प्रकाश हळू-हळू कमी होत होता. अंधार आपले हात पसरवत होता. आगीच्या ठिणग्या आणि गोळ्यांचा जणू पाऊस पडत होता. लोक घायाळ होत होते, मृत्यूमुखी पडत होते. दूर क्षितिजावर काळ्या धुरात गुरफटलेली तलवार नाचवत सैतान राजा दुष्कीर्ती हसत होता, “हा... हा... हा... मी अजेय आहे. आता माझा कोणीही पराभव नाही करू शकणार... माझा कोणीही अंत नाही करू शकणार... हा... हा... हा...” हसता हसताच दुष्कीर्तीने तलवारीचं टोक एका दिशेकडे वळवलं. तळवारीतून लाल किरणं निघाली आणि समोर विस्फोट होऊ लागले. मनुष्य क्षणार्धात भस्मसात होऊ लागले. त्याच वेळ तीन तेजस्वी मानव दुष्कीर्तीसमोर प्रकट झाले...
दैवी शक्ती असलेल्या त्या तीन मानवांनी आपापल्या हातात शस्त्र घेतली होती. एक मानव म्हणाला, “दुष्ट, दुराचारी... बंद कर तुझी ही विनाशलीला अन्यथा...” हे ऐकून दुष्कीर्ती अजून जोरात हसत म्हणाला, “हा... हा... हा... अन्यथा... अन्यथा काय... कोण थांबवेल मला... तुम्ही क्षूद्र मानव... हा... हा... हा... करा प्रयत्न...” बोलता बोलता दुष्कीर्तीने तलवार स्वत:च्या माथ्याला लावली आणि त्याचा आकार वाढू लागला. बघता बघता सैतान राजा दुष्कीर्ती, काळ्या धुरात गुरफटलेल्या, डोळ्यांनी आग ओकणाऱ्या एका अक्राळ-विक्राळ राक्षसात परिवर्तीत झाला आणि समोर उभ्या त्या तीन मानवांसमोर उभा राहून तो जोर-जोरात हसू लागला...
हजारो वर्ष उलटली...
अंधार वाढत चालला होता. किड्यांची गुणगूण आणि जनावरांच्या आवाजांसोबत, वाऱ्यामुळे सळसळणाऱ्या पानांच्या आवाजामुळे जंगल अधिकच भयावह झालं होतं. दगडी वाटेवरून अडखळत, झाडांच्या, फांद्यांना चुकवत एक मुलगी वाट फुटेल तिथे पळत होती आणि काही जंगली लांडगे तिचा पाठलाग करत होते. अचानक ती मुलगी ठेच लागून खाली पडली. तिला पडताना पाहून ते लांडगेही पळायचे थांबले. त्या मुलीने वळून पाहिलं तर दोन लांडगे हळू-हळू तिच्याकडे येत होते. त्या लांडग्यांनी त्या मुलीवर झडप घातली आणि अचानक त्याच वेळी कुठूनतरी दोन बाण बाहेर आले...
एका बाणाने एका लांडग्याच्या मानेवर आघात केला तर दुसरा बाण दुसऱ्या लांडग्याच्या कपाळाला लागला. दोन्ही लांडगे एकसाथ त्या मुली समोर येऊन पडले आणि गतप्राण झाले. आपल्या साथीदारांची अवस्था पाहून बाकी लांडगे कान दुमडून इकडे-तिकडे पाहू लागले आणि थोड्याच वेळात मागे वळत अंधारात पळून गेले. भेदरलेली ती मुलगी चोहीकडे नजर फिरवू लागली. काही क्षणातच चार पावलं तिच्या जवळ आली. दगडावर दगड घासून ठिणग्या तयार झाल्या आणि जवळ पडलेल्या काही पानांवर त्या पडून अग्नी प्रज्वलित झाला. त्या प्रकाशात त्या मुलीने पाहिलं, तर पाठीवर बाण भरलेले भाते, कमरेला बांधलेली तलवार आणि खांद्यावर धनुष्य घेतलेले दोन तरूण समोर उभे होते. त्यातल्या एकाने जमीनीवर पाडलेलं जाड लाकूड उचलून आगीवर धरून त्याची मशाल तयार केली. दुसरा तरूण त्या मुलीजवळ येत म्हणाला, “शांत व्हा. ते लांडगे पळून गेले. माझं नाव समर. आणि हा माझा भाऊ सोहम. आम्ही दोघं वनात शिकारीसाठी आलो होतो. रात्र झाली म्हणून इथे जवळच तंबू उभारला...” सोहम पुढे येत म्हणाला, “आपण कोण आहात..? आणि अशा यावेळी या वनात कशा..?
स्वत:ला सांभाळत ती मुलगी उभी राहिली. मग समर आणि सोहमकडे पाहत बोलू लागली, “मी कोण आहे हे जाणून घेण्याआधी मी इथे का आहे ते जाणून घ्या. हजारो वर्षांपूर्वी दुष्कीर्ती नावाचा एक महापराक्रमी राजा होऊन गेला. तो जितका बलवान होता तितकाच दुष्ट होता. समस्त पृथ्वीवर त्याला राज्य करायचं होतं. त्याने घोर तपश्चर्या करून भोळेनाथ शंकरकडून वर प्राप्त करून घेतला. भगवान शंकरने दुष्कीर्तीला पांढराशुभ्र प्रकाश असलेली एक खड्ग भेट करत वरदान दिलं, की मनाच्या शक्तीने तेज मिळवणारी ही खड्ग दुष्कीर्तीला प्रत्येक युद्धात अपराजित ठेवेल. शिवाय याच तलवारीच्या वारानेच दुष्कीर्तीचा अंत होईल. या तलवारीशिवाय दुसरं कोणतंही शस्त्र दुष्कीर्तीला अपाय करू शकणार नाही. इतकं बोलून महादेव अंतर्धान पावले. पवित्र अशा पांढऱ्या प्रकाशाने वेढलेली ती तलवार जशी दुष्कीर्तीच्या हाती आली, त्याच क्षणी त्याच्या अंगात विजेचा संचार झाला. पाहता पाहता तो पांढरा प्रकाश लुप्त झाला आणि तलवारीभोवती काळ्या धुराने वेटोळं करायला सुरुवात केली...
काळ्या मनाच्या दुष्ट राजा दुष्कीर्तीने त्याचे काळे विचार त्या तलवारीत प्रविष्ट केले. तो आता अमर झाला होता. चहू दिशांना त्याने आपली विनाशलीला आरंभली. पृथ्वीची ही दशा पाहून स्वर्गातील देव-देवता भयभीत झाले. महादेवाच्या वरदानाने उन्मत्त झालेला दुष्कीर्ती कदाचित स्वर्गावरही आक्रमण करू शकला असता. हे विचारात घेऊन देवतागण महादेवांकडे गेले. दुष्कीर्तीची विनाशलीला पाहून महादेव आधीच क्रोधीत झाले होते. पण स्वत:च दिलेल्या वरदानामुळे ते हतबल होते. महादेवांनी मग ब्रह्मदेव आणि नारायण यांना पाचारण केले. या त्रिमूर्तीने तीन चमत्कारी मानवांची निर्मिती केली आणि त्यांना दुष्कीर्तीला थांबवण्यासाठी पृथ्वीवर जाण्याचा आदेश दिला. राजा दुष्कीर्ती आणि या तीन मानवांचं घनघोर युद्ध झालं. महादेवांच्या वरदानामुळे दुष्कीर्तीचा पराभव करणं किंवा त्याचा अंत करणं शक्य नव्हतं. समस्त चराचराला गिळंकृत करण्यासाठी दुष्कीर्तीने काळ्या साम्राज्याचं द्वार उघडलं होतं. त्या तीन महामानवांनी योजना आखली आणि दुष्कीर्तीलाच त्या काळ्या साम्राज्यात फेकून दिलं. पडताना दुष्कीर्तीच्या हातून वेगळ्या झालेल्या तलवारीला पकडण्यासाठी ते तीन मानव पुढ सरसावले. हे पाहून दुष्कीर्तीने आपल्या दोन्ही हातांनी लाल किरणं सोडली. एक किरण उत्तरेच्या दिशेला निघून गेला आणि एक किरण तलवारीवर आदळला. तलवार हवेत उडाली आणि तिचे तीन तुकडे होऊन ते तुकडे दूरवर फेकले गेले. काळ्या साम्राज्याचं द्वार बंद झालं...
हजारो वर्ष उलटली. दुष्कीर्तीचं शरीर तर पंचतत्वात विलीन झालं, पण त्याचा आत्मा तिथेच काळ्या साम्राज्यात विहार करत राहिला. काळ्या शक्तींमुळे दुष्कीर्तीचा आत्मा अधिकच बलवान आणि मायावी झाला. परंतु बाहेर येण्याचे त्याचे सगळे प्रयास विफल झाले. बाहेरच्या जगात त्या तीन तेजस्वी मानवांनी एका मंदिराची स्थापना करून आपल्या दैवी शक्ती तिथे जतन करून ठेवल्या. मी देवयानी. त्याच मंदिराची देवी. आज इतक्या वर्षांनी देवळातला तेजस्वी पांढरा प्रकाश कमी होऊन देऊळ काळं पडू लागलं. मूर्तीरूपात तिथे विराजमान असलेल्या मला मूर्तस्वरूप प्राप्त झालं. कलशाच्या आतल्या भागात तीन निशाण दिसू लागले. ही तीच स्थानं होती, जिथे दुष्कीर्तीच्या तलवारीचे तुकडे फेकले गेले होते. मृत्यूचा सागर, काळा पर्वत आणि हे वन. माझ्या मानवी देहाचा उद्देश मला उमगला. ते तीनही तुकडे एकत्र करून ती तलवार पुन्हा निर्माण करायची आणि काळ्या साम्राज्यात दडलेल्या दुष्कीर्तीचा अंत करायचा. या जंगलात असलेला तुकडा शोधण्यासाठी मी इथे आले. तो तुकडा मला मिळालाही, पण तेवढ्यात ते लांडगे माझ्या मागे लागले. पळता पळता मी येथे पडले आणि तो तुकडा माझ्या हातून निसटला. पुढे काय झालं, हे तुम्हा दोघांना ज्ञात आहेच...” हे ऐकून समर आणि सोहम दोघंही आश्चर्यचकित झाले...
देवयानी पुढे म्हणाली, “अपवित्र झालेल्या त्या तलवारीला मंदिरात नेऊन पुन्हा पावन करायला हवं. म्हणजे त्या काळ्या शक्तींचा समूळ नाश होईल...” शेकोटीजवळ उभा असलेला सोहम म्हणाला, “देवी, आपण जे म्हणता आहात ते जर सत्य असेल, तर इतकी वर्ष सगळं शांत कसं होतं..? आणि अचानक सर्व सुरू कसं झालं..? आमचा पूर्ण परिचय नसतानाही आपण हे सर्व आम्हाला का सांगितलंत..? दादा, दंतकथा रचून या आपला वेळ वाया घालवू पाहत आहेत. मी तंबूत परत जात आहे. तू ही चल माझ्या सोबत. पण तुला जर यांच्यासोबत इथे थांबायचं असेल तर तुझी मर्जी...” इतकं बोलून देवयानी अजून काही बोलण्याआधीच सोहम एका दिशेने चालू लागला. देवयानी उभी राहत असताना तिला मदत करत समर म्हणाला, “देवयानी, सोहम पूर्णपणे चुकीचा नाही. तुमच्या कथनावर विश्वास ठेवणं थोडं कठीण आहे. या वेळी तुम्ही आमच्यासोबत चला. तुमचं इथे अशा वेळी थांबणं कदाचित घातक ठरू शकतं...” देवयानीला समरचं म्हणणं पटलं आणि ती समर व सोहमसोबत चालू लागली. तेवढ्यात एका झाडाच्या बुंध्याजवळ काळ्या धुराचा एक छोटा ढग सर्वांना दिसला. सोहमने ढग बाजूला केला, तर तिथे एक काळी टोकदार वस्तू पडलेली होती. त्या काळ्या वस्तूला उचलण्यासाठी सोहम झुकलाच होता, की देवयानी ओरडून म्हणाली, “त्या वस्तूला स्पर्श करू नका...”
समरने एकवार तुकड्याकडे बघितलं आणि मग पुन्हा देवयानीकडे पाहू लागला. देवयानी म्हणाली, “अंधारात तुम्ही त्या लांडग्यांना नीट पाहिलं नाहीत. आकाराने मोठी असलेली ती जनावरं त्याच काळ्या शक्तीने प्रेरित होऊन या तुकड्याचं रक्षण करत होती. मी प्रयास करून हा तुकडा मिळवला पण त्यांना समजलं आणि ते माझ्या मागे लागले...” बोलता बोलता देवयानीने बाजूलाच पडलेल्या एका रेशमी कपड्याचा तुकडा उचलला आणि त्याच कपड्यात ती वस्तू उचलून गुंडाळून धरली. मग समरला तो हात दाखवत, दुसऱ्या हाताने अजून दोन रेशमी कपड्यांचे तुकडे अंगरख्यातून बाहेर काढत देवयानी म्हणाली, “हे तीन रेशमी कपडे त्या तीन महावीरांच्या अंगरख्यांचे आहेत ज्यांनी दुष्कीर्तीला काळ्या साम्राज्यात धाडलं आणि ते पवित्र देऊळ स्थापन केलं...
हे रेशमी कपडे त्या दुष्ट शक्तींना काबूत ठेऊ शकतात, पण थोड्याच अवधीसाठी. दुष्कीर्ती आणि त्या तीन महामानवांचं जेव्हा युद्ध सुरू झालं, तेव्हा अवकाशात ग्रह आणि नक्षत्रांची एक विशिष्ट स्थिती होती. दहा दिवस ते युद्ध सुरू राहिलं. प्रत्येक दिवशी दुष्कीर्तीची शक्ती वाढत होती. दहाव्या दिवशी जेव्हा सगळे ग्रह आणि नक्षत्र त्यांच्या परमोच्च स्थानावर होते, तेव्हा काही क्षणांसाठी दुष्कीर्तीची शक्ती कमी झाली. ही संधी साधून त्या महावीरांनी दुष्कीर्तीला काळ्या साम्राज्यात ढकललं. इतक्या वर्षानंतर काल रात्री ग्रह व नक्षत्रांची तीच स्थिती उत्पन्न झाली जी युद्ध सुरू होताना दिसली होती. आता दुष्कीर्तीची आसूरी काळी शक्ती वाढत जाणार. याचं प्रमाण आहे हा अंध:कार. काल पौर्णिमेची रात्र होती, पण अवकाशात चंद्र नव्हता. बलवान होत चाललेल्या काळ्या शक्तींनी चंद्रालाही झाकोळून टाकलं होतं. दहाव्या दिवशी जेव्हा सर्व ग्रह आणि नक्षत्र त्यांच्या परमोच्च स्थानावर असतील, त्या समयी त्या तलवारीचे तुकडे देवळात नेऊन ती तलवार नष्ट केली, तरच दुष्कीर्तीच्या आत्म्याला मुक्ती मिळेल. आजचा दिवसही गेला. आता माझ्याकडे केवळ आठ दिवस आहेत...” “माझ्याकडे नाही. आपल्याकडे...”
हे ऐकून देवयानीने समरकडे पाहिलं. समर पुढे म्हणाला, “हो देवयानी. मीसुद्धा तुझ्यासोबत येत आहे. त्या काळ्या शक्ती कितीही मोठ्या का असेनात, पण सोहम त्यांच्या कैदेत आहे. तो जिवंत आहे की नाही ते ठाऊक नाही. पण मी त्याला एकटं नाही सोडू शकत. आणि तुलाही माझ्या मदतीची गरज भासू शकते...” समारच्या म्हणण्याने देवयानीच्या मुखावर हलकीशी स्मितरेषा उमटली. दोघंही खूप थकले होते. तंबूजवळ पोहोचल्यावर दोघांनी विचार केला, थोडी विश्रांती घेऊन सकाळी पुढच्या प्रवासाला जावं. दोन प्रहर उलटले. सकाळ व्हायला काही क्षणच राहिले होते. एका किंकाळीने समरचे डोळे उघडले. तंबूतून बाहेर येत समरने पाहिलं, तर एक अस्वल आणि लांडगा यांच्यामध्ये, हातात एक लाकडाचा तुकडा घेऊन देवयानी उभी होती. ती जनावरं आकाराने मोठी आणि रूपाने अघोरी वाटत होती...
म्यानातून तलवार बाहेर काढत समर म्हणाला, “देवयानी, तू निघून जा इथून. तुझं पुढे जाणं आवश्यक आहे. मी यांना थोपवतो...” ती जनावरं जवळ आलीच होती, की उगवणाऱ्या भास्कराची किरणं समर आणि देवयानीवर पडली. त्याच क्षणी तीव्र प्रकाशाने समरचे डोळे दिपले. दुसऱ्याच क्षणाला समोरून येणाऱ्या जनावरांवर विजेच्या लकेरी पडल्या. क्षणार्धात ती सगळी जनावरं जागीच गतप्राण झाली. तो प्रखर प्रकाश आणि विजेच्या त्या लकेरी, देवयानी ऊभी होती तिथून येत होत्या. समरने देवयानीकडे पाहिलं, तर तिच्या सगळ्या जखमा गायब झाल्या होत्या. तिची काया, पांढऱ्याशुभ्र प्रकाशात घेरलेली होती आणि नुसत्या हातांनी देवयानी विजेच्या लकेरी उत्पन्न करत होती. सर्व जनवरांचा अंत केल्यावर देवयानी म्हणाली, “समर, माझ्याकडे त्या तीन महावीरांची शक्ती आहे. पण मानवी रूपात असल्याकारणाने पूर्ण दिवसात केवळ एकदाच मी या शक्तीचा प्रयोग शकते. मग माझी शक्ती लुप्त होते आणि सूर्योदयासोबत ती शक्ती मला परत प्राप्त होते...”
देवयानी बोलत असताना तिचा आवाज एखाद्या प्रतिध्वनीसारखा सर्वत्र घुमत होता. क्षणार्धात तिच्या भोवती असलेला पांढरा प्रकाश कमी झाला आणि देवयानी पुन्हा मानवी रूपात अलगद पृथ्वीवर येऊन उभी राहिली. हे सगळं पाहून समर आश्चर्यचकित झाला. देवयानी म्हणाली, “समर, तलवारीचा दुसरा तुकडा दक्षिण दिशेला पसरलेल्या मृत्यूच्या सागरात कुठेतरी आहे. संकटं अजून गढद होत जातील. तू अजूनही माझ्यासोबत आहेस...” या वेळी देवयानीचा आवाज सामान्य होता. आशेने भरलेल्या नजरेने देवयानी समरकडे पाहत होती. दोघांची नेत्रपल्लवी झाली. समरने स्मित केलं आणि होकारार्थी मान हलवली. देवयानीला हायसं वाटलं. ती म्हणाली, “मग अजून कुठलंही संकट येण्यापूर्वी आपल्याला तलवारीच्या दुसऱ्या तुकड्याला शोधायच्या मोहिमेवर निघायला हवं...”
दोघंही लवकरच जंगल पार करून किनाऱ्यापर्यंत पोहोचले. लांबवर पसरलेल्या काळ्या रेतीशिवाय काहीच दिसत नव्हतं तिथे. सर्वत्र पाहत समर म्हणाला, “आपण सागर किनारी आहोत. पण इथे किनाऱ्यासारखं काहीच दिसत नाही. वृक्ष नाहीत, पक्षी नाहीत, केवळ काळी वाळू दिसत आहे. अजब आहे...” बोलता बोलता त्याने देवयानीकडे पाहिलं. देवयानी टक लाऊन एका दिशेला पाहत होती. त्याच दिशेकडे बोट दाखवत ती म्हणाली, “समर, तिथे एक गुहा आहे. आपण तिथे जाऊ. कदाचित आपल्याला सहाय्य मिळेल...” समरने मान हलवून अनुमोदन दिलं आणि दोघंही गुहेकडे निघाले. काही क्षणातच दोघं गुहेच्या तोंडावर पोहोचली. दोघांनी आत डोकावलं, पण हवा आणि अंधाराशिवाय तिथे काहीच नव्हतं. समरने जवळच पडलेल्या खडकांचे तुकडे घासून ठिणग्या निर्माण केल्या. तिथेच पडलेल्या एका लाकडाच्या तुकड्यांवर त्या ठिणग्या टाकत अग्नी प्रज्वलित केला. अग्नीच्या त्या प्रकाशात दोघं गुहेत शिरली...
गुहेच्या अंती एका शिळेवर एक दगडी मूर्ती उभी होती. कोणी तपस्वी आहेत असंच वाटत होतं. मूर्तीच्या डोळ्यात भीती दिसत होती, आणि तिचा हात समोरच्या दिशेने होता. जणू ते कोणालातरी थांबण्याचा इशारा करत आहेत. देवयानी आणि समरने एकमेकांकडे पाहिलं आणि मूर्तीच्या जवळ पोहोचले. “कोण आहेत हे..? आणि इथे...” समर त्याचं बोलणं पूर्ण करेल त्याआधीच देवयानीचा त्या मूर्तीला स्पर्श झाला. मूर्तीला तडे गेले आणि अचानक तिचा विस्फोट झाला. त्या प्रकाशाने देवयानी आणि समर, दोघांचे डोळे दिपले. हळूहळू प्रकाश कमी झाला तसे दोघांनी डोळे उघडले. समोर पांढऱ्या प्रकाशात घेरलेले एक ऋषी उभे होते. देवयानीकडे पाहत त्यांनी हात जोडले आणि म्हणाले, “धन्यवाद देवी. आपल्या स्पर्शाने आज मी धन्य झालो. मी एकेकाळचा राजा आदित्यनाथ आहे. एका युद्धात माझ्या कुटुंबाचा समूळ नाश झाला. हे पाहून मी अत्यंत दु:खी झालो. सगळ्या सुख-सोयी मला नीरस वाटू लागल्या. या गुहेत येऊन माझ्या हातून घडलेल्या पापांसाठी आणि मोक्षप्राप्तीसाठी मी तपश्चर्या करू लागलो...
श्री विष्णूला माझी परीक्षा घ्यावीशी वाटली. त्या परीक्षेत मी विफल ठरलो आणि क्रोधीत होऊन त्यांनी मला अनंत काळासाठी या दगडी शिळेत राहण्याचा शाप दिला. मी त्यांची याचना केली, तेव्हा त्यांनी उ:शाप दिला. ते म्हणाले, मानवी शरीरात असलेल्या एखाद्या दैवी शक्तीचा स्पर्श जेव्हा या शिळेला होईल तेव्हाच मी शापमुक्त होईन आणि तोच क्षण माझ्या मोक्षप्राप्तीचा असेल. आज तुमच्या स्पर्शाने या दगडी शिळेतून माझी मुक्तता झाली. त्या कारणास्तव माझा आपल्याला धन्यवाद...” आशीर्वाद देत देवयानीने तिचा उजवा हात वर उचलला. मग समरकडे पाहत आदित्यनाथ म्हणाले, “मुला, तू ज्या यात्रेवर निघाला आहेस, तिथे तुला अजून मोठ्या संकटांना सामोरं जावं लागणार आहे. त्या संकटांचा सामना करण्यासाठी माझ्या आशीर्वादाचा स्वीकार कर...”
बोलता बोलता आदित्यनाथ ऋषींनी आपला हात आशीर्वादस्वरूप वर केला. हातातून एक प्रखर किरण निघाली आणि गुहेच्या बाहेर जात अदृश्य झाली. “किनाऱ्यावर माझा आशीर्वाद तुझी प्रतीक्षा करत आहे समर. मोठ्या शक्तीसोबत मोठ्या बलिदानाचं मोलही द्यावं लागतं. ईश्वर तुझं कल्याण करो. माझा तो आशीर्वाद ग्रहण कर...” आदित्यनाथ यांचं बोलणं संपलं आणि ते त्या पांढऱ्या प्रकाशात विलीन झाले. त्या जागेला नमस्कार करून समर आणि देवयानी गुहेच्या बाहेर आले. तटावर शस्त्रास्त्राने युक्त एक जहाज उभं होतं. समर आणि देवयानी त्या जहाजावर चढले. त्याच वेळी आकाशवाणी झाली आणि आदित्यनाथ म्हणाले, “समर, हे जहाज पाणी आणि हवा असं दोन्हीवर चालू शकतं. कल्याणमस्तू...” आकाशवाणी बंद झाली आणि जहाज सुरू झालं. दूरवर पसरलेल्या सागराकडे पाहत समर म्हणाला, “हा समुद्र इतकं शांत कसा..? लाटा नाहीत, पाण्याची गाज नाही..! पाण्याचा रंगसुद्धा काळा आहे..! असं का..?”
सागराकडे पाहत देवयानी म्हणाली, “ही खूप वर्षांपूर्वीची घटना आहे. हा समुद्र आधी असा नव्हता. त्या काळी तो तटही असा ओसाड नव्हता. मोठ-मोठाले वृक्ष, पक्षी यांनी तो सुशोभित असायचा. एक दिवस यमराज या सागरावरुन प्रवास करत होते. तेव्हा उसळणाऱ्या लाटांमुळे ते भिजले. यमराज क्रोधीत झाले आणि त्यांनी त्यांचा पाश लाटांवर आणि पाण्यावर मारला. तेव्हापासून हा सागर काळा पडला आणि सारे वृक्ष सुकून नष्ट झाले. सर्व पक्षी भयभीत झाले आणि त्यांनी स्थलांतर केलं. पाण्यातली जनावरं...” देवयानी बोलतच होती, की जहाज जोरजोरात हलू लागलं. आणि चारही बाजूंनी काळ्या धुरात गुरफटलेले पर्वताइतके लांब हात पाण्याबाहेर येऊ लागले. देवयानी आणि समर दोघंही स्तब्ध झाले. एका मोठ्या गर्जनेसह, लाल डोळ्याचा एक विशालकाय जीव बाहेर आला. समरने लगेच तलवार सरसावली आणि त्या हातांना कापू लागला. समरला पाहून देवयानीनेही एक भाला उचलला आणि त्या दानवाचा सामना करू लागली. त्या दानवाचा हात जिथे कापला जाई, तिथूनच नवीन हात पुन्हा बाहेर येइ. बराच वेळ हा सामना करताना समर म्हणाला, “हा दानव तर महाशक्तीशाली आहे. आपण किती काळ याचा सामना करू शकू...” दानवाच्या हाताला लांब सारत देवयानी म्हणाली, “समर, या दानवाचा डोळा बघ... त्याच्यावर निशाणा साध...” दानवाच्या डोळ्याकडे पाहताना समरची एकाग्रता भंग झाली आणि दानवाच्या हाताच्या तडाख्याने समर दूर फेकला गेला...
दुसरीकडे त्या दानवाच्या हाताच्या तडाख्याने देवयानीने पकडलेला भाला तिच्या हातून खाली पडला. तो हात देवयानीला पकडणारच होता त्याच वेळी काहीतरी वस्तू समर आणि देवयानीसमोर असलेल्या दानवाच्या दोन्ही हातांना जाऊन भिडली. एकाच वेळी दोन विस्फोट झाले आणि दानवाचे दोन्ही हात कापले गेले. दानवासोबतच देवयानी आणि समरने, ज्या दिशेने ती वस्तू आली त्या दिशेला पाहिलं. एक जहाज हवेत उडत होतं. त्यावर, एका हातात मशाल आणि दुसऱ्या हातात तलवार पकडून एक मुलगी उभी होती. तिच्या समोर एक भलीमोठी तोफ होती. त्या मुलीने तोफेला पुन्हा बत्ती दिली. पुन्हा विस्फोट झाले आणि त्या दानवाचे अजून दोन हात कापले गेले. दानवाने रागाने लाल होऊन त्या जहाजाकडे मोर्चा वळवला. दानवाचं लक्ष विचलित झालेलं पाहून देवयानी म्हणाली, “समर हाच मोक्याचा क्षण आहे...”
दानवाने एव्हाना राहिलेल्या हातांनी त्या मुलीच्या जहाजाला जखडायला सुरुवात केली होती. त्याच वेळी देवयानीचा इशारा समजून समरने धनुष्य उचलून निशाणा साधला आणि एकसाथ दोन बाण चालवले. दोन्ही बाणांनी योग्य ठिकाणी प्रहार केला. एक बाण त्या दानवाच्या डोळ्यात लागला आणि दुसरा त्याच्या मानेत घुसला. दानव जोरजोरात किंचाळू लागला. त्याच्या डोळ्यातून काळं रक्त वाहू लागलं. जहाजाला जखडूनच तो दानव पाण्याखाली जाऊ लागला. समर त्या मुलीकडे पाहून ओरडला, “दानवापासून वाच...” जहाज जखडलं जात असताना त्या मुलीने तलवार म्यान करून पाण्यात उडी घेतली. काही क्षणातच दानव जहाजासह पाण्यात नाहीसा झाला. समरने दोर फेकून त्या मुलीला आपल्या जहाजावर खेचून घेतलं. कृतज्ञतेच्या भावनेने त्या मुलीने समर आणि देवयानीकडे पाहिलं आणि मस्तक झुकवलं. देवयानी म्हणाली, “काही क्षणांपूर्वी इथे फक्त आमचंच जहाज होतं. आपण अचानक कशा आलात..? कोण आहात आपण..?”
ती मुलगी हसली आणि म्हणाली, “मी वीरा. सागरी चाचांचे सरदार संग्रामसिंह माझे वडील आहेत. बाबा कितीतरी काळापासून बाहेर होते. एक दिवस कबुतरामार्फत एक संदेश आला. त्यात लिहिलं होतं, एका जहाजाला लुटून परत येत असताना समुद्री तुफानात ते अडकले. त्यांचं जहाजही नष्ट झालं आणि बाबा या काळ्या समुद्रात फसले. मग त्यांच्या पाळीव कबुतरामार्फत त्यांनी हा संदेश पाठवला. आत्ता जे जहाज त्या दानवाने खेचून नेलं, ते माझ्या मनाच्या इशाऱ्याने चालायचं. तेच जहाज घेऊन मी इथे बाबांना शोधत होते. तुम्हाला संकटात पाहिलं म्हणून इथे आले. पण तुम्ही कोण आहात..? आणि इथे कसे..?” हे ऐकून समर बोलू लागला, “मी समर, आणि ही देवयानी. प्रकाशाच्या मंदिराची देवी...” आत्तापर्यंत घडलेल्या सर्व घटना समरने वीराला सांगितल्या आणि म्हणाला, “त्या तलवारीच्या दुसऱ्या भागाचा शोध घेण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत...”
समरचं बोलणं ऐकून वीरा म्हणाली, “खरंच अदभूत. पण या अथांग सागरात त्या तुकड्याला कुठे...” वीरा बोलतच होती, पाण्यावर तरंगणारं एक लाकडी फळकूट तिच्या नजरेस पडलं. वीराने ते फळकूट नीट पाहिलं आणि ओरडलीच, “ते... ते... बाबांच्या जहाजाचं फळकूट आहे ते. त्यावर आमचं निशाणसुद्धा आहे. म्हणजे बाबा पण इथेच कुठेतरी... बाबा... बाबा... मी वीरा... कुठे आहात तुम्ही...” वीराला दिलासा देत समर मागे वळला तेव्हा देवयानी एका दिशेला टक लाऊन पाहत होती. समर देवयानीजवळ गेला तेव्हा एका दिशेला बोट दाखवत देवयानी म्हणाली, “समर, तो बघ. तो लाल प्रकाश. याचा अर्थ, तलवारीचा दुसरा भाग तिथेच असेल. आणि वीरा, कदाचित तुझे बाबाही तिथे असू शकतील. तो प्रकाश पाण्याच्या आतून येत आहे. आपल्याला पाण्याखाली जायला हवं...” वीरा आणि समरने माना हलवल्या. समरने देवयानीकडून रेशमी कापड घेतलं आणि पाण्यात उडी मारली...
लाल प्रकाशाकडे जात समर पाण्यात अजून खोल जाऊ लागला. बराच वेळ पोहोल्यानंतर समर तळापर्यंत पोहोचला. पाणी आणि अंधार याशिवाय समरला काहीच जाणवत नव्हतं. त्याला एका दिशेने लाल प्रकाशाचा भास होत होता. त्या प्रकाशाच्या दिशेने समर पुढ जातच होता, की एका छोट्या माशाने त्याची वाट अडवली. त्या माशाला हटवायला समर जवळ गेला तेव्हा त्याला दिसलं, की माशाचे डोळे काळे होते आणि मासा काळ्या धुरात गुरफटलेला होता. हा मासासुद्धा त्या काळ्या विद्येच्या जाळ्यात अडकलेला आहे, हे समर समजून गेला. एकाएकी माशाचे डोळे लाल झाले आणि त्याचा आकार झपाट्याने वाढू लागला. समरने स्वत:ला चाचपडलं, पण त्याच्याकडे कोणतंही शस्त्र नव्हतं. आकाराने मोठा होणारा तो मासा हळू-हळू समरच्या दिशेने येऊ लागला...


No comments:
Post a Comment