ऑस्ट्रेलियाचा ऍडम गिलक्रिस्ट, किंवा दक्षिण आफ्रिकेचा क्विन्टन डिकॉक. झिंबाब्वेचा एँडी फ्लॉव्हर, किंवा श्रीलंकेचा कुमारा संघकारा. आपापल्या देशाला एकहाती सामना जिंकवून देण्यात, हे डावखुरे यष्टीरक्षक फलंदाज पटाईत होते. बराच काळ भारतीय क्रिकेट संघात असा डावखुरा यष्टीरक्षक फलंदाज नव्हता, पण दोन डावखुऱ्या यष्टीरक्षकांनी आपल्या फलंदाजीच्या जोरावर समस्त क्रिकेट जगताला आश्चर्यचकित केलं...
१२ ऑगस्ट २००२ भारत विरुद्ध इंग्लंड - दुसरी कसोटी...
भारतीय संघ इंग्लिश भूमीवर चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार होता. क्रिकेटची मक्का समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवर रंगलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांनी नेहमीप्रमाणे हाराकिरी पत्करली आणि इंग्लंडने ती कसोटी १७० धावांनी आरामात खिशात टाकली. दुसरा सामना ट्रेन्ट ब्रिज येथे होता. अजय रात्रा जायबंदी झाला आणि एका नव्या यष्टीरक्षकासोबत भारतीय संघ मैदानात उतरला...
इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत ६१७ धावांचा डोंगर उभा केला. त्याला प्रत्युत्तर देताना भारतीय संघ ३५७ धावातच गारद झाला. २६० धावांच्या पिछाडीवर भारताने दुसरा डाव सुरू केला. तेंडुलकर, द्रविड, लक्ष्मण आणि गांगुलीने धावा वाढवत नेल्या. इंग्लिश माऱ्यासमोर गांगुली बाद झाला आणि ६ बाद ३७८ या अवस्थेत भारत पोहोचला. सर्वांना वाटलं झालं, लवकरच उरलेले फलंदाज बाद होतील आणि सवाशे ते दीडशेचं लक्ष इंग्लंडसमोर येईल...
त्या वेळच्या इंग्लीश फलंदाजीला हे माफक लक्ष भेदणं सहज सोपं होतं. भारत आज ०-२ ने मालिकेत पिछाडीवर जाणार हे सर्वांनी मनाशी पक्कं केलं. अशा वेळी मैदानात उतरला १७ वर्षाचा डावखुरा यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेल. आजू-बाजूने इंग्लिश फील्डर्सकडून होणारं स्लेजिंग आणि समोरून गोलंदाजांचा अचूक मारा, या दोघांमध्ये न अडकता पार्थिव ने आपला संयम कायम ठेवतं खेळपट्टीवर खुंटं गाडलं. दिवस संपला आणि इंग्लंडच्या विजयाचे स्वप्न भंग पावत सामना अनिर्णीत राहिला. संपूर्ण मालिकेची भिस्त या सामन्यावर होती. तेव्हा ६० चेंडूत नाबाद १९ धावांची पार्थिवच्या जिगरबाज खेळीने सर्वांना प्रभावित केलं...
१९ जानेवारी २०२१ भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - चौथी कसोटी...
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी चार कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियन भूमीवर आला होता. ऍडलेडची पहिली कसोटी ऑस्ट्रेलियाने लीलया जिंकली. पलटवार करत भारताने दुसरी कसोटी आपल्या नावे केली. तिसरा कसोटी सामना अनिर्णीत राहिल्यामुळे शेवटची कसोटी निर्णायक होती. कोहली, बुमराह, जडेजा, अश्विन हे कोणीच उपलब्ध नसताना, अजिंक्य रहाणेच्या हंगामी नेत्रुत्वाखाली एक दुबळा वाटणारा संघ चौथ्या कसोटीत उतरला...
ऑस्ट्रेलियाने केलेल्या ३६९ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ ३३६ धावाच जमवू शकला. ३३ धावांची नाममात्र आघाडीनिशी ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावाला सुरुवात केली. काहीशा दुबळ्या वाटणाऱ्या भारतीय बोलिंग अटॅकने या वेळी कमाल केली आणि ऑस्ट्रेलिया २९४ धावाच जमवू शकली. ३२८ धावांचे लक्ष घेऊन चौथ्या दिवशी तिसऱ्या सत्रात भारतीय संघाचा दुसरा डाव सुरू झाला. ऑस्ट्रेलियाचा तिखट मारा, स्लेजिंग, शेवटची कसोटी आणि शेवटचा दिवस, या चौकडीत भारतीय संघ अडकणार आणि ढेपाळणार असं सर्वांनाच वाटू लागलं...
पहिला गडी स्वस्तात बाद झाल्यावर ऍडलेड कसोटीच्या दुसऱ्या डावाची पुनरावृत्ती होणार हे जाणवत होतं. पाचवा दिवस जसा चढत गेला, तसं ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी अंगावर मारा करणं, बाऊंसर्स टाकणं, नकारात्मक गोलंदाजी करणं, स्लेजिंग करणं, हे आपले नेहमीचे हातखंडे वापरायला सुरूवात केली. तीन गडी बाद झाल्यावर हा सामना आपण गमावणार असं चित्र दिसू लागलं. अशातच पुजाराच्या मदतीला आला डावखुरा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत. सहा विकेट्स पडल्या तेव्हा पंत तिथे हजर होता. पंतने सामना अनिर्णीत अवस्थेकडे तरी न्यावा असंच सर्वांना वाटत होतं. पण रिषभचा मनसूबा वेगळाच होता...
चहापानानंतर रिषभने त्याचा नैसर्गिक खेळ दाखवत ऑस्ट्रेलियन गोलंदाजी फोडायला सुरूवात केली. काही वेळाने पंतच्या बॅटचा फटका चेंडूला बसून चेंडू सीमापार गेला आणि इतिहास घडला. ऑस्ट्रेलियाच्या बालेकिल्ल्यात म्हणजे ब्रिजबेनच्या मैदानावर ३७ वर्षात जे दिग्गज कसोटी संघांना जमलं नाही, ते भारताच्या दुय्यम समजल्या जाणाऱ्या कसोटी संघाने करून दाखवलं. रिषभच्या चौकारासोबत नुसता सामनाच नाही तर भारताने कसोटी मालिकाही जिंकली...
वरच्या दोन्हीही सामन्यात भारताच्या डावखुऱ्या यष्टीरक्षक फलंदाजांनी प्रतिकूल परिस्थितीत चिवट झुंज देत सामना आणि मालिका दोघांनाही कलाटणी देऊन अवघ्या क्रिकेट विश्वात भारतीय कसोटी संघाच्या नावाचा दरारा निर्माण केला...
@ अनिकेत परशुराम आपटे.

खूप सुंदर आठवणी आहेत या.. विस्मृतीत गेल्या होत्या..धन्यवाद आठवण करून दिल्याबद्दल... छान लिहिलं आहे.. पार्थिवच्या खेळीला तोड नाही
ReplyDeleteधन्यवाद...
Delete