Tuesday, July 4, 2023

पॉयझन - पहिला भाग...


सकाळचे आठ वाजले होते. वाटेत भेटणाऱ्या ओळखीच्या माणसांशी बोलत अरविंद बँकेत पोहोचला. ए.टी.एम.च्या समोर खुर्चीवर एक गणवेषधारी गार्ड बसला होता. गेटमधून आत येत अरविंद म्हणाला
, "काय काशिराम दादा, आजपासून सकाळची शिफ्ट वाटतं..." अरविंदला पाहून काशिराम उठला आणि सलाम करत म्हणाला, "गुड मार्निंग सर, हो फर्स्ट शिफ्ट... साएब, यादवने डूटी दिली नाय माला. मी आलो तवापासनं यादव कुठे दिसला नाय माला. त्याचं सामान ए.टी.एम.च्या आतमंदीच हाय. कुटं गेला कोन जाने..." हे ऐकत अरविंद म्हणाला, "गेला असेल हो इथेच कुठेतरी. तुम्ही शटर उघडा, मी दाराचं कुलूप उघडतो. मग पाहू आपण..." काशिरामने शटर उघडलं आणि काचेचं दार ढकलून दोघं आत गेले. अरविंद पुढे जाऊ लागला तसा काशिराम म्हणाला, "साएब जरा जाऊन येतो..." अरविंद सिस्टीमकडे वळलाच होता, की त्याला काशिरामच्या ओरडण्याचा आवाज आला. अरविंद धावतच बाहेर आला. आवाजाच्या दिशेने जात तो बँकेच्या मागे पोहोचला आणि समोरचं दृश्य पाहून अवाक झाला. तिथे एक वॉशरूम होतं आणि बाजूलाच जमिनीवर एक गणवेषधारी गार्ड मरून पडला होता... 

पोलिसांना पाचारण केलं गेलं. सब इंस्पेक्टर उमा आसपासची जागा न्याहाळत होती. इंस्पेक्टर आनंद मेलेल्या गार्डची बॅग तपासत होता. सब इंस्पेक्टर सचिन बॉडी तपासत होता आणि सीनियर इंस्पेक्टर प्रधान काशिराम व अरविंदशी बोलत होते, "कोणी फोन केला होता..." अरविंदने हात वर करताच प्रधान म्हणाले, "बोला काय झालं इथे..." अरविंद पुढे होत म्हणाला, "सर, मी अरविंद. या बँकेत ऑफिसर आहे. आत्ता थोड्या वेळापूर्वी इथे आलो तर काशिराम दादा खुर्चीवर बसले होते. आमचे रात्रीचे गार्ड, यादवजी कुठे दिसत नव्हते. आम्हाला वाटलं ड्यूटी संपली म्हणून ते निघून गेले असावेत पण त्याचं सामान इथेच होतं. बँकेच्या या भागात गार्ड्ससाठी वॉशरूम आहे. काशिराम दादा इथे आले तेव्हा समजलं..." प्रधानांनी अरविंदला विचारलं, "किती गार्ड आहेत इथे..." तेव्हा अरविंद म्हणाला, "सर, इथे तीन गार्ड आहेत, जे आलटून पालटून आठ तासांची ड्यूटी करतात. दिलीप, यादवजी आणि काशिराम दादा..."

काशिरामकडे वळत प्रधान म्हणाले, "तर तुम्ही काशिराम, सांगा काय झालं..." काशिरामने एकदा अरविंदकडे पाहिलं आणि म्हणाला, "साएब, या वीकमधे माझी डूटी सकालची लागली हाय. सकाली सात ते दुपारी तीन आसा माझा टाईम हाय. माला थोडा लेट होनार होता म्हनून मी यादवला फोन केला. पन त्याने फोन नाय उचलला. मग मी त्याला मेसेज केला. इथे आलो तर यादव नवता. पन तेचं सामान ए.टी.एम.मदीच होतं. मग मी खुर्चीवर बसून ऱ्हायलो. अरविंद साएब आले. मी यादव नसल्याचं सांगितलं. आमाला वाटलं गेला आसल इतंच. मग मी हितं आलो आनी हे पायलं..." हनवटी चोळत प्रधान म्हणाले, "तुम्ही इथे आलात तेव्हा या यादवचं प्रेत दिसलं. याचा अर्थ जे काही घडलं, ते यादवची शिफ्ट संपण्यापूर्वी घडलं तर... सचिन, उमा, आनंद..."

बॉडीकडे बोट दाखवत सचिन म्हणाला, "सर, साधारण ३५ ते ४० वय असेल याचं. बॉडीवर कुठेही कसल्याही जख्मा नाहीत. कपाळाच्या बाजूला एखादी पिन टोचावी इतकी छोटीशी खूण आहे. मृत्यू कशामुळे झाला ते नाही समजत नाही..." आनंद बॅग समोर धरत म्हणाला, "सर, या बॅगेत एक शर्ट-पँट, पाण्याची अर्धवट भरलेली बाटली, हे आय.डी. कार्ड, खाण्याचे डबे आणि मोबाईलचा चार्जर आहे. या आय.डी. कार्डवरून याचं नाव देवचरण यादव असल्याचं समजतं. पत्ता यू.पी.चा आहे. या शिवाय या बॅगेत अजून काहीच खास नाही..." आनंद, सचिन आणि प्रधान बोलत असतानाच, उमा समोर येत म्हणाली, "सर, आसपासचा परिसर मी न्याहाळला. कुठल्याही खुणा किंवा फुटमार्क्स नाहीत. वॉशरूमच्या दारावरून आणि लाईटच्या बटणावरून मी फिंगरप्रिंट्स घेतले आहेत..." सचिनकडे पाहत प्रधान म्हणाले, "सचिन, तू ही बॉडी आणि फिंगरप्रिंट घेऊन डॉककडे जा. आम्ही मागून येतोच..."

सचिन बॉडीला घेऊन रवाना झाल्यावर प्रधान, आनंद आणि उमा बँकेकडे वळले. तोवर बँकेचे इतर कर्मचारी येऊन पोहोचले होते. अरविंदने त्यांना सर्व सांगितल्यामुळे सगळे थोडे बावरले होते. सर्वांकडे पाहत प्रधान म्हणाले, "मला वाटतं इथे काय घडलं ते मि. अरविंदने तुम्हाला सांगितलेलं आहे. हे बघा घाबरू नका. आम्ही ब्रांच बंद करत नाही आहोत. आमचे दोन कॉन्स्टेबल इथे असतील. ते कोणालाही स्पॉटजवळ जाऊ देणार नाहीत. तुमच्या ब्रांचच्या बाहेर, पुढे आणि मागे असे चार कॅमेरे आहेत. त्यांचं गेल्या चोवीस तासांचं फुटेज मला या पेन ड्राईव्हवर कॉपी करून द्या आणि या यादवचा मुंबईतला पत्ताही द्या..." मॅनेजरने पेन ड्राईव्हवर फुटेज कॉपी करून दिलं. ड्राईव्ह घेऊन आनंद, उमा आणि प्रधान लॅबकडे निघाले. उमा म्हणाली, "सर, हा मृत्यू नैसर्गिक असू शकतो का..." उमाकडे पाहत प्रधान म्हणाले, "असूही शकेल. पोस्ट मॉर्टममधून समजेलच. आता आपल्याला बोलावलंच आहे, तर सर्व बाजूंनी तपास करू..." बोलता बोलता गाडी लॅबच्या बिल्डिंगच्या कंपाऊंडमध्ये शिरली...

प्रधान, उमा आणि आनंद लॅबमध्ये शिरले तेव्हा डॉ. गोखले बॉडी तपासत होते आणि सचिन हाताची घडी घालून बाजूला उभा होता. सचिनजवळ जात प्रधान म्हणाले, "सचिन, डॉक काही बोलले का..." नकारार्थी मान हलवत सचिन म्हणाला, "नाही सर. डॉक्टर साहेबांनी अजून काहीच सांगितलं नाही. पण त्यांनी बॉडीमधून काहीतरी काढलं..." प्रधानांजवळ येत डॉ. गोखले म्हणाले, "प्रधान साहेब, याचा मृत्यू विषामुळे झाला आहे. पोटॅशियम सायनाईड. याच्या ओठांवर आणि नखांवरच्या निळ्या रंगाने तुम्ही हे ताडलंच असेल. याला मरून ७-८ तास झालेत, कारण रायगर मॉर्टीस सेट झालंय. याने खाल्लेल्या अन्नात विष नाही. तर विष त्याच्या शरीरात बाहेरून इन्जेक्ट झालं आहे. या मी दाखवतो..."

डॉ. गोखले सर्वांना बॉडीजवळ घेऊन गेले. बॉडीच्या कानाच्या वरच्या बाजूला बोट दाखवत ते म्हणाले, "कपाळाच्या बाजूला ही छोटी जखम तुम्ही पाहिलीच असेल... ही जखम एका पिनमुळे झाली आहे. ही ती पिन. आणि प्रधानसाहेब, या पिनवर लागलं होतं पोटॅशियम सायनाईड. ही पिन इतक्या फोर्सने मारली गेली, की ती पूर्णच्या पूर्ण याच्या शरीराच्या आत घुसली. इतका फोर्स कसा काय मिळाला त्या पिनला..." प्रधानांकडे पाहत आनंद म्हणाला, "सर, एखादा ट्रिगर असल्याशिवाय इतका फोर्स येणं शक्य नाही..." प्रधान हनवटी चोळत होते. त्यांनी सचिनला पेन ड्राईव्ह देत बँकेतून आणलेलं फुटेज लावायला सांगितलं...

क्लिप सुरू झाली. हा व्हिडियो बँकेच्या समोरच्या गेटचा होता. यादव ए.टी.एम.च्या बाजूला एका खुर्चीत बसला होता. लोक येत होते, जात होते. थोड्या वेळाने यादव उठला आणि मागे जात कॅमेऱ्याच्या फोकसच्या बाहेर गेला. त्यावेळी व्हिडियोच्या कॅमेऱ्यात बारा वाजले होते. प्रधानांनी व्हिडियो फॉर्वर्ड करायला सांगितला. व्हिडियो सकाळपर्यंत फॉर्वर्ड होत गेला पण यादव परत नाही दिसला. बँकेच्या डाव्या बाजूच्या कॅमेऱ्यातही काहीच खास नव्हतं. तिसरा व्हिडियो लावला गेला. हा व्हिडियो ए.टी.एम.च्या मागे असलेल्या वॉशरूमच्या वरच्या बाजूला लावलेल्या कॅमेऱ्याचा होता. व्हिडियो सुरू झाला. बराच वेळ त्यात काहीच वेगळं नव्हतं. तोही व्हिडियो फॉर्वर्ड केला गेला. बाराच्या सुमारास यादव तिथे दिसला. त्याने वॉशरूमचं दार उघडलं. तो आत जाणार इतक्यात त्याने चेहेऱ्यावरून हात फिरवला. यादव आत जाऊन दोनच मिनिटात परत आला आणि एका क्षणात तो वॉशरूमच्या दारातच कोसळला...

व्हिडियो बंद झाला. आनंद म्हणाला, "यादव वॉशरूममध्ये जाऊन बाहेर आला आणि तिथेच कोसळला. पण आजूबाजूला तर कोणीच नव्हतं..." डॉक्टर गोखले म्हणाले, "पोटॅशियम सायनाईडने काही मिनिटातच माणसाचा मृत्यू होतो..." त्यांच्या बोलण्याला पुढे नेत उमा म्हणाली, "म्हणजे जे काही झालं, ते वॉशरूमच्या आत झालं की काय..." स्क्रीनकडे पाहत प्रधान म्हणाले, "मला तसं नाही वाटत. कारण आपण वॉशरूम नीट चेक केलं होतं. शिवाय दुसरं कोणी त्या भागात येऊन गेल्याच्या काहीच खुणा नाहीत... सचिन, व्हिडियो रिवाइंड करून झूम कर आणि स्लो मोशनमध्ये लाव..." व्हिडियो पुन्हा सुरू झाला. जिथे यादव वॉशरूमचं दार उघडतो तिथे येताच प्रधान व्हिडियोला पॉज करायला सांगितलं आणि थोडं रिवाईंड करून पुन्हा अल्ट्रा स्लो मोशनमध्ये सुरू करवला...

एका पॉईंटला स्क्रीनकडे बोट दाखवत प्रधानांनी सर्वांना विचारलं, "डिड यू सी दॅट..." स्क्रीनकडून नजर वळवत सचिन म्हणाला, "यादवने जेव्हा वॉशरूमचा दरवाजा उघडला, तेव्हा काहीतरी त्याच्या डोक्याच्या दिशेने येत आत शिरलं..." सचिनच्या पाठीवर थाप मारत प्रधान म्हणाले, "राईट... ही तीच विषारी पिन असणार... इतकी लहान असल्याने ती नॉर्मल स्पीडमध्ये दिसली नाही. पण ज्या फोर्सने ती पिन यादवच्या डोक्यात घुसली, तो फोर्स कुठून आला असणार..." सचिनने पॉज केलेला तो व्हिडियो स्क्रीनच्या डावीकडे सरकवला. स्क्रीनकडे बोट दाखवत सचिन म्हणाला, "सर, या इथे काहीतरी आहे. हेवत आहे. छोटे-छोटे चार पंखे दिसत आहेत सर..." स्क्रीनकडे बघत प्रधान म्हणाले, "पंखे, अधांतरी असणारी वस्तू... हेलिकॉप्टरसारखं काहीतरी वाटतंय..." प्रधानांच्या बोलण्याला पुढे नेत डॉक्टर गोखले म्हणाले, "हे हेलिकॉप्टर वाटत नाही. याला चार पंखे आहेत. हा ड्रोन असावा..."

डॉ. गोखलेंचं म्हणणं ऐकून सगळे विचारात पडले. प्रधानांकडे पाहत आनंद म्हणालाच, "ड्रोनने खून... काय पद्धती शोधून काढतात हे गुन्हेगार..." आनंदला दुजोरा देत उमा म्हणाली, "हो ना... म्हणजे जी गोष्ट व्हिडियो कव्हरेजसाठी सहसा वापरली जाते, ती गोष्ट खुनासाठीही उपयोगात आणली जाते... कमाल आहे..." आनंद आणि उमा बोलत असताना प्रधान विचारात पडलेले सचिनला दिसले. "कोणता विचार करताय सर..." सचिनच्या या प्रश्नावर हनवटी चोळत प्रधान म्हणाले, "जर व्हिडियोत दिसणाऱ्या ड्रोनसारख्या गॅझेटमधून ती विषारी पिन सोडली गेली, तर हे गॅझेट ऑपरेट कोण करतंय... आणि एका सिक्यूरिटी गार्डला मारून कोणाचा काय फायदा... उमा, रेकॉर्ड्स चेक कर. या यादवबद्दल काही माहिती आहे का बघ..."

उमाने सगळा डेटा चेक केला आणि म्हणाली, "सर, दहा वर्षांपूर्वीची यू.पी.ची एक केस आहे. देवचरण यादवला चोरीच्या आरोपात सहा महिन्यांची शिक्षा झाली होती. शिक्षा पूर्ण करून हा यादव मुंबईत आला आणि तेव्हापासून सिक्यूरिटी गार्ड म्हणून काम करतो..." हे ऐकून सर्व विचारात पडले. आनंद म्हणाला, "दहा वर्षांपूर्वी तो गुन्हा घडला होता, ज्याची शिक्षा यादवला मिळाली. या खुनामागे जर बदल्याची भावना असेल, तर मोटिव्ह यादवकडे असायला हवा..." आनंदला दुजोरा देत डॉ. गोखले म्हणाले, "आनंद इज राईट. ज्या पद्धतीने खून झाला, त्याचा त्या चोरीच्या केसशी काही संबंध आहे असं वाटत नाही..." यावर कोणी पुढे काही बोलणार इतक्यात प्रधानांचा मोबाईल वाजला. फोन घेत प्रधान म्हणाले, "सीनियर इंस्पेक्टर प्रधान हियर... काय... ओ.के. आम्ही पोहोचतो तिथे..." फोन खिशात ठेवत सर्वांकडे पाहत प्रधान म्हणाले, "इथून जवळच असलेल्या जंगलाच्या तोंडावर एका माणसाचा खून झाला आहे. उमा, यू बी हियर. यादवबद्दल आणखी काही माहिती मिळते का बघ. आणि डॉक, या यादवचं प्रेत अजून काही बोलतंय का बघा. सचिन, आनंद, लेट्स गो..."

थोड्याच वेळात गाडी घटनास्थळी पोहोचली. रस्त्याच्या कडेला घोळका जमलेला दिसत होता. त्यातून वाट काढत प्रधान, आनंद आणि सचिन घोळक्याच्या केंद्रस्थानी पोहोचले. तिथे दोन हवालदार उभे होते आणि एक माणूस उताणा पडला होता. प्रधानांना पाहताच त्या दोन्ही हवालदारांनी सेल्यूट केलं. मान हलवत प्रधान म्हणाले, "तुम्हीच कॉल केलात ना... बोला, काय झालं..." त्यातला एक म्हणाला, "सर, मी कॉन्स्टेबल शिंदे आणि हा दळवी. आम्ही या एरियात गस्त घालत होतो. थोड्या वेळापूर्वी हा माणूस त्याच्या लहान मुलाला घेऊन आमच्याकडे आला. या मुलाने हे प्रेत इथे पाहिलं असं हा मुलगा म्हणाला. आम्ही इथे आलो. प्रेत पाहून आम्ही आधी चौकीत कळवलं. आम्हाला वाटलं की हार्ट फेल वगैरे असावं पण बॉडी पाहिली तेव्हा कपाळाच्या बाजूला कानाच्या वर एक भोक दिसलं. याची नखं आणि ओठही निळे पडत चालले होते. तेव्हा आम्ही तुम्हाला बोलावण्याचं ठरवलं..."

दळवीची पाठ थोपटत प्रधान म्हणाले, "गुड वर्क. इथून पुढे ही केस आम्ही हाताळतो... आनंद, आजूबाजूचा परिसर..." पुढे येत आनंद म्हणाला, "सर, जंगलाच्या दिशेने जाणाऱ्या पाऊलवाटांवर ठसे आहेत, सायकल किंवा टू व्हीलरच्या चाकांचेही ठसे आहेत. पावलांचे काही ठसे या प्रेताच्या बुटांशी जुळतात. ठसे थोडे वेडेवाकडे आहेत, जणू हा माणूस पळत असावा असा अंदाज आहे. याशिवाय अजून काही संशयास्पद असावं असं नाही वाटत..." आनंदकडे पाहत मान हलवून बॉडीकडे पाहत प्रधान म्हणाले, "सचिन, बॉडी काय म्हणते..." यावर उत्तर देत सचिन म्हणाला, "या माणसाचा मृत्यूही तसाच झालाय सर, जसा यादव मेला. याच्या कपाळावरचं हे छिद्र, नखांचा आणि ओठांचा निळा रंगच हे सांगतोय. पण सर, याची दाढी-मिशी बनावट वाटते..." बोलता बोलता सचिनने दाढी आणि मिशी काढली. प्रेताचा चेहेरा पाहून प्रधान, आनंद आणि सचिन तिघंही अवाक झाले...

प्रधान म्हणाले, "हा तर युसूफ आहे. इंटरपोल वाँटेड लिस्टमध्ये याचं नाव आहे. हा इथे या जंगलात..." मग त्या लहान मुलाकडे वळत ते म्हणाले, "बाळा, अजिबात घाबरू नकोस. तू काय काय पाहिलंस ते नीट आठवून सांग..." त्या मुलाने त्याच्या वडिलांकडे पाहिलं. त्यांनी होकार देताच तो मुलगा म्हणाला, "मी पवन. इथून जवळच राहतो. रोज सायकलवरून याच रस्त्याने जातो. हा माणूस कधी कधी या जंगलात शिरताना मला दिसायचा. पण मी लक्ष दिलं नाही. आज हाच माणूस जंगलातून धावत येताना माझ्या सायकलवर आदळला. आम्ही दोघं खाली पडलो. मला थोडं लागलं पण याने माझ्याकडे पाहिलंही नाही. तसाच उठून पळत गेला. मी माझा माझा उठलो आणि सायकल धरून पुढे चालू लागलो. थोड्याच वेळात मला घुंघावण्याचा आवाज आला. मी वळून पाहिलं, तर चार पंखे असलेला एक ड्रोन जंगलाच्या दिशेने बाहेर आला. शाळेत आम्हाला ड्रोनबद्दल सांगितलं होतं म्हणून त्या ड्रोनला मी लगेच ओळखलं. तो ड्रोन त्या माणसाजवळ पोहोचला आणि एका झटक्यात तो माणूस खाली पडला. तो ड्रोन तसाच मागे जात जंगलाच्या दिशेने निघून गेला...

ड्रोन निघून गेल्यावर मी या माणसाजवळ गेलो. याचे डोळे सताड उघडे होते. मी लगेच बाबांना सांगितलं आणि त्यांनी पोलिस काकांना कळवलं..." पवनची पाठ थोपटत प्रधान म्हणाले, "शाब्बास पवन. तू हुशारही आहेस आणि शूरही. दळवी, शिंदे, ही गर्दी पांगवा आणि लवकरात लवकर ज्यादा कुमक बोलावून घ्या. चला, लागा कामाला... सचिन, आनंद, तुम्हाला काय वाटतं..." हे विचारल्यावर आनंद म्हणाला, "सर यादवचा खून आणि इथे सापडलेला मृतदेह या वेगवेगळ्या केसेस असाव्यात असं मला वाटत होतं. पण हा युसूफ आहे हे समजल्यावर आणि दोघांचे खून एकाच प्रकारे झालेत हे कळल्यावर हे दोन्ही खून एकाच केसचे भाग आहेत हे नक्की..." "आनंद सर इज राईट..." आनंदला दुजोरा देत सचिन म्हणाला, "युसूफचं इथे असणं आणि ड्रोनचा केलेला वापर, यावरून ही केस दिसते तितकी सोपी आणि हलकी नक्कीच नाही..." थोडा विचार करत प्रधानांनी मोबाईल काढून युसूफचा फोटो काढला. मग तो सेंड करून नंबर मिळवला, "उमा, इथेही तशाच प्रकारे खून झालाय जसा यादवचा झाला. मी तुला एक फोटो आणि आमचे coordinates पाठवले आहेत. पूर्ण तयारीनिशी ये. And make it fast. Combing operation ahead..."

थोड्याच वेळात उमा आणि पोलिसांची एक तुकडी तिथे येऊन पोहोचले. प्रधानांनी सगळे hearing devices तपासून एक स्वत:च्या कानाला लावला आणि बाकी आनंद, सचिन आणि उमाला दिले. मग आपल्या घड्याळाकडे पाहत म्हणाले, "Sync your watches. At the count of three, it should be exactly 2:35..." सर्वांनी आपापली घड्याळं सेट केली. मग उमा, सचिन व आनंदकडे पाहत प्रधान म्हणाले, "Uma, you be alert. We three will be implementing 100 left & right tactics. I will approach from the center... Lets move..." काही माणसांसह प्रधान ड्रोन गेला त्या रस्त्याने गेले. आनंदने एक मिनीट जाऊ दिलं आणि प्रधानांच्या १०० पावलं उजवीकडून काही माणसांसोबत तो आत शिरला. आनंदचा कित्ता गिरवत सचिनने अजून एका मिनिटानंतर प्रधानांच्या १०० पावलं डावीकडून उरलेल्या माणसांसोबत जंगलात शिरकाव केला...

एका विशिष्ट पद्धतीने सर्व आत शिरले. जंगल घनदाट होतं. पक्ष्यांच्या आणि पाला-पाचोळ्याच्या आवाजाखेरीज तिथे काहीच ऐकू येत नव्हतं. बरंच आत जाऊनही काही हाती लागत नव्हतं. झाडी असल्याने प्रकाशही कमी होत होता. सर्वजण थोडे अजून पुढे गेले आणि एका शिपायाने प्रधानांना इशाऱ्यानेच एका दिशेला पहायला सांगितलं. सर्वांनी तिथे पाहिलं, तर छपरासारखं काहीतरी दिसत होतं. कानाला स्पर्श करत प्रधान म्हणाले, "Team, two o'clock from me. Be careful..." प्रधानांची तुकडी हळूहळू पुढे गेली. थोडी झाडी बाजूला झाली आणि एक पडकं घर दिसू लागलं. प्रधानांच्या तुकडीतला एक शिपाई म्हणाला, "सर, या जंगलात हे घर थोडं विचित्र वाटतंय. प्रधानांच्या कानाला लावलेल्या माईकमुळे हे बोलणं सचिन आणि आनंदलाही ऐकू गेलं. त्यांच्या तुकड्याही आपापसात बोलू लागल्या. सचिनच्या तुकडीतला एक शिपाई म्हणाला, "सचिन सर, सरांना सांगा, की काही वर्षांपूर्वी या भागात एक फॉरेस्ट ऑफिसर होता. त्याचं ते घर होतं. पण त्याच्या बदली नंतर ते घर रिकामंच होतं..."

"कॉपी..." प्रधानांनी हे शब्द उच्चारले, एकवार आपलं पिस्तूल चेक केलं आणि ते सरसावत प्रधान हळूहळू पुढे जाऊ लागले. घराच्या जवळ पोहोचल्यावर त्यांनी त्यांच्यासोबत असलेल्या माणसांना तिथेच झाडीत थांबायला सांगितलं आणि ते स्वत: दबकत दबकत घराच्या मुख्य दाराच्या बाजूला येऊन उभे राहिले. तिकडे आनंद आणि सचिनही प्रधानांप्रमाणेच वागत घराच्या उजव्या आणि डाव्या बाजूला येऊन पोहोचले होते. तिघांनीही हाताच्या बोटांवर तीन, दोन एक अशी आकडेमोड केली आणि एकाच वेळी लाथा हाणून दारं आणि खिडक्यांमधून आत प्रवेश केला. आत बऱ्यापैकी अंधार होता. माणसाचा काही लवलेश नव्हता. इथे-तिथे पाहत आनंद म्हणाला, "सचिन, जरा लाईटचं स्विच कुठे दिसतंय का बघ..." सचिन पुढे जाणार इतक्यात प्रधान म्हणाले, "Don't touch the switches. Use your torches..." इतकं बोलून प्रधान दाराशी गेले आणि इशाऱ्याने बाहेर उभ्या सर्व शिपायांना घराला घेराव घालून आजू-बाजूचा परिसर तपासायला सांगितलं...

आनंद आणि सचिननेही जास्त काही न विचारता आपापले टॉर्चेस सुरू केले. आनंदला डाव्या हाताला थोडा उजेड दिसला म्हणून तो तिथे वळला. दाराच्या समोर जमिनीवर एक माणूस पडला होता. सचिनने जवळ जाऊन टॉर्च मारला तर तो एका माणसाचा मृतदेह होता. त्याने प्रधानांना बोलावलं. प्रधान पुढे जाणार इतक्यात त्यांच्या पायाला काहीतरी लागलं. प्रधानांनी टॉर्च पायाजवळ केला तर तिथे एक तुटलेला ड्रोन पडला होता. प्रधानांनी तो ड्रोन जवळून पाहिला आणि सचिनकडे गेले. जमिनीवर पडलेल्या माणसाचं तोंड खालच्या बाजूला होतं, डोळे सताड उघडे होते, हातात साखळदंड होते आणि पाठीवर जखम होती. सचिनने तो मृतदेह पलटवला. त्याच्या छातीवरही जखम होती आणि त्यामुळे झालेल्या रक्ताने त्याचा पूर्ण शर्ट माखला होता. जखमेकडे बोट दाखवत सचिन म्हणाला, "सर, याच्यावर गोळी झाडली गेली आहे. जखमेवरून तरी एकापेक्षा जास्त गोळ्या झाडल्या असाव्यात असं वाटतं..." बॉडीकडे पाहत प्रधान म्हणाले, "अजून एक खून... आज दिवसभरात याला धरून तीन खून..." प्रधानांचं वाक्य मध्येच तोडत आनंद म्हणाला, "तीन नाही सर, चार खून झालेत..."

आनंदचं बोलणं ऐकून प्रधान सचिनसह बाजूच्या खोलीत गेले. तिथेही एक माणूस जमिनीवर पडला होता. त्याचे हातही साखळदंडांनी जखडलेले होते आणि त्याच्याही छातीवर जखमा होत्या. मृतदेहाकडे बोट दाखवत आनंद म्हणाला, "सर, याचं नाव डॉ. अनसारी आहे. याला तीन गोळ्या मारल्या गेल्या आहेत. याच्याजवळ मोबाईल किंवा पाकीट काहीच नाही पण बाजूलाच हे आयडी कार्ड पडलेलं आहे. याला इथे आणलं तेव्हा बहुतेक याच्या गळ्यातून हे खेचून घेतलं असावं, कारण याच्या मानेवर तशा खुणा आहेत. सर हा अनसारी, नॅशनल रिसर्च लॅबमध्ये काम करतो..." आनंदचं हे वाक्य ऐकून प्रधान चमकलेच. मृतदेहाकडून आनंदकडे पाहत ते म्हणाले, "नॅशनल रिसर्च लॅब... ही तीच संस्था आहे ना जिथे वेगवेगळ्या विषांवर प्रयोग केले जातात... तिथला एक डॉक्टर इथे... आणि या अवस्थेत... स्ट्रेंज..." तिघंही बाहेर आले. सचिनकडे पाहत प्रधान म्हणाले, "सचिन, या मृतदेहाचं काय..." मृतदेहाकडे पाहत सचिन म्हणाला, "सर यालाही दोन गोळ्या मारल्या गेल्या आहेत. याच्याजवळही मोबाईल, पर्स काहीच नाही. फक्त काच तुटलेलं हे बंद घड्याळ याच्या मनगटाला आहे. याने मरण्याआधी स्वत:च्या रक्ताने हे लिहून ठेवलं इथे जमिनीवर..." सचिनने मृतदेहाच्या चेहेऱ्याजवळ टॉर्च मारला. तिथे लाल अक्षरात वेडी वाकडी अक्षरं लिहिली होती, "POISAN..."

प्रधानांनी आनंद आणि सचिनला बाहेर असलेल्या शिपायांपैकी काहींना बोलवायला सांगितलं. दोघांनी तसं करताच घराबाहेर असलेल्या शिपायांपैकी काही जण आत आले. प्रधानांनी त्यांना बाहेरच्या परिस्थितीबद्दल विचारलं. एक शिपाई म्हणाला, "सर, घराच्या मागच्या बाजूने एक पायवाट जंगलात गेली आहे. आम्ही त्याने जाऊन पाहिलं तर एका ठिकाणी झाडी, पानं चेपलेली दिसली आणि पुढे टायर मार्क पण सापडले..." शिपायाचं म्हणणं ऐकून प्रधान विचारात पडले. मग आनंदकडे पाहत म्हणाले, "टायर मार्क्स... म्हणजे इथे यायचे दोन रस्ते आहेत तर... ओके. सचिन आणि आनंद, तुम्ही दोघं माझ्या बरोबर चला. आणि तुम्ही सर्व, इथले फोटोग्राफ घ्या, इथे सापडलेल्या सगळ्या वस्तू आणि या बॉडीज घेऊन बाहेर जा. तिथून उमा पुढची प्रोसेस करेल. आणि हो... इथे कुठल्याही स्विचला हात नका लावू. टॉर्चेसचा वापर करा..." मग कानावर हात नेत प्रधान पुढे म्हणाले, "उमा, यू कॉपी दॅट... गुड. तुला माहित आहे पुढे काय करायचं. तू पुढे हो, आम्ही येतो..." कानावरचा हात काढत सर्वांकडे पाहत प्रधान म्हणाले, "लेट्स मूव्ह..."

घरात शिपाई फोटो काढण्यात, चीज वस्तू वेचण्यात गुंतले, तर प्रधान, आनंद आणि सचिन घराच्या मागच्या दिशेने गेले. घरापासून जवळ-जवळ दहा फुटांवर ती पायवाट होती. त्यावरून चालताना तिघंही आजूबाजूचं निरिक्षण करत होते. सचिन म्हणाला, "सर, फुटप्रिंट्स खूप आहेत इथे. तेही साध्या चप्पल किंवा बुटांचे नाहीत..." एका बाजूला बोट दाखवत आनंद म्हणाला, "सर, इथे ही झाडी दबली गेली आहेत. बहुतेक काही माणसं इथूनही गेलेली दिसतात. पुढे जाताना प्रधान वाटेच्या कडेला खाली वाकले आणि त्यांनी काहीतरी उचललं. ती पिस्तुलाची एक गोळी होती. ती गोळी समोर धरत प्रधान म्हणाले, "बंदुकीची गोळी... That means they are armed..." तिघांनीही आपापल्या बंदुका सरसावल्या आणि पुढे जाऊ लागले. थोडं पुढे गेल्यावर झाडी कमी झाली होती आणि एका झाडाला काळा रंग लागलेला दिसला. सचिनने जवळ जाऊन पाहिलं आणि म्हणाला, "सर, हा गाडीचा रंग दिसतोय. बहुतेक नुकतंच त्या गाडीला पेन्ट केलं गेलं आहे. हे इथे टायर मार्क पण दिसत आहेत..."

तिघंही टायर मार्कच्या दिशेने पुढे गेले. थोड्याच अंतरावर डांबरी रस्ता होता. माती लागलेले टायर मार्क एका दिशेला वळले होते. तिकडे पाहत आनंद म्हणाला, "सर हे मार्क तर मुंबईच्या दिशेने गेलेत..." आनंदचं म्हणणं पुढे नेत सचिन म्हणाला, "मुंबईच्या दिशेने गेलेले गुन्हेगार, यूसुफची बॉडी, तो विष पसरवणारा तुटलेला ड्रोन आणि घरातल्या दोन डेड बॉडीज... काहीतरी मोठा कट रचला जातोय..." इतक्यात प्रधानांचा फोन वाजला, "हां बोल उमा... काय... ओके. तू हो पुढे. आम्हीही निघतो इथून. डॉककडे भेटू..." फोन ठेवत प्रधान म्हणाले, "त्या घरात बाहेरच्या खोलीत असलेल्या माणसाला उमाने त्याच्या सोशल मिडिया साईटवरून ओळखलं आहे. त्याचं नाव जेम्स रिकार्डो आणि तो United Robotonics या कंपनीत technical engineer म्हणून काम करायचा..." आनंद म्हणाला, "United Robotonics... सर ही कंपनी तर सिनेमांसाठी लागणारी वेगवेगळी यंत्र बनवते... थोडा विचार करून प्रधान म्हणाले, "आनंद, तू त्या काळ्या गाडीच्या मागावर जा, आणि सचिन, तू या जेम्सबद्दल अजून काही माहिती मिळते का ते बघ. उमा डॉककडे निघाली आहे. मीही तिथे जातो..."

प्रधान वळलेच होते, की सचिन म्हणाला, "सर, जायच्या आधी एक शंका विचारायची होती..." प्रधानांनी सचिनकडे पाहताच सचिन आणि आनंदने एकमेकांकडे पाहिलं. आनंद म्हणाला, "सर, त्या घरात तुम्ही कुठल्याही स्विचला हात लावायचा नाही असं का सांगितलंत..." प्रधानांनी दोघांकडे काही क्षण पाहिलं आणि म्हणाले, "कम विथ मी..." तिघंही घराजवळ पोहोचल्यावर प्रधानांनी तिथे उरलेल्या शिपायांपैकी एकाला कुठल्यातरी एका स्विचला तार बांधून ती तार बाहेर आणायला सांगितलं. शिपायाने तारेचं एक टोक स्विचला अडकवलं आणि दुसरं टोक बाहेर घेऊन आला. सर्वजण घराबाहेर आल्यावर प्रधानांनी घरात कोणीही नाही याची खात्री करून घेतली. मग सर्वांना जरा मागे हटायला सांगितलं आणि स्वत: त्यांच्या जवळ येऊन उभे राहिले. प्रधानांनी तार खेचली. तिथे घरात स्विच ऑन झालं. काही क्षणातच, "चचर......." अशा आवाजापाठोपाठ एक स्फोट झाला आणि ते स्विच घराच्या ज्या भागात होतं तो भाग हवेत उडून पुन्हा खाली आला. पुन्हा स्फोट झाले आणि क्षणार्धात त्या घराच्या ठिकऱ्या उडाल्या. प्रधान म्हणाले, "I knew it... बराच काळ बंद असलेल्या घरात वीज असणं कठिण होतं. ते जे कोणी आहेत, त्यांनी यूसुफला मारलं तेव्हाच पोलिस या घरापर्यंतही पोहोचतील, हे त्यांना समजलं होतं... We should not waste time now... Lets move..."

तिघंही तीन दिशांना गेले. प्रधान थोड्याच वेळात डॉ. गोखलेंच्या लॅबमध्ये पोहोचले. उमा तिथे उभीच होती. तिच्या डोक्यावर हात ठेवत प्रधान म्हणाले, "गुड उमा. जेम्सबद्दल लगेच माहिती काढलीस तू. मी सचिनला त्याचाच तपास करायला पाठवलं आहे. आणि आनंद गेलाय जंगलातून निघालेल्या त्या गाडीच्या मागावर..." गाडीचा विषय येताच उमा म्हणाली, "पण सर, ती गाडी शोधणार कशी... नंबरही नाही आपल्याकडे..." प्रधान हसले आणि म्हणाले, "आनंद हुशार आहे. तो करेल काहीतरी खटपट. एनीवेज, डॉक... तुमचा तपास काय म्हणतोय..." प्रधानांकडे येत डॉ. गोखले म्हणाले, "प्रधानसाहेब, हल्ली एकाच वेळी चार-पाच बॉडीज पाठवता तुम्ही. या गुन्हेगारांना बहुतेक एका खुनावर समाधान मानता येत नाही असं दिसतंय. असो... यादव आणि यूसुफ ज्या विषारी पिनमुळे मेले, ती पिन याच ड्रोनमधून सोडली गेली. दिसायला हा एक साधा ड्रोन असला, तरी यात पिन बसवायला एक खाच आणि त्यासोबत एक स्प्रिंग आहे. बनवणाऱ्याचं कसब जबरदस्त आहे...

दुसरीकडे हा जेम्स आणि डॉ. अन्सारी बंदुकीच्या गोळ्या लागून मारले गेलेत. 9 MM caliberच्या या गोळ्या खूप जवळून चालवल्या गेल्यात. कारण शरीराच्या आर-पार जात गोळ्या भिंतीत घुसल्या..." जंगलात सापडलेली गोळी काढून डॉ. गोखलेंच्या हातावर ठेवत प्रधान म्हणाले, "डॉक, चेक धिस ऑल्सो..." डॉ. गोखले गोळी तपासू लागले तेव्हा प्रधानांचा फोन वाजला, "येस सचिन... अच्छा... ओके. यू कम टू द लॅब नाव..." फोन ठेऊन उमाकडे पाहत प्रधान म्हणाले, "या जेम्सबद्दल सचिनने माहिती मिळवली आहे. हा त्याच्या कामात निपूण होता. dronesच्या assembling departmentचा हा हेड होता. दोन महिन्यांपूर्वी ऑफिसच्या समोरून हा गायब झाला. तिथे असलेला एक पानवाला म्हणाला की जेम्स बिल्डिंगमधून बाहेर पडला आणि एक गाडी त्याच्यासमोर थांबली. जेम्स गाडीकडे वाकला. मग त्याला एकदम धक्का बसला आणि जेम्स त्याच गाडीत बसून निघून गेला. Surprising गोष्ट अशी, की ज्या दिवशी जेम्स किडनॅप झाला, त्याच दिवशी डॉ. अन्सारीही गायब झाले..."

हनवटी चाळत उमाकडे पाहून प्रधान म्हणाले, "हे दोघंही एकाच दिवशी गायब झाले, आणि या दोघांचेही मृतदेह एकाच दिवशी सापडले.." प्रधानांना दुजोरा देत उमा म्हणाली, "हो ना, आणि तेही एकाच ठिकाणी... स्ट्रेंज..." प्रधान काही बोलणार इतक्यात त्यांचा फोन वाजला, "येस आनंद... अच्छा... ओके, तूही ये लॅबवर लवकर..." फोन ठेवत प्रधान म्हणाले, "जंगलातून निघालेली ती काळी गाडी एका घळीत सापडली आनंदला. नंबर प्लेट नव्हती तिला. गाडीच्या डिक्कीत एक प्रेत पण आहे. जंगलाच्या तोंडावरच शहराबाहेर एक मेकॅनिक आहे. त्याने ती गाडी ओळखली. मूळची आकाशी निळ्या रंगाची ती गाडी, दोन दिवसांपूर्वी रंग बदलण्यासाठी त्याच्याकडे आली होती. त्या वेळी हा मेकॅनिक बाहेर गेला होता आणि त्याचा एक माणूस तिथे होता. त्या गाडीत दोन-तीन बुरखाधारी होते म्हणे आणि बंदुकीच्या धाकावर त्यांनी गाडीचा रंग बदलून घेतला. मग त्या माणसाला तिथेच मारलं आणि डिक्कीत घालून ते बुरखाधारी जंगलाच्या दिशेने निघून गेले. या मेकॅनिकने हे सगळं लपून पाहिलं आणि त्याचा इतका धसका घेतला की गेले दोन दिवस तो तिथेच झाडीत लपून राहिला. आनंद त्या गाडीला आणि त्या मेकॅनिकला घेऊन येतोय..."

प्रधानांचं बोलणं ऐकून उमा म्हणाली, "आकाशी निळा... सर, तो जेम्स ज्या गाडीत बसून गेला, तीसुद्धा याच रंगाची गाडी होती..." प्रधान पुन्हा विचार करू लागले. तेवढ्यात डॉ. गोखले म्हणाले, "प्रधानसाहेब, तुम्ही दिलेली ही गोळीसुद्धा तीच आहे. 9 MM caliber. म्हणजे ही गोळी त्याच गुन्हेगारांची असू शकते ज्यांनी या जेम्स आणि डॉ. अन्सारीला मारलं..." हनवटी चोळत प्रधान म्हणाले, "या सगळ्या गोष्टी एकमेकांशी जुळत आहेत. उमा, रेकॉर्ड चेक कर. दोन महिन्यांपूर्वी आकाशी निळ्या रंगाच्या गाडीच्या चोरीचा काही रिपोर्ट आहे का बघ..." उमाने सगळा डेटा चेक केला आणि म्हणाली, "येस सर. दोन महिन्यांपूर्वी पनवेलवरून एक अशीच गाडी चोरीला गेली होती. दिनेश फडके या माणसाची ती गाडी होती. त्याने दोन महिन्यांपूर्वी तक्रार केली होती. पण काल त्याने पुन्हा पोलिसांना सांगितलं की त्याला शहराबाहेर त्याची गाडी दिसली होती. गाडीत दोघं-तिघं होती. पण दिनेश जवळ जायच्या आधीच ती गाडी निघाली आणि शहरापासून लांब गेली..."

उमाचं म्हणणं ऐकून प्रधान विचारात पडले. तेवढ्यात सचिन आणि आनंद लॅबमध्ये आले. आनंद म्हणाला, "सर, ती गाडी घेऊन आलोय. बॉडी डिक्कीतच होती. डॉक्टर, तुमच्यासाठी अजून एक गिफ्ट..." डॉ. गोखले हसले आणि दाराकडे गेले. प्रधानांना विचारात गढून गेलेलं सचिनने पाहिलं आणि विचारलं, "कोणता विचार करताय सर..." प्रधानांनी सर्वांकडे पाहिलं आणि ते बोलू लागले, "दोन महिन्यांपूर्वी एक गाडी चोरीला जाते. तिच्यातून या जेम्सचं अपहरण केलं जातं. त्याच दिवशी डॉ. अन्सारीही किडनॅप होतात. कालच्या सकाळी तो यादव विषप्रयोगाने मारला जातो. आज सकाळी हा यूसुफ जंगलाच्या बाहेर मृत सापडतो. तोही यादवसारखाच विषामुळे मेला आहे हे समजतं. यासाठी एक ड्रोनचा वापर केला गेला हेही कळतं. जंगलातल्या त्या घरात जेम्स आणि डॉ. अन्सारीचे मृतदेह सापडतात. वर ती गाडीसुद्झा घळीत सापडते. हे सगळं एकमेकांशी जुळलेलं आहे. यामागे mastermind एक असेल कदाचित, पण ती व्यक्ती एकटी नक्कीच नाही. कोण असतील हे गुन्हेगार..." प्रधानांना दुजोरा देत सचिन म्हणाला, "आणि सर, जेम्सने लिहून ठेवलेली ती अक्षर... P O I S A N... technologyमध्ये expert असलेला एखादा माणूस, मरणाच्या दारात असताना असं चुकीचं स्पेलिंग लिहील... हे पटत नाही मला... याचा काहीतरी वेगळा अर्थ असावा..." "या सर्व प्रश्नांची उत्तरं हा जेम्स देऊ शकेल प्रधानसाहेब..."

डॉ. गोखलेंच्या वाक्याने सर्व चपापले. त्या मेकॅनिकची बॉडी स्ट्रेचरवरून आत आणताना डॉ. गोखले सर्वांकडे पाहत म्हणाले, "असे पाहताय काय सगळे... मी खरं सांगतोय. या जेम्सकडे आहे प्रधानसाहेबांच्या प्रश्नाचं उत्तर. त्या मारेकऱ्यांनी जेम्स आणि डॉ. अन्सारी यांची पाकिटं, ओळखपत्र, सगळं काढून घेतलं. पण यांची घड्याळं तशीच ठेवली. प्रधानसाहेब, हा जेम्स तंत्रज्ञानात निपूण होता. त्याने त्याच्या घड्याळातही modifications करून एक रेकॉर्डिंग डिव्हाईस आणि व्हिडियो कॅमेरा बसवला होता. यात काही क्लिप्ससुद्धा रेकॉर्ड झाल्या आहेत. मी त्या घड्याळातली चिप स्कॅन करून तो डेटा ट्रान्स्फर करून घेतला आहे. आपण त्या सर्व क्लिप्स या स्क्रीनवर पाहू..."

कथेचा पुढचा भाग काही दिवसात...

@ अनिकेत परशुराम आपटे.

No comments:

Post a Comment