Friday, April 11, 2025

एप्रिल फूल...

 


दुपारचे ३.३० वाजले होते. कॉलेजच्या गेटवर रेलचेल होती. परीक्षा संपली होती. मुलं बाहेर पडत होती. परीक्षा संपली म्हणून त्यांच्या चेहेऱ्यांवर आनंद दिसत होता. एका बाजूला शलाका आणि रसिका उभ्या होत्या. घड्याळ पाहत शलाका म्हणाली, "यार पेपर संपून एक तास झाला. हे दोघं कुठे राहिले..." रसिका लगेच म्हणाली, "तुला माहीत आहे ना, ते दोघं कसे आहेत. आज शेवटचा पेपर होता ना. सगळ्यांना टाटा बाय-बाय करत येत असतील... ते बघ आलेच..."

दोघींनी पाहिलं, तर दोन मुलं एकमेकांना टाळ्या देत त्यांच्याकडे येत होती. जवळ येताच त्यातला एकजण म्हणाला, "सॉरी सॉरी मुलींनो. थोडा उशीर झाला. हा लेटलतीफ पवन असाच उशीर करतो..." हे ऐकून पवन म्हणाला, "ए आज्या, माझ्यावर का बिल फाडतो रे... हा अजय, तिथे मुली बघत उभा होता. खेचून आणावं लागलं याला..." दोघांकडे पाहत रसिका म्हणाली, "झालं तुमचं... निघायचं आपण..." रसिकाचं म्हणणं पुढे नेत शलाका म्हणाली, "हो ना... आधीच उशीर झालाय. ट्रॅफिक वाढत जाईल ना..." सर्वजण जीपमध्ये बसले आणि जीप अलिबागच्या दिशेने निघाली...

अजयने पवनला विचारलं, "काय रे... हे फार्म हाऊस कोणाचं आहे..." रस्त्यावर नजर रोखत पवन म्हणाला, "अरे माझ्या वडिलांच्या मित्राचं आहे. ते भारतात राहत नाहीत. म्हणून चावी आमच्याकडे दिली आहे. आपली परीक्षाही संपली आहे तर विचार केला तिथेच विकेंड घालवू..." गप्पा मारता मारता फार्म हाऊस आलं. जीप गेटच्या आत आली. सर्वजण उतरले. एक माणूस बॅगा घ्यायला आला. पवन म्हणाला, "काय शंकर... कसा आहेस..." शंकरने स्मित केलं आणि बॅगा घेऊन आत गेला. एव्हाना संध्याकाळचे सात वाजत आले होते...

सर्वजण आत गेल्यावर शंकर म्हणाला, "साहेब, खालच्या दोन खोल्या तयार केल्या आहेत. तासाभरात जेवणाची व्यवस्था होईल. तेव्हा जेवण पाठवतो आणि सकाळी नाश्ता घेऊन मी येतो..." पवनने होकारार्थी मान हलवली. तसा शंकर दाराकडे जाऊ लागला. दारात पोहोचताच तो वळला आणि म्हणाला, "साहेब, इथे रात्रीचे लाईट जातात कधी कधी. त्या टेबलवर मेणबत्ती आणि कडेपेटी ठेवली आहे. आणि हो... लाईट गेले तर जरा सांभाळून बरं का..." इतकं बोलून शंकर निघून गेला. हे ऐकून रसिका आणि शलाका थोड्या घाबरल्या. "ए पवन... हा शंकर असं काय बोलला..." "हो ना... काहीही बोलायचं..." रसिका आणि शलाकाचं बोलणं ऐकून पवन आणि अजयने एकमेकांकडे पाहिलं. पवन म्हणाला, "गावाकडली ही माणसं. लक्ष नका देऊ त्यांच्याकडे..." पवनला साथ देत अजय म्हणाला, "हो ना... आपण मस्त फ्रेश होऊ आणि जेवण येईपर्यंत ही जागा एक्सप्लोर करू..." तिघांनाही अजयचं म्हणणं पटलं आणि सगळे खोल्यांकडे वळले...

सर्वजण फ्रेश झालेच होते, की जेवणाचे डबे घेऊन एक माणूस आला. अजय आणि पवनने डबे घेतले. रसिकाने त्या माणसाला पाहिलं आणि विचारलं, "अरे तुम्ही कोण... तो शंकर कुठे आहे..." रसिकाकडे पाहत तो माणूस म्हणाला, "शंकर दादा गावात हायेती. तेंच्या घरनंच आलू म्या डबे द्याया... दादा सकालच्या पारी येतील..." इतकं बोलून चौघांकडे एकवार नजर फिरवून तो माणूस आल्या पावली निघून गेला. पाठमोऱ्या जाणाऱ्या त्या माणसाला पाहत शलाकाने विचारलं, "तो असा काय पाहत होता आपल्याकडे..." त्यावर पवन म्हणाला, "गावाकडची माणसं ही. नवीन आलेल्याला असंच पाहत असतील. तुम्ही दोघी लक्ष नका देऊ..." पवनला साथ देत अजय म्हणाला, "हो ना... जाम भूक लागली आहे..." पानं वाढली गेली. गप्पा-गोष्टी करत गावरान रुचकर जेवणावर सर्वांनी ताव मारला आणि सर्व हॉलमध्ये येऊन बसली. इतक्यात लाईट गेले...

गुडूप अंधार झाला. सर्वजण बसल्या जागी खिळून राहिले. "कसला मिट्ट काळोख आहे. हाताला हात दिसत नाही..." शलाकाचा आवाज आला. "आता काय करायचं... किती वेळ बसून राहायचं असं अंधारात..." रसिकाने शंका व्यक्त केली. तेवढ्यात पवन म्हणाला, "अरे तो शंकर म्हणाला होता ना टेबलवर कडेपेटी आणि मेणबत्ती ठेवली आहे..." "अरे हो... थांबा थांबा..." असं बोलून अजय टेबल चाचपडू लागला. त्याच्या हाताला एक छोटी डबी आणि एक मेणबत्ती लागली. त्याने एकामागून एक अशा दोन मेणबत्त्या पेटवल्या आणि टेबलवर उभ्या केल्या. दोन्ही मेणबत्यांचा मंद प्रकाश हॉलभर पसरला. "चला, काळोख तर कमी झाला... आता काय..."

रसिकाच्या या प्रश्नावर सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले. शलाकाला तहान लागली. समोरच डायनिंग टेबलवर पाण्याचा जार आणि ग्लास होते. शलाकाने एक मेणबत्ती उचलली आणि पाणी पिण्यासाठी गेली. तोवर आता अंधारात काय करावं याची चर्चा रंगात आली होती. रसिका म्हणली, "मस्त गाणी ऐकत बसू... " त्यावर अजय म्हणाला, "गाणी नुसती ऐकायची... त्यापेक्षा अंताक्षरी खेळू..." पवन काही बोलणार तेवढ्यात त्याला हातात मेणबत्ती घेतलेली शलाका दिसली. त्याला काहीतरी सुचल्यासारखं झालं. तो म्हणाला, "युरेका... आयडिया... आपण अंताक्षरीच खेळू पण वेगळ्या स्टाईल ने..." तोपर्यंत शलाका जागेवर येऊन बसली. सर्वजण पवनकडे पहायला लागली. पवन पुढे म्हणाला, "अंताक्षरी खेळायची. पण गाण्यांची नाही. हॉरर स्टोरीजची..."

सर्वांना ही कल्पना आवडली.  अजयने लगेच सुरुवात केली, "अँधेरे में क्या करें... कुछ नहीं है काम... एकेक करके सुनाओ हॉरर स्टोरीज... लेकर रामसे का नाम... अरे वाह. मीच पहिला ठरलो... तर ऐका... एका भयाण काळोख्या रात्री नीरज एकटाच..." अजय गोष्ट सांगत असताना सगळे स्तब्ध होऊन त्याच्याकडे पाहत होते. अजयची गोष्ट सांगून संपली आणि काही क्षण शांततेत गेले. पवन म्हणाला, "काय डेंजर स्टोरी यार आज्या... भारीच... आता मी सांगतो... तर एका बिल्डिंगमध्ये एक कपल नव्याने रहायला आलं. जो फ्लॅट त्यांनी घेतला होता त्यात..." पवन गोष्ट सांगत असताना सर्वांचं भान हरपलं होतं. गोष्ट संपली आणि पवनचे पाय धरत अजय म्हणाला, "मानला राव तुला... माझ्या स्टोरीपेक्षा कडक होती यार स्टोरी तुझी... आता तुम्ही दोघी..." पवन आणि अजयने रसिका आणि शलाकाकडे पाहिलं तर त्या एकमेकींचा हात पकडून अगदी खेटून बसल्या होत्या...

रसिका म्हणाली, "ए बस ना आता... आपण गाणीच लावू ना..." रसिकाला साथ देत शलाका म्हणाली, "हो ना... एकतर लाईट नाहीत. त्यात अनोळखी जागा. अशा वेळी या गोष्टी म्हणजे..." हे ऐकून अजय म्हणाला, "बस काय... घाबरलात... आमच्याकडून गोष्टी ऐकून घेतल्या. आता तुमचा नंबर आहे तर... हॉरर स्टोरी तरी सांगा नाहीतर हरलात हे मान्य करून शिक्षा भोगा..." अजयच्या टपलीत मारत पवन म्हणाला, "ए आज्या, लगेच काय शिक्षा. आपल्या मैत्रिणी आहेत ना या दोघी... दोस्ती में एक चान्स तो बनता है यार... मुलींनो. तुम्ही हॉरर स्टोरीजचा विचार करून ठेवा आम्ही दोघं जरा..." पवन आणि अजय आत गेले. काही वेळ निघून गेला. शलाका आणि रसिका तिथेच बसून राहिल्या. मेणबत्त्यांच्या मंद प्रकाशात तिथलं वातावरण वेगळंच वाटत होतं. रसिका म्हणाली, "या दोघांना जाऊन बराच वेळ झाला ना..." यावर शलाका म्हणाली, "हे दोघं नक्कीच काहीतरी प्लॅन करत असणार..." दोघी बोलतच होत्या तेवढ्यात, "खळऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ..."

आवाजाने दोघी दचकल्या. त्यांनी एकमेकींकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. मग दोघींनी होकारार्थी मान हलवली आणि एकेक मेणबत्ती हातात घेऊन दोघी आत निघाल्या. आवाज किचनच्या दिशेने आला होता. दोघी किचनमध्ये गेल्या. दोघींना जमिनीवर काचेचे तुकडे पडलेले दिसले. दोघी खाली बसल्या. एक तुकडा उचलत हळू आवाजात शलाका म्हणाली, "हा तर ग्लास आहे. तिथे शेल्फ वर होता... हा इथे कसा काय..." दोघीही एकमेकींकडे पाहू लागल्या. सावरून घेण्यासाठी रसिका म्हणाली, "अगं उंदीर वगैरे असेल..." पण तिलाही माहीत होतं, की हे खरं उत्तर नव्हतं. त्या दोघी उठून उभ्याच राहत होत्या, की अचानक रसिकाच्या हातातली मेणबत्ती विजली. विजलेल्या मेणबत्तीकडे पाहत शलाका म्हणाली, "इ...थे तर वाराच नाही. म...ग ही मेणबत्ती कशी विजली..." रसिकाने शलाकाचा हात धरला. दोघी किचनमधून बाहेर आल्या. रसिका म्हणाली, "एखादी झुळूक आली असेल पटकन..." ती बोलतच होती, की, "टप... टप... टप..."

पाण्याच्या थेंबांच्या त्या आवाजाने दोघी जागीच गारठल्या. आवाजाच्या दिशेकडे पाहत शलाका म्हणाली, "आता हे काय..." शलाकाच्या पाठीवर हात ठेवत रसिका म्हणाली, "क... शाला घाबरतेस शलाका... मी आहे ना तुझ्यासोबत... चल, आपण पाण्याचा आवाज कुठून येत आहे ते पाहू..." रसिका धीराने बोलत होती खरी. पण मनातून तीही घाबरली होती. किचनच्या समोर असलेल्या एका खोलीमधून तो आवाज येत होता. दोघी खोलीत पोहोचल्या. तिथे अंधाराशिवाय काहीच नव्हतं. "टप... टप... टप..." हा आवाज तिथल्या वॉशरूम मधून येत होता. दोघी तिथे गेल्या तर एका नळाखाली एक बादली होती आणि त्या बादलीत "टप... टप... टप..." असा आवाज करत नळातून पाणी गळत होतं. रसिकाने नळ बंद केला. दोघी पुन्हा वॉशरूमच्या बाहेर आल्या...

इतक्यात शलाकाच्या हातातली मेणबत्तीही विजली. मेणबत्तीकडून बाजूला पाहत, "रसिका... अगं ही मेणबत्ती..." असं म्हणत शलाकाने बाजूला पाहिलं. रसिका तिथे नव्हती. आता मात्र शलाका खूपच घाबरली. तिच्या हातून मेणबत्ती गळून पडली. थरथरत्या हाताने शलाकाने मोबाईल टॉर्च सुरू केला आणि रसिका, पवन व अजयला शोधू लागली. तिने एका खोलीत डोकावलं पण तिथे कोणीच नव्हतं. शलाका वळली तशी, "शलाका... आम्हाला शोधते आहेस का... पण आम्ही तर इथेच आहोत... तुझ्या जवळ..." आवाजाने शलाका स्तब्ध झाली. आवाज तिच्या मागून येत होता. शलाकाच्या कानामागून घामाची एक धार खाली ओघळली. ती हळू हळू वळली. मोबाईलच्या अंधूक प्रकाशात तिला तीन आकृत्या दिसल्या. शलाकाने मोबाईल वर नेला आणि, "आऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ..."

पवन, रसिका आणि अजयचे चेहेरे विद्रुप दिसत होते. तिघांनी हात पसरून डोळे मोठे करून शलाकावर झाडप घातली. शलाकाने एक किंकाळी फोडली आणि डोळे गच्च बंद केले. काही क्षणातच हसण्याचे आवाज येऊ लागले. लाईट आले आणि "एप्रिल फूल..." असा ओरडा ऐकू आला. शलाकाने डोळे उघडले. समोर रसिका, पवन, अजय आणि शंकर खिदळत होते. एकमेकांना टाळ्या देत होते. अजय म्हणाला, "यार शलाका... किती घाबरट आहेस गं तू..." "हो ना... नुसत्या आवाजाने घाबरतेस तू..." रसिकाने अजयची री ओढली. दोघांना साथ देत पवन म्हणाला, "तुला एप्रिल फूल बनवणं एकदम सोपं होतं. मी आणि शंकरने इथे सगळी व्यवस्था केली. रसिकाला आमचं प्लॅनिंग समजलं म्हणून तिलाही यात सामील करून घेतलं. और रिझल्ट सबके सामने है..." पुन्हा सर्वजण एकमेकांना टाळ्या देत हसू लागले. पण शलाका एकदम शांत उभी होती...

तेवढ्यात पुन्हा लाईट गेले. मिट्ट काळोख झाला. अजय म्हणाला, "आता परत लाईट कोणी घालवले... शंकर..." अजयला उत्तर देत शंकर म्हणाला, "मी तर तुमच्याच बरोबर आहे... मी कसा घालवेन लाईट..." "लाईट मी घालवले..." अजय आणि शंकर पाठोपाठ आलेल्या या आवाजाने सर्वजण चपापले. मोबाईलचा टॉर्च सुरू करून सर्वांनी मागे पाहिलं. शलाका तिथे निश्चल उभी होती. पुढच्याच क्षणी ती म्हणाली, "माझ्या हातातली मेणबत्ती विजली तेव्हाच मी...... आणि माझा नाही... एप्रिल फूल झाला आहे तो तुमचा... नाही ना पटत..." बोलता बोलता शलाकाने एका दिशेला बोट दाखवलं. चौघंही त्या दिशेला गेली. खोलीच्या दाराकडे पाहून सर्वांचा थरकाप उडाला...

उंबऱ्यात शलाका पडलेली होती. तिचे डोळे सताड उघडे होते. तिच्या हाताजवळ एक विजलेली मेणबत्ती पडलेली होती. शलाकाची ती गत पाहून सर्वांचे डोळे विस्फारले. त्यांनी हळू हळू मान वळवली. समोर शलाका उभी होती. वाऱ्याची एक झुळूक आली आणि शलाकाच्या चेहेऱ्यावरचे केस बाजूला झाले. तिचा चेहेरा पांढरा होता आणि डोळ्यांतली बुबूळं नाहीशी झाली होती. अजय, पवन, रसिका आणि शंकर सर्वांनी एकत्र किंकाळ्या फोडल्या आणि एकाच वेळी सर्वजण खाली कोसळली. सर्वांकडे विकृत नजरेने पाहत शलाका भसाड्या आवाजात ओरडली, "हा... हा... हा... माझा नाही... तुमचाच एप्रिल फूल झाला... हा... हा... हा..."

@ अनिकेत परशुराम आपटे.

No comments:

Post a Comment