"जरा दार उघडून दे ना... पावसामुळे लाकूड फुगून जाम झालं असेल कदाचित." दाराला चावी लावत बायको म्हणाली. CID Inspector Dayaचं नाव घेऊन तो जाम झालेला दरवाजा मी जोर लावून उघडला. "हा दरवाजा किती कठीण झालाय उघडायला. आज तू होतास म्हणून. पण उद्याचं काय...!!" आत येत सौ म्हणाली. "मी करतो काहीतरी." असं म्हणून उलट्या पावली सुताराच्या शोधात निघालो...
हल्ली हे सुतारही इतके डांब्रट झालेत ना... "दरवाजेको रंधा मारने का है" असं म्हणताच, "साब, जरा बड़ा काम निकालो ना, इत्ते में क्या मिलेगा मुझे..." अशी उत्तरं मिळतात. मान खाली घालून मी घरी परतलो. बायकोच्या चेह-यावर प्रश्नचिन्ह पाहिलं आणि तिने काही विचारायच्या आत मी म्हणालो, "अगं, एकही सुतार तयार नाही, पण तू काळजी नको करूस, मी बघतो". असं म्हणून पुरावे गोळा करण्यासाठी Senior Inspector Abhijeet जसा सगळीकडे शोध घेतो तसेच मीही पूर्ण घर पिंजून काढलं...
माझ्या या शोधमोहिमेतून एक लोखंडाचं पातं सापडलं. मग काय विचारता... गणपतीचं स्मरण केलं नी लागलो कामाला. पाच मिनिटं, दहा, पंधरा... माझी घासाघीस सुरूच होती. जवळपास वीसएक मिनिटांनंतर धबधब्यात उभ्या मंदाकिनीसारखा घामाच्या धारात ओलाचिंब होत मी बाजूला झालो. सौंनी सहज दरवाजा लोटला तर तो अलगद लागला. पुन्हा उघडण्याचा प्रयत्न करताच पटकन उघडला. "भले शाब्बास रे माझ्या पठ्ठ्या. माझं मोठ्ठं काम केलंस..." बायकोच्या उद्गारांनी मी हुरळून गेलो पण हा आनंद पुढच्याच वाक्याने हिरावून घेतला, "मला काय वाटतं, बँकेची कामं झाली की फावल्या वेळेत किंवा सुट्टीत तू सुतारकामाचा side business का करत नाहीस..!"
तुम्हाला सांगतो, या बायका म्हणजे.....
@ अनिकेत परशुराम आपटे.
No comments:
Post a Comment