Tuesday, December 24, 2024

नाईट वॉचमन...

वेळ मध्यरात्रीकडे सरकत चालली होती. सगळीकडे सामसूम होतं. वृंदावन सोसायटीच्या मेन गेटबाहेर असलेल्या रस्त्यावर रामूने नजर फिरवली. सर्वत्र नीरव शांतता पसरली होती. रामूने पुन्हा एकदा आपली नजर फिरवली आणि जागेवर येऊन बसला. घड्याळाकडे पाहत म्हणाला, "आता थोडाच वेळ. मग सगळं नीट होईल..." रामूने पुस्तक काढलं आणि वाचायला सुरुवात केली. वाचता वाचता सहज त्याची नजर वर गेली आणि तो दचकला...


समोर काळोखात त्याला एक आकृती दिसली. रामूने भीत-भीत टॉर्च पेटवला. समोर एक मुलगी उभी होती. मुलीला पाहून रामूची भीती थोडी कमी झाली. थोडा त्रासिक चेहेरा करत रामूने तिला खुणेनेच विचारलं. ती म्हणाली, "काका, मला स्टेशनला कसं जायचं सांगता का..." उभा राहत रामू म्हणाला, "गेटच्या समोरून जो रस्ता जातोय, त्याने जा. रस्ता संपेल तिथे एक आडवा रस्ता लागेल. डावीकडे वळा, तासाभरात स्टेशन..." त्या मुलीने घड्याळ पाहिलं आणि रडवेला चेहेरा करत म्हणाली, "बापरे. तासभर लागेल... माझी साडे-बाराची ट्रेन आहे हो. आणि आत्ताच पावणे बारा झालेत. दुसरा कुठला मार्ग नाही का..."

रामूने त्या मुलीकडे एकवार पाहिलं. मग उभा राहत गेटकडे बोट दाखवून म्हणाला, "हा रस्ता संपल्यावर समोर एक स्मशानाचं गेट आहे. त्यातून सरळ चालत जाऊन दुसऱ्या गेटने बाहेर पडलात की पाचव्या मिनिटाला स्टेशन येईल. इथून फक्त वीस मिनिटं लागतील..." मुलीने गेटकडे पाहिलं आणि पुन्हा म्हणाली, "इतक्या रात्री स्मशानातून जायचं... काका, तुम्ही सोबत कराल माझी... मला फक्त स्मशानाच्या दुसऱ्या टोकाला सोडून तुम्ही परत या. तासाभरात याल तुम्ही. मी तुमच्या मुलीसारखी आहे हो... प्लीज..." रामूने तिच्याकडे पाहिलं. थोडा विचार केला आणि तिला तिथेच थांबायला सांगून त्याने सोसायटीला एक चक्कर मारली. मग टॉर्च घेऊन तिच्यासोबत निघाला...

दहाच मिनिटात दोघं स्मशानाच्या गेटजवळ पोहोचली. अर्ध्या उघड्या गेट मधून दोघांनी आत प्रवेश केला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला थडगी दिसत होती. वातावरण अगदी शांत होतं. आजू-बाजूला पाहत ती मुलगी म्हणाली, "किती भयाण शांतता आहे इथे... आणि ते गेट उघडं कसं..." रामूने स्मित केलं आणि म्हणाला, "अगं पोरी, स्मशान आहे हे... इथे कोण काय चोरणार... गेली काही वर्ष हाच माझा जायचा-यायचा रस्ता आहे. तसा मी मूळचा इथला नाही बरं. बायको आणि मुलगी गावाकडे होत्या. पण एका रात्री... जाऊ देत माझी कर्म-कहाणी. तू सांग की तुझ्याबद्दल..." त्या मुलीने एकदा रामूकडे पाहिलं आणि रस्त्याकडे पाहत म्हणाली, "मी रेणू. शहरात राहते. इथे मामाकडे आले होते. तशी दर वर्षी मी येते इथे. पण मध्ये अमेरिकेला गेले होते. मग तो कोविड आला. त्यामुळे येणं झालंच नाही काही वर्षात. मागच्याच वर्षी आले तर इथे सगळं पार बदलेलं आणि त्याबरोबर माझं आयुष्यही..." रेणू गप्पं झाली...

हे ऐकून रामू म्हणाला, "पोरी, असं अवेळी फिरू नये. रहायचंस मामाकडे नि उद्या निघायचंस..." बोलता बोलता रामूने बाजूला पाहिलं, तर रेणू तिथे नव्हती. रामूने वळून सगळीकडे पाहिलं. पण रेणू कुठेच दिसत नव्हती. रामूने टॉर्च चालू केला आणि पण तरीही त्याला रेणू दिसली नाही. काळजीपोटी रामू वळला आणि समोर त्याला एक आकृती दिसली. रामू दचकला आणि त्याने थरथरत्या हाताने टॉर्च वर केला. त्या प्रकाशात त्याला रेणू दिसली. "पोरी, अगं होतीस कुठे... काळजाचा ठोका चुकला माझ्या..." हे रामूचं वाक्य संपतं न संपतं तोच रेणू म्हणाली, "घाबरलात काका... मी तर माझी ही तुटलेली चेन उचलायला बाजूला गेले होते..." रेणूचा चेहेरा एकदम शांत दिसत होता. तिच्या आवाजातही एक वेगळेपणा होता. रेणूने वर केलेल्या उजव्या हातात एक तुटलेली चेन चमकत होती. रेणू पुढे म्हणाली, "मी म्हणाले होते ना, दर वर्षी मी मामाकडे यायचे. गेल्या वर्षी इथे आले तेव्हाच उशीर झाला मला. तुमच्याच वयाचा होता तो वॉचमन. मला एकटी पाहून याच स्मशानात त्याने... त्यावेळी ही चेन तुटून झाडीत पडली. मला मारताना त्या नराधमाच्या डोळ्यात जराही दया नव्हती. हे बघा. माझ्या गळ्यावर अजूनही त्याच्या वाराचा घाव आहे. तेव्हापासून मी इथेच फिरते आहे. त्या वॉचमनच्या शोधात. आज त्याच्याच वयाचे तुम्ही भेटलात..."

रेणूचं ते करारी बोलणं ऐकताना रामूचे डोळे विसफारले. तो दोन पावलं मागे सरकला. टॉर्च त्याच्या हातून पडून बंद झाला. तिथे पूर्ण अंधार झाला आणि रामूला पुन्हा रेणू एका आकृतीच्या रूपात दिसू लागली. रामूचे डोळे अजून विसफारले गेले. तेवढ्यात रेणू जोर-जोरात हसू लागली. काही क्षणात तिथे हॅलोजन लाईट्स सुरू झाले. हसण्याचा आवाज दुप्पट-तिप्पट झाला आणि लगेच चारही बाजूने काही पोरं-पोरी हसत बाहेर पडले. सर्वांनी रेणूला टाळ्या दिल्या. रामूकडे पाहत रेणू म्हणाली, "सॉरी काका. आम्ही सगळे मस्करी करत होतो. सॉरी हं तुम्हाला त्रास दिला... मंडळी, पैज जिंकले मी. याच वॉचमन काकांना पुन्हा घाबरवलं. काकांचा चेहेरा बघा पार पांढरा पडलाय. सगळे एकमेकांना टाळ्या देत हसत होते. त्यांच्या हसण्याचा आवाज त्या स्मशानात घुमत होता...

पहाट झाली. बऱ्यापैकी उजाडलं होतं. स्मशानाच्या गेटवर गर्दी जमली होती. एक पोलीस जीप तिथे येऊन थांबली. एक इन्स्पेक्टर उतरत गर्दीकडे पाहून म्हणाला, "कोणी फोन केला होता... काय झालं इथे..." एक माणूस पुढे होत म्हणाला, "साहेब, मी संजय. वृंदावन सोसायटीचा नाईट वॉचमन. ड्युटी संपवून स्टेशनकडे चाललो होतो. शॉर्टकट म्हणून स्मशानाचा रस्ता धरला. तर आत ते अघटित पाहिलं..." इन्स्पेक्टर आत गेला. पाठोपाठ गर्दीही गेली. स्मशानाच्या मध्यभागी सहा मृतदेह पडले होते. हवालदार ते मृतदेह तपासत होते. इन्स्पेक्टरला पाहून सर्वांनी सलाम केला. मग एक जण म्हणाला, "सर, हे सगळे मेलेत. यांच्या कोणाच्याच शरीरावर कसल्याही खुणा नाहीत. फक्त सर्वांचे डोळे विसफारलेले आहेत. सर्वजण तिशीतले वाटतात आणि यांचा मृत्यू बहुतेक मध्यरात्रीच्या आस-पास झाला असावा..."

हे ऐकून संजय म्हणाला, "साहेब हा प्रकार इथे दुसऱ्यांदा घडला आहे. सहा वर्षांपूर्वी वृंदावन सोसायटीमध्ये माझ्या सोबत अजून एक वॉचमन होता. मी डे शिफ्टला होतो तर तो नाईटला. सहा वर्षांपूर्वी तो नाईट वॉचमन असाच मेलेला आढळला. आम्हाला वाटलं दारूमुळे खपला म्हणून काही विशेष चर्चा केली नाही. तो स्वभावाला खूप छान होता. त्याची आठवण म्हणून या स्मशानात हा नाईट लॅम्प लावला गेला. पण तो कधीच पेटला नाही. आज सहा वर्षांनी त्याच ठिकाणी हे सहाजण तसेच मरून पडलेत साहेब..." संजयचं हे बोलणं ऐकून इन्स्पेक्टर गोंधळला आणि त्याने त्या वॉचमनचं नाव विचारलं. संजय म्हणाला, "रामू नाव होतं त्याचं. मी त्यांना रामू काका म्हणायचो..." यावर इन्स्पेक्टर म्हणाला, "म्हणजे, सहा वर्षांपूर्वी अशाच प्रकारे त्या वॉचमन रामूचाही मृत्यू झाला होता... आणि त्याची कुठेच वाच्यता नाही... काय घडलं या स्मशानात, तेव्हा आणि आत्ता, हे आपल्याला शोधायला हवं. तूर्तास या सर्व डेड बॉडीज ऍटोप्सीसाठी घेऊन चला आणि स्मशानाची दोन्ही गेट्स सील करा..."

इतकं बोलून हवालदारांना बॉडीजसह पुढे पाठवून, तो इन्स्पेक्टरही निघून गेला. सगळी गर्दी पांगली. संजयसुद्धा त्याच्या वाटेने चालू लागला. सगळे गेटबाहेर पडताच गेट पूर्ण बंद करून सील ठोकलं गेलं. जाता-जाता संजय थबकला. पुन्हा गेटजवळ येऊन म्हणाला, "रामू काका, रात्री मला बाथरूममध्ये बंद करणारे, पहाटे दाराची कडी काढणारे, रात्रभर माझ्या जागी सोसायटीचं रक्षण करणारे आणि तुमच्या मृत्यूचं कारण बनलेल्या त्या सहा जणांना धडा शिकवणारे तुम्हीच होता ना..." संजयच्या डोळ्यात पाणी तरारलं. त्याने स्मशानाकडे पाहून हात जोडले आणि आपल्या वाटेने निघून गेला. स्मशान पुन्हा शांत झालं. रामूच्या स्मरणार्थ उभारलेला तो नाईट लॅम्प हळू हळू लुकलुकत प्रकाशमान झाला...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Monday, December 9, 2024

Deposits बद्दल बोलू काही...

'Deposit' हा शब्द ऐकला, की आपल्याला आठवते ती बँक किंवा पतपेढी. काहीजण पोस्टातही ठेवतात. पण बहुतकरून बँका. Deposits तीन प्रकारची असतात. SB म्हणजे Saving Bank Deposits, FD म्हणजे Fixed Deposits आणि RD म्हणजे Recurring Deposits. यातल्या FD आणि RD बद्दल थोडंसं...


Fixed Deposits...

एक ठराविक रक्कम एका ठराविक काळासाठी बँकेत ठेवली जाते. त्यावर एका ठराविक दराने बँक व्याज देते. FDचे मुख्य दोन प्रकार आहेत. पहिला Short Term Deposit, जे 14 दिवसांपासून 364 दिवसांपर्यंत केले जाते. दुसरा आहे Long Term Deposit, जे 365 दिवस ते 10 वर्षांपर्यंत ठेवले जाते. Long Term Depositचेही दोन प्रकार आहेत. Simple Interest Deposit अर्थात सरढोपट व्याज, आणि Cumulative किंवा Compounded Interest Deposit अर्थात चक्रवाढ व्याज. थोडा वेगळा पण अजून एक प्रकार अस्तित्वात आहे. तो म्हणजे Linked Deposit. यात, दर शनिवारी खात्यात ठराविक रक्कम ठेऊन बाकी सगळ्या रकमेला depositमध्ये गुंतवलं जातं. हे deposit 180 किंवा 360 दिवसांचं असतं. याची पावती मिळत नाही पण माहिती मिळते. मोठ्या खर्चाची गरज असताना FIFO (First In First Out) पद्धतीने deposit बंद होऊन पैसे खात्यात येतात...

Simple Interest Depositमध्ये, आलेलं वर्षाचं व्याज विभागलं जातं, आणि महिन्याच्या किंवा तीन महिन्यांच्या शेवटी ते तुमच्या खात्यात जमा होतं. काहीजण सहा महिने किंवा वर्षही निवडतात पण तो कालावधी मोठा असल्याने जास्त निवडला जात नाही. Cumulative किंवा Compounded Interest Depositमध्ये दर तीन महिन्याला व्याजाची गणना होते आणि आलेला आकडा तुमच्या मूळ रकमेत जोडला जातो...

Renewal...

सर्व बँकांमध्ये renewalसाठी दोन मुख्य प्रकार असतात. ATR म्हणजे Auto Renewal Facility. अर्थात, depositच्या due dateला, depositमध्ये असलेली रक्कम, deposit सुरू करताना निवडलेला कालावधी वापरून पुढे सुरू ठेवली जाते. पण व्याज दर मात्र आधीचा ग्राह्य न धरता, चालू व्याज दर धरला जातो. दुसरा प्रकार आहे No ATR म्हणजे Do Not Auto Renew. अर्थात, depositच्या due dateला ते deposit बंद होऊन सर्व रक्कम तुमच्या खात्यात जमा होते...

Maturity Date...

बऱ्याच वेळा प्रश्न पडतो, आपल्या depositची शेवटची तारीख काय... कारण जी शेवटची तारीख लिहिली असते, त्या तारखेला सकाळीच ते deposit renew होतं किंवा खात्यात जमा होतं आणि आपलं एक दिवसाच्या व्याजाचं नुकसान झालं असं समजून आपण चिडतो. आपण साधं उदाहरण घेऊ. एका calendarचं वर्ष म्हणजे 1 जानेवारी ते 31 डिसेम्बर. नवीन वर्ष पुन्हा 1 जानेवारी. म्हणजेच 31 डिसेम्बरचा दिवस पूर्ण झाल्यावर वर्ष संपतं. तेच गणित FDसाठीसुद्धा लागू होतं. 1 जानेवारी रोजी तुम्ही एक वर्षाची FD केली असेल तर शेवटची तारीख 31 डिसेम्बर असते आणि due date 1 जानेवारी असते. म्हणून FD वर जी due date असते, ती FDचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरच्या दिवसाची तारीख असते आणि त्याच तारखेला सकाळी सकाळी त्या FDचा निकाल लागतो...

Recurring Deposits...

Recurring deposits अर्थात आवर्ती ठेव. म्हणजे छोट्या छोट्या मासिक हफ्त्यातून तयार झालेली मोठी रक्कम. Recurring Depositsचे दोन प्रकार आहेत. Simple RD आणि Flexi RD. Simple RD मध्ये दर महिन्याला फक्त एकदाच एक ठराविक रक्कम तुमच्या खात्यातून वळती होऊन तुमच्याच नावाने तयार झालेल्या RD खात्यात जमा होते. Flexi RD हे Simple RD सारखंच असतं, पण यात, ठरलेल्या मूळ रकमेच्या दहापट पैसे त्याच रकमेच्या विभाज्य संख्येत (Multiples) आपण RD खात्यात वाढीव भरू शकतो. म्हणजे जर मूळ रक्कम रु. 1000/- असेल तर Simple RD मध्ये दर महिन्यात एकदाच रु. 1000/- ग्राहकाच्या खात्यातून वळते होऊन त्याच्या RD खात्यात जमा होतात. Flexi RD मध्ये मात्र मूळचे रु. 1000/- जमा होतातच. पण त्याशिवाय ग्राहक वाढीव रु. 9000/- आणि तेही रु. 1000/- च्या गुणाकारात भरू शकतात...

RD संपण्याची तारीख सर्व हफ्ते पूर्ण झाल्यानंतरच्या महिन्यात असते. उदाहरणार्थ, जर 01.01.24 रोजी 12 महिन्याचं RD सुरु केलं असेल, तर शेवटचा हफ्ता जाईल 01.12.24ला आणि RD संपेल 01.01.25 रोजी. त्याच दिवशी RD खातं बंद होतं आणि पैसे ग्राहकाच्या खात्यात जमा होतात...

Interest Calculation...

RD आणि FD वर व्याज कसं येतं, याचं गणित आता पाहू...

Simple RD Interest...

उदारहरण: गुंतवणूक रु. 1000/-, व्याज दर 10% p.a., तारीख 01.01.2024, कालावधी 12 महिने...

वरील तपशीलानुसार, दर महिन्याला रु. 1000/- ग्राहकाच्या खात्यातून वळते होऊन RD खात्यात जमा होईल. दर 3 महिन्यांनी RD खात्यात असलेल्या बाकी रकमेवर व्याजाची गणना होईल. म्हणजे 31.03.2024 रोजी, RD खात्यात रु. 3000/- जमा असतील. त्यावर 10% प्रमाणे व्याज बसेल रु. 75/-, जे RD खात्यात जमा होईल. पुढच्या 3 महिन्यातही महिना रु. 1000/- जमा होऊन 30.06.2024 रोजी RD खात्यात असतील रु. 6075/-. आता व्याजाची गणना होईल रु. 6075/- वर आणि रु. 151.88 RD खात्यात जमा होतील. 30.09.2024 रोजी व्याज गणनेची रक्कम असेल रु. 9266.88 आणि रु. 230.67 RD खात्यात जमा होतील. 31.12.2024 रोजी संपूर्ण शिल्लक असेल रु. 12497.55 आणि व्याज असेल रु. 312.44. 01.01.2025 रोजी RD बंद होऊन रु. 12809.99 ग्राहकाच्या खात्यात परत जातील. Flexi RD च्या व्याजाची गणनाही वरील पद्धतीनेच होते, फरक इतकाच की FRD खात्यात वाढीव भरलेल्या रकमेलाही त्यात धरलं जातं...

Simple Interest FD...

उदारहरण: गुंतवणूक रु. 100000/-, व्याज दर 12% p.a., तारीख 01.01.2024, कालावधी 12 महिने, व्याज कालावधी 3 महिने...

वरील तपशीलाप्रमाणे वर्षाचं व्याज आहे रु. 12000/-. ते 4 भागात विभागलं जातं आणि 31.03.2024, 30.06.2024, 30.09.2024, 31.12.2024 या तारखांना रु. 3000/- ग्राहकाच्या खात्यात जमा होतात...

Cumulative / Compounded FD...

इथे RD प्रमाणेच FD खात्यात दर 3 महिन्यांनी शिल्लक असलेल्या रकमेवर व्याजाची गणना होऊन ते FD खात्यात जमा केलं जातं...

उदारहरण: गुंतवणूक रु. 100000/-, व्याज दर 10% p.a., तारीख 01.01.2024, कालावधी 12 महिने...

वरील तपशीलाप्रमाणे, 31.03.2024 रोजी FD खात्यात, व्याजासकट असतील रु. 102500/-. 30.06.2024 रोजी FD खात्यात, व्याजासकट असतील रु. 105062.50. 30.09.2024 रोजी FD खात्यात, व्याजासकट असतील रु. 107689.06 आणि 31.12.2024 रोजी FD खात्यात, व्याजासकट रु. 110381.29 शिल्लक असतील...

Pre-mature...

Pre-mature म्हणजे depositचा कालावधी पूर्ण होण्याआधी त्या depositचे बंद होणे. अचानक आलेल्या खर्चासाठीची तरतूद, चालू depositच्या व्याज दरापेक्षा जास्तीचा दर मिळणे, locker surrender केल्याने locker security depositची गरज नसणे, loan बंद झाल्यास additional security depositची गराज नसणे आणि पहिल्या खातेदारचा मृत्यू होणे, ही deposit pre-mature होण्याची मुख्य करणं आहेत...

यापैकी मृत्यू हे कारण सोडून बाकी सर्व deposits वेळेआधी बंद केली तर वापरलेल्या कालावधीच्या निश्चित व्याज दारातून 1% वजा होऊन शिल्लक दराने व्याजाची गणना होते आणि पैसे खात्यात परत येतात. इथे बऱ्याच वेळेला ग्राहकांचा प्रश्न असतो, मला पैसे कमी मिळाले किंवा माझी मूळ रक्कम परत नाही आली...  यासाठी वर दिलेल्या उदाहरणानुसार...

Simple Interest Premature...

उदारहरण: गुंतवणूक रु. 100000/-, व्याज दर 12% p.a., तारीख 01.01.2024, कालावधी 12 महिने, व्याज कालावधी 3 महिने. म्हणजेच 30.06.24 रोजी रु. 6000/- ग्राहकाच्या खात्यात आले होते. समजा ग्राहकाने 01.07.24 रोजी ते deposit बंद करायला सांगितलं. म्हणजे त्याने कालावधी वापरला सहा महिन्याचा. त्या कालावधीसाठी व्याज दर होता 10%. Pre-mature penalty वजा 1%. म्हणजेच आता व्याजाची गणना होईल 9% दराने. सहा महिन्यानंतर ग्राहकाच्या खात्यात रु 4500/- जमा व्हायला हवे होते पण जमा झाले रु. 6000/-. तेव्हा जास्तीचे रु. 1500/- मूळ रकमेतून वजा होऊन बाकी पैसे परत येतात...

Cumulative / Compounded Deposit, SRD आणि FRD यातही व्याजाची गणना अशीच होते. फरक इतकाच की इथे चक्रवाढ पद्धत असल्याने सहसा मूळ रकमेला हात जात नाही आणि नुकसान कमी होते. शिवाय RD मध्ये शिल्लक रकमेवर व्याजाची गणना होते...

वरील सर्व माहितीसोबतच deposits म्हटलं की TDS म्हणजे Tax Deducted at Source हा एक महत्वाचा घटकही सामील असतो. पण हा एक वेगळा विषय असल्याने इथे घेतला गेला नाही. इतकंच सांगतो, की सामान्य नागरिकांसाठी रु. 40000/- च्या पुढे आणि जेष्ठ नागरिकांसाठी रु. 50000/-च्या पुढे जर वार्षिक व्याज मिळकत असेल, तर वाढीव मिळकतीवर PAN असल्यास 10% आणि PAN नसल्यास 20% TDS बसतो...

बँकेत असणाऱ्या वेगवेगळ्या depositsबद्दलची ही थोडक्यात माहिती आहे. माझ्याकडून लिहिण्यात काही कमी-जास्त झालं असेल तर मला नक्की सांगावं ही विनंती...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Sunday, November 24, 2024

KYCबद्दल बोलू काही...

बऱ्याच वेळा UPI, Internet Banking, Online Shopping, ATM Cash Withdrawal करत असताना आपल्या लक्षात येतं, अरे transaction होत नाही. कुछ तो गडबड है, हे लक्षात आल्यावर आपण बँकेकडे धाव घेतो. तिथे आपल्याला समजतं KYCअभावी आपलं खातं debit freeze झालं आहे. मग आपला चरफडाट होतो. असं कसं freeze झालं... खातं सुरू करताना सगळे कागदपत्र तर दिले होते... आता हे काय नवीन... नवीन नाही, तसं जुनंच आहे सारं. याच KYCबद्दल थोडंसं...

K.Y.C. म्हणजेच Know Your Customer. ग्राहकाची आवश्यक ती माहिती. म्हणजे संपूर्ण नाव, सध्याचा राहता पत्ता, शिक्षण, आर्थिक उत्पन्न (Annual Income), वैवाहिक स्थिती (Marital Status), चालू फोन नंबर, चालू ई-मेल आय.डी. या सर्व माहितीसाठी लागतात कागदपत्र. व्यक्तीचं PAN, हे आधी ओळखपत्र म्हणून गणलं जायचं आणि राहत्या पत्त्यासाठी चालू Passport, चालू Driving License, Voters Card किंवा आधार कार्ड यापैकी एक चालायचं. नियमात बदल होत गेले. आणि PANचा उपयोग फक्त कर-देयकाचा क्रमांक (Tax Payers Number) म्हणूनच राहिला...

KYC कधी व कुठे करायचं?, किती काळानंतर करायचं?, हे प्रश्न येतात. मी एक बँकर असल्याने बँकेत होणाऱ्या KYCबद्दल मी बोलेन. RBIने KYCचा कालावधी निश्चित करण्यासाठी एक पायंडा किंवा स्तर ठेवला आहे. त्या पायंड्यानुसार कुठल्याही KYCचा कालावधी, ते KYC ज्या खात्याशी जोडलं आहे, त्या खात्यातल्या transactionsवर आणि त्यामुळे खात्याच्या Risk catagoryवर अवलंबून असतो. रिस्क तीन प्रकारचे असतात. Low Risk, Medium Risk आणि High Risk...

Low Risk...

सगळे वैयक्तिक ग्राहक, अर्थात Individual Customers low risk catagoryमध्ये येतात. यात जेष्ठ नागरिक, गृहिणी, सामान्य नागरिक आणि बालवर्गाचा समावेश आहे. यांच्या खात्याकडे पाहिलं, तर पैशांची जास्त देवाण-घेवाण नसते. खात्यातल्या घडामोडीही ठराविक असतात. वैयक्तिक बचत खाती यात समाविष्ट असतात. या catagoryमध्ये येणाऱ्या ग्राहकांना साधारण १० वर्षांनी पुन्हा KYC करावं लागतं...

Medium Risk...

ज्या खात्यात आर्थिक व्यवहार होतात, व्यावसायिक दृष्ट्या जी खाती सुरू असतात, अशी सर्व खाती medium risk catagoryमधली असतात. मुख्यत्वे चालू खाती अर्थात current accounts किंवा संस्थेची खाती अर्थात institutional accounts म्हणजे सोसायटी, ट्रस्ट, Association of Persons (unregistered trusts), अशा खात्यांचा medium risk categoryमध्ये समावेश होतो. या catagoryमध्ये येणाऱ्या ग्राहकांना साधारण ५-६ वर्षांनी पुन्हा KYC करावं लागतं...

High Risk...

High risk catagoryवर रिझर्व्ह बँकेचं विशेष लक्ष असतं. मोठ्या प्रमाणातले रोकड व्यवहार, भागिदारी असलेले व्यवहार, राजकीय व्यक्तींची खाती, सुरक्षा यंत्रणांचे म्हणजेच पोलिस, जवान, नौदल यांचे पैशांचे व्यवहार, रासायनिक द्रव्यांबद्दलचे व्यवहार, हे सर्व या catagoryमध्ये येतं. इथे मात्र ग्राहकांना दर दीड ते दोन वर्षांनी पुन्हा KYC करावं लागतं...

यांमध्ये परकीय खाती म्हणजेच NRE-NRO accountsचा समावेश नाही, कारण ही खाती परतीय चलनावर चालतात...

CKYC & Re-KYC...

प्रत्येक बँकेला नियमित कालानंतर CERSAIच्या पोर्टलवर आपापल्या ग्राहकांचे KYC upload करावे लागतात. जर ते व्यवस्थित झाले, तर CERSAIतर्फे प्रत्येक ग्राहकाचा एक CKYC क्रमांक तयार होतो, जो ग्राहकाला मेल आणि मेसेजद्वारे कळवला जातो. तो CKYC क्रमांक वापरून पोर्टलवरून बँकांना ग्राहकाचे कागदपत्र download करता येतात. कधी कधी CKYC क्रमांक नाकारला जातो. फोटो बरोबर नसणं, दिलेले पुरावे अर्धवट असणं किंवा पुराव्यांची तारीख उलटलेली (Passport & Driving License) असणं, ही कारणं असतात CKYC क्रमांक न मिळण्याची. अशा वेळी ती ती खाती KYCच्या कारणास्तव freeze होतात...

आता CKYC आणि Re-KYC यातला फरक आपण पाहू...

जेव्हा Passport किंवा Driving Licenseची तारीख उलटून जाते, ग्राहकाचं नाव किंवा धर्म बदलतो (बहुत करून लग्न झालेल्या महिला ग्राहक...), जेव्हा ग्राहकाचं वय १८ पूर्ण होतं, पहिल्या खातेदाराचा मृत्यू झाल्यास death claim settlementच्या वेळी इतर खातेदार किंवा nominee राहतात, वर्षाहून अधिक काळ खातं न वापरल्याने lock किंवा dormant होतं, त्यावेळी सगळे कागदपत्र देऊन पुन्हा CKYC करणं भाग असतं. जरी आधी दिली असली तरी...

Re-KYCचा सरळ अर्थ आहे Revised KYC. इथे बँकेकडे असलेला एक फोर्म भरून Re-KYCची पूर्तता करता येते. त्या फॉर्ममध्ये आधी दिलेल्या कागदपत्रांचाच वापर करून KYC पूर्ण होते. Passport किंवा Driving License जरी दिलं असेल आणि KYCची तारीख जवळ आली असेल आणि या कागदपत्रांची तारीख उलटली नसेल तरी Re-KYC देता येतं. आत्ताशा प्रत्येक बँकेच्या websiteवर KYC किंवा Re-KYC करण्याची सोय असते. ज्यांना ते जमत नाही, त्यांना मात्र त्यांच्या बँकेत जावं लागतं...

मला ज्ञात असलेल्या गोष्टींच्या आधारे वरील माहिती दिली आहे. जाणकारांना त्यात काही भर घालायची असल्यास अथवा सुधारणा सुचवायची असल्यास स्वागतच आहे...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Thursday, September 12, 2024

खानावळ...

नमस्कार...

एकाच कथेला दोन उत्तरार्ध लिहिण्याचा मी प्रयत्न केला आहे. कृपया गोड मानून घ्या...


खानावळ...

संध्याकाळ उलटून चालली होती. वेळ रात्रीच्या कुशीत शिरत होती. दुतर्फा झाडी असलेल्या निर्मनुष्य रस्त्यावरून गाडी वेगाने पुढे चालली होती. खिडकीबाहेर न दिसणाऱ्या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करून सुहासकडे वळून सीमा म्हणाली, "तरी मी सांगत होते लवकर निघू. पण तुला मॅच पहायची होती ना... आता घे... जंगलातच अंधार झाला..." सीमाकडे कटाक्ष टाकत सुहास म्हणाला, "डोंट वरी सीमू... When I am hear, there is every reason to fear..." हे ऐकून सीमाच्या कपाळावर आठ्या आल्या आणि ते पाहून सुहास थोडा हसला. हसतानाच सुहास म्हणाला, "बरं सीमू, भूक लागली यार... जरा गूगलवर चेक कर ना आस-पास कुठे हॉटेल आहे का..."

सीमाने फोनवर मॅप चालू केला. मॅपमध्ये असलेल्या कंपॉसच्या सुईची दिशा वेगळीच वाटत होती. "अजबच आहे... गाडी जाते ती दिशा न दाखवता ही सुई उलट्या दिशेला वळली आहे..." सीमा बोलतच होती की सुहासला गाडीच्या लाईटच्या प्रकाशात दूरवर काहीतरी दिसलं. सुहास म्हणाला, "अगं जंगल आहे. दिशा चुकू शकतात इथे. बरं ते लांबवर काहीतरी दिसतंय. बहुतेक कोणीतरी रस्त्याच्या कडेने चाललंय. जवळच्या वस्तीतली किंवा खेड्यातली व्यक्ती असावी..." बोलता बोलता सुहासने गाडीचा वेग कमी केला. रस्त्याच्या कडेला हातात काठी घेतलेला, धोतर नेसलेला आणि डोक्यावरून घोंगडी घेतलेला एक माणूस चालला होता. सुहासने गाडी त्याच्या जवळ आणून थांबवली. गाडी थांबलेली पाहून तो माणूस गाडीच्या जवळ आला. काच खाली करून सीमा म्हणाली, "काका, आम्ही प्रवासाला निघालोत. भुकेने कासावीस झालोत. इथे जवळ कुठे हॉटेल वगैरे आहे का..."

सीमावरून सुहासकडे पाहत तो म्हणाला, "हाटील... न्हाय बा. हितं आसं काय बी न्हाय... हा, पर येक खानावल हाय म्होरं. आक्शी झाक ज्येवन बगा... येकदा थितं गेलात की भाईरच न्हाय येनार तुम्मी..." सीमा आणि सुहासने त्या माणसाकडे पाहून स्मित केलं आणि त्याला धन्यवाद देत गाडी पुढे सरकवली. पुढे जाताना सुहासने सहज आरशात पाहिलं तर तो माणूस रस्त्याच्या मधोमध उभा राहून गाडीकडेच पाहत होता. सुहास पुन्हा समोर पाहू लागला. सुहास एकदम गप्प झालेला पाहून सीमा त्याला कोपर मारत म्हणाली, "भूक वाढलेली दिसते... काही बोलत नाहीस ते..." नजर रस्त्यावर ठेवत सुहास म्हणाला, "मी त्या माणसाचा विचार करतोय. जंगल सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत आपल्याला चिटपाखरूही दिसलं नाही आणि अचानक तो माणूस दिसतो... थोडं ऑड नाही वाटत..." यावर सीमा काहीच बोलली नाही. गाडीने एक वळण घेतलं आणि काही अंतरावर त्यांना एक पाटी दिसली. त्यावर खडूने लिहिलं होतं, "म्हादूची खानावळ..."

बाजूलाच लाल मातीचा एक छोटा रस्ता होता आणि रस्ता संपतो तिथे झापाची कौलं असलेलं एक घर होतं. ओसरीत वरच्या बाजूला टांगलेला कंदिल लुकलुकत होता. सुहासने गाडी घराजवळ नेली. घराबाहेर एक-दोन बैल गाड्या आणि दोन-पाच सायकली दिसत होत्या. सुहासने एका झाडाखाली गाडी लावली. "काय मस्त आहे रे सगळं. या जमान्यातही अशी घरं अस्तित्वात आहेत तर... मला तर फोटो काढायची जाम इच्छा होत आहे..." गाडीतून उतरत असताना सीमा म्हणाली. सीमाला घराकडे ढकलत सुहास म्हणाला, "फोटो नंतर... आधी पोटोबा मग फोटोबा..." दोघंही आत गेली. आत अर्धगोलाकार सतरंज्या हंतरल्या होत्या आणि काही माणसं त्यावर बसली होती. सुहास म्हणाला, "अरे वाह... भारतीय बैठक... एकदम ऑथेंटिक..." सीमाने स्मित केलं. समोरच असलेल्या दोन रिकाम्या जागांवर दोघं जाऊन बसली. एक बाई आतून बाहेर आली. सीमा आणि सुहासला पाहून ती पुन्हा आत गेली आणि देन ताटं घेऊन आली आणि सीमा व सुहास समोर ती ताटं ठेऊन आत निघून गेली...

ताटात वरण, भात, पोळ्या, भाज्या, पापड, चटण्या असं सगळं वाढलेलं होतं. ते जिन्नस पाहून सीमा आणि सुहासने एकमेकांकडे पाहिलं. "आक्शी पॉटभर ज्येवा बरं का... लागंल त्ये मागून घ्या..." हातात दोन मोठाले पेले घेऊन उभ्या मावशी हसत म्हणाल्या. त्या मावशी अचानक समोर आल्याने दोघं दचकली. पेला ताटांजवळ ठेवत त्या मावशी म्हणाल्या, "म्या श्येवंता. हितलं समदं म्या आन माजं धनी आम्मी दोगं बगतू..." स्वत:ला सावरत, शेवंताकडे पाहून स्मित करत दोघं जेऊ लागली. जेवताना सीमाने सहज आजू-बाजूला पाहिलं. सर्वजण एकदम शांत होते. त्यांची ताटंही रिकामी झाली तरीही ते सर्व तसेच बसून होते. नवल वाटून सुहासला कोपर मारत सीमा हलक्या स्वरात म्हणाली, "सुहास, ही सगळी माणसं अशी का बसली आहेत... त्यांचं जेवण झालं तरी उठत नाहीत..."

उत्तरार्ध पहिला...

तेवढ्यात, "त्येंचं ज्यावन जालंय. पर ती उटायची न्हाइत. तुम्मी ज्येवा बगू बिगी-बिगी..." पुन्हा आलेल्या आवाजाने दोघं चपापली. समोर शेवंता उभी होती. दोघांची जेवणं उरकत आलेली पाहून ती ताकाच्या वाट्या घेऊन समोर उभी होती. दोघांनीही ताक प्यायलं आणि पानावरून उठली. सुहासने जेवणाचे पैसे विचारले तर शेवंता म्हणाली, "तुमच्याकडनं पैकं घ्यनार न्हाय म्या. तुम्मी पॉटभर ज्येवलात. म्या भरून पावले. बरं आता निघा बगू. घाई करा. धा वाजले, आन माजं धनी आलं तर म्या काईच न्हाय करू शकनार..." सीमा आणि सुहासने शेवंताकडे चमत्कारीक नजरेने पाहिलं. मग शेवंताला वाकून नमस्कार करून दोघं बाहेर पडली. गाडीकडे जाताना दोघांनी मागे पाहिलं तर दारात शेवंता उभी होती. हात ऊंचावून सांगत होती, "जावा जावा... घाई करा... आज्याबात मागं बगू नका... आन ह्ये वन संपस्तोवर कुटं बी थांबू नगा..." सीमा आणि सुहास गाडीत बसले. गाडी लाल मातीचा रस्ता ओलांडू लागली...

अचानक वारा वाहू लागला आणि एक कागदाचा चिठोरा सीमाच्या हाताला येऊन चिकटला. सीमाने तो चिठोरा पाहिला. तो कागद वर्तमान पत्रातला एक चिठोरा होता. सीमाने मजकूर वाचला, "रात्री दहाच्या सुमारास खानावळीत लागलेल्या आगीत सापडून इतर गिऱ्हाइकांसोबत खानावळीचे मालक म्हादू पाटील आणि त्यांची पत्नी शेवंता पाटील मृत्यूमुखी..." मजकूराच्या खाली म्हादू आणि शेवंताचे फोटो होते. चिठोऱ्यावर साल दिसत होतं १९०६. फोटो पाहत सीमा म्हणाली, "सुहा...स... अरे हा त...र... तोच आहे ज्याने आ...पल्या...ला खानावळीचा पत्ता..." हे ऐकून सुहासने करकचून ब्रेक मारला. स्वत:भोवती एक गिरकी घेऊन गाडी थांबली. मुख्य रस्त्यापासून आत असलेलं ते कौलारू घर जळत होतं. ज्वाळा आसमानाला भिडत होत्या. हे दृष्य पाहून दोघांचेही डोळे विस्फारले. "कशी वाटली म्हादूची खानावल..." हा आवाज ऐकून दोधं स्तब्ध झाली...

आवाज मागच्या सीटकडून येत होता. दोघांनी आरशात पाहिलं तर मागच्या सीटवर म्हादू बसला होता. दोघांनी वळून पाहिलं. पण मागच्या सीटवर कोणीच नव्हतं. दोघं पुन्हा आरशात पाहू लागली तर त्यांना म्हादू दिसला. दोघांनाही दरदरून घाम फुटला. कर्कश आवाजात म्हदू म्हणाला, "शेवंतानं सांगितलं व्हतं ना गाडी कुटं बी थांबवू नगा म्हनून... थांबला तो संपला... ते थांबले... ते संपले... तुम्मी बी थांबलात... तवा तुम्मी बी... हा...हा...हा..." हे ऐकून सीमा आणि सुहासने किंकाळ्या फोडल्या. गाडीने अचानक पेट घेतला आणि क्षणार्धात तिचा स्फोट झाला...

उत्तरार्ध दुसरा...

तेवढ्यात, "त्येंचं ज्यावन जालंय. पर ती उटायची न्हाइत. तुम्मी ज्येवा बगू बिगी-बिगी..." दारातून आलेल्या या शब्दांनी सीमा आणि सुहास चपापले. दारात तोच मगाचचा माणूस उभा होता ज्याने या खानावळीचा पत्ता सांगितला. सीमा व सुहासचं जेवण झालंच होतं. पानावरून उठत सुहास म्हणाला, "अरे काका तुम्ही... धन्यवाद हं. अहो आम्ही भुकेने कासाविस झालो असताना तुम्ही देवासारखे भेटलात आणि आम्हाला या खानावळीचा पत्ता दिलात..." तो माणूस हसत म्हणाला, "आरं म्याच म्हादा... ही माजीच खानावल हाय. भुकेल्यासनी आन्नं खाऊ घालाया मला लई आवडतं. म्हनून ह्ये खानावलीचा खटाटोप..." सुहासने जेवणाचे पैसे विचारले तर म्हादू म्हणाला, "तुमच्याकडनं पैकं घ्यनार न्हाय म्या. तुम्मी पॉटभर ज्येवलात. म्या भरून पावलो. बरं आता निघा बगू. घाई करा. धा वाजले तर म्या काईच न्हाय करू शकनार..."

सीमा आणि सुहासने म्हादूकडे चमत्कारीक नजरेने पाहिलं. मग म्हादूला वाकून नमस्कार करून दोघं बाहेर पडली. गाडीकडे जाताना दोघांनी मागे पाहिलं तर दारात म्हादू उभा होता. हात ऊंचावून सांगत होता, "जावा जावा... घाई करा... आज्याबात मागं बगू नका..." सीमा आणि सुहास गाडीत बसले. गाडी लाल मातीचा रस्ता ओलांडू लागली. सुहासने सहज आरशात पाहिलं आणि गाडी थांबवली. दोघं बाहेर आली आणि विस्फारलेल्या नजरेने पाहू लागली. मुख्य रस्त्यापासून आत असलेलं ते कौलारू घर जळत होतं. ज्वाळा आसमानाला भिडत होत्या. वारा सुहास व सीमाच्या दिशेने वाहत होता. एक कागदाचा चिठोरा उडून सीमाच्या पायाशी आला. सीमाने तो उचलला. "अरे... हे कसं काय... मिनीटभरापूर्वी सगळं व्यवस्थित होतं आणि आता हे... म्हादू काका आणि बाकीच्यांना वाचवायला हवं..." असं म्हणत सुहास पुढे जाणार इतक्यात सीमाने त्याला अडवलं आणि तो कागद दाखवला...

तो कागद वर्तमान पत्रातला एक चिठोरा होता. त्यावर मजकूर होता, "रात्री दहाच्या सुमारास खानावळीत लागलेल्या आगीत सापडून इतर गिऱ्हाइकांसोबत खानावळीचे मालक म्हादू पाटील आणि त्यांची पत्नी शेवंता पाटील मृत्यूमुखी..." मजकूराच्या खाली म्हादू आणि शेवंताचे फोटो होते. चिठोऱ्यावर साल दिसत होतं १९०६. फोटो पाहून सुहासने सीमाकडे पाहिलं. दोघांचे डोळे पाणावले होते. घराकडे पाहून दोघांनीही हात जोडून नमस्कार केला...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Saturday, July 27, 2024

विजयी झेल...

क्रिकेटचे सामने नेहमीच उत्कंठावर्धक असतात. काही सामने रटाळ होतात खरे. पण बहुतांश सामने खुर्चीला खिळवून ठेवणारे असतात. क्रिकेटच्या अनेक स्पर्धा जगभर सुरू असतात. पण सारं जग ज्या स्पर्धेकडे डोळे लाऊन असतं, ती म्हणजे विश्वचषक स्पर्धा. त्यातही विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना म्हणजे उत्कंठेचा उच्चांक गाठणारा असतो...

जग जिंकायला तत्पर असलेले दोन तुल्यबळ संघ एकमेकांसमोर उभे राहतात आणि सर्व ताकदीनिशी 'जगत जेता' या पदासाठी लढतात. अशा या हाय प्रेशर लढतीत काही महत्वाच्या झेलांमुळे सामन्यांना कलाटणी मिळते. भारताने जिंकलेल्या चार विश्वचषकांमध्ये असेच कमालीचे झेल समोर आले...

१९८३ विश्वचषक...

दोन वेळा विश्वविजेता बनलेला वेस्ट इंडीज एका बाजूला तर त्यावेळी नवखा असलेला भारतीय संघ दुसऱ्या बाजूला, असा हा अंतिम सामना होता. प्रथम फलंदाजी करताना गार्नर, होल्डिंग, मार्शल आणि रॉबर्ट्स समोर भारतीय फलंदाजीची दाणादाण उडाली आणि विंडीजला १८३ धावांचं माफक आव्हान मिळालं. तुफान फॉर्ममध्ये असलेले सर विव्ह रिचर्ड्स गोलंदाजांचा समाचार घेत होते. मदनलालला तर त्यांनी सलग चौकार खेचले होते. तरीही कपिलने पुन्हा मदनलालच्या हाती चेंडू दिला. यावेळी मदीपांनी टाकलेल्या आखुड चेंडूवर विव्ह रिचर्ड्सने प्रहार केला. हवेत उडालेला झेल मिड-ऑनला उभ्या असलेल्या कपिलने मागे धावत जाऊन अचूक पकडला. सर विव्ह रिचर्ड्स बाद झाले. विंडीजची पुढची फलंदाजी ढेपाळली आणि ४३ धावांनी सामना जिंकत भारताने पहिल्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं...

२००७ टी २० विश्वचषक...

टी २० क्रिकेटच्या पहिल्या विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांनी अंतिम फेरी गाठली होती. प्रथम फलंदाजी करताना पाक गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना डोकं जास्त वर काढू दिलं नाही आणि टी २० सामन्यासाठी तुलनेने सोप्पं असलेलं १५८ धावांचं लक्ष्य पाकिस्तानसमोर आलं. विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानची भारतापुढे होणारी गत सर्वांना ज्ञात होती. त्यामुळे हाही सामना भारत जिंकेल असंच वाटत होतं. मिसबाह-उल-हक़ नेटाने किल्ला लढवत होता आणि धावाही जमवत होता. पठाण, रूद्र प्रताप आणि श्रीशांथची षटकं संपली होती. मिसबाह हरभजनची गोलंदाजी चांगला खेळत होता. त्यावेळी एकच पर्याय धोनीसमोर उरला होता. तो म्हणजे जोगिंदर शर्मा. जोगीच्या दुसऱ्याच चेंडूवर षटकार खेचून मिसबाहने समस्त भारतीयांना तोंडात बोटं घालायला लावली. जोगीच्या तिसऱ्या चेंडूवर मिसबाहने स्कूप शॉट खेळला. चेंडू हवेत जाऊन शॉर्ट फाईन लेगला उभ्या असलेल्या श्रीशांथच्या हाती विसावला. मिसबाह बाद झाला आणि पहिला टी २० विश्वचषक भारताच्या झोळीत पडला...

२०११ विश्वचषक...

वानखेडेवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारत आणि श्रीलंका समोरासमोर होते. प्रथम फलंदाजी करताना लंकेची सुरुवात थोडी डळमळीत झाली. पण संघक्कारा आणि जयवर्धनेने डाव सावरला. स्थिर होताच दोघांनीही वेगाने धावा जमवायला सुरुवात केली. ही भागिदारी तोडायला हवी असं सर्वांनाच वाटत होतं. पण संघक्कारा आणि जयवर्धने कोणत्याही गोलंदाजाला दाद लागू देत नव्हते. अशा वेळी धोनीने युवराजकडे चेंडू सोपवला. युवराजच्या त्या षटकातल्या पाचव्या आणि थोड्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला संघक्कारा खेळायला गेला. चेंडूने बॅटची कड घेतली आणि स्टंपला चिकटून उभ्या असलेल्या धोनीने तो पकडला. संघक्कारा बाद झाला. तो जर अजून काही काळ टिकला असता, तर जे लक्ष्य २७५ पर्यंत थांबलं, तेच लक्ष्य कदाचित ३०० पार गेलं असतं. म्हणून धोनीने पकडलेला तो झेल महत्वाचा होता. लंकेच्या धावांना लगाम बसला आणि धावांचा यशस्वी पाठलाग करून भारताने दुसऱ्या विश्वचषकाला गवसणी घातली...

२०२४ टी २० विश्वचषक...

सर्वांच्या अपेक्षांच्या विरुद्ध, हा विश्वचषक भारतीय गोलंदाजांनी गाजवला. सर्व सामने जिंकत भारताने दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला. दक्षिण आफ्रीकेचं कडवं आव्हान भारतासमोर होतं. विराटच्या जिगरबाज खेळीच्या जोरावर प्रथम फलंदाजी करत भारताने प्रोटियाजसमोर १७७ धावांचं आव्हान ठेवलं. भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त फॉर्मात असलेल्या दक्षिण आफ्रीकन फलंदाजांना वेसण घालत ३० चेंडूत ३० धावा अशा सूस्थितीतून ६ चेंडूत १६ धावा अशा बिकट अवस्थेत आणून ठेवलं. शेवटचं षटक टाकायला आलेल्या हार्दिक पंड्याच्या पहिल्याच चेंडूवर डेविड मिलरने हल्ला चढवला. चेंडू सीमापार जाण्याच्या दिशेने खाली येत असताना लाँग ऑफला उभ्या असलेल्या सूर्यकुमार यादवने प्रसंगावधान दाखवत अप्रतीम झेल पकडला आणि भारतासाठी विजयाची वाट मोकळी झाली...

अत्यंत हाय प्रेशरमध्ये, कपिल, श्रीशांथ, धोनी आणि सूर्याने डोकं शांत ठेवत मोक्याच्या क्षणी पकडलेले हे चारही झेल, फसलेल्या सामन्यांना कलाटणी देत भारताच्या बाजूने सामना झुकवणारे ठरले. त्यामुळे, 'कॅचेस विन मॅचेस...' ही म्हण पूर्णपणे सार्थकी लागली...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Saturday, July 6, 2024

Island of Stars...

रात्रीचे १० वाजून गेले होते. क्लबमध्ये अजून जोशपूर्ण वातावरण होतं. डिस्को सुरू होता, ड्रिंक्स दिले जात होते. दिवे लखलखत होते. काही माणसं टेबलवर बसून खाण्याचा, पिण्याचा आणि संगीताचा आस्वाद घेत होती. काही माणसं ठेक्यावर ताल धरून नाचत होती. एका टेबलवर विक्रम त्या वातावरणाचा आनंद घेत होता. त्याच्या टेबलवर एक अर्धवट भरलेला ग्लास होता आणि हातात जळकी सिग्रेट होती. सिग्रेटचे झुरके आणि ग्लासमधले घोट घेत विक्रम सर्वत्र नजर फिरवत होता. बारकडे पाहताच एका ठिकाणी त्याची नजर स्थिरावली. तिथे एक मुलगी हातात ग्लास घेऊन बसली होती. विक्रम हसला. सिग्रेटचा एक झुरका घेऊन त्याने समोरचा ग्लास संपवला आणि टेबल सोडून बारच्या दिशेने जाऊ लागला...


मुलीच्या शेजारच्या स्टुलावर बसून आधी त्याने बियरची ऑर्डर दिली मग मुलीकडे पाहत म्हणाला, "हाय. मी विक्रम. सगळे मला विकी म्हणतात..." त्या मुलीने विक्रमकडे पाहत स्मित केलं आणि ग्लासमधला एक घोट घेतला. ती काहीच बोलत नाही म्हटल्यावर विक्रम पुन्हा बोलता झाला, "तुमचा चेहेरा खूप फोटोजेनिक आहे. तुमची फिगरही छान आहे. बाय द वे, तुम्ही..." ती मुलगी हसली आणि म्हणाली, "मी अक्षरा..." "अक्षरा... तुमच्याप्रमाणे तुमचं नावही छान आहे. नाईस टू मीट यू..." इतकं बोलून विक्रमने हात पुढे केला. अक्षराने पुन्हा स्मित केलं आणि विक्रमशी हस्तांदोलन केलं. विक्रम पुढे म्हणाला, "मी एक सिने-जर्नालिस्ट आहे. अप-कमिंग मॉडेल्सवर मी एक आर्टिकल लिहितो आहे. तुमचे काही फोटो काढू शकतो का... कदाचित माझ्या आर्टिकलमध्ये तुमचे फोटो झळकले तर तुम्हालाही प्रसिद्धी मिळेल..." अक्षराने जरा विचार केला आणि होकार दिला. दोघंही दाराच्या दिशेने निघालेच होते की मोठा आवाज झाला...

अचानक आलेल्या आवाजाने सर्व दचकले. आवाज क्लबच्या मुख्य दाराच्या दिशेने आला होता. सर्वांनी त्या दिशेला पाहिलं, तर काळी पँट आणि बिन-बाह्यांचं काळं जॅकेट परिधान केलेला, चेहेऱ्यावर मास्क असलेला एक इसम हातात एक पम्प शॉर्ट गन घेऊन दारात उभा होता. बोलणं आणि नाच बंद झाले होते. पण संगीत अजून सुरू होतं. तो माणून एक पाऊल पुढे आला. त्याने सगळीकडे नजर फिरवली. कोपऱ्यात एक मोठा स्पीकर होता. त्या माणसाने शॉर्ट गन स्पीकरकडे वळवली. मग लिव्हर खेचून ट्रिगर दाबला. क्षणार्धात स्पीकर फुटला आणि आवाज बंद झाला. मग पुन्हा तो माणूस सर्वत्र नजर फिरवू लागला. अक्षरा आणि विक्रमवर येऊन त्याची नजर स्थिरावली. हळू हळू चालत तो माणूस त्या दोघांच्या दिशेने जाऊ लागला. जाताना त्याने परत लिव्हर खेचलं विक्रमजवळ येत त्याने चाप ओढला. गोळी विक्रमच्या छातीत घुसली. गोळीच्या धक्क्याने विक्रम मागे फेकला जाऊन भिंतीवर आदळला आणि जमिनीवर कोसळला...

कसातरी सरकत सरकत तो अक्षराच्या दिशेने जाऊ लागला. अक्षराजवळ पोहोचून अचके देत विक्रमने प्राण सोडले. अक्षरा जागीच गोठली होती. विक्रमकडे पाहत ती थरथर कापत होती. तो माणूस विक्रमजवळ आला. त्याने एकदा अक्षराकडे पाहिलं, मग पायाने विक्रमच्या शरीराला उताणं केलं. डोळे उघडेच ठेऊन विक्रम गतप्राण झाला होता. तो माणूस परत फिरला आणि दाराच्या दिशेने जाऊ लागला. त्याने एक पाऊल पुढे टाकलं पण लगेच थांबून तो पुन्हा विक्रमकडे वळला. लिव्हर खेचून त्याने विक्रमच्या डोक्यात गोळी झाडली. रक्ताची चिळकांडी उडाली आणि काही थेंब अक्षराच्या चेहेऱ्यावर पडले. अक्षरा जिवाच्या आकांताने किंचाळून जमिनीवर कोसळली...

तपास सुरू झाला. आनंद बॉडी तपासत होता. सचिन आणि उमा त्या परिसरातून महत्वाच्या गोष्टी गोळा करत होते. आणि प्रधान तिथे असलेल्या घोळक्याशी संवाद साधू लागले, "तुम्ही सगळे इथेच होता जेव्हा हे सगळं घडलं. कोणी सांगेल मला नेमकं काय झालं इथे..." एक वेटर पुढे येत म्हणाला, "सर, अर्ध्या-पाऊण तासापूर्वी सगळं व्यवस्थित होतं. डिस्कोची गाणी वाजत होती, लोक खात-पित होते, गप्पा मारत होते. विक्रमसाहेबही त्यांची ड्रिंक घेऊन बसले होते. थोड्या वेळाने ते उठले आणि बारकडे गेले. तिथे ती मुलगी होती. दोघं एकमेकांशी काहीतरी बोलली. मग एकत्र दाराकडे निघाली. तेवढ्यात एक मोठा आवाज झाला गोळीबाराचा. आम्ही आवाजाच्या दिशेने पाहिलं तर एक ऊचपुरा धिप्पाड माणूस दारात उभा होता. काळे बूट, काळी पँट, काळं लेदरचं जाकिट, चेहेऱ्यावर मास्क आणि हातात एक गन घेऊन तो माणूस सगळीकडे पाहत होता...

गाणी बंद करण्यासाठी त्याने अजून एक गोळी चालवून स्पीकर फोडला. मग तो माणूस विक्रमसाहेबांच्या दिशेने गेला. त्याने विक्रमसाहेबांवर गोळी चालवली. साहेब मागे सरकत खांबावर आदळले आणि काचांच्या तुकड्यांसह खाली पडले. कसंतरी घसपटत ते त्या मुलीजवळ पोहोचले आणि शांत झाले. तो माणूस विक्रमसाहेबांजवळ गेला. त्याने पायानेच बॉडी हलवली. मग पुन्हा विक्रमसाहेबांच्या डोक्यात एक गोळी मारली. ती मुलगी बिचारी किंचाळली आणि बेशुद्ध पडली..." बाकी लोकांकडे पाहत प्रधानांनी विचारलं, "हे असंच झालं होतं..." सर्वानी मानेनेच होकार दिला. प्रधानांनी त्या वेटरला विचारलं, "याचं नाव विक्रम आहे हे तुला कसं माहित..." तेव्हा तो वेटर म्हणाला, "सर हे आमचे रेग्यूलर कस्टमर आहेत. शिवाय हे मॅगझीन्समध्येही लिहितात..." तो वेटर बोलत असताना उमा हातात बुलेट शेल्स घेऊन आले. उमा म्हणाली, "सर चार शेल्स मिळाले आहेत. दोन दाराजवळ आणि दोन या विक्रमच्या बॉडीजवळ..."

प्रधान बुलेट शेल्सकडे पाहत असताना सचिन तीन गोळ्या घेऊन आला बंदुकीच्या. प्रधानांना दाखवत तो म्हणाला, "सर, या तीन बुलेट्स मिळाल्या. एक स्पीकरच्या मागच्या भिंतीमध्ये, एक त्या टेबलजवळ, तर एक या एक काचेच्या खांबात रुतली होती..." बुलेट्सकडे पाहत प्रधान म्हणाले, "चौथी बुलेट या विक्रमच्या शरीरात असेल. त्या माणसाने हवेत फायर केलं तेव्हा वरच्या झुंबराला लागून बुलेट खाली आली आणि टेबलजवळ येऊन थांबली. स्पीकर फोडणारी बुलेट भिंतीत अडकली. पण तिसरी बुलेट या विक्रमचं शरीर भेदून आरपार जाऊन त्या खांबात अडकली असणार..." प्रधान बोलत असताना आनंद म्हणाला, "विक्रमच्या छातीत लागलेली गोळी अजून शरीरातच आहे. पाठीवर कुठलाही एग्झिट वूंड नाही. त्याच्या कपाळावर लागलेली गोळी मात्र डोक्याच्या मागून बाहेर पडली. विक्रमच्या डोक्याच्या बरोबर खाली एक छोटा खड्डा आहे. विक्रमच्या डोक्यात शिरलेली गोळी जमीनीवर आदळून रिबाऊंड होऊन त्या खांबात घुसली..."

आनंदचं म्हणणं पुढे नेत उमा म्हणाली, "सर, ती गोळी नुसती खांबात घुसली नाही. तर जाताना या मुलीच्या हाताला चाटून गेली. हिच्या दंडावर जखम आहे. ही मुलगी थोडक्यात वाचली सर. पण आत्ता बेशुद्ध आहे. हिचं नाव अक्षरा आहे. हिच्या पर्समध्ये हिचं आधार कार्ड आहे ज्यावर अमरावतीचा पत्ता आहे. .." उमा बोलत असताना अक्षरा शुद्धीवर आली. सगळीकडे पाहत, "त...तो रा...क्षस... ग...गोळी..." इतकं बोलून ती पुन्हा बेशुद्ध पडली. अक्षराकडे पाहत प्रधान म्हणाले, "हिला जबरदस्त शॉक बसलेला दिसतोय. हिने त्या खुन्याला खूप जवळून पाहिलं आहे. ही आपली मदत करू शकेल. उमा, तू अक्षराला घेऊन हॉस्पिटलला जा. शुद्धीत आल्यावर ही बोलण्याच्या मन:स्थितीत आली की मला कळव..." अक्षराला घेऊन उमा निघून गेल्यावर प्रधान, सचिन आणि आनंद आपापसाद बोलू लागले. सचिन म्हणाला, "इतक्या सगळ्या लोकांमध्ये त्या खुन्याने विक्रमलाच टार्गेट केलं. बाकी कोणालाही काहीही न करता तो निघून गेला. एकतर या विक्रमला मारण्यासाठी त्याला पैसे मिळाले असतील किंवा त्याचं विक्रमशी वैर असावं..."

यावर आनंद म्हणाला, "सर हा विक्रम एक सिने जर्नालिस्ट आहे. "Island of Stars" या मॅगझीनमध्ये याचे आर्टिकल्स येत राहतात. याचे तीन लेख सध्या खूप प्रसिद्ध आहेत. एक आहे ऍक्ट्रेस नताशाबद्दल ज्यात तिचे काही अश्लील फोटो आहेत, दुसरा लेख आहे प्रोड्यूसर जयवंतबद्दल ज्यात जयवंत B grade movies बनवतो. त्याच्या moviesमध्ये sex आणि violence जास्त असतो याबद्दल लिहिलं आहे. आणि तिसरा लेख हिरो पवनच्या अफेयर्सबद्दल आहे..." थोडा विचार करत प्रधान म्हणाले, "आनंद, सचिन, बॉडीला डॉककडे पाठवायची व्यवस्था करा. This can be a high profile case. We need to handle it carefully..." डॉ. गोखले बॉडी तपासत होते. प्रधानांकडे पाहत ते म्हणाले, "प्रधानसाहेब, या विक्रमचा मृत्यू गोळी लागूनच झाला आहे. खूनी निष्णात आहे. One shot and game over. विक्रमच्या शरीरातून मिळालेली गोळी, तुम्ही क्लबमधून आणलेल्या गोळ्या आणि हे शेल्स एकाच मेकचे आहेत. 18mm calibre. हे कोणत्याही पिस्तुल किंवा रिवॉल्व्हरचं काम नाही. अजून एक गोष्ट प्रधानसाहेब, या विक्रमचा मृत्यू छातीत लागलेल्या गोळीने झाला आहे. तरीही याच्या डोक्यात गोळी मारली गेली. याचा अर्थ त्या खुन्याचा विक्रमवर प्रचंड राग होता..."

डॉ. गोखलेंचं म्हणणं ऐकून विचार करत असताना प्रधानांचा फोन वाजला, "येस उमा. गुड. मी येतोच तिथे..." फोन बंद करत प्रधान म्हऩाले, "अक्षरा शुद्धीवर आली आहे. आनंद, तू माझ्यासोबत हॉस्पिटलला चल. आणि सचिन, तू नताशा, पवन आणि जयवंत कुठे आहेत ते बघ. आपल्याला त्यांना भेटायला हवं..." आनंद आणि प्रधान हॉस्पिटलला पोहोचले तेव्हा अक्षरा बेडवर टेकून बसली होती आणि उमा तिला पाणी पाजत होती. बेडजवळ जात प्रधान म्हणाले, "अक्षरा, मी सीनियर इन्स्पेक्टर प्रधान आणि हे इन्स्पेक्टर आनंद. तुम्ही त्या खुन्याला खूप जवळून पाहिलं आहे. तुम्ही त्याच्याबद्दल काही सांगू शकता का..." अक्षराने उमाकडे पाहिलं, मग प्रधान व आनंदकडे पाहत बोलती झाली, "खूप क्रूर होता तो माणूस. त्याचे हिरवेगार डोळे होते. अंगाने चांगलाच मजबूत होता तो. त्याच्या डाव्या दंडावर जळणाऱ्या खोपडीचा एक टॅटू होता. काळे बूट, लेदरचं स्लीव्हलेस जॅकेट, चेहेऱ्यावर मास्क होता त्याच्या आणि त्याच्या गळ्यात 'B' हे अक्षर असलेलं एक लॉकेट आणि चेन होते. हातात एक मोठी गन घेऊन तो आत शिरला आणि माझ्यासमोरच त्याने विक्रमला..."

अक्षरा बोलायची थांबली आणि रडायला लागली. उमाने तिला धीर दिला आणि प्रधानांकडे वळली. अक्षराने केलेलं वर्णन ऐकून प्रधान आणि आनंदने एकमेकांकडे पाहिलं. आनंदने लगेच मोबाईल काढला आणि चेक करू लागला. अक्षराजवळ जात उमा म्हणाली, "अक्षरा, तुला अजून काही आठवतं त्या खुन्याबद्दल... एखादी वेगळी गोष्ट..." अक्षराने काही क्षण डोळे बंद केले. मग लगेच डोळे उघडत म्हणाली, "तो खुनी जेव्हा परत फिरला आणि त्याने विक्रमच्या डोक्यात गोळी मारली, त्याआधी तो काहीतरी बोलला... काय बरं... हां... तो म्हणाला, "बदनामी करतोस... हा घे तू केलेल्या बदनामीचा मोबदला..." हे ऐकून प्रधान आणि उमाने एकमेकांकडे पाहिलं. तेवढ्यात पुढे येत आनंद म्हणाला, "सर, आपला संशय खरा ठरला. अक्षराने केलेल्या वर्णनाची व्यक्ती आपल्या रेकॉर्ड्समध्ये आहे..." आनंदला मध्येच तोडत प्रधान म्हणाले, "बाबू... राईट..." आनंदने मानेनेच होकार दिला. तेवढ्यात प्रधानांना सचिनचा फोन आला. फोन ऐकून उमा आणि आनंदकडे पाहत प्रधान म्हणाले, "नताशा एका जाहिरातीचं शूटिंग करून घरी परतली आहे. तो प्रोड्यूसर जयवंत सध्या लोणावळ्याला एका मूव्हीच्या सेटवर आहे आणि तो पवन गोव्यात आहे. आनंद, तू आणि उमा नताशाकडे जा सचिन आणि मी त्या जयवंतला गाठतो..." पुन्हा फोनवर नंबर लावत प्रधान म्हणाले, “हॅलो, गोवा पोलिस स्टेशन... मी मुंबईहून सीनियर इन्स्पेक्टर प्रधान बोलतोय. तो हीरो पवन तिथेच शूटिंग करतो आहे. त्याच्यावर नजर ठेवा. And keep me posted…”

हे ऐकून अक्षरा घाबरली. उमाचा हात गच्च पकडत म्हणाली, "म्हणजे, तुम्ही मला इथे एकटं सोडून जाणार... आणि तो खूनी इथे आला तर... नको नको. मला इथे एकटं सोडू नका प्लीज..." अक्षराचं बोलणं ऐकून उमा म्हणाली, "अक्षरा, अगं असं काय करतेस... इथे डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, तुला काहीही होणार नाही. शिवाय आम्ही तुझ्या घरी कळवलं आहे. तुझे आई-वडील निघालेत यायला. डोंट वरी..." उमाने सांगूनही अक्षरा ऐकत नव्हती. तेव्हा प्रधान म्हणाले, "अक्षरा, आम्हाला काळजी आहे तुझी. पण विक्रमला मारणाऱ्या आणि तुला या अवस्थेत पोहोचवणाऱ्या त्या खुन्याला पकडायला हवं ना. एक काम करू, तुला आपण प्रोटेक्शन देऊ. मग तर झालं..." हे ऐकून अक्षराला थोडं हायसं वाटलं. तिने उमाचा हात सोडला. प्रधान पुन्हा म्हणाले, "उमा, अक्षराच्या पोलीस प्रोटेक्शनची व्यवस्था कर. एक लेडी ऑफिसर इथे आत आणि दोन ऑफिसर्स रूमच्या बाहेर. ओ.के. लेट्स गो..."

आनंद आणि उमा, आनंदच्या बाईकने नताशाकडे निघाले तर जीप घेऊन प्रधान लोणावळ्याला रवाना झाले. एका बंगल्याच्या गेटवर बाईक थांबली. गेटवर दोन माणसं तैनात होती. आनंदने त्यांना आय.डी. कार्ड दाखवताच त्यांनी गेट उघडलं. बाईक एका ठिकाणी पार्क करून आनंद आणि उमा दाराजवळ आली. उमाने बेल वाजवली. एका माणसाने दार उघडलं. "काय आहे... हे पहा मॅडम आत्ताच शूटवरून आल्या आहेत. त्या आता कोणालाही भेटणार नाहीत. तुम्ही उद्या सकाळी या. आता निघा..." उद्धटपणे हे उद्गार काढत त्या माणसाने दार लावायला सुरुवात केली. आनंदने त्याच क्षणी दार ढकललं आणि आत येत म्हणाला, "हे पहा मिस्टर, आम्ही इथे शिळोप्याच्या गप्पा मारायला आलो नाही. मी इन्स्पेक्टर आनंद आणि या सब-इन्स्पेक्टर उमा. एका खुनाच्या केस संबंधी नताशा मॅडमशी बोलायचं आहे. तेव्हा आता लगेच त्यांना बोलवा..." आनंदचा चढा आवाज ऐकून तो माणूस जरा वरमला. तिथेच असलेल्या इंटरकॉमने नंबर लावत तो म्हणाला, "मॅडम, खाली पोलिस आलेत. काही चौकशी करायचं म्हणत आहेत. ओ.के. मॅडम..." मग फोन ठेवत तो म्हणाला, "मॅडम पाच मिनिटात खाली येत आहेत. बाय द वे, मी सतीश. मॅडमचा सेक्रेटरी. सॉरी हं मी तसा बोललो..." सतीश बोलतच होता, की वरून आवाज आला, "सतीश..."

सर्वांनी वर पाहिलं तर एक सुंदर मुलगी जिना उतरत होती. जिना उतरून ती सोफ्यावर बसली. मग तिने सतीशला विचारलं, "सतीश, हेच का ते पोलिसवाले..." सतीशने होकार देताच आनंद आणि उमाकडे पाहत ती म्हणाली, "काय काम काढलं माझ्याकडे, माझा ऑटोग्राफ हवा आहे की फोटोग्राफ. असं करा तुम्ही दोन्हीही घेऊन जा. सतीश, यांना माझे साईन केलेले फोटोज दे. नाव, विल यू प्लीज एक्सक्यूज मी..." इतकं बोलून नताशा उठली. उमाला तिचं वागणं जरा खटकलंच होतं. ती लगेच नताशाजवळ जात म्हणाली, "नताशा मॅडम, आम्हाला ना तुमचा ऑटोग्राफ हवा आहे, ना फोटोग्राफ. सिने जर्नालिस्ट विक्रमला ओळखता तुम्ही..." विक्रमचं नाव ऐकताच नताशा वळली आणि खाली मान घालून म्हणाली, "हो, न्यूजमध्ये वाचलं मी सकाळी. चांगला रायटर आणि फोटोग्राफर होता. त्याच्या आर्ट्कल्समुळे अनेकांना इंडसर्ट्रीत एंट्री मिळाली. मीसुद्धा त्याने माझ्यावर आर्टिकल लिहावं म्हणून त्याच्याकडे गेले होते. पण विक्रमने माझ्या फोटोजना मॉर्फ करून चुकीच्या पद्धतीने वापरले. मैत्रीच्या पाठीत खंजीर खुपसला त्याने..."

'मैत्री' हा शब्द ऐकताच आनंद आणि उमा चपापले. दोघांच्याही प्रश्नार्थक चेहेऱ्याकडे पाहून नताशा म्हणाली, "हो. मी आणि विक्रम कॉलेजपासूनचे मित्र आहोत. मी, विक्रम आणि दिव्या एकाच वर्षी पास-आऊट झालो. विक्रम त्याही वेळी छान लिहायचा, फोटो काढायचा. त्याच्या या गुणांवर दिव्या इम्प्रेस झाली होती. ती विक्रमवर प्रेम करू लागली होती. पण विक्रम माझ्याकडे आकर्षित होता. त्याने मला प्रपोजही केलं होतं. पण मी नकार दिला. कॉलेजच्या शेवटच्या दिवशी विक्रम मला म्हणाला होता, की या नकाराचा तो बदला घेईल. आणि आज हे आर्टिकल... मी ऍक्ट्रेस व्हायला आले होते. पण विक्रमच्या आर्टिकलने बोल्ड गर्लचा शिक्का माथी लागला माझ्या. मला क्लब डान्सर, आयटम गर्ल असेच रोल मिळू लागले आणि मी स्वीकारले. कारण माझ्यापुढे दुसरा पर्याय नव्हता. हे सगळं वैभव आतून पोकळ आहे. हा बंगलाही रेन्टवर आहे. ऍक्ट्रेस बनायला मी माझ्या लग्नमंडपातून पळून आले होते.  मला वाटलं विक्रम माझी मदत करेल. पण त्याने..." इतकं बोलून नताशाने डोळ्यांच्या कडा पुसल्या. पुढे होत उमा म्हणाली, "म्हणून तुम्ही विक्रमला मारायला माणूस पाठवलात..."

हे ऐकून डोळे पुसत नताशा म्हणाली, "म्हणजे, तुम्ही माझ्यावर संशय घेताय... ऑफिसर्स, विक्रम मेल्याचा आनंद आहे मला. पण मी त्याचा खून करवला नाही. आणि तुम्ही फक्त मलाच का प्रश्न विचारताय... दिव्यालाही विचारा. कदाचित तिनेच पाठवलं असेल कोणालातरी विक्रमला मारायला. विक्रमच्या मरण्याने तिलाच तर सर्वात जास्त फायदा आहे... शिवाय तिचं रानही मोकळं झालं आहे..." नताशाचं बोलणं ऐकून आनंद आणि उमाला प्रश्न पडला. आनंदने नताशाला प्रतिप्रश्न केला, "नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला मॅडम..." आनंदकडे पाहत नताशा म्हणाली, "हे तुम्ही दिव्यालाच विचारा. हा आहे दिव्याचा पत्ता. मी याहून जास्त काहीच सांगणार नाही..." नताशाकडून बाहेर पडल्यावर बाईकजवळ येताना आनंद आणि उमामध्ये बोलणं झालं. उमा म्हणाली, "चांगली ऍक्ट्रेस आहे. मध्येच इमोशनल होते तर मध्येच आवाज वाढवते..." उमाला दुजोरा देत आनंद म्हणाला, "नताशा काहीतरी लपवते आहे आपल्यापासून. सध्यातरी आपल्याला या दिव्याकडून काही माहिती मिळते का ते पाहू..."

तिथे प्रधान आणि सचिन, प्रोड्यूसर जयवंतला भेटायला एका शूटिंगच्या सेटवर पोहचले. माणसांची लगबग चालू होती. कॅमेरा ऍडजस्ट केला जात होता. एका माणसाला अडवत सचिनने जयवंतबद्दल विचारलं, तर त्याने एका झाडाकडे बोट दाखवलं. हॅट, जॅकेट घातलेला एक माणूस झाडाखाली ठेवलेल्या खुर्चीत बसला होता. प्रधान आणि सचिन तिथे गेले. त्या माणसासमोर उभं राहत सचिन म्हणाला, "मि. जयवंत. मी सब-इंस्पेक्टर सचिन आणि हे सीनियर इंस्पेक्टर प्रधान. विक्रम मर्डर केसबद्दल तुम्ही ऐकलं असेलच... त्याबद्दल तुमच्याशी बोलायचं आहे..." उठून उभा राहत जयवंत म्हणाला, "हो. सकाळी न्यूजमध्ये पाहिलं मी. बरं झालं मेला तो. आज तर पार्टी करेन मी. पण त्याची चौकशी करायला तुम्ही इथे का आलात..." पुढे येत प्रधान म्हणाले, "मि. जयवंत, तुमच्यात आणि विक्रममध्ये त्याने लिहिलेल्या एका आर्टिकलवरून वाद होता ना... त्यासाठीच आलो आहोत आम्ही इथे..." जयवंतने टोपी काढली. कपाळावरचा घाम रुमालाने टिपून घेतला आणि बोलायला सुरुवात केली...

"सर, मी प्रोड्यूसर आहे आणि विक्रम फोटोग्राफर आणि जर्नालिस्ट. आम्हा दोघांनाही कधी कधी एकमेकांची गरज भासते. एक दिवस विक्रम माझ्याकडे एक स्टोरी घेऊन आला. स्टोरी चांगली होती पण माल-मसाला जास्त नव्हता. सर आजकाल पब्लिकला रियलिस्टिक स्टोरी तर लागतेच, पण मसालासुद्धा लागतो. मी विक्रमला स्टोरीमध्ये बदल करायला सांगितलं पण विक्रमने नकार दिला. मी त्याला युनिटमधून काढून टाकलं आणि दुसऱ्या रायटरची स्टोरी घेऊन मूव्ही बनवली. सर, मूव्ही हिट झाली. रायटरला अवॉर्डपण मिळाला. याचा राग म्हणून विक्रमने, मी बी ग्रेड मूव्हीज बनवतो. सेक्स आणि वॉयलन्स शिवाय माझ्या मूव्हीजमध्ये काहीच नसतं असा गवगवा केला. मी विक्रमला त्याच्या ऑफिसमध्ये भेटायला गेलो तर तिथेही माझ्याबद्दल अजून लिहीन अशी धमकी दिली त्याने..." जयवंतला तोडत सचिन म्हणाला, "आणि म्हणून तुम्ही विक्रमचा काटा काढलात. बरोबर ना..." प्रधानांकडे पाहत जयवंत म्हणाला, "सर आम्ही सगळे इंडस्ट्रीमधले आहोत. आमच्याबद्दल चांगलं-वाईट नेहमीच लिहिलं जातं. म्हणून आम्ही लेखकाचा खून करत बसत नाही. आणि तुम्ही फक्त मलाच का विचारता आहात... त्या हिरो पवनलाही विचारा की... त्याच्या अफेयरबद्दलही विक्रमने लिहिलं होतं..." प्रधान काही बोलणार इतक्यात त्यांना आनंदचा फोन आला...

तिथे आनंद आणि उमा, दिव्याला भेटण्यासाठी नताशाने दिलेल्या पत्त्यावर पोहोचले. एका छोटेखानी बंगल्याच्या आवारात बाईक थांबली. आस-पास कोणीच नव्हतं. दोघंही दाराजवळ आली. बराच वेळ बेल मारूनही कोणी दार उघडलं नाही. दार ठोठावण्यासाठी आनंदने दारावर थाप मारली तर ते आत ढकललं गेलं. आनंद आणि उमाने एकमेकांकडे पाहिलं. दारात बुटांचे काही ठसे होते. झटक्यात दोघांनी आपापल्या गन्स काढल्या. आनंद पुढे झाला आणि त्याने दार पूर्ण उघडलं. आत कोणीच नव्हतं. कानोसा घेत दोघांनी आत प्रवेश केला. दोघांची नेत्रपल्लवी झाली. उमा एका बाजूला वळली आणि आनंद दुसऱ्या दिशेला गेला. किचनच्या बाजूला एक दार होतं. उमाने कडी काढून दार उघडलं. तो मागचा दरवाजा होता. उमाने आनंदकडे पाहिलं. त्याने होकारार्थी मान हलवली. उमाने दार बंद केलं आणि किचनचा तपास करून ती पुन्हा हॉलकडे वळली. दुसरीकडे आनंद तिथल्या रूम्स शोधू लागला. एका रूममध्ये बेडच्या बाजूला असलेल्या टेबलवर आनंदला दोन फ्रेम्स सापडल्या...

एका फ्रेममध्ये विक्रमचा फोटो होता तर दुसऱ्या फ्रेममध्ये दिव्याचा फोटो होता. आनंदने टेबलाखालचा ड्रॉव्हर उघडला. त्यात एक फाईल होती. आनंदने ती फाईल बाहेर काढली. ते विक्रम आणि दिव्याच्या घटस्फोटाचे पेपर्स होते. शिवाय त्यात दिव्या आणि पवनचे एकत्रित फोटोही होते. ते फोटो आणि फाईल पाहताना आनंद विचार करू लागला, "म्हणजे विक्रम आणि दिव्या नवरा बायको होते तर... आणि या पवनसोबत दिव्याचं अफेयरपण चालू होतं..." आनंद विचारच करत होता, की फटाक्यासारखा आवाज आला आणि आनंदच्या कानाच्या बाजूने एक गोळी जाऊन मागच्या आरशाला लागली. काच निखळून खाली आली आणि आनंदही उडी मारून बेडच्या आडोशाला गेला. त्याला हॉल दिसला आणि हातात गन घेऊन सोफ्याच्या मागे बसलेली उमाही दिसली. समोरच्या खिडकीतून दोन मास्कधारी गुंड आलटून-पालटून फायर करत होते. उमा ते फायर्स चुकवत स्वत: गोळ्या झाडत होती. इथे आनंद ज्या बेडचा आडोसा घेऊन लपला होता त्या बेडच्या पलिकडे असलेल्या खिडकीतूनही दोघंजण आलटून-पालटून फायर करत होते आणि आनंद त्यांना प्रतिउत्तर देत होता...

आनंद आणि उमाच्या गोळ्यांनी एकेक गुंड मरून पडला. आता दोघांच्याही समोरच्या खिडकीत एकेक गुंड राहिला होता. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. आनंदने आधी एक बोट मग दुसरं बोट दाखवलं. मग दोन वेळा हात गोल फिरवला. उमाने होकारार्थी मान हलवली. दोघंही खाली गेली. मॅगझीन्स बदलून गनचं लिव्हर खेचलं आणि एकामागून एक हवेत फायर करू लागले. लागोपाठ फायर येऊ लागल्याने ते दोन गुंड भिंतीआड लपले. हे पाहून आनंद आणि उमा तसेच फायर करत मागच्या दाराबाहेर पडले. दोन्ही दिशांनी जात त्यांनी त्या दोन्ही गुंडांच्या डोक्याला आपापल्या गन्स लावल्या. आनंद व उमा अचानक त्यांच्या मागे आल्याने दोन्हीही गुंडं बावरले आणि हात वर करून उभे राहिले. आनंदने दरडावतच विचारलं, "काय रे, आमच्यावर गोळ्या का झाडल्यात..." त्यातला एक वळू लागला तशी उमा म्हणाली, "जसे आहात तसेच रहा नाहीतर... आता बोला लवकर..." त्यातला एक गुंड बोलता झाला, "आम्ही या घराच्या पाळतीवर होतो. या घरात येणाऱ्या व्यक्तीचा काटा काढायची सुपारी मिळाली होती आम्हाला. म्हणून आम्ही..." आनंदने दोघांची झडती घेतली. मरून पडलेल्या बाकी दोघांची झडती घ्यायला आनंद वळलाच होता, की एका गुंडाने उमाच्या हाताला हिसडा दिला...

उमाची गन खाली पडली. दोन्हीही गुंडं पळू लागले. उमाने गन उचलून आणि आनंदने वळून एकाच वेळी फायर केलं. दोन्हीही गुंडं गोळ्या लागून खाली कोसळले. आनंद पुन्हा त्या आधीच्या गुंडांकडे वळला. एकाच्या पँटच्या खिशात पैसे गुंडाळलेला पेपर नॅपकिन होता. दोघांनी पाहिलं, तर त्या नॅपकिनच्या एका कोपऱ्यावर लाल रंगात 'पी.सी.' ही अक्षरं होतं आणि बाजूलाच एका घराचं चित्र होतं. आनंद आणि उमाने एकमेकांकडे पाहिलं. उमाने इंटरनेटवर ही अक्षरं सर्च केली आणि पटेल कॉटेजचं नाव समोर आलं. आनंदने प्रधानांना फोन लावला, "सर, मी आणि उमा नताशाकडून दिव्याच्या घरी आलो होतो. इथे काही माणसं दबा धरून बसली होती. त्यांनी गोळ्या झाडल्या आमच्यावर. हो सर आम्ही ठीक आहोत. सर, विक्रम, दिव्या आणि पवनबद्दल काही महत्वाच्या गोष्टी हाती लागल्या आहेत. शिवाय एक पेपर नॅपकिन मिळाला आहे. तो पटेल कॉटेजचा नॅपकिन आहे. आम्ही दोघं तिथेच जातोय सर... ओ.के. सर..." फोन ठेवत आनंद म्हणाला, "सर आणि सचिन त्या प्रोड्यूसर जयवंतला भेटले. त्यांनाही काही गोष्टी समजल्या आहेत. तो ऍक्टर पवन गोव्याला होता. तो थोड्या वेळात मुंबईत दाखल होत आहे. सर त्याला एयरपोर्टवरून चौकीवर आणणार आहेत..."

आनंद बोलत होता पण उमा टक लाऊन त्या पेपर नॅपकिनकडे पाहत होती. उमाचं लक्ष नाही पाहून आनंदने तिला हटकलं, "उमा... कसला विचार करतेस..." तो नॅपकिन समोर धरत उमा म्हणाली, "हा लोगो मी नुकताच पाहिला आहे. आठवत नाही कुठे पाहिला हा लोगो. पण इतक्यातच पाहिल्यासारखा वाटतोय..." आनंदनेही तो नॅपकिन पुन्हा पाहिला. मग उमाकडे पाहत म्हणाला, "कदाचित या घरावर पाळत ठेवण्यासाठी आणि घरात येणाऱ्या व्यक्तीवर हल्ला करण्यासाठी ज्या व्यक्तीने या गुंडांना पाठवलं, त्याचा या लोगोशी काहीतरी संबंध असावा... आणि आपण त्या व्यक्तीला भेटलो असू म्हणून तुला हा लोगो ओळखीचा वाटत असेल... पण या सगळ्यावर इथे चर्चा करण्यापेक्षा तुर्तास आपण चौकीवर जाऊ. कदाचित तिथे जाऊन काहीतरी समजेल..." इतकं बोलून आनंद आणि उमा बाईकने निघाले...

तिथे एयरपोर्टवर प्रधान आणि सचिन, पवनच्या बाहेर येण्याची वाट पाहत होते. सचिन म्हणाला, "सर, हा पवन मोठा माणूस आहे. आपण त्याला चौकीवर नेलं तर ठिक होईल का..." प्रधान म्हणाले, "मला माहित आहे त्याला असं डायरेक्ट नेता येणार नाही. म्हणून मी तशी परमिशन घेऊनच आलो आहे. ते बोलतच होते की प्रधानांचा फोन वाजला, "हॅलो, सीनियर इंस्पेक्टर प्रधान बोलतोय... येस डॉक्टर... ओ.के. तिथे आमची माणसं आहेत ना, त्यांना द्या जरा... हां, हे बघा तिला फक्त स्टेशनला नका सोडू. तिच्या ट्रेनमध्ये सीटपर्यंत नीट सोडा..." फोन खिशात ठेवत सचिनकडे वळून प्रधान म्हणाले, "हॉस्पिटलमधून फोन होता. अक्षराचे आई-वडील आलेत तिला न्यायला. मी आपल्या माणसांना अक्षराला स्टेशनवर सोडायला सांगितलं आहे..." प्रधान बोलतच होते, की समोरून पवन येत असल्याची खूण सचिनने केली. सचिनला गाडी काढायला सांगून प्रधान पवनच्या दिशेने गेले...

पवनजवळ जात प्रधान म्हणाले, "मि. पवन. मी सीनियर इंस्पेक्टर प्रधान. एका केस संदर्भात तुमच्याशी बोलायचं आहे. तुम्ही प्लीज चौकीवर येता..." पवनने प्रधानांकडे पाहिलं आणि म्हणाला, "विक्रम..." प्रधानांनी होकारार्थी मान हलवली आणि पवन त्यांच्यासोबत चालू लागला. एयरपोर्टच्या बाहेर पडताना प्रधानांनी सचिनला गाडी घेऊन यायला सांगितलं आणि पवनकडे वळले तोच गोळी झाडण्याचा आवाज आला. पवन व प्रधान एकत्र खाली बसले. अजून एक गन शॉटचा आवाज आला आणि पवनच्या बाजूलाच असलेला कचऱ्याचा लोखंडी डबा खाली पडला. पवनला कव्हर करत प्रधानांनी समोर पाहिलं तर एका बाईकवर एक मास्क घातलेला माणूस हातात पम्प गन घेऊन पवनवर गोळ्या झाडत होता. प्रधानांनी त्यांची गन काढली आणि लोड करून फायर केलं. मास्कधारी सरकला पण प्रधानांनी झाडलेली गोळी त्याच्या हाताला लागली आणि त्याची गन त्याच्या हातून लांब फेकली गेली. मास्कधाऱ्याने बाईक सुरू केली आणि भरधाव वेगाने बाहेरच्या दिशेने निघाला...

पवनला सांभाळत प्रधानांनी रस्त्यावर पाहिलं तर सचिनही गाडीसह तिथे पोहोचला होता. सचिनकडे पाहत प्रधान ओरडले, "सचिन दॅट इज द मॅन... पकड त्याला..." सचिनने गाडीचा गेयर बदलला आणि मास्कधाऱ्याच्या मागे जाऊ लागला. तिथे एयरपोर्टवर घडल्या प्रकारामुळे अनेक पोलिस जमा झाले होते. त्यातल्याच दोघांना प्रधानांनी गाडी आणायला सांगितलं आणि पवनकडे वळत म्हणाले, "आर यू ओ.के..." पवनने होकारार्थी मान हलवली. तेवढ्यात हवालदार पोलिस जीप घेऊन आले. प्रधान आणि पवन जीपमध्ये बसले आणि जीप चौकीकडे निघाली. तिथे सचिन त्या बाईकस्वार मास्कधाऱ्याचा पाठलाग करत होता. बाहेर हात काढून सचिन त्या मास्कधाऱ्यावर गोळ्या झाडत होता. तो मास्कधारी बाईक वेडी-वाकडी हलवत त्या गोळ्या चुकवत होता. रत्यावरून गल्लीमध्ये, गल्लीमधून पुन्हा रस्त्यावर असा भरधाव वेगाने तो बाईकस्वार जात होता आणि सचिन त्याच्या मागावर होता...

सचिनने एक गोळी झाडली. मास्कधाऱ्याने बाईक वळवली. सचिनने झाडलेली गोळी मास्कधाऱ्याच्या गळ्यात असलेल्या स्ट्रॅपवर बसली. स्ट्रॅप तुटला आणि सोबत जोडलेली साईड-बॅग निखळून वेगळी होऊन बाजूला फेकली गेली. सचिनसोबत त्या मास्कधाऱ्यानेही ती बॅग पडताना पाहिली होती. त्याने एकवार समोर पाहिलं. मग आपली बाईक बॅलन्स केली. नंतर हँडलवरचे दोन्ही हात सोडून त्याने दोन गन्स बाहेर काढल्या आणि चालत्या बाईकवरच पाठीवर आडवा झोपून एकाच वेळी दोन्ही गोळ्या सचिनच्या गाडीच्या दिशेने झाडल्या. गोळ्यांनी सचिनच्या गाडीच्या पुढच्या चाकांचा बरोब्बर वेध घेतला. चाकं फाटली आणि गाडी कंट्रोल बाहेर जाऊ लागली. क्षणाचाही उशीर न करता सचिनने गाडीतून उडी घेतली. गाडी त्याच वेळी पुढच्या दोन चाकांवर उचलली जाऊन हवेत गंटांगळ्या खात जमिनीवर आली. आदळताच गाडीचा स्फोट झाला आणि आगीच्या लोळासह रस्त्यावर घासत गाडीने रस्त्यावरचं रेलिंग तोडलं आणि घळीत शिरली. मास्कधाऱ्याने एकवार मागे पाहिलं आणि बाईकचा वेग वाढवत पुढे निघून गेला...

जीपमधून उडी घेऊन रस्त्याच्या कडेला पडलेला सचिन उठला आणि रस्त्यावर आला. एव्हाना तिथे बघ्यांची गर्दी जमली होती. सचिनने बाईक गेली त्या दिशेला नजर फिरवली पण तोवर बाईक निघून गेली होती. गर्दीतले काही जण, "तुम्ही ठिक आहात का...", "कोण होता तो बाईकवाला...", "रॅश ड्रायव्हिंग काय करताय...", "तुमच्याकडे बंदूक कशी..." अशा प्रश्नांचा भडिमार करत होते. सर्वांना शांत करत सचिनने स्वत:चं आय.डी. कार्ड दाखवून स्वत:ची ओळख पटवून दिली. गर्दी पांगू लागली तसा सचिनने मोबाईल काढून प्रधानांना फोन लावला, "हॅलो सर... सर तो बाईकवाला निसटला सर. तो माझ्या आवाक्यात होता. पण त्याने टायरवर गोळी झाडली. टायर फाटलं आणि गाडी आऊट ऑफ कंट्रोल झाली. हो सर मी ठिक आहे. सर मी पण त्याच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. त्यातली एक..." सचिन पुढे काही बोलणार इतक्यात त्याला आठवलं गोळी बाईकरच्या गळ्यातल्या क्रॉस बॅगच्या पट्ट्याला लागली होती आणि पट्टा तुटून बॅग बाजूला फेकली गेली होती. "सर, मी थोड्या वेळात तुम्हाला परत कॉल करतो..." असं म्हणून सचिनने फोन ठेवला आणि मागच्या दिशेने चालू लागला...

थोडं अंतर चालून गेल्यावर एका झाडाजवळ पडलेली एक वस्तू सचिनला दिसली. तो जवळ गेला तर ती वस्तू म्हणजे तीच क्रॉस बॅग होती. त्यात थोडेफार पैसे, सिगारेट लायटर आणि एक की-चेन होती. त्या की-चेनवर "पी.सी. २२..." लिहिलं होतं. सचिनने थोडा विचार केला आणि पुन्हा प्रधानांना फोन लाऊन त्या बॅगबद्दल आणि की-चेनबद्दल सांगितलं आणि म्हणाला, "सर, मी या की-चेनवरच्या लोगोचा इंटरनेटवर शोध घेतला. सर हा पटेल कॉटेजेसचा लोगो आहे. २२ नंबर म्हणजे कदाचित रूम नंबर असावा. सर मी तिथेच निघालो आहे. तुम्हाला पत्ता पाठवला आहे सर..." इतकं म्हणून सचिनने फोन ठेवला आणि पुन्हा रस्त्यावर येऊन त्याने लिफ्टसाठी हात करायला सुरुवात केली. गाड्या थांबतच नव्हत्या. काही क्षणात पोलिसांची मोबाईल व्हॅन त्याच रस्त्याने चालली होती. सचिनने हात दाखवताच ती जवळ येऊन थांबली. आत बसलेल्या पोलिसांना सचिनने स्वत:ची ओळख करवून दिली आणि त्याच गाडीत बसून सचिन पटेल कॉटेजकडे रवाना झाला...

काही वेळाने व्हॅनने मुख्य रस्ता सोडला आणि मातीच्या रस्त्यावरून पुढे जाऊ लागली. झाडीतून डोकं वर काढलेला  एक बोर्ड समोर होता. त्यावर लिहिलं होतं 'पटेल कॉटेजेस...' सचिनने गाडी थांबवायला सांगितली. व्हॅनमधले हवालदार सचिनसोबत येऊ पाहत होते. पण सचिन म्हणाला, "इथे थोडा धोका आहे. तुम्ही असेच जवळच्या चौकीवर जा आणि अजून कुमक घेऊन या. तोवर मी..." सचिन पुढे बोलणार इतक्यात त्याची नजर व्हॅनच्या मागच्या सीटकडे गेली. तिथे दोन माणसं झोपलेली होती. त्यांची अवस्था पाहून सचिनला समजलं की ते दोघंही मेलेले आहेत. सचिनने त्या हवालदारांकडे पाहिलं. दोघंही हसत होते. त्यातला एक म्हणाला, "धोका आम्हाला नाही. तुला आहे. बरेच पुढे आलात तुम्ही लोक. पण आमचा बॉससुद्धा हुशार आहे. जागो जागी आमच्यासारखी माणसं पेरून ठेवली होती त्यांनी. नताशाच्या घरातला तो सेक्रेटरी, दिव्याच्या घरावर हल्ला करणारे गुंड आणि आता आम्ही. आत्तापर्यंत ते बाकी पोलिसवाले तर मेले असतील. आता तुझी पाळी..."

दुसऱ्या बाजूने आनंद आणि उमा गेटजवळ पोहोचले होते. पटेल कॉटेज असा मोठा बोर्ड तिथे होता. समोर रिसेप्शनवर एक माणूस बसला होता. आनंद आणि उमा काऊंटरवर गेले. आपले आय.डी. कार्ड दाखवून दोघांनी स्वत:ची ओळख पटवून दिली. बाबूचा फोटो दाखवत आनंदने विचारलं, "हा माणूस राहतोय का इथे..." बाबूचा फोटो पाहून रिसेप्शनवरच्या माणसाने डोळे विस्फारले. तो म्हणाला, "हो सर. तीन दिवसांपूर्वी हा माणूस इथे आला होता. कॉटेज नंबर २२ दिला आहे त्याला. पण हा आत्ता कॉटेजमध्ये नाही. सकाळीच बाहेर गेला आहे. चावी मात्र दिली नाही..." तो बोलतच होता की प्रधानही तिथे पोहोचले.  उमाने प्रधानांना सर्व माहिती दिल्यावर रिशेप्शनिस्टकडे पाहत प्रधान म्हणाले, "हे पहा, जो माणूस कॉटेज नंबर २२ मध्ये आहे तो एक अपराधी आहे. आम्ही त्यालाच पकडायला आलो आहोत. तुम्ही सगळे इथून बाहेर जा. कदाचित तुम्हालाही धोका होऊ शकतो... उमा, तू इथेच थांब. कॉटेजवर काही झालं तर आपल्याकडे बॅकप असायला हवा. आनंद, लेट्स गो..."

उमाला रिसेप्शनवर सोडून प्रधान आणि आनंद कॉटेज नं २२कडे वळले. मॅनेजरने कॉटेजचा रस्ता दाखवल्यावर प्रधानांनी त्यांना मागे राहण्याचा इशारा केला. मॅनेजर आणि कॉटेजचा बाकी स्टाफ मागे गेले तशी प्रधान आणि आनंदने आपापल्या गन्स काढून लोड केल्या. प्रधान डावीकडून गेले तर आनंदने उजवी बाजू धरली. २२ नंबरमध्ये जर कोणी असेल तर त्या व्यक्तीला दिसू नये अशा पद्धतीने भिंतींमागे लपत, झाडाच्या आड जात, गाड्यांचा आडोसा घेत दोघं कॉटेजच्या जवळ पोहोचली. कॉटेज नंबर २२ त्या आवारात एकदम शेवटी होतं. पलिकडच्या बाजूला छोटी दरी होती आणि दरीच्या अंताला तलाव होता. प्रधान आणि आनंदची नेत्रपल्लवी झाली आणि प्रधानांनी डाव्या हाताचं पहिलं बोट हवेत फिरवलं. आनंदला समजलं आणि त्याने मानेनेच होकार दिला. दोघांनी बाहेरूनच कॉटेजची पडताळणी केली. आजू-बाजूला कोणीही नाही याची खात्री करून दोघंही कॉटेजच्या मुख्य दाराशी आली...

तिथे रिसेप्शनवर उमा वाट पाहत असताना मॅनेजर तिथे आला. मॅनेजरला पाहून उमाला प्रश्न पडला. उमाजवळ येत मॅनेजर म्हणाला, "दोन्ही ऑफिसर्स कॉटेजकडे गेलेत आणि तुम्हालाही बोलावलं आहे..." उमा पुढे जाऊ लागली तसं मॅनेजरने तिच्या डोक्याला पिस्तूल लावलं. उमाने हात वर केले तसा तो मॅनेजर म्हणाला, "कुठे निघालात मॅडम... तुमच्या त्या दोन ऑफिसर्सकडे... ते आता वरच्या वाटेने जाणार आहेत. मानलं बॉस तुम्हाला. इतक्या सफाईदारपणे तुम्ही सर्वांचा काटा काढला की बस. इथे आल्यावर आम्ही इथल्या सगळ्या वेटर्सना आणि रिसेप्शनिस्टला कायमची रजा दिली आणि हे कॉटेज ताब्यात घेतलं. तो तुमचा ऑफिसर आमच्या बॉसचा पाठलाग करत होता. बॉस तर निसटला पण या कॉटेजच्या बाजूच्या जंगलात आमच्या साथिदारांनी तुमच्या माणसाचा गेम केला. आता तुम्हाला तिघांनाही इथेच उडवणार आम्ही. आता मरणाला तयार हो..." बोलता बोलता मॅनेजरने लिव्हर मागे-पुढे केलं...

प्रधानांनी कानोसा घेतला. आतून कसलाही आवाज येत नव्हता. आनंद आणि प्रधानांनी एकमेकांकडे पाहिलं आणि लाथा हाणून दार उघडलं. ती एक छोटीशी खोली होती. पलंग, कपाट, एक छोटा फ्रीज, एक टेबल आणि खोलीच्या कोपऱ्यात असलेली एक वॉशरूम. आनंद आणि प्रधान पिस्तूलं सरसावत अंत शिरले. आनंद वॉशरूमकडे गेला तर प्रधान कपाट चेक करू लागले. प्रधानांनी कपाट उघडलं. आत काही पुरुषी कपडे होते तर काही कपडे बायकी पण होते. एका पॅकेटमध्ये बरीच मोठी रक्कम होती आणि बाजूला काही पुडक्या होत्या. एक पुडी फाडून प्रधानांनी त्यातली वस्तू चाखली. प्रधानांचे डोळे विस्फरले. त्या पुडक्यातली वस्तू ड्रग्स होते. दार ढकलून आनंदने पिस्तूल समोर धरलं. पण वॉशरूममध्ये कोणीही नव्हतं. आनंद मागे वळला तोवर कपाट चेक करून प्रधान टेबलजवळ पोहोचले. तिथे खाण्याच्या दिशेस पडलेल्या होत्या, चहाचे कप होते आणि टेबलाच्या एका कोपऱ्यात एक फोटो फ्रेम होती. प्रधानांनी फ्रेम उचलली त्यातले फोटो पाहून प्रधानांचे डोळे मोठे झाले. तोवर आनंद प्रधानांजवळ येऊन पोहोचला होता. आनंदकडे पाहत प्रधान म्हणाले, “आनंद, हे दोन्ही फोटो पाहिलेस...” फोटो पाहत आनंद म्हणाला, “सर, हा फोटो तर...” आनंदला मध्येच तोडत प्रधान म्हणाले, “तो लिफाफा कुछ और था, और मजमून कुछ और है...”

दोघं बोलतच होते, की प्रधानांचा फोन वाजला, “हॅलो सीनियर इन्स्पेक्टर प्रधान बोलतोय..., व्हॉट... कसा पळाला तो... शिट...” बोलणं ऐकून फोन आत ठेवत प्रधान म्हणाले, “पवन निसटला...” प्रधान पुढे बोलणार इतक्यात खिडकीच्या काचा अचानक फुटल्या. बाहेरून काही बंदुकधाऱ्यांनी कॉटेजला तीन बाजूंनी घेरलं होतं आणि ते कॉटेजवर बेछूट गोळीबार करू लागले. तिकडे जंगलात दोन्ही गुंडांनी पिस्तुली काढल्या. एकाने सचिनची गन काढून घेतली तर दुसऱ्याने त्याचा मोबाईल हिसकावला. सचिनला धरून दोघं झाडीत शिरली. दोन्ही हात डोक्यामागे धरून सचिन पुढे चालला होता आणि हातात पिस्तुली सरसावून ते गुंडं मागून येत होते. सचिन थोडा पुढे गेला आणि अचानक वाकला. आपले दोन्ही हात जमिनीला टेकवत त्याने पायाने दोघांची पिस्तुलं उडवली. अचानक झालेल्या हल्ल्याने दोन्ही गुंडं मागे सरकले. संधी साधून सचिनने आपल्या पायाने एका गुंडाच्या मानेवर वार केला. तो गुंडं झाडावर आदळून तिथेच निपचित पडला. दुसऱ्या गुंडाने ठोसा मारायला हात फिरवला तसा सचिन बाजूला झाला आणि लगेच त्या गुंडाची मानगूट पकडडून वळवली. त्या गुंडाची मान मोडली आणि तोही गतप्राण झाला. सचिनने लगेच आपला मोबाईल आणि गन ताब्यात घेतले. मोबाईलकडे पाहत सचिन म्हणाला, “मोबाईल तर बंद पडला आहे. आता सरांना कॉनटॅक्ट कसा करू... त्या पटेल कॉटेजमधून संपर्क साधतो सरांशी...” इतकं बोलून त्याने मोबाईल खिशात ठेवला आणि पटेल कॉटेजकडे मोर्चा वळवला...

गन शॉट्सचे आवाज रिसेप्शनपर्यंत येत होते. उमाच्या डोक्यावर लावलेलं पिस्तूल स्थिर करत मॅनेजर गोळीबाराच्या दिशेला पाहू लागला. मॅनेजरचं लक्ष नाही पाहून उमा झटक्यात आपले दोन्ही पाय जमिनीला समांतर करून खाली बसली आणि तिने मॅनेजरच्या पोटात गुद्दा मारला. अकस्मात झालेल्या हल्ल्याने मॅनेजर बावचळला. त्याच्या हातून त्याची गन निखळून पडली. उमाने लगेच आपले पाय दुमडले आणि पोटात गुद्दा बसल्याने वाकलेल्या मॅनेजरच्या हनवटीवर लाथ मारली. उमा आणि तो मॅनेजर दोघांनीही हवेत कोलांटी मारली. मॅनेजर छातीवर पडला तर उमा आपल्या पायांवर उभी राहिली. उमाने हातकडी काढून त्या मॅनेजरचे हात त्याच्या पाठीला जखडले. त्याच्या कोटाच्या आतल्या बाजूला असलेली स्वत:ची गन मिळवली आणि कॉटेज नं. २२कडे जाऊ लागली...

इकडे गोळ्यांच्या वर्षावापासून वाचण्यासाठी प्रधान आणि आनंदने जमिनीवर समांतर उडी मारली आणि बेडच्या आडोशाला गेले. दोघांनीही आपापल्या गन्स काढल्या पण डोकं वर करून गोळ्या चालवणं त्यांना शक्य होत नव्हतं. कॉटेजवर तीनही बाजूंनी बेछूट गोळीबार होत होता. काचा फुटत होत्या, तावदानं तुटत होती, भिंतींचे टवके उडत होते तरीही गोळीबार थांबत नव्हता. इतक्यात कॉटेजच्या उजव्या बाजूने रिसेप्शनकडून उमा आली आणि डाव्या बाजूने जंगलाकडून सचिन आला. दोघांनीही उजव्या आणि डाव्या बाजूच्या गुंडांवर प्रतिहल्ला चढवला. हे पाहून गुंडांनी आपल्या गन्सच्या नळ्या सचिन व उमाकडे वळवल्या. गोळीबार दोन बाजूंनी बंद झाला हे लक्षात येताच प्रधान आणि आनंदने आपापल्या गन्स लोड केल्या आणि गोळ्या चालवतच बेडमागून वर येत समोरच्या खिडकीची एकेक बाजू पकडली. कॉटेजला घेरून हल्ला करणारे ते गुंड स्वत:च या चौधांच्या घेरात अडकले आणि मारले गेले. मरता मरता एका गुंडाने बॉम्बची पिन काढून बॉम्ब कॉटेजच्या दिशेने भिरतावला. बॉम्ब आत आला आहे हे पाहताच प्रधान आणि आनंदने खिडकीतून उड्या टाकल्या. स्फोट झाला आणि कॉटेजच्या ठिकऱ्या उडाल्या...

उमा आणि सचिन धावत तिथे पोहोचले. "तुम्ही ठिक आहात ना..." दोघांनी विचारलेल्या या प्रश्नाला आनंद आणि प्रधानांनी मान हलवून होकार दिला. प्रधानांकडे पाहत आनंद म्हणाला, "सर, आपण जिथे जातो तिथे आपल्या स्वागतासाठी ही माणसं आधीच पोहोचलेली असतात. हा बाबू इतका पहोचलेला असेल असं वाटलं नव्हतं. पण तो तर एकटाच ऑपरेट करायचा..." आनंदला मध्येच तोडत सचिन म्हणाला, "आनंद सर, मला तर वाटतं तो मारेकरी बाबू नाही..." सर्वजण सचिनकडे पाहू लागले. सचिन पुढे म्हणाला, "सर, एयरपोर्टवरून मी त्या बाईकवाल्याचा पाठलाग केला. सर ज्या प्रकारे त्याने बाईक चालू असताना माझ्यावर गोळ्या चालवल्या, तेवढी लवचिकता बाबूमध्ये असणं शक्य नाही सर..." सचिन बोलतच होता, की रिसेप्शनच्या दिशेने कोणीतरी धावताना दिसलं. प्रधान लगेच म्हणाले, “कोणीतरी धावत जातंय. पकडा त्या व्यक्तीला...” आनंद रिसेप्शनच्या दिशेने गेला आणि सचिन डाव्या बाजूने गेला. दोघांनी लवकरच त्या व्यक्तीला घेरलं. दोघांनी त्या व्यक्तीला प्रधानांसामोर उभं केलं. त्या व्यक्तीला पाहून प्रधान म्हणाले, “ओ... मला वाटलंच होतं. एखादातरी ओळखीचा चेहेरा पाहायला मिळाणारच इथे...” प्रधान बोलतच होते, की गतप्राण झालेल्या मारेकऱ्यांपैकी एकाचा फोन वाजला. आनंदने सर्वांकडे पाहिलं आणि गुंडाच्या खिशातून फोन काढून ऑन केला...

आनंद काही बोलणार इतक्यात समोरून आवाज आला, "हॅलो, मी साहेब बोलतोय... काय झालं... मेले का सगळे पांडू..." आनंदने थोडा विचार केला आणि म्हणाला, "हो सगळे मेले..." हे ऐकल्यावर समोरून आवाज आला, "ठिक आहे. तुम्ही सगळे गायब व्हा तिथून. इथलं काम झालं की तुमचे पैसे मिळतील तुम्हाला..." फोन बंद झाला. आनंदने नंबर पाहिला आणि सर्वांना दाखवला. नंबर पाहून सचिनने डायरी चेक केली आणि म्हणाला, "सर हा नंबर तर..." सचिन पुढे बोलणार इतक्यात खिशातून एक फ्रेम काढत प्रधान म्हणाले, "नंबर तर पाहिलात तुम्ही. आता हा फोटो बघा. या कॉटेजमधून आम्हाला हा फोटो आणि या ड्रग्सच्या पुडक्या मिळाल्या..." फोटो पाहून सचिन आणि उमाचे डोळे विस्फारले. मान हलवत प्रधान म्हणाले, "तुमचा सर्वांचाच तर्क बरोबर आहे. द गेम विल एंड नाव... लेट्स हंट नताशा..."

तिथे एका बंगल्यात बऱ्यापैकी अंधार होता. एका खोलीत ठेवलेल्या दोन खुर्च्यांवर दोन व्यक्ती बसल्या होत्या. त्या दोन्हीही व्यक्ती उठण्यासाठी धडपडत होत्या पण त्यांना हलता येत नव्हतं. अजून एक व्यक्ती धावत तिथे आली आणि खुर्च्यांवर बसलेल्या व्यक्तींना सोडवण्याचा प्रयत्न करू लागली. इतक्यात, "यांना सोडवायला आलास... पण ते शक्य नाही... तुम्हाला निघता येणार नाही माझ्या कचाट्यातून..." या आवाजापाठोपाठ बुटांचा आवाज खोलीत घुमू लागला. खुर्चीत बसलेल्या दोन्हीही व्यक्तींनी बुटांचा आणि बोलण्याचा आवाज ऐकून हालचाल थांबवली. बुटांचा आवाज त्यांच्या अगदी जवळ आला आणि खोलीतले लाईट लागले. खुर्चीत नताशासोबत दुसऱ्या एका मुलीला बांधून ठेवलं होतं. ती दुसरी मुलगी दिव्या होती आणि बाजूला पवन उभा होता. लाईट लागेपर्यंत पवनने दिव्या आणि नताशाच्या तोंडांवर बांधलेली फडकी सोडवली होती. तिघांनीही समोर पाहिलं तर हातात पिस्तुल घेऊन एक माणूस समोर उभा होता. त्याच्या मागे असलेल्या चार गुंडांनी धावत जाऊन पवनला धरलं...

पिस्तुलाची दिशा पवनकडे करत तो माणूस म्हणाला, "मि. पवन, पिक्चरमध्ये दाखवता तशी हीरोगिरी इथे दाखवू नका. हे लुटूपुटूचे गुंडं नाहीत, माझी माणसं आहेत. खरंतर तुमच्याशी माझं काहीच वैर नाही. त्या विक्रमसह मला या दोघींचाही बदला घ्यायचा होता. तुमचे आणि दिव्याचे संबंध माझ्या पथ्थ्यावर पडले आणि मी तुमचा ढालीसारखा वापर करायचं ठरवलं. म्हणजे या प्रकरणात तुम्हाला गोवलं तर मी नामानिराळा राहून माझा धंदा सुरू ठेवायला मोकळा..." तो माणूस बोलतंच होता की दिव्या बोलू लागली, "आम्ही काय वाकडं केलं तुझं. आम्ही तर तुला ओळखतच नाही. मला इथे बांधून स्वत:च्या जॅकेटवर कॅमेरा लावून विक्रमचा खून तू आम्हाला दाखवलास..." दिव्याचं बोलणं पुढे नेत नताशा म्हणाली, "पिस्तुलाचा धाक दाखवून माझ्याकडून पोलिसांना खोटा पत्ता दिलास. आणि आता आम्हालाच मारायची भाषा करतोस... अरे काय वाईट केलं आम्ही तुझं..."

दिव्या आणि नताशा रडत होत्या आणि हातात गन घेतलेला तो माणूस हसत होता. हसता हसता तो म्हणाला, "हे सगळं गरजेचं होतं. विक्रमच्या खुनात तुम्हाला अडकवून तुमचं आयुष्य बरबाद करायचं होतं मला. विक्रमचा खून मोकळ्यावरच करायचा होता मला. पण त्याच्या खुनात अडकायचं नव्हतं. पोलिसांना घुमवण्यासाठी मी हा प्लॅन बनवला. त्या खाकीवर्दीवाल्यांना मारण्याचा मी हरेक प्रयत्न केला. पण ते वाचले आणि माझ्या अड्ड्यापर्यंत पोहोचले. कर्माने मेले बिचारे. पण कायदा तर आहे ना अजून. कायद्यातून वाचण्यासाठी माझा हा प्लॅन. त्या फोटोंमुळे विक्रमला मारण्याचं कारण नताशाकडे होतं. नताशाने तिच्या प्रियकराकरवी विक्रमला मारलं. नंतर दिव्याने पवनकरवी नताशाला मारलं. मग समजलं की पवनच नताशाचाही प्रियकर होता म्हणून दिव्या आणि पवनमध्ये वाद झाला आणि दोघांनी एकमेकांचा जीव घेतला. बस. खेळ खल्लास. सो नो हार्ड फीलिंग्स. आणि तुम्ही दोघींनी माझं काय वाईट केलं हे आता वर जाऊन विक्रमलाच विचारा..." हसत हसत त्या माणसाने गनचा लिव्हर ओढला. तो फायर करणार इतक्यात त्याच्या हातावर एक गोळी येऊन आदळली...

त्या माणसाच्या हातून त्याची गन सुटून दूर फेकली गेली. प्रधानांसह उमा, सचिन आणि आनंद आत आले. प्रधानांनी त्या माणसावर गन रोखली. सचिन आणि आनंदने बाकीच्या गुंडांना गन पॉईंटवर हात वर करून गुडघ्यांवर बसायला लावलं. त्या माणसांकडे पाहत प्रधान म्हणाले, "संजय, तुझा खेळ संपलेला आहे. संजयचा प्रश्नार्थक चेहेरा पाहून प्रधान पुढे म्हणाले, "बातमी तर आली होती की आम्ही मेलो. त्यामुळे आम्हाला पाहून आश्चर्य वाटलं असेल ना तुला... शिवाय आम्ही इथे कसे... आणि तुझ नाव कसं माहित आम्हाला... हाही प्रश्न पडला असेल ना... तुझ्यापर्यंत आम्हाला पोहोचवलं या व्यक्तीने... तुम्ही तिघंही बघा या व्यक्तीला... काही लक्षात येतंय..." प्रधान दाराकडे बोट दाखवत होते. दारात एका व्यक्तीला उमाने गन पॉईंटवर उभं केलं होतं. त्या व्यक्तीला आत आणून सर्वांसमोर उभी करत उमा त्या खुर्च्यांकडे वळली ज्यांवर दिव्या आणि नताशाला बांधलं होतं...

त्या व्यक्तीकडे पाहून नताशा आणि दिव्याने एकमेकींकडे पाहिलं आणि एका सुरात म्हणाल्या, "आरती..." तोवर उमाने दिव्या आणि नताशाला सोडवलं होतं. एका गुंडाचा गळा धरत आनंद म्हणाला, "येस आरती. तुमच्या कॉलेजमधली आरती. जी अक्षरा बनून विक्रमला भेटली. या सगळ्या कारस्थानात तिचाही सहभाग आहे..." अनंदचं बोलणं पुढे नेत सचिन म्हणाला, "संजय, तुम्ही दोघं एकमेकांना ओळखता हे या फोटोने सिद्ध झालं. शिवाय, या फोटोत आरती आणि तुझ्यासोबत अजून एक व्यक्ती आहे. तो फोटोग्राफर ज्याची इमेज तुमच्या मागे असलेल्या आरशात दिसते आहे..." तेव्हा उमा पुढे म्हणाली, "हा सतीशच आहे ना, जो याच घरात आम्हाला भेटला होता. नताशाचा सेक्रेटरी म्हणून..." पुढे होत प्रधान म्हणाले, "सतीशला पाहिल्याबरोबर हा सगळा डाव याच घरातून खेळला जात असणार याची खात्री पटली आम्हाला. सगळी माहिती मिळवली आहे आम्ही. आरती, तू आणि बाबूचं काय नातं आहे, हे सुद्धा समजलं आम्हाला. तेव्हा आता गुन्हा कबूल कर तुझा..."

संजयची माणसं डोक्यामागे दोन्ही हात ठेऊन गुडघ्यांवर बसली होती. त्यांच्या दोन्ही बाजूला आनंद आणि सचिन उभे होते. समोर एका खुर्चीत संजय बसला होता. नताशा, दिव्या, पवन, उमा आणि प्रधान त्याला घेराव घालून उभे होते. संजयने एकवार सर्वांकडे पाहिलं आणि बोलायला सुरूवात केली, "हो. मीच केलं हे सगळं. आरती माझी धाकटी बहिण आहे. तुम्ही म्हणता तो कॉन्ट्रॅक्ट किलर बाबू आमचे वडिल. आमची आई आमच्या लहानपणीच गेली. टॅक्सी चालवून बाबा आम्हा तिघांचं पोट भरायचे. एक दिवस एका भाडेकरूसोबत झालेल्या वादादर्म्यान बाबांकडून तो भाडेकरू त्याच्याचकडच्या पम्प आप शॉटगनने मारला गेला. सोबत असलेल्या दुसऱ्या भाडेकरूने बाबांना चिक्कार पैसे दिले आणि खून पचवायला मदतही केली. एक खून आणि पैशांचा पाऊस. टॅक्सीसोबत बाबांनी सुपारी किलिंगचा व्यवसाय सुरू केला. यातच आमचं ज्यूनियर कॉलेजपर्यंतचं शिक्षणही झालं. आणि एक दिवस बाबा पकडले गेले...

साऱ्या जगाला कळलं आम्ही कॉन्ट्रॅक्ट किलर बाबूची मुलं आहोत. आमचा काही दोष नसताना आम्हाला हिणवलं गेलं. आम्हाला दूर लोटलं गेलं. आम्ही शहर सोडलं आणि अमरावतीला मामाकडे आलो. बहिणीची मुलं म्हणून त्याने आम्हाला रहायला जागा दिली. पण बाकी सारं आमचं आम्हालाच पहायचं होतं. आमचं शिक्षण सुटलं. कष्ट करून आम्ही गुजरण करू लागलो. त्याच दरम्यान मला ड्रग्जचं व्यसन लागलं. ड्रग्स मिळवण्यासाठी मी ड्रग्स विकायला लागलो. एक पुडी विकली की चिक्कार पैसा... मी हा धंदा समजून घेतला आणि एक दिवस माझ्या बॉसलाच डबल क्रॉस करून धंद्यावर कब्जा मिळवला. पुन्हा पैशाचा पाऊस पडू लागला. मी माणसं कमावली. माझं साम्राज्य बनवलं. आरतीला पुन्हा कॉलेजला पाठवलं. माझ्या वडिलांप्रमाणे माझ्या धंद्याचं सावट आरतीवर पडू नये म्हणून तिच्यापासून लांब जायचं ठरवलं...

मुंबईत या धंद्याला चांगली कमाई होती पण जोखिमही होती. मी मुंबई गाठली आणि पटेल कॉटेजला माझा मुख्य अड्डा बनवलं. लोकांसाठी राहण्याचं असलेलं पटेल कॉटेज माझ्या ग्राहकांसाठी ड्रग्सच्या देवणा-घेवाणीचं मुख्य केंद्र बनलं. आमचं चांगलं चाललं होतं. आरती कॉलेजमध्ये शिकत होती आणि चारही बाजूंनी पैसा बरसत होता. धंदा वाढवावा म्हणून दोन वर्षांसाठी मी दुबईला गेलो. परत आलो आणि तडक अमरावतीला गेलो. मला वाटलं आरतीला आनंद होईल. पण तिला पाहून मलाच धक्का बसला. आरती हॉस्पिटलमध्ये होती. पूर्ण डिप्रेशनमध्ये गेलेली माझी आरती एकदम शांत आणि सुन्न झाली होती. पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी मी आरतीला पटेल कॉटेजवर घेऊन आलो. इथेच तिच्यावर उपचारही झाले. दोन वर्ष लागली आरतीला नॉर्मल व्हायला. परत आलेल्या आरतीने एक दिवस आयलँड ऑफ स्टार्स हे मासिक पाहिलं आणि तिला फीट आली...

शुद्धीवर आल्यावर माझ्या कुशीत शिरून आरती मनमोकळेपणाने रडली. मग दोन वर्षांपूर्वी घडलेल्या गोष्टी तिने मला सांगितल्या. अमरावतीला ज्या कॉलेजमध्ये आरती शिकत होती, त्याच कॉलेजमध्ये विक्रम, नताशा आणि दिव्यासुद्धा शिकत होते. आरतीला दोन वर्ष सीनियर असलेल्या या तिघांना आमच्या वडिलांबद्दल समजलं. विक्रमने सगळ्या कॉलेजमध्ये आरतीला बदनाम केलं. आमच्या वडिलांचं नाव घेऊन घेऊन विक्रमने तिचं जगणं मुश्किल केलं. नताशा आणि दिव्या आरतीला विक्रमसमोर आणायच्या आणि विक्रम तिला बदनाम करायचा. तिला त्रास द्यायचा. आरतीचं मानसिक संतुलन ढळलं. तिचं करियर संपलं. आणि हे सगळं त्या विक्रम, दिव्या आणि नताशामुळे. माझ्या बहिणीचं आयुष्य खराब झालं आणि हे तिघं ऐश-आरामात जगत होते. माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. मी या तिघांची सर्व माहिती मिळवली. माझ्या वडिलांचं नाव वापरुन आरतीला सर्वांसमोर त्रास देणारा विक्रम होता म्हणून माझ्या वडिलांचंच नाव वापरून मी सर्वांसमोर विक्रमला संपवायचं ठरवलं...

तुम्हा सर्वांना माहित आहे की कॉन्ट्रॅक्ट किलर बाबू जेल मधून पळाला. पण हे कोणालाच माहित नाही की त्यांनी आम्हाला पटेल कॉटेजला शोधून काढलं. आरतीने जेव्हा तिची हकीगत सांगितली तेव्हा बाबाही तिथे होते. आरतीच्या झालेल्या मानसिक छळांमुळे त्यांच्या मनावर आघात झाला आणि ते हार्ट अटॅकने गेले. या तिघांमुळे माझे वडिलही गेले. आम्हाला या तिघांचा बदला घ्यायचा होता. आम्ही प्लॅन बनवला. विक्रमला क्लबमध्ये मारलं. मग दिव्याला नताशाच्या घरी बोलवून दोघींना कैद केलं. दिव्याकडून विक्रम आणि तिच्या घटस्फोटाचे पेपर्स आणि पवन व दिव्याचे फोटो मिळवले. नताशाकरवी दिव्याच्या पत्त्याऐवजी तुम्हाला पवनच्या घरी पाठवलं. मग पवनलाही गायब करून नताशाच्या घरी आणलं. सगळा संशय दिव्या आणि पवनवर आला. माझा मार्ग मोकळाच झाला होता. पण तुम्ही कॉटेजवर पोहोचलात आणि इथेही..." संजय बोलायचा थांबला. प्रधान पुढे होत म्हणाले, "संजय, तुझ्या कॉटेजच्या चावीमुळे, पेपर नॅपकिन्समुळे आणि या फोटोमुळे आम्ही तुझ्यापर्यंत पोहोचलो. आरतीवर झालेल्या अन्यायाकडे लक्ष देऊन कोर्ट कदाचित तिच्या सोबत नरमी बरतेल. पण तू अट्टल गुन्हेगार आहेस. ड्रग्सचा व्यवसाय चालवतोस, पोलिसांवर हल्ला करवलास, विक्रमला मारलंस... या सर्व गुन्ह्यांसाठी तुला कठोरातली कठोर शिक्षा होईल..."

समाप्त.

@ अनिकेत परशुराम आपटे.