“Welcome sir, welcome to this institute. आमच्या सर्वांतर्फे मी
श्रीनिवास गोडबोले, सरस्वती कॉलेजचा वाईस प्रिंसिपॉल तुमचं मनापासून स्वागत करतो.”
पुष्पगुच्छ देत गोडबोले सर आपटे सरांचं स्वागत करत म्हणाले. कॉलेजचे नवे प्रिंसिपॉल
म्हणून आपटे सरांनी आजच सूत्र हाती घेतली होती. गोडबोले सर पुढे म्हणाले, “सर,
इथला स्टाफ खूप मेहनती आहे शिवाय इथे शिकणारी मुलंही सुसंस्कृत, हुशार आणि creative आहेत. तुम्हाला तक्रारीला कधीच
वाव मिळणार नाही बघा. उलट तुम्ही खूप एन्जॉय कराल इथे.” “या आधी मी गायकवाड
कॉलेजमध्ये वाईस प्रिंसिपॉल होतो. ते कॉलेज तसं लहान होतं पण हे कॉलेजपण मोठं आहे
आणि जबाबदारीसुद्धा. माझी खात्री आहे. तुम्ही सर्व मला मदत कराल, मला समजून
घ्याल.” आपटे सर हसत म्हणाले. सर्वांची ओळख झाली, हस्तांदोलनं झाली आणि सर्व
आपापल्या वर्गाकडे जाऊ लागले. “बापट सर, जरा थांबा.” आवाजाने बापट सर मागे वळले. आपटे
सर म्हणाले, “मी मघापासून पाहतोय, तुम्ही गप्प गप्प आहात. तुम्हाला काही बोलायचं
आहे का....” बापट सर थोडे गांगरले. म्हणाले, “त... तसं नाही सर. पण... तुम्ही
इथे... क... काही नाही सर. आज तुमचा पहिला दिवस आहे. आपण नंतर बोलू.” पाठमोऱ्या
बापट सरांना पाहत आपटे सर तसेच उभे राहिले...
दिवसभराचे काम संपले होते. कॉलेज सुटून सर्व
विद्यार्थी आणि शिक्षक निघून गेले होते. आवरा-आवर करून आपटे सर निघणार इतक्यात
जोराचा पाऊस सुरू झाला. पहिल्या दिवसाच्या घाईगडबडीत आपटे सर छत्री विसरून गेले
होते. आता पाऊस थांबण्याची वाट बघण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. आपटे सरांनी
विचार केला, “अनायसे इथे बसलोच आहोत तर या कपाटातल्या पुस्तकांचा आस्वाद घेऊ...”
आपटे सर पुस्तक काढून वाचू लागले. वाचता वाचता ते इतके मग्न झाले की वेळेचं भानच
उरलं नाही. जोराचा वारा आला आणि “खा.....ड......” खिडकी उघडली गेली. आपटे सर
भानावर आले. त्यांनी घड्याळात पाहिले तर १०.३० झाले होते. बराच उशीर झालेला पाहून
त्यांनी लगबगीने सर्व आवरले. खिडकी बंद करून ते बाहेर पडणार इतक्यात
“खा.....ड......” खिडकीचं तावदान पुन्हा उघडलं गेलं. वाऱ्याच्या जोरदार झोतासरशी
टेबलवर ठेवलेली घंटा खाली पडली. घंटा उचलायला सर खाली वाकले तर ती पुढे सरकून
दाराबाहेर गेली. एका क्षणासाठी आपटे सर स्तब्ध झाले. त्यांनी विचार केला,
“वाऱ्यामुळे झालं असेल बहुतेक...” त्यांनी खिडकी बंद करून कडी लावली आणि पुन्हा
घंटा उचलायला गेले तर ती तशीच पुढे सरकत लॉबीमध्ये गेली. आता मात्र आपटे सर
घाबरले. वारा नसताना घंटा पुढे कशी सरकली, हा विचार करत असताना पुन्हा घंटा पुढे
सरकलेली पाहून आपटे सरांनी तिथून पळ काढला. त्यांच्या मनातमात्र शंकांनी थैमान
घातलं, “खिडकी बंद केली असताना ती आपोआप कशी उघडली...? पहिल्यांदा घंटा वाऱ्यामुळे
पडली... पण नंतर ती पुढे कशी सरकली... हे काहीतरी वेगळंच प्रकरण आहे... याचा छडा
लावलाच पाहिजे...
दुसऱ्या दिवशी आपटे सरांनी त्यांच्या केबिनचे
दार उघडले. पाहतात तर घंटा टेबलवर तिच्या जागी ठेवलेली. आपटे सरांनी घंटा उचलली,
जरा उलट-सुलट केली आणि वाजवली. “साहेब, मला बोलावलंत...” आपटे सर घंटा पाहतच होते
की शिपायाचा आवाज आला. अचंभित झालेले आपटे सर म्हणाले, “मी, नाही तर...” शिपाई लगेच
म्हणाला, “साहेब, घंटा वाजवलीत ना...” आपटे सरांनी एकवार घंटेकडे पाहिलं. म्हणाले,
“अरे घंटा खाली पडली धक्का लागून. म्हणून आवाज आला असेल. तू जा आणि बापट सरांना
पाठवून दे...” शिपाई बाहेर गेला आणि आपटे सर घंटेकडे पाहत बसले. ती एक साधीच घंटा
होती. घंटा न्याहाळत असताना, “सर, आत येऊ का...” बापट सरांचा आवाज आला. बापट
सरांना पाहताच आपटे सरांनी त्यांना आत घेत दार लावले. म्हणाले, “बापट सर, माझ्या
पहिल्या दिवशी आपण सर्व इथे जमलो होतो तेव्हा तुम्ही जरा अस्वस्थ होतात. काय झालं
सर... काय सांगायचं होतं तुम्हाला...” बापट सर बराच वेळ शांत होते. धीर एकवटून
म्हणाले, “सर, मी विचार करत होतो. तुम्ही जॉईन तर झालात पण किती दिवस इथे टिकू
शकाल... नाही, तुम्हाला राग आला असेल तर माफ करा पण माझ्या म्हणण्याला एक कारण आहे
सर. गेल्या चार वर्षात अनेक प्रिंसिपॉल आले, पण कोणीही १२-१५ दिवसांपेक्षा जास्त
काळ राहू शकलं नाही इथे. सुरुवाती सुरुवातीला सर्व नॉर्मल असायचे पण हळू हळू ते
बदलायचे. जणू कसल्यातरी भीतीच्या सावलीखाली राहत असत. आणि १२-१५ दिवसातच ते पळून
जात. या सर्वांच्या भीतीचं कारण आम्हाला आजवर कळलं नाही. मी तर दोन वर्षांपूर्वी
आलो इथे पण गोडबोले सर खूप जुने आहेत. कदाचित त्यांना काही माहित असल्याची शक्यता
आहे.” बापट सर बोलायचे थांबले. आपटे सरांनी गोडबोले सरांना विचारायचे ठरवले पण
त्या आधी या घंटेचं काय प्रकरण आहे ते शोधायचं त्यांनी मनाशी पक्कं केलं...
लेक्चर्स संपली. कॉलेज सुटलं. सगळे विद्यार्थी
आणि शिक्षक आपापल्या मार्गाने गेले. आपटे सर तिथेच बसून राहिले. सात वाजले, नऊ
वाजले, बघता बघता दहा वाजले तरीही काहीच घडत नव्हतं. आपटे सरांना खात्री होती.
नक्कीच काहीतरी घडेल... आणि झालंही तसंच... अकराच्या सुमारास वाऱ्याची एक झुळूक
त्यांच्या कानाला स्पर्शून गेली. आपटे सरांनी बसलेल्या खुर्चीचे दोन्ही हात घट्ट
पकडले. पुन्हा आलेल्या वाऱ्याने टेबलवरची घंटा खाली पडली. आपटे सर लगेच उठले आणि
घंटेमागे जाऊ लागले. लॉबीमधून घंटा पुढे सरकत जिन्यापर्यंत आली. आपटे सर मागे
होतेच. त्यांच्या डोळ्यांदेखत घंटा हवेत उचलली गेली आणि अधांतरी उभी राहिली. ती
पकडायला आपटे सर पुढे सरसावले. घंटा जिन्याच्या बाजूला असलेल्या कठड्यावरून सरकत
वर जाऊ लागली. पाठलाग करत करत आपटे सर पाचव्या मजल्यावर आले. पाचव्या मजल्याच्या
दारात पडलेल्या घंटेला सरांनी पायाने हलवले. काही हालचाल नाही झाली तेव्हा त्यांनी
घंटा उचलली. अवती भोवती नजर फिरवली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की इथे खूप
धूळ-माती आहे, जळमटांनी भिंती भरलेल्या आहेत. जणू काही बराच काळ हे वर्ग बंदच आहेत
असं वाटत होतं. आपटे सर जसजसे पुढे जात होते तसतसे त्यांना हसण्याचे आणि
“म....मला.... स....सो....डा....” असं कोणीतरी आर्ततेने ओरडत आहे असे आवाज येऊ
लागले. आवाजांचा माग काढत आपटे सर पार शेवटपर्यंत गेले. शेवटी एक दार होते. त्याला
“Police line do not cross” अशी पट्टी लावली होती पण
इतर दारंमात्र साध्या कुलुपाने बंद केली होती. आपटे सरांनी त्या सीलबंद दाराला कान
लावला आणि, “म....मला सो...डा... म....म्या....क....का....य.... ना....य....” असा
विव्हळण्याचा आवाज आला. शिवाय “लटकवा त्याला पंख्याला....” असाही आवाज आला. आपटे
सरांनी दार वाजवताच सर्व शांत झालं. त्यांना हा काय प्रकार आहे ते समजेना. या
प्रकरणाच्या मुळाशी जायचंच असा त्यांनी निश्चय केला...
दुसऱ्या दिवशी लेक्चर्स सुरू होण्याआधी आपटे
सरांनी बापट सरांना आणि गोडबोले सरांना बोलावले. ते म्हणाले, “मला जॉईन होऊन आज
दोन दिवस झालेत. या दोन दिवसात मला इथे काही विचित्र घटनांचा अनुभव आला आहे. त्या
घटनांचा आणि या घंटेचा काहीतरी संदर्भ आहे असं मला वाटतं. शिवाय आपलं कॉलेज इतकं
चांगलं असताना पाचव्या मजल्यावरील वर्ग रिकामे का... बरं, रिकामे तर रिकामे, पण
त्यातील एक वर्गाला पोलीसांची पिवळी पट्टी का लावली आहे... काय मामला आहे हा
सारा... बापट सरांनी सांगितल्याप्रमाणे असेच काहीसे अनुभव इतर प्रिंसिपलांनाही आले
होते मग त्याची दखल का घेतली गेली नाही... मला हे सगळं समजलं पाहिजे... गोडबोले सर
तुम्ही तर फार जुने आहात ना इथे... मग सांगा मला...” गोडबोले सरांनी कोणी ऐकत तर
नाही ना याची खात्री करून घेतली आणि ते बोलते झाले, “सर पाचव्या मजल्यावर ती
कोपऱ्यातली खोली एकेकाळी आपली सायन्सची प्रयोगशाळा होती आणि त्याला पोलीसांनी
सीलबंद केलं आहे. चार वर्षांपूर्वीची ही घटना आहे. आपल्या कॉलेजचा एक रामदास म्हणून
शिपाई होता. तसा कामाला बरा होता पण त्याला कानाने फार कमी ऐकू यायचं. दहा वेळा
बोलावलं की कुठे त्याला ऐकू जायचं. तेव्हाचे प्रिंसिपल मोरे साहेबांनी मग रामदासला
बोलवायला म्हणून ही घंटा मागवली. पुढे शिपायाला बोलवायचं तर घंटा वाजवायची असा
अलिखित नियमाच पडला. सगळं सुरळीत चालू होतं. एक दिवस अचानक रामदास गायब झाला. एका
साध्या शिपायाला कोण शोधायला जातंय सर... असेल इथेच कुठेतरी असा विचार करत मोरे
सरांनी त्याचा नाद सोडून दिला. पण मी त्याला शोधायला प्रयोगशाळेत गेलो तेव्हा
पंख्याला लटकलेला रामदासचा मृतदेह सापडला. त्याच्या शर्टाच्या खिशात एक चिठ्ठी
होती, ज्यावर लिहिलं होतं, “पैशासाठी मी हे कृत्य केलं... पण आता पकडला जाईन या
भीतीपोटी मी स्वत:ला संपवत आहे...”
“काय... रामदासने आत्महत्या केली... पण का...”
बापट सरांनी सवाल उठवला. गोडबोले सर बोलू लागले, “सांगतो. कॉलेजमध्ये एक मृत्यू
झाला होता म्हणून पोलीसांना बोलावणं भाग होतं. त्यांनी तपास केला. रामदासच्या
सामानाची आणि त्याच्या खोलीची झडती घेतली. त्यात त्यांना ड्रग्सचा साठा सापडला.
उत्तर सोप्पं होतं. कॉलेजच्या आड रामदास ड्रग्सचा धंदा करत होता आणि पकडला जाईल या
भीतीमुळे त्याने आत्महत्या केली. मोरे साहेबांच्या सांगण्यावरून पोलीसांनी केस
फाईल बंद केली. पुन्हा कॉलेज नियमित सुरू झालं. पण दैवाच्या मनात काही वेगळंच
होतं. पुढच्या काही दिवसात कॉलेजचे सायन्सचे प्रोफेसर डिसिल्वा आणि रामदास सोबतचा
शिपाई चतुर्वेदी, हे दोघं एकाएकी गायब झाले आणि त्यांचे मृतदेह त्याच प्रयोगशाळेत
तसेच लटकलेले सापडले. मोरे साहेबांनी या प्रकरणाचा धसका घेतला आणि त्यांनी
कॉलेजमधून पळ काढला. महिन्याभराने त्यांचा राजीनामा पोस्टाने आम्हाला मिळाला.
प्रोफेसर डिसिल्वा आणि शिपाई चतुर्वेदी यांच्या मृत्युचं कारण शोधण्याचा पोलीसांनी
आटोकाट प्रयत्न केला पण त्यांच्या हाती काही लागलं नाही. शेवटी त्यांनी प्रयोगशाळा
बंद केली आणि ही पट्टी लावली. प्रोफेसर डिसिल्वा आणि चतुर्वेदी यांचा मृत्यू कसा
झाला हे आजही आम्हाला कळू शकलेलं नाही.” गोडबोले सर गप्प झाले. बापट सर आणि आपटे
सर स्तब्ध उभे होते. लेक्चर्सची वेळ झाली तसे गोडबोले सर आणि बापट सर आपापल्या
वर्गाकडे गेले. आपटे सर विचार करू लागले, “गोडबोले सर म्हणत होते रामदासने
आत्महत्या केली. का... तर तो करत असलेल्या ड्रग्सच्या वाईट व्यवसायामुळे. असं जर
आहे तर ती घंटा मला त्याच प्रयोगशाळेकडे का घेऊन गेली... शिवाय ते आवाज, “मला
सोडा... मी नाही...” नाही, दिसतं तसं हे सगळं सरळ नाही... काहीतरी वेगळा प्रकार
आहे हा. मला शोधून काढायलाच हवं... मोरे साहेबांच्या वेळेपासून पाचव्या
मजल्यावरच्या त्या खोल्या बंद आहेत म्हणजे त्यांच्या चाव्या याच खोलीत असायला
हव्यात.” असं म्हणत आपटे सरांनी खोलीत शोधाशोध केली. टेबलातले सारे खाण, कपाट सगळं
शोधत असताना कपाटातल्या आतल्या खणात ठेवलेला किल्ल्यांचा एक जुडगा त्यांच्या हाती
लागला. त्यांनी मोजल्या तर ८ किल्ल्या होत्या. त्यांचं विचारचक्र पुन्हा सुरू
झालं, “आठ चाव्या... पाचव्या मजल्यावर सात वर्ग आणि एक प्रयोगशाळा, म्हणजे बरोब्बर
आठ वर्ग आहेत. या चाव्या पाचव्या मजल्याच्या तर नसतील... जाऊन बघायला हवं. पण
आत्ता जाण्यापेक्षा संध्याकाळी जाऊ. ते जास्त योग्य ठरेल...”
दिवसभराचं कामकाज संपलं. लेक्चर्स संपवून
प्रोफेसर्स आणि विद्यार्थी आपापल्या वाटेने निघून गेले. सर्वत्र सामसूम झाल्यावरही
आपटे सर बराच वेळ केबिनमध्येच बसून राहिले. साधारण दहा वाजता ते उठले आणि दबकत
दबकत पाचव्या मजल्यावर पोहोचले. त्यांनी पाचव्या मजल्यावर प्रवेश केला आणि त्यांना
ऐकू येणारे आवाज पुन्हा सुरू झाले, “म....मला सो...डा...
म....म्या....क....का....य.... ना....य....”, “लटकवा त्याला पंख्याला....” आपटे सर
थोडे घाबरले पण धीर करून ते प्रयोगशाळेजवळ आले. आवाज वाढतच चालले होते. पोलीसांनी
लावलेल्या पट्टीला धक्का न लावता त्यांनी आणलेल्या जुडग्यातली एकेक चावी वापरत
शेवटी त्यांनी कुलूप उघडले. दाराची कडी काढताच सर्व आवाज एकाएकी बंद झाले. आपटे
सरांनी दार ढकलले तर, “कर्रर्रर्रर्र.....” असा आवाज करत ते उघडले. आतून रसायनांचा
कुबट वास येत होता शिवाय मिट्ट काळोख मी म्हणत होता. आपटे सरांनी सोबत आणलेला torch उघडला आणि सगळीकडे नजर
फिरवली. प्रयोगशाळा तशी लहानखोरच होती. मधोमध ठेवलेली चार टेबलं, भिंतींना धरून
उभी केलेली विविध सामग्रीने भरलेली काचेची कपाटं आणि मोठा आरसा असलेलं एक भलं मोठं
लोखंडी कपाट, याखेरीज तिथे काहीच नव्हतं. आपटे सर सर्व न्याहाळत असताना वाऱ्याची
एक झुळूक त्यांच्या कानाला स्पर्श करून गेली...
आपटे सर दचकले. त्यांनी आजूबाजूला पाहिले पण
कोणीच दिसेना. शेवटी दीर्घ श्वास घेऊन ते म्हणाले, “रामदास, याच खोलीत तुझा मृत्यू
झाला असला तरी मला माहित आहे, तू अजून इथेच आहेस... तू मला बोलावलंस... हा मी
तुझ्यासमोर उभा आहे... सांग मला काय झालं तुझ्यासोबत... रामदास... रा....” आपटे सर
बोलतच होते की एका लख्ख प्रकाशझोताने त्यांचे डोळे दिपले. डोळे किलकिले करून
त्यांनी पाहिलं तर समोरच्या आरशातून हा प्रकाश येत होता. आपटे सर जसजसे आरशाजवळ
जाऊ लागले तसतसा प्रकाश कमी होत गेला. आता आपटे सर आरशासमोर उभे होते. प्रकाश
पूर्ण नाहीसा झाला होता. आपटे सरांनी आरशात पाहिलं तर त्यांच्या प्रतिबिंबाच्या
बाजूला एक धुराचा ढग तयार झाला. तो ढग नाहीसा झाला आणि शिपायाचा गणवेष परिधान
केलेला, डोळे बाहेर आलेला, गळ्याभोवती दोर अडकवलेला एक इसम आपटे सरांना दिसला. त्याच्या
चेहऱ्यावर चोर, गुन्हेगार, असे लिहिले होते. आपटे सरांनी बाजूला पाहिले तर कोणीच
नव्हते. त्यांनी पुन्हा आरशात पाहिले तर तोच इसम शांत उभा होता. “रामदास... तू
रामदास आहेस ना...” आपटे सर आरशाकडे बोट दाखवत म्हणाले. आरशातल्या त्या माणसाने
हात वर उचलला आणि सर्वत्र धुराचं वलय तयार झालं. काळ चार वर्ष मागे गेला...
“रामदास... अरे ए रामदास... ए राम्या...” मोरे
सर केबिनमधून बोंबा मारत होते. शेवटी एकदाचा रामदास उगवला. मोरे सर थोडे चिडलेलेच
होते. म्हणाले, “अरे बहिऱ्या, किती हाका मारायच्या रे तुला... घसा फुटेल की
माझा...” रामदास जरा ओशाळला. म्हणाला, “सायेब, आवं पोरांच्या कल्ल्यापाई काय बी
ऐकू येत न्हाई बगा... न आता वयसुदिक जालं न्हवं माजं... कवा कवा ह्यो कान दगा
देतुया बगा... एक डाव माफी करा...” मोरे सर लगेच म्हणाले, “तुझ्या कानासाठी उपाय
शोधला आहे मी. ही बघ घंटा. आता निदान हिचा आवाज तरी तुझ्या कानी पडेल...” घंटा
पाहत रामदास आनंदला. म्हणाला, “हे बाकी लई झाक केलं बगा तुम्मी... आता कवा बी
बोलवा... अस्सा ईन म्या...” रामदासला मध्येच थांबवत मोरे सर म्हणाले, “बरं बरं... जा
आता...” रामदास बाहेर पडला तर समोरच गोडबोले सर दिसले. ते म्हणाले, “अरे रामदास...
बरं झालं इथेच भेटलास... हे बघ सोमवारी सकाळी प्रयोगशाळेत परीक्षा आहे. त्याची
तयारी तू आजच करून ठेव. हवं तर चतुर्वेदीला घे मदतीला... जा लवकर...” गोडबोले सर
त्यांच्या वाटेने निघून गेले. “प्रिक्षा सोमवारी सकालच्या परी हाय न्हवं... मंग
आत्ता कशापाई येल घालवा... कालिज तर संपलंच हाय... निवांत ज्यावन करू, झोप काढू आन
सांच्याला करू तयारी.” असा विचार करत रामदास त्याच्या खोलीकडे वळला. वाटेत त्याला
चतुर्वेदी भेटला. “कुठे निघालास रामू...” त्याच्या सवालाला रामदास उत्तरला,
“खोलीवर जातुया... आरं गोडबोले सरांनी परयोगशालेत तयारी कराया सांगितलं हाय न्हवं,
जरा ज्यावन करून आराम करून मंग करतुया... कसं... आन तू बी ये बरं का
सांच्याला....” रामदास खोलीवर पोहोचला. जेवणाला सुरुवात करणार इतक्यात चतुर्वेदी
बाटली घेऊन तिथे आला. म्हणाला, “अरे रामू... शनिवार आहे आज... सोमवार सकाळपर्यंत
वेळ आहे आपल्याला... चल तोवर मारुया थोडी थोडी...” रामदासने आधी आढेवेढे घेतले पण
नंतर तयार झाला. दोघंही खोलीत बसले. दारूच्या नशेने दोघांना झोप येऊ लागली. पाऊस
पडू लागला. वाऱ्याच्या झटक्यासरशी भांडी खाली पडली आणि रामदासला जाग आली. बाहेर
पाहिले तर अंधार झाला होता. रामदासला तयारी करायचं आठवलं. तो तडक उठला. कॉलेजच्या
आवारात पोहोचला तेव्हा पाचव्या मजल्यावर त्याला प्रकाश दिसला. चतुर्वेदी असेल
म्हणून रामदासही वर आला...
दार ढकलताच त्याला डिसिल्वा आणि चतुर्वेदी
दिसले. टेबलवर बऱ्याच पुड्या पडल्या होत्या. काही क्षण रामदासला काहीच कळलं नाही.
त्याने समोर पडलेल्या पुढ्यातली एक फाटलेली पुडी उचलली आणि नाकाजवळ नेली. त्याला
वासाने कळमळायला लागलं. त्याने त्यातली थोडी पावडर चाखली आणि त्याचे डोळे
विस्फारले. “गर्द... तुम्ही दोघं हितं गर्द बनवता... म्या तुम्मास्नी न्हाय
सोडणार... आत्ताच पोलीसासनी घेऊन येतू...” असं म्हणत रामदास बाहेर आला. डिसिल्वा
आणि चतुर्वेदी त्याच्या मागे धावणार तोच त्याने खोलीचं दार बंद केलं आणि कडी लावली.
अंधारात चाचपडत रामदास खाली येत असताना मोरे सरांशी त्याची टक्कर झाली. “अरे अरे
रामदास जरा हळू... कुठे पळतो आहेस...” स्वत:ला सावरत मोरे सर म्हणाले. रामदास लगेच
उत्तरला, “सायेब... बरं जालं तुम्मी भेटलासा... त्यो डिसिल्वा न त्यो चतुर्वेदी
हितं गर्द बनवत हायेत... म्या सवताच्या डोळ्यांनी बगितलं... म्या पोलीसासनी
बोलवाया चाललू बगा... तुम्मी बी चला...” “अरे हो हो... जाऊया पण आधी मला तर
दाखव... अरे पुरावे नकोत का... चल... बघू...” असं म्हणत मोरे सर रामदासला घेऊन
प्रयोगशाळेकडे गेले. दार उघडून दोघं आत गेले. “अरे रामदास, कोण आहे इथे... आणि
कसली गर्द...” हे बोलत असतानाच डिसिल्वा आणि चतुर्वेदी टेबलाखालून बाहेर आले.
रामदास त्यांना पाहून मोरे सरांना खेटून उभा राहिला. म्हणाला, “बघलास सायेब... ही
दोघं हितंच हायेत... न या बगा गर्दच्या पुड्या...” “बरोबर आहे तुझं रामदास...
यांनी चूकच केली आहे... काय रे, या पुड्या अशा का ठेवल्यात... अरे इतकी महत्वाची
गोष्ट अशी उघड्यावर ठेवायची का... मूर्ख कुठले... नशीब हा रामदास माझ्या हाती
लागला... पोलीसांपर्यत पोहोचला असता तर काय झालं असतं आपलं... आता बघताय काय...
धरा याला...” असं म्हणून बाजूलाच उभ्या असलेल्या रामदासला मोरे सरांनी डिसिल्वा
आणि चतुर्वेदीकडे ढकललं. काही समजण्याच्या आत डिसिल्वा आणि चतुर्वेदीने रामदासला
पकडून त्याचा गळा आवळला. आधीच हाडकुळ्या असलेल्या रामदासने, “म....मला सो...डा...
म....म्या....क....का....य.... ना....य....” असं केविलवाण्या आवाजात ओरडत प्राण
सोडले...
“मेला वाटतं हा... पण हा इथे आला कसा... काय रे
चतुर्वेदी... तू तर बोललास रामदास झोपला म्हणून...” मोरे सर चरफडत म्हणाले.
चतुर्वेदीने रामदासच्या देहाला लाथ मारली आणि म्हणाला, “साहेब, गोडबोले सरांनी
याला प्रयोगशाळा तयार करायला सांगितली आणि हा माझ्याकडे आला. याला आपला धंदा कळू
नये म्हणून बाटलीतून थोडीशी अफू मी याला पाजली. मला वाटलं गप गार पडेल सकाळपर्यंत.
पण कसलं काय... उठला की हा...” डिसिल्वाने रामदास मेल्याची पुन्हा खात्री केली आणि
म्हणाले, “सर रामदास मेला आहे. पण आता काय करायचं. प्रेताची विल्हेवाट कशी
लावायची... कोणी पाहिलं तर...” मोरे सरांनी थोडा विचार केला. बाजूला पडलेल्या
कागदावर काहीतरी खरडलं आणि तो कागद रामदासच्या शर्टाच्या खिशात टाकला. ते म्हणाले,
“अरे विचार कसला करताय... ही तर आपल्याला मिळालेली संधी आहे... याच्या गळ्यात दोर
अडकवून लटकवा त्याला पंख्याला. ते स्टूल इथे खाली आडवं पाडा आणि चतुर्वेदी, एक काम
कर. यातल्या थोड्या पुड्या रामदासच्या खोलीत लपवून ठेव. दाराला कडी लावू नका. आता
बघाच, करून सावरून आपण निराळे राहू आणि नाव खराब होईल या रामदासचं.” सोमवारी सकाळी
गोडबोले सर रामदासला शोधत मोरे सरांकडे आले. “काय झालं गोडबोले सर. इतके का
त्रासिक दिसताय...” काही ठाऊक नसल्याचा आवं आणत मोरे सर म्हणाले. गोडबोले सर थोडे
बेचैन दिसत होते. म्हणाले, “अहो काय सांगू सर तुम्हाला. मी या राम्याला
प्रयोगशाळेत तयारी करायला सांगितली होती. पण याचा कुठे पत्ताच नाही. बरं सकाळपासून
मला रिपोर्टसुद्धा केला नाही त्याने. कुठे उलथलाय कोणास ठाऊक...” “अहो काल रविवार
होता ना, असेल इथेच कुठेतरी... तुम्ही जाऊन प्रयोगशाळेत बघा बरं... कदाचित त्याने
तयारी करून ठेवली असेल...” मोरे सर शांतपणे म्हणाले पण मनातून मात्र ते आनंदले
होते. गोडबोले सर प्रयोगशाळेकडे गेले. पाहिले तर दरवाजा उघडा होता. त्यांनी दार
ढकललं आणि समोरचं दृश्य पाहून त्यांची पाचावर धारण बसली. रामदासचा देह पंख्याला
लटकलेला होता. गोडबोले सरांनी जोरदार किंकाळी फोडली...
इंस्पेक्टर वाघ पोलीस कुमक घेऊन घटनास्थळी
पोहोचले. रामदासचा देह खाली उतरवला गेला. वाघांना खिशात चिठ्ठी सापडली. त्यांनी ती
वाचली, “पैशासाठी मी हे कृत्य केलं... पण आता पकडला जाईन या भीतीपोटी मी स्वत:ला
संपवत आहे...” आजूबाजूला पडलेल्या पावडरचा त्यांनी वास घेतला. हवालदाराला ताबडतोब
रामदासच्या खोलीची झडती घ्यायला पाठवलं. काही क्षणातच हवालदार तीन-चार पुड्या घेऊन
आला. इंस्पेक्टर वाघांनी मोरे साहेबांना सांगितलं, “मिस्टर मोरे, its an open and shut case. हा तुमचा शिपाई रामदास,
कॉलेजच्या आड drug trafficking करायचा. ही आजूबाजूला
पडलेली पावडर ब्राऊन शुगर आहे. शिवाय या पुड्या आणि ही चिठ्ठी... पुरावे तुमच्या
सामोर आहेत. काय करायचं बोला...” मोरे सरांना आयतंच कोलीत मिळालं होतं. ते लगेच
म्हणाले, “साहेब, हे जर बाहेर समजलं तर कॉलेजची खूप बदनामी होईल. तुम्ही ही केस
बंद करा.” हे ऐकताच पोलीसांनी गाशा गुंडाळला आणि ते मार्गस्थ झाले. मोरे सरांच्या
केबिनमध्ये मोरे, डिसिल्वा आणि चतुर्वेदीने एकमेकांना विजयी आनंदाने टाळ्या
दिल्या. त्याच रात्री डिसिल्वा
आणि चतुर्वेदी त्याच्याच खोलीत पीत बसले होते. इथे मोरे सरमात्र बचैन होते. ते
विचार करू लागले, “हे संकट तर टळलं पण पुढे असं परत होणार नाही कशावरून... तो
डिसिल्वा आणि चतुर्वेदी दोघं तद्दन मूर्ख आहेत. त्यांच्यामुळे अजून कशात
अडकण्यापेक्षा हाताशी असलेले पैसे आणि ड्रग्स घेऊन इथून निघून गेलं तर...” मोरे
सरांनी होतं नव्हतं ते सगळं सामान गोळा केलं आणि ते रात्रीच पसार झाले. इकडे बराच
वेळ पार्टी झोडल्यावर डिसिल्वा परत निघाले तर त्यांना प्रयोगशाळेत प्रकाश दिसला.
त्यांनी वर जाऊन पाहिलं तर आत कोणीच नव्हतं. ते परत फिरणार इतक्यात दार बंद झालं.
आता डिसिल्वा सर घाबरले. वाऱ्याची एक झुळूक त्यांच्या कानाला चाटून गेली. त्यांनी
मागे पाहिलं तर त्यांच्यापासून इंचभर लांब उभा असलेला रामदास त्यांना दिसला. भीतीने
त्यांची गाळणच उडाली. जोरदार किंकाळीने चतुर्वेदीला जाग आली. त्याने कॉलेजच्या
अंगणात येऊन कानोसा घेतला. प्रयोगशाळेतला प्रकाश पाहून तो अवाक झाला. तो वर
पोहोचला आणि लांबूनच त्याने आवाज दिला, “कोण आहे तिथे...” “अरे चतुर्वेदी, इकडे
ये. हे बघ काय...” आतून डिसिल्वा सरांचा आवाज ऐकून चतुर्वेदी लगेच तिथे गेला...
डिसिल्वा सरांची अवस्था पाहून त्याच्या
तोंडातून शब्द फुटेना. रामदासप्रमाणेच त्यांचाही मृतदेह पंख्याला लटकलेला होता.
त्यांच्या गळ्यातील दोराची एक बाजू वाढत जाऊन चतुर्वेदीच्या गळ्याभोवती गुंडाळली
गेली. चतुर्वेदी हवेत उडवला गेला. फास त्याच्या गळ्याभोवती आवळत चालला होता. तो
मारणार हे उघड होतं. त्याने प्रयत्नांची शर्थ केली. आचके देत असताना त्याला समोर
उभा असलेला रामदास दिसला. त्याही अवस्थेत चातुर्वेदीचे डोळे विस्फारले आणि तो
गतप्राण झाला. दुसऱ्या दिवशी विद्यार्थी आपापल्या वर्गाकडे जात असताना काहींचे
लक्ष सहज प्रयोगशाळेकडे गेले. उघडे असलेले दार आणि पंख्याला लटकलेले दोन मृतदेह
त्यांनी पाहिले आणि एकच गोंगाट झाला. गोडबोले सर आणि इतर मंडळी तिथे आली. मोरे
सरांना बोलवायचे म्हणून ते केबिनजवळ आले तर तिथे एक चिठ्ठी होती. लिहिलं होतं,
“रामदासच्या मृत्यूने मी खूप दुखावलो गेलो आहे. त्यामुळे मी हे शहर सोडून जात आहे.
माझा राजीनामा मी नंतर पाठवून देईन. पोलीस तपास पुन्हा सुरू झाला. इंस्पेक्टर
वाघांच्या हाती याही वेळी काही लागलं नाही. त्यांनी प्रयोगशाळा सील केली.
विद्यार्थीही आता पाचव्या मजल्यावर जायला घाबरायला लागल्याने गोडबोले सरांनी शेवटी
तिथल्या सर्व खोल्यांना कुलूप घातलं...
आरशात पुन्हा धूर दिसू लागला. काळ पुन्हा परत
आला होता. हे सगळं पाहून आपटे सर स्तब्ध झाले. त्यांना काहीच सुचत नव्हतं. ते
विचार करू लागले, “म्हणजे रामदासची हकीगत जी सर्वांना माहित आहे त्याला हाही एक
पैलू होता... विश्वासच बसत नाही माझा... नाही... सत्याला वाचा फुटलीच पाहिजे...
इंस्पेक्टर वाघांची भेट घ्यायला हवी. खऱ्या गुन्हेगाराला शासन व्हायलाच हवं...”
दुसऱ्याच दिवशी आपटे सर इंस्पेक्टर वाघ यांना भेटले. वाघांनी सगळं ऐकून घेतलं. ते
म्हणाली, “मिस्टर आपटे, तुम्ही जे सांगताय त्यात तथ्य असेलही... मिस्टर डिसिल्वा
आणि चतुर्वेदीचे मृतदेह त्याच अवस्थेत सापडणं, मोरे सरांचं गायब होणं, यात काहीतरी
गडबड आहे हे मला जाणवलं होतं. पण साहेब, कायदा पुरावा मागतो. असंतुष्ट आत्मा, अपुरी
इच्छा, असल्या गोष्टी म्हणजे न्यायदेवतेला भाकड कथा वाटतात. हा... पण मिस्टर मोरे
जर सापडले तर काहीतरी करता येईल. या कामात तुम्हाला लागेल ती मदत मी करेन...” आपटे
सरांनी ताबडतोब कॉलेजला येऊन बापट सर आणि गोडबोले सरांची भेट घेतली. त्यांना सर्व
हकीगत सांगितली. ते म्हणाले, “गोडबोले सर, तुम्हाला प्रयोगशाळेत जाऊन बघायला कोणी
सांगितलं... मोरे सरांनीच ना... तुम्ही म्हणालात रामदासने लिहिलेल्या चिठ्ठीत,
“पैशासाठी मी हे कृत्य केलं... पण आता पकडला जाईन या भीतीपोटी मी स्वत:ला संपवत
आहे...” असं लिहिलं होतं. सर, जो माणूस स्वत: अशुध्द बोलतो तो शुद्ध भाषेत चिठ्ठी
कसा लिहील...” गोडबोले सर हे ऐकून गडबडले. म्हणाले, “या गोष्टीचा विचारच नाही केला
मी. पण आता...” आपटे सरांनी थोडा विचार केला आणि म्हणाले, “गोडबोले सर, तुम्ही
म्हणालात मोरे सरांचा राजीनामा पोस्टाने आला. त्यावरचा शिक्का सांगू शकेल मोरे सर
कुठे गेले. तिथे चौकशी केली तर... आणि या कामात इंस्पेक्टर वाघ आपली मदत करतील
कारण त्यांनाही तेच वाटतं आहे जे माझ्या मनात आहे पण त्यांचे हात कायद्याने बांधले
आहेत.” तिघांनाही हा विचार पटला आणि इंस्पेक्टर वाघांना आपटे सरांनी फोन लावला...
इंस्पेक्टर वाघांनी शोधाशोध केली आणि समजलं की
मोरे नागपूरला आहेत. त्यांचा नंबर मिळवून वाघांनी आपटे सरांना दिला. मोरेला इथे
कसं बोलवावं याचा विचार ते करत होते. त्यांना काहीतरी सुचलं आणि आपटे सरांनी
संपर्क साधला आणि आवाज बदलून म्हणाले, “Hello, मोरे, मी डिसिल्वा बोलतो आहे. तुझा नंबर कसा
मिळाला ते महत्वाचं नाही. चार वर्षांपूर्वी आम्हाला तसाच सोडून पळून गेलास ना...
तुझ्यासाठी खुशखबर आहे... पोलीसांना सुगावा लागला आहे... उद्या रात्री साडे दहा
वाजता सरस्वती कॉलेजला मला भेट नाहीतर पोलीसांना सगळं सांगेन आणि तुझा पत्ताही
देईन...” फोन बंद झाला. रात्रीचे अकरा वाजले होते. कॉलेजच्या गेटजवळ एक आकृती
दिसली. ते मोरे सर होते. त्यांच्या हातात एक जाडजूड काठी होती. मोरे सर आवारात
आले. सर्वत्र सामसूम आहे पाहून जरा अचंभित झाले. इकडे तिकडे पाहत असताना, “या या
मिस्टर मोरे, स्वागत आहे तुमचं...” या आवाजाने ते दचकले. आवाज डिसिल्वाचा वाटला. त्यांनी
पाहिले तर आपटे सर समोरून चालत येत होते. मोरे सर म्हणाले, “तुम्ही... डिसिल्वाचा
आवाज काढून तुम्हीच बोलत होता ना... कोण आहात तुम्ही... हा काय प्रकार आहे...”
आपटे सर म्हणाले, “मी देवेंद्र आपटे, या कॉलेजचा प्रिंसिपल. तुम्हाला इथे बोलवायचं
म्हणून हा सगळा डाव रचला आहे. आठवतंय का चार वर्षांपूर्वी तुम्ही काय केलं होतंत
ते... का तुमच्या सैतानी मेंदूने त्याही आठवणी पुसून काढल्या...” आपटे सर भडकलेले
पाहून मोरे सर हसले. म्हणाले, “आठवतंय तर... कसा विसरेन मी... आणि तुम्ही मला इथे
बोलावलं आहे म्हणजे तुम्हाला सगळं समजलं आहे तर... मग तुम्हाला कसा सोडणार मी...
तुम्हाला काय वाटलं... माझ्यासारखा निर्ढावलेला माणूस एकटाच येईल... मागे पहा...
माझी माणसं तुमच्या समाचारासाठी सज्ज आहेत...” आपटे सरांनी मागे पाहिलं आणि मोरे
सरांनी त्यांच्या हातातल्या काठीने आपटे सरांच्या डोक्यात वार केला. आपटे सर
कोसळले. “चला आपटे सर. तुम्हालाही रामदासच्या वाटेने स्वर्गात पाठवतो...” असं
म्हणत मोरे सर बेशुद्ध असलेल्या आपटे सरांना ओढू लागले...
ते पाचव्या मजल्यापर्यंत पोहोचले. तिथून ते
आपटे सरांना खाली टाकणार इतक्यात वाऱ्याची झुळूक त्यांना स्पर्शून गेली. मोरे सर
गडबडले. आपटे सर त्यांच्या हातून निसटले पण ते हवेत अधांतरीच राहिले. हळू हळू ते
खाली येऊन जमिनीवर ठेवले गेले. हे पाहून मोरे सरांनी डोळे विस्फारले. पुन्हा
वाऱ्याची झुळूक त्यांना स्पर्श करून गेली. त्यांनी मागे पाहिलं तर हवेत एक घंटा
अधांतरी उभी होती. ती घंटा तीव्र वेगाने मोरे सरांवर आदळली. मग घंटेने सटासट मोरे
सरांवर वर केले. त्यांचा चेहरा रक्ताने माखला होता. आपटे सरांना शुद्ध आली.
त्यांनी पाहिलं तर प्रयोगशाळेचं दार उघडलं गेलं आणि जोरदार लाथ बसावी तसे मोरे सर
हवेत फेकले जाऊन प्रयोगशाळेत पडले. आपटे सर ताबडतोब उठले आणि प्रयोगशाळेकडे धावले.
घंटेच्या वारांनी मोरे सर अर्धमेले झाले होते. आपटे सर म्हणाले, “थांब रामदास...
याला मारलंस तर तू कधीच निर्दोष ठरणार नाहीस. याला त्याच्या कृत्याची कबुली देऊ
दे...” मोरे सर हवेत उडाले. दोराचा फास झाला आणि त्यांची मान त्यात अडकवली गेली.
आपटे सर म्हणाले, “नीच माणसा, डिसिल्वा आणि चातुर्वेदीने तर फक्त रामदासचा खून
केला पण खरा गुन्हेगार तूच आहेस... तू रामदासला आयुष्यातून उठवलंस. त्याच्या
कुटुंबाची काय दशा झाली असेल... काबूल कर तुझं कृत्य...” आधीच घाबरलेल्या मोरे
सरांनी लगेच बोलायला सुरुवात केली, “मी कबूल करतो रामदासवर खोटा आळ माझ्यामुळे
आला. खरा गुन्हेगार मीच आहे. मीच ड्रग्स विकत होतो आणि डिसिल्वा आणि चतुर्वेदी
माझी मदत करत होते. रामदासने आम्हाला ड्रग्ससकट पाहिलं म्हणून आम्ही त्याला संपवलं
आणि ड्रग विक्रीचा व्यवसाय तोच करतो असं भासवलं...”
पोलीस लगेच आत आले. मोरे सर खाली कोसळले.
इंस्पेक्टर वाघ त्याला घेऊन निघून गेले. आपटे सर सुद्धा निघायच्या बेतात होते की
एक प्रकाशझोत त्यांच्यावर आला. त्यांनी पाहिलं तर आरशात रामदास होता. आता त्याचा
चेहरा पूर्ण स्वच्छ दिसत होता. त्याने आपटे सरांना हात जोडले. खऱ्या गुन्हेगाराला
शिक्षा होऊन रामदासवरचं बालंट दूर झालं होतं...
समाप्त.
No comments:
Post a Comment