"तो आला, की टाळ्यांचा कडकडाट व्हायचा. रस्ते ओस पडायचे. आणि तो बाद झाला, की स्मशान शांतता पसरायची. प्रेक्षक मैदान सोडून निघून जायचे किंवा टि.व्ही. बंद करायचे..." हे उद्गार ज्याच्याबद्दल आजही उच्चारले जातात, तो आहे सर्व क्रिकेटप्रेमींचा देव, सचिन रमेश तेंडुलकर...
२२.०४.१९९८ - कोकाकोला कप, शारजाह - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया...
हा त्या मालिकेतला शेवटचा साखळी सामना होता. ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यासाठी आधीच पात्र ठरली होती. चुरस होती, ती भारत आणि न्यूझीलंड संघात. हा सामना जरा भारताने जिंकला असता, तर तो सरळ अंतिम सामान्यासाठी पात्र ठरला असता. पण भारत जर हरला असता, तर मात्र नेट रनरेटच्या आधारे निर्णय लागणार होता. तसं पहायला गेलं, तर भारतीय संघासाठी हा तथाकथित उपांत्य सामनाच होता...
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत २८४ धावांचा डोंगर उभा केला. सामन्यादर्म्यान आलेल्या वादळामुळे षटकं कमी होऊन ४६ षटकंच भारताच्या वाट्याला आली. भारताला हा सामना जिंकण्यासाठी २७६ धावा हव्या होत्या, तर अंतिम सामना गाठण्यासाठी २३७ धावांची गरज होती. एका बाजूने फलंदाजांची पतझड होत असताना सचिनने दुसरी बाजू नेटाने सांभाळली. काही काळ तर असं वाटलं, की सचिन हा सामना जिंकण्यासाठीच खेळतो आहे. १४३ धावांची वादळी खेळी करून सचिन विवादास्पदरित्या बाद झाला. भारत पराभूत झाला, पण सचिनच्या खेळीमुळे नेट रनरेटच्या आधारे भारत अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला. रवि शास्त्रीचे ते शब्द, "Sachin Tendulkar has taken India into the finals single-handedly..." आजही सर्वांच्या लक्षात आहेत...
१३.११.१९९८ - कोकाकोला चँपियन्स ट्रॉफी, शारजाह - भारत विरुद्ध झिम्बाब्वे...
हा, त्या त्रिदेशीय मालिकेचा अंतिम सामना होता. याच्या आधीच्याच सामन्यात भारताने झिम्बाब्वेकडून पराभव पत्करला होता. अंतिम सामन्याची रंगीत तालीम म्हणून त्या सामन्याकडे पाहिलं जात होतं. या मालिकेत भारत निर्भेळ यश मिळवेल असंच सर्वांना वाटत होतं. हेन्री ओलोंगाच्या भेदक माऱ्यापुढे इतरांसह सचिनही टिकाव धरू शकला नाही आणि भारत पराभूत झाला. ओलोंगाच्या गोलंदाजीवर सचिनचा झेल ग्रँट फ्लॉव्हरने पकडला आणि मैदानावरचं वातावरण थोडं गरम झालं. बाद होण्याचा सल सचिनला विसरता आला नाही. पुढे येणारा अंतिम सामना एक वेगळाच सचिन घेऊन येणार होता...
अंतिम सामन्याचा दिवस उजाडला. झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करत १९६ धावा जमवल्या. असं ऐकीवात होतं, की त्या सामन्याचा निकाल सामन्याआधीच भारताविरुद्ध ठरवला गेला होता. ही बाब जेव्हा सचिनला समजली, तेव्हा त्याने सौरव गांगुलीला हाताशी धरत या कटावर कुरघोडी करण्याचा मनसूबा बनवला. आधीच्या सामन्यात बाद झाल्याची जखम सचिनच्या मनात होतीच. त्या जखमेचाच वचपा काढण्याच्या इराद्याने सचिन मैदानात उतरला. एका बाजूने सौरव संयमी खेळी साकारत होता तर दुसऱ्या टोकावर सचिन चौफेर फटकेबाजी करत होता. सर्वच गोलंदाजांचा त्याने खरपूस समाचार घेतला. हेन्री ओलोंगा तर सचिनचं खास टार्गेट होता. आधीच्या सामन्यात सचिनला बाद करणारा हाच तो ओलोंगा होता का, असा प्रश्न पडावा अशा पद्धतीने सचिनने ओलोंगाची गोलंदाजी फोडून काढली आणि सौरवसह १९७ धावांची अभेद्य सलामी देत भारताला विजय मिळवून दिला...
२८.०१.१९९९ - पहिली कसोटी, चेन्नई - भारत विरुद्ध पाकिस्तान...
पाकिस्तानचा संघ भारतभूमीवर दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार होता. त्यातला हा पहिला कसोटी सामना होता. पहिल्या डावात पाकिस्तान संघाला २३८ धावात गारद करून भारताने वरचस्व मिळवलं होतं. पण पाकिस्तानच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजीवर अंकुश ठेवत फक्त २५४ धावाच करू दिल्या. १६ धावांच्या नाममात्र पिछाडीवर असलेल्या पाकिस्तानने दुसऱ्या डावात २८६ धावा जमवल्या आणि सामना जिंकण्यासाठी २७१ धावांचं आव्हान भारतासमोर आलं...
निव्वळ ८० धावात भारताचे पाच फलंदाज बाद झाल्यावर सचिनने सामन्याची सूत्र आपल्या हाती घेतली आणि नयन मोंगियासह धावा वाढवत गेला. त्याच वेळी त्याच्या पाठीच्या दुखण्याने डोकं वर काढलं. प्रत्येक चेंडू खेळताना सचिनला वेदना जाणवत होत्या. एखादा तगडा प्रहार केल्यावर सचिन विव्हळायचा, पण त्या दुखण्याकडे त्याचं लक्षच नव्हतं. समोर ध्येय होतं, ते सामना जिंकण्याचं. सचिन हा सामना घेऊन जातो की काय अशी भिती पाकिस्तान संघाला वाटत असतानाच १३६ धावांची जिगरबाज खेळी करून सचिन बाद झाला आणि पाकिस्तानने तो सामना केवळ १२ धावांनी जिंकला. वसिम अक्रम आजही सांगतो, "If Sachin would have stayed for two more overs, India would have taken the game..."
आज २४ एप्रिल. मास्टर ब्लास्टर सचिनचा आज वाढदिवस. रेकॉर्ड मास्टर, भारत रत्न सचिन रमेश तेंडुलकरला वाढदिवसाच्या अर्धशतकाच्या कोटी कोटी शुभेच्छा...
सचिन सचिन...
सचिन सचिन...
सचिन सचिन...
@ अनिकेत परशुराम आपटे.

.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment