'थुंकसांप्रदायिक...' नवीन शब्द आहे ना. हा शब्द त्यांना लागू पडतो, जे हातांनी नाही, तर तोंडावाटे जिथे तिथे रांगोळ्या काढत असतात. पान (म्हणजे विडा बरं का...) खाणाऱ्या पर्णप्रेमींचा यात प्रामुख्याने समावेश असतो. याच थुंकसांप्रदायिक रांगोळीकर्त्यांना वेगवेगळ्या हिंदी चित्रपटांच्या नावांच्या अनुषंगाने आपण पाहू..."दिवार" थुंकसांप्रदायिक...
श्वान हा प्राणी, गाडीचं चाक, एखादा खांब, अशी काही स्थिर गोष्ट दिसली रे दिसली की त्याचं तंगडं वर करतो. याच श्वानांप्रमाणे हे "दिवार" थुंकसांप्रदायिक, भिंत दिसली रे दिसली की त्यांचं थोबाड त्या भिंतीच्या जवळ नेतात आणि क्षणार्धात तिथे लाल-काळा असा डोंगर तयार होतो. काम झाल्यावर हे लोक, "काय सुंदर नक्षीकाम केलं मी..." अशा अविर्भावात चालते होतात...
"तलवार" थुंकसांप्रदायिक...
तलवार जशी सरळ पात्याची असते तशी वाकलेल्या पात्याची ही असते. तिला पुढे टोक आणि मागे मूठ असते. हे "तलवार" थुंकसांप्रदायिक लोक अशी तलवार काढण्यात पारंगत असतात. यांचं नक्षीकाम शक्यतो रस्त्याच्या कडेला असतं. हाताची पहिली दोन बोटं 'V' आकारात तोंडाजवळ आणत ते बहारदार सडा पाडतात. आणि बघता बघता त्यांच्या समोर एक अनन्यसाधारण अशी खडग तयार होते...
"छोटी सी बात" थुंकसांप्रदायिक...
वस्तू जितकी लहान तितकी ती पाहण्यास त्रास अधिक. या लोकांची पिंकं तशी छोटीच असते. चमचा घेऊन ते मास्टरशेफवाले डिशवर एक विचित्र स्प्लॅश तयार करतात ना, तसाच एक छोटा शिंतोडा या "छोटी सी बात" थुंकसांप्रदायिक लोकांकडून आलेला दिसतो. ते समोर असतात म्हणून त्यांचं कृत्य उघडकीस येतं हां... इतरवेळी कदाचित पत्ताही लागणार नाही, की इथे तो मास्टरशेफचा स्प्लॅश होता...
"तेज" थुंकसांप्रदायिक...
चित्रपटांमध्ये दुचाकी आणि चार चाकी वाहनांवरची स्टंटबाजी आपण पाहतो. नायक किंवा खलनायकाने, ही थरारक दृश्य करताना आपण उत्कंठेने थोंडात बोटं घालतो. "तेज" थुंकसांप्रदायिक याच स्टंटबाजी पठडीतले. भरधाव वेगाने आपापल्या वाहनांनी, रिक्षाने, बसने किंवा ट्रेनने जाताना आपलं मुख डावीकडे किंवा उजवीकडे करत हे लोक लेझरगनसारखा एक मारा करतात. बरं त्यांना पहावं, तर वाहन वेगात असल्याने हे लोक झटकन नजरेच्या टप्प्यापासून दूर जातात. थोडे थेंब जमिनीवर, थोडे कोणाच्यातरी अंगावर असे सांडत ते वाहन निघून जातं...
"बोल बच्चन" थुंकसांप्रदायिक...
या प्रकारात पर्णप्रेमी आणि असा व्यासंग नसलेले, असे सर्वच मोडतात. गप्पा मारताना मध्येच थांबून वेगळंच काहीतरी करावं तेव्हा ते कसं दिसतं, अशी या मंडळींची क्रिया असते. कोणाशीतरी गप्पा मारत उभे असताना मध्येच वळून आपल्या विचारांची ती पिंकं यांच्या वदनातून बाहेर पडते. गप्पा मारायला ही मंडळी साधारणपणे गटारीच्या बाजूला, रस्त्याच्या कडेला, गेटच्या कोपऱ्यावर, फुटपाथच्या कडेला अशा जागा शोधतात, जेणेकरून कोणाला त्रास होऊ नये. व्यासंग नसणाऱ्या काहींनाही अशा पिंका टाकायची सवय असते बरं का. फरक इतकाच, की यांची रांगोळी रंगहीन (मराठीत colourless) असते आणि बाकीच्यांची मात्र Eastman colour असते...
"अंधाधून" थुंकसांप्रदायिक...
हा प्रकार म्हणजे बेफिकीर आणि बिन्धास्त अशी जमात. बेजबाबदार पण म्हणता येईल खरं तर. हिंदी चित्रपटात शेवटच्या हाणामारीच्या वेळी जसा बेछुट गोळीबार होतो, तसेच हे "अंधाधून" थुंकसांप्रदायिक, पिंकांचा जबरदस्त मारा करतात. बरं आपल्या या माऱ्यामुळे इतर लोकांना काही त्रास वगैरे होतोय का याचं काहीच भान नसतं इकडे. आपण बरे आपली पिंकं बरी हेच त्यांचं तत्व असतं. शिवाय, "Do Not Spit..." किंवा "येथे थुंकू नये..." असं जिथे लिहिलं असतं, तिथेच जाणून-बुजून हे हेकेखोर लोक्स आपली कला दाखवतात. ही मंडळी रस्त्याच्या कडेला किंवा गटारीत पाऊस पाडतील असंही नाही. पिंकाचा मारा करताना त्यांच्यात "कालिया" चित्रपटातला नायक संचारतो. "हम जहाँ खडे होते हैं, पिकदानी वहीं पर होती है..." असा संवाद मणातल्या मणात उच्चारत, पिंकांची जबरदस्त अतिषबाजी ते करतात...
तर... असे हे काही थुंकसांप्रदायिक महाभाग. त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या लाल-काळ्या रांगोळ्यांबद्दल टाकलेली, माझ्या विचारांची ही पिंकं. असे अजून बरेच नानाविध प्रकार असतीलही. पण सध्या इतकेच बरं का...
@ अनिकेत परशुराम आपटे.
No comments:
Post a Comment