दुपारचे चार वाजत आले होते. तेराव्या
मजल्यावरच्या कँटीनमध्ये सिया, आकाश, विपूल आणि पूनम गप्पा मारत बसले होते. सिया
म्हणाली, “यार किती बोरिंग झालं आहे सगळं... तेच तेच रूटीन आयुष्य...” सियाला
दुजोरा देत आकाश म्हणाला, “हो ना... तेच दुपारी दोन ते रात्री दहाचं ऑफीस आणि मग
घर... वेगळं काहीच घडत नाही. हा, शनिवार-रविवार सुट्टी असल्यामुळे काय तो वेगळेपणा, पण बाकी...” ज्यूसचा घोट घेत पूनम म्हणाली, “मला काय वाटतं, काहीतरी थ्रिल, काहीतरी भन्नाट घडायला हवं... व्हॉट से...” विपूल बराच वेळ शांत बसला होता. काही
विचार करून तो म्हणाला, “आयडिया... सर्वांना काहीतरी वेगळं हवं आहे ना... मग मस्करी...” कोणाला काहीच कळत नव्हतं. विपूलने मोबाईल काढला आणि काही बटणं दाबून,
“डन...” असं म्हणत सर्वांकडे पाहू लागला...
सगळ्यांच्या प्रश्नार्थक नजरा त्याला समजल्या.
विपूल म्हणाला, “सांगतो सर्व सांगतो... ऐका... आपण मस्करी करायची लोकांची... आपलं
सर्वांचं ऑफीस दहा ते साडेदहा या वेळेत संपतं. उद्या कोणीच घरी नका जाऊ. नाहीतरी
परवा शनिवार आहे... त्यामुळे ऑफीसला येण्याचं टेंशन नाही... रात्री बाराला ग्राऊंड
फ्लोअरला लिफ्टजवळ सर्वांनी जमा. मी आत्ताच एक मस्त वस्तू ऑनलाईन मागवली आहे.
उद्या सकाळपर्यंत ती माझ्याकडे पोहोचेल. ती पोहोचली की मस्करी सुरू...” विपूल
सांगत होता आणि सर्वांच्या मुद्रा बदलत होत्या. सर्वांना विपूलची आयडिया आवडली.
आता सर्वांचं लक्ष उद्या रात्रीकडे लागलं होतं. दुसऱ्या दिवशी चौघंही आपापली कामं
उत्सुकतेने करत होते. साडेदहा पर्यंत दुपारच्या शिफ्टचे सर्व बाहेर पडले. रात्रीची
शिफ्ट सुरू व्हायला बराच वेळ होता. अखेर रात्रीचे बारा वाजले...
सर्वजण लिफ्टजवळ जमले. आकाश रिसेप्शनवर थांबला
आणि सावज येण्याची वाट पाहू लागला. दारातून एक मुलगी येताना दिसली. आकाशचा इशारा
मिळताच विपूल लिफ्टसमोर उभा राहिला आणि सिया व पूनम कॅमेरा सरसावून लपून बसल्या.
ती मुलगी टप्प्यात आली आणि विपूलने बटण दाबलं. लिफ्टचं दार उघडलं आणि विपूल आत
शिरला. लिफ्ट आल्याचा आवाज येताच ती मुलगी धावत पुढे येत, “सर, जरा थांबा... मलाही
यायचं आहे...” असं ओरडू लागली. आत गेलेल्या विपूलने हात बाहेर काढला. दार बंद झालं
आणि हात बाहेर राहिला व लिफ्टसोबत वर जाऊ लागला. वरच्या चौकटीवर पोहोचताच हात खाली
पडला आणि त्यातून रक्त येऊ लागलं. तुटलेला हात पाहून ती मुलगी किंचाळली. तिला काय
करावं समजत नव्हतं. ती सैरभैर झालेली पाहून आकाश, सिया आणि पूनम जोरात हसत बाहेर
पडले...
“सॉरी सॉरी हां... आम्ही फक्त मस्करी करत होतो...
तुम्हाला त्रास झाला त्याबद्दल खरंच सॉरी...” सिया त्या मुलीला दिलासा देत म्हणाली
खरी पण तिचं हसणं काही थांबत नव्हतं. काही क्षणात विपूल खाली आला. तो म्हणाला, “सॉरी
मिस... आम्ही मस्करी करत होतो... हा पडलेला हात खोटा आहे आणि ते रक्त नाही, रोज
सिरप आहे...” हे सर्व पाहून ती मुलगी खूप चिडली. सर्वांना शिव्या देत लिफ्टजवळ
पोहीचली पण लिफ्टने न जाता जिन्याने गेली. हे पाहून ते सर्व अजून जोरात हसू लागले.
आलटून पालटून एकाने सावज हेरायचं, दुसऱ्याने हात लिफ्टमधून बाहेर टाकून सावजाला
घाबरवायचं आणि बाकी दोघांनी हे सर्व शूट करायचं. हा त्यांचा खेळ बराच वेळ चालू
होता. शेवटी सिया आणि पूनम म्हणाल्या, “ए आता बास रे... उशीर झाला आहे खूप...” पण
आकाश आणि विपूलचा नूर काही वेगळाच होता. विपूल म्हणाला, “काय रे तुम्ही दोघी...
आत्ता कुठे मजा यायला लागली होती आणि तुम्ही...” आकाश म्हणाला, “हो ना यार... अभी
तो रात बाकी है... पण ठीक आहे. आता माझी पाळी आहे. एक लास्ट मस्करी...” सिया आणि
पूनम म्हणाल्या, “बघ हा... फायनल ना...” आकाश आणि विपूलने माना डोलावल्या. सर्वजण
आपापल्या जागेवर गेले व सावजाची वाट पाहू लागले...
एक माणूस दारातून येताना दिसला. सियाने खूण
करताच विपूल व पूनम कॅमेरा घेऊन लपून बसले आणि आकाश लिफ्टजवळ आला. त्याने तशाच
प्रकारे लिफ्ट वर जाताना नकली हात बाहेर टाकला. हात पाहून तो माणूस गांगरला. “सिक्यूरीटी...
सिक्यूरीटी... हेल्प... हेल्प...” असं म्हणत तो पळू लागला. तेवढ्यात सिया, पूनम
आणि विपूल जोरजोरात हसत बाहेर आले. पूनम म्हणाली “सॉरी सर... आम्ही जरा मस्करी करत
होतो. लिफ्टमधून वर जाणारा व हा खोटा हात खाली टाकणारा तो आमचाच मित्र आहे...
व्हेरी सॉरी सर...” तो माणूस अजूनही चरफडत होता. म्हणाला, “कसली अघोरी मस्करी
ही... आणि खरंच असा हात तुटला असता म्हणजे...” पूनम हसत म्हणाली, “अहो काहीतरीच
काय... असा हात तुटेल का कधी...” सिया पूनमला दुजोरा देत म्हणाली, “हो ना... उगाच
आम्हाला घाबरवता कशाला सर...” सर्वांकडे एक नजर फिरवत त्या माणसाने, “पहायचं आहे
तुम्हाला हात कसा निखळतो ते...” असं म्हणत स्वत:च्या हाताकडे पाहिलं...
त्याचा तो हात एका झटक्यात मुख्य शरीरापासून
वेगळा झाला आणि तरंगायला लागला. तो तरंगता हात पाहून सर्वांचे श्वास अडकले. तो
माणूस पुढे म्हणाला “हे तर काहीच नाही... अजून पहायचं आहे तुम्हाला...” हे म्हणत
असतानाच डाव्या हाताने त्या माणसाने त्याचं डोकं धरलं आणि खाडकन धडावेगळं केलं.
भिबत्स आणि किळसवाणं हसत तो माणूस सिया, पूनम आणि विपूलकडे पाहू लागला. काही
क्षणात आकाश खाली आला. त्यानं पाहिलं तर सिया, पूनम आणि विपूल जमिनीवर पडले होते.
त्यांची तोंडं उघडी होती आणि डोळ्यात भीती दिसत होती. आकाशने सर्वांच्या नाड्या
चेक केल्या. डोळे मोठे करत आकाश म्हणाला, “ओह नो... दे ऑल आर डेड... पण... हे
कसं... इथे कोण आलं... हे काय...” इतक्यात त्याच्या खांद्यावर एक हात पडला. आकाशने
मागे पाहिलं तर तो मगाचचाच माणूस त्याच्या समोर उभा होता. तो म्हणाला, “लोकांची
मस्करी करता करता त्याची कुस्करी होते ती अशी... आता पुन्हा तुम्ही कधीच कोणाची
मस्करी करणार नाही... हा...हा...हा...” तो माणूस किळसवाणा हसत लिफ्टकडे वळला आणि
बंद लिफ्टच्या आर-पार जात गायब झाला. फाटलेल्या डोळ्यांनी आ वासून आकाश त्या
माणसाला पाहत राहिला...
सकाळचे सात वाजले होते. रिसेप्शनजवळ गर्दी जमा
झाली होती. पोलीस तपास करत होते. इंस्पेक्टरने डॉक्टरला मृत्यूचं कारण विचारलं तर
ते म्हणाले, “तूर्तास तरी हेच सांगता येईल, की हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे या
चौघांच्याही प्राणावर बेतलं...” इंस्पेक्टर म्हणाले, “पण यांचे डोळे काहीतरी
वेगळंच सांगत आहेत... त्यांनी असं काहीतरी भयानक पाहिलं ज्यामुळे भितीने त्यांचं
हृदय बंद पडलं. पण... असं काय पाहिलं त्यांनी... आणि हा खोटा हात काय करतो आहे या
ठिकाणी... काय घडलं असावं इथे...”
समाप्त.
Pudhacha bhaag?
ReplyDeleteकथा संपली आहे... त्यांनी काय पाहिलं या रहस्यातच...
Delete