवर बसवायचं आणि गाडी पेटवून द्यायची. पण..."

जयेशला मध्येच तोडत प्रधान म्हणाले, "पण तुमचं नशीब खराब निघालं. बाबूने पेट्रोल पम्पावरून गाडी पळवली आणि घाटाच्या तोंडाशी त्याने ऍक्सीडेंट केला. तेव्हा अनिताची बॉडी उघडकीस आली..." जयेश पुन्हा बोलू लागला, "गाडी पळवली तेव्हा काय करावं मला समजत नव्हतं. मी बस पकडून परत निघालो. बॉडी समोर येणार हे मला कळून चुकलं होतं. तेवढ्यात मला आठवलं की माझी बाईक वर्कशॉपच्या बाहेरच होती. मी लगेच उतरलो आणि बाईक घ्यायला गेलो. यातून कसं वाचायचं आणि त्या जयरामचं काय करायचं हेच विचार करत होतो. अनिताची पर्स रोझॅन घेऊन गेली होती. मी रोझॅनला अनिताचा फोन चेक करून जयरामला अनिताच्याच फोनवरून फोन करून आरे कॉलनीत बोलवायला सांगितलं. जयराम कसा येतोय आणि कसा दिसतो हेसुद्धा रोझॅनने शोधून काढलं. मी जयरामला गाठलं आणि डोक्यात दगड घालून त्याला ठार मारलं. त्याच्या प्रेताची विल्हेवाट लावणारच होतो, की मला कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला. मी जयरामची बॅग खेचली आणि लगेच तिथून सटकलो. मग अनिताचा खून पचवण्यासाठी मी रोझॅनला घरी येऊन अनिता बनून रहायला सांगितलं. पण हे सगळं तर मी म्हणतोय. तुम्ही लोक सिद्धच करू शकत नाही की हे खून मी केलेत...”

जयेश बोलतच होता, की प्रधानांना डॉ. गोखलेंचा फोन आला, "येस डॉक..." डॉ. गोखलेंचं म्हणणं ऐकून जयेशकडे पाहत प्रधान म्हणाले, "जयेश, जरी अनिताच्या शरीराचा अर्धा भाग विद्रूप झाला असला, तरी आमच्या डॉ. गोखलेंनी शरीराला बोलतं केलं. तिच्या हातांवर, पायांवर, आणि तिथे सापडलेल्या साखळदंडांवर तुझे आणि रोझॅनचे फिंगर प्रिंट्स सापडलेत. संतोष देसाईच्या अल्बममध्ये तुमचे फोटो आहेत. शिवाय संतोष आणि गगन आहेतच साक्ष द्यायला. आणि हो, तुझ्या बाईकच्या साईड डिककीत आम्हाला जयरामची ही बॅग सापडली ज्यात तुम्ही दोघं गुन्हेगार असल्याचे सबळ पुरावे आहेत. आता काय म्हणणं आहे तुझं..." हे ऐकून जयेश काही बोलत नाही हे पाहून प्रधान खूप चिडले. दोघांकडे नजर रोखून पाहत ते म्हणाले, "काय म्हणावं तुम्हा दोघांना... स्वार्थापोटी, बतफैलपणापोटी एक नाही, दोन नाही तर तीन तीन अपराध केलेत तुम्ही. देसाईच्या व्यवसायाचं नुकसान केलंत, अनिता आणि जयराम या दोन निष्पाप जिवांची हत्या केलीत. तुम्हाला फाशीची शिक्षा सुद्धा कमी आहे..."

समाप्त.

@ अनिकेत परशुराम आपटे.

No comments:

Post a Comment