Thursday, May 1, 2025

द ४०० प्रिन्स...

 


४०० नाबाद. कसोटी क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत नं मोडला गेलेला हा महाकाय विक्रम करणारा एकमेव खेळाडू म्हणजे सर ब्रायन चार्ल्स लारा...

सर लारा सहा वर्षांचे असतानाच त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना क्रिकेट प्रशिक्षणात गुंतवलं. त्यामुळे अगदी कोवळ्या वयात त्यांना तंत्रशुद्ध फलंदाजीचे धडे मिळाले. सर लारा १४ वर्षांचे असताना एक अंतर-महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत त्यांनी १२६.१६च्या सरासरीने त्या स्पर्धेतल्या सर्वाधिक ७४५ धावा जमावल्या. त्यांच्या या कामगिरीमुळे वेस्ट इंडीजच्या १९ वर्षाखालील अंतरराष्ट्रीय संघात त्यांची निवड झाली...

सर लाराने १९८८ साली प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. जोएल गार्नर, माल्कम मार्शलसारख्या दिग्गजचा सामना तर केलाच. पण युवा विश्वचषकात वेस्ट इंडीज संघांचं कर्णधारपद सांभाळून संघाला उपांत्य फेरीही गाठून दिली. प्रथम श्रेणी क्रिकेट आणि वेस्ट इंडीज अ संघातून चांगली कामगिरी करत सर लारा वेस्ट इंडीजच्या अंतरराष्ट्रीय संघाचं दार ठोठावत राहिले. अखेर १९९० साली पाकिस्तान विरुद्ध त्यांना संधी मिळाली. पाकिस्तानसोबत झालेल्या कसोटी आणि एक दिवसीय मालिकेत ते खेळले. पण त्यांना मोठी खेळी उभारता आली नाही...

१९९३ साल सर लारा आणि वेस्ट इंडीज संघ दोघांसाठीही फलदायी ठरलं. वेस्ट इंडीज संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना सर लाराने एका कसोटी सामन्यात २७७ धावांची मोठी खेळी उभारली. ते त्यांचं पाहिलं शतक आणि पाहिलं द्विशतकही ठरलं. त्यांच्या याच खेळीच्या जोरावर वेस्ट इंडीजने ती कसोटी तर जिंकलीच. शिवाय पुढची कसोटी जिंकून मालिकाही खिशात टाकली. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर साकारलेल्या या खेळीच्या आठवणीत सर लाराने त्यांच्या मुलीचं नाव सिडनी ठेवलं...

सर लारांनी कधी स्लेजिंग हा प्रकार केला नाही. शांतपणे आपली खेळी उभारत ते डावाला पुढे घेऊन जायचे. आपण बरे आपला खेळ बरा असं म्हणत सर लारा फलंदाजी करायचे. कसोटी आणि एक दिवसीय सामने मिळून तब्बल २२०००हून अधिक धावा, यातच सगळं आलं. पण आपल्या खेळीने त्यांनी स्लेजिंगला उत्तर मात्र जबरदस्त दिलं. पाकिस्तानच्या दानिश कन्हेरियाने त्यांना केलेलं स्लेजिंग आणि त्याच षटकात सर लाराने दानिशला मारलेले दोन खणखणीत षटकार आजही सर्वांना आठवतील...

सर लाराच्या नावावर अनेक विक्रम आहेत. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी केलेल्या नाबाद ५०१ धावा असोत किंवा त्यांच्या नावे असलेल्या द्विशतक आणि त्रीशतकांची यादी असो. सलग ५ वर्ष, दर वर्षी १००० धावा असोत किंवा एकच षटकात सर्वाधिक २८ धावा असोत. यातले काही विक्रम काळानुसार येणाऱ्या खेळाडूंनी मोडीत काढले. पण आजवर न मोडलेला त्यांचा सर्वात मोठा विक्रम म्हणजे सर लारा यांनी २००४ मध्ये इंग्लंड विरुद्ध केलेल्या नाबाद ४०० धावा. आजवर या विक्रमाला कोणी गवसणी घातली नाही आणि नाजिकच्या काळात कोणी हा विक्रम मोडेल असंही वाटत नाही...

आज २ में. सर लारा यांचा आज जन्म दिवस. पोर्ट ऑफ स्पेनच्या या प्रिन्सला अर्थात सर ब्रायन चार्ल्स लारा यांना वाढदिवसाच्या शतकीय शुभेच्छा...

@ अनिकेत परशुराम आपटे.

No comments:

Post a Comment