रात्र सुरू होऊन तासभर झाला असेल, रस्त्यालगतच्या मैदानात छान रोशणाई दिसत होती. मैदानाच्या मधोमध उभारलेल्या मोठ्या तंबूत सर्कसचा खेळ रंगात आला होता. कुठे विदुषक टिवल्या-बावल्या करत होते, तर कुठे जादुगार करामती दाखवत होते. खाली लहान मुलांच्या कवायती सुरू होत्या तर त्यांच्याच डोक्यावर एक ट्रपीज कलाकार दोऱ्यांवरचे थरारक खेळ दाखवत होती...
अर्ध्या अधिक खुर्चा रिकाम्या होत्या. एका बाजूला, बाकी प्रेक्षकांपासून जरा लांब बसलेलं एक जोडपं प्रयोगाचा आनंद घेत होतं. त्यातली मुलगी म्हणाली, "कित्ती मजा येत आहे ना... इतकी वर्ष आपण वाट पाहिली आणि आज ती प्रतीक्षा फळाला आली. काय मजे मजेचे खेळ सुरू आहेत... पण काय रे... मागच्या वेळी पाहिली तशी जनावरं नाही दिसत..." तिचा हात हातात घेत तो म्हणाला, "अगं प्रज्ञा, या आधी आपण सर्कस पाहिल्याला किती काळ लोटला आहे... नियम बदलत असतात ना..." इतर प्रेक्षकांसोबत हे जोडपंही प्रयोग पाहत असतानाच, "फऽऽऽऽट..." असा आवाज आला...
या आवाजापाठोपाठच अजून दोन-तीन तसेच आवाज आले. सर्वांनी पाहिलं तर तंबूच्या वरच्या अंगाला आणि बाजूंना लावलेल्या हॅलोजन दिव्यांमध्ये स्पार्क झाले होते. ठिणग्या कापडावर पडताच त्याने पेट घेतला. एकच गोंधळ झाला. सगळेजण इकडे-तिकडे धाऊ लागले. विदुषक व इतर कलाकार बाहेर जाणाऱ्या मार्गावरच उभे असल्याने लगेच बचावले. मंचाच्या मधोमध असलेली लहान मुलं आणि दोऱ्यांचे खेळ करणारी ती कलाकार मात्र आगीच्या वर्तुळात सापडले. ती ट्रपीज कलाकार खाली येणासाठी धडपडत होती पण संपूर्ण दोराने पेट घेतला होता...
प्रेक्षकात बसलेल्या त्या जोडप्याने एकमेकांकडे पाहिलं. प्रज्ञा म्हणाली, "दिनेश, अरे ती मुलं बघ आगीत सापडली आहेत आणि ती बिचारी कलाकार वरच अडकली आहे. ती दोराची शिडी तर जळते आहे. ती मुलगी पडली तर..." दिनेशने जरा विचार केला आणि म्हणाला, "सगळे बाहेर पळाले आहेत. ती मुलं आणि ती कलाकार मुलगीच राहिले आहेत. आपण आधी त्या मुलांना वाचवायचं बघू..." दोघांनीही एकमेकांकडे पाहून माना हलवल्या. प्रज्ञा आगीत शिरली आणि दिनेश बाहेर उभा राहिला...
प्रज्ञाने आगीच्या मधोमध सापडलेल्या त्या मुलांना एकेक उचलत दिनेशकडे दिलं. तो एकेक मुलाला आगीतून मोकळं करत बाहेर पाठवू लागला. इतक्यात वर दोऱ्यांना लटकलेल्या त्या कलाकाराचा तोल गेला आणि ती सरळ खाली येऊ लागली. दिनेशने ते पाहिलं आणि लगेच त्या कलाकाराला झेलून जमिनीवर ठेवलं. त्या कलाकार मुलीने एकदा मागे पाहिलं आणि बाहेर निघून गेली....
सगळे सुखरूप आहेत याची खात्री करून ते जोडपं तंबूबाहेर येत आपल्या वाटेने चालू लागलं. त्याच्या खांद्यावर डोकं ठेवत प्रज्ञा म्हणाली, "चला, सगळे वाचले. ओझं दूर झाल्यासारखं वाटतंय मला..." तिला मिठीत घेत दिनेश म्हणाला, "हो ना... आता आपण घरी जाऊ शकतो. नाही का..." तिने त्याच्याकडे पाहून स्मित केलं आणि दोघंही आपल्या वाटेने निघून गेले...
तिकडे आग विजवायला फायर ब्रिगेड पोहोचल्या होत्या, बातमीसाठी पत्रकार पोहोचले होते. एकच गदारोळ माजला होता. त्यात एक पत्रकार मात्र भांबावल्यासारखा वाटत होता. एका सहपत्रकाराने त्याला कारण विचारलं तर तो म्हणाला, "अरे, बहुदा ती मुलं खूप घाबरली आहेत. काहीही बरळत आहेत. काय तर म्हणे आम्ही आगीत सापडलो होतो आणि अचानक हवेत उडू लागलो आणि आगीबाहेर आलो. जादू झाली जादू... असं कुठे असतं का..." "सर ती मुलं बहुतेक खरं सांगत होती..."
तो पत्रकार बोलतच होता की ती ट्रपीज कलाकार समोर येत म्हणाली, "सर, आग वाढली आणि सगळे पळाले. मला मात्र पळायला जागाच नव्हती. काय करावं सुचत नव्हतं. माझ्या पायांना व हातांना चटके बसू लागले आणि माझा तोल गेला. खाली पडताना मी डोळे बंद केले. मला वाटलं आता काही खरं नाही. पण जमिनीपासून पाच-सहा फुटांवर मी हवेतच थांबले. मला असं वाटलं की मला कोणीतरी झेललं. मी जमिनीवर पाय ठेवले व इकडे-तिकडे पाहिलं. पण मला कोणीच दिसलं नाही. मला वाटलं मला वाचवून ती व्यक्ती निघून गेली असेल, पण ही मुलंही तेच म्हणत आहेत..."
"कसं शक्य आहे...", "इंपॉसिबल..." मुलं आणि त्या मुलीसमोर पत्रकार एकमेकांशी बोलत होते. तेवढ्यात एक आजोबा तिथे येत म्हणाले, "हे शक्य आहे. माणूस एखादी गोष्ट अपूर्ण ठेऊन मरण पावला तर त्याचा आत्मा मुक्त होत नाही. त्याच गोष्टीभोवती भटकत राहतो. वीस वर्षांपूर्वी याच मैदानात एक सर्कस आली होती. असाच रात्री आठचा प्रयोग होता आणि याचप्रमाणे तंबूने पेट घेतला...
त्यावेळी प्रेक्षकांमधून मदतीला धाऊन येणारं, दिनेश व प्रज्ञा हे एकच जोडपं होतं. पण ते त्यांचं काम पूर्ण करू शकले नाहीत आणि दोन मुलं व एक ट्रापीज कलाकारासह दिनेश व प्रज्ञाही आगीत सापडून मरण पावले. आपण त्या कलाकारांना वाचवू शकलो नाही हेच, ओझं मनावर घेऊन दिनेश व प्रज्ञाने प्राण सोडला असावा. त्यावेळी खूप गवगवा झाला होता त्या बातमीचा. आज पुन्हा तसाच प्रसंग उभा राहिला आणि दिनेश व प्रज्ञाला मुक्त होण्याची संधी मिळाली..." मग ते आजोबा रस्त्याकडे पाहत नमस्कार करत म्हणाले, "धन्य दिनेश व प्रज्ञा... विधात्या, तुझी करणी अपार आहे रे... तूच करता तूच करविता..."
@ अनिकेत परशुराम आपटे.

No comments:
Post a Comment