Thursday, August 23, 2018

शापित राजकन्या...



फार पूर्वीची गोष्ट आहे. भारताच्या मधोमध एका छोट्याशा गावात रामू आपल्या आईसोबत राहत होता. रामू मेहनती व धाडसी होता पण नशीबाची साथ त्याला लाभत नव्हती. गरिबीत दिवस काढत तो बिचारा आयुष्य वेचत होता. गावात पडेल ते काम करून रामू आपले व आपल्या आईचे पोट भरत असे. दीर्घ आजाराने ग्रासलेल्या आपल्या आईची त्याला जास्त काळजी होती कारण तिच्या औषध-पाण्यासाठी पुरेसे पैसे त्याच्याजवळ नव्हते. एक दिवस हताशपणे देवळात बसला असताना गावकऱ्यांचे शब्द त्याच्या कानी पडले, "शेजारच्या नगराच्या, कृपापुरीच्या महाराज कृपळदेवने म्हणे दवंडी पिटवली आहे... की त्यांच्या मुलीला म्हणजे राजकुमारी सोनलला जी कोणी व्यक्ती परत आणून देईल त्या व्यक्तीला रहायला मोठा वाडा आणि अमाप पैसा बहाल केले जाईल...", "सांगतोस काय... कोण असेल ती भाग्यवान व्यक्ती...", "अरे पण असं झालं तरी काय राजकन्येला...", "हो ना, परत आणून देईल म्हणजे कुठे गेली तरी कुठे ती...", "काय एकेक ऐकावं ते नवलंच..." रामू कान देऊन सगळं ऐकत होता. त्याने मनोमन विचार केला, "जावं का तिथे... बघू प्रयत्न करून... यावेळी नशीबाने साथ दिलीच तर आईची चिंताच मिटेल आणि नाहीच दिली तर त्याच नगरात एखादं काम मिळवू..." मनाशी विचार पक्का करून रामू घरी परतला...

रामूने तयारी केली आणि आईसोबत प्रवासाला निघाला. कृपापुरीत पोहोचेपर्यंत संध्याकाळ झाली होती. नगराच्या बाहेर असलेल्या देवळात रामूने वस्ती केली आणि सकाळ होताच राजमहालाकडे निघाला. द्वारपालाने हटकलंच, “काय रे... आत कुठे निघालास... काय हवं आहे तुला...” रामूने त्याच्या येण्याचं कारण सांगताच द्वारपालाने एका सैनिकाकरवी महाराजांना वर्दी दिली. रामूला ताबडतोब आत बोलावलं गेलं. दरबारात महाराज कृपाळदेव व महाराणी सुनंदादेवी दोघंच होते. रामूने आत येताच महाराजांना मुजरा केला, “महाराजांचा विजय असो. महाराज, मी रामू. शेजारच्या नगरातून आलो आहे. आपल्या दवंडीबद्दल मी ऐकून आहे आणि माझ्याकडून काही होण्यासारखे असल्यास मी तयार आहे...” महाराज आणि महाराणी दोघंही एकमेकांकडे पाहू लागले. महाराज सिंहासनावरून खाली येत म्हणाले, “मुला, बहुतेक तुला दवंडीची पूर्ण कल्पना नाही. आम्ही तुला सगळं सांगतो. चल आमच्यासोबत...” रामू महाराजांसह एका दालनात आला. ते राजकुमारी सोनलचे दालन होते. दालनाच्या मधोमध एक दगडी पुतळा होता. रामूने तो पुतळा पाहिला आणि त्याला धक्काच बसला, “महाराज हे...” तो पुढे काही बोलेल इतक्यात महाराज पुढे होत म्हणाले, “हो... हीच आमची कन्या... राजकुमारी सोनल...

काही दिवसांपूर्वी राजकुमारी शिकारीहून परतल्या त्याच मुळी रडत. आजवर राजकुमारीच्या डोळ्यात कधी अश्रू आले नव्हते आणि आज तर त्या चक्क रडत होत्या. आम्ही दोघं त्यांना सारखे विचारत होतो. शेवटी त्या बोलत्या झाल्या, “पिताश्री, आज माझ्याकडून एक अघटित गोष्ट घडली. जंगलात शिकार करत असताना एक मृग माझ्या नजरेस पडलं. त्यावर मी बाण मारला खरा पण मागाहून ओरडण्याचा आवाज मात्र मनुष्याचा होता. मी जवळ जाऊन पाहिलं तर तिथे एका योग्याचं शरीर पडलं होतं. इतक्यात मला हसण्याचा आवाज आला. मी वर पाहिलं तर एक शीर हवेत उडत चाललं होतं. त्याला माझा बाण अडकला होता. त्या शिराच्या मुखातून शब्द बाहेर पडले, “तू माझी साधना भंग केलीस... मी तुला शाप देतो... आज सूर्यास्तानंतर तुझी काया दगडाची होईल आणि जसे माझ्या शरीराचे दोन भाग झाले तसे तुझ्याही शरीराचे दोन भाग होऊन एक भाग माझ्या गुहेत बंदिस्त होईल... हा...हा...हा...” हे बोलत ते शीर क्षितिजावर नाहीसे झाले. मातोश्री मला खूप भीती वाटते आहे हो... पिताश्री मला वाचवा हो...” हे बोलत असतानाच सूर्य मावळला. त्याचसोबत, “पिताश्री...” असे ओरडत राजकुमारी दगडाच्या पुतळ्यामध्ये परिवर्तीत झाल्या. नुसते एवढ्यावरच भागले नाही, तर पुतळ्याचे दोन भाग झाले आणि एक भाग गायब झाला. आम्ही त्या योग्याच्या गुहेचा आणि सोनलच्या अर्ध्या देहाचाही शोध घेतला पण हाती काही लागलं नाही...

जंगलात आम्हाला एक शीर नसलेला देह सापडला. पण तो देह योग्याचा वाटत नव्हता तर एखाद्या राक्षसाचा वाटत होता. शेवटी न राहून आम्ही दवंडी पिटवली...” रामूने सर्व ऐकलं. म्हणाला, “महाराज, मला तुमची मनस्थिती समजू शकते. मी राजकन्येला पूर्ववत करण्याचा प्रयत्न करेन. त्यासाठी मला त्या गुहेच्या शोधार्थ जावं लागेल आणि अशावेळी माझ्या आईकडे...” रामू गप्प झाला. महाराणी सुनंदादेवी रामूच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाल्या, “रामू, तू काही चिंता करू नकोस. तुझ्या आईची आम्ही पुरेपूर काळजी घेऊ...” रामूला हायसं वाटलं. तो मोहिमेवर निघाला. राजकुमारी सोनलसोबत जो सैनिक जंगलात गेला होता त्याच्यासह रामू त्याच जागी पोहोचला जिथे त्या राक्षसाचं शरीर होतं. रामूने पाहिलं तर शिराविना असलेलं ते धड काळं आणि अगडबंब होतं. योग्याचं शीर कुठल्या दिशेने गेलं याची त्या सैनिकाकडे विचारणा करून रामू विचारात पडला, “याचं शीर वेगळं झालं तरी अजून शरीर तसंच आहे. रक्त येत नसलं तरी शरीर जिवंत असल्याचा भास होतोय. हा काय प्रकार असावा...” महाराजांकडे वळत रामू म्हणाला, “महाराज, हा नक्कीच कोणीतरी मायावी राक्षस असणार... या घटनेला दिवस उलटून गेलेत तरी अजून याचं शरीर तसंच आहे... महाराज मला आज्ञा द्यावी निघण्याची...”

नमस्कार करणाऱ्या रामूला महाराज कृपाळदेवांनी उठवलं. प्रवासासाठी घोडा आणि संरक्षणासाठी तलवार व कट्यार देत ते म्हणाले, “जा मुला, यशस्वी हो...” ज्या दिशेला राक्षसाचं शीर नाहीसं झालं होतं त्या दिशेने रामू निघाला. एका अरण्यातून दुसऱ्या अरण्यात असा त्याचा प्रवास चालला होता. एका नदी किनारी तो पोहोचला. घोड्याला थोडा आराम मिळावा म्हणून एका डेरेदार वृक्षाखाली रामूने त्याला बांधून ठेवलं आणि तिथेच बाजूला बसून महाराणीने दिलेली शिदोरी तो खाऊ लागला. त्याचं जेवण सुरू असताना, “ओम... ओम...” असा आवाज त्याला ऐकू आला. जवळच कोणीतरी मुनिवर असणार याची कल्पना त्याला आली. त्यांचं दर्शन व्हावं म्हणून रामू आवाजाच्या दिशेने निघाला. रामूने पाहिलं तर एक झाडाखाली एक मुनी पद्मासनात बसले होते. त्याचं शीर सोडून संपूर्ण शरीर दगडाचं होतं. रामू अवाक झाला. जवळ जाऊन मांडीवर डोकं ठेवत रामू म्हणाला, “प्रणाम मुनिवर... आपण तपस्वी असून आपली ही अवस्था...” त्या योग्याने डोळे उघडले. रामूकडे पाहून ते हसत म्हणाले, “वत्सा, अरे मी तपस्वी आहे म्हणूनच माझं पूर्ण शरीर दगडाचं नाही होऊ शकलं. हे कृत्य त्या मायावी क्रूरकर्मा संधू राक्षसाचं आहे. माझ्याकडून शिवशंकराला प्रसन्न करण्याचा मंत्र जाणून घेऊन त्याने माझी अशी गत केली. माझंच रूप धारण करून तो संधू शंकराच्या तपश्चर्येसाठी पुढे गेला...

मी अंतरज्ञानाने जाणलं, संधूने भगवान शंकरकडून वरदान प्राप्त केलं. त्यानुसार संधूचा वध फक्त त्याच्या स्वत:च्याच हातून होऊ शकेल. या वरदानावरही त्या संधूचं समाधान नाही झालं. त्याला आता त्रिलोकाधीश व्हायचं होतं. त्यासाठी संधूने पुन्हा तपश्चर्येला प्रारंभ केला पण कृपाळदेवाच्या कन्येमुळे संधूची तपश्चर्या भंग पावली. राजकुमारी सोनलच्या बाणामुळे संधूचं शीर धडावेगळं झालं आणि त्याची तपश्चर्या भंगली. संधूचं शीर हिमालयातल्या त्याच्या गुहेत गेलं आणि त्याच्या शापामुळे राजकुमारी सोनलचा अर्धा देहही त्यासोबत गेला. शिराविना असलेल्या संधूच्या धडाला पुढचे आदेश येणं बंद झालं आणि ते तसंच निपचित पडून राहिलं... रामू, तुझं येण्याचं कारणही मला ज्ञात आहे. राजकुमारी सोनलचा अर्धा देह याच संधूच्या भाळावर स्थित मण्यामध्ये कैद आहे. तो मणी तोडताच सोनलचा देह तिच्या उरवरित अर्ध्या देहाशी जोडला जाईल आणि सोनलची शापातून मुक्तता होईल. कारण तो मणीच त्या संधू राक्षसाचा प्राण आहे. मी तुला एक धनुष्य व सात बाण देत आहे. त्याचा प्रयोग करून त्या संधूचं शीर त्याच्या धडापर्यंत पोहोचवू शकशील...

संधूचं शीर त्याच्या धडाला शिवताच तो राक्षस पुन्हा जिवंत होईल आणि मग त्याला रोखणं अशक्य होईल. रामू, तुला असं काहीतरी करावं लागेल ज्यामुळे संधू स्वत:च स्वत:ला इजा करेल. आता बस माझ्यासमोर...” रामू मुनींसमोर डोळे मिटून बसला. मुनींनी मंत्र म्हटला आणि क्षणार्धात रामूसमोर एक धनुष्य आणि सात बाण प्रकट झाले. मुनी म्हणाले, “रामू, या सहा बाणांचे त्यांचे त्यांचे गुणधर्म आहेत आणि हा सातवा बाण एका विशिष्ठ गोष्टीसाठी वापरता येईल. नीट विचार करून यांचा वापर कर. संधू राक्षसाची गुहा हिमालयात स्थित गिरीधर पर्वतात आहे. तिथवर तू तुझ्या अश्वावर जाऊ शकशील पण गुहेतमात्र तुला चालत जावं लागेल. संधूनेच तयार केलेले पाच राक्षस त्या गुहेचं रक्षण करतात. त्यांना नमवूनच तू गुहेच्या मध्यावर असलेल्या संधूच्या शिरापर्यंत पोहोचशील. जा वत्सा तुझा विजय असो...” रामूने त्या सात बाणांकडे पाहिलं. हिरवा, पांढरा, निळा, लाल, सोनेरी आणि काळा असे ते सहा बाण आणि रिंगण असलेला सातवा बाण पाहून रामूला आश्चर्य वाटलं. आणि प्रत्येक बाणाचा त्याचा त्याचा गुणधर्म म्हणजे काय असणार याचाच विचार तो करू लागला. रामूला विचारात पाहून मुनी म्हणाले, “काळजी नसावी रामू... योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य बाण वापरण्याचं ज्ञान तुला तुझं अंतर्मन देईल. कल्याण हो...” मुनींना नमस्कार करून रामू पुढे निघाला. बरंच अंतर पार केल्यावर रामू गिरीधर पर्वताच्या पायथ्याशी पोहोचला. त्याने वर पाहिलं तर एखाद्या उघड्या जबड्यासारखी एक गुहा त्याला दिसली...

रामूने देवाचे नाव घेतले आणि आत प्रवेश केला. गुहेत सगळीकडे सामसूम होतं. अंधाऱ्या रस्त्यावरून हळूहळू मार्गक्रमण करत रामू पुढे जाऊ लागला. अचानक त्याच्या समोरचा रस्ता प्रकाशमान झाला. रामूने पाहिलं तर समोर झाडंच झाडं होती. रामूने जसे पाऊल पुढे टाकले तशी त्या झाडांनी आपली जागा सोडली. झाडांच्या खोडातले हिरवे डोळे चमकू लागले आणि झाडं रामूच्या दिशेने येऊ लागली. रामूने धनुष्य-बाण खाली ठेवत तलवार उपसली पण त्या झाडांच्या अक्राळ-विक्राळ ताकदीपुढे त्याचा निभाव लागत नव्हता. त्याने धनुष्य-बाणाचा वापर करायचं ठरवलं. पण कुठला बाण चालवायचा आणि कोणावर... कारण प्रत्येक बाण एकदाच चालवता येणार होता. रामूने जरा विचार केला आणि फांद्यांना चकवत धनुष्य-बाणापर्यंत पोहोचला. त्याने तलवार म्यान केली आणि हिरव्या रंगाचा बाण धनुष्याला लावला. बाण मारण्यासाठी जागा शोधत असताना रामूला जाणवलं की इतर झाडांचे दोन डोळे आहेत पण एका झाडालामात्र तीन डोळे आहेत. रामूने नेम धरून त्या झाडाच्या तिसऱ्या डोळ्यावर बाण मारला. “आ......” अशी आरोळी ऐकू आली. बाणाने त्याचे कार्य साध्य केले होते. सगळी झाडं गायब झाली. ज्या झाडाला बाण लागला होता ते कोसळलं आणि त्याजागी हिरवट रंगाचा राक्षस दिसू लागला. त्या राक्षसाला ओलांडून रामू पुढे गेला आणि अचानक सोसाट्याचा वारा वाहू लागला...

प्रकाश कमी होत गेला आणि अंधार वाढू लागला. एका बाजूला वाढत जाणारा अंधार आणि दुसरीकडे हे वावटळ... रामूला तर डोळे उघडणंच शक्य होत नव्हतं. त्याचा चालण्याचा वेग मंदावला. दोन्ही हात डोळ्यांवर ठेऊन तो पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता खरा पण हा वारा त्याला तसूभारही सरकू देत नव्हता. पुढे कसं जावं हा विचार करत असतानाच वावटळाने त्याला गिळंकृत केलं. वावटळात गटांगळ्या खात असताना रामूने डोळे किलकिले करत पाहिलं तर केंद्रस्थानी त्याला एक काळा चौकोन दिसला. या वावटळात सर्वकाही फिरत असताना हाच चौकोन स्थिर कसा काय याचाच विचार करत असताना रामूला त्याच्याकडे असलेल्या काळ्या बाणाची आठवण झाली. रामूने लगेच धनुष्याला तो काळा बाण लावला आणि त्या काळ्या चौकोनाकडे भिरकावला. चौकोनात बाण बसताच “आ.......” असा ओरडण्याचा आवाज आला. वावटळ थांबलं तसा रामू खाली आला. खाली राखाडी रंग अंगभर फासलेला एक राक्षस पडला होता. रामू म्हणाला, “आधी ती झाडं आणि आता हे वावटळ... झाडांसाठी हिरवा बाण आणि आता काळा बाण... म्हणजे... पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश... याचा अर्थ त्या संधूने पंचतत्वांच्या आधारे हे पाच राक्षस बनवले तर... आता मला सावध व्हायला हवं कारण जल, अग्नी आणि अवकाश यांचा प्रकोप अजून बाकी आहे...” रामू विचारच करत होता की एकाएकी आकाशात गडगडाट झाला आणि विजा चमकू लागल्या. एक वीज रामूच्या शेजारी असलेल्या झाडावर कोसळली आणि क्षणार्धात झाडाची राख झाली...

रामूने झाडाकडे पाहत स्मित केलं आणि स्वत:शीच म्हणाला, “याचा अर्थ हा राक्षस अवकाश या तत्वापासून तयार झाला आहे तर. याला थांबवण्यासाठी कोणता बाण वापरावा... अंधारात चमकणाऱ्या या विजा पांढऱ्या रंगाच्या भासत आहेत... पांढराच बाण वापरतो. पण बाण मारायचा कुठे...” बोलत असताना रामूच्या लक्षात आलं की सगळ्या विजा एकाच ठिकाणाहून येत आहेत. रामू धनुष्याला पांढरा बाण लावून वर पाहत पावित्र्यात उभा राहिला. जशी वीज कोसळली त्यासरशी रामूने बाण सोडला. “आ......” असा ओरडा पुन्हा ऐकू आला. विजा शांत झाल्या आणि पांढऱ्या रंगाचा राक्षस धपकन जमिनीवर पडला. “तीन गेले आता दोन...” असे उद्गार काढत रामू पुढे गेला. बराच काळ चालूनही कुठलंही आव्हान त्याच्या समोर आलं नाही. रामू थोडा आश्चर्यचकित झाला खरा पण इतक्यात गुहेच्या एका बाजूला असलेला दगडी दरवाजा सरकला आणि आतून “खळखळ...” असा आवाज येऊ लागला. रामू सावधपणे पुढे जात दारातून आत गेला. त्या दालनाच्या मधोमध हवेत तरंगत असलेलं एक शीर त्याच्या नजरेस पडलं. ते शीर मोठ्या आवाज म्हणालं, “आलास... ये की पुढे... इथवर आला आहेस तर थांबलास कशाला...” ते शीर संधू राक्षसाचं होतं. रामू पुढे जाणार इतक्यात त्याची नजर खाली गेली. पाण्याच्या एका प्रचंड मोठ्या भोवऱ्याच्या तोंडावर रामू उभा होता. एक पाऊल पुढे टाकलं असतं तर भोवऱ्यात अडकून रामूला जलसमाधीच मिळाली असती...

रामू एक पाऊल मागे गेला. थोडं मागे जाऊन धावत येत त्या भोवऱ्यावरून उडी मारावी अशा विचारात तो असतानाच तो दगडी दरवाजा बंद झाला आणि जमीनही भोवऱ्याच्या दिशेने सरकू लागली. आता वेळ घालवून चालणार नव्हतं. रामूकडे आता चार बाण उरले होते, निळा, लाल, सोनेरी आणि रिंगण असलेला बाण. त्याने ताबडतोब निळ्या रंगाचा बाण धनुष्याला लावला आणि भोवऱ्याच्या उगमाच्या दिशेने पाण्यात सोडला. त्यासरशी पाण्यातून, “आ......” असा ओरडण्याचा आवाज येऊन भोवरा कमी होत होत नाहीसा झाला व त्या जागी निळ्या रंगाचा राक्षस पडलेला दिसला. रामूने पाय पुढे ठेवला. त्याला टणक जमीन लागली. संधूचं शीर हाकेच्या अंतरावर आहे हे पाहून रामू धावतच त्याकडे निघाला. तो शिरापर्यंत पोहोचणार इतक्यात शिराच्या चारही बाजूंनी प्रचंड मोठे आगीचे लोळ वर आले. नुसत्या स्पर्शाने एखाद्याची जळून राख होईल इतकी दाहकता होती त्या आगीत. ती आग पार करून पुढे जाण्याचा मार्ग शोधत असताना ती आग रामूच्या दिशेने येऊ लागली. रामूला समजलं ही नुसतीच आग नसून पंचतत्वांनी तयार झालेला एक राक्षस आहे. उरलेल्या तीन बाणांपैकी लाल बाण त्याने धनुष्यावर चढवला आणि जमिनीवर असलेल्या लाल निखाऱ्यावर त्याने तो चालवला. लगेचच आग शांत झाली आणि एक लालबुंद राक्षस तिथे पडलेला दिसला...

रामू पुढे आला तसं संधूचं शीर म्हणालं, “तुला काय वाटलं, या आग, पाणी, अशा क्षुद्र गोष्टींना नाहीसं करून तू माझ्यापर्यंत पोहोचशील... हा...हा...हा... मी संधू आहे संधू... बघ तुझ्या अवती-भोवती...” रामूने चौफेर नजर फिरवली तर दगड फोडून हिरव्या रंगाचा राक्षस, वाऱ्याच्या वेगाने आलेला राखाडी रंगाचा राक्षस, पाण्यातून निर्माण झालेला निळा राक्षस, आकाशातून उडी घेत खाली आलेला पांढरा राक्षस व अग्नीतून निर्माण झालेला लाल रंगाचा राक्षस असे पाचही राक्षस वेडेवाकडे हसत हात पसरवून रामूकडे येऊ लागले. आता रामूकडे दोनच बाण शिल्लक होते. रामूने धनुष्य-बाण खाली ठेवले आणि तलवार उपसली. बराच वेळ रामू त्या पाचही राक्षसांचा प्रतिकार करत होता पण त्याला यश मिळत नव्हतं. कुठल्याही राक्षसावर रामूने तलवार चालवताच तो वार त्या राक्षसाच्या शरीराच्या आर-पार जाई आणि राक्षस हसत राही. रामूला समजलं, हे राक्षस मायावी आहेत. हे असे नष्ट होणार नाहीत. जर हे राक्षस संधूनेच निर्माण केलेत तर संधूचाच कुठलातरी गूण त्यांच्यात असणारच. हा विचार करेपर्यंत पाचही राक्षसांनी रामूला घेराव घातला होता. रामूने सर्वांचं निरीक्षण केलं आणि त्याला जाणवलं की पाचही राक्षसांच्या भाळावर एकेक मणी आहे. रामू हसला. त्याला मार्ग सापडला होता. एक राक्षस पुढे आला. रामूने त्याला चुकवून त्याच्या भाळावरच्या मण्यावर वार केला. त्याबरोब्बर त्या राक्षसाचं भस्म झालं. रामूने आता सर्व राक्षसांच्या मण्यावर वार करण्याचा सपाटाच लावला. एकेक राक्षस भस्मसात होत गेला आणि रामू संधूच्या शिराजवळ पोहोचला...

आपल्या सर्व राक्षसांचं भस्म झालेलं पाहून संधू थोडा चरकला पण सावरत म्हणाला, “माझ्या या राक्षसांना मारून हे मानवा तुला काय वाटलं... तू मला हरवशील... मला... या संधूला... हा...हा...हा... राजकुमारीला सोडवायचं आहे ना तुला... पण ती तर माझ्या भाळावर असलेल्या या मण्यात कैद आहे आणि हा मणी माझ्या हातून तुटला तरच राजकुमारी मुक्त होईल... पण माझे हात असलेलं माझं धड... ते तर लांब त्या वनात आहे... माझं हे शीर जर माझ्या धडाशी पुन्हा जोडलं गेलं तर... तर मी पूर्ववत होईन. मग कुठली राजकुमारी नी कसली ही पृथ्वी... हा...हा...हा... काय करशील रे...” तलवार उपसून संधूवर वार करण्यास रामू सज्ज झाला होता खरा पण संधूचे हे शब्द ऐकले आणि रामू विचारात पडला, “हा संधू म्हणतोय ते खरं आहे. मणी फक्त संधूच्याच हातून तुटला तरच राजकुमारी सोनल त्याच्या शापातून मुक्त होईल. आणि ते मुनिवर म्हणाले तसं जर संधूचं शीर पुन्हा धडाशी जोडलं गेलं तर हा राक्षस पूर्ववत होईल आणि मग याला संपवणं अशक्य होईल... काय करावं...” विचार करत असताना रामूला एक युक्ती सुचली. त्याने तलवार म्यान केली. त्याच्याजवळ दोन बाण शिल्लक होते. त्यातल्या रिंगण असलेला बाण रामूने काढला. आपल्याजवळची कट्यार बाणाच्या अग्रस्थानी असलेल्या रिंगणात नीट बसवली आणि बाण वनाच्या दिशेने भिरकावला. हे पाहून संधू हसत म्हणाला, “हा...हा...हा... कट्यार टाकून दिलीस... अरे मानवा आता कसा रे मला हरवणार तू...” रामू संधूकडे पाहत हसला. “तुला लवकरच कळेल पुढे काय होईल ते...” असं म्हणत असताना रामूने सोनेरी बाण धनुष्याला लावला. त्याला नमस्कार केला आणि संधूच्या दिशेने सोडला...

त्या सोनेरी बाणाने संधूच्या शिराचा बरोब्बर वेध घेतला. बाणाचा शिराला स्पर्श होताच एक सोनेरी वलय त्या शिराभोवती प्रकट झालं. तो बाण संधूच्या शिराला त्याच्या धडाच्या दिशेने नेऊ लागला. पाठोपाठ रामूही निघाला. जसा रामू बाणाच्या मागे जाऊ लागला तसं त्याच्या मागे गुहा कोसळू लागली. बाणाचा पाठलाग करत रामू गुहे बाहेर आला. संपूर्ण गुहा कोसळून भुईसपाट झाली. हवेत बाणाला लागलेलं संधूचं शीर हसत आपल्या धडाच्या दिशेने जात होतं. रामूही घोड्यावर स्वार होत बाणामागे घोडदौड करू लागला. तिथे रिंगण असलेल्या बाणाने सोबत असलेल्या रामूच्या कट्यारीला बरोब्बर संधूच्या धडापर्यंत पोहोचवलं होतं. त्या कट्यारीनेही एकाच वारानिशी देहापासून हात वेगळा करत आपलं कामही चोख बजावलं होतं. हे अदभूत दृष्य महाराज, महाराणीसह तिथे जमलेली रयत पाहत होती. त्याच वेळी हसत असलेलं संधूचं शीर येताना दिसलं. शीर धडाला शिवलं आणि वलयासह संधू राक्षस पूर्ववत होऊन उभा राहत मोठमोठ्याने हसू लागला. सर्वजण घाबरून मागे सरकू लागले तेवढ्यात रामू तिथे पोहोचला. ताडाच्या झाडाएवढा ऊंच असलेल्या संधूला पाहून रामू खाली उतरला. संधू म्हणाला, "हा...हा...हा... मी पूर्ववत झालो... आता तुम्हा सर्वांना खाणार... आणि या रामूच्या तर चिंध्या करून हवेत फेकून देणार... हा...हा...हा..."

संधू बोलत असतानाच पुढे येत रामू म्हणाला, "संधू, तू सगळं करशील पण एका हाताने तू किती जणांना मारशील..." रामू बोलतच होता तेव्हा संधूने त्याच्या हातांकडे पाहिलं तेव्हा आपला डावा हात नसल्याचं त्याला समजलं. रागाने लाल होत त्याने रामूकडे पाहिलं तर रामू धनुष्याला संधूचा हात लावून सज्ज होता. क्षणार्धात रामूने संधूचा हात बाणासारखा भिरकावला. बाणाने संधूच्या कपाळाचा वेध घेतला आणि हाताच्या लांबच लांब नखाचा वार संधूच्या भाळावर स्थित मण्यावर बसला. "आ......" असं किळसवाणं ओरडत संधू वितळत जाऊन नाहीसा झाला. मागे राहिलेल्या मण्यातून दिव्य प्रकाश बाहेर पडला आणि समोर दिसू लागला राजकुमारी सोनलचा अर्धा देह. तो अर्धा देह सोनलच्या उर्वरित अर्ध्या देहाशी जाऊन मिळाला आणी सोनलमध्ये चेतना परत आली. सोनल धावत जाऊन महाराज व महाराणीला बिलगली. इतक्यात, "राजन..." या आवाजाने सर्वांचं लक्ष वेधलं. सर्वांनी पाहिलं तर समोर एक मुनिवर उभे होते. रामूने लगेच ओळखलं की हे तेच मुनी होते ज्यांनी संधूला नमवण्यात त्याची मदत केली होती…

रामूने त्यांना नमस्कार केला. रामूला उठवत मुनी म्हणाले, "रामू, संधूचा वध झाला आणि सोनलसह माझीसुद्धा मुक्तता झाली. राजन, संधूचा वध करताना या रामूने अद्वितीय पराक्रम दाखवला आहे. सोनलशी याचा विवाह करून राज्यकारभार याला सोपवावा असे मला वाटते..." महाराजांनी सोनलकडे पाहिलं. लाजून गुलाबी झालेल्या सोनलने एकवार रामूकडे पाहिलं व म्हणाली, "माझी काहीच हरकत नाही..." रामूच्या रूपात सोनलला तिच्या मनाजोगता आणि सुयोग्य जोडीदार तर मिळालाच होता पण नगरालाही एक कर्तबगार आणि पराक्रमी राजा मिळाला होता. सोनल व रामूचा सुखी संसार सुरू झाला व सर्वत्र आनंदी आनंद पसरला...

समाप्त.

Sunday, August 12, 2018

न्याय...



सकाळचे नऊ वाजले होते. चर्चगेटकडे जाणारी फास्ट ट्रेन प्लॅटफॉर्म सोडतच होती की एक माणूस धावत चालत्या ट्रेनमध्ये चढला. गर्दीतून रेटारेटी करत आत शिरत असताना स्वत:शीच बडबडत होता, "फर्स्ट क्लासमध्येपण गर्दी... काही सीमाच नाही राहिली गर्दीची. त्यात पावसानेही कहर केलाय..." कसाबसा तो माणूस आत पोहोचला. स्थिरस्थावर होईपर्यंत गाडीने अंधेरी सोडलं होतं. त्या माणसाला नीटसं उभं राहता येत नव्हतं त्यामुळे त्याची चलबिचल चालू होती. समोर बसलेल्या माणसाला त्याचा सारखा धक्का लागत होता. एकदोनदा त्याने वर पाहिलंसुद्धा. पण काय उपयोग झाला नाही. शेवटी न राहून त्या बसलेल्या माणसाने समोर उभ्या राहिलेल्या माणसाला ढकललं. तो माणूस अडखळणार इतक्यात इतर प्रवाशांनी त्याला सावरलं. तो माणूस पुढे येत म्हणाला, "काय हो, धक्का का मारताय... बसलात ना निवांत मग... आम्ही उभे आहोत तेसुद्धा बघवत नाही का..." बसलेला माणूसही काही कमी नव्हता. म्हणाला, "मग नीट उभे रहा ना... डांस कसला करताय... डांसच करायचाय तर जरा मोकळ्यावर करा. चार पैसे मिळतील..." गाडी एकेक स्थानक पुढे जात होती आणि या दोघांचं भांडणही वाढत होतं. शेवटी न राहून त्या उभ्या असलेल्या माणसाने बसलेल्या माणसाला जोरात ढकललं. मागच्या लोखंडी पाईपवर त्याचं डोकं जोरात आपटलं. "आह..." असा अस्पष्ट उच्चार करत त्या माणसाने मान टाकली...

उभ्या असलेल्या माणसाने त्याला हलवलं तर तो बाजूच्या माणसावर कलंडला. बाजूला बसलेल्या माणसाने त्याला सावरत डोक्याला धरून सरळ केलं तर त्याच्या हाताला रक्त लागलं. रक्त पाहून भांबावून तो आरडा-ओरडा करू लागला, “रक्त... अरे हा मेला-बिला की काय... पकडा रे या माणसाला... थांबवा गाडी... चेन खेचा कोणीतरी...” डब्यात गोंधळ सुरू झाला. त्यातच कोणीतरी साखळी खेचली. गाडी दादर सोडतच होती की साखळी खेचल्यामुळे थांबली. प्रवाशांपैकी कोणीतरी पोलीसांना फोन केला. तपास सुरू झाला. सब इंस्पेक्टर सचिन आणि इंस्पेक्टर आनंद बॉडी तपासू लागले. सचिन म्हणाला, “याला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय आठवत नाही कुठे...” सब इंस्पेक्टर उमा आणि सीनियर इंस्पेक्टर प्रधान प्रवाशांची जबानी घेऊ लागले, “बोला... काय घडलं इथे...” एक प्रवासी सर्व हकीगत सांगू लागला. प्रधान म्हणाले, “हम्म... म्हणजे त्या मृत व्यक्तीमध्ये आणि या माणसामध्ये वाद झाला आणि त्यातून झालेल्या ढकला-ढकलीत या बिचाऱ्याचा मृत्यू ओढवला... काय रे... काय नाव तुझं...” रक्त, प्रेत आणि गोंधळ पाहून आधीच घाबरलेला तो इसम कसाबसा बोलला, “स...सर... म...मी प्रमोद... रोज याच ट्रेनने जातो सर... आ...आज थोडा उशीर झाला म्हणून गर्दीत सापडलो... या माणसाशी काही वैर नाही हो माझं... मी का मारू याला...” तो बोलत असतानाच सचिन बोलता झाला, “सर, बॉडीवर कोणत्याच जखमा नाहीत... इथे डोक्याला हा रॉड लागल्याने रक्त आलं आहे... कदाचित याचमुळे या माणसाचा मृत्यू झाला असावा...”

प्रधान त्यांची नजर प्रमोदवर रोखत म्हणाले, "उमा, अजून काय मिळालं याच्याकडे... ओळख पटेल असं काही..." उमाने बॉडीच्या वस्तू चेक केल्या. म्हणाली, "सर याचं नाव आकाश आहे. बोरिवलीला राहतो आणि नरिमन पॉईंटला असलेल्या एबीसी टेक्नोमध्ये जॉब करतो. थोडे पैसे आहेत, पॅन कार्ड, पास, क्रेडिट कार्ड्स, याखेरीज अजून काही नाही सर..." ऐकून प्रधानांची नजर अजून धारदार झाली. ते म्हणाले, "बोल प्रमोद, आता काय बोलायचं आहे तुला..." प्रमोदला घाम फुटला होता. तो हात जोडत म्हणाला, "सर, प्लीज सर... प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर... मी काहीही केलं नाही..." प्रमोदला मध्येच तोडत प्रधान म्हणाले, "तुर्तास तरी समोर आलेल्या गोष्टींवरून तू दोषी आहेस. सचिन, याला चौकीवर घेऊन जा..." मग प्रवाशांकडे वळत म्हणाले, "घटनेच्या वेळी तुम्ही सगळे इथे होता. तर आपापले फोन नंबर्स द्या. कदाचित आम्हाला तुमची गरज लागेल. आणि, आत्ता हा डबा रिकामा करा. इथे जर काही पुरावे राहिले असतील तर गर्दीमुळे ते नष्ट होऊ शकतात. आनंद, तू या डब्यात थांब. मी रेल्वे अथॉरिटीजशी बोलून घेतो. गाडी चर्चगेटला जाऊ दे. मग हा डबा वेगळा करून पुढील तपासासाठी कारशेडला हलवू. उमा, तू चल माझ्यासोबत. आपण बॉडीला डॉ. गोखलेंकडे नेऊ..."

रेल्वेच्या परवानगीने ट्रेनचा डबा कारशेडला नेला गेला. आनंद तपास करू लागला. आकाशचं प्रेत ज्या ठिकाणी होतं. तिथून तो बारकाईने सर्व जागा न्याहाळू लागला. सर्वसाधारण प्रथम दर्जाचा तो डबा दोन भागात विभागला गेला होता. मागचा भाग शारीरिक विकलांगांसाठी होता तर पुढचा भाग बाकी सर्वांसाठी. या दोन्ही भागांना जोडणाऱ्या लोखंडाच्या पाईपला रक्त लागलं होतं. त्या जागेपासून दारापर्यंत आनंदने सर्व डबा तपासला दोन पिना व कचरा याखेरीज त्याला विशेष काही आढळलं नाही. विकलांगांच्या डब्यातही जरा नजर फिरवावी म्हणून आनंद तिथे शिरला. बारकाईने तपासत असताना त्याला जमिनीवर पडलेली एक नळी सापडली. आनंदने हातमोजे घालून ती नळी उचलली. म्हणाला, “हा तर स्ट्रॉ आहे... पण इथे काय करतोय...” आनंदने प्रधानांना फोन लावला. तिथे डॉ. गोखले आकाशची बॉडी तपासत म्हणाले, “प्रधान साहेब, मी बॉडी तपासली आहे. एक नक्की, याचा मृत्यू डोक्याला मार लागल्याने नाही तर विषामुळे झाला आहे...” गोंधळलेल्या प्रधान आणि उमाकडे पाहत डॉ. गोखले म्हणाले, “सांगतो... हे बघा... याचे ओठ आणि हाताची नखं हलकी निळी पडली आहेत आणि याच्या डोक्यात गळ्याच्या वर ही छोटी ठिपक्याएवढी जखम. याच्या आजूबाजूलाही हलका निळा रंग दिसतोय. इथूनच आकाशला विष दिलं गेलं असावं. विष कोणतं, तर साईनाईड आहे... अत्यंत जहाल विष... एका झटक्यात मृत्यू...” डॉ. बोलत असताना प्रधानांचा फोन वाजला...

फोन घेत प्रधान म्हणाले, “बोल आनंद... हम्म्म... एक काम कर, तू ते सगळं घेऊन इथे डॉ. गोखलेंकडे ये. पण सांभाळून... तो स्ट्रॉ तोंडाजवळ नेऊ नकोस... त्या डब्याच्या सुरक्षिततेसाठी मी परळ पोलीस चौकीला कळवलं आहे. त्यांचे हवालदार येताच तू निघ... डॉक्टर, आनंदला ट्रेनच्या डब्यात जिथे आकाशचं प्रेत होतं तिथे काही पिना सापडल्यात आणि त्याच्या मागच्या डब्यात एक स्ट्रॉ सापडला आहे. आनंद ते सर्व घेऊन इथेच यायला निघाला आहे...” काही वेळात आनंद आत आला. डोक्टरांनी आनंदने आणलेले जिन्नस तपासले. म्हणाले, “प्रधान साहेब, बरं झालं तुम्ही आनंदला हा स्ट्रॉ तोंडाजवळ न नेण्याची सुचना दिलीत. या कचऱ्यात विशेष काही नाही पण या पिनांमधल्या एकीवर आणि या स्ट्रॉमध्ये मला साईनाईडचे ट्रेसेस सापडले आहेत. शिवाय या पिनेच्या टोकाच्या भागाला थोडं रक्त आहे जे आकाशच्या रक्ताशी जुळतंय. प्रधान साहेब, याच स्ट्रॉचा वापर करून ही विषारी पीन आकाशवर चालवली गेली ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला...” प्रधान काही क्षण हनवटी चोळत उभे राहिले. मग म्हणाले, “ठीक आहे... आनंद, उमा, आपण चौकीवर जाऊ. त्या बिचाऱ्या प्रमोदला आपण धारेवर धरलंय...” गाडी बसता बसता उमा म्हणाली, “सर, म्हणजे खरा खूनी अजूनही मोकाट सुटलाय...”

सर्व चौकीवर पोहोचले तेव्हा तिथे गदारोळ सुरू होता. लोकांचे तीन गट दिसत होते. एक पोलीसांचा, एक आरडाओरड करणाऱ्या नागरिकांचा आणि एक शांतपणे उभ्या रेल्वेमधल्या प्रवाशांचा. गोंगाट करणारे सर्व आकाशचे नातेवाईक होते. पोटतिडकीने प्रमोदला शिक्षा देण्याची मागणी करत होते. प्रधान पुढे होत म्हणाले, “जरा शांत व्हा... हे बघा घडला प्रकार या सर्वांच्या समोर झाला असला तरी हा प्रमोद दोषी नाही. डब्यात झालेल्या वादात तो ढकलाढकलीचा प्रकार घडला हे जरी खरं असलं तरी त्यामुळे आकाशचा मृत्यू झाला नाही. त्याचा खून झाला आहे... विष दिलं गेलंय त्याला. मला सांगा, आकाशचं कोणाशी वैर होतं का...किंवा भांडण वगैरे...” सर्वांनी नकारार्थी माना हलवल्या. प्रधान म्हणाले, “ठीक आहे. तुम्ही आता घरी जा. आणि विश्वास ठेवा आमच्यावर... आम्ही या प्रकरणाचा छडा लवकरच लाऊ...” सर्वजण निघून गेल्यावर प्रधानांनी सचिनला प्रमोदला सोडायला सांगितलं. इतका वेळ शांत बसलेल्या त्या प्रवासी गटातील एकजण पुढे येत म्हणाला, “इंस्पेक्टर साहेब, आम्हाला किती वेळ अजून इथे थांबावं लागेल... अहो हा माणूस खूनी असेल किंवा नसेल, पण आम्हाला कशाला अडकवताय...” आनंद पुढे होत म्हणाला, “हे बघा, तुमच्याकडून थोडी माहिती हवी आहे म्हणून तुम्हाला इथे बोलावलं आहे. आम्हाला सहकार्य करा म्हणजे या केसची उकल लवकर होईल...” त्या सर्वांनी मानेने होकार देताच उमा पुढे झाली...

“मला सांगा, आकाश आणि प्रमोदचं भांडण सुरू असताना त्या ठिकाणाच्या आस-पास एखादी वेगळी गोष्ट तुम्हाला कोणाला जाणवली का... किंवा काही पाहिलंत का असं...” उमाच्या या प्रश्नावर सर्व विचार करू लागले पण कोणी काही बोललं नाही. इतक्यात एक माणूस पुढे होत म्हणाला, “सर, एक विचित्र गोष्ट घडली खरी...” सर्वांनी पाहिलं तर तो एका पायाने अधू असलेला इसम हातात कुबडी घेऊन उभा होता. तो पुढे बोलू लागला, "सर, हा प्रकार ज्या डब्यात घडला त्याच्या मागच्या अपंगांच्या डब्यात मी होतो. माझ्या समोर एक आंधळा बसला होता. फिकट दाढी-मिशा, डोक्यावर तुरळक केस, डोळ्यांवर काळा गॉगल, असा हा माणूस हातात कोल्ड ड्रिंकचा कागदी ग्लास घेऊन बसला होता. ग्लासात असलेला स्ट्रॉ त्याने नुसताच तोंडात धरला होता कारण स्ट्रॉमध्ये हालचाल दिसत नव्हती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्या हातात काठी नव्हती. मी त्याला विचारलंही पण त्याने उत्तर दिलं नाही. गोंधळामुळे जेव्हा गाडी थांबली तेव्हा तो उतरून गेला..." प्रधान म्हणाले, "ही फार मोलाची माहिती दिलीत तुम्ही. एकच करा. त्या आंधळ्या माणसाचा चेहरा बनवायला आम्हाला मदत करा. सचिन, गेट स्टार्टेड..."

पायाने अधू असलेल्या त्या व्यक्तीच्या मदतीने त्या अंध व्यक्तीचं स्केच बनवलं गेलं. सर्वाना जाऊ दिलं गेलं. मध्ये बराच वेळ निघून गेला. प्रधानांसह इतर तिघंही ते स्केच न्याहाळू लागले. प्रधान म्हणाले, “मला वाटतं हा माणूस आंधळा नसावा. त्या डब्यात शिरण्यासाठी केलेला बनाव असावा...” प्रधानांना दुजोरा देत उमा म्हणाली, “हो सर, आणि याचा या दाढी-मिशापण कृत्रीम वाटत आहेत. याने नक्कीच मेकप केला असणार...” सचिन पुन्हा त्या स्केचला न्याहाळत म्हणाला, “असं तर नाही, की हे टक्कलसुद्धा त्याच मेकपचा भाग आहे... याचा खरा चेहरा कसा काय ओळखायचा...” सर्व बोलत असताना आनंदचा फोन वाजला, “इंस्पेक्टर आनंद बोलतोय... काय... कुठे... ओके आम्ही पोहोचतोच... सर, वसई रोडवर अपघात झाला आहे. एका ट्रकने कारला धडक दिली आहे ज्यात कार-चालक जागीच मारला गेलाय. तिथे जमलेल्या सर्वांनी ट्रकचालकाला ताब्यात ठेवलं आहे...” सर्व ऐकत प्रधान म्हणाले, “सचिन, आनंद, तुम्ही तिथे जा... मला सविस्तर माहिती कळवा. उमा आपण या स्केचमधल्या माणसाला शोधण्याच्या कामाला लागू. न जाणो कुठे असेल हा... आणि हो... आकाशचा फोटोही बघ रेकॉर्ड्समध्ये. बघ काही सापडतंय का...”

सचिन व आनंद घटनास्थळी पोहोचले. बघ्यांच्या गर्दीतून वाट काढत दोघं गाडीजवळ आले. गाडी पूर्ण उलटी झाली होती. समोरचा भाग बऱ्यापैकी चिरडला गेला होता आणि आत रक्तबंबाळ झालेला एक माणूस दिसत होता. बाजूलाच उभ्या भल्यामोठ्या ट्रकजवळ काही माणसं एकाला धरून उभी होती. तो धरलेला माणूस, “मला सोडा... सोडा मला...” अशी गयावाया करत होता. सचिन व आनंद घोळक्याजवळ पोहोचले. “काय झालं इथे, आणि याला का धरून ठेवला आहे...” आनंदच्या या प्रश्नावर एकजण पुढे येत म्हणाला, “साहेब, हाच या ट्रकचा ड्रायव्हर आहे. आम्ही समोरून येताना हा प्रकार आमच्या समोर घडला. ती गाडी आपल्या मार्गाने जात होती आणि अचानक याने ट्रक वळवला तो थेट या गाडीवर. गाडीला जोरदार धडक बसली. गाडी हवेत उडून खाली पडली. ट्रकच्या बरोब्बर समोर गाडी पडली असल्याने ट्रक पुढे जाऊ शकला नाही आणि आम्हाला याला पकडता आलं. आनंदने प्रधानांना सगळी हकीगत सांगितली सचिनला जबान्या घेऊन चौकीवर यायला सांगून ट्रकसह प्रेत आणि गाडीला घेऊन पुढील तपासणीसाठी तो डॉ. गोखलेंकडे रवाना झाला. तिथे चौकीवर एव्हाना रेकॉर्ड्स तपासले गेले होते. उमा म्हणाली, “सर, या आकाशचं नाव आपल्या रेकॉर्ड्समध्ये आहे. माधुरी सबनीस केसमध्ये हा साक्षीदार होता...” प्रधान हनवटी चोळत म्हणाले, “इंटरेस्टिंग, त्या केसची फाईल घेऊन ये. बघू अजून काही सापडतंय का...”

डॉ. गोखलेंनी प्रेत, ट्रक आणि गाडी तपासण्यात बराच वेळ घालवला. प्रेतावरचं रक्त साफ झाल्यावर आनंदने चेहरा पाहिला आणि तो उडालाच. म्हणाला, "डॉक्टर याला ओळखतो मी. मागे आम्ही माधुरी सबनीस नावाच्या मुलीची केस हाताळली होती. त्यात हा एक साक्षीदार होता. याचं नाव रणजीत आहे आणि गोव्याच्या ए.व्हाय.एस. फिशरीजमध्ये हा कामाला होता. पण मग हा इथे काय करतोय...” आनंदच्या बोलण्याकडे लक्ष देत सचिन म्हणाला, “आठवलं आनंदसर त्या ट्रेनमध्ये खून झालेल्या आकाशला मी कुठे पाहिलं. याच माधुरी सबनीस केसमध्ये तोही एक साक्षीदार होता. मुंबईतल्या कॅपिटाज इंव्हेस्टमेन्टमध्ये हा कार्यरत होता... डॉक्टर अजून काही कळलं का...” डॉक्टर आनंद व सचिनला गाडीजवळ घेऊन येत म्हणाले, “या गाडीच्या इंजिनमध्ये एक चिप बसवली होती. तशीच चिप या ट्रकच्या स्टीयरिंग यंत्रणेतसुद्धा आहे. एकाच रिमोटने या दोन्ही चिप्स अॅक्टिव्हेट केल्या गेल्या ज्यामुळे गाडीचं इंजिन बंद झालं आणि ट्रकचं स्टियरिंग गाडीच्या दिशेने वळलं. पुढे काय झालं ते तुम्हाला माहीतच आहे. या रिमोट चिप्सची रेंज साधारण दहा ते वीस फुटांमध्ये असावी...” सचिन पुढे येत म्हणाला, “म्हणजे हा अपघात नसून खून आहे तर... आणि खूनी त्यावेळी आस-पासच होता. तो बिचारा ट्रक ड्रायव्हर योगायोगाने या प्रकरणात अडकला...” सर्व ऐकून आनंदने ताबडतोब प्रधान सरांना फोन केला...

चौकीवर चौघांची मिटिंग भरली. उमा म्हणाली, “सर, ट्रेनमध्ये भांडण होतं ज्यात या आकाशचा मृत्यू होतो. आपल्याला समजतं, की त्याला विष दिलं गेलं आहे. बिचारा प्रमोद त्यात अडकतो...” उमाच्या बोलण्याला पुढे नेत सचिन म्हणाला, “आणि हा आकाश आपण सोडवलेल्या एका केसमध्ये साक्षीदार निघतो. त्याच प्रकारे या रणजीतच्या गाडीला अपघात होतो आणि बिचारा ट्रक ड्रायव्हर त्यात अडकतो...” आनंद बाजूलाच उभा होता. म्हणाला, “आणि हा रणजीत त्याच माधुरी सबनीसच्या केस मधला दुसरा साक्षीदार निघतो... विलक्षण योगायोग...” प्रधान इतका वेळ शांत होते. सर्वांचं ऐकत म्हणाले, “हे सर्व योगायोग नाहीत... वरकरणी अपघात वाटणाऱ्या या दोन्ही घटना म्हणजे सूडाच्या उद्देशाने केलेले थंड डोक्याचे योजनाबद्ध खून आहेत. माधुरी सबनीस केसचा खूनी, तो रघुवीर, त्याला तर फाशी झाली... म्हणजे हा कोणीतरी त्याचा हितचिंतक असावा... माधुरी सबनीसच्या फाईलप्रमाणे त्या केसमध्ये तीन प्रमुख साक्षीदार होते. एक आकाश, दुसरा रणजीत आणि तिसरे होते माधव गानू. हे माधव गानू मालाड वेस्टच्या चिंचोली बंदर परिसरात राहत होते जेव्हा ती केस सुरु होती. त्यांचा पत्ता शोधा पण त्यांच्याशी संपर्क साधू नका. या योगायोगाच्या अपघातांवर पडदा पडण्याची वेळ आली आहे...” ते बोलत असतानाच त्यांची नजर कॉमप्युटरकडे गेली. त्यांचे डोळे विस्फारले. बाकीच्या तिघांना त्यांनी स्क्रीनकडे पहायला सांगितलं. सिनीयर इंस्पेक्टर प्रधान, इंस्पेक्टर आनंद, सब इंस्पेक्टर सचिन व सब इंस्पेक्टर उमा बराच वेळ आतल्या खोलीत आखणी करत होते. त्या ट्रक ड्रायव्हरला सोडून देण्यात आलं. अखेर त्यांनी सापळा रचला...

दोन दिवस मध्ये निघून गेले. संध्याकाळची वेळ होती. सोसायटीच्या आवारात मुलं खेळत होती. जवळच्या बागेत वृद्धांच्या गप्पा चालल्या होत्या. इतक्यात धप असा आवाज आला. सर्वांनी पाहिलं तर जमिनीवर कोणीतरी पडलं होतं. चेहऱ्याभोवती रक्तच रक्त होतं. बघ्यांची गर्दी जमली. एकाने प्रेत सरळ केलं आणि सर्वांना धक्का बसला. “याचा काय अर्थ... ही काय मस्करी करण्याची पद्धत झाली... हा पुतळा कोणी पाडला वरून...” गर्दीमधल्या एकाला कंठ फुटला आणि कुजबूज सुरू झाली. त्यातलाच एक माणूस मागे जात गर्दीपासून वेगळा झाला. इकडे-तिकडे पाहत आधी हळू आणि मग जोरात पळत सोसायटीमधून बाहेर जाऊ लागला. “कुठे निघालास विलास...” या आवाजाने विलास थबकला. त्याने हळू हळू मागे पाहिलं तर सिनीयर इंस्पेक्टर प्रधान व यांच्यासोबत प्रमोद त्याच्या समोर उभे होते. त्यांना पाहून विलासचे डोळे विस्फारले आणि तो पळू लागला. थोडाच पळाला असेल आणि हातात पिस्तूल घेतलेली उमा त्याच्या सामोर आली. आजूबाजूने विलास पळणार तोच सब इंस्पेक्टर सचिन व इंस्पेक्टर आनंदने त्याला पकडला. जमावाकडे पाहत प्रधान म्हणाले, “मंडळी, माफ करा. खुन्याला पकडण्यासाठी आम्हाला हा बनाव करावा लागला. प्रमोद, ट्रेनमध्ये जो खून झाला त्याचा खूनी हा आहे हा... विलास...

विलास तू लवकरच प्रमोदचा खून करायला येणार हे आम्ही ओळखलं होतं. त्याच्या घरात ट्रांसमीटर बसवले होते आम्ही. आज सकाळी तू प्लंबर बनून घरात प्रवेश केलास तेव्हाच समजलं की तू आजच याचा काटा काढणार. तू गेल्यावर आम्ही तपास केला तेव्हा समजलं की बाल्कनीच्या रेलिंगचे स्क्रू लूज आहेत. म्हणजे प्रमोद इथे आला असता रेलिंगला हात लावताच त्याच्यासकट तो खाली पडला असता आणि खेळ खलास... नाही का... पण सुडाच्या आगीत जळत असताना तू केलेली एक छोटीशी चूक तुला आज भोवली. आकाश आणि रणजीत आम्ही सोडवलेल्या दुसऱ्या एका केसमध्ये साक्षीदार होते. आम्ही त्याच केसच्या मागे लागलो असतो पण तुझ्या चेहऱ्याने तुझा घात केला. ट्रेनमध्ये झालेल्या खुनात त्या आंधळ्याचे चित्र बनवत असताना तू गडबडीत स्वत:चाच दाढी-मिशा लावलेला चेहरा बनवलास. तो चेहरा आम्ही चेक केला तेव्हा नीता सोनटक्केची केस समोर आली. आपल्या बहिणीच्या खुनासाठी तू तिघांना जबाबदार धरलं होतंस, आकाश, रणजीत आणि हा प्रमोद. तू बनवलेला आंधळ्याचा चेहरा, पायाने अधू असलेल्या माणसाचा आमच्या सी.सी.टिव्हीमधला चेहरा, ट्रक ड्रायव्हरचा चेहरा मॅच झाला. तो तूच होतास विलास. हे समजल्यावर आम्ही तापासाची दिशा बदलली आणि आज तू अडकलास. पुढचं मी सांगू की तू सांगतोस...”

चारही पोलीसांच्या गराड्यात फसलेल्या विलासने बोलायला सुरुवात केली, “मी विलास सोनटक्के. मी लहान असतानाच माझे आई-बाबा मला सोडून गेले. तेव्हा माझ्या तीन वर्षांच्या बहिणीची, नीताची जबाबदारी माझ्यावर आली. मी तिला लहानाची मोठी केली चांगल्या कॉलेजला घातली. ती कॉलेजमध्ये रमू लागली आणि तिला आनंदी पाहून मला समाधान वाटलं. कॉलेज संपल्यावर नीताचं लग्न लावावं हीच माझी इच्छा होती. नीतालामात्र पुढे शिकायचं होतं. पण सगळं संपलं. नीता तिच्या कॉलेज पिकनिकला जी गेली ती परतलीच नाही. मी शोध घेतला पण व्यर्थ. तीन दिवसांनी चालत्या गाडीतून कोणीतरी नीताची बॉडी घराबाहेर फेकली. त्यावेळी तिच्या हातात एक कागद होता. त्यावर लाल रंगाने तीन नावं लिहिली होती... आकाश, रणजीत आणि प्रमोद... खाली नाव होतं नीता... मी पोलिसांना बोलावलं. तपासात समजलं की तिच्यावर शारीरिक अत्याचार झाले होते. शिवाय शरीरावर जखमाही होत्या. माझी फुलांसारखी नाजूक नीता... किती हालहाल झाले असतील तिचे... मी त्या तिघांविरुद्ध तक्रार नोंदवली. तो कागदही मी पोलीसांना दाखवला पण त्यांनी नीट तपास केला नाही आणि तो कागदही गायब झाला. पुराव्या आभावी या तिघांचीही निर्दोष सुटका झाली. मी तिथेच त्या तिघांवर हल्ला केला पण पोलिसांनी मला पकडलं...

कोर्टाची बेअदबी आणि खोटी केस केल्याबद्दल मला शिक्षा झाली. मला खात्री होती, की याच तिघांमुळे माझ्या नीताचं... ती परत तर येऊ शकणार नव्हती पण तिला न्याय मिळवून द्यायचाच असं मी ठरवलं. त्याच आगीत जळत मी शिक्षा पूर्ण केली. बाहेर येताच आकाश, रणजीत आणि प्रमोदची माहिती मिळवली. तिघांनाही मारण्याचा प्लॅन बनवला. आकाशवर व रणजीतवर पाळत ठेवली. रणजीत मुंबईत आल्याचं मला समजलं पण नीताने लिहिलेल्या कागदात आकाशचं नाव पहिलं होतं. मी त्याच्या ट्रेनची वेळ शोधून काढली. योगायोगाने प्रमोदही तिथे आला. त्यांच्यात भांडण झालं. आकाशला मारून प्रमोदला त्यात अडकवण्याचा मी प्रयत्न केला पण त्याच वेळी तुम्हाला तुमच्या टीमसह येताना पाहिलं. मी घाबरलो आणि पायाने अधू बनून चौकीवर येऊन तुमची दिशाभूल करण्यासाठी आंधळ्याचा चेहरा बनवून दिला. तिथून मी निघालो तो थेट रणजीतकडे. मला वाटलं मला उशीर झाला, पण इथेही योगायोग माझ्या पथ्यावर पडला. रणजीतला निघायला उशीर झाला होता. मी त्याच्या गाडीच्या इंजीनमध्ये चिप बसवली. मी स्वत: ट्रकमध्ये होतो आणि माझ्यावर संशय येऊ नये म्हणून तशीच चिप मी ट्रकच्या स्टीयरिंगमध्ये बसवली. रणजीत टप्प्यात येताच मी रिमोटचं बटण दाबलं. इंजीन बंद पडून रणजीतची गाडी मंदावली आणि माझा ट्रक त्याच्या दिशेने वळला. मी व्यवस्थित यशस्वी झालो होतो पण...”  

विलासला मध्येच तोडत प्रधानांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, “पण ओव्हर काँफिडंस आणि सूडबुद्धी यामुळे तुझाच घात झाला. आमची दिशाभूल करण्याच्या नादात तू स्वत:चंच चित्र काढलंस हे तुझ्या लक्षात आलं नाही आणि तिथेच तू फसलास... प्रमोद... विलासच्या कबुलीजबाबामुळे नीता सोनटक्केची केस रीओपन होईल. बऱ्याबोलाने सर्व कबूल कर नाहीतर केस रीओपन झाल्यावर तुला रिमांडवर घेऊन...” प्रमोद हात जोडत म्हणाला, “साहेब, नीताच्या मृत्यूला मी, रणजीत आणि आकाश कारणीभूत होतो हे खरं असलं तरी आम्ही तिला मारलं नाही हो... ती कॉलेजला आल्यापासूनच आमचा तिच्यावर डोळा होता पण नीता आमच्याशी कधीच बोलली नाही. पिकनिकच्या वेळी आम्ही तिघांनी प्लॅन करून तिला पळवलं आणि रणजीतच्या फार्महाऊसवर नेलं. तिथे दोन दिवस आम्ही तिघांनी मिळून आळीपाळीने तिच्यावर... आम्ही केलेल्या मारहाणीमुळे आणि अशक्तपणामुळे तिसऱ्या दिवशी नीता मेली. तेव्हा आम्ही तिला गाडीत घालून तिच्या आयकार्डवर लिहिलेल्या तिच्या घरच्या पत्त्यावर टाकून दिली. कालांतराने माझ्यात आणि आकाशमध्ये गैरसमज होऊन शत्रुत्व निर्माण झालं आणि मी शहर बदललं. मला चांगली नोकरी लागली आणि काही वर्षांनी माझी पुन्हा मुंबईत बदली झाली. त्या दिवशी ट्रेनमध्ये योगायोगाने आम्ही भेटलो आणि राग अनावर होऊन त्याने भांडण उकरून काढलं...”

प्रमोदचं बोलणं संपतं न संपतं तोच विलासने प्रमोदचा गळा आवळला. सचिन आणि आनंदने विलासला धरलं. प्रमोदच्या डोक्याला पिस्तूल लावत उमा म्हणाली, “सर, एक खून माफ करा सर मला... या नराधमाला जगण्याचा काहीही अधिकार नाही...” उमाकडे पाहत प्रधान म्हणाले, “कंट्रोल युअरसेल्फ उमा... पुट द गन डाऊन... यू आर अ रिस्पॉन्सिबल ऑफिसर... प्रमोद, गुन्हेगार कितीही अट्टल असो, केलेला गुन्हा कधी लपून राहत नाही. नीता सोनटक्केवर केलेल्या अत्याचारांची कठोर शिक्षा तुला होईल. नक्कीच होईल. विलास... गुन्ह्याला शासन व्हायला हवं हे खरं आहे पण त्यासाठी तू निवडलेला मार्ग योग्य नव्हता. तुझ्याकडे सहानुभूतीच्या नजरेने पाहण्याची मी कोर्टाला विनंती करेन शिवाय नीतासारख्या मुलींना न्याय मिळावा यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू...”

समाप्त.

Friday, August 3, 2018

झोपाळा...



संध्याकाळ सरत चालली होती. वादळ-वाऱ्यासह कोसळणारा पाऊस वातावरणात एक भयावह गूढ निर्माण करू पाहत होता. बंगल्याच्या मागच्या अंगणातल्या झोपाळ्यावर दामले काका बसले होते. हळू हळू झोका घेत ते सारखे घराकडे पाहत होते. अचानक वीज चमकली आणि त्यांनी दचकून आभाळाकडे पाहिलं. म्हणाले, “काय विचित्र, भयाण वातावरण आहे... संध्याकाळ आहे की रात्र तेच समजत नाही...” “समजेल कसं हो... पावसामुळे अंधार किती पडलाय बघताय ना...” या आवाजाने आकाशाकडे लागलेली त्यांची नजर खाली आली. बाजूला दामले काकू उभ्या होत्या. चेहरा शांत आणि हसतमुख होता त्यांचा. त्या झोपाळ्यावर बसल्या. दामले काका म्हणाले, “अगं वसू होतीस कुठे तू... मी कधींचा आलोय...” पायाने झोपाळा ढकलत दामले आजी म्हणाल्या, “इथेच तर होते... जाणार कुठे... आता तुमच्याशिवाय मला आणि माझ्याशिवाय तुम्हाला दुसरं कोणी आहे का... हे वातावरण काहीही म्हणो... पण आपली ही साथ अशीच राहील. याच झोपाळ्यावर. नाही का...” दहा दिवसांपूर्वी...

"या साहेब या... बघा किती प्रशस्त हवेशीर बंगला आहे. दुसऱ्या मजल्यावर बेडरूम्स आहेत..." बंगला दाखवणारा एजंट एका माणसाला सांगत होता. तो पुढे काही बोलणार इतक्यात त्याचा फोन वाजला. फोनवर बोलत तो एजंट बाहेर गेला. बंगला पहायला त्या माणसासोबत एक मुलगीही आली होती. ती म्हणाली, "कित्ती छान आहे रे बंगला... आपलं लग्न झाल्यावर आपण इथे राहणार या विचारानेच मी जाम खुश आहे..." ती बोलत असताना तिने त्याच्याकडे पाहिलं. तो एकटक खिडकीबाहेर पाहत होता. तिने जवळ जाऊन पाहिलं, तर लॉनमध्ये असलेला झोपाळा हलत होता.काय रे... कुठे तंद्री लागली आहे...” त्याला हलवत ती म्हणाली. त्याने झोपाळ्याकडे बोट दाखवलं. हलणारा झोपाळा पाहून तिलाही थोडं विचित्र वाटलं. ती लगेच म्हणाली, “अरे वाऱ्याने हलत असेल. तू नको लक्ष देऊ...” ती जायला निघाली तर तो तिला थांबवत म्हणाला, “वाऱ्याने... पण मग लॉनमधल्या झाडांची पानं का हलत नाहीत... जाऊन बघावं का...”

नुकताच पाऊस पडून गेल्याने हवेत गारवा पसरला होता. ओलसर लॉनमधून दोघं हळू हळू चालत झोपाळ्यापर्यंत गेले. झोपाळ्याच्या हलण्याचा वेग मंदावला. एकाएकी झोपाळा एकदम स्थिर झाला. जसा झोपाळा थांबला तसे ते दोघंही थांबले. काही क्षण तिथेच थांबून आपल्याला भास झाला असेल असं समजून दोघं वळली. थोडं पुढे गेली आणि झोपाळा पुन्हा सुरु झाला. दोघांनी हळू हळू मान वळवली. झोपाळा हलका हलका झोका घेत होता. पुन्हा तो अचानक थांबला. गवतावरून कोणीतरी चालत येतंय असं वाटलं. अचानक दोघांनाही धक्का बसला. दोघं खाली पडली आणि लॉनवरून कोणीतरी पावलं टाकत बंगल्याकडे गेलं. दार उघडलं गेलं आणि पुन्हा बंद झालं. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. त्या थंड वातावरणातही दोघांनाही घाम फुटला होता. ती म्हणाली, “त...ते क...काय होतं... क...कोण गेलं आ...त...” तोही चांगलाच घाबरला होता पण तिला धीर देत सावरत म्हणाला, “काही समजत नाहीये... तू घाबरू नकोस. चल, आपण आत जाऊन पाहू...” दोघंही हळू हळू बंगल्याच्या दिशेने जाऊ लागली...

बंगल्यात सगळीकडे सामसूम होतं. दाराबाहेर तो एजंट फोनवर बोलत होता. ते दोघं इकडेतिकडे पाहत होते इतक्यात दार आपोआप बंद झालं. वाऱ्याची झुळूक त्यांना चाटून गेली. त्या दिशेने दोघांनी पाहिलं तर आरशावर काहीतरी लिहिलं जात होतं. दोघांनी जवळ जात पाहिलं तर, “निघून जा... परत येऊ नका...” ही अक्षरं लाल रंगात दिसत होती. दोघंही खूप घाबरली. हात जोडत ती म्हणाली, “निघून जातो. निघून जातो आम्ही. परत नाही येणार...” तिला दुजोरा देत तोही म्हणाला, “हो हो... परत नाही येणार आम्ही. पण तो दरवाजा...” वाऱ्याची झुळूक पुन्हा त्यांना स्पर्श करून गेली आणि लाथ मारल्यासारखा बाहेरचा दरवाजा उघडला. ती दोघंही मागे न बघता बाहेर पळाली. तो एजंट परत येत असताना दोघंही त्याच्यावर आदळली. तो म्हणाला, “ठेवा हे घर तुमच्याकडेच. आम्ही जातो...” दोघंही तिथून निघून गेल्यावर एजंट बंगल्याकडे पाहत, “काय पनवतीवाला बंगला आहे... कधी पिच्छा सोडणार काय माहित...” असं म्हणत निघून गेला. बंगल्याचं दार बंद झालं. लॉनकडचा दरवाजा उघडला गेला. झोपाळा पुन्हा हलके हलके झोका घेऊ लागला...

मध्ये काही काळ निघून गेला. एजंटने पुन्हा धीर करून बंगल्यासाठी ग्राहक शोधला. नवरा-बायकोचं ते जोडपं बंगला पहायला आलं. एजंट त्यांच्यासह आत गेला. सर्व बंगला नजरेखालून घातल्यावर ती म्हणाली, “विशाल, कित्ती छान आहे रे बंगला... बघ, मी तुझ्यासाठी किती लकी आहे... आपलं लग्न झालं आणि तुला प्रमोशन मिळालं. या आनंदावर कळस म्हणून आता आपण हा बंगला घेत आहोत... ए, घेउया ना हा बंगला... आई-बाबांनापण आवडेल अशा मोकळ्या जागेत रहायला...” लाडिकपणे विशालच्या खांद्यावर डोकं ठेवणाऱ्या तिला थोपटत विशाल म्हणाला, “हो गं नेहा... घेऊ आपण हा बंगला... मि. पवार, बंगला तर आवडला आहे आम्हाला. पण, या बंगल्याबद्दल बाहेर जे बोललं जातं ते जरा विचित्र आहे. तुम्हाला काही माहित आहे का याबद्दल...” मि. पवार म्हणाले, “तसं काही विशेष नाही साहेब. लोक काय आपलं उगाच काहीबाही सांगतात...” विशाल बधत नाही हे पाहून उसासा टाकत मि. पवार म्हणाले, “या बंगल्याचे मालक प्रभाकर दामले आणि त्यांच्या पत्नी वसुधा दामले यांचा मृत्यू या बंगल्यात झाला होता...

म्हणतात की प्रभाकर दामले यांच्या मुलाने विक्रांतने हा बंगला बांधला. तो खूप खुश होता स्वत:चं घर झाल्यावर. पुढे कृतिका नावाच्या मुलीशी त्याचं लग्नही झालं. घरात येणारी सून खूप चांगली होती. मनमिळाऊ होती. पण वसुधा दामलेंना कृतिका अजिबात आवडत नसे. त्या तिला नेहमी पाण्यात पहायच्या. रोजरोज होणाऱ्या कटकटी विक्रांतला सतावू लागल्या. त्यातच कृतिकाही या सगळ्याला कंटाळून निघून गेली. विक्रांतला मानसिक धक्का बसला. त्याच वेळी त्याला सिंगापूरला नोकरी लागली आणि या सगळ्यापासून दूर जायचं म्हणून विक्रांत तिथे निघून गेला. या घरात प्रभाकर दामले आणि वसुधा दामले दोघंच उरली. कालांतराने विक्रांतला खबर मिळाली की शॉक लागून वसुधा दामले आणि त्या धक्क्याने प्रभाकर दामले असे दोघंही मरण पावलेत. नाही म्हणायला त्यांनी एक गोष्टमात्र केली, की विल करून बंगला विक्रांतच्या नावे केला. आई-बाबा गेल्याचं दु:ख विक्रांतला होतंच शिवाय या घरात घडलेल्या वाईट गोष्टींचा अनुभवसुद्धा गाठीशी होता त्याच्या. शेवटी न राहून विक्रांतने बंगला विकायचं ठरवलं. विक्रांत निघून गेला आणि त्या दिवसापासून इथे विचित्र अघटित घटना घडू लागल्या...”

सर्व ऐकून विशाल म्हणाला, “फार वाईट झालं हे. सासू-सुनेमध्ये वाद होतात पण त्याची झळ मुलाला क्वचितच बसावी. आता आमच्याही घरात कधी कधी आई व नेहामध्ये वाद होतात. पण इतर वेळीमात्र दोघीही अगदी मायलेकीप्रमाणे असतात. दोघी एकमेकींचं कौतुक करता थकत नाहीत...” नेहा थोडीशी लाजत म्हणाली, “चल रे विशाल, काहीतरीच तुझं. आपण आत्ता या दामले नवरा-बायकोबद्दल बोलत आहोत बरं का... मला वाटतं कदाचित या दामले दाम्पत्याने त्या कृतिकाचा खूप छळ केला असणार म्हणून तर ती अशी विक्रांतला सोडून गेली. बिचारा विक्रांत...” “खोटं आहे हे सगळं... असं काहीच घडलं नाही...” विशाल, नेहा आणि मि. पवार बोलत असतानाच या दोन वाक्यांमागचे दोन आवाज पूर्ण घरात पसरले. अचानक आलेल्या आवाजाने गोंधळलेले तिघंही इकडे तिकडे पाहू लागले. इतक्यात वाऱ्याची झुळूक तिघांनाही स्पर्श करून लॉनच्या दिशेने गेली. लॉनचा दरवाजा उघडला गेला. त्या वाऱ्याच्या झुळुकीमुळे आणि दारामुळे भयभीत झालेल्या मि. पवारने, “बापरे... परत नाही परत नाही... वाचवा...” असं म्हणत थेट बाहेरचा रस्ता धरला...

विशाल व नेहा एकमेकांचे हात धरून तिथेच उभे होते. मि. पवारांना याचा अनुभव असला तरी या दोघांना हे नवीन होतं. त्यामुळे काय करावं हे त्यांना सुचत नव्हतं. धीर करून विशाल व नेहा लॉनकडे चालू लागले. जसजसे ते दाराजवळ आले तसतसा झोपाळा हलू लागला. दोघंही झोपाळ्याच्या जवळ पोहोचले आणि झोपाळा एकदम स्थिरावला. नेहा प्रचंड घाबरली होती. तिला धीर देत विशाल म्हणाला, “कोण आहे इथे... हे बघा असे छुपे खेळ करून आम्हाला घाबरवू नका...” काही क्षण गेल्यावर लॉनच्या गवतावर पावलांचा आवाज आला. वाऱ्याची एक झुळूक दोघांनाही स्पर्श करून झोपाळ्याकडे गेली आणि एक प्रखर पांढऱ्याशुभ्र प्रकाशाने विशाल व नेहा, दोघांचेही डोळे दिपले. डोळे किलकिले करत दोघांनी पाहिलं तर झोपाळ्यावर बसलेल्या दोन आकृत्या त्यांना जाणवल्या. हळू हळू प्रकाश कमी होत नाहीसा झाला. विशाल व नेहाने पाहिलं तर झोपाळ्यावर एक वृद्ध जोडपं बसलं होतं. नेहाचे डोळे विस्फारले. थरथरत्या हाताने त्यांच्याकडे बोट दाखवत ती कशीबशी म्हणाली, “त...तुम्ही कोण... आ...णि इ...थे कसे काय...” ते वृद्ध जोडपं हसलं. त्यातला पुरुष म्हणाला, “घाबरू नका. आम्ही तुम्हाला काहीही करणार नाही. हा बंगला विकत घेण्यासाठी, भाड्याने घेण्यासाठी आजवर इथे अनेक जण आले पण तुम्ही पहिले आहात ज्यांच्या मनात आपल्या आई-वडिलांविषयी खरं प्रेम पाहिलं आम्ही. आम्हाला तुमची मदत हवी आहे...”

विशाल व नेहाने एकमेकांकडे पाहिलं. त्यांचे गोंधळलेले चेहरे पाहून तो माणूस म्हणाला, “मी प्रभाकर दामले. आणि ही माझी पत्नी वसुधा दामले. आमचा प्रेमविवाह. आम्ही दोघंही अनाथ असल्याने कदाचित तोच आमच्यातला दुवा ठरला असावा. आमची परिस्थिती बेताचीच होती. चाळीतल्या दीड खोल्यांमध्ये आमचा संसार सुरू झाला. नोकरीत माझी प्रगती होत गेली, पगारवाढ झाली आणि त्याचं फळ म्हणजे हा बंगला. या जागेवर आम्ही दोघांनी हा बंगला बांधला, सजवला. रोज संध्याकाळी मी कामावरून येत असे आणि त्यानंतर याच झोपाळ्यावर तासंतास बसून आम्ही गप्पा मारत असू. सगळं काही छान सुरू होतं. फक्त एकच उणीव होती आणि ती म्हणजे आम्हाला मूलबाळ नव्हतं. उपचार केले, नवस केले पण उपयोग झाला नाही. शेवटी अनाथ आश्रमातून आम्ही एक मुलगा दत्तक घेतला. मनात विचार होता, जे अनाथाचं आयुष्य आम्ही काढतो आहोत निदान एका मुलालातरी तसं काढायला लागू नये. ते मूल आमच्यासोबत नांदू लागलं. मोठ्या प्रेमाने हिने त्याचं नाव विक्रांत ठेवलं. त्याच्या खोड्यांनी, चाळ्यांनी घराला चैतन्य आलं. पण त्या नुसत्याच खोड्या नव्हत्या हे त्यावेळी कुठे ठाऊक होतं आम्हाला...” प्रभाकर दामले बोलता बोलता थबकले. त्यांना पुढे बोलवेना म्हणून वसुधा दामले पुढे बोलू लागल्या...

“विक्रांत जसा मोठा होत गेला तशा त्याच्या खोड्याही वाढत गेल्या. आसपासच्या मुलांशी मारामाऱ्या करणं, उद्धटपणे बोलणं, बेलगाम वागणं, सगळं वाढत गेलं. विक्रांतवरच्या अतिप्रेमापाई आम्ही या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. शेजारी सतत सांगत असत आणि आम्ही त्याचं बोलणं उडवून लावत असू. विक्रांत मोठा झाला. वाईट संगतीमुळे घरात चोरी करण्यापर्यंत मजल गेली त्याची. घरात येणाऱ्या त्याच्या मित्रमंडळींचा धांगडधिंगा, दारू पिऊन केलेले हिडीस नाच, सगळं आमच्या कल्पनेपलिकडचं होतं. यावर कहर म्हणून की काय... कृतिका नावाच्या त्या मुलीचा घरात शिरकाव झाला. न जाणो कुठल्या कुठल्या पुरुषासोबत तिने... हे तिने स्वत:च कबूल केलं. तिच्या अवास्तव मागण्या आणि जोडीला अपमान, शारीरिक छळ, सगळं जेव्हा सहन करण्यापलिकडे गेलं तेव्हा ह्यांनी विक्रांतला दुसरं घर पहायला सांगितलं आणि तसं नाही झालं तर पोलीस बोलावेन अशीही धमकी दिली. हे ऐकून कृतिका निघून गेली आणि विक्रांत हवालदिल झाला व घरातून निघून गेला. आम्हाला वाटलं सगळं संपलं, पण इथेच आम्ही चुकलो...”

वसुधा दामलेंची पाठ थोपटत प्रभाकर दामले बोलते झाले, “रस्त्याच्या कडेला एक फूलवाला बसतो. त्याच्याकडे चाफ्याची फुलं खूप छान मिळतात. या बंगल्यात आल्यापासून एक दिनक्रम मी ठरवला. रोज संध्याकाळी मी बाहेर फिरायला जात असे आणि येताना माझ्या वसूसाठी फुलं आणत असे. त्यादिवशीही मी तसाच बाहेर पडलो. वसू  सारखी सांगत होती नाक जाऊ पण मी ऐकलं नाही. फुलं घेऊन परत आलो तेव्हा बाहेरचा दरवाजा सताड उघडा होता. असं कधीच झालं नव्हतं आजवर. थोडा अचंभित होऊन मी आत गेलो तर, “ऊ...ऊ...” असा आवाज येत होता. मी पाहिलं तर लॉनकडचा दरवाजाही उघडा होता आणि आवाज तिथूनच येत होता. मी तिथे गेलो तर वसू झोपाळ्यावर बसली होती. तिला दोराने बांधून ठेवलं होतं. समोर कृतिका उभी होती आणि हातातल्या वायर्सने वसूला शॉक देत होती. मला ते दृश्य पाहवलं नाही. मी तिच्याकडे जाणार तोच विक्रांतने मला अडवलं. वसूच्या जिवाच्या बदल्यात विलच्या पेपर्सवर त्याला माझ्या सह्या हव्या होत्या. मी नकार दिला तर ती कृतिका माझ्या वसूला शॉक देऊ लागली. न राहून मी सह्या केल्या आणि वसूकडे धावलो. पण तोवर सगळं संपलं होतं...

शॉकच्या झटक्यांमुळे माझ्या वसूची प्राणज्योत मालवली होती. वसू मला सोडून गेली हा धक्का मला सहन झाला नाही आणि तिच्या शेजारी याच झोपाळ्यावर मीही प्राण सोडले. जगाला दाखवण्यासाठी की विक्रांत एक चांगला मुलगा आहे, त्याने आमचे अंत्यसंस्कार केले. पण तरीही आम्हाला मुक्ती नाही मिळाली. कारण आमचा जीव अडकलाय तो विक्रांतने पसरवलेल्या खोट्यात आणि आम्ही सह्या केलेल्या कागदपत्रात. विशाल, नेहा... मुक्ती मिळवण्यासाठी आम्हाला मदत करा...” काही काळ शांतता पसरली. नेहा म्हणाली, “काका, काकू... तुमची ही कहाणी ऐकून मला रडू आवरत नाही हो... कसं काय सहन केलंत तुम्ही इतकं सगळं...” विशाल काहीच बोलत नाही हे पाहून प्रभाकर दामले त्याच्या जवळ गेले. तेव्हा विशाल म्हणाला, “काका. तुमची ही कहाणी हृदय पिळवटून टाकणारी आहे पण बाहेरच्या जगात जी कहाणी पसरली आहे ती याहून पूर्ण निराळी आहे. अशा वेळी कोणावर विश्वास ठेवावा कोणावर नाही हाच मोठ्ठा पेच आहे माझ्या पुढे. दामले काका हसत म्हणाले, “बरोबर आहे तुमचं. एकाच घटनेच्या दोन कहाण्या तुम्ही ऐकल्यात. कोण खरं बोलतंय कोण खोटं हे समजणं कठीण आहे. विक्रांतला इथे आणा. सगळं आपोआप सिद्ध होईल...” विशालला दामले काकांचं म्हणणं पटलं. दुसऱ्याच दिवशी विशालने मि. पवारांना फोन केला...

“मि. पवार, आम्हाला बंगला आवडला आहे. तुम्ही सांगाल त्या किमतीला आम्ही तो विकत घ्यायला तयार आहोत पण अट एकच. हा सौदा आम्ही तुमच्याशी नाही तर खऱ्या मालकाशी करू इच्छितो आणि तेही याच बंगल्यात...” मि. पवारांनी काही दिवसांची मुदत मागून घेतली व फोन कट केला. आठवडा निघून गेला. एक दिवस मि. पवारांचा फोन आला. व्यवहाराचा दिवस ठरला. विशाल आणि नेहा ठरल्या दिवशी बंगल्यावर पोहोचले. बंगल्याच्या आवारात एक ऊंचपुरा धिप्पाड माणूस उभा होता. हाच होता विक्रांत. हस्तांदोलन झालं ओळखपाळख झाली आणि चौघं आत गेले. बंगल्याचे कागद वाचताना विशालने एकाएकी कृतिका आणि वसुधा दामलेंच्या वादाचा मुद्दा काढला. गडबडलेल्या विक्रांतचं ततपप झालं खरं पण त्याही वेळी त्याने प्रभाकर दामले व वसुधा दामले कसे वाईट होते तेच सांगायला सुरुवात केली. तो बोलत असताना अचानक घरातले दिवे चालू-बंद होऊ लागले. वाऱ्याची झुळूक विक्रांतच्या कानाला चाटून गेली. “नालायक माणसा...” हा आवाज बंगल्यात घुमू लागला. विक्रांत व मि. पवार सर्वत्र पाहू लागले. इतक्यात लॉनकडचा दरवाजा उघडला गेला आणि वाऱ्याच्या जोरदार झोतासरशी विक्रांत हवेत उडाला. नेहाच्या हातातले कागद एकाएकी जळू लागले...

हवेतल्या हवेत गटांगळ्या खात असताना, “वाचवा... वा...च... असे अस्पष्ट उद्गार त्याच्या तोंडून निघत होते. त्याच वेळी, “कबूल कर तुझं कृत्य नीच माणसा... कबूल कर...” हे आवाजही घुमत होते. घाबरलेला, हवेत गटांगळ्या खात असलेला विक्रांत कसाबसा बोलला, “म...मी कबूल करतो... मी...मी... खून केला माझ्या आई-वडिलांचा... आ...ता मला वाचवा...” अचानक वाऱ्याचा झोत विक्रांतला लॉनकडे घेऊन गेला. झोपाळ्यासमोर तो आपटला गेला. सर्वजण लॉनवर आले. “सगळं सत्य कबूल कर...” हा आवाज घुमताच विक्रांत बोलता झाला, “मी कबूल करतो की माझ्या आई-वडिलांचा खून मीच केला. वाईट संगतीमुळे मला ड्रग्सचं व्यसन लागलं. ते पूर्ण करायला हवा असलेला पैसा मी जबरदस्तीने आई-बाबांकडून मिळवू लागलो. एकदा माझे मित्र मला तिथे घेऊन गेले. तिथे कृतिकाची भेट झाली. मला ती त्याच वेळी आवडली होती. मी कृतीकाला या घरात घेऊन आलो. ती म्हातारीवर जाच करू लागली. माझा विचार होता की या जाचाला कंटाळून ते दोघं इथून निघून जातील पण झालं भलतंच...

म्हाताऱ्याने मला व कृतिकाला पोलीसांची धमकी दिली. हे ऐकून कृतिका त्याच क्षणी निघून गेली आणि मी एकटा पडलो. कृतिका इतकी मोहक आणि सुंदर होती की तिला गमावणं मला शक्य नव्हतं. कृतिकाला पैसा हवा होता आणि माझं लक्ष होतं या घरावर. मी एक प्लॅन बनवला. म्हातारा संध्याकाळचा बाहेर गेल्यावर कृतिकाला लॉनकडून मी आत शिरकाव करायला मदत केली. म्हातारी तिथेच झोपाळ्यावर बसली होती. मी म्हाताऱ्याच्या मागे गेलो. प्लॅन असा होता की कृतिकाने इलेक्ट्रिक शॉक देत म्हातारीची सही विलच्या पेपर्सवर घायची व मी म्हाताऱ्याला वाटेतच संपवायचं. मी त्याला संपवणार इतक्यात कृतिकाचा फोन आला. तिने सांगितलं की घर दोघांच्या नावावर आहे. तेव्हा प्लॅन बदलून मी म्हाताऱ्याला घरी जाऊ दिलं. म्हातारीची अवस्था त्याला बघवली नाही आणि त्याने सही करून टाकली. मी विचार केला दोघांनाही लांब कुठेतरी नेऊन तिथेच संपवून टाकावं पण ही म्हातारी... जरासे झटके सहन झाले नाहीत तिला आणि मरून गेली ती. हा म्हातारा पण तिथेच खपला. मी दोघांवर अंत्यसंस्कार केले आणि त्यांच्याबद्दल खोटंनाटं पसरवलं. वाटलं आता निवांतपणे हा बंगला विकेन आणि कृतिकासोबत जाईन निघून कुठेतरी पण...”

विक्रांत बोलत असतानाच पोलीस झाडामागून बाहेर आले. इंस्पेक्टर म्हणाले, “मी सर्व रेकॉर्ड केलं आहे. चला मि. विक्रांत, मोठ्या घरी जायला तयार व्हा. आणि हो त्या कृतिकालाही बोलवा. तुमच्या वाट्याला येणारी शिक्षा तिलाही भोगू दे की... धन्यवाद मि. विशाल. तुमच्यामुळे खरं बाहेर आलं. कधीकधी सत्यासाठी अशा अमानवी गोष्टींचा आधार घ्यावा लागतो माणसाला. पुन्हा एकदा धन्यवाद...” पोलीस विक्रांतला घेऊन गेले. पाठोपाठ मि. पवारपण निघून गेले. दामले पती-पत्नी विशाल व नेहासमोर आले. हात जोडून त्यांनी दोघांना धन्यवाद म्हटलं. विशाल म्हणाला, “काका, तुम्ही आता मुक्त झालात. हा वाडा मुक्त झाला. आता आम्ही निघतो...” काका लॉनच्या दिशेने जात नाहीसे झाले. नेहा, काकूजवळ जात, “काकू... नमस्कार करते...” असं म्हणत खाली वाकली. काकूने तिला आशीर्वाद दिला आणि लुप्त झाली. विशाल व नेहाने एकमेकांकडे पाहिलं. एकमेकांचे डोळे पुसत दोघं घराबाहेर पडली. नेहाने एकदा वळून पाहत घराला नमस्कार केला. सगळीकडे सामसूम झालं. फक्त येणाऱ्या पावसाचाच आवाज होता...

संध्याकाळ सरत चालली होती. वादळ-वाऱ्यासह कोसळणारा पाऊस वातावरणात एक भयावह गूढ निर्माण करू पाहत होता. बंगल्याच्या मागच्या अंगणातल्या झोपाळ्यावर दामले काका बसले होते. हळू हळू झोका घेत ते सारखे घराकडे पाहत होते. अचानक वीज चमकली आणि त्यांनी दचकून आभाळाकडे पाहिलं. म्हणाले, “काय विचित्र, भयाण वातावरण आहे... संध्याकाळ आहे की रात्र तेच समजत नाही...” “समजेल कसं हो... पावसामुळे अंधार किती पडलाय बघताय ना...” या आवाजाने आकाशाकडे लागलेली त्यांची नजर खाली आली. बाजूला दामले काकू उभ्या होत्या. चेहरा शांत आणि हसतमुख होता त्यांचा. त्या झोपाळ्यावर बसल्या. दामले काका म्हणाले, “अगं वसू होतीस कुठे तू... मी कधींचा आलोय...” पायाने झोपाळा ढकलत दामले आजी म्हणाल्या, “इथेच तर होते... जाणार कुठे... आता तुमच्याशिवाय मला आणि माझ्याशिवाय तुम्हाला दुसरं कोणी आहे का... हे वातावरण काहीही म्हणो... पण आपली ही साथ अशीच राहील. याच झोपाळ्यावर. नाही का...” आणि झोपाळा हळू हळू झोके घेऊ लागला...

समाप्त.