एखादी गोष्ट एकदम उच्च शिखरावर असते. त्या गोष्टीला भरपूर मान, प्रसिद्धी मिळत असतानाच असं काही होतं, की त्या गोष्टीची अधोगती सुरू होते. क्रिकेट विश्वातल्या एका संघाबद्दल असंच काहीसं घडलं...
१९७५, १९७९चा विश्व-विजेता वेस्ट इंडीजचा संघ आठवतो का... भल्याभल्या गोलंदाजांना पाणी पाजणारे गॉर्डन ग्रिनीज, क्लाईव्ह लॉईड, विव्ह रिचर्ड्ससारखे फलंदाज आणि दिग्गज फलंदाजांच्या मनात धडकी भरवणारे एँडी रॉबर्ट्स, जएल गारनर, मल्कम मार्शल, मायकल होल्डिंग असे गोलंदाज संघात असायचे. त्या वेस्ट इंडीज संघाशी कोणाची तुलानाच शक्य नव्हती...
नंतर आलेल्या ब्रायन लारा, रिची रिचर्डसन, शिवनारायण चंद्रपॉल, ख्रिस गेल, कर्टली एॅम्ब्रोज, कॉर्टनी वॉल्श, कॅमेकॉन कफी, अशा क्रिकेटपटूंनी आधीच्या पीढीचा वारसा बऱ्यापैकी चालवला खरा. पण कायरन पोलार्ड, शे होप, शिमरन हिटमायर, ड्वेन ब्राव्हो, जेसन होल्डर, रवि रामपॉल, अल्जारी जोसेफ यांना तो लौकिक जपता आला नाही...
एकेकाळी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारख्या दिग्गजांना त्यांच्याच देशात हरवणारा आणि चार विश्वचषकांवर स्वत:चं नाव कोरलेला वेस्ट इंडीज क्रिकेट संघ, २०१९ पासून पात्रता फेरीत दिसू लागला. २०१९साली मुख्य फेरी वेस्ट इंडीजने धडक मारली पण यंदा मात्र पात्रता फेरीतूनच संघ बाद होतो की काय असं चित्र दिसू लागलंय...
देशाची आर्थिक परिस्थिती, निवड समिती, खेळाडूंची आपापसातली भांडणं, खेळाडूंचं खेळाकडे पाहण्याचं धोरण, या सगळ्याचा एकत्रित परिणाम वेस्ट इंडियन क्रिकेटवर झाला आणि तिथला खेळ रसातळाला जाण्याइतपत खालावला. भविष्यकाळात परिस्थिती बदलावी आणि वेस्ट इंडियन क्रिकेट पुन्हा बहरावं हीच इच्छा...
@ अनिकेत परशुराम आपटे.

No comments:
Post a Comment