Wednesday, December 20, 2023

चीका द बॉलर...

'चीका' म्हटल्याबरोब्बर एकच व्यक्ती आठवते. भारताची एकेकाळचा तडाखेबंद सलामीवीर कृष्णमाचारी श्रीकांत...

'स्लो बॅटिंग'च्या काळात चीकाने स्फोटक फलंदाजीचा पायंडा रचला. त्यांच्या फलंदाजीच्या शैलीमुळे आजच्या काळात चीकाला त्या काळातला विरेंदर सेहवाग म्हणूनही ओळखलं जातं. चीकाच्या बॅटने अनेक खेळी साकारल्या. १९८३च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात चीकाने मारलेल्या काही फटक्यांची स्तुती स्वत: सर विव्ह रिचर्ड्सने केली होती. पण १८८८-८९च्या हंगामातला न्यूझीलंडचा भारत दौरा मात्र वेगळ्या कारणाने चर्चेत राहिला...

जॉन राईटचा न्यूझीलंड संघ १९८८-८९च्या काळात भारत दौऱ्यावर आला होता. दिलीप (कर्नल) वेंगसरकर भारताचे कर्णधार होते. त्या दौऱ्यात तीन कसोटी आणि पाच एकदिवसीय सामने खेळले जाणार होते. भारताने २-१ अशी कसोटी मालिका तर जिंकलीच. पण ४-० अशा मोठ्या फरकाने एकदिवसीय मालिकाही खिशात टाकली. चीका त्या वेळी जबरदस्त फॉर्ममध्ये होते. ६०च्या सरासरीने चीकाने तीन कसोटी सामन्यात २४० धावा फटकावल्या पण न्यूझीलंडचा तो भारत दौरा भारतासाठी आणि चीकासाठी एका वेगळ्या कारणाने स्मरणात राहिला...


भारताने एकदिवसीय मालिका ४-० ने जिंकली. अझरुद्दीन, सिध्दू अशा खेळाडूंनी फलंदाजीत चमक दाखवली. चीकानेही धावा केल्या. पण त्याचसोबत चीकाने विकेटही मिळवल्या. पहिल्याच सामन्यात, पहिल्या डावात ७० धावा करून दुसऱ्या डावात २७ धावांच्या मोबदल्यात चीकाने पाच कीव्ही फलंदाज बाद केले. एकाच सामन्यात पन्नास धावा आणि पाच गडी, ही कामगिरी करणारा त्या काळातला सर विव्ह रिचर्ड्स नंतर चीका दुसरा फलंदाज ठरला. तिसऱ्या सामन्यातही आपल्या गोलंदाजीची धार दाखवत चीकाने पुन्हा पाच कीव्ही गडी बाद केले...

४ सामन्यात ११ बळी मिळवत चीकाने सर्व गोलंदाजांना मागे टाकलं. त्या मालिकेत फक्त भारताच्याच नाही, तर न्यूझीलंडच्या गोलंदाजांनाही, चीकाने बाद केलेल्या एकूण बळींच्या अर्ध्यापर्यंतही पोहोचता आलं नाही. चीकाने त्यांच्या कारकिर्दीत एकूण २५ बळी मिळवले, पैकी ११ बळी त्यांना याच मालिकेत मिळाले. शिवाय २७/५ ही चीकाची सर्वोत्तम कामगिरीसुद्धा याच मालिकेत आली. फलंदाज म्हणून चीकाचं नाव आहेच. पण गोलंदाज म्हणूनही चीकाने न्यूझीलंड विरुद्धची ही एकदिवसीय मालिका गाजवली...



आज २१ डिसेम्बर. कृष्णमाचारी श्रीकांतचा आज वाढदिवस. या खुश मस्कऱ्या, हिंदी बोलताना विनोद निर्माण करणाऱ्या, आपल्या वागण्याने वातावरण नेहमीच हलकं-फुलकं आणि मैत्रीपूर्ण करणाऱ्या आणि  एकेकाळच्या स्फोटक सलामीवीराला वाढदिवसाच्या चौकार-षटकारमय शुभेच्छा...

Happy Birthday Cheeka Sir...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Friday, November 24, 2023

मूक प्रतिशोध...

रात्र वाढत होती. सुधीर झपाझप पावलं टाकत स्टेशनकडे चालला होता. “आज इतका उशीर... ही सेकंड शिफ्ट कठीणच आहे. जरा उशीर झाला, की सगळ्या रिक्षा आणि टॅक्सी बंद होतात. तरी मी सरांना सांगत होतो, उद्या काम पूर्ण करतो, पण आमचं ऐकेल तो बॉस कसला...” स्वत:शीच पुटपुटत सुधीर एका जोड रस्त्यावर येऊन पोहोचला. समोर एक छोटी गल्ली होती आणि बाजूला सुधीर चालत असलेला रस्ता होता. सुधीर विचार करू लागला, “हा रस्ता मला २०-२५ मिनिटात स्टेशनला पोहोचवेल, पण ही गल्ली शॉर्टकट आहे. दहा मिनिटात असेन मी स्टेशनवर. कदाचित शेवटची गाडी मिळेल मला...” काही क्षण विचार करून सुधीर समोरच्या गल्लीत शिरला...

सुधीर जस-जसा पुढे जात होता, तसा अंधार अजून गढद होत होता. सुधीरने मोबाईलचा टॉर्च सुरू केला आणि चालू लागला. त्याला काहीतरी आवाज आल्यासारखा वाटला. सुधीर थबकला. तो आवाज नक्की कुठून येत आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न करू लागला. पण मोबाईलच्या टॉर्चच्या मंद प्रकाशात सुधीरला फारसं स्पष्ट दिसलं नाही. सुधीर पुन्हा चालायला सुरुवात करणार इतक्यात त्याचा मोबाईल वाजू लागला. फोन घेत तो म्हणाला, “हं आई... हो मला माहीत आहे उशीर झाला आहे. पण मी शॉर्टकट घेतला आहे. आता पाचंच मिनिटात मी स्टेशनला पोहोचेन. स्टेशनला पोहोचताच मी...” सुधीर बोलतच होता, की त्याला परत कसलातरी आवाज आला. या वेळी तो आवाज अगदी जवळून आला होता. सुधीरने लगेच वळून पाहिलं, तर दोन चकाकणारे ठिपके त्याच्या दिशेने येत होते. क्षणार्धात, “आSSSSSSSSSSSSS........” सुधीरची किंकाळी सर्वत्र पसरली...

तपास सुरू झाला. इन्स्पेक्टर आनंद आणि सब-इन्स्पेक्टर उमा बॉडी तपासत होते. सब-इन्स्पेक्टर सचिन सभोवार फिरत काही धागे-दोरे मिळतात का, ते पाहत होता. आणि सीनियर इन्स्पेक्टर प्रधान तिथे जमलेल्या लोकांशी बोलत होते, “या घटनेची वर्दी कोणी दिली आम्हाला...” प्रधानांनी असं विचारताच एक माणूस पुढे येत म्हणाला, “सर, मी फोन केला तुम्हाला. रात्रीच्या वेळी हा परिसर शांत असतो. संध्याकाळ नंतर इथे फारसं कोणी येतही नाही. या माणसाच्या अचानक आलेल्या किंकाळीने मला जाग आली. मी गॅलरीत आलो आणि पाहिलं, तर कोणीतरी जमिनीवर पडलं होतं इथे. मी मदतीसाठी लोकांना बोलावलं. काही माणसं जमली तेव्हा आम्ही इथे आलो आणि याला पाहिलं. याचे सताड उघडे डोळे आणि उघडं तोंड पाहून आमची खात्री पटली, की हा माणूस मेला आहे...”

तो माणूस बोलतच होता, की उमाने प्रधानांना बोलावलं. प्रधान उमाजवळ पोहोचताच उमा म्हणाली, “सर, याचं नाव सुधीर आहे. मी याची बॅग चेक केली. त्यात याचं आयकार्ड सापडलं. बॅगेतल्या बाकी वस्तू जशाच्या तशा आहेत. रोख रक्कम आहे थोडी, पण त्यालाही हात लावलेला नाही...” उमाला दुजोरा देत आनंद म्हणाला, “याच्या गळ्यातली चेन, हातावरचं घडयाळ आणि वॉलेटही हललं नाही. याच्या शरीरावर उरखडे आणि चावण्याच्या खुणा आहेत. बहुतेक एखाद्या जनावराचं काम असावं हे. पण सर, याची नखं आणि डोळे यात निळ्या रंगाची झाक दिसते आहे. विषप्रयोगाचाही प्रकार असू शकतो...” आनंद त्याच्या शंका व्यक्त करत होता, तेव्हा तिथे येत सचिन म्हणाला, “सर, हा सुधीरचा तुटलेला मोबाईल आहे. शिवाय, पंजांचे ठसे सापडलेत, जे बॉडीच्या जवळ तर आहेतच, आणि बॉडीपासून उलट्या दिशेला जाताना दिसत आहेत. या ठशांकडे पाहून असं वाटतं, की हे एखाद्या कुत्र्याचे असावेत...”

सचिनचं बोलणं ऐकून गर्दीतला एक जण म्हणाला, “या परिसरात भटकी कुत्री आहेत. पण तशी तर सगळीकडेच असतात. त्या माणसाच्या जवळ जात आनंद म्हणाला, “बरोबर आहे सर तुमचं. पण बॉडी ज्या जागी आहे, तिथे आजू-बाजूला सापडलेले कुत्र्यांच्या पंजांचे ठसे, आणि या सुधीरच्या अंगावर आढळलेले ओरखडे, जे कुत्र्याचे असण्याची शक्यता आहे, असा योगायोग सगळीकडे पहायला मिळत नाही...” सर्वांकडे पाहत प्रधान म्हणाले, “सुधीरचा मृत्यू संशयास्पद आहे. म्हणून जोवर तपास सुरू आहे, तोवर ही जागा आम्ही सील करत आहोत. सचिन, या मोबाईलला आपल्या टेक्निशियनकडे घेऊन जा. आनंद, तू बॉडीला डॉककडे ने. मी आणि उमा या सुधीरच्या घरी घडल्या प्रकाराची सूचना देतो. लेट्स मूव्ह...”

सर्वजण पांगले. प्रधान आणि उमा एका घराजवळ पोहोचले. प्रधानांनी उमाला पुढे केलं. उमाने बेल वाजवताच एका महिलेने दार उघडलं. तिचं अभिवादन करत उमा म्हणाली, “नमस्कार मावशी, मी सब-इन्स्पेक्टर उमा. आणि हे आमच्या टीमचे हेड, सीनियर इन्स्पेक्टर प्रधान. आम्ही इथे...” उमा तिचं वाक्य पूर्ण करतच होती, की ती महिला म्हणाली, “सापडला का सुधीर..? कुठे आहे तो..?” उमाने एकवार प्रधानांकडे पाहिलं. मग त्या महिलेच्या खांद्याला धरून तिला आत नेलं. आत जाऊन सर्वजण सोफ्यावर बसले. तेव्हा काही क्षणांनी प्रधान म्हणाले, “मॅडम, एक वाईट बातमी आहे. आम्हाला सुधीरचं प्रेत सापडलं आहे...” हे ऐकताच त्या महिलेला धक्का बसल्यासारखं झालं आणि तिची शुद्ध हरपली...

उमाने ताबडतोब थोडं पाणी आणून त्या महिलेच्या चेहेऱ्यावर काही थेंब शिंपडले. ती महिला शुद्धीवर आली. ग्लासातलं थोडं पाणी प्यायली. तिला सांत्वना देत उमा म्हणाली, “धीर धरा मावशी. आम्हाला तुमची मन:स्थिती समजते आहे. पण सुधीरसुद्धा पाहत असेल तुम्हाला. अशा अवस्थेत तुम्हाला पाहून त्याला कसं वाटेल विचार करा...” हे ऐकून त्या महिलेने डोळे पुसले. हळू आवाजात प्रधान म्हणाले, “मॅडम, आम्हाला सुधीरची रूम चेक करायची आहे...” त्या महिलेने होकार दिला आणि सुधीरच्या खोलीकडे जायची दिशा दाखवली. उमाला तिथेच बसवून प्रधान सुधीरच्या खोलीत गेले. एकदम साधी खोली होती ती. बेड, कपाट, टेबलवर एक कॉम्प्युटर आणि एक लॅम्प...

प्रधानांनी सहज म्हणून कपाटाला हात लावला आणि हँडल फिरवलं. कपाट उघडलं. आत कपडे, घड्याळं, गॉगल्स, बँकेचे पेपर्स आणि काही रोख रक्कम, असा संशय न येणारा ऐवज होता. प्रधानांनी त्यांचा मोर्चा टेबलकडे वळवला. टेबलच्या ड्रॉव्हरमध्ये एक डायरी होती. डायरीतल्या काही पानांनंतर एका पानावर काही व्यक्तींची नावं आणि रक्कम लिहिली होती. प्रथमदर्शनी, ती देणेकऱ्यांची यादी असावी असंच वाटत होतं. ती डायरी घेऊन प्रधान बाहेर आले आणि त्या महिलेला म्हणाले, “मॅडम, या डायरीत काही व्यक्तींची नावं आणि रकमा लिहिल्या आहेत. याबद्दल तुम्हाला काही माहीत आहे...” त्या डायरीकडे पाहून नकारार्थी मान हलवत ती महिला म्हणाली, “नाही साहेब. याबद्दल मला काहीच कल्पना नाही. खरंतर दोनच महीने झालेत आम्ही इथे येऊन, जेव्हा दोन महिन्यांपूर्वी सुधीरची इथे बदली झाली...”

त्या महिलेच्या खांद्यावर हात ठेवत उमाने विचारलं, “मावशी, सुधीरच्या मित्र-मैत्रिणींबद्दल तुम्ही सांगू शकाल का... किंवा एखादं स्थळ सांगून आलं आहे का त्याला...” उमाकडे पाहून त्या महिलेने काही क्षण जाऊ दिले. मग म्हणाली, सुधीर घटस्फोटीत आहे. प्रणाली नावाच्या मुलीशी सुधीरचं लग्न झालं होतं. प्रणालीसुद्धा याच परिसरात राहते. सुधीरचे सगळे मित्र-मैत्रिणी, आम्ही आधी जिथे राहत होतो तिथे होते. इथे आल्यावर सुधीरची नव्याने कोणाशी मैत्री झाली असेल तर अजून मला माहीत नाही...” प्रधान आणि उमाने एकमेकांकडे पाहिलं. प्रधानांनी मान हलवली. प्रणालीचा पत्ता मिळवून, त्या महिलेचा निरोप घेऊन, सुधीरची डायरी स्वत:कडे ठेवत प्रधान आणि उमा त्या घरातून बाहेर पडले. थोडं पुढे आल्यावर उमा म्हणाली, “सुधीरची ट्रान्सफर होते. मग दोनच महिन्यात त्याचा मृत्यू होतो. शिवाय सुधीरपासून घटस्फोट घेतलेली प्रणालीसुद्धा याच परिसरात राहते. स्ट्रेन्ज...”

उमाला दुजोरा देत प्रधान म्हणाले, “थोडी खटकणारी गोष्ट आहे खरी. सध्यातरी आपल्याकडे सुधीरची ही डायरी आणि प्रणालीचा नंबर, इतकंच आहे...” लगेच सचिनला कॉल करत प्रधान म्हणाले, “सचिन, मी तुला काही व्यक्तींची नावं पाठवत आहे. सुधीरचा मोबाईल दुरुस्त झाला असेल तर या व्यक्तींची नावं त्यात आहेत का चेक कर आणि त्यांच्यांशी संपर्क साधून त्यांना चौकीवर बोलावून घे. हे बहुतेक सुधीरचे देणेकरी तरी असावेत, नाहीतर घेणेकरी तरी असावेत...” कॉल कट करत उमाकडे वळून प्रधान म्हणाले, “उमा, लेट्स गो टू मीट प्रणाली. तिथे काही नवीन सुगावा लागू शकतो...” उमाने होकार दिला आणि जीप एका दिशेने वळली...

काही वेळातच जीप एका मोठ्या सोसायटीत शिरली. गेटवर एक सिक्युरिटी गार्ड उभा होता. त्याने प्रधान आणि उमाचे आयकार्ड चेक केले आणि आत प्रवेश दिला. त्याच्या दाढीकडे पाहताना प्रधानांना शंका येत होती. आयकार्ड परत घेत प्रधान आणि उमा, प्रणालीच्या फ्लॅटकडे जाऊ लागले. एका महिलेने दार उघडलं. दारातच उमाने स्वत:ची आणि प्रधानांची ओळख करून दिली. दारात पोलिस आलेत हे पाहताच ती महिला थोडी बावरली. मग भानावर येत ती म्हणाली, “मी प्रणाली, आत या ना...” दोघं आत जाताच प्रणालीने दार लाऊन घेत विचारलं, “पोलिस इथे माझ्या घरी येण्याचं कारण... नाही म्हणजे माझ्याकडून काही...” प्रणालीचं म्हणणं पूर्ण होतं ना होतं तोच उमा म्हणाली, “प्रणाली मॅडम, आम्हाला आज सकाळी सुधीर नावाच्या माणसाची डेड बॉडी सापडली आहे...”

हे ऐकताच प्रणालीला धक्का बसला. ती काही क्षण स्तब्ध झाली. तिला शांत करत खुर्चीत बसवत उमा म्हणाली, “प्रणाली मॅडम, आज सकाळी सुधीरचा मृत्यू झाला. आम्ही सुधीरच्या आईला भेटलो. तिथे तुमच्याबद्दल समजलं. तपासाचा भाग म्हणून आम्ही इथे...” उमाला मध्येच तोडून डोळे पुसत प्रणाली बोलती झाली, “लपवण्यासारखं काहीच नाही. दोन वर्षांपूर्वी आमचं लग्न झालं. साधारण सहा महिने चांगले गेले. पण आमचं करियर आणि संसार एकत्र सांभाळणं आम्हा दोघांनाही जड जात होतं. वर्षभरापूर्वी आम्ही म्युचल कानसेंटने वेगळे झालो. आमचा घटस्फोट झाला आणि लगेच मला एक मोठी संधी चालून आली आणि मी इथे शिफ्ट झाले. आम्ही दोघं टचमध्ये होतो. सुधीरची इथे ट्रान्सफर झाली होती हे मला माहीत होतं. या रविवारी आम्ही भेटणारही होतो. पण आता...”

प्रणालीला पुन्हा दिलासा देत उमा आणि प्रधान तिच्या घरातून बाहेर पडले. जीपजवळ येत प्रधान म्हणाले, “तूला काय वाटतं उमा... या प्रणालीचा काही हात असू शकेल या मृत्यूमध्ये...” विचार करत उमा म्हणाली, “तिच्या बोलण्यावरून तर तसं...” उमा बोलतच होती, की प्रधानांचा फोन वाजला, “येस सचिन. ओके. तू लॅबवर ये. आम्ही तिथेच निघालोत...” फोन ठेवत प्रधान म्हणाले, “सुधीरचा फोन रिस्टोर झाला आहे. त्या डायरीतली नावं आहेत फोनमध्ये. सचिनने सर्वांना कॉल केले. त्यातल्या बऱ्याच जणांनी त्यांची देणी फेडली आहेत. आता दोनच गोष्टी राहिल्या आहेत. एक म्हणजे सुधीरचं ऑफिस आणि दुसरी आहे त्याची बॉडी. उमा, मला लॅबला ड्रॉप करून तू सुधीरचं ऑफिस गाठ...” लॅबच्या गेटजवळ प्रधान उतरले आणि उमा जीप घेऊन पुढे गेली. प्रधान लॅबमध्ये शिरले. तिथे आनंद आणि डॉ. गोखले त्यांची वाटच पाहत होते...

प्रधानांना पाहून पुढे येत डॉ. गोखले म्हणाले, “या प्रधान साहेब. मी आणि आनंद आत्ता या सुधीरबद्दलच बोलत होतो. सुधीरबद्दल सांगायचं, तर हा चाळीशीतला इसम होता. याला बी. पी.चा त्रास होता, जे याच्या लाईफ स्टाईलकडे पाहता नॉर्मल आहे. म्हणजे याच्या कामाच्या वेळा, स्ट्रेस, यांमध्ये हा त्रास उद्भवतोच. बाकी त्याला काही आजार नव्हता. याच्या अंगावर कुत्र्याच्या चाव्यांच्या आणि ओरखड्यांच्या खुणा आहेत. पण त्या घातक नाहीत. याच्या मृत्यूचं मुख्य कारण आहे विष, पॉयझन... या सुधीरचे डोळे आणि नखं निळी पडलेली तुम्ही पाहिलीतच. तो निळा रंग विषामुळेच आला. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे याच्या शरीरात विष शिरण्याचा एंट्री पॉईंट दुसरा तिसरा नसून कुत्र्याने दिलेले हे ओरखडे आहेत. हो प्रधान साहेब, कुत्र्यांच्या नखांच्या ओरखड्यातून विष सुधीरच्या शरीरात शिरलं आहे...”

हे ऐकून आनंद आणि प्रधान दोघांनाही नवल वाटलं. प्रधान म्हणाले, “म्हणजे डॉक, कुत्र्यांचे ओरखडे जीवघेणे नव्हते. पण विषामुळे ते ओरखडे फेटल बनले...” डॉ. गोखलेंनी होकारार्थी मान हलवली. आनंद म्हणाला, “म्हणजे ज्या कुत्र्यांनी सुधीरवर हल्ला केला, त्यांच्या नखांना विष होतं...” डॉ. गोखले पुढे म्हणाले, “आनंद, नुसतं विष नाही, तर जहाल विष होतं. त्या कुत्र्यांच्या नखांना सायनाईड होतं. तेच सायनाईड मला या सुधीरच्या बॉडीमध्ये सापडलं...” हे ऐकून प्रधान आणि आनंद अवाक झाले. आनंद पुढे काही बोलेल इतक्यात प्रधानांचा फोन वाजला, “हां उमा बोल... ठीक आहे. तू चौकीवर ये. मी आणि आनंद पोहोचतो तिथे...” फोन ठेवत डॉ. गोखलेंकडे पाहत प्रधान म्हणाले, “डॉक, सायनाईड एक जहाल विष आहे आणि ते असं बाहेर मिळत नाही. बरोबर...” प्रधानांना दुजोरा देत डॉ. गोखले म्हणाले, “राइट प्रधान साहेब. फक्त मोठ्या लॅब्समध्ये ते मिळू शकतं. पण अजून एका प्रकारे सायनाईड बनवलं जाऊ शकतं. सफरचंदाच्या किंवा अॅप्रीकॉटच्या बिया...”

डॉ. गोखलेंचं अभिवादन करून प्रधान आणि आनंद चौकीकडे निघाले. चौकीवर सर्वजण प्रधानांच्या केबिनमध्ये जमले. उमा म्हणाली, “सर, सुधीरचे ऑफिस रेकॉर्डस क्लीन आहेत. तो कामात एकदम चोख होता...” उमाच्या म्हणण्याला पुढे नेत सचिन म्हणाला, “आणि सर, सुधीरच्या फोनमध्येही काही विशेष नाही. मित्र-मैत्रिणींचे, देणेकऱ्यांचे, ऑफिसचे नंबर्स आहेत. पण त्यातून संशय यावा असं काहीच जाणवलं नाही...” दोघांचं बोलणं झाल्यावर आनंद म्हणाला, “सर, पण मृत्यू तर झालाय. आणि तोही संशयास्पदरित्या सायनाईडद्वारे. काहीतरी आहे, जे अजून आपल्या पाहण्यात आलं नाही...” आनंदकडे पाहत प्रधान म्हणाले, “राईटली सेड आनंद. या केसमधला कुठलातरी एक धागा अजून लपला आहे. हे तर नक्की आहे, की त्या कुत्र्यांनी कोणाच्यातरी इशाऱ्याने सुधीरवर हल्ला केला. पण कोणाचा इशारा... आणि का...” सर्वजण चर्चा करत असताना प्रधानांचा फोन वाजला...

“येस, सिनीयर इन्स्पेक्टर प्रधान स्पीकिंग... काय... बाहेर जाण्याचे सगळे मार्ग, सगळे गेट्स ताबडतोब बंद करा. कोणीही बाहेर जाता कामा नये. आम्ही येतोच...” कॉल कट करत टीमकडे वळत प्रधान म्हणाले, “प्रणालीचा मृत्यू झाला आहे. लेट्स मूव्ह...” जीपकडे जाताना प्रधानांनी घडयाळ पाहिलं, तर रात्रीचे पावणे अकरा वाजले होते. जीप सुरू झाली. उमा म्हणाली, “आत्ता थोड्या वेळापूर्वीच तर आपण प्रणालीला भेटलो. आणि आता तिच्या मृत्यूची बातमी येते...” ड्राईव्ह करत आनंद म्हणाला, “दोन दिवसांच्या कालावधीत दोन मृत्यू... आधी सुधीर आणि आता प्रणाली... आणि दोघांचाही एकमेकांशी संबंध होता...” उमासमोर बसलेला सचिन म्हणाला, “सुधीरच्या मृत्यूसाठी मी प्रणालीला जबाबदार धरत होतो. पण आता तिचाच मृत्यू झाला...” सर्वांचे विचार ऐकल्यावर प्रधान म्हणाले, “मला वाटतं, सुधीर आणि प्रणाली यांच्या मृत्यूमध्ये काहीतरी दुआ आहे. सुधीर आणि प्रणालीचा घटस्फोट होतो. प्रणाली जॉबसाठी इथे येते. काही काळाने सुधीरही ट्रान्सफर होऊन याच भागात येतो. वेगळे होऊनही ते रविवारी भेटायचं ठरवत असतात. पण त्या आधीच दोघंही मरण पावतात. देयर इज अ डॅम लिंक...”

जीप मधुबन सोसायटीमध्ये पोहोचली. पुढच्या भागात इतकी हालचाल नव्हती. पण सोसायटीच्या मागच्या बाजूला घोळका जमला होता. गर्दीतून वाट काढत चौघं घटनास्थळी पोहोचले. तिथे प्रणालीचा मृतदेह पडला होता. उमाने बॉडीची तपासणी सुरू केली. आनंद आणि सचिन तिथल्या परिसराची पाहणी करू लागले आणि प्रधानांनी गर्दीकडे मोर्चा वळवला. तिथे उभ्या माणसांपैकी एक म्हणाला, “सर, मी लक्ष्मण दिक्षीत. या सोसायटीचा सेक्रेटरी. वॉचमॅनने हा प्रकार मला सांगितला तेव्हा मी तुम्हाला कॉल केला...” प्रधानांनी लगेच प्रतिप्रश्न केला, “बॉडी सर्वात आधी कोणी पाहिली...” दोन माणसं समोर आली. एक म्हणाला, “सायेब, हा भीमा आनी मी जग्गू. भीमा फुडल्या ग्येटजवल आसतो, आनी मी इथे मागल्या ग्येटजवल

सवा धा वाजले होते. मी ग्येटजवल ज्येवायला बसलोच होतो. त्याच वेळी प्रणाली म्याडम थितून जात होत्या. रोज रात्री धा आनी साडे धाच्या मदे त्या चालायला इथे येतात. आत्ता पन आल्या. माला पाहून हासल्या आनी फुडे गेल्या. मी पुन्ना जेऊ लागलो. थोड्या वेळात मी दोन आवाज ऐकले. त्यातला एक प्रणाली म्याडमचा आवाज होता. मी इकडे आलो तर प्रणाली म्याडम इथं पडल्या होत्या. त्यांचे डोळे उघडे होते. मी त्यांच्या नाकाशी हात धरला पन... म्हनून मी दिक्षीत सायेबांना...” प्रधानांनी लगेच विचारलं, “प्रणालीच्या आवाजाआधी तू कोणाचा आवाज ऐकलास...” जग्गूने एकवार प्रणालीच्या मृतदेहाकडे पाहिलं आणि म्हणाला, “सायेब, तो आवाज मांजराच्या ओरडण्याचा होता...”

“या सोसायटीमध्ये मांजरं आहेत का...” प्रधानांच्या या प्रश्नाला उत्तर देत मि. दिक्षीत म्हणाले, “सर, पाळीव प्राण्यांना या सोसायटीमध्ये परमिशन नाही. काही जणांकडे पक्षी असलेले पिंजरे आहेत आणि काहींकडे फिश टॅंक्स आहेत. प्रणालीला मांजरांचा भारी शौक होता. सोसायटीच्या बाहेर असलेल्या मांजरांना ती खायला वगैरे द्यायची. त्यांच्यापैकी कोणी आत येत असावं...” मि. दिक्षीत बोलत असतानाच उमाने प्रधानांना बॉडीजवळ बोलावलं. उठून उभी राहत उमा म्हणाली, “सर, प्रणालीने नाईट गाऊन घातला आहे. तिच्या बॉडीजवळ चाव्या आहेत ज्या कदाचित तिच्या फ्लॅटच्या असू शकतात आणि तिचा मोबाईल पडला आहे. प्रणालीची नखं निळी पडली आहेत. तिच्या डोळ्यातही निळ्या रंगाची झाक आहे. तिच्या शरीरावर कुठेही जखमा नाहीत फक्त डाव्या पायाला घोटाजवळ ओरखडा आहे. सर, सुधीरच्या मृत्यूशी हा मृत्यू जुळतो आहे असं वाटतंय...”

उमा बोलतच होती, की आनंदने प्रधानांना आवाज दिला, “सर, इथे येता प्लीज...” उमाला बॉडीजवळ थांबवून प्रधान आनंदच्या दिशेने धावले. सोसायटीच्या मागच्या गेटच्या बाहेर आनंद आणि सचिन एका गुडघ्यावर बसला होते. प्रधान तिथे पोहोचले. तिथे त्यांना झाडीत एक मांजर मरून पडलेलं दिसलं. सचिन म्हणाला, “सर, तपास करत आम्ही इथे आलो. हे मांजर इथे मेलेलं आढळलं. याच्या तोंडातून फेस येत आहे आणि याची नखं व जीभ हलकी निळी पडली आहे. कदाचित याच मांजराचा आवाज जग्गूने ऐकला...” थोडा वेळ विचार करून प्रधान म्हणाले, “सचिन, दोन्ही बॉडीज घेऊन तू डॉककडे जा. आनंद, तू चौकीवर जाऊन सुधीर आणि प्रणाली यांच्या संदर्भात काही रेकॉर्ड आहेत का बघ. मी आणि उमा प्रणालीचा फ्लॅट चेक करतो. मि. दिक्षीत जरा आमच्यासोबत चला. कारण फ्लॅट ओनर समोर नसताना आम्हाला झडती घ्यायची आहे...”

सचिन आणि आनंद त्यांच्या त्यांच्या वाटेने गेल्यावर उमा आणि प्रधान मि. दिक्षीतांसोबत प्रणालीच्या फ्लॅटमध्ये पोहोचले. झडती सुरू झाली. मि. दिक्षीत एका बाजूला उभे होते. घरात काही संशयास्पद समोर येत नव्हतं. बेडरूममध्ये एका टेबलवर लॅपटॉप ठेवला होता. उमाने लॅपटॉप सुरू केला. त्यात खूप फोल्डर्स होते. एका फोल्डरचं नाव हनीमून होतं. उमाने तो फोल्डर उघडला. त्यात प्रणाली आणि सुधीरचे खूप फोटोस आणि व्हिडियोज होते. त्यांची तारीख दोन वर्षांपूर्वीची होती. उमाने सगळे फोटोज प्रधानांना दाखवले. प्रधान म्हणाले, “यात, सुधीर आणि प्रणाली ज्या हॉटेलमध्ये राहिले होते, तिथले फोटोसुद्धा आहेत. हॉटेलचं नाव, गोल्डन हिल्स, लोणावळा...” त्याच वेळी प्रधानांचा फोन वाजला, “येस आनंद, ओके. आम्ही येतोच...” फोन ठेवत प्रधान म्हणाले, “आनंदला दोन वर्ष जुनी एक केस सापडली आहे ज्यात सुधीर आणि प्रणाली दोघांचाही संबंध आहे. मि. दिक्षीत, हा लॅपटॉप आम्ही घेऊन जात आहोत. सोसायटीच्या बाहेर कोणीही जाणार नाही. आम्ही गेटवर हवालदार तैनात करत आहोत. त्या भीमा आणि जग्गूलाही सांगून ठेवा. लेट्स गो...”

थोड्याच वेळात प्रधान आणि उमा चौकीवर पोहोचले. आनंद त्यांची वाटच पाहत होता. जसे दोघं आत आले, तसा आनंद म्हणाला, “सर, दोन वर्षांपूर्वीची लोणावळ्याची केस आहे. सुधीर आणि प्रणाली यांनी दिनेश नावाच्या माणसाविरुद्ध कंप्लेन्ट केली होती. ती केस असं सांगते, की दिनेश या प्रणालीचा पाठलाग करायचा. एकदा त्याने प्रणालीला एकटी पाहून तिची छेड काढली. तेव्हा सुधीर आणि तिथल्या काही स्थानिकांनी दिनेशला मारहाण केली आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. सेक्शन ३५ए खाली दिनेशला दोन वर्षांची शिक्षा झाली. सर, हा दिनेश, मि. दिनकर यांचा धाकटा भाऊ आहे. आणि मि. दिनकर, अंबा लॅब्समध्ये असिस्टंट आहे. हे ऐकून प्रधान आणि उमा दोघांनीही डोळे मोठे केले. स्क्रीनवर आलेला केस फाईलमधला दिनेशचा फोटो जेव्हा प्रधानांनी पाहिलं, तेव्हा फोटोकडे काही क्षण पाहत प्रधान म्हणाले, “याला मी कुठेतरी पाहिलं आहे...” बोलता बोलता प्रधानांनी माऊसने फोटोला दाढी-मिशा काढल्या. समोर आलेला चेहेरा पाहून सर्व अवाक झाले...

उमा म्हणाली, “सर, हा तर...” तिचं बोलणं पुढे नेत आनंद म्हणाला, “भीमा आहे. मधुबन सोसायटीमधला गार्ड...” त्यावर प्रधान म्हणाले, “म्हणजे दिनेशने भीमा नाव धारण करून मधुबन सोसायटीमध्ये नोकरी धरली. उमा, आनंद, आपल्याला लगेच तिथे जायला हवं. हा दिनेश कदाचित निसटण्याच्या प्रयत्नात असावा...” सर्व मधुबन सोसायटीकडे निघाले. वाटेत प्रधानांना सचिनचा कॉल आला, “बॉल सचिन. ओके. आम्ही मधुबन सोसायटीकडेच निघालो आहोत. तूही तिथे ये ताबडतोब...” कॉल कट करत प्रधान म्हणाले, “प्रणालीचा मृत्यूसुद्धा सायनाईडमुळे झाला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तेच विष त्या मांजराच्या नखात, जिभेवर आणि पोटात सापडलं आहे. आपले पंजे चाटण्याच्या प्रयत्नात ते विष त्या मांजराच्या नखातून जिभेवर आणि मग पोटात गेलं असावं...” प्रधानांना उत्तर देत उमा म्हणाली, “सर, मांजर असा प्राणी नाही जो उगाच कोणाला इजा करेल, जोवर त्याला कोणी दिवचत नाही. आणि प्रणालीची बॉडी जिथे सापडली, ती जागा चांगली मोकळ्यावर आहे. बरं, मि. दिक्षीतांचं म्हणणं आहे, की प्रणालीला मांजरं आवडायची. मग प्रणाली कशाला दिवचेल मांजराला...”

उमाकडे पाहत आनंद म्हणाला, “बरोबर आहे उमा तुझं. मांजरं अशी स्वत:हून हल्ला करत नाहीत. पण जिथे प्रणालीचा मृतदेह सापडला, तिथे प्रकाश कमी होता. होऊ शकतं, की ते मांजर तिथे आलं असताना अंधारात प्रणालीला दिसलं नाही आणि त्याच्या शेपटीवर किंवा अंगावर प्रणालीचा पाय पडला म्हणून मांजराने बोचकारलं तिला...” बोलणं सुरू असताना प्रधानांनी आनंदला मि. दिनकरचा पत्ता शोधायला सांगितलं. जीप मधुबन सोसायटीमध्ये पोहोचली. गेटजवळ एक हवालदार बेशुद्ध अवस्थेत पडला होता. सचिनही त्याचवेळी तिथे पोहोचला. प्रधानांच्या “इथला तो दुसरा गार्ड जग्गू कुठे गेला..?” या प्रश्नावर कोणाकडेही उत्तर नव्हतं. त्या जखमी हवालदाराला घेऊन सचिन लगेच हॉस्पिटलला रवाना झाला आणि बाकी तिघं सोसायटीत गेले. प्रधान चिडले आणि मूठ आवळत म्हणाले, “डॅम. दिनेश सटकला. पण गेला कुठे असेल तो..!” उमा लगेच म्हणाले, “सर, मि. दिनकरची मदत मागायला तर गेला नसेल...” उमाला दुजोरा देत आनंद म्हणाला, “यू में बी राईट उमा. मि. दिनकर इथून जवळच राहतात...” तेवढ्यात जग्गू समोर आला. प्रधानांचा रागीट चेहेरा पाहून तो स्वत:च म्हणाला, “सायेब, माला भीमा म्हनाला मागे काहीतरी हालचाल दिसते. म्हनून मी इथे आलो...”

प्रधानांनी होकारार्थी मान हलवली आणि म्हणाले, “ठीक आहे. हे मागचं गेट लॉक करून तू इथेच थांब. अँड बी एलर्ट...” सर्वजण पुन्हा जीपकडे वळले. सचिनला कॉल करत प्रधान म्हणाले, “सचिन, आपल्याला हवा असलेला माणूस दिनेश म्हणजे भीमा आहे. मी तुला लोकेशन पाठवतो. तू लगेच तिथे ये...” फोन कट करत प्रधान म्हणाले, “कदाचित मि. दिनकरचाही जीव धोक्यात असू शकतो...” जीप एका घराजवळ पोहोचली. एका अरुंद गल्लीच्या शेवटी असलेला तो एक छोटेखानी बंगला होता. गेटच्या थोडं आधी जीप थांबली. सर्वजण खाली उतरले आणि आपापल्या पिस्तुली तपासल्या. हळू आवाजात प्रधान म्हणाले, “Be careful. We are dealing with a person who handles Cyanide. The most dangerous poison. A few drops going inside, and we are gone…” दबकत दबकत सर्वजण घराच्या अंगणात पोहोचले. संपूर्ण घर अंधारात बुडालेलं होतं...

प्रधानांनी उमा आणि आनंदला वेगवेगळ्या दिशेला जाण्याचा इशारा केला. प्रधान स्वत: मुख्य दरवाजाकडे गेले. उमाने घराची डावी बाजू घेतली तर आनंद उजव्या दिशेला वळला. काही क्षणातच तिघंही आपापल्या स्पॉटवर पोहोचले. तिघांनी घड्याळं चेक केली. मग बोटांवर १...२...३... मोजून तिघांनी एकाच वेळी तीन दिशांनी घरात प्रवेश केला. घरात पूर्ण काळोख होता. प्रधान लिव्हिंग रूममध्ये होते. उमा डाव्या बाजूच्या एका खोलीत होती तर आनंद उजव्या बाजूच्या खोलीत उभा होता. तिघांनी आपापल्या टॉर्च ऑन केल्या आणि आजू-बाजूला पाहू लागले. त्या घरात त्यांना चिटपाखरूही दिसत नव्हतं. उमा पुढे जात असताना भिंतीला लावलेल्या आरशात तिला प्रतिबिंब पाहिल्यासारखं जाणवलं. उमा थबकली आणि झटक्यात मागे वळली. पण तिथे कोणीच नव्हतं. पुन्हा वळून उमा पुढे जाऊ लागली. इतक्यात कोणीतरी तिला मागून धरलं आणि उमाची गन खाली पडली...

त्या व्यक्तीने उमाला पुढे ढकललं आणि लिव्हिंग रूममध्ये घेऊन आला. उमाला ओलीस धरलं आहे, हे दिसताच प्रधानांनी त्यांची गन उमा आणि त्या अनोळखी व्यक्तीवर रोखली. आनंदही उजव्या बाजूच्या खोलीतून बाहेर आला आणि त्यानेही त्यांची गन त्या अनोळखी व्यक्तीच्या दिशेने केली. टॉर्चचा प्रकाश अंधुक होता, त्यामुळे त्या व्यक्तीचा चेहेरा नीटसा दिसत नव्हता. ती व्यक्ती म्हणाली, “Hold it officers… नाहीतर ही तुमची लेडी ऑफिसर हाकनाक मरेल...” एका हाताने गन उमाच्या डोक्याच्या दिशेने रोखत त्या व्यक्तीने दुसरा हात वर केला. त्या हातात एक काचेची छोटी बाटली होती. ती बाटली नाचवत ती व्यक्ती म्हणाली, “या बाटलीत अॅसिड आहे. अजिबात हलू नका कोणी. नाहीतर...” उमाचा ढालीसारखा वापर करत ती अनोळखी व्यक्ती मुख्य दरवाजाच्या दिशेने मागे सरकू लागली... ती व्यक्ती दाराबाहेर पडलीच होती, की एक जोरदार लाथ त्या व्यक्तीच्या दंडाला बसली. अॅसिड असलेली बाटली हवेत उडाली...

आनंदने त्वरेने झेप घेऊन ती बाटली अलगद झेलली. ती व्यक्ती उमापासून जरा दूर गेलेली पाहून उमाने तिच्या कोपराने त्या व्यक्तीच्या पोटात गुद्दा हाणला. “आह...” असं विव्हळत ती व्यक्ती मागे गेली आणि मागे उभ्या सचिनने त्या व्यक्तीची कॉलर धरून आपली गन त्या व्यक्तीच्या कपाळाला लावली. घरातले लाईट लावले गेले. त्या व्यक्तीला एका खुर्चीत बसवलं गेलं. खुर्चीजवळ येत प्रधान म्हणाले, “भीमा... नाही नाही... दिनेश... बरोबर ना...” बोलता बोलता प्रधानांनी त्या व्यक्तीची दाढी आणि मीशी खेचून काढली. खुर्चीत बसलेला दिनेश रागाने लाल झाला होता. त्याने प्रधानांवर हल्ला करायचा प्रयत्न केला पण सचिन आणि आनंदने दिनेशचे दोन्ही हात धरून त्याला परत खुर्चीत बसवलं. प्रधान म्हणाले, “स्टॉप इट दिनेश. तू आता पळू शकत नाहीस...” प्रधानांकडे पाहून दिनेश म्हणाला, “मी दिनेश नाही. दिनकर आहे. मी आणि दिनेश जुळे होतो. दिनेश माझ्यापेक्षा दोन मिनिटेच लहान होता. माझं लग्न झालं होतं आणि दिनेशचा साखरपुडा ठरला होता...

दोन वर्षांपूर्वी आम्ही दोघं आणि आमचे काही मित्र लोणावळ्याला ट्रीपसाठी गेलो होतो. तिथे फिरताना मला प्रणाली दिसली. मला ती आवडली. तिच्यासोबत कॉफी प्यावी म्हणून मी लगेच तिच्याजवळ गेलो आणि कॉफीबद्दल विचारलं. काहीही न बोलता प्रणाली एका दिशेने चालू लागली. मी तिचा पाठलाग करू लागलो. त्याचवेळी तिचा तो नवरा सुधीर तिथे आला. त्याने मला जायला सांगितलं, पण त्याच्या बोलण्याकडे लक्ष न देता मी प्रणालीला पुन्हा कॉफीसाठी विचारलं आणि तिचं मनगट पडकलं. हे पाहून सुधीरने मला थोबाडीत मारली. तिथे असलेल्या काही लोकांनी आम्हाला घेरलं. मग सुधीर आणि त्या लोकांनी मला मारायला सुरुवात केली. त्या प्रणालीने पोलिसांना बोलावलं आणि मला तिथून पळावं लागलं. मी हॉटेलवर पोहोचल्यावर माझी अवस्था पाहून दिनेशने माझ्याकडे विचारणा केली. रस्त्यावर घडलेली सगळी घटना मी दिनेशला सांगितली. दिनेशने थोडा विचार केला. मग मला शांत केलं आणि याबद्दल कोणालाही काहीही सांगायचं नाही असं सांगितलं...

तेवढ्यात माझ्या मागावर असलेले पोलिस तिथे आले आणि मला वाचवण्यासाठी दिनेश स्वत: पोलिसांच्या स्वाधीन झाला. त्याला दोन वर्षांची शिक्षा झाली. मी मुंबईला परतलो आणि तेव्हा समजलं, माझ्या बायकोने घटस्फोटाची मागणी केली. तिचं म्हणणं, मुलींची छेड काढणाऱ्या माझ्यासारख्या माणसासोबत तिला संसार करायचा नव्हता. दिनेशच्या होणाऱ्या बायकोनेही साखरपुडा मोडला. मी दिनेशला याबद्दल काहीही सांगितलं नाही. दोन वर्षानंतर शिक्षा संपवून दिनेश घरी आला. त्याला माझ्या घटस्फोटाबद्दल आणि त्याच्या मोडलेल्या साखरपुड्याबद्दल समजलं. दिनेशने अगदी शांतपणे हे सर्व घेतलं. मला वाटलं दिवस पुढे सरकतील तशा आमच्या या जखमा भरतील आणि आयुष्य सुरळीत होईल. पण या समाजाला हे मान्य नव्हतं. त्या केसवरून आम्हाला टोमणे मारणं, आमची हेटाळणी करणं सुरूच राहिलं. दिनेशची आणि माझी नोकरीही गेली होती. दिनेशला हे सगळं सहन झालं नाही. आणि काही दिवसांनी त्याने स्वत:ला संपवून टाकलं...

यामुळे मला खूप वाईट वाटलं. माझी जवळची माणसं, माझा भाऊ, मित्र-मंडळी सर्वच दुरावले मला. फक्त एक कप कॉफी प्यावी इतकीच तर मागणी होती माझी. त्यात काय मोठी गोष्ट होती... पण ती प्रणाली आणि तो सुधीर... दोघांनी मिळून आयुष्य बरबाद केलं माझं. नुसतं माझंच नाही, तर दिनेशलाही त्यांनी आयुष्यातून उठवलं. मला त्या दोघांवर सूड उगवायचा होता. होतं-नव्हतं ते सर्व विकून मी मुंबईला आलो आणि हे घर घेतलं. मी, सुधीर आणि प्रणालीबद्दल माहिती मिळवली. मला समजलं त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर काही महिन्यांनी प्रणाली मुंबईत आली आणि माझ्या घराजवळच राहू लागली. मी माझा गेटअप बदलला आणि मधुबन सोसायटीमध्ये गार्ड म्हणून नोकरी धरली. बरेच दिवस मी प्रणालीवर नजर ठेवली. रोज रात्री ती प्रणाली सोसायटीमध्ये वॉक घ्यायची. सोबत तिला मांजरांचीही आवड होती हेही मला समजलं. एक मांजर नेहमी मागच्या गेटजवळ असायचं. प्रणाली त्याला खायला द्यायची. त्याच्याशी खेळायची. मी ठरवलं, प्रणालीला याच मांजराच्या हातून मारायचं...

अंबा लॅब्समध्ये मी बरीच वर्षे काम केलं होतं. सायनाईड कसं बनवायचं हे मला माहीत होतं. मी सायनाईड बनवलं. मी काही कुत्रे विकत घेतले. त्यांच्या पंजांना सायनाईड लाऊन त्यांच्या करवी इतर छोट्या जनावरांना चावण्याचं ट्रेनिंग, मला जमेल तसं मी त्या कुत्र्यांना दिलं. रिझल्ट्स पाहून मी मनोमन सुखावलो. कुत्र्यांसोबत माझं काम फत्ते झालं. आता प्रश्न होता त्या मांजराला कसं हाताळायचं. मी त्या मांजरांशी जवळीक वाढवली. त्या मांजराची माझ्याबद्दलची भीती कमी झाली. मी प्रणालीला संपवण्याचा दिवस ठरवला. एक दिवस प्रणालीवर नजर ठेवताना मला समजलं, सुधीरसुद्धा मुंबईत आला आहे. मला मारहाण करणारा सुधीरच होता. दिनेशविरुद्ध पहिली साक्ष देणारा सुधीरच होता. मला हेसुद्धा समजलं, की सुधीरला कुत्रा हा प्राणी खूप आवडतो. मी माझ्या कुत्र्यांकरवी आधी सुधीरचा काटा काढला. थोडे दिवस थांबून मग प्रणालीलाही संपवायचं असं मी ठरवलं. पण ते मूर्ख मांजर...

सोसायटीच्या मागच्या गेटजवळ एक झाड आहे. तिथे मी सायनाईडची बाटली पुरून ठेवली होती. तुम्ही लोक सोसायटीमध्ये आल्यावर सुधीरचा मृत्यू सायनाईडमुळे झाला आहे याचा सुगावा तुम्हाला लागल्याचं समजलं. म्हणून तुर्तासतरी प्रणालीला मारण्याचा विचार मी सोडून दिला. रात्री झाडाच्या डोलीतून सायनाईडची बाटली काढली आणि त्याचवेळी ते मांजर पायात घुटमळलं माझ्या. बाटली उघडली गेली आणि ते विष जमीनीवर पडलं. त्यातच नाचत ते मांजर माझ्या पायाजवळ आलं. मला ती बाटली लपवण्याची चिंता लागली होती. मी त्या मांजराला लाथ घातली. ते मांजर पळालं आणि त्याच वेळी प्रणाली तिथे पोहोचली. भेदरलेल्या त्या मांजराने प्रणालीला पंजा मारला. आणि नंतर धावत गेटबाहेर पळून गेलं. तिथे जाऊन त्याने लगेच स्वत:चे पंजे चाटले आणि लगेचंच ते मरून पडलं. हे पाहून मी बाटली खिशात घातली आणि तिथून पळ काढला आणि माझ्या जागी येऊन बसलो जिथे त्या ओरडण्याचा आवाज आला नसता...

जग्गू मला बोलवायला आला आणि मी पुन्हा त्याच्यासोबत इथे आलो. सुधीरचा खून जसा मी पचवला तसा हाही खून मी पचवला असता. पण ते बिनडोक मांजर. स्वत:च्या पंजांना चाटून त्याने स्वत:ला तर संपवलंच, पण माझाही घात केला...” दिनकर बोलायचा थांबला. प्रधानांनी दिनकरच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, “दिनकर, तुझ्या पापांची शिक्षा तुझ्या भावाला भोगावी लागली. खरा दोषी तू आहेस. पण याचा तुला तिळमात्र पश्चात्ताप नाही. उलट तू प्रणाली आणि सुधीरवर सूड उगवण्याचा कट रचलास, ज्यांची काहीच चूक नव्हती. या कामी तू मुक्या जनावरांचाही वापर करून त्यांना मारलंस. तू विकृत आहेस. तुला कठोर शिक्षा होईल हे पाहीन मी...” हे ऐकून दिनकरच्या मुखावर एक क्रूर हसू उमटलं...

समाप्त.

@ अनिकेत परशुराम आपटे.

Saturday, November 4, 2023

चेस मास्टर...

'रन मशीन' हा शब्द ऐकला, की एकच व्यक्ती आठवते. भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या मधल्या फळीतला भरवशाचा फलंदाज, विराट कोहली...

खेळपट्टी आणि मैदानावरच्या त्याच्या वावरामुळे विराटला किंग कोहली सुद्धा म्हटलं जातं. विराटच्या बॅटने अनेक मोठमोठ्या खेळी साकारल्या. अनेक विक्रमही विराटच्या नावे आहेत. आशिया चषक २०२३ मध्ये पाकिस्तान समोर खेळताना विराटने सर्वात जलद तेरा हजार धावा करण्याचा नवा विक्रम करून, सचिन तेंडुलकरलाही मागे टाकलं. इतके सगळे विक्रम गाठीशी असल्याने विराट खरंच विराट झाला. पण त्याचे काही डाव असे होते, ज्यांनी विराटला महान खेळाडूंच्या यादीत बसवलं...

आशिया चषक २०१२ - भारत वि. पाकिस्तान...

या सामन्याआधी, पाकिस्तानने दोन्हीही सामने जिंकले होते, तर भारताला बांगलादेशकडून पराभवाचा प्रसाद मिळाला होता. मीरपूरच्या फलंदाजीला पोषक अशा खेळपट्टीवर नाणेफेक जिंकून पाकिस्तानने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मोहम्मद हाफीज़ आणि नासिर जमशेद यांच्या शतकांच्या जोरावर पाकिस्तानने ३२९ धावा उभ्या केल्या. सामना जिंकण्यासाठी भारताला ३३० धावांचा डोंगर पार करायचा होता. भारताचा डाव सुरू झाला आणि दुसऱ्याच चेंडूवर गौतम गंभीर बाद झाला...

भारत हा सामनाही गामावणार असं वाटत होतं. त्यावेळी विराटने मैदानात प्रवेश केला. सचिनसोबत १३३ आणि रोहितसोबत १७२ अशा दोन मोठ्या भागीदाऱ्या रचत विराटने लक्षाला काबीज केलं. सचिन आणि रोहित बाद झाल्यावर, खेळपट्टीवर जम बसलेल्या विराटने मोठे फटके मारायला सुरुवात केली. सत्तेचाळीसाव्या षटकात जेव्हा विराट बाद झाला, तेव्हा सामना पूर्णपणे भारताकडे झुकला होता. धोनीने विजयी चौकार खेचून राहिलेली औपचारिकता पूर्ण केली खरी, पण १४८ चेंडूत १८३ धावांची धडाकेबाज खेळी साकारणारा विराट, या विजयाचा खरा शिल्पकार ठरला...

२०१४ दुसरी कसोटी - भारत वि. न्यूझीलंड...

पहिल्या कसोटीत पराभूत होऊन भारतीय संघ या कसोटीसाठी मैदानात उतरला होता. नाणेफेक जिंकून भारताने न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी दिली. मोहम्मद शामी आणि इशांत शर्माने भेदक मारा करत न्यूझीलंडला १९२ धावात रोखलं. मग अजिंक्य राहणे आणि शिखर धवन यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने ४३८ धावा जमवल्या आणि दुसऱ्या डावासाठी भारताला २४६ धावांची  आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात ज़हीर ख़ानने न्यूझीलंडच्या फलंदाजीला खिंडार पाडलं आणि किवींची अवस्था ९४ वर ५ अशी झाली. पण ब्रँडन मॅक्कलम आणि जेम्स वॉटलिंग यांच्या विक्रमी भागीदारीने न्यूझीलंडला जबरदस्त आघाडी मिळवून दिली. भारताला पाचव्या दिवशी ४३४ धावांचा पाठलाग करायचा होता आणि ५२ षटकांचा खेळ शिल्लक होता...

भारताचा दुसरा डाव सुरू झाला पण ट्रेन्ट बोल्ट आणि टिम साउदीने टिच्चून मारा करत भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना लवकर परतीचा रस्ता दाखवला. ३ गडी बाद ५४ अशा केविलवाण्या अवस्थेत भारतीय संघ अडकला होता. हा सामनाही भारत गमावणार असंच सर्वांना वाटत असताना मैदानात होते विराट कोहली आणि रोहित शर्मा. विराटने एकेरी-दुहेरी धावा जमवत खेळपट्टीवर जम बसवला. टप्प्यातल्या चेंडूंवर जोरदार प्रहार करत चौकार-षटकारही मिळवले. ती कसोटी अनिर्णित अवस्थेत संपली. मॅक्कलमच्या त्रिशतकाने आणि मॅक्कलम-वॉटलिंग जोडीच्या विक्रमाने ही कसोटी चर्चेत राहिली हे खरं आहे. पण कसोटी वाचवणारी १३५ चेंडूत नाबाद १०५ धावांची विराट कोहलीची चिवट खेळी जास्त लक्षात राहिली...

टी २० विश्वचषक २०२२ - भारत वि. पाकिस्तान...

कोव्हिडमुळे पुढे सरकलेल्या टी २० विश्वचषक २०२१ मध्ये विश्वचषक इतिहासात पहिल्यांदाच पाकिस्तानने भारताला पराभूत केलं. तोच विजय गाठीशी धरून याही वेळी पाकिस्तानी संघ मैदानात उतरला होता. त्या विश्वचषकात, भारत व पाकिस्तान दोघांचाही हा पहिलाच सामना होता. नाणेफेक जिंकून भारताने पाकिस्तानला फलंदाजी दिली. अर्शदीप सिंह आणि हार्दिक पंड्या यांच्या गोलंदाजीच्या जोरावर भारताने पाकिस्तानला १५९ धावांवर रोखलं. आता सामना होता भारतीय तगडी फलंदाजी आणि पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजीचा. राहुल, रोहित, कार्तिक, सूर्या ही दमदार नावं पाहता भारत हे आव्हान लीलया पेलेल असं वाटत होतं...

नईम शाह आणि हॅरीस रौफ यांनी भेदक मारा करत भारतीय फलंदाजीला खिंडार पाडलं. ३६ धावा आणि चार बळी अशा नाजूक अवस्थेत भारतीय संघ असताना, विराटने सामन्याची सूत्र स्वत:च्या हाती घेतली. हार्दिकसोबत एकेरी-दुहेरी धावा जमवत विराटने धावफलक हलता ठेवला. वेळोवेळी चौकार-षटकारांची बरसात करत विराटने धावगतीही वाढवली. अश्विनच्या चतुरपणामुळे असो किंवा नवाज़च्या ढिसाळपणामुळे असो, सामना भारताच्या झोळीत गेला. पण प्रतिकूल परिस्थितीत, ५३ चेंडूत नाबाद ८२ धावांच्या विराटच्या जिगरबाज खेळीचा, भारताच्या या अशक्यप्राय विजयात सिंहाचा वाटा होता हे नक्की...

या सर्व सामन्यात जेव्हा विराट फलंदाजीसाठी आला, तेव्हा भारताची नाजूक स्थिती होती. त्यातून विराटने भारताला नुसतं बाहेरच नाही काढलं, तर सामन्याला कलाटणी देत विजश्रीही खेचून आणली. एकेरीच्या दुहेरी करणं, दुहेरीच्या तिहेरी धावा करणं यात विराटचा कमालीचा फिटनेस दिसून येतो. धावफलक हलता ठेवत एकीकडे फील्डर्सना व्यस्त ठेवायचं आणि दुसरीकडे धावा जमवत जायचं यात विराटचा हातखंडा आहे. विराटचं हेच कौशल्य त्याला इतर फलंदाजांत वेगळं ठरवतं...

आज ५ नोव्हेंबर. आज विराट कोहलीचा वाढदिवस. भारतीय क्रिकेट संघाच्या या भरवशाच्या चेस मास्टरला वाढदिवसाच्या शतकमय शुभेच्छा...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Tuesday, October 10, 2023

कुंग-फू पंड्या...

"कुंग-फू पंड्या" हे नाव ऐकलं किंवा वाचलं, की बहुतांश क्रिकेट प्रेमींना एकच व्यक्ती आठवते. मिश्कील हसणारा, मस्कऱ्या स्वभावाचा हार्दिक पंड्या...

Instagramच्या एका क्लिपमध्ये हार्दिकने 'कुंग फू पांडा' या प्रसिद्ध व्यक्तिरेखेचे कपडे घातले होते. तेव्हापासून त्याला "कुंग फू पंड्या" हे टोपण नाव मिळालं. हार्दिकचं क्रिकेटप्रेम त्याच्या वडिलांना त्याच्या लहानपणीच लक्षात आलं होतं. हार्दिकची ही आवड जोपासायला त्याच्या वडिलांनी सूरतेहून वडोदरेला स्थलांतरण केलं आणि तिथल्या किरण मोरे अकादमीमध्ये हार्दिक पंड्या नावाच्या हिऱ्याला पैलू पाडण्याचं काम सुरू झालं...

तिथल्या क्लब क्रिकेटमध्ये हार्दिक चांगली प्रगती दाखवत पुढे गेला. हार्दिक त्या वेळी वडोदरा संघाकडून खेळायचा. २०१३ साली सय्यद मुश्ताक़ अली ट्रोफीच्या अंतिम सामन्यात खेळताना हार्दिकने वडोदरा संघातर्फे नाबाद ८६ धावा केल्या ज्यात सहा उत्तूंग षटकारांचाही समावेष होता. हार्दिकच्या याच कामगिरीच्या जोरावर वडोदरा संघाने विदर्भ संघाला हरवत ट्रोफी मिळवली आणि हार्दिक सर्वांच्या नजरेत आला. यापुढे हार्दिकची पुढची पायरी होती IPL, म्हणजेच Indian Premier League...

T20 या क्रिकेटच्या छोटेखानी स्वरूपाच्या IPL नावाच्या महास्पर्धेत हार्दिकची मुंबई इंडियन्स संघात वर्णी लागली. मुंबई संघातर्फे खेळताना हार्दिकने अनेक स्फोटक खेळी करून रसिकांची दाद मिळवली. कायरन पोलार्डसोबत मोक्याच्या क्षणी भागिदाऱ्या रचून हार्दिकने मुंबई इंडियन्सला अनेक विजय मिळवून दिले. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या ३१ चेंडूत ६१ धावा, ही हार्दिकची IPLमधली सर्वोत्तम खेळी ठरली. २०२२च्या सुरुवातीला मुंबईने हार्दिकला निरोप दिल्यावर गुजरात टायटन्स या नव्या संघाचं कर्णधारपद त्याच्याकडे आलं. हार्दिकच्या कुशल नेतृत्वाने आणि त्याच्या उंचावलेल्या कामगिरीने गुजरात टायटन्स, IPL २०२२चा विजेता संघ बनला...

IPL मधल्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर २०१६मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या T20 सामन्यात पदार्पण करण्याची संधी हार्दिकला मिळाली. तोपर्यंत हार्दिक एक उत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून प्रसिद्ध झाला होता. २०१६च्या T20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध फक्त आठ धावात तीन मोलाचे बळी मिळवून त्यांना ८३ धावांवर रोखण्यात हार्दिकने मोलाचा वाटा उचलला. ऑस्ट्रेलिया विरुद्ध हार्दिकेने ३१ चेंडू साकारलेल्या स्फोटक ७१ धावांची खेळी त्याची सर्वोत्तम खेळी होती. अर्थात तो सामना भारताने गमावला खरा, पण हार्दिकची खेळी मात्र स्मरणात राहिली...

२०१६ हे वर्ष हार्दिकसाठी महत्वाचं ठरलं. कारण याच वर्षात T20 पाठोपाठ एक दिवसीय अंतरराष्ट्रीय सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध पदार्पणाची संधी हार्दिकला मिळाली. आजवर खेळल्या गेलेल्या त्याच्या ६२ एक दिवसीय सामन्यात हार्दिकच्या नावे सात अर्ध शतके आहेत, पण अजून त्याला शतकाला गवसणी घालता आली नाही. ऑस्ट्रेलिया विरुद्धची नाबाद ९२ धावांची फटकेबाज खेळी हार्दिकची सर्वोत्तम खेळी ठरली. T20 आणि एक दिवसीय सामन्यांमध्ये हार्दिक कमाल करतच होता. पण पारंपारिक कसोटी क्रिकेटपासून तो वंचित राहत होता. २०१६च्या हंगामात इंग्लंड विरुद्ध मालिकेसाठी हार्दिकची निवड झाली होती, पण त्याला खेळण्याची संधी मिळाली ती श्रीलंकेच्या मालिकेत. याच मालिकेच्या तिसऱ्या कसोटीत हार्दिकने आपलं पहिलं कसोटी शतक झळकवताना जबरदस्त फलंदाजी तर केलीच, शिवाय जेवणापूर्वी शतक ठोकणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू, असा विक्रमही केला...

२०२०-२१चा हंगाम हार्दिकसाठी वाईट काळ ठरला. त्याच्या पाठीच्या दुखण्यामुळे तो संघातून सतत आत-बाहेर करत राहिला. त्याने गोलंदाजी करणं बंद केलं होतं, पण त्याचा फलंदाजीचा फॉर्मही ढासळत गेला. २०२१च्या T20 विश्वचषकात हार्दिकच्या याच खराब कामगिरीचा मोठा फटका भारतीय संघाला बसला. संघाला पाकिस्तानकडून विश्वचषकातला पहिला पराभव स्वीकारावाला लागला आणि सोबत भारताला उपांत्य फेरीही गाठता आली नाही. त्यानंतर बराच काळ संघाबाहेर राहून हार्दिकने स्वत:च्या फिटनेस व फॉर्मवर मेहनत घेतली. हार्दिकची ही मेहनत फळाला आली आणि २०२२ मध्ये हार्दिकने धडाकेबाज पुनरागमन केलं...

हार्दिक पंड्या रुबाबदार आहेच, पण वागण्या-बोलण्यातला रुबाब जरा कमी केला आणि संघाबद्दल आणि सह-खेळाडूंबद्दलची वागणूक बदलली तर हार्दिकमध्ये महान खेळाडू बनण्याची क्षमता नक्की आहे. आज ११ ऑक्टोबर. भारतीय संघाच्या या भरवशाच्या अष्टपैलू खेळाडूचा आज वाढदिवस. जिगरबाज हार्दिकला वाढदिवसाच्या चौकार-षटकारमय शुभेच्छा...

Happy Birthday Kung Fu Pandya...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Saturday, September 30, 2023

नकोसा विक्रम...

कसोटी क्रिकेटमध्ये अनेक ऐतिहासिक सामने झाले. इंग्लंडविरुद्ध लाराने केलेल्या ४०० धावा असो किंवा पाकिस्तानविरुद्ध कुंबळेने घेतलेले दहा बळी असो. कुठल्या ऐतिहासिक सामन्यात विक्रम होतेच. या सामन्यांमध्ये एक सामना असा होता, जो एका नको असलेल्या विक्रमासाठी लक्षात राहिला. तो सामना होता, १९९६-९७च्या हंगामातला ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडीज...

फ्रँक वॉरेल ट्रोफी. ऍशेस मालिकेसारखीच प्रतिष्ठा असलेल्या फ्रँक वॉरेल ट्रोफीसाठी चुरस असायची ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज संघांमध्ये. बराच काळ सलग या ट्रोफीवर वेस्ट इंडीजने वर्चस्व गाजवलं. पण १९९६-९७चा ऑस्ट्रेलिया दौरा, वेस्ट इंडीज कधीच विसरणार नाही. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतले पहिले दोन सामने सहज जिंकून कांगारूंनी वेस्ट इंडीजला बॅकफूटवर ढकललं होतं. कर्टली एँब्रोजच्या भेदक माऱ्याच्या जोरावर तिसरी कसोटी जिंकून वेस्ट इंडीजने मालिका रंगतदार अवस्थेत आणली. चौथी कसोटी जिंकून मालिकेत बरोबरी करावी या विचारात संघ असतानाच कर्टली एँब्रोज दुखापतीने जायबंदी झाला...

वेस्ट इंडीज गोलंदाजीचा हुकमी एक्का एँब्रोज मैदानात नाही याचा फायदा कांगारूंनी उचलला आणि चौथा कसोटी सामना डावाने जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेतली. एँब्रोज मात्र हताशपणे पॅव्हेलियनमधून हे सगळं पाहत होता. एकेकाळी क्रिकेट जगतावर अधिराज्य गाजवणाऱ्या वेस्ट इंडीजवर पत राखण्यासाठी झगडण्याची वेळ आली होती. एँब्रोजने फिटनेस टेस्ट पास केली आणि पाचव्या व शेवटच्या कसोटीसाठी तो मैदानात उतरला. पहिल्या डावात कॉटनी वॉल्शला उष्णतेचा तडाखा बसला आणि त्याने मैदान सोडलं. एँब्रोज आणि बिशपने मात्र अचूक मारा करत कांगारूंना २४३ धावात गारद केलं. त्याला उत्तर देताना लाराच्या शतकाच्या जोरावर वेस्ट इंडीजने १४१ धावांची आघाडी मिळवली...

ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव सुरू झाला. वॉल्श-एँब्रोज जोडीने सुरुवातीपासूनच बळी मिळवत कांगारू फलंदाजीला खिंडार पाडलं. पण काही काळानंतर चौथ्या कसोटी आधी एँब्रोजला झालेल्या दुखापतीने पुन्हा डोकं वर काढलं. त्या दुखण्याने एँब्रोजची एकाग्रता भंग झाली आणि त्याच्या पावलांशी त्याचा ताळमेळ बिघडला. त्यानंतरची एँब्रोजची दोन ओव्हर्स एँब्रोज कधीच विसरणार नाही. सलग नो बॉल आणि वाईड बॉल टाकत एँब्रोजने पहिल्या ओव्हरमध्ये १२ तर नंतरच्या षटकात ६ जास्त बॉल घेतले. १५ चेंडूंची मोठी ओव्हर टाकण्याचा नकोसा विक्रम एँब्रोजच्या खात्यात आला. आपल्या जोडीदाराची अवस्था पाहून कर्णधार वॉल्शने एँब्रोजला पॅव्हेलियनला पाठवलं. मग वॉल्श आणि बिशपने मॅरेथोन ओव्हर्स टाकत राहिलेली कांगारू फलंदाजी गुंडाळून, विजय समोर आणून ठेवला. कॅरेबियन फलंदाजांनी ५४ धावांचं माफक आव्हान सहज पार करत तो सामना दहा गडी राखून जिंकला...

ऑस्ट्रेलियाने ३-२ अशी मालिका जिंकली. पर्थला खेळलेला तो सामना एँब्रोजचा ऑस्ट्रेलियामधला शेवटचा कसोटी सामना ठरला. एँब्रोजने काही काळाने कसोटी क्रिकेटला अलविदा केलं. मॅकग्राथ-गिल्लेस्पी, वसिम-वकारसारखे भेदक असणारी एँब्रोज-वॉल्श ही जोडी फुटली आणि तिथून वेस्ट इंडियन कसोटी क्रिकेटची उतरती कळा समोर आली. २००० पासून आजपर्यंत वेस्ट इंडीज कसोटी सघाला ऑस्ट्रेलियासमोर पराजयाचीच चव चाखावी लागली आणि एक नको असलेला विक्रम उराशी बाळगत एँब्रोजने तो लाल चेंडू हातावेगळा केला...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Friday, September 15, 2023

युद्ध - दुसरा भाग...

पहिल्या भागात...

दुष्ट राजा दुष्कीर्ती सगळीकडे हाहाकार माजवत असतो. तेव्हा तीन दैवी मानव त्याच्या समोर प्रकट होतात. हजारो वर्ष उलटतात. एका रात्री जंगली लांडग्यांपासून स्वत:ला वाचवत देवयानी पळत असते. त्यावेळी समर आणि सोहम हे दोन भाऊ तिचं रक्षण करतात. देवयानी त्या दोघांना दुष्कीर्ती आणि त्या तीन दैवी मानवांच्या युद्धाची हकीगत सांगते आणि म्हणते की ती स्वत: प्रकाशाच्या मंदिराची देवता आहे. सोहमचा या गोष्टीवर विश्वास बसत नाही. रात्र तंबूत घालवावी आणि सकाळी प्रवास करावा म्हणून सगळे जाऊ लागतात. इतक्यात सोहमला एक काळी वस्तु दिसते. त्या वस्तूला पाहताच देवयानी धोक्याचा इशारा देते...
सोहम त्या वस्तूला स्पर्श करतो आणि त्याच वस्तूमध्ये खेचला जातो. देवयानी समरला सांगते की ही वस्तू म्हणजे त्या दैवी तलवारीचा एक भाग आहे. समरचा विश्वास बसतो. देवयानी आणि समर समुद्र तटावर पोहोचतात. तिथे सागरी तटासारखं काहीच नाही ह पाहून समरला नवल वाटतं. देवयानीला एक गुहा दिसते. दोघं त्या गुहेत प्रवेश करतात. गुहेच्या अंताला एका दगडी शिळेवर एक मूर्ती उभी असते. त्या मूर्तीला देवयानीचा स्पर्श होताच ती भंग पावते आणि ऋषी आदित्यनाथ समोर येतात. आदित्यनाथ सांगतात की त एकेकाळचे राजा होते आणि युद्धात सर्व कूळ गमावल्यावर त्यांना पश्चात्ताप झाला आणि ते इथे तपश्चर्या करायला आले...
श्री विष्णूने त्यांची परीक्षा घेतली ज्यात ते असफल ठरले. श्री विष्णूने त्यांना शाप देत या शिळेत परिवर्तीत केलं. आज देवयानीच्या स्पर्शाने त्यांची शापातून मुक्ती झाली. इतकं बोलून ऋषी आदित्यनाथ भेट म्हणून समरला एक उडणारं जहाज देतात. दुसरा तुकडा मिळवण्यासाठी समर आणि देवयानी त्याच जहाजावर स्वार होतात. एका सागरी दानवाशी लढताना त्यांना सागरी चाचा संग्रामसिंहची मुलगी वीरा भेटते. दानवाला हरवल्यावर तिघं बोलत असताना देवयानीला जाणवतं की दुसरा तुकडा पाण्यात आहे. समर लगेच पाण्यात उडी घेतो. तिथे एक आकाराने मोठा होत असलेला मासा समरची वाट अडवतो...


दुसरा भाग...

तिथे जहाजावर देवयानी आणि वीरा समरच्या कुशलतेची चिंता करत होत्या. दोघी सारख्या पाण्यात डोकावून पाहत होत्या. तिथे पाण्यात, समोर आलेल्या संकटाचा सामना कसा करावा या दुविधेत असलेल्या समरला बाजूलाच पडलेली एक चमकदार वस्तू दिसली. त्याने नीट पाहिलं, तर तो रेतीमध्ये गढलेला एक भला मोठा खंजीर होता. त्या माशाने समरला गळंकृत केलंच असतं, पण समरने चपळाईने तो खंजीर मिळवत, एका बाजूला हटत, तो खंजीर त्या माशाच्या पोटात खुपसला. जखम होताच माशाच्या डोळ्यातली लालसर झाक कमी झाली आणि मासा गतप्राण झाला. माशाच्या अवती-भोवती असलेला काळा धूरही नाहीसा झाला होता. समर माशाजवळ गेला आणि त्याच्या पोटात खुपसलेला खंजीर काढून समरने स्वत:जवळ ठेवला. तिथून जवळच समोरच्या दिशेने लाल प्रकाश येत होता. समर तिथे पोहोचला. तो त्या दैवी तलवारीचा दुसरा तुकडा होता. देवयानीकडून घेतलेल्या रेशमी कापडाने समरने तो तुकडा उचलला आणि क्षणाचाही विलंब न करता तो पाण्याच्या पृष्ठभागाकडे जाऊ लागला...

वर पोहोचून जहाजात चढताना समरने देवयानी आणि वीराच्या नजरांकडे पाहिलं. त्या नजरेत आशा आणि काळजी दोन्ही दिसत होते. अंगरख्यात ठेवलेलं रेशमी कापड बाहेर काढत समर म्हणाला, “हा आहे त्या तलवारीचा दुसरा भाग... वीरा, तुझ्या वडिलांचा काहीच ठाव नाही लागला...” समर बोलतच होता, की त्याच्या कमरेला लटकलेला खंजीर वीराच्या दृष्टीस पडला. त्वरेने तो खंजीर घेत वीरा म्हणाली, “बाबांचा खंजीर... हा माझ्या बाबांचा खंजीर आहे. हे पहा आमचं निशाण. समर, तुला हा खंजीर कुठे सापडला...” समरने एकवार देवयानीकडे पाहिलं. तिने मान हलवली तेव्हा समर म्हणाला, “हा खंजीर पाण्याच्या तळाशी रेतीत रुतला होता. जिथे हा खंजीर होता, तिथून जवळच हा तलवारीचा दुसरा तुकडा होता...” तलवारीच्या तुकड्याकडे पाहत देवयानी म्हणाली, “दोन शक्यता आहेत... कदाचित त्याच दानवाशी लढताना तुझे बाबा...... तेव्हाच तो खंजीर त्यांच्या हातून निसटला. नाहीतर त्यांना तलवारीचा हा दुसरा तुकडा दिसला असणार...

जर त्यांनी या तुडक्याला स्पर्श केला असेल, तर... वीरा, कदाचित तुझे वडील त्या महाकाय दानवाची शिकार झाले, अथवा ते त्याच्या काळ्या साम्राज्यात कैद झाले, जिथे समरचा भाऊ सोहम खेचला गेला...” हे ऐकून वीरा क्षितिजाकडे पाहू लागली. तिच्या डोळ्यात एकाच वेळी क्रोध आणि अश्रू दोन्ही होते. काही क्षणांनी डोळ्यातलं पाणी पुसत वीरा म्हणाली, “मीसुद्धा तुम्हा दोघांसोबत येत आहे. मला माहीत नाही माझे बाबा...... पण जर ते जीवित आहेत आणि त्या काळ्या जगात आहेत, तर त्यांना परत आणल्याशिवाय मला चैन पडणार नाही...” समर आणि देवयानीने एकमेकांकडे पाहिलं. पश्चिम दिशेला पाहत देवयानी म्हणाली, “काळ्या पर्वताची शिखरं याच दिशेला आहेत. तलवारीचा तिसरा भाग तिथेच आहे...” हे ऐकल्यावर जहाजाला नमस्कार करत समर म्हणाला, “कृपया आम्हाला पश्चिम दिशेला घेऊन जावे...” बघता बघता ते जहाज पाण्यावर हवेत उडालं आणि पश्चिमेकडे वळून पुढे जाऊ लागलं...

पश्चिम दिशेला जाताना मृत्यूच्या काळ्या सागराला ओलांडल्यावर अनेक वनं, नद्या आणि पर्वतशिखरं यांना पार करत जहाज हवेतून जात होतं. पश्चिम दिशेला पाहत समरकडे जात वीरा म्हणाली, “आठ दिवस उलटले. आपण अजूनही त्या काळ्या पर्वतापर्यंत पोहोचू शकलो नाही. कोण जाणे कधी आपण तिथे पोहोचू आणि कधी मी बाबांना परत भेटेन...” समर काही बोलायच्या आधीच देवयानी एका दिशेला इशारा करत म्हणाली, “ती पहा काळ्या पर्वताची शिखरं...” वीरा आणि समरने देवयानीने दाखवलेल्या दिशेला पाहिलं, तर अनेक पर्वत शिखरं तिथे दिसत होती. सभोवतालच्या वातावरणाशी विसंगत असलेली ती पर्वतशिखरं काळी ठिक्कर होती. जसं जहाज जवळ गेलं, सर्वांना दिसलं, की त्या परिसरात असलेली वृक्ष, भूमी, सर्वच काळं होतं. असं वाटत होतं, जणू कोणीतरी सर्वत्र काळी चादर पसरली आहे. तिघंही हे सर्व पाहतच होते, की अचानक एका पर्वत शिखरातून निघालेला लाल प्रकाशाचा एक किरण जहाजाला येऊन भिडला...

किरणाच्या तडाख्याने जहाजाचे तुकडे झाले. आता आपण खाली पडणार हे लक्षात येताच वीराने कमरेला बांधलेला दोरखंड सोडून त्याचा फास बनवला. समरने फास असलेली बाजू एका बाणात अडकवली आणि धनुष्याच्या सहाय्याने तो बाण एका झाडाच्या दिशेने सोडला. तो बाण झाडाच्या एका मजबूत फांदीला लागताना फासाने त्या फांदीला स्वत:त सामावले. दोरखंडाचं दुसरं टोक वीराच्या हातात होतं. तिने दोरखंड खेचला. फास त्या फांदीला आवळला गेला आणि त्या दोरखंडाच्या मदतीने देवयानी, समर आणि वीरा तिघंही अलगद जमिनीवर उतरले. खाली पोहोचताच तिघं सर्वत्र नजर फिरवू लागले. काळी जमीन, काळे वृक्ष पाहून समर आणि वीराला नवल वाटलं. तेव्हा देवयानी म्हणाली, “हे सर्व पूर्वी असं नव्हतं. देवराज इंद्राने पर्वताला शाप देताना वज्रप्रहार केला. त्यामुळे इथली सृष्टी काळी पडली...” देवयानी बोलतच होती, की, “मला मदत करा... कोणी आहे का...” या करूण आवाजाने तिघांचं लक्ष वेधलं...

त्यांनी पाहिलं, तर एक तरुण समोरच्या दिशेने त्यांच्याकडे धावत येत होता. लाल डोळे असलेले काही दगडी दानव आणि राक्षसी वृक्ष त्याचा पाठलाग करत होते. त्या वृक्षांच्या आणि दानवांच्या लाल डोळ्यांच्या वरच्या बाजूने लाल किरणं निघत होती, ज्याने आजूबाजूच्या वृक्षांची आणि जमिनीची राख होत होती. हे पाहून समरने धनुष्य-बाण सरसावला आणि वीराने एका हातात खंजीर तर दुसऱ्या हातात तलवार घेतली. आपल्या कक्षेत आपल्यावर समरने त्या दगडी दानवांवर बाण चालवायला सुरुवात केली. दुसरीकडे वीरा त्या राक्षसी वृक्षांच्या फांद्या तोडू लागली. ते दानव आणि वृक्ष थांबण्याचं नाव घेत नव्हते. थोड्याच वेळात तो तरुणही त्यांच्या जवळ आला. त्या दानवांनी आणि वृक्षांनी एव्हाना समर आणि वीरासह देवयानी आणि त्या तरुणालाही घेराव घातला होता. ते दानव आणि वृक्ष चौघांच्या जवळ येऊ लागले. तेव्हा देवयानीने तिचे हात जोडले...

पांढऱ्या प्रकाशाची एक लकेर देवयानीला घेराव घालू लागली आणि देवयानी हवेत तरंगू लागली. तिने डोळे उघडले. तिचे डोळे पूर्ण पांढरे-शुभ्र होते. देवयानीने तिच्या हातातून पांढरी प्रकाश किरणं सोडली. ती किरणं त्या दानव आणि वृक्षांवर आदळताच क्षणार्धात विस्फोट होऊन त्यांचं भस्म होऊ लागलं. जेव्हा सगळे दानव आणि वृक्ष भस्मसात झाले, तेव्हा देवयानीने पुन्हा डोळे बंद करून हात जोडले. तिच्या कांतीभोवती असलेला पांढऱ्या प्रकाशाचा घेराव कमी होत गेला. काही क्षणातच देवयानी पुन्हा सामान्य रूपात परिवर्तीत होऊन जमिनीवर उतरली. त्यावेळी ती स्वत: सांभाळू शकत नव्हती. देवयानीचा तोल गेला. ती पडणार इतक्यात त्या तरुणाने देवयानीला आधार दिला. तिला व्यवस्थित उभं करताना तो तरुण म्हणाला, “तुम्ही माझी मदत केलीत याबद्दल धन्यवाद. मी....” तो तरुण बोलतच होता, की देवयानीची नजर त्याच्या हातावर पडली...

त्या तरुणाच्या हातात एक काळी वस्तू होती. ती वस्तू पाहून देवयानी अवाक झाली आणि म्हणाली, “हा तर त्या दैवी तलवारीचा शेवटचा तुकडा आहे. या तुकड्याला तुम्ही हातात धरून ठेवलं आहे आणि अजून तुम्हाला काहीच झालं नाही...” त्या तरुणाने स्वत:च्या हाताकडे पाहिलं. मग समोर उभ्या तिघांकडे पाहत म्हणाला, “हो. हा त्याच तलवारीचा तिसरा आणि शेवटचा तुकडा आहे, ज्याला शोधत तुम्ही इथवर आला आहात. याला स्पर्श केल्यावरही मला काहीच कसं नाही झालं, तेही समजेल तुम्हाला. पण त्या आधी...” बोलता बोलता त्या तरुणाने तलवारीचा तुकडा धरलेली मूठ उघडली. तलवारीचा तो तुकडा वर जाऊन काही अंतरावर हवेत तरंगू लागला. मग त्या युवकाने त्यांचे दोन्ही हात त्या तिघांसमोर धरले. वीरा आणि समरजवळ असलेले तलवारीचे राहिलेले तुकडे त्या युवकाकडे आकर्षित होत, त्यांच्यापासून दूर जात, त्या तिसऱ्या तुकड्याच्या बाजूला जाऊन हवेत तरंगू लागले. त्या युवकाच्या चेहेऱ्यावर एक विद्रूप हसू होतं. त्याने जसं त्याच्या दोन्ही हातांना जोडलं, तसे त्या दैवी तलवारीचे तीनही तुकडे एकमेकांशी जोडले गेले...

दुसऱ्याच क्षणाला एक मोठी काळी तलवार हवेत तरंगत होती. काळ्या धुरात गुरफटलेल्या त्या तलवारीतून लाल ठिणग्या निघत होत्या. त्या तरुणाने त्याच्या हातात ती तलवार धरली आणि काळा धूर अजून गढद होऊन त्या युवकाला घेरू लागला. त्या युवकाच्या कायेचा रंग बदलला. तो निळा-जांभळा झाला होता. त्याचे डोळे जळत्या निखाऱ्यासारखे लाल झाले आणि तो तरुण गर्जना करत हसू लागला. हे सगळं इतक्या त्वरेने झालं, की देवयानी, समर आणि वीराला आकलनच करता आलं नाही. त्या युवकाने जसं बोलायला सुरुवात केली, तसे तिघं भानावर आले, “मी दुष्कीर्तीचा पुत्र काली आहे. जेव्हा ते तीन मूर्ख मानव पिताश्रींना काळ्या साम्राज्यात कैद करत होते, तेव्हा पिताश्रीनी या तलवारीतून एक किरण वर अवकाशात सोडला. तो प्रकाश किरण मी होतो. तो किरण इथे या पर्वतावर उभ्या एका वृक्षाच्या फळात शिरला आणि मी त्या फळात अडकून पडलो. ही तलवार तुटली आणि तिचा अग्रभागही इथेच येऊन पडला. काळ्या साम्राज्यात कैद असलेले माझे पिताश्री आणि इथे फळात अडकलेला मी, आम्ही दोघं विवश होतो. तो प्रकाश जर बाहेर पडला असता, तर मी लगेच हा तुकडा हस्तगत केला असता. पण मी स्वत:हून यातून बाहेर पडू शकणार नव्हतो...

फळाच्या आतून प्रकाश किरणं सोडून मी सुटण्याचा कयास करू लागलो. आज इतक्या वर्षांच्या प्रतीक्षेनंतर समरने चालवलेल्या बाणाने त्या फळाला छेद दिला आणि मी मुक्त झालो...” बोलता बोलता कालीने तलवार देवयानीच्या दिशेला वळवली. तलवारीतून निघालेल्या लाल किरणांनी देवयानीला घेराव घातला. समर आणि वीराने देवयानीकडे धाव घेतली, पण कालीने त्याच्या दुसऱ्या हाताने लाल किरणं त्या दोघांवर सोडून त्यांना दूर फेकलं. तिथे देवयानी एखाद्या चुंबकासारखी कालीकडे खेचली जाऊ लागली. समर आणि वीराकडे पाहत देवयानी म्हणाली, “तुम्हा दोघांना आता हे सगळं थांबवावं लागेल. आजच्या दिवसभरासाठी माझी शक्ती लुप्त झाली आहे. आणि आज दहावा दिवस आहे. आजच त्या दुष्कीर्तीचा अंत व्हायला हवा...” देवयानी कालीसमोर येताच त्याने तलवारीच्या सहाय्याने काळ्या साम्राज्याचे दरवाजे उघडले. मग देवयानीला जखडलेल्या लाल किरणांना पकडून देवयानीसमवेत काली त्या काळ्या साम्राज्यात प्रविष्ट झाला...

सर्व काही इतक्या लवकर झालं, की समर आणि वीरा काहीच करू शकले नाहीत. अचंभित होऊन वीरा म्हणाली, “कालीला तलवार तर मिळाली होती, मग तो देवयानीला का घेऊन गेला..?? काय रहस्य असू शकतं या मागे..?? याला उत्तर म्हणून समर काही बोलेल इतक्यात, “मोठ्या शक्तीसोबत मोठ्या बलिदानाचं मोलही द्यावं लागतं...” हे ऋषी आदित्यनाथ यांनी गुहेत उच्चारलेले शब्द त्याला आठवले. समर म्हणाला, “वीरा, आज दहावा दिवस आहे. आज त्या दुष्कीर्तीला त्याच्या सर्व शक्ती प्राप्त होतील. पण बहुदा त्यासाठी त्याला बलिदान द्यावं लागेल. अर्थात बळी द्यावं लागेल. देवयानीला यासाठी तर नाही... वीरा, आपल्याला देवयानीच्या मदतीसाठी त्या काळ्या साम्राज्यात जायला हवं...” वीराने होकारार्थी मान हलवली आणि दोघंही त्या द्वाराकडे वळले, जे कालीने उघडलं होतं. ते द्वार हळू हळू बंद होत होतं. हे पाहून दोघंही द्वाराच्या दिशेने पळू लागले. इतक्यात त्यांच्या आजू-बाजूला स्फोट होऊ लागले...

धावताना दोघांनी पाहिलं, तर दगडी दानव आणि राक्षसी वृक्षांची सेना, चहू बाजूंनी त्यांच्यावर चालून येत होती. वीरा म्हणाली, “हे सैन्य आपल्याला आत जाण्यापासून रोखण्यासाठी येत आहे. यांच्याशी आपण लढत राहिलो तर ते द्वार बंद होईल आणि आपण देवयानीपर्यंत पोहोचू शकणार नाही...” समरने जरा विचार केला. मग त्याने आपल्या भात्यातून काही बाण बाहेर काढले. अंगावरच्या कापडातून काही हिस्सा फाडला आणि त्या बाणांना गुंडाळला. वीरा समजून गेली. तिने पळता पळताच बाजूचे दोन दगड उचलले. ते एकमेकांवर घासून ठिणग्या निर्माण केल्या आणि त्या ठिणग्या बाणांवर बांधलेल्या कापडांवर घातल्या. जळत्या मशालींप्रमाणे दिसणाऱ्या त्या बाणांना समरने वेळ न दवडता द्वाराच्या जवळ पोहोचलेल्या दानवांवर आणि वृक्षांवर सोडलं. विस्फोट झाले आणि द्वाराच्या जवळ पोहोचलेलं सैन्य क्षणार्धात तुकड्यांमध्ये विखुरलं गेलं. हीच संधी साधून समर आणि वीराने बंद होणाऱ्या द्वारातून काळ्या साम्राज्यात उद्या घेतल्या...


चुंबकासारखे
दोघं खाली खेचले जात होते. काही क्षणातच जमीन दिसू लागली. खाली पोहोचताच समर आणि वीरा थोडे अडखळले आणि मग स्थिर उभे राहिले. त्यांच्या चारही बाजूंनी एक वेगळंच जग दिसत होतं. अंधुक प्रकाश होता. काही टेकड्यांमधून ज्वालामुखीचा रस निघत होता. काही टेकड्यांमध्ये विस्फोट होत होते. ते दोघं उभे होते तिथून काही अंतरावर सोनेरी लाव्याचा एक विशाल समुद्र पसरला होता, ज्यात वाफा येत होत्या आणि बुडबुडेही निघत होते. हवा येत-जात होती, पण शीतलतेपेक्षा उष्णतेचा अनुभव जास्त येत होता. आकाशात विजा चमकत होत्या. चंद्र, सूर्य किंवा चांदण्या काहीच दिसत नव्हतं. वीरा म्हणाली, “बाहेरच्या जगापेक्षा ही जागा वेगळीच आहे... कथा-कल्पनांमध्ये ऐकलेला रसातळ हाच का...” वीराला दुजोरा देत समर म्हणाला, “इथे सगळीकडे आगच आग दिसते. वृक्ष नाहीत, प्राणी नाहीत की मनुष्य नाही...” “ते ही येतील. इतकी घाई कशाला...”

समर बोलतच होता, की या आवाजाने समर आणि वीरा दोघंही चपापले. आवाज ज्या दिशेने आला त्या दिशेला दोघांनी पाहिलं, तर समोर काली उभा होता. कालीला पाहताच वीरा आणि समर दोघांनी आपापल्या तलवारी बाहेर काढत आक्रामक पावित्रा घेतला. समरने विचारलं, “काय आहे हे सगळं..?? देवयानी कुठे आहे..??” काली हसत म्हणाला, “रसातळ किंवा ज्याला नरक म्हणतात, त्या पाताळाच्या आणि धरतीच्या मध्ये आहे हे काळं साम्राज्य. या शापित काळ्या साम्राज्याचे पालक आहेत माझे पिताश्री, महान राजा दुष्कीर्ती. माझ्या मागे त्या टेकड्या आहेत ना, त्या टेकड्यांच्या मधोमध पिताश्रींनी परकाया प्रवेशाच्या विद्येचे अनुष्ठान केले आहे. देवयानीसुद्धा मूर्छित अवस्थेत तिथेच आहे. ही विद्या संपन्न होताच पिताश्री देवयानीच्या शरीरात प्रवेश करतील आणि अमर होतील. हा...हा...हा...” काली अजून जोरात हसू लागला. वीरा आणि समरने तलवारी सरसावत कालीवर धाऊन आले...

दोघांना चाल करून येताना पाहून काली हसायचा थांबला. पाहता पाहता त्याचे डोळे लाल झाले आणि त्याच्या दोन्हीही रिकाम्या हातात एकेक शस्त्र आलं. तलवार, भाला, धनुष्य-बाण, खंजीर या सर्वांपेक्षा वेगळी असलेली ही शस्त्र टोकदार आणि मोठ-मोठ्या काटयांनी भरलेली होती. वीरा आणि समर कालीवर वार करत होते आणि काली दोघांचेही वार लीलया परतवत होता. बराच वेळ हे युद्ध चाललं. समर आणि वीरा दोघंही घायाळ झाले होतं. त्यांना झालेल्या जखमांमधून रक्त येऊ लागलं होतं. हसत हसत काली म्हणाला, “हा...हा...हा... स्वीकार करा तुमचा पराजय, तुम्ही क्षूद्र मानव काहीएक करू शकणार नाही. त्या विद्येला आता सुरुवात होणारच आहे. हा...हा...हा...” समर आणि वीराने एकमेकांकडे पाहिलं. दोघांची नेत्रपल्लवी झाली आणि दोघांनी एकत्र कालीवर वार केले. आपली पूर्ण ताकद पणाला लाऊन दोघांनी कालीची शस्त्र त्याच्या हातावेगळी केली. मग तलवारींचे सपासप वार करत दोघांनी कालीला घायाळ केलं. त्याच्या जखमांमधून काळं रक्त वाहू लागलं. कालीला वेदना होऊ लागल्या आणि काही क्षणातच त्याच्या शरीराचा स्फोट झाला. काली संपला हे पाहून समर आणि वीरा दोघं त्या टेकड्यांच्या दिशेने धावले...

टेकडी चढून दोघं माथ्यावर पोहोचले. त्यांनी सर्वत्र नजर फिरवली. टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या पठारावर अनेक ठिकाणी पालवीरहित काळी वृक्ष जळताना दिसत होती. कुठे लाव्याची नदी वाहत होती आणि त्यात स्फोट होत होते. पठाराच्या शेवटी एका दगडी शिळेवर साखळदंडात जखडलेली देवयानी त्यांना दिसली. देवयानी स्वत:ला सोडवण्याचा प्रयत्न करत होती. शिळेच्या मागे काळ्या धुरात गुरफटलेली, लाल डोळे असलेली आणि हातात ती काळी तलवार घेतलेली एक आकृती नाचत होती. तिथून जवळच दगडी दानवांची एक तुकडी सज्ज होती. समर आणि वीराने एकमेकांकडे पाहिलं. समरने भात्यातून बाण काढत धनुष्यावर चढवले. वीराने अग्नी उत्पन्न करत तो अग्नी बाणांवर टाकला. समरने ते अग्नीबाण क्षणार्धात त्या दानवांच्या तुकडीवर चालवले. दोन-तीन विस्फोट झाले आणि ती दानवांची तुकडी ठिकऱ्या ठिकऱ्या होऊन सर्वत्र विखुरली. देवयानी आणि त्या आकृतीने समोर पाहिलं तर समर आणि वीरा टेकडी उतरताना दिसत होते...

त्या दोघांना पाहून देवयानी म्हणाली, “दुष्कीर्ती, थांबव तुझा हा खेळ. तू कधीच विजयी होऊ शकणार नाहीस. कधीच अमरत्व प्राप्त करू शकणार नाहीस...” हे ऐकून ती आकृती हसू लागली आणि तिचा आवाज सर्वत्र घुमू लागलं, “हा...हा...हा... कोण थांबवणार मला... ही विद्या संपन्न होताच तुझं हे देवलोकाचं पवित्र शरीर मला प्राप्त होईल, आणि मी अधिक शक्तीशाली होईन. कीटाकांसारखी भासणारी ही माणसं काय वाकडं करू शकतील माझं. हा...हा...हा...” बोलता बोलता दुष्कीर्तीने तलवारीचं टोक एका दिशेला वळवलं. तलवारीतून निघालेल्या लाल किरणांनी प्रचंड ताकदीची महाकाय जनावरं आणि दानव यांची सेना निर्माण केली. ती सेना, वीरा आणि समरच्या दिशेने जाऊ लागली. त्या सैन्याशी दोन हात करत समर आणि वीरा पुढे सरकत होते. सर्वांचा नायनाट करून वीरा आणि समर पुढे आले आणि, “वीरा, माझी मुलगी...” या आवाजाने दोघं थांबली. वीराने वळून पाहिलं, तर तिचे वडील, म्हणजेच सरदार संग्रामसिंह उभे होते...

आपल्या वडिलांना समोर पाहून वीराने धावत जाऊन त्यांना आलिंगन दिलं. समर त्यांच्याकडे वळलाच होता, की त्याच्या खांद्यावरही एक हात आला. समर वळला तर मागे सोहम उभा होता. सोहम म्हणाला, “दादा, माझ्यासाठी आलास ना इथवर... मी तर इथे आहे. मग तू त्या दिशेला का जात होतास... आता आपली भेट झाली आहे. चल, इथून बाहेर जाऊ...” तिथे आपल्या वडिलांच्या मिठीत सामावलेली वीरा त्वरेने मागे झाली आणि म्हणाली, “बाबा, तुम्ही इतके थंडं का जाणवत आहात...” सरदार संग्रामसिंहांच्या चेहेऱ्यावर स्मित आलं. वीराचा हात पकडत ते म्हणाले, “वीरा इथून बाहेर जाऊ आपण. आता इथे थांबण्याची काहीच आवश्यकता नाही...” वीराला त्यांचा स्पर्शही खूपच थंडं वाटला. ती स्वत:ला सोडवू लागली. वीरा तिचा हात सोडवण्याचा जितका प्रयत्न करत होती, तितकीच सरदार संग्रामसिंहांची पकड अधिक बळकट होत होती. त्याच वेळी फक्त पकडलेल्या हाताने सरदार संग्रामसिंहांनी वीराला भिरकावलं आणि वीरा दूर जाऊन जमीनीवर पडली...

दुसरीकडे समरने जेव्हा सोहमचा हात आपल्या हातात घेतला, तेव्हा तो समरला थंडं जाणवला. समरने त्वरित आपला हात सोडवला आणि स्वत:च्या हाताकडे पाहून मग सोहमकडे पाहत समर म्हणाला, “सोहम, तू बोलतोस हे... इतरांच्या सहाय्यासाठी तू नेहमीच तत्पर असतोस. आणि इथे...” यावर सोहम पुन्हा रागाने म्हणाला, “समर, आधी चल इथून. तुला माझ्यासोबत यावंच लागेल...” सोहमच्या या व्यक्तव्याने समर अवाक झाला आणि मागे जाऊ लागला. त्याचवेळी सोहमने समरच्या छातीवर लाथ मारली. तो तडाखा इतका जबरदस्त होता, की समर हवेत उडून लांब फेकला गेला. वीरा आणि समर एकमेकांपासून जवळच पडले होते. एकमेकांना आधार देत दोघं उभे राहिले. समर म्हणाला, “वीरा आपले आप्त आता आपले नाही राहिले. हे दोघं कदाचित या दुष्कीर्तीच्या काळ्या विश्वाचाच भाग झाले आहेत...” समरच्या म्हणण्याला दुजोरा देत वीरा म्हणाली, “तुझं म्हणणं योग्य असेलही समर, पण तरीही मी माझ्या बाबांवर शस्त्र कसं चालवू...” समरला वीराची मन:स्थिती समजली. कारण या घडीला समरच्या मनातही सोहमबाबत हाच प्रश्न उभा ठाकला होता. समर म्हणाला, “तू म्हणतेस ते अगदी योग्य आहे वीरा. यावर एकच उपाय, मी तुझ्या वडिलांचा सामना करतो, आणि तू सोहमला सांभाळ...” दोघंही तलवारी सरसावत एकमेकांच्या पाठीला पाठ लाऊन लढायला सज्ज झाले...

पाहता पाहता सोहम आणि सरदार संग्रामसिंह, दोघांचे डोळे लाल झाले आणि शरीरं निळी-जांभळी पडली. दोघांनी समर आणि वीरावर हल्ला चढवला. समर आणि वीराने त्यांच्या पूर्ण ताकदीनिशी सरदार संग्रामसिंह आणि सोहमचा सामना केला. अखेर वीराने तिच्या तलवारीने सोहमचा शिरच्छेद केला आणि समरने त्याची तलवार सरदार संग्रामसिंहांच्या छातीच्या आर-पार केली. सोहम आणि सरदार संग्रामसिंह हा हा म्हणता भस्मसाद झाले. तिथे राजा दुष्कीर्तीने हे पाहिलं आणि त्याला राग अनावर झाला. त्याने पुन्हा तलवार चालवली. तलवारीतून निघालेल्या लाल किरणांमधून भयंकर जनावरं आणि दानवांचं प्रचंड मोठं सैन्य तयार झालं. ते सैन्य अत्यंत वेगाने समर आणि वीराच्या रोखाने सरकू लागलं. हे पाहून समरने तलवार म्यान केली आणि भात्यातून बाण काढून ते जमीनीवर पसरलेल्या लाव्यात बुडवले. बाणांनी पेट घेताच समरने धनुष्याच्या सहाय्याने ते बाण त्या सैन्यावर चालवले. जागोजागी स्फोट होऊ लागले. ती जनावरं जळू लागली. दानवांच्या ठिकऱ्या उडू लागल्या. थोड्याच वेळात समरच्या भात्यातले सगळे बाण संपले. पण ते सैन्य अजून शिल्लक होतं. तेव्हा समर आणि वीराने पुन्हा तलवारी उपसल्या आणि त्या राक्षसी सेनेवर हल्ला चढवला...

कुठे जनावरांच्या पंजांवर वार होत होते तर कुठे त्या दानवांच्या माना छाटल्या जात होत्या. वीरा आणि समर लढत होते पण ते सैन्य कमी होण्याचं नाव घेत नव्हतं. त्याच वेळी मोठ्या आवाजानिशी ती दगडी शिळा भंग पावली आणि साखळदंडात जखडलेली देवयानी मुक्त होऊन हवेत तरंगू लागली. देवयानी हवेत तरंगत होती, पण तिचं शरीर निष्तेज होतं आणि जमीनीला समांतर होतं. समर, वीरा आणि त्या सैन्याने आवाजाच्या दिशेने पाहिलं. दुष्कीर्तीने ती दैवी तलवार देवयानीच्या हाती सोपवली आणि गर्जना करून हसत तो देवयानीच्या शरीरात प्रविष्ट झाला. चहू बाजूंना कंपनं झाली आणि देवयानीचं शरीर निळं-जांभळं पडलं. काही क्षणातच देवयानीच्या निष्तेज शरीरात चेतना आली आणि डोळे उघडून ती हवेतच उभी राहिली...

तिचे निळे डोळे बदलून ती जागा लाल भडक आग ओकणाऱ्या डोळ्यांनी घेतली होती. तिने हातातली तलवार साखळदंडांवर ठेवतातच सर्व साखळदंड वितळून गेले. देवयानीच्या मुखातून दुष्कीर्तीचा आवाज येऊ लागला, “हा...हा...हा... मी आता अनंत काळासाठी अमर झालो आहे. क्षूद्र मनुष्य प्राण्यांनो, या देवयानीची दैवी शक्ती प्राप्त करून आता मी समस्त ब्रह्मांडाला काबीज करेन... हा...हा...हा...” देवयानीच्या आत प्रवेश केलेल्या दुष्कीर्तीने देवयानीचा हात पुढे केला. त्यासरशी थांबलेलं ते राक्षसी सैन्य पुन्हा चाल करून आलं आणि दुष्कीर्ती मंत्र म्हणू लागला. त्याच वेळी एक प्रखर पांढरा प्रकाश देवयानीच्या माथ्यातून निघाला. त्या प्रकाशाने त्या राक्षसी सैन्याला एकाच जागी गोठवलं. गोठलेलं ते सैन्य पाहून वीरा आणि समर, काय झालं याचा विचारच करत होते, की देवयानीच्या छातीवर त्यांना अजून एक प्रखर प्रकाश दिसला. दोघांनी तिथे पाहिलं, तर तिथे देवयानीचा चेहेरा दिसत होता. देवयानी म्हणाली, “समर, माझ्या शक्ती पूर्ण ग्रहण करण्यासाठी हा दुराचारी मंत्रोच्चारण करत आहे. माझ्या शक्तींनी माझ्या पूर्ण शरीराचा पूर्ण ताबा त्याला दिलेला नाही. या शरीरात माझा काही अंश अजूनही शिल्लक आहे. हे युद्ध रोखण्यासाठी एकमेव उपाय आहे दुष्कीर्तीचा अंत, जो त्याच्याच त्या दैवी तलवारीने होऊ शकतो. त्वरा कर समर. या तलवारीला माझ्या हातून हिसकावून घे...”


देवयानीने
इतकं बोलायचा अवकाश, की समरने तिथेच पडलेल्या एका दानवाचा तुटलेला हात उचलून धनुष्यावर चढवला. निशाणा साधत त्याने प्रत्यंचा खेचली. धनुष्यातून निघालेल्या त्या हाताने आपला निशाणा चोख साधला आणि देवयानीच्या हाताला झटका दिला. ती दैवी तलवार जशी हवेत उडाली, तसे दुष्कीर्तीचे मंत्रोच्चार बंद झाले. दुष्कीर्ती काही करेल, त्याआधीच समरने हवेत कोलांटी उडी घेत ती तलवार पकडली. समरच्या हातात तलवार येताच देवयानीच्या शरीरातला दुष्कीर्ती गर्जना करू लागला, “नाहीऽऽऽऽऽ..." आणि काळ जसा स्तब्ध झाला. तलवारीला गुरफटलेला काळा धूर कमी होत गेला. तलवारीतून निघत असलेल्या लाल ठिणग्या बंद झाल्या आणि निळी प्रकाशकिरणं तलवारीतून निघू लागली. त्या निळ्या प्रकाशकिरणांनी जसा तलवारीला घेराव घातला, तसा तलवारीचा काळा रंग निघून गेला आणि तलवार पांढऱ्याशुभ्र प्रकाशात न्हाऊन निघाली...

स्तब्ध झालेला काळ पुन्हा पूर्ववत झाला. राक्षसी सैन्याची एक तुकडी जशी जवळ आली, समरने त्याच क्षणी तलवार चालवली. तलवारीच्या तडाख्याने ती तुकडी क्षणार्धात भस्मसाद झाली. हे पाहताच समरने तलवारीचे वार करायला सुरुवात केली. काही वेळातच संपूर्ण सैन्याचं भस्म झालं. हे पाहून दुष्कीर्ती अधिकच क्रोधीत झाला आणि म्हणाला, “क्षूद्र मानवा, माझी तलवार हस्तगत करून हे सैन्य संपवलंस म्हणजे तू विजयी झालास असं वाटतंय का तुला... मी आत्ताही अमर आहे, अजिंक्य आहे... हा...हा...हा...” इतकं बोलून दुष्कीर्ती पुन्हा मंत्रोच्चार करू लागला. त्याचवेळी देवयानीच्या छातीवर पांढरा प्रकाश दिसू लागला. त्यातून देवयानी म्हणाली, “समर, हीच ती वेळ, हाच तो क्षण. अवकाशातले ग्रह आणि नक्षत्र आपापल्या परमोच्च स्थानी पोहोचले आहेत. दुष्कीर्तीची तलवारी तुझ्या हाती आहे. कर वार... जाऊ देत ते पातं माझ्या छातीच्या आर-पार...” समर नकारार्थी मान हलवू लागला आणि मागे सरकू लागला. देवयानी पुन्हा म्हणाली, “समर, आठव ऋषी आदित्यनाथांचं ते वाक्य...”

दुविधेत सापडलेल्या समरने डोळे बंद केले आणि ऋषी आदित्यनाथांचं वाक्य त्याच्या कानात घुमू लागलं, “मोठ्या शक्तीसोबत मोठ्या बलिदानाचं मोलही द्यावं लागतं...” समरने डोळे उघडले. त्याने चारही बाजूंना नजर फिरवली आणि, “दुष्कीर्तीऽऽऽऽ...” असं ओरडत तलवारीसोबतच समरने हवेत उडी घेतली. दुष्कीर्तीचा मंत्रोच्चार सुरूच होता, की समरने ती तलवार देवयानीच्या छातीत खुपसली. मग पूर्ण ताकदीसह तलवार देवयानीच्या शरीराच्या आर-पार केली. विजेचा प्रचंड कडकडाट झाला आणि धरती कापू लागली. तलवारीसह देवयानीचं शरीर हवेत तरंगू लागलं आणि काळा धूर तिच्या शरीरातून निघून तलवारीत सामावला. तलवारीतून प्रखर निळा प्रकाश निघाला ज्यामुळे समर आणि वीरा दोघांचेही डोळे दिपले. दोघांनी हळूहळू डोळे उघडले. अंधार नष्ट झाला होता. चोहीकडे कोरीव काम केलेल्या सांगमरवरी भिंती होत्या आणि पणत्या ज्योतीर्मय झाल्या होत्या...

एका पलंगावर असलेल्या मखमली गादीवर देवयानी पाहुडली होती आणि बाजूलाच निळ्या प्रकाश किरणात गुरफटलेली ती दैवी तलवार हवेत तरंगत होती. समर आणि वीराने आधी एकमेकांकडे पाहून मग चारही बाजूंना नजर फिरवली. देवयानीला निपचित पडलेली पाहून साश्रू नायनांनी दोघं तिच्याजवळ पोहोचले. वीरा देवयानीला स्पर्श करणारच होती इतक्यात एक आवाज तिथे घुमू लागला, “धीर धरा पुत्रांनो. तुम्ही आता प्रकाशाच्या मंदिरात आहात. सर्वकाही क्षेम होईल...” वीरा आणि समरने आवाजाच्या दिशेने पाहिलं, तर तलवारीच्या बाजूलाच तीन तेजस्वी पुरुष उभे होते. तिघं एकत्र म्हणाले, “तुम्हा दोघांनी दाखवलेल्या अतुलनीय साहसामुळे आज दुष्कीर्तीचा अंत होऊ शकला. या युद्धात तुम्ही तुमच्या आप्तजनांना हरवून बसलात हे खरं आहे, पण सर्वात मोठं बलिदान दिलं या देवयानीने. दुर्जनांच्या विनाशासाठी तिने स्वत:च्या प्राणांची आहुती दिली. आणि म्हणूनच...” बोलता बोलता तिघांनी आपापला हात देवयानीच्या दिशेने केला. काही क्षणातच देवयानीने डोळे उघडले आणि ती उठून हात जोडून उभी राहिली...

देवयानी जिवंत आहे हे पाहून समर आणि वीरा दोघांनाही आनंद झाला. देवयानीकडे वळत ते तीनही महापुरुष म्हणाले, “देवयानी, मृत्यूलोकातलं तुझं कार्य पूर्ण झालं. आता तू देवलोकाकडे प्रस्थान कर. वीरा, तू एक सागरी लुटारू आहेस, पण दुष्कीर्तीसोबतच्या युद्धात तू तुझी सर्व पापं धुतली आहेस. तू आता एका राज्याची महाराणी होशील. तुझे इतर लुटारू साथीदार तुझी प्रजा आणि तुझे मंत्रीगण बनून तुझ्या आधीन असतील. समर, तू जो असामान्य पराक्रम दाखवला आहेस, त्यावर आम्ही प्रसन्न आहोत. मनाच्या शक्तीनुसार चालणारी ही तलवार दुष्कीर्तीच्या स्पर्शाने अपवित्र झाली होती. पण तुझा स्पर्श होताच तिला तिचं मूळ स्वरूप प्राप्त झालं. कारण तुझं मन शुद्ध आहे, निर्मळ आहे. म्हणूनच ही दिव्य तलवार तुला आम्ही भेट देत आहोत. ही तलवार जोवर तुझ्याजवळ असेल, तोवर तू अपराजित राहशील. कल्याणमस्तु...”

इतकं बोलून ते तीनही महापुरुष लुप्त झाले. समर आणि वीराकडे पाहत देवयांनी म्हणाली, “तुम्ही दोघांनी मला मोलाचं सहाय्य केलंत. त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. वीरा, उत्तरेला स्थित श्वेतांबर नावाचं राज्य आपल्या महाराणीची प्रतीक्षा करत आहे. योग्य रीतीने राज्यकारभार कर. समर, ज्या वनात आपली भेट झाली, तू त्या वनाचा अधिपती होशील. सर्व पशूपक्ष्यांची आणि वृक्ष-वल्लरींची भाषा तुला अवगत होईल...” देवयानी बोलत असतानाच पांढराशुभ्र प्रकाश देवयानीला गुरफटू लागला. हे पाहताच देवयानी म्हणाली, “माझं इथलं कार्य संपन्न झालं. आता मला प्रभूचरणी लीन व्हायला हवं. पण मी मूर्तीरूपाने याच मंदिरात विराजमान असेन...” प्रकाश वाढत गेला आणि पाहता पाहता देवयानी अंतर्धान पावली. जिथे देवयानी उभी होती, तिथे आता एक संगमरावरी सुंदर मूर्ती प्रकट झाली आणि पूर्ण देऊळ प्रकाशात न्हाऊन निघालं...”

समाप्त.

@ अनिकेत परशुराम आपटे.