Friday, November 24, 2023

मूक प्रतिशोध...

रात्र वाढत होती. सुधीर झपाझप पावलं टाकत स्टेशनकडे चालला होता. “आज इतका उशीर... ही सेकंड शिफ्ट कठीणच आहे. जरा उशीर झाला, की सगळ्या रिक्षा आणि टॅक्सी बंद होतात. तरी मी सरांना सांगत होतो, उद्या काम पूर्ण करतो, पण आमचं ऐकेल तो बॉस कसला...” स्वत:शीच पुटपुटत सुधीर एका जोड रस्त्यावर येऊन पोहोचला. समोर एक छोटी गल्ली होती आणि बाजूला सुधीर चालत असलेला रस्ता होता. सुधीर विचार करू लागला, “हा रस्ता मला २०-२५ मिनिटात स्टेशनला पोहोचवेल, पण ही गल्ली शॉर्टकट आहे. दहा मिनिटात असेन मी स्टेशनवर. कदाचित शेवटची गाडी मिळेल मला...” काही क्षण विचार करून सुधीर समोरच्या गल्लीत शिरला...

सुधीर जस-जसा पुढे जात होता, तसा अंधार अजून गढद होत होता. सुधीरने मोबाईलचा टॉर्च सुरू केला आणि चालू लागला. त्याला काहीतरी आवाज आल्यासारखा वाटला. सुधीर थबकला. तो आवाज नक्की कुठून येत आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न करू लागला. पण मोबाईलच्या टॉर्चच्या मंद प्रकाशात सुधीरला फारसं स्पष्ट दिसलं नाही. सुधीर पुन्हा चालायला सुरुवात करणार इतक्यात त्याचा मोबाईल वाजू लागला. फोन घेत तो म्हणाला, “हं आई... हो मला माहीत आहे उशीर झाला आहे. पण मी शॉर्टकट घेतला आहे. आता पाचंच मिनिटात मी स्टेशनला पोहोचेन. स्टेशनला पोहोचताच मी...” सुधीर बोलतच होता, की त्याला परत कसलातरी आवाज आला. या वेळी तो आवाज अगदी जवळून आला होता. सुधीरने लगेच वळून पाहिलं, तर दोन चकाकणारे ठिपके त्याच्या दिशेने येत होते. क्षणार्धात, “आSSSSSSSSSSSSS........” सुधीरची किंकाळी सर्वत्र पसरली...

तपास सुरू झाला. इन्स्पेक्टर आनंद आणि सब-इन्स्पेक्टर उमा बॉडी तपासत होते. सब-इन्स्पेक्टर सचिन सभोवार फिरत काही धागे-दोरे मिळतात का, ते पाहत होता. आणि सीनियर इन्स्पेक्टर प्रधान तिथे जमलेल्या लोकांशी बोलत होते, “या घटनेची वर्दी कोणी दिली आम्हाला...” प्रधानांनी असं विचारताच एक माणूस पुढे येत म्हणाला, “सर, मी फोन केला तुम्हाला. रात्रीच्या वेळी हा परिसर शांत असतो. संध्याकाळ नंतर इथे फारसं कोणी येतही नाही. या माणसाच्या अचानक आलेल्या किंकाळीने मला जाग आली. मी गॅलरीत आलो आणि पाहिलं, तर कोणीतरी जमिनीवर पडलं होतं इथे. मी मदतीसाठी लोकांना बोलावलं. काही माणसं जमली तेव्हा आम्ही इथे आलो आणि याला पाहिलं. याचे सताड उघडे डोळे आणि उघडं तोंड पाहून आमची खात्री पटली, की हा माणूस मेला आहे...”

तो माणूस बोलतच होता, की उमाने प्रधानांना बोलावलं. प्रधान उमाजवळ पोहोचताच उमा म्हणाली, “सर, याचं नाव सुधीर आहे. मी याची बॅग चेक केली. त्यात याचं आयकार्ड सापडलं. बॅगेतल्या बाकी वस्तू जशाच्या तशा आहेत. रोख रक्कम आहे थोडी, पण त्यालाही हात लावलेला नाही...” उमाला दुजोरा देत आनंद म्हणाला, “याच्या गळ्यातली चेन, हातावरचं घडयाळ आणि वॉलेटही हललं नाही. याच्या शरीरावर उरखडे आणि चावण्याच्या खुणा आहेत. बहुतेक एखाद्या जनावराचं काम असावं हे. पण सर, याची नखं आणि डोळे यात निळ्या रंगाची झाक दिसते आहे. विषप्रयोगाचाही प्रकार असू शकतो...” आनंद त्याच्या शंका व्यक्त करत होता, तेव्हा तिथे येत सचिन म्हणाला, “सर, हा सुधीरचा तुटलेला मोबाईल आहे. शिवाय, पंजांचे ठसे सापडलेत, जे बॉडीच्या जवळ तर आहेतच, आणि बॉडीपासून उलट्या दिशेला जाताना दिसत आहेत. या ठशांकडे पाहून असं वाटतं, की हे एखाद्या कुत्र्याचे असावेत...”

सचिनचं बोलणं ऐकून गर्दीतला एक जण म्हणाला, “या परिसरात भटकी कुत्री आहेत. पण तशी तर सगळीकडेच असतात. त्या माणसाच्या जवळ जात आनंद म्हणाला, “बरोबर आहे सर तुमचं. पण बॉडी ज्या जागी आहे, तिथे आजू-बाजूला सापडलेले कुत्र्यांच्या पंजांचे ठसे, आणि या सुधीरच्या अंगावर आढळलेले ओरखडे, जे कुत्र्याचे असण्याची शक्यता आहे, असा योगायोग सगळीकडे पहायला मिळत नाही...” सर्वांकडे पाहत प्रधान म्हणाले, “सुधीरचा मृत्यू संशयास्पद आहे. म्हणून जोवर तपास सुरू आहे, तोवर ही जागा आम्ही सील करत आहोत. सचिन, या मोबाईलला आपल्या टेक्निशियनकडे घेऊन जा. आनंद, तू बॉडीला डॉककडे ने. मी आणि उमा या सुधीरच्या घरी घडल्या प्रकाराची सूचना देतो. लेट्स मूव्ह...”

सर्वजण पांगले. प्रधान आणि उमा एका घराजवळ पोहोचले. प्रधानांनी उमाला पुढे केलं. उमाने बेल वाजवताच एका महिलेने दार उघडलं. तिचं अभिवादन करत उमा म्हणाली, “नमस्कार मावशी, मी सब-इन्स्पेक्टर उमा. आणि हे आमच्या टीमचे हेड, सीनियर इन्स्पेक्टर प्रधान. आम्ही इथे...” उमा तिचं वाक्य पूर्ण करतच होती, की ती महिला म्हणाली, “सापडला का सुधीर..? कुठे आहे तो..?” उमाने एकवार प्रधानांकडे पाहिलं. मग त्या महिलेच्या खांद्याला धरून तिला आत नेलं. आत जाऊन सर्वजण सोफ्यावर बसले. तेव्हा काही क्षणांनी प्रधान म्हणाले, “मॅडम, एक वाईट बातमी आहे. आम्हाला सुधीरचं प्रेत सापडलं आहे...” हे ऐकताच त्या महिलेला धक्का बसल्यासारखं झालं आणि तिची शुद्ध हरपली...

उमाने ताबडतोब थोडं पाणी आणून त्या महिलेच्या चेहेऱ्यावर काही थेंब शिंपडले. ती महिला शुद्धीवर आली. ग्लासातलं थोडं पाणी प्यायली. तिला सांत्वना देत उमा म्हणाली, “धीर धरा मावशी. आम्हाला तुमची मन:स्थिती समजते आहे. पण सुधीरसुद्धा पाहत असेल तुम्हाला. अशा अवस्थेत तुम्हाला पाहून त्याला कसं वाटेल विचार करा...” हे ऐकून त्या महिलेने डोळे पुसले. हळू आवाजात प्रधान म्हणाले, “मॅडम, आम्हाला सुधीरची रूम चेक करायची आहे...” त्या महिलेने होकार दिला आणि सुधीरच्या खोलीकडे जायची दिशा दाखवली. उमाला तिथेच बसवून प्रधान सुधीरच्या खोलीत गेले. एकदम साधी खोली होती ती. बेड, कपाट, टेबलवर एक कॉम्प्युटर आणि एक लॅम्प...

प्रधानांनी सहज म्हणून कपाटाला हात लावला आणि हँडल फिरवलं. कपाट उघडलं. आत कपडे, घड्याळं, गॉगल्स, बँकेचे पेपर्स आणि काही रोख रक्कम, असा संशय न येणारा ऐवज होता. प्रधानांनी त्यांचा मोर्चा टेबलकडे वळवला. टेबलच्या ड्रॉव्हरमध्ये एक डायरी होती. डायरीतल्या काही पानांनंतर एका पानावर काही व्यक्तींची नावं आणि रक्कम लिहिली होती. प्रथमदर्शनी, ती देणेकऱ्यांची यादी असावी असंच वाटत होतं. ती डायरी घेऊन प्रधान बाहेर आले आणि त्या महिलेला म्हणाले, “मॅडम, या डायरीत काही व्यक्तींची नावं आणि रकमा लिहिल्या आहेत. याबद्दल तुम्हाला काही माहीत आहे...” त्या डायरीकडे पाहून नकारार्थी मान हलवत ती महिला म्हणाली, “नाही साहेब. याबद्दल मला काहीच कल्पना नाही. खरंतर दोनच महीने झालेत आम्ही इथे येऊन, जेव्हा दोन महिन्यांपूर्वी सुधीरची इथे बदली झाली...”

त्या महिलेच्या खांद्यावर हात ठेवत उमाने विचारलं, “मावशी, सुधीरच्या मित्र-मैत्रिणींबद्दल तुम्ही सांगू शकाल का... किंवा एखादं स्थळ सांगून आलं आहे का त्याला...” उमाकडे पाहून त्या महिलेने काही क्षण जाऊ दिले. मग म्हणाली, सुधीर घटस्फोटीत आहे. प्रणाली नावाच्या मुलीशी सुधीरचं लग्न झालं होतं. प्रणालीसुद्धा याच परिसरात राहते. सुधीरचे सगळे मित्र-मैत्रिणी, आम्ही आधी जिथे राहत होतो तिथे होते. इथे आल्यावर सुधीरची नव्याने कोणाशी मैत्री झाली असेल तर अजून मला माहीत नाही...” प्रधान आणि उमाने एकमेकांकडे पाहिलं. प्रधानांनी मान हलवली. प्रणालीचा पत्ता मिळवून, त्या महिलेचा निरोप घेऊन, सुधीरची डायरी स्वत:कडे ठेवत प्रधान आणि उमा त्या घरातून बाहेर पडले. थोडं पुढे आल्यावर उमा म्हणाली, “सुधीरची ट्रान्सफर होते. मग दोनच महिन्यात त्याचा मृत्यू होतो. शिवाय सुधीरपासून घटस्फोट घेतलेली प्रणालीसुद्धा याच परिसरात राहते. स्ट्रेन्ज...”

उमाला दुजोरा देत प्रधान म्हणाले, “थोडी खटकणारी गोष्ट आहे खरी. सध्यातरी आपल्याकडे सुधीरची ही डायरी आणि प्रणालीचा नंबर, इतकंच आहे...” लगेच सचिनला कॉल करत प्रधान म्हणाले, “सचिन, मी तुला काही व्यक्तींची नावं पाठवत आहे. सुधीरचा मोबाईल दुरुस्त झाला असेल तर या व्यक्तींची नावं त्यात आहेत का चेक कर आणि त्यांच्यांशी संपर्क साधून त्यांना चौकीवर बोलावून घे. हे बहुतेक सुधीरचे देणेकरी तरी असावेत, नाहीतर घेणेकरी तरी असावेत...” कॉल कट करत उमाकडे वळून प्रधान म्हणाले, “उमा, लेट्स गो टू मीट प्रणाली. तिथे काही नवीन सुगावा लागू शकतो...” उमाने होकार दिला आणि जीप एका दिशेने वळली...

काही वेळातच जीप एका मोठ्या सोसायटीत शिरली. गेटवर एक सिक्युरिटी गार्ड उभा होता. त्याने प्रधान आणि उमाचे आयकार्ड चेक केले आणि आत प्रवेश दिला. त्याच्या दाढीकडे पाहताना प्रधानांना शंका येत होती. आयकार्ड परत घेत प्रधान आणि उमा, प्रणालीच्या फ्लॅटकडे जाऊ लागले. एका महिलेने दार उघडलं. दारातच उमाने स्वत:ची आणि प्रधानांची ओळख करून दिली. दारात पोलिस आलेत हे पाहताच ती महिला थोडी बावरली. मग भानावर येत ती म्हणाली, “मी प्रणाली, आत या ना...” दोघं आत जाताच प्रणालीने दार लाऊन घेत विचारलं, “पोलिस इथे माझ्या घरी येण्याचं कारण... नाही म्हणजे माझ्याकडून काही...” प्रणालीचं म्हणणं पूर्ण होतं ना होतं तोच उमा म्हणाली, “प्रणाली मॅडम, आम्हाला आज सकाळी सुधीर नावाच्या माणसाची डेड बॉडी सापडली आहे...”

हे ऐकताच प्रणालीला धक्का बसला. ती काही क्षण स्तब्ध झाली. तिला शांत करत खुर्चीत बसवत उमा म्हणाली, “प्रणाली मॅडम, आज सकाळी सुधीरचा मृत्यू झाला. आम्ही सुधीरच्या आईला भेटलो. तिथे तुमच्याबद्दल समजलं. तपासाचा भाग म्हणून आम्ही इथे...” उमाला मध्येच तोडून डोळे पुसत प्रणाली बोलती झाली, “लपवण्यासारखं काहीच नाही. दोन वर्षांपूर्वी आमचं लग्न झालं. साधारण सहा महिने चांगले गेले. पण आमचं करियर आणि संसार एकत्र सांभाळणं आम्हा दोघांनाही जड जात होतं. वर्षभरापूर्वी आम्ही म्युचल कानसेंटने वेगळे झालो. आमचा घटस्फोट झाला आणि लगेच मला एक मोठी संधी चालून आली आणि मी इथे शिफ्ट झाले. आम्ही दोघं टचमध्ये होतो. सुधीरची इथे ट्रान्सफर झाली होती हे मला माहीत होतं. या रविवारी आम्ही भेटणारही होतो. पण आता...”

प्रणालीला पुन्हा दिलासा देत उमा आणि प्रधान तिच्या घरातून बाहेर पडले. जीपजवळ येत प्रधान म्हणाले, “तूला काय वाटतं उमा... या प्रणालीचा काही हात असू शकेल या मृत्यूमध्ये...” विचार करत उमा म्हणाली, “तिच्या बोलण्यावरून तर तसं...” उमा बोलतच होती, की प्रधानांचा फोन वाजला, “येस सचिन. ओके. तू लॅबवर ये. आम्ही तिथेच निघालोत...” फोन ठेवत प्रधान म्हणाले, “सुधीरचा फोन रिस्टोर झाला आहे. त्या डायरीतली नावं आहेत फोनमध्ये. सचिनने सर्वांना कॉल केले. त्यातल्या बऱ्याच जणांनी त्यांची देणी फेडली आहेत. आता दोनच गोष्टी राहिल्या आहेत. एक म्हणजे सुधीरचं ऑफिस आणि दुसरी आहे त्याची बॉडी. उमा, मला लॅबला ड्रॉप करून तू सुधीरचं ऑफिस गाठ...” लॅबच्या गेटजवळ प्रधान उतरले आणि उमा जीप घेऊन पुढे गेली. प्रधान लॅबमध्ये शिरले. तिथे आनंद आणि डॉ. गोखले त्यांची वाटच पाहत होते...

प्रधानांना पाहून पुढे येत डॉ. गोखले म्हणाले, “या प्रधान साहेब. मी आणि आनंद आत्ता या सुधीरबद्दलच बोलत होतो. सुधीरबद्दल सांगायचं, तर हा चाळीशीतला इसम होता. याला बी. पी.चा त्रास होता, जे याच्या लाईफ स्टाईलकडे पाहता नॉर्मल आहे. म्हणजे याच्या कामाच्या वेळा, स्ट्रेस, यांमध्ये हा त्रास उद्भवतोच. बाकी त्याला काही आजार नव्हता. याच्या अंगावर कुत्र्याच्या चाव्यांच्या आणि ओरखड्यांच्या खुणा आहेत. पण त्या घातक नाहीत. याच्या मृत्यूचं मुख्य कारण आहे विष, पॉयझन... या सुधीरचे डोळे आणि नखं निळी पडलेली तुम्ही पाहिलीतच. तो निळा रंग विषामुळेच आला. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे याच्या शरीरात विष शिरण्याचा एंट्री पॉईंट दुसरा तिसरा नसून कुत्र्याने दिलेले हे ओरखडे आहेत. हो प्रधान साहेब, कुत्र्यांच्या नखांच्या ओरखड्यातून विष सुधीरच्या शरीरात शिरलं आहे...”

हे ऐकून आनंद आणि प्रधान दोघांनाही नवल वाटलं. प्रधान म्हणाले, “म्हणजे डॉक, कुत्र्यांचे ओरखडे जीवघेणे नव्हते. पण विषामुळे ते ओरखडे फेटल बनले...” डॉ. गोखलेंनी होकारार्थी मान हलवली. आनंद म्हणाला, “म्हणजे ज्या कुत्र्यांनी सुधीरवर हल्ला केला, त्यांच्या नखांना विष होतं...” डॉ. गोखले पुढे म्हणाले, “आनंद, नुसतं विष नाही, तर जहाल विष होतं. त्या कुत्र्यांच्या नखांना सायनाईड होतं. तेच सायनाईड मला या सुधीरच्या बॉडीमध्ये सापडलं...” हे ऐकून प्रधान आणि आनंद अवाक झाले. आनंद पुढे काही बोलेल इतक्यात प्रधानांचा फोन वाजला, “हां उमा बोल... ठीक आहे. तू चौकीवर ये. मी आणि आनंद पोहोचतो तिथे...” फोन ठेवत डॉ. गोखलेंकडे पाहत प्रधान म्हणाले, “डॉक, सायनाईड एक जहाल विष आहे आणि ते असं बाहेर मिळत नाही. बरोबर...” प्रधानांना दुजोरा देत डॉ. गोखले म्हणाले, “राइट प्रधान साहेब. फक्त मोठ्या लॅब्समध्ये ते मिळू शकतं. पण अजून एका प्रकारे सायनाईड बनवलं जाऊ शकतं. सफरचंदाच्या किंवा अॅप्रीकॉटच्या बिया...”

डॉ. गोखलेंचं अभिवादन करून प्रधान आणि आनंद चौकीकडे निघाले. चौकीवर सर्वजण प्रधानांच्या केबिनमध्ये जमले. उमा म्हणाली, “सर, सुधीरचे ऑफिस रेकॉर्डस क्लीन आहेत. तो कामात एकदम चोख होता...” उमाच्या म्हणण्याला पुढे नेत सचिन म्हणाला, “आणि सर, सुधीरच्या फोनमध्येही काही विशेष नाही. मित्र-मैत्रिणींचे, देणेकऱ्यांचे, ऑफिसचे नंबर्स आहेत. पण त्यातून संशय यावा असं काहीच जाणवलं नाही...” दोघांचं बोलणं झाल्यावर आनंद म्हणाला, “सर, पण मृत्यू तर झालाय. आणि तोही संशयास्पदरित्या सायनाईडद्वारे. काहीतरी आहे, जे अजून आपल्या पाहण्यात आलं नाही...” आनंदकडे पाहत प्रधान म्हणाले, “राईटली सेड आनंद. या केसमधला कुठलातरी एक धागा अजून लपला आहे. हे तर नक्की आहे, की त्या कुत्र्यांनी कोणाच्यातरी इशाऱ्याने सुधीरवर हल्ला केला. पण कोणाचा इशारा... आणि का...” सर्वजण चर्चा करत असताना प्रधानांचा फोन वाजला...

“येस, सिनीयर इन्स्पेक्टर प्रधान स्पीकिंग... काय... बाहेर जाण्याचे सगळे मार्ग, सगळे गेट्स ताबडतोब बंद करा. कोणीही बाहेर जाता कामा नये. आम्ही येतोच...” कॉल कट करत टीमकडे वळत प्रधान म्हणाले, “प्रणालीचा मृत्यू झाला आहे. लेट्स मूव्ह...” जीपकडे जाताना प्रधानांनी घडयाळ पाहिलं, तर रात्रीचे पावणे अकरा वाजले होते. जीप सुरू झाली. उमा म्हणाली, “आत्ता थोड्या वेळापूर्वीच तर आपण प्रणालीला भेटलो. आणि आता तिच्या मृत्यूची बातमी येते...” ड्राईव्ह करत आनंद म्हणाला, “दोन दिवसांच्या कालावधीत दोन मृत्यू... आधी सुधीर आणि आता प्रणाली... आणि दोघांचाही एकमेकांशी संबंध होता...” उमासमोर बसलेला सचिन म्हणाला, “सुधीरच्या मृत्यूसाठी मी प्रणालीला जबाबदार धरत होतो. पण आता तिचाच मृत्यू झाला...” सर्वांचे विचार ऐकल्यावर प्रधान म्हणाले, “मला वाटतं, सुधीर आणि प्रणाली यांच्या मृत्यूमध्ये काहीतरी दुआ आहे. सुधीर आणि प्रणालीचा घटस्फोट होतो. प्रणाली जॉबसाठी इथे येते. काही काळाने सुधीरही ट्रान्सफर होऊन याच भागात येतो. वेगळे होऊनही ते रविवारी भेटायचं ठरवत असतात. पण त्या आधीच दोघंही मरण पावतात. देयर इज अ डॅम लिंक...”

जीप मधुबन सोसायटीमध्ये पोहोचली. पुढच्या भागात इतकी हालचाल नव्हती. पण सोसायटीच्या मागच्या बाजूला घोळका जमला होता. गर्दीतून वाट काढत चौघं घटनास्थळी पोहोचले. तिथे प्रणालीचा मृतदेह पडला होता. उमाने बॉडीची तपासणी सुरू केली. आनंद आणि सचिन तिथल्या परिसराची पाहणी करू लागले आणि प्रधानांनी गर्दीकडे मोर्चा वळवला. तिथे उभ्या माणसांपैकी एक म्हणाला, “सर, मी लक्ष्मण दिक्षीत. या सोसायटीचा सेक्रेटरी. वॉचमॅनने हा प्रकार मला सांगितला तेव्हा मी तुम्हाला कॉल केला...” प्रधानांनी लगेच प्रतिप्रश्न केला, “बॉडी सर्वात आधी कोणी पाहिली...” दोन माणसं समोर आली. एक म्हणाला, “सायेब, हा भीमा आनी मी जग्गू. भीमा फुडल्या ग्येटजवल आसतो, आनी मी इथे मागल्या ग्येटजवल

सवा धा वाजले होते. मी ग्येटजवल ज्येवायला बसलोच होतो. त्याच वेळी प्रणाली म्याडम थितून जात होत्या. रोज रात्री धा आनी साडे धाच्या मदे त्या चालायला इथे येतात. आत्ता पन आल्या. माला पाहून हासल्या आनी फुडे गेल्या. मी पुन्ना जेऊ लागलो. थोड्या वेळात मी दोन आवाज ऐकले. त्यातला एक प्रणाली म्याडमचा आवाज होता. मी इकडे आलो तर प्रणाली म्याडम इथं पडल्या होत्या. त्यांचे डोळे उघडे होते. मी त्यांच्या नाकाशी हात धरला पन... म्हनून मी दिक्षीत सायेबांना...” प्रधानांनी लगेच विचारलं, “प्रणालीच्या आवाजाआधी तू कोणाचा आवाज ऐकलास...” जग्गूने एकवार प्रणालीच्या मृतदेहाकडे पाहिलं आणि म्हणाला, “सायेब, तो आवाज मांजराच्या ओरडण्याचा होता...”

“या सोसायटीमध्ये मांजरं आहेत का...” प्रधानांच्या या प्रश्नाला उत्तर देत मि. दिक्षीत म्हणाले, “सर, पाळीव प्राण्यांना या सोसायटीमध्ये परमिशन नाही. काही जणांकडे पक्षी असलेले पिंजरे आहेत आणि काहींकडे फिश टॅंक्स आहेत. प्रणालीला मांजरांचा भारी शौक होता. सोसायटीच्या बाहेर असलेल्या मांजरांना ती खायला वगैरे द्यायची. त्यांच्यापैकी कोणी आत येत असावं...” मि. दिक्षीत बोलत असतानाच उमाने प्रधानांना बॉडीजवळ बोलावलं. उठून उभी राहत उमा म्हणाली, “सर, प्रणालीने नाईट गाऊन घातला आहे. तिच्या बॉडीजवळ चाव्या आहेत ज्या कदाचित तिच्या फ्लॅटच्या असू शकतात आणि तिचा मोबाईल पडला आहे. प्रणालीची नखं निळी पडली आहेत. तिच्या डोळ्यातही निळ्या रंगाची झाक आहे. तिच्या शरीरावर कुठेही जखमा नाहीत फक्त डाव्या पायाला घोटाजवळ ओरखडा आहे. सर, सुधीरच्या मृत्यूशी हा मृत्यू जुळतो आहे असं वाटतंय...”

उमा बोलतच होती, की आनंदने प्रधानांना आवाज दिला, “सर, इथे येता प्लीज...” उमाला बॉडीजवळ थांबवून प्रधान आनंदच्या दिशेने धावले. सोसायटीच्या मागच्या गेटच्या बाहेर आनंद आणि सचिन एका गुडघ्यावर बसला होते. प्रधान तिथे पोहोचले. तिथे त्यांना झाडीत एक मांजर मरून पडलेलं दिसलं. सचिन म्हणाला, “सर, तपास करत आम्ही इथे आलो. हे मांजर इथे मेलेलं आढळलं. याच्या तोंडातून फेस येत आहे आणि याची नखं व जीभ हलकी निळी पडली आहे. कदाचित याच मांजराचा आवाज जग्गूने ऐकला...” थोडा वेळ विचार करून प्रधान म्हणाले, “सचिन, दोन्ही बॉडीज घेऊन तू डॉककडे जा. आनंद, तू चौकीवर जाऊन सुधीर आणि प्रणाली यांच्या संदर्भात काही रेकॉर्ड आहेत का बघ. मी आणि उमा प्रणालीचा फ्लॅट चेक करतो. मि. दिक्षीत जरा आमच्यासोबत चला. कारण फ्लॅट ओनर समोर नसताना आम्हाला झडती घ्यायची आहे...”

सचिन आणि आनंद त्यांच्या त्यांच्या वाटेने गेल्यावर उमा आणि प्रधान मि. दिक्षीतांसोबत प्रणालीच्या फ्लॅटमध्ये पोहोचले. झडती सुरू झाली. मि. दिक्षीत एका बाजूला उभे होते. घरात काही संशयास्पद समोर येत नव्हतं. बेडरूममध्ये एका टेबलवर लॅपटॉप ठेवला होता. उमाने लॅपटॉप सुरू केला. त्यात खूप फोल्डर्स होते. एका फोल्डरचं नाव हनीमून होतं. उमाने तो फोल्डर उघडला. त्यात प्रणाली आणि सुधीरचे खूप फोटोस आणि व्हिडियोज होते. त्यांची तारीख दोन वर्षांपूर्वीची होती. उमाने सगळे फोटोज प्रधानांना दाखवले. प्रधान म्हणाले, “यात, सुधीर आणि प्रणाली ज्या हॉटेलमध्ये राहिले होते, तिथले फोटोसुद्धा आहेत. हॉटेलचं नाव, गोल्डन हिल्स, लोणावळा...” त्याच वेळी प्रधानांचा फोन वाजला, “येस आनंद, ओके. आम्ही येतोच...” फोन ठेवत प्रधान म्हणाले, “आनंदला दोन वर्ष जुनी एक केस सापडली आहे ज्यात सुधीर आणि प्रणाली दोघांचाही संबंध आहे. मि. दिक्षीत, हा लॅपटॉप आम्ही घेऊन जात आहोत. सोसायटीच्या बाहेर कोणीही जाणार नाही. आम्ही गेटवर हवालदार तैनात करत आहोत. त्या भीमा आणि जग्गूलाही सांगून ठेवा. लेट्स गो...”

थोड्याच वेळात प्रधान आणि उमा चौकीवर पोहोचले. आनंद त्यांची वाटच पाहत होता. जसे दोघं आत आले, तसा आनंद म्हणाला, “सर, दोन वर्षांपूर्वीची लोणावळ्याची केस आहे. सुधीर आणि प्रणाली यांनी दिनेश नावाच्या माणसाविरुद्ध कंप्लेन्ट केली होती. ती केस असं सांगते, की दिनेश या प्रणालीचा पाठलाग करायचा. एकदा त्याने प्रणालीला एकटी पाहून तिची छेड काढली. तेव्हा सुधीर आणि तिथल्या काही स्थानिकांनी दिनेशला मारहाण केली आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. सेक्शन ३५ए खाली दिनेशला दोन वर्षांची शिक्षा झाली. सर, हा दिनेश, मि. दिनकर यांचा धाकटा भाऊ आहे. आणि मि. दिनकर, अंबा लॅब्समध्ये असिस्टंट आहे. हे ऐकून प्रधान आणि उमा दोघांनीही डोळे मोठे केले. स्क्रीनवर आलेला केस फाईलमधला दिनेशचा फोटो जेव्हा प्रधानांनी पाहिलं, तेव्हा फोटोकडे काही क्षण पाहत प्रधान म्हणाले, “याला मी कुठेतरी पाहिलं आहे...” बोलता बोलता प्रधानांनी माऊसने फोटोला दाढी-मिशा काढल्या. समोर आलेला चेहेरा पाहून सर्व अवाक झाले...

उमा म्हणाली, “सर, हा तर...” तिचं बोलणं पुढे नेत आनंद म्हणाला, “भीमा आहे. मधुबन सोसायटीमधला गार्ड...” त्यावर प्रधान म्हणाले, “म्हणजे दिनेशने भीमा नाव धारण करून मधुबन सोसायटीमध्ये नोकरी धरली. उमा, आनंद, आपल्याला लगेच तिथे जायला हवं. हा दिनेश कदाचित निसटण्याच्या प्रयत्नात असावा...” सर्व मधुबन सोसायटीकडे निघाले. वाटेत प्रधानांना सचिनचा कॉल आला, “बॉल सचिन. ओके. आम्ही मधुबन सोसायटीकडेच निघालो आहोत. तूही तिथे ये ताबडतोब...” कॉल कट करत प्रधान म्हणाले, “प्रणालीचा मृत्यूसुद्धा सायनाईडमुळे झाला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तेच विष त्या मांजराच्या नखात, जिभेवर आणि पोटात सापडलं आहे. आपले पंजे चाटण्याच्या प्रयत्नात ते विष त्या मांजराच्या नखातून जिभेवर आणि मग पोटात गेलं असावं...” प्रधानांना उत्तर देत उमा म्हणाली, “सर, मांजर असा प्राणी नाही जो उगाच कोणाला इजा करेल, जोवर त्याला कोणी दिवचत नाही. आणि प्रणालीची बॉडी जिथे सापडली, ती जागा चांगली मोकळ्यावर आहे. बरं, मि. दिक्षीतांचं म्हणणं आहे, की प्रणालीला मांजरं आवडायची. मग प्रणाली कशाला दिवचेल मांजराला...”

उमाकडे पाहत आनंद म्हणाला, “बरोबर आहे उमा तुझं. मांजरं अशी स्वत:हून हल्ला करत नाहीत. पण जिथे प्रणालीचा मृतदेह सापडला, तिथे प्रकाश कमी होता. होऊ शकतं, की ते मांजर तिथे आलं असताना अंधारात प्रणालीला दिसलं नाही आणि त्याच्या शेपटीवर किंवा अंगावर प्रणालीचा पाय पडला म्हणून मांजराने बोचकारलं तिला...” बोलणं सुरू असताना प्रधानांनी आनंदला मि. दिनकरचा पत्ता शोधायला सांगितलं. जीप मधुबन सोसायटीमध्ये पोहोचली. गेटजवळ एक हवालदार बेशुद्ध अवस्थेत पडला होता. सचिनही त्याचवेळी तिथे पोहोचला. प्रधानांच्या “इथला तो दुसरा गार्ड जग्गू कुठे गेला..?” या प्रश्नावर कोणाकडेही उत्तर नव्हतं. त्या जखमी हवालदाराला घेऊन सचिन लगेच हॉस्पिटलला रवाना झाला आणि बाकी तिघं सोसायटीत गेले. प्रधान चिडले आणि मूठ आवळत म्हणाले, “डॅम. दिनेश सटकला. पण गेला कुठे असेल तो..!” उमा लगेच म्हणाले, “सर, मि. दिनकरची मदत मागायला तर गेला नसेल...” उमाला दुजोरा देत आनंद म्हणाला, “यू में बी राईट उमा. मि. दिनकर इथून जवळच राहतात...” तेवढ्यात जग्गू समोर आला. प्रधानांचा रागीट चेहेरा पाहून तो स्वत:च म्हणाला, “सायेब, माला भीमा म्हनाला मागे काहीतरी हालचाल दिसते. म्हनून मी इथे आलो...”

प्रधानांनी होकारार्थी मान हलवली आणि म्हणाले, “ठीक आहे. हे मागचं गेट लॉक करून तू इथेच थांब. अँड बी एलर्ट...” सर्वजण पुन्हा जीपकडे वळले. सचिनला कॉल करत प्रधान म्हणाले, “सचिन, आपल्याला हवा असलेला माणूस दिनेश म्हणजे भीमा आहे. मी तुला लोकेशन पाठवतो. तू लगेच तिथे ये...” फोन कट करत प्रधान म्हणाले, “कदाचित मि. दिनकरचाही जीव धोक्यात असू शकतो...” जीप एका घराजवळ पोहोचली. एका अरुंद गल्लीच्या शेवटी असलेला तो एक छोटेखानी बंगला होता. गेटच्या थोडं आधी जीप थांबली. सर्वजण खाली उतरले आणि आपापल्या पिस्तुली तपासल्या. हळू आवाजात प्रधान म्हणाले, “Be careful. We are dealing with a person who handles Cyanide. The most dangerous poison. A few drops going inside, and we are gone…” दबकत दबकत सर्वजण घराच्या अंगणात पोहोचले. संपूर्ण घर अंधारात बुडालेलं होतं...

प्रधानांनी उमा आणि आनंदला वेगवेगळ्या दिशेला जाण्याचा इशारा केला. प्रधान स्वत: मुख्य दरवाजाकडे गेले. उमाने घराची डावी बाजू घेतली तर आनंद उजव्या दिशेला वळला. काही क्षणातच तिघंही आपापल्या स्पॉटवर पोहोचले. तिघांनी घड्याळं चेक केली. मग बोटांवर १...२...३... मोजून तिघांनी एकाच वेळी तीन दिशांनी घरात प्रवेश केला. घरात पूर्ण काळोख होता. प्रधान लिव्हिंग रूममध्ये होते. उमा डाव्या बाजूच्या एका खोलीत होती तर आनंद उजव्या बाजूच्या खोलीत उभा होता. तिघांनी आपापल्या टॉर्च ऑन केल्या आणि आजू-बाजूला पाहू लागले. त्या घरात त्यांना चिटपाखरूही दिसत नव्हतं. उमा पुढे जात असताना भिंतीला लावलेल्या आरशात तिला प्रतिबिंब पाहिल्यासारखं जाणवलं. उमा थबकली आणि झटक्यात मागे वळली. पण तिथे कोणीच नव्हतं. पुन्हा वळून उमा पुढे जाऊ लागली. इतक्यात कोणीतरी तिला मागून धरलं आणि उमाची गन खाली पडली...

त्या व्यक्तीने उमाला पुढे ढकललं आणि लिव्हिंग रूममध्ये घेऊन आला. उमाला ओलीस धरलं आहे, हे दिसताच प्रधानांनी त्यांची गन उमा आणि त्या अनोळखी व्यक्तीवर रोखली. आनंदही उजव्या बाजूच्या खोलीतून बाहेर आला आणि त्यानेही त्यांची गन त्या अनोळखी व्यक्तीच्या दिशेने केली. टॉर्चचा प्रकाश अंधुक होता, त्यामुळे त्या व्यक्तीचा चेहेरा नीटसा दिसत नव्हता. ती व्यक्ती म्हणाली, “Hold it officers… नाहीतर ही तुमची लेडी ऑफिसर हाकनाक मरेल...” एका हाताने गन उमाच्या डोक्याच्या दिशेने रोखत त्या व्यक्तीने दुसरा हात वर केला. त्या हातात एक काचेची छोटी बाटली होती. ती बाटली नाचवत ती व्यक्ती म्हणाली, “या बाटलीत अॅसिड आहे. अजिबात हलू नका कोणी. नाहीतर...” उमाचा ढालीसारखा वापर करत ती अनोळखी व्यक्ती मुख्य दरवाजाच्या दिशेने मागे सरकू लागली... ती व्यक्ती दाराबाहेर पडलीच होती, की एक जोरदार लाथ त्या व्यक्तीच्या दंडाला बसली. अॅसिड असलेली बाटली हवेत उडाली...

आनंदने त्वरेने झेप घेऊन ती बाटली अलगद झेलली. ती व्यक्ती उमापासून जरा दूर गेलेली पाहून उमाने तिच्या कोपराने त्या व्यक्तीच्या पोटात गुद्दा हाणला. “आह...” असं विव्हळत ती व्यक्ती मागे गेली आणि मागे उभ्या सचिनने त्या व्यक्तीची कॉलर धरून आपली गन त्या व्यक्तीच्या कपाळाला लावली. घरातले लाईट लावले गेले. त्या व्यक्तीला एका खुर्चीत बसवलं गेलं. खुर्चीजवळ येत प्रधान म्हणाले, “भीमा... नाही नाही... दिनेश... बरोबर ना...” बोलता बोलता प्रधानांनी त्या व्यक्तीची दाढी आणि मीशी खेचून काढली. खुर्चीत बसलेला दिनेश रागाने लाल झाला होता. त्याने प्रधानांवर हल्ला करायचा प्रयत्न केला पण सचिन आणि आनंदने दिनेशचे दोन्ही हात धरून त्याला परत खुर्चीत बसवलं. प्रधान म्हणाले, “स्टॉप इट दिनेश. तू आता पळू शकत नाहीस...” प्रधानांकडे पाहून दिनेश म्हणाला, “मी दिनेश नाही. दिनकर आहे. मी आणि दिनेश जुळे होतो. दिनेश माझ्यापेक्षा दोन मिनिटेच लहान होता. माझं लग्न झालं होतं आणि दिनेशचा साखरपुडा ठरला होता...

दोन वर्षांपूर्वी आम्ही दोघं आणि आमचे काही मित्र लोणावळ्याला ट्रीपसाठी गेलो होतो. तिथे फिरताना मला प्रणाली दिसली. मला ती आवडली. तिच्यासोबत कॉफी प्यावी म्हणून मी लगेच तिच्याजवळ गेलो आणि कॉफीबद्दल विचारलं. काहीही न बोलता प्रणाली एका दिशेने चालू लागली. मी तिचा पाठलाग करू लागलो. त्याचवेळी तिचा तो नवरा सुधीर तिथे आला. त्याने मला जायला सांगितलं, पण त्याच्या बोलण्याकडे लक्ष न देता मी प्रणालीला पुन्हा कॉफीसाठी विचारलं आणि तिचं मनगट पडकलं. हे पाहून सुधीरने मला थोबाडीत मारली. तिथे असलेल्या काही लोकांनी आम्हाला घेरलं. मग सुधीर आणि त्या लोकांनी मला मारायला सुरुवात केली. त्या प्रणालीने पोलिसांना बोलावलं आणि मला तिथून पळावं लागलं. मी हॉटेलवर पोहोचल्यावर माझी अवस्था पाहून दिनेशने माझ्याकडे विचारणा केली. रस्त्यावर घडलेली सगळी घटना मी दिनेशला सांगितली. दिनेशने थोडा विचार केला. मग मला शांत केलं आणि याबद्दल कोणालाही काहीही सांगायचं नाही असं सांगितलं...

तेवढ्यात माझ्या मागावर असलेले पोलिस तिथे आले आणि मला वाचवण्यासाठी दिनेश स्वत: पोलिसांच्या स्वाधीन झाला. त्याला दोन वर्षांची शिक्षा झाली. मी मुंबईला परतलो आणि तेव्हा समजलं, माझ्या बायकोने घटस्फोटाची मागणी केली. तिचं म्हणणं, मुलींची छेड काढणाऱ्या माझ्यासारख्या माणसासोबत तिला संसार करायचा नव्हता. दिनेशच्या होणाऱ्या बायकोनेही साखरपुडा मोडला. मी दिनेशला याबद्दल काहीही सांगितलं नाही. दोन वर्षानंतर शिक्षा संपवून दिनेश घरी आला. त्याला माझ्या घटस्फोटाबद्दल आणि त्याच्या मोडलेल्या साखरपुड्याबद्दल समजलं. दिनेशने अगदी शांतपणे हे सर्व घेतलं. मला वाटलं दिवस पुढे सरकतील तशा आमच्या या जखमा भरतील आणि आयुष्य सुरळीत होईल. पण या समाजाला हे मान्य नव्हतं. त्या केसवरून आम्हाला टोमणे मारणं, आमची हेटाळणी करणं सुरूच राहिलं. दिनेशची आणि माझी नोकरीही गेली होती. दिनेशला हे सगळं सहन झालं नाही. आणि काही दिवसांनी त्याने स्वत:ला संपवून टाकलं...

यामुळे मला खूप वाईट वाटलं. माझी जवळची माणसं, माझा भाऊ, मित्र-मंडळी सर्वच दुरावले मला. फक्त एक कप कॉफी प्यावी इतकीच तर मागणी होती माझी. त्यात काय मोठी गोष्ट होती... पण ती प्रणाली आणि तो सुधीर... दोघांनी मिळून आयुष्य बरबाद केलं माझं. नुसतं माझंच नाही, तर दिनेशलाही त्यांनी आयुष्यातून उठवलं. मला त्या दोघांवर सूड उगवायचा होता. होतं-नव्हतं ते सर्व विकून मी मुंबईला आलो आणि हे घर घेतलं. मी, सुधीर आणि प्रणालीबद्दल माहिती मिळवली. मला समजलं त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर काही महिन्यांनी प्रणाली मुंबईत आली आणि माझ्या घराजवळच राहू लागली. मी माझा गेटअप बदलला आणि मधुबन सोसायटीमध्ये गार्ड म्हणून नोकरी धरली. बरेच दिवस मी प्रणालीवर नजर ठेवली. रोज रात्री ती प्रणाली सोसायटीमध्ये वॉक घ्यायची. सोबत तिला मांजरांचीही आवड होती हेही मला समजलं. एक मांजर नेहमी मागच्या गेटजवळ असायचं. प्रणाली त्याला खायला द्यायची. त्याच्याशी खेळायची. मी ठरवलं, प्रणालीला याच मांजराच्या हातून मारायचं...

अंबा लॅब्समध्ये मी बरीच वर्षे काम केलं होतं. सायनाईड कसं बनवायचं हे मला माहीत होतं. मी सायनाईड बनवलं. मी काही कुत्रे विकत घेतले. त्यांच्या पंजांना सायनाईड लाऊन त्यांच्या करवी इतर छोट्या जनावरांना चावण्याचं ट्रेनिंग, मला जमेल तसं मी त्या कुत्र्यांना दिलं. रिझल्ट्स पाहून मी मनोमन सुखावलो. कुत्र्यांसोबत माझं काम फत्ते झालं. आता प्रश्न होता त्या मांजराला कसं हाताळायचं. मी त्या मांजरांशी जवळीक वाढवली. त्या मांजराची माझ्याबद्दलची भीती कमी झाली. मी प्रणालीला संपवण्याचा दिवस ठरवला. एक दिवस प्रणालीवर नजर ठेवताना मला समजलं, सुधीरसुद्धा मुंबईत आला आहे. मला मारहाण करणारा सुधीरच होता. दिनेशविरुद्ध पहिली साक्ष देणारा सुधीरच होता. मला हेसुद्धा समजलं, की सुधीरला कुत्रा हा प्राणी खूप आवडतो. मी माझ्या कुत्र्यांकरवी आधी सुधीरचा काटा काढला. थोडे दिवस थांबून मग प्रणालीलाही संपवायचं असं मी ठरवलं. पण ते मूर्ख मांजर...

सोसायटीच्या मागच्या गेटजवळ एक झाड आहे. तिथे मी सायनाईडची बाटली पुरून ठेवली होती. तुम्ही लोक सोसायटीमध्ये आल्यावर सुधीरचा मृत्यू सायनाईडमुळे झाला आहे याचा सुगावा तुम्हाला लागल्याचं समजलं. म्हणून तुर्तासतरी प्रणालीला मारण्याचा विचार मी सोडून दिला. रात्री झाडाच्या डोलीतून सायनाईडची बाटली काढली आणि त्याचवेळी ते मांजर पायात घुटमळलं माझ्या. बाटली उघडली गेली आणि ते विष जमीनीवर पडलं. त्यातच नाचत ते मांजर माझ्या पायाजवळ आलं. मला ती बाटली लपवण्याची चिंता लागली होती. मी त्या मांजराला लाथ घातली. ते मांजर पळालं आणि त्याच वेळी प्रणाली तिथे पोहोचली. भेदरलेल्या त्या मांजराने प्रणालीला पंजा मारला. आणि नंतर धावत गेटबाहेर पळून गेलं. तिथे जाऊन त्याने लगेच स्वत:चे पंजे चाटले आणि लगेचंच ते मरून पडलं. हे पाहून मी बाटली खिशात घातली आणि तिथून पळ काढला आणि माझ्या जागी येऊन बसलो जिथे त्या ओरडण्याचा आवाज आला नसता...

जग्गू मला बोलवायला आला आणि मी पुन्हा त्याच्यासोबत इथे आलो. सुधीरचा खून जसा मी पचवला तसा हाही खून मी पचवला असता. पण ते बिनडोक मांजर. स्वत:च्या पंजांना चाटून त्याने स्वत:ला तर संपवलंच, पण माझाही घात केला...” दिनकर बोलायचा थांबला. प्रधानांनी दिनकरच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, “दिनकर, तुझ्या पापांची शिक्षा तुझ्या भावाला भोगावी लागली. खरा दोषी तू आहेस. पण याचा तुला तिळमात्र पश्चात्ताप नाही. उलट तू प्रणाली आणि सुधीरवर सूड उगवण्याचा कट रचलास, ज्यांची काहीच चूक नव्हती. या कामी तू मुक्या जनावरांचाही वापर करून त्यांना मारलंस. तू विकृत आहेस. तुला कठोर शिक्षा होईल हे पाहीन मी...” हे ऐकून दिनकरच्या मुखावर एक क्रूर हसू उमटलं...

समाप्त.

@ अनिकेत परशुराम आपटे.

No comments:

Post a Comment