Wednesday, March 19, 2025

मृत्यूचा चित्रकार... (पहिला भाग)


नमस्कार. काहीवर्षांपूर्वी
, मी "मृत्यूची हाक..." या नावाने एक भयकथा लिहिली होती. कथा थोडक्यात अशी होती...

तीन मुलं आणि दोन मुली पिकनिकसाठी जात असताना रस्ता चुकतात. वाटेत त्यांना जंगल लागतं आणि जंगलात दडलेला एक वाडाही दिसतो. पाचही जण त्या वाड्यात जातात. लगेचंच त्यांना घड्याळाचे पाच टोले ऐकू येतात आणि त्यांच्यातल्या एकाचा मृत्यू होतो. टोले कमी होत जातात आणि एकामागून एक सगळे मृत्यूमुखी पडतात. सकाळी पोलीस तपासात एका ठिकाणी पाच प्रेतं सापडतात. सर्वाच्या मृत्युंचं कारण एकच असतं. Cardiac arrest. म्हणजे अचानक हृदय बंद पडल्याने झालेला मृत्यू...

याच "मृत्यूची हाक..." कथेचा sequel म्हणजे पुढचा भाग सादर करत आहे...

मृत्यूचा चित्रकार...

रात्र आपल्या गतीने चालली होती. सारं जग गाढ झोपेत मग्न होतं. भावना बेडवर पडली होती. तिची शुद्ध हरपली होती. अनेक वेगवेगळ्या विचारांनी तिच्या मनाची पकड घेतली होती. दयाळ काकांचे शब्द, आपल्या मित्रांची अवस्था, या सर्वांच्या विचारातच भावना शुद्धीवर आली. तिने डोळे उघडले आणि ती बेडवरच उठून बसली. सर्वत्र अंधार होता. तिने एकदा स्वतःला चाचपडलं, आणि आपण ठीक आहोत हे लक्षात येताच, तिला हायसं वाटलं. कूस बदलून भावना पुन्हा झोपणारच होती, की दारावर "ठक ठक..."चा आवाज आला...

त्या शांततेत तो आवाज अधिकच मोठा वाटत होता. भावनाने दाराकडे पाहिलं. खालच्या फटीत तिला सरकणारा प्रकाश आणि एक सावली दिसली. भीतीने तिच्या काळजात धस्स झालं. बेडवरून खाली उतरत भावना हळू हळू दाराकडे जाऊ लागली. तिने दाराला कान लावला. पण कुठलाच आवाज आला नाही. "बहुतेक मला भास झाला..." असा विचार करत भावना परत फिरली. तेवढ्यात पुन्हा दारावर थाप पडली. या वेळचा आवाज, मागच्या आवाजापेक्षा मोठा होता. जणू कोणी रागाच्या भरात दार ठोठावत होतं. भावना लगेच वळली आणि तिने खालच्या फटीकडे पाहिलं. आता तिथे तो प्रकाशही नव्हता आणि ती सावलीही नव्हती. आता मात्र भावना जास्तच घाबरली. ए. सी. सुरू होता तरीही ती घामाने थपथपली होती. थरथरत्या हाताने तिने हॅन्डल पकडलं आणि ते वळवून झटक्यात दार उघडलं. "आऽऽऽऽऽऽऽऽ..." भावनाची आर्त किंकाळी शांततेचा भंग करत होती...

काही तासांपूर्वी...

"एक दो तीन... चार पाँच छह सात आँठ नौ... दस ग्यारह... र आला भावनार..." ड्रायव्हरच्या बाजूला बसलेला गौरव गाणं गुणगुणत म्हणाला. थोडा विचार करून भावना गाऊ लागली, "राजा की आयेगी बारात... रंगीली होगी रात..." "कोण आहे गं तो handsome, ज्याच्या विचाराने हे गाणं सुचलं..." भावनाला मध्येच तोडत मंजू म्हणाली. त्यावर बाकी सर्व हसू लागले. सर्वांकडे पाहत भावना म्हणाली, "मला चिडवलंत तर निघून जाईन हां मी..." काय गं भावना, मस्करी पण नाही समजत तुला... " ड्राइव्हर सीटवर बसलेला रतन म्हणाला. मग समोर पाहत पुन्हा म्हणाला, "आलं की माझं फार्म हाऊस..."

सर्वांनी समोर पाहिलं, तर एक बंगला होता. गाडी गेटमधून आत शिरली. पायऱ्यांवर एक म्हातारा बसला होता. गाडी आत आलेली पाहून तो उठला आणि पुढे आला. "कसे आहात दयाळ काका..." गाडीतून उतरत रतन म्हणाला. स्मित करत दयाळ काका म्हणाले, "देवाच्या कृपेने सर्व ठीक आहे रतन बाबा. साहेबांचा फोन आला होता. तू तुझ्या मित्र-मैत्रिणींसोबत येत आहेस हे कळवलं होतं त्यांनी. सगळी व्यवस्था केली आहे मी. जरा लाईट गेलेत. तुम्ही सगळे इथे व्हरांड्यात थोडा वेळ बसा, लाईट आले की पानं वाढतो..." सर्वजण उतरतच होते, की गौरवला बंगल्याच्या उजवीकडे असलेल्या जंगलात काहीतरी दिसलं. "गाईज, ते बघा तिथे काय आहे..."

गौरवने दाखवलेल्या दिशेला सर्वजण पाहू लागले. काळ्या रंगाची एक इमारत तिथे होती. "वाह... जंगलाच्या आत काय आहे ते..." बाकी तिघांच्या मुखातून एकाच वेळी हे शब्द बाहेर पडले. दयाळ काकांनी तिथे पाहिलं, आणि त्यांचे डोळे विस्फारले. "रतन बाबा, तुम्ही सगळे लगेच आत चला. इथे थांबणं धोक्याचं आहे..." हे बोलत असताना त्यांच्या डोळ्यात भीती दिसत होती. त्यावेळी कोणी काहीच बोललं नाही. दयाळ काकांसोबत सर्वजण आत गेले. गौरवने एकवार त्या इमारतीकडे पाहिलं आणि दार लावून घेतलं. दिवाणखान्याच्या कोपऱ्यात असलेल्या एका खोलीत गौरव आणि रतन होते तर बाजूच्याच खोलीत मंजू आणि भावना होत्या. काही क्षणातच लाईट आले. गौरव म्हणाला, "रतन, काय असेल रे ते... ती बिल्डिंग..." रतनने खांदे उडवले. तेवढ्यात दिवाणखान्यातून, "जेवण तयार आहे..." अशी दयाळ काकांची हाक आली...

जेवण सुरू असताना गौरवने पुन्हा विषय काढला, "काका, जंगलात ते काय होतं... ते पाहून तुम्ही इतके घाबरलात का..." "हो ना... एक बिल्डिंग तर आहे... इतकं काय घाबरायचं..." रतनने ही गौरवची री ओढली. डबा टेबलवर ठेवत दयाळ काका म्हणाले, "ती फक्त एक इमारत नाही मुलांनो... दुष्ट शक्तींनी भारलेला बंगला आहे..." दयाळ काकांचं बोलणं ऐकताच मंजू आणि भावना घाबरल्या. दयाळ काका पुढे म्हणाले, "हो. भूत बंगला आहे तो. बऱ्याच काळापूर्वी तिथे एक चित्रकार राहत होता. एकदा चित्र काढत असताना त्याचा मृत्यू झाला. बस. तेव्हापासून त्या बंगल्यात जाणारी व्यक्ती परत येत नाही. म्हणून सांगतोय मुलांनो, त्या इमारतीचा विचारही मनात आणू नका..."

दयाळ काकांचं बोलणं ऐकून मंजू आणि भावना एकमेकींकडे पाहू लागल्या. रतन म्हणाला, "काका, उगाच काहीतरी बोलू नका. असं कुठे असतं का..." रतनचं बोलणं पुढे नेत गौरव म्हणाला, "नाहीतर काय... या घाबरट मुलींचे चेहेरे बघा कसे झालेत..." गौरव आणि रतनने हसत हसत एकमेकांना टाळी दिली. दोघांची नेत्रपल्लवी झाली. जेवणं संपली. सगळे झोपायला गेले. थोड्या वेळात गौरवने रतनला उठवलं. रतन तयारच होता. दोघं गपचूप बाहेर पडले. ते गेटजवळ पोहोचलेच होते, की त्यांच्या खांद्यावर हात पडले...

दोघांनी मागे पाहिलं, तर भावना आणि मंजू तिथे होत्या. भावना म्हणाली, "आम्हाला घाबरट म्हणताना मजा घेत होता ना तुम्ही दोघं... आता आम्ही तुम्हाला दाखवणार, की आम्ही घाबरट नाही..." भावनाचं बोलणं पुढे नेत मंजू म्हणाली, "आम्हाला माहीत होतं, तुम्ही दोघं असंच काहीतरी कराल. आम्हीही तुमच्या बरोबर येणार..." रतन आणि गौरवने एकमेकांकडे पाहिलं. हळू आवाजात टाळ्या वाजवत दोघांनी त्या दोघींचं स्वागत केलं. गेटची कडी काढून चौघं बाहेर पडली आणि जंगलाच्या दिशेने चालू लागली. थोड्याच वेळात जंगलात लपलेल्या त्या बंगल्याच्या गेटजवळ चौघं पोहोचली...

गेटवर कुलूप होतं. पण कडी तुटलेली होती. चौघांनी एकमेकांकडे पाहिलं. रतन आणि गौरवने गेट ढकललं. काही आवाज न करता गेट सताड उघडलं. हे पाहून मंजू आणि भावनाने एकमेकींचा हात पकडला. गौरव म्हणाला, "घाबरलात वाटतं तुम्ही. आत्ताही परत जा. घाबरट असणं काही चुकीचं नाही..." गौरवला टाळी देत रतन म्हणाला, "हो ना. अगदी खरं आहे...” भीतीला बाजूला सारत मंजू आणि भावना एकदम म्हणाल्या, “नाही. आम्ही येणार...” गेटमधून सर्वजण आत आले. समोर काळी पडलेली दोन माजली इमारत होती. समोरच्या बाजूने असलेल्या दोन खिडक्या आणि दरवाजा यांमुळे एखादी कवटी समोर ठेवल्याचा भास होत होता...

वातावरणात एक वेगळाच गारवा जाणवत होता. सर्वजण हळू हळू पुढे जाऊ लागले. भावना सर्वात मागे होती. तिचा पाय अडखळला आणि ती खाली पडली. तिच्या हातून टॉर्च सुटून बाजूला पडला. त्या प्रकाशात भावनाला काहीतरी दिसलं. तिने ती वस्तू उचलली, तर ते एक लॉकेट होतं. भावनाने ते लॉकेट उचललंच होतं, की बाकी तिघं तिच्या जवळ आली. गौरव आणि रतनने तिला उभं रहायला मदत केली. भावना आणि मंजूने भावनाचे कपडे झटकले. गौरवने विचारलं, "यू ओके ना..." भावनाने मान हलवून उत्तर दिलं. रतनला भावनाच्या हातात काहीतरी दिसलं. तो काही बोलणार इतक्यात बंगल्याचा दरवाजा उघडला...

दाराकडे पाहून सर्वांनी एकमेकांकडे पाहिलं. कोणीही काहीही बोलत नव्हतं. काहीतरी आपल्याला आत यायला खुणावत आहे असं सर्वांना वाटलं. चौघंही आत पोहोचली. तिथे प्रकाशाचा मागमूस नव्हता. सर्वांनी चारही दिशा पाहिल्या. तीन-चार बंद दारं आणि खिडक्या होत्या. आणि वरच्या मजल्यावर जाण्यासाठी एक जिना दिसत होता. टॉर्च हातात पकडून सर्व जरा पुढे गेले. एका भिंतीवर लावलेल्या काही फोटो फ्रेम्सकडे सर्वांचं लक्ष गेलं. सर्वांनी त्यांवर टॉर्च मारल्या. फ्रेम्स आणि आतले फोटो यात काळाची तफावत सर्वांना जाणवली. सर्वांना आश्चर्य वाटलं. सर्व अचंभित होऊन फोटो पाहतच होती, की बंगल्याचा दरवाजा अचानक बंद झाला आणि, "टण... टण... टण... टण..."

शांतता भंग करणारा तो आवाज, घड्याळाच्या टोल्यांचा होता. रतनने हातातल्या घड्याळाकडे पाहिलं आणि म्हणाला, "आत्ता तर बारा वाजलेत... आणि चारच टोले ऐकू आले..." त्यावर मंजू म्हणाली, "आवाजावरून तर जुनाट घड्याळ आहे असं वाटतंय. बहुतेक खराब झालं असावं..." "पण हा टोल्यांचा आवाज आला कुठून... घड्याळ तर कुठे दिसत नाही..." मंजूला मध्येच तोडत भावना म्हणाली. सर्वजण विचारात पडले. गौरव म्हणाला, "आपण सगळे वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेऊ. कदाचित घड्याळासोबत माणूस किंवा बाई सापडेल... तुम्ही दोघं या खालच्या खोल्यांमध्ये बघा, मी आणि मंजू वर शोध घेतो..." सर्वांना गौरवचं म्हणणं पटलं. दोन-दोनच्या जोड्या करून चौघं घड्याळाचा शोध घेऊ लागली...

भावना आणि गौरव जिन्याने वर पोहोचले. टॉर्च पेटवून दोघं पाहतच होती, की मंजू अडखळून खाली पडली. तिच्या हातून टॉर्च निसटला. घरंगळत जाणाऱ्या टॉर्चला पकडून तिने वर पाहिलं, तर गौरव तिथे नव्हता. मंजू उठली आणि गौरवला शोधू लागली. एका खोलीच्या बंद दाराच्या फटीतून तिला उजेड दिसला. मंजूने दार ढकललं. खोलीच्या डावीकडून उजेड येत होता. तिने तिथे पाहिलं, तर जमिनीवर गौरवच्या हातातला टॉर्च पडला होता. मंजू टॉर्चजवळ गेली आणि टॉर्च उचलताना टॉर्चचा प्रकाश समोर पडला, आणि "आऽऽऽऽऽऽ..." मंजूची किंकाळी ऐकून रतन आणि भावना धावतच वर पोहोचले. दोघांना तिथे पाहून कापऱ्या हाताने मंजूने एकीकडे बोट दाखवलं. तिथे गौरव निपचित पडला होता. तिघं गौरवजवळ गेले. त्याचे दोन्ही डोळे इतके मोठे झाले होते, जणू त्याने काहीतरी भयानक पाहिलं. गौरवची अवस्था पाहून भावनाही किंचाळली आणि तिने हातांनी डोळे बंद केले. इतक्यात, "टण... टण... टण..." पुन्हा आलेल्या टोल्यांचा आवाज ऐकून तिघं दचकली. चारही दिशांना पाहत मंजू म्हणाली, "त... तीन टोले... आ... पण इथे आलो त... तेव्हा चार टोले पडले... गौरव इथे पडला आहे. आ...णि... आता तीन टोले... 

"मंजू, तुम्ही दोघं वर आलात, तेव्हा इथे अजून कोणी होतं..." मंजूकडे पाहत रतनने विचारलं. नकारात्मक मान हलवत मंजू म्हणाली, "नाही रे. इथे कोणीही नव्हतं. पडलेला टॉर्च उचलायला मी वाकले तोवर गौरव गायब झाला होता..." सगळीकडे पाहत भावना म्हणाली, "इथे काहीतरी गडबड आहे. आपल्याला इथून ताबडतोब निघायला हवं..." तिघं जिन्यापर्यंत पोहोचलेच होते, की रतनला काहीतरी आठवलं. "अरे, आपल्या गाडीची चावी गौरवकडे होती. तुम्ही दोघी खाली जा, मी चावी घेऊन येतो..." इतकं बोलून रतन मागे फिरला. भावना आणि मंजू जिना उतरू लागल्या तेव्हा त्यांची नजर फोटो फ्रेम्सकडे गेली. तिथे गौरवचं चित्र पाहून दोघी घाबरल्या. दोघी फ्रेम्सच्या खाली उभ्या होत्या आणि, "आऽऽऽऽऽ..."

रतनचा आवाज ऐकून दोघींनी वर पाहिलं. कोणीतरी धक्का दिल्यागत रतन खाली पडत होता. रतन वेगाने खाली आला आणि तिथे ठेवलेल्या काचेच्या टेबलावर आदळला. काचांचा चक्काचूर झाला. मंजू आणि भावना लगेच रतनजवळ गेल्या. गौरवप्रमाणेच बाहेर आलेले रतनचे डोळे पाहून दोघीही किंचाळल्या. हळू हळू वळत त्यांनी फोटो फ्रेम्सकडे पाहिलं, तर आता तिथे रतनचंही चित्र होतं. "म... मंजू... रतनपण गेला गं. आ... पण दोघीच उरलो..." रतनकडे पाहत भावना म्हणाली. भावनाला मध्येच तोडत मंजू म्हणाली, "इथे नक्कीच असं काहीतरी आहे जे आपल्याला जिवंत पाहू शकत नाही. चल लवकर. आधी इथून बाहेर पडू आपण..." इतकं बोलेपर्यंत, "टण... टण..."

टोल्यांचा आवाज ऐकून दोघी घाबरल्या. भावनाच्या हातून लॉकेट सुटून खाली पडलं. लॉकेट उचलून ती उभी राहिली, तर बाजूला मंजू नव्हती. "मंजू... मंजू... अगं कुठे आहेस तू..." असं ओरडत भावना मंजूला शोधू लागली. तिला जिन्यावर मंजू पडलेली दिसली. भावना जवळ गेली आणि मंजूचे विस्फारलेले डोळे पाहून भावनाचा थरकाप उडाला. तिने हळू हळू आपली नजर फोटो फ्रेम असलेल्या भिंतीकडे वळवली. आता तिथे मंजूचंही चित्र होतं. भावना मागे सरकतच होती, की, "टण..." आवाज ऐकून भावना स्तब्ध झाली. "आता फक्त तूच राहिली आहेस भावना. तुझंही चित्र तयार होईल..."

शांततेला छेद देणाऱ्या या कर्कश आवाजने ती गारठली. तिने वळून पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. आता मात्र भावनाचा धीर सुटला. तिथे असलेल्या दारं-खिडक्यांवर हात मारत, "वाचवा... मला वाचवा..." असा आकांत करत भावना पळू लागली. तिचा पाय अडखळला आणि ती खाली पडली. तेव्हाच तिची नजर तिच्या हातात असलेल्या लॉकेटकडे गेली. लॉकेट चमकत होतं. भावना लॉकेटकडे पाहतच होती, की तिच्या डाव्या हाताला असलेल्या खिडकीचं तावदान उघडलं. एक क्षणही न दवडता भावना उठली आणि तिने खोडकीतून बाहेर उडी घेतली. मागे वळूनही न पाहता भावना पळत राहिली. त्या बंगल्याचं गेट पार करून ती जंगलात पोहोचली. बंगल्याच्या गेटसमोरील दोन्ही खिडक्या आणि दारातून लाल प्रकाश येत होता. असं वाटत होतं, भावना जिवंत बंगल्याबाहेर पडलेल्याचा बंगल्यातल्या शक्तीला राग आला होता...

भावना मात्र दगडांवर, निसरड्या मातीवर अडखळत, ठेचकाळत पळत राहिली. तिच्या पायांना होणाऱ्या जखमांचं, ओरखड्यांचं तिला काहीच भान नव्हतं. ती फक्त पळत होती. थोड्याच वेळात भावना कॉटेजजवळ पोहोचली. जंगलातून बाहेर पडल्याने तिला जरा हायसं वाटत होतं. पण अजून तिची भीती गेली नव्हती. "काका... दार उघडा... लवकर उघडा... काका..." असं ओरडत भावना जोरजोरात दार वाजवू लागली. दयाळ काकांनी दार उघडताच भावना तडक आत गेली आणि दारं-खिडक्या लावू लागली. "अगं मुली काय झालं... सांगशील तरी... बाकीचे कुठे आहेत... आणि रतनबाबा..." दयाळ काकांच्या या प्रश्नांची भावनाला उत्तरं द्यायची होती. पण तिचा आवाजच फुटत नव्हता. तिने हातातलं लॉकेट दयाळ काकांना दाखवलं. पण ते काळं पडलं होतं. लॉकेटकडे पाहून भावना अजूनच घाबरली आणि तिची शुद्ध हरपली...

आत्ताची वेळ...

कॅमेऱ्याचे फ्लॅश चमकत होते. दयाळ काका एका कोपऱ्यात मान खाली घालून उभे होते. पोलीस तपास करत होते. इन्स्पेक्टरने दयाळ काकांना जवळ बोलवून विचारलं, "तुम्हीच फोन केलात ना... इथे काय घडलं सांगू शकाल...??" दयाळ काकांनी एकवार दाराकडे पाहिलं. मग इन्स्पेक्टरकडे पाहत ते बोलू लागले, "साहेब, ही भावना. आमच्या रतन बाबाची, म्हणजे आमच्या मोठ्या साहेबांच्या मुलाची ही मैत्रीण. हिच्यासह रतनबाबा आणि अजून दोन जण आज संध्याकाळी इथे आले. जेवणं झाल्यावर सुमारे दहा वाजता सगळे आपापल्या खोलीत गेले. मी पण कामं संपवून झोपायला गेलो. आत्ता थोड्या वेळापूर्वी दारावर झालेल्या ठकठकीने मला जाग आली. मी दार उघडलं, तर ही बिचारी लागेचंच आत आली आणि तशीच बेशुद्ध पडली. हिला पलंगावर ठेऊन मी रतन बाबाला बोलवायला गेलोच होतो, की हिच्या किंकाळीने माघारी फिरलो आणि पाहतो तर..."

दयाळ काका, तो इन्स्पेक्टर आणि बाकी हवालदारांनी दाराकडे पाहिलं. उंबऱ्यात भावना निपचित पडली होती. तिचे डोळे बाहेर आले होते आणि तिची मान पूर्ण मुरगळून मागे वळली होती. प्रेत पाहून एक हवालदार म्हणाला, "सर, ज्या पद्धतीने या मुलीला मारलं आहे, हे कोण्या व्यक्तीचं काम नाही..." इन्स्पेक्टरच्या चेहेऱ्यावरचे प्रश्नार्थक भाव पाहून दुसरा हवालदार म्हणाला, "सर, या परिसरातून रात्रीच्या वेळी अनेक जण गायब झालेत. आणि सकाळी त्यांच्या डेड बॉडीज जंगलात सापडल्यात. दोन वर्षांपूर्वी त्या पाच मुलांचं काय झालं, लक्षात आहे ना सर... सर्वांची प्रेतं बंगल्याच्या मागे..." 'बंगला' हा शब्द ऐकताच त्या हवालदाराला मध्येच तोडत दयाळ काका म्हणाले, "हवालदार साहेब, तुम्ही बंगला म्हणालात... त्या बंगल्याबद्दल मी या चौघांजवळ बोललो होतो. अरे देवा... ही मुलं त्या झपाटलेल्या बंगल्यात तर नाही गेली ना... तरीच रतन बाबा आणि बाकी दोघं दिसत नाहीत इथे...

दयाळ काकांच्या खांद्यावर हात ठेवत इन्स्पेक्टर म्हणाला, "भुतं, पिशाच्च, यांवर माझा विश्वास नाही. काही असो, सध्या या भावनाची बॉडी पी.एम.साठी पाठवा आणि हिच्या घरी कळवा..." मग खिशातून फोन काढत, नंबर लावत इन्स्पेक्टर म्हणाले, "हॅलो, मी इन्स्पेक्टर जगताप बोलतोय. ऍडिशनल फोर्स पाठवा. जंगलात शोध घ्यायचा आहे..." सर्वांच्या सामानाचा तपास केला गेला. भावना मृत असल्याची आणि बाकी तिघं गायब असल्याची खबर त्यांच्या नातेवाईकांना दिली गेली. तिथे असलेल्या हवालदारांना, रतन, मंजू आणि गौरवचा शोध घ्यायला सांगून इन्स्पेक्टर चौकीवर परतले. तिथे भावनाचा पोस्ट मॉरटम रिपोर्ट वाट पाहत होता. मृत्यूचं कारण होतं, मान मोडल्याने श्वास नलिका बंद झाल्याने मृत्यू...

हवालदाराला इशारा करत इन्स्पेक्टर जगताप म्हणाले, "जंगलातल्या परिसरात आत्तापर्यंत जितके मृत्यू झालेत, त्यांची फाईल आणा..." जगताप बराच वेळ फाईल वाचत होते. तेवढ्यात फोन आला, "इन्स्पेक्टर जगताप बोलतोय... काय... ठीक आहे... सर्व बॉडीज पी.एम.साठी पाठवा. आजू-बाजूचा परिसर सील करा आणि तुम्ही सगळे चौकीवर परत या. फोन ठेऊन आपल्या साथीदारांशी बोलत जगताप म्हणाले, "जंगलात झालेल्या मृत्युंची फाईल पाहत होतो. सर्वांमागे एकच कारण आहे. Cardiac arrest. हृदयाचे ठोके अचानक बंद झाल्याने मृत्यू..." जगताप बोलतच होते, की बाहेरून आवाज ऐकू येऊ लागले...

जगताप बाहेर आले तर तिथे त्या चारही मुलांचे कुटुंबीय आले होते. त्यांच्याकडे पाहत ते म्हणाले, "शांत व्हा. काल एकाच मुलीचा, भावनाचा मृत्यू झाला होता आणि बाकी तिघं गायब होते. पण आज त्या तिघांच्या बॉडीजसुद्धा सापडल्या आहेत. भावना कॉटेजमध्ये मृतावस्थेत सापडली तर बाकी तिघं जंगलात सापडलेत. भावनाचा खून झाला हे तर स्पष्टच आहे. पण बाकी तिघांच्या मृत्यूचं कारण रिपोर्ट आल्यावरच समजेल. मला माहीत आहे तुमच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पण बॉडीज तुम्हाला रिपोर्ट आल्यानंतरच मिळू शकतील..." हे ऐकून तिथे जमलेल्या सर्वांनी पाणावलेल्या डोळ्यांनी चौकी सोडली. तेव्हाच बाकी तीन मुलांचा पोस्ट मॉर्टम रिपोर्ट घेऊन हवालदार आला. रिपोर्ट जगतापांच्या हातात देत हवालदार म्हणाला, "सर, त्या तीन मुलांचा शोध घ्यायला आम्ही जंगलात गेलो, तेव्हा बरंच आत आम्हाला तीन रोपटी दिसली. ती नुकतीच लावल्यासारखी वाटत होती...

त्या रोपांचं तिथे असणं आम्हाला खटकलं. रोपं काढून तिथली जमीन आम्ही खोदली, तर तिथे तीन प्रेतं होती. सर, जंगल परिसरात या चौघांसह अनेक मृत्यू झालेत. अजूनही वेळ आहे सर. संपूर्ण जंगल आपण सील केलं तर... " जगतापांना हवालदाराचं म्हणणं पटलं. ते म्हणाले, "बरोबर आहे तुमचं. अजून मृत्यू व्हायला नको तिथे. संपूर्ण परिसर सील करा. पण मला एक गोष्ट समजली नाही, आत्तापर्यंत जंगल परिसरात जितके मृत्यू झालेत, ते सगळे हृदयाचे ठोके बंद पडल्याने झालेत. सर्वांच्या बॉडीज आधी गायब होत्या. नंतर त्या सर्व बॉडीज जंगलात मिळाल्या. या भावनाचा मृत्यू मात्र जंगलापासून दूर झाला. निर्घृण हत्या झाली तिची... असं कसं..." “हेच मलाही जाणून घ्यायचं आहे... " जगताप बोलतच होते, की या आवाजाने सर्वांचं लक्ष वेधलं...

सर्वांनी आवाजाकडे पाहिलं, तर दारात एक माणूस उभा होता. सर्व आपल्याकडेच पाहत आहेत हे लक्षात आल्यावर तो माणूस म्हणाला, "मी भावनाचा मोठा भाऊ शेखर. भावनाचा मृत्यू तिच्या तीनही मित्रांपेक्षा वेगळा का आहे, हाच विचार मला भेडसावतो आहे..." जगतापांनी शेखरला आत बोलावलं. आत येत शेखर म्हणाला, "सर, आमचे आई-वडील आमच्या लहानपणीच गेले. तेव्हापासून मी आणि भावना, आम्ही दोघंच एकमेकांसाठी होतो. आता तर भावनाही नाही राहिली. मी एकटा पडलो. हे कृत्य ज्या कोणी केलं आहे, त्या व्यक्तीला शिक्षा व्हायलाच हवी सर..." शेखरला शांत करत जगताप म्हणाले, "शांत व्हा मि. शेखर. खुन्याला आम्ही लवकरात लवकर पकडू..." "खूनी मानवी असेल तर पकडाल ना..." या आवाजाने सर्व चपापले. खुर्चीत एक वृद्ध बसला होता. सर्वांकडे पाहून आपला चस्मा सावरत तो वृद्ध म्हणाला, "क्षमा करा, मी मध्येच बोललो. माझी सायकल हरवल्याची तक्रार करायला आलो होतो. जंगलात घडलेल्या घटनांबद्दल ऐकून राहवलं नाही म्हणून बोलतोय...

या जागी मी लहानाचा मोठा झालो आहे. इथे घडलेल्या घटनांशी मी बऱ्यापैकी परिचित आहे. या परिसराबद्दल खूप जुनी कहाणी माझ्या आईने सांगितली होती. अनेक वर्षांपूर्वी इथे जंगल नव्हतं. तर एक गाव होतं. गावाच्या मध्यभागी गावच्या सावकाराचा वाडा होता. सावकारचा मुलगा सोहन, एका आजाराने ग्रस्त होता. सूर्याच्या प्रकाशात त्याला त्रास व्हायचा. त्याच्या शरीरावर फोड यायचे. म्हणून सोहन कधी वाड्याबाहेर पडायचा नाही. तो एक उत्तम चित्रकार होता. लोकांची चित्र काढून वाड्यातल्या भिंतींवर तो लावायचा. हाच त्याचा विरंगुळा होता. सोहनच्या या विरंगुळ्यासाठी सावकाराचे नोकर, कुठून कुठून माणसं, बायका यांना पकडून पकडून आणायचे. एक दिवस दीर्घ आजाराने ग्रासलेल्या सावकाराने देह ठेवला. सोहन नवा सावकार झाला. पण त्याची चित्रकलेची आवड तो जोपासत राहिला. वाड्याच्या तळघरात चित्र काढण्यात सोहन तासंतास घालवायचा. चित्र पूर्ण झाल्यावर, तिथे असलेल्या घड्याळाचा ठोका वाजवून सोहन नोकरांना चित्र पूर्ण झाल्याचं कळवायचा. जितकी माणसं तितके ठोके सोहन वाजवायचा. ठोके ऐकल्यावर नोकर मंडळी त्या पकडून आणलेल्या व्यक्तीला बाहेर सोडून यायचे. असं बराच काळ चाललं. पण एक दिवस घडू नये तेच घडलं...

एक दिवस चित्र बनवण्यासाठी एका लहान मुलाला नोकरांनी पकडून आणलं. तो बिचारा पोरगा भीतीपोटी रडत होता. त्याला गप्प करण्यासाठी सोहनने त्याच्या कानाखाली मारली. सोहनसाठी ती एक चपराक होती. पण त्या चिमुरड्यासाठी मात्र तो एक तडखा ठरला. बिचारं ते मूल खाली पडताच मरण पावलं. सोहनला हे लक्षातच नाही आलं. त्याने त्या पोराला तसंच खुर्चीवर बसवलं. चित्र पूर्ण झाल्यावर त्याने घड्याळाचा ठोका दिला. सोहन त्या मुलाजवळ गेला तेव्हा तो मुलगा मेला असल्याचं त्याला कळलं. सोहन थोडा चरकला. त्याने लगेच त्या पोराच्या प्रेताला वाड्याच्या मागे असलेल्या झाडीत गाडलं आणि त्यावर एक रोप लावलं. ठोक्याचा आवाज ऐकून तिथे आलेल्या नोकर शंभूने हे सगळं पाहिलं. तेव्हा सोहनने पैशाचं आमिष दाखवून शंभूचं तोंड बंद केलं. काही दिवस गेले. त्या पोराच्या मृत्यूचा काही गवगवा नाही झाला हे पाहून सोहनच्या लक्षात आलं, की त्याचा अपराध लपला गेला आहे...

त्या दिवसापासून सोहनच्या डोक्यात एक विचित्र आणि अघोरी तिडीक गेली. शंभू नोकर ज्या कोणाला चित्र काढण्यासाठी पकडून आणायचा, सोहन आधी त्या व्यक्तीचा खून करायचा. मग त्या व्यक्तीला खुर्चीत बसवून त्याचं चित्र काढायचा. चित्र पूर्ण झाल्यावर सोहन घड्याळाचा ठोका वाजवायचा. मग शंभू त्या मेलेल्या व्यक्तीच्या प्रेताला वाड्याच्या मागच्या झाडीत गाडून त्यावर रोप लावायचा. सोहनच्या या विकृतीमुळे निष्पाप लोकांचे जीव जात आहेत ही गोष्ट शंभूला खटकत होती. पण पैशांच्या लालसेपोटी तो गप्प होता. एका संध्याकाळी चित्रकलेसाठी पकडून आणलेली एक मुलगी, चित्र पूर्ण होण्याआधीच वाड्यातून निसटली. झाडीतून गावाच्या विरुद्ध दिशेला पाळणाऱ्या त्या मुलीला सोहनने वाटेतच अडवलं आणि त्याच झाडीत त्या नीच सोहनने तिच्यावर........

मग गळा दाबून तिला मारून टाकलं. जवळच खेळणाऱ्या एका मुलाने मुलीचा गळा दाबला जातोय हे पाहिलं. अंधूक प्रकाशात त्याने मुलीला ओळखलं पण त्याला मारेकऱ्याचा चेहेरा दिसला नाही. सोहनच्या हातात चमकणारी हिऱ्याची अंगठी त्याने पाहिली. ते सगळं कृत्य पाहून तो घाबरला आणि गावाकडे पळाला. गावात जाऊन त्याने सर्वांना घडलेली घटना सांगितली. मुलीची हत्या झाली हे ऐकून गावकरी भडकले. दुसरा-तिसरा कोणी नसून हा सावकारचा पोरगा सोहनच आहे याची त्यांना खात्री पटली. मशाली, लाठ्या, दगड घेऊन गावकरी वाड्यावर पोहोचले. त्यांनी वाड्याला घेराव घातला. वाड्याच्या मागच्या झाडीत खोदकाम सुरू होतं आणि जवळच त्या मुलीचं प्रेत पडलं होतं. तिथे असलेल्या लोकांनी बाकी गावाकऱ्यांना बोलावलं. जमावाला येताना पाहून सोहन घाबरला आणि तळघरात जाऊन लपला...


पुढचा भाग काही दिवसात...

2 comments: