“Hello... प....पोलीस
स्टेशन... म.....मी दादासाहेब इनामदार बोलतोय.... इंद्रधनू बंगल्यावरून....
स....साहेब लवकर या... माझ्या जिवाला धोका आहे.... म... माझे भाऊ.... माझ्या
जीवावर.... न... ना.....ही....” “ठो.... ठो....” गोळ्यांच्या आवाजानिशी फोन बंद झाला...
काल रात्री अकरा वाजता...
प्रचंड पाऊस पडत होता.
सोसाट्याचा वारा सुरू होता. वादळ-वाऱ्यामुळे लाईट गेले होते. बंगल्यातल्या जुनाट
घड्याळाचे टोले पडले. “O…. stop this damn noice…. मेंदूच्या चिंधड्या उडत
आहेत...” चिडचिड करत दादासाहेब जागे झाले. त्यांनी कान देऊन टोले ऐकले. म्हणाले,
“अकरा टोले... अकरा वाजले... म्हणजे एकच तास उरलाय... पण रॉकी कसा नाही आला
अजून... कदाचित खाली उभा असेल... मला disturb होऊ नये म्हणून दार
वाजवलं नसेल... का अजून आलेलाच नाही तो... आणि तो यायच्या आधीच जर त्यांनी मला
पकडलं तर... नाही नाही... असं नको व्हायला... त्यापेक्षा मीच दुसऱ्या ठिकाणी जाऊन लपतो.”
काळोखात हाताने चाचपडत दादासाहेबांनी हळूच दार उघडले. कानोसा घेत ते बाहेर आले.
अंधारात कठड्यावर ठेवलेल्या कुंडीला त्यांचा धक्का लागला आणि ती खाली पडली. आवाज ऐकू
येऊ नये म्हणून दादासाहेबांनी कानावर हात ठेवले. काही क्षणात त्यांनी विचार केला,
“अरे, आवाज नाही झाला... कुंडी पडलीच नाही की काय... पण धक्का तर लागला होता...
म्हणजे कोणीतरी...” हळू हळू कठड्यावरून खाली डोकावत दादासाहेब हलक्या आवाजात
म्हणाले, “कोण आहे खाली...”
“मी आहे साहेब...
रॉकी...” लांब काळा कोट आणि काळी टोपी असा वेश परिधान केलेला एक दणकट इसम खाली उभा
होता. वरून पडलेली कुंडीही त्याच्या हातात होती. आवाज ऐकताच दादासाहेबांची कळी
खुलली. “आलास तू... बरं झालं... ये... वर ये... पण हळू... कोणाला कळता कामा
नये...” असं म्हणून दादासाहेब खोलीत गेले. रॉकी मोठमोठी पाऊलं टाकत वर जाऊ लागला.
आपल्याला कोणी पाहत तर नाही ना याची त्याने खात्री करून घेतली. रॉकी खोलीत आला.
“ये... आत ये.... टेबलवरचा emergency lamp लाव.” दादासाहेबांच्या म्हणण्यानुसार रॉकीने
दिवा लावला. त्या मंद प्रकाशात रॉकीला समोर दादासाहेब उभे असलेले दिसले. डोळ्यांवर
काळा चष्मा आणि हातात काठी असलेलं रूप पाहून रॉकी आश्चर्याने म्हणाला,
“दादासाहेब... हे काय... ही काठी, हे goggles...” दादासाहेब हसले. म्हणाले, “आंधळा
झालोय मी. चार महिन्यांपूर्वीची घटना... आवारात फिरत होतो. मागच्या बाजूला असताना
डोक्यावर जबरदस्त आघात झाला आणि बेशुद्ध झालो. शुद्ध आली ती थेट हॉस्पिटलमध्ये. डॉक्टर
म्हणाले डोक्याला जबर मार लागल्याने दृष्टी गेली आहे. त्याचा उपचार इथे नाही
होणार. परदेशात जावं लागेल. मी परदेशातही गेलो पण काही उपयोग झाला नाही. परवाच परत
आलो. तुला सांगतो रॉकी... हे आंधळेपण आलं ते नुसतं नाही, तर ते घेऊन आलं अनेक
अडचणी, मृत्यूची भीती...” दादासाहेबांच्या खांद्यावर हात ठेवत रॉकी म्हणाला, “माफ
करा साहेब, मला माहीत नव्हतं. पण मृत्यूची भीती...” दादासाहेब पुढे म्हणाले, “आंधळा
असणं वाईट पण आंधळा माझ्यासारखा असणं त्याहून वाईट. कोण, कधी जिवावर उठेल सांगता
येत नाही. अरे ज्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं त्यांनीच माझा घात केला.”
रॉकीचे डोळे विस्फारले. तो म्हणाला, “म्हणजे ते...” रॉकीच्या खांद्यावर हात ठेऊन
दादासाहेब म्हणाले, “हो... माझेच भाऊ आहेत ते...
मी परदेशात उपचार घेत
असताना माझे सेक्रेटरी आपटे यांनी मला फोन केला होता. त्यांनी सांगितलं, माझे
दोन्ही भाऊ अजय आणि विजय हे वाया गेले आहेत. मी इथे हजर नाही हे लक्षात घेऊन
कंपनीच्या petty cashमधून हजारो रुपयांची उधळण केली. शिवाय एक फेक कंपनी काढून
माझ्या कंपनीतून बराच पैसा त्या कंपनीत वळवला. ही चोरी उघडकीला येऊ नये म्हणून
त्या दोघांनी माझा काटा काढायचं ठरवलं. मला झालेला अपघात नव्हता, तो घातपात होता.
माझं नशीब बलवत्तर म्हणून मी वाचलो. पण आता ते तेवढं सोपं नाही. आजची रात्र कठीण
आहे. ही रात्र पार पडली की मी सुटलो.” रॉकी सगळं ऐकत जवळच उभा होता. म्हणाला, “This is ridiculous दादासाहेब. सख्खे भाऊच वैरी निघावेत... पण साहेब, असं काय
घडलं ज्यामुळे तुम्ही मला इथे बोलावलं... काय होणार आहे आज रात्री... आणि हे सगळं
तुम्हाला कसं समजलं...” रॉकीच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत दादासाहेब म्हणाले,
“हुशार आहेस रॉकी, एखादा असता तर निमूट गप्प बसला असता पण तू तसा नाहीस. सांगतो,
सगळं सांगतो... माझ्यावर झालेला हल्ला निकामी ठरला खरा पण माझे भाऊ गप्प बसणार
नव्हते हे मी ओळखलं. काय करावं सुचत नव्हतं. त्यावेळी आपटेंनी मला transmetersचा
सल्ला दिला. हे transmeters खूप छोटे असतात. कुठेही लपवता येतात आणि receiverच्या
मदतीने आपण बोलणं ऐकू शकतो. परदेशात तसे दोन transmeters घेतले आणि परतलो. अजय आणि
विजय यांच्या नकळत दोघांच्या खोलीत एकेक transmeter लपवला. काल रात्री अजयच्या
खोलीतून मला खुडबूड ऐकू आली. मी कान देऊन ऐकू लागलो. विजय आणि अजय एकमेकात बोलत
होते...
“Shit yaar, म्हातारा परत आला. तो नव्हता तेव्हा आपलं कसं सुरळीत चालू होतं. आता हा पुन्हा
आपल्यात लुडबूड करणार.” विजय म्हणत होता. चिडचिड्या स्वरात अजयही बोलता झाला, “हो
ना... ती कुंडी डोक्यात घालण्यापेक्षा अजून एखादी अवजड वस्तू वापरली असती तर
म्हाताऱ्याने वरचाच रस्ता धरला असता. ठीक आहे दादासाहेब, एकदा वाचलात तुम्ही, पण
आता नाही वाचणार...” विजय इकडे तिकडे पाहत अजयच्या जवळ येऊन म्हणाला, “अरे पण आता
काय करायचं... आणि जे करायचं ते लवकरात लवकर... दादाने accounts मागवलेत. नशीब तो आपटे इथे नाही. नाहीतर आजच निकाल लागला असता आपला.”
विजयच्या खांद्यावर थाप मारत अजय हळू आवाजात म्हणाला, “Don’t worry, भरपूर पैशाची लालूच दाखवून मी वकिलाला willचे papers बनवायला सांगितलं आहे. नीट
ऐक... उद्या रात्री बरोब्बर बारा वाजता willचे papers मिळतील. ते हातात आले की त्या म्हाताऱ्याची सही घ्यायची आणि त्याला संपवायचं.
गच्चीतून त्याला खाली फेकून द्यायचं म्हणजे लोकांसमोर असं दिसेल की आंधळा अंधारात
गच्चीत गेला आणि पाय घसरून खाली पडून मेला.” मान हलवत विजय म्हणाला, “plan तर चांगला आहे. पण काही गडबड होता कामा नये याची खबरदारी घ्यायला हवी. बरं आता
मी माझ्या खोलीत जातो. उगाच कोणाला संशय यायला नको.” विजय बाहेर निघून गेला याची
खात्री करून अजयने दार लावून घेतलं आणि लगोलग कोणालातरी phone केला...
“Hello, कोण, परश्या... मी बोलतोय... एक काम आहे. ताबडतोब वाड्यावर ये. आणि direct माझ्याचकडे ये...” Phone बंद झाला. आता तो परश्या येईपर्यंत वाट
पाहणं क्रमप्राप्त होतं. मी विजयकडे मोर्चा वळवला. तो खोलीत पोहोचला तेव्हा आधीच
कोणीतरी आत येऊन बसलं होतं. दार लावत विजय म्हणाला, “नरसू, आलास... बरं झालं.
तुझ्याकडे एक जोखमीचं काम आहे. उद्या रात्री आम्ही आमच्या मोठ्या भावाचा काटा
काढणार आहोत. त्याचबरोबर मला अजयलाही संपवायचं आहे. ही कामगिरी तुला बजावायची आहे.
नीट ऐक. तिसऱ्या मजल्यावरून गच्चीत जायला एक लोखंडी जिना आहे. त्याच्या खाली माणूस
बसू शकेल आणि दिसणार नाही इतपत अंधारी जागा आहे. तू तिथे लपून बसायचंस. आम्ही सर्व
गच्चीत गेलो की मागून तू वर यायचंस. काम संपवून आम्ही परत फिरलो की तू अजयवर हल्ला
करायचा आणि गळा दाबून त्याला संपवायचंस. नंतर त्याला पडद्यात गुंडाळून त्याची मान
मोडून जिन्यावरून ढकलून द्यायचं. म्हणजे असं दिसेल, की दादाचा खून करून परत येत
असताना पडद्यात अडकून अजयचा तोल गेला आणि जिन्यावरून पडत असताना मान मोडून तो
मेला. लोकांच्या दृष्टीने मी इथे नसणारच आहे. कामानिमित्त मी आणि अजय उद्या
संध्याकाळी पुण्याला जातोय असं आम्ही भासवणार आहोत. आणि तूही इथे नाहीस त्यामुळे
तुझ्यावर संशय येणारच नाही. काम नीट पार पाडलंस तर तुला भरपूर पैसे देईन. सगळं
समजलं...” त्या माणसाने होकार दिला असावा. कारण विजयने त्याला आज रात्री बारा
वाजता यायला सांगून पाठवून दिलं. मी हे सर्व ऐकत असताना दुसऱ्या transmeterवर
अजयचा आवाज आला...
“परश्या, वेळेवर आलास...
हे बघ, तुला एक काम करायचं आहे. विजयचा, माझ्या भावाचा खून करायचा आहे. उद्या
संध्याकाळी मी आणि विजय कामासाठी पुण्याला जातोय पण लोकांना दाखवायला. खरंतर इथेच
राहून आम्ही आमच्या मोठ्या भावाला संपवणार आहोत. आता तुला काय करायचंय ते ऐक.
बंगल्याच्या मागच्या बाजूने पाइपावरून तू गच्चीत येऊन टाकीच्या मागे लपून बसायचं.
दादाला संपवून आम्ही मागे फिरलो की तू बाहेर यायचं. electric wires आणि circuitची
व्यवस्था मी केली आहे. आपण दोघांनी मिळून विजयला या तारांमध्ये अडकवायचं. Shock
लागून तो जागीच खपेल. काम झाल्यावर आपण तिथून निघून जायचं. मी रात्रीच पुण्याला
जाईन. सकाळी नोकर मंडळी येतील तेव्हा असं दिसेल की विजयने इस्टेटीसाठी दादाला
मारलं आणि परत जाताना इलेक्ट्रिक शॉक लागून तोही मेला. तुझ्याबद्दल कोणाला काहीच
माहित नसल्याने संशय नाही आणि मी इथे नाही त्यामुळे मीही वाचेन. Plan व्यवस्थित execute केलास तर रग्गड पैसे कमावशील. नाही, तर
स्वत:चा जीव गमावशील. आलं लक्षात... जा आता. उद्या रात्री १२ वाजता...” बोलणं बंद
झालं. माझी भीतीने वाचाच बसली. माझे भाऊ इतके नीच असतील, पैशासाठी इतक्या खालच्या
पातळीवर उतरतील असं मला स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं.” दादासाहेब बोलायचे
थांबले...
“Don’t worry साहेब. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. माझ्याकडे हे German made पिस्तूल आहे. I will shoot them like pigeons.” दादासाहेबांच्या
खांद्यावर हात ठेवत रॉकी म्हणाला. खांद्यावरचा हात झटकत दादासाहेब म्हणाले, “No, you will not. रॉकी एक गोष्ट नीट लक्षात घे. तुला इथे बोलावलं आहे ते
माझ्या संरक्षणासाठी. कोणाला मारायला नाही. अजय आणि विजय जरी माझेच भाऊ असले तरी
आमच्यात एक फरक आहे. मला त्यांना संपवायचं नाहीये. त्यांना बरबाद करायचं आहे. ते
आयुष्यातून उठले पाहिजेत. सगळ्या propertyचा trust करणार आहे मी. त्या दोघांच्या हाती काहीच लागणार नाही. पण, तोपर्यंत मला
त्यांच्यापासून वाचायचं आहे आणि म्हणूनच तुला....” दादासाहेब बोलतच होते की
घड्याळात बाराचे टोले पडले. कानावर हात ठेवत दादासाहेब म्हणाले, “O…. this bloody noice… stop it… मेंदू फुटेल माझा...” टोल्यांचा आवाज बंद झाला. दादासाहेब
कानावरचे हात काढत म्हणाले, “बारा टोले.... बारा वाजले. म्हणजे आता तयारी सुरू
होईल. एका जीवघेण्या षडयंत्राची तयारी.... रॉकी... रॉकी... चल, मला त्या
कोपऱ्यातल्या खोलीत घेऊन चल. ती जास्त safe आहे. चल, लवकर चल...”
रॉकी दादासाहेबांचा हात धरून हळू हळू त्यांना घेऊन गेला. दोघंही खोलीत आले.
दादासाहेब म्हणाले, “रॉकी, इथे मला थोडं safe वाटतंय. या खोलीत
येण्याचा हाच एक मार्ग आहे. आता तू इथेच बस.” रॉकी म्हणाला, “नाही दादासाहेब, इथे
नको. मी बाहेर थांबतो. कोणी आत येत असेल तर त्याला बाहेरच्या बाहेर थांबवेन मी.
तुम्ही आराम करा आणि दाराची कडी आतून नीट लावून घ्या. काहीही झालं तरी सकाळपर्यंत
दार उघडू नका. मी स्वत: येईन तेव्हाच दार उघडा.” रॉकी बाहेर आला. दादासाहेबांनी
आतून दार लाऊन घेतलं. सगळीकडे सामसूम होतं. दाराजवळच्या खुर्चीत बसून रॉकी पाईपचे
झुरके घेऊ लागला...
इकडे विजय खोलीत येरझरा
घालत होता. त्याच्या मनात विचारांनी थैमान घातलं होतं, “बारा वाजलेत. नरसू जागेवर
पोहोचला असेल का... त्याला कोणी पाहिलं तर नसेल ना... आणि अजयचाही पत्ता
नाहीये...” विजयच्या विचारांची मालिका खंडित झाली ती दारावर कोणीतरी “टक टक”
केल्यामुळे. “विजय, दार उघड लवकर. मी आहे अजय.” अजयचा हलक्या स्वरातला आवाज ऐकून
विजयने दार उघडले. “विजय, हे बघ papers...” अजय आत येत म्हणत होता, “वकिलाने
माणसाकरवी पाठवलेत.” विजयने अजयच्या हातातले कागद पाहिले आणि म्हणाला, “तुला एक
गोष्ट दाखवतो.” विजयने उशीखाली ठेवलेले पिस्तूल बाहेर काढले. “दादाने ऐकलं नाही तर
त्याच्या डोक्याला हे लावून काम करून घेता येईल...” अजय हसत म्हणाला, “very good idea विजय. बरं, मी खोलीत जाऊन torch घेऊन येतो. हा म्हातारा एक आंधळा आहे, पण
आपल्याला तर नीट दिसायला हवं ना.” अजयने खोलीत येऊन torch उचलला. थोडं हसून मनात म्हणत होता, “विजय, तू हुशार आहेस रे... पण मी तुझा बाप
आहे...” असा विचार करत अजयने कपाटातले पिस्तूल काढले. म्हणाला, “तुला तुझं पिस्तूल
वापरण्याची संधीच मिळणार नाही बघ...” अंधार मी म्हणत होता. पाईपचे झुरके घेत रॉकी
त्याच्याच विचारात मग्न होता. पावसाचा आणि विजांचा आवाजमात्र वेळोवेळी शांतता भंग
करू पाहत होता. इतक्यात....
“आ..........................................................”
पावसाच्या आवाजापेक्षा
वरचढ अशी आर्त किंकाळी साऱ्या बंगल्याभर घुमली. रॉकी धडपडून उठला. “दादासाहेब, काय
झालं ते पाहून येतो. तुम्ही बाहेर येऊ नका.” असं म्हणून लगोलग आवाजाच्या दिशेने
गेला. आवाज गच्चीतून आला होता. रॉकी गच्चीत आला. टाकीजवळ electric wiresवर काळाठिक्कर
पडलेला एक मृतदेह त्याला दिसला. बाजूला अजय आणि विजय उभे होते. रॉकी जवळ गेला.
अजयने त्याला विचारलेच, “तुम्ही कोण आणि इथे काय करताय...” रॉकीने उत्तर दिले, “मी
रॉकी. तुमच्या दादासाहेबांचा bodyguard. बाकी ओळखपरेड आपण नंतर करू. आधी या
मेलेल्या माणसाबद्दल बोलू. कोण आहे हा...” अजयचे डोळे विस्फारले होते. हातातल्या
कड्यावरून त्याने ओळखले होते की हा परश्याच आहे पण तो काहीच बोलला नाही. विजय जवळ
आला म्हणाला, “घरच्या नोकरांपैकी नाही, कारण आज सर्व सुट्टीवर आहेत. मला वाटतं हा
एखादा चोर असेल. पावसाचा आणि अंधाराचा फायदा घेऊन आला असेल आणि shock लागून मेला
असेल. पण या इथे या खुल्या electricच्या तारा सोडल्या कोणी...” रॉकी उठला.
म्हणाला, “ते शोधणं पोलीसांचं काम आहे. पण त्यांना कळवायला phone lines dead आहेत.
शिवाय अशा पावसात तिथवर जाणंही कठीण आहे. आता सकाळपर्यंत वाट बघण्याखेरीज गत्यंतर
नाही. ही गच्ची बंद करू आणि सकाळपर्यंत वाट बघू. तिघंही बाहेर पडले आणि रॉकीने
गच्चीला कुलूप लावले. अजय आणि विजय त्यांच्या त्यांच्या खोलीत गेले आणि रॉकी
दादासाहेबांकडे वळला...
रॉकी खोलीजवळ पोहोचला
तेव्हा दादासाहेब दार वाजवत होते आणि हलक्या आवाजात रॉकीला बोलावत होते. “दादासाहेब,
दार उघडा, मी आहे रॉकी.” रॉकी दाराजवळ येत म्हणाला. दादासाहेबांनी दार उघडले आणि
रॉकी आत आला. दादासाहेबांनी लगेच रॉकीचा हात धरला आणि विचारू लागले, “रॉकी, बाहेर
काय झालं... कोण ओरडलं... क...काय.... म....मी....” दादासाहेबांना दिलासा देत रॉकी
बोलता झाला, “दादासाहेब calm down. बातमी चांगलीही आहे आणि वाईटही. विजयचा मारेकरी
बनवून ज्याला अजयने गच्चीत लपवले होते तो परश्या त्याचप्रमाणे electric wiresचा shock
लागून मेला.” हे ऐकून दादासाहेब थरथरू लागले. खुर्चीत बसले. म्हणाले, “ह...हे कसं...
क...काय... क...कोण...” “माझा अंदाज आहे, अंधारात wires नक्की कुठे आहेत ते
परश्याला कळलं नसेल आणि...” खिडकीजवळ जात रॉकी म्हणत होता. दादासाहेब त्याला मधेच
तोडत म्हणाले, “रॉकी, तूच तर हे कृत्य केलं नाहीस ना...” रॉकी हे ऐकून चकित झाला.
दादासाहेबांजवळ येत म्हणाला, “नाही दादासाहेब मी काहीच केलं नाही. आहो तो माणूस
मेला तेव्हा मी इथे बाहेरच बसलो होतो. साहेब माझ्यावर संशय घेऊ नका साहेब...
मी...” रॉकी बोलतच होता की... “खळ..... ळळळळळळळळळळळळळळ.....”
खालून काच तुटण्याचा
प्रचंड मोठा आवाज आला. “दादासाहेब, तुम्ही इथेच थांबा. मी बघून येतो.” असं म्हणून
रॉकी आवाजाच्या दिशेने धावला. तो खाली आला तेव्हा दिवाणखाण्याच्या एका कोपऱ्यात
असलेल्या काचेच्या टेबलाचा चक्काचूर झाला होता. त्यावर एक माणूस पडला होता.
त्याच्या डोक्यापासून गळ्याभोवती कापड असल्याने चेहरा दिसत नव्हता. रॉकीने थोडे
कापड बाजूला केले आणि torch मारला तेव्हा जीभ बाहेर असलेला डोळे उघडे असलेला चेहरा
समोर आला. बाजूलाच एक देशी पिस्तूल पडलं होतं. काही क्षणातच अजय आणि विजय खाली
धावत आले. रॉकीने त्या माणसाची नाडी तपासली आणि नकारार्थी मान हलवत उठला. म्हणाला,
“He is dead. कदाचित हा इसम अंधारात पडद्यात अडकला असेल आणि स्वत:ला
सोडवण्याच्या नादात तोल जाऊन खाली पडला असेल. पण पडला तरी कुठून हा... आणि मेला कसा...”
अजय आणि विजय दोघं पुढे आले. चेहरा पाहून विजयची वाचाच गेली असावी... तो मेलेला
माणूस नरसू होता. विजयला घाम फुटला. अजयने कापड पाहिलं. म्हणाला, “अरे, हा तर
दुसऱ्या मजल्यावरच्या दाराला लावलेला पडदा आहे. म्हणजे हा माणूस दुसऱ्या
मजल्यावरून खाली पडला तर...” रॉकी म्हणाला, “त्याचा चेहरा बघा एका बाजूला कलला आहे
आणि डोक्यावर जखम आहे. याचा अर्थ हा इसम दुसऱ्या मजल्यावर होता आणि खाली पडला तो
थेट डोक्यावर. त्यामुळे त्याची मान मोडली असावी आणि तो मेला असावा... पण हे
पिस्तूल... कोण असावा हा इसम... तुमच्यापैकी कोणी याला ओळखतं का...” अजय आणि विजय
दोघांनी नकारार्थी मान हलवली. रॉकी बोललाच, “आवाज ऐकताक्षणीच मी इथे आलो. तुम्ही
दोघं कुठे होता... हे काम तुमच्यापैकी कोणाचं तर नाही ना...” “Shut up will
you...” अजय रागाने म्हणाला. तो पुढे काही बोलणार इतक्यात रॉकी म्हणाला, “असो. मी
दादासाहेबांजवळ जातो. ते एकटेच आहेत.” असं म्हणून रॉकी वर निघून गेला...
रॉकी वर आला. खोलीजवळ
येऊन पाहतो तर दार उघडं होतं. रॉकी आत गेला. खोलीत कोणीच नव्हतं. “आवाज ऐकून मी
खाली गेलो तेव्हा हा दरवाजा उघडा होता. आता परत आलोय तर दादासाहेब खोलीत नाहीत.
म्हणजे मला दादासाहेब... आवाज ऐकून मी खाली जाणार हे त्यांना माहित होतं. पण...
दादासाहेब त्यांच्या खोलीत नसून इथे आहेत हे कसं काय समजलं त्यांना... Yes... तो
परश्या मेला तेव्हा दादासाहेब दार वाजवत होते. बहुतेक तेव्हाच कळलं असावं... I
took them too lightly... मला दादासाहेबांना शोधायला हवं...” हा विचार करून रॉकी
इतर खोल्यांमध्ये शोधू लागला. दादासाहेबांचा शोध घेत असतानाच... “ठो.........” गोळीच्या
आवाजाने रॉकी थबकला. लगेच खाली आला. दिवाणखान्यात कोणीतरी खाली पडलं होतं. रॉकीने
torch मारला. गोळी लागून गतप्राण होऊन विजय जमिनीवर पडला होता. त्याचं पिस्तूल
त्याच्या हातापासून थोडं लांब पडलं होतं आणि हातात पिस्तूल घेऊन अजय समोर उभा
होता. “अजय.... तू...” रॉकी काही बोलणार इत्क्यात अजय पिस्तुलाची नळी रॉकीकडे वळवत
म्हणाला, “Dont move रॉकी... याला मारायलाच हवं होतं... मला मारण्याचा plan बनवत
होता बेटा... या माणसाला विजयनेच इथे बोलावलं होतं. याच्या मदतीने माझा काटा
काढायचा विचार होता त्याचा. तू वर गेल्यावर मी या माणसाचा mobile चेक केला तेव्हा
सर्व गोष्टींचा उलगडा झाला. विजय इतकं डोकं लावेल हे मला माहित नव्हतं. मला तर
खात्री आहे, गच्चीत पडलेल्या त्या माणसाचादेखील खून झाला असणार... काही अपघाताने
मेला नाही तो... या विजयनेच...” अजयला मध्येच तोडत रॉकी म्हणाला, “वाह अजय. बरोबर
बोललास तू... या दोन्ही माणसांचा अपघात नसून खून आहेत. पण यात एक गोम आहे... हे
दोन्ही खून... मी केले आहेत...”
हे ऐकून अजय चक्रावला आहे
पाहताच रॉकीने बाजूला ठेवलेलं showpiece अजयच्या हातावर मारलं. अजयचं पिस्तूल खाली
पडलं. ते उचलायला अजय पुढे सरसावला तर रॉकीने त्याचं पिस्तूल बाहेर काढून अजयवर
रोखलं. म्हणाला, “Hold it अजय... अरे सूड घेण्यासाठी ज्या संधीची मी दोन वर्ष वाट
पाहिली, ती अशी जाऊ देणार नाही मी... मी रॉकी नाही. माझं खरं नाव राघव आहे...
राघव...” राघव हे नाव ऐकताच अजयचे डोळे विस्फारले. तो कसा बसा बोलला, “राघव...
म...म्हणजे त...तू...” अजयला मधेच तोडत राघव म्हणाला, “हो... राघव... तुमच्या
कारखान्यात काम करणारा एक पगारी नोकर ज्याला २ वर्षांपूर्वी चोरीचा आरोप ठेऊन
तुम्ही तिघांनी गजाआड केलंत. असा काय मोठा गुन्हा होता माझा... गोडाऊनमधला माल
चोरून blackने विकला इतकाच... तुम्हा तिघांनी मनावर घेतलं असतंत तर मी वाचलो असतो.
पण तुम्ही दोघं आणि तुमचे ते दादासाहेब... कोणालाच पाझर फुटला नाही. दोन वर्ष त्या
कोठडीत मी सुडाच्या आगीत जळत राहिलो. बाहेर आलो तेव्हा मनातल्या सुडाची जागा
पोटातल्या भुकेने घेतली. मी त्याच वकीलसाहेबांकडे पुन्हा गेलो ज्यांनी पाच
वर्षांपूर्वी माझ्या नोकरीसाठी दादासाहेबांकडे शब्द टाकला होता. त्यांनी मला मदत
करायची हमी दिली. मी तिथून निघालोच होतो की तुला येताना पाहिलं. तुला पाहून मनातला
सूड पुन्हा वर आला. मी दारामागे उभा राहून तुमचं सगळं बोलणं ऐकलं आणि माझ्या
लक्षात आलं की तू आणि विजय काहीतरी कट रचताय. बंगल्यात शिरकाव कसा करावा याचा
विचार करत असताना दादासाहेबांच्या सेक्रेटरीचा, आपटेचा फोन आला. दादासाहेबांना
म्हणे bodyguard हवा होता. मी समजलो, तुम्ही दोघं आजच तुमचा plan execute करणार...
मी इथे आलो. मोठ्या विश्वासाने दादासाहेबांनी मला तुमचा plan तर सांगितलाच शिवाय
तुम्ही दोघांनी एकमेकांना मारण्यासाठी माणसं बोलावली आहेत हेदेखील सांगितलं. मी
तेव्हाच ठरवलं... तुमचा plan तुमच्यावरच उलटवायचा...
दादासाहेबांच्या
खोलीपासून गच्ची आणि तो लोखंडी जिना easily accessable नव्हता. काय करावं याचा
विचारच करत होतो की दादासाहेबांनी त्यांना दुसऱ्या खोलीत न्यायला सांगितलं. या
खोलीतून गच्चीजवळच होती. दादासाहेबांनी दार लाऊन घेतलं आणि मी तडक कामगिरीवर
निघालो. पहिला नंबर लागला नरसूचा... नरसू जिन्याखाली लपून बसला होता. त्याला gun
pointवर बाहेर काढलं आणि तो काही प्रतिकार करण्याच्या आत मान मोडून त्याला संपवलं.
त्याच्या प्रेताला दुसऱ्या मजल्यावर पडद्यात अडकवून ठेवलं. मला खात्री होती की
वजनामुळे ते प्रेत खाली पडेल. नरसूचा खात्मा करून मी परश्याकडे वळलो... गच्चीत
टाकीखाली लपून बसलेला परश्या मला पाहून गांगरला आणि त्याने माझ्यावर हल्ला केला. आमच्यात
थोडी हाणामारी झाली आणि मी परश्यावर control मिळवला. त्याचे हात आणि तोंड बांधून
ठेवलं. Circuit बंद केलं. Switchला तार जोडून एक टोक माझ्या हातात ठेवलं आणि तिथून
निघालो. परश्या “ओ.... ओ...” करत राहिला पण या पावसात त्याचा आवाज कसा आणि कोणाला
ऐकू येणार होता... मी माझ्या जागेवर येईन बसलो. पाईप पेटवला आणि हातातली तार ओढली.
Switch on झालं. Circuitमधून निघालेल्या currentने आपलं काम चोख केलं. परश्यासोबत
त्याला बांधलेले दोरसुद्धा जाळून गेले आणि तार माझ्याकडे आली. अपघाती मृत्यू...
मला वाटलं सर्वांना हेच वाटेल पण दादासाहेबांना माझा संशय आला. त्यांना इतक्यात
माझं खरं रूप कळायला नको होतं. कारण तुम्ही दोघं अजून जिवंत होतात. मी त्यांना
सामजावतच होतो की नरसूचं प्रेत पडद्यासकट खाली पडलं. माझ्यावरचं बालंट आपोआपच दूर
झालं. आता राहिलात तुम्ही तिघं. मला वाटलं तुम्ही एकमेकांना संशय घेऊन मारून टाकाल
आणि दादासाहेबांना मी संपवून टाकेन. पण हा विजय अगदीच कचखाऊ निघाला. तुला न मारताच
मेला... हरकत नाही. Now get ready to die...” असं म्हणत राघवने पिस्तूल पुन्हा
अजयवर रोखलं. आधीच घाबरलेला अजय कसा-बसा बोलला, “र... राघव... न...नको... म...मी...”
“ठो...” राघवच्या पिस्तूलातून सुटलेल्या गोळीने अजयच्या छातीचा वेध घेतला आणि
“आ...क....क....आ....” अशा अस्पष्ट किंकाळीनिशी अजय कोसळला...
“Its all in the game
अजय... No hard feelings my friend...” अजयच्या प्रेताजवळ येत राघव म्हणाला.
त्याने विचार केला, “सगळे संपले. आता तो दादासाहेब राहिला... बस... त्याला मारलं
की...” राघव दादासाहेबांना शोधात निघाला, “दादासाहेब... कुठे आहात दादासाहेब...
आनंदाची बातमी... तुमचे सगळे शत्रू त्यांच्याच मौतीने खापलेत... दादा...” राघव
दादासाहेबांना शोधतच होता की त्याच्या हातावर काहीतरी आदळलं आणि हातातली torch व
पिस्तूल खाली पडले. “थप...थप...थप...” टाळ्यांच्या आवाजाने टाळ्यांच्या आवाजाने
राघव थबकला. “काय म्हणू तुला... रॉकी... की राघव...” राघव जागीच खिळला होता.
अंधारात आवाजाचा कानोसा घेत होता... दादासाहेब बोलत होते, “कुठे पाहतो आहेस... मी
इथेच आहे. तू मला पाहू शकत नसलास तरी मला तुझं अस्तित्व जाणवतंय... कारण अंधार हे
माझं साम्राज्य आहे... त्यामुळे जिथे आहेस तिथेच उभा रहा... जरा जरी हालचाल केलीस
तर... तुला काय वाटलं... तू रॉकी नसून राघव आहेस हे मला माहित नाही... अरे आपटेने
जेव्हा तुझं वर्णन केलं तेव्हाच मी तुला ओळखलं होतं... मला वाटलं तुला पश्चात्ताप
झाला असेल... तुला एक संधी द्यावी म्हणून माझा bodyguard म्हणून तुला इथे
बोलावलं... पण तू... सुडाने वेड्या झालेल्या तुझ्यासारख्या सैतानाला कसला
पश्चात्ताप... त्या नरसूला पहायला तुम्ही सगळे खाली आलात त्याच वेळी मीही तुमच्या
मागोमाग खाली आलो आणि लपून बसलो. तुम्ही कोणीच मला पाहू शकला नाहीत कारण मी
दुसऱ्या रस्त्याचा उपयोग केला... राघव... या वाड्यात जन्म गेलाय माझा... सगळे छुपे
रस्ते आणि चोर दरवाजे माहित आहेत मला... मी इथे आलो आणि तुझ्याबद्दल सगळं समजलं
मला... राघव... तुला क्षमा नाही...”
राघवला कोणीच दिसत
नव्हतं. नुसता आवाज ऐकू येत होता. “Hello... प....पोलीस स्टेशन... म.....मी
दादासाहेब इनामदार बोलतोय.... इंद्रधनू बंगल्यावरून.... स....साहेब लवकर या...
माझ्या जिवाला धोका आहे.... म... माझे भाऊ.... माझ्या जीवावर.... न...
ना.....ही....” हे शब्द ऐकून राघव काही करायच्या आधीच, “ठो.... ठो....” पिस्तूलातल्या
गोळ्या राघववर चालवल्या गेल्या. Phone जमिनीवर आपटला गेला. राघव जमिनीवर कोसळला.
धडपडत थरथरत्या हातांनी राघवने पडलेला torch वर उचलला. विजयाच्या प्रेताजवळ
दादासाहेब बसले होते. त्यांच्या हातात gloves होते आणि एका हाताने विजयचा हात धरला
होता. विजयकारवीच दादासाहेबांनी राघववर गोळ्या झाडल्या होत्या. रक्ताळलेला हात
पुढे नेत राघवने प्राण सोडले. राघव मेला याची खात्री करून दादासाहेब उठले.
विजयच्या खोलीतले willचे papers टेबलवर पसरले. अजयच्या जवळ पडलेल्या पिस्तुलाला
silencer लावून एक स्वत:च्या दंडावर मारून घेतली. gloves आणि silencer लपवून ठेवले
आणि मुख्य दारासमोरील खुर्चीमागे लपून बसले. पावसाचा आणि विजांचा काय तो आवाज
होता. बाकी भयाण शांतता...
“ठक ठक ठक धडधड धडधड....”
“दादासाहेब दार उघडा... मी सिनीयर इंस्पेक्टर प्रधान... दादासाहेब...” सिनीयर
इंस्पेक्टर प्रधान दार वाजवत दादासाहेबांना आवाज देत होते. कोणीच दार उघडत नाही
असं कळल्यावर ते त्यांच्या सहकाऱ्यांकडे वळत म्हणाले, “दार आतून बंद आहे. आपल्याला
ते तोडावं लागेल. चला लवकर. प्रधान आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लाथा हाणून दार
उघडले. पोलीसांची कुमक आत आली. लाईट अजून आले नव्हते. सर्वांनी torch उघडले. दिवाणखान्यात
चार मृतदेह पडले होते. तीन दिवाणखान्याच्या मधोमध होते तर एक दिवाणखान्याच्या एका
कोपऱ्यात होता. चारही मृतदेहांच्या आजूबाजूला एकेक पिस्तूल पडलं होतं. तपासणी सुरू
झाली. एका हवालदाराला खुर्चीमागे हालचाल जाणवली. पाहिलं तर भेदरलेले दादासाहेब अंग
चोरून बसले होते. त्यांच्या हाताला जखम झाली होती. प्रधानांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी
दादासाहेबांना खुर्चीत बसवलं. प्रधान त्यांच्या बाजूला येऊन बसले, “दादासाहेब, मला माहित आहे ही वेळ नाही पण काय घडलं ते
सांगू शकाल का...” दादासाहेबांनी होकारार्थी मान हलवताच त्यांनी constableला statement लिहून घ्यायला सांगितले. दादासाहेब बोलू लागले’ “इस्टेटीसाठी माझे भाऊ अजय आणि विजय मला
मारण्याचा कट रचत होते. त्यांच्या मदतीसाठी अजून दोघं होते. मला माझ्या जिवाची
खात्री वाटेना म्हणून मी रॉकीला माझा bodyguard म्हणून इथे बोलावलं. ते मदतनीस काही करतील इतक्यात अपघाताने
ते स्वत:च मेले. वकिलाने पाठवलेल्या willच्या papersवर माझ्या सह्या मिळवण्यासाठी अजय आणि विजय मला पिस्तूलांच्या जोरावर इथे घेऊन
आले. इतक्यात रॉकीपण आला. तिघांमध्ये बाचाबाची झाली. गोळीबार झाला. माझ्या दंडाला
एक गोळी चाटून गेली. मी खाली पडलो. एका मागोमाग “धप” असे तीन आवाज आले. सगळंच शांत झालं होतं...”
दादासाहेब बोलायचे
थांबले. प्रधानांनी wirelessवरून संपर्क साधला. “Hello, control room, मी सिनीयर इंस्पेक्टर प्रधान बोलतोय. इंद्रधनू बंगल्यावर ताबडतोब ambulance पाठवा. आणि हो, डॉक्टरसुद्धा. इनामदारसाहेब
जख्मी झालेत.” प्रधान दादासाहेबांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, “दादासाहेब, खूप मोठ्या संकटातून वाचला आहात तुम्ही. आम्ही
या bodies ताब्यात घेतो. तुम्हाला उपचाराची
गरज आहे. डॉक्टर येतीलच इतक्यात. आणि तुमच्या संरक्षणासाठी constable पानसरे इथे तैनात राहतील. पानसरे, जरा लक्ष ठेवा...” सिनीयर इंस्पेक्टर प्रधान आणि बाकी पोलीस कुमक
तिथून निघून गेली. Constable पानसरे अजून काही धागेदोरे मिळतात का पाहू लागले. बाजूलाच असलेल्या आरशात
दादासाहेबांचा चेहरा दिसत होता. त्यांच्या चेहऱ्यावर विजयी हास्य उमटलं होतं. आणि
डोळ्यात एक वेगळीच जरब दिसत होती...
निशांत...
No comments:
Post a Comment