काल फारा दिवसांनी न्हाव्याकडे जाण्याचा योग आला. आता न्हावीच तो... गप्पा थांबणार आहेत थोड्याच... त्याच्या अनेक विषयांच्या अगम्य बडबडीत एक सुखावणारी गोष्ट अशी की तो सारखा बोलत होता, "दादा, केस भारी हायेत तुमचे... येकदम सिल्की... कातर आपोआप चालते बघा... माझा आनंद डोक्यात मावेनासा झाला. पण आनंदावर विरजण घालणार नाही तर तो न्हावी कसला... मी निघताना त्याच्या श्रीमुखातून आकाशवाणी झाली, "दादा, कपाळावरचे केस बगा विरळ होत चाललेत. तुम्हाला लवकरच टक्कल पडेल. ट्रीटमेंट करून घ्या हो..."
अस्सा राग आला होता त्या न्हाव्याचा... पण करतो काय... पहिल्याच बॉलवर क्लीन बोल्ड झाल्यागत खाली मान घालून घराकडे परतलो. सौंनी विचारताच सर्व हकीगत सांगितली. त्यावर त्या म्हणतात कशा, "चला, आता मुद्दाम मनीला सांगावं लागणार नाही, की आत्त्या म्हण... या, मागे सरकलेल्या जंगलाकडे पाहत मुली स्वत:च तुला भैया म्हणून मोकळ्या होतील... नाही का..." आधी त्या न्हाव्याने माझा त्रिफळा उडवला आता आमच्या सौंनी मला stumped out केलं...
मला जामच राग आला होता. मी म्हणालो, "अभी तो मैं जवान हूँ... लागली पैज... आज शनिवार आहे. संध्याकाळी बाहेर जाऊ... बघ, एकही मुलगी मला भैया म्हणणार नाही..." मंडळींनी थोडा विचार केला. म्हणाल्या, "ठीक आहे. मी हरले तर तुला हवी असलेली खिचडी करेन. पण तू हरलास तरमात्र आपण हॉटेलमध्ये जायचं... कबूल..." मी लगेच "Done..." म्हणत अंगठा दाखवला...
संध्याकाळ झाली. जीन्स, टी-शर्ट अशा झकास पेहेरावत हीरो बनून बाहेर पडलो. Saturday evening असल्याने प्रेक्षणीय स्थळांची ही गर्दी... त्यातली एक मुलगी माझ्या दिशेने येऊ लागली... माझ्या मनात कारंजी फुलू लागली. मी हिला खिजवण्यासाठी म्हणालो, "ती ललना बघ काय सुरेख दिसते... सुंदर चेहरा, सुडौल बांधा... आणि इतक्या लोकात माझ्याचकडे येत आहे..." त्यावर बायकोने "हममम...." असे उद्गार काढले. ती मुलगी जवळ आली. तिने तोंड उघडले आणि जणू काही कारंज्याचं पाणीच जाऊन कारंजे फुसकन बसले... ती मुलगी म्हणते कशी, "अंकल... यह अॅड्रेस बता दो ना..." हाय रे माझ्या कर्मा... अंकल... नहीं... यह सुनने से पहले मेरे कान क्यौं नहीं फट गए... त्या ललनेने मला हिटविकेटच केलं की राव... त्यावर आमच्या सौंनी माफक सूर काढला, "कुठल्या हॉटेलमध्ये जाऊया..."
@ अनिकेत परशुराम आपटे.
No comments:
Post a Comment