Sunday, July 30, 2017

बालंट...

Welcome sir, welcome to this institute. आमच्या सर्वांतर्फे मी श्रीनिवास गोडबोले, सरस्वती कॉलेजचा वाईस प्रिंसिपॉल तुमचं मनापासून स्वागत करतो.” पुष्पगुच्छ देत गोडबोले सर आपटे सरांचं स्वागत करत म्हणाले. कॉलेजचे नवे प्रिंसिपॉल म्हणून आपटे सरांनी आजच सूत्र हाती घेतली होती. गोडबोले सर पुढे म्हणाले, “सर, इथला स्टाफ खूप मेहनती आहे शिवाय इथे शिकणारी मुलंही सुसंस्कृत, हुशार आणि creative आहेत. तुम्हाला तक्रारीला कधीच वाव मिळणार नाही बघा. उलट तुम्ही खूप एन्जॉय कराल इथे.” “या आधी मी गायकवाड कॉलेजमध्ये वाईस प्रिंसिपॉल होतो. ते कॉलेज तसं लहान होतं पण हे कॉलेजपण मोठं आहे आणि जबाबदारीसुद्धा. माझी खात्री आहे. तुम्ही सर्व मला मदत कराल, मला समजून घ्याल.” आपटे सर हसत म्हणाले. सर्वांची ओळख झाली, हस्तांदोलनं झाली आणि सर्व आपापल्या वर्गाकडे जाऊ लागले. “बापट सर, जरा थांबा.” आवाजाने बापट सर मागे वळले. आपटे सर म्हणाले, “मी मघापासून पाहतोय, तुम्ही गप्प गप्प आहात. तुम्हाला काही बोलायचं आहे का....” बापट सर थोडे गांगरले. म्हणाले, “त... तसं नाही सर. पण... तुम्ही इथे... क... काही नाही सर. आज तुमचा पहिला दिवस आहे. आपण नंतर बोलू.” पाठमोऱ्या बापट सरांना पाहत आपटे सर तसेच उभे राहिले...

दिवसभराचे काम संपले होते. कॉलेज सुटून सर्व विद्यार्थी आणि शिक्षक निघून गेले होते. आवरा-आवर करून आपटे सर निघणार इतक्यात जोराचा पाऊस सुरू झाला. पहिल्या दिवसाच्या घाईगडबडीत आपटे सर छत्री विसरून गेले होते. आता पाऊस थांबण्याची वाट बघण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. आपटे सरांनी विचार केला, “अनायसे इथे बसलोच आहोत तर या कपाटातल्या पुस्तकांचा आस्वाद घेऊ...” आपटे सर पुस्तक काढून वाचू लागले. वाचता वाचता ते इतके मग्न झाले की वेळेचं भानच उरलं नाही. जोराचा वारा आला आणि “खा.....ड......” खिडकी उघडली गेली. आपटे सर भानावर आले. त्यांनी घड्याळात पाहिले तर १०.३० झाले होते. बराच उशीर झालेला पाहून त्यांनी लगबगीने सर्व आवरले. खिडकी बंद करून ते बाहेर पडणार इतक्यात “खा.....ड......” खिडकीचं तावदान पुन्हा उघडलं गेलं. वाऱ्याच्या जोरदार झोतासरशी टेबलवर ठेवलेली घंटा खाली पडली. घंटा उचलायला सर खाली वाकले तर ती पुढे सरकून दाराबाहेर गेली. एका क्षणासाठी आपटे सर स्तब्ध झाले. त्यांनी विचार केला, “वाऱ्यामुळे झालं असेल बहुतेक...” त्यांनी खिडकी बंद करून कडी लावली आणि पुन्हा घंटा उचलायला गेले तर ती तशीच पुढे सरकत लॉबीमध्ये गेली. आता मात्र आपटे सर घाबरले. वारा नसताना घंटा पुढे कशी सरकली, हा विचार करत असताना पुन्हा घंटा पुढे सरकलेली पाहून आपटे सरांनी तिथून पळ काढला. त्यांच्या मनातमात्र शंकांनी थैमान घातलं, “खिडकी बंद केली असताना ती आपोआप कशी उघडली...? पहिल्यांदा घंटा वाऱ्यामुळे पडली... पण नंतर ती पुढे कशी सरकली... हे काहीतरी वेगळंच प्रकरण आहे... याचा छडा लावलाच पाहिजे...

दुसऱ्या दिवशी आपटे सरांनी त्यांच्या केबिनचे दार उघडले. पाहतात तर घंटा टेबलवर तिच्या जागी ठेवलेली. आपटे सरांनी घंटा उचलली, जरा उलट-सुलट केली आणि वाजवली. “साहेब, मला बोलावलंत...” आपटे सर घंटा पाहतच होते की शिपायाचा आवाज आला. अचंभित झालेले आपटे सर म्हणाले, “मी, नाही तर...” शिपाई लगेच म्हणाला, “साहेब, घंटा वाजवलीत ना...” आपटे सरांनी एकवार घंटेकडे पाहिलं. म्हणाले, “अरे घंटा खाली पडली धक्का लागून. म्हणून आवाज आला असेल. तू जा आणि बापट सरांना पाठवून दे...” शिपाई बाहेर गेला आणि आपटे सर घंटेकडे पाहत बसले. ती एक साधीच घंटा होती. घंटा न्याहाळत असताना, “सर, आत येऊ का...” बापट सरांचा आवाज आला. बापट सरांना पाहताच आपटे सरांनी त्यांना आत घेत दार लावले. म्हणाले, “बापट सर, माझ्या पहिल्या दिवशी आपण सर्व इथे जमलो होतो तेव्हा तुम्ही जरा अस्वस्थ होतात. काय झालं सर... काय सांगायचं होतं तुम्हाला...” बापट सर बराच वेळ शांत होते. धीर एकवटून म्हणाले, “सर, मी विचार करत होतो. तुम्ही जॉईन तर झालात पण किती दिवस इथे टिकू शकाल... नाही, तुम्हाला राग आला असेल तर माफ करा पण माझ्या म्हणण्याला एक कारण आहे सर. गेल्या चार वर्षात अनेक प्रिंसिपॉल आले, पण कोणीही १२-१५ दिवसांपेक्षा जास्त काळ राहू शकलं नाही इथे. सुरुवाती सुरुवातीला सर्व नॉर्मल असायचे पण हळू हळू ते बदलायचे. जणू कसल्यातरी भीतीच्या सावलीखाली राहत असत. आणि १२-१५ दिवसातच ते पळून जात. या सर्वांच्या भीतीचं कारण आम्हाला आजवर कळलं नाही. मी तर दोन वर्षांपूर्वी आलो इथे पण गोडबोले सर खूप जुने आहेत. कदाचित त्यांना काही माहित असल्याची शक्यता आहे.” बापट सर बोलायचे थांबले. आपटे सरांनी गोडबोले सरांना विचारायचे ठरवले पण त्या आधी या घंटेचं काय प्रकरण आहे ते शोधायचं त्यांनी मनाशी पक्कं केलं...

लेक्चर्स संपली. कॉलेज सुटलं. सगळे विद्यार्थी आणि शिक्षक आपापल्या मार्गाने गेले. आपटे सर तिथेच बसून राहिले. सात वाजले, नऊ वाजले, बघता बघता दहा वाजले तरीही काहीच घडत नव्हतं. आपटे सरांना खात्री होती. नक्कीच काहीतरी घडेल... आणि झालंही तसंच... अकराच्या सुमारास वाऱ्याची एक झुळूक त्यांच्या कानाला स्पर्शून गेली. आपटे सरांनी बसलेल्या खुर्चीचे दोन्ही हात घट्ट पकडले. पुन्हा आलेल्या वाऱ्याने टेबलवरची घंटा खाली पडली. आपटे सर लगेच उठले आणि घंटेमागे जाऊ लागले. लॉबीमधून घंटा पुढे सरकत जिन्यापर्यंत आली. आपटे सर मागे होतेच. त्यांच्या डोळ्यांदेखत घंटा हवेत उचलली गेली आणि अधांतरी उभी राहिली. ती पकडायला आपटे सर पुढे सरसावले. घंटा जिन्याच्या बाजूला असलेल्या कठड्यावरून सरकत वर जाऊ लागली. पाठलाग करत करत आपटे सर पाचव्या मजल्यावर आले. पाचव्या मजल्याच्या दारात पडलेल्या घंटेला सरांनी पायाने हलवले. काही हालचाल नाही झाली तेव्हा त्यांनी घंटा उचलली. अवती भोवती नजर फिरवली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की इथे खूप धूळ-माती आहे, जळमटांनी भिंती भरलेल्या आहेत. जणू काही बराच काळ हे वर्ग बंदच आहेत असं वाटत होतं. आपटे सर जसजसे पुढे जात होते तसतसे त्यांना हसण्याचे आणि “म....मला.... स....सो....डा....” असं कोणीतरी आर्ततेने ओरडत आहे असे आवाज येऊ लागले. आवाजांचा माग काढत आपटे सर पार शेवटपर्यंत गेले. शेवटी एक दार होते. त्याला “Police line do not cross” अशी पट्टी लावली होती पण इतर दारंमात्र साध्या कुलुपाने बंद केली होती. आपटे सरांनी त्या सीलबंद दाराला कान लावला आणि, “म....मला सो...डा... म....म्या....क....का....य.... ना....य....” असा विव्हळण्याचा आवाज आला. शिवाय “लटकवा त्याला पंख्याला....” असाही आवाज आला. आपटे सरांनी दार वाजवताच सर्व शांत झालं. त्यांना हा काय प्रकार आहे ते समजेना. या प्रकरणाच्या मुळाशी जायचंच असा त्यांनी निश्चय केला...

दुसऱ्या दिवशी लेक्चर्स सुरू होण्याआधी आपटे सरांनी बापट सरांना आणि गोडबोले सरांना बोलावले. ते म्हणाले, “मला जॉईन होऊन आज दोन दिवस झालेत. या दोन दिवसात मला इथे काही विचित्र घटनांचा अनुभव आला आहे. त्या घटनांचा आणि या घंटेचा काहीतरी संदर्भ आहे असं मला वाटतं. शिवाय आपलं कॉलेज इतकं चांगलं असताना पाचव्या मजल्यावरील वर्ग रिकामे का... बरं, रिकामे तर रिकामे, पण त्यातील एक वर्गाला पोलीसांची पिवळी पट्टी का लावली आहे... काय मामला आहे हा सारा... बापट सरांनी सांगितल्याप्रमाणे असेच काहीसे अनुभव इतर प्रिंसिपलांनाही आले होते मग त्याची दखल का घेतली गेली नाही... मला हे सगळं समजलं पाहिजे... गोडबोले सर तुम्ही तर फार जुने आहात ना इथे... मग सांगा मला...” गोडबोले सरांनी कोणी ऐकत तर नाही ना याची खात्री करून घेतली आणि ते बोलते झाले, “सर पाचव्या मजल्यावर ती कोपऱ्यातली खोली एकेकाळी आपली सायन्सची प्रयोगशाळा होती आणि त्याला पोलीसांनी सीलबंद केलं आहे. चार वर्षांपूर्वीची ही घटना आहे. आपल्या कॉलेजचा एक रामदास म्हणून शिपाई होता. तसा कामाला बरा होता पण त्याला कानाने फार कमी ऐकू यायचं. दहा वेळा बोलावलं की कुठे त्याला ऐकू जायचं. तेव्हाचे प्रिंसिपल मोरे साहेबांनी मग रामदासला बोलवायला म्हणून ही घंटा मागवली. पुढे शिपायाला बोलवायचं तर घंटा वाजवायची असा अलिखित नियमाच पडला. सगळं सुरळीत चालू होतं. एक दिवस अचानक रामदास गायब झाला. एका साध्या शिपायाला कोण शोधायला जातंय सर... असेल इथेच कुठेतरी असा विचार करत मोरे सरांनी त्याचा नाद सोडून दिला. पण मी त्याला शोधायला प्रयोगशाळेत गेलो तेव्हा पंख्याला लटकलेला रामदासचा मृतदेह सापडला. त्याच्या शर्टाच्या खिशात एक चिठ्ठी होती, ज्यावर लिहिलं होतं, “पैशासाठी मी हे कृत्य केलं... पण आता पकडला जाईन या भीतीपोटी मी स्वत:ला संपवत आहे...”

“काय... रामदासने आत्महत्या केली... पण का...” बापट सरांनी सवाल उठवला. गोडबोले सर बोलू लागले, “सांगतो. कॉलेजमध्ये एक मृत्यू झाला होता म्हणून पोलीसांना बोलावणं भाग होतं. त्यांनी तपास केला. रामदासच्या सामानाची आणि त्याच्या खोलीची झडती घेतली. त्यात त्यांना ड्रग्सचा साठा सापडला. उत्तर सोप्पं होतं. कॉलेजच्या आड रामदास ड्रग्सचा धंदा करत होता आणि पकडला जाईल या भीतीमुळे त्याने आत्महत्या केली. मोरे साहेबांच्या सांगण्यावरून पोलीसांनी केस फाईल बंद केली. पुन्हा कॉलेज नियमित सुरू झालं. पण दैवाच्या मनात काही वेगळंच होतं. पुढच्या काही दिवसात कॉलेजचे सायन्सचे प्रोफेसर डिसिल्वा आणि रामदास सोबतचा शिपाई चतुर्वेदी, हे दोघं एकाएकी गायब झाले आणि त्यांचे मृतदेह त्याच प्रयोगशाळेत तसेच लटकलेले सापडले. मोरे साहेबांनी या प्रकरणाचा धसका घेतला आणि त्यांनी कॉलेजमधून पळ काढला. महिन्याभराने त्यांचा राजीनामा पोस्टाने आम्हाला मिळाला. प्रोफेसर डिसिल्वा आणि शिपाई चतुर्वेदी यांच्या मृत्युचं कारण शोधण्याचा पोलीसांनी आटोकाट प्रयत्न केला पण त्यांच्या हाती काही लागलं नाही. शेवटी त्यांनी प्रयोगशाळा बंद केली आणि ही पट्टी लावली. प्रोफेसर डिसिल्वा आणि चतुर्वेदी यांचा मृत्यू कसा झाला हे आजही आम्हाला कळू शकलेलं नाही.” गोडबोले सर गप्प झाले. बापट सर आणि आपटे सर स्तब्ध उभे होते. लेक्चर्सची वेळ झाली तसे गोडबोले सर आणि बापट सर आपापल्या वर्गाकडे गेले. आपटे सर विचार करू लागले, “गोडबोले सर म्हणत होते रामदासने आत्महत्या केली. का... तर तो करत असलेल्या ड्रग्सच्या वाईट व्यवसायामुळे. असं जर आहे तर ती घंटा मला त्याच प्रयोगशाळेकडे का घेऊन गेली... शिवाय ते आवाज, “मला सोडा... मी नाही...” नाही, दिसतं तसं हे सगळं सरळ नाही... काहीतरी वेगळा प्रकार आहे हा. मला शोधून काढायलाच हवं... मोरे साहेबांच्या वेळेपासून पाचव्या मजल्यावरच्या त्या खोल्या बंद आहेत म्हणजे त्यांच्या चाव्या याच खोलीत असायला हव्यात.” असं म्हणत आपटे सरांनी खोलीत शोधाशोध केली. टेबलातले सारे खाण, कपाट सगळं शोधत असताना कपाटातल्या आतल्या खणात ठेवलेला किल्ल्यांचा एक जुडगा त्यांच्या हाती लागला. त्यांनी मोजल्या तर ८ किल्ल्या होत्या. त्यांचं विचारचक्र पुन्हा सुरू झालं, “आठ चाव्या... पाचव्या मजल्यावर सात वर्ग आणि एक प्रयोगशाळा, म्हणजे बरोब्बर आठ वर्ग आहेत. या चाव्या पाचव्या मजल्याच्या तर नसतील... जाऊन बघायला हवं. पण आत्ता जाण्यापेक्षा संध्याकाळी जाऊ. ते जास्त योग्य ठरेल...”

दिवसभराचं कामकाज संपलं. लेक्चर्स संपवून प्रोफेसर्स आणि विद्यार्थी आपापल्या वाटेने निघून गेले. सर्वत्र सामसूम झाल्यावरही आपटे सर बराच वेळ केबिनमध्येच बसून राहिले. साधारण दहा वाजता ते उठले आणि दबकत दबकत पाचव्या मजल्यावर पोहोचले. त्यांनी पाचव्या मजल्यावर प्रवेश केला आणि त्यांना ऐकू येणारे आवाज पुन्हा सुरू झाले, “म....मला सो...डा... म....म्या....क....का....य.... ना....य....”, “लटकवा त्याला पंख्याला....” आपटे सर थोडे घाबरले पण धीर करून ते प्रयोगशाळेजवळ आले. आवाज वाढतच चालले होते. पोलीसांनी लावलेल्या पट्टीला धक्का न लावता त्यांनी आणलेल्या जुडग्यातली एकेक चावी वापरत शेवटी त्यांनी कुलूप उघडले. दाराची कडी काढताच सर्व आवाज एकाएकी बंद झाले. आपटे सरांनी दार ढकलले तर, “कर्रर्रर्रर्र.....” असा आवाज करत ते उघडले. आतून रसायनांचा कुबट वास येत होता शिवाय मिट्ट काळोख मी म्हणत होता. आपटे सरांनी सोबत आणलेला torch उघडला आणि सगळीकडे नजर फिरवली. प्रयोगशाळा तशी लहानखोरच होती. मधोमध ठेवलेली चार टेबलं, भिंतींना धरून उभी केलेली विविध सामग्रीने भरलेली काचेची कपाटं आणि मोठा आरसा असलेलं एक भलं मोठं लोखंडी कपाट, याखेरीज तिथे काहीच नव्हतं. आपटे सर सर्व न्याहाळत असताना वाऱ्याची एक झुळूक त्यांच्या कानाला स्पर्श करून गेली...

आपटे सर दचकले. त्यांनी आजूबाजूला पाहिले पण कोणीच दिसेना. शेवटी दीर्घ श्वास घेऊन ते म्हणाले, “रामदास, याच खोलीत तुझा मृत्यू झाला असला तरी मला माहित आहे, तू अजून इथेच आहेस... तू मला बोलावलंस... हा मी तुझ्यासमोर उभा आहे... सांग मला काय झालं तुझ्यासोबत... रामदास... रा....” आपटे सर बोलतच होते की एका लख्ख प्रकाशझोताने त्यांचे डोळे दिपले. डोळे किलकिले करून त्यांनी पाहिलं तर समोरच्या आरशातून हा प्रकाश येत होता. आपटे सर जसजसे आरशाजवळ जाऊ लागले तसतसा प्रकाश कमी होत गेला. आता आपटे सर आरशासमोर उभे होते. प्रकाश पूर्ण नाहीसा झाला होता. आपटे सरांनी आरशात पाहिलं तर त्यांच्या प्रतिबिंबाच्या बाजूला एक धुराचा ढग तयार झाला. तो ढग नाहीसा झाला आणि शिपायाचा गणवेष परिधान केलेला, डोळे बाहेर आलेला, गळ्याभोवती दोर अडकवलेला एक इसम आपटे सरांना दिसला. त्याच्या चेहऱ्यावर चोर, गुन्हेगार, असे लिहिले होते. आपटे सरांनी बाजूला पाहिले तर कोणीच नव्हते. त्यांनी पुन्हा आरशात पाहिले तर तोच इसम शांत उभा होता. “रामदास... तू रामदास आहेस ना...” आपटे सर आरशाकडे बोट दाखवत म्हणाले. आरशातल्या त्या माणसाने हात वर उचलला आणि सर्वत्र धुराचं वलय तयार झालं. काळ चार वर्ष मागे गेला...

“रामदास... अरे ए रामदास... ए राम्या...” मोरे सर केबिनमधून बोंबा मारत होते. शेवटी एकदाचा रामदास उगवला. मोरे सर थोडे चिडलेलेच होते. म्हणाले, “अरे बहिऱ्या, किती हाका मारायच्या रे तुला... घसा फुटेल की माझा...” रामदास जरा ओशाळला. म्हणाला, “सायेब, आवं पोरांच्या कल्ल्यापाई काय बी ऐकू येत न्हाई बगा... न आता वयसुदिक जालं न्हवं माजं... कवा कवा ह्यो कान दगा देतुया बगा... एक डाव माफी करा...” मोरे सर लगेच म्हणाले, “तुझ्या कानासाठी उपाय शोधला आहे मी. ही बघ घंटा. आता निदान हिचा आवाज तरी तुझ्या कानी पडेल...” घंटा पाहत रामदास आनंदला. म्हणाला, “हे बाकी लई झाक केलं बगा तुम्मी... आता कवा बी बोलवा... अस्सा ईन म्या...” रामदासला मध्येच थांबवत मोरे सर म्हणाले, “बरं बरं... जा आता...” रामदास बाहेर पडला तर समोरच गोडबोले सर दिसले. ते म्हणाले, “अरे रामदास... बरं झालं इथेच भेटलास... हे बघ सोमवारी सकाळी प्रयोगशाळेत परीक्षा आहे. त्याची तयारी तू आजच करून ठेव. हवं तर चतुर्वेदीला घे मदतीला... जा लवकर...” गोडबोले सर त्यांच्या वाटेने निघून गेले. “प्रिक्षा सोमवारी सकालच्या परी हाय न्हवं... मंग आत्ता कशापाई येल घालवा... कालिज तर संपलंच हाय... निवांत ज्यावन करू, झोप काढू आन सांच्याला करू तयारी.” असा विचार करत रामदास त्याच्या खोलीकडे वळला. वाटेत त्याला चतुर्वेदी भेटला. “कुठे निघालास रामू...” त्याच्या सवालाला रामदास उत्तरला, “खोलीवर जातुया... आरं गोडबोले सरांनी परयोगशालेत तयारी कराया सांगितलं हाय न्हवं, जरा ज्यावन करून आराम करून मंग करतुया... कसं... आन तू बी ये बरं का सांच्याला....” रामदास खोलीवर पोहोचला. जेवणाला सुरुवात करणार इतक्यात चतुर्वेदी बाटली घेऊन तिथे आला. म्हणाला, “अरे रामू... शनिवार आहे आज... सोमवार सकाळपर्यंत वेळ आहे आपल्याला... चल तोवर मारुया थोडी थोडी...” रामदासने आधी आढेवेढे घेतले पण नंतर तयार झाला. दोघंही खोलीत बसले. दारूच्या नशेने दोघांना झोप येऊ लागली. पाऊस पडू लागला. वाऱ्याच्या झटक्यासरशी भांडी खाली पडली आणि रामदासला जाग आली. बाहेर पाहिले तर अंधार झाला होता. रामदासला तयारी करायचं आठवलं. तो तडक उठला. कॉलेजच्या आवारात पोहोचला तेव्हा पाचव्या मजल्यावर त्याला प्रकाश दिसला. चतुर्वेदी असेल म्हणून रामदासही वर आला...

दार ढकलताच त्याला डिसिल्वा आणि चतुर्वेदी दिसले. टेबलवर बऱ्याच पुड्या पडल्या होत्या. काही क्षण रामदासला काहीच कळलं नाही. त्याने समोर पडलेल्या पुढ्यातली एक फाटलेली पुडी उचलली आणि नाकाजवळ नेली. त्याला वासाने कळमळायला लागलं. त्याने त्यातली थोडी पावडर चाखली आणि त्याचे डोळे विस्फारले. “गर्द... तुम्ही दोघं हितं गर्द बनवता... म्या तुम्मास्नी न्हाय सोडणार... आत्ताच पोलीसासनी घेऊन येतू...” असं म्हणत रामदास बाहेर आला. डिसिल्वा आणि चतुर्वेदी त्याच्या मागे धावणार तोच त्याने खोलीचं दार बंद केलं आणि कडी लावली. अंधारात चाचपडत रामदास खाली येत असताना मोरे सरांशी त्याची टक्कर झाली. “अरे अरे रामदास जरा हळू... कुठे पळतो आहेस...” स्वत:ला सावरत मोरे सर म्हणाले. रामदास लगेच उत्तरला, “सायेब... बरं जालं तुम्मी भेटलासा... त्यो डिसिल्वा न त्यो चतुर्वेदी हितं गर्द बनवत हायेत... म्या सवताच्या डोळ्यांनी बगितलं... म्या पोलीसासनी बोलवाया चाललू बगा... तुम्मी बी चला...” “अरे हो हो... जाऊया पण आधी मला तर दाखव... अरे पुरावे नकोत का... चल... बघू...” असं म्हणत मोरे सर रामदासला घेऊन प्रयोगशाळेकडे गेले. दार उघडून दोघं आत गेले. “अरे रामदास, कोण आहे इथे... आणि कसली गर्द...” हे बोलत असतानाच डिसिल्वा आणि चतुर्वेदी टेबलाखालून बाहेर आले. रामदास त्यांना पाहून मोरे सरांना खेटून उभा राहिला. म्हणाला, “बघलास सायेब... ही दोघं हितंच हायेत... न या बगा गर्दच्या पुड्या...” “बरोबर आहे तुझं रामदास... यांनी चूकच केली आहे... काय रे, या पुड्या अशा का ठेवल्यात... अरे इतकी महत्वाची गोष्ट अशी उघड्यावर ठेवायची का... मूर्ख कुठले... नशीब हा रामदास माझ्या हाती लागला... पोलीसांपर्यत पोहोचला असता तर काय झालं असतं आपलं... आता बघताय काय... धरा याला...” असं म्हणून बाजूलाच उभ्या असलेल्या रामदासला मोरे सरांनी डिसिल्वा आणि चतुर्वेदीकडे ढकललं. काही समजण्याच्या आत डिसिल्वा आणि चतुर्वेदीने रामदासला पकडून त्याचा गळा आवळला. आधीच हाडकुळ्या असलेल्या रामदासने, “म....मला सो...डा... म....म्या....क....का....य.... ना....य....” असं केविलवाण्या आवाजात ओरडत प्राण सोडले...

“मेला वाटतं हा... पण हा इथे आला कसा... काय रे चतुर्वेदी... तू तर बोललास रामदास झोपला म्हणून...” मोरे सर चरफडत म्हणाले. चतुर्वेदीने रामदासच्या देहाला लाथ मारली आणि म्हणाला, “साहेब, गोडबोले सरांनी याला प्रयोगशाळा तयार करायला सांगितली आणि हा माझ्याकडे आला. याला आपला धंदा कळू नये म्हणून बाटलीतून थोडीशी अफू मी याला पाजली. मला वाटलं गप गार पडेल सकाळपर्यंत. पण कसलं काय... उठला की हा...” डिसिल्वाने रामदास मेल्याची पुन्हा खात्री केली आणि म्हणाले, “सर रामदास मेला आहे. पण आता काय करायचं. प्रेताची विल्हेवाट कशी लावायची... कोणी पाहिलं तर...” मोरे सरांनी थोडा विचार केला. बाजूला पडलेल्या कागदावर काहीतरी खरडलं आणि तो कागद रामदासच्या शर्टाच्या खिशात टाकला. ते म्हणाले, “अरे विचार कसला करताय... ही तर आपल्याला मिळालेली संधी आहे... याच्या गळ्यात दोर अडकवून लटकवा त्याला पंख्याला. ते स्टूल इथे खाली आडवं पाडा आणि चतुर्वेदी, एक काम कर. यातल्या थोड्या पुड्या रामदासच्या खोलीत लपवून ठेव. दाराला कडी लावू नका. आता बघाच, करून सावरून आपण निराळे राहू आणि नाव खराब होईल या रामदासचं.” सोमवारी सकाळी गोडबोले सर रामदासला शोधत मोरे सरांकडे आले. “काय झालं गोडबोले सर. इतके का त्रासिक दिसताय...” काही ठाऊक नसल्याचा आवं आणत मोरे सर म्हणाले. गोडबोले सर थोडे बेचैन दिसत होते. म्हणाले, “अहो काय सांगू सर तुम्हाला. मी या राम्याला प्रयोगशाळेत तयारी करायला सांगितली होती. पण याचा कुठे पत्ताच नाही. बरं सकाळपासून मला रिपोर्टसुद्धा केला नाही त्याने. कुठे उलथलाय कोणास ठाऊक...” “अहो काल रविवार होता ना, असेल इथेच कुठेतरी... तुम्ही जाऊन प्रयोगशाळेत बघा बरं... कदाचित त्याने तयारी करून ठेवली असेल...” मोरे सर शांतपणे म्हणाले पण मनातून मात्र ते आनंदले होते. गोडबोले सर प्रयोगशाळेकडे गेले. पाहिले तर दरवाजा उघडा होता. त्यांनी दार ढकललं आणि समोरचं दृश्य पाहून त्यांची पाचावर धारण बसली. रामदासचा देह पंख्याला लटकलेला होता. गोडबोले सरांनी जोरदार किंकाळी फोडली...

इंस्पेक्टर वाघ पोलीस कुमक घेऊन घटनास्थळी पोहोचले. रामदासचा देह खाली उतरवला गेला. वाघांना खिशात चिठ्ठी सापडली. त्यांनी ती वाचली, “पैशासाठी मी हे कृत्य केलं... पण आता पकडला जाईन या भीतीपोटी मी स्वत:ला संपवत आहे...” आजूबाजूला पडलेल्या पावडरचा त्यांनी वास घेतला. हवालदाराला ताबडतोब रामदासच्या खोलीची झडती घ्यायला पाठवलं. काही क्षणातच हवालदार तीन-चार पुड्या घेऊन आला. इंस्पेक्टर वाघांनी मोरे साहेबांना सांगितलं, “मिस्टर मोरे, its an open and shut case. हा तुमचा शिपाई रामदास, कॉलेजच्या आड drug trafficking करायचा. ही आजूबाजूला पडलेली पावडर ब्राऊन शुगर आहे. शिवाय या पुड्या आणि ही चिठ्ठी... पुरावे तुमच्या सामोर आहेत. काय करायचं बोला...” मोरे सरांना आयतंच कोलीत मिळालं होतं. ते लगेच म्हणाले, “साहेब, हे जर बाहेर समजलं तर कॉलेजची खूप बदनामी होईल. तुम्ही ही केस बंद करा.” हे ऐकताच पोलीसांनी गाशा गुंडाळला आणि ते मार्गस्थ झाले. मोरे सरांच्या केबिनमध्ये मोरे, डिसिल्वा आणि चतुर्वेदीने एकमेकांना विजयी आनंदाने टाळ्या दिल्या. त्याच रात्री डिसिल्वा आणि चतुर्वेदी त्याच्याच खोलीत पीत बसले होते. इथे मोरे सरमात्र बचैन होते. ते विचार करू लागले, “हे संकट तर टळलं पण पुढे असं परत होणार नाही कशावरून... तो डिसिल्वा आणि चतुर्वेदी दोघं तद्दन मूर्ख आहेत. त्यांच्यामुळे अजून कशात अडकण्यापेक्षा हाताशी असलेले पैसे आणि ड्रग्स घेऊन इथून निघून गेलं तर...” मोरे सरांनी होतं नव्हतं ते सगळं सामान गोळा केलं आणि ते रात्रीच पसार झाले. इकडे बराच वेळ पार्टी झोडल्यावर डिसिल्वा परत निघाले तर त्यांना प्रयोगशाळेत प्रकाश दिसला. त्यांनी वर जाऊन पाहिलं तर आत कोणीच नव्हतं. ते परत फिरणार इतक्यात दार बंद झालं. आता डिसिल्वा सर घाबरले. वाऱ्याची एक झुळूक त्यांच्या कानाला चाटून गेली. त्यांनी मागे पाहिलं तर त्यांच्यापासून इंचभर लांब उभा असलेला रामदास त्यांना दिसला. भीतीने त्यांची गाळणच उडाली. जोरदार किंकाळीने चतुर्वेदीला जाग आली. त्याने कॉलेजच्या अंगणात येऊन कानोसा घेतला. प्रयोगशाळेतला प्रकाश पाहून तो अवाक झाला. तो वर पोहोचला आणि लांबूनच त्याने आवाज दिला, “कोण आहे तिथे...” “अरे चतुर्वेदी, इकडे ये. हे बघ काय...” आतून डिसिल्वा सरांचा आवाज ऐकून चतुर्वेदी लगेच तिथे गेला...

डिसिल्वा सरांची अवस्था पाहून त्याच्या तोंडातून शब्द फुटेना. रामदासप्रमाणेच त्यांचाही मृतदेह पंख्याला लटकलेला होता. त्यांच्या गळ्यातील दोराची एक बाजू वाढत जाऊन चतुर्वेदीच्या गळ्याभोवती गुंडाळली गेली. चतुर्वेदी हवेत उडवला गेला. फास त्याच्या गळ्याभोवती आवळत चालला होता. तो मारणार हे उघड होतं. त्याने प्रयत्नांची शर्थ केली. आचके देत असताना त्याला समोर उभा असलेला रामदास दिसला. त्याही अवस्थेत चातुर्वेदीचे डोळे विस्फारले आणि तो गतप्राण झाला. दुसऱ्या दिवशी विद्यार्थी आपापल्या वर्गाकडे जात असताना काहींचे लक्ष सहज प्रयोगशाळेकडे गेले. उघडे असलेले दार आणि पंख्याला लटकलेले दोन मृतदेह त्यांनी पाहिले आणि एकच गोंगाट झाला. गोडबोले सर आणि इतर मंडळी तिथे आली. मोरे सरांना बोलवायचे म्हणून ते केबिनजवळ आले तर तिथे एक चिठ्ठी होती. लिहिलं होतं, “रामदासच्या मृत्यूने मी खूप दुखावलो गेलो आहे. त्यामुळे मी हे शहर सोडून जात आहे. माझा राजीनामा मी नंतर पाठवून देईन. पोलीस तपास पुन्हा सुरू झाला. इंस्पेक्टर वाघांच्या हाती याही वेळी काही लागलं नाही. त्यांनी प्रयोगशाळा सील केली. विद्यार्थीही आता पाचव्या मजल्यावर जायला घाबरायला लागल्याने गोडबोले सरांनी शेवटी तिथल्या सर्व खोल्यांना कुलूप घातलं...

आरशात पुन्हा धूर दिसू लागला. काळ पुन्हा परत आला होता. हे सगळं पाहून आपटे सर स्तब्ध झाले. त्यांना काहीच सुचत नव्हतं. ते विचार करू लागले, “म्हणजे रामदासची हकीगत जी सर्वांना माहित आहे त्याला हाही एक पैलू होता... विश्वासच बसत नाही माझा... नाही... सत्याला वाचा फुटलीच पाहिजे... इंस्पेक्टर वाघांची भेट घ्यायला हवी. खऱ्या गुन्हेगाराला शासन व्हायलाच हवं...” दुसऱ्याच दिवशी आपटे सर इंस्पेक्टर वाघ यांना भेटले. वाघांनी सगळं ऐकून घेतलं. ते म्हणाली, “मिस्टर आपटे, तुम्ही जे सांगताय त्यात तथ्य असेलही... मिस्टर डिसिल्वा आणि चतुर्वेदीचे मृतदेह त्याच अवस्थेत सापडणं, मोरे सरांचं गायब होणं, यात काहीतरी गडबड आहे हे मला जाणवलं होतं. पण साहेब, कायदा पुरावा मागतो. असंतुष्ट आत्मा, अपुरी इच्छा, असल्या गोष्टी म्हणजे न्यायदेवतेला भाकड कथा वाटतात. हा... पण मिस्टर मोरे जर सापडले तर काहीतरी करता येईल. या कामात तुम्हाला लागेल ती मदत मी करेन...” आपटे सरांनी ताबडतोब कॉलेजला येऊन बापट सर आणि गोडबोले सरांची भेट घेतली. त्यांना सर्व हकीगत सांगितली. ते म्हणाले, “गोडबोले सर, तुम्हाला प्रयोगशाळेत जाऊन बघायला कोणी सांगितलं... मोरे सरांनीच ना... तुम्ही म्हणालात रामदासने लिहिलेल्या चिठ्ठीत, “पैशासाठी मी हे कृत्य केलं... पण आता पकडला जाईन या भीतीपोटी मी स्वत:ला संपवत आहे...” असं लिहिलं होतं. सर, जो माणूस स्वत: अशुध्द बोलतो तो शुद्ध भाषेत चिठ्ठी कसा लिहील...” गोडबोले सर हे ऐकून गडबडले. म्हणाले, “या गोष्टीचा विचारच नाही केला मी. पण आता...” आपटे सरांनी थोडा विचार केला आणि म्हणाले, “गोडबोले सर, तुम्ही म्हणालात मोरे सरांचा राजीनामा पोस्टाने आला. त्यावरचा शिक्का सांगू शकेल मोरे सर कुठे गेले. तिथे चौकशी केली तर... आणि या कामात इंस्पेक्टर वाघ आपली मदत करतील कारण त्यांनाही तेच वाटतं आहे जे माझ्या मनात आहे पण त्यांचे हात कायद्याने बांधले आहेत.” तिघांनाही हा विचार पटला आणि इंस्पेक्टर वाघांना आपटे सरांनी फोन लावला...

इंस्पेक्टर वाघांनी शोधाशोध केली आणि समजलं की मोरे नागपूरला आहेत. त्यांचा नंबर मिळवून वाघांनी आपटे सरांना दिला. मोरेला इथे कसं बोलवावं याचा विचार ते करत होते. त्यांना काहीतरी सुचलं आणि आपटे सरांनी संपर्क साधला आणि आवाज बदलून म्हणाले, “Hello, मोरे, मी डिसिल्वा बोलतो आहे. तुझा नंबर कसा मिळाला ते महत्वाचं नाही. चार वर्षांपूर्वी आम्हाला तसाच सोडून पळून गेलास ना... तुझ्यासाठी खुशखबर आहे... पोलीसांना सुगावा लागला आहे... उद्या रात्री साडे दहा वाजता सरस्वती कॉलेजला मला भेट नाहीतर पोलीसांना सगळं सांगेन आणि तुझा पत्ताही देईन...” फोन बंद झाला. रात्रीचे अकरा वाजले होते. कॉलेजच्या गेटजवळ एक आकृती दिसली. ते मोरे सर होते. त्यांच्या हातात एक जाडजूड काठी होती. मोरे सर आवारात आले. सर्वत्र सामसूम आहे पाहून जरा अचंभित झाले. इकडे तिकडे पाहत असताना, “या या मिस्टर मोरे, स्वागत आहे तुमचं...” या आवाजाने ते दचकले. आवाज डिसिल्वाचा वाटला. त्यांनी पाहिले तर आपटे सर समोरून चालत येत होते. मोरे सर म्हणाले, “तुम्ही... डिसिल्वाचा आवाज काढून तुम्हीच बोलत होता ना... कोण आहात तुम्ही... हा काय प्रकार आहे...” आपटे सर म्हणाले, “मी देवेंद्र आपटे, या कॉलेजचा प्रिंसिपल. तुम्हाला इथे बोलवायचं म्हणून हा सगळा डाव रचला आहे. आठवतंय का चार वर्षांपूर्वी तुम्ही काय केलं होतंत ते... का तुमच्या सैतानी मेंदूने त्याही आठवणी पुसून काढल्या...” आपटे सर भडकलेले पाहून मोरे सर हसले. म्हणाले, “आठवतंय तर... कसा विसरेन मी... आणि तुम्ही मला इथे बोलावलं आहे म्हणजे तुम्हाला सगळं समजलं आहे तर... मग तुम्हाला कसा सोडणार मी... तुम्हाला काय वाटलं... माझ्यासारखा निर्ढावलेला माणूस एकटाच येईल... मागे पहा... माझी माणसं तुमच्या समाचारासाठी सज्ज आहेत...” आपटे सरांनी मागे पाहिलं आणि मोरे सरांनी त्यांच्या हातातल्या काठीने आपटे सरांच्या डोक्यात वार केला. आपटे सर कोसळले. “चला आपटे सर. तुम्हालाही रामदासच्या वाटेने स्वर्गात पाठवतो...” असं म्हणत मोरे सर बेशुद्ध असलेल्या आपटे सरांना ओढू लागले...

ते पाचव्या मजल्यापर्यंत पोहोचले. तिथून ते आपटे सरांना खाली टाकणार इतक्यात वाऱ्याची झुळूक त्यांना स्पर्शून गेली. मोरे सर गडबडले. आपटे सर त्यांच्या हातून निसटले पण ते हवेत अधांतरीच राहिले. हळू हळू ते खाली येऊन जमिनीवर ठेवले गेले. हे पाहून मोरे सरांनी डोळे विस्फारले. पुन्हा वाऱ्याची झुळूक त्यांना स्पर्श करून गेली. त्यांनी मागे पाहिलं तर हवेत एक घंटा अधांतरी उभी होती. ती घंटा तीव्र वेगाने मोरे सरांवर आदळली. मग घंटेने सटासट मोरे सरांवर वर केले. त्यांचा चेहरा रक्ताने माखला होता. आपटे सरांना शुद्ध आली. त्यांनी पाहिलं तर प्रयोगशाळेचं दार उघडलं गेलं आणि जोरदार लाथ बसावी तसे मोरे सर हवेत फेकले जाऊन प्रयोगशाळेत पडले. आपटे सर ताबडतोब उठले आणि प्रयोगशाळेकडे धावले. घंटेच्या वारांनी मोरे सर अर्धमेले झाले होते. आपटे सर म्हणाले, “थांब रामदास... याला मारलंस तर तू कधीच निर्दोष ठरणार नाहीस. याला त्याच्या कृत्याची कबुली देऊ दे...” मोरे सर हवेत उडाले. दोराचा फास झाला आणि त्यांची मान त्यात अडकवली गेली. आपटे सर म्हणाले, “नीच माणसा, डिसिल्वा आणि चातुर्वेदीने तर फक्त रामदासचा खून केला पण खरा गुन्हेगार तूच आहेस... तू रामदासला आयुष्यातून उठवलंस. त्याच्या कुटुंबाची काय दशा झाली असेल... काबूल कर तुझं कृत्य...” आधीच घाबरलेल्या मोरे सरांनी लगेच बोलायला सुरुवात केली, “मी कबूल करतो रामदासवर खोटा आळ माझ्यामुळे आला. खरा गुन्हेगार मीच आहे. मीच ड्रग्स विकत होतो आणि डिसिल्वा आणि चतुर्वेदी माझी मदत करत होते. रामदासने आम्हाला ड्रग्ससकट पाहिलं म्हणून आम्ही त्याला संपवलं आणि ड्रग विक्रीचा व्यवसाय तोच करतो असं भासवलं...”

पोलीस लगेच आत आले. मोरे सर खाली कोसळले. इंस्पेक्टर वाघ त्याला घेऊन निघून गेले. आपटे सर सुद्धा निघायच्या बेतात होते की एक प्रकाशझोत त्यांच्यावर आला. त्यांनी पाहिलं तर आरशात रामदास होता. आता त्याचा चेहरा पूर्ण स्वच्छ दिसत होता. त्याने आपटे सरांना हात जोडले. खऱ्या गुन्हेगाराला शिक्षा होऊन रामदासवरचं बालंट दूर झालं होतं...

समाप्त.

Saturday, July 15, 2017

कचरेवाली...

रविवार सकाळचे नऊ वाजले होते. गरमागरम उपम्यावर ताव मारत वरूण टि.व्ही पाहत बसला होता. त्याची अडीच वर्षाची मुलगी सायली बाजूला खेळत होती. शांतपणे चहा-नाश्ता चालला असताना बेल वाजली. "कोण आलं सकाळी तडमडायला..." असं म्हणत वरूणने दार उघडलं. समोर एक भला मोठा ड्रम ठेवला होता आणि बाजूलाच एक बाई केर काढत होती. ती कचरा गोळा करणारी बाई आहे हे शेंबडं पोर देखील ओळखेल. वरूणच्या बायकोने सुजाताने आवाज ऐकला होताच. तिने पटकन आतून कच-याचा डबा आणून समोर ठेवला...

त्या बाईसोबत 8-9 वर्षाची एक मुलगी होती. सायलीला ही ताई आवडली. तिने लगेच तिच्या जवळची बाहुली त्या ताईला खेळायला दिली. त्या मुलीलाही छोटीशी गोंडस सायली खूप आवडली होती. दोघीही खेळू लागल्या. त्या दोघींना खेळताना पाहून सुजाता धावत आली. "अहो, सायू लहान आहे. तिला एक कळत नाही पण तुम्हाला नको समजायला...!!!" ती वरूणवर कडाडलीच. वरूण शांत होता पण सुजाता बोलतंच राहिली, "अहो ती कचरेवालीची पोर किती कळकट आहे बघा. ती कचरेवालीही कुठून कुठून हिंडून आली असेल, तिचीही घाण लागेल की सायूला..."

सुजाता बोलायची थांबली. इतका वेळ शांत असलेला वरूण बोलता झाला, "कचरेवाली... कोण कचरेवाली...!! सुजू, आपण आपल्या घरात कचरा साठवतो. तो जास्त दिवस राहून घरात व परिसरात घाण होऊ नये, आजारपणं येऊ नयेत म्हणून हे लोक आपल्या घरातून सर्व कचरा घेऊन जातात. जाताना झाडलोट करून परिसर स्वच्छ करतात. आता मला सांग, कोण कचरेवाले...!!! ते की आपण... आणि ती मुलगीही माणूसंच आहे ना. तिलाही वाटत असेलंच की, आपल्याशीही कोणी खेळावं, आपल्यालाही अशा बाहुल्या मिळाव्यात... कुठे चुकलं तिचं..."

वरूण शांत झाला. सुजाताला तिची चूक समजली. "खरंतर आपण कचरेवाले आणि ही मंडळी सफाईवाले म्हणून ओळखली जायला हवीत. कारण कचरा आपण करतो आणि ते साफ करण्याचं काम ही मंडळी करत असतात. तरी कचरेवाले म्हणून त्यांना हिणवले जाते. त्यांना काय वाटत असेल याचा विचारदेखील येत नाही मनात..." हे विचार सुजाताच्या मनात घोळत असताना ती बाई जायला निघाली. त्या मुलीने सायलीला बाहुली परत केली. सुजाता पुढे झाली. तिने ती बाहुली त्या मुलीला दिलीच, शिवाय सायलीसाठी आणलेल्या खाऊमधून थोडासा दिला. त्या बाईच्या आणि तिच्या मुलीच्या चेह-यावर स्मितहास्य उमटले. सायलीला टाटा करत दोघी समाधानाने निघून गेल्या...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Wednesday, July 12, 2017

Good Evening...

"आता तर हद्दंच झाली. कसा काय तुझ्याशी संसार करणार आहे, देवंच जाणे..." अजय रीमाला म्हणाला आणि तणतणत बाहेर निघून गेला. तो इतका रागावला होता की मागून येणारे रीमाचे हुंदकेही त्याला ऐकू आले नाहीत. चालत चालत अजय एका बागेजवळ आला. संध्याकाळचे पाच वाजले होते त्यामुळे बाग ब-यापैकी गजबजली होती. अजय कोप-यातल्या एका सिंगल बाकड्यावर जाऊन बसला...

समोरच्या बाकावर एक आजी स्वेटर विणत होत्या. त्यांच्या बाजूला एक कापडी पिशवी होती जी जवळ जवळ सर्व बाक आडवून होती. आजी मधेच खेळणा-या मुलांकडे बघायच्या आणि पुन्हा विणकामात बुडून जायच्या. काही वेळाने एक आजोबा तिथे आले. आजींच्या बाजूला बसण्याजोगी जागा आहे हे पाहून ते आजींजवळ आले. "माफ करा, मी इथे बसू का..??" ते आजींना म्हणाले. विणकामातून नजर वळवत आजींनी आजोबांना पाहिले आणि त्यांचा पसारा थोडा आवरता घेतला. आजोबा हसले आणि बाकावर बसले...

काही क्षण शांततेत गेल्यावर आजोबांना कंठ फुटला, "तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय..." आजोबांकडे एक कटाक्ष टाकत आजी म्हणाल्या, "काय हो... या वयातसुद्धा..." आजोबांनी आजींच्या म्हणण्यातला रोख ओळखला. म्हणाले, "अहो तसं नाही. खरंच तुम्हाला पाहिलंय कुठेतरी. तुम्ही पुण्याला होता का... गोखले कॉलेजला..." "अय्या, तुम्ही कसं हो ओळखलंत..." आजी, 'आजी म्या ब्रम्ह पाहिले' असे भाव चेहे-यावर आणत म्हणाल्या. "अगं कुसे मी दिन्या... ओळखलं नाहीस..." आजोबा उत्तर देत म्हणाले...

दोघांना एकमेकांची ओळख पटली आणि गप्पा सुरू झाल्या. आजी म्हणाल्या, "तो समोर एका मुलीशी खेळतोय ना तो माझा नातू, स्वप्नील. हुशार आहे हो. पहिल्या पाचात असतो". आजोबाही वदले, "आणि ज्या मुलीशी तुझा स्वप्नील खेळतोय ना ती माझी नात, स्वाती. तीही काही कमी हुशार नाही. तोडीसतोड आहे अगदी. वेळ जात राहिला आणि गप्पा रंगत गेल्या. उजेड कमी होत गेला तसेच स्वप्नील आणि स्वाती आजी-आजोबांजवळ आले आणि, "आजी, आजोबा चला ना घरी. आई-बाबा वाट बघत असतील पार्टीसाठी..." असं म्हणत दोघांना उठवू लागले...

आजोबा-आजी उठले. आजोबा एका दिशेने चालू लागले तर आजी म्हणाल्याच, "अहो, तिथे कुठे... पार्टी घरी नाही हॉलवर आहे म्हटलं..." आजोबा वळले. हे सर्व पाहणा-या अजयला काही कळेना... त्याने दोघांना विचारलं तर आजोबा म्हणाले, "मुला, आम्ही नवरा-बायको आहोत आणि ही आमचीच नातवंड आहेत. आज आमच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस आहे. आता हॉलवर छान पार्टी आहे. पण आम्ही विचार केला की आयुष्याच्या संध्याकाळी आजच्या या दिवसातले काही क्षण जुन्या आठवणीत घालवायचे". अजय हसला. स्वत:लाच म्हणाला, "जर हे दोघं पन्नास वर्ष एकमेकांना समजून घेत असतील तर मी का नाही..." पाठमो-या जाण-या त्या जोडप्याकडे पाहत अजय म्हणाला, "good evening आजी-आजोबा..."

@ अनिकेत परशुराम आपटे.

घासाघीस...

"जरा दार उघडून दे ना... पावसामुळे लाकूड फुगून जाम झालं असेल कदाचित." दाराला चावी लावत बायको म्हणाली. CID Inspector Dayaचं नाव घेऊन तो जाम झालेला दरवाजा मी जोर लावून उघडला. "हा दरवाजा किती कठीण झालाय उघडायला. आज तू होतास म्हणून. पण उद्याचं काय...!!" आत येत सौ म्हणाली. "मी करतो काहीतरी." असं म्हणून उलट्या पावली सुताराच्या शोधात निघालो...

हल्ली हे सुतारही इतके डांब्रट झालेत ना... "दरवाजेको रंधा मारने का है" असं म्हणताच, "साब, जरा बड़ा काम निकालो ना, इत्ते में क्या मिलेगा मुझे..." अशी उत्तरं मिळतात. मान खाली घालून मी घरी परतलो. बायकोच्या चेह-यावर प्रश्नचिन्ह पाहिलं आणि तिने काही विचारायच्या आत मी म्हणालो, "अगं, एकही सुतार तयार नाही, पण तू काळजी नको करूस, मी बघतो". असं म्हणून पुरावे गोळा करण्यासाठी Senior Inspector Abhijeet जसा सगळीकडे शोध घेतो तसेच मीही पूर्ण घर पिंजून काढलं...

माझ्या या शोधमोहिमेतून एक लोखंडाचं पातं सापडलं. मग काय विचारता... गणपतीचं स्मरण केलं नी लागलो कामाला. पाच मिनिटं, दहा, पंधरा... माझी घासाघीस सुरूच होती. जवळपास वीसएक मिनिटांनंतर धबधब्यात उभ्या मंदाकिनीसारखा घामाच्या धारात ओलाचिंब होत मी बाजूला झालो. सौंनी सहज दरवाजा लोटला तर तो अलगद लागला. पुन्हा उघडण्याचा प्रयत्न करताच पटकन उघडला. "भले शाब्बास रे माझ्या पठ्ठ्या. माझं मोठ्ठं काम केलंस..." बायकोच्या उद्गारांनी मी हुरळून गेलो पण हा आनंद पुढच्याच वाक्याने हिरावून घेतला, "मला काय वाटतं, बँकेची कामं झाली की फावल्या वेळेत किंवा सुट्टीत तू सुतारकामाचा side business का करत नाहीस..!"

तुम्हाला सांगतो, या बायका म्हणजे.....

@ अनिकेत परशुराम आपटे.

Tuesday, July 11, 2017

मृत्यूची हाक...


मृत्यूची हाक...

रात्रीची वेळ होती. जोरदार पाऊस, सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट यांनी थैमान घातलं होतं. निर्जन रस्त्यावरून गाडी भरधाव वेगाने पळत होती. “आशू, अरे जरा हळू. इतक्यातच वर पोहोचवतो का काय आम्हाला.” विकी म्हणाला. “नाहीतर काय... रेस लावली आहेस की काय रे...” विकीच्या म्हणण्याला दुजोरा देत राघवने सूर काढला. “अरे हम है तो क्या डर है...” आशू फुशारक्या मारत होता. “यस माय बेबी... तुम ही तो हो. ए तुम्ही टेंशन नका रे घेऊ. माझा आशू आहे ना...” बाजूला बसलेल्या अंजूने आशूची री ओढली. “ए, जरा आजूबाजूला बघा की... घरं नाहीत, वस्ती नाही, जनावरंसुद्धा दिसत नाहीत. हा वादळ-वारा नसेल तेव्हा भयाण शांतता असणार इथे. तरी मी तुम्हाला सांगत होते, लवकर निघू. मागच्या गावाजवळच्या लॉजमध्ये राहू पण माझं कोणी ऐकेल तर ना...” रश्मी बोलती झाली. राघव हसत म्हणाला, “ए भित्री भागुबाई... आम्ही आहोत ना तुझ्यासोबत... बरं... काही झालंच तर तुलाच पुढे करू. बस... खुश...” सर्व हसले आणि रश्मी अजून रुसली. असाच हसत-खेळत प्रवास चालला होता आणि... फट.......सससससससससससससससस...

गाडीचं टायर पंचर झालं. गाडी out of control होऊ लागली. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर गाडी आदळणार होती. “आशू.... ब्रेक मा....र.....” सर्व एका सुरात किंचाळली. आशूने करकचून ब्रेक मारला. कर्कश आवाज करत गाडी झाडापासून अर्ध्या फुटावर येऊन थांबली. “आशू, मी सांगत होतो ना स्पीड कमी कर. बघ काय झालं.” विकी म्हणाला. अंजूने आशूला घट्ट धरलं होतं. म्हणाली, “आता काय करायचं रे... पावसात टायर कसं बदलणार...” “अरे पाऊस सोडा. स्टेप्नी कुठे आहे गाडीत... आता बसा असेच पाऊस थांबेपर्यंत.” राघव हे बोलतच होता की खिडकीबाहेर त्याला एक प्रकाशाचा ठिपका दिसला. “ए, ते बघा काय...” त्याने सर्वाना खुणावले. माळावरून एक माणूस हातात काठी, पावसापासून वाचण्यासाठी डोक्यावर प्लास्टिक घेऊन हळू हळू रस्त्याकडे येत होता. “काका..... अहो काका..... इकडे इकडे...” आशू आणि विकी खिडकीबाहेर हात हलवत एका सुरात ओरडले. त्या माणसाने पाहिलं आणि तो गाडीजवळ आला. म्हणाला, “काय रं पोरांनो, आवऱ्या पावसाचं रातच्या टायमाला हितं काय करतायसा...” “काका आम्ही ट्रीपला निघालोत. रस्ता चुकलोय. आणि आता तर गाडीही बंद पडली आहे. अशा वातावरणात काही सुचत नाहीये. आम्हाला मदत करता का... जवळपास कुठे रहायची सोय होईल का...” रश्मी म्हणाली. तो माणूस काही बोलणार इतक्यात, “Oh boy… oasis in desert, ए, तिकडे बघा रे...” विकीने दाखवलेल्या दिशेला सर्वांनी पाहिलं तर, विजांच्या प्रकाशात झाडीमागे लपलेला एक बंगला दिसत होता...

सर्वजण त्या बंगल्याकडे पाहत होते. “पोरांनो, माजं ऐका. थितं जाऊ नगासा... त्यो वाडा झपाटलेला हाय. आम्मी समदी त्याला भूतोबाचा वाडा म्हनत्यात... थितं आजपातूर कुनीसुदिक गेलं न्हाई... आनी गेलं आसल तर पुन्यांदा दिसलं न्हाई... ह्यो वाडा असा दिसत न्हाई कदी... आज त्यो दिसतुया... म्हंजी... आज... न्हाई न्हाई... तुम्मी काय बी करा... पर थितं जाऊ नगासा... जाऊ नगासा...” तो माणूस बोलता झाला. सर्वांनी पाहिलं तर त्याच्या डोळ्यात भीती दाटली होती. तो मागे सरकला. त्याच्या हातातली काठी आणि डोक्यावरचं प्लास्टिक खाली पडले. आलेल्या दिशेने तो माणूस पळत सुटला. पाचही जण तो माणूस दिसेनासा होईपर्यंत त्याच्याकडे पाहत राहिले. “काय पण नग असतात एकेक... म्हणे भुताचा वाडा...” विकी म्हणाला. “नाहीतर काय... उगाच अफवा पसरवायची... चला रे आपण तिथे जाऊ...” विकीला दुजोरा देत राघव म्हणाला. पण रश्मीच्या मनात वेगळंच काहीतरी आलं, “अरे पण तो माणूस जे म्हणत होता ते खरं असेल तर... नको नको... आपण इथेच बसू...” रश्मीच्या या बोलण्यावर तिच्या टपलीत मारत राघव म्हणाला, “अगं राणी, कोणीतरी काहीतरी सांगितलं म्हणून आपण रात्रभर असंच बसून रहायचं का... त्यापेक्षा त्या वाड्यावर जाऊ. काही मदत मिळते का ते पाहू... काय रे तुम्ही काय म्हणताय...” सर्वांनी माना डोलावल्या. फुशारकीबहाद्दर आशू तयारच होता. म्हणाला, “आणि तुम्ही मुली कशाला काळजी करताय... आम्ही तिघं आहोत की तुमचे body guards… chill मारनेका क्या...” सर्वजण गाडीतून उतरले आणि वाड्याकडे निघाले...

वाडा खूप जुना होता. कौलं, अंगण सगळं जुन्या पद्धतीप्रमाणे. कुंपणाला भलं मोठं लोखंडी गेट होतं आणि गेटला त्याच्याच तोडीचं कुलूप. पण ते कुलूप फक्त शोभेचं वाटत होतं कारण कडी तुटली होती. वाड्याच्या समोरच्या बाजूला असलेल्या दोन खिडक्या आणि दरवाजा पाहून एखादी कवटी समोर ठेवली आहे असाच भास होत होता. अंजूने आशूचा हात घट्ट धरला होता. म्हणाली, “किती भयाण आहे रे इथे... आपण जाऊयात का परत...” आशू अंजूला दिलासा देत होता. आशू, विकी आणि राघवने जोर लावून ते गेट ढकललं तसं मोठा आवाज करत ते उघडलं. सर्व एकेक करून आत गेले. अंगणात उगवलेल्या झुडपातून मार्ग काढत दाराजवळ पोहोचले. विकी दार चाचपडून पाहत होता की ते ‘क........र........’ असा आवाज करत उघडले गेले. जणू काही या सर्वांना आत बोलावण्याठीच ते उघडलं गेलं होतं. सर्वजण एक पाऊल मागे झाले. हळूच कानोसा घेत, इकडे-तिकडे पाहत सर्व आत गेले. आतला हॉल, वरच्या मजल्यावर जाणारे दोन जिने, फर्निचर, सर्वकाही ठेवणीतलं होतं. वाड्यात खूप शांतता होती. एका भिंतीवर काही तस्बिरी होत्या. बहुतेक वाड्यातील रहिवाशांच्या असाव्यात. सर्वजण त्या फोटोंसमोर येऊन उभे राहिले. स्वातंत्य्रपूर्व काळातल्या आणि त्याही आधीच्या अशा बऱ्याच फ्रेम्स होत्या. विकी म्हणाला, “यार, एक गोष्ट कळत नाहीये... फ्रेम्स तर खूपच जुन्या आहेत पण त्यातले फोटो बघा... असं वाटतंय अलीकडेच बदललेत... आणि या बाकीच्या फ्रेम्स रिकाम्या का आहेत...” सर्वांनी निरखून पाहिले तेव्हा त्यांनाही पटले. हा काय प्रकार आहे याचा सर्व विचार करतच होते की... टण... टण... टण... टण... टण...

घड्याळाच्या टोल्यांचा आवाज वाड्यात घुमत होता. सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले. त्यांनी आपापली घड्याळं पाहिली. साडे अकरा वाजले होते. “आत्ता तर साडे अकरा वाजलेत, मग पाच टोले कसे...” सर्वांच्या मनात एकच विचार आला. “काय भानगड आहे पाहिलं पाहिजे...” विकी म्हणाला. “अरे हो, पण समोर दिसत नाहीये घड्याळ... शोधायचं कुठे...” आशूने शंका काढली. राघव पुढे झाला. म्हणाला, “असं करू... विकी, तू आणि रश्मी वर बघा... आम्ही तिघं खाली बघतो...” सर्वांना राघवचं म्हणणं पटलं. आशू, अंजू आणि राघव खाली शोधू लागले आणि विकी व रश्मी वर गेले. काही दारं बंद होती आणि काही उघडी होती. सर्वांना एकच अनुभव येत होता. अंधारात पावलं टाकत, अंदाज घेत सर्व शोध घेत होते की, “विकी.... विकी.... काय झालं.... अरे दार उघड... विकी...” रश्मीच्या आवाजाने सर्वजण वर धावले. रश्मी एका दाराला थाप मारत होती. अंजू म्हणाली, “काय झालं रश्मी... विकी कुठे आहे...” रश्मी रडत होती. म्हणाली, “आम्ही शोधत होतो. सगळी दारं बंद होती. विकीला हे दार उघडं दिसलं. मला बाहेर थांबवून तो आत गेला. आत जाताच दार आपोआप बंद झालं. मला ‘धाप......’ असा आवाज आला आणि आता दार उघडत नाहीये.” राघवने दाराला हात लावून पाहिलं. म्हणाला, “दार आतून बंद आहे... आशू चल, दार तोडावं लागेल...” आशू आणि राघवने लाथा हाणून दार उघडलं. खोलीत एक मोठा आरसा, एक लाकडी कपाट आणि एक बेड याखेरीज काहीच नव्हतं. बेडच्या बाजूला विकी पडला होता. त्याचे डोळे खूप मोठे झाले होते. तोंड पूर्ण उघडलं होतं. राघवने विकीचा हात धरला. म्हणाला, “Guys…. He is dead….

सर्वजण स्तब्ध होते. कोणाला काय बोलावं काळत नव्हतं. “Guys… आपण सर्व एकत्र इथे आलो. घड्याळाचा शोध घेत होतो तेव्हा विकी रश्मीच्या डोळ्यांदेखत गायब झाला आणि हा असा सापडला. याचाच अर्थ कोणीतरी सहावी व्यक्ती इथे आहे. कदाचित गुन्हेगार असतील. आपण आलो म्हणून घाबरून त्यांनी हे कृत्य केलं असेल...” आशू सांगत होता. थरथरणाऱ्या रश्मीला शांत करत अंजू म्हणाली, “अरे पण जर तो कोणी मनुष्य नसेल तर... रश्मी म्हणाली ना दार आपोआप बंद झालं. आणि खोलीतही कोणी नाही...” राघव म्हणाला, “काही असो... विकी आपला मित्र होता. आपल्यासोबत तो इथे आला. त्याच्या मृत्युचं कारण आपल्याला समजलंच पाहिजे. राघव उठला आणि बाकी खोल्यांमध्ये पाहू लागला. आशू, अंजू आणि रश्मीही त्याच्यासोबत निघाले. आशू म्हणाला, “विकीकडे एक टॉर्च मी पाहिला होता. तो घेऊन येतो. सर्व पुढे झाले आणि आशू मागे फिरला. काही क्षणातच... टण... टण... टण... टण... घड्याळाचे चार टोले पडले. सर्व थबकले. रश्मी अजून घाबरली. म्हणाली, “आ....पण पाच जण इथे आलो तेव्हा घड्याळात पाच टोले पडले. विकी गेला. आ... पण चार जण उरलो. आता चार टोले पडले....” राघवने विचार केला. म्हणाला, “आपण तिघं एकत्र आहोत पण आशू... Come on… he is in danger…” तिघंही मागे फिरले. Passageमध्ये एका कपाटाजवळच्या खुर्चीत आशू बसला होता. त्याचा चेहरा विकीसारखाच भेदरलेला दिसत होता. हातात उघडलेली टॉर्च होती. राघवने नाडी तपासली आणि नकारार्थी मान हलवली...

“आशू...... नाही आशू.... मला सोडून जाऊ नकोस रे.... ऊठ ना....” अंजूच्या आसवांचा बांध फुटला होता. आशूला उठवण्याचा ती कसोशीने प्रयत्न करत होती. “अंजू, अगं सावर स्वत:ला...” अंजूच्या खांद्यावर हात ठेवत राघव म्हणाला. त्याला रश्मीने बाजूला खेचलं. म्हणाली, “राघव, आतातरी ऐक माझं. चल आपण इथून निघूया.” राघवला रश्मीचं म्हणणं पटलं. दोघं अंजूला उठवू लागले पण ती ऐकतच नव्हती. शेवटी राघव म्हणाला, “रश्मी आपण आपलं सर्व सामान गोळा करू मग अंजूला घ्यायला येऊ. तोवर अंजू तू इथेच थांब. कुठेही जाऊ नकोस.” राघव आणि रश्मी खाली आले. सामान गोळा करू लागले. रश्मीची नजर सहज म्हणून फोटो लावलेल्या भिंतीकडे वळली. ती भीतीने गोठली. राघवला इशारा करत थरथरत्या हाताने भिंतीकडे बोट दाखवलं. भिंतीवरच्या दोन रिकाम्या फ्रेम्समध्ये विकी आणि आशूचे चेहरे दिसत होते. राघवचे डोळे विस्फारले. तो म्हणाला, “रश्मी, आधी इथे पाच फोटो होते. आशू आणि विकी गेले आणि त्यांचे फोटो इथे लागले. आणि ते कमी होणारे घड्याळाचे टोले... Oh my God… रश्मी... तू बरोबर होतीस... इथे आपल्याखेरीज जे काही आहे ते मानवी नाही... चल आपल्याला लगेच निघायला हवं...” रश्मी आणि राघव अंजूसाठी वळणार इतक्यात... टण... टण... टण... राघव आणि रश्मीने एकमेकांकडे पाहिलं आणि “अंजू..............” दोघंही एकाच वेळी ओरडली. “खळळळळळळळळळळळळळळळ.......” आवाजाकडे दोघांनी पाहिलं तर हॉलच्या मधोमध ठेवलेल्या काचेच्या टेबलाचा चक्काचूर झाला होता आणि अंजू त्यावर गतप्राण होऊन पडली होती. अंजू गेली होती तरीही तिच्या उघड्या डोळ्यातली भीती लपत नव्हती...

राघव आणि रश्मी जवळ गेले. “आ.....अंजू..... उ..... ऊठ ना...” कापऱ्या स्वरात रश्मी म्हणाली. अंजू उठत नाही याची खात्री पटली आणि रश्मीचं अवसान गळलं. “आ.... आपण मारणार आहोत.... विकी, आशू, अंजू.... आ....पण न....नाही वाचणार.... ना....ही....” रश्मी कशीबशी पुटपुटली. राघव तिला शांत करू लागला. दोघांनी फोटो असलेल्या भिंतीकडे पाहिलं तर एका रिकाम्या फ्रेममध्ये अंजूचा चेहरा दिसू लागला. आतामात्र दोघंही प्रचंड घाबरली. दार उघडायला धावली. पण दर बंद होतं. काही केल्या उघडेना. राघव म्हणाला, “रश्मी आपल्याला इथून बाहेर पडायचं आहे. हे दार बंद आहे आणि माझ्या एकट्याने ते नाही उघडणार. पण या खिडक्या बघ... त्या तोडता येतील. तू तिथे बघ मी या बाजूला बघतो. अशी एखादी वस्तू शोध जिने खिडकी तोडता येईल. हो, पण आपण एकमेकांच्या नजरेसमोरच राहू.” दोघंही शोध घेऊ लागली. रश्मीच्या हाताला एक फुलांची रिकामी कुंडी लागली. उचलायला जड असली तरी दोघांनी ती उचलली तर खिडकी तोडून बाहेर जाता येणार होतं. कुंडीकडून राघवकडे वळत असताना... टण... टण... टोल्यांच्या आवाजाने रश्मी गोठली. “कोणाची वेळ आली असेल... माझी की राघवची...” हा विचार करत ती वळली तर राघव कुठेच नव्हता. “राघव.... राघव.... रा....” ओरडत असताना तिला टेबलजवळ पडलेला राघव दिसला. तिने जवळ जाऊन पाहिलं तर राघवचं तोंड उघडं होतं आणि डोळे विस्फारले होते...

रश्मी कापू लागली. जागेवर उभी राहिली. तिने सगळीकडे नजर फिरवली. अंधारात तिला काहीच दिसत नव्हतं. फक्त जाणवत होता क्षणोक्षणी जवळ येणारा मृत्यू. जीवाच्या आकांताने रश्मी पळत सुटली. “वाचवा.... वाचवा.... कोणी आहे का.... मला बाहेर काढा...” असं ओरडत खिडक्या, दारं वाजवू लागली. आणि.... “कुठे पळतेस रश्मी.... आता तुझाच नंबर आहे...” आवाजाने रश्मीचं काळीज धडधडू लागलं. तिने हळू हळू मागे पाहिलं... तिचे डोळे विस्फारले... तिला ओरडायचं होतं पण तिच्या उघड्या तोंडातून आवाजच फुटत नव्हता... आणि... टण..... टोल्याचा नाद सगळीकडे घुमत होता...

“सर्व बॉड्या ताब्यात घ्या आणि Post Mortemसाठी पाठवा... अजून काही मिळतंय का ते बघा...” इंस्पेक्टर साहेब आपल्या लोकांशी बोलत होते. चला शिंदे... आपण बाहेर जाऊ... ज्याने complaint केली त्यांच्याशी बोलू...” दोघं बाहेर आली. “पोलिसात वर्दी कोणी दिली होती...” इंस्पेक्टर साहेबांचा धारदार आवाज ऐकून एक माणूस पुढे आला. म्हणाला, “सायेब, ही समदी मुलं काल रातच्याला हितं भेटली व्हती. त्यांची गाडी बंद पडली व्हती. म्या त्यासनी सांगितलं की आत जाऊ नगासा पर त्यांनी ऐकलं न्हाय. सकालच्या पारी म्या हितं आलू तवा गाडी बी हितंच व्हती आनी हे फटकसुदिक उघडं व्हतं. म्हनून म्या तुम्मासनी खबर दिली.” इंस्पेक्टर साहेब सर्व ऐकून घेत, “ठीक आहे...” असं म्हणून मार्गस्थ झाले...

Post Mortem report आला. सर्वांच्या मृत्युचं कारण... Cardiac Arrest… हृदयक्रिया बंद पडल्याने अकस्मात झालेला मृत्यू... पण... ही सर्व मुलं तर तरुण होती... याचा अर्थ... तिथे त्यांना जिवाचा थरकाप उडवणारं, असं काहीतरी भयानक दिसलं, की भीतीने त्यांची हृदयं बंद पडली...  काय घडलं असावं काल... असं काय दिसलं असावं त्यांना... हे एक गूढ आहे... आजही हा वाडा, आपले बाहू पसरून एखाद्या अक्राळ विक्राळ राक्षसासारखा आपल्या भक्षाची वाट पाहत आहे... आणि त्या घड्याळाच्या टोल्यांमधून, जणू मृत्यूच हाक मारत आहे...

टण... टण... टण... टण...

समाप्त.

रूम नं.: ११०२

“सर ही तुमची रूम नं. ११०२ आणि ही चावी. काही लागलं तर मला सांगा. Wish you a happy honeymoon. Enjoy your stay.” मॅनेजरने सुशांतच्या हाती किल्ल्या दिल्या आणि तो मार्गस्थ झाला. सुशांत आत आला. सुजाता रूम न्याहाळत होती. “ए सुशांत, किती छान रूम आहे रे. ए.सी., बेड, गॅलरी, सर्वच छान आहे. पण मला एक गोष्ट नाही रे कळली...” सुशांतकडे पाहत जेव्हा सुजाता असं म्हणाली तेव्हा सुशांत तिच्या जवळ आला. म्हणाला, “कोणती गं...” सुजाता म्हणाली, “अरे मघाशी रिसेप्शनवर तो माणूस म्हणाला सहा वर्ष ही रूम बंद आहे आणि आज तुमच्यासाठी खुली केली आहे. काय तर म्हणे रिनोव्हेशन. इतका वेळ कधी काम चालतं का....” सुशांत हसला. आपले दोन्ही हात सुजाताच्या खांद्यावर ठेवत म्हणाला, “अगं राणी, असेल काही त्याचं. आपल्याला काय करायचं आहे. आणि, हनीमूनचा पहिला दिवस अशी चिकित्सा करण्यात घालवणार आहेस का तू...” सुजाता लाजली. तिने सुशांतचा चेहरा हातात घेतला. दोघं एकरूप होणार इतक्यात दारावर टक टक झाली. चिडलेल्या सुशांतने दार उघडले तर बाहेर मॅनेजर उभा. म्हणाला, “साहेब नक्की काही गरज नाही ना...” सुशांत त्याला हात जोडून नमस्कार करत म्हणाला, “हे बघा, काही गरज लागली तर नक्की बोलवू तुम्हाला. आता please don’t disturb us. काय विचित्र स्टाफ आहे इथला.” दार लावत सुशांत म्हणाला. सुजाता जवळ येत म्हणाली, “असू दे रे. तू चिडून दिवसाची मजा नको घालवूस. हे बघ, मी फ्रेश होते तोवर तू घरी आपण पोहोचल्याचं कळव. हो नंतर disturbance नको.” सुजाता आत गेली आणि सुशांत फोन करू लागला...

काही क्षणात, “आ........................” अशी किंकाळी त्याला ऐकू आली. सुशांत धावत बाथरूममध्ये गेला. पाहतो तर शॉवर चालू होता आणि बाजूला कोपऱ्यात सुजाता थरथरत बसली होती. “सुजू अगं काय झालं... तू कापते आहेस...” सुजाताच्या जवळ जात सुशांत म्हणाला. सुजाताने तिचा थरथरता हात वर उचलत आरशाकडे बोट दाखवलं. आरशावर गरम पाण्यामुळे साचलेली वाफ आणि पाण्याचे तुषार याखेरीज काहीच नव्हतं. सुशांत गोंधळला. नुसता आरसा पाहून सुजू इतकी का घाबरली याचा विचार करू लागला. तो तिला बाहेर घेऊन आला. आधी तिला शांत केले. म्हणाला, “सुजू, काय झालं ते सांगशील का... इतकी कशाला घाबरलीस तू...?” सुजाता अजूनही थरथरत होती. पण सुशांत जवळ असल्याने तिला हायसं वाटलं. कापऱ्या आवाजात ती म्हणाली, “म..... मी आत आले. शॉवर सुरू केला. अंघोळ करत होते तोच शॉवर बंद झाला. मी चाचपडत आरशासमोर आले. पाहिले त.... तर आ....आत माझ्याबाजूला एक मुलगी उभी होती. लाल डोळे, मोकळे सोडलेले केस, चेहेऱ्याची एक बाजू रक्ताने माखली होती. मी बाजूला पाहिले तर कोणीच नव्हतं. पुन्हा आरशात पाहिलं तर ती मुलगी मला खुणावत होती. म्हणून मी ओरडले.” सुशांतने सुजाताला जवळ घेतले. संपूर्ण दिवस दोघांनी भीतीयुक्त दडपणाखाली काढला...

संध्याकाळ संपून रात्र वाढू लागली. हॉटेलने आयोजित केलेल्या candle light dinnerचा आस्वाद घेऊन सुशांत आणि सुजाता दोघं पाय मोकळे करायला आवारात फिरू लागले. सुजाताला झाल्या प्रकाराचा विसर पडावा म्हणून सुशांतनेही वेगवेगळे विषय काढून सुजाताचं लक्ष त्या प्रसंगापासून वळवून घेतलं. दोघं रूमवर आले. त्यांच्या भावी आयुष्याबद्दल चर्चा करत त्यांना झोप लागली. तीन-सवा तीन झाले असतील. सुशांतची झोप चाळवली. बाजूला हात लावला तर सुजाता तिथे नव्हती. सुशांत खडबडून जागा झाला. पूर्ण रूममध्ये सुजाता कुठेच सापडत नाही तेव्हा सुशांतने बाहेर मोर्चा वळवला. तडक रिसेप्शनला पोहोचला. तिथे उभ्या माणसाला सांगितले, “अहो, सुजाता, माझी बायको कुठे सापडत नाही. जरा माझ्यासोबत चालता का...” सर्वजण सुजाताचा शोध घेऊ लागले. सुशांत पुन्हा वर जाणार इतक्यात, “साहेब जरा मागच्या बाजूला या...” या वेटरच्या हाकेने थांबला आणि धावतच त्या दिशेला निघाला. हॉटेलच्या मागे त्याने पाहिलं तर पूलच्या शेजारी कोणीतरी बसलं होतं. पेहेरावावरून ती सुजाताच आहे हे सुशांतने ओळखलं. सुशांतने जवळ जाऊन तिला हात लावला. तिने सुशांतकडे पाहिलं मात्र, तिचे लालबुंद डोळे, रक्ताने माखलेली चेहेऱ्याची एक बाजू पाहून सुशांत हबकला. जोराचा सुस्कारा टाकत सुजाता म्हणाली, “पाच वर्ष... पाच वर्षांपासून वाट बघत होते मी...” सुजाताच्या बदललेल्या आवाजाने सुशांतच्या काळजात धस्स झालं. “सुजाता...” सुशांतने आर्त किंकाळी फोडली आणि गाढ झोपेतून एकदम जाग यावी तशी सुजाता भानावर आली. स्वत:ला हात लावत, आजूबाजूला पाहत सुजाता कशीबशी म्हणाली, “क.... काय.... म....मी इथे कशी.... स.....सुशांत.... मी....” सुशांतने तिला शांत करत रूमवर आणलं. हळूहळू सुजाताला झोप लागली. सुशांतच्या मनात विचारांनी थैमान घातलं होतं, “सकाळी सुजू म्हणाली तिला एक मुलगी दिसली. त्यावेळी मी विषय बदलला. पण आत्ता मी जे पाहिलं ते काय होतं... जणू काही सुजूच्या चेहेऱ्यात दुसराच चेहेरा होता... नाही आता इथे थांबण्यात अर्थ नाही... उद्याच दुसरं हॉटेल पाहतो आणि सुजूला इथून घेऊन जातो...” सुशांतने एकवार झोपलेल्या सुजाताकडे पाहिलं आणि तोही झोपी गेला...

सकाळी सुजाताला जाग आली. पाहते तर सुशांत आधीच तयार होऊन बसला होता. “चल सुजू लवकर तयार हो, आपण फिरायला जातोय...” ती लगोलग तयार झाली आणि सुशांतसोबत निघाली. दिवसभर दोघं खूप फिरले. एकमेकांच्या सहवासात छान वेळ घालवला. संध्याकाळी हिंडून-फिरून दोघं रूमवर आली. सुशांत सुजाताच्या जवळ येऊन बसला. म्हणाला, “सुजू तुला एक surprise देतो... आपण उद्या सकाळीच ही रूम सोडून दुसऱ्या हॉटेलमध्ये जातोय...” सुजाताचा चेहेरा आनंदाने खुलला. सुशांतच्या या वाक्यावर कसं व्यक्त व्हावं तेच तिला कळत नव्हतं. सुशांतचा हात हातात घेत ती म्हणाली, “सुशांत, अरे मीही सकाळी तुला हेच सांगणार होते. पण तुला राग येईल म्हणून नाही बोलले. खरंच, तू आत्ता म्हणालास तरी आपण जाऊ. मला खूप भीती वाटते रे इथे.” सुशांतने तिला जवळ घेतलं. म्हणाला, “बस. आजची रात्र राणी. उद्या जाऊ आपण.” सुजाता हसली. एकमेकांच्या सहवासात दोघं गाढ झोपी गेले. “सुशांत.... ऊठ.... लवकर ऊठ....” या आवाजाने सुशांतचे डोळे उघडले. बाजूला सुजाता नव्हती. सुशांत उठला. “तिकडे कुठे बघतोस... इकडे बघ...” या भेदक आवाजाने सुशांत थोडा घाबरला. त्याने आवाजाच्या दिशेने पाहिलं तर गॅलरीत सुजाता उभी होती. सुशांत तिथे निघाला आणि, “जवळ येऊ नकोस.... नाहीतर खाली उडी घेऊन जीव घेईन तुझ्या बायकोचा...” सुजाता हात दाखवत म्हणाली. सुशांत थांबला. त्याच्या नजरेत भीती दाटली होती. तो म्हणाला, “कोण आहेस तू... सुजाताशी काय संबंध आहे तुझा... का त्रास देतेस तिला...” सुजाता भेदक आवाजात म्हणाली, “तुझ्या बायकोशी माझा काही संबंध नाही. पाच वर्षांपूर्वी याच गॅलरीतून खाली पडून मी मेले तेव्हापासून सूड घ्यायला तळमळत होते. ती संधी आज आली. आणि तू ही संधी माझ्या हातून घालवू पाहतोस...” सुशांत भीतीने कापू लागला. म्हणाला, “पाच वर्षांपूर्वी.... पण कशी...” सुजाता जोरजोरात हसू लागली. हात वर करत तिने कपाटाकडे बोट दाखवलं. कपाटाखालून धुळीने भरलेला एक पेपर बाहेर आला. सुशांतने तो उचलताच “धप” असा आवाज झाला. सुशांतने पाहिलं तर सुजाता बेशुद्धावस्थेत गॅलरीत पडली होती. तिला सुशांतने बेडवर ठेवलं आणि पेपरकडे पाहिलं तर त्यावर तारीख होती ०२.०६.२०१२...

सुशांत विचार करू लागला, “हॉटेलचे लोक म्हणतात सहा वर्षांपासून ही रूम बंद होती आणि हा पेपर आज सापडला. याचा अर्थ पाच वर्षांपूर्वी याच दिवशी काहीतरी घडलं इथे आणि त्या मुलीचा मृत्यू झाला. पण कसं काय... मला या प्रकरणाचा छडा लावायलाच हवा कारण आता यामुळे सुजूला त्रास होत आहे.” सकाळी सुशांत लवकर उठला. दोन दिवसांच्या त्रासामुळे सुजाता अजून झोपली होती. सुशांत ताबडतोब रिसेप्शनवर आला. टेबलवर पेपर आदळत म्हणाला, “हा काय प्रकार आहे ते मला समजलं पाहिजे. तुम्ही सांगितलं होतं गेली सहा वर्ष ही रूम बंद आहे. मग हा पाच वर्षांपूर्वीचा पेपर तिथे कसा आला. काय घडलं होतं त्या दिवशी...” हॉटेलचे लोक आढेवेढे घेऊ लागले तेव्हा सुशांतने आवाज चढवला, “हे बघा, बऱ्याबोलानं काय ते सांगा, मी दुसरे मार्ग निवडले तर उगाच हॉटेलची बदनामी होईल.” हे ऐकल्यावर मॅनेजर गयावया करू लागला. म्हणाला, “साहेब असं करू नका. मी सांगतो सगळं. पाच वर्षांपूर्वी म्हणजे ०२.०६.२०१२ या दिवशी रूम नं. ११०२ मधून निखीलसरांमुळे मीरा नावाच्या मुलीने खाली उडी मारून आत्महत्या केली होती. निखील सर म्हणजे आमच्या मालकाचा मुलगा. मालकांनी हे प्रकरण दडपलं आणि ती रूम बंद केली. मागच्या आठवड्यात निखीलसर परदेशातून परतले आणि गेल्या पाच वर्षात काहीच घडलं नाही म्हणून ही रूम त्यांनी पुन्हा खुली केली. साहेब आमच्या नोकरीचा प्रश्न होता हो म्हणून आम्ही काही बोलत नव्हतो.” सत्य कळल्यावर सुशांत रूममध्ये आला. दार उघडंच होतं आणि सुजाता समोर बसली होती. सुशांतला पाहताच, “सापडला का तो...” असा भेदक आवाजात प्रश्न केला. सुशांत म्हणाला, “मला खरं काय ते समजलं आहे. तुझं नाव मीरा आहे आणि तुझा खरा अपराधी निखील आहे. पण त्याचा त्रास तू सुजाताला का देतेस... सोड तिला...” हे ऐकून सुजाताचा चेहेरा अजून विद्रूप झाला. डोळे आग ओकू लागले. सुजाता कडाडली, “निखीलला माझ्या समोर आण नाहीतर तुझी सुजाता वाचणार नाही...”

सुशांत विचारात पडला, “निखील इथे आला तर मीरा सूड घेतल्याशिवाय रहायची नाही आणि तो नाही आला तर माझ्या सुजूला हा त्रास भोगावा लागेल. नाही नाही... असं होता कामा नये.” सुशांतने रिसेप्शनवरून निखीलला फोन लावला. युक्तिवादात अडकवून त्याला हॉटेलला रूम नं. ११०२मध्ये बोलवून घेतलं. निखील इतका निर्ढावला होता की त्याने केलेला अपराध तो विसरून गेला होता. निखील रूमवर पोहोचला. त्याने आत प्रवेश करताच दार बंद झालं. सर्वत्र काळोख पसरला आणि, “आलास तू... मी तुझीच वाट पाहत होते...” हा भेदक आवाज रूमभर पसरला. निखील थोडा घाबरला. अंधारात पाहण्याचा प्रयत्न करू लागला तोच समोर ही विद्रूप आकृती दिसली. मोकळे सोडलेले केस, लालबूंद डोळे, रक्ताने माखलेली चेहेऱ्याची एक बाजू... “क.... कोण आहेस तू...” निखील कसाबसा पुटपुटला. सुजाता डोळ्यांवाटे आग ओकू लागली, “नीच माणसा, पाच वर्षांपूर्वी केलेलं कृत्य विसरलास... मी मीरा... इंटरव्ह्यूच्या बहाण्याने मला इथे बोलावलंस आणि माझ्यावर............ तरीही तुझं समाधान झालं नाही, तेव्हा अर्धमेल्या अवस्थेतल्या मला गॅलरीतून खाली फेकून दिलंस. माझे आई-बाबा रस्त्यावर आले. मी त्यांचा एकाच आधार होते. तोही तू हिरावून घेतलास. तुला नाही सोडणार मी.” असं म्हणून सुजाताने हात उचलला. त्यासरशी निखील हवेत उचलला गेला आणि आरशावर जाऊन आदळला. काचेच्या ठिकऱ्या झाल्या. रक्तबंबाळ आणि जख्मी झालेला निखील जमिनीवर कोसळला. आपले थरथरते हात जोडून, “मीरा, मला जाऊ दे.... असं परत नाही करणार मी...” अशी विनवणी करू लागला. मीरा संतापली. म्हणाली, “तुला दया आली माझी... त्यावेळी तू ते कृत्य केलं नसतंस तर आज ही वेळ आली नसती तुझ्यावर. मरणाला तयार हो...” मीराने पुन्हा हात उचलला. जमिनीवर पडलेला निखील वर उचलला गेला आणि गॅलरीबाहेर भिरकावला गेला. “ना......ही.......... आ...........” अशी शेवटची किंकाळी त्याने फोडली...

निखीलचा अंत झाला होता. मीराचा सूड पूर्ण झाला होता. रूमभर प्रकाश पसरला. सुशांत आणि बाकी हॉटेलची मंडळी आत आली. मीरा म्हणाली, “आज मी माझा सूड घेतला. यापुढे या रूम आणि या हॉटेलला माझा त्रास होणार नाही.” झटका लागावा तशी सुजाता जमिनीवर पडली. सुशांतने तिला सावरले. पांढरा धूर रूमभर पसरला आणि त्यातून बाहेर आली एक सुंदर मुलगी. म्हणाली, “सुजाता, मी मीरा. तुला त्रास झाला त्याबद्दल क्षमा कर मला. पाच वर्षांनंतर इथे पाऊल ठेवणारी तूच होतीस. सूड घेण्याची ही संधी मला सोडायची नव्हती. पण आता माझी इच्छा पूर्ण झाली आहे. सुशांत, I am sorry.” धूर हळू हळू नाहीसा होत गेला आणि हात जोडून उभी असलेली मीरा पंचतत्वात विलीन झाली...

समाप्त.

@ अनिकेत परशुराम आपटे