Thursday, September 12, 2024

खानावळ...

नमस्कार...

एकाच कथेला दोन उत्तरार्ध लिहिण्याचा मी प्रयत्न केला आहे. कृपया गोड मानून घ्या...


खानावळ...

संध्याकाळ उलटून चालली होती. वेळ रात्रीच्या कुशीत शिरत होती. दुतर्फा झाडी असलेल्या निर्मनुष्य रस्त्यावरून गाडी वेगाने पुढे चालली होती. खिडकीबाहेर न दिसणाऱ्या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करून सुहासकडे वळून सीमा म्हणाली, "तरी मी सांगत होते लवकर निघू. पण तुला मॅच पहायची होती ना... आता घे... जंगलातच अंधार झाला..." सीमाकडे कटाक्ष टाकत सुहास म्हणाला, "डोंट वरी सीमू... When I am hear, there is every reason to fear..." हे ऐकून सीमाच्या कपाळावर आठ्या आल्या आणि ते पाहून सुहास थोडा हसला. हसतानाच सुहास म्हणाला, "बरं सीमू, भूक लागली यार... जरा गूगलवर चेक कर ना आस-पास कुठे हॉटेल आहे का..."

सीमाने फोनवर मॅप चालू केला. मॅपमध्ये असलेल्या कंपॉसच्या सुईची दिशा वेगळीच वाटत होती. "अजबच आहे... गाडी जाते ती दिशा न दाखवता ही सुई उलट्या दिशेला वळली आहे..." सीमा बोलतच होती की सुहासला गाडीच्या लाईटच्या प्रकाशात दूरवर काहीतरी दिसलं. सुहास म्हणाला, "अगं जंगल आहे. दिशा चुकू शकतात इथे. बरं ते लांबवर काहीतरी दिसतंय. बहुतेक कोणीतरी रस्त्याच्या कडेने चाललंय. जवळच्या वस्तीतली किंवा खेड्यातली व्यक्ती असावी..." बोलता बोलता सुहासने गाडीचा वेग कमी केला. रस्त्याच्या कडेला हातात काठी घेतलेला, धोतर नेसलेला आणि डोक्यावरून घोंगडी घेतलेला एक माणूस चालला होता. सुहासने गाडी त्याच्या जवळ आणून थांबवली. गाडी थांबलेली पाहून तो माणूस गाडीच्या जवळ आला. काच खाली करून सीमा म्हणाली, "काका, आम्ही प्रवासाला निघालोत. भुकेने कासावीस झालोत. इथे जवळ कुठे हॉटेल वगैरे आहे का..."

सीमावरून सुहासकडे पाहत तो म्हणाला, "हाटील... न्हाय बा. हितं आसं काय बी न्हाय... हा, पर येक खानावल हाय म्होरं. आक्शी झाक ज्येवन बगा... येकदा थितं गेलात की भाईरच न्हाय येनार तुम्मी..." सीमा आणि सुहासने त्या माणसाकडे पाहून स्मित केलं आणि त्याला धन्यवाद देत गाडी पुढे सरकवली. पुढे जाताना सुहासने सहज आरशात पाहिलं तर तो माणूस रस्त्याच्या मधोमध उभा राहून गाडीकडेच पाहत होता. सुहास पुन्हा समोर पाहू लागला. सुहास एकदम गप्प झालेला पाहून सीमा त्याला कोपर मारत म्हणाली, "भूक वाढलेली दिसते... काही बोलत नाहीस ते..." नजर रस्त्यावर ठेवत सुहास म्हणाला, "मी त्या माणसाचा विचार करतोय. जंगल सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत आपल्याला चिटपाखरूही दिसलं नाही आणि अचानक तो माणूस दिसतो... थोडं ऑड नाही वाटत..." यावर सीमा काहीच बोलली नाही. गाडीने एक वळण घेतलं आणि काही अंतरावर त्यांना एक पाटी दिसली. त्यावर खडूने लिहिलं होतं, "म्हादूची खानावळ..."

बाजूलाच लाल मातीचा एक छोटा रस्ता होता आणि रस्ता संपतो तिथे झापाची कौलं असलेलं एक घर होतं. ओसरीत वरच्या बाजूला टांगलेला कंदिल लुकलुकत होता. सुहासने गाडी घराजवळ नेली. घराबाहेर एक-दोन बैल गाड्या आणि दोन-पाच सायकली दिसत होत्या. सुहासने एका झाडाखाली गाडी लावली. "काय मस्त आहे रे सगळं. या जमान्यातही अशी घरं अस्तित्वात आहेत तर... मला तर फोटो काढायची जाम इच्छा होत आहे..." गाडीतून उतरत असताना सीमा म्हणाली. सीमाला घराकडे ढकलत सुहास म्हणाला, "फोटो नंतर... आधी पोटोबा मग फोटोबा..." दोघंही आत गेली. आत अर्धगोलाकार सतरंज्या हंतरल्या होत्या आणि काही माणसं त्यावर बसली होती. सुहास म्हणाला, "अरे वाह... भारतीय बैठक... एकदम ऑथेंटिक..." सीमाने स्मित केलं. समोरच असलेल्या दोन रिकाम्या जागांवर दोघं जाऊन बसली. एक बाई आतून बाहेर आली. सीमा आणि सुहासला पाहून ती पुन्हा आत गेली आणि देन ताटं घेऊन आली आणि सीमा व सुहास समोर ती ताटं ठेऊन आत निघून गेली...

ताटात वरण, भात, पोळ्या, भाज्या, पापड, चटण्या असं सगळं वाढलेलं होतं. ते जिन्नस पाहून सीमा आणि सुहासने एकमेकांकडे पाहिलं. "आक्शी पॉटभर ज्येवा बरं का... लागंल त्ये मागून घ्या..." हातात दोन मोठाले पेले घेऊन उभ्या मावशी हसत म्हणाल्या. त्या मावशी अचानक समोर आल्याने दोघं दचकली. पेला ताटांजवळ ठेवत त्या मावशी म्हणाल्या, "म्या श्येवंता. हितलं समदं म्या आन माजं धनी आम्मी दोगं बगतू..." स्वत:ला सावरत, शेवंताकडे पाहून स्मित करत दोघं जेऊ लागली. जेवताना सीमाने सहज आजू-बाजूला पाहिलं. सर्वजण एकदम शांत होते. त्यांची ताटंही रिकामी झाली तरीही ते सर्व तसेच बसून होते. नवल वाटून सुहासला कोपर मारत सीमा हलक्या स्वरात म्हणाली, "सुहास, ही सगळी माणसं अशी का बसली आहेत... त्यांचं जेवण झालं तरी उठत नाहीत..."

उत्तरार्ध पहिला...

तेवढ्यात, "त्येंचं ज्यावन जालंय. पर ती उटायची न्हाइत. तुम्मी ज्येवा बगू बिगी-बिगी..." पुन्हा आलेल्या आवाजाने दोघं चपापली. समोर शेवंता उभी होती. दोघांची जेवणं उरकत आलेली पाहून ती ताकाच्या वाट्या घेऊन समोर उभी होती. दोघांनीही ताक प्यायलं आणि पानावरून उठली. सुहासने जेवणाचे पैसे विचारले तर शेवंता म्हणाली, "तुमच्याकडनं पैकं घ्यनार न्हाय म्या. तुम्मी पॉटभर ज्येवलात. म्या भरून पावले. बरं आता निघा बगू. घाई करा. धा वाजले, आन माजं धनी आलं तर म्या काईच न्हाय करू शकनार..." सीमा आणि सुहासने शेवंताकडे चमत्कारीक नजरेने पाहिलं. मग शेवंताला वाकून नमस्कार करून दोघं बाहेर पडली. गाडीकडे जाताना दोघांनी मागे पाहिलं तर दारात शेवंता उभी होती. हात ऊंचावून सांगत होती, "जावा जावा... घाई करा... आज्याबात मागं बगू नका... आन ह्ये वन संपस्तोवर कुटं बी थांबू नगा..." सीमा आणि सुहास गाडीत बसले. गाडी लाल मातीचा रस्ता ओलांडू लागली...

अचानक वारा वाहू लागला आणि एक कागदाचा चिठोरा सीमाच्या हाताला येऊन चिकटला. सीमाने तो चिठोरा पाहिला. तो कागद वर्तमान पत्रातला एक चिठोरा होता. सीमाने मजकूर वाचला, "रात्री दहाच्या सुमारास खानावळीत लागलेल्या आगीत सापडून इतर गिऱ्हाइकांसोबत खानावळीचे मालक म्हादू पाटील आणि त्यांची पत्नी शेवंता पाटील मृत्यूमुखी..." मजकूराच्या खाली म्हादू आणि शेवंताचे फोटो होते. चिठोऱ्यावर साल दिसत होतं १९०६. फोटो पाहत सीमा म्हणाली, "सुहा...स... अरे हा त...र... तोच आहे ज्याने आ...पल्या...ला खानावळीचा पत्ता..." हे ऐकून सुहासने करकचून ब्रेक मारला. स्वत:भोवती एक गिरकी घेऊन गाडी थांबली. मुख्य रस्त्यापासून आत असलेलं ते कौलारू घर जळत होतं. ज्वाळा आसमानाला भिडत होत्या. हे दृष्य पाहून दोघांचेही डोळे विस्फारले. "कशी वाटली म्हादूची खानावल..." हा आवाज ऐकून दोधं स्तब्ध झाली...

आवाज मागच्या सीटकडून येत होता. दोघांनी आरशात पाहिलं तर मागच्या सीटवर म्हादू बसला होता. दोघांनी वळून पाहिलं. पण मागच्या सीटवर कोणीच नव्हतं. दोघं पुन्हा आरशात पाहू लागली तर त्यांना म्हादू दिसला. दोघांनाही दरदरून घाम फुटला. कर्कश आवाजात म्हदू म्हणाला, "शेवंतानं सांगितलं व्हतं ना गाडी कुटं बी थांबवू नगा म्हनून... थांबला तो संपला... ते थांबले... ते संपले... तुम्मी बी थांबलात... तवा तुम्मी बी... हा...हा...हा..." हे ऐकून सीमा आणि सुहासने किंकाळ्या फोडल्या. गाडीने अचानक पेट घेतला आणि क्षणार्धात तिचा स्फोट झाला...

उत्तरार्ध दुसरा...

तेवढ्यात, "त्येंचं ज्यावन जालंय. पर ती उटायची न्हाइत. तुम्मी ज्येवा बगू बिगी-बिगी..." दारातून आलेल्या या शब्दांनी सीमा आणि सुहास चपापले. दारात तोच मगाचचा माणूस उभा होता ज्याने या खानावळीचा पत्ता सांगितला. सीमा व सुहासचं जेवण झालंच होतं. पानावरून उठत सुहास म्हणाला, "अरे काका तुम्ही... धन्यवाद हं. अहो आम्ही भुकेने कासाविस झालो असताना तुम्ही देवासारखे भेटलात आणि आम्हाला या खानावळीचा पत्ता दिलात..." तो माणूस हसत म्हणाला, "आरं म्याच म्हादा... ही माजीच खानावल हाय. भुकेल्यासनी आन्नं खाऊ घालाया मला लई आवडतं. म्हनून ह्ये खानावलीचा खटाटोप..." सुहासने जेवणाचे पैसे विचारले तर म्हादू म्हणाला, "तुमच्याकडनं पैकं घ्यनार न्हाय म्या. तुम्मी पॉटभर ज्येवलात. म्या भरून पावलो. बरं आता निघा बगू. घाई करा. धा वाजले तर म्या काईच न्हाय करू शकनार..."

सीमा आणि सुहासने म्हादूकडे चमत्कारीक नजरेने पाहिलं. मग म्हादूला वाकून नमस्कार करून दोघं बाहेर पडली. गाडीकडे जाताना दोघांनी मागे पाहिलं तर दारात म्हादू उभा होता. हात ऊंचावून सांगत होता, "जावा जावा... घाई करा... आज्याबात मागं बगू नका..." सीमा आणि सुहास गाडीत बसले. गाडी लाल मातीचा रस्ता ओलांडू लागली. सुहासने सहज आरशात पाहिलं आणि गाडी थांबवली. दोघं बाहेर आली आणि विस्फारलेल्या नजरेने पाहू लागली. मुख्य रस्त्यापासून आत असलेलं ते कौलारू घर जळत होतं. ज्वाळा आसमानाला भिडत होत्या. वारा सुहास व सीमाच्या दिशेने वाहत होता. एक कागदाचा चिठोरा उडून सीमाच्या पायाशी आला. सीमाने तो उचलला. "अरे... हे कसं काय... मिनीटभरापूर्वी सगळं व्यवस्थित होतं आणि आता हे... म्हादू काका आणि बाकीच्यांना वाचवायला हवं..." असं म्हणत सुहास पुढे जाणार इतक्यात सीमाने त्याला अडवलं आणि तो कागद दाखवला...

तो कागद वर्तमान पत्रातला एक चिठोरा होता. त्यावर मजकूर होता, "रात्री दहाच्या सुमारास खानावळीत लागलेल्या आगीत सापडून इतर गिऱ्हाइकांसोबत खानावळीचे मालक म्हादू पाटील आणि त्यांची पत्नी शेवंता पाटील मृत्यूमुखी..." मजकूराच्या खाली म्हादू आणि शेवंताचे फोटो होते. चिठोऱ्यावर साल दिसत होतं १९०६. फोटो पाहून सुहासने सीमाकडे पाहिलं. दोघांचे डोळे पाणावले होते. घराकडे पाहून दोघांनीही हात जोडून नमस्कार केला...

@ अनिकेत परशुराम आपटे.

No comments:

Post a Comment