Friday, May 30, 2025

पिक्चर परफेक्ट (दुसरा व शेवटचा भाग)...


पहिल्या भागात...

गुलमोहर सोसायटीमधल्या त्याच्या राहत्या बंगल्यात शशांकचा मृत्यू होतो. त्या धक्क्याने शशांकची बायको रेवा बेशुद्ध पडते. तपासात समजतं, शशांकला विष देण्यात आलं आहे. आस-पासचे रहिवासी आणि शशांकच्या घरातली मोलकरीण सुजाता, सगळे शशांक आणि रेवाबद्दल चांगलं बोलतात. चौकशी सुरू असतानाच शशांकचा मित्र आणि बिझिनेस पार्टनर कल्पेश तिथे दाखल होतो...
त्याचवेळी समजतं, की रेवाला या प्रसंगाचा धक्का बसला आहे आणि शशांक मेल्याचं ती मानायला तयार नाही. उमा तिथेच रेवाजवळ थांबते. शशांकची बॉडी आणि बाकी वस्तू घेऊन सचिन जातो डॉ. गोखलेंच्या लॅबकडे तर आनंद आणि प्रधान कल्पेशसोबत शशांक आणि कल्पेशच्या ऑफिसकडे जातात. जाताना प्रधान कल्पेशला शशांक आणि कल्पेशच्या कॉलेज लाईफमध्ये काही प्रसंग घडला का ते विचारतात...
कल्पेश थोडा गडबडतो पण तसं विशेष काही प्रसंग घडलं नसल्याचं सांगतो. शशांकच्या ऑफिसमध्ये चौकशी करताना शशांकचं बबनशी भांडण झाल्याचं समजतं. सर्वजण डॉ. गोखलेंच्या लॅबमध्ये भेटतात. डॉ. गोखले सांगतात की शशांकचा मृत्यू स्लो पॉयझनमुळे झाला आणि त्याने शेवटी प्यायलेल्या दुधात किंवा दुधाच्या ग्लासात विष नाही. सर्वांमध्ये पुढचा आराखडा तयार होतो. सचिन जातो बबनच्या मागावर, आनंद जातो कल्पेशच्या घरी आणि प्रधान व उमा पुन्हा रेवाला भेटायला जातात. डॉ. संग्राम सांगतात की रेवा अजून शॉकमध्ये आहे. प्रधान सांगतात ते एक लेखक आहेत आणि प्रेमळ जोडप्यांवर पुस्तक लिहीत आहेत...

आता पुढे...

रेवाने एकवार सर्वांकडे पाहिलं. मग बोलायला सुरुवात केली, "आमच्या नात्याबद्दल... मलाही आवडेल तुमच्यासोबत आमच्या नात्याचा प्रवास शेयर करायला. शशांक टूरवर गेलेत. त्यामुळे ते भेटू शकणार नाहीत. पण मी माझ्याकडून तुम्हाला सगळं सांगेन... दोन वर्षांपूर्वी मी एस. के. ग्रूपला शशांकची सेक्रेटरी म्हणून जॉईन झाले. बहुतांश वेळ आम्ही दोघं एकत्रच असायचो. हळू हळू आम्हाला एकमेकांबद्दल जवळीक वाटू लागली. एका प्रोजेक्ट निमित्त आम्ही नागपूरला गेलो असताना तिथे शशांकने माझ्याजवळ त्याचं मन मोकळं केलं. मी होकार दिला आणि आमचं रजिस्टर्ड लग्न झालं. लग्नाचे साक्षीदार होते, कल्पेश आणि डॉ. संग्राम. आमच्या लग्नानंतर मी जॉब सोडला आणि माझ्या शशांककडे लक्ष देऊ लागले. शशांकला नवीन आणि मोठे प्रोजेक्ट्स मिळायला लागले. शशांक म्हणायचा माझ्या पायगुणांनी त्याला त्याच्या कामात यश मिळतंय...

सुमारे दहा महिन्यांपूर्वी आम्ही हा बंगला विकत घेतला. मी तो छान सजवला. आज शशांकचा वाढदिवस आहे. या बंगल्यातला त्याचा पहिला वाढदिवस. मी संध्याकाळच्या पार्टीची जय्यत तयारी केली होती हो, पण..." अचानक रेवा बोलायची थांबली. तिने सर्वांकडे पाहिलं आणि स्वतःला चाचपडलं. मग धडपडत ती बेडवरून खाली उतरली आणि, "शशांक तिथे सोफ्यावर... शशांक... मी येते रे.. शशांक..." असं ओरडत ती बाहेर आली. तिने सोफ्याकडे पाहिलं. पण तिथे शशांक नव्हता. तिने आजू-बाजूला पाहिलं, तर भिंतीजवळच्या टेबलवर शशांकचा हार घातलेला फोटो तिला दिसला. फोटोजवळ जात फोटोवरून जात फिरवत रेवा उद्गारली, "शशांक... काय झालं रे हे... मला सोडून तू..." बोलता बोलता रेवाला भोवळ आली आणि ती पडू लागली. डॉ. संग्राम आणि उमाने तिला सांभाळलं, आणि पुन्हा बेडवर आणून झोपवलं...

उमा आणि प्रधानांनी डॉ. संग्रामकडे पाहिलं तेव्हा ते म्हणाले, "इन्स्पेक्टर साहेब, शशांकच्या जाण्याचा रेवाला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. शशांक गेल्याचं तिचा मेंदू मानायला तयार नव्हता. तुमच्याशी बोलताना रेवा त्या क्षणापर्यंत पोहोचली जेव्हा तिने शशांकला मरताना पाहिलं. रेवा बहुतेक त्या ट्रॉमातून बाहेर आलेली दिसते..." डॉ. संग्राम बोलत असतानाच रेवाला शुद्ध आली. डोक्याला हात लावत ती उठून बसली. सुजाताने तिला मदत केली. डॉ. संग्रामला पाहून रडवेला चेहेरा करत, "डॉक्टर, माझा शशांक..." असं म्हणून रेवा हाताने चेहेरा लपवून रडू लागली. डॉ. संग्राम तिचं सांत्वन करत असताना तिने उमा आणि प्रधानांकडे पाहिलं. डॉ. संग्रामच्या सांगण्यावरून दोघांनी रेवाला त्यांची खरी ओळख दिली. उठून उभी राहत रेवा म्हणाली, "पोलीस... म्हणजे शशांकचा..." उमाने होकारार्थी मान हलवत उत्तर दिलं, "हो मॅडम. त्यांना विष दिलं गेलं आहे..." हे ऐकून कोसळल्यासारखी रेवा पुन्हा बेडवर बसली. काही क्षण गेले आणि ती म्हणाली, "इन्स्पेक्टर साहेब, माझ्या शशांकच्या खुन्याला शिक्षा करा. माझं सर्वस्व लुबाडलं त्या खुन्याने..."

तिथे बबनच्या मागावर गेलेल्या सचिनने, बबन राहत असलेली वस्ती गाठली. बबनचा फोटो दाखवत तो सर्वांना त्याच्याबद्दल विचारात होता. एका बाईने फोटो पाहिला आणि म्हणाली, "हा तर बबन्या. १४ नंबरमध्ये राहतो. एक नंबरचा लंपट माणूस हो... वस्तीतल्या बायका-मुलींना मोकळेपणाने चालायची सोय नाही राहिली याच्यामुळे... पण तुम्ही कोण... आणि याला कशाला शोधताय..." फोटोकडे पाहत सचिन म्हणाला, "मी सब-इन्स्पेक्टर सचिन. एका खुनासंदर्भात आम्ही याचा शोध घेत आहोत..." हे ऐकताच बाजूला उभा असलेला एक माणूस म्हणाला, "म्हणजे आता खून पण करायला लागला का हा... तुम्हाला सांगतो साहेब, हा लय बेकार माणूस. जुगार खेळायचा, सिगारेटी फुंकायच्या, दारू ढोसायची, काय नाही करत हा. त्याच्या जवळचे पैसे संपले की उसने मागायचा. आणि पैसे नाही मिळाले तर शिवीगाळ करायचा. एक-दोघांना तर त्याने मारायचाही प्रयत्न केला. आम्ही सर्वांनीच त्याला बुकलून काढला तेव्हापासून जरा थंड आहे..." रहिवाशांचं बोलणं ऐकून फोटो खिशात ठेवत सचिनने बबनच्या खोलीचा रस्ता धरला. बबनच्या खोलीला कुलूप होतं. कुलूप पाहून तो मागे फिरला आणि समोर एक माणूस दिसला, "साहेब, बबनला शोधताय का तुम्ही... तू इथे कुठला सापडायला... तो असेल त्याच्या अड्डयावर... वस्तीच्या मागे एक दारूचा गुत्ता आहे. तिथेच पडलेला असतो तो..." त्या माणसाला धन्यवाद देऊन सचिन वस्तीबाहेर पडला आणि चक्कर मारून दारूच्या गुत्त्याजवळ पोहोचला. इथे त्याने बबनची चौकशी केली, पण बबन तिथे नव्हता. सचिन तिथून बाहेर पडतच होता, की एक माणूस झिंगलेल्या अवस्थेत येऊन त्याला धडकला, "साये......ब, बबन्या हवाय ना तु....म्हाला... मी सां...गतो की... पण एक चप....टी घेऊन द्या की... हा मा.....लक सांगतो म.....मला जास्त झाली आहे..." त्या माणसाची कॉलर पकडत सचिन म्हणाला, "ए, मी तुला पाजायला नाही आलो इथे. बबन कुठे आहे ते माहीत असेल तर सांग नाहीतर..." त्या माणसाकडून बबनचा पत्ता मिळवत सचिन तिथून बाहेर पडला... तिसरीकडे कल्पेशबद्दल माहिती मिळवायला गेलेला आनंद, कल्पेश राहत असलेल्या सोसायटीमध्ये पोहोचला. वॉचमनने त्याला हटकल्यावर त्याने आय.डी. कार्ड दाखवलं आणि सोसायटीच्या सेक्रेटरीबद्दल विचारलं. वॉचमनने आनंदला सेक्रेटरीच्या घराचा रस्ता सांगितला. आनंद दुसऱ्या मजल्यावरच्या एका दारासमोर आला. दारावर पाटी होती, 'सदाशिव लेले.' एका माणसाने दार उघडलं. आनंद त्याला म्हणाला, "मि. लेले, मी इन्स्पेक्टर आनंद. एका केससंदर्भात चौकशी सुरू आहे, ज्यात इथे राहणाऱ्या कल्पेशचंही नाव आलं आहे. तर या कल्पेशबद्दल तुम्ही काही माहिती देऊ शकाल का..." मि. लेलेंनी आनंदला आत बोलावलं. दार लावत मि. लेले म्हणाले, "या कल्पेशने नुसता उच्छाद मांडलाय. पार्ट्या काय, डी.जे. काय, लफडी काय... इतका पैसा हा माणूस आणतो कुठून कळत नाही. ऑफिसला जाताना तर कधी पाहिलं नाही. बऱ्याच कंप्लेंट्स आल्यात त्याच्याबद्दल येत्या मिटिंगमध्ये यावर काहीतरी तोडगा काढूच आम्ही..." मि. लेलेंकडे पाहत आनंद म्हणाला, "कल्पेश आत्ता घरी नाही तर मला त्याचं घर बघायचं आहे. तुम्ही चला माझ्यासोबत व्हिटनेस म्हणून..." मि. लेले तयार झाले. दोघं कल्पेशच्या घरी आले. दार आतून बंद होतं. आनंदने बेल वाजवली आणि काही क्षणात एका माणसाने दार उघडलं. मि. लेले म्हणाले, "सर, हा दिनू. इथे नोकर आहे. दिनू, हे बघ, हे इन्स्पेक्टर आनंद आहेत. चौकशी करत आहेत..." समोर पोलीस पाहून दिनू जरा घाबरला आणि मागे झाला. आनंद आणि मि. लेले आत शिरले. चांगला मोठा फ्लॅट होता. हवेशीर मोठ्या खोल्या, एका कोपऱ्यात मिनी-बार असा चांगला ठाट होता. इकडे-तिकडे पाहत आनंद, "तुझे कल्पेश साहेब शौकीन दिसतात..." असं म्हणत घराची पाहणी करू लागला. सोबत दिनू आणि मि. लेले फिरत होते. पाहणी करताना आनंद दिनूला म्हणाला, "तुझ्या मालकाबद्दल सांग काहीतरी..." दिनूने एकवार मि. लेलेंकडे पाहिलं आणि म्हणाला, "कल्पेश साहेब एकदम दिलदार आहेत. आठवड्यातून दोन-तीन वेळा तरी इथे पार्ट्या देतात ते. त्यात मोठ्या आवाजातलं संगीत, नाच, गाणी, पोरी सगळं असतं. घरात पार्टी असते तेव्हा मलाही मेजवानी असते. ऊंची दारू, सिगारेट, चमचमीत खाणं. दारू, सिगारेट मी घेतली तरी खाणं बांधून नेतो बायको-मुलासाठी..." बोलता बोलता आनंद कल्पेशच्या बेडरूममध्ये शिरला. कपाटं तपासताना एका कपाटात बँकेचं पासबुक सापडलं. आनंदने ते चाळलं आणि त्याचे डोळे मोठे झाले. बाजूलाच एक फोटो होता. फोटो दिनूला दाखवत आनंदने इशाऱ्यानेच विचारलं. दिनू म्हणाला, "हा कल्पेशसाहेबांच्या कॉलेजच्या वेळचा फोटो आहे. जिथे फोटो ठेवला होता तिथेच एक पेनाचा बॉक्स ठेवला होता. आनंदने बॉक्स उचलला. त्यातलं एक पेन गायब होतं. बॉक्स खाली ठेऊन फोटो आणि पासबुक हातात घेत आनंद म्हणाला, "थँक्स मि. लेले तुम्ही इथे थांबलात. या दोन वस्तू मी घेऊन जातोय. पण घराची झडती घेतली गेली हे कल्पेशला कळता कामा नये. बरं का दिनू... कारण कल्पेश एक संशयित आहे..." दोन्ही गोष्टी घेऊन आनंद तिथून बाहेर पडला... सर्वजण डॉ. गोखलेंच्या लॅबमध्ये जमले. उमा आणि प्रधान यांनी शशांकच्या घरातून आणलेल्या वस्तू आणि शशांकच्या ऑफिसमधून आणलेल्या वस्तू तपासण्यात डॉ. गोखले गर्क झाले तेव्हा बाकी सर्व केस विषयी चर्चा करू लागले. उमा म्हणाली, "आपल्या डोळ्यांदेखत आपला नवरा मरण पावला हे पाहून धक्का बसलेली रेवा सवरली खरी. पण तिच्याकडून फारशी माहिती नाही मिळाली. शशांक-रेवाच्या नात्याबद्दल सर्वजण चांगलंच बोलतात. शिवाय अशी कोणती बाब नाही ज्यावरून त्यांचे बाहेर काही संबंध असावेत याची माहिती मिळेल..." उमाचं म्हणणं पुढे नेत सचिन म्हणाला, "आणि सर हा बबन अत्यंत बेजबाबदार आणि गुंडं प्रवृत्तीचा माणूस आहे. दारू पिणं, सिगारेटी ओढणं, जुगार खेळणं, उधारी मागणं, पैसे नाही मिळाले तर शिवीगाळ-मारहाण करणं हे त्याच्यासाठी नेहमीचंच आहे. शशांकसोबत झालेलं त्याचं भांडण हे त्याच्या अनेक भांडणांपैकी एक आहे. त्यासाठी तो शशांकचा खून करेल, आणि ते ही स्लो पॉयझनिंग सारखी पद्धत वापरून... जरा अशक्यच वाटतं..." सचिनचं बोलणं पूर्ण झालं, तर आनंद पुढे येत म्हणाला, "हा कल्पेश एकदम रंगेल माणूस आहे. पार्ट्या झोडणं, नाच-गाणी, ऊंची दारू, गर्ल फ्रेंड्स, असे महागडे शौक आहेत त्याचे. ऑफिसला क्वचितच कधीतरी जातो. पण क्लायंट मीटिंगला शशांकसोबत हमखास असतो. सर, त्याचा बँक अकाऊंट मी तपासला. महिन्यातून एकदा त्याच्या खात्यात दीड ते दोन लाख कॅश जमा होते. बरं, ही रक्कम एका ठराविक दिवशी एका ठराविक ब्रांचमध्ये जमा होते असं नाही. वेगवेगळी माणसं महिन्यातल्या वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या ब्रॅंचेसमध्ये ही रक्कम जमा करतात. कल्पेशच्या घरातून बँकेचं पासबुक आणि हा फोटो मिळाला. असाच फोटो, शशांकच्या केबिनमध्ये सुद्धा लावलेला होता..." फोटो पाहून उमा म्हणाली, "सर शशांकच्या घरी बेडरूममध्ये पण हाच फोटो लावला आहे..." फोटोकडे पाहत प्रधान म्हणाले, "कल्पेशने सांगितलं होता, की त्यांच्या कॉलेजच्या शेवटच्या दिवसाचा हा फोटो आहे..." सर्वजण बोलतच होते, की, "युरेक्का... सापडलं..." सर्वांनी आवाजाच्या दिशेने पाहिलं. डॉ. गोखले खुशीत दिसत होते. सर्वांच्या नजरा आपल्याकडे आहेत हे कळल्यावर ते म्हणाले, "प्रधान साहेब, शशांकच्या शरीरात विष कुठून गेलं याचा शोध लागला. या सगळ्या वस्तूंमध्ये एकच गोष्ट आपल्या कामाची निघाली. ती म्हणजे हे पेन. या पेनाच्या टोपणाला आणि पेनाच्या टोकाला विषाचे ट्रेसेस सापडलेत..." डॉ. गोखलेंनी सर्वांसमोर पेन धरलं. ते पाहून उमा म्हणाली, "सर, शशांकच्या घरी त्याच्या बेडरूममध्ये रेवा आणि शशांकचा एक फोटो आहे. त्यात शशांकच्या कोटाच्या खिशाला हे पेन लावलेलं मी पाहिलं आहे..." उमाचं म्हणणं पुढे नेत आनंद म्हणाला, "सर, अशीच पेनं मी कल्पेशच्या घरीही पाहिली. एक बॉक्स होता, ज्यातून एक पेन गायब होतं. हे तेच पेन असावं..." सर्वांचं बोलणं ऐकून सचिन म्हणाला, "सर, याचा अर्थ कल्पेश कोणालातरी ब्लॅकमेल करत असावा, ज्याबद्दल ते पैसे त्याच्या खात्यात जमा होत होते. शशांकला ही गोष्ट समजली म्हणून कल्पेशने शशांकचा काटा काढला..." हनुवटी चोळत प्रधान म्हणाले, "कल्पेशच्या खात्यात दर महिन्याला जमा होणारी कॅश, ऑफिसला फारसं नं जाताही तो व्यतीत करत असलेलं राहणीमान, ज्या पेनावर विषाचे ट्रेसेस सापडले, तशीच पेनं कल्पेशच्या घरात सापडणं, या सगळ्या गोष्टींवरून हळू हळू सर्व सुया कल्पेशकडे वळत आहेत. पण हे सगळं कोर्टाला पाठवण्यासाठी आपल्याला अजून भक्कम पुरावे हवेत. आत्तापर्यंत आपण सगळ्या गोष्टी पडताळून पाहिल्या. एकच गोष्ट राहिली. ती म्हणजे हा ग्रूप फोटो. शशांक आणि कल्पेशच्या कॉलेजचा. उमा तू चौकीतच थांब. रेवाला त्या सकाळबद्दल किंवा त्याच्या आधीचं अजून काही आठवतं का ते बघ आणि काही समजलं तर कळव मला. बबन तर चौकीवर आहेच. सचिन, तू या कल्पेशच्या मागावर रहा. तो कुठे निसटून जाण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला थांबव. मी आणि आनंद या कॉलेजला भेट देऊन येतो. कदाचित कल्पेश ज्या व्यक्तीला ब्लॅकमेल करतोय ती व्यक्ती आणि शशांकचा खून का झाला, हे आपल्याला तिथे समजेल. लेट्स मूव्ह..." आनंद आणि प्रधान कॉलेजला पोहोचले. दोघांची ओळख पटल्यावर कॉलेजच्या प्रिन्सिपॉलने त्यांना केबिनमध्ये नेलं. खुर्चीवर बसत प्रधान म्हणाले, "२०१७ मध्ये तुमच्याकडे एक स्टुडन्ट होता, शशांक जहागीरदार. त्याच्याबद्दल माहिती हवी आहे. त्यावर्षीच्या सिव्हील इंजिनियरिंग बॅचचा तो टॉप रँक होल्डर होता..." यावर प्रिन्सिपॉलने कॉम्पुटरवर काही बटणं दाबली आणि रेकॉर्ड काढून दोघांना वाचायला दिले. आनंद आणि प्रधान रेकॉर्ड वाचत होते. तेवढ्यात प्रधानांचं लक्ष एका भिंतीवर गेलं. त्या भिंतीवर बरेच ग्रूप फोटो पिन केलेले दिसत होते. प्रधान तिकडे पाहत आहेत हे लक्षात येताच प्रिन्सिपॉल म्हणाले, "आमच्या कॉलेजची ही पद्धत फार पूर्वीपासून आहे. प्रत्येक शाखेच्या बॅचच्या शेवटच्या दिवशी एक ग्रूप फोटो घेतला जातो आणि तो इथे लावला जातो. फोटोच्या खाली वर्ष पण लिहिलं आहे. २०१७ सालच्या सिव्हील इंजिनियरिंग बॅचचा पण फोटो आहे त्यात..." त्याच वेळी आनंद म्हणाला, "सर, शशांकची सर्व माहिती बरोबर आहे पण... तुम्ही बघा सर..." प्रधानांनी स्क्रिनकडे पाहिलं आणि मग आनंदकडे पाहत म्हणाले, "आता तू तो सॉफ्ट बोर्ड बघ..." आनंदने बोर्ड पाहिला आणि आश्चर्याने प्रधानांकडे पाहिलं. प्रधानांनी मान हलवली तसा आनंदने मोबाईल काढून सॉफ्ट बोर्डसमोर धरला आणि फोटो काढला. फोटो कोणालातरी पाठवून आनंद खुर्चीत येऊन बसला. प्रिन्सिपॉलकडे पाहत प्रधान म्हणाले, "सर, फोटोत हा समोर बसलेला शशांक आणि वरून तिसऱ्या रांगेत उभा असलेला हा कल्पेश, यांच्याबद्दल तुम्ही काही सांगू शकता..." नकारार्थी मान हलवत प्रिन्सिपॉल म्हणाले, "सर, चार वर्षांपूर्वी इथला सगळा स्टाफ बदली झाला. नाही म्हणायला रामदिन नावाचा एक पिऊन आजही आहे. गेली १७ वर्ष तो इथे आहे. त्याला काहीतरी माहीत असेल. मी बोलावतो त्याला..." प्रिन्सिपॉलने इंटरकॉम उचलून रामदिनला पाठवायला सांगितलं. थोड्याच वेळात पन्नाशीतला एक गृहस्थ तिथे आला आणि प्रिन्सिपॉलना सलाम करून उभा राहिला..." रामदिन जवळ जात आनंद म्हणाला, "काका, आम्ही दोघं पोलीस अधिकारी आहोत. मी इन्स्पेक्टर आनंद आणि हे सीनियर इन्स्पेक्टर प्रधान. शशांक जहागीरदार विषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे..." प्रिन्सिपॉलकडे पाहत रामदिन बोलू लागला, "शशांक जहागीरदार. म्हणजे शशांक बाबा. खूप चांगला मुलगा हो. अभ्यासात पण छान. त्याला सिनेमाची आवड होती. मला तो रामूकाका म्हणायचा. ते सिनेमात म्हणतात ना, म्हणून. तो कोणाच्यात जास्त मिसळायचा नाही पण माझ्याशी गप्पा मारायचा. महिन्यातून एकदा मला पैसे देऊन बँकेत भरायला सांगायचा. त्याचं बाकी सगळं ठीक होतं. पण त्याची एक गोष्ट मात्र जरा वेगळी वाटायची. दर शुक्रवारी कॉलेज संपल्यावर शशांक कुठेतरी निघून जायचा आणि रविवारी रात्री परत यायचा. मी त्याला अनेक वेळा याबद्दल विचारलं. पण तो सांगायचं टाळायचा..." प्रधानांनी लगेच विचारलं, "शशांक तुम्हाला दर महिन्याला बँकेत काही पैसे भरायला द्यायचा असं म्हणालात तुम्ही. त्याबद्दल काही सांगाल का..." जरा विचार करत रामदिन म्हणाला, "कोणा मंजिरी नावाच्या मुलीचं खातं होतं ते. बाकी मला काहीच माहीत नाही..." आनंदने रामदिनला कल्पेश आणि शशांकचे फोटो दाखवले. रामदिनने फोटो पाहून परत केले. तेव्हा आनंद म्हणाला, "काका, तुम्ही या दोघांना ओळखत नाही का..." रामदिनने नकारार्थी मान हलवली. आनंद पुढे म्हणाला, "अहो असं काय करताय... हा कल्पेश. शशांकसोबत त्याच्याच वर्गात होता. आणि हा शशांक..." प्रिन्सिपॉल, प्रधान आणि आनंदकडे पाहत रामदिन म्हणाला, "साहेब, हजारो मुलं-मुली येतात कॉलेजला. कोणा-कोणाला लक्षात ठेवणार मी. शशांकबाबा सारखे काहीच असतात, जे आमच्यासोबत छान वागतात आणि आम्हाला सामावून घेतात. ते लक्षात राहतात. त्यामुळे हा कल्पेश असेल शशांकबरोबर, पण लक्षात नाही. आणि साहेब, हा दुसरा फोटो तुम्ही म्हणताय शशांकचा आहे. पण तो शशांक नाही..." हे ऐकून प्रधान, आनंद आणि प्रिन्सिपॉल तिघांनाही आश्चर्य वाटलं. स्क्रिनवर शशांकच्या माहितीत दिसणारा फोटो पाहून त्याकडे बोट दाखवत रामदिन म्हणाला, "साहेब, हा शशांक आहे. माझा शशांकबाबा. तुमच्याकडे असलेल्या फोटोतला मुलगा शशांक असेलही पण तो माझा शशांकबाबा नाही..." रामदिनचं हे म्हणणं ऐकून प्रिन्सिपॉल अजूनच बुचकळ्यात पडले. त्यांनी प्रधानांना विचारलं, "इन्स्पेक्टर प्रधान, हे सगळं काय चाललंय... हा रामदिन काय म्हणतोय..." प्रधान त्यांना उत्तर देणार इतक्यात आनंदचा फोन वाजला... "नमस्कार, इन्स्पेक्टर आनंद बोलतोय. हां... ओके पाठवा. धन्यवाद..." फोन बंद झाला आणि काही क्षणात फोनवर मेसेजेस येऊ लागले. आनंदने सगळे मेसेजेस प्रधानांना दाखवले आणि स्वतःसुद्धा वाचले. मेसेजेसमधले फोटो पाहताना आणि त्यातली माहिती वाचताना आनंद आणि प्रधान दोघांच्याही चेहेऱ्यावरचे भाव बदलले. प्रिन्सिपॉलकडे पाहत प्रधान म्हणाले, "धन्यवाद सर. इथे येण्याने आमचे बरेच प्रश्न सुटले. बऱ्याच गोष्टी नव्याने समजल्या. रामदिन आत्ता जे काही बोलला ते सगळं खरं आहे. कारण त्याच्यासमोर आलेला शशांक वेगळा होता आणि जगासमोर आलेला शशांक वेगळा होता. आजच याची उकल होईल. थोडी कळ सोसा..." फोन बाहेर काढत उमाचा नंबर मिळवत ते म्हणाले, "उमा, रेवाला घेऊन इथे कॉलेजला ये. तिला म्हणावं खुन्याचा शोध लागला आहे..." कॉल कट करत प्रधान आनंदला म्हणाले, "आनंद, सचिनला कॉल कर आणि त्याला सांग कल्पेश जिथे असेल तिथून त्याला उचल आणि इथे कॉलेजला घेऊन ये..." थोड्याच वेळात उमासोबत आलेली रेवा, रेवाला मदत म्हणून आलेले डॉ. संग्राम, सचिनसोबत आलेला कल्पेश, कॉलेजचा प्रिन्सिपॉल, रामदिन, आनंद आणि प्रधान, कॉलेजच्या गेटबाहेर जमले. प्रधान म्हणाले, "आपण सगळे इथे जमलोत कारण या प्रकरणाची खरी सुरुवात इथूनच झाली. या कॉलेजपासून..." एक फोटो कल्पेशसमोर धरत प्रधानांनी कल्पेशला त्या फोटोबद्दल विचारलं. कल्पेश म्हणाला, "सर, हा कॉलेजच्या शेवटच्या दिवसाचा फोटो आहे. यात मी आहे आणि शशांक पण आहे..." फोटोमध्ये शशांक कुठे असं विचारलं तेव्हा कल्पेशने शशांकच्या चेहेऱ्याकडे बोट दाखवलं. तेव्हा प्रधान हसत म्हणाले, "हा शशांक आहे... पण हा रामदिन तर सांगतो हा शशांक नाही. काय रामदिन, हे साहेब म्हणतात या ग्रूप फोटो मधला हा मुलगा शशांक आहे. तुझं काय म्हणणं..." रामदिनने तो फोटो पाहिला. तेवढ्यात आनंदने प्रिन्सिपॉलच्या केबिनमध्ये असलेला फोटो रामदिनला दाखवला. त्यातल्या एका चेहेऱ्याकडे बोट दाखवत रामदिन म्हणाला, "साहेब, हा शशांक आहे..." कल्पेशला तो फोटो दाखवत प्रधान म्हणाले, "काय कल्पेश... आता या दोन फोटोमधला कोणता शशांक खरा म्हणायचा... तू दाखवलेला की या रामदिनने दाखवलेला..." कल्पेश थोडा गडबडला. चेहेऱ्यावर आलेला घाम तो रुमालाने टिपू लागला. प्रधान म्हणाले, “इतक्यात घामाघूम झालास... मीच सांगतो मग... तुझं बरोबर आहे कल्पेश. तू दाखवलेला मुलगा खरा शशांक आहे..." यावर सचिनने विचारलं, "सर, म्हणजे हा रामदिन खोटं बोलतोय का..." प्रधान हसले आणि म्हणाले, "नाही सचिन. रामदिन म्हणतोय ते सुद्धा खरं आहे. कारण शशांकचं नाव घेऊन कॉलेजमध्ये दाखल झालेला हा मुलगा शशांक नसून मंदार आहे... कल्पेश, आता पुढचं काय ते सांगतोस, की मी सांगू..." कल्पेश घामाने थपथपला होता. रुमाल खिशात ठेवत तो म्हणाला, "मी सांगतो सगळं. रामदिनने दाखवलेला हा मुलगा मंदार आहे. शशांकच्या नावाने तो माझ्याच बॅचमध्ये शिकत होता. शिक्षण पूर्ण झालं. शशांक म्हणजेच मंदारने टॉप रँक मिळवला. नोकरी मिळावी म्हणून मी शशांकच्या कंपनीत इंटरव्हयूसाठी गेलो. मला वाटलं बॅचमेट म्हणून शशांक मला जॉब देईल. पण तिथे मला भेटलेला, आणि प्रश्न विचारणारा शशांक तो नव्हता, जो माझ्यासोबत शिकत होता. शिवाय केबिनमध्ये लावलेल्या फोटोमध्येही तो शशांक नव्हता. मी समोर गेलो तर शशांकने मला ओळखलंदेखील नाही. मला अचंभा वाटला. मी घरी आलो आणि माझ्याकडचा फोटो काढला. थोडी चौकशी केल्यावर खरा प्रकार माझ्या लक्षात आला आणि मी शशांकला भेटायचं ठरवलं... मला माहीत होतं, शशांक मला तसा भेटणार नाही. म्हणून आधी ते दोन्ही फोटो शशांकला पाठवले. माझ्या अपेक्षेप्रमाणे त्याचाच फोन आला. मी शशांकला भेटलो. मला माहीत असलेल्या सर्व गोष्टी त्याला सांगितल्या. तेव्हा शशांकने खुलासा केला. शशांक लहानपणापासून below average student होता. अभ्यासात त्याला काही रुची नव्हती. त्याचे वडील मि. जहागीरदार मोठे बिल्डर होते. शशांकही त्याच लाईनमध्ये यावा म्हणून त्यांनी शशांकला सिव्हील इंजिनियरिंगला घातलं. पण शशांकला मौज-मजेशिवाय दुसरं काही दिसायचं नाही. त्याच दरम्यान मि. जहागीरदारांच्या ऑफिसमध्ये एक मुलगा नोकरीसाठी आला. तो होता मंदार. पडेल ते काम करायला तो तयार होता पण त्याचे सर्टिफिकेट्स काही वेगळंच सांगत होते. मि. जहागीरदारांनी तर त्याला नोकरी नाही दिली. पण शशांकने त्याच्या हुशारीचा फायदा घ्यायचं ठरवलं... शशांकच्या नावाने मंदार कॉलेजमध्ये शिकू लागला. शशांक दर महिन्याला मंदारला पैसे पाठवायचा आणि शशांकचं नाव लाऊन मंदार वावरायचा. दरम्यानच्या काळात हार्ट अटॅकने मि. जहागीरदारही गेल्याने शशांकच्या सगळंच पथ्यावर पडलं होतं. शशांक मला हे सगळं सांगत असताना मी सगळं रेकॉर्ड करून ठेवलं. शशांकही मूर्खासारखं मला सगळं सांगून बसला. त्याला जराही लक्षात आलं नाही, की जसं त्याने पैशाच्या जोरावर मंदारला मॅनेज केलं, तसं कॉलेजमध्ये कोणालातरी मॅनेज करून रेकॉर्ड बदलता आले असते. पण शशांक घाबरला. आणि त्याच्या याच भितीचा मी फायदा करून घेतला. शशांकच्या कंपनीमध्ये भागिदारी मिळवली. माझं चांगलं सुरू होतं. ए.सी.केबिनमध्ये बसायचं, क्लायंट मिटिंग अटेंड करायची फक्त आणि त्यासाठी प्रॉफिटमध्ये शेयर. काही काळानंतर मला हेसुद्धा समजलं, की शशांकने मंदारचा अपघाती मृत्यू घडवून आणला होता. हे समजल्यावर मी शशांककडे अजून पैसे मागितले. वर्षाच्या प्रॉफिट शेयरशिवाय आता दर महिन्याला शशांक मला पैसे देऊ लागला आणि मी चैनीत जगू लागलो... आमच्या पार्टनरशिप डीडमध्ये एक क्लॉज आहे. त्यात असं म्हटलं आहे, की शशांकचा किंवा माझा मृत्यू झाल्यास, मृत पार्टनरची जागा रेवा घेईल आणि सगळे निर्णय तिचेच राहतील. साहेब, तुमच्या इन्स्पेक्टर सचिनने इथे येताना मला सांगितलं की तुमचा माझ्यावर संशय आहे. सर आता तुम्हीच विचार करा... शशांकला मारून मी माझंच नुकसान का करून घेऊ..." कल्पेश बोलायचं थांबला. कल्पेशकडे पाहत प्रधान म्हणाले, "बरोबर आहे कल्पेश तुझं. शशांक तुझ्यासाठी सोन्याचं अंडं देणारी कोंबडी होता. त्याला मारून तुझंच मोठं नुकसान होतं. शशांक नावाच्या त्या कोंबडीला मारलं त्या व्यक्तीने, जिचा त्या अंड्यावर जास्त अधिकार होता... काय रेवा मॅडम. बरोबर बोलतोय ना मी... सॉरी सॉरी... रेवा नाही, मंजिरी. हेच नाव आहे ना तुमचं..." रेवा रागाने लाल झाली. एकदा कल्पेशकडे नजर टाकून ती बोलू लागली, "हो. माझं खरं नाव रेवा नाही, मंजिरी आहे. आणि मीच मारलं शशांकला..." मंजिरीचं बोलणं ऐकून पुढे सरसावत डॉ. संग्राम म्हणाले, "मंजू हे काय बोलतेस तू... अगं..." डॉ. संग्रामना मध्येच थांबवत मंजिरी म्हणाली, "प्लीज डॉक्टर. मला बोलू द्या... हे सगळं मी पैशासाठी नाही केलं. शशांकच्या पार्टनरशिप डीडबद्दल मला कधीच काहीच माहीत नव्हतं. मी शशांकला मारलं माझ्या दादाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी. शशांकने वापर करून घेतलेला मंदार सरंजामे माझा मोठा भाऊ. आमची परिस्थिती पहिल्यापासूनच हालाखीची होती. आमच्या लहानपणीच आमचे आई-बाबा एका अपघातात वारले. त्यांनंतर बाबांचे मित्र डॉ. संग्राम यांनी आमचा सांभाळ केला. त्यांच्यावर ओझं होऊन राहणं आम्हाला पटत नव्हतं. आम्ही त्यांचं घर सोडलं. दादाचं स्वप्न होतं, की मी शिकून मोठी व्हावं. हुशार असूनही त्याने शिक्षण सोडलं. मग पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणारा, हॉटेलचा वेटर, अशा छोट्या नोकऱ्या तो करू लागला. एकदा दादाने मला सांगितलं, की त्याला एका मोठ्या कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळाली आणि कामासाठी बाहेरगावी रहावं लागणार आहे. त्याने माझं नाव एका मोठ्या कॉलेजमध्ये घातलं. दादा दर महिन्याला मला पैसे पाठवी. दर शनिवारी आमची भेट होई. अशीच पाच वर्ष निघून गेली... एका शनिवारी दादा आलाच नाही. मी त्याला फोन लावला पण त्याचा फोनसुद्धा लागला नाही. मला वाटलं कामानिमित्त अडकला असेल. मी अजून एक शनिवार जाऊ दिला. पंधरा दिवस झाले तरी दादाची काही खबर नाही आली. तेव्हा मी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्याने सांगितलेली कंपनी अस्तित्वातच नव्हती. मला येणारे पैसे ज्या ठिकाणच्या बँकेत भरले जायचे, मी तिथेही गेले. पण मंदार सरंजामे या व्यक्तीबद्दल कोणालाच काही माहीत नव्हतं. मी तिथल्या पोलिसात तक्रार करायला गेले तेव्हा मी दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांनी अपघातात मरण पावलेल्या एका माणसाची केस फाईल मला दाखवली. मृत व्यक्तीचं नाव नव्हतं लिहिलं. पण बाकी माहिती मंदार दादाशी तंतोतंत जुळत होती. शिवाय अपघाताच्या वेळी त्या मेलेल्या व्यक्तीच्या गळ्यात सापडलेली चेनसुद्धा मी ओळखली. दादा जे पैसे मला पाठवायचा, त्यातून काही वाचवून मी दादासाठी ही चेन विकत घेतली होती. माझी खात्री पटली. ही मेलेली व्यक्ती म्हणजे माझा मंदार दादाच होता... मृत्यूचं कारण वाचून तर मी पूर्ण हलले. दारूचं अती सेवन करून मद्यधुंद अवस्थेत रस्त्याने चालताना तोल जाऊन ट्रकसमोर आल्याने मृत्यू. माझ्या भावाला दारू तर नाहीच, पण साध्या कोल्ड ड्रिंकचीसुद्धा आवड नव्हती हो. आणि असा माणूस दारूच्या नशेत बुडालेला. मी तेव्हाच ओळखलं, की मंदार दादासोबत काहीतरी अघटित घडलं आहे. मी खूप प्रयत्न केले. पण मला न्याय मिळू शकला नाही. अधून-मधून डॉ. संग्रामच्या संपर्कात मी होते. माझं शिक्षणही पूर्ण झालं होतं. त्यांच्याच सांगण्यावरून मी इथे आले. एस.के. ग्रूपमध्ये शशांकच्या सेक्रेटरीची नोकरी धरली. मला शशांक खूप आवडायचा. पण त्याला कधी सांगू शकले नाही. आणि एक दिवस शशांकनेच मला मागणी घातली. आमचं लग्न झालं आणि मी नोकरी सोडली. संपूर्ण वेळ घर आणि शशांक हेच आता माझं आयुष्य बनलं होतं. आम्ही नवीन घर घेतलं. शिफ्टिंगच्या वेळी शशांकच्या कपाटाच्या एका खणात मला दोन फोटो सापडले. एका फोटोमध्ये शशांक होता तर एका फोटोमध्ये मंदार दादा होता. दोन्ही फोटोमध्ये कल्पेश होता... मी डॉ. संग्रामना ते फोटो दाखवले. त्यांनी त्यांच्या परीने चौकशी केली तेव्हा खरा प्रकार उघडकीस आला. कल्पेशला या सर्व गोष्टी आधीपासून माहीत होत्या. पण पैशाच्या हव्यासापोटी त्याने या गोष्टी बाहेर येऊ दिल्या नाहीत. शशांकवरचं माझं प्रेम पूर्ण आटलं. प्रेमाची जागा राग आणि बदल्याने घेतली. डॉ. संग्रामकडून मी विष मिळवलं. आधी त्यांनी नकार दिला. पण माझ्यावरच्या मायेखातर ते मला मदत करायला तयार झाले. डॉ. संग्रामनी मला स्लो पॉयझनिंगबद्दल सांगितलं. मला कल्पेशलाही धडा शिकवायचा होता. म्हणून त्याने शशांकला दिलेल्या एका पेनाला मी डॉ. संग्रामनी दिलेलं विष लावलं. शशांकला पेनाचं टोपण तोंडात धरून पेन उघडण्याची सवय होती. मला खात्री होती, की एक ना एक दिवस विष त्याचं काम करेल आणि दादाला न्याय मिळेल. चौकशी झालीच तर कल्पेशने दिलेलं पेन, त्याचं ऑफिसमध्ये येणं-जाणं, शशांक त्याला देत असलेले पैसे यामुळे कल्पेश अडकेल. तोवर आम्ही नॉर्मल रहावं असं मी आणि डॉ. संग्रामने ठरवलं. पण विषाने नको त्या वेळी काम केलं आणि शशांक घरी असतानाच त्याला मरण आलं... मी घाबरले आणि गोंधळले. पोलिसांनी सखोल चौकशी केली असती तर कदाचित सत्य बाहेर आलं असतं. पण डॉ. संग्रामनी कधी काळी सांगितलेली एक केस मला आठवली ज्यात अकस्मात बसलेल्या धक्क्याने एक माणूस शॉकमध्ये गेला आणि धक्क्याच्या त्या प्रसंगासहित मधले काही दिवस विसरला. मीसुद्धा तसंच केलं. शशांक जिवंत असून टूरवर गेल्याचा बनाव निर्माण केला. जेव्हा माझी खात्री पटली, की आता तुम्ही मला उलट-सुलट प्रश्न विचारणार नाही, तेव्हा मी स्वतःला शॉकमधून बाहेर आणलं. शशांकला मारून माझा अर्धा बदला पूर्ण झाला होता. पण हा कल्पेश अजून बाकी आहे. सॉरी दादा. मी तुला पूर्ण न्याय मिळवून देऊ शकले नाही. पण..." इतकं बोलून मंजिरीने बाजूलाच उभ्या असलेल्या उमाला ढकललं आणि साडीमध्ये लपवलेली पिस्तूल काढून कल्पेशवर चालवली. गोळीने कल्पेशच्या छातीचा वेध घेतला. कल्पेश खाली कोसळला आणि गतप्राण झाला. कल्पेश मेला हे पाहून मंजिरी जोरजोरात हसत सुटली. तिच्या हातून पिस्तूल खाली पडलं. प्रधानांकडे पाहत मंजिरी म्हणाली, "इन्स्पेक्टर साहेब. आता माझ्या दादाला पूर्ण न्याय मिळाला. हा... हा... हा..." पडलेलं पिस्तूल उचलत प्रधान म्हणाले, "मंजिरी, मला मान्य आहे कायद्यात काही त्रुटी आहेत. तुझ्याकडे पुरावे नव्हते तेव्हा शशांक आणि कल्पेश निसटले. पण पुरावे हाती आल्यावर तरी तू पोलिसात पुन्हा जायला हवं होतंस. तुझ्या डोक्यात असलेल्या रागाच्या आणि बदल्याच्या भावनेने तुझ्या विवेकावर ताबा मिळवला आणि तू हे कृत्य केलंस. पण मंजिरी, गुन्हेगाराला शिक्षा व्हायलाच हवी. शशांक आणि कल्पेशच्या कृत्यांची शिक्षा त्यांना मिळाली. तुलाही शिक्षा भोगणं क्रमप्राप्त आहे. आणि डॉ. संग्राम, गुन्हेगाराला किंवा एखाद्या व्यक्तीला गुन्हा करण्यात मदत करणं, हा सुद्धा एक गुन्हाच आहे. मंदार आणि मंजिरीवरच्या मायेपोटी तुम्ही मंजिरीची साथ दिलीत. तुम्हालाही याची शिक्षा होईल..." समाप्त.
@ अनिकेत परशुराम आपटे.

No comments:

Post a Comment