पहिल्या भागात...
Friday, May 30, 2025
पिक्चर परफेक्ट (दुसरा व शेवटचा भाग)...
Tuesday, May 27, 2025
पिक्चर परफेक्ट (पहिला भाग)...
सकाळचे ८ वाजले होते. शशांक जॉगिंग करून घरात आला. बूट काढून पेपर वाचायला हॉलमध्ये बसणारच होता की त्याची नजर बेडरूमकडे वळली. रेवा आरशासमोर केस सुकवत उभी होती. शशांक दबक्या पावलांनी आत गेला आणि त्याने रेवला मागून मिठी मारली. रेवाच्या हातून ड्रायर खाली पडला. शशांककडे पाहत रेवा म्हणाली, "काय हे... आत्ताच अंघोळ झाली माझी आणि तू..." रेवला वळवत शशांक म्हणाला, "त्यात काय, परत कर अंघोळ. माझीही अंघोळ बाकीच आहे की..." शशांकने रेवाच्या केसातून हात फिरवला. दोघं अजून जवळ आली. दोघांचे ओठ एकमेकांना बिलगले आणि दोघांचे डोळे बंद झाले...
काही क्षणात त्यांचे ओठ एकमेकांना दुरावले. त्यांचे डोळे उघडले. रेवा म्हणाली, "हॅपी बर्थ डे शशांक..." रेवाच्या भाळाचं चुंबन घेत शशांक म्हणाला, "वाढदिवसाची इतकी गोड सुरुवात झाली. पण एकच..." रेवा हसली आणि म्हणाली, "आपण या घरात आलो त्यानंतरचा हा तुझा पहिला वाढदिवस म्हणून आत्ता फक्त तोंड गोड केलं. बाकी सगळं रात्री. आता सोड पाहू मला. सुजाता येईल इतक्यात. तिने आपल्याला असं पाहिलं तर..." दोघं बोलत असताना मेन डोर उघडण्याचा आवाज आला. रेवा लगेच वॉशरूममध्ये गेली आणि शशांक बाहेर आला. दारातून सुजाता येताना दिसत होती. तिच्या एका हातात भाजीची पिशवी आणि दुसऱ्या हातात दुधाची थैली होती. शशांककडे पाहत सुजाता हसून म्हणाली, "हेपी बड्डे दादा..." शशांकने स्मित केलं आणि पेपर वाचत सोफ्यावर बसला...
"आज उशीर केलास सुजाता..." बाहेर येत रेवा म्हणाली. सुजाता काही बोलणार इतक्यात रेवा पुन्हा म्हणाली, "बरं ते जाऊ दे. मी आता निघते थोड्या वेळात. आज दादांच्या आवडीचा ब्रेकफास्ट बनव हं... आणि हो, आज सहा नंतर तुला सुट्टी. दादांचा वाढदिवस आहे ना आज, तर आम्ही बाहेर जाणार आहोत..." रेवा बोलत असताना शशांकने तिच्याकडे एक कटाक्ष टाकला. दोघांची नेत्रपल्लवी झाली आणि रेवा आवरण्यासाठी आत निघून गेली तर सुजाता किचनमध्ये शिरली. थोड्याच वेळात सुजाताने गरम दुधाचा ग्लास आणून शशांकपुढे ठेवला. शशांकने एक घोट घेतलाच होता की रेवा तयार होऊन बाहेर आली. "शशांक मी निघते रे. माझ्या महत्वाच्या अपॉइंटमेंट्स आहेत आज. पण संध्याकाळी लवकर येते. तूसुद्धा तुझी कामं आटपून लवकर ये ओके..." असं म्हणत तिने शशांककडे पाहिलं...
शशांकचा चेहेरा बदलला होता. त्याच्या हातून पेपर गळून पडला. एका हातात दुधाचा ग्लास घेऊन दुसऱ्या हाताने छाती चोळत शशांक उभा राहिला. "शशांक काय होतंय तुला..." असं म्हणत रेवा त्याच्या जवळ आली. शशांकचा चेहेरा एकदम आक्रसला. त्याचे डोळे मोठे झाले. दुधाचा ग्लास त्याच्या हातून निसटून जमिनीवर पडून फुटला. शशांकने दोन्ही हातांनी स्वतःचा गळा पकडला आणि क्षणार्धात सोफ्यावर कोलमडला. "सुजाता... लवकर ये... बघ शशांक कसं करतोय..." रेवाने सुजाताला बोलावलं खरं. पण तोपर्यंत शशांकची हालचाल बंद झाली होती. रेवा शशांकला हलवून उठवू लागली, "शशांक अरे ऊठ की... हे बघ मला अशी मस्करी पसंत नाही... शशांक..." रेवाने पुन्हा शशांकला हलवलं तर त्याचा हात मांडीवरून खाली घसरला. हे पाहून रेवा जोरात किंचाळली, "शशां....... क....."
तिथे चौकीवर नेहमीचं कामकाज सुरू होतं. प्रधान आणि उमा जुन्या फाईल्स पाहत होते. तर सचिन कॉम्पयूटरमध्ये डेटा अपडेट करत होता. चौकीतला फोन वाजला. फोन उचलत उमा म्हणाली, "नमस्कार, सब इन्स्पेक्टर उमा बोलते... काय... ठीक आहे आम्ही येतोच. पण तोपर्यंत कोणत्याही गोष्टीला हात लावू नका..." फोन ठेऊन सर्वांकडे पाहत उमा म्हणाली, "सर गुलमोहर कॉलोनीतल्या ५ नंबर बंगल्यात एक खून झालाय..." सर्वांकडे पाहत प्रधान, म्हणाले, "ओके. सचिन, आनंदला कॉल करून स्पॉटवर यायला सांग. लेट्स गो..."
जीप गुलमोहर कॉलनीच्या गेटजवळ पोहोचली. आनंदही त्याचवेळी त्याच्या बाईकने तिथे पोहोचला. दोन्ही गाड्या ५ नंबर बंगल्याच्या आवाराबाहेर येऊन थांबल्या. आवारात आणि गेटबाहेर बघ्यांची गर्दी जमली होती. गर्दीतून वाट काढत प्रधान, उमा, आनंद आणि सचिन बंगल्यात शिरले. हॉलच्या मधोमध असलेल्या सोफ्यावर शशांकचं प्रेत पडलं होतं. त्याचे डोळे सताड उघडे होते आणि तोंडातून फेस येत होता. शशांकच्या उजव्या पायाजवळ पेपर होता आणि डाव्या पायाजवळ कचांचा चुराडा पडला होता. हॉलच्या डाव्या हाताला असलेल्या किचनच्या दारात एक बाई बसली होती आणि काही बायका तिच्याजवळ उभ्या होत्या. प्रधानांनी इशारा देताच तिघं कामाला लागली. आनंद बॉडी तपासू लागला. उमा त्या बायकांजवळ गेली तर प्रधान आणि सचिन गर्दीकडे वळले...
गर्दीला उद्देशून प्रधान म्हणाले, "तुमच्यापैकी कोणी फोन केला होता का..." त्यासरशी एक माणूस पुढे आला आणि बोलता झाला, "हो सर. रोजच्यासारखं आम्ही तिघं वॉक घेऊन परतत होतो तर या बंगल्यातून किंकाळी ऐकू आली. आम्ही तिघं इथे आलो तर सोफ्यावर शशांक मरून पडला होता. शशांकची बायको रेवा त्याच्या बाजूलाच बेशुद्ध पडली होती आणि ती मोलकरीण सुजाता रेवाला उठवण्याचा प्रयत्न करत होती. मी तुम्हाला फोन केला आणि मग आम्ही रेवाला नेऊन तिच्या बेडवर ठेवलं आणि तुमची वाट पाहत इथे थांबलो. मग हळू हळू ही गर्दी वाढली..." "बरं, या रेवा आणि शशांकमध्ये काही वाद वगैरे..." सचिनच्या या प्रश्नावर त्या लोकांनी नकारात्मक मान हलवली. एक जण म्हणाला, "सर, नवरा-बायकोचे नॉर्मल वाद तर प्रत्येक घरात होतात. पण कधी सिरीयस भांडण झालं नाही त्यांच्यात. खूप प्रेमळ जोडपं होतं हे..."
तिथे उमा त्या बसलेल्या बाईकडे गेली, "काय नाव तुमचं... आणि या घटनेबद्दल तुम्हाला काय माहीत आहे..." पदराला डोळे पुसत ती बाई उभी राहिली आणि म्हणाली, "मी सुजाता. इथं मोलकरीन हाये. आज धा म्हाइनं झालं काम घेऊन. म्या सकाली येती. दूध तापवून, नाश्ता बनवती. दोघांचे डबे बनवती. दादा आनी ताई निघून गेल्यावर बाकी कामं आटपून म्या बी निघून जाती. मंग संध्याकाली सहाला परत येती रातच्या जेवनासाटी. शनवार किंवा सुट्टीच्या आधीचा दिस असला की माला संध्याकाली सुट्टी असायची. आज दूध तापवून म्या दादांना दिलं आनी येक घोट घेऊनच... म्या काय बी केलं न्हाय म्याडम... आयच्यान..." सुजाता बोलायची थांबली आणि पुन्हा मुसमुसू लागली. तिथे जमलेल्या बायका सुजाताला धीर देऊ लागल्या. उमाने लगेच पुढचा प्रश्न केला, "रेवा आणि शशांकमध्ये काही वाद... काही भांडण..." यावर रडणं थांबवत सुजाता म्हणाली, "न्हाय म्याडम. ताई आनी दादा लय चांगले व्हते. भांडन कदी झालं न्हाय तेंच्यात..."
सर्वांची चौकशी सुरू असताना आनंदने प्रधानांना बॉडीजवळ बोलावलं. प्रधान सोफ्याजवळ पोहोचताच आनंद म्हणाला, "सर, क्लीयर केस ऑफ पॉयझनिंग. शशांकचे ओठ आणि हाताची नखं निळी पडली आहेत. फरशीवर तुटलेला ग्लास आणि दूध दिसतंय. शशांकच्या अंगात ट्रॅक सूट आहे आणि टेबलवर हेडफोन्स ठेवलेत. म्हणजे हा नुकताच जॉगिंग करून आला असावा. या बाजूच्या टेबलवर हा मोबाईल आहे. शशांकचाच असावा. यावर शेवटचा कॉल कोण्या कल्पेशचा आहे..." आनंद बोलतच होता, की, "शशांक... अरे काय झालं तुला..." दारातून हा आवाज आला. सर्वांनी दाराकडे पाहिलं तर एक ऊंच माणूस दारात आला होता. तो पुढे आला आणि बॉडीजवळ येणार तोच सचिनने त्याला हटकलं, "प्लिज थांबा इथे. आत्ता बॉडीजवळ जाऊ नका. बाय द वे, तुम्ही कोण..." सचिनच्या अडवण्याने थांबलेला तो माणूस सचिनकडे पाहत म्हणाला, "मी कल्पेश. शशांकचा मित्र आणि बिझीनेस पार्टनर..."
हे ऐकून प्रधान पुढे झाले, "अच्छा तुम्ही मि. कल्पेश. थोड्या वेळापूर्वी तुम्हीच फोन केलात ना शशांकच्या मोबाईलवर..." कल्पेशने होकारार्थी मान हलवली आणि म्हणाला, "हो, मीच केला होता फोन. सुजाताने फोन घेतला आणि मला शशांकबद्दल सांगितलं. मी तडक इथे यायला निघालो..." आनंदने लगेच पुढचा प्रश्न केला, "पण इतक्या सकाळी कॉल कशासाठी केलात तुम्ही..." यावर कल्पेश म्हणाला, "सर, आज एका मोठया प्रोजेक्ट संबंधी आमची क्लायंटसोबत महत्वाची मिटिंग आहे. त्या प्रोजेक्टची फाईल काल शशांक घरी घेऊन आला होता. त्या फाईलची आठवण करायची होती आणि शिवाय आज शशांकचा वाढदिवस आहे. तर विशसुद्धा करायचं होतं..." कल्पेश बोलत होता, की, "अरे कल्पेश... इतक्या सकाळी सकाळी तू इथे..."
बेडरूमच्या दिशेने हा आवाज आला होता. सर्वांनी तिथे पाहिलं तर दारात रेवा उभी होती. तिच्या चेहेऱ्यावर स्मित होतं. कल्पेश तिच्याकडे पाहतो आहे हे लक्षात येताच रेवा पुढे येत म्हणाली, "खुद्द कल्पेश साहेब इतक्या सकाळी इथे... हं... शशांकला विश करायला आलास ना... अरे आत तर ये. शशांक गेलाय जॉगिंगला. जगबुडी झाली तरी शशांक जॉगिंग सोडायचा नाही. अजून सुजाता पण आली नाही. तू बस जरा मी चेंज करून येते. शशांक येईलच इतक्यात..." रेवा बोलत असताना तिने आजू-बाजूला पाहिलं. बरेच अनोळखी चेहेरे समोर दिसत होते. सर्वजण रेवाकडे पाहत होते. रेवा थोडी बावरली. सर्वांकडे पाहत ती म्हणाली, "तुम्ही सगळे इथे काय करताय... आणि असे का पाहताय माझ्याकडे... शशांक... अरे तू काही सरप्राईज पार्टी प्लॅन केली आहेस का... हे बघ किती लोक आलेत..." रेवा असंबद्ध बोलत होती आणि सगळे एकमेकांकडे पाहत होते. प्रधानांनी उमाला इशारा केला. उमा रेवाजवळ येत म्हणाली, "मॅडम, मी सब-इन्स्पेक्टर उमा. हे सगळे आणि आम्ही इथे आहोत कारण थोड्या वेळापूर्वी शशांकचा मृत्यू झाला आहे..."
हे ऐकून रेवा काही क्षण उमाकडे पाहत राहिली. मग हसू लागली. हसता हसता उमाकडे पाहत रेवा म्हणाली, "काय नाव म्हणालात तुमचं... उमा... उमा मॅडम, हा एप्रिल नाही बरं का... उगाच काहीही सांगू नका मला. असं सांगायला शशांकच म्हणाला ना... कल्पेश, अरे हा काय प्रकार आहे... ही सगळी माणसं कोण आहेत... आणि शशांक कुठे आहे..." रेवा बोलत असताना सुजाता तिच्याजवळ आली आणि तिला सोफ्यासमोर घेऊन आली. सोफ्यावर उघड्या डोळ्यांसह निपचित पडलेल्या शशांकला पाहून रेवा स्तब्ध झाली. आपला थरथरता हात शशांककडे नेत, "शशांक..." अशी हाक मारून रेवा पुन्हा बेशुद्ध झाली. सुजाता आणि उमाने तिला सांभाळलं. प्रधानांनी हाताने इशारा केला तेव्हा उमा व सुजाता रेवाला बेडरूममध्ये घेऊन गेल्या. रेवाला आत झोपवून सुजाताला तिथे बसवून उमा बाहेर आली. आपल्या टीमकडे येत म्हणाली, "सर, रेवाला बहुतेक मानसिक धक्का बसला आहे... आत्ता तिच्याशी बोलून काहीच साध्य होणार नाही..." होकारार्थी मान हलवत प्रधान म्हणाले, "सचिन, तू शशांकची बॉडी आणि इथे मिळालेल्या सर्व संशयास्पद वस्तू डॉककडे घेऊन जा. उमा, तू इथेच थांब. आनंद, आपण दोघं शशांकच्या ऑफिसमध्ये चौकशी करू. चला मि. कल्पेश..."
शशांकची बॉडी आणि संशयास्पद वस्तू घेऊन सचिन डॉ. गोखलेंच्या लॅबकडे निघाला तर आनंद आणि प्रधान कल्पेशसोबत त्यांच्या ऑफिसच्या दिशेने गेले. "मि. कल्पेश, तुम्ही शशांक आणि रेवाला कधीपासून ओळखता... " आनंदच्या या प्रश्नावर आनंदकडून प्रधानांकडे पाहत कल्पेश म्हणाला, "सर, मी आणि शशांक एकाच इंजिनियरिंग कॉलेजमध्ये शिकत होतो. पास झाल्यावर आम्ही पार्टनरशिपमध्ये कंपनी सुरू केली. आजवरतरी आमच्यात कधी मतभेद झाले नाहीत. छोटे-मोठे वाद होतात पण ते काही काळच टिकतात. दोन वर्षांपूर्वी रेवा आमच्या ऑफिसमध्ये शशांकची सेक्रेटरी म्हणून जॉईन झाली. हळू हळू तिची आणि शशांकची मैत्री होऊन एकमेकात प्रेम जमलं. मग लग्न..." कल्पेशचं बोलणं ऐकून प्रधान म्हणले, "मग शशांक आणि रेवाचं नातं कसं होतं..."
या प्रश्नावर कल्पेश थोडा चक्रवला. मग म्हणाला, "सर, सर्वसाधारण नवरा-बायकोचं जसं नातं असतं तसंच या दोघांचंही होतं. पण हे प्रश्न का विचारताय तुम्ही..." प्रधान म्हणाले, "मि. कल्पेश, प्राथमिक अंदाज सांगतो, की शशांकवर विषप्रयोग झालाय. आणि तोही शशांकच्या राहत्या घरात. त्यामुळे रेवावर आमचा पहिला संशय आहे..." प्रधानांचं बोलणं पुढे नेत आनंद म्हणाला, "जे दूध शशांकला दिलं गेलं, कदाचित त्यात किंवा त्या दुधाच्या ग्लासात विष असेल. यावरून सुजातावरही संशय आहे. शिवाय तुम्ही शशांकचे बिझीनेस पार्टनर आहात. त्यामुळे संशयाची सुई तुमच्यावर देखील आहे..." हे ऐकून कल्पेश चकित झाला, "माझ्यावर संशय... सर मी काहीही केलं नाही. आमच्यात काहीच वाद नव्हते..." कल्पेशच्या खांद्यावर हात ठेवत प्रधान म्हणाले, "रिलॅक्स मि. कल्पेश. जर तुम्ही काही केलं नसेल तर घाबरायचं कशाला. तूर्तास आपण तुमच्या ऑफिसला जाऊ. आमचे काही प्रश्न आहेत ते तुमच्या स्टाफला विचारू..."
शशांकच्या घरी, रेवा तिच्या बेडवर बेशुद्ध अवस्थेत पडली होती. एक डॉक्टर तिला तपासत होता. सुजाता बाजूलाच उभी होती आणि उमा खोली न्याहाळत होती. खोलीच्या मध्यभागी बेड होता. दोन्ही बाजूला दोन कपाटं होती. बेडसमोर ड्रेसिंग टेबल होतं. भिंतींवर शशांक आणि रेवाचे फोटो होते. बेडच्या मागे असलेल्या टेबलवरही वेगवेगळे फोटो होते. एक फ्रेम उचलून उमा पाहत होती की रेवा हळू हळू शुद्धीवर आली. तिने डोळे उघडले तर ती बेडवर होती. सुजाता तिच्या पायाशी बसून होती आणि बाजूला असलेल्या खुर्चीवर उमा बसली होती. तिची नजर समोर गेली तर तिथे डॉक्टर उभे होते. "डॉक्टर, तुम्ही इथे..." उठून बसत रेवा म्हणाली. तिला गरगरायला लागलं म्हणून तिने डोक्याला हात लावला. सुजाताने रेवाला आधार देत बेडवर बसवलं. "रेवा मॅडम, बरं वाटतंय का तुम्हाला..." उमाच्या या प्रश्नावर तिच्याकडे पाहत रेवा म्हणाली, "डोकं थोडं जड झालं आहे. पण तुम्ही कोण... आणि इथे माझ्या बेडरूममध्ये काय करताय... शशांक... अरे हा काय प्रकार आहे..."
उमा काही बोलणार इतक्यात डॉक्टर म्हणाले, "अगं रेवा, तुला जरा थकवा आला होता म्हणून सुजाताने मला बोलावलं. शशांक टूर वर आहे. मी त्याला कळवलं आहे. ओके. आणि ही उमा आहे. माझी असिस्टंट. मदतीसाठी आणलं मी तिला. बरं, तू आराम कर. अजून अशक्तपणा आहे अंगात. सुजाता, तू रेवाजवळ थांब. मी निघतो. काही लागलं तर मला लगेच कळव. चल उमा..." इतकं बोलून डॉक्टर उमासह बाहेर आले. बेडच्या मागे असलेल्या कुशनला डोकं टेकवून रेवाने डोळे मिटले आणि सुजाता तिथेच तिच्याजवळ बसली. दारातून डॉक्टर आणि उमा हे पाहत होते. बाहेर येत डॉक्टर म्हणाले, "सॉरी मॅडम मला खोटं बोलावं लागलं. शशांकच्या जाण्याचा रेवाला मानसिक धक्का बसला आहे. तिने शशांकला प्रत्यक्षात मरताना पाहिलं आहे. त्यामुळे तिला जो शॉक बसला, त्याच फेजमध्ये ती आहे. तिचा मेंदू हे मानायला तयार नाही, की शशांक आता जिवंत नाही. तिच्या विचारातून काही काळापुरता शशांक बाजूला रहावा म्हणून तो टूरला असल्याचं मी सांगितलं. रेवाला सध्यातरी काही विचारू नये असं मला वाटतं..."
उमाला डॉक्टरचं म्हणणं पटलं. डॉक्टर पुढे म्हणाले, "मी रेवा आणि शशांकचा फॅमिली डॉक्टर आहे. अर्थात या दोघांचं लग्न झाल्यावर रेवानेच माझी आणि शशांकची भेट करवली. तेव्हापासून मी या परिवाराचाच एक भाग झालो आहे. खूप छान जोडपं होतं हो... आदळ-आपट नाही, भांडण-तंटा नाही. हां, नवरा-बायको मधले वाद होते. पण ते तेवढ्यापुरतेच. एका क्षणात हे हसतं-खेळतं जोडपं दु:खात बुडालं. हे ज्या कोणी केलं असेल, त्या खुन्याला सोडू नका ऑफिसर..." डॉक्टर बोलत असताना उमाचा फोन वाजला, "येस सर. शुद्धीवर तर आली आहे, पण बोलण्याच्या मनस्थितीत नाही ती. अजून स्टेट ऑफ शॉक मध्ये आहे. इथे ती सुजाता आहे आणि रेवाचे फॅमिली डॉक्टर पण आहेत. शिवाय घराबाहेर दोन कॉन्स्टेबल आहेत. ओके सर..." फोन ठेवत डॉक्टरकडे पाहत उमा म्हणाली, "डॉक्टर संग्राम, मला जावं लागतंय. तुम्ही दोघं आहात ना इथे..." डॉक्टर संग्रामने उमाला अश्वस्त केलं तेव्हा, "थँक यू डॉक्टर. रेवा बोलण्याच्या मनस्थितीत आली की कळवा मला..." इतकं बोलून उमा लॅबकडे निघाली...
तिकडे जीप शशांकच्या ऑफिसच्या दिशेने चालली होती. प्रधानांनी उमाला फोन केला, "उमा, रेवा शुद्धीवर आली का... ओके. तू डॉकच्या लॅबला जा. शशांकच्या ऑफिसमध्ये चौकशी करून आम्हीसुद्धा पोहोचतो..." फोन ठेवत कल्पेशकडे वळत प्रधान म्हणाले, "मि. कल्पेश, शशांकचं कोणाशी वैर होतं, आय मीन बिझीनेस रायव्हलरी किंवा ऑफिसमध्ये कोणाशी वाद वगैरे..." या प्रश्नावर नकारात्मक मान हलवत कल्पेश म्हणाला, "सर आमची एस. के. इंडस्ट्रीज खूप फेमस आहे. आमच्याकडे बरेच मोठे प्रोजेक्ट्स आहेत. त्यामुळे रायव्हलरी तर असणारच. पण त्यामुळे इतक्या खालच्या थराला कोणी उतरेल असं वाटत नाही. मी ऑफिसमध्ये कधीतरीच जातो. त्यामुळे तिथे काही वाद होत असतील तर मला जास्त काही माहीत नाही त्याबद्दल..." आनंद लागेच म्हणाला, "मि. कल्पेश, तुम्ही आणि शशांक एकत्र एकाच इंजीनियरिंग कॉलेजला होता ना... मग तुमच्या कॉलेजच्या दिवसातली कुठली अशी घटना आहे का, जिचा राग आत्ता कोणाच्यातरी मनात आहे..."
कल्पेश काही सेकंद बोलायचा थांबला. मग म्हणाला, "सर, शशांक रँक होल्डर होता. तो नेहमी टॉप फाईव्हमध्ये असायचा. शेवटच्या वर्षी तर त्याने कॉलेजमध्ये टॉप रँक मिळवला होता. आता त्या गोष्टीचा राग जर कोणाच्या मनात असेल तर मी कसं सांगू शकतो..." बोलता बोलता जीप एस. के. इंडस्ट्रीजच्या गेटवर पोहोचली. कल्पेशला पाहून वॉचमनने काहीही नं विचारता गेट उघडलं. समोर दोन मजली काचेची इमारत होती. जीप एका बाजूला लाऊन तिघंही आत गेले. रिसेप्शनवर पोहोचताच प्रधान म्हणाले, "मि. कल्पेश, तुमच्या सगळ्या स्टाफला इथे बोलवा. आम्हाला त्यांच्याशी बोलायचं आहे..." कल्पेशने लगेच रिसेप्शनिस्टला इशारा केला. तिने कोणालातरी कॉल केला. थोड्याच वेळात बरीच माणसं आणि बायका रिसेप्शन एरियामध्ये जमले. सर्वांना उद्देशून आनंद म्हणाला, "तुमच्या शशांक सरांचा त्यांच्या राहत्या घरात मृत्यू झाला हे आत्तापर्यंत तुम्हा सर्वांना समजलं असेल. तर त्या संदर्भात आम्ही इथे चौकशी करायला आलोत. मि. कल्पेश आम्हाला चांगलीच मदत करत आहेत. तुम्हीही कराल अशी अपेक्षा आहे..." थोडीशी कुजबूज झाली आणि सगळे परत शांत झाले...
एकजण पुढे येत म्हणाला, "सर आम्ही ऍडमिन टीम आणि एच.आर. टीमचे आहोत. आम्ही सर्व दुसऱ्या मजल्यावर असतो. कल्पेश सरांचं केबिन तिथे आहे. शशांक सरांचं केबिन पहिल्या मजल्यावर फायनॅन्स टीमसोबत आहे. तर तेच तुम्हाला जास्त सांगू शकतील..." आनंद आणि प्रधानांनी आपापसात काही ठरवलं. आनंद दुसऱ्या मजल्यावर गेला तर प्रधान पहिल्या मजल्याकडे वळले. कल्पेश आनंदसोबत होताच. आनंदने कल्पेशचं केबिन चेक केलं. काही फायली तपासल्या आणि तिथल्या स्टाफला प्रश्न विचारले. प्रधानही शशांकच्या केबिनमध्ये शिरले. शशांकचा सेक्रेटरी नीरजसुद्धा प्रधानांसोबत आत शिरला. केबिन बऱ्यापैकी मोठं होतं. टेबलवर शशांक आणि रेवाचा फोटो होता आणि खुर्चीच्या मागच्या भिंतीवर एक ग्रूप फोटो होता. प्रधान केबिन तपासत होते फाईली न्याहाळत होते आणि नीरजला प्रश्न विचारत होते. "बाकी सगळं ठीक आहे सर, पण बबनसोबत हल्ली जरा जास्तच खटके उडायला लागलेत..." नीरजच्या या वाक्यावर प्रधानांनी कान टवकारले...
"हा बबन कोण..." प्रधानांच्या या प्रश्नावर नीरज म्हणाला, "सर, तो या मजल्यावरचा पिऊन आहे. अत्यंत अजागळ आहे. उशीरा येतो. कामात नीट लक्ष देत नाही. शशांक सर तर खूप ओरडायचे त्याला. आजही आला नाही तो..." तपासणी झाल्यावर केबिनचे फोटो काढून प्रधान बाहेर आले. समोरून आनंदसुद्धा येताना दिसला. त्यानेही कल्पेशच्या केबिनचे फोटो काढले होते. आनंद कल्पेशला म्हणाला, "मि. कल्पेश, सध्यातरी तुमच्याकडे काही कामं नाही आमचं. तुम्ही आता इथेच थांबा. शशांक नाही तर तुमचं लक्ष असू देत तुमच्या स्टाफवर..." कल्पेशने होकारार्थी मान हलवली. तेव्हा प्रधान म्हणाले, "मि. नीरज, या बबनचा पत्ता आणि फोन नंबर द्या. आणि हो, शशांकचं केबिन लॉक्ड राहील आणि चावी आमच्याकडे असेल. कोणीही केबिनमध्ये जाऊ नका प्लिज..." मग आनंदकडे पाहत ते म्हणाले, "लेट्स गो..." नीरजकडून बबनचा पत्ता आणि फोन नंबर घेऊन आनंद आणि प्रधान लॅबकडे निघाले...
तिकडे लॅबमध्ये डॉ. गोखले बॉडी आणि त्यासोबत आणलेल्या इतर वस्तू तपासत होते. कमरेवर हात ठेऊन सचिन बाजूला उभा होता. बॉडी तपासताना डॉ. गोखले म्हणाले, "सचिन, या वेळी एकच गिफ्ट आणलंस... नाही म्हणजे तुमच्या युनिटचा लौकिक आहे, एका वेळेला २-३ तरी गिफ्ट असतातच..." बोलत असताना डॉ. गोखलेंनी बॉडीकडे बोट दाखवलं. सचिनला नवल वाटलं, "डॉक्टर, तुम्ही डेड बॉडीला चक्क गिफ्ट म्हणताय..." डॉ. गोखले हसत म्हणाले, "अरे सचिन, या लॅबमध्ये डेड बॉडीज, किंवा अवयव, आणि त्यांच्याशी संबंधित वास्तूच येतात. त्या सगळ्याचं निरीक्षण करताना डोक्याला ताण येतो. असे काही जोक्स जरा वातावरण हलकं करतात..." डॉ. गोखले बोलतच होते, की प्रधान, आनंद आणि उमा तिथे आले. सर्वांकडे पाहत डॉ. गोखले म्हणाले, "तुम्हा लोकांचा अंदाज बरोबर आहे. या शशांकचा मृत्यू विषामुळेच झाला आहे. पण एक वेगळीच गोष्ट तुम्हाला सांगतो. सचिनने आणलेले ग्लासचे तुकडे, दुधाची पिशवी किंवा इतर वस्तूंमध्ये विष नाही..."
हे ऐकून सचिन चक्रवला. तो काही बोलणार इतक्यात डॉ. गोखले पुढे म्हणाले, "दुसरी गोष्ट, शशांकचा मृत्यू स्लो पॉयझनिंगमुळे झाला आहे. हळू हळू याला विष दिलं जात होतं. आज ते विष इतक्या प्रमाणावर पोहोचलं, की ते घातक ठरून शशांकचा मृत्यू झाला. हे विष त्याच्या खाण्यात असू शकेल, किंवा इतर कोणत्या वस्तूमधून याच्या शरीरात गेलं, हे शोधायला हवं. यासाठी शशांक वापरत असलेल्या सगळ्या वस्तू आपल्याला तपासायला हव्यात. एक महत्वाची गोष्ट, शशांकवर विषप्रयोग झाला आहे. त्यामुळे असाही विचार करायला हरकत नाही, की खुन्याने अशी वस्तू निवडली, जी फक्त शशांक वापरत होता. प्रधानसाहेब, शशांक वापरत असलेली प्रत्येक गोष्ट आपल्याला चेक करायला हवी..."
डॉ. गोखलेंचं बोलणं ऐकून सर्वजण गोलाकार उभे राहिले. प्रधान म्हणाले, "शशांकचा त्याच्या राहत्या घरात मृत्यू झाला. मृत्यूचं कारण, विषप्रयोग. पण शशांकने सकाळी घेतलेल्या दुधात किंवा दुधाच्या ग्लासात विष सापडलं नाही..." यावर डॉ. गोखले म्हणाले, "हो. मी दोन्ही गोष्टी तपासल्या पण त्यात विषाचा अंश सापडला नाही. शिवाय शशांकचा मृत्यू स्लो पॉयझनिंगमुळे झाला आहे. मी बॉडीच्या डोक्यावरचे केस, मायक्रोस्कोपने तपासले तेव्हा हा उलगडा झाला..." डॉ. गोखलेंचं म्हणणं पुढे नेत आनंद म्हणाला, "स्लो पॉयझन. म्हणजे शशांकला रोज थोडं थोडं विष दिलं जायचं. घरात असेल किंवा बाहेर. घरात शशांकची बायको रेवा आणि ती मोलकरीण सुजाता. या दोघीच..."
आनंदला दुजोरा देत उमा म्हणाली, "मी इथल्या रहिवाशांकडून दोघींची माहिती मिळवली. रेवा आणि शशांकचा प्रेम विवाह. चांगलं जोडपं होतं असं सगळेच म्हणतात. शशांकचं घर सोडल्यास ती सुजाता अजून दोन घरात संध्याकाळची कामाला जाते. तिच्याबद्दलही कोणी वाईट बोललं नाही..." उमाचं बोलणं ऐकून आनंद म्हणाला, "आता राहिला हा कल्पेश. शशांकचा कॉलेजचा मित्र आणि बिझीनेस पार्टनर..." आनंदला मध्येच तोडत प्रधान म्हणाले, "एक सेकंद. तो बबन पण आहेच की... ज्याच्यासोबत शशांकचं वाजलं होतं... सचिन, तू या बबनचा माग काढ. आनंद, या कल्पेशची सगळी माहिती मिळव. शिवाय शशांकच्या ऑफिसमधल्या अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या फक्त शशांकच वापरतो, त्यांचा शोध घ्या आणि त्या वस्तू मिळवा. मी उमासोबत जाऊन पुन्हा रेवाला भेटतो. तिथेही काही अशा वस्तू सापडतात का ते पाहतो... लेट्स मूव्ह..."
सर्वजण लॅबमधून निघाले. प्रधान आणि उमाची जीप शशांकच्या घराच्या दिशेने जात असताना उमा म्हणाली, "सर, आपण आता रेवाला का भेटायला चाललोय... डॉ. संग्रामचा अजून काही मेसेज नाही रेवा ठीक असल्याबद्दल..." उमाकडे पाहत प्रधान म्हणाले, "रेवा आणि शशांकच्या नात्याबद्दल मला तिच्याकडून जाणून घ्यायचं आहे. शिवाय आपल्याला त्या घरात अशा काही वस्तूही शोधायच्या आहेत ज्या फक्त शशांक वापरतो. आणि रेवाची जी कंडिशन आहे, तिला मी सांगणार आहे की मी एक लेखक आहे आणि एक नॉव्हेल लिहायचं म्हणून तिच्याकडे आलो आहे. सो डोन्ट वरी..." बोलता बोलता गुलमोहर सोसायटीमध्ये जीप शिरली...
डॉ. संग्रामने दार उघडलं. आत शिरताना उमाने विचारलं, "डॉक्टर, कशी आहे रेवा..." रेवाच्या बेडरूमकडे पाहत डॉ. संग्राम म्हणाले, "शुद्धीत आली आहे ती. पण शशांक गेल्याचं अजून मानायला तयार नाही. सततच्या धक्क्याने तिच्या मेंदूवर ताण येऊ शकतो. मला वाटतं तिला काही विचारू नये..." बोलता बोलता त्यांनी प्रधानांकडे पाहिलं. उमाने डॉ. संग्राम आणि प्रधानांची ओळख करून दिली. प्रधान म्हणाले, "डोन्ट वरी डॉक्टर संग्राम, रेवाला त्रास होणार नाही याची काळजी घेऊ आम्ही. पण रेवाला भेटणं गरजेचं आहे..." डॉ. संग्रामना प्रधानांचं म्हणणं पटलं आणि त्यांनी होकारार्थी मान हलवली...
सर्वजण खोलीत पोहोचले तेव्हा रेवा नुकतीच उठून बसली होती. ती कॉफी घेत होती आणि सुजाता तिच्या बाजूला उभी होती. दारात तिघांना पाहून ती सावरून बसली आणि म्हणाली, "डॉ. संग्राम, तुम्ही केव्हा आलात... अरे, उमा मॅडम पण आल्यात का सोबत... आणि हे कोण..." आपल्याकडे रेवाचं बोट आहे हे पाहून प्रधान म्हणाले, "मॅडम, माझं नाव श्रीधर आहे. मी उमाचा काका आहे. सध्या नवरा-बायकोमधलं नातं खूप बदललं आहे. घटस्फोटांचं प्रमाणही वाढलं आहे. पण आजही अशी जोडपी आहेत, ज्यात अतोनात प्रेम दिसतं. मी एक लेखक आहे, आणि अशा प्रेमळ जोडप्यांवर पुस्तक लिहावं हा माझा मानस आहे. उमाकडून तुमच्या आणि शशांकबद्दल समजलं. म्हणून इथे आलो. तुम्हा दोघांपासून माझ्या पुस्तकाची सुरुवात झाली तर आवडेल मला..."
दुसरा व शेवटचा भाग काही दिवसात...
@अनिकेत परशुराम आपटे.

